कॅनियन म्हणजे मोठ्या डोंगरांच्या मधील खोल दरी. बऱ्याच कॅनियनमधून नदी किंवा पाण्याचा प्रवाह वाहताना आढळतो. ग्रैंड कॅनियन या अमेरिकेतील युटा, अरिझोना आणि नेवाडा या ३ राज्यांमध्ये पसरल्या आहेत. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गनिर्मित भूभाग बघायला मिळतात. ग्रैंड कॅनियनला ४ दिशांनी जाता येते. पूर्व भागामध्ये आर्चेस, कॅनियन लैंड, अन्टोलोप कॅनियन, होर्शू बेंड, ब्राईस कॅनियन इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात.
मित्रांकडून आणि ऑफिसमधील काही स्थानिक लोकांच्या सल्ल्यानंतर आम्ही शेवटी युटा आणि अरिझोना राज्यांमध्ये असणाऱ्या इस्ट रिमला जाण्याचे ठरवले. दगड माती मध्ये फारसा रस नसल्याने मी या सहलीकडून फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण या सहलीने वाळवंट आणि कोरडे प्रदेशसुद्धा फारच सुंदर असू शकतात याची जाणीव मला करून दिली.
सर्वात आधी काहींना युटा आणि अरिझोना अमेरिकेत नक्की कुठे आहेत असा प्रश्न पडू शकतो (इथे येण्याआधी तो मलासुद्धा पडला होता). त्यामुळे माहितीसाठी लेखामध्ये हा नकाशा लावत आहे.

लेखातील सर्व फोटो आम्ही आमच्या फोनमधुनच काढले आहेत.
आर्चेस, कॅनियनलैंड्स आणि ब्राइस कॅनियन राष्ट्रीय उद्याने, युटा
युटा आणि त्याच्या दक्षिणेकडील भाग वाळवंट असल्याने या भागातील डोंगर व खडक मुख्यत्वे वाळूपासून बनलेल्या (Sand Stone) प्रकारात मोडतात. त्यामुळे ते निसर्गतःच पिवळे, केशरी, गुलाबी आणि लाल रंगाचे असतात. याशिवाय ते फार घन किंवा टणक नसतात. लाखो वर्षे बर्फ, पाऊस, ऊन आणि वारा याचा परिणाम होऊन या डोंगरांमध्ये खिडक्या तयार होतात यालाच इंग्लिशमध्ये आर्चेस असे म्हणतात. आर्चेस राष्ट्रीय उद्यानामध्ये अशा खडकांमधल्या असंख्य खिडक्या तयार झाल्या आहेत. याशिवाय मोठ्या खडकांची झीज होऊन निरनिराळ्या प्रकारचे आकार निर्माण झाले आहेत.
आर्चेस राष्ट्रीय उद्यानाच्या सुरुवातीलाच दगडांची ही सुंदर कलाकृती पाहायला मिळते.
संतुलित खडक (बैलन्स्ड रॉक)
मोठ्या खडकाखालील भागाची झीज होऊन हा खडक जणू हवेत तरंगतच आहे.
इतर काही खिडक्या (आर्चेस)
डेलिकेट आर्च
युटा राज्याचे मानचिन्ह असणारी डेलिकेट आर्च पाहण्यासाठी जवळ जवळ दोन-अडीच
मैल (सुमारे ४ किलोमीटर) डोंगर चढून जावे लागते. पायवाट बरी असली तरी चढ
आणि अंतर बऱ्यापैकी मोठे आहे. डेलिकेट आर्च बघायला जात असताना कमीतकमी दहा
वेळा मला वाटले असेल की एवढे कष्ट करून असा काय चमत्कार बघायला मिळणार आहे
कोणास ठाऊक. पण जेव्हा आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा निसर्गाची अद्भुत कलाकृती
पाहायला मिळाली. सुमारे ६० फूट उंच खडकामध्ये ४८ फूट उंच खिडकी (आर्च)
तयार झाली आहे.
सूर्यास्ताच्या वेळी या लालसर गुलाबी रंगाच्या आर्चवर केशरी सोनेरी ऊन पडल्यावर ती विलक्षण सुंदर दिसते. डेलिकेट आर्चचा सुर्यास्ताचा क्षण हा नक्कीच आयुष्यातल्या मोजक्या स्वर्गीय क्षणांपैकी एक होता यात मला अजिबात शंका नाही.
कॅनियनलैंड्स राष्ट्रीय उद्यान
कॅनियनलैंड्स राष्ट्रीय उद्यान हे आर्चेसच्या साधारण समोरच आहे. दोन्हीमधील अंतर फार फार तर २५-३० मैल असेल. आर्चेसच्या अविस्मरणीय अनुभवानंतर आम्ही दुसऱ्यादिवशी कॅनियनलैंड्सला जायचा बेत आखला. पण आर्चेसशी तुलना करता कॅनियनलैंड्स फार काही विशेष पाहायला न मिळाल्याने थोडा हिरमोड झाला आणि दिवसही वाया गेल्यासारखे वाटले. संध्याकाळी हॉटेलवर आल्यावर ऑफिसमधल्या अमेरिकन मित्राचा फोन आला. त्याने मी अजून कॅनियनलैंड्सच्या जवळच असल्याची खात्री करून मला कॅनियनलैंड्समधली मेसा आर्च सुर्योदयाच्यावेळी पाहण्याचा सल्ला दिला. बायकोशी चर्चा करून, हो-नाही करून आम्ही सूर्योदयापूर्वी मेसा आर्च गाठली.
सूर्योदय हा बरोब्बर मेसा आर्चच्या मागे होतो हे कळल्यावर आणि सकाळी ५.३० वाजता तिथे असलेली गर्दी पाहून आपल्याला काहीतरी अद्भुत पाहायला मिळणार याची मला खात्री झाली. आमच्या सुदैवाने आकाशही अगदी मोकळे होते.
जशी जशी सूर्योदयाची वेळ होऊ लागली तशी तशी मेसा आर्च पिवळी आणि मग हळूहळू केशरी सोनेरी होऊ लागली.
सूर्योदयापुर्वीची मेसा आर्च


मेसा आर्चचा सूर्योदय

मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने मी अनुभवले. मला एखाद्या वेगळ्याच विश्वात असल्यासारखे वाटले आणि याच अवस्थेत आम्ही ब्राइस कॅनियन राष्ट्रीय उद्यानाला जाण्याचा प्रवास सुरु केला.
अमेरिकन साउथवेस्टातला युटा, अरिझोना, कोलोराडो आणि न्यू मेक्सिको या चार राज्यांचा भाग हा नेटिव्ह प्युब्लो किंवा अनासाझी लोकांचा भाग. साउथवेस्टात अनासाझी लोकांच्या पाच मोठ्या रिजन मानल्या जातात, त्यापैकी सगळ्यात मोठी 'मेसा वर्दे रिजन'. या लेखातले आर्चेस आणि कॅनियनलैंड्स पार्क याच मेसा वर्दे रिजन मधलेच. या अनासाझी लोकांचा इतिहासही मोठा रंजक आहे. कोलोराडोतल्या मेसा वर्दे नेशनल पार्कात तर त्यांच्या जुन्या खेड्यांसह जवळपास ५००० पुरातन घरांना संरक्षित करण्यात आलेय. इ.स. ६०० पासून इ.स. १३०० पर्यंत या भागात नांदणारी ही लोकं तेराव्या शतकाच्या अखेरीस अचानक इथून नाहीशी झाली. काही ठिकाणी घर दारं जशीच्या तशी सोडून तर काही ठिकाणी सगळं जाळून! हे मायग्रेशन होते का अजून काही? मायग्रेशन असेल ते फ़ोर्सड होते, अत्याचारी नवीन जमातीला कंटाळुन केलेले (exodus) होते का अजून काही विशिष्ठ परिस्थिती मुळे उद्भवले होते? हे आजही न उकलेले कोडे आहे. त्याबद्दल अनेक थेअरीज आहेत पण नक्क्की कारण माहित नाही.
ब्राईस कॅनियन, होर्शू बेंड आणि अन्टोलोप कॅनियन
आतामात्र माझे निसर्ग सौंदर्याबद्दलचे मत बदलायला सुरुवात झाली होती आणि
ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यानात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता मनाला
लागली होती.
ब्राईस कॅनियन राष्ट्रीय उद्यान हे युटा राज्यात आहे. लाखो वर्षे बर्फ,
पाऊस, ऊन आणि वारा याचा परिणाम होऊन येथील डोंगरांची झीज होऊन उंचच उंच
सुया किंवा सुळके (Needles) झाले आहेत. शेकडो एकर परिसरात लालसर गुलाबी
रंगाचे हे सुळके हजारो वर्षांपासून उभे आहेत. याशिवाय बाकीच्या डोंगरांची
अशीच झीज सुरु असून नवीन नवीन सुळके तयार होत आहेत.
ब्राईस कॅनियनमधल्या खडकांच्या हजारो सुया
ज्यांची १५० ते २०० फुट खाली उतरून परत वर चढायची तयारी असते त्यांना या सुया पाहायला खाली उतरून आत सुद्धा जाता येते.
खाली उतरून आतून दिसणारी खडकांच्या सुया

लेखाच्या पहिल्या भागात लिहिलेली संध्याकाळच्या उन्हाची जादू ब्राईस कॅनियनमध्ये सुद्धा बघायला मिळते. सूर्यास्ताच्यावेळी या सुया म्हणजे शेगडीतले धगधगणारे निखारेच भासतात.
सूर्यास्ताला दिसणारे धगधगणारे निखारे (फायरी फर्नेस)
होर्शू बेंड (घोड्याची नाल)
कोलोराडो नदी अरिझोना राज्यातल्या डोंगर दर्यांमधून वाहते. पेज या छोट्या
शहराजवळ ती एका डोंगराला गोल वळसा घालते. उंचावरून पाहिल्यावर याचा आकार
घोड्याच्या नालेप्रमाणे दिसतो. ही जागा होर्शू बेंडम्हणून प्रसिध्द आहे.
होर्शू बेंड हा निसर्गाचा अजून एक चमत्कार म्हणावा लागेल. तशी ही जागा
हल्ली हिंदी सिनेसृष्टीतही लोकप्रिय होत आहे. मध्ये वरुण धवनच्या
कुठल्याश्या गाण्याचे चित्रीकरण झाले होते इथे.



होर्शू बेंडचे आमचे फोटो फार काही चांगले न आल्याने हे फोटो गुगल फोटोवरून घेतलेले (उचललेले) आहेत.
अन्टोलोप स्लॉट कॅनियन
होर्शू बेंडपासून थोड्याच अंतरावर अन्टोलोप स्लॉट कॅनियन आहेत. जमिनीखाली
५० ते ६० फुट खोल या कॅनियन पाण्याच्या प्रवाहाने तयार खाल्या आहेत. या
कॅनियन म्हणजे वाळू (Sand Stone), हवेचा दाब आणि पाण्याच्या प्रवाहाने तयार
केलेल्या अतिशय सुंदर नैसर्गिक कलाकृतीच आहेत. कॅनियन पाहायला अरुंद
जिन्याने ५०-६० फुट खोल उतरून जावे लागते. कॅनियन पाहताना जिथे थोडाफार
सूर्यप्रकाश आत येतो तिथे अतिशय सुंदर रंगसंगती निर्माण होते.
अन्टोलोप कॅनियनच्या वर असणारा खडकांचा थर
अन्टोलोप स्लॉट कॅनियनचे काही फोटो
ब्राईस कॅनियन-
ब्राईस कॅनियन पार्कच्या वावात जरी 'कॅनियन' असले तरी हे नदीने कोरलेले कॅनियन नाहीत तर वातावरणाने झीज झालेली दरी आहे.
ब्राईस कॅनियन मधल्या नीडल्स तिथले स्थानिक 'हुडू' (hoodoo) या नावाने
ओळखतात. पहिल्यांदा पाहिले तेव्हा वाटले हे कॅनियन आपल्याकडे असते तर
शिवलिंग म्हणुन पूज्य ठरले असते :-). मोटर टुरिंग बरोबर इथल्या छोट्या
मोठ्या ट्रेल्स हुडुंच्या मनोहारी जादुई विश्वात फिरवून आणतात, सनराईज आणि
सनसेट पोईंट ला योग्य वेळी पोचलात तर खरोखर मंत्रमुग्ध करणार नजारा दिसतो,
आधीच्या लेखात एका प्रतीसादाकाने म्हटल्याप्रमाणे 'इट इज अनादर वर्ल्ड'.
इतक्या सुंदर ठिकाणाबद्दल लोककथा नसेल तर नवलच, तिथल्या म्युजिअम मध्ये वाचलेल्या गोष्टीचे हे स्वैर भाषांतर -
फार फार शतकांपूर्वी, हिमायुगानंतर थोड्या काळने या भागात 'टु-व्हेन-एन-अंग-वा' लोक रहायचे. खरे तर 'टु-व्हेन-एन-अंग-वा' खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, त्यांच्यापैकी काही पक्षी होते तर काही प्राणी होते तर काही चक्क सरपटणारे प्राणी होते ! 'टु-व्हेन-एन-अंग-वा' मुळात माणसं नव्हतीच, त्यांच्याकडच्या जादुई शक्ती वापरून ते फक्त माणसांसारखे दिसायचे.
वर्षानुवर्षे तिथे राहून 'टु-व्हेन-एन-अंग-वा' बेदरकार झाले होते, त्यांचे वागणे उन्मत्त होते. निसर्गाने दिलेल्या मर्यादीत अन्न पाण्याची ते उधळपट्टी करत होते. वसंतात सगळ्या झर्यांचे पाणी ते पिउन टाकत आणि बाकीचे प्राणी तहानलेलेच राहत, पानगळीच्या ऋतूमध्ये ते सगळे पाईन नट्स खाउन टाकत, त्यामुळे बाकी प्राण्यांना हिवाळ्यात तग धरणे मोठे अवघड होई.
वर्षानुवर्षे त्यांची ही मनमानी सहन केल्यावर शेवटी सगळ्या प्राण्यांनी तिथे रहाणार्या लांडग्याला शरण जायचे ठरवले. हा लांडगा साधा नसून काळ्या जादूचा मोठा जादुगार होता. लबाड लांडग्याने त्यांना जरा कल्पकतेने शिक्षा द्यायचे ठरवले. त्याने एक मोठी मेजवानी जाहीर केली आणि असे निमंत्रणात असे सांगितले की सगळ्यांना दिवसभर खाता येईल इतके अन्न मेजवानीला असणार आहे. युटासारख्या वाळवंटी आणि दुष्काळी भागात अश्या मेजवानीची दवंडी ऐकून सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' मोठे खुश झाले. झाडून सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' त्यांचे उत्तमोत्तम रंगेबीरंगी पोशाख घालून हजर झाले. मोकळ्या आकाशाखाली मेजवानीची जय्यत तयारी होती. हीच संधी योग्य समजून लांडग्याने त्याचे मायाजाल फेकले आणी सगळे 'टु-व्हेन-एन-अंग-वा' तत्क्षणी दगडाचे झाले. ते आजही तिथे तसेच उभे आहेत. वार्या पावसाने त्यांची झीज झालीये, चेहरे आकार अस्पष्ट झालेत, पण ते अजून तिथेच उभे आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.