Tuesday, August 6, 2024

बसने नर्मदा परिक्रमा

 https://www.maheshnaik.com/narmada-parikrama/

बसने नर्मदा परिक्रमा-Narmada Parikrama by Bus


Narmada Parikrama by Bus

नर्मदा परिक्रमा (#NarmadaParikrama) ही हिंदूंच्या पवित्र मानल्या गेलेल्या तीर्थयात्रांपैकी एक व गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व नर्मदा या पवित्र नद्यांपैकी परिक्रमा केली जाणारी एकमेव नदी. अपमृत्यू टाळण्याकरिता शिवाच्या शोधात मार्कंडेय ऋषी नर्मदाकिनारी आले व त्यानी पहिल्यांदा नर्मदेची प्रदक्षिणा केल्याची कथा स्कंदपुराणातील नर्मदा पुराणाच्या भागात येते. त्याना पुण्यप्राप्ती झाली व अपमृत्यूचे देखील निवारण झाले आणि त्या मुळेच पुढे नर्मदा प्रदक्षिणेची प्रथा पडली. पुढे आठव्या शतकात आदि शंकराचार्य देखील आपल्या गुरूच्या शोधात येथे आले आणि आपल्या गुरुना पुराच्या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी जे स्तोत्र रचले ते आजही नर्मदाष्टक म्हणून ओळखले व गाईले जाते.

Narmada Parikrama by Bus

नकाशा – संपूर्ण श्री नर्मदा परिक्रमा, माँ नर्मदा साहित्य सदन, अमरकंटक यांच्या पुस्तकातून केवळ संदर्भाकरिता, साभार

मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावून पश्चिमगामिनी होणारी नर्मदा एकमेव मोठी नदी. ती गुजरात मधील भरुच येथे समुद्राला मिळते. सर्वसाधारणपणे परिक्रमा करताना ती ओंकारेश्वर येथे सुरु करुन नदीप्रवाहाला कायम उजवीकडे ठेवत ही प्रदक्षिणा केली जाते. यात मधे नदी ओलांडली जात नाही. जेथे ती समुद्राला मिळते तेथेच ती पोहून ओलांडली जात असे पण आता ती पुलावरुन वाहनाने ओलांडता येते.

आम्हीही बसने नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली. त्याची संकल्पपूजा आम्ही ओंकारेश्वरच्या घाटावर केली. त्या आधी आम्ही ममलेश्वर च्या शिवमंदिराला भेट दिली. ममलेश्वर व ओंकारेश्वर ही दोन लिंगे मिळून एक पूर्ण ज्योतिर्लिंग होते असे मानले जाते. पावसाळ्याच्या दिवसात याआधी मांधाता बेटावर असलेले ओंकारेश्वर नदीकाठापासून पूर्णपणे विलग होत असे त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ओंकारेश्वर ऐवजी ममलेश्वर हेच मुख्य लिंग समजले जाई, व म्हणून त्याला अर्ध्या ज्योतिर्लिंगाच्या मान मिळाला आहे.

Narmada Parikrama by Bus
ममलेश्वर देवस्थान
Narmada Parikrama by Bus
ओंकारेश्वर देवस्थान

याठिकाणी आम्ही बसने केलेल्या परिक्रमेबद्दलची थोडक्यात माहिती, मार्ग, वाटेतील मंदिरांची माहिती व आमचे अनुभव, याचे संकलन आहे.

पायी चालणारे परिक्रमावासी

परिक्रमा पायी केली तर कमीतकमी ४ महिने (तरुण व्यक्ती रोजचे ३०-३५ किमी चालणे गृहीत धरून) ते सर्व साधारणपणे ३ वर्षे लागतात. यात चातुर्मासात धर्मशाळा उपलब्ध नसल्याने, सर्वत्र पूर, चिखल सदृश्य परिस्थिती असल्याने  या   कालावधीत नर्मदा परिक्रमा बंद असते. त्यामुळे अशा प्रकारच्या परिक्रमाना ३ ते ३-१/२ वर्षापर्यंतचा  कालावधी  लागू शकतो.

पण तुम्ही परिक्रमा पायी करा अथवा वाहनाने, सुरवातीला संकल्प पूजन व अखेरीस संकल्प पूर्ती हे केल्यानंतरच परिक्रमा पूर्ण झाली असे मानले जाते.  परिक्रमेचे काही नियम आहेत ते पाळून हि परिक्रमा करावी लागते. ते म्हणजे  पूर्ण प्रदक्षिणेत  नर्मदा नदी कोठेही ओलांडू नये. नदी उजव्या हाताला ठेवत नदीला वळसा घालत हि प्रदक्षिणा करावी.

प्रभू ट्रॅवेल्स, दादर  यांनी या यात्रेचे आयोजन अतिशय शिस्तबद्धपणे केले होते त्यामुळेच यात्रा खूप छान पार पडली. त्यातील प्रमुख मुद्दे येथे मी मांडतो म्हणजे वाचकांच्या मनात असणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.

(१) यात्रा ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा नदीला उजवीकडे ठेवत पार पडली.
(२) काही वेळा नदी ओलांडावी लागू नये म्हणून गूगल ने जरी जवळची वाट दाखवली तरी दूरचा रस्ता घेतला गेला.
(३) प्रथम दिवशी घाटावर मैय्या पूजन व संकल्प पूजा केली गेली. प्रत्येक दिवशी एकदा तरी नर्मदा भेट घडली जेथे आम्ही नर्मदा पूजन, आरती व नर्मदाष्टक म्हटले.
(४) सर्व प्रवासादरम्यान भजने अथवा भक्तिगीते (प्रवाशांनी गायलेली अथवा गाडीत वाजणारी) लावून वातावरण मंगलमय ठेवले गेले.
(५) प्रत्येक ठिकाणची ऐतिहासिक, आध्यात्मिक माहिती पुरविली गेली. यात विठ्ठलराम महाराज, सिद्धमाई यासारख्या महात्म्यांची भेट घडविली गेली.
(६) सहल आयोजक प्रभंजन व रागिणी देसाई स्वतः सहलीत उपस्थित होते व सर्वांकडे लक्ष पुरवीत होते. प्रभंजन यांचे वडील श्री सुहास देसाई काका देखिल होते व बऱ्याच घटना, प्रसंग अवगत करून देत होते.
(७) यांचे स्वतःचे स्वयंपाकी व साहित्य सोबत असल्याने प्रत्येक ठिकाणी रुचकर, गरम, वेगवेगळ्या प्रकारचे भोजन रोज मिळत गेले. चहा, नाश्ता, जेवणखाण यातली आपुलकी अन्नाच्या स्वादात उतरत होती. आचारी व वाढपी त्यांच्याच घरचे असल्याप्रमाणे लोकांची काळजी घेत होता त्यामुळे स्त्रीवर्ग अतिशय खुश होता.
(८) बसची स्थिती, चालक उत्तम असल्याने कुणालाही एवढ्या दीर्घ (सुमारे ३२०० किमी) प्रवासाचा त्रास जाणवला नाही.
(९) सर्व ठिकाणी उत्तम एसी हॉटेल्स मिळाल्याने व्यवस्थित झोप मिळाली, गरम पाण्याने आंघोळी करता आल्या.
(१०) रोज पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असल्याने बाहेरचे पाणी पिण्याची गरज भासली नाही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी बाटल्यांची एकत्रित विल्हेवाट लावण्याची पद्धत पहिल्याच दिवशी समजाविली गेली.
(११) सर्व सहयात्रींनी वेळेवर (अथवा वेळेआधीच) येत सर्व वेळा पाळून यात्रा आयोजकांना उत्तम सहकार्य केले.
(१२) या यात्रेत जवळपास ३० (७५%) स्त्रिया होत्या. वाटेत प्रवासादरम्यान (विशेषता मध्य प्रदेशात) टॉयलेट्स उपलब्ध नव्हते त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती पण यात आयोजकांनी त्यांच्या परीने शक्य तितका प्रयत्न केला, ही एकमेव गोष्ट यात्रा या दृष्टिकोनातून लक्षात घेतली तर उरलेल्या सर्व बाबतीत यात्रा अतिशय सुखकर झाली. सर्व स्थळे (ठरविलेल्या पेक्षा जास्तच) व्यवस्थित व घाई गडबड न करता पाहता आली.

या सर्वांचे सार एकच ……

नर्मदा परिक्रमा करावी तर ती फक्त आणि फक्त प्रभू ट्रॅवेल्स बरोबरच.

 

 

१-ओंकारेश्वर ते शहादा-Omkareshwar to Shahada - नर्मदा परिक्रमा


बसने नर्मदा परिक्रमा सुरुवात

Omkareshwar to Shahada

Omkareshwar to Shahadaनर्मदा परिक्रमेच्या संकल्प पूजेनंतर आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास सुरु झाला. या यात्रेत आम्ही नर्मदा उजव्या हाताला ठेवत प्रवास करण्याचा नियम शेवटपर्यंत पाळला. दर दिवशी एकदा तरी नर्मदा दर्शन व पूजा झाली व त्याचबरोबर त्याचवेळी नर्मदाष्टकाचे पठणदेखील करण्यात आले. घाट असेल त्या ठिकाणी नर्मदास्नान घडत गेले, असे या यात्रा सहलीचे स्वरूप होते.

पहिल्या दिवशीचा आमचा प्रवास नर्मदेच्या दक्षिण तटावरून, म्हणजे ओंकारेश्वरहून गुजरातच्या दिशेने सुरु झाला. आजच्या दिवसाची नर्मदा भेट, बरवानी येथील राजघाट या ठिकाणी घडली. वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे येथील रस्ता बराचसा पाण्याखाली गेला आहे. पण या ठिकाणी नर्मदाभेट सहज घडू शकते. येथेही आम्ही नर्मदा पूजा व प्रार्थना केली.

बावनगजा

त्यानंतरची भेट होती बावनगजा या जैन तीर्थस्थळाला. येथे जैनांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची ८४ फूट उंच, एकसंध दगडातील दुसऱ्या क्रमांकाची उंच, मूर्ती आहे. (सर्वात उंच १०८ फूट उंचीची मूर्ती नाशिक जवळ मांगी तुंगी येथे आहे (संदर्भ – विकिपीडिया). हे बावनगजा ठिकाण म्हणजे अनेक डोंगरटेकड्यांचा समूह. यापैकीच एका डोंगराच्या कुशीत हे मोहक स्थान वसले आहे.

सुमारे ३१५ किमीचा प्रवास केल्यानंतर पहिली रात्र महाराष्ट्रातील शहादा (जि. नंदुरबार) या ठिकाणी विश्राम केला. दुसऱ्याच दिवशी आणखी पश्चिमेकडे सरकत नर्मदा ओलांडायची होती.

पायी नर्मदा परिक्रमा ही कष्टदायी असली तरी ती करणारे बरेच जण आजही दिसून येतात. त्यासाठी दुर्दम्य इच्छा 

शक्ती व वेळही हवा. समविचारी मित्रमंडळी असतील तर अशी यात्रा सुखद ठरु शकते. पण किमान ४ महिन्यांचा कालावधी तर निश्चितच लागू शकतो, त्यावरचा “वाहन यात्रा” हा पर्याय. येथे रोज माता नर्मदाही भेटते व अशी अनेक आडवाटेवरची देवस्थानेदेखील.

 

२-शहादा-नीलकंठेश्वर-नारेश्वर-केवडिया - नर्मदा परिक्रमा


रंगावधूत स्वामी
बसने नर्मदा परिक्रमा

दुसऱ्या दिवसाचा सुरुवातीचा मोठा टप्पा होता सुमारे २०० किमी चा शहादा ते नीलकंठेश्वर. हे स्थान नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर आहे त्यामुळे आम्ही भरुचच्या खाडीपुलावर नर्मदा ओलांडली. नीलकंठेश्वर येथेही नदीकाठच्या सुंदर परिसरात शंकराचे स्थान आहे. येथेच नर्मदा समुद्राला मिळते त्या परिसरात घाटाच्या पायऱ्याही बांधलेल्या आहेत. प्रथेप्रमाणे आम्ही येथेही कलश पूजन व नर्मदा पूजन केले व सर्व समूहाने खड्या आवाजात नर्मदाष्टक वाचायला सुरुवात केली.

सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।।१।।

(भावार्थ – बिंदुरूपाने प्रकटलेली तू सिंधूपर्यंतच्या प्रवाहाने सुशोभित आहेस. दुष्ट वृत्ती , पाप या मुळे वारंवारच्या होणाऱ्या फेऱ्यांचा नाश तुझ्यामुळेच होतो. तू काल दूतांची भीती हरण करणारी आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो).

आणि नदीच्या पाण्यात तरंग उमटू लागले. आणि सर्वजण अचंबित होऊन त्या तरंगाकडे पाहू लागले कारण ते होते नर्मदेच्या वाहनाचे – पोहत येणाऱ्या मगरीचे. ते पाहताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले व सर्वांनी नर्मदामातेचा जयकार केला.

रंगावधूत स्वामी
रंगावधूत स्वामी

यापुढचा टप्पा होता ६० किमी अंतरावरील नारेश्वर येथील रंगावधूत स्वामींचे समाधिस्थळ. गरुडेश्वरच्या टेंबे स्वामींचे हे शिष्य. यांची दत्त बावनी खूप प्रसिद्ध आहे व अनेक समस्यांवरचा रामबाण उपाय म्हणून ओळखली जाते. हे स्थळ देखील अतिशय रम्य आहे.

या सर्व सहलीत सुमारे ४० सदस्य होत्या व त्यातील ७५ टक्के स्त्रिया आहेत, त्यातील बऱ्याचशा जेष्ठ नागरिक होत्या. कुणी बहीणींबरोबर, तर कुणी मैत्रिणीबरोबर आलेल्या. काही तर एकेकट्या आल्या व इथे त्यानी मैत्रिणी तयार केल्या. या सर्वांचा समान धागा होता तो नर्मदा मैया. तिनेच आपल्याला इथे बोलावले आहे यावर यातील प्रत्येकीची गाढ श्रद्धा होती. या श्रद्धेला जोड मिळाली ती प्रभू ट्रॅव्हल्सच्याच्या अनुभवाची. त्यातूनच ही यात्रा रंगली  व आम्ही उभयतानी देखील तो आनंद अनुभवला.

 

३-गरुडेश्वर टेंबे स्वामी समाधी-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar


Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

Narmada Parikrama – Garudeshwar-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

आजची पहाट झाली तीच गरुडेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनाने. हे मंदिर सुप्रसिद्ध टेंबेस्वामी समाधीपासून जवळच आहे. टेंबेस्वामी हे मूळचे कोकणातील माणगाव या ठिकाणचे. तेथील दत्त मंदिराचीही स्थापना त्यांनीच केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व स्वामी नृसिंह सरस्वती यानंतरचे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) हे दत्ताचा तिसरा अवतार असल्याची त्यांच्या भक्तगणांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात दत्तगुरूंच्या दृष्टांताप्रमाणे ते गरुडेश्वरला आले. इथे त्यांचे वास्तव्य सुमारे वर्षभर होते आणी अखेरीस इथे नर्मदेच्या काठी त्यांनी, आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३६ (इ स १९१४) ला समाधी घेतली. टेंबेस्वामी मंदिरातील पुजाऱ्यांनी स्वामींच्या चरित्राबद्दल विस्ताराने माहिती दिली.

या समाधिस्थळाला लागूनच असलेल्या निरीक्षणस्थानहून नर्मदेचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते व पूर्वेकडे असलेला जगातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळाही (Statue of Unity) पाहायला मिळतो. मुख्य सरदार सरोवर धरणाचे एक छोटे उप-धरण या ठिकाणी आहे व त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे नर्मदेची गाज आपल्याला सतत ऐकायला मिळते. येथेच आम्ही आजचे सामूहिक नर्मदाष्टक पठण केले व Statue of Unity ला भेट देऊन माहेश्वरच्या २५० किमीच्या दीर्घ प्रवासासाठी निघालो.

Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

त्वदम्बु लीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकम
कलौ मलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकं
सुमस्त्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक् शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ।।२।।

भावार्थ –
तुझ्या जळात वास करणाऱ्या दीन मत्स्यांनादेखील तू दिव्यत्त्व देतेस. कलियुगात मल-दोषांची भारवाहक असलेली तू सर्व तीर्थांमधील श्रेष्ठ तीर्थ आहेस. मासे, कासवे, मगरी, चक्रवाक पक्षी यांची तूच कल्याणकर्ती आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

वाटेत दुपारच्या जेवणासाठी एका छोट्याशाच पण सुंदर हनुमान मंदिरात थांबलो. सर्व जण  मंदिराच्या इतके प्रेमात पडले कि बऱ्याच जणांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरघोस मदत केली. यानंतरचा मुक्काम माहेश्वरला होता  व  येथील घाटावर आंघोळ करून माहेश्वर दर्शन करता येईल.

 

Day 4-Maaheshwar of Ahilyabai Holkar-अहिल्यादेवींचे माहेश्वर


Ahilyabai Holkar

(छायाचित्र – जलकोटी एकमुखी दत्त मंदिर )

Narmada Parikrama – Maaheshwar of Ahilyabai Holkar

कालच्या  रात्री माहेश्वरला पोहोचून मुक्काम केला होता. माहेश्वर म्हटल्यावर ज्या गोष्टी आठवतात त्या म्हणजे इंदोरच्या होळकर घराण्यातील लोकप्रिय राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व माहेश्वरी साड्या. अहिल्यादेवी व नर्मदेचा फार जवळचा संबंध. त्यानी जे घाट नर्मदेच्या काठावर बांधले त्यांपैकी माहेश्वरचा घाट अतिशय सुंदर आहे. आजचे नर्मदास्नान या सुंदर घाटावरच्या स्वच्छ पाण्यात व्यवस्थित करता आले. येथे पुरुष व स्त्रियांकरिता वेगळे घाट आहेत.

माहेश्वरची खासियत म्हणजे येथील साड्या. त्याना रेवा, नर्मदा पॅटर्न अशी वेगवेगळी नावे देऊन ग्राहकांना चागलेच मोहविले जाते. येथील महाराष्ट्रीयन पवारांचे दुकान महाराष्ट्रातील ग्राहकांच्या विशेष आवडीचे. ३-४ पिढ्यांपूर्वी आलेल्या पवारांनी आता इथे चांगलाच जम बसविला आहे व या कुटुंबियांची आता “पायल” व “अभिनव हँडलूम” या नावाने इथे आणखी दोन दुकाने झाली आहेत. सर्वसंग परित्याग न करता आलेल्या नर्मदा परिक्रमार्थीना माहेश्वरच्या घाटाबरोबर या कपड्यांचा (साड्या/ड्रेस मटेरियल) चा मोह न पडला तरच नवल.

येथे जवळच जलकोटी या ठिकाणी एकमुखी दत्ताचे खुप मोठे मंदिर आहे. तेदेखील न चुकता पाहायला हवे. कदाचित भारतातील दत्ताचे हे सर्वात मोठे मंदिर असावे.

सहस्रार्जुन मंदिर
सहस्रार्जुन मंदिर

माहेश्वरचा किल्ला हे अहिल्यादेवींचे वसतीस्थान. या किल्ल्यातही अख्खं गाव वसलेलं आहे. येथेच अहिल्यादेवींचा राहता वाडा, त्यांचं सुंदर पूजाघर व त्याचबरोबर अलीकडच्या काळात उभारलेला त्यांचा पूर्णाकृती पुतळा देखिल आहे. किल्ल्यातही अनेक हातमाग व माहेश्वरी साड्यांची दुकाने चांगली देखील आहेत. वाड्याखालीच काशीविश्वेश्वराचे अप्रतिम देऊळ आहे. तर किल्ल्यावर सहस्रार्जुन मंदिर, ११ अखंड ज्योती मंदिर अशा अनेक मंदिरांचा समूह आहे. हे सगळं पाहिल्याशिवाय यात्रेकरूचे पाय येथून निघणे अशक्यच, म्हणून दिवस राखूनच माहेश्वरला भेट दयावी व अहिल्यादेवींची भक्ती डोळा भरून पहावी आणि त्यातील अंश आपल्याही उरात साठवून घ्यावेत.

काशी विश्वेश्वर मंदिर, माहेश्वर किल्ला

सायंकाळी सूर्यास्त पाहून साग्रसंगीत नर्मदा आरती केली. तोच एक व्यक्ती येऊन किनाऱ्यावर सर्वत्र पडलेला केरकचरा काढू लागला. चौकशी केल्यावर कळले की गेली कित्येक वर्षे आपले काम संपवून आल्यावर सेवाभावनेने तो हे काम करतो व मगच घरी जातो. अशीही भक्ती असते. आपल्या नर्मदामैय्येच्या स्वच्छतेची काळजी करणारी.

महागभीर नीर पुर पापधुत भूतलं
ध्वनत समस्त पातकारि दरितापदाचलम
जगल्ल्ये महाभये मृकुंडूसूनु हर्म्यदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥३॥

भावार्थ – तुझ्या महापुराने तू भूतलावरील समस्त पापे धुवून काढतेस. पातकांच्या राशी तू नष्ट करतेस. प्रलयकाळी मार्कंडेय ऋषींना देखील तूच आसरा दिलास.अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

Maaheshwar of Ahilyabai Holkar

 

Day 5- Nemavar नर्मदेचे नाभीस्थान-नेमावर


नेमावर

सिद्धेश्वर मंदिर, नेमावर
सिद्धेश्वर मंदिर, नेमावर

सुमारे २०० किमी चा प्रवास करून आम्ही “नेमावर” या ठिकाणी आलो. अमरकंटक या ठिकाणी उगम पावणाऱ्या नर्मदा नदीचे “नेमावर” हे नाभीस्थान मानले जाते. येथेदेखील स्नानासाठी घाट आहेत व घाटाला लागूनच सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी अपमृत्यू निवारणासाठी ज्या शिवलिंगाला मिठी घालत शिवआराधना केली ते हेच अशी आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. या मंदिराच्या स्थापत्य शैली वरून हे मंदिर ११-१२ व्या शतकातील परमार कुलीन राजांनी निर्मिले असावे असा फलक भारतीय पुरातत्त्वविभागाने लावलेला आहे.

सिद्धेश्वर मंदिर वैशिष्ट्ये

छोटेखानी असलेल्या या मंदिराची रचना आकर्षक असून रंगमंडप, सभामंडप व गर्भगृह यात विभागलेली आहे. पैकी सभामंडपाच्या छताचे वर्तुळाकार कोरीव काम आकर्षक असून वर्तुळाभोवती विविध मुद्रेतील सुरसुंदरी घडविलेल्या आहेत. त्या फारश्या आकर्षक नसल्या तरी भारतातील इतर मंदिरांशी साधर्म्य दर्शवितात. मंदिराच्या रंगमंडपावर बाहेरील बाजूने दशावतारां

सिद्धेश्वर मंदिर, नेमावर
गर्भगृहाच्या द्वारावरील अप्रतिम कोरीव काम

ची एक पट्टिका आहे पण तिचे काम देखील फारसे आकर्षक नाही. यातीलच एका बाजूच्या शिखरपट्टीकेवर काही मैथुन शिल्पे देखील आहेत. मंदिराच्या बाह्यांगवर बरेच शिल्पकाम असून येथे ब्रम्हा, विष्णु, महेश, गणेश तसेच वराह अवतार, महिषासूर मर्दिनी अशा अनेक मूर्तींचे भग्नावशेष पाहायला मिळतात.

सभामंडपाच्या छतावरील दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील दर्पणसुंदरी

मंदिराच्या वरच्या बाजूला चिन्मयानंद आश्रम आहे. या ठिकाणचे सध्याचे प्रमुख श्री विठ्ठलराम महाराज यांची भेट झाली. या छोट्याश्या भेटीत महाराजानी “अहंकार बाजूला ठेवून कर्म करीत रहा” याचा संदेश काही निवडक कथांद्वारे दिला तो ऐकून मन प्रसन्न झाले.

सिद्धेश्वर मंदिर, नेमावर
सिद्धेश्वर मंदिरावरील ब्रम्हा

तेथून निघतानाच नाशिकचा एक तरुण परिक्रमावासी भेटला. २५-३० चा तरुण, एकटाच पायी परिक्रमा करत होता. व्यवसायाने इंजिनिअर असलेला हा तरुण कामावरून सुट्टी घेऊन परिक्रमा करतोय हे पाहून आम्हा सर्वांना कौतुक वाटले व त्याला शुभेच्छा देत आम्ही परतीच्या मुक्कामाला निघालो.

नर्मदाष्टक ४

गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम यदा
मृकुंडूसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदा
पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥४॥

ज्या तुझ्या जलाचे मार्कंडेय, शौनक, सुरेंद्र सेवन करतात त्या जलाच्या दर्शनाने माझे भय पळून जाते. पुनर्जन्माच्या भवसागरातून मुक्ती देणाऱ्या अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

मंडपावरील दशावतार पट्टीका
मंडपावरील दशावतार पट्टीका
 

Day 6-Bhedaghat -नेमावर ते जबलपूर-भेडाघाट - नर्मदा परिक्रमा


#NarmadaParikrama

६४ योगिनी मंदिर, भेडाघाट
६४ योगिनी मंदिर, भेडाघाट

Day 6-Bhedaghat आजच्या टप्प्यातला प्रवास फार दूरचा म्हणजे जवळपास ३७५ किमीचा होता. एवढा दीर्घ प्रवास केल्यावर आम्ही पोहोचलो ते भेडाघाटाच्या एका सुंदर मंदिरापाशी व ते म्हणजे ६४ योगिनी मंदिरापाशी. वर्तुळाकार आकाराच्या या मंदिराच्या सभोवतालच्या कोष्ठांमध्ये जवळपास ९० मूर्ती आढळून येतात. यात योगिनीमूर्ती तर आहेतच पण काही गणेशमूर्ती देखील आढळून येतात. या मंदिराच्या वर्तुळाकार प्रांगणात एक सुंदर शिवमंदिर आहे. नंदीवर बसलेल्या शंकर पार्वतीची मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य. असे शिवमंदिर इतर कुठेच आढळत नाही. यापैकी वर्तुळाकार मंदिराची निर्मिती इ स १००० च्या सुमारास कलिचुरी वंशीय राजांनी केली तर मधील शिवमंदिराची निर्मिती १२ व्या शतकातील गुजरात मधील राणी गोसलदेवीने केल्याची माहिती मिळते. या मंदिरातील शिवप्रतिमा उत्कृष्ट असली तरी भोवतालच्या योगिनी मात्र भग्नावस्थेत आहेत. भारतातील ६४ योगिनी मंदिरांपैकी हे सर्वात मोठे असल्याचे सांगण्यात येते. भारतीय संसद भवनाची (जुनी) इमारत याच वर्तुळाकार आकारावरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

यानंतर आमची माता नर्मदेशी गाठभेट घडली ती भेडाघाटाच्या प्रवाहात. इथे आम्ही बोटीतून फेरफटका मारला व बोटचालकाकडून विविध संगमरवर प्रकारांची विनोदी पद्धतीने माहिती घेतली. या घाटातील संगमरावराने तयार होणारे विविध काल्पनिक आकार, गमतीशीर घटना इ या होडीवाल्याने मस्त यमक जुळवत सांगितले. येथील सर्वच बोट चालकांचे हे वैशिष्ट्य असल्याने  हे  मात्र अनुभवायलाच हवे.

आता अंधारू लागलं होतं पण अजून एक ठिकाण बाकी होतं ते म्हणजे धुवांधार धबधबा. हा अगदी मिनी (अथवा मायक्रो) नायगाराच जणू. त्यामुळे या प्रवाहाचे उडणारे तुषार आम्ही मनसोक्त अंगावर घेतले व तिथेच आमचे नर्मदापूजन करुन व नर्मदाष्टक म्हणत दिवस संपविला.

नर्मदाष्टक ५

अलक्षलक्ष किन्नरामरासुरादी पूजितं
सुलक्ष नीर तीर धीर पक्षीलक्ष कुजितम
वशिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥५॥

भावार्थ – लक्षावधी देव, किन्नर, असूर तुझी पूजा करतात. तुझ्या तीरावरील असंख्य पक्षिगण कूजन करीत तुला भजतात. वसिष्ठ, पिप्पलादिकांचे कल्याण करणाऱ्या अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

६४ योगिनी मंदिर, भेडाघाट
६४ योगिनी मंदिर, भेडाघाट
 

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक नर्मदा परिक्रमा


त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

Bhetaghat-Amarkantak त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

Day 7 of Narmada Parikrama by Bus – Bhedaghat to Amarkantak

आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. आज आमच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होत असताना आमच्या दिवसाची सुरुवात ग्वारीघाटावरील (गौरीघाट?) नर्मदा मैयाच्या आरतीने व नर्मदाष्टकाने व्हावी हा किती सुखद योगायोग. उगवता सूर्य पूर्वेच्या भाळीच्या ललाटबिंबासारखा दिसत असताना आमच्या मुखातून शब्द उमटत होते,
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

नर्मदाष्टक ६

सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षटपदै
धृतम स्वकीय मानषेशु नारदादि षटपदै:
रविन्दु रन्ति देवदेव राजकर्म शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥६॥

भावार्थ – सनत्कुमार, नचिकेत , कश्यप , अत्री , नारद इ नी तुझ्या पदकमालांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले आहे.तू सूर्य, चंद्र, देवराज इंद्र यांनाही त्यांच्या चांगल्या कर्मानी सुखावले आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

Bhetaghat-Amarkantak कपिलधारा धबधबा

Bhetaghat-Amarkantak दूधधारा धबधबा
दूधधारा धबधबा

अमरकंटक कडे प्रवास करताना आमच्यामधील आंतरपाट दूर झाल्यानंतरच्या ३० वर्षांचा जीवनपट आमच्या डोळ्यासमोरून सरकत होता. ही ३०वी वर्षापूर्ती नर्मदा परिक्रमेत होणे आमच्यासाठी फारच सुखद होते. बसमधे आज आम्हाला कपिलधारा तीर्थाजवळ आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सिद्धमाई यांच्या सिद्धीबद्दल ऐकायला मिळाले तसेच सहप्रवासी डॉ गीता दलाल यांच्याकडून आपल्या शरीरातील चक्रांबद्दल.

संध्याकाळपर्यंत आम्ही अमरकंटकला पोहोचलो. येथून कपिलधारा व दूधधारा ही उत्तर बाजूचीच दोन स्थाने. अजून अमरकंटकचा वळसा पूर्ण झाला नसल्याने आज ही दोन स्थाने पाहून घेतली. उगमापासून येणारे पाणी येथे काही उंचीवरून धबधब्यांच्या रुपात झेपावत खाली वाहते. पैकी कपिल मुनींच्या तपाचे स्थान ते कपिल धारा टीएसआर दुर्वास मुनींच्या तपाचे दूध धारा. दूध धारेच्या गुहेसाठी थोडे खाली उतरावे लागते. आता तेथील गुहा विस्तारून या गुहेत पिंडीसोबत एक ऋषी मूर्ती व एक देवीची मूर्ती ठेवली आहे. त्या शांत, रम्य वातावरणात धबधब्याचा आवाज मोहवत होता, पण अंधार पडू लागल्याने पुन्हा वार चढलो. मधे योगिनी सिद्धमाई यांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेतले व हॉटेलवर परतलो.

 

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri


Narmada Parikrama - Amarkantak to Dindouri

Narmada Parikrama – Amarkantak to Dindouri

अमरकंटकाच्या गोड गुलाबी थंडीत आज थोडं उशिरा उठता आलं. रामघाट जवळच होता. सकाळची आरती व नर्मदाष्टक तेथेच करायचे ठरलं व सर्वजण शेजारील कल्याण आश्रम, मृत्युंजय आश्रम पहात राम घाटावर पोहोचलो. नर्मदा मातेचे साग्रसंगीत पूजन करुन आरत्या केल्या व तसेच नर्मदाष्टक देखील पूर्ण केले.

नर्मदाष्टक ७

अलक्षलक्ष लक्षपाप लक्ष सार सायुधं
ततस्तु जीवजंतु तंतु भुक्तिमुक्ति दायकं
विरन्ची विष्णु शंकरं स्वकीयधाम वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥७॥

भावार्थ – तू असंख्य दृश्य व अदृश्य अशांच्या लक्षावधी पापराशींचा नाश करणारी आहेस.तूच सर्व जीवजंतूना भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहेस.तूच ब्रह्मा, विष्णु व महेश यांना त्यांच्या धामावर प्रस्थापित करणारी आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

अमरकंटकमध्ये कल्याण सेवा आश्रम आणि मृत्युंजय आश्रम हे २ आश्रम पाहण्यासारखे आहेत. या  पैकी यातील मृत्युंजय आश्रमात झाशीची राणी, मगरींवर उभी असलेली शिवपुत्री नर्मदा यांचे देखणे पुतळे आहेत.

अमरकंटक येथे बाहेर फिरताना शेजारच्या धर्मशाळेपाशी महाराष्ट्रातील येवला या ठिकाणाहून आलेले यात्रेकरू भेटले. त्यातही बऱ्याच स्त्रिया होत्या. बिचाऱ्या प्रवासाने बेजार झाल्या होत्या. थोडीशी चौकशी करताच कळले की त्यांच्यापैकी बरेच जण बदलत्या पाण्याचा त्रास झाल्यामुळे आजारी पडले होते. बस मधे सुमारे ४० यात्रेकरू, आचारी, इ धरून ५० जण होते. त्याना कपिलधारा व दुधधारा या तीर्थांपाशी व घाटावर स्नानाला जायचे होते व त्यासाठी त्यांच्या सहल आयोजकाने त्यांना जीपवाल्यांशी संगनमत करून प्रत्येकी ३००/- अधिक सांगितले होते, कारण काय तर तिथे बस जात नाही (आम्ही मात्र काल बसनेच गेलो होतो). भोळ्या भाबड्या भाविकांना असेही लुबाडले जाते. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी, शुद्ध पाणी मिळण्याचे महत्त्व आपल्याला इथे लक्षात येते. “पेट सलामत तो यात्रा पचास”.

दुपारच्या भोजनानंतर आम्ही छोट्या गाड्यांमधून नर्मदेच्या उगमस्थानाकडे निघालो. “माई का बगीचा” नावाच्या या ठिकाणी एका छोट्याश्या कुंडात हा उगम असल्याची धारणा आहे. तेथून पुढे “नर्मदा उद्गम मंदिर” समूहापर्यंत भूगर्भाखालून प्रवास करते (सुमारे १ किमी). नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी माई का बगीचा इथे नर्मदेला उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे येण्यासाठी वळसा घातला की पुन्हा उत्तर बाजूकडे न जाण्याची काळजी घ्यायची असते. तसे फलक पण जागोजागी असतात.

अमरकंटकला एक श्रीयंत्र मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १९९१ मध्ये सुरु झालेय पण अजून पूर्ण झालेले नाही याचे मुख्य कारण म्हणजे या मंदिराचे निर्माणकार्य फक्त गुरु पुष्य योगाच्या पंधरवड्यातच सुरु राहाते व इतर वर्षभर ते बंद ठेवले जाते.  या मंदिराची निर्मिती महामंडलेश्वर अटल पीठाधीश्वर स्वामी सुखदेवानंद यांच्या देखरेखीखाली होत आहे.

येथून जवळच अजून दोन नद्या उगम पावतात, भद्रा व शोण. पण यातील भद्रा नदी अगदी १०-२० फुटातच शोण  नदीला मिळते (संगम) व हि शोण  नदी पुढे पूर्व दिशेने वाहात जाते (म्हणजेच नर्मदेच्या अगदी विरुद्ध दिशेने).

परतीच्या वाटेत अजून एक वयोवृद्ध परिक्रमवासी भेटले. वय वर्षे ७६. दंतेवाडा परिसरातील जंगलातून एकटेच चालले होते. गेली २ वर्षे परिक्रमेत आहेत. आता ओंकारेश्वरला पुन्हा पोहोचतील तेव्हा ही परिक्रमा पूर्ण होईल. वाटेत गाव, मंदिरे, धर्मशाळा अशा ठिकाणी मुक्काम करायचा. लोक श्रद्धेने देतील तेवढे खायचे. चातुर्मासात एखाद्याच ठिकाणी मुक्काम करुन रहायचं असा दिनक्रम. मैय्या वरती प्रचंड श्रद्धा.

आम्ही तरी सुखवस्तू पद्धतीने राहतो, जेवतो व फिरतो आहोत. पण आज सकाळी भेटलेले येवलेकर यात्रेकरू असो, की हे ७६ वर्षाचे एकट्याने चालणारे बाबा, माणसे नक्की कोणत्या अपेक्षेने की श्रद्धेने हे खडतर कर्म करतात याचाच विचार करीत राहिलो.

अमरकंटकहून आजचा प्रवास छोटासा होता. अगदी १०० किमी हुन कमी. त्यामुळे साधारण २ तासात दिंडोरी या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

Narmada Parikrama - Amarkantak to Dindouri

 

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli


Narmada Parikrama - Dindori to Kareli

Narmada Parikrama – Dindori to Kareli

आजच्या दिवसाची नर्मदामाईची भेट घडली ती महाराजपूरच्या संगमावरील घाटावर. या ठिकाणी बंजारा व नर्मदा या दोन नद्यांचा संगम आहे. पैकी नर्मदेच्या बाजूला मांडला किल्ल्याचा प्रदेश येतो. या संगमावर छोटासा घाट आहे व संतोषी माता, शनीदेव अशी काही मंदिरे व एक जुन्या धाटणीची विटांची विहीर आहे. नर्मदामातेची एक मूर्ती देखील आहे. आजचे नर्मदापूजन व आमचे नर्मदाष्टक याच ठिकाणी झाले.

नर्मदाष्टक ८

अहोमृतम स्वनं श्रुतम महेश केशजा तटे
किरात सूत वाड़वेषु पण्डिते शठे नटे
दुरंत पाप ताप हारि सर्वजंतु शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥८॥

भगवान शंकराच्या जटेतून निघालेल्या तुझ्या तीरावर तुझा आवाज ऐकत आलेला मृत्यू भाग्यकारी आहे. किरात, सूत, वाडव, पंडित, शठ, नट अशा सर्वांच्या दुस्तर पापांचे देखील तू हरण करुन सर्व जीवांचे तू कल्याण करणारी आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

Narmada Parikrama - Dindori to Kareliदुपारच्या भोजनानंतर ज्योतेश्वर येथील गुरु गुंफा,लोधेश्वर स्फटिक लिंग, राजराजेश्वरी मंदिर अशी काही मंदिरे आहेत. यातील गुरु गुफा याच ठिकाणी असलेल्या शंकराचार्यांनी नर्मदाष्टक रचले असे मानतात. येथील राजराजेश्वर मंदिर या ठिकाणी नवीन योगिनीमूर्ती आहेत तर लोधेश्वर मंदिरात नवीनच स्फटिक शिवलिंग असलेले मंदिर आकार घेत आहे. या सर्व भेटी देऊन करेली मुक्कामी प्रवास सुरु केला.

Narmada Parikrama - Dindori to Kareli

 

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram


Narmada Parikrama – Kareli to Narmadapuram

मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ आम्हाला काल प्रथमच बसली. करेलीच्या हॉटेल वर पोहोचताच आम्हाला समजले की आमच्या खोल्यांपैकी ५ खोल्या काही राजकीय नेत्यांनी अडविल्या आहेत व अर्ध्या लोकांची सोय दुसऱ्या हॉटेल मधे करावी लागेल अथवा काहींना इतरांसोबत आहेत त्या खोल्यांमध्ये सामावून घ्यावे लागेल. आतापर्यंत बऱ्याच ओळखी झाल्याने लोकांनी एकमेकांसोबत एकत्र राहणेच पसंत केले.

Narmada Parikrama - Kareli to Narmadapuram
बर्मन घाटावरील आरती

सकाळी नेहमीच्या वेळेवर म्हणजे ६ वाजताच बर्मान (की ब्रम्हांड?) घाटावर नर्मदा पूजनाला निघालो. येथे नर्मदेचा प्रवाह मात्र खळाळणारा होता. बाहेर थंडी असून पाणी मात्र उबदार होते. ही पूजा आटोपून पुढे नर्मदापूरम (आधीचे होशंगाबाद) साठी मार्गस्थ झालो.

बर्मन घाटावर आम्ही सर्व आरती/नर्मदाष्टक म्हणत होतो. त्याचवेळी एक स्थानिक मध्यमवयीन स्त्री तेथे स्नानाला आली. आम्हा सर्व स्त्री-पुरुषांचा समूह तेथेच उभा असताना तिने त्या ठिकाणी नदीत डुबकी मारत स्नान केले, कपडे बदलले व कपडे धुण्याच्या कामाला लागली. सुसंस्कृत अशा भारतीय संस्कृतीचे दर्शन आम्हाला तेथे घडले. इतक्या अनोळखी समूहासोर एक स्त्री विनासंकोच आपली स्नानादी  कामे उरकते. यात न तिला काही वावगे वाटले न तेथे उभ्या असणाऱ्यांना.

यापुढचा नर्मदापूरमचा प्रवास सुमारे १८० किमी चा होता. संध्याकाळच्या वेळी येथे खर्राघाट या ठिकाणी असलेल्या एकमुखी दत्ताच्या मंदिराला भेट दिली.  याच ठिकाणी आमची भेट श्री रोहित प्रधान या बडोद्याच्या परिक्रमावासियांशी झाली. तेथे ३६ वर्षे ते आपले कोचिंग क्लास चालवत होते. ते नोव्हेंबर २१ पासून परिक्रमा करताहेत व चातुर्मासामुळे (त्यांच्या परिक्रमा काळातील दुसरा) ते येथील आश्रमातच रहात होते. आता पुढे मार्च २०२४ पर्यंत ओंकारेश्वरला पोहोचून आपली परिक्रमा पूर्ण करतील. येथे असलेल्या दत्तमंदिरासमोरील वडाच्या झाडाच्या ढोलीत टेंबे स्वामींनी तपश्चर्या केल्याची माहिती त्यांच्याकडूनच आम्हाला मिळाली.

माझ्या मनातला प्रश्न मग मी त्यांना विचारला की सर्वसाधारणपणे परिक्रमा करणाऱ्यांच्या अपेक्षा / श्रद्धा / ईच्छा काय असतात? यावर त्यानी दिलेल्या उत्तराने आम्ही भारावून गेलो. ते म्हणाले “माझा संकल्प असा आहे की, जर मला या नर्मदा परिक्रमेचे काही पुण्य मिळणार असेल तर ते माझ्या देशाच्या प्रगती व उन्नती साठी वापरले जावे व तसेच ते माझ्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी व उत्थानासाठी कामी यावे”.

पुढे सेठाणी घाटावर जाऊन आम्ही समूहाने नर्मदाष्टक म्हटले.

नर्मदाष्टक ९

इदन्तु नर्मदाष्टकम त्रिकलामेव ये सदा
पठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतिम कदा
सुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवम
पुनर्भवा नरा न वै त्रिलोकयंती रौरवम ॥९॥

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

भावार्थ – जे लोक या नर्मदाष्टकांचे तिन्ही त्रिकाळ पठण करतील ते कधीही दुर्गतीला जाणार नाहीत. देवानाही दुर्लभ असलेले शिवाचे धाम(शिवलोक) त्या प्राप्त होईल आणि ते नरकात कधीही न जाता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून देखील मुक्त होतील.

नर्मदा आरती

यानंतरचा सोहळा होता तो नर्मदा मैयाच्या आरतीचा. त्याची तयारी घाटावर सुरु झाली होती. ते पाहून तेथील पुरोहितांना आम्हालाही आरती घेऊ देण्याची विनंती केली, जी त्यानी सहज मान्य केली व आम्ही एक आनंदसोहळा अनुभवला. घाटावरील सर्वच लहानथोर या आरतीत सहभागी झाले होते.

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर


Narmada Parikrama – Narmadapuram to Omkareshwar

आज परिक्रमेच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. यात आजचा नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे सुमारे २७५ किमीचे अंतर होते. यात थोडीशी वाट वळवून आम्ही मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी असलेल्या श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी या समाधिस्थळी गेलो. येथे आजही एक धुनी अखंड पेटती असते व येथे बडे दादाजी व छोटे दादाजी अशा दोन समाध्या आहेत.

येथेच पुढे मुख्य रस्त्यालगत सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचेही समाधिस्थळ आहे. ते पाहून आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो, व येथे आमच्या परिक्रमा प्रवासाची समाप्ती झाली. आता उद्या रीतसर उद्यापन व परिक्रमा संकल्प समाप्ती आणि ओंकारेश्वराला अभिषेक केल्यानंतर यात्रा समाप्ती होईल.

आजच्या प्रवासात सर्व सहप्रवाशानी यात्रेच्या प्रवास, जेवण व नियोजनाबद्दल आपली मते मांडली. प्रभू ट्रॅवेल्स यांनी या यात्रेचे आयोजन अतिशय शिस्तबद्धपणे केले होते त्यामुळेच यात्रा खूप छान पार पडली. त्यातील प्रमुख मुद्दे येथे मी मांडतो म्हणजे आतापर्यंत मला विचारल्या गेलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
(१) यात्रा ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा नदीला उजवीकडे ठेवत पार पडली.
(२) काही वेळा नदी ओलांडावी लागू नये म्हणून गूगल ने जरी जवळची वाट दाखवली तरी दूरचा रस्ता घेतला गेला.
(३) प्रथम दिवशी घाटावर मैय्या पूजन व संकल्प पूजा केली गेली. प्रत्येक दिवशी एकदा तरी नर्मदा भेट घडली जेथे आम्ही नर्मदा पूजन, आरती व नर्मदाष्टक म्हटले.
(४) सर्व प्रवासादरम्यान भजने अथवा भक्तिगीते (प्रवाशांनी गायलेली अथवा गाडीत वाजणारी) लावून वातावरण मंगलमय ठेवले गेले.
(५) प्रत्येक ठिकाणची ऐतिहासिक, आध्यात्मिक माहिती पुरविली गेली. यात विठ्ठलराम महाराज, सिद्धमाई यासारख्या महात्म्यांची भेट घडविली गेली.
(६) सहल आयोजक प्रभंजन व रागिणी देसाई स्वतः सहलीत उपस्थित होते व सर्वांकडे लक्ष पुरवीत होते. प्रभंजन यांचे वडील श्री सुहास देसाई काका देखिल होते व बऱ्याच घटना, प्रसंग अवगत करून देत होते.
(७) यांचे स्वतःचे स्वयंपाकी व साहित्य सोबत असल्याने प्रत्येक ठिकाणी रुचकर, गरम, वेगवेगळ्या प्रकारचे भोजन रोज मिळत गेले. चहा, नाश्ता, जेवणखाण यातली आपुलकी अन्नाच्या स्वादात उतरत होती. आचारी व वाढपी त्यांच्याच घरचे असल्याप्रमाणे लोकांची काळजी घेत होता त्यामुळे स्त्रीवर्ग अतिशय खुश होता.
(८) बसची स्थिती, चालक उत्तम असल्याने कुणालाही एवढ्या दीर्घ (सुमारे ३२०० किमी) प्रवासाचा त्रास जाणवला नाही.
(९) सर्व ठिकाणी उत्तम एसी हॉटेल्स मिळाल्याने व्यवस्थित झोप मिळाली, गरम पाण्याने आंघोळी करता आल्या.
(१०) रोज पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असल्याने बाहेरचे पाणी पिण्याची गरज भासली नाही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी बाटल्यांची एकत्रित विल्हेवाट लावण्याची पद्धत पहिल्याच दिवशी समजाविली गेली.
(११) सर्व सहयात्रींनी वेळेवर (अथवा वेळेआधीच) येत सर्व वेळा पाळून यात्रा आयोजकांना उत्तम सहकार्य केले.
(१२) या यात्रेत जवळपास ३० (७५%) स्त्रिया होत्या. वाटेत प्रवासादरम्यान (विशेषता मध्य प्रदेशात) टॉयलेट्स उपलब्ध नव्हते त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती पण यात आयोजकांनी त्यांच्या परीने शक्य तितका प्रयत्न केला, ही एकमेव गोष्ट यात्रा या दृष्टिकोनातून लक्षात घेतली तर उरलेल्या सर्व बाबतीत यात्रा अतिशय सुखकर झाली. सर्व स्थळे (ठरविलेल्या पेक्षा जास्तच) व्यवस्थित व घाई गडबड न करता पाहता आली.

या सर्वांचे सार एकच ……

नर्मदा परिक्रमा करावी तर ती फक्त आणि फक्त प्रभू ट्रॅवेल्स बरोबरच.

आतापर्यंत आमच्यासोबत ही रोजनीशी वाचत अनेक मित्रमंडळींनी नर्मदा वाचनयात्रा केली व मला लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. आमच्या सहप्रवाश्यांनी देखील रोजनिशीचा रोजच्या रोज पाठपुरावा केला. या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.

……महेश नाईक (६ नोव्हेंबर २०२३)

 

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama


#NarmadaParikrama

ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर या नर्मदा परिक्रमेच्या (Narmada Parikrama) प्रवासाची जरी काल समाप्ती झाली असली तरी यात्रेची सांगता / संकल्प पूर्ती होण्याकरिता आवश्यक असणारी “कर्मकांडे” आज पूर्ण केली गेली. यात नर्मदा कलश पूजन, आरती, ओंकारेश्वराला जलाभिषेक व नंतर कन्या पूजन या सर्व गोष्टींची रीतसर पूर्णता केली गेली आणि आमची ही यात्रा संपली.

या सर्व गोष्टी पाहिल्यावर आपलं मन विविध गोष्टींचा विचार करू लागतं. नर्मदा परिक्रमेसारख्या अनेक यात्रा आपल्या देशात पुराणकाळापासून अस्तित्त्वात आहेत. महाभारतात देखील धौम्य मुनी युधिष्ठिराला वनवासात भेटले असताना अनेक यात्रांबद्दल सांगतात. या यात्रांमागचा दृष्टीकोन केवळ धार्मिक नसून सामाजिक व आर्थिक उन्नतीचाही आहे हे आपल्या सहज लक्षात येते.

नदीकिनारी संस्कृतीचे निर्माण व्हायची सुरुवात होते. जगभर सर्वत्र नदीकिनाऱ्याने लोकवस्तीची सुरुवात झाली आहे. तेथूनच आर्थिक व्यवहारांची सुरुवात होत लोकवस्तीची घनता वाढीस लागते. मग यातून नगरसत्ता व राजसत्ता निर्माण होते. त्याचा विस्तार वाढला की आर्थिक केंद्रे तयार होतात व लोकभावना व अर्थकेंद्रे यांना पुरक असे धार्मिक केंद्र उभे राहायला सुरुवात होते. त्या धर्मस्थानाचे महत्त्व वाढण्याकरिता मग मंदिरे मोठी होतात, कथा जोडल्या जातात, पुराणकथांचे संदर्भ जोडले जातात. अनेक तपस्वी, महाराज येथे मानसोपचार तज्ज्ञासारखे काम करतात व त्या त्या भागात त्यांचे प्रस्थ वाढत त्यांचा संप्रदाय तयार होतो. नर्मदाकिनारी वावरताना, वेगवेगळी देवस्थाने, मठ पाहताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एका नर्मदेने परिक्रमा स्वरूपातच कितीतरी लोकाना मनःशांती दिली, समाजस्वास्थ्य दिले, रोजगार दिला, दातृत्त्व वाढीस लावले, भक्तिभाव निर्माण केला, एकात्मता वाढीस लावली, हे आपल्या लक्षात येते.

भारतीय समाजमन मुळातच आध्यात्मिक. त्याची पूर्तता करणारी जी अनेक केंद्रे आहेत, त्यापैकीच ही एक परिक्रमा. याद्वारे नर्मदा मैय्या गेली हजारो वर्षे समाजजीवन बहरवत आली आहे. नर्मदेच्या काठावर असणारी असंख्य मंदिरे, शिवलिंगे, घाट, धर्मशाळा, गावे, मठ, वैरागी, परिक्रमावासी हे सर्व याची साक्ष देत आहेत. आणि हे कसे ते पाहण्यासाठी ही यात्रा प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवी.

आमचा नर्मदा परिक्रमा संकल्प सुखरुपपणे पूर्ण करविणाऱ्या प्रभू ट्रॅवेल्स च्या श्री सुहास देसाई (काका), प्रभंजन (उर्फ प्रभू) देसाई, सौ रागिणी देसाई या सर्वांचे मनापासून आभार. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे आमची यात्रा सुखरुप पार पडली.

ॐ नर्मदे हर

…. Mahesh Naik (7th November 2023)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...