Thursday, August 3, 2023

क्योटो-नारा-ओसाका

 https://www.maayboli.com/node/15899

जपानमधे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा मिळुन एकूण ५-६ दिवस सुट्टी असते, ज्याला GW अर्थात "गोल्डन वीक" म्हणतात. शनिवार रविवारला जोडुन अजुन काही सुट्ट्या काढल्या की सलग ८-१० दिवसही मिळतात, म्हणुन तो "गोल्डन".

गोल्डन वीकला असं फिरण्याचं हे तिसरं वर्ष.
'नेमाने' गोल्डन वीकला फिरायला गेलो, तेही एका ठरलेल्या कंपुबरोबर.
वयाने २४-२७ च्या आसपास... अर्थात सगळे एकाच वेव्हलेंथवर. ....
" लय मज्जा " वगैरे वगैरे...

नेमाने जाणे झालेच, पण त्याहीपेक्षा नेमाने त्या प्रवासाचे यथासांग वर्णन केल्यामुळे भेट दिलेल्या स्थळाप्रमाणे येणारी मजा वेगळी असली जरी, तरी 'तोचतो'पणा टाळावा असा ठराव मांडला.

काय काय करायचं ते ठरवायच्या आधी "हे करायचं नाही" हे अधोरेखित वगैरे करुन बुलेटट्रेन अर्थात शिंकानसेन मधे "हर हर महादेव" म्हटलं.

काय काय करायचं नाही याची यादी: -

  1. आपल्या भाषेचा अभिमान असावा. जरुर, पण म्हणुन तो परप्रांतात जाऊन दाखवु नये. उगाच अगम्य भाषेत घोषणा देउ नयेत. तिथेही तिथला राज ठाकरे असु शकतो. त्यातुन आपलं नशीब सहसा टींबटींब, आणि आपण पांडु असतो, हे नेहेमी लक्षात ठेवायचं.
  2. फिरायला फक्त आपण गेलेलो नाहीये. "इथल्या बहुतांश पोरी इतक्या सुंदर कशा?" , असा प्रश्न मनात आणु नये. बाकीचेही बाहेरुन येऊ शकतात.
  3. दुकानदार पोरगी सुंदर असेल, आणि सगळ्यांना जपानी येत असेल तरीही एका वेळी एकाने बोलावे. तिला दोन कान असले, तरी एका वेळी एकच समजते.
  4. एखादी पोरगी फार सुंदर दिसली तरी लगेच मित्राला सांगु नये. "लगेच नको" म्हटलं तरी तो आपलाच मित्र. तो लगेच बघतो आणि मग आपल्याला ओशाळायला होतं. (कारण सहसा तीही तेव्हाच बघते..)
  5. त्यातुन तीने फार कमी कपडे घातले असले, तरी तेही आपापसात बोलु नये. आपल्या भाषेतसुद्धा. तिला शब्द समजले नाहीत, तरी आपल्याविषयी आहे, हे समजतं.
  6. किमोनो घातलेल्या पोरी दिसल्या की उगाचच त्यांचे फोटो काढु नयेत. विचारुन काढावेत.
    *नाही म्हटल्या तर काढु नयेत.
  7. उगाच फार फोटो काढु नयेत एकाच जागेचे. नंतर बॅटरी संपते, चार्जिंग करायला मिळत नाही.
  8. एशियन लोकांना फोटो काढताना बोटाने "व्ही" चिन्ह करुन दाखवायची सवय असते. त्यावरुन फालतु जोक करु नयेत. फोटो काढताना आपण काय करतो? "हाताची घडी?" / "एका बाजुला कलुन उभे राहतो" का असे?? हे आठवावे, "व्ही"बद्दल प्रश्न पडणार नाही.
  9. मित्र-मित्र फिरायला गेलो असलो तरी गळ्यात गळे घालुन चालु नये. गैरसमज होतात.
    "असं आहे होय? मैत्रिण चालते का? मैत्रिण शोधतो. हॅहॅहॅ..." असा फालतु जोकही मारु नये.
  10. "ऑरकुट फोटो" जास्ती काढु नयेत. म्हणजे "क्योटो टॉवरच्या समोर उभे राहुन, तो हातात असा लोंबकळत पकडला आहे" अशी थिम वापरु नये. जुनी झाली. सगळे वापरतात. जसं "तळहातावर ताजमहाल" वगैरे..
  11. संध्याकाळी ६:००-६:३० नंतर गॉगल घालु नये.
  12. "इथे 'शाकाहारी' जेवण का मिळत नाही?" असा वाद घालु नये. हे पुणे नाही. खास करुन "तुमच्या पिझ्झा बेस मधे अंडे असते का हो?" असे तर चुकुनही विचारु नये.
  13. हॅम म्हणजे डुक्कर. पोर्क म्हणजेही डुक्कर.
  14. काट्या-चमच्याने/चॉप स्टीक्सने खाता येत नसेल, तर खुशाल हाताने खावे, पण "हाताने खाणेच बरोबर कसे", "भारतीय संस्कृती" वगैरे कुठल्या कुठे जाऊ नये.
  15. "तुम्ही भारतीय का? लय भारी!!" असं कोणी म्हटल्यास लगेच हुरळुन जाऊ नये. तो सौजन्याचा एक भाग असतो.
  16. "जपानी मंदिरामधे देवासमोर मदिरा का ठेवलेली असते?" हा प्रश्न विचारु नये.
    असली तर असुदे. तुम्हाला मिळणार नाहीये.
  17. "सामुराई दिसला नाही नाई?", "गेईश्या दिसली नाही नाई" हे जुने जोक मारु नयेत..

ह्या आणि इतरही काही गोष्टींचा "क्योटो-प्रोटोकॉल" बनला.
'क्या पता, कब लौटना पडे देस' म्हणत 'जपानच्या पंढरीला-क्योटो"ला सर्वात आधी.
त्यानंतर जवळच 'नारा' आणि तिथुन थेट 'ओसाका' ला जायचे ठरले. तीन दिवसांची सहल.

पहिला मुक्कामः - क्योटो अर्थात 'क्यो~तो'. 

 

तर त्या "क्योतोकॉल"मधे अजुन थोडीशी(च) भर टाकुन मुळ क्यो~तो विषयाला हात घालुया...

१८) जिथे जाऊ तिथे काहीतरी घेतलेच पाहिजे असे नाही. लॉकेट्स वगैरे लहानपणी घेतली ती पुष्कळ झाली.
१९) आजुबाजुचं थोडंसं निरीक्षण करुन उगाच "फार समजत असल्यागत", "जनरलाईज्ड स्टेटमेंट" बनवु नये.
२०) जाईल तिथे तिकीटे मिळतात. (प्रवेशद्वारापाशी योग्य ती रक्कम दिल्यावर, ) ती घरी येईपर्यंत जपुन ठेवायची
गरज नाही. नंतर टाकणे होत नाही, घरात कचरा होतो. * म्हणुन रस्त्यावर टाकु नये. हा आपला भारत नाही.

.......................असं करत करत ती "काकाकन" यादी सफळ संपुर्ण झाली..................

* * * * * * * 「京都」 * * * * * * *

बर्‍याच जणांना माहिती असेल, की "क्योटो" हा खरं तर आंग्ल उच्चार.

मुळ जपानी भाषेत म्हटलं तर "क्यो~तो". 「京都」
京 : क्यो~ : राजधानी(चे)
都 : तो : शहर

आता जपानची राजधानी तर 'टोक्यो'! मग 'क्यो~तो' चा अर्थ "राजधानी" असा कसा?
* लगे हाथ टोक्योची चित्रलिपीही बघुन घेऊया. 「東京」

बरोबर ओळखलंत. १) टोक्यो हादेखिल आंग्ल उच्चार.. खरं तर ते "तो~क्यो~" आणि
२) टोक्यो आणि क्योटो मधला "क्यो~" हा एकच, ज्याचा अर्थ, "राजधानी" Happy

थोडंसं (अगदी थोडंसंच! ) इतिहासात पाहिलं तर सापडतं, की राज्यकारभार जेव्हा "एदो" भागाकडे गेला, तेव्हा १८६८ मधे, राजधानी "क्यो~तो" हुन "एदो"ला हलवण्यात आली. "एदो" चं नंतर "तो~क्यो~" असं नामकरण झालं. तेव्हाही काही काळ "क्यो~तो" ला "पश्चिम राजधानी" म्हटलं जात असे.
"क्यो~तो" हे जपानच्या *पश्चिम दिशेला येतं...
"तो~क्यो~" मधल्या "तो~" चा अर्थ "पुर्व" असतो, हेही ओघाने सांगणे आलेच.
* अजुनही काही जुन्या लोकांच्या मते, "खरी राजधानी" क्यो~तोच आहे.

"क्यो~तोचं नाव कसं पडलं?? " याबद्दलही थोडी रोचक माहिती मिळाली...
इ.सन ७९४ मधे "हेइआन कालखंडाच्या सुरुवातीपासुन "क्यो~तो" शहर जपानची राजधानी बनलं.
पण नावानं पुर्वी ते "क्यो~तो" नव्हतंच....
जपानी भाषा, जी पुर्वी केवळ बोलीभाषा होती, ती लिहीता येऊ लागली, ती चीनच्या चित्रलिपीची ओळख झाल्यापासुन. त्यामुळे बरीच चित्रलिपीमधली चित्रं चीनी भाषेतुन "जशीच्या तशी" उधार घेतली गेली आहेत. त्यातलंच मुख्य उदाहरण म्हणजे क्यो~तो.

दोन्ही भाषांमधे चित्र एकच, पण उच्चार वेगळा. ( चित्रलिपी : 京都 )
चिनी भाषेत वाचतात, "जिन्गडु"! Happy खरंच.
मधल्या काळात त्याचं नाव "क्यो~(京)", "मियाको(都)", "क्यो~नो मियाको(京の都)" असं होतं.
होता होता, ११व्या शतकात जपानी भाषेत "क्यो~तो" असं त्याचं बारसं झालं, ते शेवटचं...
इतका इतिहास पुरे झाला. आता आम्ही क्यो~तो सर करायला सज्ज झालो होतो.

जपानी भाषा शिकायला लागलो, की १) नवी लिपी, २)अगम्य उच्चार, ३) प्राचिन संस्कृती अशा एक ना अनेक गोष्टींमुळे विद्यार्थी जपानच्या प्रेमात न पडला तरच नवल. आमचंही तसंच झालं होतं.
"ज्या दिवशी जपानला आमची पायधुळ लागेल, तो दिवस सोन्याचा!?!?!? Wink " अशा काहीशा भावना मनात होत्या जपानी शिकण्याच्या काळात. जपानला येणं तर जमलं, पण क्यो~तोचा योग काही येत नव्हता.

गोल्डन वीक असला म्हणुन क्लायंटकडे सुट्टी मिळेल याची खात्री नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत डळमळित वातावरणात शेवटी ग्रीन सिग्नल मिळाला. त्याच दिवशी रात्री लॉजचं बुकिंग केलं.
दुसर्‍या दिवशी बुकिंगला गेलो. "स्वस्त म्हणुन बसने" जायचं होतं...
काऊंटरला जाऊन "आज रात्रीचं तिकीट द्या.." म्हटलं.. "तिकीटं मिळाली..."असती तर आश्चर्य! दिवाळीच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी जाऊन आज रात्रीचं "पुणे-कोल्हापुर रिझर्वेशन द्या" म्हणण्यासारखंच होतं...

टोक्यो पासुन शिंकानसेनने "५१३किमी" इतकं अंतर "२तास १८ मिनीटं" अशा विक्रमी वेळात पार केलं..
शिंकानसेनला *ओजिगी (१२००० जपानी येन/६००० रु.) करुन आम्ही क्यो~तोमधे प्रवेश केला.

जपानी "ओजिगी" बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, "लवुन अभिवादन्/नमस्कार करणे!"
आपल्या "सावधान" अवस्थेमधे कमरेमधे साधारण ४५अंश झुकणे! काही वेळा ७० ते ९०अंश झुकणारे जपानीही नजरेस पडतात. ते जर का आपल्याला पाहुन कधी असे झुकले, तर मात्र आपण खरंच काहीतरी महान काम केलं आहे असं समजायला हरकत नाही. खरंच!

शिंकानसेन अर्थात बुलेटट्रेनमधे न बसलेल्यांसाठी थोडीफार माहिती देणं भाग आहे.

shinkansen_1.jpg
जागेवर बसल्या कॉफी. (३००येन/१५०रु.)

shinkansen_2.jpg
आतला व्ह्यु~. विमानच जणु...

shinkansen_3.jpg
नोझोमी: - लय फाष्ट शिंकानसेन...

क्यो~तो मधे मुख्य आकर्षणं म्हणजे तिथली देवळं!
पॅगोडा पद्धतीची तिथली देवळं मुळ चीनच्या देवळांवर आधारित वाटतात.
तसं पाहिलं तर जपानच्या बर्‍याच गोष्टी ह्या मुलत: चीनच्या संस्कृतीमधुन (परत एकदा) उधार घेतल्या गेल्यात असं आपण म्हणु शकु कदाचित. पण म्हणुन त्याचं महत्त्व कमी होतं असं मात्र मानता येणार नाही. उधार घेणं वेगळं आणि एखादी गोष्ट समजुन घेऊन त्यावर नवा विचार करुन ती आणखी उत्तम कशी बनवता येईल अर्थात त्या गोष्टीचं 'कायझेन' कसं करता येईल यावर भर देणारी जपानी संस्कृती आहे असं म्हणता येईल कदाचित.

क्यो~तो पाहिलेले लोक, सहसा पुढिल दोन प्रकारच्या गटामधे विभागता येतील असं मला वाटतं.

  1. भारत/इतर देशामधुन थेट क्यो~तो ला आलेले
  2. जपानमधे राहिलेले, पण क्यो~तो ला काही काळानंतर गेलेले

असं विभाजन करायचं कारण म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया, ह्या या दोन गटावरुन विभागता येतात.

पहिल्या गटातले लोक म्हणजे साधारण 'केसरी' किंवा अशाच ट्रॅवल कंपनीमधुन येऊन चार दिवसात क्यो~तो पाहुन "माझं क्यो~तो" निबंध लिहीणारे. मला फार हसु येतं अशा लोकांचं... दोन दिवसात कसं ते "माझं" होतं??

.................
त्या सर्वांची मी आज जाहिर माफी मागतो. Sad
.................

खरं तर मी दुसर्‍या गटातला, जो टोक्यो किंवा इतर ठिकाणी राहुन जपानी संस्कृतीची बर्‍यापैकी ओळख झालेला, आणि 'क्यो~तो' या मंदिरांच्या शहरात जाउन "हे काय, इथं सगळी मंदिरंच...." म्हणणार्‍यातला असायला हवा होतो. पण टिपिकल जपानी कंपनीमधलं अति-काम म्हणा किंवा २-३ वर्षं इथे राहुन आलेला आळस म्हणा देवळात वगैरे जाणं बंदच झालं होतं आणि अशाच वेळी क्यो~तो ला जाणं झालं आणि ती मगाचची माफी: - "मीही क्यो~तो च्या प्रेमात पडलो. " जाहिर!!! Happy

"का असं प्रेम वाटावं एखाद्या शहराबद्दल? "
आणि १ मधल्यांचं प्रेम आणि २ मधे असुनही १ प्रमाणे मला क्यो~तो बद्दल वाटलेलं प्रेम यातही फरक आहेच!
मी माझ्यापुरतं, "२ मधे असुनही १ मधल्याप्रमाणे" बद्दल जरुर बोलु शकतो: -
"भाषेतला ओलावा", "अनोळखी व्यक्तीलाही सहज मदत करण्याची वृत्ती", "औपचारिकतेचा अभाव" या माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी क्यो~तो मधे भरभरुन आढळल्या.
उगाच वाद नको म्हणुन भारतातल्या कुठल्याही शहराशी तुलनेचा मोह आवरता घेत, "मोठ्या/औद्योगिक शहराहुनही, त्यापेक्षा थोड्या लहान शहरातली संस्कृती, राहणी जास्ती चांगली असते " असं मला तरी वाटतं आणि तेच आवडतं. क्यो~तो मधे नेमकं हेच दिसलं आणि आवडुन गेलं.

* इथेच तो "दोन-चार दिवसात 'माझं क्यो~तो' कसं होऊ शकतं?" प्रश्नाचं माझ्या मते असलेलं उत्तर आहे: -
संदर्भासाठी, तुलनेसाठी जर आपल्याकडे पुरेशी माहिती असेल, तर जरुर दोन-चार दिवसात ते आपलं होऊ
शकतं. बाकी "नवीन, कधी न पाहिलेलं म्हणुन आवडणं", ते वेगळं...

क्यो~तो मधे पाहाण्यासारखी ठिकाणं बरीच! पण आम्ही मात्र एकुण चारच ठिकाणं पाहिली.
*इथे परत त्या टुरटुर कंपनीवाल्यांची माफी मागतो. Sad
' "टुर"वाल्या कंपन्या कशा पळवतात ' चे किस्से आपण बरेचदा ऐकतो. हसतो.. पण ते का पळवतात हे क्यो~तो सारख्या ठिकाणी आलं की समजतं. आपण एकाच ठिकाणी बागडत बसलो, की बाकीची ठिकाणं कशी होणार?

क्यो~तो मधे फिरताना सर्वात सोयीचा पर्याय म्हणजे "सिटी बस"!
क्यो~तो स्टेशनमधुन बाहेर पडलो, की समोरच हे दिसतं: - [ 市バス 京都 一日乗車券 ]
"तोशी बासु क्यो~तो इचि निची जो~शा केन" (बस मधुन 'क्यो~तो' भर फिरायचा, एक दिवसाचा पास)
तिथेच बाहेर उभारलेल्या कंडक्टरला नमस्कार करुन (५००येन) पास मिळवायचा.

पहिल्यांदा गेलो, ते "कियोमिझु देरा"ला.

0_.jpg
प्रवेशद्वार

कियोमिझुदेरा: - 清水寺
फोड करुन सांगायची झाली तर,
कियो: - 清 : - स्वच्छ. ; मिझु: - 水 : - पाणी; देरा(तेरा): - 寺 : -मंदिर

क्यो~तो राजधानी झाली तेव्हाचं म्हणजे "हेईआन कालखंडामधलं हे देऊळ."
मुळ बांधलं गेलं ७९८ मधे आणि १६३३ च्या तोकुगावा कालखंडामधे जिर्णोद्धार केला गेला.
"देवळाच्या बांधकामात एकही खिळा वापरला गेला नाही" अशी एक आख्यायिका आहे.
* मी खिळा शोधायचा प्रयत्न केला नाही... Happy

1_.jpg
पॅगोडा

2_.jpg
मुख्य मंदिर

3_.jpg
उज्ज्वल भविष्य म्हणा, प्रवास चांगला होईल म्हणुन म्हणा, परि़क्षा पास होईन म्हणुन म्हणा..
अशा प्रकारे गंडेदोरे-ताईत बाधणं जपानमधे उदंड प्रमाणात आहे!
अंधश्रद्धा म्हणा, काही म्हणा दगडाला शेंदुर फासला की लोकं डोकं टेकवतात.
मग "जपानचं देखिल असंच का?" असं तुम्हाला वाटुन गेलं तर मात्र फसलात!
जपानइतका धर्मांध "नसलेला" देश जगात कुठेही नाही...
* माफ करा, जनरलाईज्ड स्टेटमेंट Wink

सद्यस्थिती सांगायची, तर जपानी लोक बौद्ध धर्माचे असले तरी "देवळात जाणं" हे "जन्म", "लग्न" आणि "मृत्यु" या मुख्य 'समारंभावेळीच' होतं... अजुन एक वेळ म्हणजे 'नवीन वर्षारंभ!' हा दिवस चुकवला जात नाही सहसा.
असं नवर्षाच्या निमित्तानं देवदर्शनाला जाण्याला "ओमाईरी"/"जिंज्या माईरी" असं म्हणतात.
जिंज्या म्हणजे देऊळ आणि माईरी म्हणजे जाणे...
बाकी लग्नंही आजकाल ख्रिश्चन पद्धतीनं होत असल्यानं देव सहसा एकटाच असतो...

थोडंसं विषयांतर झालं खरं, पण आता परत क्यो~तोकडे वळुया...
नुकताच "साकुरा" संपुन झाडं नव्या जोमानं, हिरव्या पानानी बहरुन गेलेली.
अशा हिरव्यागार डोंगरावर असलेलं "कियोमिझुदेरा".
"जागतिक सांस्कृतिक वारशामधे" याचा समावेश आहे.

मंदिराचेच दोन फोटो.

4_.jpg
पुढुन.

5_.jpg
पाठिमागुन. इथुन क्यो~तो पाहु शकतो...

"पापक्षालन": -
7_.jpg
* तिथे ओळीत उभ्या असलेल्या एकाने, "त्या पळीला तोंड लावुन पाणी पिताना" पाहुन आम्ही "पापक्षालन फिर कभी..." म्हणुन तिथुन निघालो..

"काय काय करायचं नाही" अर्थात काकाकना यात लिहील्याप्रमाणे "विचारुन" काढलेला फोटो. Happy

क्यो~तोमधे भेटलेल्या पोरी: -
6_.jpg

सकाळपासुन विशेष काहीच खाणं न झाल्यामुळे (शिंकानसेनमधे बसण्याआधी आणि थोड्या वेळाने अजुन एकेक कॉफी + एक फ्रेंच टोस्ट ) १२:३० च्या आसपास भुक लागु लागली.
'कियोमिझुदेरा'दर्शन तर झालं होतं. म्हणुन मग एकेक ड्रिंक घ्यावं म्हटलं.

निसर्गाच्या सान्निध्यात "जपानी भातापासुन बनवलेली नॉन अल्कोहोलिक ओसाके (आलं घालुन) " आणि सोबतीला उलाँग च्या (हा चायनीज आहे. परत उधार )!
ही ओसाके पिताना म्हणजे थेट, "डोंगरावर चढुन गेल्यावर मिळालेला आलं घातलेला चहा"च जणु.
आणि "ऑर्डर घेताना" उगाचच आदर दाखवुन "काय पाहिजे साहेब" वगैरे प्रकार नाही.
"काय घेणार?" असा सवाल. की आपण खुश. Happy टोक्यो मधे मिळेल असं??
मग प्रेमात पडणार नाही तर काय? म्हणुन "माझं क्यो~तो"!!!

"जपानी भातापासुन बनवलेली नॉन अल्कोहोलिक ओसाके (आलं घालुन) " आणि सोबतीला "उलाँग च्या" :
ale_sake_ulong_tea.jpg

मधेच छोट्यामोठ्या बागा होत्याच....
8_.jpg

मंदिराच्या जवळच एक आडवाट होती, जाऊन पाहिलं तरः -
9_.jpg
स्मशान...
स्मशानावरुन मग जपानी भाषा शिकताना पुण्याच्या रानडे इन्स्टिट्युटमधे आम्ही विद्यार्थ्यांनी केलेला "जपानी अंतिमसंस्कार विधी" बद्दल केलेला प्रोजेक्ट आठवला. खरंच... थोडक्यात सांगायचं तर जपानी माणसांचे अंतिमसंस्कार म्हणजे प्रथम हिंदु संस्कृतीप्रमाणे "दहन" आणि मग "उरलेल्या राखेचे पुरणे." हे पुरणेदेखील विशिष्ट पद्धतीचे. जुन्या काळात परिवाराची अशी वेगळी "ओ-हाका" (थडगं) असे. ज्यात परिवारामधला सदस्य आयुष्याच्या शेवटी येत असे... नंतर नंतर आपली स्वतःची "ओ-हाका", ही "लाखात एक" अशा जपान्यांनी लाखो येनच्या "ओ-हाका" बनवुन घेतल्याचं वाचनात आलं होतं...

तिथल्या "ओ-हाका" खरं तर प्रेक्षणिय होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या. पण "स्मशान" ह्या शब्दाची इतकी धास्ती/भिती आहे, की दहाबारा पावलं पुढे गेलेलो लगेचच परत फिरलो...

दोनेक तास "कियोमिझुदेरा" च्या परिसरात होतो. थंड, हिरवं गार वारं. निळं आसमंत.
तिथुन बाहेर पडताना वाटेत दिसलं हे "रंगीत-झाड"!
10_.jpg

"हिरव्या रंगानंच आपल्याला इतकं मोहात पाडलंय, तर ऐन "शरद" ऋतुमधे काय बोला?" मनात विचार आलाच..
परत एकदा त्या देवळातल्या देवाला नमस्कार केला.
हातातल्या नकाशामधे पुढचं ठिकाण दिसत होतं "गीन-काकु-जी"!!!

(क्रमशः)

*** याबाबत आणि एकुणच प्रवास करायच्या आधी थोडीफार भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती मिळवावी
म्हणुन विकीपीडीयावर चक्कर टाकली.

 

आम्ही एकुणात ४ वेळा क्योतो, नारा वारी केली. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सापडलं. तरी बर्फात, साकुरा फुलताना आणि ऑटममध्ये राहिलंच. अमितचे (नवर्‍याचे) क्योतो मोमीजीचे फोटो अप्रतिम आहेत.
तुला विकांताला झब्बू देते.

किनकाकुजी, गिनकाकुजी,सांजुसांगेंदो, अराशीयामा, निजो जो, र्योआनजी, हेईआन जिंगु पाहिलंस का?
प्रत्येक जपानी जिंगु किंवा बागेत पाण्याचा वापर पाहिला, रॉक गार्डन पाहिले की मला आचवलांच किमया आठवतं. पाण्याचा जपान्यांनी जसा वापर केला तसा कोणीच केला नाही असं आचवल म्हणतात. किनकाकुजी पाहिल्यावर, हेईयान पाहिल्यावर शब्दशः पटतं. खरं तर तो परिच्छेदच इथे टाकला पाहिजे.

जाता जाता: सायोनारा सायोनारा गाण्यात ही सर्व ठिकाणं आहेत.

 "कियोमिझुदेरा" तर बघुन झालं, आता हातातल्या नकाशामधे पुढचं ठिकाण दिसत होतं: -
"गीन-काकु-जी"!!!

त्या रंगीत झाडापासुन पुढे चौकात आलो..
बस स्टॉप शोधत, नकाशा पहात असताना अचानक हॉर्नचे आवाज ऐकु आले!!!
"आपल्या मागुन येणार्‍या वाहनाने जर हॉर्न दिला तर आपण काहीतरी चुक केली आहे" हा सर्वसाधारण संकेत असलेल्या तो~क्योमधे राहिल्यानंतर असे पोत्यानं होर्न वाजताना ऐकुन धक्का बसला नसता तर नवल होतं..

सतत असे हॉर्नचे आवाज, नंतर संध्याकाळी घराकडं जाताना "लाल सिग्नल असुनही गाडी दामटत चाललेला ड्रायव्हर", "सिग्नल लाल होताना पाहुन" हातातलं सगळं सामान सांभाळत पळणारी "विद्यार्थी लोकं" पाहुन थेट पुण्याची आठवण आली....
ते पाहिलं आणि एक सेकंद तिथेच थांबलो.
छातीभरुन श्वास घेतला! वाह!
मनात जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असताना असा श्वास घेतला की थेट त्या आठवणीच्या जागी आपण जाऊन पोहोचतो!!!

....................................................................................

सिग्नलचा लाल दिवा हिरवा झाला आणि आम्ही गीनकाकुजी च्या शोधात पुढे निघालो...
बसने १५ मिनीटं प्रवास होता...

बसमधे मुख्यतः परप्रांतियांचाच भरणा होता.
जन्माला येतानाच नाकाला चिकटवुन आणल्यासारखं "गॉगल काढायचा नाही" या तत्वाला सारे चिकटले होते.. काही उन वगैरे नव्हतं खरं तर...
* असो..... ज्याचा त्याचा प्रश्न आहे...

(नियमाप्रमाणे ) गीन-काकु-जी बद्दलही थोडीशी(च) इतिहासगिरी तसंच जपानीगिरी करणं भाग होतं: -
चित्रलिपीप्रमाणे 銀閣寺
銀 गीन : चांदी
閣 काकु : मंडप
寺 जी : मंदिर
अर्थात "चांदीचा मंडप असलेले मंदिर"!

मंदिर बांधलं गेलं ते १४९० साली, अर्थात "मुरोमाची" कालखंडामधे (१३३३ ते १५७३) .
पंधराव्या शतकामधे "आशिकागा योशिमासा" या शोगुन(कमांडर) आणि "मुसो~ सोसेकी" या बौद्ध भिक्षुनी हे मंदिर बांधलं अशी माहिती मिळते.
*पण "मुसो~ सोसेकी"चा मृत्यु आणि मंदिर बांधलं गेलं तो काळ यात थोडी तफावत जाणवली.
* अधिक अभ्यास केला नाही Wink

ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेलं "झेन उद्यान"!

अशी उद्यानं बौद्ध भिक्षुंची शांतिसाधनेची मुळ जागा होती...

0__0.jpg1__.jpg4__.jpg5__.jpg6__.jpg
गीनकाकुजी वरुन दिसणारा क्यो~तो चं दृश्य..

7__.jpg8__.jpg
गीनकाकुजी.

दुपारी तांदळापासुन बनवलेली ओसाके अर्थात आमाझाके जरी प्यायली असली, तरी भुकेचं अकाऊंट अजुन भरलेलं नव्हतं. त्यामुळे गीन-काकु-जी ला जातानाच एका इटालियन रेस्टॉरंटवर नजर पडली होती.
तिथं थोडीशी पोटपुजा वगैरे करुन आजच्या शेवटच्या देवळाकडे जायला निघालो...

गीनकाकुजी पासुन पुढे ४० मिनीटं बसचा प्रवास करुन कीनकाकुजीला जायचं होतं.
अर्थाच सोन्याच्या मंदिरात...
कीन 金 सोन्याचा
काकु 閣 मंडप (असलेले)
जी 寺 मंदिर.
* गीनः - चांदी आणि कीनः - सोनं.

अर्थातच चांदीपेक्षा सोन्याचं मंदिर कसं प्रत्यक्ष कसं दिसेल याचा विचार करत "कीनकाकुजी" चाललो होतो..

चित्रात कितीवेळाजरी पाहिलं तरी "चित्रात आणि प्रत्यक्ष पाहण्यात फरक असतो" हे इथं परत एकदा पटलं...

कीनकाकुजी मंदिर..

9__.jpg10__.jpg11_.jpg

१३९७ला बांधलं गेलेलं हे मंदिरही गीनकाकूजीचा बौद्ध संस्थापक "मुसो~ सोसेकी" आणि शोगुन "आशिकागा योशिमात्सु" यांनी बांधलं.
मात्र या सोन्यावरही डाग लागलाच. १९५० मधे "हायाशी योकेन" या भिक्षुनेच मंदिराला आग लावुन देऊन स्वतः आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. तो वाचला. ७ वर्षांची शिक्षा होऊनही त्यादरम्यान मनावर परिणाम झाल्याने तिथुन सुटका झाली... पण सुटका होताच आजारपणात अंत झाला...
आग लागल्यानंतर झालेलं मंदिराचं नुकसान, १९५५ मधे जिर्णोद्धार करुन भरुन काढण्यात आले.
उन्हात चमकत असलेलं कीनकाकुजी, शिखरावर असलेल्या सोन्याच्या "फिनिक्स पक्षाचं असणं" या गोष्टीमुळं सार्थ आहे हे दाखवत होतं...

इतर मंदिरांमधे गेलं तरी साधारण सारखीच रचना असेल अशा विचारानं, "मुख्य मंदिरं झाली आहेत." त्यामुळे इतर मंदिरात जाणं टाळुन, संध्याकाळ निवांत "क्यो~तो" फिरण्यात घालवावी असा विचार करत तिथुन बाहेर पडलो...

"क्यो~तो" हे जपानच्या पश्चिम भागात येतं, जिथलं "ओकोनोमी याकी" हे व्यंजन प्रचंड प्रसिद्ध आहे.
आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेला पहिला जपानी पदार्थ हा "ओकोनोमी याकी" हा असल्याने खुद्द क्यो~तो मधे
आल्यावर तो न खाणं अशक्य होतं..

ओकोनोमी याकी: - (お好み焼き)

12_.jpg
ओकोनोमी याकी चा तवा. उजवीकडे सगळे मसाले.

13_.jpg14_.jpg

ओकोनोमी: - आवडीचं
याकी: - ग्रील करणे.
* विविध जपानी सॉस, कांदा, भाज्या, आणि भाजलेले नुडल्स(याकी सोबा) हे सारं शिजवुन, त्यावर ऑम्लेटसारखा पातळ पदार्थ घालुन हे सारं ग्रील करतात.
* तो~क्यो मधे सहसा "तयार" ओकोनोमी याकी मिळते. पण क्यो~तो ची खसियत म्हणजे, त्यावरचा सॉस आपण आपल्याला हवा तसा घालु शकतो. गप्पा मारत निवांत खाउ शकतो. दरम्यान पदार्थ गार झाल्यास गरम करण्यासाठी तवा.
* सॉस तिखट, गोड असे दोन प्रकारचे. बरोबर "वाळवलेले शेवाळे" (पौष्टिक म्हणुन...)
* हा पदार्थ शाकाहारी देखिल मिळतो. पण ज्यांना "सगळं चालतं" त्यांच्यासाठी ह्यात ऑक्टोपस आणि अंडं असतं... आम्हाला "सगळं चालतं..." Wink

आवडीचं खाणं तर झालं होतं.
दिवस चांगला गेला होता..
आता उद्या सकाळी उठुन "आराशीयामा", अर्थात "आराशी" नावाच्या डोंगरावर जायचं होतं...
चला, पहिला दिवस असा संपला होता...

................पण ती गोष्ट सांगितल्याशिवाय हा दिवस संपणार नाही... Happy

* * * हॉटेलच्या बुकींगची गोष्ट. * * *

पहिल्या भागात लिहील्याप्रमाणं, शेवटपर्यंत नक्की होत नव्हतं जाणं.
ते नक्की झालं आणि राहण्याचं बुकींग करायला घेतलं.
"हॉस्टेलवर्ल्ड" वेबसाईटवरुन बुकींग केलं. २५०० येन प्रत्येकी. एक रात्र राहणं.

हॉस्टेलवर चेक इन करायला गेलो पण सापडेना.
मग तिथेच दुकानदाराला विचारलं.
त्यानं तत्परतेनं बरोब्बर चुकीचा पत्ता सांगितला.
टॅक्सी करु म्हटलं.
"पण इथुन फारच जवळ आहे" म्हणत टॅक्सीवाल्यानं स्वत:च्या फोननं मालकाला फोन केला.
मालकीण स्वतः आम्हाला घ्यायला आली.
आम्ही हॉस्टेलला पोचल्यावर मालक आला.
आम्हाला न्याहाळत म्हणाला, "अरे! तुम्ही?.... बुकींग तर लेडीज रुममधे झालं आहे तुमचं..."

.............................

आम्ही डोक्याला हात लावुन एकमेकांकडं बघत राहिलो..
मालक आमच्याकडं पाहत जागेवर खिळुन राहिला.....
आमची सारथी, मालकाची बायको हसत आमच्याकडं बघत काहीतरी बोलत होती, पण आम्ही मात्र
"काही जमलं नाही इथं तर आजची रात्र कुठे काढायची?" ह्या विचारात पडलो होतो...
"खरंच, सरळ काही होत नाही आयुष्यात..... लक्षात राहते अशानं ट्रीप... "

मालकानं बरीच काही सेटींग्स लावली...
हॉस्टेलमधे "लेडिज", "जेन्ट्स" आणि "मिक्स्ड" असे तीन विभाग होते...
"मिक्स्ड" रुममधे असलेल्या एका पोरीला "लेडीज" मधे जाण्याची विनंती.
आणि आमच्यातला एक तिच्या जागी मिक्स्ड रुममधे.
दुसरा, जेन्ट्स रुममधे उपलब्ध असलेल्या एकमेव खाटेवर...
"माफ करा, तुम्हाला वेगवेगळ्या खोल्या देतो आहे" म्हणत मालक खोखो हसु लागला.
त्याची बडबडी बायकोही हसली.
एवढी मदत केलेली त्यानं, पर्याय नव्हता... आम्हीही हसलो...

चालुन चालुन इतकं दमल्यावर बिछान्याला पाठ लागताच गाढ झोप लागली...

मनात आराशीयामा!
उद्या आराशीयामाला जायचं होतं... Happy

(क्रमशः)

* इतिहास वगैरे परत विकीपीडीयावरुन साभार...

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...