मानवाचं आणि निसर्गाच नातं हे केवळ अद्वैत. निसर्गात मानव हिंडतो; त्यावेळी त्याचे मन निसर्गाच्या सानिध्यात तल्लीन होत.निसर्गाचा आणि इतिहासाचा काहीच संबंध नसल्यासारखा वाटत; पण खरं तर इतिहास हा तिथल्या राहणाऱ्या लोकांचा आणि जमिनीचा असतो.तेंव्हा कळते की त्या लोकांना निसर्गाने कोणती देणगी दिली आहे आणि तिथल्या लोकांनी ती कशी वापरली,यावर इतिहास घडतो.गोंविदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी; महाराष्ट्राचे वर्णन ‘कणखर देशा,राकट देशा,दगडांच्या देशा’ अस करतात.या कणखर सह्याद्रीने कठीण परिस्तिथीत शिवाजी महाराजांना आणि मावळ्यांना दिलेली साथ सर्वांना माहीत आहेच.
दगड आणि माणसाचं नातं अगदी प्राचीन आहे. प्राण्यांपासून बचावासाठी अश्मयुगीन मानवाने हत्यारे तयार केली.घरे बांधण्यासाठी दगडांचा वापर केला गेला.अन्न शिजवण्यासाठी गारगोटीचा वापर केला.नैसर्गिक देणग्यांचा वापर मानव कित्येक वर्षांपासून करत आला आहे. आपले कर्तृत्व,इतिहास सांगणारे अनेक शिलालेख,वीरगळ व शिल्पकला या दगडातच कोरल्या गेल्या.अनेक लेण्या बांधल्या,मंदिरे उभारली गेली तीही दगडातच! तर हा सह्याद्रीचा दगड कसा तयार झाला? त्यात कोणकोणत्या प्रकारचे खडक निर्माण झाले?यासारखे कुतूहल निर्माण करणारे प्रश्न मनाला पडतात. तर याची माहिती काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. साहिजकच, या सह्याद्रीकडून विपुल प्रमाणात ज्ञान घेण्यासारखं आहे. बिनभिंतीचा सह्याद्री हा झाडे,वेली,पशु,पक्षी मार्फत विविध ज्ञान बरसत असतोच! त्यातीलच हाताच्या आचनमनात मावेल एवढं ज्ञान वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय.
सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते.ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ,या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बेसाल्ट खडक असे म्हणतात.
बेसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे – चार्नोकाईट, ग्रॅनाईट, लेप्टिनाईट,खोंडालाईट, लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी.अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे.

Pohale Caves_____________
काळाकभिन्न सह्याद्री प्रत्येक ऋतूत आपलं विस्मयचकित करणारं वेगवेगळ रूप दाखवत असतो. पावसाळ्यात भनायक पाऊस इथे बसरतो;गवतांचा दाटवा सर्वत्र पसरलेला असतो,तर हिवाळ्यात प्रचंड थंडी कुण्या फिरंगीला ही न मानवेल अशी! याच्या कुशीत स्वच्छ,नितळ,निळ काचेसारखं पाणी पाहावयास मिळत.जितकं सांगाल तितकं याच रुपडं कमीच! ह्या सह्याद्रीत बेसाल्ट हा खडक प्रामुख्याने आढळतो.हा खडक दख्खनच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला,त्यामुळे त्याचे अग्निजन्य खडक असे वर्गीकरण केले आहे.हे खडक अनेक प्रकारचे असून ते विविध भूहालचालीतून तयार झाले आहेत.त्यामुळे त्यांना रूपांतरित खडक असे म्हणतात.भूगर्भातील लाव्हा रस हा ज्वालामुखी वेळी वर येतो.तो थंड होऊन हळूहळू त्याचे बेसाल्टच्या थरात रूपांतर झाले.भूशास्त्रज्ञांनी या थराचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे.

१.साधे थर(simple flows) – कमी जाडीचे ३५ ते ४० मी.
२. मिश्रथर( compound flows) – जास्त जाडीचे १००मी. हुन अधिक
साधे थर हे प्रामुख्याने सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे येथे पाहायला मिळतात
तर मिश्र थर हे उत्तरेला म्हणजे नगर,नाशिक,धुळे,औरंगाबाद इ. भागात पसरलेले
दिसतात.उत्तरेकडील भागात मिश्र थरांमध्ये विविध प्रकारची
जांभळ्या,पांढऱ्या व हिरव्या रंगाची दुय्यम खनिजे सापडतात.साधे व मिश्र थर
हे लाल रंगाच्या १ ते २ मीटर जाडीच्या मातीच्या थरांनी विभागलेले असतात.या
दोन्ही थरांच्या मध्ये एक वैशिष्ठपूर्ण संरचना बघायला मिळते. उदा. Lava
tube,Basalt columns इ. मुंबईतील गिल्बर्ट टेकडी आणि पन्हाळा-मसाई
पठाराजवळील बेसाल्ट स्तंभ याची उदाहरणे आहेत. पुणे,नाशिक भागात विविध
प्रकारची मौल्यवान खनिजे सापडतात.अश्या खनिजांचे(गारगोटी) एक संग्रहालय
नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे आहे.

ग्लिबर्ट टेकडी,मुंबई.
बेसाल्ट मध्ये सापडणारी खनिज द्रव्ये :
बेसाल्ट हा खडक मूलतः अनेक खनिजांचा बनलेला आहे. या खडकामध्ये प्राथमिक तीन खनिजे मुख्यत्वेकरून सापडतात. त्यांना pyroxene, plagiodase feldspar आणि olivine असे म्हणतात. त्यांचे प्रमाण भिन्न असते;या खनिजांमुळेच बेसाल्ट खडकाला काळा किंवा करडा रंग प्राप्त झाला आहे.ही खनिज द्रव्ये विभिन्न रासायनिक घटकांनी बनलेली असतात.त्यामध्ये सिलिका,लोह,अल्युमिनिअम या मुख्य धातूंचे प्रमाण अधिक असून calcium, magnesium,sodium, potassium इ. रासायनिक घटक असतात. प्राथमिक खनिजानंतर दुय्यम खनिजेसुद्धा बेसाल्ट मध्ये सापडतात. यांना zeolites म्हणजेच आपण ‘गारगोटी’ बोली भाषेत म्हणतो! याचेही रंग,रूप,आकार,प्रदेशानुसार ४०० पेक्षा जास्त प्रकार पडतात !

Zeolites

–वैभव राजेंद्र गुरव
https://vaibhavguravblog.wordpress.com/2019/07/28/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F/
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.