Tuesday, August 13, 2024

जेरुसलेम - एक शापित देवभूमी

 
 जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०१
Submitted by Theurbannomad on 16 May, 2021 - 15:51
jerusalem

२०२१ सालच्या मे महिन्यात, तेही रमझानच्या पवित्र महिन्यात पुन्हा एकदा जेरुसलेम नावाच्या शापित देवभूमीवर मृत्यूचं तांडव सुरु झालं. निमित्त झालं इस्राएलच्या लष्कराने जोरजबरदस्ती करून शेख जर्रा वस्तीतून पॅलेस्टिनी अरब कुटुंबांना हलवायला सुरुवात केली, या बेदरकार कृतीचं....या घटनेच्या आसपासच इस्राईलने कोरोना संकटावर अंकुश लावल्याची आणि आपल्या लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुखपट्ट्यांचा नियम शिथिल केल्याची घोषणा करून समस्त जगाला आपली दाखल घ्यायला पुन्हा एकदा भाग पाडलं होतं. एक राष्ट्र म्हणून इस्राएल किती सुसंघटित आणि सुसूत्रपणे काम करू शकतं, हे या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलं होतं....पण त्यांच्या या कामगिरीवर भाळून ज्यांनी ज्यांनी चार कौतुकाचे शब्द बोलून दाखवले होते, त्यांचे दात पुढच्याच आठवड्यात घशात घालण्याचं महान काम इस्राएलने करून दाखवलं.

सध्याच्या महामारीच्या वातावरणात जग ढवळून निघत असताना आपल्या छुप्या मनसुब्यांना इस्राएलने प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली ती डोक्यावर अटकेची किंवा किमान भ्रष्टाचाराच्या खटल्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या राष्ट्राध्यक्ष बिन्यामीन नेतान्याहू यांच्या पुढाकाराने. नेसेट म्हणजेच इस्राएलच्या संसदेत सतत बहुमताची कसरत करत असलेल्या नेतान्याहू यांनी आपल्या सरकारच्या स्थैर्याचा राजमार्ग हा असा शोधला असं अनेक जाणकारांचं मत आहे. एकदा जहाल यहुदी राष्ट्रभावनेला चिथावलं आणि ' एरेट्झ इस्राएल ' च्या घोषणेआडून दडपशाही करून अधिकाधिक भूमी इस्रायलला जोडली की आपोआप नेसेटमधल्या बहुमताचा प्रश्न तडीस जाईल अशी ही नेतान्याहू यांची खेळी त्यांच्या धूर्त आणि युद्धखोर प्रतिमेला साजेशीच.

जगाच्या पाठीवरच्या तीन मुख्य धर्मांचं उगमस्थान असलेल्या जेरुसलेम परिसरात अवघ्या चार-पाच दिवसात पुन्हा एकदा स्फोटक परिस्थिती निर्माण झाली ती अशा सगळ्या पार्श्वभूमीवर. अर्थातच दोन्ही बाजूंच्या जागतिक समर्थकांनी आपापल्या परीने ' आभासी जगतावर ' प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आणि एक एक करत अनेक ' ख्यातनाम ' व्यक्ती या मुद्द्यावर भाष्य करायला लागल्या. सौदीच्या पाठिंब्यावर २०१८ सालापासून अरब आसमंतातल्या अनेक देशांनी इस्राएलशी आपले संबंध जुळवायला सुरुवात केलेली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांचा उद्योगी जावई आणि राजनैतिक सल्लागार जॅरेड कुशनर, सौदीचा भावी सर्वेसर्वा आणि २०१७ सालापासून सौदी अरेबिया देशावर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करणारा सुधारणावादी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान अल सौद, ट्रम्प यांच्या जवळच्या गोटातले बिन्यामीन नेतान्याहू आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अबू धाबी या तेलसंपन्न अमिरातीचा आणि पर्यायाने या देशाचा भावी सर्वेसर्वा राजपुत्र मोहम्मद बिन झाएद अल नाहयान अशा महत्वाच्या भिडूंनी मिळून अनेक दशकांपासून चालत आलेली अरब - इस्राएल द्वेषाची परंपरा मोडीत काढली होती. अमिरातीपाठोपाठ बहरैन, ओमान, सुदान, मोरोक्को या देशांनीही इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली. या सगळ्यातून अखेर ज्यू - अरब यांच्यातला रक्तरंजित संघर्ष थांबेल आणि या परिसरात शांतता नांदेल अशी अनेकांची आशा होती, पण युद्धखोरी आणि अतिकडवेपणा नसानसात मुरलेल्या झिओनिस्ट ज्यू आणि पॅलेस्टिनी अरबांमध्ये संघर्षाची काडी पडलीच !

आधुनिक इतिहासाच्या अनुषंगाने बघितल्यास या सगळ्याची सुरुवात जरी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये वाढीस लागलेल्या झिओनिस्ट चळवळीमुळे झालेली दिसत असली, तरी ज्यू धर्मियांच्या इतिहासात डोकावल्यावर मात्र या संघर्षाची पाळंमुळं थेट ज्यू - मुस्लिम - ख्रिस्ती या तिन्ही धर्माचा आद्यपुरुष असलेल्या अब्राहमच्या काळात रुजलेली दिसतात.(झायनिस्ट चळवळी अंतर्गत ज्युंनी आटमन साम्राज्य अस्तित्वात असतानाच पॅलेस्टॅइन मधे वसाहती निर्माण केल्या. पहिल्या महायुद्धानंतर आटमन साम्राज्य संपुष्टात आलं, ब्रिटिशांनी पॅलेस्टाइनचा ताबा घेतला, पुढे ज्युइश स्टेट स्थापित (युएनच्या संमतीने) करण्याचा उद्देशाने. पण पुढे दुसरं महायुद्ध झालं, ज्यामुळे ब्रिटिशांना आर्थिक्/सामरिक फटके बसले, आणि त्यांनी पॅलेस्टाइनमधुन अंग काढुन घेतलं. त्या दरम्यान झायनिस्ट चळवळ अमेरिकेच्या सपोर्टने अजुन स्ट्राँग झाली. आणि त्यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या पॅलेस्टाइन वर संपुर्ण ताबा प्रस्थापित केला. पुढे युएनने हि इझरेलला मान्यता दिली, जी अरब राष्ट्रांना (इजिप्त, इराक, लेबनन, सिरिया इ.) मान्य न्हवती. आणि हेच कारण पुढच्या ऑनगोइंग संघर्षाला कारणीभूत ठरलं...)   या लेखमालेत जेरुसलेम या शापित देवभूमीला केंद्रस्थानी ठेवून आपण या परिसरात घडलेल्या अशा अनेक घटनांचा मागोवा घेणार आहोत, ज्यामुळे या परिसराच्या वर्षानुवर्षाच्या संघर्षाला कारणीभूत असलेल्या परिस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल...आपल्या काश्मीर प्रश्नाची अनेक अभ्यासक जरी जेरुसलेमच्या प्रश्नाशी तुलना करत असले, तरी माझ्या मते या तुलनेला विशेष अर्थ नाही, कारण काश्मीर प्रश्न केवळ सत्तर वर्षं जुना आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांपुरता मर्यादित आहे...पण जेरुसलेम प्रश्न मात्र समस्त अरब जगत आणि ज्यू धर्मियांमधला हजारो शतकं जुना आहे.

लेखमालेचा आरंभ करताना मला पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांचं एक प्रसिद्ध वाक्य आठवतं -
" anyone who relinquishes a single inch of Jerusalem is neither an Arab nor a Muslim . "

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०२

Submitted by Theurbannomad on 17 May, 2021 - 08:12

जेरुसलेम शहर कदाचित जगातलं एकमेव असं शहर असेल, जिथे सुपीक जमीन, आल्हाददायक हवामान, खनीज संपत्ती, पाण्याचे बारमाही स्त्रोत यापैकी काहीही नाही आणि तरीही या शहराच्या मालकीवरून शतकानुशतकं कुरबुरी सुरू आहेत. जर आद्यपुरूष अब्राहम या भूमीकडे आला नसता तर कदाचित या शहराला इतकं महत्त्व मिळालंच नसतं...पण या शहराच्या नशिबात एकीकडे तीन - तीन धर्मांच उगमस्थान होण्याचं अहोभाग्य आणि दुसरीकडे सततच्या युद्धातून येणारी अनिश्चितता असा विरोधाभासी प्रकार विधात्याने लिहून ठेवला आहे!

अब्राहम - पूर्व कालखंडात जेरुसलेमच्या भागात विशेष काही नव्हतंच. रेताड कोरड्या प्रांतातून किडूकमिडूक सामान पाळीव प्राण्यांच्या पाठीवर लादून अन्न - पाणी शोधत फिरणाऱ्या आणि सतत एकमेकांशी उभा दावा मांडणाऱ्या भटक्या टोळ्या या भागात वास्तव्य करत होत्या. सुबत्ता होती ती एकिकडच्या तैग्रिस - युफ्रेटीस नद्यांच्या आणि दुसरीकडच्या नाईल नदीच्या खोऱ्यात. तिथे मात्र हिरवळ, बारमाही पाणी, फळफळावळ या सगळ्याची रेलचेल होती. विकसित झालेल्या नागरी संस्कृती अस्तित्वात होत्या. या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या देवता पुजल्या जात. भटक्या टोळ्यांच्याही आपापल्या देवता होत्या.

आत्ताच्या इराक देशाच्या नसिरिया प्रांताच्या उर कासिदिम भागात साधारण ख्रिस्तपूर्व २१५० साली अब्राम बेन तेरा जन्माला आला. ' बुक ऑफ जेनेसिस ' नुसार याहोवा देवाने या अब्रामला उर कासिदिम सोडून थेट कनानच्या भूमीत जाऊन वस्ती करायचा आदेश दिला. जे जे अब्रामबरोबर आले ते ते याहोवा देवाचे अनुयायी ठरले. तिथे ' एकदेवत्व ' प्रथा पाळणारी याहोवा देवाची ही ' लेकरं ' एकत्र आली आणि त्यांनी ज्यू धर्माची मुहूर्तमेढ रोवली. ही कनानची पवित्र भूमी म्हणजेच आजच्या जेरुसलेमच्या आसपासचा परिसर. याहोवा देवतेने अब्रामचा ' अब्राहम ' केला , ज्या शब्दाचा अर्थ ' अनेक प्रांताचा सर्वेसर्वा / पितामह ' असा होतो.

त्या काळी या भागात भटक्या टोळ्या अस्तित्वात असल्यामुळे अब्राहम आणि त्याच्या अनुयायांना याहोवा देवतेचा आदेश मानून एका ईश्वराला पुजणाऱ्या स्वतंत्र धर्माची स्थापना करण्यात फारशी अडचण जरी आली नसली, तरी शेवटी ते या भागात उपरेच होते. या ज्यू लोकांच्या त्या टोळ्यांशी अधून मधून चकमकी होत असायच्याच....पण त्यांच्या पाठीशी याहोवा देवतेचा भक्कम हात होता.

हे सगळं होत असताना आजूबाजूच्या प्रांतांमध्ये कोणताही एक विशिष्ट असा धर्म अस्तित्वात आलेला नव्हता. अब्राहम याने आपल्या अनुयायांना याहोवा देवतेचे संदेश आणि शिकवण एकत्र करून यहुदी धर्माची ' दीक्षा ' दिली...ही दीक्षा म्हणजेच ' तोरा ' नावाचा धर्मग्रंथ. ज्यू धर्म अशा प्रकारे तिन्ही धर्मांमधला आद्य धर्म ठरतो. या धर्माचं आणि या धर्माच्या अनुयायांच स्थान म्हणून कनानची भूमी ज्यू धर्मियांना पवित्र ठरते.

अब्राहम आणि त्याच्या अनुयायांनी कनानच्या भूमीत ज्या जागी आपली वेदी बांधून काढली ती जागा म्हणजे जेरुसलेम. अब्राहम - पूर्व काळात प्राचीन इजिप्शियन मजकुरांमध्ये या भागाचा उल्लेख ' उरुसलिम ' म्हणून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो ' city of shalem ' - शालेम ही कनान भागातल्या तेव्हाच्या ' Pantheon ' नावाच्या पंथाची देवता. अब्राहम आणि त्याच्या अनुयायांनी जेरुसलेम शहराला आपल्या नव्याने जन्माला घातलेल्या धर्माचं मूळ शहर म्हणून नवी ओळख मिळवून दिली. या यहुद्यांनी आसपासच्या भागात आपला जम बसवायचा प्रयत्न सुरू केला आणि यहुदी धर्माचा प्रसार होऊ लागला.

पॅलेस्टाईन हे नाव मूळच्या इजिप्शियन आणि असिरियन लिखाणातून ' पलेशेत ' म्हणून आढळून आलेलं आहे. हा भाग तोच, जो याहोवाने अब्राहम आणि बाकीच्या अनुयायांना ' पवित्र कनानची भूमी ' म्हणून स्थायिक होण्यासाठी सुचवलेला होता आणि त्यासाठी शेकडो मैल लांबच्या उर कासिदिमच्या सुजलाम सुफलाम भूमीतून त्यांना या रेताड वाळवंटात यायला भाग पाडलं होतं. इथले मूळचे निवासी म्हणजे इथल्या भटक्या टोळ्या, पण त्यांचा इथे कधीच एकसंध असा देश नव्हता...तो देश ( किंवा यहुदी धर्माची सत्ता असलेला एकजिनसी प्रांत ) तयार झाला अब्राहममुळे....अशा प्रकारे ज्यू या भूमीत ' उपरे ' आहेत हेही खरं ठरतं आणि पॅलेस्टिनी आपला ' देश किंवा प्रांत ' म्हणून या भूमीवर हक्क सांगू शकत नाहीत हेही खरं ठरतं. याहोवा देवाने नक्की काय विचार करून हा तिढा निर्माण केला, हे त्यालाच माहीत, पण त्या काळापासून संघर्ष या भूमीसाठी चिरकाल टिकून राहिलेला शाप ठरलेला आहे.

आज या इतिहासाचा आधार अरब आणि ज्यू हे दोघेही आपापल्या सोयीने घेतात, ते आपलं घोडं पुढे दामटवायला. अरब ज्यू लोकांना उपरे संबोधतात, तर ज्यू अरबांना ' तेव्हा तुमचा धर्म तरी अस्तित्वात होता का? आणि मूळच्या पॅलेस्टिनी टोळ्या अरब तरी कशा मानायच्या ? ' असा बिनतोड सवाल करतात. या सगळ्यावर कडी म्हणजे एकाच अब्राहमची लेकरं असली, तरी अब्राहमच्या खऱ्या लग्नाच्या बायकोचे वंशज म्हणून ज्यू स्वतःला उच्च समजतात आणि त्याच अब्राहमच्या गुलाम स्त्रीचे वंशज म्हणून मुस्लिम अरबांना हीन....मुस्लिम मात्र त्या गुलाम स्त्रीला अब्राहमची दुसरी बायको म्हणवतात. गंमत अशी, की हिटलरने आर्य वंशाचा अभिमान बाळगून ज्यू लोकांना कायम तुच्छ लेखलं, ते त्यांना ' हीन सेमिटिक ' वंशाचे संबोधून....एकूण काय, तर आपल्याकडच्या जातीव्यवस्थेप्रमाणे तिथेही वंश - द्वेषाची परंपरा चालत आलेली आहे!

पुढच्या प्रकरणांमध्ये हे ज्यू किती वेळा आपल्याच भूमीतून परागंदा झाले आणि पुन्हा पुन्हा त्यांनी कशा प्रकारे आपला भूभाग परत मिळवला, यावर लिहीनच....पण तूर्तास अल्पशी विश्रांती घेऊया. अब्राहम आणि याहोवा देवतेला शिरसाष्टांग प्रणाम करून या लेखाची समाप्ती करतो, धन्यवाद!

जेरुसलेमबद्दल कणव असलेल्यांनी या भागाची स्तुती भरभरून केली आहे....पण हा भाग अजिबात निसर्गसंपन्न किंवा आल्हाददायक नाही. आजही तिथे शेती करण्यासाठी ठिबकसिंचन सारखे पाण्याची बचत करणारे सिंचन प्रकल्प वापरावे लागतात, तर तेव्हा काय परिस्थिती असेल याचा अंदाज करा....

तेव्हा धर्म असा नव्हता, तर 'peganism' म्हणून ओळखली जाणारी व्यवस्था होती. Peganism म्हणजे अनेक देवी - देवतांना पुजणारे...एकेश्वरवाद जन्मला तेव्हा धर्म ही संज्ञा या भागात जन्माला आली.
आपल्याकडे हिंदू धर्माला म्हणूनच धर्म म्हणण्यापेक्षा व्यवस्था म्हणणं जास्त संयुक्तिक आहे असं अनेकांचं मत याच कारणासाठी आहे....सनातन धर्म ही हिंदू धर्माची ' व्यवस्था ' असल्यामुळे आपल्याकडे देवदेवतांचे अनेक प्रकार आहेत.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०३

Submitted by Theurbannomad on 17 May, 2021 - 14:42

अब्राहम जसा तीन धर्मांचा आद्यपुरुष होता , तसा तीन बायकांचा दादलाही होता. जेव्हा तो उर कासिदिम येथून कनानकडे निघाला होता, तेव्हा त्याचं लग्न झालेलं होतं. त्याची बायको सारा ही त्याचीच सावत्र बहीण होती. त्या काळी अशा पद्धतीची लग्न सर्रास होत असत. ही सारा अब्राहमबरोबर त्या सगळ्या खडतर प्रवासात सामील होती. तेव्हाच्या प्रथांनुसार पदरी गुलाम बाळगणं गुन्हा मानला जात नसे. अब्राहमच्याही घरात अनेक गुलाम होते. हेगार नावाची ईजिप्शियन स्त्री त्याची ' खास ' गुलाम होती. ( मुस्लिम धर्मिय मात्र तिला गुलाम नाही, तर अब्राहमची दुसरी बायको मानतात. )

अब्राहम वयाच्या ७५-७६ व्या वर्षी कनान येथे आला आणि पुढच्या पाच-सहा वर्षात त्याने तिथे आपलं ज्यू राज्य स्थापन केलं...पण पंच्याऐंशी वय होऊनही त्याला मूलबाळ होऊ शकलं नाही. साराची कूस उजवत नसल्यामुळे ते दाम्पत्य चिंतीत होतं, पण देवदूतांनी त्याला आश्वस्त केलं होतं....नंतर कर्मधर्मसंयोगाने हेगारची कूस उजली आणि अब्राहमला वारस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सवतीला ( तेही गुलाम स्त्री असलेल्या सवतीला ) आपल्याआधी गर्भधारणा झालेली....साराच्या डोळ्यात ही बाब खुपली आणि त्यातून दोघींमध्ये उभा दावा मांडला गेला. हेगार तशाच गर्भार अवस्थेत अब्राहमच्या घरातून निघून गेली, पण वाटेत एका देवदूताने तिला समज देऊन परत पाठवलं. अखेर तिला मुलगा झाला, ज्याचं नाव त्या देवदूताच्या आदेशानुसार ' इश्माएल ' ठेवलं गेलं.
पुढे देवदूताच्या आश्वासनानुसार सारासुद्धा गर्भार राहिली. अब्राहम या वेळी ९९ वर्षाचा होता. साराच्या मुलाचं नाव ' आयझॅक '. अब्राहमची तिसरी बायकोसुद्धा गुलाम स्त्रीच होती, जिचं नाव होतं केतुरा. आयझॅकच्या जन्मानंतर या केतुरापासून अब्राहमला अजून सहा मुलं झाली.

इतका मोठा कुटुंबकबिला म्हणजे कुरबुरी आल्याच....यहोवा देवतेचा आशीर्वाद मिळालेला आद्यपुरुष असला तरी अब्राहम कुटुंबकलहापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकला नाही...त्याचा वारसदार कोण होणार यावरून पुन्हा तंटे सुरु झाले. इश्माएलकडून एकदा आयझॅकची थट्टा काय झाली, प्रकरण इतकं विकोपाला गेलं की अब्राहमने आपल्या दोन्ही अर्धांगिनींना एकत्र आणलं आणि त्यांच्याशी निर्वाणीची भाषा करून पाहिली. त्यातून निष्पन्न इतकंच झालं, की हेगार आणि इश्माएल यांची बीरशेबा प्रांतात ' पाठवणी ' करून झाली.

काहीही झालं, तरी इश्माएल अब्राहमचा वंश होता...तेव्हा त्यालाही राज्यसत्ता मिळणार होतीच....यहोवाचं तसं भाकीतच होतं...परंतु अब्राहमचा वारसाहक्क मात्र यहोवाने आयझॅकला दिलेला होता. दोघे भाऊ आपल्या आयांप्रमाणे एकमेकांचा द्वेष करत नव्हते, अन्यथा त्यांच्यातच तलवारीची भाषा बोलली गेली असती....अब्राहमच्या अंतिम क्षणी त्याच्या दफनच्या वेळी ते दोघे उपस्थित होते.

पुढे आयझॅक ज्यू धर्मियांचा झेंडा हाती घेऊन साम्राज्यविस्ताराला लागला. त्याचे सावत्र भाऊ आजूबाजूच्या लहानमोठ्या प्रांतांचे सुभेदार झाले. इश्माएलने आपल्या आईच्या संमतीने एका ईजिप्शियन स्त्रीबरोबर संसार थाटला आणि असिरिया - इजिप्तच्या सीमाभागाच्या प्रांतांमध्ये त्याने आपलं बस्तान बसवलं. त्याची १२ मुलं या भागातल्या छोट्या छोट्या प्रांतांची सर्वेसर्वा झाली. आयझॅकचे पुढचे वंशज म्हणजे जगबुडीतून निवडक पशू - पक्षी आणि मनुष्यांना वाचवणारा नोआ....पुढे ख्रिस्ताच्या जन्माच्या १००० वर्षं आधी ज्यू राजा डेव्हिड याने जेरुसलेम आणि आसपासच्या परिसरात ज्यू साम्राज्याची स्थापना केली. त्यानेच यहुदी धर्माच्या पहिल्यावहिल्या महाप्रचंड मंदिराची मुहूर्तमेढ रोवली आणि हे प्रचंड मंदिर पुढे चार शतकं ज्यू धर्मियांचं तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झालं. साधारण ५८६ बी.सी.मधे त्यावर परकीय शत्रूंनी आक्रमण करून यहुदी लोकांच ते पवित्र मंदिर उध्वस्थ केलं. तिथे वसलेल्या ज्यू (यहुदी) लोकांना कैदेत टाकलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले. ५० वर्षानंतर यहुदी लोकांना पर्शियन राजा सायरस ने पुन्हा जेरुसलेम ला येऊन आपलं मंदिर उभारण्याची मुभा दिली. त्या नंतर अलेक्सझांडर दि ग्रेट याने ३३२ बी.सी. मध्ये जेरुसलेम वर ताबा मिळवला. त्यानंतर रोमन, अरब, पर्शियन, इस्लामिक अश्या अनेक राज्यकर्त्यांनी पुढल्या १०० वर्षात आक्रमण करून ताबा मिळवला.

इश्माएलच्या पुढच्या ४० पिढ्यांनंतर ( जवळ जवळ २,६७० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ) सध्याच्या सौदी अरेबियाच्या हेजाझ प्रांतात मक्का येथे मोहम्मद याचा जन्म झाला. मोहम्मद ज्या घरात जन्माला आला ते घर व्यापारी कुटुंबाचं. बानू हाशिम हे त्यांचं घराणं. मोहम्मद यांचे वडील त्यांच्या जन्माआधीच निर्वर्तले होते, तर आई जन्मानंतर सहा वर्षात. त्यांचा सांभाळ केला त्यांच्या आजोबांनी आणि काकांनी. त्यांच्या काळात आसपासच्या प्रांतात वाढलेली आर्थिक विषमता, कमी होत चाललेली माणुसकी आणि भोगवादाकडे वाढत चाललेला लोकांचा ओढा त्यांना अस्वस्थ करत होता. तिशीनंतर त्यांनी हळू हळू विरक्ती पत्करून आसपासच्या डोंगरातल्या गुहांमध्ये बसून ध्यान करायला सुरुवात केली. तिथे त्यांना गेब्रिएल नावाच्या देवदूताने दृष्टांत देऊन जो काही उपदेश केला, तो उपदेश म्हणजेच कुराण. इथेच मोहम्मदांनी एकेश्वरवादाच्या मार्गाने जाणारा आपला वेगळा धर्म - इस्लाम स्थापन केला. मोहम्मद हे अशा प्रकारे ईश्वराचे प्रेषित म्हणून मान्यता पावले.

मोहम्मदांचा संबंध जेरुसलेमशी आला तो ' ईस्रा वल मिराज ' च्या निमित्ताने. देवदूतांनी त्यांना मक्केहून जेरुसलेम येथे नेलं आणि तिथल्या अल अकसा मशिदीच्या परिसरातून त्यांना देवदूताने स्वर्गाचं दर्शन करवून आणलं. त्या नंतर अनेक वर्ष मुस्लिम आणि यहुदी समाजासाठी जेरुसलेम हे अतिशय पवित्र स्थान म्हणून मानलं गेलं. यहुदी आणि मुस्लिम धर्माचे लोक इकडे हजारो च्या संख्येने येत राहिले.वर सांगितलं त्या प्रमाणे यहुदी लोकांच मंदिर जेरुसलेम मधे सगळ्यात आधी होतं असं इतिहास सांगतो. रोमन लोकांनी ७० ए.डी. मधे हे मंदिर उध्वस्थ केलं. ज्याची एक भिंत आज फक्त शाबूत आहे. त्यामुळेच यहुदी लोकांसाठी ती खूप पवित्र आणि धार्मिक आहे. त्याच जागेवर शेकडो वर्षांनी अल अकसा ही मशीद बांधण्यात आली.याच मशिदीच महत्व मुस्लिम धर्मातील लोकांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या क्रमांकाचं आहे. इकडेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असं पवित्र थडग्यांच चर्च आहे. अशा प्रकारे जेरुसलेमची फक्त ३५ चौरस किलोमीटर भागात पसरलेली ही जागा तीन धर्मांसाठी अतिशय महत्वाची आहे...आणि म्हणूनच या जागेचा ताबा मिळवण्यासाठी तिन्ही धर्मियांमध्ये अनेक वर्षांपासून झटापटी सुरु आहेत.

ज्यू धर्मियांना आपल्या पवित्र भूमीतून परागंदा कशा पद्धतीने व्हावं लागलं, त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या हत्येचा कलंक कसा लागला आणि ज्यू - मुस्लिम - ख्रिस्ती धर्माचा तिढा पुढे कसा गुंतत गेला हे पुढच्या प्रकरणात...तोवर अलविदा !

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०४

Submitted by Theurbannomad on 18 May, 2021 - 11:04

ज्यू लोकांचं राज्य म्हणून याहोवा देवाने कनानची भूमी निवडली आणि तिथे अब्राहमच्या वंशजांना राज्य करू दिलं असलं तरी ही भूमी सुजलाम् सुफलाम् मात्र त्याने केली नाही. त्या रेताड कोरड्या भूमीत गवताचं पातं उगवायची देखील मारामार...तशात या भागात जेमतेम पडणारा पाऊससुद्धा रुसल्यामुळे तिथे भयानक दुष्काळ पडला. तब्बल सात वर्षे लांबलेल्या दुष्काळामुळे अब्राहमचे तिथले वंशज इजिप्तच्या दिशेला गेले. या काळात ज्यू लोकांचा प्रमुख होता जोसेफ.

जोसेफ आणि बाकीचे ज्यू इजिप्तमध्ये नुसतेच स्थिरावले नाहीत तर तिथे त्यांनी व्यापारात खूप प्रगती केली. ज्यू लोकांमध्ये हा चिवटपणा आणि मेहेनत करण्याची जिद्द जन्मतः च येत असावी...हे इजिप्तच्या फारो राजाच्या इतकं डोळ्यात आलं की त्याने ज्यू कुटुंबात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाची हत्या करण्याचा फतवा काढला. या प्रकारामुळे घाबरून अम्राम आणि जोशेबेद या दांपत्याने आपल्या नवजात मुलाला टोपलीत ठेवून नाईल नदीकाठी ठेवलं आणि तो नेमका फारोच्या बहिणीला सापडला.

या मुलाने - मोझेसने पुढे आपल्या ज्यू बांधवांना पुन्हा एकदा आपल्या पवित्र भूमिकडे जायचा आदेश दिला. याही वेळी याहोवाने त्याला साथ दिली. आधी इजिप्तमध्ये त्याने
प्लेगच्या नऊ साथी एकापाठोपाठ एक निर्माण करून फारोच्या तोंडचं पाणी पळवल आणि मग मोझेसचा तांडा तांबडा समुद्र ओलांडत असताना त्याने समुद्र दुभंगून त्यांची वाट मोकळी केली. ज्यू पैलतीरावर पोचल्यावर पुन्हा त्याने समुद्र पूर्ववत केला आणि मागचे इजिप्तचे सैनिक समुद्रात गुडूप झाले. अशा प्रकारे ज्यू लोक आपल्या मायदेशात पुन्हा एकदा आले आणि पुन्हा स्थानिक पॅलेस्टिनी टोळ्यांशी त्यांच्या चकमकी सुरू झाल्या. मोझेसच्या वंशजांनी याहोवा देवाच्या साहाय्याने आजच्या पॅलेस्टाईन, सीरिया, जॉर्डन, इराक आणि इस्राएल इतक्या मोठ्या भूभागावर ज्यू साम्राज्याचा विस्तार केला आणि शक्तिशाली ज्यू साम्राज्य स्थापन केलं.

ज्यू राजा डेव्हिड याने राज्यव्यवस्था बऱ्याचशा प्रमाणात सुसूत्र केली. मंत्रीमंडळ, न्यायाधीश, पुजारी असे प्रकार त्याच्या काळात अस्तित्वात आले. पुढच्या वंशजांना हे इतकं प्रचंड साम्राज्य विनासायास मिळाल्यामुळे साहजिकच तंतेबखेडे सुरू झालेच....शेवटी या साम्राज्याचे ' जुडा ' आणि ' इस्राएल ' असे दोन तुकडे पडून ज्यू साम्राज्य डेव्हिडच्या वंशजांनी वाटून घेतलं. आपल्या मराठा साम्राज्यात जशी ' सातारची ' आणि ' कोल्हापूरची ' गादी वेगळी झाली, तसाच हा प्रकार.

पुढे या दोन्ही साम्राज्यामध्ये भांडणं होत राहिली आणि त्याचा फायदा इतरांनी घेतला. शेजारच्या असिरियन साम्राज्याच्या राजाने - शालमनेसर याने ज्यू साम्राज्य आपलं मांडलिक करून घेतलं आणि ज्यू लोक आसपासच्या प्रदेशात पुन्हा एकदा विखुरले. पुढे इराकच्या भागात असिरीयन साम्राज्य जाऊन बाबिलोनियन साम्राज्य आलं आणि त्याचा राजा नेबुकडनेझार हा ज्यू लोकांचा पहिला कर्दनकाळ. त्याने ज्यू लोकांची अशी भयंकर कत्तल केली की ज्यू दूरवरच्या प्रदेशांमध्ये पळून गेले. जे उरले ते गुलाम म्हणून खितपत पडले.

या ज्यू लोकांची कणव अनेक वर्षांनी पर्शियन राजा पहिला सायरस याला आली. बाबिलोनियन साम्राज्य जिंकल्यावर त्याने ज्यू लोकांना अभय देऊन त्यांना कनानच्या भूमीवर जायची मुभा दिली. झेरूबाबेल या जुडा साम्राज्याच्या वंशाजाच्या नेतृत्वाखाली पुन्हा ज्यू लोक मायभूमीत आले आणि सायरस राजाच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा जेरुसलेमच्या सिनेगोगच्या बांधकामाला सुरुवात केली. बघता बघता पन्नास - पंचावन्न हजार ज्यू मातृभूमीत आले आणि त्यांनी आपल्या वस्त्या उभ्या करायला सुरुवात केली.

आता या ज्यू लोकांवर नजर पडली ग्रीकांची. अलेक्झांडर द ग्रेट याने या भागावर चढाया करून ज्यू लोकांना पुन्हा एकदा परागंदा केलं आणि सिनेगोग फोडून त्यावर आपले ग्रीक घोडे नाचवले. काही वर्षांनी ग्रीकांवर रोमनांनी मत केली आणि त्याचे पडसाद इस्राएलमध्येही उमटले....तेव्हाचा ज्यू राजा ( अर्थातच नावाचा ) हारोड रोमनांचा मांडलिक झाला आणि ज्यू लोक रोमनांच्या टाचेखाली आले. रोमनांनी या भागाचे तीन हिस्से केले - ज्यूडिया, समारिया आणि इडूमिया.

याच काळात आसपास वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे आणि अनागोंदीमुळे एका साध्या सुतार - मेंढपाळ कुटुंबात जन्माला आलेल्या येशूने इथे ख्रिस्ती धर्माची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर ज्यू लोकांवर कायमचा येशूच्या ' हत्येचा ' शिक्का लागला....पण त्यावर पुढच्या भागात बोलूया. तोवर अलविदा !

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०५

Submitted by Theurbannomad on 19 May, 2021 - 10:47

येशू जन्मला , ते घर एका सध्या सुतार - मेंढपाळ कुटुंबाचं.या जिजसला येशू, ईसा , इमानुएल अशा अनेक नावांनी संबोधलं जातं असलं, तरी ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्माचे लोक याला ईश्वराचा अवतार मानतात. आजच्या जेरुसलेमपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या नाझरेथ गावात जोसेफ आणि मेरी आपल्या लहानग्या येशूला घेऊन आले आणि स्थिरावले. वडिलांच्या सुतारकामात येशू त्यांना मदत करत असे. येशूच्या बालपणाबद्दल खूपशी माहिती आज उपलब्ध नाही. त्या काळात त्या प्रांतात जॉन नावाचा धर्मगुरू होता. उंटाच्या कातडीचे कपडे घालणारा, मध आणि टोळ खाणारा असा हा जॉन लहान मुलांचा बाप्तिस्मा करायचा. ईश्वराकडून आपल्या पापांना माफी मिळवून हवी असेल, तर बाप्तिस्मा करणं हाच एकमेव मार्ग आहे असं तो सांगायचं. ' मार्कच्या गॉस्पेल्स ' मध्ये ( गॉस्पेल म्हणजे वेगवेगळ्या महापुरुषांनी लिहून काढलेली धर्माची शिकवण आणि त्या अनुषंगाने त्या काळच्या महत्वाच्या घटनांची लिखित स्वरूपातली माहिती ) नमूद केल्याप्रमाणे या जॉनची प्रत्यक्ष ईश्वराने प्रेषितांच्या आधी पृथ्वीवर पाठवलेला देवदूत अशी ओळख आहे आणि म्हणून त्याला ' सेंट जॉन द बाप्टिस्ट ' असं संबोधित केलं गेलं आहे.
जिझसच्या आयुष्याबद्दल अभ्यासकांची इतकी मतमतांतरं आहेत, की बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दलच्या माहितीत विरोधाभास आणि विसंगती आढळून येते. उदाहरणार्थ, ' सिनॉप्टिक गॉस्पेल' आणि ' गॉस्पेल ऑफ जॉन' या दोहोंमधल्या माहितीत बरीच तफावत आहे. तशात ' जुन्या 'आणि ' नव्या ' टेस्टामेंट्समध्ये पुन्हा अनेक विसंगती आहेत. या कारणामुळे साधारण सर्वमान्य माहिती प्रमाण मानून येथे त्याच्याबद्दल उहापोह केलेला आहे.
हा जॉन लोकांना सांगत असे. की लवकरच तुमचा बाप्तिस्मा करणारा सिद्धपुरुष तुमच्या आयुष्यात येईल, जो पवित्र पाण्याने नाही तर आपल्या अस्तित्वाने तुम्हाला पापमुक्त करेल. जिझसच्या चार भावांचा - जेम्स, जोसेफ, जुडास आणि सायमन यांचा आणि बहिणींचा उल्लेख लूक आणि मॅथ्यू यांच्या गॉस्पेल्समध्ये आहे. बहिणींची नाव मात्र आज उपलब्ध माहितीनुसार ज्ञात नाहीत. लहान असताना त्याच्या विक्षिप्तपणाच्या तक्रारी शेजारपाजारच्या लोक करत असत, असा उल्लेख त्यात आलेला आहे. या विक्षिप्त गोष्टी म्हणजेच त्याच्याकडून बोलल्या जाणाऱ्या ईश्वरी संदेशाबद्दलच्या गोष्टी.


तरुण व्हायला लागलेला जिझस आपलं कुटुंब म्हणजे आपले अनुयायी असं उघडपणे आणि थेट बोलू लागलेला होता. अखेर जॉनने जिझसचा जॉर्डन नदीच्या पाण्याने बाप्तिस्मा केला. या वेळी त्याचं वय साधारण तीस वर्षाचं होतं असा अभ्यासकांचा कयास आहे. त्या बाप्तिस्माच्या वेळी पाण्यातून वर येताच स्वर्गाचे दरवाजे उघडले जाऊन तिथून एक दैवी आकृती खाली आली आणि तिने त्याचबरोबर एका दैवी आवाजाने त्याला ' ईश्वराचा अंश ( प्रेषित ) ' अशा अर्थाने संबोधलं. वेगवेगळ्या गॉस्पेल्समध्ये हि कहाणी काही अंशाने बदलते, परंतु ईश्वराने जिझसला 'प्रेषित ' म्हणून संबोधल्यावर मात्र सगळ्या गोस्पेल्सचं एकमत आहे. या घटनेनंतर जिझसने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं. असं म्हंटलं जात, की आधी जुडास प्रांतात त्याने आपलं मंत्रिमंडळ तयार केलं असलं, तरी नंतर खुद्द जेरुसलेम येथे त्याने तयार केलेलं दुसरं मंत्रिमंडळ अधिक लोकमान्य होतं आणि त्याचं बराचसा कार्य या जेरुसलेमच्याच परिसरात पार पडलं. या काळात त्याने असंख्य चमत्कार करून दाखवले आणि लोकांनी त्याच्या दैवी शक्तीचे अनुभव घेऊन त्याला ईश्वरी अवताराचा दर्जा दिला. प्रचंड वादळाला शांत करणं, पाण्यावरून चालणं अशा प्रकारचे ते चमत्कार होते.
सध्याच्या उत्तर इस्राएलमधल्या कोरॅझिम पठारावर त्याने आपल्या अनुयायांना अनेक महत्वाचे उपदेश केले. हे उपदेश म्हणजे ईश्वराने त्याच्या तोंडून दिलेली आदर्श शिकवण असं ख्रिस्ती लोक मानतात. याच काळात त्याच्या अनुयायांची संख्या वाढायला लागली. जिझसने त्याचे एकूण बारा सर्वाधिक योग्यतेचे अनुयायी निवडून त्यांना आपले ' प्रेषित ' ( अपॉसल्स ) म्हणून नियुक्त केले. या काळात घडलेली एक महत्वाची घटना त्याच्यावर आजूबाजूच्या ज्यू लोकांच्या नजरा रोखल्या जायला कारणीभूत ठरली.
ज्यू लोकांच्या दुसऱ्या सिनेगॉगमध्ये तेव्हा अनेक भोंदू आणि पैसेखाऊ लोकांचा सुळसुळाट झाला होता. आपल्या स्वार्थासाठी ते खोटेपणा, धाकधपटशा, अव्वाच्या सव्वा भाव आकारणे, पैशांची अफरातफर अशा अनेक वाईट गोष्टी करत असत. त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या या दुष्कृत्यांचा उघड निषेध करून जिझसने एका अर्थाने सापाच्या शेपटावर पाय ठेवला. त्यांच्या काळ्या कृत्यांना त्याने लोकांसमोर उघड केलंच, पण त्याचबरोबर जोडीला या कुकर्मांमुळे ईश्वरी प्रकोप होऊन या प्रदेशात हाहाकार माजेल, अशी भविष्यवाणीही वर्तवली. हा विध्वंस जिवंतपणे तुमच्याच डोळ्यांसमोर घडेल, असं सांगून त्याने त्या सगळ्या कुप्रवृत्तीच्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकवली.
आपल्याला उघड उघड आव्हान देणारा हा उपाटसुम्भ कोण, अशा विचाराने त्या सगळ्यांनी त्याच्यावर खार खायला सुरुवात केली. तशात त्याने एका ' लाझारस ' नावाच्या एका मनुष्याला मृत झाल्यावरही पुन्हा जिवंत केलं आणि या गोष्टीचा गवगवा होऊन त्याच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. ज्यू धर्मगुरूंच्या अस्तित्वाचाच प्रश्न आता निर्माण झाला होता.आपल्यातलाच कोणीतरी येऊन सरळ सरळ आपल्याला आव्हान देतो, हे त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. अखेर या सगळ्याची अखेर व्हायची तीच झाली.

आपल्या ' मृत्यूची ' चाहूल अर्थात जिझसला लागली होतीच, कारण तो ईश्वराचा अवतारच होता. अखेर त्याने आपल्या १२ ' प्रेषितांना ' मेजवानीसाठी एकत्र बोलावलं. याच घटनेला ' लास्ट सपर ' म्हणून ओळखलं जातं. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराचं 'द लास्ट सपर' हे चित्र याच घटनेचं. याच मेजवानीच्या वेळी जिझसने आपल्यातला एक जण आपल्याविरुद्ध फितूर होईल, अशी भविष्यवाणी वर्तवली. काही अभ्यासकांच्या मते हा घरभेदी म्हणजे जुडास. त्याचप्रमाणे त्याचा एक ' प्रेषित ' - पीटर हा तीन वेळा विचारूनही जिझसची ओळख दाखवणार नाही , तिसऱ्या नकाराच्या वेळी जवळच एक डोमकावळा ओरडत असेल आणि सगळे प्रेषित त्याच्याकडे पाठ फिरवतील अशीही भविष्यवाणी त्याने केली.
जेरुसलेमच्या टेकड्यांच्या पायथ्याशी ऑलिव्ह वृक्षांनी भरलेली गेथसेमाने नावाची बाग बायबलमधलं एक अतिशय महत्वाचं स्थान आहे. याच जागी आपल्या अनुयायांसह आलेला असताना जिझसला ज्यू धर्मगुरू, उच्चभ्रु आणि शक्तिशाली लोक पकडतात आणि त्याची ओळख पटवून घेतल्यावर त्याला अटक करतात असा उल्लेख बायबलमध्ये केलेला आहे.ही ओळख पटवायला कारणीभूत ठरतो जुडास, जो जिझसला ' रब्बी ' म्हणजे ईश्वर या अर्थाने जाणूनबुजून संबोधित करतो. या वेळी झालेल्या गोंधळात जिझसने आधी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार त्याचे अनुयायी आणि प्रेषित त्याच्याकडे पाठ फिरवतात आणि पीटर तीन वेळा जिझसची ओळख देण्यास नकार देतो. या वेळी ओरडणाऱ्या डोमकावल्याचा आवाज येऊन पीटर ढसाढसा रडतो, असा उल्लेख त्या कथेत आहे. यापुढचे प्रसंग तेव्हाच्या प्रशासनाच्या पाखंडी आणि क्रूर वर्तणुकीची चांगलीच कल्पना देतात.
जिझसला धर्मगुरूंच्या आणि इतर पाखंडी परंतु शक्तिशाली लोकांच्या सभेत हजर केलं जातं. ' संहेडरीन' या नावाने ओळखली जाणारी ही सभा म्हणजे रोमन प्रशासक पॉंटीएस पिलाटे याचं 'न्यायालय'. जिझसला या न्यायालयात अतिशय अपमानास्पद अवस्थेत उपस्थित केलं जातं. त्याच्यावर देशद्रोह, फसवाफसवी, चेटूक, लोकांना फितवून त्यांच्या मनात प्रशासनाबद्दल विष पेरणं अशा अनेक ' गुन्ह्यांचे ' आरोप केले जातात. जिझसने स्वतःला ज्यू लोकांचा देव म्हणून घोषित कशाच्या आधारावर केलं, असाही त्याला प्रश्न केला जातो. जिझस अर्थात कोणत्याही आरोपाचं खंडन करत नसल्यामुळे आणि माफी मागत नसल्यामुळे अखेर त्याला लोकांसमोर हजर केलं जातं. त्याचे काही अनुयायी आणि मूक समर्थक सोडले, तर बाकीच्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल काहीही कणव नसते, याची पुष्टी करणारा प्रसंग म्हणजे जिझस आणि बाराब्बास मनाच्या एका विकृत खुनी गुन्हेगारापैकी एकाला मुक्ती देण्याबद्दल विचारणा केल्यावर जनसमुदायाने त्या बाराब्बासला मुक्ती देणं.
शेवटी तेव्हाच्या क्रूर प्रथेनुसार जिझसला अखेर क्रूसावर लटकावलं जातं. त्याच्याबरोबर दोन अट्टल गुन्हेगारांनाही त्याच्याच बाजूला क्रूसावर लटकावलं जातं. बायबलमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जिझसचे प्राण जाताच तिथल्या वातावरणात अचानक बदल होतो, जेरुसलेमच्या त्या भल्या मोठ्या मंदिराला तडे जातील इतक्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप होतो आणि त्या भागात काहीतरी अरिष्ट येण्याची चिन्ह दिसायला लागतात, ज्यामुळे रोमन अधिकारी जिझस देवाचा अवतार असल्याचं मान्य करून आपल्या कृत्याची आठवण काढत भयभीत होतात.
शेवटी निकोडेमस आणि जोसेफ हे दोघे जिझसच्या मृतदेहाला एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून एका गुहेत ठेवतात आणि गुहेचं तोंड बंद करतात. मेरी माग्दालिनी ( हिला त्या काळच्या वेगवेगळ्या लिखाणात जिझसची अनुयायी, पत्नी, सहचारिणी अशा अनेक विशेषणांनी संबोधलं गेलं आहे ) ही या घटनेच्या नंतरच्या रविवारच्या दिवशी त्या गुहेचं तोंड उघडते आणि जिझस पुन्हा एकदा जिवंत अवस्थेत बाहेर येतो अशा प्रकारे बायबलमध्ये त्याच्या ' पुनर्जीवित ' होण्याचं वर्णन आहे. आपल्या अनुयायांना आपल्या तळहातावरच्या आरपार भोकात हात घालायला देऊन तो आपण तोतया नसल्याची खात्री पटवून देतो, ज्यामुळे त्याच्या ईश्वरी अवतार असण्यावर कोणालाही शंका उरत नाही.
पुनर्जीवित झाल्यानंतर जिझस एकूण चाळीस दिवस पृथ्वीवर राहतो. या काळात तो आपल्या अनुयायांना बेथनी नावाच्या गावात एकत्र करून त्यांना ' देवदूत ' येईपर्यंत जेरुसलेम न सोडण्याचा आदेश देतो. शेवटी चाळीसाव्या दिवशी तो सदेह स्वर्गात जातो. या कथेचं कुराणात थोड्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं गेलं आहे. क्रूसावर चढवण्याआधीच प्रत्यक्ष ईश्वर जिझसला आपल्याबरोबर घेऊन स्वर्गात जातो अशा प्रकारे ही घटना कुराणात नोंदली गेली आहे.
जगाच्या पाठीवर जन्माला आलेल्या काही अलौकिक आणि दैवी व्यक्तींमधली जिझस हि निःसंशयपणे एक महत्वाची व्यक्ती. या दैवी पुरुषाची शिकवण मूलतः क्षमाशीलतेच्या मार्गावर चालण्याची आहे. या जिझसबद्दल असंख्य आख्यायिका, कहाण्या आणि समजुती वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आढळून येतात. खुद्द ख्रिस्ती लोकांमध्येही जिझसच्या आयुष्यातल्या अनेक घटनांबद्दल मतमतांतरं आहेत. मेरी माग्दालिनी आणि त्याचे संबंध सहजीवनाचे होते आणि मेरी जेरुसलेम सोडताना आपल्या पोटात जिझसचा ' पवित्र वंश ' घेऊन गेली होती, अशाही प्रकारचा एक मतप्रवाह बायबलच्या संशोधकांमध्ये आढळतो. या सगळ्यावर कितीही मतभिन्नता असली, तरी जिझसने आपल्या शिकवणुकीने आपल्या अनुयायांना एका नव्या धर्माची दीक्षा दिली, हे मात्र नक्की.
जेरुसलेमच्या भूमीवर ज्यू लोकांच्या देखत आता ख्रिस्ती धर्म उदयाला आलेला होता. लवकरच या धर्माचा प्रसार झपाट्याने आजूबाजूच्या प्रांतात होणार होता आणि थेट रोमन लोकांकडून स्वीकारला गेल्यामुळे या धर्माला आता राजमान्यताही मिळणार होती. या धर्माचं प्रतीक म्हणून लाकडी क्रूसावर लटकवलेल्या जिझसची प्रतिमा शतकानुशतकं ख्रिस्ती लोक आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून जपणार होते आणि आपल्या या ईश्वरी अवतार असलेल्या महापुरुषाच्या मृत्यूला जबाबदार म्हणून ख्रिस्ती आणि ज्यू लोकांमध्ये कायमचं वितुष्ट येणार होतं.
जेरुसलेम शहराच्या छोट्याशा भागात मूळचा ज्यू आणि त्यातून पुढे जन्मला आलेले ख्रिस्ती आणि मुस्लिम असे दोन्ही धर्म या सगळ्यांसाठी महत्वाची असलेली स्थळं अशा प्रकारे एकवटली. ख्रिस्ती धर्म रोमनांनी युरोपभर नेला, अरबस्तानच्या वाळवंटात मुस्लिम धर्म वाढला आणि ज्यू धर्मिय मात्र युरोपपासून आशियापर्यंत जिकडे आसरा मिळेल तिथे उपऱ्यासारखे आपापल्या वस्त्या वसवून राहिले. ज्यू लोक जेरुसलेम आणि आसपासच्या परिसरातून कशा प्रकारे परागंदा झाले, ते पुढल्या प्रकरणात...तोवर अलविदा !

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०६

Submitted by Theurbannomad on 20 May, 2021 - 09:44

येशूने निवडलेल्या 'प्रेषितांपैकी' - ज्यांना मुख्य अनुयायी म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल -विश्वासघातकी जुडास सोडला, तर बाकीच्या अकरा जणांनी आपल्या ईश्वराने दिलेल्या संदेशाच्या पायावर ख्रिस्ती धर्माची मुहूर्तमेढ रोवली. तोपर्यंत ज्यू असलेले हे सगळे जण आणि एव्हाना प्रचिती आल्यामुळे जिझसला देवाचा अवतार मानायला लागलेले लोक एकत्र आले आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. ज्यू या नव्या धर्माला अर्थात मान्य करायला तयार नव्हते.
जिझसच्या अकरा प्रेषितांपैकी शेवटच्या प्रेषिताचा मृत्यू होईपर्यंतच्या काळाला ' अपोस्तोलिक एज ' असं संबोधलं जातं. जेरुसलेम येथे एककून १२० अनुयायांनी मिळून आपल्या धर्माचं ' चर्च ' स्थापन केलं. या अनुयायांपैकी महत्वाचे होते पॉल आणि पीटर. या पीटरने कोर्नेलियस नावाच्या बड्या रोमन अधिकाऱ्याला बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती धर्मात आणलं आणि चंचुपावलांनी ख्रिस्ती धर्माचा रोमन साम्राज्यात प्रवेश झाला. पॉलने जेरुसलेममधल्याच ज्यू सोडून इतर लोकांना आणि मूळच्या ग्रीक असलेल्या हेलेनिस्ट लोकांना सर्वप्रथम ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. हळू हळू त्यांच्याकडून रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडच्या ग्रीक प्रांतांमध्ये हा धर्म पसरायला सुरुवात झाली. ज्यू धर्मातल्या बजबजपुरीला कंटाळलेले अथवा बळजबरीने ज्यू झालेले लोक हळू हळू या नव्या धर्माकडे आकर्षित होऊ लागले. जेरुसलेमपासून सुरू झालेला हा धर्मप्रसार अँटीओक , इफेसस , कोरिन्थ, थेसलॉनिका, सायप्रस, क्रेते अशा भागाकडून होत होत पुढे तर थेट इजिप्तच्या अलेक्सान्ड्रियापर्यंत हे लोण पसरलं. १० वर्षाच्या काळात १०० च्या वर चर्च या भागात उदयाला आली.
या काळात जुडिआ प्रांतात ' सिमोन बार खोखबा ' नावाचा एक शूर ज्यू योद्धा आपल्या मनात काही वेगळेच मनसुबे रचत होता. अनेक वर्षांपासून बकोटीवर बसलेले रोमन त्याच्या डोळ्यात खुपत होते. अखेर त्याने आपल्या ज्यू बांधवांमधून काही समविचारी तरुण निवडले आणि त्यांच्यातला एलसार नावाचा एक उमदा तरुण हाताशी घेतला. आपल्या सैन्याची जमवाजमव करून त्याने जुडिआ आणि आजूबाजूच्या प्रदेशात रोमन लोकांच्या विरोधात उठाव केला. आपल्या शिवाजी महाराजांप्रमाणे त्याने प्रचंड रोमन सैन्याला मात दिली ती गनिमी युद्धतंत्राने. अपलावधीत जुडिआ प्रांत हाताखाली आणून पुढे इदूमिया प्रांतापर्यंत त्याने मजल मारली.


आसपासच्या डोंगराळ भागातल्या गुहेत लपून अचानक रोमन सैन्यावर हल्ले करण्याच्या त्याच्या युद्धतंत्रामुळे रोमन सैन्याची चांगलीच वाताहात झाली. शेवटी रोमनांना सेक्सटस ज्युलिअस सेव्हरस या शूर रोमन सेनापतीला थेट ब्रिटन भागातून डॅन्यूब नदीमार्गे पाचारण करावं लागलं. आपल्याबरोबर सव्वा लाखाचं सैन्य घेऊन हा सेनापती जुडीआ आणि आजूबाजूच्या प्रांतात उतरला आणि या नव्या दमाच्या सैन्याने बंडखोरांना चांगलाच दणका दिला. अखेर साडेपाच लाख ज्यू, जवळ जवळ हजारभर ज्यू वस्त्या आणि पन्नास तटबंदीयुक्त शहरं रोमन सैन्याने नष्ट करून या बंडाची अखेर केली.
या बंडामुळे या प्रदेशावर अतिशय दूरगामी परिणाम झाले. सर्वप्रथम या ज्यू लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने रोमन लोकांनी ज्यू लोकांच्या कायद्यांवर आणि हिब्रू दिनदर्शिकेवर बंदी घातली. टेम्पल माऊंट या ज्यू लोकांच्या महत्वाच्या धर्मस्थळावर अनेक पवित्र हस्तलिखितांची होळी पेटवली. ज्यू लोकांच्या मुख्य सिनेगॉगच्या आवारात रोमनांच्या देवतांचा प्रमुख देव असलेल्या ज्युपिटरचा आणि रोमन सम्राट हेंड्रियनचा पुतळा उभारला. ज्यू लोकांचं शिरकाण करण्याच्या दृष्टीने त्यांना जुडीआ आणि आजूबाजूच्या प्रांताबाहेर जायलाही रोमनांनी मज्जाव केला. हिब्रू संस्कृती या भागातून कायमची हद्दपार करण्याचा या हेंड्रियनने चंग बांधला आणि पुन्हा एकदा ज्यू लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला.
इथे ज्यू लोकांच्या नशिबी हे भोग आले असताना दुसरीकडे ख्रिस्ती धर्म मात्र हळू हळू आपला विस्तार वाढवत चालला होता. भूमध्य समुद्राच्या भागातल्या मेसोपोटेमिया, आर्मेनिया ते थेट पर्शियाच्या साम्राज्याच्या पश्चिम भागातल्या प्रांतांमध्ये आता या धर्माचा प्रसार झाला. जिझसच्या जन्मापासून ख्रिस्ती धर्मियांनी नवी कालगणना सुरु केली होती. त्या कालगणनेनुसार ख्रिस्तजन्माच्या शंभर वर्षातच रोमन साम्राज्यातल्या बऱ्याचशा लोकांनी ख्रिस्ती धर्म अंगिकारला.
ज्यू लोकांचं बंड अयशस्वी झाल्यावर रोमनांनी त्या बंडाचा राग ज्यू लोकांच्या सिनेगॉगवर काढला.. ख्रिस्तजन्मानंतर ७० वर्षातच मंदिर होत्याच नव्हतं झालं आणि जिझसने आपल्या हयातीत केलेलं भाकीत खरं ठरलं. या सिनेगॉगच्या जागी उरली ती फक्त एक भिंत. आज जेरुसलेमची जी भिंत ज्यू लोकांची पवित्र ' वेलिंग वॉल ' म्हणून ओळखली जाते, ती हीच. आता ज्यू लोक भयभीत झाले. त्यांच्या खुद्द जेरुसलेममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली गेली. आपला पूर्ण निर्वंश होतो की काय, या भीतीने ते उरलेसुरले ज्यू लोक आपल्या पवित्र भूमीतून निघून गेले. खुष्कीच्या मार्गाने आणि समुद्रमार्गाने जमेल तसे जमेल त्या दिशेला शेकडो ज्यू लोक आपल्या मायभूमीतून परागंदा होऊन सुरक्षित आश्रयाच्या शोधात निघाले. आफ्रिका, युरोप, रशिया, इराण ते अगदी भारतापर्यंत त्यांची पांगापांग झाली. या वेळी मात्र जवळ जवळ १७-१८ शतकं त्यांना आपल्या मातृभूमीत परत येणं शक्य झालं नाही. या भागातून ते जे हद्दपार झाले, ते रोमन साम्राज्य लयाला गेल्यावरही परतले नाहीत.

ख्रिस्तजन्मानंतर ३०० वर्षांनी ' कॉन्स्टंटाईन द ग्रेट ' या नावाने ओळखला जाणारा रोमन सम्राट गादीवर आला आणि त्याने ख्रिस्ती धर्माला राजधर्म म्हणून स्वीकारल्याची घोषणा केली. या एका घोषणेने ख्रिस्ती धर्म झटकन जगाच्या नकाशावरच्या एका बलाढ्य साम्राज्याचा धर्म म्हणून पुढे आला आणि अखेर त्या धर्माला राजाश्रय मिळाला. रोमन साम्राज्य तेव्हा ' पेगन ' धर्मपद्धतीने चालणार होतं. या धर्मपद्धतीत एकापेक्षा जास्त धर्मांना मान्यता होती, जी या कॉन्स्टंटाईनच्या एका घोषणेने लयास गेली. पुढच्या चार शतकांमध्ये या धर्माची वाढ अतिशय जलद रीतीने झाली.
ख्रिस्ती धर्माला आता सोन्याचे दिवस आले होते. या धर्माचा प्रभाव आता विस्तीर्ण भूभागावर आणि अतिशय मोठ्या लोकसंख्येवर प्रस्थापित झाला होता. चर्च हे राजसत्तेइतकंच प्रबळ होतं चाललं होतं. धर्मसत्तेतही आता पदांची उतरंड तयार होऊ लागली होती. वेगवेगळ्या प्रांताचे जसे प्रशासक होते, तसेच धर्मगुरूही. परंतु हे सगळं घडत असताना शेजारच्या अरबस्तानात काही घडामोडी घडत होत्या. टोळीजीवन जगणाऱ्या आणि रुक्ष वाळवंटात कशीबशी जगण्याची कसरत करत असणाऱ्या कबिल्यांमध्ये आता एक प्रेषित जन्माला येणार होता. ख्रिस्तजन्मानंतर सातव्या शतकात अरबस्तानच्या विशाल वाळवंटात मोहम्मद पैगंबरांच्या रूपाने आता एक वादळ येणार होतं.
या काळात ज्यू लोक मात्र जिथे सुरक्षित आसरा मिळेल तिथे विसावले. ज्यू लोकांनी बरोबर नेलेल्या दोन गोष्टी म्हणजे ' तोरा ' हा त्यांचा धर्मग्रंथ आणि ' हिब्रू ' हि मातृभाषा. आपल्या प्राचीन इतिहासाचा टोकाचा अभिमान आणि वांशिक शुद्धतेचा आग्रह या दोन गुणांमुळे ते गेले तिथे आपल्या वस्त्या - घेट्टो - तयार करून राहिले. जणू काही इस्राएलच्या भूमीचे विखुरलेले तुकडे असावेत, अशा त्या वस्त्यांमध्ये ज्यू लोकांव्यतिरिक्त कोणीही राहत नसत. रक्तातली व्यापारी वृत्ती त्यांना आपसूक व्यापाराकडे खेचून नेत असल्यामुळे जिथे राहिले तिथे ते व्यापारधंद्यात शिरले. ख्रिस्ती अथवा मुस्लिम लोकांप्रमाणे त्यांच्यात व्याज घेणं हे पाप समजलं जात नसे...खरं तर आजही परिस्थिती तशीच आहे. याच कारणांमुळे ते हळू हळू पैशाने साधन झाले आणि नंतर नंतर चांगले गब्बर होऊन आपापल्या प्रांतातल्या उच्चभ्रु वर्तुळात आले.
व्याज घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्यावर सावकारीचा आणि पर्यायाने बदनामीचा शिक्का लागला. जिझसच्या निर्घृण हत्येला जबाबदार तर तर त्यांचे पूर्वज होतेच. या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल इतर समाजाच्या मनात एक प्रकारची घृणा होती. त्यांच्या वंशाला हीन समजलं जात होतं. तशात ते उपरे असल्यामुळे स्थानिक लोकांनाही त्यांच्याबद्दल तितकी माया नव्हती. ज्यू लोकसुद्धा आपल्या त्या घेट्टोमध्ये आपल्याच लोकांच्या सान्निध्यात राहणं पसंत करत. रोटीबेटी व्यवहार आपापसातच करत. शिक्षण, संस्कृती, अडीअडचणीला एकमेकांना मदत इतकंच काय पण शेती, पशुपालन अशा गोष्टीही आपापसातच ठेवण्यावर त्यांचा भर असे. या सगळ्यामुळे इस्राईलहून परागंदा होताना ते जसे होते तशाच त्यांच्या पुढच्या पिढ्याही राहिल्या.
आपल्या पुढच्या पिढ्यांना ' एरेट्झ इस्राएल ' येथे - म्हणजे आपल्या पूर्वजांनी आणि यहोवा देवतेने आपल्यासाठी निवडलेल्या पवित्र कनानच्या भूमीत कधी ना कधी आपण नक्की जाऊ अशा दुर्दम्य आशावादाचं आणि इच्छाशक्तीचं बाळकडू पाजत त्यांनी वाढवलं. जेथे जातील तिथल्या स्थानिक भाषा, रीतिरिवाज आणि समाजप्रथा शिकण्याचं त्यांना कधीच वावडं नव्हतं, पण त्यासाठी त्यांनी आपल्या हिब्रू भाषेला आणि ज्यू संस्कारांना तिलांजली दिली नाही.
सर्वाधिक प्राचीन धर्म विखुरलेला , दुसरा काही शतकांपूर्वी जन्माला येऊनही विस्तारलेला आणि बाकीचे धर्म व पंथ नुसते नावालाच उरलेले अशा परिस्थितीत जन्माला आलेला नवा इस्लाम धर्म पुढे या सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने फोफावला. या तीन धर्मांमध्ये आपापसात पुढे अनेक वेळा झटापटी होणार होत्या आणि प्रत्येक धर्मामध्येही अनेक पंथ निर्माण होणार होते. अब्राहमच्या वंशजांच्या या सगळ्या कृत्यांमध्ये आता युरोपपासून आशियापर्यंतच्या भागात घडामोडी घडणार होत्या.
यापुढे थेट एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये सुरू झालेल्या झिओनिस्ट चळवळीनंतर पुन्हा एकदा या तीन धर्मांच्या तलवारी आपापसात भिडल्या. सुरुवात झाली युरोप मधून, आणि त्याचे लोण हळू हळू मध्यपूर्वेत पसरले आणि सरतेशेवटी ज्यू लोकांनी पुन्हा एकदा आपला देश निर्माण केला...पण त्याविषयी पुढच्या भागात.....तोवर, अलविदा!

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ०७

Submitted by Theurbannomad on 23 May, 2021 - 11:06

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात थिओडोर हर्टझल यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळपुरुषांच्या पावलांवर पाऊल ठेवून समस्त पृथ्वीतलावर विखुरलेल्या ज्यू लोकांना एक महत्वाचं आवाहन केलं. यहोवा देवतेने फक्त ज्यू लोकांसाठी नेमून दिलेल्या कनानच्या पवित्र भूमीवर आपला हक्काचा देश - ' इस्राएल ' निर्माण करण्यासाठी एकत्र यावं हे ते आवाहन म्हणजेच ' झिओनिसम ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कडव्या ज्यू राष्ट्रवादाची सुरुवात. अठराव्या शतकापासून पूर्व युरोपमध्ये विखुरलेल्या ज्यू लोकांमध्ये सुरु झालेली ' हसकला ' नावाने ओळखली जाणारी चळवळ हा झिओनिसमचा तात्विक आणि बौद्धिक पाया. युरोप, मध्यपूर्व आणि आजूबाजूच्या भागातल्या सर्वाधिक प्राचीन संस्कृतींपैकी सगळ्यात प्राचीन आणि म्हणून ' आद्य ' असलेली ज्यू संस्कृती तिच्या मूळ स्वरूपात जपणं हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता, ज्यातून ' झिओनिसम ' ला पोषक पार्श्वभूमी तयार व्हायला मदत झाली.

या काळात युरोपमध्ये प्रचंड उलथापालथ होत होती. दूर अमेरिकेत लोकशाही आकाराला येत होती. युरोपमध्येही त्या दिशेने हालचाली होत होत्या. ' कधीही सूर्य ना मावळणाऱ्या ' साम्राज्याच्या बढाया मारणाऱ्या ब्रिटनमध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच संसदेची स्थापना झालेली होती. पुढे सहा दशकांनंतर ' फ्रेंच राज्यक्रांती ' होऊन युरोपमधल्या या दुसऱ्या महासत्तेला लोकशाही स्वीकारावी लागली. युरोपच्या भूमीवर सतत नवीनवी समीकरणं जन्माला येत होती. उर्वरित जगाची - विशेषतः आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेकडच्या प्रदेशांची या वसाहतवादी देशांनी वाटणी करून घेतलेली होती आणि आपापल्या वसाहतींमधून अधिकाधिक साधनसंपत्ती कशी ओरबाडत येईल याची या सगळ्या देशांमध्ये चढाओढ लागलेली होती.

अशा सगळ्या वातावरणात शांतपणे आपल्या वस्त्यांमध्ये - ' घेट्टो' मध्ये - सर्वसामान्य जीवन जगणारे ज्यू लोक कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा पद्धतीने सगळ्यांपासून सामान अंतर राखून होते. थेट दुसऱ्या शतकात रोमन सेनानी सेक्सटस जुलियस सेव्हरस याने केलेल्या भीषण पराभवानंतर रोमन साम्राज्याच्या जाचाला घाबरून ज्यू लोक कनानच्या भूमीतून जे परागंदा झाले, ते १७-१८ शतकं परतले नाहीत. त्यातले काही युरोपमध्ये , काही थेट भारतापर्यंत आणि काही रशियाच्या भूमीवर स्थिरावले. या ज्यू लोकांनी बरोबर नेल्या दोन महत्वाच्या गोष्टी - आपल्या यहोवा देवतेने दिलेल्या शिकवणुकीचा धर्मग्रंथ - ' तोरा ' आणि आपली मूळ भाषा - ' हिब्रू ' . हे ज्यू लोक होते हाडाचे व्यापारी. जोडीला कमालीची चिकाटी आणि कष्ट उपसायची तयारी असल्यामुळे ते जिथे गेले तिथे गब्बर श्रीमंत झाले. पण पारशी लोक जसे भारतात पळून आल्यावर भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन गेले, तसे ज्यू मात्र जगातल्या कुठल्याही देशातल्या संस्कृतीत विरघळून गेले नाहीत. आपल्या वस्त्या उभारून, आपल्या संस्कृतीला कवटाळून आणि आपल्या धर्माला चिकटून हे ज्यू स्वखुशीने ' उपरे ' राहिले.
युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वसामान्य लोकांमध्ये ज्यू लोकांविषयी प्रचंड तिटकारा निर्माण झाला.ज्यू लोकांच्या हाती एकवटलेल्या पैशांमुळे आणि त्यापाठोपाठ त्यांच्याकडे आपसूक चालत आलेल्या ' राजकीय आणि सामाजिक ' ताकदीमुळे त्यांच्यावर सामान्य जनता खार खाऊन होती , शिवाय ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य असलेल्या युरोपमध्ये येशूच्या ' हत्येला ' जबाबदार असलेल्या ज्यू धर्मियांबद्दल घृणा होतीच. तशात फ्रान्समध्ये ' ड्रेफस अफेयर ' नावाने प्रसिद्ध असलेली एक अशी घटना घडली, ज्यामुळे ज्यू लोकांच्या आत्मसन्मानाला चांगलीच ठेच लागली.

फ्रेंच सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर असलेल्या आल्फ्रेड ड्रेफस यांच्यावर वरिष्ठ फ्रेंच अधिकाऱ्यांनी फ्रान्सच्या विरुद्ध हेरगिरी करून महत्वाची माहिती जर्मनीला पुरवल्याचा ठपका ठेवला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे या प्रकरणात सामील असलेला खरा देशद्रोही सापडलाही, जो फर्डिनांड एस्तेरहाझी नावाचा फ्रेंच आर्मी मेजर होता. पण मधल्या काळात या घटनेमुळे फ्रेंच जनतेकडून ज्यू लोकांवर चांगलीच चिखलफेक झाली. ज्यू लोकांना अक्षरशः देशद्रोही, कपटी आणि कारस्थानी अशा शेलक्या विशेषणांनी संबोधलं जाऊ लागलं. पुढे सत्य परिस्थिती पुढे येऊनही या घटनेचे घाव काही भरून आले नाहीत. हे सगळं सहन करत असतानाच थिओडोर हर्टझल यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला - ज्यू लोकांचा स्वतःचा देश जन्माला घालायचा आणि ज्यू लोकांनी तिथे पूर्ण सन्मानाने आपल्या मातृभूमीच्या कुशीत ताठ मानेने जगायचं.
आपल्या या उद्दिष्टाच्या दिशेने त्यांनी पहिलं पाऊल टाकलं ' वर्ल्ड ज्युईश काँग्रेस ' भरवून. १८९७ साली बासल येथे भरलेल्या या परिषदेत अथक प्रयत्न करून हर्टझल यांनी जगभरातून २०८ मान्यवर ज्यू लोकांना एकत्र आणलं होतं. शिवाय देशोदेशीचे २६ पत्रकार या परिषदेच्या वृत्तांकनासाठी आलेले होते. या परिषदेत आडमार्गाने का होईना, पण ज्यू लोकांचा हक्काचा देश त्यांच्या पवित्र भूमीत पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या उद्देशाची पायाभरणी झाली. हे काम पुढे हाती घेतलं रशियामध्ये जन्माला आलेल्या आणि पेशाने बायोकेमिस्ट असलेल्या डॉक्टर चैम वैझमन यांनी. किण्वन क्रियेला औद्योगिक पातळीवर यशस्वी करण्याचं काम करणारे किमयागार ते हेच.

या मनुष्याने स्वतंत्र ज्यू राष्ट्र उभारण्याचं इतकं मनावर घेतलं, की त्यासाठी त्यांनी आपलं ब्रिटिश दरबारातलं वजन वापरून थेट ब्रिटिश संसदेचं पंतप्रधानपद भूषविलेल्या आर्थर बाल्फोर यांनाच आपल्या प्रभावाखाली आणलं.' बाल्फोर डिक्लरेशन ' या नावाने प्रसिद्ध असलेल्या जाहीरनाम्याचे हे जनक. या जाहीरनाम्यात प्रथमतः ज्यू लोकांच्या हक्काच्या भूमीचा उल्लेख ब्रिटनसारख्या महासत्तेच्या संसदेत उघडपणे झाला. या जाहीरनाम्यात हेतुपुरस्पर पॅलेस्टिनमधल्या ज्यू लोकांना ' त्यांची पवित्र भूमी ' मिळावी याचा उल्लेख स्पष्ट ठेवून बाकीच्या गोष्टी मात्र संदिग्धपणे मांडल्या गेल्या होत्या. तेव्हाच्या ब्रिटिश आसमंतात आपला आब राखून असलेले अनेक ज्यू - ज्यात धनाढ्य बँकर लॉर्ड रॉथशिल्ड, सांसद हर्बर्ट सॅम्युएल असे महत्वाचे लोक होते - या जाहीरनाम्याच्या बाजूने असल्यामुळे एका अर्थाने ज्यू लोकांच्या ' इस्राएल ' च्या मागणीला चांगलाच राजाश्रय मिळाला.

या सगळ्यातून झालं एकच - यूरोपच नाही, तर अगदी अमेरीकेहूनही ज्यू लोक भरभरून आपल्या पवित्र भूमीकडे निघाले. ' आलिया ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यू लोकांच्या स्वगृही परतण्याच्या या प्रवासातून हजारो ज्यू पॅलेस्टिनच्या भूमीवर उतरले. ज्यू लोकांकडे पैसा भरभरून होताच, जोडीला ' बाल्फोर जाहीरनाम्याच्या ' आडून आपलं इप्सित साध्य करून घ्यायचा बेरकीपणाही होता. १८८२ साली ' आलिया ' ची पहिली लाट आली ती जेमतेम ३०-३५००० ज्यू लोकांची. परंतु या सगळ्या घडामोडींनंतर १९२९-१९३९ दरम्यानच्या पाचव्या लाटेत तब्बल २५०००० ज्यू आपल्या मातृभूमीमध्ये परतले. तशात हिटलरने ज्यू लोकांचा केलेला वंशसंहार, अरबी धर्मगुरू अमीन अल हुसेनीसारख्या ज्यू-द्वेष्ट्यांनी ज्यूंचा केलेला नरसंहार या सगळ्या घटनांमुळे ज्यू लोकांबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली.

अखेर १४ मे १९४८ चा तो दिवस उजाडला. अमेरिकेपासून युरोपपर्यंतच्या अनेक बलाढ्य देशांमध्ये पसरलेल्या ज्यू लोकांनी आपल्या अथक प्रयत्नांनी जगाच्या पटलावर आपला हक्काचा देश जन्माला घातला. अमेरिकेचे खमके राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रख्यात असलेले रुझवेल्टही ज्यू लॉबीच्या दबावापुढे तग धरू शकले नाहीत, तिथे इतरांची काय कथा ! पुढच्या वर्षभरात या ' इस्राएल' चा ' संयुक्त राष्ट्रसंघात ' समावेश झाला. पॅलेस्टिनच्या अरबांना आपल्या भूमीचे तुकडे पडत असूनही काहीही करता आलं नाही. या ज्यू राष्ट्राचे - स्वतंत्र इस्राएल देशाचे पहिले राष्ट्रप्रमुख झाले अर्थात चैम वैझमन आणि अमेरिकेत ज्यू लोकांची तगडी लॉबी तयार करून अमेरिकेच्या सिनेटमध्ये ज्यू लोकांचा दबदबा निर्माण करणारे डेव्हिड बेन गुरियन झाले इस्राएलचे पहिले पंतप्रधान.

तेलसंपन्न अरबी देशांनी चहुबाजूने वेढलेल्या आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती पाचवीला पुजलेल्या या देशाला सतत अस्तित्वाचा संघर्ष करावा लागणार हे उघड होतं. यहोवा देवाने नक्की कोणत्या उद्देशाने असा भूप्रदेश आपल्या अनुयायांना ' पवित्र भूमी ' म्हणून नेमून दिला होता, हे त्यालाच माहित, परंतु त्याच्या या अनुयायांनी पुढे अशा परिस्थितीतही जे काही करून दाखवलं, त्याला जगाच्या इतिहासात खरोखर तोड नाही.

अथक संघर्ष करून आणि प्रसंगी रक्ताचं शिंपण करून पुन्हा एकदा शून्यातून उभा केलेला आपला हक्काचा देश ज्यू लोकांनी प्राणपणाने जपला, तो आजतागायत. १९४८ पासून ते आत्तापर्यंत या देशाने फत्ते केलेल्या विस्मयकारक लष्करी मोहिमा या देशाच्या विजिगीषू वृत्तीची प्रचिती तर देतातच, शिवाय या मोहिमांच्या आखणीमागे पडद्यापुढून आणि पडद्याआडून काम करणाऱ्या असंख्य लोकांमध्ये असलेल्या सुसूत्रतेचीही महती पटवून देतात.

स्थापनेआधीपासून या देशाने अंगिकारलेल्या लष्करी संस्कृतीचा हा परिपाक. सर्वसामान्य नागरिकही वेळप्रसंगी शस्त्र घेऊन आपल्या पवित्र भूमीच्या रक्षणार्थ शत्रूशी दोन हात करायला सज्ज होऊ शकेल, अशी या देशाची महती. सैनिकी प्रशिक्षण प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्यामुळे आणि आईच्या गर्भातूनच मिळत असलेल्या कमालीच्या चिवट वृत्तीमुळे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकात एक परिपूर्ण योद्धा लपलेला असतोच. जोडीला थंड डोक्याने आणि अतिशय योजनाबद्ध रीतीने प्रत्येक मोहीम तडीस नेण्याची क्षमता या देशाच्या लष्कराला आणि हेरखात्याला जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाच्या पातळीवर नेऊन सोडते.

शेजारच्या अरबस्तानमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि रशिया या तीन महासत्ता आपापल्या पद्धतीने वाळूत रेषा काढून तिथे नवनवे घोळ घालण्यात गुंग होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दात या महासत्ता स्वतः खिळखिळ्या झाल्या तरी त्यांच्यातली साम्राज्यवादी मस्ती जिरली नव्हती...त्यातून पुढे जे काही प्रकार घडले, त्यातून अरब जगत सगळ्याच अर्थाने दुभंगल...आणि या भागात तेल सापडल्यावर इथे या सगळ्या साम्राज्यवादी देशांचा ' बाप ' या भागात अवतरला. हा देश एक तर आर्थिकदृष्ट्या प्रबळ. युरोपमधून निर्वासित झालेल्या अनेक कुशाग्र लोकांना आसरा देणारा...आणि त्यांच्या जोरावर आपलं तंत्रज्ञान जगाच्या चार पावलं पुढे नेलेला..... हा देश म्हणजेच ' अमेरिका '.

अमेरिकेत ज्यू लोकसंख्या मोठी.... सगळेच महत्त्वाचे उद्योग, वित्तसंस्था, वृत्तपत्र संस्था, शैक्षणिक संस्था यांमध्ये ज्यू लोकांचं प्राबल्य होतं. अल्बर्ट आईनस्टाईन, सिग्मंड फ्रॉईड, वॉल्ट डिस्ने, रॉबर्ट ओपन्हाईमार.....अशी जागतिक कीर्तीची मोठी नावं ज्यूच आहेत. इतकंच काय, पण युरोप आणि अमेरिकेत तेव्हाही आणि आजही राजकीय क्षेत्रात ज्यू लॉबी आपला प्रचंड दबावगट राखून आहे. या सगळ्याचा परिपाक इतकाच, की भांडकुदळ आणि भडक अरबांना सुसंघटित आणि संपन्न ज्यू लोकांनी त्यांच्या नाकावर टिच्चून आपला देश तयार करून दाखवला आणि तोही जेरुसलेमसकट! त्यावर पुढच्या भागात सविस्तर बोलू, तोवर अलविदा.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ८

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 14:10

एकोणिसाव्या शतकात युरोपीय महासत्तांनी आशिया, आफ्रिका आणि अरबस्तानाची आपापसात वाटणी करून घेतली होती. अरबस्तान आणि लेव्हन्ट भागात तेव्हा अनेक साम्राज्य आपल्या शेवटच्या घटका मोजत होती. ऑटोमन आणि पर्शियन साम्राज्य युरोपीय महासत्तांनी अंकित झालेली होती. युरोपियन महासत्तांनी जागोजागच्या प्रांतात तयार झालेल्या स्वयंभू सुभेदारांना आधी फूस लावली, त्यांना आपापल्या साम्राज्याच्या विरोधात भडकावलं आणि त्यांच्यातल्या साठमाऱ्यांमध्ये आपले हात धुवून घेतले. जिथे कोणी नव्हतं, तिथे त्यांनी आपली प्यादी आणून बसवली. अखेर या विस्तीर्ण भूभागावर युरोपियन साम्राज्यवाद्यांनी आपला अंमल बसवला.
या सगळ्यात आघाडीवर होते ब्रिटिश आणि फ्रेंच. एकमेकांना सतत पाण्यात बघणारे, एकमेकांशी सतत स्पर्धा करणारे पण वेळप्रसंगी आपल्या फायद्याचा वास आला तर एक होऊन इतर युरोपीय स्पर्धकांना मागे रेटणारे हे दोघे सांड पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात गेले सुएझच्या कालव्याच्या प्रकरणामुळे. फ्रेंच अभियंते आणि इजिप्तमधले फ्रेंच राजनैतिक अधिकारी असलेले फर्डिनांड द लेसेप्स यांनी आपल्या फावल्या वेळात जुन्या हस्तलिखितांचा अभ्यास करायला सुरुवात केला. त्यात अनपेक्षितपणे त्यांना पुरातन काळात इजिप्तच्या फारो राजाने तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडणारा कालवा तयार केल्याचा उल्लेख सापडला आणि त्यांच्या डोक्यात ही कल्पना घर करून गेली. तेव्हाच्या इजिप्तच्या सर्वेसर्वा मुहम्मद अली पाशा याच्या मुलाला - सैद पाशाला त्यांनी ही कल्पना सांगितली आणि या दोघांनी मिळून फ्रांस - इजिप्त या दोन देशातल्या अनेक धनदांडग्यांना हाताशी धरलं. शेवटी फ्रेंचांनी ९९ वर्षांसाठी कालव्याचा हक्क आपल्या पदरात पडून घेऊन कामाला सुरुवात केली.
या सगळ्याकडे चरफडत बघणाऱ्या ब्रिटिशांनी पुढे एक धूर्त व्यापारी खेळी केली. कालव्यात तिजोरी रीती केल्यावर पाशा पुरेसा खंक झाला आहे हे बघून त्यांनी इजिप्तच्या लांब धाग्याच्या कापसाची खरेदीच बंद केली. पाशाला पैशांची चणचण भासू लागल्यावर त्याने ब्रिटिशांना त्यांच्या कृतीबद्दल जाब विचारला. ब्रिटिशांनी साळसूदपणे कालव्याचे ४०% समभाग आपल्या पदरात पडून घेतले आणि त्याच्या मूल्याइतके पौंड पक्षाच्या तिजोरीत भरून त्याला पुन्हा एकदा गब्बर केलं. या सगळ्यामुळे फ्रेंच चांगलेच संतापले आणि दोघा महासत्तांमध्ये चांगलाच बेबनाव निर्माण झाला. इतका, की त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरु झाली.


या सगळ्यात ब्रिटिशांकडून आघाडीवर होते पंतप्रधान बेंजामिन डिझरेली. हेमूळचे ज्यू, त्यामुळे ज्यू वर्तुळात चांगली उठबस असणारे...पण राजनैतिक आघाडीवर आपल्या महत्वाकांक्षेला पूर्णरूप द्यायला त्यांनी ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा स्वीकारलेला होता. त्यामुळे ख्रिस्ती लोकांशीही त्यांची चांगली घसट होती. त्यांना साथ मिळाली रॉथशिल्ड कुटुंबाची...हे कुटुंब युरोपमधलं बँकिंगच्या क्षेत्रातील बलाढ्य नाव होतं. अर्थातच हे कुटुंब ज्यू होतं.
पुढे या ब्रिटिशांनी पाशाच्या विरोधात इजिप्तमध्ये वातावरण तापवून त्यालाही पदच्युत केलं. त्याच्या मुलाला गादीवर बसवून त्यांनी ' सैन्य ' आणि ' तिजोरी ' सोडून बाकी सगळं कारभार करण्याची ' स्वायत्तता ' त्याच्या पदरात टाकली आणि फ्रेंच साम्राज्याचा इजिप्तवरचा वरचष्मा संपला.
फ्रेंचांनी सुएझच्या कालव्याच्या मुखाशी उभा करण्याच्या उद्देशाने तयार केलेला ' स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ' त्यांनी या सगळ्या प्रकारामुळे खट्टू होऊन थेट अमेरिकेच्या पदरात घातला - भेट म्हणून. पण या प्रकारानंतर एकमेकांच्या अहंकाराला शमवण्याची जी स्पर्धा युरोपीय सत्तांमध्ये सुरु झाली, त्यात शकलं पडली आफ्रिका आणि अरबस्तानच्या भागांची. याची सुरुवात झाली ब्रिटिशांकडूनच - त्यांनी मोरोक्को देशाचा भूभाग फ्रेंचांना ' आंदण ' दिला - कसा, तर तिथे फ्रेंचांची निरंकुश सत्ता त्या देशावर स्थापन करण्यासाठी आपण मदत करू हे आश्वासन देऊन. तिथे आधीपासून स्पॅनिश लोकांनी किनारी भागात बस्तान बसवलं होतं...कारण जिब्राल्टरच्या चिंचोळ्या समुद्रधुनीच्या एका बाजूला मोरोक्को तर दुसऱ्या बाजूला स्पेन....या दोन्ही महासत्तांनी स्पेनला व्यवस्थित डावलून आपले मनसुबे सफल केले. मोरोक्कोच्या बाजूचा अल्जेरिया आधीपासूनच फ्रेंचांचा होता. पण ब्रिटिश मुरलेले राजकारणी....इतक्या महत्वाच्या सामुद्रधुनीवर फ्रेंचांचा वरचष्मा राहायला नको हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी मुद्दाम ही खेळी केली होती, कारण या प्रकारामुळे इटली आणि जर्मनी भडकले. युरोपचा व्यापारी मार्ग या चिंचोळ्या सामुद्रधुनीतून जात असल्यामुळे सगळ्यांचा जीव तिच्यात अडकलेला होता.
अखेर हे सगळे वसाहतवादी देश आणि अटलांटिकपलीकडून आलेली अमेरिका असे सगळे जण टेबलवर बसले आणि त्यांनी मोरोक्कोवर फ्रेंचांचा ताबा मान्य केला. जर्मनी या सगळ्यामुळे बिथरला आणि त्यांनी थेट ऑटोमन साम्राज्याशी घसट वाढवून पुढे अनेक उचापती केल्या. या सगळ्याचा थेट संबंध भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशांशी येत असल्यामुळे तिथले अनेक प्रदेश या साठमारीत भरडले गेले. त्या प्रदेशांमधला एक होता पॅलेस्टिन आणि तेव्हा या प्रदेशावर वर्चस्व होतं ऑटोमन साम्राज्याचं.
पुढे झिओनिस्ट चळवळ युरोपमध्ये आकाराला येऊ लागली आणि या भागाचं समीकरण पुन्हा एकदा डळमळीत होऊ लागलं. जगभरातल्या ज्यू लोकांना आपला हक्काचा देश आपल्याच पवित्र कनानच्या भूमीत आकाराला यावा अशी स्वप्नं पडू लागली ती पहिल्या जागतिक ज्यू परिषदेमुळे. हा काळ विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचा. या काळात एकीकडे लोकशाहीचं वारं बऱ्याच देशांमध्ये वाहायला लागलेलं आणि दुसरीकडे इस्लामी जगताच्या खलिफापदाचा मान मिरवणाऱ्या ऑटोमन साम्राज्याची शेवटची घटका जवळ आलेली. रशियात राज्यक्रांती झाली ती बोल्शेविकांच्या हातात सत्ता देऊन विसावली. ते लोण पुढे चीनमध्ये जाऊन तिथे प्रस्थापित राजघराण्याविरोधात जात सन यत् सेन यांनी साम्यवादी विचारसरणी जवळ केली. युरोपमध्येही राजेशाही नावाला उरलेली....पण अचानक ऑस्ट्रिया - हंगेरीचा आर्चड्यूक फ्रांस फर्डिनांड याचा सारजेवो येथे खून झाला आणि पहिल्या महायुद्धाच्या तुताऱ्या फुंकल्या गेल्या.
या युद्धात धनाढ्य ज्यू व्यापाऱ्यांची महती समस्त युरोपला कळली. युद्धात लागणारा पैसा , शस्त्रास्त्र, रसायनं , तंत्रज्ञान अशा सगळ्या आघाड्यांवर ज्यू लोकांच्या कंपन्या युरोपीय सत्तांना टेकू देत होत्या. या धनाढ्य ज्यू लोकांमध्ये अनेक जण ' एरेट्झ इस्राएल ' च्या स्वप्नाने भारलेले होते. त्यांनी या सगळ्याच्या मोबदल्यात मागणी केली आपल्या स्वतंत्र इस्राएल देशाची. आडून आडून युरोपियन ज्यू आपल्या ' मायभूमीत ' जाण्याच्या उद्देशाने पॅलेस्टिनमध्ये आपली संख्या वाढवत होते. त्यांनी आपल्याकडच्या पैशांच्या मोबदल्यात पॅलेस्टिनी अरबांकडून जमिनी विकत घेतल्या. त्याही सलग. एकदा जमिनी मिळवल्या की तिथे ते आपली घरं बांधायचे, आपल्या वस्त्या उभारायचे आणि त्यात ज्यू लोकांव्यतिरिक्त कोणीही घुसणार नाही याची काळजी घ्यायचे.
पण काही वर्षातच हिटलरच्या रूपाने ज्यू लोकांचा कर्दनकाळ जर्मनीमध्ये अवतरला. त्याला साथ मिळाली अमीन अल हुसेनी या आग्यावेताळाची. हा पॅलेस्टिनी अरब कडवा राष्ट्रवादी विचारांनी भारलेला...आणि त्यात त्याचा वंश थेट मोहम्मद पैगंबरांशी नातं सांगणारा असल्यामुळे हा जेरुसलेमचा मुफ्तीही होता. त्याचा झिओनिस्ट चळवळीला कडवा विरोध. या दोघांनी मिळून ज्यू लोकांचा जो नरसंहार केला, त्यामुळे जगभरात ज्यू लोकांविषयी अचानक प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. लाखो ज्यू ' होलोकॉस्ट ' च्या नृशंस हत्याकांडात मेले असले, तरी त्या निमित्ताने युरोपभरातून ज्यू लोकांचा लोंढा जेरुसलेम आणि पॅलेस्टिनच्या दिशेला वळला.
या सगळ्या गोंधळात भर घातली सदानकदा वेगवेगळ्या देशांमध्ये / धर्मांमध्ये / जातींमध्ये ' घोळ ' घालत आपल्या सत्तेचा खुंटा बळकट करणाऱ्या ब्रिटिशांनी, ब्रिटिशांहून चिवट आणि दडपशाही गाजवण्यात पुढे असलेल्या फ्रेंचांनी आणि दूर अटलांटिक पल्याड राहून सगळ्या विश्वावर सत्ता गाजवणाऱ्या अमेरिकेने. दोन महायुद्धात ऑटोमन साम्राज्याची अखेर झालीच, पण केमाल पाशा यांनी आपणहून खिलाफत गुंडाळून मुस्लिम जगताच्या नेतृत्वाची पोकळी निर्माण केली. ती जागा भरून काढली नव्याने क्षितिजावर उदयाला येत असलेल्या सौदीने. मुस्लिम जगतात मक्का आणि मदिना या दोन जागा अतिशय महत्वाच्या...त्याच अब्दुल अझीझ इब्न सौद याच्या नेतृत्वाखाली सौदी वहाबी फौजांनी आपल्या ताब्यात आणल्या आणि त्यांनी मुस्लिम जगाचं नेतृत्व स्वीकारलं.
ब्रिटिश आणि फ्रेंच ( आणि काही प्रमाणात रशिया ) या सांडांनी मिळून अरब - लेव्हन्ट भागात जो काही घोळ घातला, त्याचं नाव ' साईक्स - पिको ' करार. या करारामुळे या भागात निर्माण झालेली राजकीय सुंदोपसुंदी अजूनही इथे अधून मधून धुमसत असते...पण त्यावर पुढच्या भागात. तोवर अलविदा!

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग ९

Submitted by Theurbannomad on 25 May, 2021 - 16:31

साईक्स पिको करार हा ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी परस्पर आपापसात बसून केलेला उद्योग. या करारामागचा उद्देश होता आचके देणाऱ्या ऑटोमन साम्राज्याचे तुकडे कशा प्रकारे करायचे आणि कोणकोणते भाग कोणाकोणामध्ये वाटून घ्यायचे. १९१६ सालच्या जानेवारीत , अगदी नाताळच्या मेणबत्त्या विझायच्या आत या करारावर सह्या झाल्या. या करारात वास्तविक इटली आणि रशिया हे दोन भिडूसुद्धा सामील होते...पण त्यांना अरबस्तानच्या वाळवंटात विशेष रस नव्हता. रशियाला भूमध्य समुद्रात उतरायचा मार्ग तेव्हढा मोकळा करून हवा होता , जो मिळाल्यावर त्यांनी पुढच्या वाटाघाटींमध्ये विशेष सहभाग नोंदवलाच नाही. आर्मेनियाचा पश्चिम भाग, इस्तंबूल आणि तुर्कस्तानमधले एजियन , भूमध्य आणि काळ्या समुद्राला जोडणारे जलमार्ग रशियाने आपल्या हातात आणले.
ब्रिटिश आपल्या लौकीकाला साजेशी खेळी इथेही करत होते. एकीकडे त्यांच्या वतीने मक्केचा शरीफ असलेला हुसेन बिन अली याच्याशी सर हेन्री मॅकमोहन वेगळ्याच वाटाघाटी करत होते. शरीफ यांच्या सैन्याने तत्कालीन ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात आघाडी उघडावी आणि ऑटोमन साम्राज्य अस्ताला न्यावं असा ब्रिटिशांचा प्रस्ताव होता.. आणि त्याबदल्यात ते शरीफ यांना त्यांचं अरब साम्राज्य ( मक्का - मदिना या दोन महत्वाच्या स्थळांसकट ) देणार होते. पाहुण्यांच्या काठीने विंचू मारण्याची ही ब्रिटिश कूटनीती. दुसरीकडे याच ब्रिटिशांच्या वतीने मार्क साईक्स त्याच ऑटोमन साम्राज्याच्या वाटणीसाठी फ्रॅन्कवा जॉर्जेस - पिको या फ्रेंच अधिकाऱ्याशी बोलणी करायला बसले होते. आपल्या तीर्थरुपांनी जणू काही हे सगळे प्रांत आपल्याला आंदण दिलेले आहेत या थाटात हे दोघे जानेवारी महिन्याच्या सुखद वातावरणात एका तंबूत टेबलवर या प्रांताचा नकाशा पसरवून बसलेले होते.
सर्वप्रथम पिको यांनी आपल्या हातात निळ्या रंगात बुडवलेला ब्रश घेतला आणि एका फटक्यात भूमध्य समुद्राच्या काठावरच प्रदेश आणि सध्याच्या इराक, सीरिया, पश्चिम जॉर्डन, लेबनॉन या देशांचा प्रदेश निळा केला. मोसूल पासून थेट बेरूत पर्यंतचा आडवा पट्टा त्यांनी आपल्या ' खिशात ' घातला. साईक्स लाल ब्रश घेऊन पुढे आले आणि त्यांनी जॉर्डनपासून थेट आखाती देशांपर्यंतचा भाग लाल रंगात रंगवला. त्यानंतर पाळी आली ती व्यापारी बंदरांची. ब्रिटिशांकडे हैफा, बसरा आणि एडन ही बंदरं होती, आणि फ्रेंचांकडे बेरूत आणि एकर ही बंदरं.त्यांनी आपापसात चर्चा करून या बंदरांमध्ये एकमेकांना मुक्त व्यापार करू द्यायचा निर्णय घेतला. ब्रिटिशांना वास्तविक मोसूल आणि मेसोपोटेमियाचा भाग सोडायची इच्छा नव्हती, कारण तिथे तेल असल्याचे अहवाल त्यांना मिळालेले होते, पण त्यांनी अखेर त्या बाबतीत नमतं घेतलं.


पॅलेस्टिन आणि जेरुसलेम या भागावर दोघांकडून वाटाघाटी झाल्या. ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या नकळत पॅलेस्टिनी अरबांना आणि ज्यू लोकांना एकाच वेळी त्यांच्या स्वतंत्र देशाचं आमिष दिलेलं होतंच...तेव्हा या भागात फ्रेंचांनी नाक खुपसलेलं त्यांना चालणार नव्हतं....पण शेवटी त्यांनी आपल्या स्वभावाला साजेसा निर्णय घेऊन वेळ मारून नेली. जेरुसलेमचा भाग आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली असावा असा या दोघांनी ' निर्णय ' घेतला आणि साईक्स यांनी तात्पुरता पॅलेस्टिनचा प्रश्न बाजूला ठेवला.
पुढे रशियन क्रांतीने बोल्शेव्हिक सत्तेत आले आणि त्यांच्या हाती रशियाच्या प्रतिनिधींनी नेमले या कराराचे दस्ताऐवज पडले. ब्रिटिश आणि फ्रेंचांनी हा करार अतिशय गुप्त ठेवला होता. शरीफ यांना रसद पुरवून ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्याच्या कबरीवर फुलं वाहण्याची पुरेपूर तयारी केली होती...पण बोल्शेव्हिकांनी नेमका हा करार शरीफ यांच्या हाती ठेवला आणि ते खवळले. जे साम्राज्य पुढे माझं होणार, ते या दोघांनी आपापसात आधीच वाटून घेतलेलं आहे हे त्यांना पचायला अवघड गेलं...पण शेवटी त्यांनी रागारागात थेट ब्रिटिशांना जाब विचारला. त्यांनी साळसूदपणे ' हा तात्पुरता करार असून तुम्ही जोवर सत्तारूढ होतं नाही तोवर आम्ही दोन देशांनी या भागात प्रशासकीय व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी तो केला आहे ' अशा पद्धतीच्या भूलथापा त्यांना दिल्या. शरीफच ते....त्यांनी धूर्त ब्रिटिशांवर विश्वास ठेवून आपला राग आवरला. ब्रिटिशांनी पुढे दमास्कसमध्ये आपल्या फौज घुसवून ऑटोमन फौजांना धूळ चारल्यावर त्यांनी अगदी अगत्याने शरीफ यांना या ऐतिहासिक शहरात पहिलं पाऊल ठेवायचा मान वगैरे दिला. या सगळ्यामुळे हरखून जाऊन शरीफ यांनी आपली सगळी शक्ती ब्रिटिशांच्या मागे उभी करून ऑटोमन साम्राज्य संपवायच्या कार्यात हातभार लावला.
१९०५ साली सातवी ज्यू परिषद भरल्यावर तिथून ज्यू प्रतिनिधी बाहेर पडले, ते थेट मायभूमी मिळवायच्या उद्देशानेच. १९१४ साली सुरु झालेल्या पहिल्या महायुद्द्धापर्यंत एक लाख ज्यू पॅलेस्टिनमध्ये आलेले होते...आणि त्यांनी सलग भूभाग विकत घेऊन तिथे आपल्या वस्त्या - किबुट्झ - उभारलेल्या होत्या. १९१६ साली साईक्स - पिको करार झाला. ऑटोमन साम्राज्य पुढच्या दशकभरात खिळखिळं होऊन गेलेलं होतंच....तेव्हा ज्यू लोकांनी अधिक जोमाने आपल्या लोकांना पॅलेस्टिनी भागात पाठवायला सुरुवात केली. स्थानिक पॅलेस्टिनी इतके कोत्या दृष्टीचे होते, की पैसा मिळाल्यावर त्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी विकल्याच, पण तिथे उभ्या राहणाऱ्या किबुट्झ बघूनही त्यांना पुढचा धोका लक्षात आला नाही.
साल १९१७. दोस्त राष्ट्रं पहिलं महायुद्ध जिंकणार याचा अंदाज आता सगळ्यांना आलेला होता. तिथे ब्रिटिश संसदेत डॉक्टर चैम वाइझमान यांनी आपल्या हाताशी धरलं आर्थर बाल्फोर यांना. हे ब्रिटिश सांसद चर्चिल यांचे कट्टर विरोधक. वाइझमान यांनी ऍसिटोन या रसायनाच्या साहाय्याने दारुगोळा बनवायची पद्धत शोधून काढून ब्रिटिशांना ऐन युद्धात मोलाची मदत केली होती. त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही झालेला होता. त्यांनी आपलं हे सगळं वजन वापरलं बाल्फोर यांच्या साहाय्याने एक जाहीरनामा तयार करण्यात. खुद्द बाल्फोर यांनी तो संसदेच्या पटलावर मांडला आणि मंजूर करून घेतला. या जाहीरनाम्यात झिओनिस्ट ज्यू लोकांना जेरुसलेम येथे त्यांच्या पवित्र भूमीत ' राष्ट्रीय सदन ' स्थापन करण्याचा हक्क असल्याचं एक कलम होतं. या शब्दाचा अर्थ जाणून बुजून संदिग्ध ठेवला गेला होता.

अशा प्रकारे ब्रिटिशांनी एकीकडे फ्रेंचांबरोबर जेरुसलेम आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली ठेवण्याचा, दुसरीकडे शरीफ यांच्याबरोबर जेरुसलेम त्यांच्या अरब सत्तेचा भाग म्हणून सामील करण्याचा आणि तिसरीकडे स्वतःच्या संसदेत जेरुसलेमला ज्यू लोकांचं ' राष्ट्रीय सदन ' स्थापन करण्याचा गुंतागुंतीचा राजकारणी डाव खेळून या देवभूमीचं भविष्य रक्ताच्या लाल रंगात रंगेल याची तजवीज करून ठेवली. या सगळ्यातून त्यांनी आपली अनेक इप्सित साध्य केली असली, तरी पुढे या देवभूमीवरचा हिंसेचा शाप दूर करण्यात मात्र त्यांना यश आलं नाही.
ज्यू लोकांनी या जाहीरनाम्याचा सोयीस्कर अर्थ लावला असा, की ब्रिटिशांनी त्यांना आपला देश स्थापन करण्याची मुभा दिलेली आहे....आणि त्यानंतर ज्यू लोकांची मायभूमीकडे जाण्याची आस शतपटींनी वाढली. त्यांनी हजारोंच्या संख्येने जेरुसलेम आणि आसपासच्या भागात वस्त्या उभारायला सुरुवात केली. महायुद्ध संपल्यावर शरीफ यांनी आपल्याला मिळालेल्या वचनाप्रमाणे ब्रिटिशांनी आपलं अरब राज्य आपल्याला आखून द्यावं यासाठी भुणभुण सुरु केली. ब्रिटिशच ते....त्यांनी पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला जागून नवे फासे टाकले.
अमेरिकेने पहिल्या महायुद्धात जरी प्रत्यक्षात युद्धभूमीवर उतरून फारसं काही केलं नसलं, तरी त्यांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव सगळ्या साम्राज्यवादी देशांना करून दिली होती. त्यांनी महायुद्धानंतरच्या वाटाघाटी सुरु होताच या युरोपीय देशांच्या छातीत धडकी भरवणारी मागणी केली - अरबस्तान, लेव्हन्ट आणि आखाती भागात लोकशाही स्थापन व्हावी आणि तीही आपल्या देखरेखीखाली, ही ती मागणी. हे ऐकून युरोपीय देश चांगलेच हबकले. ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी आपल्या नुकसानीची गणितं मांडल्यावर त्यांना या मागणीतले धोके स्पष्ट व्हायला लागले.
ब्रिटिशांनी पुन्हा एक धूर्त खेळी केली. त्यांनी सीरिया आणि पॅलेस्टिन एकत्र करून तो भाग वचनपूर्तीची ' सुरुवात ' म्हणून शरीफ यांच्या हाती दिला. फ्रेंच इथे चवताळले...कारण साईक्स - पिको करारानुसार सीरिया त्यांचा असणार होता. ब्रिटिशांनी फ्रेंचांना पटवून दिलं, की या नामधारी राजाला फ्रेंचांच्या अखत्यारीत राहायला लागणार आणि त्या व्यवस्थेच्या आडून लोकशाहीचं झेंगाट आपोआप दूर होणार...तेव्हा फ्रेंचांनी या सगळ्या प्रकाराला होकार दिला. पण ब्रिटिशांना हे व्यवस्थित ठाऊक होतं, की सीरियाच्या भागातल्या अरब लोकांना फ्रेंच जराही आवडत नव्हते. ब्रिटिशांच्या अपेक्षेप्रमाणे शरीफ आपल्या नव्या राज्याच्या सिंहासनावर बसल्यावर तिथल्या जनतेने त्यांच्यावर दबाव आणून फ्रेंच सैन्याशी उभा दावा मांडला. फ्रेंचांनी माशी झटकावी तसा या किडूकमिडूक अरबी सैन्याचा उठाव मोडून काढला आणि शरीफ यांना थेट पॅलेस्टिनला हाकलून दिलं. शरीफ यांच्या दुसऱ्या मुलाने - अब्दुल्लाने आपली फौज जमवून जॉर्डन नदीच्या काठाशी डेरा टाकला खरा, पण फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याशी दोन हात करणं आपल्या आवाक्याबाहेरचं असल्याची खात्री होताच त्याने अखेर नांगी टाकली. तो ब्रिटिशांच्या कानाशी पुन्हा एकदा आपल्या वडिलांना मिळालेल्या वचनांचा पाढा वाचत भुणभुण करत राहिला.
अखेर नव्याने पंतप्रधान झालेल्या सर विन्स्टन चर्चिल यांनी या तिढ्याला सोडवायच्या दृष्टीने पुढाकार घेतला. १९२१ साली कैरो येथे एक परिषद भरली. तिथे चर्चिल यांनी जॉर्डन नदीच्या पूर्वेकडचा भाग शरीफ यांना त्यांचं साम्राज्य म्हणून देऊ केला. सीरिया हातचा गेल्यामुळे शरीफ यांनी पॅलेस्टिन आणि इराक आपल्याला मिळावा म्हणून कटकट सुरु केली. त्यापैकी इराकचा थोडासा भाग त्यांना मिळालाही. मग त्यांनी जॉर्डन नदीच्या पश्चिमेचा भाग मागून पहिला...इथे चर्चिल यांनी कठोरपणे त्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. कारण काय, तर या भागात ज्यू लोकांची असंख्य पवित्र स्थानं आहेत...जी शरीफ यांच्या हाती न जावी हा साधा सोपा उद्देश. इथे या सगळ्या वाटाघाटींनंतर जॉर्डन नदीच्या पूर्वेला एक देश अस्तित्वात आला - ट्रान्सजॉर्डन. शरीफ यांना तिथल्या राजेपदावर बसवून चर्चिल यांनी त्यांची बोळवण केली. त्यांनी अब्दुल्लाच्या हाती या भागाची सत्ता देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो अर्थातच मंजूर झाला.
आता पाळी होती शरीफ यांच्या थोरल्याची - फैसल याची. त्याला मिळाला इराकचा भूभाग. हा भूभाग तेलसंपन्न आणि गुंतागुंतीच्या समाजरचनेचा. उत्तरेच्या मोसूल भागात कुर्द, नेस्टोरियन ख्रिश्चन यांचं प्राबल्य. दक्षिण भागात शिया वरचढ. बगदादच्या आसपास सुन्नी आणि या सगळ्यात अधून मधून ज्यू लोकांच्या घेट्टो वस्त्या. फैसल स्वभावाने साधा, अगदीच महत्वाकांक्षा नसलेला. तो आपल्या शब्दाबाहेर नसेल याची ब्रिटिशांना खात्री होती, म्हणून त्याला इराकच्या राजगादीवर त्यांनी बसवलं.
शरीफ यांच्या धाकट्या अली याला सध्याच्या सौदी अरेबियाच्या हेजाझ प्रांताचा सर्वेसर्वा करून ब्रिटिशांनी त्यालाही मार्गी लावला. सौदी अरेबिया अजून अस्तित्वात यायचा होता. इब्न सौद यांची टोळी अजून प्रबळ व्हायची होती आणि शरीफ यांच्या हाती मक्का आणि मदिनेच्या किल्ल्या अजूनही होत्या. अशा प्रकारे आपल्या हाती सगळी सत्ता ठेवून नामधारी राजे म्हणून शरीफ यांच्या कुटुंबियांच्या मार्फत ब्रिटिशांनी अरबस्तानचा कारभार मार्गी लावला - पॅलेस्टिन आणि जेरुसलेम वगळून. तिथे ज्यू लोक प्रचंड संख्येने येत होतेच....
या सगळ्यामुळे जेरुसलेम आणि आसपासच्या भागात दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत इतका असंतोष निर्माण झाला, की त्यावर नियंत्रण ठेवणं ब्रिटिशांनाही जड जायला लागलं. दुसऱ्या महायुद्धाचे लोण जसजसे या भागात पसरायला लागले, तशी इथली समीकरणं पुन्हा बदलली. आता या समीकरणात एक नवा भिडू प्रत्यक्षात उतरणार होता - अमेरिका आणि त्याला इथे आणणार होतं इथल्या जमिनीत भरभरून उपलब्ध असणार तेल. त्यातून संपन्न झालेल्या अरबांकडून आता पॅलेस्टिन या देशाला मान्यता मिळवण्याचे प्रयन्त होणार होते, पण त्या सगळ्यांवर कुरघोडी करत इस्राएल एक देश म्हणून अस्तित्वात येणार होता...पण त्यावर पुढे. तोवर अलविदा !

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - भाग १०

Submitted by Theurbannomad on 26 May, 2021 - 11:52

दुसरं महायुद्ध सुरु झालं ते जर्मनीच्या पुढाकाराने, पण त्याला जबाबदार होते पहिल्या महायुद्धात जेते ठरलेले सगळे देश. त्यांनी जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी आणि त्यांनी जर्मनीचं केलेलं विभाजन या दोन गोष्टी त्या देशाच्या नागरिकांच्या जिव्हारी लागलेल्या होत्या. हिटलरने जनतेच्या मनातल्या रागाला मोकळी वाट करून दिली आपल्या राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित असलेल्या भाषणांद्वारे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये स्थापन केल्या गेलेल्या ' वायमार रिपब्लिक ' मध्ये - हे सरकार दोस्त राष्ट्रांच्या हातातलं बाहुलं होतं - ज्यू लोकांनी पुष्कळ ढवळाढवळ केली होती. त्यांनी या कुडमुड्या सरकारच्या स्थापनेत पडद्याआडून खूप काही घडवून आणलं होतं. महायुद्धापूर्वीच्या ' प्रशिया ' मधल्या लब्धप्रतिष्ठितांमध्ये तब्बल २४% ज्यू होते...महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८% विद्यार्थी ज्यू होते....या सगळ्यामुळे मूळच्या जर्मन लोकांमध्ये त्यांच्याविषयी राग होताच. महायुद्धानंतर या ज्यू लोकांनी दोस्त राष्ट्रांना पडद्याआडून मदत केली हाही राग जर्मन लोकांमध्ये होता.

हिटलर स्वतः आर्यन वंशाला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्यांपैकी होता. सेमेटिक वंशाचे ज्यू त्याला तसेही आवडत नव्हतेच....तो त्यांच्या वंशाला हीन मानायचा. त्याचं असं ठाम मत होतं, की ज्यू फक्त पैसा आणि प्रतिष्ठा बघतात, देशाभिमान वगैरे त्यांना विशेष महत्वाचा वाटत नाही कारण ते तसेही कोणत्याच देशाचे नाहीत....त्याचा जर्मनीतल्या साम्यवादी विचारांच्या गटांवरही राग होता, पण त्याच्या डोळ्यात खुपत होते ज्यू. या सगळ्याचा विस्फोट झाला ज्यू विरोधात जनमत तापण्यात. महायुद्धाला सुरुवात झाल्यावर हिटलरने या ज्यू लोकांचा वंशसंहार करण्याची मोहीमच हाती घेतली आणि आपल्या एका खास सहकाऱ्याला - रैनहार्ट हेड्रीच याला - फक्त ज्यू लोकांच्या नरसंहारासाठी तैनात केलेला होता. त्याचा उजवा हात होता एडॉल्फ ऐचमन. या दोघांनी गॅस चेंबरसारख्या अमानवी पद्धतीने हजारोंनी ज्यू लोकांची कत्तल केली.

या सगळ्याचा परिणाम असा झाला, की ज्यू लोक हजारोंच्या संख्येने जर्मनीतून इतस्ततः पळाले. त्या सगळ्यांना ओढ होती इस्रायलची. आपल्या हक्काच्या देशाची. महायुद्धात एकीकडे जर्मनी पोलंड, हंगेरी, फ्रांस, बेल्जीयम असे महत्वाचे देश गिळंकृत करत होता आणि दुसरीकडे ब्रिटन या जर्मन लाटेला तोंड देत टिकून होता. हिटलरने आपल्या आततायी निर्णयाने एकाच वेळी रशिया आणि ब्रिटन अशा दोन्ही आघाड्या उघडून आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आणि त्याचा विजयरथ भरकटला. अखेर १९४५ साली एकीकडे हिटलरचा पाडाव आणि दुसरीकडे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकेने फेकलेले अणुबॉम्ब या दोन महत्वाच्या घटनांनी दुसरं महायुद्ध संपलं.

या महायुद्धाच्या काळात अरबस्तानातही प्रचंड उलथापालथ होत होती. १९२४ साली इब्न सौद यांच्या कडव्या वहाबी फौजेने हेजाझ प्रांतावर चढाई केली. हा प्रांत होता ब्रिटिशांनी शरीफ यांच्या हाती दिलेला...पण इब्न सौद यांच्या फौजा पुढे अरबस्तानात प्रबळ होणार हे ब्रिटिशांनी ताडलं होतं. त्यांनी शरीफ आणि इब्न सौद यांच्यातल्या साठमारीत बघ्याची भूमिका घेतली. शरीफ, अली आणि त्यांचे लोक जिवाच्या आकांताने या भागातून पळून गेले ते थेट भूमध्य समुद्राच्या सायप्रस बेटावर. इब्न सौद यांनी वाळवंटात अशी काही मुसंडी मारली, की मक्का - मदिना या दोन महत्वाच्या जागांसकट हेजाझ , नजद , अल अहसा आणि असीर असे प्रचंड प्रांत त्यांनी आपल्या अमलाखाली आणले. इब्न सौद यांनी आपल्या कुटुंबाच्या नावाने या प्रांताचा मिळून असा एक देश जन्माला घातला - सौदी अरेबिया. या देशाला लगेच ब्रिटिशांनी आणि इतर महासत्तांनी मान्यता दिली. ही घटना १९३२ सालची - म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या सहा-सात वर्षांपूर्वीची.

हे सौदी वाहाबी कट्टर सुन्नी पंथीय. धर्मवेडे आणि हिंस्त्र. तशात त्यांच्या भूमीत भरभरून तेल सापडल्यावर त्यांना अचानक जगाच्या पाठीवर अतोनात महत्व प्राप्त झालं. त्या तेलाच्या वासाने अमेरिका या वाळूत अवतरली आणि स्थिरावली. दुसऱ्या महायुद्धात युरोपीय राष्ट्रं इतकी खंक झाली होती, की त्यांच्याच्याने आपल्या वसाहती सांभाळणंही मुश्किल होऊ लागलं. अमेरिका लोकशाहीच्या बाजूने आपलं वजन टाकणारं राष्ट्रं...त्यामुळे युरोपीय राष्ट्रांना कुरकुरत आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य द्यावं लागलं.

अमीन अल हुसेनी याने दोन महायुद्धांच्या मधल्या काळात जेरुसलेम येथे बराच हैदोस घातलेला होता. जेरुसलेम येथे ज्यू लोकांचं शिरकाण करण्यासाठी आपल्या भडक भाषणांद्वारे त्याने अनेक पॅलेस्टिनी तरुणांना चिथावलेलं होतं. तशात ब्रिटिशांच्या कूटनीतीत त्याने स्वतःचा धूर्तपणा मिसळून जेरुसलेमच्या अल अकसा मशिदीचा ग्रँड मुफ्ती व्हायची पायरीसुद्धा पार केली. मशिदीच्या घुमटाला सोन्याचा पत्रा लावण्याचं अचाट काम त्याने या काळात पूर्ण केलं. हे सगळं करत असताना त्याने दुसरीकडे ज्यू लोकांची अशी भयानक कत्तल केली की त्याच्यासमोर हिटलर मवाळ वाटेल....१९३७ साली अखेर ब्रिटिशांनी त्याला पकडून तुरुंगात टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आणि तो जेरुसलेम येथून थेट बर्लिनला हिटलरकडे पळाला. जर्मनीने बोस्निया देश पादाक्रांत केल्यावर हुसेनीने तिथे ज्यू लोकांच्या वंशसंहारात हिटलरला ' मोलाची ' मदत केली. हिटलरच्या पाडावानंतर हुसेनी फ्रान्सला पळाला ....पण या टप्प्यावर ब्रिटिशांनी जी खेळी केली, ती धूर्तच नव्हे तर कुटीलसुद्धा होती.

त्यांनी या हुसेनीला पुन्हा इजिप्तला पाठवून दिलं. का, तर त्याच्या ' कीर्तीचा ' वापर करून त्यांना आसपासच्या मुस्लिम साम्राज्यांना चुचकारायचं होतं. एव्हाना इब्न सौद यांना हुसेनी आवडायला लागलेला होताच....त्यांनी तेलाच्या मार्गाने येत असलेल्या पैशांचा एक ओघ त्याच्याकडे वळवला. त्याने या पैशांचा वापर करून एक रेडिओ प्रसारण केंद्र आणि वर्तमानपत्र सुरु केलं आणि ज्यू विरोधी विखार ओकत वातावरण पुन्हा तापवलं. या वेळी मात्र ज्यू लोकांनी त्याला आणि त्याच्या बगलबच्च्यांना असा तडाखा दिला, की तो पॅलेस्टिनमधून पळून गेला. असं म्हणतात, की त्याला पॅलेस्टीनचं अरब मुस्लिम प्रजासत्ताक स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी तो खास कैरोहून जेरुसलेमला आला होता.

इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेने आता आपले पाय चांगलेच ऐसपैस पसरले होते. या संघटनेचा म्होरक्या होता हसन अल बन्ना. सुएझ कालव्याच्या बांधणीच्या काळात युरोपीय महासत्तांच्या हाती इजिप्तचं सरकार ' विकलं ' गेल्यामुळे अरब आणि मुस्लिम यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी भावना तेव्हाच्या इजिप्तच्या तरुणांमध्ये प्रबळ होत होती. त्यांनी बन्नाला आपली मळमळ बोलून दाखवली आणि १९२७ साली मुस्लिम ब्रदरहूड स्थापन झाली. ही संघटनाही रक्ताची चटक लागलेली. १९४८ साली तत्कालीन इजिप्शियन राजे फारूख यांना ही संघटना इतकी डोईजड झाली की त्यांनी या संघटनेला छाप लावण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याचा परिणाम इतकाच झाला, की पंतप्रधान नाकारी या संघटनेकडून अल्लाच्या वाटेवर धाडले गेले. याचा परिणाम होऊन इजिप्तच्या लष्कराने आणि निमलष्करी दलाने या संघटनेची अशी काही धरपकड केली, की त्यात हसन अल बन्ना स्वतःच मारला गेला. हे सगळं हुसेनीच्या डोळ्यांदेखत होत असल्यामुळे तोही इरेला पेटला.

या सगळ्या काळात पॅलेस्टिनी भूमीवर ज्यू लोकांचा संघर्ष सुरूच होता. जर्मनीने चेकोस्लोवाकियाचा घास घेऊन रशियाकडे मोर्चा वळवल्यावर जर्मन सेनानी रोमेल याने इजिप्तच्या दिशेलाही एक आघाडी उघडली. आता हा रोमेल पॅलेस्टिनलाही येतो की काय,म्हणून ज्यू घाबरले. ज्यू लोकांनी पहिल्या महायुद्धानंतर ' पाल्माक ' नावाची एक लष्करी सेना उभारली होती. या सेनेद्वारे इस्रायलला येत असलेल्या ज्यू लोकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, त्यांचं आजूबाजूच्या मुस्लिम माथेफिरूंपासून रक्षण करणे, वेळ पडली तर त्यांच्या खाण्यापिण्याची - राहण्याची सोया करणे अशी कामं पाल्माक करत असे. तिचा प्रमुख होता पुढे इस्राएलच्या पंतप्रधानपदी बसलेला यिझताक राबीन. या काळात ब्रिटिशांनी युद्धात अरबांची मदत घेण्यासाठी ज्यू लोकांच्या पुनर्वसनाच्या कामात मुद्दाम अडथळे आणले होते. ब्रिटिश सैन्य पॅलेस्टिनच्या सीमारेषांवर तैनात केलं गेलं होतं. पाल्माक त्या सैन्याच्या तटबंदीतून रात्रीच्या वेळी शिताफीने पलीकडच्या ज्यू निर्वासितांना हळूच ज्यू वस्त्यांमध्ये आणत असत. पुढे ज्यू वस्त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी ' हगाना ' नावाची वेगळी संघटना तयार केली. शिवाय तशाच पद्धतीच्या ' इरगुन ' आणि ' स्टर्न गॅंग ' या दोन संघटनाही तेव्हा तयार झाल्या होत्या. गम्मत म्हणजे, या संघटनांच्या प्रमुखपदी असलेले ज्यू ब्रिटिशांनी लष्करी प्रशिक्षण देऊन तयार केले होते...ही खास ब्रिटिश कूटनीती. दोन्ही बाजूंच्या लोकांना आपापसात भिडवत आपलं इप्सित साध्य करण्याचे हे खास ब्रिटिश डाव....

१९४० साली युरोपमधून ज्यू लोकांना घेऊन हैफा बंदरात एक जहाज आलं. पेट्रीय नावाच्या त्या जहाजात १८०० ज्यू दाटीवाटीने बसले होते. ब्रिटिशांनी हे जहाज बंदरातच अडवून ठेवलं. हगाना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या जहाजात बॉम्ब ठेवला. उद्देश हा, की बॉम्बस्फोट झाल्यावर तरी ब्रिटिश त्या ज्यू लोकांना उतरवून घेतील...पण त्या स्फोटानंतर ते जहाज बुडून १८०० ज्यू लोकांना जलसमाधी मिळाली. याचा परिणाम असा झाला, की कैरोच्या लॉर्ड मोईने या ब्रिटिश उच्चअधिकाऱ्याचा खून पाडून ज्यू लोकांनी त्यांची चुणूक दाखवली.

अमेरिकेत ज्यू लॉबी आता सक्रिय झाली. तिथे डेव्हिड बेन गुरियन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांच्यावर असा दबाव आणला, की त्यांनी ब्रिटिशांना ज्यू लोकांची केलेली कोंडी शिथिल करण्याचे आदेश द्यावे लागले. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अटली यांनी या सगळ्यातून तोडगा म्हणून भलताच प्रकार केला. अमेरिकेच्या बरोबरीने एक समिती नेमून ज्यू लोकांची अवस्था अभ्यासावी आणि त्यातून तोडगा काढावा असा प्रस्ताव त्यांनी अमेरिकेला दिला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली ज्यू आणि अरबांचं संयुक्त संघराज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण पुन्हा ब्रिटिशांनी त्या कल्पनेला विरोध केला. १९४६ च्या मे महिन्यात पुन्हा त्यांनी ज्यू लोकांना घेऊन आलेल्या जहाजाला परत पाठवून दिलं. अखेर ज्यू लोकांनी ब्रिटिशांना असा काही तडाखा दिला, की त्यांची पळता भुई थोडी झाली. १९४६ च्या २२ जुलै रोजी जेरुसलेम येथे किंग डेव्हिड हॉटेलमध्ये - जिथे ब्रिटिशांनी आपलं लष्करी मुख्यालय थाटलं होतं - दुधाच्या बाटल्यांमधून स्फोटकं नेऊन ज्यू लोकांनी असा काही स्फोट घडवून आणला की ब्रिटिश हादरले. त्यांनी मग मुकाट युनोपुढे ज्यू - पॅलेस्टिन प्रश्न सोडवायचा प्रस्ताव ठेवला आणि आपलं अंग काढून घेतलं.

युनोने आमसभा भरवली आणि ३३ विरुद्ध १३ मतांनी पॅलेस्टिनच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला. पॅलेस्टीनेचे तीन तुकडे पडले. जॉर्डन सीमारेषेपाशी वेस्ट बँक आणि इजिप्त सीमारेषेशी गाझा असे दोन पॅलेस्टिनी अरबांचे प्रांत आणि त्यामध्ये ज्यू इस्राएल अशी वाटणी झाली. ५५% भूभाग मिळाला सहा लक्ष ज्यू लोकांना आणि ४५ % भूभाग मिळाला १२ लक्ष पॅलेस्टिनी अरबांना. हा प्रस्ताव मुळातच होता अन्यायकारक. ज्यू लॉबीने आपल्या आर्थिक ताकदीने हा असा विषम प्रस्ताव पुढे दामटवलेला स्पष्ट दिसत होता. या प्रस्तावानंतर ब्रिटिश सैन्य जिथून जिथून मागे गेलं, तिथे वेगाने सुसंघटित ज्यू सैन्य पसरत गेलं आणि तिथून त्यांनी पॅलेस्टिनी अरबांना हुसकावून लावलं. जेरुसलेम तेव्हढा युनोने आपल्या देखरेखीखाली ठेवला.

१९४८ साली अखेर बाल्फोर जाहीरनाम्याचा आधार घेऊन इस्राईलने आपल्या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. हे सगळं होत असताना पॅलेस्टिनी लोक हुसेनी आणि मुस्लिम ब्रदरहुडकडे आशेने बघत होते. पलीकडे सौदीच्या इब्न सौद यांनाही हे सगळं खुपत होतं. इराक, जॉर्डन वगैरे भागातले सुन्नी मुस्लिमही या सगळ्या प्रकारामुळे संतापलेले होते...पण ज्यू लोकांनी दुसऱ्या महायुद्धात मिळवलेली सहानुभूती, त्यांच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्यांच्या पाठीशी उभी असलेली प्रबळ राष्ट्रं ( विशेषतः ब्रिटन, फ्रांस आणि अमेरिका ) या सगळ्यामुळे जेरुसलेमसकट इस्रायलची स्थापना झाल्यावर त्याला जागतिक मान्यताही मिळाली. डॉक्टर चैम वाइझमान , डेव्हिड बेन - गुरियन, रुवेन शिलोह अशा रथी - महारथींनी एरेट्झ इस्राएल अखेर अस्तित्वात आणून दाखवलं.

हे राष्ट्र जन्माला आल्या आल्या त्यांना आजूबाजूच्या अरब राष्ट्रांशी चार हात करावे लागलेच. अरबांनी संघटन कौशल्य आणि सुसूत्रता दाखवली असती तर इस्राएल कधीच जगाच्या नकाशातून पुसला गेला असता, पण ते काही होणार नव्हतं....त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - ११

Submitted by Theurbannomad on 27 May, 2021 - 16:17

इस्राएल देश जन्माला आला तेव्हाची आजूबाजूची परिस्थिती अतिशय स्फोटक होती. वसाहतवादी युरोपीय देश अनिच्छेने काही देशांना स्वातंत्र्य बहाल करून तिथून काढता पाय घेत होते, पण जाता जाता मुद्दाम त्या त्या देशात असे काही उलटे सुलटे तिढे जन्माला घालत होते की तिथे शांततापूर्ण वातावरण तयार होणं दुरापास्त होत होतं. अमेरिकेने तेलाच्या वासाने अरबस्तानात पाऊल टाकलं होतं. अरबी देश अचानक गब्बर व्हायला लागले होते, कारण तेल आता जगभरातल्या प्रत्येक देशाला अनिवार्यपणे लागणार होतं.

इस्राएलमध्ये तेल किंवा नैसर्गिक वायू जवळ जवळ नसल्यातच जमा! आजूबाजूच्या अरबांना दुखावून काही करायचा घाट आता महासत्ता पूर्वी इतक्या सहजतेने घालू शकणार नव्हत्या. सौदीने तर इस्राएलला संपवण्यासाठी आपल्या तिजोरीतून डॉलरचा ओघ पॅलेस्टिनी बंडखोरांकडे वळवलेला. तिथे एक नवा नेता पॅलेस्टिनी तरुणांचं नेतृत्व स्वीकारायला पुढे आला. हा अमीन अल हुसेनी याचा नातू होता , ज्याचं नाव होतं मोहम्मद अब्देल रहमान अब्देल रौफ अल कुद्वा अल हुसेनी....आपण ज्याला यासर अराफत म्हणून ओळखतो, तो हाच.

कैरोच्या महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण करता करता हा आसपासच्या पॅलेस्टिनी तरुण विद्यार्थ्यांप्रमाणे इस्राएलच्या विरोधात आपली जहाल मतं व्यक्त करायला लागला. त्याच्या आजोबांचं कर्तृत्व आसमंतात सगळ्यांना ठाऊक होतंच....आपसूक त्याला पॅलेस्टिनी तरुणांनी आपला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. पॅलेस्टिनी विद्यार्थी संघटनेचा तो प्रमुख झाला. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ( PLO ) चा तो सक्रिय सदस्य झाला आणि पुढे प्रमुख. १९५९ साली त्याने आपल्या काही सहकाऱ्यांबरोबर ' फतह ' या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. ही संघटना दहा - बारा वर्षात राजकीय पक्षासारखी काम करू लागली.

इस्राएलच्या स्थापनेनंतर ब्रिटिश हाय कमिशनर जसा या भागातून निघाला, तसा आजूबाजूच्या सगळ्या अरब देशांनी इस्राएलवर हल्ला केला. लेबनॉन, सीरिया, इजिप्त, ट्रांसजॉर्डन, इराक आणि अर्थातच पॅलेस्टाईनचे दोन तुकडे अशा चहूबाजूंनी हा हल्ला झाला. ४ कोटी अरब आणि ६ लाख ज्यू असा हा सामना. सुरुवातीला इस्राएल या हल्ल्याने थोडा गांगरला, पण युनोने या संघर्षात हस्तक्षेप करून युद्धबंदी लादली. या युद्धबंदीच्या काळात इस्रायलने आपल्या सगळ्या सैन्याला एकत्र केलं. बेन गुरियन यांनी एकेका शिलेदाराला त्याच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. महिन्याभराने अरब सैन्याला बेसावध गाठून इस्रायलने युद्धाला पुन्हा तोंड फोडलं. सुरुवातीला शेजारच्या इजिप्तच्या नेगेव वाळवंटात चढाई करून ज्यू लोकांचं प्राचीन बीरशेबा गाव आपल्या हाती घेतलं. सिनाईचा प्रांत काबीज करून थेट कैरो आपल्या हवाई हल्ल्याच्या टप्प्यात येईल अशा प्रकारे मोर्चेबांधणी केली आणि इजिप्तचा नक्षा उतरवला. मूळ इस्राएलच्या २३% भूभाग त्यांनी सहा दिवसात काबीज करून त्यांनी इजिप्त आणि इतर अरबांना धडकी भरवली.

इस्राएलचे संरक्षणमंत्री मोषे दायान यांनी पंतप्रधान एशकोल यांना आपला पुढचा प्रस्ताव दिला. त्यांना अख्खा सिनाई भाग काबीज करून थेट तिरानची सामुद्रधुनी इस्रायलला जोडायचा होता. त्यासाठी दुसऱ्या बाजूच्या ट्रान्सजॉर्डनच्या राजे हुसेन यांना त्यांनी युद्धबंदीचा करणार केला होता...जेणेकरून दुसऱ्या आघाडीवर लढून सैन्य दुभांगणार नाही. त्यांना लक्ष एकट्या इजिप्तवर केंद्रित करायचं होतं, कारण अरब आसमंतात तो एकच देश लष्करी दृष्ट्या प्रबळ होता.

एकीकडे इस्रायलने पत्रकारांना ' युद्ध होणार नाही ' अशा बातम्या देत अरबांना गाफील ठेवलं आणि दुसरीकडे इजिप्तच्या युद्धासज्जतेची खडानखडा माहिती मिळवली. सिनाई भागात इजिप्तने आपली लढाऊ विमानं उभी करून ठेवली होती. इजिप्तचे हवाईदल प्रमुख अम्र आपल्या दलाला दोन दिवसात इस्राएलच्या भूमीवर बॉम्बहल्ला करण्याची तयारी करायच्या सूचना देऊन कैरोला आले, आणि इस्राएल सावध झाला. त्यांच्या १२ विमानांनी दुसऱ्याच दिवशी आकाशात झेप घेतली आणि त्यांनी बेसावध असलेल्या २३६ इजिप्तच्या विमानांचा फडशा पाडला. हे ऐकून जॉर्डन खवळला, पण इस्रायलने त्यांनी काही करण्याच्या आत गाझा पट्टीत १०००० इजिप्शियन सैनिकांची कोंडी केली.

जॉर्डनने जेरुसलेमच्या दिशेला आपलं सैन्य पाठवल्यावर इस्रायलने आपल्या हवाई दलाने थेट जेरुसलेम काबीज करून दाखवलं. आता जॉर्डनलाही धडा शिकवावा म्हणून त्यांनी वेस्ट बँकेमध्ये धुमाकूळ घालून थेट गोलान टेकड्या काबीज केल्या आणि सिरियाची राजधानी दमास्कस आपल्या हल्ल्याच्या टप्प्यात आणली. अख्खा पॅलेस्टाईन, सिनाईचा प्रांत, जेरुसलेम, गोलान टेकड्या, सुएझचा कालवा इतकी म्हणजे मूळ इस्राएलच्या तिप्पट भूमी गिळून इस्रायलने अखेर युद्धबंदी जाहीर केली.

आता अरब युनोकडे धावले आणि त्यांनी इस्रायलने जिंकलेला भाग परत द्यावा अशी युनोला गळ घातली. इस्रायलने त्याला स्पष्ट नकार दिला. त्याआधी अरबांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता द्यावी ही इस्रायलने मागणी केली आणि अरबांना पेचात पकडलं. अरब मुळात भडक आणि त्यात युद्धात नाक कापलं गेल्यामुळे सरबरलेले...त्यांनी दोन तुकड्यातला पॅलेस्टिन देश म्हणून स्वीकारणार नाही अशी उलट भूमिका घेतली. झालं इतकंच, की पॅलेस्टाईन एक देश म्हणून अमान्य झालं तो अरब देशांकडूनच आणि मग जगानेही पॅलेस्टाईनला मान्यता दिली नाही.

अहमद सुकेरी हे या सगळ्या काळात पॅलेस्टाईनचे नेते होते. या पराभवानंतर ते स्थान यासर अराफत यांनी मिळवलं. त्यांच्या दोन्ही संघटनांना डॉक्टर जॉर्ज हबाश यांची ' पीएफएलपी ' ही आणखी एक संघटना येऊन मिळाली. या संघटनांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला दहशतवादी मार्ग दाखवला आणि जगाची सहानुभूती गमावली. त्यांच्या दहशतवादाचा फटका जॉर्डन, सीरिया, इराक, लेबनॉन आणि इजिप्त या शेजारी देशांनाही बसला आणि पॅलेस्टिनी लोकांना अतिरेकी असल्याचं लेबल हे चिकटल ते अजूनही टिकून आहे....त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी -१२

Submitted by Theurbannomad on 28 May, 2021 - 07:23

यासर अराफत हा माणूस तसा गुंतागुंतीचा. एका बाजूला कॅम्प डेव्हिड करार पूर्णत्वाला नेण्यास अमेरिकेची मदत केल्यामुळे थेट नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारा यासर अराफत दुसरीकडे विमान अपहरण करून खंडण्या वसूल करण्यातही पटाईत होता. त्याने प्रशिक्षित केलेले पॅलेस्टिनी माथेफिरू तरुण जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इजिप्त आणि पॅलेस्टिनी भागात धुमाकूळ घालत असायचे. आंतरराष्ट्रीय मंचावर पॅलेस्टिनी लोकांचा चेहरा आणि आवाज बनलेला अराफत प्रत्यक्षात आपल्या या प्रतिमेचा वापर आपल्या तुंबड्या भरण्यासाठीही करत होता. त्याने इस्रायलला संपवायची भाषा करून जहाल अरब लोकांमध्ये आपली लढाऊ प्रतिमा जाणीवपूर्वक रित्या तयार केलेली होती.

या अराफतच्या उचापती अनेकांना डोईजड झालेल्या होत्या. सहा दिवसांच्या युद्धात पॅलेस्टिनी अरबांनी माती खाल्ल्यावर त्यांच्या हातून इतकी जमीन निसटली कर निर्वासित पॅलेस्टिनी हजारोंच्या संख्येने आजूबाजूच्या देशात पांगले. त्यापैकी अनेकांनी आपल्या ' अंगभूत कर्तृत्वाने ' त्या त्या देशाच्या सरकारला नाकी नऊ आणले. या बाबतीत पहिला नंबर लागला जॉर्डन देशाचा. इथे जॉर्डन - वेस्ट बँक सीमेच्या भागात निर्वासित पॅलेस्टिनी लोकांनी आपल्या वस्त्या तयार केल्या आणि तिथे त्यांची दादागिरी सुरू झाली. जॉर्डनच्या लोकांना तिथे जायला यायला चक्क ' कर ' द्यावा लागे. एकदा तर तिथे कोणत्यातरी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला गेलेल्या पोलिसाचा शिरच्छेद करून त्या मुंडक्याने हे पॅलेस्टिनी फुटबॉल खेळले होते...शिवाय या भागातून ते सतत इस्राएलच्या कुरापती काढत असल्याने पलीकडून इस्राएल त्याच्या प्रत्युत्तरादाखल अधून मधून अशी जबरदस्त कारवाई करायचे की हा भाग सतत युद्धाच्या सावटाखाली राहायचा. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला या सगळ्याला इतके वैतागले की त्यांनी अखेर एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. अब्दुल्ला यांनी अराफत यांना जॉर्डनच्या उपपंतप्रधान पदाची ऑफर देऊनही त्यांची मस्ती गेली नाही, उलट पॅलेस्टिनी लोकांनी आता उघडपणे जॉर्डनच्या अंतर्गत कारभारात नाक खुपसत अब्दुल्ला यांना आपला माज दाखवून दिलं

अब्दुल्ला यांना संधी मिळाली १९७० च्या सप्टेंबर महिन्यात. या महिन्यात पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी तब्बल चार विमानाचं अपहरण करून त्यापैकी तीन जॉर्डनची राजधानी अम्मान येथे उतरवली. तिन्ही विमानांमधून लोकांना उतरवून त्या अतिरेक्यांनी या विमानांना बॉम्बने उडवून दिलं आणि जगभरात त्याचं चित्रीकरण पाठवून दिलं. अराफत यांनी आपली प्रतिमा जपण्यासाठी या घटनेचा निषेध केला, पण तो तेव्हढाच. राजे हुसेन यांनी मार्शल लॉ पुकारला आणि या पॅलेस्टिनी कटकटीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लष्कराला पाचारण केलं. इजिप्तच्या जमाल अब्देल नासेर यांनी मध्यस्थी केली, पण त्यांचं अचानक निधन झालं आणि पॅलेस्टिनी उघड्यावर पडले. जॉर्डनच्या लष्कराने लगेच कारवाईला सुरुवात करून पॅलेस्टिनी निर्वासितांची न भूतो न भविष्यती अशी कत्तल केली. अरब देशाने अरब निर्वासित लोकांना अशा पद्धतीने मारण्याची ही पहिली आणि एकमेव वेळ...पण त्यामुळे पॅलेस्टिनी जॉर्डन मधून जे पाळले ते शेजारच्या लेबनॉनमध्ये विसावले.

पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती असलेल्या अरबी नेत्यांनाही विशेष काही करता आलं नाही, कारण अतिरेकी कारवाया करून पॅलेस्टिनी लोकांनी आपल्याबद्दलची सहानुभूती गमावलेली होती. शिवाय सगळ्यांनी त्यांच्या माजोरड्या वृत्तीचा अनुभव घेतलेला होताच...सौदी, इराक, सीरिया, जॉर्डन यांपैकी कोणाला हे पॅलेस्टिनी आपल्या घरात नको होते....दूर राहून आपण हवी ती मदत पॅलेस्टिनी लोकांना करू पण ते दूरच राहिलेले बरे असा त्यांचा पवित्रा झालेला होता. या सगळ्यामुळे लेबनॉन उगीच भरडला गेला....

लेबनॉन देश अतिशय सुरेख. भूमध्य समुद्राच्या शेजारचा, आल्हाददायक हवामान असलेला. युरोपला खेटून असल्यामुळे पर्यटन आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर व्यापारात खाऊन पिऊन सुखी झालेला. या देशाचा राजनैतिक तिढा मात्र काही और होता. झालं असं, की फ्रेंचांनी या देशातून जायला आधी बरीच खळखळ केली पण अखेर जायचा निर्णय घेतल्यावर एक विचित्र व्यवस्था इथे अस्तित्वात आणली. १९४० ते १९४८ या काळात टप्प्याटप्प्याने फ्रेंच इथून निघाले. लेबनॉन येथे पूर्वीपासूनच अनेक निरनिराळ्या पंथाची आणि धर्मीयांची वस्ती होती. त्यांच्यात राजकीय हक्क समसमान वाटायचा एक जगावेगळा ' फॉर्म्युला ' फ्रेंचांनी शोधला...

राष्ट्राध्यक्ष मॅरोनाईट ख्रिस्ती , पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसदेचा अध्यक्ष शिया मुस्लिम, उपपंतप्रधान आणि संसदेचा उपाध्यक्ष ग्रीक ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती असावा अशी ही विचित्र व्यवस्था. यात झालं इतकंच, की लेबनॉन देशात इतके दबावगट निर्माण झाले की देशाच्या दृष्टीने विचार करून कशावरच एकमत होणं दुरापास्त झालं. अरबांनी या देशावर पॅलेस्टिनी लोकांना शरण द्यायला दबाव आणला...मानवतावादी दृष्टीकोण हे गोंडस कारण देऊन त्यांनी लेबनॉनला भरीस पाडलं आणि इस्राएल - लेबनॉन - सीरिया सीमेच्या भागात पॅलेस्टिनी एकदाचे स्थिरावले. इथेही त्यांनी काही काळाने आपल्या लीला दाखवायला सुरुवात केली आणि लेबनॉन देश पोळून निघाला, तो आजतागायत स्थिरावू शकलेला नाही.

सहा दिवसांच्या युद्धानंतर पुन्हा एकदा अरब इस्राएलचा घास घ्यायला पुढे आले १९७३ साली. या युद्धाला योम किप्पूर युद्ध म्हणतात, कारण इस्राएलचा योम किप्पूर सण सुरू असतानाचा मुहूर्त साधून अरब राष्ट्रांनी युद्धाला तोंड फोडलं. या वेळी अरब अधिक जोमाने आणि संख्येने सरसावले होते. सीरिया, इराक, लेबनॉन, इजिप्त, लिबिया, अल्जीरिया, मोरोक्को असे सगळे जण या वेळी एकवटले होते. सौदी अरेबियाने भरभरून पैसा आणि शस्त्र पुरवलेली होती. एकट्या जॉर्डन देशाने यात विशेष सहभाग दाखवला नाही, कारण त्यांना घरचंच थोडं झालं होतं.

सुरुवातीला अरबांनी इस्रायलला बेसावध पकडलं खरं, पण पुढे ज्यू लॉबीने अमेरिकेला भरीस पाडून त्यांच्याकडून हजारो टन शस्त्रसामुग्री आणि दारूगोळा मिळवला. या काळात इस्राएलचे प्रमुखपद होते गोल्डा मायर या महिलेकडे. त्यांनी आपल्या सैन्यप्रमुख, मोसाद प्रमुख आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना एकत्र आणून अतिशय कमी काळात आपली आघाडी मजबूत केली. एरियल शारोन यांनी आपल्या रणगाडा तुकडीला इजिप्तच्या पायदळ तुकडीसमोर नेलं. त्यांनी इजिप्शियन पायदळ तुकडीच्या भिंतीला भेदून रणगाडे थेट इजिप्तमध्ये घुसवले आणि इजिप्शियन सैन्याला मागच्या बाजूने घेरलं. इस्रायली पाराट्रूपर झपाट्याने इजिप्तच्या भूमीत उतरले. त्यांनी इजिप्शियन सैन्याभोवती असा काही फास आवळला की सुएझ कालवा इजिप्तच्या हातून जातो की काय अशी परिस्थिती आली. दुसरीकडे इस्राएलच्या दुसऱ्या लष्करी आघाडीने थेट दमास्कसच्या सीमा भागात हल्ले चढवून सीरियाच्या तोंडचं पाणी पळवलं.

अखेर कैरो आणि दमास्कस इस्राएलच्या हाती पडेल अशी चिन्हं दिसत असल्यामुळे रशिया खडबडून जागा झाला. युनोमध्ये रशियाने आपण या युद्धात सक्रीय होऊ अशी धमकी दिल्यावर युनोने पुन्हा एकदा मध्यस्थी सुरू केली. अखेर अमेरिकेने दबाव आणून इस्रायलला शांत केलं, अन्यथा सीरिया, इजिप्तचा सुएझ कालव्याच्या भाग आणि कदाचित कैरोही इस्रायलने पादाक्रांत केलं असतं. या युद्धानंतर अमेरिकेने कॅम्प डेव्हिड करणार घडवून आणला, ज्याच्या वाटाघाटीत इस्राएलचे मेनाचेम बेगिन, पॅलेस्टाईनचे यासर अराफत आणि इजिप्तचे अन्वर सदात सामील होते. प्रत्यक्ष करणार होत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्टर बेगिन आणि सदात यांच्याबरोबर हजर होते.

या करारानंतर सदात यांची इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूडने दिवसा ढवळ्या सैनिकी सूत्रसंचालन होत असताना हत्या केली...कारण काय, तर कॅम्प डेव्हिड करार. हा करार अरब - इस्राएल यांच्यातला शांतता करणार म्हणवला जात असला तरी त्यामुळे प्रत्यक्षात विशेष शांतता काही प्रस्थापित झाली नाही...फक्त नोबेल शांतता पुरस्कारावर बेगिन आणि अराफत यांची नावं नोंदवली गेली. हा कदाचित या पुरस्काराचा सगळ्यात वाईट अपमान असावा....कारण तो मिळवणारे दोघेही शांततेच्या मार्गाने कधी गेलेही नव्हते आणि जाणारही नव्हते.

या युद्धात खऱ्या अर्थाने इस्रायलने आपल्या सामर्थ्याची चुणूक अरब जगातला दाखवून दिली, कारण सगळ्या अरब राष्ट्रांना एकटा इस्राएल पुरून उरला. पॅलेस्टाईन आपल्या आडमुठ्या स्वभावामुळे कायम सहानुभूती गमावत राहिला आणि पुढे पुढे अरब जगतालाही त्यांची अडचण व्हायला लागली. अराफत यांनी स्वतःची माया विलक्षण गतीने वाढवली...इतकी की त्यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. त्यांच्या समोर हळू हळू आता एक नवा भिडू आपली पॅलेस्टिनी संघटना घेऊन उभा राहत होता. ही संघटना होती हमास आणि हा नवा भिडू होता शेख अहमद यासीन. ही संघटना पुढे अतिरेकी कारवायांमध्ये अराफत यांच्याही वरताण कामं करणार होती...त्याविषयी पुढच्या भागात. तोवर अलविदा!

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - १३

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 12:18

पॅलेस्टिनी लोकांना जिथे जिथे आश्रय दिला गेला तिथे तिथे त्यांनी आपल्या आततायी आणि हिंसक कारवायांनी त्या त्या देशाच्या प्रशासनाला नाकी नऊ आणले. लेबनॉनची तर केवळ दोन दशकांमध्ये रयाच गेली. शेजारच्या सीरियामध्ये गृहयुद्ध सुरु होतंच, आणि तिथले लोक पॅलेस्टिनी बरे वाटावेत इतके भांडखोर...त्यामुळे याही देशात बजबजपुरी माजली. तशात सीरियाने स्वतःला अण्वस्त्रधारी करण्याच्या दृष्टीने अणुप्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी थेट इराण आणि उत्तर कोरिया अशा जगाने बहिष्कृत केलेल्या देशांना हाताशी धरलं. इस्राएलनेही छुप्या मार्गाने आपल्या अण्वस्त्रांच्या निर्मितीचा कार्यक्रम पुढे नेला आणि यशस्वी करून दाखवला. त्यांनी आजूबाजूला कोणीही अण्वस्त्रधारी होऊ शकणार नाही याची पूर्ण काळजी घेतली....इराकमध्ये सद्दामच्या आणि सीरियामध्ये असाद यांच्या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले करून त्यांनी आपण काय करू शकतो याची चुणूक जगाला दाखवून दिली.

पॅलेस्टिनी लोकांमध्ये आता असंतोष वाढलेला होता...ज्याचा फायदा घेतला शेख अहमद यासीन याने. हा अल जुर्रा नावाच्या आत्ताच्या इस्राएल आणि ब्रिटिशकालीन पॅलेस्टिनच्या भागात १९३७ साली जन्माला आला. आपल्या भावा - बहिणींना घेऊन हा १९४८ सालच्या अरब - इस्राएल युद्धानंतर गाझा भागात पळाला आणि तिथल्या अल - शती भागात स्थिरावला. तिथे मित्राबरोबर कुस्ती खेळता खेळता त्याच्या मानेला इतकी गंभीर इजा झाली की तो जवळ जवळ अंध आणि मानेखाली पूर्णपणे विकलांग झाला. अशा या पंगू व्यक्तीकडून कुठल्या भरीव कामगिरीची अपेक्षा सामान्यतः ठेवता येत नाही, पण याने आपल्या शाबूत राहिलेल्या मेंदूने जे काही करून दाखवलं, ते त्याचं नाव इतिहासात ठळकपणे नोंदवून गेलं.

कैरो महाविद्यालयात प्रकृतीच्या कारणामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. शेवटी घरीच या ना त्या मार्गाने त्याने शिक्षण घेतलं आणि त्याने आपल्या बुद्धीची चुणूक दाखवून दिली. राजकारण, धर्म, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्याला गती होती. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी जमलेल्या लोकांना धार्मिक प्रवचनं देण्यात तो आघाडीवर असे. लहान वयात यहुद्यांच्या त्रासामुळे आपल्याला आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं ही बोच त्याच्या मनात सतत होती. त्या सगळ्या वातावरणात तो शेजारच्या इजिप्तमध्ये बाळसं धरत असलेल्या मुस्लिम ब्रदरहूडकडे आकर्षित झाला आणि त्याने गाझा पट्टीत त्या संघटनेच्या शाखेची मुहूर्तमेढ रोवली. तिथे त्याला भेटले त्याच्यासारखेच पॅलेस्टिनी निर्वासित....अब्दुल अझीझ आलं रंतिसी, महमूद झहर,महमूद तहा असे अनेक जण त्याच्याबरोबर एकत्र आले आणि त्यांनी १९८७ साली एक संघटना स्थापन केली - हमास .

या हमासची स्थापनाच मुळी झालेली भडक माथ्याच्या नेत्यांकडून. ते सगळे शस्त्रास्त्रांची आणि हिंसेची भाषाच बोलणारे. त्यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवून आपल्या प्रश्नांना योग्य व्यासपीठावर नेण्याची चतुराई नावालाही नव्हती. तशात ही संघटना गाझा पट्टीमधली. पलीकडच्या वेस्ट बँक भागात यासार अराफत यांची PLO संघटनेने पाय रोवलेले होते. त्यामुळे गाझा भागात हमासने आपली संघटना रुजवली आणि विस्तारली. आता पॅलेस्टिनी लोकांच्या समोर दोन तुकड्यात विभागलेल्या त्यांच्या ' देशात ' दोन वेगवेगळ्या संघटना जन्माला आलेल्या होत्या. यासार अराफत यांनी सुरुवातीला विमान अपहरणापासून ते हिंसेपर्यंत सगळ्या गोष्टी करून पुढे हळू हळू मवाळ व्हायला सुरुवात केली. नोबेल मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांनी चर्चेचा मार्ग स्विवरून कमीत कमी हिंसा तरी काही प्रमाणात कमी केली...पण असल्या कोणत्याच बंधनांना हमास जुमानणारी नव्हती.

हमासने हळू हळू गाझा भागात आपली संघटना मजबूत केली. तिथल्या बँका, जमिनी, स्थावर मालमत्ता, धार्मिक ट्रस्ट, वक्फ बोर्ड अशा सगळ्या महत्वाच्या संघटनांमध्ये हमास प्रबळ झाली. त्याशिवाय कतार, सौदी अरेबियामधल्या काही विशिष्ट संघटना, इराणमधल्या इस्राएलच्या विरोधातल्या काही संघटना, इजिप्तमधल्या मुस्लिम सुन्नी संघटना यांच्याकडून छुप्या मार्गाने त्यांनी आपल्या पैशांची तजवीज केली. २०११ साली या संघटनेच्या हाती तब्बल ७० दशलक्ष डॉलर असल्याचा अहवाल काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी सादर केला होता ज्यावरून या संघटनेची आर्थिक ताकद कळू शकते.

१९८९ साली या शेख यासीनची इस्राईलने धरपकड केली आणि त्याला तुरुंगात डांबलं. त्याच्या हमास संघटनेच्या अस्तित्वावर आता इस्रायली लष्कर पूर्ण ताकदीनिशी घाला घालण्यासाठी सज्ज झालं. हमासचे काही महत्वाचे नेते कतार, जॉर्डन, सौदी अशा सुरक्षित ठिकाणी पळाले आणि त्यांनी तिथून संघटनेच्या कामाची सूत्रं हाती घेतली.

१९९४ साली बारूच गोल्डस्तीन या माथेफिरू ज्यू तरुणाने वेस्ट बँकच्या इब्राहिमी मशिदीत तब्बल २९ मुस्लिम लोकांची हत्या केली...आणि तीही रमझानच्या पवित्र महिन्याची प्रार्थना सुरु असताना. इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांनी या घटनेची निर्भत्सना केली, पण या माथेफिरूच्या बाजूने तसलेच कडवे झिओनिस्ट ज्यू ठामपणे उभे राहिलेले बघून त्यांनी आपले शब्द मागे घेतले आणि संघर्षाची ठिणगी पडली. दंग्यांमध्ये १९ मुस्लिम इस्रायली सैनिकांकडून मारले गेले. या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून संतापलेल्या पॅलेस्टिनी तरुणांनी हमासच्या पाठबळाने स्वतःच्या शरीरावर बॉम्ब लावून आत्मघाती स्फोट घडवून आणायला सुरुवात केली.

टोकाचे झिओनिस्ट ज्यू आणि तितकेच भडक पॅलेस्टिनी यांच्यात शस्त्रसंधी होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करून बघितले पण दोन्ही बाजूंच्या माथेफिरू तरुणांना ते मान्य नव्हतं. हिंसा होतंच राहिली. पुढे राबिन यांच्या जागी आलेले बेन्यामीन नेतान्याहू हे तर अशा सगळ्या हिंसेचे कट्टर समर्थक...त्यांनी सरळ जॉर्डन देशात आसरा घेतलेल्या खालिद मशाल या हमास नेत्याच्या हत्येचं फर्मान काढलं. मोसादच्या खास एजंट्सनी जॉर्डनमध्ये जाऊन या खालिद मशालवर नर्व्ह गॅसचा मारा केला. पण परतीच्या वाटेवर असताना जॉर्डनच्या पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर खटला चालवायची धमकी देऊन इस्रायलला आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडं पाडलं. ही घटना १९९७ सालची....या काळात पॅलेस्टिनी आणि इस्रायली संघर्षाची चरमसीमा गाठली गेली होती.

इस्राईलने आपल्या शिलेदारांना सोडवण्याच्या बदल्यात शेख यासीन याला तुरुंगातून मुक्त केलं. यासीन एखाद्या विजयी योद्ध्याच्या थाटात तुरुंगाबाहेर आला आणि पॅलेस्टिनी जनतेने त्याला डोक्यावर घेतलं. अर्थातच इस्राएलच्या डोळ्यात तो खुपत होताच....पण त्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग धूर्तपणे आपल्या फायद्यासाठी करणं जमलं नाही. रोखठोक राजकारण करणारे आणि त्यात पिढ्यानुपिढ्या भडक माथ्यानेच वागणारे पॅलेस्टिनी सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेचेच धनी होत राहिले. हमासने भूमध्य समुद्रात बुडालेल्या जहाजांपासून, युद्धात ध्वस्त झालेल्या वाहनांपासून आणि अशाच मिळेल त्या स्रोतापासून धातू वेगळे केले, युद्धात हस्तगत झालेल्या रॉकेट्स - मिसाईल्सवर काम करून ' रिव्हर्स इंजिनीरिंग ' तंत्राने अतिशय कमी किमतीत आपले रॉकेट्स आणि मिसाईल्स बनवले आणि इस्राएलवर अधून मधून त्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांना अखेर आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं...पण त्यांच्याइतकीच पापं केलेले इस्रायली मात्र नामनिराळेच राहिले.

अखेर २००४ साली इस्राईलने मोका साधून शेख यासीन याला टिपलं. राहत्या घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या सब्रा मशिदीत दररोज सकाळी यासीन नमाज पढायला जातो, हे मोसादच्या गुप्तहेरांनी शोधून काढलं होतं. त्याचा जायचा - यायचा रस्ता, त्याच्या बरोबर किती जण असतात, ते कशा पद्धतीने शेख यासिनचं संरक्षण करतात याचा मोसादच्या गुप्तहेरांनी व्यवस्थित छडा लावलेला होता. त्यांनी आपल्या F-१६ लढाऊ विमानांना या मशिदीवरून मुद्दाम उड्डाण करायला लावून परिसरात खळबळ माजवली. या विमानाचा आवाज अतिशय मोठा होता...पण इस्राईलने योजना अशी आखली होती, की त्या आवाजाच्या आडून आपली कमी उंचीवरून उडणारी AH -६४ अपाचे हेलिकॉप्टर्स त्यांनी या भागात आणली आणि यासीनला टिपलं. यासीनची दोन मुलं सुद्धा या हल्ल्यात अल्लाच्या वाटेवर धाडली गेली.

या हल्ल्यानंतर अब्दुल अझीझ अल रंतिसी याने हमासची धुरा सांभाळली. २००७ साली गाझाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हमासला दणदणीत पाठिंबा मिळाला आणि या भागात त्यांच्या उमेदवारांना भरभरून मतं मिळाली. आता हमासने आपल्या प्रतिस्पर्धी फताह संघटनेच्या लोकांना आणि पदाधिकाऱ्यांना गाझा पट्टीतून निघून जायला सांगितलं आणि या दोन संघटनांमध्येच युद्धाला तोंड फुटलं. इस्राएल बाजूला राहिलं आणि पॅलेस्टिनी लोकांना आपल्याच दोन संघटनांमधला संघर्ष बघावा लागला. २००४ साली यासर अराफत निर्वर्तल्यामुळे ( अनेकांच्या मते त्यांच्यावर विषप्रयोग झालेला होता, कारण त्यांच्या मृतदेहाच्या ऑटोप्सीला त्यांच्या पत्नीने कणखर दिला होता...) या सगळ्या संघर्षात हस्तक्षेप करणारं कोणी उरलेलं नव्हतंच.... अखेर संयुक्त पॅलेस्टिनी सरकार दुभंगून गाझा पूर्णपणे हमासच्या हातात आलं आणि फताह वेस्ट बँकच्या हातात गेलं.

या घटनेनंतर हमास एकाकी झाली. अधून मधून इस्राएलच्या भूमीवर रॉकेट हल्ले करून त्यांच्या कुरापती काढणं, सतत सीमारेषेवर संघर्षाची परिस्थिती निर्माण करणं अशा प्रकारे हमास आपलं अस्तित्व दाखवत राहिली. २००८ साली इजिप्तच्या मध्यस्थीने पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चा सुरु झाल्या...पण आता हमासच्याच अंतर्गत तयार झालेल्या जहाल गटांनी हिंसा सुरूच ठेवली. सुरुवातीची नऊ दिवसांची युद्धबंदी संपल्या संपल्या हमासनेच रॉकेट्स डागून इस्राएलच्या समोर नाक खाजवायची आततायी कृती केली. इजिप्तच्या होस्नी मुबारक यांनी हमासला समजावण्याचे अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही...आणि इस्राईलने आपल्या हवाईदलाला हाताशी घेऊन ' ऑपरेशन कास्ट लीड ' सुरु केलं.

या संघर्षात तब्बल २८० पॅलेस्टिनी मारले गेले आणि ६०० जखमी झाले. हमासने जमिनीखालून खोदलेल्या बोगद्यांचा इस्रायली सैन्याने छडा लावून त्यांची तिथेही नाकेबंदी केली. अखेर सडकून मार लागल्यावर हमास घायकुतीला आलं आणि त्यांनी युद्ध थांबवायची घोषणा केली. २००९ साली अमेरिकेत बाराक ओबामा प्रशासनाने या सगळ्या प्रकारचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुढाकार घेतला. आधीचे जॉर्ज बुश जितके इस्राएलच्या जवळचे होते, तितके ओबामा नव्हते...पण एव्हाना अमेरिकेची ज्यू लॉबी सक्रिय झाली होती. बिन्यामीन नेतान्याहू यांनी ओबामा प्रशासनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यांनी आपल्या बाजूने आता हमासचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने सरळ सैनिकी कारवाया सुरु केल्या. २०१४ साली हजारो पॅलेस्टिनी मारले गेल्यावर इस्राईलने हमासला अखेर गुढघ्यांवर आणलं.

हमास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने यासर अराफत यांचा मार्ग निवडला. सीरियाच्या यादवी युद्धापासून त्यांनी स्वतःला वेगळं केलं आणि आपल्या बाजूच्या कट्टरतावादी संघटनांना चाप लावण्याचे प्रयत्न ( निदान तोंडदेखले तरी ) केले. ' इस्राएलच्या पूर्ण विनाश ' हे उद्दिष्ट त्यांनी आपल्या संघटनेच्या उद्दिष्टांतून गाळून टाकल्याची घोषणा केली आणि १९६७ सालच्या सीमारेषेला आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणून मान्यता देऊन पॅलेस्टिनला देशाचा दर्जा देण्याचीही मागणी आंतरराष्ट्रीय पातळीवर केली. स्वतःला त्यांनी चक्क मुस्लिम ब्रदरहूडपासूनही दूर केलं...

पण एव्हाना इस्राएलमध्ये नेतान्याहू नावाचा कट्टर झिओनिस्ट सत्तेत आलेला होता. त्यांना हमासच्या या सगळ्या नव्या अवताराचं जराही अप्रूप नव्हतं...त्यांनी बळजबरीने पॅलेस्टिनी वस्त्यांमधून अरबांना हाकलून देऊन तिथे ज्यू घेट्टो बसवण्याची नवी मोहीम हाती घेतली. हमासने जराही काही केलं तर त्याच्या प्रत्युत्तरादाखल त्यांनी जबरदस्त सैनिकी कारवाई करण्याचं धोरण स्वीकारलं. अगदी हमासने स्वतःला एखाद्या माथेफिरू हल्ल्यापासून दूर केलेलं असलं तरी नेतान्याहू मात्र सरळ हमासच्या नावाने शंख फोडत युद्धभूमीवर आपल्या लष्कराला खुली सूट द्यायचे. अखेर या सगळ्याची परिणीती या भागात नव्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यात झाली....

२०१८ साल उजाडलं ते अरब देशांकडून आश्चर्यकारकरित्या इस्रायलशी नव्याने संबंध निर्माण करण्याच्या हालचालींनी. त्याआधी हमाससारख्या दहशतवादी संघटनांना रसद पुरवल्याच्या मुद्द्यावरून अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडून या भागात आकाराला येत असलेल्या नव्या समीकरणांची नांदी केलेली होतीच. पुढे अब्राहाम कराराच्या माध्यमातून त्यांनी इस्राएलपुढे मैत्रीचा हात नेला आणि एका अर्थाने वर्षानुवर्षे पेटत असलेल्या पॅलेस्टिनी प्रश्नाला आपणही कंटाळलो असल्याची ग्वाही दिली. पॅलेस्टिनी लोकांनी हमाससारख्या संघटनांना दिलेला पाठिंबा, सततचा संघर्ष, आपल्या कुवतीच्या कित्येक पटीने जास्त प्रमाणात केलेला आडमुठेपणा, बदलत्या आर्थिक - राजनैतिक समीकरणातही न सोडलेला हेकेखोरपणा आणि इतर अरबी देशांमध्ये निर्वासित म्हणून आसरा घेऊनही तिथे चालवलेला मुजोरपणा या सगळ्यामुळे त्यांना हा दिवस बघावा लागला. अब्राहाम कराराचा आधार घेऊन अरब - इस्राएल संबंध हळू हळू पूर्वपदावर येऊ लागले, त्यावर पुढच्या भागात...तोवर अलविदा.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - १४

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 13:59

सौदी अरेबिया हा एक मुलखावेगळा देश. अठराव्या शतकात वाळवंटातल्या नजद भागात जन्मलेल्या मोहम्मद इब्न अब्दुल वहाब या कट्टर विचारांच्या धर्मगुरूने सुन्नी मुस्लिमांच्या हानाबली शाखेत आपली एक पोटशाखा तयार केली...ज्याला वहाबी मुस्लिम शाखा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या परिसरातल्या इब्न सौद टोळीला हा वहाब भेटल्यावर या युतीने अरबस्तानात आपला अंमल बसवायला सुरुवात केली आणि अखेर १९३२ साली याच इब्न सौद कुटुंबाच्या अब्दुल अझीझ इब्न सौद याने ' सौदी अरेबिया ' हा देश जन्माला घातला. कट्टर सुन्नी वहाबी विचारांच्या पायावर उभा राहिलेला हा देश पुढे तेलसंपन्न देशांचा मेरुमणी झाल्यावर त्याचा आब जगाच्या पाठीवर अचानक शतपटीने वाढला. त्या पैशांतून मग कट्टर सुन्नी मुस्लिम विचारांच्या अनेक लोकांनी या देशात आपलं बस्तान बसवलं. ओसामा बिन लादेन,आयमन अल जवाहिरी असे अनेक जण सौदीच्याच आशीर्वादाने आणि कधी उघड तर कधी छुप्या पाठिंब्याने जगभरात हैदोस घालत राहिले.

सुधारणावादी विचार या देशाला कधी मानवलेच नाहीत. राजे फैसल यांच्या काळात सौदीला त्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला खरा, पण त्यांच्याच चुलतभावाने त्यांचा खून केल्यावर पुढे सौदीला फैसल यांच्या तोडीचं नेतृत्वच मिळालं नाही. राजे खालिद, राजे फाहद हे अतिशय सामान्य वकूबाचे राजे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं झालेले होते. तशात शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर नास्तिक साम्यवादी रशियाचा व्यवस्थित बागुलबुवा निर्माण करून अमेरिकेने सौदीचे नव्हे, तर सगळ्याच अरब देशांना रशियाच्या विरोधात वापरून घेतलं. पुढे इराणमध्ये इस्लामिक क्रांती होऊन अयातोल्ला खोमेनी यांनी तिथे शिया मुस्लिम राजवट आणली आणि सौदीने त्यांच्याशी सलोख्याचं धोरण ना स्विकारता थेट शिया - सुन्नी पंथांचा संघर्ष पुढे करून स्वतःकडे सुन्नी अरब देशांचं नेतृत्व घेतलं. सौदीचे तेल जगातल्या सगळ्याच देशांसाठी महत्वाचं असल्यामुळे त्यांना कोणी काही सबुरीचा सल्ला द्यायच्या भानगडीतही पडलं नाही.

सौदीमध्ये खऱ्या अर्थाने राजकीय आघाडीवर ठोस असं घडायला सुरुवात झाली एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात. जगाने ९/११ बघितलं होतं, त्यानंतर तेलाने गाठलेला १४०-१४५ डॉलर प्रतिबॅरलचा भाव सहन केला होता आणि ओपेक राष्ट्रांनी रशिया किंवा इराणला दाबायला सतत तेलाच्या भावात एकतर्फी चालवलेली मनमानीही बघितली होती. अखेर पारंपरिक ऊर्जास्रोतांव्यतिरिक्त तेल सोडून इतर ऊर्जास्रोतांकडे जगाने लक्ष वळवलं आणि हळू हळू तेलाला पर्याय निर्माण होऊ लागले. इलेक्ट्रिक गाड्यांनी बाजाराला आपली दखल घ्यायला लावून तेलावर चालणाऱ्या गाड्यांचं भविष्य डळमळीत असल्याची खूण दाखवली. तेलातून आपल्याला आता पूर्वीप्रमाणे बक्कळ पैसा मिळू शकणार नाही आणि तेलावरचं जगाचं अवलंबित्व हळू हळू कमी होतं जाणार असल्यामुळे अरब देशांना भविष्याची चिंता डाचायला लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१५ साली सौदीचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ अल सौद अल्लाच्या वाटेवर गेल्यावर त्यांच्या जागी सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद या त्यांच्या सावत्र भावाची वर्णी लागली. हे राजे सलमान सौदीचे मूळ संस्थापक इब्न सौद यांचे २५वे पुत्र... गादीवर बसताना ते ८० वर्षांचे होते आणि त्यांना शारीरिक व्याधीही बऱ्याच होत्या. सौदीचं नव्हे, तर अरब देशांमध्येच नव्याने गादीवर बसलेला राजा आपला उत्तराधिकारी नेमून देतो...त्या प्रथेला अनुसरून राजे सलमान यांनी मुक्रीन बिन अब्दुलअझीझ या आपल्या पित्याच्या सगळ्यात धाकट्या हयात असलेल्या मुलाला आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं. हा राजे सलमान यांच्यापेक्षा १० वर्षांनी लहान होता.

पुढे नक्की काय झालं याचा कोणालाच उलगडा झाला नाही, पण अवघ्या ३ महिन्यात राजे सलमान यांनी त्याच्या जागी मुहम्मद बिन नाएफ अल सौद याला आपल्या उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. हा इब्न सौद यांचा नातू. याचे वडील नाएफ बिन अब्दुलअझीझ हेही अल्पकाळासाठी राजे अब्दुल्ला यांचे उत्तराधिकारी होते. राजे सलमान याचे काका. याच्या रूपाने सौदी घराण्याची धुरा नव्या पिढीकडे सरकत असल्याची चाहूल लागलेली होती.

सौदी राजघराण्यात गुंतागुंतीचं राजकारण चालतं. एक तर हे अरब सर्वार्थाने बहुप्रसवा. अब्दुल अझीझ इब्न सौद यांच्या अनेक राण्या आणि अनेक मुलं...पण त्या राण्यांमधली महत्वाची होती हस्सा बिंत अहमद अल सुदैरी. या सुदैरी कबिल्याचीच सारा बिंत अहमद अल सुदैरी ही इब्न सौद यांची आई होती. अर्थातच हस्सा इब्न सौद यांच्या जास्त जवळची. या हस्साच्या सात पुत्रांच्या हाती पुढे सौदी अरेबियाच्या सत्तेची सूत्रं फिरत राहिली. १९८२ साली या सुदैरी भावंडांपैकी थोरल्या फाहदच्या हाती सौदीची सूत्रं आली ती थेट २००५ सालापर्यंत राहिली. त्याच्यानंतर आलेले अब्दुल्ला सुदैरी घराण्याचे नसले तरी त्यांच्या नंतर आलेले सलमान मात्र पुन्हा एकदा सुदैरीच होते. देशाची सूत्रं त्यांनी पुतण्याच्या हाती देण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या मुलाला - मोहम्मद बिन सलमान अल सौद याला मान्य नव्हता.

बंद दाराआड पुन्हा एकदा खलबतं झाली. अरब जगतात अशा प्रकारे बंद दाराआड नक्की काय काय होतं याचा सुगावा जगाला कधीच लागत नाही..बाहेर येतो तो अंतिम निर्णय. त्यानुसार २०१७ साली सलमान यांनी पित्याच्या उत्तराधिकारी पदाचा कारभार हाती घेतला आणि पहिल्यांदाच सौदीने विशीतला तरुण मुलगा राजघराण्याच्या दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी झालेला बघितला.

हा सलमान सौदीला नव्या दिशेला नेण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेला होता. वर्षानुवर्षे सौदी ज्या कट्टर वहाबी सुन्नी इस्लामच्या वाटेवरून चाललेला होता, ती वाट सलमानला बदलायची होती. जगात सौदीचे नाव आदराने घेतलं जावं, सौदीकडून जगाच्या पाठीवर प्रेरणादायी आणि रचनात्मक अशी भरघोस कामगिरी व्हावी, सौदी जगातल्या महासत्तांमध्ये गणला जावा अशा प्रकारची स्वप्न घेऊन हा गादीवर आला. पिता नव्वदीच्या उंबरठ्यावर आलेला आहे, तेव्हा आपणच राज्यशकट हाती घेतलं पाहिजे हे त्याने ओळखलं आणि २०१७ साली सौदीमध्ये प्रथमतः एक महाभारत आकाराला आलं. सौदीच्या राजघराण्यातली, सौदीच्या उच्च धनाढ्य वर्तुळातली आणि राजकारणातली अनेक महत्वाची माणसं या सलमानने चक्क नजरकैदेत ठेवली. त्यांच्याकडून आपल्याला जे काही हवं ते त्यांनी खळखळ न करता द्यावं हे आश्वासन सलमानने अशा प्रकारे मिळवून दाखवलं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याने कित्येकांना तुरुंगात टाकलं. आपले प्रतिस्पर्धी नेस्तनाबूत करून त्याने अखेर राज्यकारभारावर मांड ठोकली आणि आपल्या राजकारणाला सुरुवात केली.

युनाइटेड अरब एमिरेट्स या सात अमिरातीच्या देशातही सर्वाधिक बलाढ्य असलेल्या अबू धाबीचा राजपुत्र मोहम्मद बिन झाएद आलं नह्यान अशाच विचारांनी भारलेला.एक तर हा देश आजूबाजूच्या अरबी देशांमधील सर्वाधिक आधुनिक. या देशाला कट्टरतावादाचं वावडं. या देशाचे सौदीशी पूर्वापार घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत.मोहम्मद बिन झाएद आणि मोहम्मद बिन सलमान या दोघांनी अरब देशांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक दूरगामी निर्णय घ्यायचं ठरवलं.

तिथे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे या दोघांशी चांगले संबंध होते. ट्रम्प यांचा जावई जेरार्ड कुशनेर ज्यू. त्याने या दोहोंशी चर्चा करून २०२० साली इस्राएल आणि युएई यांच्यात समझोता घडवून आणला. हा करार म्हणजेच अब्राहाम करार. यानुसार यूएईने इस्रायलला देश म्हणून मान्यता देऊन तिथे आपले राजनैतिक अधिकारी पाठवले आणि इस्राएलमध्ये अरब देशाचं ' कौन्सुलेट ' आकाराला आलं. या करारानंतर बाहरेन, सुदान, मोरोक्को, ओमान यांनीही इस्रायलशी संबंध प्रस्थापित केले. पॅलेस्टिनी लोकांसाठी हा धक्का इतका मोठा होता, की या अरब राष्ट्रांमधल्या पॅलेस्टिनी लोकांनी आपापल्या परीने या करारावर बराच आक्रोश केला,,,पण त्यांचं ऐकायला कोणी आलं नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात दीर्घकाळ आडमुठेपणा करून आणि हिंसक वृत्तीने वागून पदरात काहीच पडत नाही हा या निमित्ताने त्यांना मिळालेला धडा. तसंच, इतरांच्या मदतीने आपली लढाई लढण्यापेक्षा स्वतःला सशक्त करणं कधीही चांगलं हेही त्यांना या निमित्ताने समजलं.

सौदीने या सगळ्यात अजूनही स्वतःला थेट गुंतवलेला नाहीये. मोहम्मद बिन सलमान याने अतिशय धूर्तपणे इस्रायलशी आपले संबंध चांगले ठेवलेले आहेत...कारण मोसादने त्याचं सौदीच्या अंतर्गत शत्रूंपासून रक्षण करण्याची कामगिरी स्वीकारलेली आहे. हळू हळू बाकीच्या देशांचे इस्रायलशी संबंध सुरळीत करून शेवटी सौदीकडून उघडपणे मैत्रीचा हात पुढे व्हावा ही त्याची धूर्त खेळी भल्या भल्यांना अचंबित करून गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इस्राएलचे राजधानी तेल अवीव येथून जेरुसलेम येथे न्यावी ( अर्थात वर्षानुवर्षे जेरुसलेम हीच इस्राईलने आपली राजधानी मानलेली आहे, पण पॅलेस्टिनसुद्धा जेरुसलेमलाच आपली राजधानी मानतो ) असा उघड पवित्र घेऊन अमेरिकेची वकिलाती जेरुसलेम येथे हलवायची घोषणाही केली. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट होता - पॅलेस्टिनी संघर्षाला आता अमेरिका आणि अरब जग वैतागलेलं होतं.

या सगळ्यातून पुढे पुन्हा एकदा इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोकांचा संघर्ष उफाळून आला, तो एका विचित्र कारणामुळे. नेतान्याहू यांनी आपली खुर्ची वाचवण्याच्या आटापिटा सुरु केल्यामुळे कदाचित इस्राएल काही काळ शांत राहील, असं अनेकांना वाटलं होतं, पण झालं भलतंच. नेतान्याहू यांनी खुंट बळकट करायला बरोब्बर पॅलेस्टिनी संघर्षाचा टेकू घेतला आणि जनभावनेच्या लाटेवर स्वार होण्याची पाताळयंत्री खेळी केली....पण त्यावर पुढच्या भागात. तोवर अलविदा.

जेरुसलेम - एक शापित देवभूमी - अंतिम.

Submitted by Theurbannomad on 31 May, 2021 - 17:10
jerusalem davi

Bhaag 14 - https://www.maayboli.com/node/79147
Bhaag 13 - https://www.maayboli.com/node/79146
Bhaag 12 – https://www.maayboli.com/node/79103
Bhaag 11 - https://www.maayboli.com/node/79093
Bhaag 10 - https://www.maayboli.com/node/79080
Bhaag 09 - https://www.maayboli.com/node/79064
Bhaag 08 - https://www.maayboli.com/node/79061
Bhaag 07 - https://www.maayboli.com/node/79043
Bhaag 06 - https://www.maayboli.com/node/79000
Bhaag 05 - https://www.maayboli.com/node/78993
Bhaag 04 - https://www.maayboli.com/node/78987
Bhaag 03 - https://www.maayboli.com/node/78979
Bhaag 02 - https://www.maayboli.com/node/78976
Bhaag 01 - https://www.maayboli.com/node/78972

जेरुसलेम शहराच्या अनुषंगाने अरब - इस्राएल आणि त्यातही पॅलेस्टीन - इस्राएल संघर्षाचा इतिहास धुंडाळायचा हा प्रयत्न वाचकांच्या समोर आणताना मला या विषयाचे असंख्य कंगोरे अनुभवायला मिळाले. अरबांच्या आणि ज्यू लोकांच्या आयुष्यात डोकावायची संधी मिळाली. जेरुसलेम येथे प्रत्यक्षात जायची संधी न मिळूनही या शहरात मनसोक्त ' फिरता ' आलं. ज्यू लोकांचा चिवटपणा, लढाऊ वृत्ती, प्रसंगी उफाळून येणारा कट्टरपणा, आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी वाट्टेल त्या थराला जाऊन राजकारण करण्याची वृत्ती हे मला पदोनपदी जसं जाणवलं, तसंच अरबांमधला आडमुठेपणा, मुत्सद्दीपणाचा अभाव, एकीचा अभाव, आत्ममग्न वृत्ती हेही मला अनुभवता आलं. जेरुसलेम येथे ज्यू, अरब आणि ख्रिस्ती लोकांनी केवळ आपलं आणि आपलंच एकहाती वर्चस्व असावं या हट्टापायी वर्षानुवर्षे जो काही धुडगूस घातलेला आहे त्यामुळे या देवभूमीत सतत रक्ताचं शिंपण होत राहिलेलं आहे.

आधुनिक काळात या संघर्षातून ख्रिस्ती लोकांनी अंग काढून घेतलं असलं तरी ज्यू आणि अरब मात्र इथे भांडतच राहिले. त्यातून जन्माला आला फक्त आणि फक्त रक्तपात. खरं तर एकाच वेळी वेलिंग वॉलसमोर पठाण करणारे ज्यू, आलं अकसा मशिदीत नमाज पढनारे मुस्लिम आणि चर्च ऑफ द होली सेपल्चर येथे प्रार्थना करणारे ख्रिस्ती असं जगाच्या तीन मुख्य धर्माचं एकत्रीकरण येथे दिसायला हवं...पण ते होणं या शहराच्या नशीबात अजून तरी आलेलं नाही.

इस्राएलमध्ये बिन्यामीन नेतान्याहू सत्तेत आल्यावर त्यांनी आपल्या सुप्रसिद्ध बेमुर्वतखोर स्वभावाला अनुसरून या संघर्षाला अजून खतपाणी घातलेलं आहे. झालं असं, की नेतान्याहू सत्तेत आले ते हमासने केलेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर. त्यांचा लिकुड पक्ष तसाही थोडासा कट्टर. १९९३ साली ओस्लो येथे इस्राएल आणि यासर अराफत यांच्या PLO मध्ये झालेल्या शांतता करारातून या दोन्ही बाजूंनी हिंसाचार थांबवून चर्चेला प्राधान्य द्यावं असा तोडगा अमेरिकेच्या पुढाकाराने निघालेला होता....पण नेतान्याहू यांनी हमास या कराराला जुमानत नसल्यामुळे या कराराच्या वैधतेवरच शंका व्यक्त केली. हमास म्हणजे पॅलेस्टीन नाही, हे माहित असूनही त्यांनी समस्त पॅलेस्टिनी लोकांना हिंसाचारासाठी जबाबदार धरलं.

नेतान्याहू खरं तर १९९३ सालीही पंतप्रधान झाले होते आणि तेव्हा ते बऱ्यापैकी विवेक राखून वागायचे. तेव्हाही अधून मधून त्यांच्या बेमुर्वतखोर स्वभावाची झलक दिसलेली होतीच, पण ती तेव्हढ्यापुरतीच. तेव्हा नेतान्याहू यांचे पूर्वसुरी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांनी सबुरी दाखवून एक योजना रोखून धरलेली होती. इस्राएलच्या ' अरब क्वार्टर ' भागातून वेस्टर्न वॉल टनेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचोळ्या भुयारी मार्गाकडे जाण्याचा रस्ता तयार करण्याची ही योजना पॅलेस्टिनी अरबांना पसंत नव्हती. एक तर त्यांच्या भागातून हा मार्ग त्या भुयारी मार्गाकडे जाणार होता आणि त्या मार्गाच्या पलीकडे ज्यू लोकांचं स्तोत्रपठण करण्याचा मोठा चौथरा होता. भुयारी मार्गाच्या वरच्या भागात मुस्लिम लोकांची दुकानं होती...त्यामुळे त्यांचाही प्रश्न होताच. हे भुयार पॅलेस्टिनींसाठी काहीच महत्वाचं नव्हतं.... पण ज्यू लोकांना मात्र हे भुयार त्यांच्या चौथऱ्याकडे जाण्याचा पुरातन रस्ता असल्यामुळे महत्वाचं होतं.

नेतान्याहू यांनी हा मार्ग तयार करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखवला आणि दोन्हीकडचे भडक माथ्याचे लोक आपापसात भिडले. वास्तविक या सगळ्याची गरज नव्हती...पण नेतान्याहूच ते. अखेर दोन्ही बाजूंच्या पन्नास-साठ लोकांची आहुती पडल्यावर जेरुसलेमचे दंगे निवळले. त्यानंतर त्यांनी यासर अराफत यांना चर्चेसाठी पाचारण केलं आणि हेब्रोन करार घडवून आणला. या कराराची पार्श्वभूमी समजायला १९९४ सालच्या यित्झाक राबिन आणि यासर अराफत यांच्यातल्या गाझा - जेरिको करारात डोकावून बघावं लागेल...या करारानुसार इस्राईलने पॅलेस्टिनी नेत्यांच्या हाती गाझा आणि वेस्ट बँक भागात राज्यशकट हाकण्याची थोडेफार स्वायत्तता देण्याचं कबूल केलं होतं. पॅलेस्टिनी पोलीस दल स्थापन करून पॅलेस्टिनी लोकांच्या भागात इस्रायली लष्कर आणि निमलष्करी दलांचा हस्तक्षेप काही प्रमाणात कमी करण्याचीही योजना त्यात होती. हेब्रोन करारात इस्राएलच्याच हेब्रोन भागात पॅलेस्टिनी लोकांचा आणि ज्यू लोकांचा भाग स्पष्टपणे आखून पॅलेस्टिनी भागातून इस्राईलने पाय काढून घेण्याचं कलम होतं. पुढे याच कराराचा विस्तृत आराखडा म्हणजे ' वाय रिव्हर मेमोरँडम ' वर एकमत करण्याच्या दृष्टीने नेतान्याहू आणि अराफत एकत्र आले. तिथे मात्र नेतान्याहू यांनो ' थ्री नो'स ' नावाने प्रसिद्ध असलेली तीन कलमं करारात समाविष्ट करण्यासाठी आग्रह धरला. ' इस्राएल गोलान टेकड्या सोडणार नाही, जेरुसलेमवर पूर्ण हक्क फक्त इस्राएलचाच असेल ज्यात कोणतीही तडजोड असणार नाही आणि कोणत्याही पूर्वशर्ती ठेवून करार करता येणार नाही ' ही ती कलमं.

एकीकडे अशा प्रकारे अराफत यांना कात्रीत पकडून नेतान्याहू यांनी हमासवर लक्ष्य केंद्रित केलं. हमासचा जॉर्डनमध्ये आश्रयाला गेलेला नेता खालेद मशाल याची त्यांनी हत्या घडवून आणली खरी, पण त्यात मोसादचे हस्तक पकडले जाऊन नेतान्याहू यांना चर्चेच्या टेबलावर यावं लागलं आणि शेख यासीनसारख्या पाताळयंत्री पॅलेस्टिनी नेत्याला सोडावं लागलं...या सगळ्यामुळे नेतान्याहू यांचं सरकार पुढल्या निवडणुकीत पडलं. लोकांना नेतान्याहू यासर अराफत यांच्या बाबतीत थोडे जास्तच मवाळ वाटले हे विशेष... शिवाय हमासच्या बाबतीत त्यांनी उचललेल्या पावलांमधून शेख यासीनला सोडून द्यायची नामुष्की इस्रायलला सहन करावी लागली याचाही ज्यू लोकांना राग आलाच होता.

पुढे याच नेतान्याहूंनी २००९ साली पुन्हा एकदा निवडणुकीत उडी घेतली. तिथे अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी पॅलेस्टिनच्या निर्मितीला अनुकूल मतं व्यक्त केल्यावर नेतान्याहू संतापले. ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच वातावरण अचानक बदलायला लागलं. नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनच्या निर्मितीला समर्थन देण्याच्या बदल्यात आपल्या अटीशर्ती समोर ठेवल्या. जेरुसलेम पूर्णपणे इस्राएलच्या ताब्यात असेल , पॅलेस्टिनकडे स्वतःचं सैन्य नसेल, पॅलेस्टिनी लोक त्यांच्या नेमून दिलेल्या सीमारेषांमध्येच राहतील , ' परतीचा मार्ग ' कधीच धरणार नाहीत आणि ज्यू लोकांना मात्र वेस्ट बँक किंवा गाझाच्या ज्यू घेट्टो वस्त्यांमध्ये राहून वस्त्या ' नैसर्गिकपणे ' विस्तारण्याची मुभा असेल या त्यांच्या अटी त्यांच्या पूर्वीच्या पंतप्रधानपदाच्या काळातल्या त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होत्या. अशा सगळ्या वातावरणात ते पुन्हा एकदा निवडून आले आणि आता त्यांच्यातला कट्टरतावादाकडे झुकलेला पण धूर्त पाताळयंत्री राजकारणी जगापुढे येणार होता.

२००९ च्या ऑगस्टमध्ये ते अचानक आपल्या कचेरीतून नाहीसे झाले. अनेकांनी अनेक कयास बांधल्यावर अखेर सत्य बाहेर आलं तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते थेट मॉस्को येथे रशियन राजकारण्यांशी वाटाघाटी करायला गेले होते - इराणला रशियाने S -३०० जातीची विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकू नये या त्यांच्या मागणीसाठी त्यांनी इराणला मदत करत असलेल्या रशियन तंत्रज्ञांची नावं उघड करण्याचा प्रकार केला होता. पुढे इराणला त्यांनी पदोनपदी लक्ष्य करायला सुरुवात केली.

या सगळ्याच्या आडून त्यांनी इस्राएलमध्ये रमत श्लोमो नावाच्या जेरुसलेमलगतच्या भागात १६०० नवी अपार्टमेंट्स बांधायच्या आराखड्याला मंजुरी दिली. या प्रकाराला ओबामा यांनी विरोध केला खरा, पण नेतान्याहू बधले नाहीत. जेरुसलेम भागात अशा प्रकारे ज्यू लोकांची संख्या वाढवत नेली तर पुन्हा या भागात दंगे पेटतील या ओबामांच्या इशाऱ्याकडे त्यांनी कानाडोळा केला. पण या सगळ्यातून त्यांना जागं केलं ज्यू लोकांनी महागाई वाढल्याच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनांनी...शेवटी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी एकीकडे महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी काही पावलं उचलली आणि दुसरीकडे पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बास यांना पॅलेस्टिनला देश म्हणून मान्यता देऊन तिथून इस्रायली सैन्य परत बोलवायचं लेखी वचन दिलं... आणि या सगळ्या ' पुण्याईवर ' त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन दाखवलं.

२०१३ साली अल्पमताचं सरकार बनवून नेतान्याहू पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि आता त्यांच्यात सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती घर करायला लागली. या वेळी त्यांच्या सरकारात बहुमतासाठी त्यांना टेकू द्यायला आलेल्या हतनूआ , युनाइटेड तोरा जुडाईसम आणि येश अतिद या राजनैतिक पक्षांपैकी पहिले दोन कट्टर ज्यू. त्यांच्यात ज्यू मूलतत्त्ववादी विचारांचा भरणा असलेले राजकारणीच जास्त. त्यांच्या दबावामुळे नेतान्याहू अधिकाधिक आक्रमक होत गेले. पुढे त्याचं कट्टर ज्यू दबावगटामुळे त्यांनी ज्यू लोक बळजबरीने आपल्या वस्त्या पॅलेस्टिनी लोकांच्या भागात वाढवत नेत असल्याच्या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष केलं.

२०१५ साली पुन्हा एकदा सरकार पडल्यामुळे निवडणूक होऊन चौथ्यांदा नेतान्याहू पंतप्रधान झाले. याही वेळी त्यांनी टेकू घेतले ज्यूईश होम, युनाइटेड तोरा जुडाईसम , कुलानु आणि शास या पक्षांचे. या सगळ्यांचा लौकिक अतिउजव्या राजकारणाचा. त्यातूनच नेतान्याहूंनी जेरुसलेमचा पूर्वीचा ग्रँड मुफ्ती आणि कडवा पॅलेस्टिनी ' अमीन अल हुसेनी ' याच्या सांगण्यावरूनच हिटलरने ज्यू लोकांचा नरसंहार केल्याची धडधडीत खोटी आणि इतिहासाचा विपर्यास करणारी विधानं केली. उद्देश काय, तर पॅलेस्टिनी लोकांना हिटलरपेक्षाही वाईट ठरवून त्यांच्या विरोधात ज्यू लोकांची घृणा अधिक तीव्र करायची....अशामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच टीका झाली. जर्मनीच्या चांसेलर अँजेला मर्केल यांनी तर त्यांच्या या कृतीला हिटलरच्या कृष्णाकृत्यांच इतिहासातलं महत्त्व कमी करून त्या नराधमाच्या जागी बळजबरीने पॅलेस्टिनी लोकांना बसवायचं हे हीन कृत्य आहे अशा शब्दात फटकारलं....कारण वास्तविक हुसेनी हिटलरला भेटायच्या पाच महिने आधीच ' होलोकॉस्ट ' सुरू झालेलं होतं.

पुढे २०१७ साली खुद्द नेतान्याहू यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांची चौकशी व्हायला लागली आणि त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगलेली दिसायला लागली. कोर्टात खटले उभे राहिले आणि इतिहासात प्रथमतः ज्यू पंतप्रधानाला अटक होणार अशी चिन्ह दिसू लागली. अशा परिस्थितीत कोणताही आत्ममग्न नेता जे करेल, तेच त्यांनी केलं....लोकभावनेला फुंकर घालून आपल्या बाजूला सहानुभूती मिळवायचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आणि ते अधिकाधिक अतिउजव्या कृती करायला लागले.

२०१९ साल उजाडलं तेच कोरोना विषाणूच्या सावटाखाली जगाच्या पाठीवर भल्या भल्या देशांच्या व्यवस्था डळमळीत होऊन. चीनने या विषाणूची माहिती दडपायचा प्रयत्न केला तो त्यांच्याही आणि जगाच्याही अंगाशी आला. त्याच्या आधाराने नेतान्याहू यांनी जमेल तितक्या आवडीने निवडणुका पुढे ढकलून दुसरीकडे कट्टर ज्यू लोकांना मोकळं रान उपलब्ध करून दिलं. आता इस्राएलच्या सीमारेषा कोणत्याही कराराला न जुमानता पॅलेस्टिनी वस्त्यांमध्ये विस्तारू लागल्या. २०२० सालच्या एप्रिलमध्ये अनुकूल वातावरणनिर्मिती होताच नेतान्याहू यांनी पुन्हा निवडणुका घेतला आणि पुन्हा एकदा अल्पमताचं सरकार स्थापन करून दाखवलं. आता ते पाचव्यांदा इस्राएलचे पंतप्रधान झाले होते. एकीकडे विषाणूच्या धोक्यांशी चार हात करण्याच्या उद्देशाने त्यांनी धडाक्याने लसीकरण मोहीम राबवून ' जगाच्या पाठीवरचा मुखपट्ट्यांचा नियम शिथिल केलेला पहिला देश ' म्हणून इस्राएलचं नाव इतिहासात नोंदवून ठेवलं आणि दुसरीकडे पॅलेस्टिनच्या बाबतीत आपलं आततायी आणि दडपशाहीचं धोरण पुढे रेटलं. या संघर्षाने पुन्हा एकदा वातावरण पेटवलं.

या वेळी संघर्षाचे चार कोन होते....इस्राएल - वेस्ट बँक संघर्ष, इस्राएल - गाझा संघर्ष, गाझा - वेस्ट बँक संघर्ष आणि पॅलेस्टिनी अरब लोकांच्यातल्या अंतर्गत बंडाळ्या. एप्रिलमध्ये वास्तविक पॅलेस्टिनी निवडणुकाही होणं अपेक्षित होतं, पण हमास वेस्ट बँकवरही वर्चस्व मिळवेल अशी चिन्ह दिसताच पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी निवडणुका पुढे ढकलल्या. या काळात अमेरिकेत ट्रम्प जाऊन जो बायडेन सत्तेत आले होते, जे ओबामांच्या परंपरेतले असल्यामुळे त्यांचा इस्राएलच्या युद्धखोरीला विरोध होता. ट्रम्प यांनी ओबामांनी महत्प्रयासाने इराणशी घडवून आणलेल्या अण्वस्त्र बंदीच्या करारातून एकतर्फी बाहेर पडत इराणला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडीत पकडायची कृती केली होती, पण बायडेन यांनी पुन्हा जुने सूर आळवल्यावर इराण नव्याने शिरजोर होऊ पाहत होताच...पलीकडे तुर्कस्तानात पुन्हा एकदा खलिफापदाच्या मुकुटावर डोळा ठेवून रिसेप तय्यीप एर्दोगन सत्तेत आले होते. सौदीमध्ये मोहम्मद बिन सलमान इस्रायलशी दोस्ती करू पाहात होता. मुस्लिम जगतात कधी नव्हे ते तीन तीन सांड एकमेकांशी राजकारणाच्या पटावर भिडत होते आणि प्रत्येकाच्या चाली तिरकस पडत होत्या.

अशा विचित्र वातावरणात ठिणगी पडली शेख जर्रा भागात. पूर्व जेरुसलेमच्या या भागात अरब पॅलेस्टिनी बहुसंख्य. तिथेच ज्यू वस्त्या असलेल्या माउंट स्कुपस, माउंट झिऑन, माउंट ऑफ ऑलिव्हस या टेकड्या आहेत...इथेच जेरुसलेम विद्यापीठही आहे. या भागातल्या अरबांना मुस्लिम बहुल भागात घरं देऊन त्यांच्या जागी ज्यू वस्त्या वाढवाव्या यासाठी कोर्टात ज्यू लोकांनी याचिका दखल केली होती. शेख जर्रा भागात अनेक वर्ष नांदणारे पॅलेस्टिनी अरब यामुळे चिडले. १९६७ च्या युद्द्धानंतर पूर्व आणि पश्चिम जेरुसलेम ज्यू अमलाखाली एक झालं तो दिवस - ' जेरुसलेम डे ' या वेळी नेमका रमझानच्या महिन्यात आला. एकाच दिवशी अल अकसा मशिदीत समूहाने मुस्लिमांचं नमाज पठण आणि ज्यू लोकांचं ' सेलिब्रेशन ' कोविड विषाणूच्या संसर्गासाठी अनुकूल वातावरण ठरेल म्हणून दमास्कस गेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल अकसा मशिदीच्या परिसराच्या प्रवेशद्वाराशी जमावबंदी घालून आणि मशीदीतही १०००० पेक्षा जास्त लोक जमू नये असे आदेश देऊन प्रशासनाने यावर तोडगा काढला...

वास्तविक यात कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारण नसायला हवं, पण पूर्वीच्या अनुभवांमुळे पॅलेस्टिनी लोकांची मनं कलुषित झालेली होती.... पॅलेस्टिनी मुस्लिमांनी या सगळ्याचा भलताच अर्थ काढला आणि त्यांनी आदेश झुगारायचा पवित्रा घेतला.... तब्बल ६०००० मुस्लिम मशिदीच्या परिसरात जमले आणि त्यांना पांगवणाऱ्या पोलिसांवर त्यांनी दगडफेक सुरु केली....अर्थातच दंग्यांना तोंड फुटलं. इस्रायली पोलिसांनी पॅलेस्टिनी नागरिकांना शब्दशः फोडून काढायला सुरुवात केली आणि पॅलेस्टिनी तरुणांनी दगडफेकीसारखी आगीत तेल ओतायची कृती करून वातावरण चिघळवलं. शेख जर्रा याचिकेचा ११ मे रोजी लागणार असलेला निकालही पुढे ढकलला गेला...

हमासने या वातावरणाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने गाझा भागातून इस्राएलच्या अशखलोन,अशदोद, लोड, बीरशेबा आणि चक्क तेल अवीव या भागाला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागली. इस्राएलकडे ' आयर्न डोम ' नावाची अत्याधुनिक प्रणाली आहे, जी क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करू शकते आणि लोकांना सावध करण्यासाठी मोठ्या आवाजात भोंगाही वाजवू शकते. ज्यू नागरिकांनी आपापल्या घरातल्या ' शेल्टर रूम्स ' मध्ये आसरा घेतला. इस्रायली सैन्याने प्रत्युत्तरादाखल भीषण हवाईहल्ला आणि क्षेपणास्त्र हल्ला करून हमासच्या तोंडाला पुन्हा एकदा फेस आणला. हमासच्या गाझा येथील मुख्यालयाला जमीनदोस्त केलं. हमासच्या सहा महत्वाच्या नेत्यांची रवानगी अल्लाच्या वाटेवर करून दिली. आपले रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रणाल्या थेट गाझा सीमारेषेवर तैनात करून इस्राईलने हमासला एकदाच काय ते संपवायचा विडा उचलला....जगाला आधीच कोविड विषाणूमुळे धाप लागलेली, त्यामुळे इस्रायलला रोखणार कोण हाच प्रश्न अरब नेत्यांना पडला.

आजही पॅलेस्टिनच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. नेतान्याहू दिमाखाने पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. हमासच्या नादी लागून पॅलेस्टिनी लोकांनी स्वतःच्या भूतकाळाप्रमाणेच वर्तमानकाळाची आणि कदाचित भविष्याचीही राखरांगोळी करून घेतलेली आहे. जेरुसलेममध्ये ज्यू पोलिसदलाने दमनशाही चालवून अरबांना अक्षरशः दूरवरच्या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये हाकलून दिलेलं आहे आणि आता त्यांची दादागिरी हाताबाहेर जायला लागलेली आहे. नाही म्हणायला एर्दोगन यांनी तुर्कीच्या बाजूने पॅलेस्टिनी लोकांची खिंड आंतरराष्ट्रीय पातळीवर लढवायचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे, पण त्यात सहानुभूती कमी आणि सौदीच्या हाती असलेल्या मुस्लिम जगताच्या प्रमुखपदावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचं राजकारण जास्त आहे. अरब देश स्वतःच सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टीन आणि तिथल्या सततच्या कुरबुरींमध्ये नाक घालण्याच्या भानगडीत पडण्यापासून स्वतःला रोखत आहेत, कारण त्यांना संघर्षापेक्षा व्यापक जनाधार मिळवून स्वतःच्या भविष्याची तरतूद करून ठेवायची आहे.

जेरुसलेम शहर मात्र एखाद्या अविचल शांत ऋषीमुनीप्रमाणे नव्याने होणाऱ्या जखमा अंगावर बाळगत कधी तरी आपल्याच भूमीतून निपजलेल्या तीन धर्मांच्या लेकरांच्या मेंदूत प्रकाश पडेल या आशेवर अजूनही तग धरून आहे. कधी काळी लोकांच्या कल्याणासाठी सुळावर चढलेला येशू आणि जेरुसलेम शहर एकसारखंच...फक्त येशूप्रमाणे जेरुसलेम कधी पुनर्जीवित होईल, याची या शहरावर खरं प्रेम करणारे सगळे जण वाट बघत आहेत !

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...