Monday, August 7, 2023

उत्तराखंडाची सहल भाग-

 https://nvgole.blogspot.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%3A%20%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80

राजकीय अवस्था

९ नोव्हेंबर २००० रोजी, भारतीय प्रजासत्ताकाचे २७ वे राज्य म्हणून उत्तरांचलाचा जन्म झाला. तात्पुरते दिलेले उत्तरांचल हे नाव जानेवारी २००७ मध्ये बदलवण्यात आले आणि मग आजचे उत्तराखंड हे राज्य निर्माण झाले. ते दोन भागांत वसलेले आहे. वायव्येला गढवाल आणि आग्नेयेला कुमाऊँ. गढवालमध्ये हरिद्वार, डेहराडून, उत्तरकाशी, चामौली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि पौडी हे सात जिल्हे आहेत. तर कुमाऊँमध्ये उधमसिंगनगर, नैनिताल, अलमोडा, बागेश्वर, पिथौरागड आणि चंपावत असे सहा जिल्हे आहेत. डेहराडून हे राजधानीचे शहर आहे [१].



या राज्याच्या उत्तरेस नेपाळ आणि चीन हे देश आहेत तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. एकूण ५३,४८४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळापैकी ३४,४३४ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ वनविभाग असलेले हे नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असे राज्य आहे. सुमारे ९३% भाग डोंगराळ आहे तर केवळ सुमारे ७% भाग सपाटीवर वसलेला आहे.

नैसर्गिक अवस्था

भागिरथी (गंगा), अलकनंदा, मंदाकिनी, पिंढारी, तोन्स, यमुना, काली, न्यार, भिलंगन, शरयू आणि रामगंगा ह्या नद्या राज्यातून वाहतात. थोडक्यात काय, तर गंगा-यमुनेच्या खोर्‍यांचे डोगराळ भागातून मैदानी भागात अवतरण होते तेच हे विख्यात स्थान आहे. गहू, तांदूळ, बार्ली, मका, मंडुआ, हंगोरा इत्यादी पीके इथे घेतली जातात. सफरचंद, लिची, आलुबुखार, नास्पती इत्यादी फळेही इथे होत असतात. चुनखडी, मॅग्नेसाईट आणि जिप्सम ही खनिजे इथे प्राप्य आहेत.  इथे कुमाऊँनी, गढवाली आणि हिंदी ह्या भाषा बोलल्या जातात. ह्या राज्याच्या अधिकृत भाषा हिंदी आणि संस्कृत ह्या आहेत [२]. मार्च महिन्यापासून जूनच्या मध्यापर्यंत उन्हाळा असल्याने हाच काळ इथल्या पर्यटनास सोयीचा असतो.

नैनिताल, मसूरी, पौडी, अलमोडा, रानीखेत, किर्सू, चंपावत, दयरा, औली, खटलिंग, वेदिनी बुग्याल, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, लॅन्सडॉन, लखमंडल पाताळ-भुवनेश्वर, गंगोलीहाट, जोलजीवी, कतारमाल, कोसिनी, जागेश्वर, द्वारहाट, सोमेश्वर, बैजनाथ, पिंढारी हिमनद इत्यादी पर्यटन स्थळे येथे आहेत. शिवाय, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पंचकेदार, पंचबद्री, पंचप्रयाग, हरिद्वार, हृषीकेश, हेमकुंडसाहिब, रेठ्ठासाहिब इत्यादी तीर्थक्षेत्रेही इथे भेटीस सिद्ध आहेत. इथे झुमालो, थड्या, चौन्फ्ला, रसौ, पंडवाना, तांडी, भादगीत, जागर, चांचरी, छोलिया इत्यादी लोकगीते वा लोकनृत्य लोकप्रिय आहेत.

पौराणिक संदर्भ

कुमारसंभवात महाकवी कालिदास म्हणतातः

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।
पूर्वापरौ तोयनिधीवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

म्हणजे उत्तर दिशेला देवतांचा आत्माच असलेला हिमालय नावाचा पर्वत आहे. पृथ्वीचा जणू मानदंडच असलेला, पूर्वापार चालत आलेला हा जलनिधी आहे.

स्कन्द पुराणात हिमालयाचे पाच भौगोलिक भाग सांगितले आहेत.

खण्डाः पञ्च हिमालयस्य कथिताः नैपालकूमाँचलौ।
केदारोऽथ जालन्धरोऽथ रूचिर काश्मीर संज्ञोऽन्तिमः॥

अर्थात्‌ हिमालय क्षेत्रात नेपाळ कुर्मांचल (कुमाऊँ) केदारखण्ड (गढ़वाल) जालन्धर (हिमाचल प्रदेश) आणि सुरम्य कश्मीर असे पाच भाग आहेत [३]. पौराणिक ग्रंथांत कुर्मांचल क्षेत्रास मानसखण्ड या नावानेही पसिद्धी प्राप्त झालेली होती. त्यांत उत्तर हिमालयात सिद्ध, गन्धर्व, यक्ष, किन्नर, इत्यादी जातींची, सृष्टी असून तिथला राजा, कुबेर, असल्याचे सांगितले आहे. कुबेराची राजधानी अलकापुरी असल्याचे सांगितले आहे. शैक्षणिक वारसा पुराणांनुसार कुबेराच्या राज्यात, ऋषि-मुनि तप व साधना करत असत. म्हणून ह्या क्षेत्रास देव-भूमी किंवा तपोभूमी समजले जाते. उत्तराखंड ही वेद, शास्त्रे व महाभारत जिथे रचले गेले ती पुण्यभूमी आहे. सुदैवाने अर्वाचिन काळातही उत्तराखंड, तपःसाधनेची भूमी बनून राहिलेली आहे. हृषीकेशला आजमितीसही योगसाधनेकरताची जागतिक राजधानी मानले जाते. स्वामी रामदेव यांचे पतंजलि योगपीठ आणि दिव्ययोग मंदिरही उत्तराखंडातच हरिद्वार येथे आहे.

भारतीय प्रशासकीय-अधिकाऱ्यांकरिता लाल-बहादूर-शास्त्री नॅशनल-ऍकॅडमी-ऑफ-ऍडमिनिस्ट्रेशन
मसुरी ही संस्था १९५९ मध्ये प्रस्थापित करण्यात आली. भारतातील सर्वात जुनी (१८४७) अभियांत्रिकी संस्था उत्तराखंडातील रूरकीमध्ये आहे. डेहराडून येथे भारतीय लष्करी अकादमी आहे. तसेच भारतीय वनसंशोधन [४] संस्थाही डेहराडूनमध्ये प्रतिष्ठित आहे. ही संस्था मुळात (१८७८ मध्ये) ब्रिटिश इंपिरिअल फॉरेस्ट स्कूल म्हणून स्थापन झालेली विख्यात संस्था आहे. भारतीयांना ज्या शैक्षणिक संस्थांचा अभिमान वाटावा अशा ह्या अग्रगण्य संस्था हल्लीच्या उत्तराखंडातच स्थित आहेत.



वन-संशोधन-संस्था, डेहराडून



मे महिन्यातील उत्तराखंडातील सरासरी हवामान



वरील आलेखावरून, सर्वसामान्य मुंबईकरास, कमाल किमान-तापमान आणि किमान-पर्जन्य वृष्टीचा काळ सोयीचा असल्याचे दिसते. यास्तव मे महिन्याचा पूर्वार्धच ह्या सहलीकरता निवडला होता [६]. मुंबई नैनिताल हा एकूण सुमारे २०-२५ तासांचा एकतर्फी प्रवास करावा लागणार असल्याने निदान दोन दिवस तरी प्रवासातच खर्ची पडणार होते. त्यामुळे सहलीचा एकूण कालावधी त्याच्या किमान पाचपट असल्याखेरीज आर्थिकदृष्ट्या तो काटकसरीचा ठरला नसता. मात्र, साधारण दहा दिवसांनंतर सहल एकसुरी आणि क्वचित कंटाळवाणीही होऊ शकत असल्याने सहलीचा कालावधी अंदाजे दहा दिवसांचा ठरवला. जाता-येता दिल्लीवरूनच प्रवास करायचा असल्याने किमान एका वेळेस तरी अक्षरधाम बघण्याचे नक्की केले. मे महिना असल्याने, दिल्लीला इतर पर्यटन करण्याचा मोह टाळणेच श्रेयस्कर होते. कारण मे महिन्यात दिल्लीचे तापमान शिगेला पोहोचलेले असते. शिवाय या काळात दिल्लीला धुळीची वादळे आणि लू लागण्याची भीतीही असतेच. मग पाहण्याची स्थळे नक्की केली. नैनिताल आणि मसूरी आधीच पक्की होती. त्यात अभयारण्य असावे म्हणून कॉर्बेटचा समावेश केला. हरिद्वार आणि हृषीकेश ह्यांचीही त्यात भर पडली. घरचे आम्ही चौघेच जाणार. त्यामुळे समूहासोबत सहलीचा आनंद साजरा करणे शक्य व्हावे म्हणून, पर्यटक संस्थेसोबत जाण्याचा विचार आला. केसरी, सचिन इत्यादींचे सहल कार्यक्रम तपासून आमच्या अपेक्षा अधिकाधिक पूर्ण करेल आणि काटकसरीचाही ठरेल असा सचिनच्या नैनिताल सहलीचा कार्यक्रम नक्की केला. मात्र, त्याची नोंदणी लगेचच केली नाही. नोंदणी मिळण्याची खात्री केली. मुंबई-दिल्ली व दिल्ली-मुंबई ऑगस्ट क्रांती राजधानीने प्रवासाची तिकिटे आरक्षित केली आणि मगच सचिनकडे नोंदणी केली. आता आमचा कार्यक्रम निश्चित झालेला होता.

संदर्भः

१. गढवाल-मंडल-विकास-निगम-लिमिटेडचे अधिकृत संकेतस्थळ
२. उत्तराखंड सरकारचे अधिकृत संकेतस्थळ
३. मेरा पहाड डॉट कॉम हे संकेतस्थळ
४. जंगलची वाट, डॉ.आनंद मसलेकर, भारतीय वनसेवा, माजी प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, काँटिनेंटल प्रकाशन, प्रथमावृत्तीः २००४, किंमत रु.२००/- फक्त.
५. उत्तराखंडावरचे विकिपेडियावरील इंग्रजी पान
६. सरासरी हवामान देणारे एक संकेतस्थळ

ऑगस्ट क्रांती राजधानी

मी आजवर कुठल्याच राजधानी गाडीने कधीही गेलेलो नव्हतो. विमानात मिळते तशी खानपान सेवा मिळते हे ऐकून होतो. आमच्या प्रवासाकरता जलद आणि स्वस्त उपाय शोधत ऑगस्ट क्रांती राजधानीच्या निवडीप्रत पोहोचलो होतो. मात्र, रेल्वेचे आरक्षण मिळाल्याशिवाय सहल निश्चितच करायची नाही हे पक्के असल्याने, आधी जाण्यायेण्याचे आरक्षण केले आणि ते चांगलेच झाले. वस्तुतः सचिनतर्फे, आरक्षण करून देण्याचे मुळीच पैसे घेणार नव्हते. पण ज्यांनी ते सचिनतर्फे केले त्या अनेकांना प्रतीक्षा यादीवर राहण्याची पाळी आली. काहींनी मग विमानाने जाणे पत्करले. म्हणून आम्हाला आमच्या निर्णयाचा खूप आनंद झाला.

प्रत्यक्ष प्रवास सुरू व्हायचा तर, मुंबई सेंट्रलला जायला हवे. त्याकरता तवेरा गाडी ठरवलेली होती. दोन वाजताच घरून निघालेलो होतो म्हणून बरे, एरव्ही गाडीच चुकली असती. कारण गाडीवानास मुंबई सेंट्रल म्हणजे सी.एस.टी. वाटत असल्याचे नंतर उघडकीस आले. पुढे रस्ता शोधता शोधता गर्दीत अडकतो की काय असेही क्षणभर वाटून गेले. पण अखेरीस मुंबई सेंट्रल स्थानकावर सुखरूप पावते झालो. गाडी फलाटावर उभी दिसली. पण ती होती राजधानी. आमची ऑगस्ट क्रांती राजधानी ही तिच्यानंतर सुमारे तासाभाराने सुटणार होती. राजधानी गाडी देखणीच होती. संपूर्ण वातानुकूलित गाडी प्रस्थान ठेवते त्यापूर्वी काही काळ तिचे वातानुकूलन सुरू करतात. मग प्रवाशांची गाडी पकडायची लगबग, फलाटावरच्या विक्रेत्यांचे आवाज, मोडके पंखे, तुटके नळ ह्या सगळ्यांचे आवाज लोप पावतात आणि एकच नाद फलाटावर घुमू लागतो, तो म्हणजे वातानुकूलनाचा! मग गाडी सुटली आणि ती निघून गेल्यावर हुश्श झाले.

जरा शांत झाले, आणि दिसू लागला फलाटावरील कचरा, सलू लागले रुळांवरील सांडपाणी, खुपू लागला साचलेल्या घाणीचा वास! बाळया गेल्या आणि भोकं राहिली, तसा फलाट ओकाबोका वाटू लागला. मग आमची गाडी आली. इतर गाड्यांतून प्रवास करणार्‍यांत आणि राजधानीने प्रवास करणार्‍यांत एक महत्त्वाचा फरक जाणवला, तो म्हणजे इथे प्रवासी आपापले सामान स्वतःच चाकांनी चालवत आणत होते. हमालाला क्वचितच वाव होता.

आम्हाला काय माहीत? आम्ही नेहमीप्रमाणे गाडीत खायला, प्यायला स्वतःजवळ असावे म्हणून आणलेले खाऊन संपवतो न संपवतो तोच, विमानातल्याप्रमाणे मग गाडीतही सरकारी खाद्यपेयांची रेलचेल सुरू झाली. उगाच खाऊन टाकले स्वतःजवळचे! मग सरकारी पदार्थांतील काय काय सोबत बांधून घेता येईल हा विचार सुरू झाला. हे घेऊ का ते घेऊ असे झाले. ठेवायला सामान पुरे ना. फलाटावर पाणी, चहा मिळवण्याकरता केलेले सव्यापसव्य व्यर्थच गेल्याची जाणीव झाली. कारण इथे मागायच्या आतच पदार्थ पाठोपाठ हजर होत होते. अंधार पडला. म्हणजे बाहेर हं! आत, सदैव एकसारखेच धृवीय वातावरण सज्ज करून ठेवलेले होते.

मग तपासनीस आला. (म्हणजे राजधानीत हे लोक येत असावेत!). हळूहळू परिस्थिती स्पष्ट होत गेली. जवळपास दर पाच-सहा प्रवाशांगणिक एक-एक दोन-दोन प्रवासी अधिक आलेले होते. त्यांचे कुठेच आरक्षण नव्हते. तपासनीस त्यांना काहीच विचारत नव्हता. आरक्षणे असलेल्यांचीच तिकिटे, ओळखपत्रे तपासून तो अंतर्धान पावला. जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो! त्यांची स्थिती निश्चित नव्हती तेंव्हा ते अधिकृत प्रवाशांप्रमाणेच आपले सामान यथास्थित पसरून बसलेले होते. ते प्रवासी आता दबक्या आवाजात उभे राहायला, बसायला, झोपायला जागा मागू लागले. ते कुठेही जाणार नव्हते. त्यांना बेकायदेशीर ठरवून कुणी घालवूनही देणार नव्हते. स्वस्तात मस्त प्रवास करायला सरावलेले ते नेहमीचे प्रवासी होते. अधिकृत प्रवाशांनीच मग परिस्थितीशी जुळवून घ्यायचा अपरिहार्य निर्णय (?) घेतला. होता होता, साध्या द्वितीय वर्ग प्रवासी यानांप्रमाणेच नेहमीची शयन-व्यवस्था अंमलात आली.

उशा, चादरी, टॉवेल, पांघरुणे वाटली गेली. खरे तर ती ठेवू कुठे अशीच परिस्थिती होती. सुट्टीचे दिवस असल्याने आरक्षण पूर्ण. प्रवासी सगळे एकतर नेहमीचे, किंवा स्वस्तात मस्त प्रवास करू पाहणारे विमानी प्रवासी. त्यामुळे सामान भरमार. ठेवायला जागा अपुरी, कारण डबा होता थ्री-टायर-ए.सी. त्यात हे सामान. म्हटल्यावर आडवे होण्याखेरीज पर्यायच न उरल्याने लवकरच निजानीज झाली.

सकाळ आरामातच झाली. आन्हिके उरकायला ही ऽ ऽ ऽ गर्दी. कुठे पाणी नाही. कुठल्या संडासातून पाणी वर येऊ लागलेले. रुळांवर घाण सोडून न देणारी नवी व्यवस्था होती इथे. मग डब्याला बसणार्‍या प्रत्येक हिसक्यासरशी ती बाहेर बाहेरच येऊ पाहे. चुकून तिथेच जाऊन किंवा अपरिहार्यतेने तिथेच सांडपाण्याची, घाणीची भर करणारेही, ती आपापल्या परीने करतच होते. लवकरच स्वर्गाचा नर्क होणार अशी मला भीती वाटू लागली. ह्या सगळ्या दुरावस्थेला जबाबदार होती रेल्वेस अनावर झालेली प्रवाशांची गर्दी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक अतिरिक्त प्रवासी विनातिकीट नव्हते. त्यांचे केवळ आरक्षणच नव्हते. पण मग अशी तिरपांगडी व्यवस्था देणारी रेल्वे, ग्राहकास कबूल केलेली सेवा देत नव्हती हे सत्यच अधोरेखित होत होते. आम्ही कुठलीही तक्रार कुणाजवळही केली नाही.

ये दिल्ली है, ये दिल्ली है

यथावकाश दिल्ली गाठली. हजरत निजामुद्दिनला उतरवून घेण्यास सचिनची बस आलेली होती. आम्ही लवकरात लवकर बसमध्ये दाखल झालो. मात्र सावकाश येणार्‍या प्रवाशांतील शेवटचा प्रवासी आल्यावरच बस सुटली. वस्तुतः संध्याकाळी अक्षरधाम पाहायला जायचे असल्याने, हॉटेल दक्षिण दिल्लीतच कुठे तरी असायला हवे होते. पण सचिन ट्रॅव्हल्सने त्यांच्या आर्थिक सोयीकरता ते पहाडगंजमध्ये ठेवलेले. याचे तोटे दोन. पहिला म्हणजे दूर जाण्यास लागणारा वेळ आणि संध्याकाळी पुन्हा दक्षिण दिल्लीतच अक्षरधामला परत येण्याकरता तितकाच वेळ खर्ची जाणार, हा. दुसरा म्हणजे हॉटेलवर लवकर जाऊ. ताजेतवाने होऊ. हा विचार विलंबित खयालच ठरला, हा. असो.

पहाडगंजच्या बकाल वस्तीतील त्या ले-रॉय नावाच्या हॉटेलजवळ बस पोहोचूच शकत नव्हती, म्हणून मग दहा मिनिटांची पदयात्रा. खोल्या तरी चटकन द्याव्यात. पण छे! तीन तीन महिने आधी, नाव-पत्त्या-निशी आरक्षण करणार्‍यांच्या, नावपत्त्यांची लिखापढी पुन्हा करायला लागली. त्यात आपापली ओळख पटविणेही आलेच. हॉटेलचा खाक्या असा की, ते ओळखपत्रे काढून घेऊन स्वतःजवळ ठेवून घेत होते. नंतर म्हणे झेरॉक्स काढून घेऊन तुम्हाला परत करू. मला हे आश्वासन काही विश्वासार्ह वाटेना. विशेषतः तिथल्या व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ पाहून! सुदैवाने मी प्रत्येकाच्या ओळखपत्राची झेरॉक्सही घेऊन फिरत होतो. मी त्यांना ताबडतोब त्या देऊ लागलो. तर कळले की ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड चालत नाही. अजबच म्हणायचे! असो. आम्हाला ही शंकाही होतीच. आमच्याजवळ प्रत्येकाचे पर्यायी ओळखपत्र, त्याची झेरॉक्स इत्यादी तयारच होत्या. आमची नोंदणी लवकर झाली. पण काय उपयोग? सगळ्यांची नोंद होईस्तोवर खोल्यांची वाटणी करेनात. खूप वेळ गेला. भरपूर मनस्ताप झाला. नंतर सगळ्यांना खोल्या दिल्या. आम्हाला म्हणाले, तुमच्या खोलीतील पाहुणे आताच निघाले आहेत, तेव्हा थोडे थांबा. थांबलो बापडे थोडा वेळ. दहा मिनिटे.... पंधरा मिनिटे... मग माझी सहनशीलता अंतास पोहोचली. मी दुसरी खोली द्यावी अशी मागणी केली. त्यांनीही लगबगीने दुसरी किल्ली दिली. वेटर सामान घेऊन चालूही लागला. वर पोहोचलो तर खोली उघडेना. मग संताप. आरडाओरडा. यथासांग सगळे झाल्यावर खोली मिळाली बुवा एकदाची!

उन्हाळ्यात मे महिन्यातील रविवारची संध्याकाळ. चहापाणी करून बसमध्ये बसून आम्ही अक्षरधामला निघालो. पुन्हा सकाळ-इतकाच वेळ गमावून तिथे पोहोचलो. वस्तुतः दक्षिण दिल्लीत हजरत निजामुद्दिन स्टेशनहून अक्षरधामला जायचे, तर फक्त यमुना नदीच काय ती ओलांडावी लागते. दक्षिण दिल्लीत हॉटेल असते तर तासाभरात आवरून आम्ही दुपारी दोन पर्यंतच अक्षरधामला पोहोचू शकलो असतो. गर्दीही मग कमीच राहिली असती. पण नियोजनातील घोडचुकीमुळे सचिनने आम्हाला इथे आणून उभे केलेले होते आणि इथे तर काय, प्रचंड मोठी रांग आमची प्रतीक्षाच करत होती. दोन तास रांगेत उभे राहून मेटाकुटीस आल्यावर प्रवेश मिळाला. संध्याकाळी सातचा सुमार होता.

अंधार पडायच्या आत मग दर्शन पदरात पाडून घ्यायची आमची धडपड सुरू झाली कारण लवकरच प्रकाश-संगीतावर थिरकणारी कारंजी असलेला खेळ सुरू होणार होता. भारतात काय पाहू नये, ते सर्व पाहत पाहतच आम्ही मुंबईहून इथवर आलेलो होतो. त्यात जवळजवळ संपूर्ण चोवीस तास आम्ही खर्चलेले होते. त्यापेक्षा मुंबईच बरी ह्या निष्कर्षाप्रत आम्ही आधीच पोहोचलेलो होतो. आता भारतात काय आवर्जून पाहावे, ते आमच्या समोरच उभे होते आणि केवळ पंधरा मिनिटांत आम्हाला ते घाईघाईने पाहायचे होते. सहलीचे नियोजन कसे असू नये ह्याचा हा आदर्श वस्तुपाठ होता. असो.

अक्षरधाम मंदिर

अक्षरधाम मंदिर खरोखरीच अप्रतिम आहे. मी यापूर्वीही एकदा इथे संपूर्ण दिवस घालवून उत्तम दर्शन घेतलेले होते. बायको-मुलास हे भारतीय वैभव दाखवावे म्हणून तर मी त्यांना इथे घेऊन आलो होतो. मात्र वेळ अपुरा मिळाला होता, हे दुर्दैव खरेच. खैर! त्यामुळे काही अक्षरधामाचा अक्षर महिमा कमी होत नाही. तो वाचायचा तर http://nvgole.blogspot.in/2008/11/blog-post_15.html#links हे अवश्य वाचा. आता, तरीही उपलब्ध वेळात त्या वैभवाचे दर्शन स्वकीयांना करवण्यात मी कसलीही कसर ठेवली नाही, की दाखवत असता वर्णन करतांना माझे तोंडही थकले नाही. अप्रत्याहत, सुंदर शिल्पकारीचे ते मनोहारी कर्तब पाहून मन प्रसन्न होऊ पाहत होते. आता मागल्या वेळेस मी जे पाहू शकलो नव्हतो, ते पाहण्याचा योग मलाही नव्यानेच मिळत होता. संध्याकाळच्या छाया-प्रकाश-संगीत-कारंजाचा खेळ. मग आम्ही सर्व त्या कारंजाभोवती जमा झालो. जागा पकडून बसलो. सगळे वालुकाश्माचे दगडी बांधकाम. उन्हाळ्यातली तप्त संध्याकाळ. दगड तापलेले. मन निराशाजनक अनुभवांनी त्रस्त झालेले. पण मग ज्या क्षणाची आम्ही सर्वच आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, तो आला.

खेळ सुरू झाला. स्वामीनारायणांचे चरीत्र उजागर करणारी कथा, सुमधूर संगीत, उत्तुंग उचंबळून हवेत दिमाखदार गिरक्या घेणारी शेकडो कारंजी, वाढत्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर कारंजांच्या पाण्यावर रंगांची मुक्त उधळण सुरू झाली आणि मग आम्ही सर्वजण आतापर्यंतचे सर्व क्लेश विसरून त्या अपूर्व सोहळ्यात मनःपूर्वक सामील झालो. सोहळा उत्तरोत्तर रंगतच गेला. यमुना नदीचे पात्र जवळच आहे. जसजसा अंधार पडत होता, तसतसे पात्रावरून गार वारेही वाहू लागले. अनुभव उत्तरोत्तर उत्कट आणि सुखदच होत गेला. पंधरा मिनिटे हा, हा, म्हणता निघून गेली. सोहळा संपला सुद्धा. पण मनावर त्याने सोडलेली छाप आमच्या सहलीतील एक अविस्मरणीय अनुभव ठरला!

मनोर-हाऊस, नैनीताल

दुसर्‍या दिवशी, मे महिन्याच्या उन्हाळ्यात दिल्ली ते नैनीताल सुमारे  ३००  किलोमीटरचे अंतर पार करून संध्याकाळी नैनीतालला पोहोचण्याचा दिवस होता. बस वातानुकूलित होती. म्हणून आम्ही फारसा त्रास न होता सुखरूप पोहोचलो.

१४ मे च्या संध्याकाळी आम्ही नैनितालमध्ये दाखल झालो. सचिन ट्रॅव्हल्सने आमच्याकरता योजलेले हॉटेल होते “मनोर-हाऊस” (अ-हेरिटेज-प्रॉपर्टी). जुन्या कौलारू खानदानी इमारतीनुरूप दिसणार्‍या त्या वास्तूचे दर्शनीय रूप मन प्रसन्न करणारेच होते. रंगीबेरंगी फुलांच्या वेष्टणात सजलेली ती इमारत सुरेख दिसत होती. आतही, अपरूप वाटेल अशी बैठकीची साधने (फर्नीचर), लाकडी स्पर्शाची, ऊब देणारी पायतळीची जमीन, कपाटाचीच दारे वाटावी अशी खोल्यांची दारे, भव्य स्नानगृहे आणि जुन्या धरतीच्या संरंजामांनी परिपूर्ण अशा लाल रुजाम्यांनी मढवलेला जिना व सुव्यवस्थित सांभाळ केलेली, काळजीपूर्वक निगा राखलेली अंगणातील बाग. प्रथम दर्शनी आवडली म्हणता येईल अशी ती निवासाची व्यवस्था होती. इथल्या हॉटेलच्या अनुभवाने, दिल्लीचा विदारक अनुभव जणू पुसूनच टाकला.

संदर्भः

१. २००८ मध्ये मी केलेले अक्षरधामचे वर्णनः अक्षरधामचा महिमा
२. अक्षरधामची विस्तॄत माहिती या संस्थळांवर सहज उपलब्ध आहे.

उत्तराखंड हिरवागार आहे. असंख्य वनस्पतींनी सदाबहार सजलेला असतो. त्यातील काही निवडक वनस्पती, ज्या मला विशेष वाटल्या आणि ज्यांची प्रकाशचित्रे जरा तरी बरी काढू शकलो आहे ती इथे देत आहे. मला जाणीव आहे की हल्ली जी प्रकाशचित्रे पेश केली जात आहेत, त्यांच्या मानाने ती कदाचित एवढी उल्लेखनीय नसतीलही पण प्रातिनिधिक आहेत.






ह्या मनोर हाऊस मध्ये आम्ही उतरलेलो होतो.


हे झाड जकारांडा असल्याचे मला नंतर कळले.






आणि ही काफळे. बोरांसारखी दिसणारी तांबडी. पण मला फारशी आवडली नाहीत. पाठीमागे दिसणारी हिरवी फळे आहेत जर्दाळू. ते मात्र मला जाम आवडले होते. इतरांनाही.


देवदारू वृक्ष (कोनफळाचे झाड, कोनिफरस पाईन)

गडद हिरव्या रंगांची सुईसारखी पाने असलेले हे कोनफळाचे वृक्ष, सदाहरित असतात. त्यास महादेवास प्रिय असलेला पवित्र वृक्ष मानतात आणि त्याच्या खोडाचा चंदनाप्रमाणे उपयोगही करतात. उंच वाढणार्‍या ह्या वृक्षास, वरवर जावे तसतशा आखूड होत जाणार्‍या क्षैतिज-आडव्या फांद्या असतात. त्यामुळे झाडाचा आकारही दुरून, उभ्या कोनासारखाच दिसतो.


कोनफळे


ही आहेत आणखी एका वेगळ्या प्रकारची कोनफळे.


उत्तराखंडात मोठी थोरली ईडलिंबे मिळतात. त्या लिंबांचे सरबत म्हणजे ’शिकंजी’. त्याचीच ही जाहिरात.


हे झाड जंगली बदामाचे आहे. तिकडे ह्याला ’कठाळ’ म्हणतात.


लिचीची ही झाडे कॉर्बेट स्मृतीसंग्रहालयासमोरची आहेत.


आपला फणस तिथेही दिसला म्हटल्यावर, फणसाला सुद्धा बरे वाटले.


हे वृक्ष हरिद्वारचे आहेत. मायबोली डॉट कॉम वरील साधना ह्यांनी  ह्याची ओळख पटवली आहे.


खरे तर आळकुड्या आणि रताळी आपल्याकडेही मिळतात. पण म्हणून काही त्याची कोणी चाट करून खात नाही! पण तिथल्या अंदाजाने आपल्याला नव्या पाककृती सुचल्या तर हव्याच आहेत की.


ह्या देखण्या वृक्षाची ओळख मायबोली डॉट कॉम वरील दिनेशदांनी पटवली आहे. ’सिल्व्हर ओक’ म्हणून.


ह्या देखण्या वृक्षाची ओळख मायबोली डॉट कॉम वरील दिनेशदांनी पटवली आहे. ’तुतारी’ म्हणून.

लोकहो, इतरही अनेक वनस्पतींनी उत्तराखंड संपन्न झालेला आहे. ही आहे केवळ एक झलक.


हो. बोगनवेल आहे. मात्र इतका डौलदार वृक्ष क्वचितच बघायला मिळतो. अगदी आपल्याकडेही.

२०१२-०९-०८

उत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा

गेल्या भागात उत्तराखंडातील इतक्या वनस्पती पाहिल्या पण एक कळीची वनस्पती राहूनच गेली. आम्हाला मात्र संपूर्ण प्रवासात इथे तिथे सर्वत्र ती दिसतच राहिलेली होती. सदाहरित आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची.

मोगर्‍याच्या झाडासारखेच हिरवेगार, बुटके झुडूप. मुळात हिरव्या-पोपटी रंगाच्या कळ्यांचे झुपके, फुलत फुले  मोठी होतात तसतशी पांढरी होऊ लागतात, नंतर उमलत विकसत जात असता त्यांना निळी जांभळी छटा चढू लागते. अशा सर्व अवस्थांतले गुच्छ बाळगणारे झुडूप मग खूपच देखणे दिसू लागते. ह्या झुडुपाला म्हणतात हायड्रन्झिया.

उत्तराखंडात जिथे जिथे गेलो तिथे तिथे होता हायड्रन्झिया आणि नावा म्हणजे होड्या. कारण तळी होती, नद्या होत्या म्हणून नावाही होत्या.. त्या सगळ्यांचीच ही दखल आहे.



नैनितालचे वैशिष्ट्य हे की डोंगराच्या खळग्यात वसलेले असूनही, तलावावर हवा भरपूर. त्यामुळे शिडाची होडी येणे स्वाभाविकच म्हणायला हवे. त्या होड्या तशा विहरतांना पाहून सहलीचा माहोल आपोआपच निर्माण होत जातो.









रोईंग म्हणजे वल्ह्याच्या नावा चालवायला जड पण बसून जायला आनंददायक. तलावाच्या काठावरून किनार्‍यावर बांधून ठेवलेल्या नावा अगदी एकदुसर्‍यासारख्या दिसत होत्या.



ओव्याच्या पानांची आठवण व्हावी इतकी हिरवीगार, कांतीमान, देखणी पाने. जणू उत्साहाचे प्रतीकच.




उमलतांना पांढुरके होत जाणारे गुच्छ.








पायडलच्या होड्या दिसतात डौलदार. मात्र पायडल मारल्यावरही, वल्ह्यांच्या होडीच्या तुलनेत जेव्हा त्या मंदच चालतात, तेव्हा मात्र उगाचच असहाय्य झाल्यासारखे वाटू लागते.


ऊन जर इतके झालेले नसते तर हे झाड अद्वितीय दिसले असते कदाचित!


जेवढा भार अधिक तेवढीच नाव मंद!




इथे आहेत लहानग्यांच्या छोट्या नावा. पूर्वी असल्या नावा पाहायला मिळतच नसत. ही हल्लीची खेळणी आहेत. नव्या युगाची.



पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे असेल तर मी हाड्रन्झियाचाच मोठ्ठा गुच्छ पसंत करेन!



हे आहे झॉर्बिंगचे साधन. मला मात्र माहीतच नव्हते तेव्हा. एरव्ही नवकुचियातालला हे पाहिले तेव्हा वेळही होता. उत्साह होता. मात्र हे काय आहे असेही मी तिथे कुणाला विचारले नव्हते. परतल्यावर एके दिवशी टीव्हीवर एका कार्यक्रमात प्रात्यक्षिक पाहिले तेव्हा मला तर हे फारच आवडले होते.


हिरव्या गार पासून तर निळ्या जांभळ्या ठिपक्यांपर्यंतचे सर्व अवतार एकाच झाडावर!


.

२०१२-०९-०९

उत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी































.

२०१२-०९-११

उत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी

नैनिताल सरोवर, नैनादेवी मंदिर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत प्राणिसंग्रहालय, रज्जूमार्गाने वर जाऊन दुर्बिणीतून दूरदर्शन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे नैनिताल गावात आहेत. सारीच स्थळे उत्तम आणि जरूर पाहावीत अशी आहेत. सरोवरातील वल्ह्याच्या नौकेतून मारलेला सुमारे तासभराचा फेरफटका तर अविस्मरणीय. आम्ही सर्वच गोष्टीत खूप रस घेतला. प्राणीसंग्रहालय तर आम्हाला बेहद्द आवडले. तिथून बाहेर पडल्यावर आमच्या बसमधील सर्व मुलांनी, मग पोलिसचौकीसमोर एका ओळीत उभे राहून पिपाण्या फुंकत आपला आनंद व्यक्त केला.



दुसरे दिवशी रानीखेतच्या कुमाऊँ रेजिमेंटचे लष्करी वस्तुसंग्रहालय पाहिले. इथे फारसे लक्षात राहावे असे काही नाही. तिसरे दिवशी नौकुचियाताल, भीमताल हे तलाव बघितले. तरीही नैनिताल पाहिल्यावर मग त्यांच्यात फारसे पाहण्यासारखे काही खास उरत नाही. चवथे दिवशी आम्ही कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य पाहणार होतो. सकाळी नास्ता करून निघाल्यावर जेवायला आम्ही कॉर्बेट जंगलानजीकच्या लि-रॉय हॉटेलात पोहोचलो. हे हॉटेल मात्र दिल्लीच्या त्यांच्या भावंडापेक्षा एकदमच निराळे आहे. सुंदर, स्वच्छ, प्रशस्त आणि सुव्यवस्थित आहे. आम्हाला आवडले. जेवण झाल्यावर सुमारे तास दीड तास प्रथम बसने आणि मग जिप्सीतून प्रवास करून आम्ही प्रत्यक्ष जंगलाच्या दारात जाऊन पोहोचलो होतो. त्यावरून हे हॉटेल जंगलापासून खूपच दूर असावे असे दिसते.

प्रवेशद्वाराशी कुठल्या जिप्सीसोबत कुठल्या मार्गदर्शकाने जावे ह्यावरून सुमारे अर्धा तास मोडल्यावर आमच्या लक्षात आले की आमचे टूर-लीडर्स गायब आहेत. मोबाईलवरही अनरीचेबल आहेत. केवळ दोन तासच मिळण्यासारखे असतांना अशा प्रकारचा वेळाचा र्‍हास होतांना वाईट वाटत होते. सगळ्यांनीच निकराने प्रयास केल्यावर, वन-अधिकार्‍याचे मार्गदर्शकाशी असलेले गणित पटून आम्ही निघायला तयार झालो.

आमच्या दुर्दैवाने त्याच दिवशी राजस्थानहून नैनितालला आलेले प्रचंड धुळीचे वादळ त्याच सुमारास जंगलात अवतीर्ण झाले. सकाळपासूनच ढग ढग होते. आकाश अंधारलेले होते. अधून मधून धूळ उडत होती. आता मात्र कधीही पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले. धुळीने आकाश भरून गेले. कॅमेरे बंद करावे असे वाटू लागले. मात्र महत्प्रयासाने जिप्सी, मार्गदर्शक, चालक अशी सगळी जय्यत तयारी झाल्यावर परत फिरण्याचा प्रश्नच नव्हता. जंगलात दिसेल काय हे मात्र अनिश्चित होते. तरीही आम्हाला फारसे खाली उतरू न देता, किरकोळ माहिती देत त्यांनी भरभर पुढे चालवले. जंगलाच्या दुसर्‍या बाजूस असलेल्या वनखात्याच्या कँटीनजवळ नेऊन उभे केले. पर्यटकांना खाद्य-पदार्थ-चहा यांत रांगा लावाव्या लागून त्यात अर्धा तास लोप पावला. मग परततांनाही घाई घाई, फारसे न थांबता त्यांनी प्रवेशद्वाराजवळ पावते केले. क्रमप्राप्त वातावरणात ह्याहून अधिक काही पदरी पडणार नाही अशी पर्यटकांची खात्री पटवल्यावर आम्हाला मुक्कामी परत आणले.

तरीही मला हे जंगल आवडले. त्याच्या वाटेवर दुतर्फा आंबा, लिची इत्यादींच्या बागा होत्या. जंगलात टिटवी, तांबट, मोर, शेखरू तसेच एक स्वर्गीय पक्ष्यांची जोडी दिसली. हे पक्षी कावळ्याहून किंचित लहान, रंगाने शुभ्र पांढरी असलेली लांबलचक (सुमारे दोन फूट) शेपटी कम पिसे असलेले होते. उडले तेव्हा शेपट्या पतंगाच्या शेपटीसारख्या सळसळत जात असतांना दिसल्या अगदी अद्भूत दृश्य. असेही क्षण बघता आले म्हणूनच आम्हाला पर्यटनाचे सव्यापसव्य सार्थकी लागले असे वाटले. त्यांचे फोटो मात्र कुणालाच काढता आले नाहीत. एकतर त्यांच्या अत्यंत चपळ आणि अवखळ हालचाली, दुसरे म्हणजे धुळीचे वादळ सुरू असलेले आणि तिसरे म्हणजे जिप्सीवाल्यांना आधीच सुमारे तास वाया गेल्याने भरभर फेरी संपवण्याची असलेली घाई, ह्यामुळे चालत्या जिप्सीतून जे केवळ नेत्रच पाहू शकतात ते कॅमेरे कसे टिपू शकतील. असो. केवळ पावसाळ्यात वाहणर्‍या नद्यांना तिथे बरसाती म्हणतात. अशाच एका कोरड्या ठक्क पडलेल्या बरसातीत आम्हाला मोर दिसला. मग शेखरांची एक जोडी झपाट्याने पळतांना दिसली. कॅमेरा रोखताच येईना. जिप्सीने पाठलाग करत आम्ही मागे मागे जात होतो. ती जोडी मग एका खूप उंच झाडावर चढली. वर जातांना कॅमेरा रोखला, तेव्हा खाली येतांना केवळ शेपटी पकडता आली.

माकडे आणि हरणे बरीच दिसली. निष्पर्ण झालेली मात्र फळांनी लगडलेली खूप बेलफळाची झाडे दिसली. जंगलभर इथे तिथे बेलफळे पडलेली दिसत होती. आम्ही सोबतही बरीच उचलून घेतली.

दुसरे दिवशी सकाळी हॉटेल सोडतांना, समोरच्याच जंगलात अकल्पितपणे कोल्हा दिसला. आजूबाजूच्या परिसरात इतका मिसळून गेलेला होता की दिसला नाही दिसला हे नक्की होईपर्यंत तो नाहीसाही झालेला होता. माझ्या तर केवळ एकाच फोटोत कोल्हा ओळखू येतो आहे. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी ऋषीकेश दर्शन केले. तिथे मंदिरे तर पाहिलीच पण लक्षात राहिला तो लक्ष्मण-झुला. सालोसाल इमाने इतबारे सेवा देणारा, जनावरांमुळे अवघडून बंद होणारा पूल.



इथे उल्लेखनीय हे आहे की १९३० मध्ये जेव्हा शिवप्रसाद तुल्शान बहादूर ह्यांनी आपल्या वडिलांनी म्हणजेच राय सूरजमल झुनझुनवाला यांनी बांधलेल्या आणि १९२४ सालच्या मोठ्या पुरात वाहून गेलेल्या पुलाचा जीर्णोद्धार करत असता, हा सध्याचा पूल बांधला आणि त्यावर लिहीले,

“ह्या पुलावर कधीही पथकर आकारण्यात येणार नाही!”

हा होता, जनतेचा पैसा कसा निस्वार्थपणे वापरावा, ह्याचा आदर्श दाखला.

त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही मसूरीला पोहोचलो. मॉलरोडवर फिरायला गेलो असता तिथे, केंब्रिज- बुक-स्टॉलमध्ये दर शुक्रवारी विख्यात लेखक रस्किन बाँड बसतात आणि विकत घेतलेल्या आपल्या पुस्तकावर स्वाक्षरी करून देतात अशी पाटी पाहिली. लगेचच आमच्या बसमधली मुले तिथे गेली. आदित्यने “डस्ट ऑन द माऊंटन” हे पुस्तक घेतले आणि त्यावर रस्किन साहेबांनी स्वाक्षरी केली.



मसुरीला दुसरे दिवशी स्थलदर्शन होते. केम्प्टी फॉल बघितला. गोंडोल्यातून मजेदार प्रवास केला. मात्र तिथली मुंबईला लाजवेल अशी शरीरास शरीर भिडवणारी गर्दी पाहून मग मुंबईच बरी वाटू लागली. निदान शिस्तीची तरी आहे.

संध्याकाळी रज्जूमार्गावरून टेकडीवरचा प्रवास होता. अगदी व्ह्यू-पॉईंट म्हटला तरी तिथून काहीच दिसण्यासारखे नव्हते कारण हवाच धूसर होती. मात्र वरती जणू जत्राच भरलेली होती. तिचाही आम्ही भरपूर लाभ घेतला. गरम-गरम वाफाळते मोमो खाल्ले. खालच्या चित्रात दिसत आहेत मोमो आणि बालमिठाई.



आता बालमिठाईची गोष्ट सांगावीच लागणार. एका मंदिरात आमची भेट मराठी बोलणार्‍या तिथल्याच एका नुकतेच लग्न झालेल्या मुलीशी झाली. त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. तिचा नवरा तिथलाच रहिवासी होता. ती मात्र होती नवी मुंबईची. त्यामुळे आम्हाला मराठी बोलतांना पाहून तिला माहेरचेच कुणी आलेत असे क्षणभर वाटले. बोलता बोलता मग असे कळले की तिथली प्रसिद्ध मिठाई, “बाल-मिठाई” म्हणून ओळखली जाते. मग त्या बुक-स्टॉलपाशीच एका दुकानात ती मिळालीही. पेढ्याचा ऐवज चॉकलेटी होईस्तोवर परतायचा, मग त्यावर बारके हलवे जडवून तयार होते “बाल-मिठाई”. आम्हाला ती आवडली.

परततांना संध्याकाळ झाली होती. रात्र पडू लागली. मॉलरोडवरून हळूहळू परत येत असता थंडी जाणवू लागली. मुंबईसारखेच तापमान असलेली मसुरी मग खर्‍या अर्थाने मसुरी वाटू लागली. थोड्या वेळाने तर, स्वेटर घेऊन निघणार्‍यांना हसणारे आम्ही, आता अक्षरशः कुडकुडू लागलो होतो. उन्हाळ्यातल्या संध्याकाळची मॉलरोडवर फिरण्याची गंमत, तिथे जाऊनच अनुभवावी अशी आहे. उद्या आम्ही हरिद्वारला निघणार होतो.

सकाळी आम्ही खिडकी उघडली आणि मग वाटू लागले की, अरे वा, असली खिडकी असली तर कितीही दिवस इथे आरामात मौज करता येईल. तीच ही खिडकी. ब्रेंटवूड हॉटेलची.



उशीला टेकून बसून तर पाहा, खाली काय दिसतेय ते! दूरवर खोलात पसरलेली दून व्हॅली. सकाळी उठताच आम्ही पाहिले की दाराशी “पिठ्ठू” जमा झालेले. पिठ्ठू म्हणजे पाठीवरून प्रवाशांचे सामान वाहून नेणारे हमाल. आमचे हॉटेल मॉलरोडवर. तिथे बस येण्यास मनाई. मग दूरवरून सामानाची ने-आण करतात हे पिठ्ठू. ६०-७० किलोचे वजन पाठीवर लादून सतत चढ-उतार आणि नाग-मोडी वळणांनी जाणारा रस्ता, ते रिकाम्या चाललेल्या प्रवाशांहूनही वेगाने पार करत होते. तिथला आवडलेला आणखी एक प्रकार म्हणजे कुल्हडीतला चहा. कदाचित चहातले पाणी मातीत शोषले जाऊन निव्वळ घट्ट चहा त्यामुळेच चांगला लागत असावा.



मग आम्ही हरिद्वारला गेलो. दुपारचे जेवायलाच खरे तर आम्ही तिथे होतो. जेवण झाल्यावर केवळ एकच कार्यक्रम पत्रिकेवर होता. संध्याकाळी सात वाजताच्या गंगा-आरतीचा. मग आमच्यापैकी अनेक लोक स्वतःचे स्वतःच मनसादेवी मंदिरात जाऊन आले. आम्हाला टूर-लीडर्सनी, जाल तर परत यायला उशीर होईल, इत्यादी कारणे देऊन परावृत्त केले. प्रत्यक्ष गंगा-आरतीला जाऊन आल्यावर मग आम्हालाही जाणवले, आम्ही काय गमावले होते ते. गंगेचा घाट अलौकिक आहे. तिथल्या पाण्याचा वेग संस्मरणीय आहे. तिथे पाहण्यासारखे इतके काही आहे की आम्ही वस्तुतः जेवण झाल्यावर तडक इकडे निघून यायला हवे होते अशी खात्री पटली.



रोज संध्याकाळी सात वाजता हर की पौडी वर गंगा मंदिर आहे. तिथे आरती होत असते. भारतभरातून हजारो-लाखो लोक रोज तिथे जमतात. सगळे बहुधा नवे असतात. तरीही शिस्त, भक्तीभाव आणि देशप्रेम ह्या गोष्टींनी प्रेरित होत्साता, गंगेवरील प्रत्येक यात्रेकरू तिथे उत्साहाने, उमेदीने आलेला असतो. लाजलज्जा न बाळगता स्त्री-पुरूष सहजपणे तिथे कोणत्याही वेळी स्नान करत असतात. आईला लेकरू भेटते तेव्हा कधीही भेटले तरी प्रेमाचे भरते येतेच. तसेच आम्ही सारे गंगेची लेकरे आहोत. हिंदू आणि मुस्लिम, ब्राम्हण आणि शुद्र, देशी आणि परदेशी, हवशे-नवशे-गवशे सगळेच ह्या सोहळ्याचे साक्षी असतात. हा सोहळा न चुकता रोज साजरा होतो. पाऊस असो, ऊन असो, कुडकुडती थंडी असो. न गंगेच्या प्रवाहास कधी खळ पडला आहे, न यात्रेकरूंच्या उत्साहास. शेकडो, हजारो वर्षे हे असेच चालत आलेले आहे. म्हणूनच तर लग्नाच्या मंगलाष्टकांत, एक असे आहे कीः

यावत्‌ वीचितरंगात वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया।
यावत्‌ आकाशमार्गे तपति दिनकरो भास्करो लोकपाल: ॥
यावत्‌ वज्रेंद्रनीलस्फटिकमणीशिला वर्तते मेरुश्रुंगे ।
तावत्‌ शंभोप्रसादात स्वजनपरिवृतौ जीविताम दंपति वै ॥

मात्र सगळे शुभंकर असले तरी काही गोष्टींचा सल मनातून जात नाही. गंगा-आरतीच्या फोटोंपैकी पहिल्या फोटोच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात वर्षानुवर्षे उभे असलेले प्लॅस्टरही न केलेले मंदिर मला सलते. तुम्हाला? मला वाटते ते तिथे नसावे. भारतातील प्रत्येकास गौरवान्वित करेल असे उत्तम काहीतरी तिथे ताबडतोब तयार व्हावे. त्या जागेची, त्या गंगेची, त्या घाटाची शान वाढवेल असे काहीतरी तिथे लगेचच व्हावे. वस्तुतः असे वाटणारा मी काही एकटा किंवा पहिला नाही. पण हे होऊ शकत नाही हीच आपली, भारताची खंत आहे.

दुसर्‍या दिवशी आम्ही दिल्लीला परतलो. जेवायला मेरठमधल्या मारवाडी भोजमध्ये आम्हाला नेले गेले. तिथे मात्र जेवण “मारवाडी” कसे असू शकते ते आम्हाला अनुभवायला मिळाले. ह्या हॉटेलात आधीच प्रचंड गर्दी झालेली होती. त्यात आम्ही दोन बसचे सुमारे पन्नास प्रवासी उतरलो. प्रत्येकास बसायला जागा मिळेपर्यंत सुमारे अर्धा तास गेला. बसायला जागाही मुंबईत दादरमध्ये खुर्चीच्या पाठीमागे उभे राहून मिळवावी लागते तशी मिळवावी लागली. तेव्हा पुन्हा वाटले मुंबईच बरी. निदान शिस्त तरी असते. मग वेटरच्या हातातून ताटे ओढून घेण्यापर्यंत पाळी आली. एव्हाना सुरवातीस जेऊ लागलेले बाहेरही पडू लागले होते. रिकाम्या ताटांतून पंधरा पंधरा मिनिटे कुणी वाढायला येईना. कारण क्षमतेपेक्षा ग्राहक किमान दुप्पट तरी झालेले होते. आमच्या बसमधील अनेकांनी जमतील ते उपाय करून, मिळेल ते खाऊन घेतले. काहींनी तर केवळ आईस्क्रीम चटकन मिळण्यासारखे होते म्हणून तेच खाऊन जेवण संपवले. वेळ निघून चाललेली होती. बसही सुटली नाही तर आमचीच गाडी चुकणार होती. काही जणांची विमानांचीही तिकिटे होती. म्हणून इतर कुठलाही विचार न करता प्रवासी बसमध्ये जाऊन बसले. सहल संपन्न झाली.

परतल्यावर “मारवाडी भोज” हॉटेल आणि सचिन ट्रॅव्हल्स ह्यांना ई-मेलने सारा वृत्तांत कळवून ह्याहून चांगल्या व्यवस्थापनाची अपेक्षा व्यक्त केली. त्याला उत्तर देण्याचे सोडाच, पण पोचही देण्याचे सौजन्य दोघांनीही दाखवले नाही. त्यामुळे मी “पर्यटन व्यवसायाने आम्हाला काय द्यावे, आमच्या काय अपेक्षा आहेत” ह्याबाबत एक सविस्तर लेखच लिहिला. तो आहे ह्या मालिकेचा शेवटला म्हणजे सातवा भाग. तळाशी मी “मारवाडी भोज”ला लिहिलेल्या पत्राचा मसुदा आहे. केवळ माहितीकरता.

संदर्भः

१. स्वर्गीय पक्षी http://animals.nationalgeographic.com/animals/birds/bird-of-paradise/
२. बाल-मिठाई http://www.merapahadforum.com/culture-of-uttarakhand/bal-mithai-(-)-famous-delicious-sweet-of-uttarakand/
३. धुळीचे वादळ http://www.amarujala.com/city/badaun/Badaun-41936-119.html

Recently we had a very frustrating experience at “Marwadi Bhoj, Meerut”. We reached your place around 1200 hrs on 21-05-2012 on way to Delhi. Dinning hall was jam packed. Crowd was pouring in. Rush was beyond manageable. No body attended to us. After several reminders by our Tour Leaders, thalis were put before us after half an hour. Follow-up services were still invisible. Tourists were running after waiters. One Mr.Goyal was trying to pacify customers. Some of us were offered ice-creams to pacify. We had to leave without completing our lunch and make our arrangement elsewhere. We could not avail the services we had already paid for. This was highly embarrassing. Why do you accept more customers than your capacity? This has left us un-satisfied and dis-pleased. The financial and vital-time loss is simply beyond compensation. I recommend Sachin Travels to discontinue being your customer.

२०१२-०९-१२

उत्तराखंडाची सहल भाग-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे?

प्रस्तावना

वाढत्या व्यस्ततेमुळे आणि मध्यमवर्गाच्या वाढत्या सधनतेमुळे पर्यटनाकरता पर्यटक-संस्थांची मदत घेणे अपरिहार्य ठरू लागलेले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय शहरवासियांत, त्यामुळेच मार्गदर्शित सहली लोकप्रिय होत आहेत. अशा सहलींचे स्वरूप, त्यामधे असलेली पर्यटकाची बाजू, पर्यटक-संस्थांची बाजू आणि पर्यटन स्थळातील पर्यटन-व्यावसायिकांची बाजू यांच्या प्रस्थापित समतोलाचे सिंहावलोकन करण्याचा हा प्रयास आहे. ह्याच तिन्ही पक्षांच्या परस्पर सहयोगातून आजच्या देशांतर्गत पर्यटन-प्रणालीचा विकास झालेला आहे. अशा ह्या पर्यटन-प्रणालीकडून, पर्यटकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याबाबतची ही निरीक्षणे आहेत. ह्या निरीक्षणांचा देशांतर्गत, भावी मार्गदर्शित-पर्यटनावर यथोचित परिणाम व्हावा आणि ते उत्तरोत्तर पर्यटकानुकूल, पर्यटकाभिमुख होत जावे हाच उद्देश आहे. ह्याचा उपयोग पर्यटक, पर्यटन-संस्था आणि पर्यटन स्थळांतील पर्यटन-व्यावसायिक ह्या तिन्ही संबंधित पक्षांना होऊ शकेल.

विख्यात पर्यटक संस्था

राजा-राणी ट्रॅव्हल्स, केसरी ट्रॅव्हल्स, सचिन ट्रॅव्हल्स, आकांक्षा ट्रॅव्हल्स, भाग्यश्री ट्रॅव्हल्स, चितारी ट्रॅव्हल्स, चौधरी यात्रा कंपनी इत्यादी अनेक विख्यात पर्यटक संस्था आज कार्यरत आहेत. प्रत्येक संस्थेचा पर्यटनविषयक दीर्घ अनुभव आणि अभ्यास आहे. त्या परस्परांत आर्थिक स्पर्धा आहे. पर्यटन संबंधित मानव-संसाधने विकसित करण्याच्या, त्यांच्या प्रशिक्षणाच्या आणि अध्ययन-अध्यापनाच्या सोयीही त्यांनी उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्याच फलस्वरूप, आज भारतातील अग्रगण्य सहलस्थानांवर पर्यटन करण्याच्या सोयी, शहरांतील पर्यटकांस सहजपणे उपलब्ध आहेत. अगदीच कमी वेळ पर्यटनाच्या नियोजनाकरता देऊनही, वर्षाकाठी आठ-दहा दिवस, देशांतर्गत कुठल्याही पर्यटनस्थळी आज आनंदाने सहल संपन्न करता येत आहे.

पर्यटनाच्या नियोजनाची गरज

पर्यटन करण्यास आपल्या घरातील किती आणि कोणत्या व्यक्ती तयार आहेत? त्यांना सोयीचे दिवस कोणते असणार आहेत? ज्या स्थळी पर्यटन करावयाचे त्याची निवड, ह्या उपलब्ध दिवसांवर अवलंबून असते. वर्षातून आपल्याला उपलब्ध असलेल्या दिवसांत पर्यटनास अनुकूल असणारे ऋतुमान कोण-कोणत्या जागी उपलब्ध असते? तिथे जाण्या-येण्याकरता ज्या प्रवासी मार्गाची निवड करायची असते त्यानुसार नियोजन करावे लागते. हल्ली रेल्वेचे आरक्षण चार-चार महिने आधीच होत असल्याने, हे नियोजनही किमान तितकेच आधी करावे लागते. या सार्‍यांचा विचार करूनच पर्यटन-संस्था आपापल्या जाहिरातीही, त्यापूर्वीच प्रकाशित करत असतात.

१. पर्यटन स्थळी आणि प्रवासादरम्यान आपले सामान सुरक्षित राहावे,
२. विविध पर्यटक सुविधा मिळवण्याबाबत आपली फसवणूक होऊ नये,
३. पर्यटनास उपलब्ध असलेल्या आपल्या सर्व वेळाचा यथोचित उपयोग होऊन पर्यटनकर्त्या सर्व सदस्यांस अधिकाधिक आनंद प्राप्त व्हावा,
४. पर्यटनादरम्यान खान-पानाच्या अव्यवस्थेपोटी पर्यटक आजारी पडून रसभंग होऊ नये,
५. पर्यटनस्थळापर्यंतचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, त्यात दोन-दोन तासांच्या अंतराने खानपानसेवा मिळत राहाव्यात, प्रसाधन सुविधा मिळत राहाव्यात, मन उल्हसित राहावे; इत्यादी अपेक्षा मनात असतातच.

पर्यटन नियोजनादरम्यानच, ह्या सार्‍यांबाबतच्या आपल्या माहितीची अपूर्णता जाणवू लागते. त्यासाठी आवश्यक त्या संपर्कांची उणीव भासू लागते. आरक्षणे हव्या त्या दिवशी, हव्या त्या तपशीलाने मिळवण्यातील आपली असमर्थता लक्षात येऊ लागते. म्हणून मग पर्यटक, पर्यटक-संस्थांचा आधार घेण्यास प्रवृत्त होतात.

पर्यटक-संस्थांचे प्रस्ताव

पर्यटक-संस्था आपापल्या संभाव्य पर्यटकांच्या अशा गरजा लक्षात घेऊन मार्गदर्शित सहलींचे आपापले प्रस्ताव तयार करतात. हल्ली, आठ ते दहा दिवसांच्या सहलीस लोक सहजी तयार होतात. कारण कमी दिवसांच्या सहलींत जाण्या-येण्यात जास्त वेळ जाऊन, सहलीचा आनंद फारसा पदरात पडू शकत नाही. तर दुसर्‍या बाजूस जास्त दिवस प्रवास करण्यास वेळच उपलब्ध नसतो, शिवाय आठ-दहा दिवसांनंतरचे पर्यटन, यथावकाश त्यातील नाविन्य सरत जाऊन कंटाळवाणे होऊ लागते. पर्यटक-संस्था, पर्यटन-स्थळीच्या-व्यावसायिकांशी चर्चा करून आपापली गणिते सोडवतात. प्रवासात वापरल्या जाणार्‍या बसचा प्रवास, बस-मालकास लाभकारक व्हावा, अतिथीगृहचालकास पर्यटक सोयीचा ठरावा आणि पर्यटन-संस्थेस सज्जड लाभ पदरात पडावा, ह्यादृष्टीने तडजोडी करून प्रस्ताव तयार केले जातात. ते प्रस्ताव पर्यटकांस कसे लाभदायक आहेत हे दाखवून देणार्‍या जाहिराती प्रकाशित केल्या जातात. प्रत्यक्षात वरील सर्व प्रकारचे नियोजन करण्यास असमर्थ असल्यानेच पर्यटक अशा पर्यटन-संस्थेप्रत पोहोचलेला असतो. त्याला फारसे पर्याय उपलब्ध नसतात.

ज्यांना नियोजनास खूप वेळ उपलब्ध असतो, खूप माहिती ज्यांनी मिळवलेली असते आणि ज्यांना स्वबळावर सहल यशस्वी करण्याची उमेद असते; ते इतरांस सोबत घेऊन असे पर्यटन यशस्वी करूनही दाखवतात. पुढे तेही पर्यटन-संस्था काढतात किंवा तिच्यात सहभागी होतात अशीही उदाहरणे आहेत.

पर्यटक संस्थांच्या प्रस्तावांतील अपरिहार्य तडजोडी

अशा प्रस्तावांत पर्यटकास काय हवे आहे त्याचा विचार, प्रस्तावास विक्रियोग्य करण्यापुरताच सीमित राहतो. पर्यटकही उपलब्ध प्रस्तावांचाच विचार करून, व त्यांच्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित, त्यातील एकाची निवड करून पर्यटन करत असतो. माझ्या पाहण्यात अशा प्रवासांत काही अपरिहार्य तडजोडी अनुस्यूत असतात. त्यांचीच चर्चा इथे करायची आहे.

१. पर्यटकास भारतीय शौचकूप हवा असतोः पर्यटक भारतीय असतो. त्यास, अपवाद-वगळता भारतीय शौचकूप हवा असतो. भारतीय रेल्वे तीनास एक ह्या प्रमाणात भारतीय शौचकूप उपलब्ध करून देत असते. असे असूनही अपवाद-वगळता सर्व पर्यटन-संस्था विदेशी कमोड असणारी अतिथीगृहेच उपलब्ध करून देत असतात. ह्याबाबत कुठलाही पर्यटक, कुठल्याही पर्यटक-संस्थेकडे, कोणतीही तक्रार, कधीही करत नाही. ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

२. पर्यटकांस दोघांकरताच्या खोलीत दोन स्वतंत्र पलंग हवे असतातः मधुचंद्रास जाणार्‍यांचा अपवाद करता सर्व पर्यटकांस दोघांकरताच्या खोलीत, दोन स्वतंत्र पलंग हवे असतात. मात्र अशा खोल्यांत जोडलेले पलंग किंवा दोघांकरता एकच विशाल मंचक आणि जोडलेले किंवा एकच विशाल पांघरूण पदरी पडते व त्याचीच ओढाताण रात्रभर करत राहावे लागते. ह्याबाबत कुठलाही पर्यटक, कुठल्याही पर्यटक-संस्थेकडे, कोणतीही तक्रार, कधीही करत नाही. ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

३. दोघांच्या खोलीतील अतिरिक्त तिसर्‍यास पलंग हवा असतोः बहुधा अशा तिसर्‍यास जमिनीवर पसरण्याकरता गादी आणून दिली जाते. त्या गादीच्या संचातीलही अपूर्णतांबाबतच्या तक्रारी करण्यात असे पर्यटक आपला अमूल्य वेळ अनेकदा गमावत असतातच. तरीही ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे.

४. कडक पलंगावर, पातळ कापसाची आरामदायक गादी हवी असतेः नेहमी मिळणार्‍या गाद्यांत अशी गादी क्वचितच आढळून येते. भारतीय ऋतुमानात जाड-जाड, कृत्रिम गाद्या सुखाची झोप घेऊ देत नाहीत. हे अतिथीगृहाच्या मालकांना कोण सांगणार?

५. खोली ताब्यात देतेवेळी पुरेसे पिण्याचे पाणी पिण्यायोग्य अवस्थेत उपलब्ध हवे असतेः पाणी भरण्याचे भांडे रिकामे असते, शिळेच पाणी बाळगत असते, त्यालाच वास येत असतो, ते माग-मागून मिळवावे लागते. तरीही ही तडजोड अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. वस्तुतः प्रत्येक खोलीत जल-शुद्धीकरण-यंत्र बसवून व विल्हेवाटीस योग्य कागदी पेले पुरवून हा प्रश्न सोडवला जाऊ शकेल. ह्या कारणांमुळेच काही पर्यटक संस्थांनी पर्यटकांना प्रत्येकास दरदिवशी खनिज-जल-बाटल्या पुरवणे सुरू केलेले आहे. हा पर्यायही परस्परांस सोयीचा आहे. मात्र ह्यामुळे अप्रत्यास्थ पदार्थाचा (प्लॅस्टिकचा) अनिर्बंध प्रसार होण्याचा वाढता धोका आहे.

६. भ्रमणध्वनी आणि प्रकाशचित्रकांच्या विजेर्‍यांच्या ऊर्जा-पुनर्भरणार्थ सोयी हव्या असतातः अनेक अतिथीगृहांतून अशा सोयी उपलब्ध नसतात व म्हणूनच मग विमानतळांवर-रेल्वेत भ्रमणध्वनी टांगून पर्यटकांना बसावे लागते. ही तडजोडही अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. याकरता कोणी प्रस्ताव नाकारल्याचे ऐकिवात नाही.

७. पर्यटनस्थळाचे वैशिष्ट्य असणारे स्थळ कार्यक्रमपत्रिकेत हवेच असतेः उदाहरणार्थ अबूला गेल्यावर गुरूशिखर करायचे नाही, हे पर्यटकास रुचणारे नसतेच. पर्यटन-संस्था ते कार्यक्रमपत्रिकेत का ठेवत नाहीत, हा त्यांच्या, इतर-पर्यटन-व्यावसायिकांशी न पटलेल्या गणिताचा भाग असतो. ही तडजोडही अपरिहार्य असल्याचे सर्वमान्यच झालेले आहे. मात्र पर्यटक मग स्वतःच स्थानिक जुळवाजुळव करून हवे ते साधण्याचा प्रयत्न करतो. कधी यशस्वी होतो. तर कधी उगाच राहतो. मात्र केवळ ह्या कारणाने प्रस्ताव नाकारू शकत नाही.

८. पर्यटनस्थळी विख्यात असलेल्या स्थळाकरता पर्याय हवा असतोः उदाहरणार्थ अजमेरला दर्ग्यास भेट देण्याची इच्छा नसलेल्यास, पुष्करला भेट देण्याचा पर्याय हवा वाटत असतो. प्रस्तावात मात्र अशा पर्यायांचा विचार कधीच केला जात नाही. नवीन धरणे, उद्द्याने, ऊर्जा-संयंत्रे व अन्य विकासकामांच्या स्थळांचा असे पर्याय म्हणून जाणीवपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. प्रस्तावाची कार्यक्रम-पत्रिका जितकी अधिक लवचिक करता येईल तितकी ती पर्यटक-धार्जिणी होईल. मात्र हे पर्यटक-संस्थांनी का करावे? अशी आजची स्थिती आहे!

९. खरेदीसाठी नियोजित स्थळास पर्याय हवा असतोः प्रत्येक प्रस्तावात खरेदीसाठी नियोजित स्थळ असते, स्थानिक पोषाखात प्रकाशचित्रणाकरता नियोजित स्थळ असते, तसेच सूर्योदय-सूर्यास्त दर्शनाकरताही नियोजित स्थळ असते. सारेच पर्यटक अशा स्थळांचे चाहते नसतात. काहींना इतर काही पर्याय हवा वाटत असतो. मात्र तो उपलब्ध नसतो. अशा स्थळांना देखण्या उद्यानांचा, स्थानिक नाटक-चित्रपट-नृत्य-गायन-वादन-लोककला इत्यादी कला-कौशल्याच्या कार्यक्रमांचा सशक्त पर्याय उपलब्ध असायला हवा. ह्याचा विचार प्रामुख्याने स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी जाणीवपूर्वक करायला हवा आहे.

१०. कालौघात अति-व्यावसायिकीकरण झालेल्या किंवा वातावरणानुरूप दर्शनीयता ठरणार्‍या स्थळांना नवे पर्याय शोधायला हवे असतातः केम्टी फॉल ह्या स्थळाचे अति-व्यावसायिकीकरण झालेले आहे. मसूरीस जाऊनही केम्टी फॉल नको वाटणार्‍यांकरता सशक्त पर्याय शोधायला हवा आहे. मसूरीस अनेकदा धूसर हवामानामुळे गन-हिल-पॉईंट दर्शनीय राहत नाही. दार्जिलिंगला कांचनजंगाही अनेकदा धूसर हवामानामुळे दर्शनीय राहत नाही. अशावेळी त्यांचेकरता सशक्त पर्याय (उदा. पुष्पप्रदर्शन, निवडुंगांची लागवड इत्यादी) शोधायला हवा आहे.

पर्यटक ह्या अपरिहार्य तडजोडींसकट प्रस्ताव स्वीकारतात आणि मिळेल तो आनंद साजरा करून घेतात. मात्र असे प्रस्ताव तयार करतांना पर्यटन-संस्था प्रवासी-वाहन-धारकांकडून आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांकडूनही उप-प्रस्ताव मागवत असतात. हे उप-प्रस्ताव पर्यटकांना कळत नाहीत. मात्र पार्श्वभूमीत हे व्यवहार सुरूच असतात. सहलीचे सारे अर्थकारण, बहुतकरून अशा प्रस्तावांवरच आधारलेले असते. ते प्रस्ताव आणि त्यांखातर पर्यटकांना कराव्या लागणार्‍या तडजोडी आता आपण पाहू या.

प्रवासी-वाहन-धारकांचे उपप्रस्ताव आणि त्याबाबत पर्यटकास कराव्या लागणार्‍या तडजोडी

कुठल्याही वाहनधारकास, दिवसाला अमूक एक अंतर प्रवास केल्याविना वाहन, लाभकारक ठरत नसते. म्हणून दिवसागणिक वाहन-प्रवास वाढविण्याकडे त्याचा कल असतो. वस्तुतः हा कल पर्यटकाच्या हिताच्या कायमच विरोधात असतो. मात्र, वाहनधारक पर्यटक-संस्थेशी देव-घेव करून असे प्रश्न मार्गी लावत असतो. पर्यटक-संस्थेनी पर्यटकाचे हितरक्षण करावे अशी या व्यवहारात पर्यटकाची अपेक्षा असते. मात्र “प्रस्ताव” विक्रियोग्य ठरेल इतपतच पर्यटन-संस्था, पर्यटक हिताचे रक्षण करतात. ही तडजोड पर्यटकास नाइलाजाने स्वीकारावीच लागते. कधीकधी केवळ ह्या कारणानेच पर्यटक-संस्थेचा प्रस्ताव नाकारण्याची पाळी पर्यटकावर येत असते. रस्त्यावरील वाहनातून सलग दोन तासांहून, रुळांवरून २४ तासांहून आणि विमानातूनही शक्य तोवर दोन तासांहून सलग देशांतर्गत प्रवास करू नये. तरच तो सुखकर होत असतो. त्याकरता सुयोग्य थांबे घेण्याची आणि तेथे प्रसाधनाची, विश्रांती घेण्याची किंवा राहण्याची योग्य सोय करायला हवी असते. पर्यटन-संस्था अशा सोयींची बर्‍यापैकी नीट काळजी घेतात असे दिसते.

शिवाय वाहनप्रवासारंभाच्या वेळा सोयीस्कर असाव्यात. विशेषतः सकाळी सहाची विमाने कधीच सोयीस्कर ठरत नाहीत. ती निवडल्यास पर्यटनाची सुरूवातच जागरण आणि थकव्याने होते. कोकण प्रवासाकरता पहाटे ५ ला प्रवास सुरू करण्याचे अनेकदा सुचवले जाते. वाहन-व्यावसायिकाचे दृष्टीने हे कदाचित सोयीचे असूही शकेल मात्र पर्यटकास ते नेहमीच तणावग्रस्त करत असते. पर्यटकाने आदर्शतः सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यानच संयमित प्रवास केल्यास तो अधिक सुखकर ठरू शकतो. अशा उप-प्रस्तावांतील धोके, ताबडतोब लक्षात न आल्याने किंवा नाइलाजाने पत्करल्यामुळे पर्यटन सुखकर न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तुमच्याही पाहण्यात असतील.

स्थानिक अतिथीगृहचालकांचे उपप्रस्ताव आणि त्याबाबत पर्यटकास कराव्या लागणार्‍या तडजोडी

स्थानिक अतिथीगृहचालक, अनेकदा खानपानासहितचे उप-प्रस्ताव देत असतात. अनेकदा ते विमानतळा/रेल्वेस्थानका पासून/पर्यंत च्या प्रवास सुविधाही पुरवण्याचे उप-प्रस्ताव देत असतात. अशा उप-प्रस्तावांमुळे पर्यटन-संस्थाही प्रभावित होत असतात. अशा सुविधा पर्यटक अनेकदा वापरूच शकत नाहीत. तरीही त्यांचा भुर्दंड पर्यटकांना सोसावाच लागत असतो. उदाहरणार्थ कलकत्याहून सिक्कीमला नेल्या जाणार्‍या सहली, मुंबई-कलकता-न्यू-जलपैगुडी रेल्वे-प्रवासास अनुकूल योजिल्या जातात. वेळ आणि कष्ट वाचवण्याकरता प्रवासी, मुंबईहून विमानाने कलकत्त्यास येणे पसंत करतात. त्यांना स्वखर्चाने अतिथीगृहाप्रत पोहोचावे लागते.

पर्यटकाने पर्यटक-संस्थेवर असलेल्या विश्वासापोटी मूळ प्रस्ताव पत्करलेला असल्याने, स्थानिक अतिथीगृहचालकास पर्याय शोधणे त्याला सोयीचे वाटत नाही. अशा वेळी पर्यटकाचे वतीने पर्यटक-संस्थेने समस्येवर उपाय शोधावा अशी अपेक्षा असते. मात्र पर्यटक संस्थेस त्याची गरज वाटत नाही. कारण त्यांचा मूळ प्रस्ताव आता विकला गेलेला असतो.

पर्यटनस्थळी जीवित आणि सामानाची सुरक्षितता व फसवणूक न होण्याची हमी, ह्या दोन गोष्टी जर पर्यटन-संस्था, पर्यटकास, स्थानिक-पर्यटन-व्यावसायिकांचे मदतीने मिळवून देऊ शकत असेल तर त्याचे उचित मूल्य देण्यास खरे पर्यटक केव्हाही तयारच असतात. तसा पुढाकार त्यांनी घ्यावा अशीच पर्यटकांची अपेक्षा असते.

मायबोली डॉट कॉम वरील प्रकाशनाचे दुवे

उत्तराखंडाची सहल भाग-१: पूर्वतयारी
उत्तराखंडाची सहल भाग-२: मुंबईच बरी
उत्तराखंडाची सहल भाग-३: उत्तराखंडातील वनस्पती
उत्तराखंडाची सहल भाग-४: हायड्रन्झिया आणि नावा
उत्तराखंडाची सहल भाग-५: पशुपक्षी
उत्तराखंडाची सहल भाग-६: देवभूमी
उत्तराखंडाची सहल भाग-७: पर्यटन प्रणालीने काय द्यावे?




















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...