Thursday, August 10, 2023

सज्जा कोठी” – पन्हाळा , पितापुत्र भेट

 शिवशंभू चरित्रातील एक महत्वाच्या घटनांपैकी ‘सज्जा कोठीत’  झालेली भेट. शिवराय व शंभुराजेंची पौष वद्य सप्तमीला म्हणजे दि.१३ जाने. १६८० रोजी पन्हाळ्याच्या सज्जाकोठीत पिता-पुत्राची हृदयस्पर्शी भेट. हि कोणीही विसरू शकणारी नाही. कारण ही भेटच अशी होती. शंभूराजे दिलेरखानाला मिळाले होते पण दुर्दैवाने दिलेरखानाकडे नेमक्या कोणत्या कारणामुळे गेले यावर प्रकाश टाकण्यासाठी पूर्णतः समकालीन/विश्सनीय साधन उपलब्ध नाही. सभासद बखरीतील ‘इतकीयात संभाजीराजे राजियांचे जेष्ठ पुत्र राजियांवर रुसून मोगलाईत गेले,’ असे सांगतो. यावरून लक्षात घेतले पाहिजे की दिलेरखानाला सामील होणे ही फितुरी नसून तो रुसवा होता हे क्रमप्राप्त सिद्ध होते. रुसव्यापोटी ते झालेले एक औटघटकेचे वादळ होते. सुदैवाने वा.सी. बेंद्रे, कमल गोखले व सदाशिव शिवदे यांसारख्या इतिहासकारांनी शंभुराजेंचे खरे ज्वलज्जवलनतेजस रूप हे सर्वांसमोर आणले.
_________

   पन्हाळ्यावर जायच्या आधी कधी एकदा सज्जा कोठी व  रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी पाहतोय असं वाटत होत.रामचंद्र पंत अमात्य बावडेकर ज्यांनी ५ छत्रपतींच्या कारकिर्दीत मोलाचे कार्य केले.येथील माती डोक्याला लागावी म्हणजे आपले भाग्यचं…सज्जा कोठी व

र गेल्यावर राहून राहून सतत सभासद बखर मधील पितापुत्र भेटीचे भावपूर्ण वर्णन “बहुत रहस्य जाहले” मस्तकात घुमत होते. या भेटीचे उल्लेख पाहू—शिवरायांना शंभूराजे परत आल्यामुळे अत्यंत समाधान झाले. व्यंकोजीराजांना कर्नाटकात पाठवलेल्या पत्रात हे समाधान व्यक्त करतांना महाराजांनी लिहलेले एक वाक्य “घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले…” या वाक्यातून आपल्या लक्षात येते की पितापुत्राचे मतभेद संपूष्ठात आले होते. शंभुराजेंना ठेवून महाराज रायगडी निघून गेले. पण यावेळी कोणाला कल्पना आली नसेल कि हीच महाराजांची अन शंभुराजेंची अखेरची भेट ठरणारी होती. दुर्दैवाने दि.२२ मार्चपासून महाराजांना ज्वराची व्यथा सुरु झाली आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला, ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांच्या जीवनसुर्याचा कायमचा अस्त झाला .

________

खंत इतकिच वाटते की आजच्या काही सडक्या मैंदूची तरुणाईंनी सज्जकोठी येथील पवित्र भिंतींवर आपले नाव , इतरांचे नाव कोरले आहे. यांच्या बापजाद्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडले हे यांना माहित नसावे कदाचित. असले उद्योग गडांवर करायचे असतील तर जाताच कश्याला तिकडे? अश्या प्रकारांना वेळीच आळा घातला पाहिजे. दुसऱ्या राष्ट्राचा,राज्याचा इतिहास आज काचेच्या स्वरूपात जतन करून ठेवला आहे आणि आपण काय करतोय ? कोणी गडकिल्ल्यावर असे उद्योग करत असतील तर त्यांना वेळीच इतिहासाचे महत्त्व पटवून देऊयात. सह्याद्री म्हणजे शिवराय! शिवरायांचे सह्याद्रीवर इतके प्रेम होते कि ते शहाजीराजेंच्या सुटकेवेळी एकही किल्ला देऊ इच्छित न्हवते शेवटी त्यांनी एक किल्ला कसाबसा दिला तो सिंहगड !कारण किल्ला परत जिंकू शकू पण बाप पुन्हा येणार नाही.अश्यावेळी रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रातील संदर्भ आठवतात ते पुढीलप्रमाणे – दुर्गांना राज्यात अतिशय महत्व होते.म्हणून मराठेशाहीत “गडकोट हेच राज्य,संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग,गडकोट म्हणजे राज्याचे मूळ , गडकोट म्हणजे खजिना ,गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी,किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण” असेच मानले जाई.

छायाचित्र:सज्जाकोठी,रामचंद्रपंत अमात्य समाधी

✍ वैभव राजेंद्र गुरव.

कविनुर्प शंभूराजे

शंभुराजे जसे रणांगणात रौद्र,बलिदानामुळे त्यांचे  ज्वलज्जवलनतेजस रूप तेवत राहिले तसेच ते मनातून किती प्रेमळ स्वभावाचे होते याचा प्रत्यय त्यांनी लिहलेल्या बुधभूषणम्, नायिका-भेद ,नखशिख व सातशतक या ग्रंथातून येतो. 

    संस्कृत भाषेचे ज्ञान आणि काव्याच्या आवडीमुळेच त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहला.यात सुरवातीच्या १-६ श्लोकातून गणेश,शिव,पार्वतीदेवी यांनां वंदन केले आहे. व पुढे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख आहे. यातून त्यांचे शिवरायांबद्दल अत्यंत आदरात्मक भाषा आढळते. नंतर त्यांनी भवानी देवीचे वर्णन केले आहे(श्लोक १८-२८).
     बुधभूषणम् या संस्कृत ग्रंथाप्रमाणेच
नखशिख,सातशतक व नायिकाभेद हि काव्य ग्रंथ लिहली.या तिन्ही हिंदी पदकाव्यातील हिंदी समजली जाणारी भाषा खरेतर ‘ब्रज -बोली ‘ आहे. नखशिख यातपन त्यांनी शिव-पार्वती,सरस्वती यांस वंदन केले आहे, भवानीदेवीचे रुपवर्णन केले आहे. आणि स्त्री सौन्दर्याचे सुरेख वर्णन केले आहे.नायिकाभेद राधाकृष्ण  भक्ती व रासशृंगाराची फार चित्ताकर्षक काव्य रचना आहे.मोठ्या मनाचे वाचकच या ऐश्वर्याची दखल घेऊ शकतात . सर्व ग्रंथामध्ये लक्ष वेधून घेतो तो त्यांचा अध्यात्मवादी सातशतक हा ग्रंथ! त्यात श्रीगणेशजी ,सरस्वती,पार्वती,श्रीराम यांची स्तुती आढळते. मुळातच पाहिल्यास शंभुराजेंच्या विशाल भाविक हृदयाचे दर्शन होते.
        
          सीता पग नष चंद की भजी कै संभ समाज।
         सात शतक ग्रंथही रच्यो,संतन के हित काज।।१।।
वरील काव्य हे कवी कालशांनी लिहले असावे व कर्ता म्हणून आपल्या स्वामींचे संभाजीमहाराजांचे नाव घेतले असावे.
       सातशतक मध्ये एकाच वेळी ‘गोपाल’ व ‘हरी’ चा संदर्भ आला आहे-
        संभ षोई महिपाल कहै सुनिए गोपाल।
        हम हरी हाल तुम,सौ निहाल राहियुत है।।२८।।
शंभू राजे म्हणतात,गोपाल श्रीकृष्णा ऐक,”मी माझी सारी जबाबदारी तुझ्यावर सोपवतो.”
या तिन्हीही ग्रंथातील वंदनामागे भगवान श्रीकृष्णांची शंभुराजेंची भक्ती प्रकट होते.बुधभूषणमध्ये ती ग्रथित आहेच.यातूनच असे दिसते की नायिकाभेद सारखे शृंगारप्रधान काव्य लिहिणारा राजा ,सातशतक सारख्या अध्यात्मवादी ग्रंथ रचू शकतो हि गोष्ट शंभुराजेंच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवणारी ठरते..
बहुत लिहिण्यासारखे आहे। तूर्तास इतकेच..
जय #नृपशंभु ,जय #कवीशंभू

 
 
https://vaibhavguravblog.wordpress.com/ 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...