Friday, August 4, 2023

टेम्स तीरी , लंडन नगरी

 https://www.maayboli.com/node/51757

आजकालच्या जमान्यात लंडनला जाण्याची " अपूर्वाई " पहिल्यासारखी रहिली नसली तरी ही भारतीय मनाला अ़जूनही लंडनचे आकर्षण वाटतेच. अलीकडेच मला लंडनला जायची संधी मिळाली. लंडन वर आजपर्यंत भरपूर मान्यवरांनी लिहीले आहे, आपल्यासारख्या एका अति सामान्य बाईने त्यात आणखी कशाला भर घालावी ह्या विचारात काही दिवस गेले. पण मला लंडन खूप आवडले आणि शेवटी " असेल राजहंसाची चाल डौलदार पण म्हणून कावळ्याने चालूच नये की काय? " ह्या विचाराने गारुड केले आणि म्हणून हा लेखन प्रपंच.

विमानतळावरून मी बाहेर आले आणि एका थंड हवेच्या आणि गार वार्‍याच्या झोताने मला अलिंगन दिले. मुंबईच्या उकाड्याला आणि घामाला कंटाळलेल्या मनाने त्या गार वार्‍याला व्वा म्हणून दाद दिली खरी पण नंतर त्या थंडीचा चांगलाच हिसका दिसला.

घरी जायला आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. सकाळची वेळ, मधूनच डोकावणारा निस्तेज सूर्यप्रकाश, लांबवर दिसणार करडं आकाश, दुशीकडे दिसणारी एक मजली रोहाऊसेस, घरापुढे असणार छोटसं अंगण, फुटपाथवर पानगळीच्या तयारीत रंगांचा साज ल्यालेली मेपलची झाडं, आणि रस्त्यावर शांतता. प्रथमदर्शनीच मी लंडनच्या प्रेमात पडले आणि ते प्रेम दिवसेंदिवस वृधिंगतच होत गेलं
ही आहेत रो हाऊसेस

From london2014

आणि एक हे जवळून

From london2014

लंडनला आलेल्या प्रत्येकाला हे शहर बघण्याची ओढ असतेच. लंडन जर तुम्हाला एका झटक्यात बघायच असेल तर ह्या शतकाच्या प्रारंभी उभारलेलं लंडन आय आहे तुमच्या दिमतीला

From london2014

किंवा अलीकडेच बांधलेली ही इमारत. हिच्या वरच्या मजल्यावरुन सुध्दा लंडनचे विहंगम दर्शन घेता येते.

From london2014

दोन इमारतींच्या मध्ये जो स्तंभ दिसतो आहे ना त्यावरुन ही लंडन पाहता येते. ह्याला वर जाण्यासाठी एक गोल जिना आहे आणि साधारण तीनशे पायर्‍या आहेत. सोळाव्या शतकात एका बेकरीमध्ये अनावधानाने राहिलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या महा भयंकर आगीत हे संपूर्ण शहर बेचिराख झाले होते. त्याची स्मृति म्हणून हा स्तंभ उभारला आहे आणि त्याला " मॉन्युमेंट " असचं नाव आहे.

From london2014

बिग बेन टॉवर आणि पार्लमेंट स्क्वेअर या दोन्ही शिवाय लंडन अपूर्ण आहे. आत्ता आत्ता पर्यंत कोणत्याही इमारतीची उंची ही बिग बेन पेक्षा कमीच असली पाहिजे असा नियम होता लंडन मध्ये. सेंट्रल लंडनमध्ये गगनचुंबी इमारती दिसत नाहीत ते या मुळेच.

From london2014

भर शहरात असणारी हाईड पार्क, ग्रीन पार्क सारखी मोठी मोठी पार्क्स हे लंडनचे वैभव आहे असं मला वाटतं. हे आहे हाईड पार्क . हिवाळा सुरु झाल्याने झाडानी रंग पालटायला सुरवात केली होती पण अजून हिरवळ आणि फुलं टिकुन होती.

From london2014

From london2014

From london2014

टेम्स नदी ही लंडनची जीवनदायिनी आहे. तिच्या दोन्ही किनार्‍यावर लंडन वसलं आहे म्हणून नदी पार करण्यासाठी टेम्सवर ठिकठिकाणी पूल बांधण्यात आले आहेत. त्यातले काही तर फक्त पादचार्‍यांसाठीच सुदधा आहेत. हा आहे लंडनची जणुं ओळखच बनलेला टॉवर ब्रिज. मोठी मोठी जहाजं जाण्यासाठी हा मधोमध दुभंगतो आणि जहा़जं गेली की परत एकसंध होतो.

From london2014

हा आहे सेंट जेम्स पार्क मधील सेंट जेम्स पॅलेस.
From london2014

हे एक अगदी आटोपशीर असे पार्क आहे आणि ह्या पार्क मध्ये पाणपक्ष्यांना अभय आहे. हा त्यापैकीच एक

From london2014

ह्या पार्क मधील मोठ्या मोठ्या खारींपैकी ही एक झुपकेदार शेपटी असलेली.

From london2014

ही आहे लंडनची भुयारी रेल्वे. मुंबईच्या लोकलने रोज प्रवास करणार्‍या मला ह्यात फारच रस होता. जवळ जवळ दीड शे वर्षापूर्वी जगातील पहिली भुयारी रेल्वे इथे सुरु होणं हे जगातलं आठवं आश्चर्यच वाटत मला. चिकाटी, दूरदृष्टी, तंत्रज्ञानातील प्रगती, अपार कष्ट याचेच हे प्रतीक आहे. हिला इथे ट्युब म्हणतात. ट्युबच जाळं सर्व लंडनभर पसरलं आहे आणि प्रवास खूपच सोपा आहे. ट्युबचा नकाशा प्रत्येक स्टेशनवर, स्टेशनाच्या बाहेर, ट्युब मध्ये आणि आता मोबाईल मध्ये ही आहे त्यामुळे चुकायचं म्हटल तरी चुकता यायच नाही.

From london2014

आम्ही ऑड वेळेला प्रवास करत असल्याने हे ही बघायला मिळालं . ट्युबची मेंटेनन्स कार

From london2014

भाड्याच्या सायकलींचा स्टँड. घ्या सायकल, चालवा आणि आपलं ठिकाण आल की जवळच्या स्टँड्वर ठेऊन द्या.

From london2014

टॉवर ऑफ लंडनच्या किल्ल्याच्या ( इथेच आपला कोहिनूर विराजमान आहे) प्रांगणात पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटीश सैनिकांच्या संख्ये एवढी सिरॅमिकची पॉपी फुलं खोवली होती त्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून.

From london2014

आणि ते पहाण्यासाठी अशी गर्दी उसळली होती.

From london2014

हा पक्षी एवढा माणसाळलेला होता की आम्ही कॉफी पीत बसलेलो असताना अगदी आमच्या पायात पायात येत होता. कोण आहे हा ?
From london2014

आणि बाजूलाच आपली चिऊताई ही

From london2014
एका पुलावरुन घेतलेला प्रचि
From london2014
ट्रॅफल्गार स्क्वेअर
From london2014

ग्रीनिच पार्क वरुन दिसणारे लंडन

From london2014

हे ग्रीनिच पार्क

From london2014

आणि सगळ्या जगाला पूर्व आणि पश्चिम मध्ये विभागणारी काल्पनिक ग्रीनिच रेषा इथे धातुच्या पट्टीने मूर्त स्वरुपात.

From london2014

तर हे काही प्रचि मी काढलेले. लंडन मला खूप आवडलं. एवढ मोठं जागतिक कीर्तीच शहर पण ह्या शहराने अजून ही आपलं गावपण कसोशीने जपलं आहे असं मला जाणवलं. छोटी छोटी साधी तरीही टुमदार एकासारखी एक घरं, त्यापुढे छोटीशीच बाग, रस्त्यावर जुने जुने विशाल मेपल वृक्ष, रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबांवरही टांगलेल्या फुलझाडांच्या कुंड्या, सेंट्रल लंडन पासून अगदी कमी अंतरापासूनच सुरु होणारी उपनगरं, भर शहरातली आणि उपनगरातली मोठी मोठी उद्याने आणि उपवने आणि जागोजागी कशोशीने जपलेल्या इतिहासाच्या खुणा या सगळ्यांमुळे वाटलं असेल मला तसं कदाचित. पण हे शहर माझ्या अंगावर नाही आलं, उलट अगदी छोट्या कालावधी साठी का होईना पण मला त्याने आपल्यात सामावून घेतलं असं मला वाटलं.

 

नावात ओल्ड लेडी आहे म्हणून इग्नोर नका करु ( स्मित) . खूप इंटरेस्टिंग आहे. वाचा पुढे, मजा येईल. हे टोपण नाव आहे तीनशे वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या जगातल्या सर्वात पहिल्या मध्यवर्ती बँकेचं, ( सेंट्रल बँक ) बँक ऑफ इंग्लंडचं. आपली जशी रिझर्व बँक आहे तशी इंग्लडची ही. पण आपली आहे यंग लेडी, अवघे ऐंशी वयमान.

साल १६९४ . म्हणजे बघा साधारण शिवाजी महाराजांच्या थोडासा नंतरचा काळ. इंग्लंडचा राजा तिस-या विल्यमचा फ्रान्स ने दारूण पराभव केला. आपल नौदल सुधारलं तरच भविष्यात आपला निभाव लागेल असं राजाला वाटलं. पण त्यासाठी खूप मोठ्या रकमेची गरज होती. राजा कडे एवढा पैसा नव्हता आणि कर्जाऊ रक्कम मिळवण्या एवढी बाजारात पत ही नव्हती त्याची. म्हणुन ही बँक स्थापन करायचं निश्चित केलं गेलं . खाजगी भागधारकांच्या ह्या बँकेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या चार आठवड्यात हवी असणारी रक्कम जमा झाली. भागधारकांना आठ टक्के लाभांश देण्याचे निश्चित केले. ही बँक सरकारची बँक झाली. राजाने ( सरकारने) बँकेला सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात चलनी नोटा इश्यु करण्याचे अधिकार दिले. बँकेने राजाला अर्थसहाय दिले. त्याच्या मदतीने राजाने नौदल सक्षम केले. अनुषंगाने शेती आणि उद्योगधंद्यांची भरभराट झाली. इंग्लंड बलशाली बनले. सरकारची बँक, आर्थिक विकासाला चालना आणि चलनी नोटांचे वितरण या आधुनिक काळातल्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याची बीजं इंग्लंड मध्ये सतरा क्लार्क आणि दोन चपराशानी सुरु झालेल्या ह्या बँकेने अशा तर्‍हेने जवळजवळ सव्वा तीनशे वर्षांपूर्वीच रोवली.

ही बँकेची इमारत

From mayboli

सोन्याच्या किंवा चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात त्याकाळी ज्या नोटा इश्यु केल्या जात ती प्रत्येक नोट हातांनी लिहीलेली असे. आणि ती वर कॅशिअर सही करत असे. त्या काळात सर्वात लहान नोट होती पन्नास पौंडाची . पण तेव्हा तिथल्या जनतेच सर्वसाधारण वार्षिक उत्पन्न होत फक्त वीस पौंड. त्यामुळे कित्येक लोकांना उभ्या आयुष्यात एकदा ही नोट हाताळायला ही मिळत नसे. एकदा तरी नोट हाताळायला तरी मिळावी हे सामान्य जनतेचं स्वप्न स्वप्नच रहात असे कित्येकदा.

मग नंतरच्या काळात अंशतः छापील नोटा आल्या आणि सन 1744 साली पहिली शंभर टक्के छापील नोट बाजारात आली. कालांतराने गरजेनुसार त्यात अनेक बदल होऊन आपण आजच्या आधुनिक चलनी नोटेपर्यंत येऊन पोचलो आहोत. त्या काळात चलनी नोटा बँक ऑफ इंग्लंड बरोबर इतर बँकाही इश्यू करत असत पण हळूहळू इतर बँकांचे नोट्स इश्यु करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आणि नोट्स इश्यु करणे ही बँक ऑफ इंग्लंडची मक्तेदारी झाली.

लंडनच्या सिटी ऑफ लंडन ह्या प्रभागामध्ये सन १७३४ पासून ह्या बँकेचे मुख्य कार्यालय आहे आणि हा सगळा परिसर ही बँक म्हणूनच ओळखला जातो. इथे बँक नावाच एक खूप मोठ ट्युब स्टेशन ही आहे. ही बँकेची इमारत एखाद्या गढीसारखी आहे. हिच्या चारही बाजूला ठराविक अंतरावर मोठ्या मोठ्या रुंद खांबाची तटबंदी आहे आणि हिला रस्त्यावर उघडणारी एक ही खिडकी नाही. इमारतीच्या चारही बाजूना प्रत्येकी एक असे आपल्याकडे किल्ल्याला असतात तसे बुलंद दरवाजे आहेत. त्यामुळे बाहेरून आत काय असेल याची जरा ही कल्पना येत नाही. आत बँकेच सात मजली कार्यालय आहे. विशेष इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथल्या व्हाॅल्ट मध्ये इंग्लंड़चं आणि इतर काही देशांच सुमारे 4700 टन सोनं बारच्या रुपात सुरक्षित आहे. एखाद्या माॅल मधे चाॅकलेटचे बार ठेवावेत तसे प्रत्येकी 12. 4 किलो वजनाचे हे बार शेल्फवर विराजमान आहेत. सुरक्षेच्या कारणासाठी ह्या व्हॉल्टचे कर्मचारी कोण आहेत ह्याची ही गुप्तता राखली जाते. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा इथे तैनात आहे. एक मजेशीर गोष्ट म्हणजे ह्या व्हॉल्टच्या चाव्या सुमारे तीन फुट लांब आहेत. लंडनच्या एका अतिशय गजबजलेल्या भागात ह्या इमारतीच्या तळघरात ही एक अतिशय अवाढव्य अशी सोन्याची खाणच आहे म्हणा ना ! तुलने साठी सांगते की भारता कडे आहे फक्त ( ? ) ५५७ टन सोनं. आपणा पैकी काही ना आठवत ही असेल की १९९१ च्या आर्थिक आणीबाणीत परकीय चलन मिळवण्यासाठी आपण ही आपलं सुमारे ४० टन सोनं बँक ऑफ इंग्लंड कडे तारण ठेवल होतं.

मध्यंतरी लंडनला जाण्याचा योग आला . सिटी ऑफ लंडन ह्या लंडनच्या भागात फिरायला खूप छान वाटत. एकदा असेच बँक परिसरात फिरत असताना ह्या बँकेचं म्युझियम आहे असं नकाशावर दिसलं. मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात एकुणच खूप रस असल्याने पावल आपोआपच तिकडे वळली. सोने पे सुहागा म्हणजे ते विनामूल्य बघता येत होत. हे म्यूझियम खूप छान आहे. बँकेच्या स्थापनेचा इतिहास, इमारतीचा इतिहास, अगदी जुन्या काळची नाणी, पहिल्या कागदी चलनी नोटा, पहिल्या सेक्रेटरीचं हस्त लिखित, नोटांच डिझाईन कसं ठरवलं जात त्याचे नमुने, अवैध नोटा छापण कठीण करणार डिझाईनच कसं तयार केल जातं त्याचे नमुने, नोटा एका ठिकाणाहुन दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी पूर्वी वापरण्यात येणार्‍या लाकडी पेट्या, नोटा छापण्याचं पुरातन मशीन, आभासी गोल्ड व्हाॅल्ट मध्ये काढता येणारा सेल्फी, बँकेची कामं , देशाच्या विकासात बँकेची भुमिका असं सगळं अतिशय रंजक रीतीने सादर केलं गेलं आहे. इथल आणखी एक आकर्षण म्हणजे खर्‍या सोन्याच्या १२. ४ किलो वजनाच्या बारला आपण तिथे स्पर्श करु शकतो आणि आपली ताकद असेल तर उचलून ही बघु शकतो. हं... पण फक्त उचलताच येतो, उचलेगिरी नाही करता येत. ( स्मित ) तो बार परत तिथेच ठेवावा लागतो.... तो घरी ही न्यायला दिला असता तर किती मजा आली असती. !!! ( स्मित) लंडन मध्ये असणार्‍या मायबोलीकरांनी हे म्युझियम अजुन पर्यंत बघितलं नसल्यास जरुर बघाव.

गोल्ड व्हॉल्ट

From mayboli

ही बँक लंडनच्या ज्या सिटी ऑफ लंडन भागामध्ये आहे तो लंडनचा एक सर्वात जुना भाग आहे. लोकं ह्याला लाडानी नुसत सिटी सुद्धा म्हणतात. ह्याचं क्षेत्रफळ आहे फक्त १. २ चौरस मैल म्हणून ह्याला स्वेअर माईल असं ही संबोधल जातं पण लंडनच्या आणि पर्यायाने जगाच्या आर्थिक उलाढालीच हे केंद्र आहे. सर्व बँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची मुख्यालये, विख्यात कंपन्यांची मु़ख्यालये ह्या परिसरात एकवटली आहेत. इथले रहिवाशी आहेत फक्त ८००० आणि सुमारे तीन लाख लो़क इथे दररोज कामासाठी येतात. त्यामुळे ऑफिसच्या दिवशी हा भाग खूप गजबजलेला असतो आणि शनिवार रविवार मात्र अगदी सुन्सान. भाग जुना असल्याने इथले रस्ते म्हणजे अगदी बोळकंडी सारखे आहेत. पण विश्वविख्यात कंपन्यांच्या मु़ख्यालयांमुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. इमारती ही जुन्याच तरी ही शानदार आहेत. त्यामुळे हा भाग फिरायला खूप छान आहे.

इथल्या रस्त्यांची नाव मात्र परंपरा प्रिय लंडनकरांनी रोमन काळात होती तीच अजून ही राखली आहेत. बहुतेक रस्त्यांना रोमन काळात चालणार्या अॅक्टेविटी वरुनच नाव मिळाली आहेत. जसं की पुडिंग लेन, मिल्क स्ट्रीट, पोल्ट्री, ब्रेड स्ट्रीट, ब्रिक लेन , चिपसाईड ( म्हणजे मार्केट प्लेस)... अशा नावांच्या रस्त्यांवर प्रसिद्ध कंपन्यांची ऑफिसं, मोठी मोठी रेस्टॉरंट्स, प्रसिद्ध दुकान पाहण खूप मजेशीर वाटत. एक गटर लेन नावाची लेन ही पाहिली मी सिटीत. ( स्मित)

सिटीतल्या थ्रेड्नीडल स्ट्रीट नावाच्या स्ट्रीटवर ही बँक आहे. पूर्वी इथे एका मर्चंट टेलरिंग कंपनीचं कार्यालय होतं म्हणून ह्या रस्त्याला हे नाव पडलं आहे असं म्हणतात. . तर झालं काय , १७९४ साली फ्रांस बरोबर झालेल्या युद्धात इंग्लंडचा खजिना रिकामा झाला होता. सरकारची कर्जे बेसुमार वाढली होती. म्हणून सरकारने नोटेच्या बदल्यात सोन्याची नाणी बँकेने वितरीत करु नयेत असा फतवा काढला. विरोधी पक्षांना हे मान्य नव्हते. पार्लमेंट मध्ये यावर जोरदार चर्चा सुरु होती. चर्चेच्या ओघात एका सभासदाने बँक ऑफ इंग्लंडचा उल्लेख दॅट ओल्ड लेडी ओफ थ्रेड्नीडल स्ट्रीट असा केला. दुसर्‍या दिवशी जेम्स गिलरी ह्या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराचे खाली दिलेले चित्र पेपरात छापले गेले तेंव्हा पासून बँक ऑफ इंग्लंडला ओल्ड लेडी ओफ थ्रेडनीडल स्ट्रीट हे नाव जे चिकटले ते अगदी आजपर्यंत.

Catroon
From Drop Box

हे कार्टून नीट बघा आणि रस वाटला तर नेट वर आणखी माहिती शोधा. खूप रंजक माहिती मिळेल. इथे लेख लांबेल म्हणून तो मोह टाळतेय.
प्रतिसाद बघुन कार्टुन विषयी लिहीतेय थोडे ते असे.
ती म्हातारी आहे बँक ऑफ इंग्लंड. . ती बसली आहे बँक ऑफ इंग्लंडच्या खजिन्याच्या पेटीवर पण पेटीला डबल लॉक आहे. म्हणजे बँकेचा खजिना खुला होण्याची सुतराम शक्यता नाही. तिने घातलेला झगा एक पौंडाच्या नोटेचा आहे आहे कारण तेव्हा प्रथमच लहान मूल्याच्या म्हणजे एक पौंडाच्या नोटा नाईलाजाने छापाव्या लागल्या होत्या. तो निळा ड्रेस घातलेला इंग्लंडचा त्या वेळचा पंतप्रधान आहे. तो तिच्या खिशातुन सोन्याची नाणी काढायचा प्रयत्न करतो आहे कारण त्याला तेव्हा पैशाची फार गरज होती. पण ओल्ड लेडीने तर हात वर केले आहेत .
रच्याकने, आपल्याकडे ही मुंबईला रिझर्व बँकेचं असच करन्सी म्युझियम आहे ते पण खूप छान आहे जमल्यास लहान मुलांना जरुर दाखवावे.

माहिती : नेट वरुन फोटो २ आणि ३ नेट वरुन

 

बी तो गोल्ड व्हॉल्ट मधला नेट वरुन घेतलेला फोटो आहे. व्हॉल्ट मधे सोनं असं शेल्फ वर ठवल गेल आहे पण व्हॉल्ट कड्या सुरक्षेतच आहेत आणि असायलाच हवेत. english मधे " as safe as bank vault " अशी फ्रेज ही आहे.
बी, १९७४ सालची राजकीय आणीबाणी. आणि १९९१ ची आर्थिक आणीबाणी.

बी, १९९१ मध्येच सोने फिजिकली तिकडे नेले होते. >> अगदी बरोबर.

इंग्रजांनी केलेली लूट मार हा या लेखाचा विषयच नाहीये. बँक ऑफ इंग्लंड बद्दल थोडी रंजक माहिती सांगणे एवढच अभिप्रेत आहे.

मुंबईला रिझर्व बँकेच असच करंसी म्युझियम कुठे आहे >>> सर पी. एम रोडवर फोर्ट भागात आहे. आपलं म्यूझियम ही विनामूल्य बघता येत. सोमवारी बंद असत मात्र.

ओळखंच कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे स्मित >> मित अगदी बरोबर. याचा आवाका प्रचंड आहे.

 

ह्या वर्षी उन्हाळ्यात लंडनला जायची संधी मिळाली आणि लंडनचा उन्हाळा हा तिथला सर्वात बेस्ट सीझन आहे असं का म्हणतात ह्याचा प्रत्यय आला. हे तिकडचे काही मी काढलेले फोटो.

हिथ्रो विमानतळाच्या बाहेरच अशा फुलांनी स्वागत केलं आणि प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात दूर झाला.

From mayboli

हिवाळ्यात आक्रसलेलं दिवसाचं फुलपाखरु उन्हाळ्यात चांगलच पंख पसरत आणि रात्री चक्क नऊ साडे नऊ पर्यंत चांगला प्रकाश असतो. स़काळी ही साडेचार पाचलाच फटफटतं

From mayboli

लंडनच बहुतांश वेळा करडं दिसणारं आकाश समर मध्ये असं निळशार दिसतं

From mayboli

ही वाट दूर जाते

From mayboli

हा मणीमोहोर आहे का ?

From mayboli

समर मध्ये सगळीकडे फुल फुललेली असतात. घराच्या पुढच्या अगदी छोट्याशा जागेत ही बाग फुलवलेली असते हौशीने . हे एक अगदी छोट गवत फुल आहे अंगणातल्या हिरवळीवर आलेलं. फोटो वर जाऊ नका ह्याची साईज आपल्या करंगळीच्या नखाएवढी आहे जेमतेम .

From mayboli

हे आणखी एक गवत फुल पण हे साईज ने थोडं मोठ होतं

From mayboli

बकिंगहम पॅलेस, रॉयल पार्क्स आणि इतर सार्वजनिक बागांमध्ये ही हौसेने फुलं लावतात. ही बकिंगहम पॅलेस, च्या अंगणातली फुलं

From mayboli

एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या बागेतली ही हिरवळ आणि एखाद्या स्त्रीने आपल्या केसांचा मधोमध सरळ भांग पाडावा तसा हा रस्ता

From mayboli

बागेतलं स्मारक आणि त्याभोवती फुलवलेली अशी अष्ट्कोनी बाग

From mayboli

From mayboli

हे पहा भरतकामाचे काही नमुने ( स्मित)

From mayboli

From mayboli

लिलीच्या फुलांचे कर्णे

From mayboli

जनरली प्रत्येक पब किंवा रेस्टॉरंटच्या इमारतीवर फुलं असतातच. पहिल्यांदा तर मला खोटीच वाटली पण ती असतात खरी ( स्मित)

From mayboli

हे जवळुन

From mayboli

From mayboli

अगदीच जागा नसेल तर अशा कुंड्या तरी असतातच पबच्या / रेस्टॉरंटच्या बाहेर

From mayboli

दिव्याच्या खांबांवर लटकवलेल्या ह्या काही कुंड्या. त्यामुळे रस्ता फार सुरेख दिसतो

From mayboli

हे जव़ळुन

From mayboli

रस्त्याच्या डिवायडरवर केलेली फुलांची सजावट

From mayboli

उन्हाळा असला तरी ही एखाद दिवशी रात्री पारा पार खाली जातो आणि मग सकाळी अंगणतल्या हिरवळीवर असे दवबिंदुंचे मोती दिसतात

From mayboli

तिकडे मला निळी फुलं खूप दिसली. ही काही

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

फुलांच्या सजावटीला रेल्वे स्टेशन ही अपवाद नाही. तिथेही फुलं असतातच आपल्या स्वागताला

From mayboli

अशा सुंदर वातावरणात गाडीची वाट पहाण ही किती आनंददायी असेल ना !
From mayboli

सिटीत जिथे जागेची कमतरता आहे, रस्ते बोळकंडीसारखे आहेत तिथे ही जरा जागा मिळेल तिथे फुलं असतातच.

From mayboli

From mayboli

From mayboli

From mayboli

चला, आता आणखी फोटो टाकण्याचा मोह आवरता घेते. एवढी फुलं होती सगळीकडे पण ती तोडताना मात्र नाही कोणी दिसलं. पहाटेच्या प्रकाशात काठ्या, छत्र्यानी फांद्या वाकवुन वाकवुन फुल तोडुन झाडं बोडकी करण्यातली मज्जा त्यांना अजुन समजलेली दिसत नाहीये. असो.

सगळीकडे जिथे नजर जाईल तिथे अशी फुलच फुल दिसत असल्याने उन्हाळ्यात लंडन एखाद्या हसर्‍या बाळासारखं आनंदी गोजिरवाणं आणि प्रसन्न दिसत ह्यात शंका नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...