Monday, August 7, 2023

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी

https://nvgole.blogspot.com/search/label/%E0%A4%93%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A3%20%E0%A5%AA%20%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%80%20%E0%A5%A7-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80

 २०१४-११-१७


उज्जयिनी, इंदौर, मांडू, महेश्वर आणि ओंकारेश्वरचे पर्यटन करावे असे कधीचेच मनात होते. मात्र संधी मिळत असे तेव्हा तिथे जाण्यास अनुकूल ऋतूमान नसे.

अनुकूल ऋतूमान निवडावे कसे ह्याकरता त्या ठिकाणांच्या हवामानचित्रांची मदत घेता येऊ शकते. लगतचे प्रकाशचित्र पाहा [१].

इंदौर आणि आसपासच्या प्रदेशात दिवसाचे तापमान नेहमीच अतिशय जास्त असते. ते कमी असण्याचा काळ पावसाळ्याच्या आसपासचा असतो. तिथले रात्रीचे तापमान नेहमीच खूप कमी असते. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानातील फरक सुमारे १५ अंश सेल्शसचा असतो. म्हणून पाऊस पुरेसा घटल्यावर आणि रात्रीचे तापमान अगदी १० अंश सेल्शस पर्यंत उतरण्याच्या आतच म्हणजे नोव्हेंबरात तिथले ऋतूमान सुखकर असते. नंतर पुन्हा दिवसाचे तापमान फारसे वाढण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीतही सोयीस्कर ऋतूमान असते.

आम्ही ह्या नोव्हेंबरच्या सुरूवातीस तिथे जाण्याचा निर्णय घेतला. इंदौरच्या पर्यटन वर्तुळातील ही ठिकाणे पाहायची तर निरनिराळ्या प्रकारे कार्यक्रम आखले जाऊ शकतात. ज्यांना स्थलदर्शन करत असतांनाच, वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही हवाहवासा वाटतो, त्रासदायक वाटत नाही, असे अनेकजण इंदौरला एकाच-जागी-राहणे पसंत करतात. तिथूनच एक दिवस उज्जयिनीला, एक दिवस मांडूला, एक दिवस महेश्वरला आणि एक दिवस ओंकारेश्वरला जाऊन परत येत असतात. ह्यात एकाच जागी राहणे होत असल्याने खाण्यापिण्याची, राहण्याची, सामानाची उत्तम सोय अनुभवता येते. पर्यटन संयोजकांच्या सोयीचा असा हा कार्यक्रम असतो. शहरात निवास ठेवल्याने पर्यटकाकडून शहरी दराने निवासखर्च वसूल करता येतो. वातानुकूलित स्वयंचलित वाहनांतील प्रवासही भरपूर होत असल्याने त्या गाड्यांच्या मालकांचाही भरपूर लाभ होत असतो.

किमान-निव्वळ-प्रवास करायचा तर मुंबईकडून येतांना उज्जयिनीसच उतरावे. दर्शनाच्या जागेवर मुक्काम हलवत न्यावे. परततांना इंदौरहून मुंबईकरता गाडी धरावी. ह्यामुळे पर्यटन स्थळावर प्रत्यक्ष निवास करण्याचा आनंद लाभू शकतो. निव्वळ प्रवास किमान राहून, पर्यटनास-लाभलेल्या-वेळेचा-इष्टतम-सदुपयोग होऊ शकतो. जास्तीत-जास्त-पर्यटन-कमीत-कमी-खर्चात होऊ शकते. आम्ही हेच धोरण पत्करले होते.

भारतातील असंख्य लोहमार्ग स्थानकांवर विश्रामकक्ष (रिटायरिंग रूम्स) आहेत. अतिशय वाजवी दरात ते प्रवासाच्या दोन दिवस आधीपासून तर प्रवासाच्या दोन दिवस नंतर पर्यंतच, रहिवासाकरता मिळू शकतात. वैध तिकिटाने प्रवास करणार्‍या प्रवाशासच केवळ ते उपलब्ध असतात. ह्या कारणानेच एवढ्या वाजवी दरात लोहमार्ग व्यवस्थापन ते आपल्याला उपलब्ध करून देऊ शकत असतात. एरव्ही मागणी अफाट वाढून, त्यांचे भाडे वाढविणे अत्यंत निकडीचे झाले असते. लोहमार्ग प्रवास करणार्‍याने निवासाकरता नक्कीच विचारात घ्यावा असा हा पर्याय आहे. आम्ही मात्र ह्यापूर्वी हा पर्याय कधीही वापरलेला नव्हता. ह्यावेळी मात्र तो वापरून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असा निर्णय घेतला. मुंबईहून आम्ही उज्जयिनी स्थानकावर उतरलो त्या दिवसाकरता, त्या स्थानकावरील विश्रामकक्ष आम्ही सुमारे रु.४००/- दरदिवस दराने आरक्षितही केला. आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावर तशी सोय आहे. लोहमार्गप्रवासाप्रमाणेच ह्या आरक्षणासही रद्द करण्याबाबत निश्चितस्वरूपाचे धोरणही आहे.

उज्जयिनीचे लोहमार्ग स्थानक! इथूनच आमच्या प्रवासाला सुरूवात झाली. पहिल्या मजल्यावरील डाव्या हाताच्या ओवरीत इथले विश्रामकक्ष आहेत. स्थलदर्शनाचे दृष्टीने ही जागा, शहरात मध्यवर्ती असून अत्यंत सोयीची आहे. सुरक्षित आहे. इथला प्रशासकीय व स्वच्छतेबाबतचा अनुभव फारसा वाखाणण्यासारखा नाही. एकूणातच असलेल्या सरकारी अनास्थेचा तो भाग आहे. मात्र त्याकरता हा पर्याय अव्हेरावा एवढा तो मुद्दा सशक्त नाही.



उज्जयिनीला महांकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. इथे कुठलेही सामान, पर्स, मोबाईल, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत. १५१ रुपयांचे विशेष दर्शन करणार्‍यांना मूळ रांगेत बरेच पुढे सोडले जाते, तसेच त्यांचे सामान ठेवण्याकरता एक कप्पाही कुलूप-किल्लीसहित मोफत पुरवला जातो. आम्ही हाच पर्याय निवडला. ह्या मंदिरात मात्र सुरूवातीपासून तर बाहेर पडेपर्यंत व नंतरही पंडे पिच्छा पुरवतात. त्यांच्यापासून होता होईस्तोवर दूरच राहावे. बडा गणपती मंदिरातही गणेशाचे दर्शन घेतले. मग आम्ही हरिसिद्धी मंदिरात गेलो. ही सर्व मंदिरे एकाच परिसरात आहेत. हरिसिद्धी मंदिराच्या प्रवेशद्वारावर कुठल्याशा उत्सवाच्या निमित्ताने पूर्ण रुंदीची, फुलांच्या माळांची झालर घातलेली होती. त्यातही हरिसिद्धीची मूर्ती साकारलेली असल्याने सुंदर देखावा दृष्टीस पडला.



हरिसिद्धी मंदिराच्या बाजूलाच, सम्राट वीर विक्रमादित्याच्या नवरत्नदरबारातील नऊ रत्नांच्या भव्य तस्विरी टांगलेले एक लांबलचक भव्य दालन पर्यटकांना खुले आहे. तिथे आम्हाला कोशकार अमरसिंह, संस्कृत वैय्याकरणी वररुची, विख्यात वैद्य धन्वंतरी, महान-वास्तुविशारद शंकू, कविकुलगुरू महाकवी कालिदास, यमक-काव्य-शिरोमणी घटकर्पर, महान-ज्योतिर्विद-वराहमिहीर, थोर- खगोल-शास्त्रज्ञ-क्षपणक आणि बेताल भट्ट नावाचा विख्यात-जादुगार अशा नवरत्नांची ओळख झाली. हा बेताल भट्ट म्हणजेच "विक्रम और वेताल" मधला वेताळ असावा. तो लक्ष्यार्थाने राजाच्या मानगुटीवर बसून न्याय्य मागण्यांची तड लावत असे. घटकर्पर याने २२ कडव्यांचे एक प्रसिद्ध यमक काव्य लिहिले आणि जाहीर केले की, याहून सरस यमक काव्य जो लिहील त्याचे घरी घटकर्पर फुटक्या मडक्याच्या खापराने पाणी भरेल. म्हणूनच त्याचे नाव घटकर्पर पडले.



ह्यानंतर आम्ही भर्तृहरी गुहेकडे गेलो. इसवीसनपूर्व ५५४ मध्ये महाराज गंधर्वसेन (वीरसेन), उज्जयिनी नगरीत राज्य करत असत. त्यांना दोन राण्या होत्या. सुशीला नावाच्या राणीपासून त्यांना भर्तृहरी नावाचा मुलगा झाला. दुसर्‍या राणीपासून विक्रमादित्य नावाचा मुलगा झाला. हा राजा-विक्रमादित्य, पराक्रमी, शककर्ता होता. आपण काल-गणनेकरता जे विक्रमसंवत अनुसरत असतो त्या शकाचा कर्ता तोच आहे. राजा विक्रमादित्याचा नवरत्न दरबार होता. त्यातच कालिदास, अमरसिंह इत्यादींचाही समावेश होता. भर्तृहरीस, विक्रमादित्य आणि सुभटवीर्य हे दोन धाकटे भाऊ होते. त्यांच्या बहिणीचे नाव मैनावती होते. मैनावतीचा मुलगा गोपीचंद हा पुढे जाऊन नाथ पंथातील साधू झाला. उज्जयिनीमध्ये भर्तृहरीगुहे नजीकच गोपीचंदाची गुहादेखील आहे.



भर्तृहरी भविष्यात मोठा योगी होईल असे भविष्य वर्तवले गेले. राजपुत्र मोठा झाला. सर्व विद्यापारंगत झाला. कलानिपूण झाला. महाराज गंधर्वसेनांचा भर्तृहरी हा मोठा मुलगा असल्याने, त्यांच्या पश्चात, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यास राज्याभिषेक झाला. भर्तृहरीला दोन राण्या होत्या. त्यानंतर त्याचा मगधदेशाची राजकन्या पद्माक्षी हिचेशी विवाह झाला. तिचे नाव पिंगला ठेवले. पिंगला अतिशय सुंदर होती. तिच्या प्रेमपाशांत भर्तृहरी बुडून गेला.

राजा भर्तृहरी रसिक कवी होता. थोर मुत्सद्दी होता. कुशल प्रशासक होता. मात्र राणी पिंगलेच्या प्रेमात बुडून गेल्याने तो देहभान विसरला. राज्यकारभारात त्याचे मन रमेना. त्याने राज्यकारभार विक्रमादित्यावर सोपवला आणि नवयौवनाच्या सर्व शृंगारसुखांचा मनःपूत आस्वाद घेऊ लागला. कलासक्त कवी आणि संस्कृत भाषा पंडित असल्याने, शृंगाराच्या रसास्वादावर त्या कालावधीत त्याने शंभर सुरेख कवने रचली. शृंगाराचे यथातथ्य आणि सुरस वर्णन करणार्‍या ह्या काव्याचा प्रभाव, आजही सर्व भारतभर विद्यमान आहे. अनेक लेखन विवरणांतून भर्तृहरीच्या काव्याचे संदर्भ नेहमीच दिले जात असतात. संस्कृत वाङमयात, छंदशास्त्रावरील कविकुलगुरू महाकवी कालिदासाचा “श्रुतबोध” हा ग्रंथ विख्यात आहे. श्रुतबोधात वर्णिलेल्या वृत्तांत बांधलेल्या काव्याचे दाखले मात्र, भर्तृहरीच्या काव्यातूनच सहजगत्या उपलब्ध होत असतात. त्याच्या काव्याचा एक सरस दाखला खाली दिलेला आहे.

क्वचित्सुभ्रूभङ्गैः क्वचिदपि च लज्जापरिणतैः ।
क्वचिद् भीतित्रस्तैः क्वचिदपि च लीलाविलसितैः ॥
नवोढानामेभिर्वदनकमलैर्नेत्रचलितैः ।
स्फुरन्नीलाब्जानां प्रकरपरिपूर्णा इव दिशः ॥ -शिखरिणी, श्रुंगारशतक-४, राजा भर्तृहरी, इ.स.पू.५५४

म्हणजेः

कधी भ्रूभंगाने क्वचित कधि लाजून हसता ।
कधी भीतीयोगे क्वचित कधि लीलेत रमता ॥
कुमारींच्या सार्‍या नयन विभ्रमी चित्त हरता ।
असे वाटे सार्‍या उमलत दिशा नीलकमला ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजा भर्तृहरी शूर होता. राजाला आपल्या शौर्याचा सार्थ अभिमान होता. एकदा तो उज्जयिनीच्या उत्तरेकडील तोरणमाळ पर्वतावर शिकारीला गेला होता. दिवस मावळतीला आला, तरीही शिकार गवसली नव्हती. निराश होऊन परतत असतांना, त्याला हरणांचा एक प्रचंड मोठा कळपच दृष्टीस पडला. हरिणींना मारण्यात त्याला स्वारस्य नव्हते. त्याने काळवीटाचा वेध घेतला. राजा त्याला घोड्यावर बांधून नेऊ पाहत होता. असंख्य हरिणींचे डोळे तडफडणार्‍या काळवीटावर खिळून राहिले होते. काळवीट असहाय्यतेने मरणास सामोरे जात होता. तिथेच काही अंतरावर गोरखनाथ साधना करत होते. त्यांनी ही घटना पाहिली. त्यांनी राजाला निष्कारण केलेल्या हत्येबाबत दूषण दिले. ते राजाला म्हणाले की, “राजा, तुला ह्या काळवीटाचे प्राण घेण्याचा मुळीच अधिकार नाही. कारण त्याला जीवदान देण्याचे सामर्थ्य तुझ्यापाशी नाही.” मग, गोरखनाथांनी आपल्या विद्येने त्याचे प्राण वाचविले. काळवीट उठून उभा राहिला आणि जंगलात पळून गेला. ही सर्व अद्भूत घटना पाहून, राजा त्यांच्या विद्येच्या प्रभावाने स्तिमित झाला. राजा त्यांचा शिष्य झाला. त्यांना आपले गुरू मानू लागला.

राजा असाच वरचेवर शिकारीला जात असे. अशावेळी, श्रुंगारसुखाच्या आस्वादाला सदैव आसुसलेली राणी पिंगला, सुरक्षादलप्रमुख असलेल्या महिपाल ह्यासच जवळ करू लागली. राजाची शिकार, त्याची प्रेमासक्ती, इत्यादींमुळे राजाचे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्या काळात उज्जयिनीस परकीय आक्रमणांचा धोका संभवत होता. विक्रमादित्याने भर्तृहरीला त्याची कल्पनाही दिली. मात्र श्रुंगाररसात आकंठ बुडालेल्या भर्तृहरीस ते रुचले नाही. त्याने विक्रमादित्यासच राज्याबाहेर घालवून दिले.

त्या दरम्यान, उज्जयिनीत एक जयंत नावाचा ब्राम्हण राहत असे. त्याने केलेल्या तपःसाधनेच्या फलस्वरूप, त्याला एक दिव्य फळ प्राप्त झाले होते. त्या फळाचे सेवन केले असता, सेवन करणारा मनुष्य अमर होणार होता. ब्राम्हणाने विचार केला की, मी अमर होऊन कुणाचे भले होणार? त्यापेक्षा राजा अमर झाला तर त्यामुळे प्रजेचे भले होईल. म्हणून राजदरबारात जाऊन त्याने ते फळ राजास अर्पण केले. राजाचे राणी पिंगलेवर अपार प्रेम होते. त्याला असे वाटे की, राणी पिंगला जर अशीच चिरतरूण राहिली, तरच आपल्याला खरा सुखोपभोग संभव आहे. म्हणून त्याने ते फळ राणी पिंगलेला दिले. राजाच्या अनुपस्थितीत राणीने असा विचार केला की, आपल्याला खरे सुख महिपालाकडूनच मिळत असते. तेव्हा तोच जर चिरतरूण राहिला तर आपल्याला खरे सुख दीर्घकाळ लाभू शकेल. म्हणून तिने ते फळ महिपालाला दिले. महिपालाचे लाखा नावाच्या एका राजनर्तिकेवर मन जडले होते. त्याने असा विचार केला की आपल्याला जर चिरसौख्य हवे असेल तर, राजनर्तकी चिरतरूण रहायला हवी. म्हणून त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटत होते की, एका राजनर्तिकेने चिरतरूण होऊन काय साधणार, त्यापेक्षा राजा चिरतरूण झाल्यास सार्‍याच प्रजेला दीर्घकाळ सुखात ठेवेल. म्हणून एक दिवस राजदरबारात येऊन ते दिव्य फळ तिने राजास अर्पण केले. राजाने ते दिव्य फळ ओळखले. फळाच्या प्रवासाची हकिकत त्याने शोधून काढली आणि तो सुन्न झाला. त्याला वाटत होते की राणी पिंगलेचे त्याच्यावर अपार प्रेम आहे. प्रत्यक्ष राजाची राणी असलेल्या पिंगलेने, महिपालावर प्रेम करावे ह्या वास्तवाने, त्याला वैराग्य प्राप्त झाले. ताबडतोब, म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी, त्याने विक्रमादित्यास पाचारण करून, राज्य त्याचे सुपूर्त केले आणि संसारत्याग करून तो चालता झाला.

राजाचे वैराग्य पराकोटीचे होते. गुरू गोरखनाथांपाशी त्याने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याकरता आसक्तीचा संपूर्ण त्याग करणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्याच्या वैराग्याची परीक्षा घेण्याकरता, त्याला राणी पिंगलेकडून भिक्षा मागून आणण्यास सांगितले. राजाने तेही केले. “भिक्षा दे, माते पिंगले!” अशी त्याने भिक्षा मागितली. राणीच्या अविरत विलापानेही तो मुळीच द्रवला नाही. योगचर्या पत्करण्याच्या त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची, राणी पिंगलेची विनंती त्याने फेटाळून लावली. नंतर त्याने उज्जयिनी नगरीबाहेरील क्षिप्रा नदीच्या किनार्‍यावरील गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली. नाथपंथाच्या “वैराग्य ऊर्फ बैरागी” उपपंथाची त्याने स्थापना केली. पराकोटीच्या वैराग्याचे स्वतःचे अनुभवही, त्याने श्रुंगाराच्या अनुभवांप्रमाणेच काव्यात रचून ठेवले. ते काव्यही जनमानसात अजरामर झाले. त्या शंभर कवनांना वैराग्यशतक म्हणून ओळखले जाते. त्या सुरस काव्याची मोहिनी, भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यानंतरच्या सर्वच रचनांवर पडलेली आहे. उदाहरणार्थ पुढील वर्णन पाहा. त्यातील “कालाय तस्मै नमः” हा शब्दसमूह तर मराठी, हिंदी आणि संस्कृत साहित्यातील वाक्प्रचारच बनून राहिला आहे.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत् ।
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ।
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥ शार्दुलविक्रीडित, वैराग्यशतक-३९

म्हणजेः

ती माया नगरी, महान नृपती, मंत्रीहि सारे तसे ।
ती विद्वानसभा, तशाच ललना तेथील चंद्रानना ॥
तो गर्वोन्नत राजपुत्र, सगळे ते भाट, त्यांच्या कथा ।
हे ज्याचे कृतिने, स्मृतीत पुरले, काळा नमस्कार त्या ॥ - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

उत्तर आयुष्यात राजा, राजस्थानातील अलवार गावानजीक राहत असे. आजही तिथे राजा भर्तृहरीची समाधी आणि मंदिर आहे. तिथे पाण्याचे कायमच दुर्भिक्ष्य असे. आसपासच्या लोकांना राजास प्राप्त असलेल्या अद्भूत सिद्धी माहीत होत्या. त्यांनी त्यास, पाणी मिळवून देण्याची विनंती केली. आपल्या अलौकिक सिद्धीचा वापर करून राजाने पत्थरातून निर्झर उत्पन्न केले. राजस्थानातील लोककथांतून भर्तृहरीच्या असंख्य कहाण्या शतकानुशतके गायिल्या जात आहेत. उत्तर आयुष्यातील समृद्ध अनुभवांच्या आधारे, राजाने, जगात कसे वागावे ह्याचे सुरेख उद्बोधन शंभर कवितांत करून ठेवले आहे. ह्या शंभर कवनांना नीतीशतक म्हटले जाते. नीतीशतकांतील काव्य, भारतीय संस्कृतीत एखाद्या चमचमत्या तेजस्वी तार्‍याप्रमाणे कायमच तळपत आलेले आहे. उदाहरणार्थ पुढील कवनात तर त्याच्या स्वतःच्या जीविताचे सारच जणू भर्तृहरीने काव्यात गुंफून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या ते निंदनीय आहे असे सांगून, अशा वर्तनांचा धिक्कारही केला आहे.

यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता ।
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ॥
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या ।
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - वसंततिलका नीतिशतक-२, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजे:

मी जीस चिंतीत असे, न रुचे तिला मी ।
जो आवडे तीस, तयास रुचे परस्त्री ॥
तो आवडे ना परस्त्रीस, मला वरे ती ।
धिक्‌ तीस, त्यास, मदनास, हिला, मलाही ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१४१०२३

राजाचे अनुभव अत्यंत समृद्ध होते. त्याची भाषा अतिशय श्रीमंत होती. अनुभवांचे सार काव्यबद्ध करून ठेवत असतांना त्याला भाषेची रंगत उमगली. त्याने संस्कृत भाषेच्या व्याकरणावर “वाक्यपदीय” ह्या नावाचा अलौकिक ग्रंथ रचला. त्यातील “स्फोट” सिद्धांताने, त्यानंतरच्या संस्कृत भाषारचनांवरील सर्व ग्रंथांत मानाचे स्थान मिळवले आहे. तोंडातून फुटणार्‍या अविभाज्य उच्चारांचे “वर्ण” असे वर्णन करण्याची संकल्पना ह्याच सिद्धांताचा भाग आहे.

राजा भर्तृहरी उज्जयिनीचा राजा असला तरीही, सर्व भारतभर तो लोककथांतून अजरामर झालेला आहे. दक्षिण भारतात भर्तृहरीकथांचे निरूपण केले जाते. उत्तर भारतात त्याच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्याच्या उज्जयिनीत, लोकांच्या व्यवहारात त्याच्या शतक काव्यांची अमिट छाप पडलेली दिसून येते. तर त्याचे कर्तृत्वक्षेत्र असलेल्या राजस्थानात आजही, त्याच्या नावे यात्रा भरतात, मंदिरे घडविली जातात, आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्याची शिकवण लोकमानसावर संस्कार करत असते. राजा भर्तृहरीच्या शतकत्रयीने, इतर संस्कृत साहित्यावर सखोल ठसा उमटवला आहे. शतकानुशतके जनमानसावर राज्य केले आहे. अनेक भारतीय भाषांतील वाक्प्रचार आणि म्हणी ह्यांत शतक-त्रयींतील श्लोक अभिव्यक्त झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” हे वाक्यही, वामन पंडितांनी मराठीत अनुवाद केलेल्या भर्तृहरीच्याच एका कवितेचा एक चरण आहे [२].

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च ।
मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः॥
कदाचिदपि पर्यटन्शशविषाणमासादयेन्नतु ।
प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ - नीतिशतक-५, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व ५५४ वर्षे

म्हणजेः

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे ।
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीही वितळे ॥
सशाचेही लाधे विपिनी फिरता शृंगही जरी ।
परंतु मूर्खाचे हृदय धरवेना पळभरी ॥ - मराठी अनुवादः वामन पंडित, इ.स.१६८० ते १६९५

स्वतः राजा भर्तृहरी मात्र पूर्वसुरींच्या पुण्यप्रभावाने अतिशय प्रभावित झालेला होता. पतंजलि मुनींबाबत तर त्याला विशेष आदर वाटत असे. पुढील कवनातून तो यथार्थपणे अभिव्यक्त होतांना दिसतो.

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानितोऽस्मि ॥ - राजा भर्तृहरी [३]

म्हणजे, योगाचे साहाय्याने चित्तशुद्धी, पाणिनीच्या सूत्रांवर “महाभाष्य” लिहून वाचाशुद्धी आणि चरक संहितेच्या पुनर्संस्करणाद्वारे वैद्यकाचे आधारे शरीरशुद्धी, ह्यांची साधने उपलब्ध करून देणार्‍या पतंजलि मुनींना, मी अंजलीबद्ध करतो. अशाप्रकारे आपल्या “वाक्यपदीय” ह्या ग्रंथात पतंजलि मुनींबाबत गौरवपर उद्गार काढणार्‍या राजा भर्तृहरीने, पुढे त्यांचाच वारसा चालवला. नाथसंप्रदायात योगसाधना करत असता, “वैराग्य ऊर्फ बैरागी पंथ” स्थापन केला. “वाक्यपदीय” ग्रंथाची रचना करून वाचाशुद्धीचा वसा चालवला. तसेच पत्थरांतून निर्झर निर्माण करून शरीरशुद्धीची साधने सामान्यांना उपलब्ध करून दिली. एवंगुणविशिष्ट राजा भर्तृहरीस सादर प्रणाम!

अशा राजा भर्तृहरीचे तपश्चर्यास्थळ पाहण्याची उत्कंठा मला बर्‍याच काळापासून लागून राहिलेली होती. आता आम्ही तिथे प्रत्यक्षात पोहोचलो होतो. राजा भर्तृहरी आणि गोपीचंद ह्यांच्या गुहा शेजारी शेजारीच आहेत. उज्जयिनी शहराच्या उत्तरेला, क्षिप्रा नदीच्या पूर्व किनार्‍यावर हे ठिकाण आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुव्यवस्थितपणे राखलेले हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. कुठल्याही पर्यटकाने त्यास अवश्यमेव भेट द्यावी. वाहनतळापासून लांबलचक छन्नमार्गातून पायर्‍या पायर्‍यांची वाट आपल्याला ह्या गुहांपर्यंत घेऊन जाते. त्यांच्या नजीकच गोरखनाथांचे सुरेख, भव्य मंदिरही आहे.

भर्तृहरी गुहेनजीकच्या गोरखनाथ मंदिरातील गोरखनाथांची आणि मच्छिंद्रनाथांची मूर्ती

गुरूशिखरावर वाहणार्‍या वार्‍याचे वर्णन गोरखनाथांनी “पवनही भोग, पवनही योग, पवनही हरे छत्तीसो रोग” असे केले होते. ते म्हणतात तसा वारा वाहत असणारी सिद्धकाली मंदिराची टेकडी आम्ही त्या दिवशी संध्याकाळीच पाहिली. हे मंदिर पश्चिम इंदौरमध्ये विमानतळ रस्त्यावर आहे. आतापुरता मात्र आम्ही मंगळनाथ मंदिराच्या दिशेने मोर्चा वळवला. उज्जयिनी शहराच्या उत्तरेकडील टोकास हे मंदिर आहे. ह्या ठिकाणास मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. कर्कवृत्ताची रेषा ह्या ठिकाणातून पार होते असे म्हणतात. शिरावर पोवळ्याच्या रंगाचा खडा जडवलेल्या शिवलिंगाच्या स्वरूपातील मंगळाचे इथे पूजन केले जाते. नंतर आम्ही परतीच्या वाटेवर सांदिपनी ऋषींच्या आश्रमास भेट दिली. बलराम, कृष्ण आणि सुदामा ह्यांचे हे गुरूकूल. त्याकाळी उज्जयिनी उपाख्य अवन्ति नगरी शिक्षणाकरता विख्यात होती.


मंगळनाथ मंदिर आणि सांदिपनी आश्रम

मात्र आता दुपारचा दीड वाजत आलेला होता. जेवायची वेळ होत होती. आम्ही उज्जयिनी स्थानकासमोरच्या न्यू सुदामा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. रुचकर आलुपराठा-दही, जिरा-राईस आणि रस-मलाईचा आस्वाद घेऊन आम्ही आमच्या सकाळच्या स्थलदर्शनाचा समारोप केला.

संदर्भः

१. इंदौरचे हवामानचित्र
२. भर्तृहरीकृत सार्थ श्रुंगारशतक, वैराग्यशतक आणि नीतीशतक, वामन पंडितांनी केलेल्या मराठी पद्य अनुवादासहित; वरदा प्रकाशन, सप्टेंबर २००५, किंमत प्रत्येकी रु.२५/- फक्त.
३. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, प्रथम आवृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतीय आवृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर

२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर

उज्जयिनीच्या लोहमार्ग स्थानकावरील विश्रामकक्षातच दुपारी थोडासा आराम करून, सुमारे तीन वाजता आम्ही स्थानकाधिकार्याहस विश्रामकक्ष सुपूर्त केला आणि इंदौरच्या दिशेने कूच केले. पहिले स्थलदर्शन, विमानतळ रस्त्यावरील “गोमतगिरी” हे जैन तीर्थक्षेत्र होते. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर होते. भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती होती. इथे पर्यटक मात्र फारसे दिसले नाहीत.


बाहुबलीची विशाल प्रतिमा भव्य फरसबंद आवार


शेजारच्याच टेकडीवरचे सिद्धकाली मंदिर आणि मंदिरापाठची सिद्धकालीमातेची मूर्ती

आजचा मुक्काम आमचा नखराली ढाणीत होता. “नखराली ढाणी” हे इंदौरच्या दक्षिणेला महू रस्त्यावर १४ किलोमीटर अंतरावर, रंगवासा, राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. इथे राजस्थानी आणि माळवी संस्कृतीची झलक आपण पाहू शकतो. एका अल्पोपहारगृहाच्या सजावटीचा भाग म्हणून सुरूवात होऊन एवढ्या वर्षांत, इंदौरी रुचीकर सांजजीवनाचे प्रतीक म्हणून ते विकसित झाले आहे. राजस्थानी आणि माळवी सांस्कृतीची झलक म्हणून ते आज सर्व मध्यप्रदेशात विख्यात आहे. २८ एकर भूमीवर वसलेले हे गाव, आपल्याला पारंपारिक उत्सवी वातावरणात घेऊन जाते. पारंपारिक मनुहारी पद्धतीने केळीच्या पानावर राजस्थानी आणि माळवी रुचकर खाद्यपदार्थांचा आपल्याला आस्वाद घेता येतो. त्यात दाल-बाफेली, बाजरा रोटी, दाल-खिचडा असे अनेकानेक पदार्थ समाविष्ट असतात. ह्या गावात प्रवेश करण्यासाठीचे शुल्क दरमाणशी ४७० रुपये इतके असते. ह्यातच ह्या जेवणाचाही समावेश होत असतो. ह्याव्यतिरिक्त कठपुतळी, जादूचे प्रयोग, संगीत-नृत्याचे कार्यक्रम, उंटावर सवारी इत्यादी कार्यक्रमांतूनही सहभागी होता येते. प्रत्येकी ४७० रुपये किंमतीचे निराळे तिकीट काढून आम्ही ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आम्हीही इंदौरमध्ये राहण्याकरताही ह्या जागेचीच निवड केली होती. मात्र सुमारे २० किलोमीटर शहराबाहेर असल्याने, रहिवासाच्या उद्दिष्टाकरता हे गैरसोयीचे ठरते असे लक्षात आले. रहिवास खर्चाच्या दृष्टीने मात्र शहरातील रहिवासापेक्षा हा रहिवास अर्ध्याच खर्चात प्राप्त होत असतो.


नखराली ढाणीतील भोजन आणि रहिवासाची व्यवस्था

दुसरे दिवशी सकाळी ९०० वाजताच्या सुमारास आम्ही तयार होऊन इंदौर शहराच्या स्थलदर्शनार्थ बाहेर पडलो. लालबाग महालाचे मुख्य प्रवेशद्वार १००० वाजता उघडत असल्याने, पहिल्यांदा बडे गणपती मंदिरात गेलो. हे मंदिर एका खासगी मालमत्तेचा भाग आहे. इंदौरातील असंख्य भाविक इथे दर्शनास येत असले, तरी पर्यटकाने हे मंदिर प्राधान्याने पाहावे असे नाही. मंदिरात व्यवस्थित बसता येईल अशी जागाही नाही.



अन्नपूर्णा मंदिर आणि त्यापाठीमागचे प्रशस्त वेदमंदिर सभागृह

नंतर आम्ही गेलो अन्नपूर्णा मंदिरात. हे मंदिर भव्य, सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराच्या पाठीमागे एक वेदपाठशाळा आणि वेदांचे मंदिरही आहे. हे मंदिर म्हणजे वेदपठणाकरताचे प्रशस्त सभागृहच आहे. त्यात चारही वेदांच्या मूर्ती आहेत.


वेदमंदिराचे प्रवेशद्वार, वेदविद्यापीठाची इमारत, कासव आणि नंदी, विश्वरूपदर्शन देखावा

त्यातील वेदांच्या मूर्ती मी पहिल्यांदाच पाहत होतो. अथर्ववेद हनुमानासारखा तर सामवेद नंदीसारखा दिसत होता. यजुर्वेद आणि ऋग्वेद नंदीसारखे दिसत होते. याबाबत मला काहीच माहिती नव्हती. अन्नपूर्णा देवीची शोभा यात्रा त्रिंबकेश्वरला रवाना होत असल्याने तिथेही कुणी माहिती देण्याच्या परिस्थितीत नव्हते. वेदांच्या मूर्तींच्या डोक्यावरच्या भिंतीवर गीतेतील विश्वरूपदर्शनाचा देखावा चितारलेला होता.


वेदमूर्ती अशा का आहेत ते मला माहीत नाही.


त्रिंबकेश्वरला निघालेला अन्नपूर्णा शोभायात्रेचा रथ आणि त्याचाच पाठीमागचा देखावा

कुणाही पर्यटकाने अवश्य भेट द्यावी असेच हे अन्नपूर्णा मंदिर आहे. नंतर आम्ही जैनांचे काचमंदिर पाहिले. तळ, भिंती आणि छतही काचांचे भौमितिक तुकडे जडवून सुशोभित केलेले आहेत. ह्याव्यतिरिक्त विशेषत्वाने भेट द्यावी असे इथे काहीही नाही. ते पाहून झाल्यावर आम्ही जुना राजवाडा पाहण्यासाठी गेलो. हा होळकरांचा सात मजली राजवाडा हल्ली पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून सुव्यवस्थित व स्वच्छ ठेवलेला आहे.


सात मजली राजवाडा, त्याचे आतल्या बाजूने दर्शन, १ल्या मजल्याचा जिना


१ल्या मजल्याचे प्रवेशद्वार, दिवाणखाना, जाळीदार दगडी खिडकी


राजदरबार, राजगद्दी

राजवाडा पाहून होता होताच आम्हाला राजवाड्यातील उजवीकडच्या भिंतीजवळील, जिन्याशेजारचे महाद्वार उघडतांना दिसले. एक दुचाकी आत आली. आम्ही चौकीदारासच विचारले की, “काय हो, इकडे मल्हारी मार्तंड मंदिर कुठे आहे?” त्याने ताबडतोब दार उघडून धरले आणि बाहेरून राजवाड्यापाठीमागे गेल्यास ते दिसेल असे सांगितले. आम्ही बाहेर पडताच दरवाजा बंद करून घेतला. म्हणजे आम्ही काय वेळ साधली होती! वा!! एरव्ही आम्हाला राजवाड्यातून बाहेर पडून पुन्हा त्याच्या उजवीकडून पाठीमागेपर्यंत मोठाच वळसा पडला असता. असो.

आम्ही मल्हारी मार्तंड मंदिर पाहिले आणि आम्हाला आमच्या प्रयासाचे सार्थक झाले असे वाटले. ते खरोखरीच पाहण्यासारखे आहे. स्वच्छ सांभाळले आहे. तिथे आम्हाला अतिशय प्रसन्न वाटले. होळकरांच्या राजघराण्याचे असंख्य तपशील असलेले फलक निवांत वाचता आले. मल्हारी मार्तंडाचे दर्शनही झाले.


डाव्या बाजूस शिवलिंग मध्यभागी गणेशमूर्ती नटराजमूर्ती उजव्या बाजूस शिवमूर्ती


डाव्या मार्गिकेतील नटराज, दुरून जवळून मधल्या चौकातील हिरवाई


मल्हारी मार्तंड मंदिर, मंदिराचा अंतर्भाग


होळकरांची राजमुद्रा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, पालखीचे साहित्य

ह्यानंतरचे स्थलदर्शन होते लालबाग महालाचे. हिरव्यागार वृक्षराजीने नटलेल्या विस्तीर्ण आवाराच्या अंतरंगात हा भव्य महाल विराजमान आहे. पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत असल्याने १० रुपये प्रवेश तिकीट आहे. आजूबाजूची बाग निगुतीने फुलवलेली आहे. महालात कॅमेरा वर्ज्य असल्याने आतले फोटो नाहीत.


लालबाग महालाचा दर्शनी भाग, भव्य प्रवेशद्वार, महालाची उजवी कडा

जुना राजवाडा आणि लालबाग महालातील समृद्धीवरून होळकरांच्या मराठी सत्तेची, हुकुमतीची पुरेशी कल्पना येते. सर्व उत्तर भारतातील, महत्त्वाच्या सर्व नद्यांवर घाट बांधणे; धर्मक्षेत्री धर्मशाळा उभारणे; जागोजाग शिक्षणाची, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करवून देणे इत्यादी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या समाजोपयोगी पुण्यकर्मांचा वास्तविक आधार, हीच प्रजासंपत्ती होती. मात्र तिचा सदुपयोग भारतात, अहिल्यादेवींइतका कुठल्याही शासकाने केल्याचा इतिहास नाही. धन्य त्या माळव्यातील प्रजेची, जिने आपल्या अथक परिश्रमांतून एवढ्या भव्य संपत्तीची निर्मिती केली आणि धन्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचीही, ज्यांनी प्रजेची संपत्ती प्रजाकारणी व्ययास लावली.


महाजालावरून घेतलेले हे अंतर्भागातील प्रकाशचित्र आतल्या समृद्धीचे प्रतीक आहे.


गुरूकृपा रेस्टॉरेंटमध्ये महेश्वरला सहस्रधारा धबधब्याकडे

एवढे स्थलदर्शन होता होताच भूकही लागली होती. आम्ही स्टेशननजीकच्या गुरूकृपा रेस्टॉरेंटमध्ये रुचकर जेवण घेतले आणि महेश्वरची वाट घरली. वाटेत आम्ही पाताळपाणीचा धबधबा पाहणार होतो. मात्र महू (खरे तर, एम.एच.ओ.डब्ल्यू., म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर) पासून पुढे तासभर खडतर रस्त्याने प्रवास केल्यावर, रस्त्याच्या बांधकामाकरता अरुंद रस्त्यावर खडीचे ढिगारे रचून, मोठमोठी उठाठेव यंत्रे, खडी पसरवित होती. सुमारे एक किलोमीटर असल्या रस्त्यावरून गेल्यास, आमचे वाहन रूतून बसेल व बाहेर काढण्यात बराच वेळ जाऊ शकेल. ह्या चालकाच्या सूचनेवर आम्ही त्यालाच योग्य तो निर्णय घेण्यास सांगितला. त्याने पाताळपाणीचा नाद सोडून आम्हाला पुन्हा महूस आणले व मग महेश्वरचा राजमार्ग पत्करला.

संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही महेश्वरच्या “नर्मदा रिट्रिट” ह्या मध्यप्रदेश पर्यटन विकास मंडळाच्या (एम.पी.टी.डी.सी.च्या) रहिवासात जाऊन पोहोचलो. नितांत रम्य परिसरात, विस्तीर्ण आवारात वसलेला हा रहिवास, होळकरांच्या किल्ल्यापासून जवळच, नर्मदा तटाकी, उंचावर वसलेला आहे. आवारातून एक रस्ता सरळ किनार्‍यावरील नावांच्या धक्क्यावर लागतांना दिसला. आता झपाट्याने अंधार पडणार होता. म्हणून जलदीने चहापान करून, आम्ही लगेचच धक्क्यावर गेलो. आठ आसनांच्या स्वयंचलित नौकेतून आम्हाला तासाभरात सहस्रधारा धबधब्यापर्यंत फिरवून आणण्यासाठी नावाडी (नावाड्याला इकडे केवट म्हणतात) आठशे रुपये मागत होता. वेळ महत्त्वाची असल्याने आम्ही किंचितही वाद केला नाही. ती मुँहमांगी किंमतच मंजूर करून, सरळ नावेत जाऊन बसलो.


मावळत्या सूर्याकडे मजेचा प्रवास दक्षिण तीरीच्या वालुकाश्मी कातळावर नाव बांधून ठेवली

आकाश नावाचा आमचा अकरावीतला केवट, आम्हाला सहस्रधाराकडे घेऊन जाऊ लागला. नर्मदा नदी पश्चिमवाहिनी आहे. तिच्या उत्तर तीरावरून आम्ही बोटीत बसलो आणि प्रवाहाच्या दिशेने काही किलोमीटर अंतरावरील धबधब्याकडे जाऊ लागलो. दक्षिण तीरावरील धबधब्यानजीकच्या एका वालुकाश्मी कातळावर नाव बांधून ठेवली आणि पायीच सहस्रधारापर्यंत जाऊन आलो. धबधब्याचा आवाज, पार परतेपर्यंत कानात गुंजत होता. थंड हवेच्या झुळूकांतून केलेले ते नौकानयन खरोखरीच संस्मरणीय झाले होते.


परततांना दिवेलागणी झालेली होती. पर्यटन समाधानकारक होत होते. चालक विनय उदार (विनय हेच त्याचे नाव आणि उदार हेच त्याचे आडनाव होते) होता. तो विनयशील होता. तक्रारीस जागाच नव्हती.

मध्यप्रदेश सरकारने स्थानिक कोष्ट्यांच्या सहकारी संस्थेस चालवायला दिलेले दुकान रहिवासी आवारातच होते. आम्ही ताबडतोब संधीचा लाभ घेतला. दोन उत्तम साड्यांची खरेदी झाली. अडचण फक्त एकच होती. त्या संध्याकाळच्या उजेडात असंख्य पावसाळी कीडे त्या दुकानात स्वैर उडत होते. ग्राहक आम्हीच काय ते होतो. त्यामुळे निवांत पाहण्या, घेण्याचा कार्यक्रम पार पडला. फक्त सुती, रेशमी साड्या उलगडून पाहतांना आणि घड्या घालतांना त्यात कीडा राहून जायला नको म्हणून अतोनात काळजी घ्यावी लागत होती. कारण एखादा कीडाही जर राहून गेला, चिरडला गेला, तर साडीला कायमस्वरूपी रंगखूण देऊन जाणार होता.


आता आम्ही रहिवासात पोहोचलो होतो आणि वेळ होती माहेश्वरी, चंदेरी साडी खरेदीची.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा

दुसरे दिवशी सकाळी आमचा महेश्वर दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केलेला होता. सकाळीच उठून तयार झालो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दर्शनार्थ होळकरांच्या राजवाड्यात दाखल झालो. अहिल्यादेवींच्या स्मृतीस सादर झालो. आपल्या तुलनेत अहिल्यादेवींची उंची, यथातथ्यपणे दाखवून देणार्‍या भव्य दिमाखदार पुतळ्यास, राजवाड्याच्या दर्शनी भागातच ठेवलेले आहे.

राजवाड्याच्या मागील बाजूस नर्मदेचे चाळीस घाट, दोन्ही तीरांवर व्यवस्थित प्रस्थापित केलेले दिसतात. राजवाड्यातून एका विशाल जिन्याने पूर्वेकडे उतरल्यावर अहिल्येश्वर मंदिर लागते. काळ्या कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तीशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. भव्य, प्रसन्न, स्वच्छ, सुंदर परिसरात सकाळच्या रामप्रहरी विहरतांना आम्हाला पर्यटनाचा अपार आनंद होत होता. मुंबईतून निघून योग्यच ठिकाणी पर्यटनास पोहोचल्याचे समाधान होत होते. अशा ठिकाणी जे लोक कायमस्वरूपी वास्तव्य करून होते, सुखेनैव राहू शकत होते त्यांच्याविषयी काहीशी असूयाच वाटू लागली होती.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील चोंडी गावच्या माणकोजी शिंद्यांची मुलगी अहिल्या [४], ही सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एकुलत्या एक पुत्राची -खंडेरावाची- भार्या बनून कीर्तिशालिनी झाली. होळकरांची सून झाल्यानंतरच अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक वलये प्राप्त झाली. पती सहवासाचे सुख दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला फारसे आले नाही. कर्तबगार, धार्मिक व उदार वृत्तीचा, मायेचा ओलावा लाभलेला सासरा आणि कणखर, करारी सासू गौतमाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाईत आमूलाग्र बदल झाला. आयुष्यातील काटेरी वाट सुरुवातीला त्यांनी सासू-सासर्‍यांच्या धीरावरच चालण्याचा प्रयत्न केला. खंडेरावांच्या चितेवर सती जाण्याच्या तयारीत असलेल्या अहिल्येला तिच्या सासर्‍यांनीच, तिच्या राजकीय कर्तव्याची जाणीव करून देत, या विचारापासून परावृत्त केले. तत्कालीन काळखंडातील त्यांचे हे पुरोगामित्व, आज आपल्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरते. सुनेला वाचायला, लिहायला शिकवले. घरची कामे, फौजेची व्यवस्था, वसुली, शत्रूच्या हालचालींवरची नजर या सार्‍यांची शिकवण तिला दिली, ती तिची पारख करूनच. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर त्या एकाकी पडल्या खर्‍या, पण सासर्‍यांनी त्यांना खर्‍या अर्थाने कर्तबगार व आत्मनिर्भर घडविलेले असल्याने, येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला त्यांनी मोठ्या हुशारीने, आत्मविश्वासाने तोंड दिले. त्यांचे शांत संयत रूप, परमेश्वरावरील निस्सिम श्रद्धा, या कामी महत्त्वाची ठरली. महेश्वरला भेट दिल्यानंतर आपल्याला याची साक्ष पटते. अहिल्याबाईंनी महेश्वरला राज्याच्या राजधानीचे ठिकाण हलविले होते. तेथूनच त्यांनी राजकारण केले. खरेतर अहिल्याबाई होळकरांचा अठ्ठावीस वर्षांचा कालखंड हा राजकारणापेक्षा समाजकारणाचाच अधिक होता, हे त्यांनी केलेल्या तत्कालीन कामावरूनच लक्षात येते.


राजवाड्याच्या परसातून दिसणारे नर्मदेचे घाट, सकाळच्या उन्हातील अहिल्येश्वर मंदिराचे दर्शन


मंदिरातील नक्काशीचे सुरेख नमुने. कातळातल्या त्या पत्थरी सौंदर्याची आपल्याला भुरळ पडत जाते.


मंदिरातून नर्मदा नदीत उतरणारा देखणा घाट व घाटावर विखुरलेल्या असंख्य शिवलिंगांपैकी एक.

मग आम्हाला एक माणूस भेटला. त्याचे नाव शेरू केवट. त्याने आम्हाला काल नदीच्या मध्यभागी एका बेटावर एकाकी उभ्या असलेल्या मंदिराचे नाव सांगितले. बाणेश्वर. त्याची एक स्वयंचलित आठ आसनी नावही होती. त्या नावेतून सुमारे अर्ध्या तासात बाणेश्वर दर्शन करून आणण्याचे तो तीनशे रुपये मागू लागला. पर्यटक असे आम्हीच काय ते होतो. आम्ही लगेचच होकार देऊन बाणेश्वराकडे कूच केले. सकाळच्या कोवळ्या उन्हातला तो नौकाप्रवास खरोखरच सुखकर होता. पावसाळ्यात एकेकदा नखशिखांत सगळेच जलमग्न होणारे, ते एकाकी बेटावरील मंदिर, सुंदर होते. पश्चिमाभिमुख होते. कोरीव कातीव पत्थरांतून चुनेगच्ची बांधकामाने घट्ट सांधलेले होते.


पूर्वेकडूनचे दर्शन, पश्चिमेकडूनचे दर्शन, पायर्‍या चढूनचे दर्शन व मंदिरालाच बांधलेली नाव


शिवलिंग पाठीमागची मूर्ती आणि मंदिराच्या पायर्‍यांवर आम्ही


अहिल्येश्वर मंदिरातील सुबक, सुंदर शिल्पाकृतींचे आणखी काही नमुने

अहिल्येश्वर मंदिरसमूहातून बाहेर पडल्यावर उजव्या हाताला कार्तवीर्याचे मंदिर आहे. म्हणजे सहस्रार्जुनाचे मंदिर. रामायण आणि महाभारतात उल्लेख असलेल्या महिष्मती नगरीचेच आधुनिक नाव महेश्वर आहे. महिष्मतीचा प्राचीन प्रशासक म्हणजे सहस्रार्जुन ह्याचेच ते मंदिर आहे. मात्र हे मंदिर महेश्वरात राजराजेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. “उपनिषद् की कथाए [५]” ह्या अनुदिनीवर कार्तवीर्याची पूर्ण गोष्ट सारांश रूपाने सांगितलेली आहे.


नवे राजराजेश्वर मंदिर, जुने राजराजेश्वर मंदिर आणि नर्मदा रिट्रिटमधून दिसणारे बाणेश्वर मंदिर

संदर्भः

४. अहिल्याबाई होळकरांची स्मृती जागवणारे: महेश्वर, सौ.पौर्णिमा केरकर, २७ ऑक्टोंबर २०१४

५. उपनिषद् की कथाए: काल का ग्रास

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर

२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू ओंकारेश्वर


रूपमती महालातील जलाशयातील वरच्या कमानींचे प्रतिबिंब. बाजबहाद्दुर महालातील पुष्करणी.

आजचा मुख्य स्थलदर्शनाचा कार्यक्रम मांडवगड उपाख्य मांडूचा होता. त्यामुळे आता नाश्ता करून आम्हाला निकडीने प्रवासास सुरूवात करायला हवी होती. तासा दीड तासातच आम्ही मांडूस पोहोचलो. किल्ल्याचे सर्वसारणतः तीन भाग पडतात. रेवाकुंड ह्या तिसर्‍या खंडापासून आम्ही सुरूवात केली.

प्रतिध्वनीस्थळावर उच्चारलेले शब्द त्यापासून सुयोग्य अंतरावर बांधलेल्या एका इमारतीद्वारे परिवर्तित होऊन प्रतिध्वनी ऐकू येतो. मी मोठ्याने हरहर म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. मी मोठ्याने महादेव म्हणालो. काही सेकंदातच आम्हाला तेच शब्द पुन्हा ऐकू आले. शेजारीच स्थानिक रानमेवे विकणारी एक मुलगी बसलेली होती. तिच्याकडे होत्या गोरखचिंचा. कच्च्या गोरखचिंचांचा गर सांधेदुखीवर उत्तम इलाज असल्याने आम्ही तो घेतला. मग आम्ही शाही परिसर उर्फ पहिल्या खंडात आलो. होशंगशहाचा मकबरा, जामी मशीद असलेला दुसरा खंड आम्ही वेळे-अभावी स्थलदर्शनातून वगळला.


प्रतिध्वनीस्थळ. आवळे, चिंचा, गोरख चिंचा आणि कवठे. शाही परिसर


जहाज महाल सुबक पुष्करणीचा कलात्मक फोटो

चारही बाजूंना विशाल जलाशय असल्याने महाल खरोखरीच तरंगत्या जहाजासारखा दिसतो. म्हणूनच ह्याचे नाव जहाज महाल पडले आहे. ह्या आणि बाजूच्या हिंडोला महालातील बांधकाम कमानींच्या वास्तुरचनेतून केलेले आहे. भिंतींतले जिने, पुष्करण्या, चबुतरे, छत्र्या आणि सज्जे ह्यांनी सुशोभित असलेल्या ह्या इमारती पाहता पाहता खूप लांबलचक अंतरे चालावी लागतात आणि पायही भरून येतात. मात्र पाहण्यासारखी ठिकाणे संपतच नाहीत. हौसेने हिंडून पाहावा असाच हा सर्व परिसर आहे. पुरातत्त्वखात्याने आपल्या नेहमीच्या शिरस्त्याने स्वच्छ, व्यवस्थित आणि शिस्तीत सांभाळला आहे.


जहाजमहालावरूनचा देखावा आणि डौलदार गोरखचिंचेचे झाड हीच तर मांडूची खरी वैशिष्ट्ये आहेत.

आता मात्र दुपारचा एक वाजून गेलेला होता. सूर्य आग ओकत होता आणि पोटात कावळेही कोकलू लागलेले होते. मांडुतून असंतुष्ट अंतःकरणाने नाईलाजानेच पाय बाहेर काढावा लागला. बर्‍यापैकी खानावळीत १२० रुपयांना थाळी मिळेल असे कळले. घेतली खरी पण तिखटजाळ भाजीचा घासही घशाखाली उतरेना. मग नेहमीचाच उपाय केला. दही मागितले. साखर मागितली. दही-साखरेच्या उतार्‍याने जेवण सुखरूप पार पडले. दही मात्र चांगले होते. ह्या संपूर्ण प्रवासातच सुरेख दही आणि हो, छाछही आवडेल असेच मिळाले. जेवण झाल्यावर ओंकारेश्वरापर्यंतचा सलग सुमारे तीन तासांचा प्रवास आता करायचा होता. पुढील आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.


आकर्षणही तसेच जबरी होते. ओंकारेश्वराचे.

ओंकारेश्वर धरणानंतर प्रवाहाच्या खालच्या बाजूला नर्मदा नदी एका कठीण खडकावर जाऊन दुभंगते. तिचे दोन प्रवाह होतात. पूर्वेला अमरकंटकच्या डोंगरात उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाट चालणार्या नदीचा उत्तरेकडचा प्रवाह मग कावेरिका म्हणून ओळखला जाऊ लागतो, तर दक्षिणेकडील प्रवाहाचे नाव नर्मदाच राहते. हे प्रवाहही काही किलोमीटरचा स्वतंत्र प्रवास करून मग पुन्हा परस्परांस मिळतात. त्या ठिकाणाला कावेरिका आणि नर्मदेचा संगम म्हणून ओळखले जाते. दोन्ही प्रवाहांमधील जागेचे एका बेटात रूपांतर झाले आहे. ह्या बेटावर असलेल्या पर्वतास, ह्या जागेचा प्राचीन शासक मान्धाता ह्याचेच नाव मिळालेले आहे. हा पर्वत आकाशातून पाहिल्यास दक्षिणाभिमुख ओंकार आकारासारखा आहे. म्हणूनच ह्या ठिकाणाला, बेटाला आणि ज्योतिर्लिंगालाही ओंकार नावानेच संबोधले जाते.

आदी शंकराचार्यांनी सर्व भारताचे पदभ्रमण केले होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक जागेची वैशिष्ट्ये उत्तम रीतीने नोंदवूनही ठेवलेली होती. ओंकारेश्वराबद्दल बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्रात ते लिहीतातः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।
सदैव मांधातृपुरे वसंतं ओंकारमीशं शिवमेकमीडे ॥

म्हणजे कावेरिका आणि नर्मदा ह्यांच्या संगमावर, मांधाता पर्वतनगरीत, सज्जनांच्या परिरक्षणार्थ, सदा वास्तव्य करत असलेल्या शिवाने माझे रक्षण करावे.

मांधाता पर्वतावर चित्रात दिसणारा ओंकाराचा आकार म्हणजे प्रत्यक्षात बांधीव पायर्‍या पायर्‍यांच्या "गीता परिक्रमा मार्ग"च आहे. ह्या मार्गावर उजव्या बाजूस ६९७ गीतेचे श्लोक वालुकाश्माच्या फलकांत कोरून जागोजाग क्रमवार बसवलेले आहेत. नितांत सुंदर, अखंड वैविध्याने नटलेल्या, पर्वतीय चढ-उताराच्या, निसर्गाच्या सान्निध्यातून वाट चालणार्‍या ह्या परिक्रमामार्गावरून चालत जाणे खरोखरीच सुखावह वाटले. सात किलोमीटर लांबीचा हा मार्ग जणू मुक्तीचा मार्गच आहे. नैसर्गिक वैविध्यांची आणि वैशिष्ट्यांची कमाल पखरण असलेले भारतीय भूप्रदेश जर कुणी सूचीबद्ध करेल, तर त्यात ओंकारेश्वराचे स्थान निस्संशय वरचेच असेल. लोक ओंकारेश्वरास का जातात मला माहीत नाही. मला मात्र ह्या परिक्रमेचे फारच आकर्षण वाटले आणि आता कायमच ते माझी सोबत करत राहणार ह्यात मुळीच शंका नाही.

ओंकारेश्वरातील पहिली रात्र चांगली झोप झाल्यानंतर पहाटेसच जाग आली. झपाट्याने आन्हिके उरकून ज्योतिर्लिंग दर्शनाचा कार्यक्रम निश्चित केलेला होता. त्यानुसार इंडिकात बसून प्रस्थान केले. नर्मदेच्या दक्षिण तीरावर असलेल्या आमच्या अतिथीगृहातील कक्षातून मांधाता पर्वत सहजच पाहता येत होता. दोन्ही तीरांना जोडणारा पूल आणि त्यापाठचे ओंकारेश्वर धरणही स्पष्ट दिसत होते. मात्र ओंकारेश्वर गाव छोट्या छोट्या गल्लीबोळांतून वसलेले असल्याने, प्रत्यक्षात समोरच दिसलेल्या त्या पुलापर्यंत पोहोचण्यास गाडीने सुमारे दहा मिनिटे लागली. मांधाता पर्वतावर स्वयंचलित वाहने जाऊ शकत नसल्याचे कळून आले. मग पुलाच्या अलीकडील टोकाशी असलेल्या वाहनतळावर गाडी उभी करून, विनोबा एक्सप्रेसने पुलापलीकडे पोहोचलो. पूल उंचावर आहे. त्यामुळे पूल संपताच खाली उतरावे लागते. मग त्याच पुलाच्या खालच्या बाजूने उजवीकडे जाणारा सरळ रस्ता ओंकारेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. तिथून आणखी सुमारे पाच-दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो.


मध्यप्रदेश पर्यटनविकासमंडळाचे अतिथीगृह व तिथून मांधाता पर्वतावर दिसणारी शिवमूर्ती.


अतिथीगृहातून दिसणारा मांधाता पर्वत रात्रीच्या प्रकाशात उजळलेले ओंकारेश्वर मंदिर

वरील पहिल्या प्रकाशचित्रात मांधाता पर्वत, त्यावर वरपर्यंत जाणारी पायर्‍या पायर्‍यांची वाट आणि शिखरावर आधीच सांगितल्याप्रमाणे दिसत असलेली पाठमोरी शिवमूर्ती दिसत आहेत. दुसर्‍या प्रकाशचित्रात पहिल्या प्रकाशचित्राच्या साधारणपणे उजवीकडचा भाग आहे, तोही रात्रीच्या प्रकाशांत उजळलेला. सर्वाधिक उजळलेला मंदिरकळस ओंकारेश्वर मंदिराचा आहे. डावीकडचा पूल आम्हाला जवळचा आहे. उजवीकडच्या पुलाच्या आमच्या बाजूस म्हणजे, दक्षिण तीरावर अमलेश्वराचे मंदिर आहे. मात्र हे मंदिर जुने आहे. खोलात आहे. फारसे उंचही नाही. त्यामुळे ओंकारेश्वर गावातून फारसे दिसतच नाही. ओंकार आणि अमलेश्वर मिळूनच हे ज्योतिर्लिंग पूर्ण होत असते. दुसर्‍या प्रकाशचित्रात अमलेश्वर पुलाच्या पाठीमागे, उजवीकडे ओंकारेश्वर धरण आहे. धरणानजीकच पण उत्तर तीरावर, ऊर्जाघर आहे.

ओंकारेश्वर मंदिरात काय नेऊ देतात, काय नाही हे नक्की माहीत नव्हते. म्हणून आम्ही कॅमेरा आणला नव्हता. केवळ मोबाईलच घेऊन आलेलो होतो. मंदिराबाहेर एका ठिकाणी टोकन घेऊन चपला उतरवल्या आणि रांगेत लागलो. पंडे पाठलाग करतच होते. त्यांना दाद न देता आम्ही मार्गस्थ राहिलो. पाचच मिनिटांत गाभार्‍यात पोहोचलो. तिथल्या एका पुजार्‍याने “वाका खाली, करा नमस्कार, ही घ्या बादली, करा अभिषेक” अशी दमदाटी करत आमच्या कडून अभिषेक करवून घेतला. शिवलिंगासमोर, काचेचे, कमरेइतक्या उंचीचे कुंपण घातलेले असल्याने शिवलिंगास कुणीही शिवू शकत नाही. कुंपणासच एक काचेचे नसराळे बसवलेले असून त्यातून यजमानांना जलाभिषेक करायला सांगितले जाते. काचेतून ते पाणी शिवलिंगावरच पडते आहे अशी खात्री करवून द्यायलाही ते विसरत नाहीत. बाहेर पडल्यावर मग आमच्या मागे लागले. आमच्या करवी अभिषेक केलात, आता एक हजार एक रुपये द्या. बधत नाही म्हटल्यावर: पाचशे एक द्या! निदान एक्कावन तरी!! पण मी कसलेला योद्धा होतो. आम्ही तसेच बाहेर पडलो. चपलांकरता मोजून दोन रुपये चपलाजोडीस घेऊन त्याने चपला परत केल्या. मला हे आवडले.


वाटेतली मकरारूढ नर्मदामैय्या दक्षिण तीरावरली जहाजागत दिसणारी इमारत


वाटेतली दुर्गेची मूर्ती; शिखरावरचे शिवालय, लेटे हनुमान मंदिर आणि ९० फुटी शिवप्रतिमा

मग पायी परिक्रमा करण्याबाबत माहिती काढली. कुणी म्हणत परिक्रमा दोन तासात होते. कुणी तीन तास सांगत तर कुणी साडेतीन सांगत होते. काल मांधाता पर्वताकडे पाहतांना आम्हाला पर्वतावर एक पायर्‍या पायर्‍यांची माळ वरपर्यंत जातांना दिसली होती. मग आम्ही विचार केला की तिनेच गेलो तर कदाचित तासाभरात परतही येऊ. काही जणांनी मग त्याचीही पुष्टी केली. आम्ही वरची वाट चालू लागलो.

हैदराबादच्या राजराजेश्वरी (पार्वती) प्रतिष्ठानातर्फे ही ९० फुटी शिवप्रतिमा उभारण्यात आलेली आहे. राजराजेश्वरीचे मंदिरही समोरच आहे. शिवप्रतिमेच्या उजव्या हाताला एक नर्मदेचे सुरेख मंदिर आहे. मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर दगडात गीतेचा श्लोक कोरलेला एक फलक दिसला. पुढे मग असे समजले की गीता परिक्रमा मार्गाचाच तो एक भाग आहे. इथे आम्हाला राजराजेश्वरी प्रतिष्ठानतर्फे वाटला जाणारा गरमा-गरम खिचडीचा प्रसादही मिळाला. तो प्रसाद वाटणार्‍याने थोडासा जमिनीवरही टाकला आणि काय आश्चर्य! पाहता पाहता अक्षरशः पाच, दहा, पंधरा, ... असंख्य छोटे छोटे पक्षी तिथे कुठूनसे उडत आले. खारी आल्या. चिमण्या आल्या. लालबुडे बुलबुल आले. दयाल आले. कितीतरी अनोळखी पक्षी आले आणि काही क्षणांतच तोही प्रसाद फन्ना झाला. आम्ही प्रसादच सेवन करत होतो. हात मोकळे करून कॅमेरे सज्ज करायच्या आतच, जागा जणू मोकळी झालेली होती. दोनचार पक्षी काय ते चित्रात गवसले.


राजराजेश्वरी मंदिर, प्रसाद खाणारे पक्षी, शेजारचे नर्मदा मंदिर आणि त्यातील मूर्ती

अशा रीतीने आम्ही मांधाता पर्वतशिखर तर गाठलेच होते. आता अमलेश्वर दर्शनही करणे आवश्यक होते. पण आम्ही तर नाश्ताही केलेला नव्हता. आम्ही अतिथीगृहात परतलो. नाश्तानुमा जेवण केले. थोडीशीच विश्रांतीही घेतली आणि अमलेश्वर दर्शनार्थ तिथे जाऊन पोहोचलो. तिथे दर्शनाला गर्दी दिसली. बारा वाजेपर्यंत भोग चढविले जात असल्याची सूचनाही लागलेली दिसली. आता काय करावे. तेवढ्यात हजार रुपयात नर्मदा-कावेरिका-नर्मदा अशी परिक्रमा नावेतून करवून आणतो असे सांगत एक माणूस आला. मी नदीच्या तीराकडे निघालो. तसा आणखी एक माणूस १०० माणशी दराने दहा माणसांच्या नावेतून तशीच परिक्रमा करवतो म्हणू लागला. परिक्रमेस साधारणपणे किती वेळ लागेल असे विचारल्यावर सुमारे एक तास म्हणाला. आम्ही कबूल झालो. नावेपाशी पोहोचलो तर आमच्याआधीच तिघे जण तिच्याशेजारी उभे असलेले दिसले. जितेंद्र, त्याची मामी आणि तिची मुलगी असे ते नातेवाईकच होते. जितेंद्रला नर्मदा-कावेरिका संगमात स्नान करायचे होते. आता आम्ही पाचजण झालेलो होतो. पण बराच वेळ झाला तरी परिक्रमेकरता कोणीच नवे माणूस येत नव्हते. शेवटी नाववाला असे म्हणू लागला की तुम्ही पाचजण मिळून आठशे रुपये देत असाल तर मी नाव न्यायला तयार आहे. आम्ही तयार झालो. नाव निघाली.


नावेतून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर सकाळीच आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो ती वाट


परिक्रमा करणार्‍यांना लाईफ जॅकेट घालावे लागे. रिकाम्या बंद बिसलरी बाटल्या पोत्यात भरून ..


संगम. डावीकडची नर्मदा. उजवीकडची कावेरिका. कावेरीकेचा प्रवाह जबरी होता. खळखळाटही खूप.


कावेरिकेत दूरवर उभारलेली आमची नाव, संगमातील स्नानानंतर आम्ही तिच्यात जाऊन बसलो.

संगमात जितेंद्रने आणि मी स्नान केले. ती मुले बसली आहेत त्या खडकाच्या आश्रयाने डुबकीही घेतली. पंधरा वीस मिनिटांतच आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. एकतर कावेरीकेचा जबरी प्रवाह आणि दुसरे म्हणजे आता आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात होतो.


नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली आम्ही पाय-उतार होऊन किनार्‍यावरून पुढे गेलो

आता नावाड्याव्यतिरिक्त दोन सशक्त साहाय्यक आमच्या सोबत होते. उंच बांबूच्या रेट्याने ते नाव किनार्‍यापासून दूर राखण्याचे काम, आलटून पालटून करत होते. एके ठिकाणी मग कावेरिका खूपच अरुंद पन्हळीतून वाहू लागते. तिथे मध्य धारेचा वेग अफाट दिसत होता. त्यापूर्वीच काही अंतरावर नावाड्याने नाव थांबवली, किनार्‍याला नेऊन बांधली.


नाविकांची प्रवाहाविरुद्धची लढाई आणि पायी अडथळा पार करणारे आम्ही

आम्हा पाचही प्रवाशांना उतरायला सांगितले. वर असेही सांगितले की बर्‍याच अंतरावर दूर, जिथे कावेरिकेचा अरुंद पन्हळीतला प्रवास सुरू होत होता, त्याच्या पारपर्यंत चालत या. तिथे आम्ही नाव घेऊन जात आहोत. मग त्या तिघांनी नाव गतीमान असलेल्या अरुंद प्रवाहाच्या मध्यधारेत घातली. धारेच्या गतीने नाव हेंदकळतांना दिसत होती. वारंवार त्वरेने दिशा बदलतांना दिसत होती. तिघेही जण शर्थीने ती पुन्हा धारेत लावत होते. आम्ही किनार्‍यावर चालत चालत पुढे निघालो होतो.


वाटेतले मुळातील माती वाहून गेलेले वृक्ष आणि पुन्हा नावेत बसलेले आम्ही


कावेरिकेच्या उत्तर तीरावरील जैन सिद्धकूट मंदिराचे प्रवेशद्वार आणि दक्षिण तीरावरला गाय-बगळा


मग दिसू लागले ओंकारेश्वर ऊर्जाघर आणि ओंकारेश्वर धरण


डाव्या कोपर्‍यात अमलेश्वरनजीकचा पूल दिसू लागला, थोड्याच वेळात तो नजरेच्या टप्प्यात आला


उजवीकडच्या दगडी भिंतींची उंची घटत जाऊन मग ओंकारेश्वर दिसू लागले


अमलेश्वर मंदिर

जितेंद्र आणि कंपनी ओंकारेश्वराच्या तीरावर उतरली. आम्ही, ते मंदिर सकाळीच पाहून झालेले असल्याने आता परिक्रमा पूर्ण करून अमलेश्वरच्या तीरावर नावेतून उतरलो. धक्क्यापासूनही अमलेश्वरचे मंदिर दिसत नाही. किनार्‍यावरून वर चढत आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजून गेलेले होते आणि गर्दीही ओसरलेली होती. निवांत दर्शन घेऊन आम्ही अतिथीगृहात परतलो. आम्ही ओंकारेश्वरला जाणीवपूर्वक दोन दिवसांचा मुक्काम ठेवलेला होता. एक दिवस अजून हाताशी होता. आम्ही सकाळीच उठून जमल्यास पायी “गीता-परिक्रमा” करण्याचा निश्चय केला. चालकास सकाळी सहा वाजताच तयार राहण्यास सांगून समाधानाने झोपी गेलो.

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.


ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर 
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर 

२०१४-११-१७

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर


पुलावरून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर आणि पुलाच्या उजवीकडील तेजाजी जाट ह्यांचा पुतळा

सकाळी उठलो. तयार झालो. मात्र पाहतो तर चालक अजून झोपेतच होता. त्याला आन्हिके आटपायला थोडासा अवधी दिला आणि मग पुलाकडे निघालो. आज काहीतरी विशेषच उत्सव असावा अशी गर्दी रस्त्यावर लागून राहिलेली दिसली. डोक्यावर मोठमोठाले ओझी घेऊन असंख्य स्त्री-पुरूष दर्शनाला निघालेले दिसत होते. काल ज्या पुलाजवळच्या वाहनतळापर्यंत आमचे वाहन गेले होते त्या ठिकाणाच्या सुमारे एक किलोमीटरभर आधीच पोलिसांनी गाडी रोखली. आमच्या परिक्रमामार्गावरील चालण्यात जातायेता मिळून दोन किलोमीटर भर तर पडलीच शिवाय वेळेचे गणितही चुकेल असे वाटू लागले.


गायत्री शक्तीपीठाची इमारत पुलापार अगदी समोरच आहे तर बाहेती धर्मशाळेची तिच्या उजवीकडे

मुळात ठरल्यानुसार सहा वाजता परिक्रमेस सुरूवात करून, अगदी सर्वात जास्त वेळेत म्हणजे साडेतीन तासातही आम्ही परिक्रमा करू शकलो असतो तर, अतिथीगृहात आठ ते दहा मिळणार असलेला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही करू शकलो असतो. आता मात्र पुलाच्या सुरूवातीस आम्ही पोहोचेपर्यंतच सात वाजले होते. परिक्रमा करण्यास आम्हाला तीन तासही लागले असते तरी, आता कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट हुकणार हे नक्की होते. शिवाय अतिरिक्त गर्दीमुळे चालण्यासही काहीसा अधिकच वेळ लागत होता.


पुलापार गेल्यावर पुलाखालून उजवीकडे गेल्यास ओंकारेश्वर मंदिर लागते तर पुलाखालून डावीकडे गेल्यास लागतो गीता परिक्रमापथ


त्यातही अगदी पाण्यालगतचा मार्ग सोडून द्यायचा. परिक्रमा मार्ग किंचित वरून आहे.


परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार

परिक्रमामार्गावर कुठे कुठे पायर्‍या होत्या, कुठे कुठे नुसतेच काँक्रीटचे चढ-उतार, तर कुठेकुठे वाट मातीतूनही चालत होती. मात्र उजव्या बाजूस गीतेचे श्लोक असलेले दगडी फलक दिसत राहत. त्यातल्या अध्याय व श्लोक ह्यांच्या संख्येवरून परिक्रमापथावरील आपली प्रगती लक्षात येत राही. जागोजाग नर्मदेची, शिवाची, मारुतीची मदिरे; एवढेच काय तर बौद्ध पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. शिवाय मारुतीचे अग्रदूत असलेली माकडे, व्यवस्थित वानरभोजन मिळत असल्याने सर्वत्रच आढळून येत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.


पॅगोडासारखी प्रार्थनास्थळेही दिसत होती. काही पिल्ले तर अतिशयच लहान दिसत होती.


स्थानिक प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नुकतीच हटवली होती. त्यांच्या पुनर्स्थापनेची कामे आबालवृद्ध स्त्रीवर्गानेच हाती घेतलेली दिसून येत होती.


परिक्रमापथावर माळांची दुकाने आणि देवींच्या मूर्ती जागोजाग असत


धोत्र्याची आणि घंटेची फुलेही आपापल्या डौलदार झुडुपांवर फुललेली दिसत होती


स्थानिकांत कपाळावर ओंकार रेखण्याची शैली प्रचलित होती, तर भाविकांत सर्वसामान्य प्रथेनुरूप हातांत गंडेदोरे बांधणे खूपच लोकप्रिय असल्याचे दिसून येत होते.

मांधाता पर्वताच्या शिखरावर पोहोचलो तेव्हा त्याचा आकार ओंकारस्वरूप असल्याचे पुरावे दिसू लागले. वळणे ओळखीची वाटू लागली. तसेच नर्मदा आणि कावेरिका ह्यांच्या पैलतीरांवरील शिखरेही स्पष्टपणे दृष्टीस पडू लागली.


पथ चढत चढत मांधाता पर्वतावर, राजराजेश्वर मंदिरापाशी घेऊन गेला. तिथे कमळे फुलली होती.


शिखरावरील रस्ता सरळसोट आणि सपाट होता. वर सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष दिसून आले.


सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष आणि जनावरांना पाणी प्यायला असते तशी एकसंध दगडातली डोणी.


आता धरण दिसू लागले आणि परिक्रमापथ ओंकाराच्या शेपटीचे वळण घेत खाली उतरू लागला.


मग उंचावरून अमलेश्वरनजीकचा पूल दिसला, त्यानंतर आम्हीही उतरून त्याच्या पातळीवर आलो


अखेरीस गीतेतला अखेरचा श्लोक दिसला आणि अमलेश्वर पूल नजरेच्या टप्प्यात आला.


आता आमच्या अतिथिगृहाकडचा पूलही दिसू लागला होता आणि मग त्या पुलाचा चढ-उतार.

दहा वाजून गेले होते. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टही गेलेलाच होता. मात्र पायी परिक्रमा तीन तासात पूर्ण केल्याचे समाधान मोठे होते. त्याची तुलना ब्रेकफास्टशी होऊच शकत नव्हती. परत येऊन नाश्तानुमा जेवण केले. किंचित विश्रांती घेतली.

मग सुमारे दोन अडीच तासांच्या, इंदौरातील नखराळी ढाणीपर्यंतच्या प्रवासास निघालो. तिथे चहापान करून मग आम्ही बिजसेन माता आणि कस्तुरबाग्राम ह्या स्थलदर्शनाकरता पुन्हा विमानतळ रस्त्यावर निघालो. सुमारे अर्ध्या तासात आम्ही बिजसेन माता मंदिरात पोहोचलो. अक्षरशः जत्राच भरलेली होती. आम्हीही दर्शन घेतले. मात्र कस्तुरबाग्रामबद्दल असे कळले की ते शहराच्या पूर्वेला देवास रस्त्यावर आहे. दिवसभराच्या धावपळीमुळे आज जरा थकवाही जाणवत होता, शिवाय आम्हाला शहरात जेवण करून दक्षिणेला २० किलोमीटरवर असलेल्या नखराळी ढाणीपर्यंत परतीचा प्रवासही करायचा होता. त्यामुळे मग आम्ही शहरात एके ठिकाणी पुन्हा माहेश्वरी साडी खरेदी करून, गुरूकृपा रेस्टॉरंटमध्येच जेवण केले आणि परत फिरलो.

नंतरच्या दिवशी दुपारी अडीच वाजता आमची परतीची गाडी होती. म्हणून किमान दीड वाजेपर्यंत स्थानकावर पोहोचायचे ह्या हिशेबाने बारा साडेबारापर्यंत गुरूकृपा गाठायला हवे होते. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच आम्ही नखराळी ढाणी सोडली. नऊ ते बारा, खजराणा भागातले गणेशमंदिर आणि शहरातले मध्यप्रदेश पर्य़टनविकास मंडळाचे मृगनयनी एम्पोरियम पाहण्याचे ठरवले.

हे गणेशमंदिर, विस्तीर्ण आवारात वसलेले आणि सुव्यवस्थित ठेवलेले सुरेख मंदिर आहे. मृगनयनी एम्पोरियमही सुरेखच आहे. सुती पिशव्या, पर्सेस, सतरंज्या, चादरी इत्यादी हातमागाच्या वस्तू तर दृष्ट लागण्याजोग्या होत्या. आम्ही माफक खरेदी केलीही. नंतर गुरूकृपाकडे कूच केले.


खजराणा भागातले गणेशमंदिरत्यात रेड्यावर स्वार झालेले शनिदेव 


गुरूकृपा रेस्टॉरंटमधले जेवण

वाटेत ५६-दुकान भागात मधुरम् नमकीन आणि स्वीटसच्या दुकानात इंदौरचे प्रसिद्ध नमकीन आणि तिळपट्टी खरेदी केली. खारी मुगडाळ सगळ्यात पसंत आली. तिळपट्टीही सुरेखच होती. मात्र शेव आणि तळलेली तिखट हरबरा डाळ भयानक तिखट निघाली. केवळ चार दाणे तोंडात टाकल्यावर असे वाटू लागले की, रोज फार तर चार चार दाणे तोंडात टाकून तहहयात किंवा डाळ संपेस्तोवर सावकाश खावी. गजक खरेदी आधीच गुरूकृपाशेजारच्या दुकानांतून करून ठेवलेली होती. गाडी वेळेवर सुटली. थोड्याच वेळात खिडकीतून मोर दिसले. काही अंतरावर हरीणही दिसले.


मृगनयनी एम्पोरियमचे प्रवेशद्वार, गाडीतून दिसलेले मोर

त्यानंतर मात्र दुतर्फा बाभुळबनच काय ते सर्वत्र दिसत राहिले. आमची ओंकारेश्वर सहल अपेक्षेहून अधिक आनंददायी अणि संस्मरणीय झाली होती. आम्ही निरोप घेतला खरा, पण केवळ पुनरागमनायच.

ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी १-उज्जयिनी
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी २-इंदौर, महेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ३-मांडू, ओंकारेश्वर
ओंकारेश्वर प्रवासवर्णन-एकूण ४ पैकी ४-ओंकारेश्वर 














No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...