"काय मग? कशी झाली तुमची ट्रीप? कॉर्बेटमधे दिसला का काही वाघ-बिघ?"
नैनीताल-मसूरी-जिम कॉर्बेट नॅशनल पार्क अशी, म्हणजे थोडक्यात
उत्तरांचलची सहल करून आल्यानंतरच्या आठवड्याभरात किमान दहा पंधरा वेळा तरी
हा प्रश्न आम्हाला विचारला गेला. (आणि त्या प्रश्नाला आम्ही तितक्यांदाच
नकारार्थी उत्तर दिलं. खोटं कशाला बोलू?)
खरंतर उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या जवळपास(च) कुठेतरी येतं इतपत
सामान्यज्ञान सर्वांनाच असतं. पण म्हणून "मसूरीला दिसली का काही
बर्फाच्छादित शिखरं-बिखरं?" असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही.
त्या प्रश्नाला तर आम्ही ‘होऽऽ! भरपूर...’ असं उत्तर द्यायला आसुसलो होतो.
पण ते नाही; व्याघ्रदर्शनाची मात्र पदोपदी चौकशी!
जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देऊन आलेले, किंबहुना कुठल्याही नॅशनल
पार्कला भेट देऊन आलेले, न आलेले, सगळ्यांच्याच चेहर्यावर आमचं ते
नकारार्थी उत्तर ऐकल्यावर एक प्रकारचं मंद स्मित झळकायचं. म्हणजे, ‘असंच
पाहीजे! तुम्हाला पण नाही ना दिसला? आम्हाला पण नव्हता दिसला.’ किंवा ‘नाही
दिसत ना तिथे वाघ? म्हणूनच आम्ही तिथे जाण्याच्या फंदात पडत नाही’ असे
काहीतरी भाव विचारणार्यांच्या चेहर्यावर झळकायचे.
तसं बघायला गेलं तर कॉर्बेट पार्कची वारी घाईघाईत उरकण्यापेक्षा तिथे दोन
दिवस आरामात राहून सगळं बघू असा निर्णय जेव्हा आम्ही घेतला तेव्हा त्या
‘सगळं’मधे वाघाला प्राधान्यक्रम होताच, नाही असं नाही. पण म्हणून जंगल
सफारीसाठी निघताना आम्ही तो काही जीवनमरणाचा प्रश्न बनवला नव्हता. उघड्या
जीपमधून निबीड अरण्यात फेरफटका मारायला मिळणार हीच गोष्ट मुळात अतिशय
रोमांचक होती. त्या फेरफटक्यादरम्यान जर खरोखरच एखादा वाघही दिसला असता तर
सोन्याहूनही (किंवा त्या वाघाहूनही) पिवळं झालं असतं.
सोन्याहून पिवळं जरी नाही तरी जंगलातल्या कच्च्या रस्त्यावरून ताशी पंधरा
कि.मी.च्या वेगानं जाणारी उघडी जीप, जीपच्या पुढच्या भागात चालक आणि एक
फॉरेस्ट ऑफिसर बसलेले आणि मागच्या भागात तोल सावरत आम्ही तिघं उभे, जीपच्या
इंजीनाच्या मंद आवाजाशिवाय इतर कसलाही आवाज नाही... अशा सफारीचा आमचा तो
अर्धा दिवस सोन्यासारखाच गेला.
सफारीदरम्यान भडक रंगाचे कपडे घालू नयेत ही सूचना आम्ही कॉर्बेट पार्कच्या
वेबसाईटवर वाचलेली होती. त्यामुळे मी आणि माझा मुलगा - आम्ही दोघं चक्क गडद
हिरव्या रंगाचे कपडे घालूनच बाहेर पडलो होतो. सोबतचा तो फॉरेस्ट ऑफिसर
अगदी हळू, दबक्या आवाजात आम्हाला काहीबाही माहिती सांगत होता. हे असे
कपड्यांचे रंग, खालच्या आवाजात संभाषण वगैरे सगळी खबरदारी कशासाठी तर
जंगलातल्या प्राण्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या दिनक्रमात कुठल्याही
प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी...
अंदाजे पाचशे वर्ग कि.मी.च्या परिसरात पसरलेल्या कॉर्बेट पार्कमधली पाचशे
वरून आता केवळ एकशेचौसष्टवर उतरलेली वाघांची संख्या आणि त्या पार्श्वभूमीवर
ही जागरुकता - ही विसंगती एका क्षणी मनाला अस्वस्थ करून गेली. त्या पाचशे
वजा एकशेचौसष्ट इतक्या वाघांचं बलिदानच या जागरुकतेमागे असेल का?
वाघांची संख्या वाढवण्यासाठी काही खास प्रयत्न सुरू आहेत का या माझ्या
प्रश्नाला नकारार्थी उत्तर मिळालं. संशोधन इ.साठीची ही जागा नव्हे; आरक्षित
जंगल असल्यामुळे इथल्या प्राण्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण कसं
मिळेल ते पाहिलं जातं असं आम्हाला सांगितलं गेलं.
जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरण?? मग त्याचदिवशी सकाळी पाहिलेल्या एका दृश्याचा नक्की काय अर्थ लावायचा ते मला कळेना...
त्यादिवशी सकाळी सफारीसाठी म्हणून हॉटेलमधून आम्ही बाहेर पडलो तर समोरच
मोकळ्या जागेत एका हत्तीला बांधून ठेवलेलं दिसलं. बांधून म्हणजे डांबून
किंवा जखडून वगैरे नाही; पाळीव प्राण्यांप्रमाणे, गोठ्यात गाई-म्हशी
बांधतात तसं. तो ‘एलिफंट सफारी’चा हत्ती असावा. निवांतपणे झुलत, सोंड हलवत
उभ्या असलेल्या त्या हत्तीला ठाऊक तरी असेल का हे ‘जास्तीत जास्त नैसर्गिक
वातावरण’ वगैरे प्रकरण? कोणे एके काळी कदाचित तो ही इतरांप्रमाणे त्या
जंगलात स्वच्छंदपणे विहरला असेल, जंगलातल्या छोट्या प्राण्यांवर त्यानं
आपली जरब बसवली असेल पण आता मात्र तो ते सगळं विसरून गेलाय असं वाटत होतं.
देशापरदेशातल्या पर्यटकांना संरक्षित जंगल, तिथे मोकळेढाकळे फिरणारे प्राणी
यांची नवलाई दाखवण्यासाठी त्या हत्तीला आपलं स्वातंत्र्य गहाण टाकावं
लागलं होतं.
----------------------------------
इकडे आमची जीप जंगलाच्या संरक्षित विभागात शिरतच होती इतक्यात एका भल्या
थोरल्या घोरपडीनं (मॉनिटर लिझार्ड) आमचं स्वागत केलं. तमाम पाल-जमातीची
मॉनिटर वाटावी असाच तिचा आकार-उकार होता. डोळ्यांत आणि कॅमेर्यात जरा तिची
प्रतिमा साठवे साठवे पर्यंत बाजूच्या झाडीत ती दिसेनाशीही झाली. जंगल
सफारीतला वेगळेपणा त्याक्षणी माझ्या लक्षात आला. त्यादिवशी आम्ही जे काही
थोडेफार प्राणी पाहीले त्यापेक्षा कैकपटींनी अधिक प्राणी कुठल्याही
प्राणीसंग्रहालयात आपल्याला कधीही पहायला मिळतात. पण तिथे कधी कुठला प्राणी
समोर येणार आहे हे आपल्याला आधीच माहीत असतं. ते ‘सरप्राईज एलिमेंट’ की
काय म्हणतात ना त्याचा तिथे पूर्णपणे अभाव असतो. मला खात्री आहे -
प्राणीसंग्रहालयात घोरपडीच्या पिंजर्यासमोरून जाताना मी आधी तिथल्या
पाटीवरची माहिती वाचली असती आणि मग पिंजर्यात कुठेतरी कोपर्यात मरगळून
बसलेल्या घोरपडीकडे एक ओझरता दृष्टीक्षेप टाकून पुढे मगरी-सुसरी बघायला
धावले असते. पण त्यादिवशी जंगलात ती अशी इतकी अनपेक्षितपणे समोर आली की
तिच्याकडे पाहतानाचे माझे विस्फारलेले डोळे मला अजूनही आठवतायत.
घोरपड इफेक्ट संपायच्या आतच एका मोकळ्या मैदानातून जाताना लांबवर तीन मोर
दिसले. थोडं पुढे गेल्यावर दोन हरणं जीपसमोरून दुडदुडत गेली. पुन्हा ते
तसंच सरप्राईज एलिमेंट, कॅमेरा सरसावण्यासाठी आमची लगबग आणि तितक्यात त्या
प्राण्यांचं गायब होणं...
हळूहळू आम्ही जंगलाच्या आत आत शिरत होतो. तीन तासांच्या सफारीतला तास-दीड
तास उलटून गेला होता; सफारी डोक्यात, मनात भिनत चालली होती आणि आम्ही तिघं,
मी उजवीकडे लक्ष ठेवते-तू डावीकडे नजर ठेव वगैरे मास्टर प्लॅनसकट घोरपड
इफेक्टवर वाघ इफेक्ट कधी मात करतोय याची आतुरतेनं वाट पाहत होतो.
आमचा मास्टर प्लॅन बनून थोडाच वेळ झाला असेल आणि अचानक माझ्या आश्चर्यचकित
चेहर्याकडे माझ्या नवर्याचं आणि मुलाचं एकाच वेळी लक्ष गेलं. त्यांना
वाटलं, झालं! आपल्या सफारीचं सार्थक झालं! हिला वाघ दिसला. आता आपण फक्त ती
बघतीए त्या दिशेला बघायचं की बास! मग पैसा वसूल! अनेकांना न मिळालेला
अनुभव आता आपल्याला मिळणार आहे. कुठला असातसा नाही तर चक्क कॉर्बेट टायगर
रिझर्वमधला वाघ आता आपल्या नजरेच्या टप्प्यात आला आहे...
पण त्यांच्या मन में फुटणारे हे लड्डू माझ्या गावीही नव्हते कारण
रस्त्याच्या कडेच्या पुरूष-दीड पुरूषभर उंचीच्या कढीलिंबाच्या झाडाकडे
पाहण्यात मी गर्क होते! इतकं उंच कढीलिंबाचं झाड मी त्याआधी कधीच पाहीलेलं
नव्हतं. ते छान उंचनिंच झाड, गडद काळपट हिरव्या रंगाची मोठ्ठाली टपोरी
पानं... कढीलिंबाची तेवढी मोठी पानंही मी कधी पाहीलेली नव्हती. शहरी
प्रदूषणापासून दूर अशा त्या जंगलात, नैसर्गिक वातावरणात ते झाड छान तरारून
आलं होतं. नीट बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तशी अनेक झाडं रस्त्याच्या
दोन्ही कडेला होती.
----------------------------------
जंगलातल्या खडबडीत रस्त्यावरून गचके खात जाणारी आमची ‘मारुती
जिप्सी’रूपी बैलगाडी अचानक थांबली आणि कढीपत्ता इफेक्टमधून मी एकदम भानावर
आले. चहापाणी, भजी, पकोडे पुरवणार्या, पुढ्यात आठदहा बाकडी टाकलेल्या एका
खोपटासमोर आम्ही थांबलो होतो. मला थोडं नवलच वाटलं. जेवणं वगैरे उरकून सुरू
झालेल्या भटकंतीत असल्या ‘छोट्याश्या ब्रेक’ची खरं म्हणजे काही आवश्यकता
नव्हती. पण आमचा चालक आणि बरोबरचा फॉरेस्ट ऑफिसर दोघंही उतरल्यामुळे
आम्हालाही उतरणं भाग होतं. जंगलाच्या इतक्या अंतर्भागात पर्यटकांना ताजे,
गरमागरम पदार्थ पुरवणार्यांचं आधी मला कौतुक वाटलं. ‘या लोकांचं आयुष्य
किती खडतर...!’ असंही वाटून गेलं. पण फावल्या वेळात काहीतरी खाणं या
माणसाच्या प्रवृत्तीला अनुसरून तिथे आम्ही जेव्हा तीन कॅडबरी चॉकलेट्स्
विकत घेतली आणि बाहेर दहादहा रुपयांना मिळणार्या त्या चॉकलेट्स्साठी
जेव्हा पंधरापंधरा रुपये मोजावे लागले तेव्हा मात्र त्या स्टॉलचं तिथे असणं
मला खर्या अर्थानं उमगलं!
सफारीच्या इतर पाचसहा गाड्याही तिथे उभ्या होत्या. त्यापैकीच एका गाडीतल्या
दोन पर्यटकांकडे जरा मोठे, अत्याधुनिक, व्यावसायिक छायाचित्रणासाठी वापरले
जाणारे कॅमेरे होते. त्यांनी सांगितलं की त्यांना त्यादिवशी जंगलात तीन
वाघ दिसले. बाकीचे त्यांच्याकडे कौतुकानं, आदरानं, असूयेनं बघायला लागले.
जग जिंकल्याच्या थाटात पांढरा धुरळा उडवत (हो! उत्तरांचलमधे बहुतेक ठिकाणी
पांढरी मातीच बघायला मिळाली.) त्यांची जीप निघून गेली. थोड्याच वेळात
आम्हीही परतीच्या वाटेला लागलो.
----------------------------------
‘त्या लोकांना दिसला म्हणजे आता आपल्याला काही वाघ दिसत नाही’ अशी आमची
आपापसात चर्चा चालू असतानाच आमच्या चालकानं एका ठिकाणी कच्कन ब्रेक मारून
जीप थांबवली आणि जीपच्या उजवीकडे खाली रस्त्यावर अंगुलीनिर्देश केला.
तिथल्या मातीत पावलांचे एक डझनभर ठसे दिसत होते. ते एका वाघिणीचे आणि
तिच्या चार पाच बछड्यांचे होते असं तो म्हणाला. (कंपाऊंडरला कसं डॉक्टरच्या
संगतीत राहून राहून सगळ्या आजार-औषधोपचारांची माहीती होते तसंच सतत
फॉरेस्ट ऑफिसरचं बोलणं ऐकून ऐकून आमच्या जीपचा चालकही त्याच्याइतकाच
ठसे-बिसे ओळखण्यात तरबेज झालेला वाटत होता.) नुसते ठसे दाखवून तो थांबला
नाही तर ती वाघीण नुकतीच तिथून गेली आहे असंही त्यानं आम्हाला सांगितलं.
चला, म्हणजे खरेखुरे वाघवाघीण नाहीत तर त्यांच्या पावलांचे ठसे आमच्या
नशीबात होते तर! काही का असेना, त्या जंगलातल्या जिवंत वाघांच्या
अस्तित्वाचा पुरावा तर आम्हाला मिळाला होता. कुणी सांगावं, त्या ठिकाणी
आम्ही काही मिनिटं आधी पोहोचलो असतो तर कदाचित ती वाघीण आणि तिचे बछडे
आम्हालाही प्रत्यक्ष दिसले असते...
पण खरंच दिसले असते का? आमची गाडी पाहून ते झाडीतून असे भर रस्त्यावर आले असते का?...
वाटेत उलट दिशेनं जाणार्या २-३ जीप्स् आम्हाला दिसल्या. प्रत्येक वेळी
थांबून आमचा चालक त्या चालकांना ‘त्या अमुक अमुकना आज वाघ दिसला म्हणे...’
असं सांगत होता.
एखाद्या नॅशनल पार्कात वाघ दृष्टीस पडणं, न पडणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे
का? त्यानं पर्यटकांना दर्शन देणं, न देणं हा खरंच इतका कळीचा मुद्दा आहे
का? जर ते तसं आहे तर मग आपल्या देशातली वाघांची संख्या इतकी कमी का?
लोकांना त्याचं जर इतकं आकर्षण आहे, कॉर्बेट पार्क म्हटल्यावर शहरी विभागात
राहणार्यांनाही जर आधी त्याचीच आठवण होते तर मग आपल्या देशातली त्याची
अवस्था इतकी केविलवाणी का?
आम्हाला नवी दिल्लीहून कॉर्बेट पार्कपर्यंत घेऊन जाणार्या गाडीच्या
चालकाकडून आम्ही रात्रीच्या वेळी रस्त्यावर अचानक वाघ किंवा चित्ता समोर
आल्याचे, त्यामुळे प्रवाश्यांची भंबेरी उडाल्याचे अनेक किस्से ऐकले होते.
त्याच्या नुसत्या दर्शनानं भंबेरी उडणाराही माणूसच आणि त्याच्या जमातीला
संपूर्ण विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाराही माणूसच...
प्राणीमैत्रीचे टेंभे मिरवणाराही माणूसच आणि हस्तिदंतांची, वाघा-हरणांच्या कातडीची तस्करी करणाराही माणूसच...
प्राण्यांसाठी आरक्षित जंगलं निर्माण करणारा माणूसच, त्याच जंगलांत
खाद्यपदार्थांचे स्टॉल टाकून सफारीसाठी येणार्या पर्यटकांना दामदुपटीच्या
भावात पेप्सी-कोक विकणाराही माणूसच आणि स्टॉलच्या आसपास घुटमळणार्या
माकडांना पिटाळून लावण्यासाठी जवळ गलोल बाळगणाराही माणूसच!!
कुठला खरा? हा की तो? आपण कुठल्या गटात मोडतो? या की त्या? प्रत्येकानं स्वतःला हा प्रश्न विचारून बघा.
कारण, येत्या काही दशकांत कॉर्बेट पार्कमधल्या वाघांची संख्या चौसष्ट होणार
की दोनशेचौसष्ट होणार हे त्या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून असणार आहे...
-----------------------------------------------------------
नुकताच गुरूवार दि. १८ मार्च २०१० च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत हा लेख छापून आला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=553...
छान लिहीले आहे. मी आधीच कल्पना दिली होती की वाघ दिसत नाही.
आम्हालाही घोरपड, कढीपत्ता, हरणे, जंगली हत्ती, मोर, उदमांजरासारखा एक
प्राणी दिसले होते. गंमत म्हणजे आम्हालाही जीपवाल्याने वाघाच्या पावलाचे
ठसे दाखवले, इतकेच काय तर एका झाडावर नखाचे ओरखाडेपण दाखवले. सकाळी सकाळी
रांगोळी काढतात तसे ठश्याचा साचा काढत असावेत. त्या सफारीचे तिकीट
मिळवण्याकरता केलेली धडपड आठवली एकदम. नुसता जंगलाचा फिल घ्यायचा असेल तर
उत्तम आहे कॉर्बेट. आम्ही तिच सफारी हत्तीवरुन पण केली, परत तेच प्राणी
दिसले पण फिल जास्ती भारी होता.
आता वाघांच्या संख्येचा प्रश्न म्हणाल तर मला वाटते त्या मानाने कॉर्बेटमधे खूप वाघ आहेत व वाघ बचावो योजनेमुळेच ते शक्य आहे. नाहीतर एव्हाना नामषेश झाले असते वाघोबा प्रोजेक्ट टायगर आले नसते तर. शिवाय कमी पैशाकरता तस्करी आहेच. याच तस्कर लोकांना (थोड्या पैशाकरता हा पेशा स्विकारलेल्या लोकांकरता) सरकारने पगार देऊन फॉरेस्ट खात्यात नोकरी दिली होती असे ऐकीवात आहे. बांधवगड, कान्हा, रणथंबोर इथे वाघांची संख्या कमी आहे पण पर्यटकांना दिसण्याचे प्रमाण जास्ती. त्याचे कारण म्हणजे कॉर्बेटचा विस्तार होय. एकुण विस्तारापैकी फक्त ५-१० किमीच्या पट्ट्यामधे आपल्याला फिरवतात. तिथे त्यावेळी वाघ येणे म्हणजे खरच नशिब. व्यवसायीक छायाचित्रण करणार्या लोकांना जास्त आकार लावला जातो व जंगलात खोल नेले जाते त्यामुळे त्यांना दिसतो वाघ. रणथंबोरचा विस्तार तसा कमी असावा व मी असे ऐकले आहे की तिथे सकाळी सकाळी १० हत्ती व जीप १० दिशेला जातात व जिथे वाघ दिसतो तिकडे सगळ्यांना नेले जाते. आता प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय कळणार नाही.
आम्ही पण चंद्रपूरला ताडोबाच्या जंगलात वन्य प्राणीदर्शनाला गेलो होतो.
तिकडे एक सरकारी विश्रामगृह आहे तिकडे दोन दिवस आणि एक रात्र राहण्याची सोय
केली होती. जंगलात फिरताना भरपूर ससे, हरणं, सांबरं, एक-दोन हत्ती दिसले.
पण वाघ काही दिसत नव्हता. एका झुडूपात काहीतरी खूसपूस झाल्याचा आवाज झाला
म्हणून जीप थांबवून बारकाईने न्याहाळलं तर ती रानमांजर निघाली.
असंच फिरता फिरता एके ठिकाणी त्या गाईडला वाघाचे ठसे दिसले. त्या
ठश्याच्या खोलीवरून त्याने वाघाच्या वजना मापाचा अंदाज काढला. चार पावलं
पुढे गेल्यावर एका ठिकाणी माती जरा ओली दिसली, इथे वाघाने 'शू' केली आहे
असं सांगितलं. त्याच्या वासावरून तो गाईड पुढे असंही म्हणाला की फार दूर
नाही, वाघ इथेच १५-२० पावलांवर असेल....... हे ऐकून आम्ही सगळ्यांनी
अक्षरशः जीव मूठीत धरून जीपकडे पळ काढला.
त्या दिवशी वाघ समोर आला असता तर जीपमध्ये सुरक्षित असूनही आमची खरोखरची
भंबेरी उडाली असती. त्या गाईडने आम्हाला रात्री मचाणावर येण्याचं आमंत्रण
दिलं. पण कोणीच तयार होईना. तो शेवटी म्हणाला की तुमच्या गेस्ट हाऊससमोर जे
तळं आहे तिकडे रात्री वाघ पाणी प्यायला येतात. ते ऐकून आम्ही त्या दिवशी
रात्री खिडक्या-दारं घट्ट लावून कडेकोट बंदोबस्तात झोपून गेलो. सहा
बेडरूम्स असूनही एका बेडरूममध्ये एका डबलबेडवर ६ बायका आणि ३ छोटी मुलं
झोपलेली, आणि एवढे पुरुषासारखे पुरुष असूनही दुसर्या बेडरूममध्ये एका
डबलबेडवर ४ पुरुष झोपलेले.......
वाघ काही दिसला नाही (ते बरंच झालं म्हणा...
) पण ही आठवण मात्र कायमची लक्षात राहिली.
आम्ही अत्तापर्यन्त रणथम्बोर आणि पेरियार बघितले आहेत, अनुभव साधारण तसाच
आहे. पेरियार मधे आम्ही जन्गलाच्या आतमधे असणार्या hotel मधे राहिलो होतो.
दिवसा कळत नाही पण रात्रि मुख्य दारवाज्याच्या बाहेर २ फूट अन्तरावर सुधा
भिती वाटत होती.
पण भारतीय जन्गलामधे वाघ सिन्ह दिसणे फारच अवघड आहे. कारण आपल्याकडे उन्च झाडे असतात.
African National Parks मधे मात्र हमखास प्राणी बघायला मिळतात कारण तिथे मैलोनमैल गवताळ प्रदेश आहे त्यामुळे सिन्ह, चित्ते
सहज दिसू शकतात.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.