Monday, August 12, 2024

फ्रेंच बोलणारा आफ्रिका

 

- - शैलेश मुळे

आफ्रिका म्हणल्यावर काही ठरावीक देश पटकन आपल्या नजरेसमोर येतात. गांधीजींच्या जीवनामुळे माहीत झालेला दक्षिण आफ्रिका, पुरातन इतिहास आणि पिरॅमिड यांच्यामुळे ज्ञात असलेला इजिप्त, कॉफीची मातृभूमी इथिओपिया, विविध जंगली श्वापदांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेला टांझानिया, त्याचबरोबर समुद्री चाच्यांच्या उपद्रवामुळे माहीत झालेला सोमालिया हे देश बहुतेकांच्या ऐकण्यातले असतात. एका बाजूला जगातील सर्वात मोठा वाळवंट असूनही दुसरीकडे सदाहरित निबीड अरण्य असलेला प्रदेश अशा विरोधाभासाचा खंड म्हणून आफ्रिकेची ओळख आहे. या महाकाय खंडात विविध प्रकारच्या भौगोलिक रचना, निसर्ग सौंदर्य, विविध प्राचीन संस्कृती आणि अनेक भाषा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. नैसर्गिक साधन संपत्तीने गर्भश्रीमंत असलेल्या या खंडाकडे व्यापाराच्या नव्या संधी शोधणाऱ्या मध्ययुगीन युरोपीय देशांचे लक्ष जाणे साहजिकच होते.

आफ्रिकेचे वसाहतीकरण

पंधराव्या शतकात युरोपातून पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी जलमार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून आफ्रिका खंडाला वळसा घालून जाणारा समुद्री मार्ग पोर्तुगिजांनी शोधला. लवकरच त्या मार्गावरून आलेल्या विविध युरोपीय सत्तांनी भारताशी आणि आशिया खंडाशी व्यापार करण्याबरोबरच आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांवर आपले अधिपत्य स्थापन केले. आफ्रिकेपुरते बोलायचे झाले तर तिथे असलेल्या अनेक स्थानिक जमातींच्या आपापसांतल्या भांडणांमुळे युरोपीय सत्तांना तेथे स्थिरावणे शक्य झाले. सुरुवातीला या सत्तांचा आफ्रिकेतील उद्योग म्हणजे स्थानिकांना पकडून गुलाम म्हणून युरोप-अमेरिकेत विकणे, आणि आफ्रिकन मौल्यवान वस्तू आणि शेतमाल गोळा करणे असा 'मर्यादित' स्वरूपाचा होता.

एकोणिसाव्या शतकातील नव-साम्राज्यवाद आणि युरोपात घडलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे आफ्रिकेतील युरोपीय सत्तांच्या या 'व्यापारी' केंद्रांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या नव्या गतिमान यांत्रिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करू शकणारा, तसेच विविध मौल्यवान साधनांचा स्त्रोत असलेला आफ्रिका म्हणूनच महत्त्वाचा ठरला. तेथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली विविध खनिजे, उत्तम प्रतीचे जंगली लाकूड, हस्तिदंत इत्यादींच्या जोडीने तेथे शेती वाढवून रबर, कॉफी, ऊस, कोको, तंबाखू अशी नगदी पिके घेणे युरोपीय देशांना जरुरीचे वाटू लागले. त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळही बळजबरीने फुकटात जमवलेल्या गुलामांच्या स्वरूपात उपलब्ध होते. आफ्रिकेतील जमीन मिळवल्यास व्यापारापेक्षा जास्त फायदा होईल हे त्यांच्या ध्यानात आले. यातूनच आफ्रिकेतील जास्तीत जास्त भूभाग ताब्यात घेऊन आपली वसाहत वाढवण्यासाठी विविध युरोपियन देशांचा सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यासाठी स्थानिक जनतेला नाडले जाऊ लागले. नव-साम्राज्यवादाच्या या काळात आफ्रिकेवर झालेली आक्रमणे, अत्याचार आणि तेथल्या युरोपीयांच्या वसाहतवादाला इतिहासात "स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका" म्हणले जाते. आफ्रिकेत वसाहतविस्तारासाठी अनेक लढाया होत. तसेच युरोपात दोन सत्तांमध्ये युद्ध भडकले की त्यांच्या आफ्रिकेतील वसाहतीमध्येसुद्धा लढाई होत असे. या सततच्या युद्धांमुळे अस्थिरता निर्माण होऊन औद्योगिक उत्पन्नामध्ये घट होऊ लागली आणि सर्वांचेच त्यामध्ये नुकसान होऊ लागले. त्यामुळे सामंजस्याचा करार करण्यासाठी पोर्तुगालने जर्मनीला गळ घातली आणि १८८४मध्ये जर्मन चान्सलर ऑटो फान बिस्मार्क यांनी त्यासाठी 'बर्लिन कॉन्फरन्स' आयोजित केली. तीन महिने चाललेल्या या सभेत "लूट का माल सब मिल बांट के खायेंगे" अशा प्रकारचा एक सामंजस्य करार करण्यात आला. तेथे आफ्रिकेतील कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसताना युरोपातील सात सत्तांनी संपूर्ण आफ्रिका खंड ५० वसाहतींमध्ये विभागून आपापसांत सामंजस्याने वाटून घेतला आणि एका तऱ्हेने आपला वसाहतवाद समर्थनीय केला. या सात युरोपीय सत्तांपैकी ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे त्या दोघांकडे सर्वात जास्त भूभाग आला. तर त्यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी होता. पुढील काळात या सर्वच युरोपीय सत्तांनी आपापल्या वसाहतींमध्ये शाळांच्या माध्यमातून युरोपीय इतिहास, संस्कृती, प्रथा व भाषा तेथील स्थानिक जनतेच्या गळी उतरवल्या.

आफ्रिकेशी माझी पहिली ओळख

अनेक भाषांचे माहेर असलेल्या या आफ्रिकेशी माझा संबंध भाषेच्याच मार्गाने आला. फ्रेंच-इंग्रजी अनुवाद करण्याचे माझे पहिले मोठे काम मी मुंबईतल्या एका प्लास्टिकच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीसाठी केले. भारतातून विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनातील वस्तू आयात करण्याच्या दृष्टीने आफ्रिकेतील काही देशांचे प्रतिनिधी १९९६ साली मुंबईत आले होते. त्यांपैकी सेनेगाल या देशाचे उद्योजक (त्यांत स्त्रिया जास्त होत्या) भारतात बनलेल्या प्लास्टिकच्या वस्तू आयात करण्यासाठी आणि तशा वस्तू बनवणारे कारखाने आपल्या देशात उभारता येतील का त्याची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. भारतीय उद्योगपतींशी चर्चा, विविध कंपन्यांच्या कारखान्यांना भेटी देणे, निर्मिती प्रक्रिया समजून घेणे, नमुन्याच्या वस्तू पाहणे, वाजवी भावासाठी घासाघीस, विशेष खानपान असा आठवड्याभराचा भरगच्च कार्यक्रम होता. सेनेगालच्या त्या प्रतिनिधी मंडळाबरोबर काम करताना अवांतर गप्पाही झाल्या आणि त्यांच्या संस्कृतीची ओळख झाली. एक तर आफ्रिकन लोकांबरोबर काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. त्यांच्याशी प्रथमच गप्पा केल्यावर फ्रान्सच्या फ्रेंचमध्ये आणि आफ्रिकन फ्रेंचमध्ये फरक असल्याचे जाणवले. भाषा, शब्द आणि व्याकरण तेच असले तरी त्यांपैकी अनेकांच्या फ्रेंच उच्चारांवर त्यांच्या आफ्रिकन मातृभाषेचा प्रभाव स्पष्ट दिसला. थोडे जाडेभरडे उच्चार, फ्रेंच "र"शी अजिबात संबंध नसलेला त्यांचा ठासून पूर्ण उच्चार केलेला "र", अनुनासिक उच्चारांमधील वेगळेपण, बोलताना येणारा विशिष्ट प्रकारचा हेल आणि वेगळ्याच ठिकाणी दाब देऊन उच्चारलेले शब्द असा प्रकार असला तरी ती बोली समजायला विशेष कठीण वाटली नाही. अगदी क्वचितच त्यांच्या बोलण्यात मातृभाषेतील एखादा शब्द येई आणि तोही अवांतर गप्पा चालू असताना. दुसरे म्हणजे त्यातील अधिकारी वर्गातील लोकांच्या फ्रेंचवर आफ्रिकन प्रभाव अगदीच नगण्य होता. कदाचित त्यांचा संपर्क युरोपीय फ्रेंच लोकांशी जास्त येत असावा. त्या तुलनेत आपण भारतीय लोक बोलताना बऱ्याचदा दोन किंवा अधिक भाषांमधील शब्द (तांत्रिक नसलेले शब्दसुद्धा) सरमिसळ करून वापरतो आणि त्यामुळे त्या भाषा समजणाऱ्यांनाच तो संवाद पूर्णपणे समजू शकतो. असो! त्या प्रतिनिधी मंडळाच्या अनेक गोष्टी मला भावल्या. त्यांच्या वागण्यातील आत्मीयता, मी नवखा असल्याने अडलेल्या शब्दांसाठी मला सांभाळून घेण्याचा समजूतदारपणा, उद्योगांमध्ये जरुरी असलेली मुत्सद्देगिरी, त्याचबरोबर स्वतःच्या देशाचे पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रंगीत कपडे भारतातही रोज घालण्याचा अभिमान अशा अनेक गोष्टी मला नवीन होत्या. सांस्कृतिक प्रथा पाळण्याची त्यांची परंपरा पाहता त्यांच्यात आणि भारतीय लोकांत साम्य वाटले.

फ्रेंचांची आफ्रिका

आफ्रिकेत फ्रेंच बोलले जाते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सामान्य माहितीतील आफ्रिकन देश मुख्यत्वे इंग्रजी भाषिक असतात. आजच्या आफ्रिकन देशांत अरबी, स्वाहिली, योरूबा, इग्बो अशा अनेक स्थानिक भाषांच्या जोडीने इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश, इटालियन, व जर्मन या युरोपियन भाषा आणि आफ्रिकान्स ही डच भाषेतून जन्मलेली भाषा या सर्व रोजच्या वापरात आहेत. त्यांपैकी फ्रेंच भाषा आणि संस्कृती आफ्रिकेत कशी आणि कुठे कुठे पोचली त्याची थोडी माहिती करून घेऊ.

फ्रेंच आफ्रिकेत सतराव्या शतकातच आले होते. पूर्वेकडे जाणाऱ्या आपल्या सागरी व्यापाराच्या मार्गावरील मुख्य ठाणी म्हणून त्यांनी सर्वप्रथम सेनेगाल आणि मदागास्कर ताब्यात घेतले होते. परंतु १८१४पर्यंत युद्धातील पराजय आणि जमीनविक्री यांमुळे त्यांचा त्यांच्या आफ्रिकेतील जवळजवळ सर्व ठाण्यांवरील ताबा नाहीसा झाला होता. १८३०नंतर युद्धात अल्जेरिया जिंकून फ्रेंचांनी पुन्हा नव्या जोमाने आफ्रिकेत वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आफ्रिकेत फ्रान्सच्या वसाहतींचे वेगवेगळे 'समूह' बनलेले दिसतात. आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या त्यांच्या वसाहती 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' या सामूहिक नावाने ओळखल्या जात. त्यात आजचे आयव्हरी कोस्ट, बेनिन, बुर्किना फासो, गिनी, मॉरीटानिया, नायजर, माली, आणि सेनेगाल हे आठ देश येतात. यांच्या बरोबरच आजचा टोगो हा देश आणि कॅमेरून देशाचा मोठा भाग हेही फ्रेंच वसाहतीत होते, आणि काही ठिकाणी या भूभागांना 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' गटाशी जोडले गेलेले दिसले तरी अधिकृतरीत्या हे दोन भूभाग 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' समूहात धरले जात नसत. त्यालगतच्या 'फ्रेंच नॉर्थ आफ्रिका' नावाच्या समूहात आजचे मोरक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया हे तीन देश येतात. त्यांना आजही 'माग्रेब' असे म्हणले जाते आणि तेथून येऊन फ्रान्समध्ये स्थिरावलेल्या लोकांना व त्यांच्या वंशजांना 'माग्रेबँ' (माग्रेबी) अशी संज्ञा आहे. 'फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिका' नावाच्या वसाहत-समूहात आजचे रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबोन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, आणि चाड हे देश येतात.

या तीन मुख्य समूहांव्यतिरिक्त आफ्रिकेच्या पूर्व आणि आग्नेयेकडेही फ्रेंचांच्या वसाहती होत्या. इथिओपियाला खेटून असलेला आजचा जिबूती हा देश वसाहतकाळात 'फ्रेंच सोमाली लँड' किंवा 'ओबोक टेरिटरी' या नावाने ओळखला जात असे. आफ्रिकेच्या आग्नेयेकडील फ्रेंचांच्या बेटांपैकी मॉरिशस आणि सेशेल्स ही बेटे एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ब्रिटिशांनी जिंकून घेतली. परंतु तेथील मदागास्कार बेट आणि त्याच्या आजूबाजूला असलेले मायोत द्वीपसमूह, कोमोरेस द्वीपसमूह, आणि रियूनिअन बेट ह्या फ्रेंच वसाहती होत्या. यातील मदागास्कार आणि जिबूती आज स्वतंत्र देश आहेत तर इतर द्वीपसमूह आजही फ्रान्सचीच भूमी आहे.

आजच्या आफ्रिकेतील २९ देश फ्रेंच भाषिक आहेत. त्यातील ११ देशांमध्ये फ्रेंच ही एकमात्र अधिकृत भाषा आहे तर १० देशांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा आहे. उर्वरित ८ देशांमध्ये फ्रेंच ही मुख्य भाषांपैकी एक आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या फ्रेंच भाषिक देशांपैकी 'डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो' हा आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा देश फ्रेंचांची नव्हे तर चक्क बेल्जियनांची वसाहत होता!

भारतात ज्याप्रमाणे ब्रिटिश, पोर्तुगीज, आणि फ्रेंचांनी आपापली भाषा आणि संस्कृती आणून त्याचा प्रसार केला, त्याचप्रमाणे आफ्रिकन देशांतही युरोपीय देशांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपापल्या भाषा व संस्कृती प्रचलित केल्या. या बाबतीत भारतातील आणि आफ्रिकेतील वसाहतींच्या व्यवस्थापनेत बरेच साम्य दिसते. मुख्य फरक हा की ब्रिटिश वसाहतीत स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्यावर बंदी नव्हती. तसे पाहता फ्रेंचांच्या आफ्रिकन ठाण्यांमध्ये सतराव्या शतकापासूनच फ्रेंच भाषा आली होती, परंतु भाषा व संस्कृती रीतसर शिकवण्यासाठी पहिली शाळा सेनेगालच्या सेंट लुई येथे १८१७ साली उघडल्याची नोंद मिळते. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून फ्रेंच वसाहतींमध्ये फ्रेंच भाषा शिकणे सक्तीचे झाले आणि स्थानिक भाषांच्या वापरावर मर्यादा घातल्या गेल्या. याचा एक परिणाम असा झाला की फ्रेंच वसाहतींतील विविध जमातींच्या आफ्रिकन लोकांना आपापसात बोलण्यासाठी सामाईक भाषा मिळाली आणि स्थानिक फ्रेंच सरकारी व्यवस्थापनात व व्यापारात नोकरीच्या संधी मिळू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला वसाहतीतील लोक आपल्याच भाषा व संस्कृतीपासून दुरावले आणि युरोपीय संस्कृतीच्या जवळ गेले. या वसाहती दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू जसजशा स्वतंत्र होत गेल्या तसतसे त्यांच्यात आपल्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान पुन्हा निर्माण झाल्याचे दिसते.

भारतात जशा प्रकारे अनेक व्यक्तींच्या मातृभाषेचा प्रभाव त्यांच्या इंग्रजी बोलण्यावर दिसतो तसेच आफ्रिकेतही फ्रेंच भाषेवर स्थानिक आफ्रिकन भाषेचे संस्करण झालेले दिसते. फ्रान्समध्ये याला फ्रेंचचे 'आफ्रिकीकरण' म्हणतात. अनेक आफ्रिकन वंशाच्या नामवंत फ्रेंच लेखकांनी अशा मिश्र फ्रेंचचा आपल्या लिखाणात वापर केला आहे. मजेची गोष्ट अशी आहे की २०५०पर्यंत जगातील फ्रेंच बोलणाऱ्या लोकांपैकी ८०% लोक आफ्रिकेतील असतील, त्यामुळे बहुतांश बोली-फ्रेंचचे स्वरूप जास्त आफ्रिकी झालेले असेल असा अंदाज आहे.

फ्रेंच वसाहतींचे व्यवस्थापन व त्याचा परिणाम

फ्रेंच आफ्रिकेचा नकाशा

आफ्रिकन वसाहतींच्या काही अभ्यासकांच्या मते आफ्रिकेतील विविध युरोपीय वसाहतींच्या व्यवस्थापनामध्ये बरीच तफावत दिसून येते. या वसाहतींपैकी बेल्जियन, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, आणि स्पॅनिश वसाहतींमध्ये प्रत्यक्ष सत्ता (डायरेक्ट रूल) राबवली गेली तर ब्रिटिश वसाहतींमध्ये अप्रत्यक्ष सत्ता राबवली गेल्याचे दिसून येते. फ्रेंच वसाहतींमध्ये स्थानिक जनतेच्या भावना, त्यांच्या गरजा, त्यांची संस्कृती, यांकडे विशेष लक्ष न देता फ्रान्समध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांना जे जे योग्य वाटेल ते ते आफ्रिकन वसाहतीमध्ये राबवण्याकडे विशेष लक्ष दिले गेले. याउलट ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींमधील स्थानिक राजकीय चौकट मोडली नाही आणि ब्रिटिशांचे अधिपत्य, नियम व आज्ञा मान्य करून स्थानिकांनीच वसाहतींच्या व्यवस्थापनामध्ये भाग घ्यावा यावर भर देण्यात आला (इंडायरेक्ट रूल). तुलनात्मक दृष्ट्या असेही म्हणले जाते की विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रेंच वसाहतींपेक्षा ब्रिटिश वसाहतींमध्ये जास्त प्रगती झालेली होती.

वसाहत असल्याने फ्रेंच आफ्रिकेमध्ये कल्पनेतील रामराज्य अजिबात नव्हते. मनमानी कारभार, भ्रष्टाचार, विविध जमातीतील आपापसातले बेबनाव व हाणामाऱ्या, त्यात आपली पोळी भाजून घेणारे संधीसाधू अधिकारी या सगळ्यांची रेलचेल होती. असे असले तरी आफ्रिकेतील कला, इतिहास, संस्कृती यांच्याबद्दल फ्रेंचांना आकर्षण होते. १८४८मध्ये 'फेब्रुवारी क्रांती'च्या प्रभावात असलेल्या फ्रेंच रिपब्लिकने त्यांच्या 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' या वसाहतीत स्थानिक लोकांना राजकीय हक्क आणि फ्रेंच नागरिकत्व दिले होते. या सुधारित स्थितीमुळे आफ्रिकन वंशाच्या नागरिकांचे फ्रान्सबरोबरचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध अधिक दृढ झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या आणि फ्रेंच सरकारशी प्रामाणिक असलेल्या 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशन'चे अस्तित्व १९५८पर्यंत टिकून होते. पुढे १९६०मध्ये या वसाहतीचे विभाजन होऊन स्वतंत्र देश निर्माण झाले असले तरी त्यांचे फ्रान्सशी असलेले संबंध आजही दृढ आहेत. वर उल्लेखलेल्या सेनेगाल देशातील सेंट लुईस आणि दाकार ही मुख्य शहरे १८९५पासून १९६०पर्यंत या फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशनच्या राजधानीची शहरे होती.

'फ्रेंच नॉर्थ आफ्रिका' किंवा 'माग्रेब' म्हणजेच आजचे मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जेरिया हे वर आले आहेच. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ऑटोमन साम्राज्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेत फ्रेंच सैन्याने अल्जेरियाचा ताबा घेतला. फ्रान्सच्या दक्षिणेचा भूमध्य समुद्र पार केला की नैर्ऋत्य दिशेला अल्जेरियाचा किनारा लागतो. त्यामुळे फ्रेंच सरकारने अल्जेरिया ही फ्रान्सचीच भूमी असल्याचा जाहीरनामाच दिला. लवकरच फ्रान्समधील अनेक लोक तेथे कामासाठी किंवा जमीनदार म्हणून येऊन राहू लागले. परंतु अल्जेरियातील अरब, तुर्की आणि स्थानिक वंशाच्या नागरिकांशी त्यांचा सतत सांस्कृतिक आणि राजकीय संघर्ष होत राहिला. अनेकदा या संघर्षाचे रूपांतर रक्तपातात झाले. अल्जेरियाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळाले, पण तेही एका भीषण युद्धानंतरच. आपल्या या क्षेत्राचा विस्तार वाढवण्यासाठी फ्रान्सने अल्जेरियाच्या पूर्व आणि पश्चिमेला वसलेल्या व समुद्र किनारा लाभलेल्या ट्युनिशिया आणि मोरोक्को या दोन देशांना आपल्या अधिपत्याखाली आणले. अल्जेरियाच्या तुलनेत हे दोन्ही देश फार कमी काळ फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहिले; आणि १९५६मध्ये स्वतंत्रही झाले. परंतु १९६२मधले अल्जेरियाचे युद्धोत्तर स्वातंत्र्य हा फ्रेंचांवर त्यांच्या वसाहतीकडून केला गेलेला सर्वांत प्रखर आघात असल्याचे मानले जाते. माग्रेबमधील बराचशा लोकांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मूळ फ्रान्समध्ये जाऊन राहायला सुरुवात केली होती. त्यातील बरेचसे लोक दोन्ही जागतिक महायुद्धांमध्ये फ्रान्सच्या बाजूने लढले होते. आजही फ्रान्समध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांपैकी सर्वात जास्त संख्या माग्रेबींची आहे. पॅरिस, मार्सेई (मार्सेलिस), लियाँ यांसारख्या महानगरांत आणि दक्षिण फ्रान्सच्या इतर भागांत माग्रेबी लोकसंख्या मोठी आहे.

फ्रेंच नॉर्थ आफ्रिका आणि फ्रेंच वेस्ट आफ्रिका या दोन गटांव्यतिरिक्त इतर फ्रेंच वसाहतींमधील आजच्या देशांचे संबंध आजच्या फ्रान्सशी तितकेसे दृढ नसले तरी सौहार्दपूर्ण नक्कीच आहेत.

वसाहतींचे स्वातंत्र्य आणि नव्या समस्या

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोप आणि आफ्रिकेत बरेच राजकीय बदल झालेले दिसतात. दोन जागतिक महायुद्धे, युरोपातील विविध राजेशाहींचा अंत, तसेच युद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेल्या कामगार वर्गाची कमतरता ह्या युरोपच्या मुख्य समस्या होत्या. याचा एक परिणाम म्हणून असे दिसते की दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेल्या वसाहतकर्त्या देशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आफ्रिकेत जोम धरू लागली, तसेच वसाहतवादात भरडल्या गेलेल्या सर्वच आफ्रिकन लोकांमध्ये बंधुत्वाची, आपण सर्व एक असल्याची भावना वाढली. १९५०नंतर बऱ्याच आफ्रिकन वसाहती हळूहळू स्वतंत्र होऊ लागल्या. परंतु त्याचबरोबर काही नवीन समस्याही निर्माण झाल्या. शीतयुद्धाच्या काळात दोन जागतिक महासत्तांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी विविध आफ्रिकन देशांना आपल्या प्रभावक्षेत्रात घेतले आणि त्यामुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आफ्रिकन देशांचे पुन्हा आपापसांत पटेनासे झाले. वसाहतींच्या काळात आफ्रिका निव्वळ कच्च्या मालाचा स्रोत असल्याने तेथे कारखाने, उद्योगधंदे फारसे वाढले नव्हते. याच्या जोडीने विविध जमातींतील युद्धे, आर्थिक आणि नैसर्गिक संकटे व त्यामुळे निर्माण झालेली अन्नधान्याची कमतरता, उपासमारी, बेरोजगारी ह्या आफ्रिकेतील वसाहतींच्या मुख्य समस्या बनल्या होत्या.

यावर उपाय म्हणून आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींमधून तसेच नंतर स्वतंत्र झालेल्या देशांमधून अनेक लोक युरोप आणि फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले. छोट्या प्रमाणावरील स्थलांतरे सतत होत होती, परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्रितरीत्या स्थलांतर होण्याच्या तीन मुख्य घटना फ्रेंच इतिहासात दिसून येतात. त्या सन १९००, १९२०चे दशक आणि १९६० ते ७०-७५ या कालावधीत झाल्या. त्यांना 'स्थलांतराच्या मोठ्या लाटा' अशा अर्थाचे संबोधन आहे. या आफ्रिकन स्थलांतरित लोकांबद्दल फ्रेंच सरकारने 'बंधुत्व आणि समता' ही धोरणे सुयोग्यरीत्या राबवली असली तरी 'समावेश' ही संकल्पना सांस्कृतिक आणि धार्मिक मर्यांदांमुळे नीटशी राबवता आली नाही असे दिसते. समावेश होण्यासाठी करावे लागणारे व्यक्तिगत प्रयत्न दोन्ही बाजूंच्या सर्व लोकांकडून संपूर्णपणे झालेले दिसत नाहीत. याचमुळे बरेचसे आफ्रिकन वंशाचे फ्रेंच लोक युरोपीय फ्रेंच लोकांशी आणि त्यांच्या संस्कृतीशी एकसंध होऊ शकले नाहीत. याचे परिणाम थोड्याफार प्रमाणात फ्रान्समध्ये अधून मधून घडणाऱ्या अशांततेच्या विविध घटनांमधून आजही दिसून येतात.

आज फ्रान्समध्ये त्यांच्या आफ्रिकेतील वसाहतींतून स्थलांतरित झालेल्या लोकांची आणि त्यांच्या वंशजांची स्वतंत्र ओळख आहे. त्यातील बहुसंख्य अजूनही फ्रान्सच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले दिसत नाहीत. असे बरेच लोक आजही बेरोजगार असून सरकारने दिलेल्या बेरोजगारी भत्त्यावर आपली गुजराण करतात. असेही म्हणले जाते की हा बेरोजगार भत्ता खर्च चालवायला पुरेसा असल्यानेच हे बेरोजगार लोक काम शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत. हे बहुसंख्य आफ्रिकन-फ्रेंच आजही 'अल्पसंख्यांक वस्त्यां'मध्ये (ghetto) वा आजूबाजूच्या जागांत एकत्र राहतात आणि फार कमी लोक संमिश्र लोकवस्तीत राहतात. याच्या दुसऱ्या बाजूला पहिले तर आयुष्यात यशस्वी वाटचाल करून समाजात मोठे स्थान मिळवलेले आफ्रिकन-फ्रेंचही अनेक आहेत. त्यातील सर्वांत जास्त लोक विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत. त्याखालोखाल राजकारणात आणि त्यानंतर मनोरंजन आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा दिसून येते. फ्रेंच भाषिक आफ्रिका आणि फ्रान्समध्ये आजही अनेक रेडिओ चॅनल्स असून त्यावर स्थानिक आणि जगातील बातम्या तसेच मनोरंजक कार्यक्रम फ्रेंच भाषेत सादर केले जातात.

'ए व्हेरी सीक्रेट सर्व्हिस' या इंग्रजी नावाची २ सीझन्सची एक फ्रेंच, विनोदी मालिका २०१६मध्ये नेटफ्लिक्सवर आली. त्यात १९६० सालच्या फ्रेंच आफ्रिकन वसाहतींमध्ये घडणाऱ्या विविध अर्धसत्य घटना, त्यांची खबर काढायला नेमलेले गुप्तहेर, डबल एजंट आणि स्थानिक सहकारी यांची धमाल कॉमेडी होती. त्या मालिकेद्वारे निर्मात्याने विडंबन आणि आदर यांचा समन्वय साधत फ्रेंच आफ्रिकन इतिहास अर्ध-काल्पनिक आणि मनोरंजक पद्धतीत मांडला होता.

वैयक्तिक अनुभव

आमच्या दुभाष्याच्या कामामध्ये आम्हाला आमची भूमिका तटस्थ ठेवावी लागते आणि त्यात कस लागतो. एकाने काय म्हणले आहे ते दुसऱ्याला जसेच्या तसे आणि स्वतःचे विचार/ मत न मिसळता सांगायचे असते. बऱ्याचदा एक बाजू आपल्याला पटत नसली तरी ती तशीच दुसऱ्याला सांगणे महत्त्वाचे असते. काही वेळा एकाचे म्हणणे काय आहे ते दुसऱ्याला विस्ताराने समजावून सांगावे लागते, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुप्तता पाळावी लागते. पण कामानिमित्त भेटलेल्या भारताबाहेरील लोकांची विचारसरणी, वैयक्तिक जीवन, समस्या आणि मर्यादा अशा अनेक गोष्टींचे आकलन होत जाते, आणि स्वतःचे त्यांच्याबद्दल मतही बनत जाते. चांगलेवाईट अनुभव तर खूप येतात.

सेनेगालच्या उद्योजकांबरोबर केलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या अनुवाद कामानंतर मी फार्मा, खाद्यतेल, कागद, कापड इत्यादी क्षेत्रांतून आफ्रिकेत होणाऱ्या निर्यातीसंदर्भात अनेक वेळा दुभाष्याचे काम केले, परंतु तो पहिला अनुभव केवळ अविस्मरणीय आहे. मला कामानिमित्त भेटलेल्या कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि सरकारी जगातील आफ्रिकन व्यक्ती आणि तशाच स्तरातील युरोपीय व्यक्ती यांच्यात पेहेराव आणि शारीरिक फरक सोडल्यास विशेष फरक जाणवला नाही. व्यवसायाचे आकलन, संघटना कौशल्य, वाटाघाटी करतानाची मुत्सद्देगिरी सर्वच कोणत्याही तरबेज व्यवसायिकाप्रमाणे करणारे व्यावसायिक, गप्पिष्ट वाटल्या तरी अघळपघळ आणि अनावश्यक असं न बोलणाऱ्या राजकारणी व्यक्ती, कामाच्या जोडीने भारतीय संस्कृती आणि कला यांच्याबद्दल कुतूहल असणारे कॉर्पोरेट जगातले लोक सगळे तसेच. सुशिक्षित आफ्रिकन व्यक्ती बऱ्याचदा सुशिक्षित भारतीय किंवा युरोपीय व्यक्तींसारख्याच भासतात. तरी आफ्रिकन व्यक्ती थोड्या जवळच्या वाटल्या कारण त्यांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन बरेचसे भारतीयांप्रमाणे वाटले.

एकदा एका यशस्वी वाटाघाटीनंतर विशेष डिनर आखले होते. काम संपले असल्याने सर्वच आरामात होते. जेवणादरम्यान अवांतर गप्पा झाल्या. जेवणानंतर अचानक यजमानाने मला एक हिंदी वात्रटिका ऐकवून "आता हे फ्रेंचमध्ये त्याला सांग" असं सांगितलं. मामला गडबडला कारण 'साहित्यिक' भाषांतर आणि त्यातही काव्य भाषांतरित करण्यावर अनेक मर्यादा येतात. त्यात आफ्रिकन पाहुणा सरकारी अधिकारी होता. तरी त्याचं गद्य-पद्य करत अन्वयार्थ सांगून मी फळी सांभाळली. नशिबाने वारुणीने सर्वांवर कृपा केली असल्याने कोणी विशेष मनावर घेतले नाही. अशा प्रकारचे मोकळे वर्तन कोणत्याही भारतीय यजमानाने युरेपीय पाहुण्याबरोबर केलेले कधीच पहिले नाही. कदाचित आपले आफ्रिकन लोकांबरोबर जास्त जुळत असावे.

एकदा एक आफ्रिकन व्यवसायिक काही यंत्रं भारतातून आयात करण्याच्या दृष्टीने आला होता. तो विविध विक्रेत्यांना भेटी देणार होता आणि मुंबईत ३-४ दिवस राहणार होता. मला ज्या भारतीय कंपनीने अनुवादासाठी बोलावले होते त्यांनी त्याचे चांगले स्वागत केले. कंपनीने आपणहून पाहुण्याला ने-आण करण्यासाठी गाडी व जेवणाची व्यवस्था केली होती. पण जेव्हा कंपनीला पहिल्या दोन मीटिंगनंतर वाटले की ऑर्डर मिळणार नाही, तेव्हा या सर्व सोयी बंद केल्या व त्याला स्वतःची व्यवस्था स्वतः करायला सांगितले. आफ्रिकन व्यावसायिकाला ते अयोग्य वाटलं. यात कोण बरोबर कोण चूक हे सोडले तरी तो व्यवसायिक मला जे म्हणाला ते अजून आठवते. त्याने सांगितले की आफ्रिकेत जेव्हा कोणी आमच्याकडे येतो तेव्हा त्याचा पाहुणचार करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. वेळ पडल्यास त्याला आम्ही आमच्या ताटातलेही काढून देतो, त्याचा मान ठेवतो. त्याच्याकडून फायदा होईल की नाही यावर आमची वर्तणूक अवलंबून नसते. आपल्या आणि आफ्रिकन संस्कृतीमध्ये किती साम्य आहे!

समारोप

एकट्याने आपण भरभर चालतो, पण एकत्रितरीत्या दूरवर चालतो. – आफ्रिकन म्हण

आज आफ्रिकेतील बरेच देश प्रगतीपथावर आहेत. एका बाजूला हुकुमशाही, भ्रष्टाचार, बेकारी, नैसर्गिक आपत्ती, अन्नटंचाई, रोगराई यांच्याशी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला पर्यटन, कच्चा माल, खनिजे, तेल इत्यादींचे उत्पादन यांच्याद्वारे स्वतःचे आर्थिक बळ वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. आफ्रिकेतील ५५ देशांची 'आफ्रिकन युनियन' ही सर्वांत मोठी संघटना असून शाश्वत विकास, सामंजस्य, तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती, मानवी हक्क अशा अनेक मुद्द्यांवर आपापसात समन्वय साधण्याचे कार्य ती करत असते. फ्रेंचच्या जोडीने स्वाहिली, अरबी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या मुख्य भाषांमध्ये या संघटनेचा व्यवहार चालतो.

भारतात नुकत्याच संपन्न झालेल्या G20 परिषदेत सुसंघटित अशा 'आफ्रिकन युनियन'ला कायमस्वरूपी सभासदत्व देण्यात आले आहे. याचा आफ्रिकेतील समाजाच्या आणि तेथील उद्योगधंद्याच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लागेल असा विश्वास अनेक देशांनी व्यक्त केला आहे. भारत-आफ्रिका आयात निर्यातीला यातून फायदा होईलच, पण त्याच जोडीने विविध भाषा जाणणाऱ्यांसाठी कामाची नवी दालने उघडतील अशी अशा आहे. या मार्गाने फ्रेंच भाषिक आफ्रिका आणि भारत यांचे चांगले संबंध अधिक वृद्धिंगत होवोत हीच सदिच्छा!

मारियो रिग्बी: वर्णभेद आणि आफ्रिकेतली रमतगमत भटकंती

- प्रीति छत्रे

जानेवारी २०१६. दक्षिण आफ्रिकेमधलं एक गाव - विटसॅन्ड. गावातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये एक आफ्रिकी वंशाचा परदेशी मुशाफिर आला. गेस्ट हाऊसचा मालक आणि त्याची बायको, दोघांनी मुशाफिराचं आगतस्वागत केलं, त्याला शक्य त्या सगळ्या सोयी पुरवल्या. संध्याकाळी दोघांनी बार्बेक्यूची तयारी केली, मुशाफिराला जेवायला बोलावलं. तिघांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता मालक अचानक म्हणाला, 'कधी वाटलंही नव्हतं, की एक दिवस मी एका काळ्या माणसाबरोबर जेवायला बसेन.' मालक श्वेतवर्णीय होता. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी राजवटीच्या काळात तो सैन्यात होता. त्याने काही कृष्णवर्णीयांना प्रत्यक्ष गोळ्या घालून ठारही केलं होतं. त्याच्या भूतकाळाबद्दल कळल्यावर मुशाफिराला एक क्षणभर त्याची घृणा वाटली खरी, पण त्याने प्रामाणिकपणे सगळं सांगून दिलगिरी व्यक्त केल्याने मुशाफिराने त्याला मनोमन माफ करून टाकलं.

तो मुशाफिर याच कारणासाठी तर घरातून बाहेर पडला होता. कृष्णवर्णीयांच्या तरुण पिढीने आपल्या कोषातून बाहेर पडून जग बघावं, असं त्याला वाटत होतं. आपला हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याने एक घाट घातला होता - आफ्रिका खंडातून दक्षिणोत्तर प्रवास करण्याचा. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनपासून इजिप्तच्या कैरोपर्यंतचं १२ हजार किमी अंतर जास्तीत जास्त चालत पार करायचं, अगदीच आवश्यकता भासेल तिथे होडीने जायचं, मात्र कोणत्याही यांत्रिक वाहनाचा वापर करायचा नाही, असा त्याचा निश्चय होता. तो होता मारियो रिग्बी, कॅनडात राहणारा एक जिम इन्स्ट्रक्टर आणि फिटनेस ट्रेनर.

मारिओ रिग्बी

मारिओचा जन्म कॅरेबियनमधल्या Turks and Caicos बेटांवर झाला. पण त्याचं सुरुवातीचं बालपण जर्मनीत गेलं. तो १०-११ वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांनी कॅरेबियनमध्ये परतण्याचं ठरवलं. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे जर्मनीत त्यांच्या गावात ते एकमेव कृष्णवर्णीय कुटुंब असूनही तिथे त्यांना कधीही भेदभावाला तोंड द्यावं लागलं नव्हतं. मात्र कॅरेबियनमध्ये वेगळंच चित्र होतं. Turks and Caicos बेटांवर ब्रिटिश राजवट आहे. तिथे मारिओला आणि त्याच्या भावाला इंग्रजीचं अज्ञान, जर्मन धाटणीचे उच्चार, त्वचेचा रंग यावरून शाळेत चेष्टा, टोमणे, कुजकट शेरे ऐकावे लागले. मारिओच्या मनात स्वतःच्या रंगाबद्दल घृणा निर्माण झाली.

शालेय शिक्षण संपल्यावर मारिओ कॅनडात आला. त्याला विविध व्यायामप्रकार, साहसी खेळ यांची लहानपणापासून आवड होती. अ‍ॅथलेटिक्स क्रीडाप्रकारांतही त्याला रस होता. अशा गोष्टींसाठी त्याची आईदेखील त्याला कायम प्रोत्साहन द्यायची. पळण्याच्या स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेत घेत त्याने Turks and Caicos च्या सर्वोच्च पातळीपर्यंत मजल मारली होती. ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र Turks and Caicos चा स्वतःचा स्वतंत्र ऑलिंपिक संघ नाही, हे कळल्यावर त्याने तो नाद सोडून दिला. अ‍ॅथलेटिक्स नाही तर नाही, वेगळं काहीतरी करावं, असं त्याने ठरवलं.

त्याची दुसरी आवडती गोष्ट होती भटकंती. जुन्या भटकबहाद्दरांनी लिहिलेली पुस्तकं तो कायम वाचायचा. आपणही तसंच काहीतरी करावं, खरं जग बघावं, असं त्याने ठरवलं. सर्वात पहिला पर्याय युरोप किंवा उत्तर अमेरिकेचा होता. पण तिथे पर्यटकांसाठी, भटक्यांसाठी तशाही अनेक सोयीसुविधा असतात. त्यामुळे ते त्याला फारसं आव्हानात्मक वाटेना. त्याचबरोबर त्याला हेदेखील दिसलं की अशी माहिती शोधताना आफ्रिकेचा कुठेही फारसा उल्लेख नव्हता. आफ्रिकेत विशेष कुणीच का जात नसेल, तो प्रदेश इतका अनुल्लेख करण्यासारखा नक्कीच नसणार, आपणच जाऊन शोधावं का, असा विचार करता करता त्याच्या डोक्यात हळूहळू आफ्रिकेतली मोहीम घोळायला लागली. तो इतका अवाढव्य खंड. सुरुवात कुठून करायची, कुठे जायचं, कोणता मार्ग निवडायचा, हे त्याने कसं ठरवलं? मारिओ सांगतो, 'मी सरळ गूगल केलं - How to travel from Cape Town to Cairo. गूगल नकाशात दिसणारा मार्ग सारखा बदलत असतो. नवे रस्ते बनलेले असतात, जुने उद्ध्वस्त झालेले असतात, वेगवेगळ्या देशांमधली राजकीय परिस्थिती, युद्ध, दुष्काळ यानुसार नकाशात वेगवेगळे मार्ग दिसतात.'

मारियोने आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलगतचा मार्ग निवडला - दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, मलावी, टांझानिया, केनिया, इथियोपिया, सुदान, इजिप्त. मोहिमेच्या दृष्टीने अधिकाधिक माहिती मिळत गेली तसतसं त्याला लक्षात येत गेलं, की आफ्रिका खंड म्हणजे एक आगळंवेगळं आश्चर्य होतं. कित्येक जंगलं, गवताळ प्रदेश, वाळवंटं, लांबच्या लांब समुद्रकिनारे, वेगवेगळ्या तीन-चार हजार जमातींची माणसं, त्यांची वेगवेगळी संस्कृती... कुणाही अस्सल भटक्याला मोहात पाडणार्‍या अशा या गोष्टी होत्या. याशिवाय मारियोचं आणखी एक उद्दिष्ट होतं. 'Trans-Atlantic Slave Trade'मुळे पश्चिम आफ्रिकेतली माणसं पुढे जगभर पसरली. त्या तुलनेत पूर्व आफ्रिकेतल्या माणसांचा बाहेरच्या जगाशी फार संपर्क आला नाही. पण मुळात ५०-६० हजार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतल्या मानवानेच पहिल्यांदा त्या भूभागाच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. हा विरोधाभासही मारियोला विशेष वाटत होता. त्यामुळे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचे देश जमेल तितके जाणून घ्यावे, असं त्याने ठरवून टाकलं.

रिग्बीचा चालण्याचा मार्ग

पायी प्रवासाचा निर्णय मारियोने का घेतला? तो म्हणतो, 'पायी फिरताना आपण त्या प्रदेशाचेच होऊन जातो. तिथलं ऊन, वारा, पाऊसपाणी आपल्यालाही झेलावं लागतं. तिथे लोकांना खायला अन्न नसेल तर आपल्यालाही ते मिळत नाही. आसपासची परिस्थिती आपल्या सोयीची नाही म्हणून गाडी पकडून दुसर्‍या ठिकाणी निघून जाण्याचा पर्याय तिथे नसतो. आफ्रिका जाणून घ्यायला हेच आवश्यक वाटलं मला...'

बेत पक्का झाला. ओळखीपाळखीतल्या लोकांना त्याबद्दल कळल्यावर सर्वांचा मारियोला एकच प्रश्न होता - 'Why Africa?' मारियो म्हणतो, 'त्यातल्या कित्येकांना आफ्रिका हा एक देश नसून ५०-६० देशांचा एक खंड आहे, हेदेखील माहीत नव्हतं.' त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया मात्र याहून एकदम वेगळी होती. त्याची आई अगदी धाडसी वृत्तीची. ती त्याला लगेच म्हणाली, 'वाटेत तुला काही झालं, पाय वगैरे मोडून घेतलास, तरी व्हीलचेअरवरून आफ्रिका पालथी घालणारा पहिला माणूस असा विक्रम करूनच घरी ये.' घरून असा पाठिंबा मिळाल्यामुळे मारियोच्या मनावरचं उरलंसुरलं ओझं निघून गेलं.

२४ नोव्हेंबर २०१५, केपटाऊन, दक्षिण आफ्रिका. सहा-सव्वासहा फूट उंचीचा हा धट्टाकट्टा तरुण कॅनडातलं निवांत आयुष्य, आवडीचं काम हे सगळं सोडून, पाठीवर सामान बांधून, एका तुलनेने मागास प्रदेशातल्या सफरीवर निघाला. त्याने या सफरीचं नाव ठेवलं होतं - 'Crossing Africa'. अर्थात आलं मनात आणि निघाला आफ्रिकेत, असं काही नव्हतं. आधीचे आठ-दहा महिने त्याने सफरीच्या तयारीत घालवले होते. दमसास वाढवण्यासाठी शारीरिक तयारी, १५-२० तास सलग चालण्याचा सराव, पैशांची आणि सामानाची जुळवाजुळव, सफरीचे टप्पे ठरवणं, त्या वाटेवरचा भूगोल समजून घेणं, इतर माहितीची शोधाशोध, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अंदाज बांधून त्यावरचे उपाय शिकून घेणं, अशा अनेक गोष्टी होत्या. तो सांगतो, 'आफ्रिकेतून चालत जायचं तर कसं याची एखादी तयार योजना काही हाताशी नव्हती. मग मी काय केलं, आधी होऊन गेलेल्या साधारण तशा मोहिमा शोधल्या, त्यातले लोकांचे अनुभव गोळा केले, त्याला समजा पाचने गुणलं आणि निघालो.' एका मुलाखतीत त्याने हेदेखील सांगितलं आहे की या आधी होऊन गेलेल्या मोहिमा जोडीने पार पाडल्या गेल्या होत्या; एकट्याने अशी प्रदीर्घ पायी मोहीम करणारा तो पहिलाच होता.

तर, केपटाऊन. निघाल्यावर एक-दोन दिवसांतच मारियोला कळून चुकलं, की त्याची पाठीवरची १५-२० किलोची पिशवी खूप जड पडत होती. एरवी एवढं वजन उचलणं त्याच्यासाठी काही विशेष नव्हतं. मात्र बर्‍याच ठिकाणचे कच्चे रस्ते, ओसाड प्रदेश, आफ्रिकेतलं हवामान आणि दीर्घ पायपीट लक्षात घेता सामान जितकं हलकं असेल तितकं चांगलं, हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग सामानातल्या अनेक वस्तू अनावश्यक वाटायला लागल्या. त्याने निघताना एक जड, मोठ्या पात्याचा सुरा बरोबर घेतला होता. दाट जंगलांतून वाट काढण्यासाठी किंवा हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव करून घेण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता खरा; पण सामानाच्या वजनात काटछाट करण्याची वेळ आली तेव्हा त्याने आधी तो सुरा काढून टाकला आणि त्याऐवजी एक लहान चाकू जवळ ठेवला. सामानातली कपड्यांची संख्याही त्याने कमी करून टाकली. डक्ट टेप, एक तंबू किंवा ताडपत्री, दोरखंड या वस्तू त्याच्या सामानात सतत होत्या. सौर ऊर्जेवर चार्ज करता येईल असा एक सेलफोनही त्याने जवळ ठेवला होता.

चालण्याचा वेग किती असावा, दररोज किती अंतर काटावं, असं काही मारियोने आधीपासून ठरवलेलं नव्हतं. आधी म्हटलं तसं, आफ्रिका समजून घेणं या गोष्टीला त्याचं प्राधान्य होतं. त्यामुळे दररोज ३०-५० किमी अंतर पार पडलं तरी त्याला चालणार होतं. मोहीम सुरू करण्यापूर्वी त्याने कॅनडात रोज ५० ते ७० किमी चालण्याचा सराव केला होता. त्या तुलनेत हा वेग त्याच्यासाठी तसा निवांत होता. काही ठिकाणी त्याला उन्हाचा खूप त्रास झाला. माऊंट केनियावर थंड, विरळ हवेचाही त्रास झाला. दक्षिण आफ्रिका, केनिया इथले गवताळ प्रदेश बरेचसे कॅनडातल्या त्याच्या ओळखीच्या प्रदेशाप्रमाणे होते, असंही तो सांगतो. आफ्रिकेत वन्य प्राण्यांची संख्या जास्त असणार, याचं भान त्याने सतत बाळगलेलं होतंच.

स्थानिकांबरोबर रिग्बी

शिखरावर रिग्बी

आफ्रिकेतल्या वन्य प्राण्यांबद्दल मारियोकडे आगळेवेगळे अनुभव आहेत. एका ठिकाणी शहामृगांच्या कळपाने त्याच्यासोबत जवळपास वीसएक किलोमीटर प्रवास केला. सुरुवातीला त्याला थोडं बिचकायला झालं. पण ती शहामृगं शांतपणे त्याच्या अवतीभोवतीने चालत होती. एका विशिष्ट टप्प्यांनंतर शहामृगांनी त्याची साथ सोडली. बहुतेक ती दमली असावीत किंवा त्यांनी आखून घेतलेल्या सीमारेषेबाहेर ती जात नसावीत. टांझानियातून केनियात शिरताना त्याला हत्तींच्या कळपाचाही असाच अनुभव आला. वास्तविक हत्ती त्याच्या वाटेत आले नव्हते, तर तो त्या हत्तींच्या आफ्रिकन सफारीच्या वाटेत आला होता. त्या कळपात चार मोठे हत्ती आणि दोन पिल्लं होती. दिवसभर हत्ती त्याच्यासोबत चालायचे. रात्री थांबून त्याने तंबू ठोकला की हत्तीही आसपास थांबायचे. सकाळी उठून तंबू आवरून तो निघाला की हत्तीही निघायचे. एका ठिकाणी जंगली कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आणखी एकदा दुपारच्या वेळी टळटळीत उन्हातून तो निघालेला असताना त्याला लांबवर वाटेत एका ट्रकचा टायर पडलेला दिसला. तापलेल्या मैलोगणती ओसाड प्रदेशात माणसाच्या अस्तित्वाची तीच एक खूण होती. तो टायर हलतोय असं मधूनच वाटत होतं. आपल्याला मृगजळामुळे भास होत आहेत, हे त्याने ओळखलं. तो टायरच्या अगदी जवळ पोहोचला, आणि अचानक टायरचं वेटोळं परत जोरात हललं. तो टायर नव्हता, तर मोठाच्या मोठा काळा साप (black Mamba) होता. हा कोब्राइतकाच जहरी असतो. मारियो जरा बिचकला, काही पावलं मागे सरकला आणि मग सापापासून लांब होऊन वळसा घेऊन पुढे गेला.

अर्थात, प्राण्यांची अशी भलीबुरी सोबत काही सतत नसायची. एरवी निव्वळ एकट्याने वेळ कसा घालवायचा? चालणं तर सुरू होतंच, शरीर काम करत होतं; पण अमुक वेळेत अमुक ठिकाण गाठायचंय, तमुक रस्ता शोधायचाय, असं काही काटेकोर व्यवधान डोक्याला नव्हतं. मोठ्या शहरांमध्ये राहणार्‍यांना अशा व्यवधान नसण्याची सवय नसते. अशा वेळी चालताना काही वेळ तंद्री लागू शकते, तर उरलेला वेळ कंटाळाही येऊ शकतो. गाणी, podcasts, चिंतनपर व्याख्यानं ऐकणं, हा त्यावरचा पहिला उपाय डोक्यात येतो. मारियोने अधूनमधून त्याच्या आवडीचे podcasts ऐकले. गाणी मात्र त्याने कैरो जवळ आल्यावरच ऐकायला सुरुवात केली. आणि मेडिटेशन? तो म्हणतो, 'Meditation works for a short time, for longer durations it is bullshit.' व्यक्तिसापेक्ष असले तरी हे त्याचे अस्सल अनुभवाचे बोल म्हणायला हवेत.

मारियोने तेव्हाच्या मनोवस्थेबद्दल छान सांगितलं आहे. आपण सर्वस्वी एकटे असतो तेव्हा सुरुवातीचा काही काळ भूतकाळातल्या आठवणी, घडून गेलेल्या गोष्टी, भेटलेली माणसं यांचे विचार मनात येतात. मग काही काळ भविष्याबद्दल विचार केला जातो. ते झालं की मन वर्तमानकाळात येतं. आपण काय ठरवलं आहे, काय करतो आहोत, जे करतो आहोत ते ठरवल्याप्रमाणे होतं आहे का, त्यात काही बदल करायला हवेत का, हे विचार सुरू होतात. काही काळाने ते विचारही थांबतात. मग समोर एखादा पर्वत असेल तर मनातल्या मनात त्याचं वर्णन करायला सुरुवात करायची. याचा उपयोग होतो, नाही असं नाही; पण नंतर नंतर तो पर्वत म्हणजे एक वस्तू असल्यासारखं वाटायला लागतं. आपल्या सगळ्या जाणिवांवर ताण पडलेला असतो. आपल्याला होणारा त्रास, शरीराची एक-एक वेदना समजून घेऊन दूर लोटायची असते. दुसरीकडे, नेमका रस्ता शोधायचा नसला, तरी दिशाभान हरवून चालणार नसतं. विशेषतः आसपास लोकवस्ती नसलेल्या प्रदेशातून चालत असताना (त्याच्या वाटेवर असे भरपूर टापू होते) आपल्यावर मागून एखादा प्राणी किंवा जंगलातल्या माणसांचा हल्ला होऊ शकतो, या शक्यतेकडे सतत लक्ष ठेवावं लागतं. ही सावधता नकळत वाढत जाते; आपण निसर्गाचाच एक भाग बनून जातो, जागरुक असणं याचा खरा अर्थ त्या वेळी समजतो. अशा अती सावधतेमुळे प्रत्येक गोष्टीची अती चिकित्साही केली जाते. तो म्हणतो, 'शब्दांत सांगणं फार अवघड आहे, अनुभव घेतला तरच ते कळेल.'

सावधता, अतिचिकित्सा होतीच; पण मारियोने स्थानिकांचे अनुभव, tips, सल्ले यांचाही कायम उपयोग करून घेतला. त्याला ठिकठिकाणी भेटलेली स्थानिक माणसं खूप अगत्यशील, आपलेपणाने वागणारी होती. त्याच्या सामानात कोरडे, वाळवलेले खाद्यपदार्थ कायम ठेवलेले असायचे. वाटेत जिथे जिथे वाणसामानाचं किंवा खाद्यपदार्थांचं दुकान दिसेल तिथे तो असे पदार्थ खरेदी करून ठेवायचा. पण अनेकदा असं व्हायचं, की ग्रामीण भागांमध्ये सलग दोन-तीन दिवस असं एकही दुकान दिसायचं नाही. अशा वेळी तो स्थानिकांकडे जेवायचा. काही ठिकाणी त्याने स्थानिकांसोबत मासेमारीचेही प्रयत्न केले. पण ते सतत करणं शक्य नव्हतं. पण एकूणच त्याच्या मोहिमेबद्दल उत्सुकता असणारी, त्याला मदत करण्यासाठी धडपडणारी माणसं त्याला ठिकठिकाणी भेटली.

तो केपटाऊनहून निघाला त्या पहाटे त्याला काही स्थानिक तरुण भेटले. तो कोण आहे, कुठे निघाला आहे, याची चौकशी केल्यावर त्यातल्या एकाला मारियोच्या मोहिमेत खूपच रस वाटला. पहिले दोन-तीन दिवस तो मुलगा चक्क त्याच्याबरोबर चालला. तो खूप बोलघेवडा होता. त्याच्यामुळे मोहिमेची सुरुवात चांगली झाली, असं मारियो सांगतो. पुढे दक्षिण आफ्रिकेतच एका ठिकाणी त्याला बघून एकाने गाडी थांबवली; त्याची चौकशी केली. मारियोचं पुढचं मुक्कामाचं जे गाव होतं तिथेच त्या माणसाचं घर होतं. रस्ता अवघड होता. मारियोचं वेळेचं गणित जरा चुकल्याने अंधार होत आला होता. त्या माणसाने आग्रह करून मारियोला घरी नेलं; रात्री ठेवून घेतलं; आणि यांत्रिक वाहनातून प्रवास न करण्याचा मारियोचा निश्चय कळल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा मारियोला ते रस्त्यात भेटले त्या ठिकाणी आणून सोडलं.

मारियो मोझांबिकमध्ये पोहोचला तोवर स्थानिक टीव्ही चॅनल्समुळे लोकांना त्याच्या मोहिमेची माहिती कळलेली होती. लहानसहान गावांतही माणसांनी त्याला ओळखलं. सगळे त्याच्या मदतीसाठी धावाधाव करत होते. काहींनी तर त्याला पैसेही देऊ केले. या लोकांच्या मनात मारियोबद्दल भीती, परकेपणा अजिबात नव्हता. एका माणसाने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. उत्साहात स्वयंपाकाची तयारी करत असताना घरातला स्टोव्ह बिघडला. तो माणूस अगदी दुःखीकष्टी झाला. मारियोने थोडी खटपट करून जवळच्या गावातून त्याच्यासाठी नवा स्टोव्ह मागवला. त्या माणसाला इतका आनंद झाला की त्याने मारियोला आणखी दोन दिवस घरी ठेवून घेतलं. कधीकधी त्यांचं असं अगत्य मारियोला नको व्हायचं. जेवणाखाण्याला नको म्हटलं तरी ती माणसं हाताने भरवायला बघायची. रात्री तंबू ठोकून मारियो झोपला असेल तर त्याच्या रक्षणासाठी म्हणून त्याच्या शेजारी येऊन झोपायची.

रिग्बी

कित्येक खेड्यांमध्ये कमालीचं दारिद्र्य होतं. दोनदोन दिवस काहीही खायला न मिळालेली माणसं होती. पण मारियोला दिसलं की ते त्यांच्या सवयीचं होतं. त्यावर उपाय शोधता येतात, पर्यायी मार्ग शोधावे लागतात, हेदेखील त्यांना ठाऊक नव्हतं. कित्येक गावांमधल्या माणसांना त्या वाटेवरचं पुढचं गाव कोणतं आहे, किती लांब आहे, तिथे कोण राहतं याची काडीचीही कल्पना नसायची. त्यामुळे पुढे जाऊ नकोस, तिकडे भूतपिशाच्चं असतात, अशा गोष्टी सांगून ती माणसं मारियोला रोखण्याचा प्रयत्न करायची. आफ्रिकेतला असा कल्पनेपलिकडचा संपर्काचा अभाव दूर व्हायला हवा, ही गोष्ट मारियोने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये नमूद केली आहे.

मोझांबिकमध्येच मारियो एका जंगलभागात सैनिक आणि बंडखोरांच्या चकमकीत सापडला. 'दोन्हीकडून गोळीबार सुरू होता, एके-४७ च्या गोळ्या सटासट जवळून जात होत्या. सैनिकांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसती तर त्या दिवशी मी मेलोच असतो,' असं तो सांगतो. योग्य माहिती योग्य वेळात न मिळणं, भाषेचा प्रश्न असे अनेक गोंधळ झाल्यामुळे हे घडलं.

भाषेचा प्रश्न, संवादातल्या अडचणी याबद्दल सांगताना तो म्हणतो, 'एका कृष्णवर्णीय देशात, कृष्णवर्णीय खंडात, एक कृष्णवर्णीय माणूस म्हणून काही तोटेही असतात. पूर्व आफ्रिकी देशांमध्ये इतके वेगवेगळे संघर्ष सुरू असतात की परक्या कृष्णवर्णीय माणसाला निर्वासित, अतिरेकी, चोर, असं काहीही समजलं जाऊ शकतं.' त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोणत्याही गावात शिरताना तो आधी कायम गावच्या मुखियाला शोधायचा. मुखिया नसेल तर स्थानिक पोलिस; पोलिसही नसतील तर गावात थोडंफार इंग्रजी बोलणारं कुणी आहे का, हे शोधायचा. काही ठिकाणी असा एखादा शिक्षक वगैरे असायचा. तो दारूच्या नशेत नसेल तर त्याच्याशी बोलता येण्याची शक्यता असायची. नाहीतर मग संशय, भीती, गोंधळ, गैरसमज यांची खात्रीच. मलावीमध्ये एका गावात त्याला अशाच गोंधळामुळे काही दिवस चक्क तुरुंगाची हवा खावी लागली.

मलावी हा मोझांबिक आणि टांझानियादरम्यानचा एक लहानसा देश. मलावीच्या उत्तर-पूर्व सीमेवर 'लेक मलावी' हा मोठाच्या मोठा तलाव आहे. तलावाच्या काठाकाठाने चालत जाण्याचा पर्याय होताच; मात्र मारियोने तलावातून ५५० किमी अंतर होडी वल्हवत (कयाकिंग) काटलं आणि टांझानियाची सीमा गाठली.

रिग्बी

होडी तलावाच्या काठावरून आत न्यायची, जमेल तितकं अंतर जायचं आणि संध्याकाळी पुन्हा पुढे कुठेतरी किनारा गाठायचा, तंबू ठोकून मुक्काम करायचा, असं त्याने दोन महिने केलं. त्याने त्याआधी कधीही कयाकिंग केलेलं नव्हतं, हे विशेष. एकदा एका ठिकाणी होडीत बिघाड झाला. होडी अचानक बुडायलाच लागली. तलावाच्या काठापासून तो दोन-एक किमी आत आलेला होता. मग त्याने पाण्यात उतरून, एका हाताने होडी पकडून पोहत पुन्हा किनारा गाठला. होडी दुरुस्त केली. मुळात ही होडी त्याच्याकडे कुठून आली? तर, होडीतून तलावाची परिक्रमा पूर्ण करणारे दोन भटके त्याला तिथे भेटले. त्यांनी त्यांची होडी मारियोला देऊ केली.

मोहिमेला एक वर्ष झालं तेव्हा मारियो टांझानियामध्ये होता. वर्षभरातले अनुभव इतके दमवणारे, थकवणारे होते, की एक महिनाभर एखाद्या अंधार्‍या खोलीत स्वतःला कोंडून घ्यावं, काहीही करू नये, कुणाशी भेटू-बोलूही नये, असं अगदी आतून वाटल्याचं त्याने नमूद केलं आहे.

स्थानिकांबरोबर रिग्बी

पुढे सुदानमध्येही त्याच्या आधी त्याच्या मोहिमेची कीर्ती पोहोचली होती. मोझांबिकप्रमाणे तिथेही दर पाच मिनिटांनी कुणी ना कुणी त्याचा फोटो काढायला धावत होतं. त्याच्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी तरुण, लहान मुलं धडपडत होती. सुदानमध्ये स्थानिकांनी मारियोची चक्क दोन जाहीर व्याख्यानंही आयोजित केली.

इजिप्तमध्ये मोहीम संपणार होती. शिवाय मारियोला इजिप्तमधल्या पिरॅमिड्सबद्दल अतिशय उत्सुकता होती. पण इजिप्तपेक्षा सुदानमध्ये जास्त पिरॅमिड्स असल्याचं त्याला दिसलं. पण हे बाहेर विशेष कुणालाच माहिती नसेल. तो म्हणतो, 'प्रसारमाध्यमांमधून आफ्रिकेचं भलतंच चित्र आपल्या माथी मारलं जातं. प्रत्यक्षात आफ्रिका खूप वेगळी आहे, तिची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यं आहेत. ती समोर न आल्यामुळे तिथल्या लोकांचं तर नुकसान होतंच, पण आपणही खूप काही गमावतो. ही दरी जितकी लवकर कमी होईल तितकं चांगलं.'

आफ्रिकेत जाऊन तिथल्या लोकांना आपल्या प्रगत जाणिवांचा उपयोग करून द्यावा, असा काहीतरी विचार घेऊन मी तिथे गेलो, पण आफ्रिकेनेच माझ्या जाणिवा अधिक समृद्ध केल्या, हेदेखील तो प्रांजळपणे कबूल करतो.

२४ फेब्रुवारी २०१८. तब्बल २८ महिन्यांनी कैरोत मारियोची मोहीम संपली. एकूण ७४० दिवस चालणं, ६० दिवस होडीतून किंवा बोटीतून मार्गक्रमण, रोज साधारण आठ ते १२ तास प्रवास; इतकं सगळं झाल्यावर कैरोत मारियोला कसं वाटलं? याचं उत्तर म्हणून तो एक समर्पक उदाहरण देतो, 'आपण वर्षभर परीक्षेसाठी झटून तयारी केलेली असते आणि अचानक एक दिवस ती परीक्षा पारही पडते. आणि मग रिकामपण येतं, वेगळं काय करावं हे सुचत नाही. तसंच माझं झालं.'

आफ्रिकेतून कॅनडात परत आल्यावर शहरी आयुष्याशी पुन्हा जुळवून घेणं त्याला खूप अवघड गेलं. पुढे वर्षभर त्याला नैराश्याने ग्रासलं होतं. या गोष्टीला तो 'रिव्हर्स कल्चर शॉक' असं म्हणतो. त्याला आयुष्य कंटाळवाणं वाटायला लागलं. आसपासची सगळी माणसं आळशी वाटायला लागली. जंगलाला, वाळवंटाला, पर्वतांना, एकटेपणाला अंगावर घेण्यासाठी जो रासवटपण नकळत अंगी बाणवला गेला होता, तो उतरवून ठेवायला त्याला खूप प्रयास पडले. पण शेवटी नशिबाने ते जमलं, असं तो म्हणतो.

स्थानिकांबरोबर रिग्बी

लहानपणी त्वचेच्या रंगावरून सोसाव्या लागलेल्या भेदभावाचं एक अदृश्य ओझं घेऊन मारियो आफ्रिकेत गेला. आफ्रिकेने त्याच्या विचारांमध्ये मोठे बदल घडवले. आता त्या भूमीसाठी आणखी काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे. विजेवर चालणार्‍या वाहनातून संपूर्ण आफ्रिका खंडाची परिक्रमा करण्याच्या मोहिमेची आखणी तो करतो आहे. आफ्रिकेतलं अंतर्गत दळणवळण सुधारण्यासाठी इ-वाहनांचा पर्याय तिथे पोहोचायला हवा असं त्याला वाटतं. तिथल्या माणसांना शारीरिक भेदभावांपलिकडचं जग बघता यावं, एवढाच त्याचा उद्देश आहे.

'अनुभव' मासिकात पूर्वप्रकाशित. फोटो
मारिओच्या संस्थळावरून, फेसबुक-इन्स्टाग्रामवरून घेतले आहेत.

सिंधुआज्जी आणि टारझनचे पशू

- देवदत्त

आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचा एक निर्जन प्रदेश. सायंकाळचा समय. अटलांटिक महासागर आफ्रिकेचे चरण (ॲक्चुअली, नकाशाप्रमाणे बघितलं तर, कोपर किंवा काख) क्षाळीत होता. महासागरातून जमिनीकडे पाहिलं तर बॅकग्राऊंडला निबिड अरण्य, आणि फोरग्राऊंडला सोनेरी वाळूचा किनारा. पशुपक्ष्यांच्या हालचाली आणि आवाज वगळले तर निःस्तब्ध शांतता.

अचानक दोन गलबते दृगोचर झाली. एक गलबत झपाट्याने किनाऱ्याजवळ आले, आणि त्याच्या डेकवरून सागवानी लाकडाची सुबक फळी किनाऱ्यावर फेकली गेली. पेस्टल कलरचं नऊवारी पातळ नेसलेली आणि त्यावर बॉम्बार्डियर जॅकेट घातलेली एक वयस्कर स्त्री सा.ला.सु. फळीवरून चालत किनाऱ्यावर उतरली. एका खुशालचेंडू खादाडखाऊ खुनशी खलाशाने तिची ट्रंक आणि वळकटी किनाऱ्यावर फेकून दिली, आणि सा.ला.सु. फळी ओढून घेतली. गलबत लगबग पुढे निघून गेले. त्याच्या डोलकाठीवरील झेंडा मतलई वाऱ्यांच्या झुळुकीवर मोठ्या दिमाखात फडकत होता. चाणाक्ष वाचकांनो - तुम्ही जाणलेच असेल की तो साधासुधा झेंडा नव्हता; तर काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची कवटी आणि हाडे दर्शवणारा समुद्री चाच्यांचा झेंडा होता - जॉली रॉजर!

चाच्यांनी किनाऱ्यावर उतरवलेल्या वयस्कर स्त्रीने बॉम्बार्डियर जॅकेटच्या खिशातून पॉकेट डायरी बाहेर काढली, एक पान फाडलं आणि जांभळ्या स्केचपेनने ती त्यावर काहीतरी लिहू लागली. मजकूर लिहून झाल्यावर तिने ट्रंकमधून महाभृंगराज तेलाची रिकामी बाटली काढली, आणि त्यात चिठ्ठी ठेवून समुद्राच्या लाटांवर अर्पण केली. चिठ्ठीवर एकच शब्द होता - "Marooned." आणि त्यानंतर तारीख आणि अक्षांश रेखांश.

हे पहिलं काम आटपल्यावर ती स्त्रीने आपल्या बटव्यातून सॅटेलाईट फोन काढला आणि स्पीड डायलवरचं तिसरं बटण दाबलं. पलीकडे, सोमाली चाच्याने तात्काळ फोन उचलला.

"अगदी सुयोग्य ठिकाणी Maroon केलंत. शाब्बास, आणि धन्यवाद!"

"तुमच्यासाठी कायपण, कधीपण, सिंधुआज्जी!"

सिंधुआज्जी स्वतःशीच हसल्या.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ब्रिस्टल ते बहामा क्रूझ शिपचा प्रवास सुरू केला होता. क्रूझ शिपने युरोपचा किनारा मागे टाकल्यानंतर सिंधुआज्जींनी आपल्या जीवश्च कंठश्च सोमाली चाच्यांना टेलेक्स धाडला होता. मग, चाचांचं आगमन होईपर्यंत सिंधुआज्जींनी क्रू. शि.च्या कप्तानाला केपांचं पिस्तूल दाखवून क्रू. शि. मोरोक्कोच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनच्या बाहेर थांबवून ठेवलं होतं.

सोमाली चाच्यांचं एक गलबत - सांता मारिया - चाच्यांनीच पेरलेल्या समुद्री सुरुंगावरून जाताना स्फोट होऊन उध्वस्त झालं होतं. बाकी दोन जहाजांच्या कप्तानांमध्ये मार्गाबद्दल तात्त्विक मतभेद झाले होते. तात्त्विक मतभेदांचं रूपांतर रुसवेफुगवे, धुसफूस, आणि अबोला यांत झाल्यावर (सोमाली चाचे झाले म्हणून काय झालं, शस्त्रांशिवाय आणि शब्दांशिवायदेखील ते संवाद साधू शकत होते) अखेरीस सामोपचाराने निन्या गलबताने सुएझ कालव्यातून तर पिंटा गलबताने केप ऑफ गुड होपला वळसा घालून प्रवास केला होता. दोन्ही गलबतं एकसमयावच्छेदेकरून क्रूझ शिपपाशी पोहोचली होती; आणि त्यांनी सिंधुआज्जींचे अपहरण केले होते. (क्रू. शि.च्या कप्तानाने आपले जहाज रोखून धरणाऱ्या चाचीचा बंदोबस्त केल्याबद्दल सोमाली चाच्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला होता.)

सिंधुआज्जींनी स्वतःच्याच अपहरणाचा आणि किनाऱ्यावर सोडल्याचा बनाव का घडवून आणला होता?

गेल्या दहा हजार वर्षांत झाला नसेल अशा प्रथितयश ऑनलाईन दिवाळी अंकात लेख लिहिण्यासाठी सिंधुआज्जींना टारझनच्या कथांमधील पशूंचा मागोवा घ्यायचा होता. टारझन कथेतल्या उल्लेखानुसार, बंडाळी करणाऱ्या नाविकांनी टारझनच्या आईवडलांना आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर एका निर्जन प्रदेशात सोडून दिलं होतं, म्हणजेच मरून केलं होतं. त्यामुळे, “Life imitates art” या उक्तीनुसार आपल्या प्रवासाची सुरुवातही आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर निर्जन प्रदेशात maroon केलं जाऊन व्हावी असे सिंधुआज्जींचे मनोगत आणि मनोरथ होते. आता, टारझनच्या कथेत कुठे अपहरणाचा उल्लेख नव्हता; पण ती सिंधुआज्जींनी घेतलेली creative liberty होती.

सिंधुआज्जींच्या मनोगताची आणि मनोरथाची पूर्तता झाली होती, आणि टारझनच्या कथांमधील पशूंचा अभ्यास करण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या. निसर्गतज्ज्ञ जॉर्ज शेल्लरच्या सूचनेनुसार दुर्बीण, नोंदवही, आणि प्राणी पाहायची इच्छा या तिन्ही बाबी (आणि त्याव्यतिरिक्त ट्रंक, वळकटी, आणि बटव्यात भरलेल्या अनेकविध चीजवस्तू) सोबत बाळगत सिंधुआज्जींनी आपला प्रवास सुरू केला.

शंभरएक मीटरच्या (रुंदी, लांबी नव्हे - तो काय प्रभादेवीच्या किंवा बॅण्डस्टॅण्डचा किनारा आहे काय?) वालुकामय किनाऱ्यानंतर वृक्षराजी सुरू होत होती; त्या दिशेला सिंधुआज्जींनी कूच केले. हळूहळू वळसे घेत जाणाऱ्या एका निर्झरास पाहून त्या हसल्या. निर्झराच्या लाटांवर पाय टाकुनी बसलेला औदुंबरासारखा वृक्षराज पाहून त्यांचे हसू अधिकच रुंदावले. सिंधुआज्जींनी वर पाहिले. वृक्षाच्या विस्तीर्ण शाखांमध्ये त्यांच्या सूचनेबरहुकूम बांधलेल्या ट्री हाऊसखाली "सुस्वागतम" लिहिलेली डोअरमॅट दिमाखात फडकत होती. सिंधुआज्जींनी विवक्षित शीळ वाजवली आणि ट्री हाऊसमधून दोराची शिडी खाली फेकली गेली. "सिंधुआज्जींनी मारली उडी, आणि सरसर चढल्या शिडी"चे प्रात्यक्षिक दाखवत शिडी चढून सिंधुआज्जी घरात गेल्या.

"नमस्कार सिंधुआज्जी! आपले स्वागत आहे!" आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत एका तरुणाने त्यांचे स्वागत केले. "मी वॅल वालावलकर. तुमचा वाटमाऱ्या - आपलं, वाटाड्या!"

"नमस्कार वॅल," सिंधुआज्जी म्हणाल्या. "तुम्ही आफ्रिकेतील पशू या विषयाचे जाणकार आहात आणि त्याबद्दल दीर्घ व्यक्त होता असं मला सांगण्यात आलं. मला वाटतं की आपण प्रवासाची सुरुवात मार्जारवर्गीय प्राण्यांपासून करावी.”

"जरूर," वॅल म्हणाला. "आफ्रिका म्हटली की सिंह आलेच!"

"सिंह काय म्हणताय? न्युमा (Numa) म्हणा किंवा सॅबोर (Sabor) म्हणा. न्युमाला आयाळ असते, सॅबोरला नसते," सिंधुआज्जी विजयी मुद्रेने म्हणाल्या.

"ओके ओके. न्युमा म्हणजे सिंह, सॅबोर म्हणजे सिंहीण," वॅल थोडासा कन्फ्यूज झाला होता.

"आणि एल अड्रेआ म्हणजे काळा सिंह. उत्तर आफ्रिकेतील सिंह," सिंधुआज्जींची मुद्रा अधिकच विजयी झाली.

"गेली पन्नास-साठ वर्षं उत्तर आफ्रिकेत सिंह नाहीत. त्यांची शिकार झाली," वॅल दुःखी चर्येने म्हणाला.

"माहितीये मला. काही वर्षांपूर्वी मला एकजण भेटला होता. तो म्हणाला, मी उत्तर आफ्रिकेतला मोठा शिकारी आहे. तिथे बिबळे, उंट, काळवीट, सिंह यांची शिकार केलीय! मी म्हटलं - काहीही बोलू नका, उत्तर आफ्रिकेत सिंह नाहीत. तर म्हणतो कसा, बरोबर! मी सगळ्याच सिंहांची शिकार केली."

रेड बुलचा एक घोट घेऊन सिंधुआज्जी पुढे बोलू लागल्या, "असो. एल अड्रेआ नाही तरी न्युमा आणि सॅबोर दाखवाल ना? आणि शीता?"

"शीता? चित्ता म्हणायचंय का तुम्हाला?"

"नाही नाही. शीता (Sheeta) म्हणजे बिबळ्या," सिंधुआज्जींनी खुलासा केला.

"बरं. तुम्हाला न्युमा, सॅबोर, शीता सगळं दाखवू."

"आणि जा? जातो?"

"कुठे जाऊ? आणि तुम्ही जातो म्हणता? जाते म्हणत नाही? म्हणजे, तुमचं प्रोनाऊन काय ते मला सांगा, मी लक्षात ठेवीन."

"जाते कशाला म्हणू? मला कुठे जात्यावरच्या ओव्या रचायच्या आहेत?”

"काय??"

"अहो विनोद केला हो. जा (Ja) म्हणजे ठिपकेदार सिंह, आणि जातो (Jato) म्हणजे सिंह आणि सेबर-टूथ वाघ यांची संकरित प्रजाती! 'टारझन द टेरिबल'मध्ये उल्लेख आहे त्यांचा."

वॅलने सुस्कारा सोडला. "सिंहांना बालपणी ठिपके असतात. सिंह मोठे होतात तसे ते ठिपके अंतर्धान पावतात. केनियात ठिपकेदार सिंहांच्या आख्यायिका आहेत, पण सबळ पुरावे नाहीत."

"आणि जातो?"

"सेबर-टूथ वाघ नामशेष झाले त्याला हजारो वर्षं झाली, तर त्यांची सिंहांबरोबर संकरित प्रजाती कुठून येणार? आणि हो, सिंह आणि वाघीण यांचा संकर झाल्यास लायगर जन्माला येतात, पण नर लायगरांना पिल्लं होत नाहीत. तशी नर खेचरांनाही होत नाहीत म्हणा. तर, जातो अशी प्रजाती जरी असती तरी तग कसा धरून राहणार?"

"ठीक आहे. उद्या न्युमा, सॅबोर, शीता आणि इतर दिसतील ती मांजरं बघायला जाऊ. ठीक पाच वाजता ट्री हाऊसवर येऊन घुबडाच्या आवाजात शीळ वाजवा. गुड नाईट."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन वॅल सटकला. नजीकच्या बांबूच्या बनात स्वतःसाठी बांधलेल्या क्र. ५४ च्या घरी जाताना तो (माणसाच्या आवाजात) शीळ घालत होता - "बांबूचे घर पहायला हवे, बांबूच्या घरात रहायला हवे"

सिंधुआज्जींनी पपनस, पर्सीमन, पीच, पेअर असा माफक फलाहार केला आणि त्या निद्रिस्त झाल्या.

दुसऱ्या दिवशी पहाटे ठीक पाच वाजता सिंधुआज्जींना घुबडाच्या आवाजातील शीळ ऐकू आली. त्या तयारच होत्या, आणि पुन्हा एकदा "सिंधुआज्जींनी मारली उडी, आणि सरसर चढल्या शिडी"चे प्रात्यक्षिक दाखवत, वॅल वालावलकरने विमानातून सोडलेली शिडी चढून त्या विमानात स्थानापन्न झाल्या.

पुढचे बरेच तास विमानातून प्रवास करताना सिंधुआज्जींनी सिंहांचे कळप पाहिले, खडकावर बसून ऊन खाणारे बिबळे पाहिले, देशोदेशी निर्यात केले जाऊन फुका मारले जाऊ या भयाने सैरावैरा पळणारे चित्ते पाहिले, आणि कॅराकल, सर्व्हल इत्यादी रानमांजराच्या आकाराचे मार्जारवर्गीय प्राणीही पाहिले.

यादरम्यान, आपल्या नोंदवहीत नोंदी करत सिंधुआज्जींनी वॅलला विचारले होते,

"या मांजराचं भक्ष्य असलेले प्राणी आपल्याला दिसतील ना? पॅक्को (Pacco) म्हणजे झेब्रा, होर्टा (Horta) म्हणजे डुक्कर, बारा (Bara) म्हणजे हरण, वाप्पी (Wappi) म्हणजे कुरंग?"

"कुरंग? एखाद्या प्राण्याचा रंग तुम्हाला आवडत नसेल तरी असं बॉडी-शेमिंग करणं शोभतं का तुम्हाला सिंधुआज्जी?" वॅलने सात्त्विक संतापाने विचारले होते.

"अहो, कुरंग म्हणजे वाईट रंगाचा प्राणी असं नाहीये. कुरंग म्हणजे अँटेलोप. भारतातल्या काळवीटासारखे. त्यांना भरीव शिंगं असतात आणि ती शिंगं दरवर्षी गळत नाहीत. हरणांची शिंगं पोकळ असतात आणि दरवर्षी गळून नवीन उगवतात."

"अच्छा, कुरंग हा शब्द मला माहित नव्हता. थँक्स हं, सिंधुआज्जी!"

"मुद्द्याचं बोला! हे सगळे प्राणी दाखवणार ना मला?"

"नाही सिंधुआज्जी, झेब्रे पश्चिम आफ्रिकेत नसतात; फक्त पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत असतात. उत्तर आफ्रिकेतले काही देश सोडले तर आफ्रिकेत हरणं नाहीत. बाकी, कुरंगांचे आणि डुकरांचे निरनिराळे प्रकार आपल्याला दिसू शकतात. पण लक्षात ठेवा, जंगलात प्राणी दिसतील याची खात्री नसते."

"आपण प्रयत्न तर करू! आणि इतर प्राण्यांचं काय? टॅन्टोर (Tantor) म्हणजे हत्ती, बुटो (Buto) म्हणजे गेंडा, बोल्गानी (Bolgani) म्हणजे गोरिल्ला. किती सुंदर प्राणी आहेत ते!"

"प्रयत्न करू," वॅल म्हणाला. सिंधुआज्जींच्या दुर्दम्य आशावादाने तो थकून गेला होता.

तरीही यथाशक्ती प्रयत्न करून वॅलने जमतील तेवढ्या प्रजातींचे प्राणी सिंधुआज्जींना दाखवले. गोरिल्ला जंगलात दिसणं कठीण असल्याने त्याने एका शहरातल्या प्राणिसंग्रहालयावर विमान नेऊन तिथले गोरिल्ले दाखविले. सिंधुआज्जी माफक प्रमाणात खूष झाल्या.

संध्याकाळी ट्री हाऊसला परतल्यावर, नवलकोल बार्बेक्यू करत सिंधुआज्जी वॅलला म्हणाल्या, "सर्वात महत्त्वाचं राहून गेलं! मंगानी (Mangani) कपि-वानर या प्रजातीबद्दल मला माहिती सांगा."

"टारझनच्या गोष्टींमधले मंगानी कपि-वानर? टारझनच्या वडिलांना मारणारे, बाल-टारझनला सांभाळणारे?"

"हो हो, तेच ते. त्यांची स्वत:ची भाषा आहे, ते चंद्राकडे बघून ओओओओओ अशी आरोळी ठोकतात, आणि कधीकधी मातीचे ड्रमदेखील वाजवतात."

"अहो सिंधुआज्जी, असे प्राणी अस्तित्वात नाहीत."

"असं कसं? एडगर राईस बरोजने सविस्तर वर्णन केलंय त्यांचं. आणि ते गोरिल्ला नाहीत हेसुद्धा लिहिलंय. गोरिल्लाला बोल्गानी म्हणतात; ते आणि मंगानी यांत वैर असतं; हे सगळं लिहिलंय. बरोजजीने लिखा है तो कुछ सोच समझ के ही लिखा होगा ना?"

वॅल हसला. "अहो सिंधुआज्जी, अशी प्रजाती असती तर त्या काळच्या किंवा नंतरच्या वैज्ञानिक साहित्यात काहीतरी उल्लेख आला असता ना? आणि तुमचा एडगर राईस बरोज आफ्रिकेत आला तरी होता का कधी? अमेरिकेतल्या घरी बसून कपोलकल्पित गोष्टी लिहिल्या त्याने."

"मग काय झालं? ज्यूल्स व्हर्ननेदेखील घरी बसूनच लिहिल्या ना गोष्टी!" सिंधुआज्जी सात्विक संतापाने म्हणाल्या.

"खरंय. पण ज्यूल्स व्हर्नच्या गोष्टींना सबळ वैज्ञानिक आधार होता. बरोजच्या गोष्टी वाचकांना रंजक वाटाव्यात या एकाच हेतूने लिहिलेल्या, सवंग होत्या. म्हणून तर त्याच्या पुस्तकांमध्ये अतर्क्य आणि अशक्य प्राणी आणि मानव असतात. मघाशी तुम्ही 'टारझन द टेरिबल'चं म्हणालात. अहो, त्या पुस्तकात ग्रफ नावाच्या, ट्रायसेराटॉप्ससारख्या प्राण्यांचासुद्धा उल्लेख आहे. वाझ-डॉन आणि हो-डॉन नावाच्या, शेपटीवाल्या मानवी प्रजाती आहेत असाही उल्लेख आहे.”

"किती गंमत ना? अशा प्रजाती खरंच असत्या तर आपण गाणं म्हटलं असतं - शेपटीवाल्या प्रजातींची एकदा भरली सभा, वाझ-डॉन होता सभापती मधोमध उभा!"

"गंमत म्हणून ठीक आहे. पण सांगायचा मुद्दा हा की एडगर राईस बरोज हा काही विज्ञानकथा लिहीत नव्हता. त्या काळातल्या वाचकांना काय आवडेल हे समजून तशा गोष्टी लिहिणं हा त्याचा हातखंडा होता. मग यात वीर, रौद्र, शृंगार, बीभत्स असे बरेच रस आले. म्हणून तर 'टारझन द टेरिबल'मध्ये हो-डॉन प्रजातीच्या एका धर्मगुरूला टारझनची बायको जेन आवडते आणि तो तिचं अपहरण करतो; पुढे टारझन तिला वाचवतो वगैरे गोष्टी. नरमांसभक्षक टोळ्यांच्या गोष्टी. वगैरे, वगैरे."

थोडंसं पाणी पिऊन वॅल पुन्हा बोलू लागला, "बरोजच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये पश्चिम आफ्रिकेतील कृष्णवंशीय लोक क्रूर, नरमांसभक्षक असे दाखवलेत. पुढच्या कादंबऱ्यांमध्ये पूर्व आफ्रिकेचे वझिरी टोळीचे कृष्णवंशीय लोक शूर आणि इमानदार दाखवलेत, पण तरीही श्वेतवंशीय टारझन त्यांच्यापेक्षा अधिक हुशार, ताकदवान, शूर वगैरे दाखवलाय. श्वेतवंशीय लोकांमध्येही इंग्लंड, अमेरिका, आणि फ्रान्सचे लोक चांगले, आणि जर्मनी आणि रशियाचे लोक वाईट अशी ढोबळ मांडणी केलीय. सांगायचा मुद्दा हा की एडगर राईस बरोजच्या कादंबऱ्या टाईमपास म्हणूनच ठीक आहेत. त्यांत फार अर्थ शोधू नये."

बोलून बोलून वॅलचा घास कोरडा पडला होता. त्याने सिंधुआज्जींकडे टॅमप्लीस मागितली, आणि रेड बुलचा एक कॅन फस्त करून तो पुन्हा बोलू लागला:

“एखाद्या देशातल्या माणसांविषयी आणि अगदी पशुपक्ष्यांविषयी प्रांजळपणे लिहायला लेखक सहृदय असणं आवश्यक असतं. उदाहरण सांगायचं झालं तर, जिम कॉर्बेट भारतात जन्मला, भारतात वाढला, अनेक दशकं भारतीय लोकांमध्ये मिळूनमिसळून राहिला. त्याच्या पुस्तकांमध्ये माणसांबद्दल आणि प्राण्यांबद्दलही खरोखरचा जिव्हाळा आणि आपुलकी जाणवते. दक्षिण भारतातलं उदाहरण घ्यायचं झालं तर केनेथ अँडरसन. अगदी आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर ॲड्रीयन बोशीयर दक्षिण आफ्रिकेच्या जमातींमध्ये राहिला आणि त्यांच्या संस्कृतीचा पाईक झाला. हे सगळे जण आणि तुमचा बरोज यांची तुलनाच होऊ शकत नाही.”

सिंधुआज्जींनी सुस्कारा सोडला. "म्हणजे आफ्रिकेतील पशूंचा मागोवा घ्यायची कल्पना योग्य नव्हती तर?"

"तसं नाही सिंधुआज्जी, आपण उद्या पुन्हा प्राणी पाहायला जाऊच. पण पूर्वग्रह बाजूला ठेवून जाऊ आणि जे प्राणी दिसतील त्यांत आनंद मानू. तुम्ही झकास लेख लिहाल असं मटेरियल शोधू आपण. आणि तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल तर चांगल्या शास्त्रज्ञांची पुस्तकं वाचा. एडगर राईस बरोज गेला खड्ड्यात. डील?"

"डील!" सिंधुआज्जी उत्साहाने म्हणाल्या, आणि बटव्यातील धोत्र्याची पाने काढून चहाची तयारी करू लागल्या.

---

Partial glossary (*E&OE)

Word in Tarzan World Meaning Initial Reference In
Bara Deer Tarzan of the Apes
Bolgani Gorilla Tarzan of the Apes
Buto Rhinoceros Tarzan and the Golden Lion
Gryf Dinosaur combining features of triceratops, stegosaurus, and other dinosaur species Tarzan the Terrible
Horta Boar Tarzan of the Apes
Ja Spotted Lion Tarzan the Terrible
Jato Hybrid of lion and saber-tooth tiger Tarzan the Terrible
Mangani Anthropoid Ape Tarzan of the Apes
Numa Lion Tarzan of the Apes
Pacco Zebra Tarzan and the Golden Lion
Sabor Lioness Tarzan of the Apes
Sheeta Leopard Tarzan of the Apes
Tantor Elephant Tarzan of the Apes
Wappi Antelope Tarzan and the Golden Lion

--- 

आशियाई प्रश्न: युगांडा सोडण्याबद्दल..."

मूळ लेखक: महमूद ममदानी

- रोचना

प्रा. महमूद ममदानी न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्राचे आणि आफ्रिकन इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक असून भारतीय वंशाचे युगांडन नागरिक आहेत. अधिक तपशील इथे.

ममदानींचे पुस्तक युगांडा

नोव्हेंबर १९७२मध्ये, इदी अमीनच्या हुकुमावर युगांडा सोडलं तेव्हा मी विशीत होतो. आदल्या वर्षी सरकार पाडून अमीननं बळजबरीनं राष्ट्रपतीपद मिळवलं होतं. युगांडातल्या सुमारे सत्तर हजार आशियाई जनतेच्या हकालपट्टीचा आदेश ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला होता. आम्हांला देश सोडून जायला तीन महिन्यांची मुदत दिली गेली. वीस हजारच्या आसपास लोक युगांडाचे नागरिक होते; बहुतेक तितक्याच लोकांनी नागरिकत्वाचे अर्ज भरले होते, पण काहीच निष्पन्न झालं नव्हतं. नागरिकत्वाचा विषय हा राजकीयदृष्ट्या किती वादग्रस्त झाला होता, त्याचं हे चिन्ह होतं. या शिवाय नागरिकत्वाचा किंवा पासपोर्टचा अर्जच कधी न भरलेले लोक होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर युगांडाचे नागरिक म्हणून नाव नोंदवून, पुढे ते नागरिकत्व हिरावून घेतलेल्यांपैकी मी होतो. सुमारे पंचवीस हजार युगांडन आशियाई लोकांसोबत मी ब्रिटनला रवाना झालो, आणि लंडनमधल्या केन्सिंगटन चर्च स्ट्रीटवरच्या एका युवा हॉस्टेलमध्ये माझी सोय केली गेली. हॉस्टेल केन्सिंगटन पॅलेसच्या मागेच होतं, आणि निर्वासितांसाठी तात्पुरतं शिबीर म्हणून त्याचा वापर होत होता. पुढे सहा महिन्यांनी तांझानियाच्या दार-एस-सलाम विद्यापीठात माझ्या पहिल्या प्राध्यापकी नोकरीत मी रुजू झालो. १९७९मध्ये, अमीनचा पाडाव झाल्यावर मी युगांडाला परतलो, आणि नैरोबीच्या ऑल आफ्रिका कॉन्फरन्स ऑफ चर्चेस या सर्वसमावेशक ख्रिस्ती संघटनेसाठी काम करू लागलो. कंपालामधल्या चर्च ऑफ युगांडाच्या कचेरीत माझी नेमणूक होती. त्याच्या पुढच्या वर्षी मी माकारेरे विद्यापीठात नोकरीला लागलो. तेव्हा भेटलेल्या बहुतेक युगांडन लोकांना मी आशियाई हकालपट्टीबद्दल आवर्जून विचारायचो. त्यांच्यापैकी बहुतेक लोकांचा हकालपट्टीला विरोध नव्हता; ती ज्या पद्धतीने अमलात आणली गेली ती त्यांना पसंत नव्हती. तो माझ्यासाठी बोधाचा क्षण होता. पुढे दहा वर्षांनी, युगांडात आणि ब्रिटनमध्ये मी हाच प्रश्न माझ्या १९७२च्या पूर्वीच्या आशियाई वंशाच्या मित्रांना, जुन्या शेजाऱ्यांना, आणि शाळकरी मित्रांना विचारला. त्यांच्यापैकी बहुतेक जणांचं उत्तर हेच होतं, की हकालपट्टीची पूर्वस्थिती त्यांना नको होती. याचं मला आश्चर्य वाटलं. जरी हकालपट्टीच्या वेळेस त्यांनी बरंच काही सोसलं असलं, तरी १९८०पासून मी विचारत असलेल्या ‘मूळ’ युगांडन लोकांप्रमाणेच त्यांनाही मुळात हकालपट्टीच्या आदेशाला विरोध नव्हताच. काळे असोत वा भारतीय खंडातले आशियाई, युगांडात स्थायिक असलेल्या बहुतांश लोकांचं असं मत का बरं होतं?

ब्रिटिश आणि युगांडाच्या न्यायव्यवस्थांमध्ये आशियाई लोकांचे हक्क क्रमश: काढून घेतले गेले; १९७२मध्ये जे झालं त्याची बीजं या प्रक्रियेत होती, हे माझ्या लक्ष्यात आलं. तोपर्यंत त्यांना युगांडात राहून सत्तर वर्षं झाली होती. १८८४मध्ये बुगांडा राज्य ब्रिटिश छत्रछायेखाली ‘रक्षित राज्य’ [protectorate] म्हणून आकाराला आलं, आणि त्याचा भूभाग क्रमश: विस्तारून जेमतेम आजच्या युगांडाएवढा झाला. १८९५ साली ब्रिटिशांनी वायव्येकडच्या नुबी लोकांचं बंड मोडून काढण्यासाठी ३०० पंजाबी सैनिकांची एक पलटण मागवली होती; यात अनेक ब्रिटिश अधिकारी मारले गेले होते. १९३०मध्ये पंजाबी पलटणी माघारी घेईपर्यंत एव्हाना तीन निराळे भारतीय गट युगांडात ठळकपणे दिसून येत होते. पहिला गट होता अलीदीन विश्राम याच्या मदतीने भारतीय साहुकारांनी दुका, अर्थात दुकानं लावली होती, ती चालवायला आलेल्या लोकांचा. विश्रामनं समुद्रकिनाऱ्यावरच्या झांजिबार आणि मोम्बासा शहरांमध्ये संपत्ती कमावली होती, आणि त्यानं युगांडा आणि पूर्व काँगोच्या आतल्या भागांपर्यंत विस्तारण्यास लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. दुसरा गट होता पस्तीस हजार भारतीय, बहुतेक पंजाबी, मजुरांचा – १८९५ नंतरच्या काळात युगांडाच्या रेल्वेवर काम करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना इथं आणलं. १९०१मध्ये काम पूर्ण झाल्यावर त्यांच्यापैकी सुमारे सात हजार मजूर इथंच, म्हणजे ब्रिटिश पूर्व आफ्रिकेतच, राहिले. तिसरा गट होता ब्रिटिश वसाहती प्रशासनात नोकरी करण्यासाठी आणलेल्या भारतीयांचा.

शेजारच्या केनिया किंवा तांगान्यीका वसाहतींच्या तुलनेत (तांगान्यीका पहिल्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत जर्मनांकडे होतं), युगांडात एक देशी अभिजन वर्ग होता. बुगांडा राज्याच्या विस्तारासाठी मदत केल्याबाबत ब्रिटिश प्रशासनानं या वर्गाला भरघोस मोबदला दिला. बुगांडा राज्य हे स्वत: विस्तारवादी होतंच; त्याचं खडं सैन्य आणि प्रशासन होतं. नवे प्रदेश हस्तगत करताना शेजारच्या बुन्योरो-कितारा राज्याबरोबर त्यांनी युती करू पाहिल्या. या सर्वांत ब्रिटिशांची भूमिका कळीची होती. सर्वप्रथम, बुगांडात कॅथलिक फ्रेंच मिशनऱ्यांचे अनुयायी, प्रोटेस्टंट इंग्रजी मिशनऱ्यांचे अनुयायी, आणि कबाका मुवांगा यांचे मुसलमान समर्थक अशा तीन दलांमध्ये यादवी युद्ध सुरू झालं, तेव्हा ब्रिटिशांनी इंग्रजी मिशनऱ्यांची बाजू घेतली. यानंतर त्यांनी बुगांडाच्या बहुतेक सर्व प्रौढ पुरुषांची सैन्यात सक्तीनं भरती करून बुन्योरो-किताराला नमवलं. अखेर बुन्योरो-किताराचा एक तृतीयांश भाग बुगांडा राज्याकडे त्यांच्या सहकार्याचा मोबदला म्हणून दिला गेला. बुगांडा राज्याची आठ हजार चौरस मैल जमीन प्रोटेस्टंट चर्चच्या प्रशासनातल्या नोटऱ्यांना मालकी हक्कावर दिली गेली. यानं एका नवीन जमीनदारी वर्गाचा पाया घातला गेला.

युगांडात मळ्यांचीदेखील व्यवस्था होती. निवृत्त ब्रिटिश सैनिकांना मोठ्या जमिनी बहाल केल्या गेल्या, आणि त्यांवर त्यांनी निर्यातीसाठी रबराची लागवड केली. पहिल्या महायुद्धानंतर वस्तूंच्या किंमतींत घट झाली, आणि या रबराच्या मळ्यांचा लिलाव झाला. विकत घेणारे होते मेहता आणि मधवानी घराण्यांचे श्रीमंत भारतीय व्यापारी. त्यांनी रबरऐवजी एतद्देशीय बाजारासाठी साखरेचं उत्पादन सुरू केलं, आणि पुढे जाऊन मोठाल्या, फायदेशीर कंपन्यांचं जाळं स्थापन केलं. लुगाझी आणि काकिरासारख्या गावांत त्यांची इंजिनियरिंग आणि कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होती. काकिरा हे मधवानीनगर या नावानं प्रसिद्ध झालं.

तांगान्यीकात अशा संधी तुलनेने कमी होत्या. परदेशातून येणाऱ्या, आर्थिक उन्नती करू पाहणाऱ्या लोकांना तो आकर्षक असा पर्याय नव्हता. इकडे केनिया ‘गोऱ्या साहेबाचा देश’ असा लौकिक बनला होता. आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या आशियाई लोकांसाठी युगांडा हाच एक पर्याय होता. यामुळे, १९६२मध्ये, स्वातंत्र्याच्या क्षणी, तिथे दोन स्पर्धक अभिजन वर्ग होते: ब्रिटिशांनी निर्माण केलेला बुगांडा जमीनदारी वर्ग, आणि स्थायिक झालेला व्यापारी अभिजन वर्ग. मिल्टन ओबोटे यांच्या नेतृत्वाखालच्या, युगांडाच्या पहिल्या स्वतंत्र प्रशासनाला बुगांडात समर्थन नव्हतेच; त्याचे समर्थक देशाच्या उत्तरेत होते. भरपूर जमीनदार आणि नोकरशहा असलेल्या बुगांडा-मध्यमवर्गानं ओबोटेचा विरोध केला, आणि त्या दबावाखाली त्याच्या सरकारनं आशियाई व्यापारी आणि उत्पादक वर्गाशी आर्थिक युती पत्करली. १९७१मध्ये इदी अमीननं ओबोटेच्या ‘उत्तरमुखी’ सरकारचा पाडाव केला, तेव्हा त्यानं साहजिकच बुगांडा अभिजनांकडे मित्रत्वाच्या नात्यानं पाहिलं. स्वातंत्र्यानंतर ज्याचं राजकीय महत्त्व पुष्कळ वाढलं होतं, त्या ‘आशियाई प्रश्ना’वर त्यानं तोडगा काढायचं ठरवलं, तेव्हा त्याला बुगांडा अभिजनांच्या उत्साही समर्थनाची खातरी होती.

खरी गोम होती ब्रिटननं बुगांडाचं रक्षित राज्य सोडलं, त्या वेळेस तयार केलेले नवीन युगांडा देशाचे नागरिकत्वाचे कायदे. १९६२च्या ‘स्वातंत्र्य घटने’नुसार, ज्यांचे आईवडील युगांडाचे असतील, आणि आईवडिलांच्या आजी-आजोबांपैकी कोणी युगांडात जन्मले असतील, त्यांनाच फक्त युगांडाचं नागरिकत्व मिळणार होतं. माझ्या अंदाजानं त्या वेळेस फक्त १०% युगांडन आशियाई लोक या नियमानुसार नागरिकत्व घेऊ शकले असते. पुढे सहा वर्षांनी ब्रिटननंसुद्धा आपल्या नागरिकत्वाच्या कायद्यात एका ’एतद्देशीय’ अटीची भर घातली, आणि युगांडन आशियाई लोक अधिकच पेचात सापडले. We'’'re Here because You Were There या पुस्तकात इअन संजय पटेल म्हणतात, "१८६८चा Commonwealth Immigrant Act हा ब्रिटनबाहेर जन्मलेल्या, अथवा स्थायिक झालेल्या गौरेतर ब्रिटिश नागरिकांना लक्ष्य करून तयार केलेला हा पहिला स्थलांतरितांसाठीचा कायदा होता. आश्चर्याची बाब म्हणजे, ब्रिटननं देशातल्या प्रवेशाधिकारापासून आपल्या राष्ट्रीयत्वाच्या सर्वांत मोठ्या घटकाला विलग केले." या कायद्याने "देशात स्थलांतर करणाऱ्या ब्रिटिश नागरिकांचा प्रवाह अचानक कमी केला, पण पूर्णपणे बंद केला नाही." १९६८ आणि १९७१मध्ये ‘पैतृक वंशक्रमाच्या नियमांचा’ [rules-based ancestral descent] ब्रिटिश कायद्यात समावेश झाला. आफ्रिका, कॅरिबियन, भारतखंड आणि आग्नेय आशियात राहत असलेल्या, आणि ब्रिटनमध्ये प्रवेशाधिकार अनिवार्य असलेल्या पंधरा लाख गौरेतर ब्रिटिश नागरिकांवर, अर्थात युनायटेड किंगडम अँड कॉलनीजच्या नागरिकांवर, नवीन नियमांनुसार बंदी आली. "कोणालाही स्वतःच्या मायदेशी प्रवेश नाकारला जाणार नाही" या युरोपीय मानवी हक्क अधिवेशनाच्या चौथ्या मसुद्याच्या क्रमांक ३.२ मुद्द्याचं, तसेच १९६९ साली मान्य झालेल्या सर्व प्रकारच्या वांशिक शोषणाच्या उच्चाटनास्तव आंतरराष्ट्रीय धोरणात "प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशात परत येण्याचा हक्क असतो, आणि हा हक्क वांशिक आधारावर अवलंबून नसावा," या क्रमांक ५.ड मुद्द्याचंदेखील, या कायद्यामुळं उल्लंघन झालं.

ब्रिटनच्या या धोरणामुळे 'आशियाई प्रश्न' हा निव्वळ युगांडा आणि इतर पूर्व-आफ्रिकी देशांचा उरला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबोटे सरकारनं आशियाई बिगर-नागरिकांना उद्देशून व्यापाराच्या परवान्यांचा [Trade Licensing Act (1969)] आणि देशात स्थायिक झालेल्यांसाठी [Immigration Act (1970)] कायदे केले. पटेल यांच्या शब्दांत, "ब्रिटिश नागरिक" म्हणून वर्णिले जात असले, तरी प्रत्यक्षात युगांडातले हजारो आशियाई ब्रिटिश नागरिक अचानक ‘बिनराष्ट्राचे’ झाले. हकालपट्टीच्या आदेशाच्या तीन दिवसांनंतर ‘सुमारे सत्तावन्न हजार ब्रिटिश नागरिक युगांडात आहेत’ आणि ‘या लोकांप्रती सरकारची खास जबाबदारी आहे’ असं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री ॲलेक डग्लस-होम यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये मान्य केलं. पण ही जबाबदारी कायद्याच्या दृष्टीनं नसून मानवीहितवादी होती, हेही सरकारनं स्पष्ट केलं. गृहखात्याचे अधिकारी टी. फित्जजेरल्ड यांनी परराष्ट्र आणि संघराष्ट्र खात्याला ऑगस्ट १९७२मध्ये लिहिलेल्या पत्राचा पटेल दाखला देतात. त्यात ते म्हणतात, "युगांडातल्या ब्रिटिश पासपोर्ट असलेल्यांना (UKPHs) ते तांत्रिकदृष्ट्या निर्वासित नसले, तरी निर्वासित म्हणूनच प्रवेश दिला पाहिजे." आणि युगांडात राहत असलेल्या तीन हजार गोऱ्या ब्रिटिश नागरिकांना सप्टेंबरमध्ये, आशियाई हकालपट्टीच्या पुष्कळ आधी, निर्वासन [evacuation] करण्याचा आराखडा तयार झाला, तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची व्याख्या गौरेतर UKPHs पासून काळजीपूर्वक वेगळी केली. त्यांना ‘आपल्यातलेच’ [belongers] असं लेखलं गेलं.

यावर भरतवाक्य होतं युगांडाकडून संयुक्त राष्ट्रसंघाला गेलेल्या दूताचं. सप्टेंबर १९७२मध्ये, १९६८चा राष्ट्रसंघ स्थलांतरितांचा कायदा [Commonwealth Immigrants Act] हेच मूळ पाप असून अमीनने त्याचा फक्त कित्ता गिरवला होता, असा कागद त्यांनी राष्ट्रसंघाच्या साधारण सभेत मांडला. पटेल लिहितात, "१९६८चा कायदा हा काळ्या आणि इतर वंशाच्या लोकांना अडवण्याचं पण ज्यांचे पूर्वज ब्रिटनचे होते, त्या गौरवर्णीय ब्रिटिश नागरिकांना मुक्त मार्ग देण्याचं, वंशवादी साधन होतं. दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, किंवा हाँगकाँगमध्ये राहणारा गोरा ब्रिटिश नागरिक हवं तेव्हा ब्रिटनमध्ये प्रवेश करू शकतो, पण आशियाई ब्रिटिश नागरिकांना अडवलं जातं, प्रवेश नाकारला जातो, असं का?, असा या कागदात स्पष्ट प्रश्न होता."

तात्पर्य, युगांडा आणि ब्रिटन अशा दोन नागरिक कायद्यांच्या कात्रीत हजारो आशियाई सापडले. १९६८नंतर ब्रिटिश पासपोर्ट असलेल्या कोणत्याही युगांडन आशियाई व्यक्तीला ना ब्रिटनमध्ये प्रवेश मिळाला, ना युगांडात व्यापाराचा किंवा नोकरीचा परवाना.

हकालपट्टीच्या आधी युगांडन आशियाई लोकांची आर्थिक परिस्थिती एकसारखी नव्हती. मोजकी श्रीमंत घराणी उत्पादन आणि व्यापारविश्वात आघाडीवर होती, पण हजारो लोक बिकट परिस्थितीत होते. हकालपट्टीपूर्वीच्या आशियाईंच्या परिस्थितीत आणि १९८६मध्ये राष्ट्रपती योवेरी मुसेवेनीच्या प्रोत्साहनामुळे १९९०च्या दशकात युगांडाला परतलेल्या लोकांमध्ये याहून मोठा फरक जाणवतो. मोठ्या इस्टेटी असलेले शेकडो लोक त्या इस्टेटींवर हक्क बजावण्याकरता परतले. पण छोट्या जमिनींचे, घरांचे मालक फारसे फिरकले नाहीत. अनेकजण मुखत्यारनामे मिळवून स्वत:च मालमत्ता हस्तगत करू पाहणाऱ्या ब्रिटन आणि कॅनडा-स्थित भ्रष्ट वकिलांच्या सापळ्यात सापडले. काही लोकांनी स्वागताच्या ताज्या वातावरणाचा फायदा घेऊन भारत आणि पाकिस्तानातून नव्याने स्थलांतर केलं. त्यांच्यापैकी बहुतेकांना तिथून पुढे पाश्चात्य जगात प्रवेश करण्याची इच्छा होती; काही जण मानवी तस्करीचा शिकार झाले होते. या नवोदित लोकांना ‘रॉकेट’ म्हटलं जाई – मागे फिरण्याची कोणतीही शक्यता नसणारे, एकाच दिशेने प्रवास करणारे.

मुसेवेनीनं लोकांचं स्वागत केलं, पण १९९५च्या घटनेनुसार एतद्देशीय नसलेल्या अर्जदारांना नागरिकत्व मिळणं अजूनच कठीण झालं. यासाठी कोणा एका एतद्देशीय गटाशी रक्ताचं नातं असणं अनिवार्य केलं गेलं. घटनेच्या तिसऱ्या सूचीत एतद्देशीय टोळ्यांची यादी आहे. या नियमानुसार त्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या या देशात राहिल्या असल्या तरी युगांडन आशियाई माणसाला नागरिकत्व मिळणं अशक्य झालं. मुसेवेनीनंदेखील आशियाई लोकांचा कधीही नागरिक म्हणून उल्लेख केला नाही; ते गुंतवणुकदार आहेत, आणि देशात राहायचा त्यांना हक्क नसून स्थानिक व्यापाऱ्यांना न मिळणाऱ्या फक्त काही सवलती दिल्या जात आहेत हे त्यानं स्पष्ट केलं. यामुळं एकीकडे आशियाई लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली, आणि दुसरीकडे युगांडन लोकांच्या मनात अढी. वास्तविक मुसेवेनी हा ओबोटेच्या १९६०च्या धोरणाचाच कित्ता गिरवत होता. जुन्या बुगांडा अभिजनांविरुद्ध फक्त प्रतिभार म्हणून आशियाई व्यापारी वर्ग त्याला हवा होता. १९९०नंतर आलेल्यांसाठी आणि त्यांच्या वंशजांसाठी युगांडा हा केवल तात्पुरता थांबा आहे. १९७२मध्ये हकालपट्टी झालेल्या आशियाई लोकांसाठी मात्र युगांडा हाच मायदेश होता.

हाकलल्या गेलेल्या आशियाई लोकांना पीडितांच्या रूपात पाहण्याची पद्धत रुळली आहे. आमच्या पहिल्या पिढीतल्या लोकांनी क्वचितच आपले अनुभव नोंदवले. एक समाज म्हणून आमच्यात ना बखरकार उपजले, ना स्वानुभवाची चिकित्सक पाहणी करणारे. दुसऱ्या पिढीतल्या लोकांनी ही उणीव थोडी भरून काढली आहे. निर्वासितांच्या जीर्ण झालेल्या गोष्टींचं कालांतरानं पीडितांची एकसुरी कहाण्यांमध्ये रूपांतर झालं आहे. असल्या कहाण्यांना एका खलनायकाची गरज असते, आणि इदी अमीनचे असंख्य गुन्हे केलेला रानटी पशू म्हणून पद्धतशीरपणे चित्रण झाले आहे. ओबोटेच्या दडपशाहीतून मुक्ती मिळवून देणारा उदात्त पशू (noble savage) म्हणून एकेकाळी ब्रिटिशांच्या नजरेत भरणाऱ्या अमीनला अचानक कसं वाळीत टाकलं गेलं हीच एक अजब कहाणी आहे. ब्रिटिश राजकारणी, मीडिया, त्याला भेटलेले लोक, आणि युगांडन नेते, या सर्वांनी हा बदल घडवून आणला. हेन्री कियेम्बा या नेत्यानं तर अमीन स्वत:च्या बायकोमुलांचा खुनी आणि नरभक्षक असल्याच्या गोष्टी रचल्या. जेम्स कॅलहॅन पंतप्रधान असताना ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यानं अमीनची तुलना कंबोडियाच्या पोल पॉटशी केली, आणि त्याची हत्या करवून घेण्याबाबत शोधाशोधही केली.

पण युगांडन आशियाई काही पीडितांच्या चौकटीत बसत नाहीत. सर्वप्रथम, हकालपट्टीचे परिणाम सर्वांनी समान भोगले नाहीत. साधारण बारा हजार लोकांसाठी हकालपट्टीच्या आदेशानं कोंडी फुटल्यासारखं झालं. चिघळलेल्या नागरिकत्वाच्या प्रश्नामुळे, आणि सरकारकडून कामाचे परवाने बंद झाल्यामुळे त्यांना घरभाडं परवडेनासं झालं होतं. मंदिरांत, मशिदींमध्ये, गुरुद्वारांत ते आश्रय घेत होते, किंवा लहान खोल्यांमध्ये गर्दी करून राहत होते. बॉब ॲस्टल्स, या ओबोटे आणि अमीनखाली असलेल्या वरिष्ठ गुप्तहेराच्या मते, ते "छळछावण्यांत असल्यासारखे" राहत होते. या मोठ्या गटानं हकालपट्टीच्या आदेशाचं स्वागत केलं. यामुळे UKPH (ब्रिटिश पासपोर्ट असलेल्या) लोकांना ब्रिटनमध्ये थोड्या कष्टानं का होईना, प्रवेश मिळवता आला. उरलेल्यांपैकी काही जण कॅनडाला गेले, काही राष्ट्रसंघाच्या शिबिरांत, आणि तिथून विविध युरोपीय देशांत, मुख्यत्वे स्वीडनला गेले. कुटुंबियांसकट काही हजारांत मोडणारे उद्योगपती आणि व्यापारी मौल्यवान मालमत्तेला मुकले खरे, पण हद्दपारीतही भरभराटीचं जीवन जगले. पुढे मुसेवेनीच्या काळात त्यांनी हिरावलेली मालमत्ता पुन्हा मिळवायचा प्रयत्न केला.

आज हकालपट्टीचे अनुभव रेखाटण्याभोवती एक लहान उद्योगच तयार झाला आहे. पुस्तकांचे ढिगांवर ढीग उपलब्ध आहेत. अनुभवांच्या समूहगानात नीमा शाह यांच्या कोलोलो हिल [Kololo Hill] कादंबरीचा प्रांजळपणा प्रखरपणे जाणवतो. कंपालाच्या समृद्ध भागात राहणाऱ्या दांपत्याच्या आशा नावाच्या नवीन सुनेची गोष्ट. तिचा नवरा प्राण हा दुकानदार असतो. त्याच्यासोबत ती संसार मांडते, पण तो, त्याचे आईवडील, त्याचं अखंड कुटुंब, आणि आख्खा आशियाई व्यापारी समाजच जणू, एका मायावी, अप्पलपोटी जाळ्यात अडकले आहेत हे तिला उमगत जातं. हकालपट्टीच्या अनुभवकथांमध्ये आशियाई लोक चोऱ्या, बलात्कार आणि हिंसेचा शिकार असल्याचं पुन्हापुन्हा सांगितलं जातं, पण ही कादंबरी या सरसकट चित्रणावर महत्त्वपूर्ण भाष्य करते.

१९७२मध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊन लोक मारले गेले नाहीत हे नमूद करायला हवं. शिवाय, आशियाई युगांडात आल्यावर, सत्तर वर्षांत अधून-मधून झालेल्या कोणत्याही कत्तलींमध्ये ते खेचले गेले नाहीत. चोऱ्यामाऱ्या अथवा लुटीचाही त्यांना फारसा त्रास झाला नाही. अर्थात, हकालपट्टी हीच एक मोठी, व्यवस्थित आयोजित केलेली लुटालूट होती; तिथेही लहानसहान उचलेगिरीला वाव नव्हता. मोठ्या अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या कोणत्याही मालमत्तेत सामान्य सैनिकानं अफरातफर करू नये असे सक्त आदेश होते. आम्हां सर्व आशियाई लोकांसाठी सर्वांत मोठी ताटातूट झाली आमच्या घराची, आमच्या मायदेशाची; हे नुकसान सर्व निर्वासितांनी भोगलं. एखाद्या जागेशी नातं जमायला अनेक पिढ्या लागतात. ज्यांची हकालपट्टी झाली ते जिथे गेले तिथे उपरे – हिंदुस्तानीत सांगायचं झालं तर मुसाफिर – म्हणूनच राहिले. पुन्हा मुळं उपटून दुसरीकडे जाण्याच्या तयारीतच ते कायम राहिले. पुनर्वसन झालेल्या मित्रांना मी भेट देत असे, तेव्हा ते गेस्टहाउसमध्ये राहत असल्याचा भास होई.

हकालपट्टीच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त माकारेरे येथील इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक सॅमविरी ल्वांगा-लुन्यीगो यांनी "युगांडा: एक भारतीय वसाहत, १८९७-१९७२" [Uganda, an Indian Colony 1897-1972] हे पुस्तक प्रकाशित केलं. युगांडा ही ब्रिटिश वसाहत होती ही बहुतेक सर्वांची धारणा असल्यामुळे हे शीर्षक युगांडन लोकांना चिथावणी देणारं होतं – प्रकाशकासाठी असं शीर्षक म्हणजे मेजवानीच! ल्वांगा-लुन्यीगोंचं म्हणणं होतं की पूर्व आफ्रिकेतले भारतीय खुद्द वसाहती सत्ताधारी नसले, तरी ते उप-वसाहती सत्ताधारी होते. गोऱ्या सत्ताधाऱ्यांचे लाडावलेले पाईक होते. आता नेमके कोणते गट उप-वसाहती सत्ताधारक होते अथवा नव्हते, हा युगांडातला फार जुना वाद आहे. १९६०-७०च्या दशकांत या संदर्भात बुगांडाच्या राज्याने ब्रिटिशांशी केलेल्या युतीची आणि त्यानंतर प्रोटेस्टंट अभिजनांना सहयोगाबद्दल मिळालेल्या मोबदल्याची चर्चा झाली. ब्रिटनच्या लष्करी उद्दिष्टं गाठून झाल्यावर बुगांडाच्या मुत्सद्द्यांना सर केलेल्या प्रांतांत बुगांडासारखं प्रशासन उभारण्यासाठी पाठवल्याबद्दलही अशीच चर्चा होत असे. म्हणजे बुगांडाचं राज्य उप-वसाहती स्वरूपाचं होतं, आणि त्यात बुगांडाच्या जनतेवर अत्याचार होत असे, असा हा तर्क होता. युगांडन आशियाईंबद्दलही हेच म्हणता येईल, असा ल्वांगा-लुन्यीगोंचा तर्क होता.

इथे कळीचा मुद्दा ‘अप्रत्यक्ष’ राज्यव्यवस्थेचा आहे. सत्तास्थापनेची कळकट्ट कामं – प्रांत सर करणं, पेठबाजारांवर ताबा मिळवणं, रोजचं प्रशासन चालवणं – ही वसाहती सत्ताधारकांनी कधी स्थानिक तर कधी लांबच्या गटांकडून, आणि कधी एतद्देशीय तर कधी बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांकडून करवून घेतली. त्यासाठी त्यांना सवलती, किंवा जमिनी दिल्या, पण ते वसाहती व्यवस्थेतच दबून राहिले. स्वातंत्र्यानंतर काही काळ ‘उप-वसाहतवाद’ आणि ‘अप्रत्यक्ष राज्य’ यांचा परस्परविरोधी अर्थ लावला गेला: उप-वसाहती गट हे राष्ट्राचे वैरी होते, या उलट अप्रत्यक्ष राज्य चालवणाऱ्या गटांना, व्यापक वसाहतविरोधी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता होती. ल्वांगा-लुन्यीगोंच्या चौकटीत मात्र, हा फरक निरर्थक होता. त्यांच्या मते युगांडन आशियाई अप्रत्यक्ष राज्याचे एजंट असल्यामुळे त्यांच्याशी युती अशक्य होती.

ल्वांगा-लुन्यीगो यांच्या पुस्तकात हकालपट्टीच्या काही महिन्यांपूर्वी अमीन आणि आशियाई पुढाऱ्यांमध्ये झालेल्या वाटाघाटींची हकीकत आहे. त्यावरून त्या पुढाऱ्यांची कोती राजकीय विचारशक्ती पाहून चकित व्हायला होतं. अमीननं चर्चेची सुरुवात आशियाई लोकांच्या उणीवांच्या यादीनं केली: ते समाजात मिसळत नाहीत; वांशिक शोषणाचा विरोध करतात पण वसाहती सत्तेकडून त्यांना मिळालेल्या सवलतींबद्दल काहीच बोलत नाहीत; फक्त ब्रिटिशांना दोष देत बसतात; प्रामाणिक व्यापार करणं हे त्यांच्या गावीच नाही; आणि युगांडन समाजाशी त्यांना बांधिलकी नाही. भविष्याचा विचार करून या सगळ्या मुद्द्यांवर विचार करण्यास अमीननं त्यांना आमंत्रित केलं, पण त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, आमचा समाज फारच छोटा आहे, सरकारी निर्णयांबद्दल आम्ही काय बोलणार?

मुळात, युगांडातले, तसेच पूर्व किंवा दक्षिण आफ्रिकेतले आशियाई लोक अधिवासी [settlers] नव्हते. ते येऊन स्थायिक झालेले लोक होते [immigrants]. यातला फरक स्पष्ट आहे. अधिवासी लोक स्वत:चे आणि वसाहतीचे ठळक, निराळे राजकीय अस्तित्व निर्माण करू पाहतात. यालाच अधिवासी वसाहतवाद [settler colonialism] म्हणतात. या उलट केवळ स्थायिक झालेले लोक असतील त्या राष्ट्रीय आणि राजकीय व्यवस्थेत, त्यांना पटो न पटो, तडजोड करून आपली सोय करू पाहतात. अधिवासींचं स्थानिक समूहांशी सहसा जमत नाही. बंदूक न बाळगणारा अधिवासी विरळाच. पण बंदूक बाळगणारा दुकावाला, किंवा आशियाई दुकानदार हा तितकाच विरळा. १९५८मध्ये युगांडाच्या राष्ट्रीय चळवळीने व्यापार बहिष्कार मोहीम चालवली होती, तेव्हाच फक्त भारतीय मळ्यांच्या मालकांनी शस्त्र धारण केले होते. तडजोड करणारा, बुजरा, अशीच दुकावाल्याची सर्वसाधारण ओळख आहे. ही काही वसाहती सत्ताधारकांची किंवा जगज्जेत्यांची लक्षणं नव्हेत. ती व्यापाऱ्यांची मात्र आवर्जून आहेत. म्हणूनच, दुकावाल्यांमध्ये अभिजनवर्ग तयार झाला, तेव्हा त्याने राजकीय प्राधान्याऐवजी आर्थिक प्राधान्य निवडलं.

भारतीय समाजात पुढाऱ्यांपेक्षा व्यापक विचारशक्तीचे लोक होते. Transition पत्राचे संपादक रजत नियोगी यांनी वकील आणि राजकारणी अबु मयंजा, आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक अली मॅझरुई यांच्याबरोबर मिळून वसाहतोत्तर आफ्रिकेच्या भवितव्याचा विचार करणारं पत्र काढलं. नव्या पिढीतल्या काही कार्यकर्त्यांनी युगांडा ॲक्शन ग्रूप स्थापन केलं. हा गट ओबोटेच्या युगांडा पीपल्स कॉंग्रेसशी निगडित होता. पण हे "आशियाई" राजकीय नेते नव्हते. किंबहुना, आशियाई समाज हा जात-संप्रदायाच्या राजकारणात अडकला आहे, म्हणून ते त्यापासून दोन हात लांबच राहिले. १९९५ नंतर उभारलेल्या एशियन आफ्रिकन असोसिएशन ऑफ युगांडा या संस्थेच्या बीजपत्रात या विचारांचा कानोसा घेता येतो.

आम्ही साउथ एशियन, अर्थात भारतीय, पाकिस्तानी किंवा बा‍ङ्लादेशी नाही, कारण साउथ एशियन हे दक्षिण आशियात राहतात, आणि त्यांचं भवितव्य तिथेच आहे. आम्ही परदेशस्थ साउथ एशियनही नाही, जे तात्पुरते परदेशात स्थायिक होतात आणि भविष्यात घरी परतण्याची स्वप्नं पाहतात. आमची मुळं दक्षिण आशियात असली तरी आमचा वर्तमान आफ्रिकी आहे. आमच्यापैकी अनेकांना त्यांचं भविष्य आफ्रिकेतच दिसतं. आम्ही आशियाई मुळाचे आफ्रिकी आहोत, आशियाई आफ्रिकी.

पन्नास वर्षं लोटून गेल्यावर हकालपट्टीबद्दल बरंच काही म्हणण्यासारखं आहे. उपऱ्यांना सामावून घेणं हे वसाहतपूर्व आफ्रिकी समाजांचं एक मोठं सामर्थ्य होतं. उदाहरणार्थ, बुगांडा लोकांमध्ये सुरुवातीला, तेराव्या शतकात, चारच कुलं होती असं म्हणतात. हळूहळू विसाव्या शतकापर्यंत त्यांची संख्या चाळीस झाली. आफ्रिकी पिंड हा विभाजनाचा नसून एकसंघतेचा आहे; अम्हारा, अरब, हौसा, वस्वाहिली, झुलू आणि इतर समाजांत हीच वस्तुस्थिती आहे. पण युगांडाच्या पहिल्या घटनेनं ही वसाहतपूर्व प्रथा न अवलंबता, वसाहती कप्प्यांची आणि उतरंडीची प्रथाच पुढे चालवली. १९९५च्या घटनेनं यावर शिक्कामोर्तब केलं. मुसेवेनी प्रशासनानं स्थानिक स्वराज्याचा विस्तार करताना ’एतद्देशीय’ चौकट दृढ केली आहे. विविध ’एतद्देशीय’ अल्पसंख्य गटांना निराळा जिल्हा बहाल करून अशा जिल्ह्यांची संख्या वाढवली आहे. या उलट सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व नागरिकांना समान मानण्याचा पर्याय निवडता आला असता.

ल्वांगा-लुन्यीगोंच्या मांडणीशी आपण सहमत असलो काय, किंवा नसलो काय, ‘आशियाई प्रश्न’ काही सुटलेला नाही. मुसेवेनीच्या काळात त्याचं स्वरूपही बदललं आहे. युगांडन पासपोर्ट असले तरी येणाऱ्या आशियाई लोकांना राजकीय हक्क नसलेले ‘गुंतवणूकदार’ आणि ‘भांडवलदार’ म्हणून लेखणं म्हणजे एकीकडे त्यांना राजकीय दायित्वाहून मुक्त करणं आहे, आणि दुसरीकडे वर्षांनुवर्षं देशात कायमचे उपरे म्हणून राहायला लावणं आहे. आफ्रिकी लोकांच्या मनात त्यांची अप्पलपोटी समाज म्हणूनच साचेबंद प्रतिमा घट्ट झाली आहे. त्यांच्याच मनात मात्र ते कायमच्या अस्थिर आणि असुरक्षित परिस्थितीत आहेत; ती सोसतच ते दिवस रेटत आहेत.

हा लेख इंग्रजीत प्रथम येथे प्रकाशित झाला आहे. मराठी अनुवाद या अंकात प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मूळ प्रकाशकांचे आभार.

इसासून : नायजेरियन खाद्यसंस्कृती

- रुची

माझ्या नेहमीच्या ट्यूबसाठी थांबले असताना एक बाई माझ्याकडे रोखून पाहत होती. वर्षभरापूर्वी टीव्हीवर माझा कार्यक्रम नुकताच प्रसारित झाला होता तेव्हा अनेकदा रस्त्यावर लोक ओळख द्यायचे, कोणी बोलून काहीतरी प्रतिक्रिया द्यायचे, कोणी सेल्फी काढून घ्यायचे, कोणी नुसतेच टक लावून पाहायचे. कार्यक्रमाचा पुढचा सीझन येईपर्यंत माझा चेहरा लंडनमधल्या इतर कृष्णवर्णीय चेहऱ्यांमध्ये मिसळून गेला आणि मी पुन्हा निर्धास्तपणे लंडनमध्ये फिरायला लागले.

त्या कुकिंग शोमध्ये भाग घ्यायची कल्पना खरी माझ्या बहिणीची; तिनंच मी माझ्या ब्लॉगवर नायजेरियन पदार्थांबद्दल लिहिलेला एक लेख आणि माझी माहिती शोसाठी पाठवून दिली. तिचं म्हणणं असं, की या कार्यक्रमात आजपर्यंत कोणीच नायजेरियन पदार्थांबद्दल बोललेलं नाही आणि आणि त्याबाबत काही परिणामकारक बोलणारं तुझ्याशिवाय तरी कोण आहे? मलाही ते तेव्हा पटलं, पण मग त्यानंतर प्रत्यक्ष बोलावणं आल्यापासून, शूटिंग पूर्ण होईपर्यंत अनेकदा आपण कशाला या भानगडीत पडलो असं होऊन जायचं. दरवेळी अबिके मला समजवायची, की तू ज्या हेतूने भाग घेत आहेस तो नक्कीच साध्य होईल. मी शेवटच्या चार स्पर्धकांच्या फेरीपर्यंत मजल मारली, पुढे कार्यक्रम प्रसारित झाला; पण तो पाहिल्यावर मात्र माझा पूर्ण भ्रमनिरास झाला. माझ्या नायजेरियनपणाचं, माझ्या ओळखीचं, नायजेरियन खाद्यसंस्कृतीचं व्यवस्थित सरसकटीकरण झालं, स्मरणरंजनाची फोडणी दिली गेली, देशविरहाची भावनिक पार्श्वभूमी, आम्हां बहिणीबहिणीतल्या प्रेमाची गोष्ट वगैरे झालरी लावून झाल्या; पण मला माझ्या खाद्यसंस्कृतीबद्दल जे सांगायचं होतं ते जवळजवळ सगळं कापलं गेलं. पुन्हा आफ्रिकन वंशाची स्त्री शेवटच्या फेरीपर्यंत गेली म्हणजे भेदभावच कसा केला गेला, तिला वाव देण्यामुळे दुसऱ्या, अधिक गुणवत्ता असलेल्या गोऱ्या माणसाला कसं डावललं गेलं वगैरे अपेक्षित विवादही निर्माण झाले. या सगळ्या प्रकारानंतर मला त्या कार्यक्रमाची कोणी आठवणही करून देऊ नये असं होऊन जाई, पण मिळालेली अल्पजीवी प्रसिद्धी मला पचवावीच लागली.

आताही ही बाई माझ्या दिशेने यायला लागल्यावर मला मनाची तयारी करावी लागली, पण तिने चक्क कार्यक्रमाचा थेट उल्लेखही न करता माझ्याशी संभाषण सुरू केलं. "अगं शाडे, मला तुझे आभार मानायचे होते, मला नायजेरियन खाद्यपदार्थांबद्दल 'जोलॉफ राईस' वगळता काहीच माहिती नव्हती, पण तू ज्या पद्धतीने त्याबद्दल बोलायचीस ते पाहून मी तुझा ब्लॉग वाचायला सुरुवात केली, आणि मला फारच मजा यायला लागली. आता मी वरचेवर जवळच्या आफ्रिकन स्टोअरमध्ये जाते, तिथला दुकानदार आधी माझ्यासारख्या गोरीला 'डावा-डावा' वगैरे मागताना पाहून बावचळायचा, पण तो आता माझा दोस्त झालाय. माझ्यातलं कुतूहल जागं केल्याबद्दल थँक्यू!" आम्ही ट्यूबमध्ये बऱ्याच गप्पा मारल्या. टेरेसा आफ्रिकेतल्या अनेक देशांत फिरली होती, तिचं वाचन खूप वेगवेगळ्या अंगांनी झालेलं असावं. तिचा स्वभावही अगदी मोकळा होता, त्यामुळे काही ओळख नसतानाही तिच्याशी गप्पा मारणं अगदी सहज आणि आनंददायी होतं. ती बोलता बोलता म्हणाली, "बहुतांश लोक नायजेरियन पदार्थांबद्दल कधी बोलतच नाहीत, बोलतात ते 'आफ्रिकन' पदार्थांबद्दल! जणू काही आफ्रिका हा एक छोटासा देशच आहे. तिथली एकच भाषा आहे, एकच जीवनपद्धती आहे, एकच खाद्यसंस्कृती आहे! या इतक्या मोठ्या खंडाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या असंख्य सांस्कृतिक विविधतेला निव्वळ 'आफ्रिकन' अशा मथळ्याखाली खपवण्यातला वंशवाद आणि अज्ञान स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या लोकांच्याही कसा लक्षात येत नाही!" मला जखमेवरची खपली निघाल्यासारखं वाटलं. मी तिला म्हणाले, "नायजेरियन खाद्यसंस्कृतीबद्दल नायजेरियन लोकही अजून बोलायला लागलेले नाहीत. आपली खाद्यसंस्कृती म्हणजे सूपं आणि भरपूर कर्बोदकं ही सरसकट बोळवण तेही मान्य करून टाकतात. आमच्या पदार्थांचे फोटोदेखील अतिशय वाईट पद्धतीने काढले जातात. होय! आमच्या जेवणात बरीच सूपं असतात आणि बरीच कर्बोदकं असतात पण त्यापलीकडेही नायजेरियन अन्न आनंददायी आहे; त्या पाककृतींत असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत; प्रचंड विविधता आहे; साध्या-सरळ, मिरवून न घेणाऱ्या पदार्थांच्या चवी जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या आहेत. जगानं आजपर्यंत नायजेरियन पदार्थांकडे गांभीर्यानं पाहिलेलंच नाही." इतक्यात माझा स्टॉप आला आणि आमचं संभाषण अपुरं राहिलं; पण मी निघण्यापूर्वी तिने एका कागदावर आपलं नाव, इमेल, पत्ता, आणि नंबर लिहून माझ्याकडे दिला. म्हणाली, "अगं तू लिहीत का नाहीस या सगळ्याबद्दल? तूच सांग ना आम्हांला त्या पदार्थांना जडलेल्या गोष्टी!"

टेरेसाशी बोलणं झाल्यापासून माझ्या डोक्यातला किडा वळवळायला लागला होताच, त्यात आज अजून भर पडली. येरुबा भाषेत एक म्हण आहे - 'थप्पड मारण्याआधी त्या चेहऱ्याच्या मालकाची परवानगी घ्या'. या विचित्र वाटणाऱ्या म्हणीचा गर्भितार्थ तसा सरळ आहे; ज्याला टप्पल मारायची आहे त्याची आधी पूर्ण ओळख तरी करून घ्या! नायजेरियन सूपांच्या पाककृती इंग्रजी माध्यमांतून वाचताना मला ही म्हण पावलोपावली आठवत असते. आज एका जगभर प्रवास केलेल्या प्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या पाककृती पुस्तकात 'नायजेरियन रिव्हर प्रोव्हिन्स चिकन सूप'ची पाककृती वाचून माझी अशीच चिडचिड झाली. एकतर हे नायजेरियन रिव्हर प्रोव्हिन्स कुठे आहे याचा मला पत्ता नाही, पण माझं असं अनुमान आहे, की त्याला 'बायेलसा सूप' म्हणायचं असावं. नावापासूनच अशी सुरुवात झाल्यावर पुढे वाचून माझी फार निराशा झाली नाही. त्यात बारीक चिरलेला कांदा, सोलून बारीक चिरलेले टोमॅटो, छोट्या फोडी करून घेतलेलं चिकन, सोलून शिजवून घेतलेली कोलंबी, फ्रोझन पालक, तिखट पूड, पाम तेल वगैरे जिन्नस वापरले होते. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे पामऐवजी इतर कोणतंही तेल वापरलं तर चालण्यासारखं होतं. ही पाककृती 'नायजेरियन' या शीर्षकाखाली देणं म्हणजे घोर अपराध आहे याची त्या बिचाऱ्या लेखकाला कल्पनाच नसावी. एकतर कोणताही स्वाभिमानी नायजेरियन माणूस मांस परवडत नसल्यासारखं बारीक तुकडे करून वापरणार नाही; हे त्याच्यासाठी कमीपणाचं आहे. पाहुणेरावळे आले, की त्यांना दिवाणखान्यातून स्वयंपाकघरात शिजणारं मांस दिसलं पाहिले असं ठळकपणे वापरायची पद्धत आहे. भर म्हणून त्यात चिरलेले टोमॅटो, तिखट पूड, आणि पाम तेलाऐवजी इतर कोणतंही तेल! हे सगळं कमी होतं की काय म्हणून फ्रोजन पालक? ही पाककृती लिहिणाऱ्या माणसाला 'सूप' या सरळधोपट पाककृतीबद्दल माहिती असली, तरी 'नायजेरियन सूप' या प्रकारची किंचितही कल्पना नाही हे स्पष्ट आहे.

नायजेरियन सूप हा सरळ-धोपट पदार्थ नव्हे! हा एक रसरशीत जिवंत प्रकार आहे, त्याला एकात एक लपलेली अनेक दारं आहेत. त्याला खोली आहे; व्यामिश्रता आहे आणि मुख्य म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आहेत. होय, ही पाककृतीदेखील माणसामाणसानुसार बदलते. त्यात एकाऐवजी दुसरा जिन्नसही वापरता येतो पण इथेही काही ठळक नियम आहेत. एका झाडाला असलेल्या अनेक फांद्यांप्रमाणे नायजेरियन सूपांचे प्रकार आहेत. एखाद्या फांदीचा आपण पाठपुरावा करत गेलो तर आपल्या लक्षात येतं, की ही फांदी एका विशिष्ट स्वादासाठी आणि त्यातल्या परिपूर्णतेसाठी राखीव आहे. इथे 'पाम तेलाला' पर्याय नाही! मी वाढले त्या योरूबा संस्कृतीत पाम तेलाला खूप मानाचं स्थान आहे. इथल्या समजुतींनुसार हे तेल विषप्रयोगावर, भूतबाधेवर हमखास उपाय असलेलं 'लाल अमृत' आहे. रक्तासारखं हे लाल तेल आमच्या धमन्यांतून वाहतं, ते आमच्या सूपांना एक विशिष्ट चव आणि रंग देतं, त्याला पर्याय उपलब्ध नाही. आमच्या पाककृतींत, उत्तम प्रतीचं लाल पाम तेल हा एक मुख्य जिन्नस आहे.

'डावा-डावा' किंवा 'इरु' हा असाच एक वैशिष्ट्यपूर्ण जिन्नस आहे. आफ्रिकन लोकस्ट बीन्स आधी पंधरा-सोळा तास शिजवून, मग सोलून, दोन-तीन वेळा धुवून मग सावकाशीने निवडल्या जातात. या निवडलेल्या बिया मग दोनतीन दिवस आंबवल्या जातात आणि शेवटी खारवल्या जातात. या विशिष्ट वासाच्या आणि चवीच्या जिन्नसाशिवाय बनलेलं सूप अनेक लोक तोंडीसुद्धा लावत नाहीत. अनेक दिवस निगुतीने बनवलेल्या या जिन्नसानं नायजेरियन सूप्सना 'उमामी' मिळते. (जपानी शास्त्रज्ञांनी उमामीसाठी मोनोसोडियमग्लुटामेट (MSG) बनवणं सुरू केल्यापासून 'मिनिटांत तयार' होणारी उमामी हाताशी आली आणि नायजेरियन जनता या मॅगीला शरण गेली. चवीचं इतकं सपाटीकरण झाल्याने आपल्या खाद्यसंस्कृतीचं नुकसान होतंय आणि आपल्या सूपांमधलं वैविध्य कमी होतंय याची जाणीव माझ्यासारख्यांना जाणवत असली, तरी बहुतांश नायजेरियन घरात आता मॅगी क्यूबशिवाय पान हालत नाही.)

सूपांमध्ये ज्या पालेभाज्या वापरल्या जातात त्यांनादेखील एक विशिष्ट स्वाद असतो. ॲफॅंग, मायाळू (मलाबार पालक), भोपळा (टोकदार दोडक्यासारखा आफ्रिकन भोपळा), एवेडू (ज्यूट) अशा अनेक भाज्यांची पानं वापरली जातात, पण 'फ्रोजन पालक' या गटात नक्कीच येत नाही. स्वादासाठी तुळस आणि पुदिना यांच्या मधला 'इफीरीन' (बुश बॅझिल) नावाचा पाला वापरला जातो. काही पानं सुवासासाठी वापरली जातात, काही किंचित गोडसर किंवा कडवट स्वादासाठी आणि काही त्यातून मागे रेंगाळणाऱ्या किंचित तिखट चवीसाठी.

जे मांस वापरलं जातं तेही अनेक प्रकारचं असू शकतं आणि एकाच सूपात अनेक प्रकारचं मांस वापरलं जाऊ शकतं. शेळीचं किंवा बुशमीट, शंख, शिंपले, गोगलगाय, सुकवलेले मासे (स्टाॅकफिश), पाकट मासा असं अनेक प्रकारचं मांस वापरलं जातं. अनेक प्रकारचे ताजे, सुकवलेले, धूर दिलेले किंवा केळीच्या पानांत बरेच दिवस आंबवलेल्या अळंब्यादेखील (मश्रूम) वापरल्या जातात.

प्रत्येक घरात प्रत्येकाच्या प्रकृतीला पचतील, वयाला मानवतील, चवीला आवडतील अशा पाककृती वापरल्या जातात. ज्याप्रमाणे लहान्या मुलांना आवडतील अशी सूपं बनवली जातात त्याचप्रमाणे सुहागरातीला नवऱ्या मुलाला 'बळ' देतील किंवा नवऱ्याला 'सूचक' संदेश देतील अशा पाककृतीही आहेत. या सगळ्या सूपांंमधलं वैविध्य काही सरधोपट आणि खास व्यक्तिमत्त्व नसलेल्या जिन्नसांतून कसं मिळावं? जे जिन्नस फक्त स्थानिक भागांतच उपलब्ध असतात आणि ज्यांच्यासाठीचे शब्द स्थानिक भाषेतच अस्तित्वात असतात, त्या जिन्नसांपासून बनलेल्या पाककृती इतरांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यासाठी चिकाटी हवी, जिज्ञासा हवी, आदर हवा, आणि कल्पकताही हवी. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपण जिथे राहतो, तिथे उपलब्ध असलेल्या गोष्टींत नवनवीन प्रकारच्या खाद्यसंस्कृतींचा आस्वाद घ्यावासा वाटणं साहजिक आहे आणि जे पदार्थ उपलब्ध नसतील त्याला पर्याय शोधणंही साहजिकच आहे. तिढा असा आहे, की ज्या खाद्यसंस्कृतींबद्दल त्या त्यांच्या मूळ स्वरूपात कशा आहेत याचं मूळ ज्ञानच आपल्याकडे येत नाही त्याचा आस्वाद आपण कसा घेऊ शकू किंवा त्याबाबत आपण मते कशी बनवू शकू? जगभरातल्या सर्वच खाद्यसंस्कृतींना या प्रकारच्या विपर्यासाला थोड्याबहुत प्रमाणात सामोरं जावं लागतं; पण इटालियन, फ्रेंच किंवा अगदी भारतीय अशा लोकप्रिय खाद्यसंस्कृतींबद्दल इंग्रजीत मुबलक आणि उत्तम लिखाण झालं आहे. त्यामुळे कोणी अमुक एक पदार्थ बिनधास्तपणे अमुक एका प्रकारचा आहे म्हणून सांगू लागलं, तर त्याला खडसावणारे अनेक आवाज आजूबाजूला आहेत, या खाद्यसंस्कृतींतले मूळ संदर्भ सांगायला अनेक लेखण्या सरसावलेल्या आहेत. नायजेरियन अन्न म्हणल्यावर जोलॉफ राईस, इगुसी, पफपफ्स आणि किकिफे यांच्या पलीकडे कोणी जातच नाही किंवा जाऊ इच्छित नाही. जे जातात ते आमच्या उपरोक्त लेखकाप्रमाणे वाट्टेल तसे पर्याय सुचवतात आणि आमच्या खाण्यातला आत्माच काढून टाकतात, त्यामागच्या सुरस कथाच पुसून काढतात.

आज माझ्या एका भारतीय मित्राला मेफेअरमधल्या एका भारतीय रेस्तराँत भेटले होते. हा माझा जुना रूममेट पक्का खवय्या आहे. आमच्या स्वयंपाकघराचा ताबा त्याने घेतलेला असायचा आणि जवळजवळ रोज आम्हां सर्वांसाठी भारतीय जेवण रांधायचा. त्यानेच मला मेथी, कलोंजी, आणि भारतीय पदार्थांत वापरायच्या इतरही अनेक प्रकारच्या मसाल्यांची ओळख करून दिली होती. इतका पक्का खवय्या असला, तरी त्याने मात्र मला कधीच नायजेरियन पदार्थांबद्दल विचारलंही नाही आणि अजूनही आम्ही भेटलो, की भारतीय रेस्तराँतच भेटणार हे नक्की असतं. आम्ही सुरुवातीला काही पदार्थ मागवले ते भारतात रस्त्यावर हातगाड्यांवर विकतात असं तो उत्साहानं सांगत होता. त्यातला एक तळलेला पदार्थ आत वॅक्सपेपरमध्ये आणि बाहेर एका वर्तमानपत्राच्या द्रोणात गुंडाळून दिला होता. तो पदार्थ पाहताच माझ्या मनात असंख्य आठवणी धावत आल्या. लेगॉसमध्ये राहायचे तेव्हा सकाळी साडेसात वाजायच्या आत ऑफिसला जाताना वाकडी वाट करून सी.एम.एस. मरीनाला जायचे. तिथे वर्तमानपत्राच्या पुडक्यात गरम गरम तळलेले पफपफ घ्यायला रांग लागलेली असे. त्या जुन्या शाईच्या स्वादामुळे की काय पण त्या गरमगरम पफ्सची चव काही औरच असायची. बातम्या जितक्या दुःखद, धक्कादायक, अविश्वसनीय तितका स्वाद अधिक! ही शाई प्रकृतीसाठी घातक असते, त्याने कर्करोगाच्या शक्यता वाढतात वगैरे ज्ञानकण प्राप्त होण्याच्या अगोदर मनात तयार झालेली गोड स्मरणरंजनाची घडी काही मोडायची नाही. माझ्या डायरीतली पाककृतीही 'वर्तमानपत्री शाईच्या वासाचे पफपफ्स' अशीच आहे. मैदा, यीस्ट, साखर, जायफळ, मीठ, आणि चवीला किंचित तिखट! हे डोनटसारखे असले, तरी डोनट्स नव्हेत; त्यांना स्वतःची खास नायजेरियन ओळख आहे. त्यांना नायजेरियन बातम्यांची चव असते!

पफ्पफ्
पफ्पफ - फोटोचा स्रोत

एकूणच, पाककृती स्मरणरंजनात खोलवर बुडलेल्या असतात किंवा त्या आपल्या आठवणींतून बाहेर काढून वापरल्या तर त्या बेवारस होतात. माझ्या लहानपणीच्या सुट्ट्या माझ्या आजोळी इबादानमध्ये जायच्या. घराच्या बाल्कनीतून फेरीवाल्यांच्या हाका ऐकत दिवस कसा जायचा ते कळतच नसे. 'ताजा पाव'वाले, (फारसं ताजं नसलेलं) मांस विकणारे, संत्री विकत घेतली, की ती सराईतपणे सालांच्या लांब रिबिनी काढून सोलून देणारे, भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या कणसाचे दाणे विकणारे, ईव-इरन पानांत सुबकपणे बांधून उकडलेले आणि पाम तेलात चमकणारे सुंदर मोईन मोईन विकणारे, 'ओगी बाबा' अश्या आरोळ्या ठोकून साध्या ज्वारीच्या ओगीना खूपच भारदस्तपणा देणारे, पांढऱ्याशुभ्र कणसाच्या उकडीचे मऊशार इको विकणारे असंख्य फेरीवाले रस्त्यांवरून फिरत असत. आपल्याकडे अगदी विश्वामित्राचा संयम असला, तरी काहीतरी विकत घेतल्याशिवाय रस्त्याला लागणे काही कोणाला जमत नसे. हे फेरीवालेही आपल्याच खास धीम्या चालीने चालत राहायचे आणि तुम्ही हाक दिल्याशिवाय काही थांबायचे नाहीत किंवा तुम्ही काही विकत घ्यावं म्हणून रेंगाळायचे नाहीत. या असंख्य फेरीवाल्यांच्या हाकांबरोबरच घराघरांतून येणारा कंद कुटण्याचा आवाज मिसळलेला असे. यांपैकी कोणत्याच पदार्थाला या आवाजांच्या आणि आठवणींच्या कल्लोळाशिवाय माझ्या डोक्यात थारा नाही.

लहानपणी आमच्याकडे वरचेवर दिवे जायचे. आई म्हणायची, की मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणून जिजसची माहिती गायली की दिवे येतात, म्हणून मग संध्याकाळी स्वच्छ होऊन बसलो, की आम्ही जोरजोरात प्रार्थना म्हणायचो. मग गोष्टी सांगितल्या जायच्या. आईच्या गोष्टींची मजल सगळ्या नाठाळ मुलांना ज्या टोपो बेटावर पाठवलं जायचं त्या बेटावरच्या भीतीदायक गोष्टींपर्यंतच जायची, पण माझी मावशी फार भारी हातवारे आणि आवाज करून मस्त गोष्टी सांगायची. त्यात आजापा नावाच्या धूर्त कासवाच्या गोष्टी असायच्या. आजापा आपलं संथ आयुष्य आपल्या चातुर्याच्या आणि धूर्तपणाच्या जोरावर यशस्वीपणे इतरांवर मात करून जगायचा. आजापाकडे अनेक प्रकारच्या क्लृप्त्या आणि कौशल्यं होती आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यातही तरबेज होता. त्यातली आजापा आणि 'अकारा'ची गोष्ट आमच्या फार आवडीची होती. त्यात हे कासव त्याला त्रास देणाऱ्या चिंपांझीचा काटा एका सिंहामार्गे काढतो आणि चिंपांझीला छान धडा शिकवतो. सिंहाला आपल्या मतलबासाठी वापरुन घेण्यासाठी तो जी खास पाककृती वापरतो ती म्हणजे 'मधात बुडवलेला आकारा'. 'आकारा' हे एका प्रकारे भारतीयांच्या वड्यासारखे असतात. पांढऱ्या चवळीचे दाणे भिजवून, सोलून, वाटून, घोटून मग हे पीठ तळतात आणि त्याचे वडे बनतात. प्रत्यक्षात लहान मुलं सोडून क्वचितच कोणी हे वडे मधात बुडवून खाईल. नायजेरियन लोकांचं साखरेशी नातंच थोडं मजेशीर आहे. एकीकडे परकीयांच्या प्रभावाखाली लग्नकार्यांत, वाढदिवसांसाठी वगैरे मोठमोठ्ठाले अनेक मजली केक आणि त्यावर आयसिंगचे थर बनवले जातात, पण प्रत्यक्षात खाताना मात्र आयसिंग बाजूला काढून टाकलं जातं. साखर खाल्ल्यानं मूळव्याधीचा त्रास बळावतो, साखर विषारी आहे वगैरे समजुतीही असल्यामुळे गोड पदार्थ खाल्ले, तर त्यावर उतारा म्हणून 'आगबो जेडी'चा काढा प्यायचा असं केलं जातं. अनेक खाद्यसंस्कृतीत दिसणारी 'आंबट-गोड' चव योरूबा संस्कृतीत दिसत नाही पण माझ्यावर 'आजापा'चा एवढा प्रभाव आहे, की आजही मी आकारा केला, की मधात बुडवून खाते. कितीही छान लागत असले, तरी दोन-चार खाऊन झाले की मग त्या चवीचा कंटाळा येतो. मग थोड्या पिठात मिरची घालून ते तिखट बनवायचे किंवा चक्क कोळंबी घालून तळायचे. कोणतीही गोष्ट त्यातल्या अनपेक्षित वळणांनी रंगतदार बनते म्हणून या 'आकारा'ची गोष्टही आपल्या मनाप्रमाणे वळवायची आणि त्याची चव आपल्याला हवी तशी फिरवायची; पण मूळ गोष्टींपासून दूर केल्या तर पाककृती पोरक्या होतात.

आकारा
आकारा - फोटोचा स्रोत

आज सकाळी गडबडीत आवरून डेन्टिस्टकडे पोहोचेपर्यंत माझी बरीच धावपळ झाली. तिथे पोहोचल्यावर मात्र माझा नंबर यायला तास तरी लागणार होता. तिथे कंटाळून बसले तर अबिकेचा फोन आला; ती तिच्या लेकीवर आणि तिच्या शिक्षिकेवर जाम भडकली होती. झालं असं, की माझ्या भाचीने वर्गात सगळ्यांना सांगितलं, की आमच्या घरी हाडं खातात! याचा तिच्या शिक्षिकेला एवढा धक्का बसला, की शाळा संपल्यावर ती भोचकपणे अबिकेकडे चौकशी करायला आली. आता मुलं कुठे काय बोलतील याची शाश्वती नाही, पण निदान तिच्या सुसंस्कृत शिक्षिकेला तरी भान हवं ना की आपण असल्या चौकश्या करू नयेत! अबिके संतापून म्हणाली, "यांना काय वाटतं की आम्ही काय नरभक्षक लोक आहोत आणि आम्ही काय जेवताना कडाकड हाडं तोडून खातो!" मला फिस्सकन हसायला आलं. मला अनेकांकडून माझे दात फार सुंदर आहेत आणि आफ्रिकन लोकांचे दात फार मजबूत असतात, असे शेरे ऐकून घ्यावे लागले होते. ही असली मिथकं कशी तयार होत असतील? आफ्रिकन लोक रानटी आहेत म्हणून तरतऱ्हेचे कठीण पदार्थ कडकड फोडून खातात असं वाटत असावं की आमच्या काळ्या वर्णामुळे पांढरे दात अधिक उठून दिसत असावेत? हे सगळं मी दाताच्या डॉक्टरकडे दुखरी दाढ घेऊन आलेली असताना जाणवल्याने मी स्वत:शीच फिदीफिदी हसले आणि इतरांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. माझ्या भाच्चीनं ज्या हाडांचा उल्लेख केला होता ती नायजेरियन देशी वाणाच्या कोंबडीची हाडं असावीत. लंडनच्या ब्रिक्स्टन बाजारात अशा काही 'देशी' वाणाच्या कोंबड्या मिळतात, त्या मोकळ्या उंडारलेल्या असल्याने त्यांच्या पायांचे स्नायू चांगले घट्ट झालेले असतात. या कोंबड्या विकत घेताना दुकानदाराला त्यांचे पाय तसेच ठेव अशी ताकीद द्यावी लागते. या कोंबड्यांचा रंग हळदीसारखा पिवळसर असतो. या कोंबड्या भाजायच्या नसतात. त्यांना जिरे, काळे आणि हिरवे वेलदोडे, बदामफूल, लवंगा, मिरे, तिखट मिरच्या वगैरे मसाल्यांसह भरपूर पाण्यात दीडेक तास शिजवायचं असतं. मी या पाण्यात आलं, लसूण, आणि बागेतला गवती चहादेखील घालते. हे सगळे मसाले त्या चिकनमध्ये पूर्ण मुरतात. मग गार होईपर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत हे चिकन त्या रसात मुरू द्यायचं. त्यांच्या हाडांपर्यंत तो रस मुरायला हवा. खायच्या वेळी ते पुन्हा किंचित गरम करायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. या चिकनची हाडं आता मऊ झालेली असतात, ती चघळून त्यांतला रस चोखायला मजा येते. आणि हो, त्याचा उरलेला चोथा कोणी गिळत नाहीत, तो टाकूनच द्यायचा असतो! चिंचिन, कुलीकुली, कोको, गुरूंडी असे अनेक पदार्थ जरा कडक असतात आणि ते चावून खायला दात वापरावे लागतात, पण त्यातच त्याची मजा असते. लहानपणी ऊस तोडून खायला पण अशीच मजा यायची. पण या सगळ्या गोष्टींचा 'आफ्रिकन लोकांचे दात मजबूत असतात' या विचित्र मिथकाशी काहीच संबंध नाही.

टेरेसाची भेट झाल्यापासून जसं सुचेल तसं लिहीत गेले आणि मनोमन तिचे आभार मानत राहिले. पण तिला फोन काही केला नव्हता. तिच्याशी झालेल्या गप्पांनी माझ्या मनात अनेक दिवस साचून राहिलेल्या आणि स्वतःशी केलेल्या संभाषणाला शब्द फुटायला लागले, म्हणून मी लिहिलेलं एक टिपण तिला पाठवलं होतं. आज अखेर तिच्याशी बोलले, फोनवर गप्पा लांबायला लागल्या, तर म्हणाली, "आपण लंचला भेटू या का? माझं ऑफिस पिमलिको ट्यूबस्टेशनच्या जवळ आहे. आपण 'लॉर्न'मध्ये भेटू शकतो." इतक्या महागड्या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण मिळाल्यावर मला जरा आश्चर्यच वाटलं, पण मला अनेक दिवसांपासून तिथे जेवायचं होतं त्यामुळे मी ते तात्काळ स्वीकारलं.

इतक्या तारांकित रेस्तराँतलं जेवणही नावाला शोभेल असंच होतं. मी मागवलेल्या एका पदार्थावर वाढतेवेळी टेबलापाशी येऊन ट्रफलचे बारीक काप घातले गेले. ते अत्यंत महाग मश्रूम पाहिल्यावर आठवलेला कालबारच्या बाजारातला एक किस्सा मी टेरेसाला सांगितला. एकदा एका टपरीवजा दुकानात काही मसाले वगैरे गोष्टी विकत घेत असताना माझं लक्ष त्या दुकानदार बाईच्या मागे असलेल्या एका टोपलीकडे गेलं. त्यात मोठ्या लिंबाच्या आकाराचे काही मातकट कंद दिसले. त्याचा आकार आणि रंगरूप पाहून माझी उत्सुकता चाळवली. ते दिसायला हुबेहूब ट्रफल मश्रूमांसारखे दिसत होते. मी तिला विचारलं, की हे काय आहे, तर म्हणाली, "ऊसू." माझा पुढचा प्रश्न - "म्हणजे काय?" त्यावर तिचं तितकंच त्रोटक उत्तर - "हे जंगलात जमिनीखाली वाढतात, त्यातलाच एक तुकडा जमिनीत टाकला, की अजून वाढतात". मी अवाक! ज्या मश्रूमांच्या बारीकश्या गोळ्यासाठी पाश्चिमात्य लोक हजारो डॉलर्स मोजतात आणि ज्यांच्या शोधात शेकडो डुकरं मारली जातात ते ट्रफल्स ही म्हणते की जमिनीवर असेच वाढतात! मी तिला विचारलं, की ह्याचं काय करायचं? हे कसे वापरायचे? तर म्हणाली, "हे कुटून इगुसीत घाल; मांसाऐवजी हे घातलं तर चांगलं लागतं." घ्या! म्हणजे हा शाकाहारी लोकांसाठी असलेला पर्याय आहे तर! मी ते विकत घेतलं आणि घरी आल्यावर त्याबद्दल थोडी माहिती मिळवली. हे मश्रूम जंगलात पडलेल्या झाडांच्या मुळांजवळ वाढतात, जमिनीच्या वरच्या भागावर ऑयस्टर मश्रूमसारख्या दिसणाऱ्या अळंब्या येतात आणि जमिनीखाली हे कंद वाढतात. हे ट्रफलसारखे दिसत असले तरी ट्रफल नव्हेत. वापरण्यासाठी त्याची पूड करून इगुसीत घालायची, शिजल्यावर त्याला मांससदृश्य पोत येतो.

टेरेसाचं कुतूहल फारच चाळवलं गेलं आणि मग मला इगुसी बनवायची कृतीही सांगावी लागली. आधी मांस, क्रेफिश, कांदा, मीठ, मिरपूड पाणी वगैरे टाकून याखनी बनवायला घ्यायची. मग मिक्सरमध्ये कांदा, ताजी लाल मिरची यांचं वाटण करून घ्यायचं आणि मग त्यात इगुसीची (टरबुजाच्या बियांची) पूड मिसळायची आणि त्याचं किंचित दाट पण सरबरीत मिश्रण करून घ्यायचं. एका जाड बुडाच्या पातेल्यात उत्तम प्रतीचं लाल पाम तेल घालायचं आणि तापल्यावर त्यात बनवलेली याखनी मांस बाजूला काढून घालायची. त्याला उकळी आली, की त्यात बनवलेलं वाटण चमच्याचमच्यानं घालायचं. जास्त लगदा न करता हळुवारपणे हलवत ते खाली पातेल्याला लागणार नाही याची खात्री करून घ्यायची. वीस-पंचवीस मिनिटांत त्याला तेल सुटायला लागतं आणि इगुसी शिजते. आता त्यात बाजूला काढलेलं मांस घालून सारखं करून घ्यायचं. शेवटी त्यात भोपळ्याची किंवा मायाळूची पानं घालायची आणि झाकण ठेऊन एक वाफ काढायची. मग त्यात ईयरो (बिटर लीफ) घालून अजून साताठ मिनिटं शिजवायचं, की झाली इगुसी तयार!

इगुसी स्ट्यू
इगुसी स्ट्यू - फोटोचा स्रोत; इगुसीची पाककृती

जेवताजेवता आमच्या गप्पा मस्त रंगल्या, खरं म्हणजे मीच बोलत होते नायजेरियन पदार्थांबद्दल! टेरेसा माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होती, मध्येच एखादा प्रश्न विचारायची पण त्यामुळे माझ्या विचारांची साखळी न तुटता उलट बोलण्यासाठी अधिकाधिक गोष्टी सुचत गेल्या. ती एका प्रकाशनासाठी काम करते हे मला माहीत होतं पण तिचे नेमके प्रश्न आणि त्यांमागची सुसूत्रता एखाद्या मुरलेल्या संपादकासारखी वाटत होती. मी तिला त्याबद्दल विचारलं, तर ती म्हणाली, "मी आज तुला भेटायला बोलावलं त्यामागे माझा एक छुपा हेतू होता. तू मला मेलवर पाठवलेलं टिपण मला इतकं आवडलं, की मला वाटतं यामागे एक पुस्तक दडलेलं आहे. ते तुझ्याकडून लिहून व्हावं असं मला वाटतं, तू विचार करशील का याबद्दल?" माझ्या टीव्ही कार्यक्रमाच्या अल्पजीवी प्रसिद्धीनंतर माझ्याशी अनेकांनी संपर्क साधला होता कारण माध्यमांना एक आकर्षक कृष्णवर्णीय चेहरा हवा होता. टीव्हीसाठी, इतर समाजमाध्यमांसाठी किंवा चकचकीत आवरणाच्या पाककृती-पुस्तकासाठी अनेकांनी प्रस्ताव पाठवले होते; पण एकदा त्या अनुभवातून गेल्यावर मी फार प्रयत्नपूर्वक त्या सगळ्याकडे पाठ फिरवली होती. पण हे फार निराळं होतं, माझ्या खऱ्या प्रामाणिक आवाजाला माध्यमात स्थान मिळालं, तर ते मला अर्थातच आवडण्यासारखं आहे आणि टेरेसाही खूप प्रामाणिक आहे, चांगलं लिहायला प्रवृत्त करणारी आहे. मी तिला म्हणाले, की मी विचार करेन त्यावर; पण मग माझ्या लक्षात आलं, की मी हे पुस्तक माझ्या मनात रोजच लिहिते आहे की! त्यात कसला विचार करायचा!

आज घरी परत जाण्याआधी पिमलिकोच्या बाजारात गेले होते. सप्टेंबरमध्ये सुगी सुरू झाली, की शेतकरी-बाजार भरभरून वाहू लागतात. अगदी छोट्यामोठ्या सुपरमार्केटमध्येही ताजी फळफळावळ, भाज्या पाहून हे घेऊ की ते असं होऊन जातं. आज ताजी कणसं पाहिल्यावर मला इकोकी खायची लहर आली. सुदैवानं फ्रीजरमध्ये मोईमोई (एवे इरान) पानं होती. ती नसती, तर केळीची पानंही चालली असती पण त्याने चव वेगळी लागतेच. पूर्वी लंडनमध्ये या गोष्टी कुठे मिळतात याचा पत्ता लागण्यापूर्वी नायजेरियातून येताना अनेक गोष्टींची तस्करी करावी लागत असे. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा खूप उच्चभ्रू आहे. त्याचा देखणा, उंचापुरा, सडसडीत बांधा, राहणी, भारी कपडे, किमती घड्याळ, बूट वगैरे पाहिलं, की विमानतळावर कोणाला संशयही येत नसे की त्याच्या महागड्या बॅगेतून तो काही बंदी असलेले खाद्यपदार्थ आणत असेल. आम्ही त्याला नेहमी काही खास दर्जाचं डॉवाडॉवा, मोईमोई पानं, ॲफॅंग वगैरे काहीबाही आणायला लावायचो. तो जरा किरकिरायचा पण त्याला पदार्थ खाऊ घ्यायचं आमिष दाखवलेलं असल्याने मोठ्या आत्मविश्वासाने एअरपोर्टवर वावरत कस्टम्समधून खाद्यपदार्थांची तस्करी करायचा.

खाद्यपदार्थांबाबत तडजोड करणं आम्हांला जमत नाही. आताही हव्या त्या जिन्नसांसाठी दोन-दोन तास प्रवास करून जायची माझी तयारी असते पण एरवी मला पंधरा मिनिटांच्या प्रवासाचाही कंटाळा असतो! एकूणच माझ्याकडे एरवी नसलेली चिकाटी स्वयंपाकाबाबत मात्र उफाळून येते! कणसं आणल्यावर कोणी किसतात, कोणी चाकूने खरवडून काढतात पण मी फार सावकाशपणे हाताने त्याचे सगळे दाणे सुटे करून घेते. हे सोललेले कणसाचे दाणे, कांदा, मिरच्या, लीक्स, धूर दिलेला क्रेफिश, आलं, लसूण, मीठ, आणि लागेल तसं पाणी घालून छान बारीक वाटून मग त्यात लाल पाम तेल मिसळते. सगळी तयारी झाली, की मग मोईमोई पानांचा कोन करून त्यात हे वाटण भरते, कोन मागच्या बाजूने दुमडून घेते आणि मग त्याची एक थप्पी रचून मस्त उकडून घेते. "एकावेळी दोन पानं वापरायची- एक मोठं आणि आणि एक त्याच्या आतलं. कोन करून पानं खालून आणि वरतून नीट दुमडून घ्यायची.. गळके द्रोण बनवायचे नाहीत!" पदार्थ बनवत असताना माझ्या कानात आजीचा करडा आवाज घुमत असतो. ज्या मुलीला मोईमोईसुद्धा नीट बांधता येत नाही तिचं पुढं कसं होणार याची काळजी एकजात सगळ्या आयांना आणि आज्ज्यांना असायची. आजी आमच्याकडे आली, की मला गृहकृत्यदक्ष बनवायच्या उद्योगाला लागायची. मी एकदा स्वत:साठी काही बनवायला लागले होते, तर तिनं मला विचारलं, "तुझ्या भावंडांना विचारलंस का काय हवंय ते?" मी लगेच म्हणाले, "मी का म्हणून विचारायचं?" त्यावर तिचं सोपं उत्तर - "त्यानं तुला सवय लागेल. उद्या तुझ्या अंगावर जबाबदाऱ्या आल्या, की तुला ते अवघड वाटणार नाही." लहानपणापासून मुलींना असं वळण लावायची ही पद्धत आता आम्हा स्त्रीवाद्यांच्या अंगावर येते पण मला व्यक्तिश: या शिकवणीचा फायदाच झालाय. शिवाय अगदी परंपरागत स्त्रीची भूमिका पाळणाऱ्या या आजीसारख्या स्त्रियांना 'हाऊसवाईफ' असं उपहासात्मक नाव मला कधी द्यावंसं वाटलं नाही. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणाऱ्या त्या सक्षम स्त्रिया होत्या. त्यांच्या काळात नायजेरियन स्वयंपाकघरावर घरातल्या कर्त्या स्त्रीचं साम्राज्य असायचं, त्या स्वयंपाकघरात डांबल्या गेलेल्या, गरीब-बिचाऱ्या स्त्रिया नव्हत्या. त्यांच्या स्वयंपाकघरांत तरतऱ्हेची धारधार, तीक्ष्ण, आणि अवजड आयुधं असायची आणि ती त्यांना पूर्ण सामर्थ्यानिशी वापरता यायची. हवे तेव्हा, हवे त्याचे, हवे तसे तुकडे करण्याची त्यांची कुवत होती. त्या कर्त्या स्त्रीला आव्हान देणं येऱ्यागबाळ्याचं काम नसे. माझ्या आजीचा स्वतःचा व्यवसाय होता; ती अगदी नवीन फॅशनचे कपडे वगैरे घालायची. तिचे काही जुने कपडे मला आजही फॅशनेबल वाटतात पण तिच्या आदर्श स्त्रीच्या कल्पना मात्र अगदी स्वच्छ होत्या. स्त्री आदर्श आहे की नाही हे पडताळण्यासाठी तिच्याकडे काही खास कसोट्या होत्या. तिला चुलीवरचं भांडं चिमट्याशिवाय उतरवता येतं का? तिला हातातल्या हातात कंद आणि कच्ची केळी चिरता येतात का? हाताची जळजळ न होता मिरच्या वाटता येतात का? गरम तेलात कौशल्यानं सोडलेले तिचे 'आकारा' छान गोलसर आणि मऊशार फुलतात का? आणि हो, तिला मोईन मोईन पद्धतशीरपणे बांधता येतात का? या सर्वसाधारण कसोट्यांवर ती स्त्रियांना जोखायची.

माझ्या आईच्या काळात गोष्टी बदलल्या; त्यांनी शिक्षणं, नोकऱ्या केल्या पण त्यामुळे त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या मात्र कोणी आपल्या अंगावर घेतल्या नाहीत. मग आपलं आयुष्य थोडं सुकर करण्यासाठी त्यांनी पर्याय शोधले. दळण्याची, कुटण्याची, निवडण्याची मानमोडी कामं एकतर यंत्रांवर सोपवली गेली किंवा घराबाहेर सोपवली गेली. माझ्या आईकडे अडीच डिग्र्या आणि वीस मिक्सर होते. म्हणजे अगदी एका वेळी नसले, तरी माझ्या बालपणात तिने निदान वीस तरी मिक्सर तोडले असावेत. इबादनसारख्या शहरी संस्कृतीत आल्यावर दगडी पाटा-वरवंटा, खलबत्ता वगैरे गोष्टींपासून माझी आई तातडीने दूर पळाली होती पण योरूबा लोकांना त्यांचा स्ट्यू अगदी गंधासारखा उगाळलेला लागतो. आईनं आणलेल्या कोणत्याच मिक्सरचा अर्धाअर्धा तास वाटण्यापुढे निभाव लागला नाही. एवढं करूनही त्या मिरच्यांच्या बिया आणि सालं अगदी बारीक वाटण्यात ते घरगुती मिक्सर कुचकामी ठरायचे. एकदा आमच्याकडे आईची दूरची बहीण राहायला आली होती. ही बया त्या पंधरा गाद्यांच्या चळतीवर झोपूनही खालचा वाटाणा टोचणाऱ्या राजकन्येसारखी होती. स्ट्यूमधल्या एकूण एक बिया बारीक दळल्याखेरीज ती त्याला हात लावत नसे. अशा प्रकारच्या वाटण्यासाठी मग व्यावसायिक कामासाठी असलेला भलामोठा ग्राईंडरच लागे. मी दहा वर्षांची असल्यापासून मला हे वाटणाचं सामान घेऊन दुकानात पाठवलं जायचं. आई मला टोमॅटो, मिरच्या वगैरे सगळं सामान नीट मोजून द्यायची आणि त्याबरोबर अगदी कडक सूचना असायच्या. दुकानदाराला अगदी ठाम आवाजात मशीन आधी स्वच्छ धुवायला सांगायचं. आधी कोणी आंबवलेलं कणीस वगैरे दळलं असेल तर त्याचा स्वाद आपल्या स्ट्यूला लागता कामा नये किंवा दुसऱ्या कोणाच्या तिखटजाळ मिरच्यांनी आपलं प्रमाण बिघडू नये म्हणून मग त्याला त्या मशीनमध्ये पदार्थ ढकलण्याचा दांडादेखील धुवायला लावाला जाई. एवढं करूनही भागायचं नाही. त्याला बजावून वाटण अगदी बारीक करायला लावायचं आणि यंत्रामधून एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीन वेळा घालायला लावायचं. मागे पंधरा लोकांची रांग लागली असेल, तरी डगमगून जायचं नाही आणि आईने सांगितल्याप्रमाणे दळून आणायचं. मला पाहिलं, की त्या दुकानदाराचा चेहरा वाकडा व्हायचा पण माझा नाईलाज होता. माझ्या व्हाईटामिक्समध्ये आता खरंतर स्ट्यूचं वाटण अगदी बारीक वाटलं जातं; तरी मला मध्येच कधीतरी त्यात बिया लागल्यासारख्या वाटतात. आईच्या करड्या ताकिदीची जरब मला अजूनही आहे!

आज मला टेरेसाने एका निबंधाची लिंक पाठवली. सिद्धार्थ मित्तरने लिहिलेला 'फ्री ओक्रा' हा लेख मी अनेक वर्षांपूर्वी वाचला होता आणि आम्ही भेटलो होतो त्या दिवशी आमचं त्याबद्दल थोडं बोलणं झालं होतं, पण मला नेमका संदर्भ सापडत नव्हता. भारतीय उपखंड, इजिप्त, टर्की, आफ्रिकेतले अनेक देश आणि इंग्रजांकरवी जिथे जिथे आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून नेलं गेलं तिथल्या अनेक खाद्यसंस्कृतीत भेंडी सहजपणे सापडते आणि आवडीने खाल्ली जाते. असं असतानाही भेंडीकडे पाहून जगात नाक मुरडलं जातं; चिकट आणि गिळगिळीत म्हणून संभावना केली जाते यामागे पाश्चात्त्य देशांची दादागिरी आहे असं मित्तर म्हणतो. ज्या गोष्टी आपल्या चवीला सहज रुचत नाहीत त्यांची जागतिक पातळीवर बदनामी करण्यामागे, त्या वेळी सत्ताधारी असलेल्या गोऱ्यांचा डाव होता असं मित्त्तर म्हणतो. तो निबंध वाचल्यावर मला मनातून भेंडीबद्दल असलेलं माझं नायजेरियन प्रेम उघड करण्याची सूट मिळाल्यासारखी वाटली; म्हणजे अशी सवलत कोणाला मागायला मला काही बंदी नव्हती त्या आधी; पण कुठेतरी कळतनकळत पाश्चात्त्यांनी आपल्यावर लादलेल्या मतांचं ओझं होतंच! भेंडीच्या चिकटपणाबद्दल दुमत नाही पण प्रश्न तो चिकटपणा आवडण्याचा आहे. बऱ्याच भारतीय पदार्थांत भेंडीचा चिकटपणा झाकून त्याला कुरकुरीत करण्यावर भर असतो, त्याच्या उलट नायजेरियन सूपमध्ये भेंडी तिच्या चिकटपणासाठी वापरली जाते. एकूणच नायजेरियन सूपमध्ये या श्लेष्मलपणाला, तार येण्याला महत्त्व आहे. स्टॉक, पाम तेल, क्रेफिशची पावडर यांमध्ये बारीक चिरलेली भेंडी आणि त्याच्या कुटलेल्या बिया घालायच्या आणि चांगली तार सुटेपर्यंत उकळायच्या. कोणी म्हणेल, की हे सूप डिंकासारखं लागतं तर ते बरोबरच आहे, पण तेच अपेक्षित असतं या प्रकारच्या ड्रॉ-सूपमध्ये! हे चमच्यात घेऊन त्याची तार मोडून खायला मनगटात शक्ती लागते आणि नायजेरियन जीभ लागते. हेच नव्हे, तर बरीच नायजेरियन सूपं कुटलेल्या कंदांबरोबर, गरीबरोबर किंवा फूफूबरोबर खातात. बाहेरून किंचित काटेरी आणि आतून सुंदर गोलगोल बिया असलेल्या ताज्या भेंड्या मिळाल्या, की मी लगेच ओक्रो सूपच्या तयारीला लागते आणि मनातल्या मनात मिस्टर मित्त्तरना सॅल्यूट ठोकते!

इथल्या शेतकरी बाजारातून फार शब्दांची देवाणघेवाण न करता विनासायास गोष्टी विकत घेताना मला माझे लागोस आणि कालबारच्या बाजारातले अवघडलेले अनुभव आठवतात. नायजेरियन बाजार म्हणजे काही फक्त भाजी-पाला-मांस-मच्छी-वाणसामान घेण्याची जागा नसते आणि बाजारात जाऊन हवं ते, हवं तसं आणि हव्या त्या किंमतीत विकत घ्यायला जो आत्मविश्वास आणि जी सूक्ष्म कौशल्यं लागतात ती दुर्दैवाने माझ्याकडे नाहीत. बाजाराला जाताना त्याच्या अंतर्विश्वात सामावून जाण्यासाठी योग्य पोशाख करावा लागतो, त्या-त्या भागानुसार भाषेची योग्य वळणं आत्मसात करावी लागतात, ताठ मानेनं आणि आत्मविश्वासानं हुज्जत घालावी लागते, दुकानदाराच्या घरादाराची चौकशी करावी लागते. मला त्यांतलं काही फार जमत नसे म्हणून बाजाराला जाताना मी माझ्या शेजारणीबरोबर तिची लांबची आणि मुकी बहीण असल्याचं सोंग वठवून सावलीसारखी तिच्यामागे फिरायचे. माझ्या शेजारणीच्या डोक्याला दिमाखात बांधलेला स्कार्फ, विवाहित असल्याची साक्ष देणारी बोटातली अंगठी, तिचा हजरजबाबीपणा, हुज्जत घालण्याची कुवत, हवं तेव्हा हसून एखाद्याला वश करणं आणि चटपटीतपणा यांमुळे ती बाजारात आत्मविश्वासाने फिरत असते. दुकानदाराने सांगितलेली किंमत अर्ध्यावर सहजपणे आणतेच आणि शिवाय हाताशी पोर असल्यानं तिला त्याच्या सूपसाठी फुकटात भेंडी, गाजर, जास्तीचा मासा वगैरे गोष्टी मिळतात. माझ्याकडे मात्र 'गावाकडनं आलंय येडं' अश्या नजरेनं पाहिलं जातं. मालाची किंमत विचारायची आणि माल पिशवीत भरायचा असा हा सोपा मामला नसतो. सुरुवात दुकानदाराच्या घरादाराची चौकशी करून करायची असते, मग आपल्या कुटुंबीयांची माहिती पुरवायची असते. मग सुरू होते ती घासाघीस, ज्या कामासाठी मी अगदीच कुचकामी आहे. मासा विकत घेताना मला हव्या त्या कापासाठी कोळिणीनं तोंडाला येईल ती किंमत सांगितल्यावर मी जर हुज्जत घातली की, 'बाई, मला त्या एवढ्या तुकड्यासाठी आख्ख्या माशाची किंमत का लावतेस?' तर ती मला 'फिश नो डे' म्हणून काहीतरी गोष्ट सांगून सरळ गुंडाळते! कधी आज बोटी आल्याच नाहीत, नाहीतर कोणत्या व्यापाऱ्यांनी सगळे मासे विकत घेतले, नाहीतर अजून काहीतरी. मला सांगितलेली गोष्ट खरी आहे की गंडवागंडवी आहे याचा मला कधी थांगपत्ता लागत नाही. चांगला, ताजा माल स्वस्त दरात मिळवण्याचं कसब माझ्याकडे नसलं, तरी मला बाजारात जायला आवडतं. नायजेरियन बाजार म्हणजे रंगांचा, आवाजांचा, भल्याथोरल्या गोष्टींचा मेळा असतो. याच बाजारात मला एकदा देखणे, पोवळ्यातले खेकडे (कोरल क्रेफिश) दिसले होते; एकदा सुकवण्याआधीचे लाल असणाऱ्या काळ्या मिरीचे भारे दिसले होते; एकदा फिकट गुलाबी रंगाचं स्थानिक सफरचंदासारखं फळ (आफ्रिकन स्टार) मिळालं होतं. एकदा मी बारकुडा विकत घेत असताना शेजारच्या बाईने विचारलं, "याचं काय बनवणार आहेस?" मी सहजच म्हणाले, "अजून काही ठरलं नाही पण बहुतेक स्ट्यू बनवेन." त्यावर तिचं तोंड वाकडं झालं, ती अधिकाराने म्हणे, "स्ट्यू? पेपर सूप बनवायचं सोडून स्ट्यू कशाला बनवतेस? माझी मुलं तर स्ट्यूला हातही लावत नाहीत!" मी योरूबा असल्याचं तिला सांगितलं नाही. या क्रॉस रिव्हेरियन कालबार भागात स्ट्यूकडे जरा वाकड्या नजरेनंच पाहिलं जातं. तिने मला लगेच तिच्या पेपर सूपची कृतीही सांगून टाकली - "भरपूर पाण्यात मासा, कांदा-लसूण-मिरचीचं वाटण, क्रेफिशची पूड, आणि पेपर सूपचा मसाला टाकायचा आणि झाकण ठेऊन शिजवायचं. शिजल्यावर त्यात इफ्रिन किंवा उझीझाची पानं चिरून घालायची." हे पेपर सूप आणि त्याचा मसाला प्रत्येक घरात थोड्याफार वेगळ्या प्रमाणात बनवतात पण या मसाल्यात तीन मुख्य घटक असतात - उलिमा (ॲलीगेटर पेपर), उडा बिया (सेलिम पेपर) आणि इहिरी म्हणजे कलाबाश जायफळ. आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागांत या मसाल्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, पण या तीन मसाल्यांची पूड करून ती पेपर सूपमध्ये वापरली जाते. मी माझ्या पेपर सूपमध्ये आलंदेखील वापरते. थंडीच्या दिवसात हे गरमगरम सूप केलं, की मला कालबारच्या बाजारात भेटलेली ती भोचक ताई नेहमी आठवते.

फिश-पेपर सूप
फिश-पेपर सूप - फोटोचा स्रोत

गेल्या काही दिवसांत सुचेल तसं, ताप चढल्याप्रमाणे झपाटल्यासारखं लिहितेय. जेव्हा लिहीत नसते तेव्हाही मनातल्या मनात नोंदी करत असते, पदार्थ बनवत असते. धरबंध नसलेल्या पुराच्या पाण्यानं रस्त्यात आलेला प्रत्येक अडथळा ओलांडून आपली सत्ता सर्वत्र पसरावी, तसं लागोस, इबादान, कालबार, अनेक वर्षं राहिले होते ती सगळी ठिकाणं, व्यक्ती, संभाषणं, बाजार, तिथून विकत घेतलेल्या वस्तू यांचा मनात नुस्ता कल्लोळ कल्लोळ होतो आहे. एकदा मला सूप बनविण्यासाठी ठरावीक साच्याचं, आकाराचं आणि कच्च्या मातीचं भांडं हवं होतं. मला डोळ्यांसमोर हे खास भांडं स्वच्छ दिसत होतं; ज्या हातांनी ते सुबक भांडं बनवलं होतं ते हात दिसत होते; नायजेरियन स्त्रियांच्या पुष्ट, गोल पार्श्वभागासारखा आणि वर निमुळता होता गेलेला, त्याचा घाटदार वळणांचा आकार दिसत होता. स्थानिक माती, पाणी, हात, आणि पुरातन ज्ञानातून तयार झालेलं; आगीत तावून सुलाखून खास आमच्या पदार्थांसाठी बनवलं गेलेलं हे खास भांडंच मला हवं होतं. हे भांडं विस्तवावर ठेवलं, की ते किंचित गडगडतं कारण त्याचं बूड गोलाकार असतं. त्या भांड्यात जोलॉफ राईस बनवला, की आधी तो तळाशी किंचित लागतो आणि मग वरपर्यंत आच सावकाश पोहोचते. हीच खरपूड त्या भातासाठी एक सुरक्षाकवचही बनते आणि भाताला अधिक स्वादही देते. खरपूड खाण्याचा अधिकार स्वयंपाक करणाऱ्याचा असतो, ती त्याला मिळालेली बक्षिशी असते. हे साधं पण सुरेख आणि सुबक भांडं जिथे विकलं जातं तो भाग 'ईफाक सटान' (सैतानाचा रस्ता) म्हणून ओळखला जातो. माझ्यासारख्या स्त्रीला या भागात जाण्याची जोखीम घेणं म्हणजे धाडसाचं काम! इथल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर कधी काय समोर येईल याचा भरवसा नाही. आजूबाजूला मुख्यतः पुरुषांचीच गर्दी! गंडेदोरे, जादूटोणा, साप, काळी जादू यांचं साम्राज्य. अन्नसा, ईसू लालू अश्या कडक आणि बिनभरवशाच्या आणि तापट दैवतांना आवाहन करण्यासाठी मिळणारी उपकरणं! मी माझ्या एका मावशीच्या आधारानं आणि माझ्या भांड्याच्या लालसेनं जीव मुठीत धरून एकदा या बाजारात गेले होते. तिथे घेतलेलं हे मातीचं भांडं आता माझ्या स्वयंपाकघराचा आणि माझ्या नायजेरियन असण्याचा अविभाज्य भाग आहे. वापरत गेलं, की हे भांडं त्याच्या रंध्रांत वेगवेगळे स्वाद आणि वास साठवत जातं, अधिकाधिक मुरतं आणि अधिकाधिक प्रगल्भ बनत जातं. यात नुसतं पाणी गरम करायला ठेवलं, तरी खास नायजेरियन स्ट्यूचा गंध सगळ्या घरात दरवळतो. तऱ्हेतऱ्हेचे मसाले आणि जिन्नस आमच्या स्ट्यूला समृद्ध करत जातात पण स्ट्यूला अधिक गहिऱ्या चवीचं बनवण्यात या भांड्याचाही वाटा असतो. हे भांडं 'इसासून', माझ्या घराचा राजा आहे; माझ्या संस्कृतीने हे भांडं घडवलंय, त्याला माझी भाषा समजते. या भांड्याला इतिहास आहे, त्याला स्वतःची खास आणि वेगळी ओळख आहे, त्याच्या रंध्रांत आधीच्या सर्व स्वादांची स्मृती आहे, हे भांडं सर्वार्थाने माझं स्वतःचं आहे. माझं पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा होईल, पण त्याचं शीर्षक माझ्या मनात पक्कं आहे!

हा लेख किंवा ही गोष्ट येमिसी अरीबिसला या नायजेरियन लेखिकेच्या 'लाँगथ्रोट मेम्वार्स' या पुस्तकावर आधारित आहे. या लेखातल्या दैनंदिन गोष्टी काल्पनिक आहेत पण पदार्थांची वर्णनं, विचार, माहिती सर्व काही येमिसीच्या पुस्तकावर आधारित आहेत, हा येमिसीचा आवाज आहे. हा अनुवाद नव्हे, भाषांतर नव्हे किंवा स्वैर रूपांतरही नव्हे, तर एका नॉनफिक्शन पुस्तकाचं फॅनफिक्शन असं याला म्हणता येईल. 'लॉंगथ्रोट मेम्वार्स'ला २०१६मध्ये 'आंद्रे सायमन फूड अँड ड्रिंक अवॉर्डस्‌'मध्ये 'जॉन एव्हरी' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दाकाराई सुमन ओकोये

- शिरीन.म्हाडेश्वर

जगभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रस्थापित झालेल्या दाकाराई सुमन ओकोये या आफ्रिकन-मराठी रेस्टॉरंटचा सर्वेसर्वा आणि मागील वर्षी एका नामांकित फाॅर्टी अंडर फाॅर्टीच्या यादीत झळकलेला दाकाराई याच्याशी हल्लीच न्यूयॉर्कला एका फूड फेस्टिवलमध्ये भेट झाली. त्यानंतर वेळात वेळ काढून त्यानं माझ्याशी गप्पा मारण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि स्वतःचे दक्षिण आफ्रिकी वडील, महाराष्ट्रीय आई, आफ्रिकेत रुजलेली पाळंमुळं, नव्वदीच्या दशकात मध्यवर्ती पुण्यामध्ये लहानाचं मोठं होतानाची जडणघडण, आफ्रिकेतील अपार्थाइडचे दिवस, पूर्वीची खडतर परिस्थिती ते आताची समृद्धी, त्याचं रेस्टॉरंट, त्याचं कुटुंब अशा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास संवाद साधला. त्या मोकळ्याढाकळ्या गप्पांचा हा संक्षिप्त अहवाल.

दाकाराई! तुझ्याबद्दल आणि तुझ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. बऱ्याच अंशी तू एखाद्या मराठी माणसासारखा दिसतोस. इतकं मस्त मराठी बोलतोस. यामागची मेख काय? आणि तुझ्या नावाबद्दलही सांग ना! कोणत्याही अँगलने तू 'दाकाराई ओकोये' वाटत नाहीस.

:- (मिस्कील हसून) 'चिन्मय पाठारे' वाटतो का? हो, म्हणजे लहानपणी पुण्यात शेजारीपाजारी किंवा कुणी नवीन भेटलं की प्रत्येकाला हा प्रश्न पडायचा. शाळेतसुद्धा बऱ्याच जणांना वाटायचं. हा पठ्ठ्या बऱ्यापैकी आपल्यासारखा दिसतो. 'आपल्यासारखा' म्हणजे काय तर कान, नाक, डोळे, कपाळाची ठेवण सगळं साधारणतः आपल्यासारखं आहे. रंग बहुतांशी लोकांप्रमाणे सावळा आहे. केस आहेत थोडे कुरळे, पण ते काय बऱ्याच जणांचे असतात! हा बोलतोही आपल्यासारखा. संस्कृत श्लोकपठण करतो. मग याचं नाव असं काय? प्रचंड कुतूहल असायचं.

तर माझा जन्म जोहान्सबर्गमधला. ऐंशीच्या दशकात पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय घरातून जोहान्सबर्गला गेलेली पंचवीसेक वर्षांची एक पत्रकार मुलगी तिथल्या एका स्थानिक मित्राच्या एवढी प्रेमात पडते की आपलं सगळं जग मागे सोडून त्याच्याबरोबरच राहायचं ठरवते, दोन्ही कुटुंबांचा विरोध पत्करून विटेवर वीट ठेवून ते दोघे तिथे आफ्रिकेतच अपार्थाइडमध्ये स्वतःचं विश्व साकारतात आणि मनापासून एकमेकांना साथ देत राहतात, ही थोडक्यात माझ्या आईबाबांची प्रेमकथा. पहिल्या वेळी ऐकली तेव्हा मला तर आपण एखाद्या सिनेमाची गोष्ट ऐकतोय की काय असंच वाटलं होतं. जग त्या वेळी सध्याइतकं पुढारलेलं आणि कनेक्टेड नव्हतं. माझ्या आईबाबांना त्या वेळी कोणत्या दिव्यातून जायला लागलं असेल याची कल्पनाही करणं खूप कठीण आहे. आईबाबांनाच काय, नानांना - नाना म्हणजे माझे आजोबा - आणि आजीलासुद्धा. सगळ्यांसाठीच तो प्रवास आव्हानात्मक वाटला असणार आहे. आई त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी. पण आई-बाबांनी लग्न करायचं ठरवलं आणि आईने तसं तिच्या घरी सांगितलं तेव्हा नाना आईला म्हणाले की तू आता काही पुण्यात परत येऊ नकोस. भेटायलाही नको. कूळ, गोत्र कशाकशाचा पत्ता नसलेल्या, दुसऱ्या खंडातल्या एका माणसाला जावई म्हणून कोणत्या तोंडानं घरात घेऊ? आईनं न डगमगता मग तिथेच राहायचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर दोन वर्षांनी मी आलो. शोना म्हणून साऊथ आफ्रिकेतली एक भाषा आहे. शोना भाषेत 'दाकाराई' म्हणजे आनंद. माझा जन्म आई बाबांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला म्हणून मी दाकाराई. (त्यानंतर माझ्या खोड्यांमुळे किती वेळ तो आनंद टिकला ती गोष्ट निराळी!) बाबाचं आडनाव ओकोये. आणि सुमन माझी आई.

दिसण्याबद्दल विचारलंस म्हणून सांगतो, माझा बाबा मला गमतीनं नेहमी म्हणायचा, तुझ्या आईचा मराठी जीन तिथल्या लढवय्या मावळ्यासारखा एकदमच डॉमिनंट निघाला. तुझा ना रंग माझ्यासारखा ना रूप. आणि आईचं ठरलेलं उत्तर असायचं, ज्या साच्यामध्ये ही मोट बांधलीये ती आहे ना तुझ्यासारखी? हाडांचा सापळा आहे ना तुझ्यासारखा? तेवढ्यावर समाधान मान आता. गंमतीचा भाग सोडला तर मी अगदी मातृमुखी आहे. माझे वडील आफ्रिकन आहेत यावर विश्वास ठेवणं अशक्य वाटेल एवढा मी माझ्या आईसारखा दिसतो.

जन्मापासून आई माझ्याशी मराठीतूनच बोलायची. भाषा टिकवण्याचा अट्टाहास म्हणून असं नाही. आपल्या स्वतःच्या भाषेत बोलणारं, आपलं कुणीतरी आईला आफ्रिकेत हवं होतं म्हणून असेल. आणि आफ्रिकेत राहून स्थानिक भाषा - स्वाहिली - येत नाही असं कसं होईल! लहानपणीचे तिथले चट्टेबट्टे दोस्त स्वाहिली बोलणारेच होते. त्यामुळे आजही मला दोन्ही भाषांमध्ये अस्खलित बोलता येतं.

जोहान्सबर्ग ते पुणे हे स्थलांतर कसं घडलं?

मी आठ वर्षांचा होतो तेव्हा अचानक एक दिवस बाबा आम्हाला सोडून गेला. त्याच्या बाईकचा ऍक्सिडंट झाला आणि आमच्या जगाची उलथापालथ झाली. A part of me died that day. Truth be told it is still healing. Perhaps it might never heal.

बाबा गेल्यावर जोहान्सबर्गमध्ये आम्ही – मी आणि आई – सहा-सात महिने राहिलो असू फार तर. माझ्यासाठी आणि आईसाठी तो प्रचंड अवघड काळ होता. मला एकटीनं वाढवणं, तेसुद्धा अपार्थाइडमध्ये, आईला जड जायला लागलं होतं. बाबाचे एक-दोन मित्र सोडले तर कुणाचाच विशेष आधार नव्हता. बाबाशिवाय तिचं मनही तिथे रमत नव्हतं. आईने मग भारतात परत जायचा निर्णय घेतला. आफ्रिका सोडून जायचं हे कळल्यावर काय वाटलं ते नेमकं मला आठवत नाही. पण आपल्यासोबत जे होतंय त्याचा अर्थच उलगडत नव्हता. वयाची आठ साडेआठ वर्षं माझं सगळं जग म्हणजे जोहान्सबर्ग एके जोहान्सबर्ग होतं. दक्षिण आफ्रिका सोडून जग काय असतं तेच मुळात माहीत नव्हतं. भारतात आपल्या आईचे आईवडील राहतात पण त्यांना बाबा आवडत नाही म्हणून आपण तिकडे जात नाही, हे जन्मापासून माहीत असलेलं एक सत्य. पण त्यानंतर आता आपण त्या पूर्ण परक्या देशात जाऊन तिथेच राहायचं हे दुसरं सत्य, आणि ते पचवणं सोपं नव्हतं. कशी असेल तिथली माती? आकाशाचा रंग इथे आहे त्याहून फिक्कट असेल की गडद? पाण्याची चव कशी असेल? तिथे कोणती फळं असतात? कोणती फुलं फुलतात? तिथली आजी कशी वागेल? आई तिथेही पेरी पेरी पोहे बनवेल का? एखादी जादू झाली आणि बाबा परत आला तर आपला भारतातला पत्ता त्याला कसा कळेल? तो कधीतरी आपल्याला पुन्हा भेटेल का? असे वाट्टेल ते प्रश्न पडायचे. ते प्रश्न मनात घेऊन, सगळं पसारा गुंडाळून, जोहान्सबर्ग मागे ठेवून आम्ही पुण्यात आलो. आईने पुण्यात नोकरी करायची आणि आम्ही दोघांनी आजी-आजोबांबरोबर त्यांच्या वाड्यात राहायचं असं ठरलं.

पुण्यात नानांच्या वाड्याशेजारच्या शाळेत माझं नाव दाखल करण्यात आलं. शाळेत नाव घालण्याआधी नानांनी प्रस्ताव मांडला, आता हे नाव कशासाठी? सगळं मागे ठेवून नव्याने श्रीगणेशा करताय तर हे नाव तरी कशासाठी! नशिबानं हा थोडासा आमच्यासारखा दिसतो. रंगानं सावळा असला तरी आमच्यातला म्हणून खपून जाईल असा आहे. बोलतोही अस्खलित मराठी. झालं गेलं गंगेला मिळालं. मुलाला आपलं घरचं आडनाव लावू. पाठारे. चिन्मय पाठारे म्हणून नाव नोंदवू.

आईने तेव्हा आजोबांना स्पष्ट शब्दांत सांगितलं. तो जेलानीसारखा – बाबाचं नाव जेलानी – फारसा दिसत नसला तरी त्याचाच मुलगा आहे. याचा तुम्हाला किंवा जगाला सोयीस्करपणे विसर पडावा म्हणून मी त्याचं नाव बदलणार नाही. नानांनी खूप आकांडतांड केलं. नातवाची ॲडमिशन घ्यायला जाऊ तेव्हा हे असलं अजब काहीतरी दाकाराई ओकोये फोकोये नाव नोंदवू? आणि काय सांगायचं रोजच्या रोज पन्नास लोकांना? किती प्रश्नाची उत्तरं द्यायची? आधीच आयुष्यात बरेच प्रश्न आहेत. त्यात अजून प्रश्नांची भर कशासाठी म्हणून? पण आई काही जुमानली नाही.

मी आजूबाजूला बरीच तुटलेली नाती बघत आलोय. संसार चालू असतात, नातं कधीचं मेलेलं असतं. जेवढं मला आठवतं तेवढं माझ्या आईबाबांचं नातं रसरशीत जिवंत होतं. म्हणून ते टिकलंही. बाबाच्या पश्चातसुद्धा. आईने पुण्याच्या त्या मराठी शाळेत माझं नाव जन्म प्रमाणपत्रावर होतं तेच कायम ठेवलं. दाकाराई सुमन ओकोये.

किती अद्भुत प्रवास आहे आहे हा! हे घडत असतानाही तसाच अद्भुत वाटला का? आपण वेगळे आहोत असं वाटायचं का?

मी 'वेगळा' आहे हे माझ्यापेक्षा जास्त इतरांनाच वाटायचं. नव्वदच्या दशकात ग्लोबलायझेशन आता आहे त्या प्रमाणात झालं नव्हतं. आता जागतिक सिनेमा घराघरात पोहोचलाय. शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं माणसं जगाच्या पाठीवर सगळीकडे प्रवास करतायेत. वेगवेगळ्या लोकांना भेटताहेत. विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण वाढलीये. मी लहान होतो तेव्हा सगळ्यांचंच जग सीमित होतं. नाना संस्कृत शिकवायचे. निवृत्तीनंतर वाड्यातच सकाळ संध्याकाळ वर्ग असायचे. लोकांची सतत वर्दळ असायची. हा गोऱ्यागोमट्या पाठारे गुरुजींचा नातू पण रंगाने काळ्याकडे झुकलेला. नाव दाकाराई. काय मामला आहे! पण हळूहळू झाली सगळ्यांना सवय.

नानांनी जेव्हा माझं नाव बदलायचा विषय काढला तेव्हा खरं सांगतो, मला खूप भीती वाटली होती. एखाद्याची ओळख अशी कशी पुसून टाकायची ना? शेवटी मी म्हणजे कोण? जगाला दिसतो तो? की मी आतमधून खरा आहे तो? आफ्रिकेत माणसांचा विक्रय चालायचा त्यात माझे पणजोबा विकले गेले होते. ते उसाच्या मळ्यात काम करायचे, कधी परतले नाहीत. फाळणीचा इतिहास वाचताना जसे माझे डोळे पाणवतात तसा आफ्रिकेतल्या गुलामगिरीचा इतिहासही माझ्या अंगावर काटे आणतो. आपोआप. अपार्थाइडच्या काळात आईबाबांना मिळालेली वागणूक ऐकली की जिवाची तडफड होते. माझ्यात एका आफ्रिकन माणसाचा DNA आहे हे सत्य जगाला वरकरणी दिसू दे किंवा न दिसू दे, मी तोच आहे. माझं दिसणं, नाव, बोलणं यात कितीही विसंगती असली तरीही मी तोच आहे.

यावरून एक आठवलं म्हणून सांगतो. केमिकल इंजिनिअरिंगला असताना आम्हाला एक माशेलकर सर म्हणून होते. लॅबमध्ये प्रयोग करताना ते म्हणायचे की तुमचे सगळे रीडींग्ज अपेक्षेप्रमाणे समीकरणात बसणारच नाहीत. थोडे बाहेर जाणार. काहीकाही outliers असणार. Outliers आले म्हणजे प्रयोग अयशस्वी झाला असं मुळीच समजू नका. तुमच्या प्रयोगामध्ये ते रीडींग घेताना असं काय वेगळं होतं म्हणून ते समीकरणात बसलं नाही याची फक्त नोंद घ्या. त्यातून बरंच शिकायला मिळेल. आपल्याला समाजात कुठेच outliers नको असतात. अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं दिसलं, ऐकलं, हाताला लागलं की लगेच घाबरायला होतं. Outliers need to be normalized.

आफ्रो-मराठी पदार्थांची सुरुवात कशी झाली?

सुरुवात कधी झाली हे आता आठवतही नाही. माझ्या जन्माच्या आधीपासूनच झाली होती खरं तर, पण बाबा गेल्यानंतर ती प्रकर्षानं जाणवायला लागली. जोहान्सबर्गमध्ये राहताना जसं आईने स्वतःमधलं पुणं निगुतीने जपलं होतं तसं आम्ही पुण्याला गेल्यावर तिने माझ्यातली आफ्रिका जपली. तेव्हा इंटरनेटकरवी एका क्लिकमधून, युट्यूब, गूगल मॅपमधून कुठेही फेरफटका मारून येता यायचं नाही. हवं ते मागवण्यासाठी अमेझॉन नव्हतं. पुरेसे पैसेही नव्हतेच म्हणा. असं असतानाही तिने खाण्यातून आमच्या आयुष्यातले आफ्रिकेतले दिवस जपले. फक्त आम्हाला दोघांनाच माहीत असलेल्या बाबाला जिवंत ठेवलं. आम्ही आफ्रिकेत असताना ती जे पदार्थ बनवायची ते ती पुण्यातही करत राहिली. मला बाबाशी आणि माझ्या लहानपणाशी जोडणारा तो एक शेवटचा धागा होता आणि तो तिने अबाधित ठेवला. त्यासाठी पुढचे किमान दहा जन्म तरी मी तिचा ऋणी राहीन.

कधी आफ्रिकन पदार्थ मराठी चवीचे, तर कधी मराठी पदार्थ आफ्रिकन पद्धतीनं अशी सरमिसळ करत तिचे नवनवीन प्रयोग चालू राहिले. 'चाकालाका' हा आफ्रिकेतल्या घराघरात केला जाणारा एक पदार्थ. कांदा, टोमॅटो, मिरची, कडधान्य आणि इतर जिन्नस त्यात जातात. जोहान्सबर्गमध्ये असताना मी ते शाळेच्या डब्यात बऱ्याच वेळा न्यायचो. पुण्यात कुणाच्या घरी मिसळ बघितली की मला नेहमी चाकालाकाची आठवण यायची. आईने मग मिसळ मसाला वापरून चाकालाका करायला सुरुवात केली. 'चाकालाका पाव' आमच्या वाड्यात त्यानंतर सर्रास व्हायला लागलं. नानांना तर मी स्वतः एकदा बोटं चाखून मिटक्या मारत 'चाकालाका पाव' खाताना बघितलंय.

'मालपुवा मांडझी' हा अजून एक पदार्थ, जो आई अगदी जाता जाता बनवायची. 'मालपुवा मांडझी' हे आता आमच्या रेस्टॉरंटच्या मेनूमधलं नाव. मी त्याला लहान असताना 'वाड्यातली मांडझी' म्हणायचो. मालपुव्याचे जिन्नस म्हणजे गव्हाचं नाहीतर तांदळाचं पीठ, गूळ, खोबरं वापरुन त्यात अधिकचं मांडझीला लागणारं अंडं, तेल मिसळून एकत्र मळायचं आणि शंकरपाळ्यांसारखं तळून घ्यायचं. तळणीचे पदार्थ जास्त नकोत म्हणून मग आईने ते नंतरनंतर तव्यावर हलकं भाजून घ्यायला सुरुवात केली. दुपारची भूक लागली की फडताळातल्या डब्यात मी आधी मांडझी शोधायचो. असे अजून अनेक पदार्थ आहेत. जोलोफ भेळ, बटाटावडा आकारा, पेरीपेरी पोहे. आफ्रिकन इंजेरा म्हणजे आपली आंबोळी. पण उडदाऐवजी नाचणीपासून बनवलेली. आई त्याच्याबरोबर आजीच्या माहेरी कोकणात करतात तशी काळ्या वाटाण्याची उसळ करायची. इंजेरा उसळ मात्र मला विशेष कधी आवडली नाही. त्याचं नाव सुद्धा मी 'इउ' ठेवलं होतं पण आईला ते आवडायचं म्हणून मला जराही eww (पन इंटेंडेड!!) न करता ते खावं लागायचं. याचा अर्थ मी फक्त हेच पदार्थ खायचो असं नाही. वाड्यात आजी पुरणपोळ्या, वरणभात करायची, गणेशचतुर्थीला उकडीचे मोदक करायची तेसुद्धा आवडायचे. पण जसजसा मोठा होत गेलो, इंजिनिअरिंगसाठी घराबाहेर पडलो तशी नॉस्टॅल्जियामधून आणि इतर कुठेच न मिळाल्यामुळे आमच्या घरातल्या “आफ्रो-मराठी” खाण्याशी जवळीक वाढतच गेली.

हल्ली सगळीकडेच फ्युजन फूडची हवा आहे. आफ्रो-मराठी इंडो चायनीजसारखं प्रसिद्ध होईल असं वाटतं का? इथे न्यू यॉर्कमध्ये 'डोसा विथ अमेरिकन ट्विस्ट' बऱ्याच ठिकाणी मिळतो. अशा प्रकारच्या फ्युजनबद्दल काय वाटतं?

कसं आहे ना, हे ऑथेंटिक, हे फ्युजन, हे पारंपरिक, हे आधुनिक असे पदार्थांचे गट माणसं आपापल्या सोयीनुसार करायला लागली आहेत. मी तर म्हणेन फ्युजन फूड हा माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक परंपरेचा, इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात ज्वारी आफ्रिकेहून आली. मग तांदळाच्या भाकरीसारखी आपण ज्वारीची भाकरी करायला लागलो. मग ज्वारीच्या भाकरीला फ्युजन फूड म्हणायचं का? खानदेशातली मुलगी लग्नानंतर कोकणात गेली आणि जेवणाच्या ताटात थोडासा वऱ्हाडी ठेचा वाढू लागली तर ते फ्युजन फूड म्हणायचं का? आता मुंबई-पुण्यात नाक्यानाक्यावर सँडविच मिळतं त्या सँडविचमध्ये परदेशात पूर्वी फक्त मांसाचे तुकडे, चीझ असंच कायकाय असायचं. त्यात आपण आता पनीर बुर्जीपासून, पुदिना चटणीपर्यंत काहीही लावायला लागलो. त्याला फ्युजन फूड म्हणायचं का? अमेरिकेत शिकायला गेलेला एखादा विद्यार्थी घरची आठवण आली म्हणून इंडियन दुकानातून फ्रोझन थालीपीठ आणतो आणि गरम केल्यावर त्यावर सोयीचं म्हणून लोण्याऐवजी आव्होकाडोची पेस्ट पसरवतो ते फ्युजन आहे का?

शतकानुशतकं माणसं स्थलांतर करत आली आहेत. आणि स्वतःबरोबर त्यांची जिव्हाळ्याची गोष्ट, त्यांचं खाद्य बरोबर घेऊन जात आली आहेत. कधी प्रत्यक्ष खाद्य तर कधी ते तयार करायच्या पद्धती. त्यातून वेगवेगळे प्रयोग करत आली आहेत. माणसं स्थलांतर करत राहणार तोवर फ्युजन चालूच राहणार. हे सगळे पदार्थ म्हणजे आपण आहोत. आपली ओळख आहे. आपली अभिव्यक्ती आहे. स्वतःपासून वेगळी अशी या पदार्थांची कदाचित ओळखच नाही. पदार्थ बनवणारी व्यक्ती सोडली तर उरलं काय? अग्नी, जिन्नस आणि त्यांना एकत्र आणणारं माध्यम?

माझ्या आईला लसणीची फोडणी दिलेली, हलकेसे कोंब आलेली मसूरची आमटी खूप आवडायची. बाबाला येता-जाता उगाली खायचं असायचं. उगाली म्हणजे मक्याच्या पीठाचा उपम्यासारख्या एक आफ्रिकन पदार्थ आहे. मग त्यांना दोघानांही जाणवलं की उगाली आणि मसूरची आमटी एकत्र खाल्लं की अजूनच रुचकर लागतंय. मग आठवड्यातून एक-दोनदा तरी ते हमखास व्हायला लागलं. दोन गोष्टी एकमेकांना पूरक असल्या की त्याला एक बहार येते. एकमेकांना झाकोळून टाकणं आलं, लादणं आलं की त्यातली सगळी गंमत निघून जाते.

जे त्यांच्यासाठी अशा एका समजुतीतून निर्मिलं गेलं ते माझ्यासाठी मात्र माझं मूळ जेवण होतं. फ्युजन जाऊ दे, माझ्यासाठी यापेक्षा ओरिजिनल काही असू शकत नाही. आपण ज्याला 'आईच्या हातचं जेवण' ही जी एक संज्ञा वापरतो, तुमच्या आतड्याशी, नाळेशी तुम्हाला जोडणारं, कोणताही अभिनिवेश नसलेलं, ते हे आहे माझ्यासाठी. आमच्या रेस्टॉरंटमधली सिग्नेचर डिश आहे 'मसूर आमटी विथ उगाली'. त्यात कोणताही आक्रस्ताळेपणा नाही. फ्युजनचं अवडंबर नाही. काही सिद्ध करणं नाही. एक शांत सहजता आहे. माझ्या आईबाबांच्या नात्यातली.

दोन संस्कृती एकमेकांत बेमालूमपणे मिसळतात आणि नव्याला जन्म देतात त्याइतकी दुसरी सुंदर गोष्ट नसावी. जुन्यात नवं आणि नव्यात जुनं मिसळत राहायला हवं. तरच आपली खाद्यसंस्कृती प्रवाही राहील. नाहीतर डबक्यातल्या पाण्यासारखी आपली संस्कृतीसुद्धा चौकटीत अडकून पडेल.

स्वतःची आफ्रो-मराठी ओळख कधी लपवायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहेस का?

:- (दीर्घ श्वास घेऊन) हो केलाय ना! कॉलेजमध्ये असताना एकदा माथेरानला मित्रांबरोबर दोन दिवस फिरायला गेलो होतो. तिथे एक मुलगी भन्नाट आवडली. तीसुद्धा फिरायलाच आली होती. मुख्य म्हणजे एकटीच आली होती. माझ्या आईसारखी सोलो ट्रॅव्हलर. काहीतरी कारण काढून तिच्याशी बोललो आणि सलग पाच तास आम्ही बोलतच राहिलो. तिला मी तेव्हा माझं नाव 'चिन्मय पाठारे' म्हणून सांगितलं. म्हटलं आपलं असं वेगळं नाव आणि अशी हटके पार्श्वभूमी ऐकून या सालस दिसणाऱ्या मुलीने आपल्याशी मैत्रीच केली नाही तर?

माथेरानहून परतल्यावर आमची मैत्री पत्रांमधून चालूच राहिली. एखाददुसरं नाही, दर पंधरा दिवसांनी मोठीमोठी लांबलचक पत्रं लिहायचो एकमेकांना. त्यांनतर इमेल सुरू झालं. मग इ-मेल करायला लागलो. तिच्यासाठी खास चिन्मयपाठारे१२@याहूडॉटकॉम असा इमेल बनवला. एक दोनदा तिने इ-मेलमध्ये म्हटलंसुद्धा, Something doesn't add up. मुलींचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त असतो म्हणतात. मग हे माझं मलाच सतवायला लागलं. शेवटी एक दिवस धाडस करून सांगितलं. मी चिन्मय पाठारे नाही दाकाराई ओकोये आहे. ६ महिने उत्तर आलं नाही. बाबा गेल्यानंतर आयुष्यात पुन्हा एकदा आपण काहीतरी मौल्यवान गमावलं आणि तेसुद्धा निव्वळ स्वतःच्या मूर्खपणामुळे म्हणून धाय मोकलून रडलो. तिच्या घरचा, सांगलीचा पत्ता माहीत होता. एक दिवस धडक ट्रेनमध्ये बसलो आणि तिच्या घराशेजारी वाट पाहात उभा राहिलो. ती दिसली तेव्हा तिला म्हणालो, माझ्याकडून भयंकर चूक झाली पण विश्वास ठेव, चिन्मयऐवजी दाकाराई सोडलं तर अजून तसूभरही काही खोटं बोललेलो नाहीये. माफ कर. आयुष्यात यापुढे पुन्हा माफ करायची संधी द्यायचो नाही. लगेच ऐकली नाही, पण एका आठवड्यात इमेल आलं 'डिअर दाकाराई'च्या नावानं. बाकी सगळ्या गप्पा जुन्याच. गंमत म्हणजे आधीची इमेल्स जपून ठेवायची म्हणून तो चिन्मयपाठारे नावाचा इमेल मी कधी बदललाच नाही आणि आमच्या पुढच्या गप्पाही तिथेच चालू राहिल्या. चित्रा पोतनीस तिचं नाव. चित्रा पोतनीस-ओकोये. माझी पत्नी. आता आम्हाला सात वर्षांची एक गोड मुलगीसुद्दा आहे. झुरी.

नवल असं की माझ्यात डॉमिनंट नसलेला बाबाचा जीन आमच्या मुलीमध्ये रसरसून उतरलाय. काळेभोर कुरळे कुरळे केस. बाबासारखा देखणा काळा रंग. विलक्षण तकाकी आहे तिच्या रंगाला. निसर्गसुद्धा लहरी आहे अगदी. कुठेही काहीही मनाप्रमाणे पेरतो आणि उगवत राहतो. आपण प्रेक्षक आहोत फक्त. आम्हाला बऱ्याच वेळा विचारतात, मुद्दाम आफ्रिकेच्या पीडित प्रदेशातून मुलगी दत्तक घेतली का? पण मला राग येत नाही. I let them be. कुठेतरी आशा आहे की माणसांच्या मनाच्या कक्षा रुंदावल्या आणि निसर्गासाठी आदर बळावला की आपोआप असे प्रश्न विचारणं किंवा पडणंच बंद होईल.

एक इंजिनियर ते रेस्टॉरंट entrepreneur हा प्रवास कसा झाला?

इंजिनिअरिंग झाल्यावर मी एका माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये आठ वर्षं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होतो. चित्राचीही फायनान्स क्षेत्रातली नोकरी चालू होती. नाना आणि आजीनंतर आईही आमच्यासोबत राहायला आली. आयुष्य तसं बघायला गेलं तर स्थिरस्थावर झालं होतं. मला आणि चित्राला माणसांची खूप आवड. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा मित्रमैत्रिणींना जेवायला घरी बोलवायचो. तेव्हा मी मगाशी म्हटलं ते जोलोफ भेळ, चाकालाका पाव वगैरे पदार्थ खाण्यात सगळ्यांना एकदम रस असायचा.

केशर मालवा पुडिंग ही आईने आफ्रिकन मालवा पुडिंगमध्ये बदल करून जरदाळूऐवजी केशर-पिस्ता टाकून नव्याने निर्माण केलेली स्वीट डिश. झुरीच्या पहिल्या वाढदिवसाला मी, चित्रा आणि आई आम्ही तिघांनी मिळून पंचवीस-तीस जणांसाठी चाकालाका पाव आणि केशर मालवा पुडिंगचा बेत केला. स्वतः घरी सगळं बनवलं. सगळ्यांना तो बेत एवढा आवडला की त्याच रात्री चित्रा मला म्हणाली, की हे जे जे काही अफलातून तुझ्या आईबाबांनी केलं आहे ना, त्याची नोंद करून ठेवायला हवी. नुसती डायरीमध्ये किंवा ब्लॉगवर नोंद करणं पुरेसं नाही. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर असं काहीतरी करायला हवं जे मूर्त स्वरूपात राहील, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल. ती म्हणतेय त्यात मला तथ्य वाटलं. कुठेतरी माझ्या मनातल्या सुप्त इच्छेला शब्द मिळाले असं वाटलं.

मग घरच्या घरी एक छोटा पार्टी केटरिंगचा व्यवसाय सुरु केला. मी आणि चित्रा आमच्या नोकऱ्या सांभाळून ते करायचो एक पॅशन म्हणून. आईही तिच्या परीने जमेल तशी मदत करायची. पण ती साधीशी कल्पना नंतर झपाट्यानं एवढी विस्तारत गेली की आम्हांला एका वर्षातच जाणवलं की दोघांपैकी एकानं तरी हे आता पूर्ण वेळ करायला हरकत नाही. मग चित्रानं आयुष्यात स्थैर्य असावं म्हणून तिची नोकरी चालू ठेवली आणि मी पूर्ण वेळ रेस्टॉरंटच्या कामामध्ये जुंपलो. आता जगभरात सात ठिकाणी लोकांना माझ्या जिव्हाळ्याचे हे पदार्थ खिलवतोय. कधीकधी सगळं स्वप्नवत वाटतं. आई आणि झुरी तर आहेतच पण सच्चे दोस्त आणि माझ्याकडून मी बदलण्याची अपेक्षा न करणारं, माझ्यातून माझी उत्तम आवृत्ती बाहेर काढणारं चित्राचं प्रेम मिळालं म्हणून इथपर्यंत पोहोचलोय, अजून काय!

आफ्रिकेबद्दल काय वाटतं? कधी परत जावंसं वाटतं?

आफ्रिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला गेलो तर सलग एक आठवडाही कमी पडेल. माझा जन्म आफ्रिकेमधल्या अपार्थाइडच्या काळातला. भारतात दीड-दोनशे वर्षांपूर्वी दलितांची जी परिस्थिती होती त्यापेक्षाही नामुष्कीची परिस्थिती आफ्रिकेतल्या लोकांनी अपार्थाइडमध्ये अनुभवली. बाबा तिथे ब्लॅक कॅटेगरीमध्ये होता. आई कलर्ड. मी दिसायला 'ब्लॅक' नव्हतो म्हणून मीसुद्धा कलर्ड. तुम्ही काळे किंवा कलर्ड असाल आणि रात्रीच्या वेळी एखाद्या उच्चभ्रू भागांमध्ये नुसते आढळलात तरी बेछूट गोळीबार करायची त्यावेळी पोलिसांना मुभा होती. बाबाच्या खूप जवळच्या एका मित्राला फक्त गोऱ्या लोकांच्या वस्तीतून कामावरून निघताना उशीर झाला म्हणून गोळी झाडली होती आणि त्यावर कुणीही काही बोलू शकलं नाही. अपार्थाइड म्हणजे एक सततचा लढा होता. आई सांगते की १९९४मध्ये ते संपल्यावर बऱ्याच जणांना स्वतःला आठवण करुन द्यायला लागायची की जगण्यासाठी रोजचं युद्ध संपलंय, आता आयुष्य जगायला सुरुवात करायला हवी. मला हे काही विशेष आठवत नाही आणि आम्ही त्यानंतर वर्षभरातच भारतात आलो त्यामुळे त्यापुढचं तर ठाऊकच नाही.

अपार्थाइडमध्ये असूनही माझ्या आयुष्यातली आफ्रिकेमधली पहिली आठ वर्षं फार फार सुंदर होती. खडतरही होती खरं तर पण आई आणि बाबाने मला फक्त प्रेम दिलं म्हणून त्या कठीण दिवसांसाठी मनात तेढ नाही. उलट आफ्रिकेसारख्या देशाशी माझी नाळ जोडली गेली म्हणून मला स्वतःचा हेवा वाटतो. ती माझी जन्मभूमी आहे. तिची ओढ वाटते. लळा वाटतो. पूर्ण आफ्रिका खंडाचाच विकास व्हायला हवा असं वाटतं. त्या प्रदेशाची ओळख नुसती कलाहारी, सहारा वाळवंट, मसाई लोक, जंगल सफारी एवढ्यापुरती राहू नये असं वाटतं. मोठा विस्तीर्ण प्रदेश आहे. सोन्यासारखा. त्याला निव्वळ लुबाडून न नेता तिथल्या प्रत्येक कुटुंबाची प्रगती व्हावी असं वाटतं. फिलांथ्रोपीच्या नावाखाली लशींची चाचणी करण्यापुरता लोकांचा उपयोग होऊ नये असं वाटतं.

आफ्रिकेत आता माझं आपलं म्हणावं असं कुणीच नाही. माझं जग – आई, झुरी आणि चित्रा – माझ्याबरोबर आहेत. तिथून भारतात येताना मुळासकट उपटून आलो आणि नंतर भारतातच रुजलो, तिथूनच बहरलो. अर्थात त्या मूळाचा उरलासुरला अंश शोधायला झुरीला तिथे जायचं असेल तर मात्र मी तिला कधीच थांबवणार नाही.

दाकाराई, खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कुतूहल म्हणून विचारतेय, तुझं रेस्टॉरंट सोशल मीडियावर कुठेच नाही. वेबसाईट नाही. जाण्याआधी वाचकांना एखाद्या तरी ठिकाणचा पत्ता द्यायला आवडेल?

पण मग तुझे वाचक म्हणतील की ही माझी किंवा रेस्टॉरंटची केलेली जाहिरात आहे. त्यापेक्षा स्वतः शोधा म्हणजे नक्की सापडेल. मी तर म्हणेन, प्रेम आणि एकमेकांच्या संस्कृतींचा, विचारधारांचा आदर जपलेल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 'दाकाराई सुमन ओकोये'चा पत्ता मिळेल.

क्वाहेरी! भेटूच.

---

हे लेखन पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

टिंबक्टू – इतिहास आणि वर्तमान

- देवकी एरंडे

आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी "टिंबक्टू" हा शब्द ऐकलेला असतो. अनेक अर्थांनी टिंबक्टू हे झुमरीतलैयासमान एक काल्पनिक, रम्य ठिकाण मानले जाते. हा संदर्भ अनेक हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा पाहायला मिळतो. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने म्हटल्याप्रमाणे टिंबक्टू म्हणजे "कल्पनेतील सर्वात दूरचे ठिकाण". अशा 'काल्पनिक' ठिकाणी काम करायला जायला मिळेल, असे मला कधी वाटले नव्हते. पण 'नकाशा नकाशा' खेळताना काही वर्षांपूर्वी फक्त कल्पनेतच असणारे हे शहर एकदा कधीतरी जगाच्या नकाशावर दिसले आणि आपल्याच अज्ञानाची मजा वाटलेली अजून आठवते! नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास सुरु केल्यापासून टिंबक्टूच्या ऐतिहासिक महत्वाची तोंडओळख झाली. त्या जागेबद्दल असलेले वलय, तेथील सर्वदूर पसरलेले ते प्रचंड सहारा वाळवंट, त्या वाळवंटातील एक प्रसिद्ध संगीत महोत्सव आणि एकूणच त्या नावाबद्दल असलेले गूढ ह्यामुळे एकदातरी तिकडे जाता आले तर किती बहार येईल असे मला काही वर्षांपूर्वी वाटून गेले होते. अर्थात मी ते विसरूनही गेले होते. पण काही वेळेस अगदी अनपेक्षितपणे आपली स्वप्ने सत्यात उतरतात, आणि टिंबक्टूच्या बाबतीत माझे तसेच झाले. २०२० साली जेव्हा मी 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस'बरोबर मालीला कामाला जाणार हे निश्चित झाले तेव्हा राजधानी बामाकोबरोबरच मोपती आणि टिंबक्टूला सुद्धा मला सतत कामानिमित्त जावे लागेल असे कळले आणि मला कोण आनंद झाला! कल्पनेतील जागा सत्यात बघायला मिळणार याचे मला खूप अप्रूप वाटत होते आणि कधी एकदा मी तिकडे जातेय असे झाले होते.

टिंबक्टू नकाशा

खरे तर कुठल्याही नवीन ठिकाणी जायच्या आधी मी त्याबद्दल मुद्दामच काही वाचायचे टाळते. उगीच पूर्वग्रह होतात आणि ती नवीन जागा जाणून घ्यायच्या निखळ आनंदाला आपण मुकतो असे मला वाटते. मात्र टिंबक्टूबद्दलची तीव्र ओढ मला काही स्वस्थ बसून देत नव्हती आणि मी जरा इंटरनेट राजाला हाक घातली. तेव्हा समोर आले सर्वप्रथम मनसा मुसा हे नाव. तसे बघायला गेले तर आपल्यासाठी अगदीच अपरिचित नाव. पण मनसा मुसा, म्हणजे बादशाह मुसा हा टिंबक्टूचा करविता. साधारणपणे बाराव्या शतकात (तर काहींच्या मते पाचव्या) तुआरेग भटक्या लोकांनी वसवलेले टिंबक्टू हे आधी फक्त तात्पुरती वसाहत म्हणून प्रसिद्ध होते. पण मनसा मुसासारख्या द्रष्ट्या राज्यकर्त्याने टिंबक्टूचे अतिशय मोक्याचे भौगोलिक स्थान ताडले आणि उत्तर, पश्चिम आणि मध्य आफ्रिकेच्या प्रदेशांमधील मध्यबिंदू म्हणून नावारूपास आणले. त्याच्या द्रष्टेपणाने सहारा वाळवंटाच्या प्रवेशद्वारावर, सुदानच्या सुपीक प्रदेशाच्या हद्दीत आणि नायजर नदीपासून साधारण नऊ मैलांवरील एका विलक्षण प्रसन्न जागेत वसलेल्या टिंबक्टूला व्यापारउदीमाचं मुख्य स्थान, आणि सहारा वाळवंटातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवर दक्षिणेकडील मार्गांचे प्रवेशद्वार म्हणून एक विलक्षण महत्त्व मिळाले. २०० वर्षांच्या आत टिंबक्टू हे मीठ आणि सोन्याच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांच्या केंद्रस्थानी असलेले एक अत्यंत श्रीमंत शहर बनले. तिथे हस्तलिखितांच्या व्यापारासाठी वाटाघाटी होत असत. उत्तरेला तेगाझा येथून मीठ, सोने विकले जात असे, आणि दक्षिणेकडून गुरे व धान्य विकले जात असे. हे एक महत्त्वाचे बाजारस्थान होते.

पण फक्त व्यापारावर भर न देता मुसाने इस्लामी शैक्षणिक संस्थासुद्धा सुरू केल्या; आणि ज्या अस्तित्वात होत्या, त्यांना एक नवी झळाळी दिली. त्यामुळे हे शहर जगप्रसिद्ध व्यापारी महासत्तेबरोबरच मध्ययुगीन जगाचे शैक्षणिक केंद्र बनले. जणू काही त्या काळातील एक बौद्धिक आणि आध्यात्मिक राजधानीच! मुसाने टिंबक्टू शहरात इस्लामी शिक्षणाचे विद्यापीठ स्थापन करून त्याला मोठी कीर्ती मिळवून दिली. केवळ इस्लामी अभ्यासच नव्हे, तर इतिहास, वक्तृत्व, कायदा, विज्ञान आणि विशेषत: वैद्यकशास्त्र हेही विषय या विद्यापीठात शिकवले जात. त्याचबरोबर गणित, खगोलशास्त्रापासून ते वैद्यकशास्त्र आणि कायद्यापर्यंत, तसेच इस्लामची महान शिकवण येथे संकलित करून अनेक लाख हस्तलिखितांमध्ये जतन करण्यात आली. ही हस्तलिखिते – काही चौदाव्या शतकातील आणि बहुतेक अरबी भाषेत लिहिली गेलेली – असे दर्शवितात की, मध्ययुगीन टिंबक्टू हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होते तसेच सहारा वाळवंटातून जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील एक मध्यवर्ती, सर्व दिशांना जोडलेले मोक्याचे शहर होते. नायजर नदी आणि सहारा ज्या ठिकाणी एकत्र येतात अशा ठिकाणी वसलेले हे ठिकाण म्हणजे भूमध्य समुद्रातील व्यापारी आणि मोठ्या इस्लामी जगासाठी बांधलेल्या आफ्रिकी वस्तूंचे प्रवेशद्वार होते. मुसानंतर आलेल्या सोंगहाई साम्राज्याच्या अंतर्गत हे शहर, १८०पेक्षा जास्त मदरसे आणि विद्यापीठ असलेले महान मुस्लिम शैक्षणिक केंद्र बनले. मनसा मुसाच्या कारकीर्दीच्या अखेरीस (इसवी सन चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस) संकोरे मशीद, ज्याला संकोरे विद्यापीठ म्हणून देखील ओळखले जाते, जगातील पहिल्या विद्यापीठांपैकी एक होते. ऑक्सफर्ड आणि सरबोनचे समकालीन असलेल्या टिंबक्टूच्या संकोरे विद्यापीठातील शिक्षणाची पातळी जगातील इतर सर्व इस्लामी केंद्रांपेक्षा श्रेष्ठ होती. जिंगुरेबर, सिदी याह्या आणि सांकोरे या तीन मदरशांमध्ये २५,००० विद्यार्थ्यांची सोय होती; ज्यामुळे हे त्या वेळचे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ बनले होते. ह्या सगळ्यावरून आपल्याला अंदाज येईल की खरे तर टिंबक्टू एकेकाळी उच्च शिक्षणाचे आश्रयस्थान होते.

युरोपात जेव्हा Renaissance लाट उसळली होती, तेव्हा टिंबक्टू हे आधीच विपुल लिखित परंपरेचे केंद्र होते. त्याकाळात टिंबक्टूमध्ये असंख्य कुरानिक शाळांबरोबरच तब्बल ८० मोठी खाजगी ग्रंथालये होती. उत्तर आफ्रिका, अरबस्तान आणि अगदी पर्शियातूनही टिंबक्टूच्या हस्तलिखितांकडे विद्वान ओढले गेले. शहराच्या सुवर्णयुगात इतर सर्व व्यापारी वस्तूंपेक्षा पुस्तके ही सर्वात मौल्यवान वस्तू बनली. टिंबक्टूमध्ये ७ लाखांहून अधिक हस्तलिखिते होती, ज्यामुळे आफ्रिकी इतिहासाची एक अनमोल लिखित नोंद तयार झाली.

टिंबक्टू मातीचं घर

पण हे सगळे जरी टिंबक्टूमध्ये घडत होते तरी जगाच्या नकाशावर अजून त्याचा पत्ताच नव्हता. तो मिळाला जेव्हा मुसाने आपल्या हजयात्रेच्या माध्यमातून टिंबक्टू आणि सर्वसाधारणपणे माली साम्राज्याची उर्वरित मध्ययुगीन जगाला ओळख करून दिली. मुसाची ही हजयात्रा फारच कमाल होती. असे म्हणतात की मुसाने १३२४ ते १३२५ या काळात २,७०० मैलांचा प्रवास केला. त्याच्या यात्रेत साठ हजार पुरुषांचा समावेश होता. त्यांनी ब्रोकेड आणि पर्शियन रेशीम परिधान केले होते. त्याचबरोबर त्याच्याबरोबर बारा हजार गुलामांचा समावेश होता, ज्यांनी प्रत्येकी १.८ किलो (४ पौंड) सोन्याच्या विटा बाळगल्या होत्या आणि रेशीम परिधान केलेले सैनिक ज्यांनी सोन्याची पाती असलेले भाले घेतले होते. मुसाने त्याच्या यात्रेसाठी सढळ हाताने खर्च केला होता आणि त्याचबरोबर असलेल्या त्याचा ताफ्यातील सर्वांच्या सगळ्या गरजा पुरवल्या. वाटेत भेटलेल्या गरिबांना सोने दिले, कैरो आणि मदिनासह मक्केला जाताना वाटेतल्या शहरांना त्याने सोने तर दिलेच, पण सोन्याचा व्यापारही केला. दर शुक्रवारी त्याने एक मशीद बांधली अशाही कथा सांगितल्या जातात. मुसाच्या मक्केच्या यात्रेनंतर कैरोला भेट देणाऱ्या अल-उमरी यांनी नमूद केले की, "हे सामर्थ्य, संपत्ती आणि त्याच्या आकाराचे आणि सौंदर्याचे अभूतपूर्व प्रदर्शन होते". मुसाने आपल्या देशाची संपत्ती यथासांग सर्वांसमोर मांडली. काही अरबी लेखकांच्या मते, मुसाच्या भेटवस्तू देण्यामुळे इजिप्तमध्ये सोन्याच्या मूल्यात घसरण झाली आणि किमान बारा वर्षे तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही! मुसाच्या हज यात्रेने एका दगडात दोन पक्षी मारले – माली साम्राज्याचे वैभव लोकांसमोर आले आणि टिंबक्टू जगाच्या नकाशावर विराजमान झाले. त्याचबरोबर अरब प्रवाशांना उत्तर आफ्रिकेला भेट देण्यासाठी प्रेरणा मिळाली. पुढे लिओ आफ्रिकन्ससारख्या लेखकाच्या माध्यमातून त्याच्या अफाट श्रीमंतीच्या कथा युरोपपर्यंत पोहोचल्या, ज्यामुळे युरोपीय खलाशांच्या मनात तीव्र कुतूहल निर्माण झाले. युरोपीय मात्र खडतर आणि लांबलचक प्रवासामुळे फार उशिरापर्यंत या शहरात पोहोचणार नव्हते, त्यामुळे या शहराभोवती गूढतेची आभा निर्माण झाली होती. त्यामुळेच टिंबक्टू हा शब्द म्हणजे पृथ्वीच्या टोकापर्यंत तीन अक्षरांचा प्रवास होय असा विचार रुजू झाला आणि त्याभोवतीचे गूढतेचे वलय अजूनच गडद होत गेले. टिंबक्टूच्या सुबत्तेची रंजक कथा युरोपीय लोकांपर्यंत यथासांग पोहोचली, पण प्रवासाची जमवाजमव करून प्रत्यक्ष तिथे पोहोचेपर्यंत त्यांना बराच उशीर झाला. ते आले ते एका समृद्ध, श्रीमंत टिंबक्टूमध्ये नाही, तर अनेक टोळ्यांच्या स्वाऱ्या आणि त्यांनी केलेल्या लुटीच्या जखमा घेऊन कोलमडलेल्या टिंबक्टूमध्ये. त्यामुळे जेव्हा युरोपी प्रवाशांना ते शोधत असलेले सोने सापडले नाही आणि त्याऐवजी तेथे पोहोचणे किती अवघड आहे हे लक्षात आले, तेव्हा शहराची कीर्ती त्याच्या सोन्यामुळे प्रसिद्ध होण्याऐवजी त्याच्या स्थान आणि गूढतेमुळे बदनाम होण्याकडे वळली. किमान १८६३पासून या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दकोशात आता टिंबक्टूचा उल्लेख कोणत्याही दूरच्या ठिकाणाचे रूपक म्हणून केला जातो. एकोणिसाव्या शतकात युरोपीय खलाशी येथे जाण्याच्या प्रयत्नात मरण पावले. टिंबक्टू हे एक असे ठिकाण म्हणून सामूहिक कल्पनेत रुजले, जे इतके विलक्षण आहे की कदाचित ते अस्तित्वातच नसेल.

अलीकडच्या वर्षांत टिंबक्टूमध्ये हजारो मध्ययुगीन हस्तलिखिते सापडली आहेत ज्यात स्त्रियांच्या कविता, कायदेशीर विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण वैज्ञानिक ग्रंथांचा समावेश आहे. आफ्रिकी आणि इस्लामी संस्कृतींबद्दलच्या कल्पनांना त्यामुळे नवे वळण मिळत आहे. कृष्णवर्णीय आफ्रिकेत साक्षरता आणि बौद्धिकता होती, हे या हस्तलिखितांतून स्पष्ट झाले आहे. आफ्रिका हा 'गीत आणि नृत्याचा खंड' आहे, या कल्पनेला त्यामुळे तडा जातो. नाजूक वाङ्‌मयीन कलाकृतींचे जतन करण्यासाठी २००९मध्ये बांधण्यात आलेल्या अहमद बाबा इन्स्टिट्यूटतर्फे सुमारे २० हजार हस्तलिखिते जतन करण्यात आली आहेत. इजिप्तच्या अलेक्झांड्रिया ग्रंथालयानंतर आफ्रिकेतील हस्तलिखितांच्या सर्वांत मोठ्या ग्रंथालयांपैकी हे एक. अनेक पुस्तके काही स्थानिक कुटुंबांच्या खासगी ग्रंथालयांमध्येही आहेत. ही कुटुंबे त्यांच्या हस्तलिखितांचा आदर करतात, अगदी वर्षातून एकदा मौलाऊद नावाच्या सुट्टीद्वारे त्यांचा सन्मान करतात, ज्या दिवशी इमाम आणि कुटुंबातील वडील पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माचे औचित्य साधून प्राचीन प्रार्थना पुस्तकांचे वाचन करतात. २०१२ साली इस्लामी अतिरेक्यांनी शहरावर कब्जा करण्यापूर्वी आणि दरम्यान, अहमद बाबा इन्स्टिट्यूट आणि खाजगी ग्रंथालयांमधील ३ लाखांहून अधिक टिंबक्टू हस्तलिखिते जतन करून मालीमधील अधिक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पण ह्या व्यतिरिक सापडत असलेला साठा मात्र आज नामशेष होण्याचा धोका आहे दिवसेंदिवस वाढत आहे, कारण वाळू आणि इतर घटकांमुळे अनेक जुने ग्रंथ नष्ट होत आहेत, त्यांचे विघटन होत आहे. आज टिंबक्टूमधली बहुतेक अनमोल हस्तलिखिते खाजगी हातात आहेत, जिथे ती बऱ्याच वर्षांपासून लपवून ठेवली गेली आहेत आणि काही काळ्या बाजारात गायब झाली आहेत. यामुळे टिंबक्टूच्या अस्मितेचा काही भाग नामशेष होण्याचा धोका आहे.

९०० वर्षांच्या इतिहासात टिंबक्टू अनेक वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाखाली होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला माली साम्राज्याने ते आपल्या ताब्यात घेतले. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात, १४६८मध्ये विस्तारित सोंगहाई साम्राज्याने हे शहर ताब्यात घेईपर्यंत तुआरेग लोकांनी थोड्या काळासाठी शहराचा ताबा घेतला. मोरोक्कोच्या सैन्याने १५९१मध्ये सोंगहाईचा पराभव केला आणि गाओऐवजी टिंबक्टूला राजधानी बनवले. आक्रमणकर्त्यांनी आर्मा नावाचा नवा शासक वर्ग स्थापन केला, जो १६१२नंतर मोरोक्कोपासून स्वतंत्र झाला. सोळाव्या शतकात मोरोक्कोच्या आक्रमकांनी विद्वानांना हाकलून लावायला सुरुवात केली आणि व्यापाराचे मार्ग हळूहळू किनाऱ्यांकडे वळले. टिंबक्टूचे महत्त्व व प्रतिष्ठा कमी झाली आणि अभ्यासक इतरत्र पांगले. १८९३मध्ये फ्रेंचांनी सत्ता हाती घेईपर्यंत वेगवेगळ्या जमातींनी राज्य केले, ही परिस्थिती १९६०मध्ये सध्याच्या माली प्रजासत्ताकाचा भाग होईपर्यंत कायम राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच वसाहतीमुळे टिंबक्टूच्या पूर्वीच्या वैभवाला आणखी एक गंभीर धक्का बसला. टिंबक्टूमधील परिस्थिती इतकी बिघडली की, काही वर्षांपूर्वीच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली असली तरी १९९०मध्ये धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान देण्यात आले. परंतु तीन प्राचीन मशिदींच्या जतनात मोठ्या सुधारणा झाल्याने २००५मध्ये टिंबक्टू या यादीतून बाहेर आला. मात्र २०१२मध्ये सशस्त्र संघर्षाशी संबंधित धोक्यांमुळे टिंबक्टूला पुन्हा एकदा जागतिक वारसा धोक्याच्या यादीत टाकण्यात आले.

टिंबक्टू मातीचं घर

मार्च २०१२मध्ये मालीच्या लष्कराने तत्कालीन अध्यक्ष अमादू तोमानी तुरे ह्यांना बडतर्फ केले आणि राजधानी बामाकोचा ताबा घेतला. ह्या लष्करी बंडामुळे माजलेल्या गोंधळाचा इस्लामी अतिरेक्यांच्या पाठिंब्याने तुआरेग बंडखोरांनी फायदा उठवला नसता तरच नवल. त्यांनी तत्परतेने गाओ, किदाल आणि टिंबक्टू यांच्यावर आपला झेंडा फडकवला आणि टिंबक्टूच्या सांस्कृतिक अस्मितेला अजून एक मोठा धोका निर्माण झाला. तुआरेगांनी टिंबक्टूसह या प्रदेशावर अझावादचे स्वतंत्र राज्य म्हणून दावा केला. तथापि, तुआरेग बंडखोरांची जागा लवकरच इस्लामी अतिरेक्यांनी घेतली आणि नंतर त्यांनी रहिवाशांवर शरीयतची (इस्लामी कायदा) कठोर आवृत्ती लादली. इस्लामी अतिरेक्यांनी – विशेषत: अंसार दीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गटाने – टिंबक्टूची अनेक ऐतिहासिक धार्मिक स्मारके आणि कलाकृती मूर्तिपूजक मानल्या आणि त्यासाठी, त्यांनी जिंगुरेबर आणि सिदी याहिया मशिदींमध्ये असलेल्या इस्लामी संतांच्या कबरींसह त्यांतील बऱ्याच स्मारकांचे नुकसान केले किंवा नष्ट केले. तेव्हापासून सुरु झालेली टिंबक्टूची साडेसाती अजूनही सुरू आहे.

एकेकाळी समृद्धीच्या शिखरावर असणारे टिंबक्टू आज आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. यादवी, वाळवंटीकरण, अस्थिरता आणि ह्या सगळ्या बरोबर येणारे सामाजिक प्रश्न आजच्या टिंबक्टू ला नकोनकोसं करून टाकतात. ज्या शहराने एकेकाळी एकाच वेळी पंचवीस पंचवीस हजार विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये सामावून घेतले आणि इस्लामच्या अभ्यासाचे माहेरघर बनवले, तेच टिंबक्टू आज, गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दारिद्र्याने ग्रासले आहे. टिंबक्टूची लोकसंख्या मध्ययुगीन काळात अंदाजे अडीच लाखावर पोचली होती ती आता साधारणपणे ३५हजारावर आली आहे. एकेकाळी अरब-आफ्रिकी व्यापाराचे केंद्र असलेले टिंबक्टू जगण्याचे साधन म्हणून सरकारी निधीवर अवलंबून असलेले शहर बनले आहे. वाळवंटाचे अतिक्रमण झाले आहे, पाण्याचा पुरवठा गायब झाला आहे आणि बंडखोर लढाऊ नवीन हल्ले करण्याची धमकी देत आहेत.

पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला कुठेतरी माझे टिंबक्टू सापडले. अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण अगदी पहिल्या दिवसापासून टिंबक्टूने मला आपलेसे करून टाकले. खरंतर ऑफिसपासून ते घरी जाईपर्यंतचा माझा रस्ता अगदी जेमतेम १० मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर होता. पण तेवढे अंतरसुद्धा मला पायी जायची परवानगी नव्हती. एकेकाळी परदेशी विद्यार्थी आणि यात्रेकरुंनी भरलेले रस्ते आज मात्र कोणत्याही विदेशी व्यक्तीसाठी असुरक्षित आहेत. किडनॅपिंगचा प्रचंड मोठा धोका आहे. कधी कुठे काय विपरीत घडेल ह्याचा नेम नाही. टिंबक्टूच्या विमानतळावर उतरल्यापासून तिथे आता सर्वदूर पसरलेल्या असुरक्षिततेची चाहूल यायला लागते. संयुक्त राष्ट्रांच्या फौजा तिथे आपले स्वागत करतात; आपल्या सामानाची आणि गाड्यांची कसून चौकशी झाल्यावरच आपल्याला बाहेर जाता येते. ह्या सगळ्यामध्ये आपला भरवशाचा साथीदार म्हणजे मनापासून आणि जरा जास्तच मनापासून काम करणारा सूर्य! पण तरीसुद्धा त्या रस्त्यांवरून फिरताना एकेकाळी गजबजलेले रस्ते, तिथे चालणारी वैचारिक खलबते आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता ह्याची कल्पना करून मन भरून येते आणि "काय होतास तू, काय झालास तू" असे वाटल्यावाचून राहत नाही. पण ह्या सगळ्यात मला काय जास्त भावले असेल तर टिंबक्टूवासियांची दिलदारी आणि आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल असलेला सार्थ अभिमान. अनेक चांगल्या-वाईट परिवर्तनांनंतर त्या अजूनही मानाने उभ्या असलेल्या मशिदींप्रमाणेच त्यांचे मनोधैर्यही अजून टिकून आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये गोष्टी खूप बदलल्या आहेत. वाढत्या दहशतवादामुळे खूप अंतर्गत स्थलांतर झाले आहे. प्रत्येक दहशतवादी गट आपल्या स्थानासाठी लढतो आहे आणि नेहमीप्रमाणे भरडली जाते आहे ती म्हणजे सामान्य जनता. एकदा असेच दोन टोळ्यांच्या भांडणात होरपळून निघालेल्या एका गावात आम्ही गेलो होतो. ते गाव टिंबक्टूपासून साधारण ३००-३५० कि. मी. दूरवर असलेल्या वाळवंटात होते. तिथल्या लोकांशी बोलून परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर त्या गावातल्या एकमेव शाळेत तिथल्या दहशतवादी गटाने तळ ठोकल्याचे आमच्या लक्षात आले. जरा अजून खोदून चौकशी केल्यावर कळले की गेले अनेक महिने शाळा भरलीच नव्हती कारण अनेक शस्त्रधारी व्यक्ती तिथे मुक्काम ठोकून होत्या. ICRC म्हणून आमची जबाबदारी आहे की कोणत्याही सशस्त्र संघर्षात सहभागी असलेल्या सशस्त्र गटांना युद्धादरम्यान त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणे – कारण युद्धातही नियम असतात. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा (IHL) युद्धांवर नियंत्रण ठेवतो. यात काही तत्त्वे आहेत जी संघर्षादरम्यान लढणाऱ्या पक्षांनी विचारात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून नागरी लोकांवर परिणाम होणार नाही. IHLने सुचविल्याप्रमाणे, शाळा, वैद्यकीय केंद्रे इत्यादी सार्वजनिक वस्तूंचे नेहमीच संरक्षण केले पाहिजे. ही नाजूक बाब शाळेवर कब्जा केलेल्या सशस्त्र गटासमोर मांडण्यासाठी स्थानिक जनतेची सहमती मिळाल्यावर आम्ही त्यांच्या कमांडरशी बोललो. आम्ही IHL, त्याची तत्त्वे आणि शाळा रिकामी करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कमांडरने आमचे आभार मानले आणि दोन आठवड्यांतच शाळा रिकामी झाली आणि वर्ग पुन्हा सुरू झाले! मी व माझे सहकारी मिळून हे करू शकलो हा एक अद्भुत अनुभव होता आणि आनंदाचा क्षणही! त्यानंतर आम्हाला इतर लढाऊ पक्षांशीही बोलावे लागले कारण ICRC म्हणून आम्ही संघर्षातील प्रत्येक पक्षाशी बोलतो – नेहमीच अत्यंत गोपनीयतेच्या पद्धतीने आणि नेहमीच द्विपक्षीयपणे. त्यांनी आम्हाला एका मोठ्या तंबूखाली बैठकीला बोलावले, मध्यभागी १३ सशस्त्र लोक आपल्या नेत्यासह आमची वाट पाहत होते. आम्ही तेथे गेलो आणि त्यांच्याशी आयएचएलबद्दल शांतपणे चर्चा केली आणि त्यांनी अतिशय समर्पक प्रश्न विचारले. आजूबाजूला मी एकटीच स्त्री होते, पण एका सेकंदासाठीही मला असुरक्षित वाटले नाही. मला खूप आदराने संबोधित केले गेले. काही अनुभव अविस्मरणीय असतात त्यातला हा एक!

असे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. आज जरी टिंबक्टू एका अतिशय कठीण काळातून जात असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व कधीही कमी होणार नाही. तिथे असलेल्या समस्यांपेक्षाही खूप काहीतरी भारावून टाकणारे असे तिथे आहे. तिथली लोकसंस्कृती ह्या आताच्या संकटांवर मात करून पुन्हा मोठ्या डौलाने उभी राहील आणि निदान एकदा तरी मला त्या वाळवंटातील संगीत महोत्सवाला जात येईल अशी एक वेडी अशा मी कायम मनात ठेवीन!

लेखिका ICRC - The International Committee of the Red Crossसाठी काम करतात. पुणे विद्यापीठातून फ्रेंचमध्ये एम्.ए. केल्यानंतर त्यांनी पॅरीसच्या Sciences Po या संस्थेतून International Public Management आणखी एक मास्टर्स केले. आजवर अनेक फ्रेंच व स्पॅनिश भाषक देशांत त्यांनी काम केले आहे. सध्या त्या कोलंबिया देशात काम करत आहेत.

एकविसाव्या शतकातल्या आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग :
सद्य उणिवा आणि प्रगतीकरिता कळीची धोरणे

- - धनंजय

(मूळ लेखक : नीमा डब्ल्यू. मिंजा आणि सहकारी. Front. Cardiovasc. Med. 9:1008335. doi: 10.3389/fcvm.2022.1008335)
मूळ लेखाचा प्रत-अधिकार लेखकांकडे; Creative Commons Attribution License (CC BY) अटींनुसार लेखाचा संदर्भ देऊन वापर, प्रसार आणि पुनर्मुद्रण करण्याची अनुमती आहे, आणि तीच अनुमती या लेखालाही लागू होते.

लेखातील प्रमुख मुद्दे आणि निवडक आकडेवारीचा सारांश

थोडक्यात

आफ्रिकेत २१व्या शतकात हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा प्रादुर्भाव आदल्या शतकापेक्षा खूप वाढलेला आहे. एकुणातच पूर्वीपेक्षा संसर्गजन्य रोगांपेक्षा हृदयरोगासारख्या असंसर्गाजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. हृदयरोगाचे प्रकार बदलत आहेत – संसर्गजन्य संधीवातासह होणारा हृद्रोग (rheumatic heart disease) कमी होतो आहे, तर नसांत चरबीची पुटे चढून ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृद्रोग (ischemic heart disease) वाढत आहेत. अती रक्तदाब, हृदयाचे स्नायू दुर्बल होण्याचे रोग (cardiomyopathies) पूर्वीही महत्त्वाचे होते, मात्र त्यांची संख्या वाढत आहे. आफ्रिका खंडातील आरोग्ययंत्रणा अजूनही संसर्गजन्य रोगांच्या उपचाराकरिता योजलेली आहे, असंसर्गजन्य रोगांच्या आणि विकारांच्या प्रतिबंधाकरिता आणि उपचाराकरिता नाही. औषधांची किंमत पुष्कळांना परवडत नाही वा ती मिळत नाहीत. आणि धोरणे सुधारण्याकरिता दर्जेदार आकडेवारी आणि संशोधन लागते, ते पुरेसे नाही. या त्रुटी भरून काढण्याच्या दिशेने प्रगती झाली, तर जागतिक आरोग्य संस्थेची २०३०करिताची उद्दिष्टे साधू शकतील, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होणारे अकालमृत्यू ३३% घटू शकतील.

प्रस्तावना

तीन दशकांपूर्वी आफ्रिकेत अती रक्तदाब, हृद्रोग, वगैरे, असंसर्गजन्य रोगांपासून मृत्यूंचे प्रमाण कमी होते. जागतिक आरोग्य संघटना संसर्गजन्य रोगांच्या, म्हणजे एचआयव्ही, क्षयरोग आणि मलेरिया यांच्या नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित करत होती. याचा चांगला परिणाम हा, की संसर्गजन्य रोगांचा दर घटला. परंतु दुर्दैवाने त्याच वेळी असंसर्गजन्य रोगांचा, विशेषतः हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा दर खूप वाढला. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका वाढवणाऱ्या पूर्वप्रकृती, म्हणजे अती रक्तदाब, मधुमेह, वगैरे, वाढत आहेत. रोगांच्या आकडेवारीत संक्रमण होते आहे, त्यात शहरीकरण आणि त्यायोगे अन्न आणि शारीरिक हलचालींच्या सवयींत होणाऱ्या बदलांचा वाटा आहे.

या संक्रमाणामुळे आफ्रिकेतील आरोग्य धोरणाचे लक्ष्याचे केंद्र बदलावे लागणार आहे. याकरिता कुठले आडथळे आव्हानात्मक ठरतील ते समजावे लागतील.

आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे ओझे

हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग जगभरात आजाराची आणि मृत्यूची महत्त्वाची कारणे आहेत. परंतु काही श्रीमंत देशांत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून होणारे मृत्यू आता घटू लागले आहेत. आफ्रिकेत मात्र गेल्या ३० वर्षांत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे ओझे ५०% वाढलेले आहे. याकरिता हृदयरोगाच्या धोक्याच्या पूर्वप्रकृती वाढण्याबरोबर लोकसंख्येची वाढ आणि वयोमानाची वाढही कारणीभूत आहे. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत सर्वत्रच वाढत आहे, पण त्यातही पश्चिम आणि पूर्व भागांत ही वाढ अधिकच गतिमान आहे – आकृती १ बघावी.

हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे होणारे मृत्यु

आकृती १ : वय वर्षे ७०पेक्षा कमी वयात हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या (१९९०-२०१९); सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत सर्वत्र (क), पश्चिम (ख), पूर्व (ग), मध्य (घ), आणि दक्षिण (ङ) विभागांत. Institute for Health Metrics And Evalationsकडून आकडेवारी.

लोकसंख्या वाढत आहे आणि सरासरी वयोमान वाढत आहे, त्यातून उत्पन्न होणारा धोका सरासरी रक्तदाब कमी करून घटवता यावा; आणि ही उपलब्धी गरीब देशांना अधिक असेल. सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होणाऱ्या आजारांची आणि मृत्यूंची प्रमुख कारणे श्रीमंत देशांपेक्षा बरीच वेगळी आहेत. जगभरात म्हणावे, तर ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृद्रोग यांपैकी मोठा वाटा (साधारणपणे ५०%) घेतात, पण आफ्रिकेच्या इतिहासात लकवा (विशेषकरून अती रक्तदाबामुळे होणारा लकवा) हे प्रमुख कारण असे. तरी आता आफ्रिकेतही ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृद्रोग महत्त्वाचे होऊ लागले आहेत, काही अंदाजांनुसार आता ते प्रमुख कारण झाले आहे. हृन्निष्फलतेची (heart failureची) प्रमुख कारणे अती रक्तदाब, संसर्गजन्य संधीवातासह होणारा हृद्रोग (rheumatic heart disease) आणि हृदयस्नायुबाधा (cardiomyopathies) होत.

आफ्रिकेतील जनसर्वेक्षणांत हृच्चयापचयाच्या (cardiometabolic) धोकाजनक प्रकृती मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यांच्यावरून गणिती अंदाज केल्यास पुरुषांमध्ये तरी पुढच्या दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका३ येण्याची सांभावनीयता १२.५-१५.३% आहे. या धोकाजनक प्रकृतींमध्ये अती रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत प्रमुख आहेत. वजन वरकरणी योग्य असून पोट फुगीर असणे ही प्रकृती वजन अधिक असून पोट सपाट असण्यापेक्षा विशेष काळजीजनक आहे : याने हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका अधिक वाढतो. आफ्रिका अजूनही संसर्गजन्य संधीवातासह होणारा हृद्रोग आणि हृदयांतर्गत व्रणरोग (endomyocardial fibrosis) यांच्याशी झुंजत आहेच; यांचे प्रमाण कमी होत असले तरी आफ्रिकेच्या काही भागांत अजूनही लक्षणीय आहे.

हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी अर्ध्याहून अधिक अकाली, म्हणजे ३०-७० वर्षे वयादरम्यान होतात. सर्वाधिक काम करण्याच्या वयात होणारे हे पंगुत्व, ही वाया गेलेली वर्षे कुटुंब, समाज, देश, या सर्व स्तरांवरच्या अर्थकारणावर दुष्परिणाम करते. आफ्रिकेत आरोग्यावर खर्च अजून कमीच आहे (२०१६ साली सरासरी दर डोई $१०३) आणि जो किमान मानला जातो त्या $४४ दर डोई स्तरापेक्षाही काही देशांत कमी आहे. बहुतेक देशांत आरोग्यविमा सार्वत्रिक नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक खर्च करणे गरजेचे होते, त्यातून दारिद्र्य येते, आरोग्यसेवा मिळवण्यात असमानता येते.

आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका वाढवणाऱ्या पूर्वप्रकृती

सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत गेल्या दशकात हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग वाढण्याचे कारण धोका वाढवणाऱ्या पूर्वप्रकृतींतली वाढ होय, आणि त्या वाढण्यात भरधाव शहरीकरणाचे कारण मोठे आहे. जगभरात म्हणावे, तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका वाढवणाऱ्या चार पूर्वप्रकृती अर्ध्याअधिक ओझ्याच्या वाटेकरी आहेत : अती रक्तदाब, उंचीच्या प्रमाणापेक्षा अधिक वजन (अती वजन निर्देशांक BMI), रक्तात साखरेचे अधिक प्रमाण आणि तंबाखू सेवन. आकृती २ सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत आणि त्याअंतर्गत चार क्षेत्रांतले हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे ओझे दाखवते, आणि धोका वाढवणाऱ्या कुठल्या पूर्वप्रकृती त्यात किती योगदान करतात, तेही दाखवते. धोका वाढवणाऱ्या पूर्वप्रकृती ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृद्रोग, लकवा, आणि अती रक्तदाबमुळे होणाऱ्या हृद्रोगांना सर्वांत अधिक योगदान देतात, आणि त्या पूर्वप्रकृतींपैकी अती रक्तदाबाचे योगदान सर्वाधिक आहे.

- आफ्रिकेतील वेगवेगळ्या देशांत अती रक्तदाबाचा प्रादुर्भाव १५-७०% इतका आहे. त्यातल्या त्यात अधिक प्रादुर्भाव उत्तर आफ्रिकेत आणि दक्षिण आफ्रिकेत आहे. सर्व मिळून सरासरी घेतल्यास प्रादुर्भाव २७% आहे, पैकी १८% उपचार घेत आहेत, पैकी केवळ ७% लोकांचा रक्तदाब नियंत्रित आहे.

- मधुमेहामुळे येणाऱ्या पंगुत्वाचे प्रमाण १९९० ते २०१७ दरम्यान १२६% वाढले आहे. पण मधुमेहाकरिता चाचणी करायचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे ५०-६०% मधुमेह रुग्णांचे अजून निदान झालेले नाही.

- अती वजनाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या देशांत १३.६-३१% आहे. इजिप्त, लिबिया या उत्तर आफ्रिकी देशांत आणि दक्षिणेकडील नामिबिया, दक्षिण आफ्रिका देशांत अती वजनाचा प्रादुर्भाव त्यातल्या त्यात अधिक आहे, सहाराच्या दक्षिणेच्या देशांपैकी इथियोपिया-एरिट्रिया या देशांत त्यातल्या त्यात कमी आहे. सर्वत्रच ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांत अती वजनाचा प्रादुर्भाव अधिक आहे.

- आफ्रिकेत धूम्रपानाचा प्रादुर्भाव जगातील अन्य भागांपेक्षा कमी असला (१८.५%) तरी आता वाढत आहे. कमी प्रादुर्भावाचा आभास काही देशांमधील आकडेवारीच्या कमतरतेमुळेही असू शकेल, ही शक्यता लक्षात ठेवली पाहिजे. अनेक देश तंबाखूच्या वापरावर काबू करणारे कायदे करीत आहेत, परंतु सरासरी बघता आफ्रिकेत तंबाखूवरच्या कराचा दर जगातल्या अन्य भागांपेक्षा कमी आहे.

हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे होणारे मृत्यु
आकृती २: चयापचयाच्या धोकादायक प्रकृती आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांत त्यांचा हातभार, सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेतली चार क्षेत्रे : मध्य (क), पूर्व (ख), पश्चिम (ग), आणि दक्षिण (घ). सर्व धोकाजनक प्रकृती मुख्यत्वाने ज्या तीन रोगांचा धोका वाढवतात, ते ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृदयरोग, लकवा आणि अती रक्तदाबामुळे होणारे हृद्रोग होत, ते तीन रंग प्रत्येक चौकोनात ठळक दिसत आहेत.

आफ्रिकेतल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा आढावा

हृन्निष्फलता : आफ्रिकेत हृदयविकारासाठी इस्पितळात भरती होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हृन्निष्फलता. हृदयाचे रक्ताभिसारणाचे कार्य कमी पडणे, म्हणजे हृन्निष्फलतेची कारणे अनेकविध असतात – अनेक भिन्न रोगप्रक्रियांची अंतस्थिती हृन्निष्फलता असते. परंतु श्रीमंत देशांत आणि विकसनशील देशांत हृन्निष्फलतेच्या कारणांची क्रमवारी वेगवेगळी असते. श्रीमंत देशांत हृदय-धमनी-रोगाचा विकोप बहुतेक करून हृन्निष्फलतेला कारणीभूत होतो, मात्र सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत अती रक्तदाबामुळे होणारा हृद्रोग आणि संधिवात-हृद्रोग ही कारणे प्राथमिक आहेत. अती रक्तदाबामुळे होणारा हृद्रोग हा आजही प्रथम कारण राहिला असला, तरी आता ऑक्सिजनचा तुटवडा करणारे हृद्रोग संधिवात-हृद्रोगाच्या पुढे गेले आहेत (आकृती ३ बघावी). ऑक्सिजनचा तुटवडा करणाऱ्या हृद्रोगांचे निदान पूर्वी नीट होत नसेल, ही आकडेवारीतली त्रुटी असण्याची शक्यता लक्षात ठेवायला पाहिजे. जगातल्या अन्य भागांपेक्षा हृन्निष्फलतेची संसर्गजन्य कारणे, उदा. क्षयरोग, ही अजून आफ्रिकेत लक्ष देण्याइतपत आढळतात. जगात अन्यत्र असतात, त्यापेक्षा आफ्रिकेत हृन्निष्फलतेचे रुग्ण कमी वयस्कर असतात, तरी इस्पितळात येईस्तोवर सरासरी रुग्णाचा रोग जगात अन्यत्र असतो त्यापेक्षा विकोपाला गेलेला असतो.

हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे होणारे मृत्यु
आकृती ३ - आफ्रिकेत हृन्निष्फलतेच्या कारणांचा कालक्रम; दोन वेगळ्या काळांतली, आणि एक दीर्घकालीन सरासरी अभ्यासप्रकल्पातली आकडेवारी.

धमनीविलेपनामुळे (atherosclerosis) होणारे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग : सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत १९९० ते २०१७ काळात धमनीविलेपनामुळे होणाऱ्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे समाजावरचे ओझे, म्हणजे पंगुत्वाचा हिशोब करत वाया गेलेली आयुष्याची वर्षे मोजलेले ओझे, १५४% वाढले आहे, असे गणित जागतिक रोग ओझे (Global Burden of Disease) संघटनेने केले आहे. आकडेवारीच्या कमतरतेमुळे हा आकडा मोघम असू शकेल, ही शक्यता लक्षात ठेवायला हवी.

- हृदय-धमनी-रोग : हे गेल्या तीस वर्षांत खूप वाढले आहेत. जगत अन्यत्र असतात, त्यापेक्षा आफ्रिकेतले रुग्ण कमी वयस्कर असतात. निदान होण्यात उशीर होणे, औषधांचा वा उपचारांचा तुटवडा किंवा ते न परवडणे, यामुळे रोग झाल्यावर मृत्यूंचे प्रमाण अधिक असते.

- लकवा : जगात लकव्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण गेली वीस वर्षे घटत आहे, पण ही घट आफ्रिकेत दिसत नाही. वरीलप्रमाणेच रुग्ण कमी वयस्कर असूनही निदान होण्यात उशीर होणे, औषधांचा वा उपचारांचा तुटवडा किंवा ते न परवडणे, यामुळे रोग झाल्यावर मृत्यूंचे प्रमाण अधिक असते.

एचआयव्ही आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग : सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत एचआयव्ही/एड्स रोगाचे ओझे जगात सर्वाधिक आहे. परंतु गेल्या काही दशकांत एचआयव्ही रोगाचा उपचार खूप सुधारला आहे, अकालमृत्यू कमी झाले आहेत. जुनाट झालेला एचआयव्ही रोग हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढवतो. म्हणून आता एचआयव्ही तसेच हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे नियंत्रण एकत्र सुसूत्र करण्याची आवश्यकता आहे.

हृदयाचे स्नायू दुर्बल होण्याचे रोग (cardiomyopathies) : आफ्रिकेत हृन्निष्फलतेचे हे एक ज्ञात कारण आहे, परंतु याबाबत संशोधन आणि आकडेवारीची अधिकाधिक आवश्यकता आहे.

संधिवात-ज्वर आणि हृद्रोग : हा संसर्गजन्य रोग क्रमवारीत खाली जात असला, तरी अजूनही महत्त्वाचा आहे.

हृदयाच्या विकृत लयीचे रोग (arrhythmia) : सहाराच्या दक्षिणेच्या आफ्रिकेत यांचा प्रादुर्भाव कमी दिसतो, तो आकडेवारीच्या कमतरतेमुळे आहे, असे अभ्यासातून दिसते.

आफ्रिकेतील विशेष हृद्रोग, हृदयांतर्गत व्रणरोग : हा रोग जगात अन्यत्र नगण्य प्रमाणात आढळतो, त्यामुळे आफ्रिकेतल्या या विशेष हृद्रोगावर फारच कमी संशोधन झालेले आहे. अनेक वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगांचा विकोप हे याचे कारण असू शकते. आफ्रिकेच्या आर्थिक प्रगतीमुळे हा रोग कमी होऊ लागला आहे.

गरोदरपणा आणि हृद्रोग : हृद्रोगाचा आधीच प्रादुर्भाव असल्यास गरोदरपणा आल्यास माता-बालक दोघांच्या जीवाला धोका असतो. आफ्रिकेत गरोदरपणाच्या आरोग्यसेवा आणि हृदयाच्या आरोग्यसेवांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.

जन्मजात हृद्रोग (congenital heart disease) : आफ्रिकेत जन्मजात हृद्रोगांचा प्रादुर्भाव जगात अन्यत्र असतो, त्यापेक्षा कमी आहे. हे आकडेवारी उपलब्ध नसण्यामुळे असायची शक्यता आहे. ज्या बालकांना जन्मजात हृद्रोग असतो, त्यांच्यात प्रगत उपचारांच्या अभावामुळे मृत्यूंचे प्रमाण फार असते.

आफ्रिकेची २०३०पर्यंत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे नियंत्रण करायची संभवनीय प्रगती

सन २०१५मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने उद्दिष्ट ठरवले की २०३०पर्यंत हृदय-नसांच्या रोगांमुळे होणाऱ्या अकालमृत्यूंची संख्या ३३%ने घटवावी. आफ्रिकेतल्या देशांतली सध्याची धोरणे चालू राहिली तर या उद्दिष्टाच्या दिशेने कितपत वाटचाल होईल? याबाबत क्षेत्रनिहाय आणि देशनिहाय अंदाज आकृती ४मध्ये बघावा. बहुतेक देशांमध्ये मृत्यूंचे प्रमाण घटवण्यात प्रगती होईल, पण उद्दिष्टाच्या मानाने पुरेशी होणार नाही. काबो वेर्दि आणि एरिट्रिया या देशांत दर घटण्याऐवजी काहीसा वाढेल. कोमोरोस आणि विषुववृत्तीय गिने या देशांत फारसा बदल होणार नाही. उद्दिष्टाशी सुसंगत प्रगती केवळ दक्षिण आफ्रिका आणि आल्जेरिया या देशांची होईल.

तर आफ्रिका खंडात उद्दिष्ट साधण्याकरीता काय त्रुटी वा अडथळे आहेत, आणि कुठली धोरणे प्राथमिकतेने राबवावी, हे विचार करण्यालायक आहे.

हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळे होणारे मृत्यु
आकृती ४: यथास्थित धोरणांनी २०१५ ते २०३० काळात ३०-७० वयोमानाच्या लोकांत हृद्रोगापासून होणाऱ्या अकालमृत्यूंच्या प्रमाणांतले बदल. आफ्रिकेतील ५ क्षेत्रे आणि देशनिहाय अंदाज

आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याकरिता त्रुटी

*. संशोधनाची आणि उच्च दर्जाची आकडेवारी जमवणाऱ्या यंत्रणेची उणीव आहे. धोरणे योजण्यासाठी आणि योजलेल्या धोरणांचे परीक्षण करण्यासाठी ही आवश्यक असते.
*. लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची संख्या कमी आहे, आणि विशेषज्ञ-तज्ज्ञांबाबत ही उणीव फारच अधिक आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचा अपुरा दर्जा आणि डॉक्टरांचे परदेशगमन याबाबत कारणीभूत आहेत.
*. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांकरिता आरोग्यसेवा सामान्य आवाक्यात नाहीत, त्याची काही करणे येणेप्रमाणे
- बहुतेक देशांच्या अर्थसंकल्पांत अपुरी तरतूद
- सार्वत्रिक आरोग्यविम्याचा अभाव
- हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग टाळण्याकरिता आणि रोगाच्या उपचाराकरिता दीर्घकाळसाठी लागणारी औषधे परवडण्यासारखी नसणे.
- हृदय आणि रक्तवाहिन्यांचे चित्रण आणि शस्त्रक्रियेच्या सोयी अपुऱ्या असणे.
*. शिक्षणाची, विशेषकरून आरोग्यविषयक ज्ञानाची पातळी कमी असणे. यामुळे रोग फार विकोपाला गेल्यावर रुग्ण उपचारासाठी जातात.
*. सरकारे किफायतशीर सामाजिक स्वास्थ्याची धोरणे राबवण्यात कमी पडतात.

प्रगतीकरिता कळीची प्रमुख धोरणे

*. रोगप्रतिबंधाची किफायतशीर धोरणे राबवावीत, त्यात तंबाखूवर नियंत्रण, साखरेवर आणि प्रक्रिया केलेल्या तयार पदार्थांवर कर, यांसारखी धोरणे आहेत. याकरिता देशांतर्गत तज्ज्ञांकडून पुढाकार हवा.
*. अती रक्तदाबाचा प्रतिबंध करण्याची धोरणे राबवावीत, जनसामान्यांत चाचणी मोजमाप करून रुग्ण लवकर ओळखावेत, त्यांचा उपचार व्हावा.
*. आरोग्याबाबत उच्च दर्जाची आकडेवारी जमवणाऱ्या यंत्रणा स्थापाव्यात, ती आकडेवारी प्रसिद्ध व्हावी.
*. वैद्यकीय आणि आरोग्यविषयक प्रशिक्षणाच्या सोयी वाढवाव्यात.
*. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याकरिता आणि उपचाराकरिता सोयी सहजप्राप्य कराव्यात :
- सार्वत्रिक आरोग्यविम्याची सोय, अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद असावी.
- प्राथमिक प्रतिबंध, आरोग्यविषयक सल्ला, वगैरे, कामे सहायक संस्थांकडे द्यावीत, आवश्यकता भासल्यास आरोग्य विशेषज्ञ-तज्ज्ञांशी संपर्क साधायचे मार्ग असावेत.
- हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याकरिता आणि उपचाराकरिता उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी.
- वैद्यकीय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षणाची संधी हवी, आणि मायदेशात राहाण्याकरिता आर्थिक वा अन्य प्रोत्साहन असावे.

तळटिपा :

. लकव्याला इंग्लिशमध्ये stroke म्हणतात. यात मुख्यतः दोन (किंवा तीन) प्रकारचे रक्तवाहिन्या-संबंधित विकार येतात – रक्तस्राव, रक्ताची गुठळी तयार होणे, किंवा इतरत्र तयार झालेली रक्ताची गुठळी मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकणे. गुठळी तयार झाल्यास मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होतो.

2. हृनिष्फलतेला इंग्लिशमध्ये heart failure म्हणतात. या परिस्थितीत हृदयाचे स्नायू रक्त अभिसरणाकरिता ढकलण्यात पुरेसे कार्यक्षम नसतात. यामुळे रक्त जिथून हृदयाकडे येत असते, तिथे साचते - फुप्फुसात साचले, तर श्वासोच्छ्वास कठिण होतो, दम लागतो. उर्वरित शरीरात रक्त साचले, तर यकृत, पाय, वगैरे, अवयव सुजतात. शिवाय हृदय ज्या ठिकाणी रक्त पोचवत असते, तिथे जरूरीइतका प्राणवायू पोचत नाही. व्यायाम, किंवा रोजव्यवहारातील कामे करण्यासाठीही बळ कमी पडू शकते. हृदयाच्या अनेक वेगवेगळ्या रोगांची अंतिम स्थिती हृनिष्फलता असते. कार्यक्षम हृदय कोणत्या का कारणाने निष्फल होण्याची प्रक्रिया क्वचित काही दिवसांत घडू शकते, तरी सामान्यतः अनेक वर्षांत विकोपाला जाते, तडकाफडकी होत नाही.

3 . हृदयविकाराच्या झटक्याला इंग्लिशमध्ये heart attack म्हणतात. यात हृदयाच्या काही भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक कमी होतो. कमी रक्तपुरवठा झालेला भाग अशक्त होऊन रक्त पंप करण्याचं काम कमी करतो; मात्र सर्वसाधारणपणे हे त्यानंतर होणाऱ्या मृत्युचं कारण नसतं. हृदयाचे सर्व भाग एकतानतेनं (synchronous) काम करण्यासाठी ज्या विद्युतलहरी हृदयातून पसरतात, त्या लहरी ह्या इजा झालेल्या भागातून संक्रमण करत नाहीत, पलीकडच्या इजा न झालेल्या भागांतही फुटीररीत्या पसरतात – असे नेहमीच नव्हे तरी पुष्कळदा होते. ज्या रुग्णांच्या विद्युतलहरी फुटीर होत नाहीत, त्यांचे हृदय पुरेसे कार्य करते, जीव शाबूत राहतो, पण दीर्घ पल्ल्याचा हृदयरोग त्रास देऊ शकतो. मात्र विद्युतलहरी फुटीर झाल्या, तर हृदयाच्या वेगवेगळ्या भागांची एकतानता जाते आणि वेगवेगळे भाग, म्हणजे रक्तपुरवठा शाबूत असलेले भागही, आपापल्या बेताल पद्धतीने धडधडतात. हृदय एकसंध पिळणारा पंप राहत नाही, स्नायूंचा एकेक धागा वेगवेगळा वळवळतोच म्हणावे, रक्ताभिसरण ठप्प होते. शरीराच्या भागांना आणि मेंदूला रक्त मिळत नाही, आणि रुग्ण तडकाफडकी, काही मिनिटांत मरू शकतो. मेंदूला सतत रक्तपुरवठा असावाच लागतो. म्हणून छातीवर दर काही सेकंदांनी दाब देण्याचा फायदा होतो. बाहेरून मोठा विद्युतधक्का देऊनही हृदय पूर्ववत सुरू झाले नाही तरीही मेंदूला रक्त मिळत राहते. विद्युतधक्का देणारे डिफिब्रिलेटर यंत्र वापरून रुग्णांना मदत मिळेस्तोवर ते जिवंत राहू शकतात.

दक्षिण आफ्रिकी जॅझ : अन्यायाची रूपांतरं

मूळ लेखक - सुरेन पिल्ले

- अनुवाद -सई केसकर

येत्या शनिवार-रविवारी केप टाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय जॅझ महोत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्तानं, 'जॅझ' या संगीत प्रकारचं या देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासात काय स्थान आहे याकडे मागे वळून बघावंसं वाटलं. या देशात, जॅझ फक्त जॅझ नाही; या संगीताला अनेक आयाम आहेत. 'केप फ्लॅट्स'वर राहणाऱ्या कुटुंबांच्या अनेक पिढ्यांच्या रोजच्या आयुष्यात 'जॅझ नृत्य' हा नृत्यप्रकार अजूनही टिकून आहे. लॅटिन अमेरिकी लोकांसाठी जसा 'साल्सा' आहे, तशीच 'जॅझिंग'ची परंपरा केप फ्लॅट्सवरच्या समुदायांमध्ये आहे. १९५० नंतर दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदासाठी म्हणून भौगोलिक सीमारेषा कायदेशीररीत्या आखल्या गेल्या. याला इंग्रजीत 'अपारटाइड' (apartheid) असा शब्द वापरला जातो. या फाळणीनंतर केप टाऊनमधल्या कृष्णवर्णीय वसाहतींना स्थानिक भाषेत 'केप फ्लॅट्स' असं संबोधलं जाऊ लागलं. डोंगरदऱ्यांचे, आणि केप द्वीपकल्पाजवळचे निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचे भाग गोऱ्या युरोपीय वंशांच्या लोकांसाठी राखून ठेवले गेले. तिथून कृष्णवर्णीयांना हुसकावून लावलं. 'केप फ्लॅट्स'मधल्या भागांचीही 'मिश्रवर्णीय', 'आफ्रिकी कृष्णवर्णीय' आणि 'भारतीय वंशा'च्या लोकांमध्ये विभागणी झाली. या अशा करकचून आवळलेल्या भेदभावातून मुक्तपणे वाहू शकणारी एकच सांस्कृतिक परंपरा होती: 'केप जॅझ' किंवा 'दक्षिण आफ्रिकी जॅझ' संगीत. मी 'परंपरा' हा शब्द विशेष जागरूकतेनं वापरला आहे. परंपरा म्हणजे आधुनिकतेच्या आधीचं काही, असा रूढ अर्थ घेतला जातो. पण इथे परंपरेचा प्रवाहीपणा मला अधोरेखित करायचा आहे. एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे जाणारी म्हणून ती परंपरा आहे. पण असं हस्तांतरण होत असताना, मोडली जाणारी आणि पुन्हा नव्यानं जन्म घेणारीही आहे!

दक्षिण आफ्रिकेत मात्र, 'ही दक्षिण आफ्रिकी परंपरा' अशा एकाच कुठल्यातरी परंपरेचं उदाहरण देणं अवघड आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही असतीलही, पण जो समाज लोकांना एकमेकांपासून प्रयत्नपूर्वक विभागलेले ठेवून तयार झाला आहे, त्या समाजातल्या परंपरादेखील विखंडित, विभक्तपणे पुढे जाणाऱ्या आहेत. जिथे वेगवेगळ्या वंशांच्या लोकांचं जगणं, त्यांची कला, त्यांचे प्रेमसंबंध, त्यांचे खेळ, इतकंच नव्हे तर त्यांचे विचारही वेगळे ठेवण्याची सक्ती होती; तिथे एकसंध अशी सामायिक परंपरा रुजणं अवघडच. अशा वातावरणात, लोकांना या सीमा ओलांडायला लावणारा असा एक सांस्कृतिक वारसा जॅझ संगीतामुळे मिळाला.

विसाव्या शतकात, गोऱ्या भांडवलदारांनी आफ्रिकी लोकांचं आफ्रिकेतल्या इतर देशांतून दक्षिण आफ्रिकेत सक्तीनं स्थलांतर घडवून आणलं. अशा स्थलांतरामुळे आलेलं तुटलेपण घेऊनच लोक या शहरी वस्त्यांमध्ये राहू लागले. त्यांच्या मूळ देशांपेक्षा अधिक शहरी, अनेक वंशांच्या लोकांची सरमिसळ असलेला हा देश होता. इथे रुजल्यावर, त्यांच्या मायदेशांतल्या परंपरांचंही शहरीकरण झालं; त्या बदलल्या, पुन्हा जन्माला आल्या आणि त्यांना नवीन आयाम मिळाले. 'मराबी'सारखं नवीन जॅझ उदयाला येऊ लागलं. मराबीची प्रेरणा अमेरिकेतल्या आफ्रिकी जॅझमधून, स्विंग आणि बीबॉपमधून आली होती असं त्या काळातले संगीतकार सांगतात. सुरुवातीला जे बँड मराबी संगीत वाजवायचे ते सगळेच अमेरिकी जॅझचं अनुकरण करत असायचे. अमेरिकी संगीताच्या किती जवळ जाणारं आहे हा त्या बँडच्या यशस्वी असण्याचा निकष असायचा. नुसतं संगीतच नाही, तर बँडच्या सदस्यांच्या वेशभूषादेखील अमेरिकी असायच्या. त्याचबरोबर हे बँड 'मॅनहॅटन ब्रदर्स' (Manhattan Brothers), 'जॅझ एपिसल्स' (Jazz Epistles) अशी अमेरिकी वाटणारी नावंही घ्यायचे. सुरुवातीला जरी हे संगीत नक्कल करून जन्माला आलं असलं, तरी कालांतरानं या संगीतावर एक आफ्रिकी प्रभाव पडला. ह्यू मॅसकेलं (Hugh Masekela) अशी एक सुंदर आठवण सांगतो. मरियम मकेबा आणि हॅरी बेलाफॉन्टे यांच्या प्रयत्नांनी ह्यूला न्यूयॉर्कमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. अमेरिकी जॅझ संगीताचं मानक असलेलं 'अमेरिकन साँग बुक' त्यानं लगेच आत्मसात केलं (https://en.wikipedia.org/wiki/Great_American_Songbook). पण देश सोडल्यानंतर आलेल्या निर्वासितपणात, अमेरिकी किंवा युरोपीय जॅझ संगीत वाजवणाऱ्या असंख्य संगीतकारांमध्ये दिसेनासं होण्याची शक्यता त्याला स्पष्ट दिसू लागली. आपल्याला, आपली ओळख टिकून राहील असं काही वेगळं या संगीतात आणायला हवं या जाणिवेतून 'मराबी' संगीतात असलेले आफ्रिकी घटक त्यानं खुलवले. यामुळे जॅझला आलेलं सरसकटपणही काहीसं कमी झालं.

निर्वासित असण्याच्या या दुःखातून अनपेक्षितपणे निपजलेली एक चांगली गोष्ट अशी की या तुटलेल्या भूतकाळातून भविष्याकडे घेऊन जाणारा आधुनिक 'दक्षिण आफ्रिके'चा सूर जॅझमध्ये सापडतो. १९८०च्या दशकात देशात आणीबाणी लागलेली असताना, काही संगीत क्लबांत सगळे वर्ण निर्भीडपणे एकत्र येत असत आणि जॅझ ऐकत असत. जॅझ संगीताच्या नावाखाली या क्लबांतून अपारटाइडविरोधी कारवाया चालायच्या. राजकीय भेटीगाठींवर बंदी असतानाच्या या दिवसांत अनेक जॅझ संगीतकार अशा भेटींसाठी आनंदानं त्यांच्या संगीताचं निमित्त पुरवायचे.

बॅझल कोत्झी (Basil Coetzee) आणि रॉबी जॅनसेनसारखे (Robbie Jansen) संगीतकार केप टाऊनमध्ये अशा क्लबांतून त्यांचं संगीत पेश करायचे. या दोघांनी मायदेशातच राहायचा निर्णय घेतला. दोघेही जॅझ 'जिनियस' समजल्या जाणाऱ्या अब्दुल्ला इब्राहिममुळे देशात आणि देशाबाहेरही प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दोघेही अब्दुल्लांकडे, वेगवेगळ्या काळांत, सॅक्सोफोन वाजवायचे. पैकी, बॅझलला लोक बॅझल 'मॅनेनबर्ग' कोत्झी या टोपणनावानं ओळखू लागले. याचं कारण, मॅनेनबर्ग असं शीर्षक असलेल्या अल्बममध्ये, त्याच नावाच्या अब्दुल्लांच्या रचनेत त्यानं सॅक्सोफोनवर एक अप्रतिम तुकडा वाजवला होता. मॅनेनबर्ग ही केप फ्लॅट्सवरची एक कामगार वस्ती. अपारटाइड लागू होण्याआधी डिस्ट्रिक्ट सिक्स यासारख्या भागांमध्ये सगळ्या वर्णांचे लोक राहत असत. 'डिस्ट्रिक्ट सिक्स' हे श्वेतवर्णीयांसाठी राखीव केल्यानंतर तिकडचे इतर वर्णांचे बरेच लोक मॅनेनबर्गमध्ये येऊन वसले.

बॅझिल मॅननबर्ग
बॅझल 'मॅनेनबर्ग' कोत्झी सादरीकरणादरम्यान, छायाचित्र : सुरेन पिल्ले

कोत्झी आणि जॅनसेन दोघेही प्रतिभावंत कलाकार होते पण देश सोडून न जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या नशिबी अनेक आर्थिक चढ-उतार आले. कोत्झी अनेक वर्षं जोडे दुरुस्त करायचं काम करत असे. कृष्णवर्णीय जॅझ संगीतकारांसाठी दक्षिण आफ्रिकेत राहणं ही एक मोठीच आर्थिक जोखीम होती. श्वेतवर्णीय संगीतकारांना जशी रेडिओवर, क्लबांमधून संधी मिळायची आणि अधिकृत मान्यता असायची, तशी त्या काळात कृष्णवर्णीय संगीतकारांना कधीच मिळाली नाही. त्यांचा उदरनिर्वाह चालेल इतकीही मिळकत संगीतातून व्हायची नाही. ते कसेतरी तग धरून राहिले असले, तरी त्यांचं आयुष्य एक तारेवरची अखंड कसरतच होती.

आता कोत्झी आणि जॅनसेन हयात नाहीत. त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास चिवट जगण्यानं आणि अशा जगण्यातल्या लहानसहान आनंदाच्या क्षणांनी सुसह्य केला असावा. अब्दुल्ला इब्राहिम यांनी १९७० च्या दशकात सुफ़ी इस्लाम स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. योगासनं आणि मार्शल आर्ट्सचा सराव करता करता, त्यातलं काही त्यांच्या संगीतातही उतरलं. आपल्याच देशात हद्दपार होण्याचं दुःख ते शिस्तबद्ध आयुष्य जगून सोसू शकले. हातातला वेळ आणि संगीताचा ध्वनी - दोन्ही एका लयीत ते बसवू शकले. केप फ्लॅट्सवर राहणाऱ्या लोकांबद्दल एक सरसकटीकरण केलं जातं: ते भरभर बोलतात; अशा घाईत बोलतात की समोरच्या कुणी त्यांचं वाक्य तोडायच्या आत ते संपवलं पाहिजे असा त्यांनी चंग बांधलेला असावा. जलदही बोलतात आणि मोठ्या आवाजातही. इब्राहिम मात्र याला अपवाद आहेत. हळुवार, विचारी आणि शांत. ते कधीच जाहीर बोलत नाहीत. प्रचार करत नाहीत किंवा आपली मतं कर्कश्यपणे व्यक्त करत नाहीत. त्यांच्या भोवती एक गूढतेचं वलय आहे. कुणालाही न समजणारे, आणि त्यांच्या साधेपणामुळे एखाद्या कोड्यासारखे भासणारे!

अब्दुल्ला इब्राहिम
अब्दुल्ला इब्राहिम (केप टाऊन, १९९८) छायाचित्र : सुरेन पिल्ले

म्हणूनच त्यांचा मी घेतलेला एक फोटो इथे दिला आहे. मागच्या प्रकाशामुळे काहीसा धूसर भासणारा, पण ओळखीचा, ओळखू येणारा. समोर असूनही काहीसे दुर्बोध, काहीसे अलिप्त – त्यांच्याबरोबर कधीच एकरूप होता येणार नाही असं वाटायला लावणारे. त्यांच्या मनात काय चालू असेल आणि ते त्यांच्या बोटांतून पियानोवर कसं उतरेल, हे सांगता येत नाही. जलश्यांत, मैफिलींतून गाताना ते आल्या आल्या सगळ्यांना सलाम करतात, एखादा तास अविश्रांत वाजवतात आणि सलाम करून निघून जातात.

त्यांच्या हातात वेळ बांधून ठेवण्याचीही कला आहे, त्यांच्या संगीतातले विरामही सुरांइतकेच योजून वापरलेले असतात. योगसाधनेमुळे श्वासावर ताबा आलेला आहे. जॅझ संगीत कधीकधी गोंगाटाकडे झुकणारं असतं. हे सगळं कुठे चाललं आहे असं वाटेपर्यंत एकदम जुळून येणारं अशी त्याची रचना असते. या रचनेतूनच जॅझ संगीतकार उत्स्फूर्ततेचा (आ?)भास निर्माण करतात. पण या सगळ्या प्रांतांत सारख्या भासणाऱ्या रचनांचं स्थळ-काळाची आठवण करून देणारं नातं असतं. नावं नेहमीच कशाचीतरी आठवण करून देणारी असतात. मध्येच गुलामगिरीतून मुक्त झालेल्या मलय वंशाच्या लोकांचे गोमा ड्रम कानावर पडतात. पण अब्दुल्लांच्या संगीतात गोमा ड्रमचा आवाजही हलका असतो, तरल असतो आणि त्याच्या आदिम, सोप्या स्वरूपात ऐकू येतो. अशा रचनांतून ते परिचित आणि अपरिचित एकमेकांत गुंफत जातात आणि आपणही आपल्याला जे माहिती आहे त्यात अडकत जातो, आणि जे माहीत नाहीत त्याबद्दल आपलं कुतूहल जागृत होतं.

या तिघांबद्दलच लिहून थांबलो, तर हे संगीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसं उलगडत, उमलत गेलं हे सांगायचं राहून जाईल. अब्दुल्ला, कोत्झी आणि जॅनसेन हे या परंपरेतले बुजुर्ग. पुढच्या पिढ्यांच्या जॅझला या तिघांचा वारसा नक्कीच आहे. तरीही, प्रत्येक पिढीनं त्यात त्यांची अशी काही भरही घातली आहे. सध्याच्या पिढीतले काही संगीतकार बघितले, उदाहरणार्थ एन्डुतो माकातिनी (Nduduzo Makhatini), बोकानी डायर (Bokani Dyer), काइल शेपर्ड (Kyle Shepherd), आफ्रिका एमकीझे (Afrika Mkhize) यांसारख्या कलाकारांचं जॅझ ऐकलं की अब्दुल्ला इब्राहिम – हिल्टन शिल्डर (Hilton Schilder) – तैवा मोलेलेक्वा (Taiwa Molelekwa) ते झिम इंग्कावाना (Zim Ngqawana) या सगळ्या प्रतिभावंत कलाकारांचा प्रवास ऐकू येतो. यात पुढे जर बेस (गिटार), ट्रम्बोन, सॅक्सोफोन, ट्रम्पेट वाजवणाऱ्या कलाकारांची नावं घ्यायला सुरुवात केली तर ती यादी कधी संपणारच नाही. पण आताची पिढी परंपरेला पुनरावृत्तीत अडकवून न ठेवता, तिच्याकडे एखाद्या कोऱ्या कॅनव्हाससारखं बघू शकते, ज्या कॅनव्हासवर आधीच्या पिढीकडून मिळालेलं सगळं आत्मसात करून काही नवीन निर्माण होऊ शकेल. ही पिढी दक्षिण आफ्रिकेतल्या स्थानिक ध्वनींना वैश्विक आवाज देते आहे.

ज्या सामाजिक परिस्थितीतून हे संगीत जन्माला आलं तिचा विचार केला तर कदाचित हे वर्णन अतिरम्य वाटेल. पण एखाद्या जॅझ-जलश्याच्या गर्दीत शिरल्यावर, अन्यायातून, अंधारातूनही काहीतरी सुरेल, स्वप्नील जन्माला येऊ शकतं यावर विश्वास बसतो. अपारटाइड काळातला अन्याय आणि अपारटाइड संपल्यानंतरच्या दिशाहीनतेमधला जॅझ हा लहानसा कवडसा आहे. परंपरेतही नवीन काहीतरी जन्माला घालण्याची ताकद असते या एका शक्यतेतूनच अशा रम्य, भाबड्या आशावादाचा जन्म होतो.

Kyle Shepherd Trio "Coline's Rose" [Jazz Audio - South Africa]

"आय लव्ह यू जोबुर्ग"

- - विजुभाऊ

दक्षिण अफ्रिकेला जाईन असे कधी काळी वाटलेही नव्हते. ऑफिसने जेव्हा दक्षिण अफ्रिकेला जायचे, असे सांगितले तेव्हा सर्वप्रथम घरातल्यांची प्रतिक्रिया होती की, तुला दुसरा कोणता देश नाही मिळाला का?

दक्षिण अफ्रिकेबद्दलचे माझे ज्ञान नेल्सन मंडेला, क्लाईव्ह राईस, जाँटी ऱ्होड्स आणि डरबनला महात्मा गांधींना रेल्वेतून उतरवले इतकेच होते. आणि अज्ञान मात्र अफाट होते. तेथे सगळी काळी माणसे आहेत इथपासून तेथे कायम दुष्काळ असतो, लुटालूट होते वगैरे वगैरेपर्यंत.

इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा तिथे यापेक्षाही बरेच काही आहे हे समजले. पण तरीही ते प्रत्यक्ष अनुभवायचे बाकी होते.

विमानात बसल्यापासून मनात एक धाकधूक तेथल्या लूटमारीबद्दल होतीच. ऐकीव कथांवर किती विश्वास ठेवायचा या प्रश्न असतोच. पण अविश्वास किती दाखवायचा हाही असतो.

एक ऐकीव कथा म्हणजे कोणी एक सॉफ्टवेअर इंजिनीयर जोहानसबर्गमध्ये आठवड्यासाठी आला होता. त्याला त्याच्या कंपनीने कॅब ड्रायव्हर देऊ केला. ड्रायवर सतत त्याच्या सोबत असायचा. इतका की तो त्याच्या विश्वासू बनला. हा माणूस त्याच्या समोर एटीएम मधून पैसे काढायचा, पाकिटात ठेवायचा. जाण्याच्या एक दिवस अगोदर या सॉफ्टवेअरवाल्याने कॅब ड्रायव्हरला कुठेतरी न्यायला सांगितले. त्याने तसे नेलेही. येताना मात्र कॅब ड्रायव्हर एकटाच आला त्या ड्रायव्हरने म्हणे त्या सॉफ्टवेअरवाल्याला लुटला त्याचे पैसे, क्रेडीट कार्ड काढून घेतले आणि त्याला मारून टाकले.

जायच्या अगोदर कंपनीच्या एचआरचे एक इमेल आले, त्यात काय करा / काय टाळा याच्या सूचना. त्यात प्रामुख्याने एकटे फिरू नका, संध्याकाळी सातनंतर बाहेर फिरू नका, एटीएममधून पैसे काढताना सोबत कोणालाही ठेवू नका, सर्वांसमोर पैसे मोजू नका, इत्यादी, इत्यादी.

त्यामुळे भीती कमी व्हायच्या ऐवजी त्यात भरच पडली.

जोहानसबर्गच्या विमानतळावर पाऊल ठेवले. बाहेर आल्यावर रिसेप्शनवर माझ्या नावाचा बोर्ड पाहिल्यावर जिवात जीव आला. पण या गडबडीत येताना एअरपोर्टवर एटीएममधून दक्षिण अफ्रिकन रँड काढायचे विसरलो. (दक्षिण आफ्रिकेतले चलन रँड हेसुद्धा अगोदर माहीत नव्हते.) त्यामुळे एटीएम शोधायचे की कसे हा विचार करत बसलो. आपल्याला घ्यायला आलेला कॅब ड्रायव्हर कसा असेल याची चिंता लागली होती. शेवटी धीर करून त्याला एटीएम शोधायला सांगितले. पैसे काढताना तो माझ्या मागेच उभा होता. गडबडीत एटीम कार्ड उलटे घातले. ते त्यानेच मला सांगितले. त्यामुळे अगोदरच्या भीतीत भरच पडली. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण खरी आहे हे अनुभवत होतो.

कंपनीने दिलेल्या गेस्ट हाऊसमधे उतरलो, कॅब ड्रायव्हरला ठरलेले पैसे दिले. आणि रूमचे दार घट्ट लावून घेतले.

मे महिना असूनही भरपूर थंडी होती. दक्षिण अफ्रिका हे दक्षिण गोलार्धात असल्यामुळे तिथे आपल्यापेक्षा ऋतू उलटे असतात. म्हणजे आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा तिकडे हिवाळा असतो. मुंबईतून मे महिन्याच्या उकाड्यातून गेलो होतो. तिथली मे महिन्याची थंडी अनुभवत होतो.

जोहानसबर्ग एक सुंदर शहर आहे. हे जगातले सर्वांत मोठे मानवनिर्मित जंगल आहे हे अनुभवत होतो.

गेस्ट हाऊसमधे रिसेप्शनला महिन्याचे भाडे भरताना पैसे रोख रकमेत दिले. तेथल्या मॅनेजरने, ब्युआलाने ते माझ्यासमोर मोजून घेतले. ऑफिसला गेल्यावर पाकिटात उरलेल्या रकमेचा आणि दिलेल्या रकमेचा मेळ बसेना. आपण देताना जास्त पैसे दिले इतकेच काय ते लक्षात आले. गेस्ट हाऊसला फोन केल्यावर मॅनेजर मला म्हणाली की तुझ्या समोरच मोजले की मी. मी तरीही विनंती केली की पुन्हा मोजून पाहा. त्यावर ती म्हणाली की, मी कॅश घेऊन माणसाला बँकेत भरायला पाठवले आहे. तो सांगेल मला आल्यानंतर. इथे आल्या-आल्या आपल्याच धांदरटपणामुळे हजार रँडचा फटका पडला असे मनोमन कबूल करून टाकले.

संध्याकाळी आलो तेव्हा ब्युआला तेथे नव्हती. त्यामुळे काही विचारता आले नाही. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर कॉफी पीत होतो, ब्युआलाने मला पाहिले, ती माझ्या समोर आली आणि शंभरशंभर रँडच्या दहा नोटा समोर करत म्हणाली, "हे घे तुझे हजार रँड्स. आणि पुढच्या वेळेस मोजताना नीट मोजून देत जा. बँकेत गेल्यावर हजार रँड्स जास्त रक्कम होती, ती माझ्या माणसाने परत केली. तू फोन केला होतास ते बरे झाले, नाही तर मला काल ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्या सगळ्यांना विचारावे लागले असते."

आपण हे सांगतो आहोत यात काही वेगळे आहे हे तिच्या गावीही नव्हते.

दक्षिण आफ्रिकेत फिरताना अगोदर मी एकट्याने मॅकडोनल्ड्समधेही, न जाणो आपल्याला कोणी लुबाडले तर काय घ्या, या विचाराने भीत भीत जायचो. पण नंतर नंतर तेथे जाऊन लोकांशी बोलल्यावर ही भीती नाहीशी झाली. आपण उगाचच घाबरतो हे जाणवले.

जोहानबर्ग स्थानिक बाजार

जोहानसबर्ग शहर स्थानिकांसाठी 'जोबुर्ग' आहे. त्यांच्या मते हे शहर सगल्या आफ्रिका खंडातले सर्वांत सुंदर शहर आहे. इतरांसाठी न्यूयॉर्कच्या तोडीचे आहे त्यामुळे इथे शेजारपाजारच्या बऱ्याच देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही पुष्कळ आहे.

वर्णद्वेषी जुलमी राजवट राजकीयदृष्ट्या जरी संपलेली असली तरी ती अजूनही तितकीशी लोकांच्या मनातून पूर्ण पुसली गेलेली नाही.

इथे एका मित्राला पबमधे जायचे होते. तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. अफ्रिकन ब्लॅक लोकांच्या पबमधे एकही गोरा आढळणार नाही. गोऱ्या लोकांचे पब वेगळे आहेत आणि आशियाई लोकांचे पब वेगळे असतात. अर्थात कोणत्याही ठिकाणी जायला कायद्याने बंदी नाही, पण लोकांच्या मनात या भिंती आहेत.

इथल्या वर्णद्वेषी राजवटीचे जुलमी रंग माहीत करून घ्यायचे असतील तर थोडे आणखी फिरावे लागते. इथे भारतीय भाषांमध्ये चालवले जाणारे एक रेडिओ स्टेशन आहे. यावर पंजाबी, हिंदी आणि गुजराथी भाषेत चालवले जाते. एकदा दिवाळीमधे रेडिओवर जहिरात आली की दिवाळीच्या दिवशी वसूबारसेच्या निमित्ताने अन्नकोट करणार आहेत. (अन्नकोट म्हणजे देवाला अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवतात.) दर्शनासाठी या. त्या निमित्ताने भारतीय लोक भेटतील म्हणून मी लिनेशियाला जायचे ठरवले.

लिनेशिया हा भाग फक्त भारतीय तेही फक्त गुजराथी लोकांची वस्ती असलेला भाग. (हे नाव लान्झ आणि अशिया यांचे मिश्रण होऊन झालेले आहे) त्या वेळच्या आफ्रिकन सरकारने १९५८च्या सुमारास गौरेतर आणि खासकरून भारतीय लोकांना इतर भागातून हुसकावून इकडे वसवले आणि त्यांची वेगळी कॉलनी केली. इथल्या रस्त्यांना नावेदेखील बाँबे स्ट्रीट, कोलकता स्ट्रीट अशी आहेत.

दिवाळीच्या दिवशी इथे बरेच गुजराथी लोक सणासाठी एकत्र आले होते. बहुतेक सगळे खास सणासुदीच्या गुजराथी पोषाखात होते. बायकामुली साड्या, चणियाचोळी इत्यादी ड्रेस वगैरेंमधे, पुरूष धोतर, कुर्ता, केडिया (घेर असलेले जाकीट), कच्छी भरतकाम केलेले जाकीट, रंगीत पागोटे अशा वेशांत होते. थोडे वयस्कर लोक गुजराथी भाषेत संभाषण करत होते पण नवी पिढी मात्र "केम छो", "मजामा" इतकेच गुजराथी बोलू शकत होती.

तेथे एकाला सहज विचारले की तुम्ही कुठून आला आहात. त्याचे उत्तर आले इंडियामधून. इंडियामधून कोणत्या भागातून विचारले असता म्हणाले की कराचीहून.

कराची तर पाकिस्तानात आहे, या प्रश्नावर आलेले उत्तर मात्र मजेशीर होते. "आम्ही आलो तेव्हा कराची इंडियामध्येच होते."

सोवेटो हादेखील असाच भाग पण तो फक्त काळ्या लोकांसाठी राखीव होता. ही संपूर्ण वस्ती गोऱ्या लोकांना काळ्या लोकांपासून वेगळे ठेवण्यासाठी बनवली. इथले नियमही वेगळेच होते. दुपारी चारनंतर रस्त्यावर काळा माणूस दिसला तर गोऱ्याला त्याच्यावर गोळी झाडण्याची पूर्ण परवानगी होती.

अपारथाईड आणि त्याचे परिणाम या सगळ्याबद्दल तीन-चार स्वतंत्र लेख लिहावे लागतील.

वर्णभेदाची जाणीव मनातून अजून पुसली गेलेली नाही याची चुणूक आपल्याला बरेचदा येते.

ख्रिसमससाठी संध्याकाळी मला आमच्या घरमालकाने पार्टीसाठी बोलावले आहे, असे मी ऑफिसमधे एका सहकाऱ्याला सांगत होतो. त्याने मला एकदम विचारले की तुझा घरमालक गोरा आहे की काळा? तोपर्यंत घरमालक गोरा आहे की काळा ही गोष्ट माझ्या डोक्यातही आली नव्हती.

सरकारच्या ब्लॅक एम्पॉवरमेंट प्रोग्राममुळे बऱ्याच संस्थामध्ये, नावाला का होईना, काळे लोक बॉस म्हणून आले आहेत. गोऱ्या लोकांना ते आवडत नाही हे ते उघडउघड बोलत नाहीत, पण एकमेकांत बोलून दाखवतात.

नेल्सन मंडेलांची दूरदृष्टी या बाबतीत मानायलाच हवी. गोऱ्या लोकांची सत्ता होती तेव्हा संस्था चालवण्याचा अनुभव त्यांच्याशिवाय इतर कोणालाच नव्हता. युगांडाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत सत्ता आणि संस्था अशिक्षित, अननुभवी लोकांच्या हाती गेल्यामुळे झाली. दक्षिण अफ्रिकेत नेल्सन मंडेलांनी गोऱ्या लोकांसोबत सत्तेत सहभागी होण्याला काही लोकांचा विरोध होता पण त्यांचा निर्णय किती योग्य होता हे आता लोकांना पटते.

सन सिटी हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठे गेमिंगचे ठिकाण. जोहानसबर्गपासून जवळजवळ पावणेदोनशे किलोमीटरवर. जाताना रस्ता मोकळ्या मैदानातून जातो. रस्त्यात आपल्या इथे दिसते तशी शेते वगैरे कुठेच दिसत नाहीत. वाटेत एखादे खेडे दिसले तरीही त्याच्या आसपासही कुठेच शेती दिसत नाही. याचे नवल वाटले. जरा विचारल्यानंतर कळाले की या जमिनीत प्लॅटिनम आहे. बहुतेक सगळ्या जमिनी कोणत्या ना कोणत्या मोठ्या कंपन्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यांवर स्थानिक शेतकऱ्याला शेती करायचा हक्कच नाहीये. मनात विचार आला की स्थानिक युवकाला त्याच्या जागेत शेती करता येत नाही, त्याचे शिक्षण झालेले नाही, त्याच्याकडे दुकान, शाळा किंवा तसल्या कोणत्याही संस्था चालवण्याचे ज्ञान नाहीये. त्यामुळे नोकरीही नाही. मग अशा युवकाने जगण्यासाठी करायचे तरी काय.

तरीही ब्लॅक एम्पॉवरमेंटमुळे काळ्या लोकांना थोड्याफार नोकऱ्या तरी मिळतात.

इथल्या समाजात काही मजेदार चालीरीती आहेत. माझी मेड तिच्या मुलीच्या लग्नासाठी सुट्टी मागत होती. मी तिला सुट्टी दिली आणि मुलीला लग्नात आहेर म्हणून थोडे पैसेही दिले. दोन महिन्यांनी तिने मुलीच्या बाळंतपणाची बातमी दिली. माझ्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून ती हसली म्हणाली की तिच्या समाजात मुलगामुलगी लग्न ठरवतात. एकत्र राहतात. त्यांना मुलेही होतात. पण जोवर त्यांची आर्थिक स्थिती योग्य होत नाही तोवर ते लग्न करत नाहीत. नवरा मुलगा नवरीच्या वडिलांना हुंडा देतो. लग्न करतेवेळेस जर नवरी गरोदर असेल तर नवरा मुलगा नवरीच्या आई-वडिलांना काही जास्तीची रक्कम देतो; त्याला ते डॅमेज चारजेस असे म्हणतात.

माझ्या टीममधे एक मुलगी नामिबीयामधून स्थलांतरित होऊन आली होती. ती जरा कमी सावळी होती. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याने जास्त हुंडा दिला होता. नवरीला लग्नाअगोदर मुले असणे यात इथे काहीच वावगे वाटत नाही. जर नवरीला गोरे मूल झालेले असेल तर तिला लग्नात जास्त हुंडा मिळतो. (भारतीय , चिनी वगैरेही गोऱ्यांमधेच मोडतात.) कोणी, किती लग्ने करावी याला ही काही मर्यादा नाही, पण ते अपवादात्मकच. (त्या वेळेस झुलू जमातीतील जेकब झुमा हे अध्यक्ष होते. त्यांना सहा बायका अणि वीस मुले होती.)

जोहानसबर्गमधे असताना नवा अनुभव आला नाही असा एकही आठवडा गेला नाही. आणि प्रत्येक अनुभव पहिल्यापेक्षा सुंदर आणि वेगळा. डिसेंबरमधे इकडे उन्हाळा असतो. त्याच सुमारास पाऊसही पडतो. अक्षरशः टेनिसबॉलच्या आकाराच्या गारांमुळे घराची कौले फुटणे, गाडीच्या काचा फुटणे, छपराला पोचे येणे, हे नवे नाही.

पण मला आलेला अनुभव खूप वेगळा. एकदा सकाळी खिडकीबाहेर पाहिले तर आसपासची सगळी झाडे पांढरीशूभ्र झालेली. अधूनमधून कुठेतरी दिसणारे हिरवे पान. बाहेर थंडी वगैरे अजिबात नसताना हे बर्फ कसले म्हणून बाहेर आलो आणि पाहिले. सगळी झाडे ही पांढऱ्याशुभ्र फुलपाखरांनी भरून गेली होती. पाहावे तिकडे फुलपाखरे. ही स्थलांतर करणारी फुलपाखरे असतात. काही हजार किलोमीटरचा प्रवास करतात. त्या दिवशी संपूर्ण गावात झाडेच काय, पण रस्ते आणि इमारतीही पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या.

हे दृश्य दोन-तीन दिवस दिसले. पण मनावर कायमचे कोरले गेलेय.

जोहानसबर्गमध्ये फोर्ड्सबर्गसारख्या भागात काळे लोकही गुजराती शब्द बोलतात. "दनिया दनिया", असे म्हणत कोथिंबिरीच्या पेंड्या घेण्याचा आग्रह करतात.

तेथे गेल्यावर तर आपण भारतात नाही हे खरेच वाटत नाही.

आपण भारतीय असे सांगितले की इथले लोक खुलतात. त्यांना शाहरुख खान माहीत असतो. इतकेच काय तर "खुच खुच होता है" हे गाणे माहीत असते. त्यांना अमिता बाच्चान माहीत असतो. त्यांच्यासाठी भारत हा खूप मोठा देश आहे. प्रगत देश आहे.

एकाने तर मला "आवारा हुं" हे गाणे संपूर्ण म्हणून दाखवले. अर्थ समजत नाही पण गाणे पूर्ण पाठ होते.

लाकडी खेळणी मिळणाऱ्या मॉलमध्ये गेल्यावर मित्रांसोबत हिंदी बोलताना ऐकल्यावर विक्रेते आपल्याला "हे शशिन (सचिन) कम हियर"; "हे अमिता बाच्चा कम हियर"; म्हणून हाक मारतात. कधीतरी भारतात जाऊन यायचे हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचा बकेट लिस्ट आयटम असतो. मी मुंबईहून आलोय हे ऐकल्यावर एकजण तर अगदी प्रेमात आला. म्हणाला, "आय लव मुम्बाय. आय वांत तु गो तु मुम्बाय," कारण विचारले तर म्हणाला, "आय वांत तू मीत लीना छांदावारकार." हे ऐकल्यावर मी चाट पडलो. लीना चंदावरकरलाही आपला कोणी फॅन दक्षिण अफ्रिकेत असेल असे स्वप्नातसुद्धा वाटत नसेल.

तो बोलणारा फॅन इतक्या तळमळीने बोलत होता की ते ऐकून म्हणावेसे वाटले, "आय लव्ह यू जोबुर्ग".

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो : खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश

- - अबापट

काँगो (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक मोठा देश (आकाराने आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा, सर्वात मोठा अल्जीरिया). साधारण १८८५पासून या देशातील लोकांचे जे हाल सुरू आहेत ते अजूनही संपण्याची शक्यता दिसत नाहीये. याची सुरुवात कुठून झाली याबद्दल फार पाल्हाळ न लावता संक्षिप्त लिहितो.

काँगोचा नकाशा

साधारण या काळापर्यंत (म्हणजे १८७०-१८८०) आफ्रिकेच्या या भागात नक्की काय आहे याबद्दल युरोपातील सत्तांना फारशी माहिती नव्हती.

हेन्री मॉर्टन स्टॅनली नावाच्या पत्रकार/ एक्सप्लोररने (तोच तो "Dr. Livingstone, I presume." हे कथित वाक्य उच्चारणारा) १८७४-७७ या काळात आपली पहिली ट्रान्स आफ्रिका मोहीम केली. यात आफ्रिका खंडाच्या पूर्वेला झांजिबारमध्ये उतरून काँगो नदीचा उगम शोधून पश्चिमेकडे काँगो नदी जिथे अटलांटिक महासागराला मिळते तिथपर्यंतचा मार्ग शोधून काढला. (तोपर्यंत या भागाबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये काहीही माहिती नव्हती.)

स्टॅन्लीने वृत्तपत्रांमध्ये या शोधाबद्दल भरपूर प्रसिद्धी घडवून आणली, युरोप व अमेरिकेत भरपूर व्याख्याने दिली. एकीकडे बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याला (इतर सर्व युरोपीय सत्तांकडे वसाहती आहेत, त्यातून ते अमाप धन गोळा करत आहेत हे बघून) आपल्याकडे एकही वसाहत नाही याची खंत होती. स्टॅन्लीचे रिपोर्ट वाचून त्याने स्टॅन्लीला काँगोमध्ये आपली वसाहत करण्यासाठी नेमले. हे करण्यासाठी त्याला साधनसामुग्री, आर्थिक बळ दिले.

स्टॅन्लीने काँगो खोऱ्यात जाऊन तिथल्या सर्व भूभागांमध्ये स्थानिक टोळीप्रमुखांशी कधी तह करून, बहुतांश वेळा जोरजबरदस्ती करून राजा लिओपोल्ड दुसरा याची खाजगी वसाहत स्थापली (१८७७). याचे नाव 'काँगो फ्री स्टेट'. स्थानिक लोकांवर जुलूम करून आधी हस्तिदंत, लाकूड आणि नंतर नैसर्गिक रबर अशी साधनसंपत्ती तिथून लुटायला सुरुवात केली. काँगो नदीचे पात्र खूप मोठे आहे. त्यातून जलवाहतूक सहज शक्य होती. लिओपोल्डच्या सैन्याने वाफेवर चालणारी जहाजे आणून ही सामुग्री अटलांटिक समुद्रापर्यंत सुरळीत पाठवण्याची व्यवस्था निर्माण केली. यानंतर रस्त्यांचे जाळेही तयार करण्यात आले. या वस्तू अतिशय किमती असल्याने आणि जवळजवळ फुकट मिळत असल्यामुळे यातून लिओपोल्ड दुसरा याने अमाप धन कमावले. १९००च्या सुमाराला लिओपोल्डचे एजंट करत असलेले भयानक अत्याचार आणि जुलूम यांबद्दल युरोपातील इतर देशांमध्ये माहिती पसरू लागली. मग त्याच्यावर दबाव आणून त्याची ही खाजगी वसाहत बेल्जियमने ताब्यात घेतली आणि त्याचे नाव बदलून बेल्जियन काँगो झाले. अत्याचार आणि (अधिकृत) लुटालूट काही कमी झाले नाही. (उदा : रबर गोळा करण्याचा कोटा पूर्ण केला नाही, तर थेट हात तोडून टाकणे.)

१९६० साली बेल्जियन अधिपत्याखाली असलेल्या या देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु बेल्जियन लोकांचा प्रभाव पूर्णपणे गेला नव्हता.

स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान होते पॅट्रिस लुमुम्बा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच राजकीय लाथाळी सुरू झाली आणि लष्करप्रमुख मोबुटूने (जोसेफ मोबुटू उर्फ मोबुटू सेसे सेको) सत्ता काबीज केली. पॅट्रिस लुमुम्बा यांना पकडून काटांगा राज्यात नेऊन हालहाल करून अतिशय निर्घृण पद्धतीने मारून टाकण्यात आले. (आधी गोळ्या घालून, मग शरीराचे तुकडे करून ते ॲसिडच्या पिंपांमध्ये विरघळवून टाकले.) अमेरिका आणि बेल्जियमच्या मते पॅट्रिस लुमुम्बा रशियाकडे झुकत होता. एवढे कारण त्याला मारून टाकायला त्यांना पुरेसे वाटले. २००१मध्ये उघड (declassify) झालेल्या कागदपत्रांमधून हे पुढे आले की लुमुम्बाला मारण्याचा कट सीआयएने एकापेक्षा जास्त वेळा रचला होता.

ब्रिटनलाही लुमुम्बा धोकादायक वाटत होता. ब्रिटनच्या काँगोमधील खाणउद्योगांच्या बाबतीत लुमुम्बा अडचणीचा ठरला असता असे मत होते.

अखेर लुमुम्बा यांना कुणी आणि कसे मारले याबद्दल विविध माहिती उपलब्ध आहे, परंतु बेल्जियन सरकारचा हे सगळे घडवून आणण्यात मोठा हात होता हे नक्की आहे.

सुरुवातीची राजकीय लठ्ठालठ्ठी काही वर्षे सुरू राहिली आणि अखेर १९६५मध्ये मोबुटू या लष्करप्रमुखाने सत्ता हातात घेतली. १९९७पर्यंत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशात हुकूमशाही सत्ता राहिली. (मधल्या काळात त्याने देशाचे नाव बदलून झाईर (Zaire) केले, त्याच्या मृत्यूपर्यंत देशाचे नाव तेच राहिले.)

लिओपोल्ड दुसरा आणि बेल्जियमच्या वसाहतीच्या काळात काँगोमधून हस्तिदंत आणि रबर हे जमिनीवर मिळणारे किमती ऐवज लुटण्यात आले. वसाहतीच्या शेवटच्या काळापासून आजपर्यंत काँगोमधील खनिज संपत्तीवर विविध परकीय देश व काँगोमधील हुकूमशहा यांनी डल्ला मारला आहे आणि अजूनही ते काम सुरूच आहे.

काँगोमध्ये हिरे आणि सोन्याच्या खाणी आहेतच परंतु त्याहून महत्त्वाची खनिजे म्हणजे आधी टिन आणि तांबे, आणि नंतर कोबाल्ट, लिथियम, कोलटन (नायोबियन आणि टँटलियम यांचे खनिज) याचे मोठे साठे आहेत. युरेनियमही काही प्रमाणात आहे. (ओपनहायमरच्या पहिल्या अणुबाँबमध्ये वापरले गेलेले युरेनियमही काँगोमधूनच आणलेले होते.) काँगोच्या जमिनीत अजूनही सुमारे २४ हजार अब्ज अमेरिकी डॉलर इतकी किंमत होईल इतकी खनिज संपत्ती आहे.

मोबुटूनंतर यादवीतून पुढे आला लॉरेन्ट कबिला (१९९७ ते २००१). २००१मध्ये लॉरेन्ट कबिलाचा खून झाल्यावर त्याचा मुलगा जोसेफ कबिला (२००१-२०१८) आणि २०१८मध्ये निवडून आलेला फेलिक्स शिसेकेडी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या प्रत्येक हुकूमशहाने या ना त्या मार्गाने प्रचंड वैयक्तिक संपत्ती जमवली. (मोबुटू : किमान ५ अब्ज डॉलर्स)

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक यादवी युद्धे झाली. या युद्धांमधील खर्च खनिज संपत्तीतूनच भागत असे आणि बऱ्याच वेळा युद्धांचा उद्देश खनिज संपत्तीवर ताबा मिळवणे असा असे.

काँगो हा तसा विशाल देश आहे. त्याच्या पूर्व भागात सर्वांत जास्त खनिज संपत्ती आहे. हा पूर्व भाग राजधानी किन्शासापासून दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. चांगल्या रस्त्यांचा अभाव आणि दुर्गम प्रदेश यामुळे किन्शासातील सत्ताधाऱ्यांना खनिजसमृद्ध पूर्व भागावर संपूर्ण असा ताबा फारसा कधी मिळवता आला नाही. या भागावर सर्वसाधारणपणे लोकल मिलिशिया आणि परदेशी खाण कंपन्या (यांची हातमिळवणी सत्ताधाऱ्यांशीही असे) यांच्याकडे जास्त काळ राहिला. काही पूर्वेकडचे शेजारचे देश म्हणजे रवांडा, बुरुंडी आणि युगांडा वेगवेगळ्या तथाकथित बंडखोरांना पाठिंबा देत, अजूनही देतात.

आजच्या जगाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचे खनिज म्हणजे कोबाल्ट. गेल्या वर्षी जगातील ४१ टक्के कोबाल्ट काँगोमधून आले. एवढे सर्व असूनही या सर्व संपत्तीचा स्थानिक लोकांना काहीही उपयोग होत नाही. कायमचे राजकीय अस्थैर्य, बंडाळ्या, यादवी युद्धे इत्यादीने पिचलेली स्थानिक जनता खंक गरिबीत जगत राहते.

आफ्रिकेतील दुसरे खनिजसमृद्ध देशाचे उदाहरण म्हणजे बोत्सवाना. इथल्या जमिनीखालच्या संपत्तीची माहिती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कळली. आज या देशांत लोकशाही आहे, प्रगती आहे, समृद्धी आहे. शिक्षण, उत्पन्न आणि विकास या तिन्हींबाबत हा देश प्रगत म्हणावा असा आहे. या देशाला आफ्रिकेतील अपवाद असं म्हणले जाते.

वसाहतकाळात काँगोमधील नैसर्गिक समृद्धीचा शोध लागला, म्हणून की काय माहीत नाही, काँगोलीज जनतेचे हे असे हाल सुरू आहेत, संपण्याची लक्षणे नाहीत.

ही सर्व झाली पार्श्वभूमी.

काँगोमधील खाण उद्योगात आज काय, कसे, आणि का सुरू आहे वाचण्यासाठी काही दुवे –

१. Adam Hoschild या पत्रकार लेखकाने "Object of Plunder: The Congo through the Centuries" २०१४ साली दिलेल्या व्याख्यानाची युट्यूब लिंक. काँगोच्या नैसर्गिक संपत्ती कशी ओरबाडली गेली याविषयी हे व्याख्यान आहे. (यूट्यूबचा दुवा)
याच लेखकाचे 'किंग लिओपोल्डज गोस्ट' नावाचे याच विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध आहे. जरूर वाचावे असे.

२. सिद्धार्थ कारा नावाच्या लेखकाने लिहिलेल्या, आज आपण वापरतो ते स्मार्टफोन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रिक कार्स यांच्यासाठी लागणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीजना आवश्यक असणारे कोबाल्ट काँगोमधील खाणींमधून कशा अमानवी पद्धतीने काढले जाते, लेखाचा दुवा.
सिद्धार्थ कारा यांचे 'Cobalt Red : How the blood of Congo powers our lives' हे याच विषयावर लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.

३. ओपनहायमर हा पहिल्या अणुबाँबविषयीचा चित्रपट या वर्षी गाजला. चित्रपटात न दाखवलेला भाग म्हणजे या अणुबाँबकरिता लागणारे मुख्य खनिज युरेनियम अमेरिकेत कुठून आणि कसे पोचले. हे खनिज आले होते काँगोमधून आणि काय परिस्थितीत, याबद्दल सखोल माहिती देणारा लेख इथे>.

४.कोबाल्ट या सध्याच्या काळात जगभर अत्यावश्यक झालेल्या खनिजाचे काँगोमधील उत्खननाबद्दल माहिती देणारा हा लेख वाचा.

५. काँगोमध्ये वारंवार स्थानिक बंडाळ्या, त्यात रवांडा, बुरूंडी आणि युगांडा या शेजारी देशांकडून होत असलेला हस्तक्षेप, हे सगळं खनिज संपत्तीवर डोळा ठेवून! या बंडाळ्यांविषयी BBCची एक छोटी क्लिप बघा इथे.

याच विषयाशी संबंधित अजून काही युट्यूब व्हिडिओ इथे बघा –
व्हिडिओ - १
व्हिडिओ - २

काँगोविषयी काही चांगली पुस्तके –

१. ब्लड रिव्हर : अ जर्नी टू आफ्रिकाज ब्रोकन हार्ट
टीम बुचर नावाच्या पत्रकाराने काँगोमध्ये २००० सालानंतर प्रवास करून त्यावर लिहिलेले पुस्तक फार चांगले आहे.

२. जोसेफ कॉनरॅड या लेखकाने १८९९ साली लिहिलेले 'हार्ट ऑफ डार्कनेस' हे फिक्शन प्रसिद्ध आहे. (पुस्तक जरी फिक्शन असले तरी या पूर्वीच्या काळात जोसेफ कॉनरॅड हा दुसऱ्या लिओपोल्डच्या 'काँगो फ्री स्टेट'मध्ये काही काळ कार्यरत होता, त्या अनुभवावर हि काल्पनिक दीर्घकथा त्याने लिहिली होती.)

३. हेन्री मॉर्टन स्टॅन्लीची या भागावर लिहिलेली बरीच पुस्तके आहेत, पण बहुतांश फार दुर्मीळ आहेत. त्यातील 'द काँगो अँड द फाऊंडिंग ऑफ इट्स फ्री स्टेट' हे पुस्तक रोचक असू शकेल. (मी वाचलेले नाही.)

"काळी" कॉफी

- - अवंती

पूर्वपीठिका

लहानपणी इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना घरात असलेल्या तर्खडकर पाठमालाचे तीनेक खंड अभ्यासणं ही घरची परंपरा होती. त्यात काॅफीकरता बुंद, कवा वगैरे शब्द वाचून हे काय कवा कवा लिहिलंय म्हणून तेव्हा हसूनही घेतलं होतं. पुढे गुगल हाताशी आल्यावर या शब्दाचा आणि काॅफीचा काय संबंध असेल हे शोधत गेले तर काॅफीला अरबी भाषेत “क़हवा” म्हणतात समजलं. याच्या जवळचा शब्द तुर्कीतला कावेह् आहे तर काॅफीच्या रोपाला तुर्कीत बुन् म्हणतात. मग लक्षात आलं की तर्खडकरांनी बहुतेक इथूनच बुंद, कवा वगैरे शब्द योजले असतील काॅफीकरता.

अवंती१

तसं पाहिलं तर काॅफी हे नावच जास्त योग्य, कारण काॅफीचं मूळ नाव हे काफ्फा (kaffa) या इथिओपियामधल्या गावावरून पडलं आहे. काॅफीचं मूळच इथिओपिया आहे. यामागची कथा फारच रोचक आहे. इथिओपियात एका रानात एक काल्दी नावाचा मेंढपाळ रोज आपल्या मेंढ्या चरायला सोडत असे. काही दिवसांनी त्याच्या लक्षात येऊ लागलं की त्याच्या मेंढ्या परत नेतेवेळी नाचत असतात. त्याने बारकाईने लक्ष ठेवलं आणि त्याला सुगावा लागला की त्याच्या मेंढ्या रोज परतताना एका झाडाची चेरीसदृश फळे खातात आणि त्यानंतर त्या खूप वेगळं वागतात. म्हणून काल्दीनेही एकदा ती फळं चाखून पहायचं ठरवलं. काल्दीला ती फळं फार काही चविष्ट वाटली नाहीत, कडू तुरट अशी ती फळं होती. तरीही त्याने ती खाल्ली अन् थोड्या वेळाने तोही एकाएकी खूष होऊन नाचू लागला. तिथून एक धर्मगुरू जात होता. त्याने काल्दीला त्याच्या नाचण्याचं कारण विचारलं असता धर्मगुरूलाही या फळांविषयी समजलं. अन् त्यानंही ही फळं चाखून पाहायचं ठरवलं. दिवसाअखेरची प्रार्थना करतेवेळी वयपरत्वे धर्मगुरूला थकून झोप येत असे. ही फळं खाल्ल्यापासून धर्मगुरूला प्रार्थनेवेळी थकणं, झोप येणं या गोष्टी बंद झाल्या अन् त्यानं या फळांविषयी इतरांना माहिती दिली. अशा पद्धतानं कर्णोपकर्णी काॅफीचा प्रसार झाला.

काॅफीच्या उगमाविषयी अनेक वाद प्रतिवाद आहेत. त्यात एक गट आफ्रिका हेच काॅफीचे मूळ म्हणतो तर दुसरा एक गट म्हणतो काॅफीचा उगम अरबस्तानातला आहे. याविषयीची कथाही रोचक आहे. अरबस्तानातील एका शहरात धर्मगुरू शेख ओमर राहात असे. त्याच्या काही चुकांमुळे त्याला तडीपार करण्यात आलं होतं. खाण्यापिण्याच्या शोधात फिरत असताना त्याला काही पक्षी एका झाडाची फळं खाताना दिसले. त्याने ती कडवट तुरट चवीची फळं खाल्ली, बिया खाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पोत कठीण असल्याने त्याला त्या बिया चावून खाणं शक्य झालं नाही. म्हणून त्याने युक्ती केली व या बिया उकडल्या तरीही त्या खाण्याइतपत मऊ झाल्या नसल्यानं बिया फेकून ते उकळलेलं पाणी तो प्यायला. हे पाणी प्यायल्यानंतर काहीच वेळात त्याची मरगळ जाऊन त्याला तरतरी आली. या बिया त्याने शिक्षा संपल्यानंतर आपल्याबरोबर शहरात नेऊन त्याचा प्रसार केला. हे शहर होते मोखा/मोका. आज मोठ्यामोठ्या काॅफी हाऊस, काॅफी ब्रॅण्ड्समधे ह्याच नावानं मोका काॅफी मिळते.

काॅफीच्या उगमाविषयी कितीही वाद असले तरीही काॅफीचा पहिला लिखित उल्लेख अबू बकर राझीच्या अल् हाईवी या नवव्या शतकातल्या बग़दादमधील एका प्रसिद्ध हकिमाच्या अल् हाईवी या ग्रंथात सापडतो. त्याच्या ग्रंथात बुन्चुम् म्हणजे काॅफीपासून तयार केलेले एक पेय नमूद आहे. या पेयाचा उपाय पोटदुखीवर, पोट बिघडणे यावर उत्तम होतो असा त्याचा दावा होता. हे काही अंशी खरंही ठरतं. ज्याला आपण घरगुती उपाय, आजीबाईचा बटवा, Home remedies म्हणतो त्यात हा उपाय काही वेळा बरोबर बसतो.

याखेरीज काॅफीविषयी इतिहासातील उल्लेख असा की धर्मगुरू शेख जमालउद्दीन अबू महम्मद काही कामानिमित्त इथिओपियात गेला होता. अनेक वर्षं तिथं राहून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी एडन - येमेन इथं परतला. परंतु तिथे आल्यानंतर तो उदास राहू लागला होता. त्याच्या मनावर मरगळ आल्यासारखं, निरुत्साही असं वाटत होतं त्याला. अनेक उपाय उपचार करूनही त्याला उतार पडत नव्हता. मग त्यालाच एक युक्ती सुचली अन् त्याने आपल्या काही माणसांना इथिओपियाला पाठवून काॅफी मागवली. काॅफीचे सेवन केल्यानंतर मात्र जमालउद्दीनला एकदम तरतरी येऊन उत्साह आला. येमेनमध्ये धर्मगुरूनेच काॅफी आणल्यामुळे तिचा प्रसार वेगाने होत गेला. काॅफीमुळे रात्री जागरणास, झोप टाळण्यास मदत होते हे लक्षात आल्यामुळं गावोगावी दौरे करत फिरणाऱ्या कलाकारांना - त्या काळी करमणुकीचे खेळ करणारे, जलसे करणारे, रात्रीही प्रवास सहज करता यावा म्हणून अनेक प्रवासी, धर्मोपासक वगैरे काॅफीचं सेवन करू लागले. हळूहळू काॅफीचा महिमा येमेनहून मक्कामदिनेपर्यंत पोहोचला. अरब काॅफीच्या आकंठ प्रेमात बुडाले होते, इतके की त्यांनी काॅफीच्या बिया अरब देशाबाहेर नेऊच दिल्या नाहीत अनेक वर्षं. प्रवाशांची झडती घेणे, काॅफीबिया असतीलच कुणाकडे तर त्या उकळून अथवा भाजून देणे जेणेकरून त्या निकामी होऊन रुजणार नाहीत, वगैरे प्रकार करून काॅफीबिया अन् पर्यायाने काॅफी बाहेर देशात पोहोचूच दिली नाही. मात्र सोळाव्या शतकात एका भारतीय सूफी प्रवाशाने, बाबा बुदन याने हज यात्रेहून येताना आपल्या सामानात सात काॅफीबिया लपवून त्या चिकमंगळूर इथे रुजवल्या आणि भारतात अराबिका काॅफी लागवड अन् उत्पादनाला सुरुवात झाली. पुढे भारतात काॅफीचा प्रसार वेगाने झाला. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी यान फान नायेंडाल व त्याच्या सहकारी डच प्रतिनिधींना गोवळकोंड्याजवळ मौल्यवान चीजवस्तू म्हणून काॅफीची भेट दिल्याचे उल्लेखही समकालीन पत्रांत आहेत.

ज्याप्रमाणे आफ्रिकेतून काॅफी आशिया खंडात पसरली तशीच ती जगभरात पसरली. दक्षिण अमेरिकेत काॅफीची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली. अर्थात दक्षिण अमेरिकेत, कॅरेबियन द्वीप समूहात ही लागवड युरोपियन सत्तांनी केली. सतराव्या शतकात युरोपियन वसाहतवादी सत्तांना काॅफीची महती पटली होती. काॅफीतून बराचसा नफा मिळवता येऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. बहुतेक जगभर पसरलेल्या युरोपियन वसाहतींनाही काॅफीची चटक लागली होती. आणि म्हणून काॅफी उत्पादन नफेशीर ठरावं याकरता या सत्तांनी काॅफी लागवडीकरता आफ्रिकेतून गुलाम निर्यात करायला सुरुवात केली. हे गुलाम दक्षिण अमेरिका, कॅरेबियन, आशिया खंड येथील युरोपियन वसाहतीत आणले जात. हे triangular trade - तीन टप्प्यातील आर्थिक प्रारूप हा वस्तू व गुलामांचा व्यापार करण्याचा एक मार्ग होता.

अवंती३

साधारणपणे १६व्या शतकाला ही कल्पना उदयाला आली अन् ती १९व्या शतकापर्यंत पाश्चिमात्त्य वसाहतवादाच्या काळापर्यंत सुरू राहिली. यात व्यापार युरोप, आफ्रिका (त्यातही पश्चिम आफ्रिका) आणि अमेरिका खंडात होत असे. या तीन टप्प्यातील व्यापारात पहिला टप्पा युरोपात सुरू होत असे. यात कापड, दागिने, धातूची भांडी, दारू व इतर पेये, सुरे, चाकू व इतर काही हत्यारे, अशा नानाविध तयार वस्तू जहाजातून पश्चिम आफ्रिकेत नेल्या जात. या वस्तूंच्या बदल्यात तिथून गुलाम विकत घेतले जात. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे गुलाम जहाजातून दक्षिण अमेरिकेत पाठवले जात. या प्रवासाला सुमारे ९० दिवस लागत. जहाजात प्रमाणापेक्षा अधिक गुलाम दाटीवाटीने साखळदंडाने बांधून ठेवलेले असत. यामुळे जहाजावरच सुमारे २०% आफ्रिकन गुलाम मृत्यू पावत. दक्षिण अमेरिकेत बरेचदा ब्राझीलमधेच जहाज येत असे, तिथे आल्यानंतर या गुलामांचा लिलाव करून विक्री केली जाई. आणि तिथून ते संपूर्ण अमेरिका खंडात वेगवेगळ्या वसाहती अन् त्यांच्या मालकीच्या मळ्यांवर कामाकरता विकले जात. यात प्रामुख्याने ऊस अन् काॅफीचे मळे होत. तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या, मौल्यवान वस्तूंची आयात केली जात असे. अशाच गुलामांच्या आयात निर्यातीतून दक्षिण अमेरिका त्यातही ब्राझिल, कोलंबिया, जमाइका वगैरे ठिकाणी काॅफीची लागवड प्रचंड प्रमाणात झाली अन् आज जगभरात सर्वाधिक काॅफी उत्पादन इथं होतं.

असं असलं तरी आफ्रिकेतही काॅफीचं उत्पादन होतंच! दक्षिण अमेरिका वगैरे ठिकाणी कॉफी पिकवणारे कष्टकरी हात हे बहुतांशी आफ्रिकन वंशीय आहेत, हे खरंच आहे. परंतु जसं अमेरिकेतील गौरवर्णीयांनी युरोप सोडल्यावरही युरोपशी त्यांचे सर्व प्रकारचे लागेबांधे, दळणवळण, इ. टिकून राहिले तसे या कृष्णवर्णीयांचे आफ्रिकेशी लागेबांधे तितक्या प्रमाणात टिकले नाहीत. त्यामुळे मी ठरवलं की लेखात आफ्रिकन वंशीयांचा अमेरिका खंडातील इतिहास व वर्तमान अभ्यासण्यापेक्षा प्रत्यक्ष आफ्रिकेतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणं अधिक योग्य. त्यामुळे इथून पुढच्या लेखात आफ्रिका खंडातील कॉफी उत्पादनाचाच विचार केला आहे.

अवंती४

आफ्रिकेतील कॉफी उत्पादन - एक ढोबळ आढावा

वर लिहिलं त्याप्रमाणे काॅफीचा उगम आफ्रिका आहे. पण आज जगभरातल्या काॅफी उत्पादनापैकी आफ्रिका खंडात फक्त १२% काॅफीचे उत्पादन होते. यातही इथिओपिया जगातील सर्वात जास्त आफ्रिकन काॅफी बनवणारा देश आहे. जगातील काॅफी उत्पादनाच्या ३% काॅफी इथिओपियात एका वर्षात होते. त्याखालोखाल युगांडामध्ये काॅफीचं उत्पादन होतं. आफ्रिकेत काॅफी बिया आजही पारंपरिकरीत्या वाळवल्या जातात. यामध्ये हातानेच काॅफीबिया साफ केल्या जातात आणि सूर्यप्रकाशातच त्या वाळवल्या जातात. काही वेळा काॅफीबिया पूर्ण खडखडीत वाळायला एक महिनाही लागू शकतो. पण काॅफीबिया सूर्यप्रकाशातच पूर्ण वाळल्याशिवाय त्यांचे पॅकेजिंग करून त्या बाहेर पाठवत नाहीत. आफ्रिका खंडात सर्वाधिक म्हणजे ३९% काॅफी उत्पादन इथिओपियात होतं. त्याखालोखाल २३% युगांडात, तर तिसऱ्या क्रमांकावर आयवरी कोस्ट आहे, जिथे १३% काॅफी उत्पादन होतं. यानंतर मग टांझानिया, केनिया या देशांतही काॅफीची लागवड होते. आफ्रिकेच्या याच भागात एक गंमतीशीर अन् अतिशय दुर्मिळ अशी पी-बेरी काॅफीदेखील उगवते. सहसा काॅफीत दोन बिया असतात. पण पी-बेरीमध्ये एकच बी असते. या प्रकारची काॅफी दुर्मिळ आहे, जगभरातल्या केवळ १०% काॅफीबियांमधे पी बेरी काॅफीचे फळ उगवून येते. उर्वरित पूर्व आफ्रिकेत फारशी काॅफी लागवड होत नाही.

आफ्रिकेतील कॉफीची पुरवठा साखळी पाहिली तर तिच्यातील अंगभूत आणि व्यवस्थात्मक दोष लगेच लक्षात येतात. बहुतांश कॉफी तिथे अल्पभूधारक मळेवाल्यांकडूनच पिकवली जाते. युगांडात यांचे प्रमाण ९८% आहे तर इथिओपियात हेच प्रमाण ९५% व टांझानियात ९०% आहे. यातील श्रमशक्तीचे वितरण पाहिले तर अल्पभूधारक मळेवाले स्वत: व कुटुंबासकट राबण्याचं प्रमाण मोठं आहे. आफ्रिकन कॉफी खरेदी करणारे प्रमुख देश म्हणजे जर्मनी, अमेरिका, सौदी अरेबिया आणि बेल्जियम. प्रक्रिया न केलेल्या कॉफीवर कोणतेही आयात शुल्क युरोपियन युनियन आणि अमेरिकेत लागू केले जात नाही, तसेच प्रक्रिया केलेल्या कॉफीवरचं आयात शुल्क १०% आहे. अरेबिका व रोबस्टा या दोन्ही वाणांची लागवड आफ्रिकेत होते. पैकी अरेबिका हा वाण अधिक किमती असून, त्याच्या उत्पादनात वाढ झाल्यास कॉफीच्या निर्यातीत थेट वाढ दिसून येते. अरेबिका वाणाची लागवड ही प्रामुख्याने इथिओपिया, टांझानिया व केनिया या देशांत होते. कॉफीची रोपं लावल्यानंतर तीनचार वर्षांनी फळं येतात, व ती पक्व झाल्यावर लगेच खुडावी लागतात. यादरम्यान कमी कालावधीसाठी बऱ्याच मजुरांची आवश्यकता भासते. या टप्प्यावर रोजगाराच्या तात्पुरत्या संधी बऱ्याच तयार होतात. त्यांचा लाभ घेणारेही बहुतांशी अस्थायी मजूरच असतात. फळे खुडून, त्यांवर प्रक्रिया करून मग अनेक दलालांकरवी ही कॉफी अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जाते.

अनेक कॉफी उत्पादक देशांत बालकामगारांचा वापर केला जातो. युगांडा, टांझानिया, केनिया या प्रमुख कॉफी उत्पादक देशांचाही यात समावेश आहे. अल्पभूधारक मळेवाल्यांना अनेकदा यांचाच आधार असतो. उत्पादनाचं लक्ष्य गाठण्याकरिता जितके अधिक मजूर मिळतील तितके हवेच असल्याने बालकामगारांची भरती आश्चर्यकारक नक्कीच नाही - योग्य नसलं तरी. केनियातील एकतृतीयांश कॉफी मजूर १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून युगांडात कॉफी मळ्यावर काम सुरू करणाऱ्यांचे सरासरी वय फक्त ११ वर्षं आहे. तेथील किमान ४८% बालकामगारांनी अनेक अपघात व दुखापती झाल्याची कबुली दिली आहे. इथिओपिया, टांझानिया व युगांडातील एकूण मुलांपैकी बालकामगारांचे प्रमाण हे अनुक्रमे ४०%, २५% व २०% पेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी या संदर्भात बोलकी ठरावी.

इथिओपिया, युगांडा, इ. देशांमधील गरीब प्रांतांमधील भूमीहीन मजूरही यात सहभाग घेतात, तसेच कॉफी उद्योगातील एकूण मनुष्यबळापैकी २०% तरी 'पार्ट-टाईम' कामगार असल्याचे आढळले आहे. पूर्णवेळ कामगारांना द्यावे लागणारे फायदे इ. कामगार कायद्यांशी निगडित जो खर्च होतो, तो टाळण्यासाठी व कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी यांची भरती केली जाते. हा प्रकार जगात अनेक ठिकाणी आढळतो तसा इथेही दिसून येतो. याखेरीज कॉफी मळ्यांवरील स्त्री कामगारांचं होणारं शोषणही चिंताजनक आहे. अजून एक गर्हणीय प्रकार म्हणजे मनुष्यबळ पुरवणारे कंत्राटदार मजुरांचे विविध मार्गे शोषण करतात. दूरवर कॉफी मळ्यांपर्यंत जाण्याचा प्रवासखर्च भरून देण्याच्या भानगडीतच मजूर कर्जबाजारी होतात. बाकीचे तर राहूच दे.

हा झाला आफ्रिकेतील कॉफी क्षेत्राचा एक धावता आढावा. आता थोड्या अधिक बारकाईने यांपैकी दोन पैलू पाहू.
१. कॉफी क्षेत्राचे विश्लेषण - इथिओपिया.
२. कॉफी क्षेत्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार - केनिया.

आफ्रिकेतील कॉफी उत्पादक देशांत कमीअधिक फरकाने सारखीच परिस्थिती आहे. ब्राझील आणि व्हिएतनाम या देशांमध्ये अक्षरश: राक्षसी प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे कॉफीची किंमत अनेकदा पडते, आणि गेली कैक दशके ती अधिकाधिक कमी होत आहे. जागतिक उत्पादनातील टक्केवारी कमी असल्याने किमतीवरही आफ्रिकन देशांचे नियंत्रण नसतं. आणि कॉफीच्या किमती कमीकमी होत गेल्याने कॉफी उत्पादकांची अवस्था अधिक बिकट आहे. त्यात भरीस भर म्हणून कॉफी क्षेत्रातील मजुरांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो - त्यातही महिला मजुरांना पुरुष मजुरांपेक्षा अधिकच. दोन वेगवेगळ्या देशांतील स्थिती नीट पाहिल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

कॉफी क्षेत्राचे विश्लेषण - इथिओपिया

अगोदरच सांगितल्यानुसार, इथिओपिया हे कॉफीचे उगमस्थान आहे. तब्बल दोनेक हजाराच्या आसपास कॉफीचे प्रकार इथे आढळतात. अन्य कोणत्याही देशात कॉफीच्या झाडांमध्ये इतकं जनुकीय वैविध्य आढळत नाही. २००६मध्येच तेथील दीडेक कोटी लोकसंख्या कॉफीवर अवलंबून होती तेव्हा अख्ख्या देशाची लोकसंख्या आठ कोटी होती. म्हणजे जवळपास १९% लोकसंख्या कॉफीवर थेट अवलंबून होती. आज हे प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी कॉफी उत्पादकांची संख्या आजही अतिशय जास्त आहे. याहीपेक्षा धक्कादायक आकडा म्हणजे, २००६मध्ये इथिओपियाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ७०% रक्कम कॉफीतून येत असे. २०२१मध्ये हाच आकडा ३६% इतका होता. ही घट लक्षणीय असली तरी हा आकडा अजिबात दुर्लक्षणीय नाही.

इथिओपियातील प्रत्येक प्रांताचं कॉफी उत्पादनाच्या दृष्टीतून Major, Medium, Minor असं वर्गीकरण केलेलं आहे. पैकी Major व Medium प्रकारात मोडणाऱ्या प्रांतांत ओरोमिया आणि सदर्न नेशन्स, नॅशनॅलिटीज अँड पीपल्स रीजन (SNNP) या दोघांचा दबदबा आहे. या दोन्ही प्रांतांत मिळून जवळपास सव्वापाच लाख हेक्टर जमीन कॉफी लागवडीखाली असून Major व Medium प्रकारात मोडणाऱ्या प्रांतांतील एकूण कॉफीखालील जमिनीपैकी ओरोमियामध्ये ६३% व SNNP मध्ये ३५% जमीन आहे. बहुतांश कॉफी उत्पादक रासायनिक खतं, कीटकनाशके, इ. सारखे आधुनिक उपाय वापरत नाहीत. शुद्ध "ऑरगॅनिक" प्रकारे शेती करतात. त्यामुळे अन्य देशांच्या मानाने उत्पादन खूप कमी आहे. आणि एकूण उत्पादनाच्या निम्म्याच्या आसपास उत्पादन हे देशांतर्गतच खपतं.

कॉफी उत्पादनाला इतरही कैक मर्यादा असून वाढती जंगलतोड, तीही विशेषत: कॉफी उत्पादक क्षेत्रांमधील, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कॉफी बेरी डिसीज नामक कॉफीच्या रोपांचा एक घातक रोग असून एकूण उत्पादनाच्या जवळपास निम्म्या उत्पादनाला यापासून धोका आहे. आधुनिक उपायांचं प्रमाण कमी असल्यानं हा धोका अधिकच मोठा आहे. त्याशिवाय साठवण, वाहतूक, इत्यादींमध्ये होणारं नुकसान वेगळंच. शेतकऱ्यांपासून कॉफी खरेदी करणारे अनेक लहानमोठे व्यापारीही असून काहीजण वैयक्तिक स्तरावर तर काहीजण संस्थात्मक स्तरावर हे काम करतात. दूध संघासारखे कैक मोठे कॉफी संघ आहेत. मोठ्या प्रमाणावर कॉफी खरेदी, त्यावर प्रक्रिया, साठवण अशी अनेक कामं हे संघ करतात.

कॉफीची फळं पिकल्यावर फळांपासून कॉफीच्या बियांपर्यंत अनेक पायऱ्या आहेत.

अवंती२

फळं साठवल्यावर लगेच त्यांचा लगदा केला जातो व मोठ्या टाक्यांमधून त्यांचं फरमेंटेशन अर्थात किण्वन केलं जातं. त्यानंतर तयार झालेला चिकट भाग काढून ती फळं स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली जातात. यानंतर पारंपरिकरीत्या सूर्यप्रकाशात वाळवली जातात. त्यांमधील आर्द्रता ११.५% इतकी राखली जाते. अलीकडच्या काळात सूर्यप्रकाशाऐवजी निव्वळ धुतलेल्या कॉफीला अधिक भाव येऊ लागल्यानं एकूण कॉफी उत्पादनात धुतलेल्या कॉफीचं प्रमाणही वाढू लागलं आहे. कॉफी निव्वळ धुवायची की न धुताच सूर्यप्रकाशात वाळवायची, हे वाणावरही अवलंबून असतं. उदा. अरेबिका वाणाची कॉफी न धुताच सूर्यप्रकाशात वाळवली जाते. त्यानंतर साल काढून मग कॉफीच्या बिया मिळतात.

या पूर्ण प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे कॉफी उत्पादक शेतकऱ्यांची गरिबी. बहुतांश शेतकऱ्यांकडे कॉफी वाळवण्यासाठी उंच कट्टे बांधायलाही पैसे नसल्यामुळे जमिनीवरच कॉफीची फळं वाळवावी लागतात. शिवाय कॉफी संघ वगैरेंतर्फे काही ठिकाणी कॉफी धुलाई केंद्रे चालवली जात असली तरी ते पुरेसं नसतं. कारण "तत्काळ" कॉफी धुतल्याशिवाय अपेक्षित दर्जा व उत्पादन मिळत नाही. आणि शेतापासून कॉफी धुलाई केंद्रं साधारणपणे दोनेक किमी तरी दूर असतात. तिथवर नेईतोवर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळेही ते अनेकदा जमत नाही. हे वाचताना तर मला क्षणभर भरूनच आलं. फक्त दोन किलोमीटर अंतरासाठी शेतकऱ्यांकडे गाड्या नसतील का? एवढा काय फरक पडतो नक्की? पण ज्या अर्थी शोधनिबंधात हे आवर्जून नमूद केलंय त्या अर्थी यात काहीएक तथ्य तर असलंच पाहिजे. त्याखेरीज मग धुलाई केंद्रांनजीकच्या जलस्रोतांमधील प्रदूषण हाही एक कळीचा मुद्दा आहेच.

इथिओपिया सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या इथिओपियन कमाॅडिटी एक्स्चेंजद्वारे तयार झालेल्या कॉफीचं लिलाव, विक्री, इत्यादींचं नियमन केलं जातं. लहान शेतकरी मोठ्या शेतकऱ्यांना किंवा कॉफी संघांना कॉफी विकतात, तिथून ती देशात आणि देशाबाहेर जाते. कमाॅडिटी एक्स्चेंजद्वारे प्रदेश, प्रक्रिया, वाण, इत्यादी निकषांवर ग्रेडिंग होऊनही उत्तम वाणाच्या देशांतर्गतच मोठ्या मागणीमुळे या अधिकृत व्यवस्थेबाहेरही कॉफीचा बराच मोठा काळाबाजार चालतो. भले स्थानिक चलनातच का असेना, यातून निर्यातीपेक्षा अधिक फायदा मिळत असल्यामुळे हा बाजार तेजीत आहे. पण अर्थातच त्यालाही बऱ्याच मर्यादा आहेत.

कॉफीच्या निर्यातीतही इथिओपियन उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मध्यंतरी, कॉफीच्या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे अवशेष सापडल्यामुळे जपानने त्यावर बंदी घातली होती. अन्यथा इथिओपियन कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन एकट्या जपानमध्ये खपतं. अगोदर लिहिल्यानुसार, कैक इथिओपियन शेतकरी रासायनिक खतं, कीटकनाशकं, इ. वापरत नसताना मग हे कसं झालं? अधिक तपासाअंती बांगलादेशहून आयात केलेल्या पोत्यांमुळे ते झाल्याचं दिसून आलं. तसेही जपानी नियम अमेरिकन नियमांपेक्षा अनेकपटीने कडक आहेतच. त्याशिवाय साठवणीचं तंत्र निर्दोष नसणं, भेसळ, इ. कारणांमुळेही न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय कॉफी बाजारात इथिओपियन कॉफीला म्हणावे तसे "रेटिंग" नाही.

अशा अनेक अडचणी असूनही इथिओपियाला कॉफीद्वारे अधिक परकीय चलन मिळवण्याची, व्यापार वाढवण्याची बरीच संधी आहे. खरं तर कोणत्याही एका वस्तूवर कोणत्याही देशाचा व्यापार बहुतांश केंद्रित असूच नये. हळूहळू इथिओपियाच्या निर्यातीतील कॉफीचा टक्का कमी कमी होत आहे हे त्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. मात्र याची दुसरी बाजू म्हणजे ब्राझील आणि व्हिएतनाम येथील कॉफीच्या भरमसाट उत्पादनामुळे अनेकदा जगभरच कॉफीचे दर पडतात आणि त्यामुळेही आफ्रिकन, पर्यायाने इथिओपियन कॉफीलाही त्याचा फटका बसतो. शिवाय गेली कैक दशकं कॉफीची किंमतही कमीकमीच होत आहे. त्यामुळे आता इथिओपियन शेतकऱ्यांनी कॉफीकडून "खात" नामक पिकाकडे मोर्चा वळवला आहे. हा एक अंमली पदार्थ असून आता कॉफीखालोखाल याची लागवड सर्वाधिक होते. खात पिकाचा जगातीलच सर्वात मोठा उत्पादक इथिओपिया हा आहे. त्याच्या निर्यातीतूनही कैक कोटी अमेरिकन डॉलर्स इथिओपियन अर्थव्यवस्थेला मिळतात.

कॉफी क्षेत्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार - केनिया

जगभरातील स्त्रियांवरील अत्याचार हा फार चिंतेचा विषय आहे. त्यातही कष्टकरी, तळागाळातील महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचं लैंगिक शोषण ही विशेष चिंतेची बाब आहे. कमी वेतन, दुय्यम वागणूक, लैंगिक शोषण, प्रसंगी बलात्कार आणि त्यानंतरची मुस्कटदाबी या साऱ्या गोष्टी अनेक वर्षं कष्टकरी स्त्रिया सोसत आल्या आहेत. परंतु कुटुंबाचा आणि स्वतःचा खर्च भागवणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची व कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणं आणि मदतीचा हात नसणं यापुढे शोषण सहन करण्याखेरीज अनेक महिलांपुढे पर्याय नव्हता - आजही नाही. आफ्रिकेतील काॅफीमळ्यातील कामगार महिलाही याला अपवाद नाहीत. गुलाम म्हणून त्यांची नेमणूक झाली तेव्हाही ही परिस्थिती अशीच होती अन् आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता केवळ गुलाम हे नाव जाऊन मजूर/कामगार अशी गोंडस, समाजमान्य नावे तिथे आली आहेत.

तर, आता कॉफी उद्योगात स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार पाहू. कोणत्याही एका देशातील परिस्थितीचा आढावा घेतला तरी आफ्रिकेतील एकूण परिस्थितीची कल्पना येण्यासाठी ते पुरेसं आहे. आफ्रिकेत इथिओपियाखालोखाल केनिया व टांझानिया येथे कॉफीचे उत्पादन सर्वाधिक होते. पैकी केनियातील अनेक स्त्री कामगारांशी प्रत्यक्ष बोलून केलेल्या एका अभ्यासात अनेक धक्कादायक आणि अप्रिय सत्यं उजेडात आली. धक्कादायक म्हणजे आश्चर्यकारक अशा अर्थी नव्हे, पण सुन्न करणारं या अर्थी. जवळपास ९०% स्त्रियांना या ना त्या प्रकारे लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला आहे, आणि त्यांपैकी ९५% तरी स्त्रियांना नोकरी जाण्याच्या भीतीने त्याविरुद्ध आवाज उठवायची भीती वाटते. कॉफी मळ्यांवरील मुकादम अनेकदा फक्त महिला कामगारांचंच नव्हे, तर त्यांसोबत मळ्यावरच राहणाऱ्या त्यांच्या मुलींचंही शोषण करतात. आणि सर्वात धक्कादायक बाब ही, की प्रत्यक्ष संभाषण केलेल्या पुरुषांपैकी तब्बल ७०% पुरुषांनी "हे असंच असतं" छाप प्रतिक्रिया नोंदवली! अत्याचारांचा सामना कराव्या लागलेल्या महिलांमध्ये हतबलता, डिप्रेशन, इत्यादी अनेक मानसिक विकारांचा प्रादुर्भाव आढळतो. शिवाय दुर्दैव म्हणजे केनियन कायद्यातही याविरुद्ध खास तरतुदी नाहीत. याची अजून एक बाजू म्हणजे किमान दोन तृतीयांश महिलांच्या मते एड्ससारख्या रोगाच्या प्रादुर्भावामागे स्त्रियांचं या मार्गे होणारं शोषणही कारणीभूत आहे. केनियाच्या लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिकांना रोजगार शेतीतून मिळतो, हे लक्षात घेतल्यास याची व्यापकता लक्षात येईल. कॉफी व तत्सम उद्योगांत बहुतांश स्त्री कामगारांचा भरणा असल्यामुळेही याला एक खास महत्त्व आहे.

या अभ्यासात एकूण ४०० स्त्रियांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पैकी १५० स्त्रिया रुइरू आणि थिका या प्रांतांमधील कॉफी मळ्यांवर काम करतात. वय वर्षे २० ते ४० या मर्यादेत बहुतांश स्त्रियांची वयं आहेत, म्हणजेच तरुण स्त्रियांचा यात भरणा असल्याचं दिसून येतं. अल्प प्रमाणात १४ ते १९ वर्षीय मुलीही इथं आढळतात. लग्न झालेल्या स्त्रियांचं प्रमाण ४०% असून अविवाहित ३८%, घटस्फोटित १२% तर विधवा १०% इतक्या आहेत. केनियातील पारंपरिक संस्कृतीनुसार, अविवाहित, अर्थात 'पुरुषाचं संरक्षण नसलेल्या' स्त्रियांचं समाजातील स्थान तसं डळमळीतच असतं. त्यामुळे यातील निम्म्याहून अधिक स्त्रियांना लैंगिक अत्याचारांचा धोका तुलनेने अधिक आहे. आणि ज्या स्त्रिया विवाहित आहेत, त्यांचे नवरे आर्थिकदृष्ट्या फार काही कमवताना दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना कुटुंब चालवण्यासाठी असे काबाडकष्ट करावे लागतात.

लैंगिक अत्याचारांचे वर्गीकरण सदर अभ्यासात तीन प्रकारे केले आहे.
१. वरिष्ठांसोबत संबंध ठेवून बढती किंवा अधिक पैसा मिळवणं.
२. नोकरी कायम ठेवण्याच्या बदल्यात वरिष्ठांनी लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करणं.
३. कोणताही खास हेतू न ठेवता वरिष्ठांनी लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करणं.

यांपैकी १ व २ चं प्रमाण अनुक्रमे १७% व १९% असून, सर्वांत धक्कादायक म्हणजे ३चं प्रमाण जवळपास ६०% इतकं आहे. म्हणजे कोणत्याही विशेष हेतूशिवाय, फक्त आणि फक्त सत्तेच्या आधारे स्त्रियांचा भोग घेणं सर्वात जास्त आढळतं. अर्थात जिथे वरील सर्वच प्रकार वाईट आहेत त्यात प्रतवारी तरी कशी करणार? यावर अधिक काहीही भाष्य करायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि एवढे अत्याचार सोसून, स्त्रियांना पुरुषांइतके पैसे तरी मिळतात का? तर तेही नाही. कॉफी मळ्यांमध्ये तर ८०% वेळेस प्रमोशन्स वगैरेही वरिष्ठांसोबत संबंध ठेवल्यामुळेच मिळतात. आणि स्त्री व पुरुषांना प्रमोशन्स मिळण्याच्या कारणातील तफावत पाहिली तर त्यातही हेच कारण प्रामुख्याने दिलं जातं.

कॉफी उद्योगात, निव्वळ लैंगिक अत्याचाराखेरीज इतरही अनेक प्रकारे स्त्रियांना त्रास दिला जातो. यात, समजा एखाद्या स्त्री कामगाराने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर तिच्या कामाबद्दल मुद्दाम वाईट रिपोर्ट्स द्यायचे, जेणेकरून तिला नोकरी गमवावी लागेल. किंवा अविवाहित स्त्रियांना उद्देशून मुद्दाम खालील वाक्य वापरायचं, उदा.

"नानी आताकुवेका वेवे?" (तुला तर नवरा नाही, मग आमच्याशिवाय तुझ्या 'गरजा' कशा भागणार?)

कॉफी मळ्याच्या मुकादमांमध्ये तर "मामा वा कांबी नि वा किला म्तु" (कॉफी मळ्यांमधील कोणत्याही स्त्रीचं लैंगिक जीवन कोणत्याही पुरुषाच्या आधीन असतं.) ही म्हणच प्रसिद्ध असल्याचंही इथे आवर्जून नोंदवण्यात आलं आहे. यांसारख्या उदाहरणावरून हा रोग किती खोलवर गेलाय, हे लक्षात येईल.

एखाद्या स्त्रीने नकार दिला तर विनाकारण तिच्यावर ओरडायचं, तेही तिच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर, समजा तिने संबंध ठेवण्यास नकार दिला तर कॉफी मळ्यावर राहण्यास जागा द्यायची नाही, इत्यादी अनेक प्रकार तिथे चालतात. कैकदा काम सुरू असतानाच संबंध ठेवले जातात, जेणेकरून मुकादम इत्यादी मंडळी लगेच 'मोकळी' होतील.

अशी ही कॉफीची काळी गाथा आहे. तिचं सेवन करणाऱ्याला तजेला मिळतो हे खरं, पण मळ्यात कष्ट करणाऱ्या मजुरांना व अल्पभूधारक उत्पादकांना विशेष काही हाताला लागत नाही. ही रड शेतीक्षेत्रातच तशी सार्वत्रिक आहे. जागतिक कॉफी उद्योगात ब्राझील व व्हिएतनामच्या तुफान उत्पादनापुढे आफ्रिकेचा पाड लागणं तसंही अवघडच. कॉफीचं उगमस्थान असूनही आज जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनाच्या फारतर दहाबारा टक्क्यांइतकंच उत्पादन तिथे होतं. त्यामुळे उत्पादन काय न त्याचं नियमन काय, सर्वच पातळ्यांवर आनंदी आनंद आहे. भरीस भर म्हणून कामगारांचं सर्वच पातळ्यांवर होणारं शोषणही आहेच.

आता हे सर्व वाचून तोंडातील कॉफी कडू होईल का?
म्हणजे तशी ती व्हावी का?
नाही झाली तर तुम्ही दगड किंवा अपार स्वार्थी ठराल का?

मला यांपैकी कोणत्याही प्रश्नाचं नेमकं उत्तर माहीत नाही. कॉफी माझा जीव की प्राण आहे हे खरंच, आणि लेखाच्या निमित्ताने हे सर्व वाचून सुन्न व्हायला झालं हेही खरंच. पण त्यापलीकडे मी काय सांगू? या लेखाच्या निमित्ताने आफ्रिकेतील कॉफीचं एक अज्ञात, दुर्लक्षित विश्व मी वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो जमलाय की नाही हे शेवटी वाचकच ठरवतील, इतकंच मी सांगू शकते.

संदर्भ :
https://verite.org/africa/explore-by-commodity/coffee/
https://www.afdb.org/fileadmin/uploads/afdb/Documents/Publications/4-Cof...
https://agoa.info/images/documents/5157/Ethiopian_Coffee_Industry_Value_...
https://laborrights.org/sites/default/files/publications-and-resources/K...
https://www.heifer.org/blog/newsworthy/rooted-in-racism-coffees-bitter-o...
• Coffee - a Dark History. Antony Wild.
• The Devil's cup - Coffee, the driving force in History. Stewart Lee Allen.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...