Thursday, August 3, 2023

देवभूमी उत्तराखंड कॉलिंग

 https://www.maayboli.com/node/25900

नमस्कार लोक्स देवभूमी उत्तरांचलमधील खटिमा, नैनिताल, राणीखेत, अल्मोरा, कौसानी या परीसराची भटकंती करून आलो. त्यातीलच काहि निवडक प्रचिंची चित्रसफर येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. आशा आहे कि हि सफर तुम्हाला नक्कीच आवडेल.  चला तर पहिल्या भागाची सफर खटिमा येथील "नानकमत्ता साहिब" गुरूद्वाराने करूया.

===============================================
===============================================
"उत्तरांचल (उत्तराखण्ड) " उत्तरप्रदेशमधून २००० साली वेगळे झालेले भारतातील २७वे राज्य. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले प्राकृतिक सुंदरता असलेले भारतातील एक राज्य.
हिंदुंचे पवित्रस्थान हरिद्वार, ऋषिकेश, पंचप्रयाग, बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री असलेल्या या राज्याला देवभूमी उत्तरांचल असेहि म्हणतात. हिंदूंच्या पवित्र नद्या गंगा व यमुना यांचे उगमस्थानही येथेच आहे. या शिवाय जिम कॉर्बेट, राजाजी यांसारखी प्रसिद्ध नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर, हर कि दून, हेमकुंड साहिब, नैनिताल, कौसानी, राणीखेत, मसूरी सारखी हिलस्टेशन, अशी ठिकाणेहि या राज्यात आहे. पर्यटनासाठी विविध पर्याय असलेले हे राज्य.

माझ्या भारतभ्रमण यादीमध्ये हि पहिल्या क्रमांकावर असलेले हे राज्य बघण्याची खुपच इच्छा होती. अचानक तसा योग जुळुन आला. आमचा एक मित्र उत्तरांचलचा आहे त्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाचे
आमंत्रण दिले तेंव्हाच माझा आणि इतर २ मित्रांचा उत्तरांचल फिरण्याचा कार्यक्रम पक्का झाला. एप्रिलपासुन नविन सुट्ट्या चालु झाल्याने सुट्टीचा काहि प्रॉब्लेम नव्हता. ४ मे ते १५ मे असा १२ दिवसांची टूर ठरली. मायबोलीकर आणि आंतरजालावरून माहिती गोळा केली. वेळ वाचावा आणि अधिक भटकता यावे म्हणुन मुंबई ते दिल्ली आणि परत असा प्रवास विमानाने करावयाचा ठरला. सगळी तयारी झाली आणि ३ तारखेला रात्री ९:५० च्या गो एअरवेजच्या फ्लाईटने दिल्लीकडे निघालो. साधारण १२ वाजता दिल्लीला पोहचलो. विमानतळावर उतरण्याआधीच "बाहेरील तापमान ३५ डिग्री आहे" अशी अनाऊन्स्मेट झाली आणि दिल्लीच्या गर्मीची चाहूल लागली.  विचार केला रात्री बारा वाजता ३५ डिग्री मग दिवसा काय?????.

दिल्ली ते खटिमा* (अंतर ~३०० किमी) जाण्यासाठी आधीच बूक केलेली स्कॉर्पियो सुमारे अर्धा-पाऊण तास उशिरा आली :(. दिल्लीवरून गाझियाबाद, मुरादाबाद, रामपूर, रुद्रपूर, खटिमा असा ६ तासाचा प्रवास मुरादाबाद येथील बेक्कार ट्रॅफिकमुळे १० तासाचा झाला.  बेक्कार अशासाठी कि कुठली गाडी कुठल्या दिशेने जातेय हेच कळत नव्हत. उभ्या, आडव्या कशाही गाड्या जात येत होत्या आणि त्यात भर म्हणजे हेवी वेट गाड्यांची आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांची. असा जा अत्यंत कंटाळवाणा प्रवास एकदाचा संपला आणि आम्ही खटिमाला मित्राच्या घरी गेलो. मस्तपैकी आंघोळ उरकुन, नाश्ता करून झोपलो. संध्याकाळी त्यांच्या रिवाजाप्रमाणे (कुमाऊ) संगीत, मेहंदी असे लग्नाचे कार्यक्रम होते. रात्री बारा वाजेपर्यंत धम्माल चालु होती. दुसरा दिवस लग्नविधी (बारात, पगफेरे, जयमाला, रीसेप्शन) यात गेला.

(*खटिमा हे उत्तरांचल राज्यातील उधमसिंग नगर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर असुन हिमालयाच्या तेरई प्रदेशात हा भाग येतो. या शहरापासुन जवळच असलेल्या बनबसा गावापासुन नेपाळ (महेन्द्रनगर) अंदाजे ४-५ किमी अंतरावर आहे. भारत-नेपाळे सीमेवर शारदा नदीवर घातलेला बांध आणि तेथुन दिसणारे दृष्य मनोहर आहे. फोटोग्राफिला येथे बंदी आहे. )

प्रचि १

प्रचि २
शादी — लड्डु मोतीचूर का Wink

प्रचि ३

लग्नात पारंपारिक "नथनी" आणि पेहराव घालुन सजलेल्या पहाडी (कुमाँऊ) स्त्रिया. नवरीच्या नाकातही अशीच भलीमोठी नथनी होती. Happy

प्रचि ४

पारंपारीक नृत्य करताना कुमाँऊ लोक. हातात ढाल/तलवार घेऊन नाचणार्‍यांना "छलिया" आणि या नृत्य प्रकाराला "छलिया नृत्य" असे म्हणतात Happy कुमाँऊ लग्न समारंभात हा नृत्यप्रकार पाहिजेच असतो. या नृत्याचा व्हिडियो येथे पहा.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

===============================================
नानकमत्ता साहिब गुरूद्वारा
===============================================

दोन दिवस काहि भटकता आले नाही. तिसर्‍या दिवशी आम्ही खटिमापासुन अंदाजे १५-१७ किमी अंतरावर असलेल्या "नानकमत्ता साहिब" या गुरुद्वार्‍याला भेट देण्याकरीता गेलो. शरयु नदीवर बांध घालुन येथे पाणी अडवलेले आहे. त्यालाच नानकसागर असे नाव दिले. याच बंधार्‍यावरून पुढे साधारण ३-४ किमी अंतरावर नानकमत्ता या गावी "नानकमत्ता साहिब" हा गुरुद्वारा आहे. पूर्वी याचे नाव "गोरखमता" होते. पुढे १६व्या शतकात गुरूनानाक यांनी येथे भेट दिल्यावर याचे नानकमत्ता असे ठेवण्यात आले. संपूर्ण गुरुद्वारा हा संगमरवर दगडांनी बांधला आहे. याच परीसरात एक पुरातन पिंपळाचे झाड आहे.

प्रचि ९

प्रचि १०
शरयू नदी

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४
(पुढिल भागात "नैनिताल" :-))

 खटिमा परिसराचे गुरूद्वारा व्यतिरिक्त काय स्थळविषेश आहेत का ??>>>>>>सचिन, खटिमा हे उधमसिंग नगर (रूद्रपूर) जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण आहे. येथुन नेपाळ (महेन्द्रनगर) ~३०किमी अंतरावर आहे. बिझनेस हब म्हणुनही हे ठिकाण सध्या ओळखले जाऊ लागले आहे. ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेले "पूर्णागिरी", खोल गुहेतील प्राचीन "पाताळ भुवनेश्वर", कुमाँऊची जुनी राजधानी चंपावत, टनकपूर, लोहाघाट, पिथौरागढ (हिल स्टेशन) इ. ठिकाण खटिमापासुन जवळ आहेत. नैनिताल येथुन ११३ किमी अंतरावर तर प्रसिद्ध जिम कॉर्बेट पार्क १५८ किमी अंतरावर आहे.

 नैनिताल – उत्तरांचल राज्यातील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. चारही बाजुंनी उंचच उंच डोंगर आणि घनदाट झाडीने वेढलेले एक नितांत सुंदर ठिकाण. या त्याच्या सौंदर्यात भर घालतात ते नितळ पाण्याचे सरोवरे अर्थात "ताल" आणि म्हणुनच या ठिकाणाला "सरोवर नगरी" असेही म्हणतात. यातील प्रत्येक सरोवराची एक कहाणी आहे. पाचूच्या हिरव्या कोंदणात वसलेले हि सरोवरे म्हणजे नैनितालचा दागिनाच. उगीचच नाही स्थानिक लोक म्हणतात कि, "तालों में ताल नैनीताल बाकी सब तलैया".

खरंतर निसर्ग आपल्याला दोन प्रकारे भेटतो एक म्हणजे स्वत:च्या उन्मुक्त आणि खर्‍या अवस्थेत आणि दुसरे म्हणजे साचेबद्ध, आखीव रेखीव सौंदर्यखुणाच्या स्वरूपात. नैनितालला आपल्याला भेटणारा निसर्ग हा पहिल्या प्रकारातला. जरी आज येथे पर्यटकांची गर्दी असली तरी इथला निसर्ग आपल्याला उन्मुक्तपणेच भेटतो. निसर्गाचा समतोल आज जरी आपल्या कर्मामुळे बिघडत चालला तरी तो स्वत: मात्र बेईमान होत नाही. नैनितालचा निसर्गही त्याला अपवाद नाही. इथे तुम्ही "मानव" म्हणुन आलात म्हणून तो देताना कुठेही डावं उजवं करत नाही. इथुन दूरचे डोंगरही साजिरे दिसतात आणि जवळचेही. Happy

उत्तरांचल भटकंतीत मला अतिशय आवडलेले हे ठिकाण. योगायोग असा कि, माझी पहिली मोठी भटकंती (३ महिने) हि "फिनलंड"ची आणि त्यानंतर "उत्तरांचल"ची (१२ दिवस) आणि यातील पहिले ठिकाण म्हणजे "फिनलंड" "सरोवरांचा प्रदेश" (लाखाहुन जास्त सरोवरे असल्याने) आणि नैनिताल "सरोवरांची नगरी" म्हणुन ओळखले जाते. दोन्ही भटकंतीत मला सरोवरांच्या सान्निध्यात मनसोक्त राहता/भटकता आले. अर्थात दोन्ही ठिकाणी मनाला लाभणारे समाधान हे एकच होते. नैनितालच्या सरोवराकाठी फिरताना कित्येकदा मला फिनलंडलाच फिरल्याचा भास होत होता.

या नैनितालची पौराणिक कथा अशी कि, दक्ष राजाने योजलेल्या यज्ञात त्याने पार्वती आणि तिचा पती शंकराला आमंत्रण दिले नाही. पार्वती हटकुन यज्ञ समारंभात गेली असता दक्ष राजाने केलेला आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन तीने यज्ञकुंडात उडी घेतली. जेंव्हा भगवान शंकराला समजले कि पार्वती सती झाली तेंव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी क्रोधीत होऊन सतीचे जळते शरीर घेऊन आकाशभ्रमणास सुरुवात केली. यावेळेस सतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठे निर्माण झाली. जिथे सतीचे डोळे (नयन) पडले तेथे नैनादेवी (नंदा देवी) चे स्थान निर्माण झाले. सतीच्या डोळ्यांतील वाहणार्‍या अश्रुं येथे सरोवरात रूपांतरीत झाले. नैनादेवीचे अश्रु म्हणजे नैनीताल. या तलावाचा आकारही डोळ्याच असल्याचे स्थानिक लोक सांगतात.

चला तर मग याच "सरोवर नगरी"ला आज भेट देऊया.
===============================================
===============================================
नानकमत्ता साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यावर आम्ही किच्छा-हलद्वानी मार्गे नैनितालला निघालो. खटिमा ते नैनिताल अंतर साधारण ११३ किमी आहे. मुंबई-पुण्याहुन यायचे झाले तर दिल्लीला यावे आणि तेथुन दिल्ली-काठगोदाम रेल्वेने "काठगोदाम" या नैनितालच्या पायथ्याशी वसलेल्या गावी यावे. काठगोदाम किंवा हलद्वानी येथुन नैनितालला जाण्याकरीता उत्तराखंड परिवहना किंवा K.M.O.Uच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत. तसं दिल्ल्लीहुन (वसंत विहार बस स्थानक) थेट नैनितालला किंवा हलद्वानीला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत, पण हा प्रवास थोडा त्रासदायक वाटतो. (दिल्ली ते नैनिताल रोडवेज अंतर साधारण ३१७ किमी आहे).

दिल्लीहुन काठगोदामला जाणार्‍या रेल्वे.
१. दिल्लीहुन (आनंदविहार टर्मिनस ते काठगोदाम) "ANVT KGM AC एक्स्प्रेस" हि गाडी (गाडी नंबर 14012) सकाळी सहा वाजता निघते आणि काठगोदामला १२ वाजेपर्यंत पोहचते.

२. "उत्तरांचल संपर्क एक्स्प्रेस (15035)" हि गाडी संध्याकाळी ४ वाजता निघते आणि रात्री १०:४० पर्यंत काठगोदामला पोहचते.

३. "राणीखेत एक्स्प्रेस (15013)" हि गाडी रात्री दहा वाजता दिल्लीहुन निघते आणि सकाळी ५:२० पर्यंत काठगोदामला पोहचते.
(वरील माहिती IRCTC वरून साभार)

आम्ही मात्र रोडवेजने हलद्वानीला पोहचलो आणि तेथुन नैनितालला जाणारी बस पकडली. हलद्वानी/काठगोदाम हि नैनितालच्या पायथ्याची गावे, पण जराही थंडपणा जाणवला नाही. :-)शरीरातुन घामाच्या धारा वाहत होत्या. नैनितालला रोडवेजने दोन मार्गे जाता येते एक म्हणजे "जोईलकोट" आणि दुसरा म्हणजे "भवाली" मार्गे. यातील पहिला मार्ग जवळचा आहे. आमची बस त्याच मार्गे चालली. हलद्वानी ते नैनिताल हे अंतर अंदाजे ३५-४० किमी आहे. साधारण विसएक किमी गाडी गेल्यावर मात्र थंड हवेने नैनिताल जवळ येत असल्याचे सुचवले. तास-दिडतासात
आम्ही नैनितालला पोहचलो. खरं तर खटिमाला भरपूर गरम होत असल्याने आम्ही जॅकेट, गरम कपडे (खास नैनितालसाठी घेतलेले) घरीच ठेवले. विचार केला उन्हाळा असल्याने नैनितालला जास्त काही थंडी नसणार. .....आणि हाच आमचा विचार किती चुकीचा होता हे बसमधुन उतरल्याक्षणीच जाणवले. Happy आम्ही सहाहीजण थंडीने अक्षरश: कुडकुडत होतो. विश्वास बसत नव्हता कि मे
महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात, भर दुपारी तीन-साडेतीनच्या वेळेत, इतक्या थंडीत आम्ही कुडकुडत आहोत. Happy गाडीतुन उतरल्यावर लगेचच आम्ही चहाच्या दुकानात गेलो, तिथेच आम्हाला
खाण्याचा स्थानिक प्रकार "मोमो" दिसला. Happy मग काय गरमागरम चहा आणि मोमोजमुळे थोडीफार थंडी पळाली.:-) "मे महिन्यातील कडाक्याच्या थंडीने" शुद्धीवर येताच समोरच नितळ
पाण्याचा"तल्ली ताल" दिसला. माझी नैनि"ताल"ची ती पहिली भेट आणि पाहताक्षणी या ठिकाणाच्या प्रेमात मी पडलो. :-). इतक्यात पावसाचे ढग जमु लागले आणि टपोरे थेंब पडु लागले. आमची
अवस्था मात्र, "अरे काय चाल्लंय काय??, ऐन मे महिन्यात कडक थंडी काय नि आत्ता हा पाऊस" नक्की कुठल्या दुनियेत आहोत??" अशी झाली होती. पावसाच्या त्या हलक्यासरींनी वातावरणातील गारठा अजुन वाढला, मात्र वातावरण नितळ झाले होते.

आमच्या एका मित्राची ओळख असल्याने आम्ही "युथ हॉस्टेल" मध्ये दोन रूम बूक केल्या होत्या. तल्लीतालपासुन युथ हॉस्टेल साधारण २ किमी असल्याने आम्हाला न्यायला दोन कार येणार होत्या. त्याची वाट पहात आम्ही तेथेच थांबलो. तिथे सगळे जॅकेट, शॉल, स्वेटर आणि गरम कपडे घालुन फिरत होते आणि आम्ही सहाजण टिशर्ट आणि शॉर्ट्सवर (थंडीने कुडकुडत :-)). थोड्यावेळात
गाड्या आल्या आणि आम्ही युथ हॉस्टेलकडे निघालो. नैनितालच्या गर्दीपासुन थोडे लांब आणि निवांत ठिकाणी असलेले हे हॉस्टेल खरंच खुप छान, स्वच्छ आणि स्वस्त होते. Happy येथे आम्हाला तीन बेडच्या दोन रूम्स ६०० रूपयात मिळाल्या. येथे प्रकर्षाने जाणवले असे कि कुठल्याही रूममध्ये पंखे नाही किंबहुना सिलिंगला पंखे अडकवण्याचे हूकही नाही. Happy अर्थात त्याची गरजच नाही,
नॅचरल एसी चालु होता ना Wink हा एसी थोडा वाढवायचा असेल तर रूमची एक खिडकी उघडा. फुल्लऑन एसी सुरू. :-). रूम खरोखर स्वच्छ आणि सुंदर होत्या. तेथेच खाली कँटिनमध्ये जेवणाची
सोयही आहे. फ्रेश होऊन संध्याकाळी मार्केटमध्ये फिरायला गेलो. यावेळी मात्र २ किमी पायीच जायचे ठरवले. खरंतर येथे पायी पायी भटकणेहि एक वेगळाच आनंद देऊन जातो. मस्त भटकुन,
गरमागरम चनाचाट, पकोडी खाऊन रात्री दहाच्या सुमारास परत रूमवर आलो. जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती, जेवून मस्तपैकी गप्पा मारत सगळे झोपेच्या स्वाधीन झालो.

दुसर्‍या दिवशी फिरण्यासाठी आम्ही दोन गाड्या बूक केल्या होत्या (रूपये १५००/- प्रत्येकी, यात नैनितालचे सगळे पॉईंट, भीमताल, नौकुचियाताल, भवाली, हनुमानगढी आणि शेवटी राणीखेतला
सोडणार होते शिवाय प्रत्येक गाडीत एक गाईडही होता). या सीझनमध्ये येथे भटकंती करण्याचा फायदा असा कि येथे दिवस लवकर उजाडतो (सकाली ५ वाजताच सूर्यदेव ड्युटीवर हजर :-)),
साधारण सहा वाजता ऊन पडते. दिवस मोठा असल्याने भटकंतीला भरपूर वेळ मिळतो. Happy आम्हीही नाश्ता करून (आलु पराठा आणि दही रायता) करून नैनिताल भटकंतीला निघालो.

चला, मी आता खुप बोललो आता पुढे जे काहि बोलतील ते माझे फोटोच. Happy

===============================================
===============================================

तल्ली ताल
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३
तल्लीतालहुन दिसणारे नंदादेवीचे मंदिर
प्रचि ४
युथ हॉस्टेल
प्रचि ५
नैनितालची एक रम्य संध्याकाळ
प्रचि ६

प्रचि ७
एक प्रसन्न सकाळ
प्रचि ८
सकाळचा नाश्ता
(आलु पराठा आणि दही रायता. रायत्यामध्ये मोहरी वाटुन टाकली होती. हा रायता इकडचा स्थानिक प्रकार होता. चव मात्र एकदम फंडू :-))
प्रचि ९
नैनिताल
प्रचि १०
रोप वे
प्रचि ११
आंब्याच्या आकाराचा नैनी लेक
प्रचि १२
रोपवे मधुन दिसणारे नैनी लेक
प्रचि १३

प्रचि १४
नैनी लेक
प्रचि १५

प्रचि १६
नैनीलेकमध्ये नैकाविहार
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
नैनादेवीचे मंदिर
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
नैनी/चायना पीकवरून दिसणारे दृष्य.
वातावरण नीटसे नसल्याने फोटो क्लियर नाही आलेत.
प्रचि २६
सुकलेली नदी Sad
प्रचि २७

प्रचि २८

===============================================
खूर्पा ताल.
नैनितालहुन जीम कॉर्बेट पार्कला जाताना वाटेत (नैनितालहुन ६ किमी अंतरावर) खूर्पा ताल आणि सरीता ताल आहे. जास्त खोल असल्याने खूर्पातालमध्ये बोटिंग होत नाही अशी माहिती गाईडने दिली.
===============================================
प्रचि २९
सरीता ताल
प्रचि ३०
नैनितालहुन जीम कॉर्बेट पार्कला जाणारा रस्ता
प्रचि ३१
वाटेवरची दाट झाडी
प्रचि ३२
फळांची टोकरी (मलबेरी, स्ट्रॉबेरी, स्थानिक फळ - काफल)
आपल्या इथे जसे उन्हाळ्यात डोंगरची काळी मैना विकायला येतात तसेच इथे हे स्थानिक फळ "काफल" विकायला येतात. आंबटगोड चवीची हि फळे मस्तच लागतात. Happy
प्रचि ३३
रासबेरी
प्रचि ३४
नैनितालमधील फुले
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
नैनितालमधील वास्तु
क्रिकेट अ‍ॅकेडमी बिल्डिंग
प्रचि ३९

मस्जिद
प्रचि ४०

चर्च
प्रचि ४१
उत्तराखंड परिवहन बस
प्रचि ४२
(नैनितालचे सगळे फोटो एकाच भागात देण्याऐवजी दोन भागात प्रदर्शित करत आहे, तेंव्हा पुढिल भागात: भीमताल, नौकुचियाताल, सातताल आणि हनुमानगढी :-))

 भीमताल
नैनितालची भटकंती करून आम्ही निघालो ते भीमताल या कुमाँऊ प्रदेशातील सर्वात मोठ्या तलावाकडे. नैनितालहुन साधारण २२ किमी अंतरावर भीमताल आहे. जसे आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे हलद्वानीहुन एक रस्ता भवालीमार्गे नैनितालला जातो त्याच रस्त्यावर भीमताल आहे. येथुन हलद्वानी साधारण ४०-४५ मिनिटावर आहे. समुद्रतळापासुन १३७०मी उंचीवर हे तळं आहे. काहि लोकं म्हणतात कि वनवासाच्या दरम्यान भीम येथे थांबला होता आणि त्यानेच आपल्या गदेच्या प्रहाराने या तलावाची उत्पत्ती केली. तर काहिंच म्हणणे "भीमकाय" आकार असल्याने या तलावाचे नाव "भीमताल" पडले आहे. :-). येथुनच "गोला" नदीचा उगम होतो जी पुढे काठगोदामला "रामगंगा" नदीला जाऊन मिळते. येथे एक छोटेसे धरणही बांधले आहे जे जवळपासच्या गावच्या शेतीसाठी उपयुक्त ठरले आहे. मुंबई-पुण्यात शोधत असलेलो "नीलमोहर" (जॅकरांदा) येथे मात्र डोळेभरून पाहता आला. भीमतालात पडलेली जॅकरांदाची फुले मन मोहुन घेत होती. भीमताल, नौकुचियाताल, सातताल आणि हनुमानगढीची सफर करताना आभाळ भरून आले होते आणि शेवटी पावसाने आम्हाला गाठलेच. त्यामुळे मनासारखे फोटो काढता आले नाही. Sad

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

===============================================
===============================================
सात ताल
नैनितालहुन सात ताल २२ किमी अंतरावर आहे तर भीमतालपासुन अवघ्या ४ किमी अंतरावर. हा तलाव सात "ताल" मिळुन बनलेला असल्याने याचे नाव "सात ताल". येथे भरपूर हॉटेल्स आहेत आणि तलावाच्या किनारी बसुन थंड हवेत तुम्ही आरामात जेवण करू शकतात. आम्हीही येथेच आमचे दुपारचे जेवण उरकले. Happy येथे निवांत बसण्यासाठी पायर्‍या आणि फिरण्यासाठी एक छोटासा पूलही आहे. बरेच पर्यटक येथे कुमॉऊ पद्धतीचे पेहराव घालुन फोटो काढत होते. (रच्याकने तो "कुमाँऊ" पेहराव, "काश्मिरी" जास्त वाटतं होता. ;-).

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

===============================================
===============================================
नौकुचियाताल
नैनितालपासुन साधारण २८ किमी अंतरावर असलेले एक सुंदर ठिकाण.नऊ किनारे असलेला तलाव म्हणुन नौकुचियाताल आणि याचे नऊ किनारे म्हणजे नवग्रहांचे वास्तव्य. असं म्हणतात कि ज्या कुणाला या तलावाचे नऊ किनारे दिसेल त्याला मोक्षप्राप्ती होते. शोधुन काढुन मला ६ कोने दिसले, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी अजुन ३ कोने दूरच. Happy नैनितालच्या गर्दीपासुन दूर निवांत अशी हि जागा. नैनीलेकमध्ये असलेली गर्दी टाळुन आम्ही येथेच नौकाविहाराचा आनंद घेतला.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

===============================================
===============================================
हनुमानगढी
नौकुचियाताल आणि भीमतालच्या वाटेवर असलेले हे हनुमानची भव्य मूर्ती असलेले ठिकाण. येथे वैष्णोदेवीच्या मंदिराची सुंदर प्रतिकृती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येतया आभाल Happy

===============================================
===============================================
अशा तर्‍हेने आमची नैनिताल भटकंती पूर्ण झाली. या नैनितालच्या भटकंतीसोबतच सुट्टी नसल्याकारणाने आमच्या दोन मित्रांनी (अमित & प्रीत) यांनी पुढिल भटकंतीपासुन रजा घेतली व मुंबईला परतले. उरलेलो आम्ही चौघे (मी, मेहर, प्रशांत आणि किशोर) राणीखेतच्या दिशेने निघालो.

तळटीप: नैनिताल हि सरोवर नगरी असल्याने वेगवेगळ्या तलावाचे फोटो पाहुन कदाचित तोचतोचपणा (रीपीटेशन) वाटेल, पण प्रत्येक तलावाची कहाणी आणि सौंदर्य वेगवेगळे असल्याने इथे ते फोटो प्रदर्शित करत आहे.

(पुढिल भागात : राणीखेत :-))

 रानीखेत — सन १८६९ मध्ये ब्रिटिशांनी रानीखेत हे थंड हवेचे ठिकाण शोधून काढले आणी कुमाऊं रेजिमेंटची अन् तिच्या प्रशिक्षणाची स्थापना केली. रानीखेतचा इतिहास असा कि राजा शुप्रदेव हा पत्नीसहित शिकारीसाठी या परिसरात आला. त्यांची पत्नी राणी पद्मिनी यांना हा परिसर इतका आवडला कि हे सारं क्षेत्र राणीसरकारांचे क्षेत्र म्हणुन ओळखल जाऊ लागलं आणि म्हणुनच या स्थानाच नाव "रानीखेत" असं झालं. रानीखेत हे प्रसिद्ध हिलस्टेशन जरी असले तरी यातील बराचसा भाग हा लष्कराच्या ताब्यात असल्याने नैनितालसारखी पर्यटकांची वर्दळ येथे कमीच असते (लष्कराच्या ताब्यात असल्याने यातील बर्‍याचशा भागात फोटोग्राफी करण्यास प्रतिबंध आहे). पण इथला निसर्ग मात्र नैनितालच्या तोडीचाच आहे. इथे कुठेही फिरलात तरी तुमच्या सोबत असते ती वृक्षांची घनदाट छाया, थंडगार वारा आणि क्वचित प्रसंगी वन्यप्राणीही. Happy
===============================================
===============================================
नैनितालचा भटकंती करून आम्ही रानीखेतच्या दिशेने निघालो. नैनिताल ते रानीखेत (भवाली मार्गे) साधारण ६०-६५ किमी अंतरावर आहे. रस्ता थोडा खराब असल्याने काहि वेळा हा प्रवास कंटाळवाणा होतो. उन्हाळा असल्याने उघडे डोंगर आणि आटलेल्या नद्या असेच चित्र होते, पण त्यातही एक वेगळेच सौंदर्य जाणवत होते. एका बाजुला उंचच उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजुला खोल दरी असा प्रवास चालु होता. बर्‍याच ठिकाणी रस्ता खचलेला दिसत होता. खरंतर पावसाळ्यानंतर येथील निसर्गसौंदर्य वर्णनातीत असले पाहिजे. नैनिताल ते रानीखेत प्रवासादरम्यान एक दोन डोंगराच्या मध्ये वसलेले "कैची धाम" हे सुंदर मंदिर दिसले. दोन्ही डोंगराच्या कैचीमध्ये असलेले हे "कैचीधाम". पावसाळ्यात जेंव्हा येथील नद्या दुथडी भरून वाहत असतील तेंव्हा हि जागा खरंच खुप सुंदर दिसत असेल. आम्ही गाडीतुनच या मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. राणीखेतच्या आधी साधारण ७-८ किमी पासुनच आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्ष दिसु लागले आणि वातावरणात एक गारवा जाणवायला लागला. आम्ही संध्याकाळच्या सुमारास रानीखेतला पोहचलो. एक-दोन हॉटेलमध्ये चौकशी केली पण रूम आणि रेट काही पटले नाही. शेवटी हॉटेल "राजदीप" मधे ४ बेड्सचा मस्त रूम फक्त ५०० रूपयांत मिळाला. Happy (एक नमूद करू इच्छितो कि, येथे हॉटेल आणि टॅक्सीवाले अव्वाच्या सव्वा भाव सांगतात. इथे तुम्हाला घासाघीस करावी लागते. आमच्या सोबत असलेला मित्र मेहर हा उत्तरांचलचाच असल्याने तो कुमाऊं भाषेतच त्यांच्याशी बोलत होता. राजदीपमध्ये आम्हाला दुसर्‍या दिवशी १२ वाजेपर्यंतचे भाडे १२०० रूपये सांगितले. पण शेवटी ५०० रूपयांत फायनल झाले. सोबत उत्तरांचलचा मित्र असल्याचा फायदा झाला ;-). इथे चेकआउट टायमिंग दुसर्‍या दिवशी बारा वाजता फिक्स असतो. तुम्ही रात्री दहाला जरी गेलात तरी दुसर्‍या दिवशी १२ ला चेकआउट करावे लागते.) रात्री मस्तपैकी फ्रेश होऊन बाहेर फिरायला गेलो. संध्याकाळी ८ च्या दरम्यान रानीखेतला सगळीकडे सामसूम :-). रूमवर परत आलो आणि खाली हॉटेलमध्येच रात्रीचे जेवण घेतले.
दुसर्‍या दिवशी आरामात उठलो. राजदीप हॉटेलच्या टेरेसवरून हिमालय (त्रिशूल, नंदादेवी शिखर) दिसतं असं हॉटेल मॅनेजरने सांगितल्यावर पटकन टेरेसवर गेलो, पण वातावरण धूसर असल्याने हिमशिखरांची व्यवस्थित दर्शन झाले नाही. Sad
तयारी झाल्यावर रानीखेत फिरण्यास निघालो. फिरण्यासाठी प्रायव्हेट गाडीची विचारणा केली असता त्याने रानीखेतचे ६ पॉईंट (चौबतिया गार्डन, झूलादेवी मंदिर, हैडाखान मंदिर, गोल्फ मैदान, कालिका माता आणि वूलन फॅक्टरी*) दाखवून कौसानीला सोडण्याचे २१०० रूपये सांगितले. घासाघीस केल्यानंतर शेवटी तो १४०० वर तयार झाला Happy आणि आम्ही रानीखेत फिरण्यास निघालो.

(*वूलन फॅक्टरीमध्ये तयार होणारा माल हा सैनिकांच्या विधवा तयार करता. यात शॉल, स्टोल, वूलन कोट तयार केले जातात आणि वाजवी किंमतीमध्ये तो पर्यटकांच्या खरेदीसाठी उपलब्ध केला जातो. वूलन फॅक्टरी प्रत्येक मंगळवारी बंद असते, पण खरेदी विक्री चालु असते. येथे फोटोग्राफिला बंदी आहे.)
===============================================
===============================================
एक सुकलेली नदी
प्रचि १
आकाशाशी स्पर्धा करणारे घनदाट वृक्ष
प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७
या झाडांची फुले Happy
प्रचि ८

प्रचि ८

===============================================
===============================================
झुलादेवी मंदिर
चौबतिया गार्डनला जाणार्‍या रस्त्यावरचे एक "झुलादेवीचे" घरवजा देऊळ लागते. नवस केला म्हणुन आणि नवस पूर्ण झाल्यावर देवीचे भक्तजन येथे घंटा आणुन बांधतात. भक्तांनी मनोभावे अर्पण केलेल्या घंटाची संख्या १०-१२ हजारांवर असेल. रानीखेत भटकंतीमध्ये झुलादेवीचे दर्शन अवश्य घ्यावे.
प्रचि ९
झुलादेवीची पौराणिक कथा
प्रचि १०

प्रचि ११
झुलादेवीची प्रसन्न मूर्ती
प्रचि १२

===============================================
===============================================
चौबतिया गार्डन
चौबतिया गार्डनला जाणारा रस्ता मनमोहक आहे आणि दाट वृक्षांच्या सान्निध्यातला आहे. या रस्त्यावर "हा रस्ता वन्यप्राण्यांचा आहे, त्यांना प्रथम जाऊ द्या" अशा आशयाचे फलक दिसत होते. येथेच लष्काराचे एक केंद्र देखील दिसले. चौबतिया गार्डन हे सध्या "फळ संशोधन केंद्र" म्हणुन विकसित करण्यात आले आहे. येथे फिरताना गाईड अवश्य घ्यावा (गाईड फि रूपये १००/-) नाहीतर आपल्याला क्त सफरचंदाचीच झाडे ओळखता येतील. Happy या बागेत सफरचंद, जर्दाळु, अक्रोड, बदाम, सिल्व्हर ओक, सप्तपर्णी, क्रिकेटची बॅट ज्या झाडापासुन बनते ते झाड, उत्तरांचलचा राज्यवृक्ष "बुरांश" (याच्या फुलांच्या रसाचा उपयोग हृदयाचा विविध विकारावर केला जातो) अश्वगंधा, बचनाग, अशी विविध झाडे होती. या बागेत फिरताना निसर्गाच्या गप्पांवरील मायबोकीकरांची प्रकर्षाने आठवण झाली. Happy

प्रचि १३

चौबतियाचे घनदाट जंगल
प्रचि १४
राज्यवृक्ष बुरांशचे फुल
प्रचि १५
कोवळे सफरचंद
प्रचि १६

प्रचि १७
कोवळे अक्रोड
प्रचि १८

प्रचि १९
बदाम
(आपल्याकडच्या बदामाचे झाड वेगळे, मोठी पाने असलेली असतात. जाणकारांनी कृपया अधिक माहिती द्यावी. :-))
प्रचि २०
जर्दाळू
प्रचि २१

आपल्याकडे ज्याला "ब्रह्मकमळ" म्हणतात त्या फड्या निवडुंगाचे लाल रंगाचे फुल
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सप्तपर्णीची फुले
प्रचि २५

प्रचि २६

===============================================
===============================================
हैडा खान मंदिर
जलाली मासी रस्त्यावरंच बाबा हैडा खानंच हे मंदिर स्थानिक लोकात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण राणीखेतपासुन ५ किमी अंतरावर आहे.

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

===============================================
===============================================
गोल्फ मैदान
जगातलं सर्वात उंचावरील हे गोल्फचं मैदान. गाडी मुख्यरस्त्याला लावूनच या मैदानावर पायी यावे लागते. एका बाजुला उंचच उंच पहाडांचा खिळवून ठेवणारा देखावा आणि दुसर्‍या बाजुला नाईन होल्स असलेले हे भन्नाट गोल्फ मैदान. पावसाळ्यात जेंव्हा सर्वत्र हिरवळ असेल तेंव्हा याचे सौंदर्य अजुनही खुलत असणार. याच रस्त्याच्या पुढे कालिका माता मंदिर आहे (जिथे फोटोग्राफिला पूर्ण बंदी आहे. तेथे "फोटो काढुन देवीचा अपमान करू नका" असा थेट भावनेलाच हात घालणारा फलक आहे. Happy

प्रचि ३३

===============================================
===============================================
प्रचि ३४

रानीखेतची हि सगळी ठिकाने साडेतीन-चार तासात आरामात फिरून होतात. हि सगळी ठिकाणे पाहून आम्ही उत्तरांचल भटकंतीतल्या शेवटच्या ठिकाणी कौसानीला निघालो.

(उत्तराखंडा कॉलिंगच्या पुढिल अंतिम भागात: कौसानी :-))

 

कौसानी — रानीखेतपासुन साधारण ७५ किमी अंतरावर असलेले आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले हे एक नितांत सुंदर ठिकाण. दिल्लीपासुन याचे अंतर साधारण ४१० किमी आहे. नैनिताल, रानीखेत या हिलस्टेशनच्या मानाने छोटेसे असलेले हि ठिकाण १८९०मी. उंचीवर वसलेले. कौसानीचा अर्धा भाग बागेश्वर जिल्ह्यात तर अर्धा भाग अल्मोडा जिल्ह्यात येतो. येथुन नंदादेवी, त्रिशूल, नन्दाघूंटी, पंचशूल यांची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. कौसानीत, गांधीजींचा अनासक्ती आश्रम, चहाचे मळे, बागेश्वर येथील बैजनाथ मंदिर हि ठिकाणे आवर्जुन बघण्यासारखी आहेत.
===============================================
===============================================

रानीखेतचा दौरा आटपून आम्ही कौसानीकडे निघालो. रानीखेत ते कौसानी रस्ता चांगला असल्याने साधारण तासाभरातच आम्ही कौसानीला पोहचलो. आम्ही ड्रायव्हरलाच एखादे चांगले हॉटेल सुचवण्याबद्दल सांगितले. त्याने आम्हाला "दीपराज" (रानीखेतला आम्ही "राजदीप" मध्ये तर कौसानीला "दीपराज" हॉटेल मध्ये :-)) हॉटेल सुचवले. खरोखर या हॉटेलातील आमचे वास्तव्य एक अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. रुममधील भल्या मोठ्या खिडकीचा पडदा दूर केला असता समोरच हिमालयाच्या बर्फाच्छादित रांगा दिसत होत्या. Happy नैनितालला (snow view point वरून) खराब वातावरणामुळे न दिसलेला, रानीखेतला ओझरते दर्शन देणारा हिमालय कौसानीत मात्र अगदी नजरेसमोर उभा ठाकलेला दिसत होता. आमच्या उत्तराखंड भटकंतीतील हा सर्वोच्च क्षण होता!!!! मी कितीतरी वेळा खिडकीत बसुन त्याला अगदी डोळेभरून पाहत होतो.

संध्याकाळी हॉटेलच्या टेरेसवर थोडा वेळ एकटाच हिमालयाला निरखत बसलो. सूर्य अस्ताला जात होता पण आपल्या अस्तित्वाच्या सोनेरी खुणा तो त्या बर्फाच्छादित शिखरावर ठेवून चालला होता. सर्व काहि विसरायला लावणारा तो क्षण होता. क्षणभर मीही स्वतःला विसरलो, फोटो काढायचेही भान राहिले नाही. नकळत मी मोबाईलवरील प्लेलिस्टमधुन "सिमटी हुई ये घडिया, फिरसे न बिखर जाये" हे गाणे चालु केले. (निसर्गाच्या सान्निध्यात असताना मी फक्त निसर्गाचेच गूज ऐकत असतो, त्याच्या सान्निध्यात मोबाईलवर गाणी वगैरे ऐकणे मला पटत नाही. :-), पण इथे मात्र का कुणास ठावूक त्या क्षणी मला हेच गाणे ऐकावेसे वाटले. :-)) डोळ्यांना सुखावणार समोर निसर्गाचा स्वर्गीय नजारा आणि कानात रुंजी घालणारे लता & रफीचे स्वर्गीय आवाज!!!! कधी कधी वाटते कि "बस्स आता, याक्षणानंतर काहीच नको" अशीच काहिशी मनस्थिती माझीही होती. त्यावेळी असंच वाटत होत कि ये "सिमटी हुई ये घडिया" कधीच "बिखरू" नये. माझ्या आयुष्यातील ती एक अविस्मरणीय संध्याकाळ होती.

सकाळी साधारण ५ वाजता सूर्योदय होतो आणि पहिल्यांदा सुर्याचे किरण "त्रिशूल" शिखरावर पडते अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली. आम्हाला सुर्योदय पाहण्यासाठी कुठे लांब जायची गरज नव्हती. मोबाईलच्या गजरावर आमचा विश्वास नव्हता Happy त्यामुळे आम्ही रूमबॉयला सांगितले आम्हाला उठवायला. मात्र सुर्योदयाचा स्वर्गीय नजारा पाहण्यासाठी तो येण्याआधीच आम्ही सर्व आवरून ठिक साडेचारला तयार झालो होतो. मे महिन्यातही वातावरणात कमालीचा गारवा होता. सुर्यदेवाच्या आगमनाला काहिसा वेळ होता आम्ही सगळे टेरेसवर पोहचलो आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेऊ लागलो. काहिवेळाने सुर्यदेवाचे आगमनाने चारही दिशा उजळायला सुरुवात झाली. सुर्याची किरणे एकेक करून"त्रिशूल"च्या तिन्ही शिखरावर विराजमान झाली. वातावरण अर्थात ढगाळ असल्याने पाहिजे तेव्हढा स्पष्ट नजारा दिसला नाही, पण जे काहि दिसले/पाहिले ते शब्दातीत होते. Happy

या सुर्योदयाचे वर्णन एका हिंदी कवितेद्वारे

कैसे - कैसे
करिश्माई कारनामे
कर जाता है एक अकेला सूर्य....
किरणों ने कुरेद दिए हैं शिखर
बर्फ के बीच से
बिखर कर
आसमान की तलहटी में उतरा आई है बेहिसाब आग.

कवि होता तो कहता -
सोना - स्वर्ण - कंचन - हेम...
और भी न जाने कितने बहुमूल्य धातुई पर्याय
पर क्या करूं -
तुम्हारे एकान्त के
स्वर्ण - सरोवर में सद्यस्नात
मैं आदिम -अकिंचन...निस्पॄह..निश्शब्द..
क्या इसी तरह का
क्या ऐसा ही
रहस्यमय रोशनी का - सा होता है राग !

(रचनाकार: सिद्धेश्वर सिंह)

हिमशिखरांचे पहिले दर्शन
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
पंचशूल शिखर
प्रचि ५
ढगांच्या दुलईतुन हळूच डोकावणारे सुर्यदेव
प्रचि ६
सुर्याची पहिले किरण त्रिशूल शिखराच्या एका टोकावर
प्रचि ७
सुर्यप्रकाशान नाहलेले त्रिशूल शिखर
प्रचि ८

===============================================
===============================================
अनासक्ती आश्रम
१९२९ साली महात्मा गांधी कौसानीला दोन दिवसांकरता आले होते. त्यांना कौसानीच्या निसर्ग सौंदर्याने इतके प्रभावित केले कि त्यांनी २ आठवडे येथे मुक्काम केला. इथले प्राकृतिक सौंदर्य पाहून "आपल्या येथे कौसानी सारखी ठिकाणे असताना लोक युरोपला का जातात?" असे म्हणत कौसानीला त्यांनी भारतातील स्वित्झर्लंड"म्हणुन गौरवले. येथेच राहुन त्यांनी आपल्या "अनासक्ती योग" या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. यानंतर येथे अनासक्ती आश्रमाची स्थापना झाली. या आश्रमात राहण्याची सोयही होते, त्यासाठी आश्रमाचे काहि नियम आहेत त्याचे पालन करावे लागते.

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

===============================================
===============================================
बैजनाथ मंदिर
प्रचि १४
"कत्युर" खोर्‍यात वसलेले शिवाचे एक मंदिर बागेश्वर जिल्ह्यात आहे. कौसानीहुन साधारण २०किमी अंतरावर हे ठिकाण आहे. बैजनाथहुन हाच रस्ता पुढे कर्णप्रयागला जातो (१००किमी).
कत्युर खोर्‍यामुळे या ठिकाणाला "कार्तिकेयपूर" असही म्हणतात. गोमती नदिच्या किनारी वसलेले हे मंदिर अकराव्या शतकातील आहे. मोठमोठ्या शिळांनी बांधलेले हे मंदिर एका रात्री बांधले असे म्हणतात. येथील मुख्य गाभार्‍यात शिवलिंग आणि माता पार्वतीची एक अतिशय सुरेख मूर्ती आहे. सोबत असलेली छोट्या छोट्या मंदिरात मूर्त्या नव्हत्या, विचारणा केली असता त्या चोरीला गेल्याचे सांगितले. :(. गोमती नदिकाठी मंदिर असल्याने काठावर मोठे मोठे मासे आहेत, त्यांना येणारे पर्यटक चणे, कुरमुरे खायला देतात.

प्रचि १५
गोमतीनदीवरील पूल
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
चहाचे मळे
प्रचि २१
चहाची पाने
प्रचि २२
अल्मोडाची प्रसिद्ध "बालमिठाई"
चॉकलेट फज आणि खव्याच्या मिश्रणावर साखरेचे छोटे गोळे असलेली चविष्ठ मिठाई. Happy फ्रिजमध्ये न ठेवताही ७-८ दिवस चांगली राहते. Happy
प्रचि २३

खरंतर कौसानीच्या प्रेमात आम्ही सगळेच पडलो होतो आणि इथला मुक्काम अजुन एक दिवस वाढवावा असा विचार होता. पण थंड/गरम हवामानामुळे आमच्यातील एकाची तब्येत थोडी बिघडली आणि दुसर्‍या दिवशी परत खटिमा ते दिल्लीचा तो कंटाळवाणा प्रवास करायचा असल्याने, एक दिवस पूर्ण आराम करावा असा विचार कऊन आम्ही कौसानी वरून अल्मोडा मार्गे हलद्वानीला निघालो. अल्मोडा ते हलद्वानी प्रवास अत्यंत बेक्कार आहे Sad आम्ही अक्षरश: किलोमीटर मोजत होतो. :(). अशा तर्‍हेने नैनिताल, रानीखेत, कौसानी अशी भटकंती करून आम्ही खटिमाला परतलो. दुसरा दिवसा पूर्ण आराम करून रात्रीच्या बसने दिल्लीला रवाना झालो.
(उत्तराखंड कॉलिंग सिरीज "समाप्त")
===============================================
===============================================
वातावरण ढगाळ असल्याने हिमशिखराचे फोटो तितकेसे क्लियर नाही आले. या सर्व प्रचिसाठी फोटोशॉप "Auto Contrast वापरला आहे.

या प्रवासात खुप ठिकाणी भटकलो, तलावापासुन हिमालयापर्यंत असा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग पाहिला, मनसोक्त फिरलो. आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुखद आठवणी घेऊन आलो. जसे पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे या भटकंतीत फोटोग्राफी माझी सेकंड प्रायोरीटी असल्याने फोटो टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत हे मलाही जाणवतंय (काहीवेळा वातावरणामुळेही नीटसे नाही आले) (Offcourse its not an excuse :-)). नोव्हेंबरमध्ये पुन्हा उत्तरांचलला येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. जर जायला जमले तर यापेक्षा नक्कीच चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करेन. :-). या सर्व ठिकांची माहिती माबोकरांना व्हावी म्हणुन हा फोटोफिचर प्रपंच

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

बदामी हंपी https://maharashtradeshee.blogspot.com/2026/06/pune-to-gokak.html

    ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे! विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्य...