https://www.maayboli.com/node/45931
मध्यंतरी येसोमिटी नॅशनल पार्कवरचा लेख वाचला नी आमची या नॅशनल पार्कची ट्रीप आठवली नी त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षातील अमेरिकेतल्या विविध नॅशनल पार्क मधील भटकंती आठवली. देशामध्ये असताना कान्हा, रणथंबोर, बंदिपूर, रंगनथीट्टू, भरतपूर अशी अनेक जंगले धुंडाळून झालेली होती नी या नॅशनलं पार्कस च्या भटकंतीला मी फारच सोकावले होते. त्यामुळे अमेरिकेत आल्यावर इथली नॅशनल पार्क बघण्याची उत्सुकता होती. नी गेल्या दहा वर्षात ग्लेशियर, यल्लोस्टोन, ऑलिंपिक, येसोमिटी, डेनाली, बॅन्फ व जास्पर, ब्रायस कॅनयन, झायन ई. पालथी घातली.
ही लेखमाला म्हणजे या भटकंती मधल्या निरनिराळ्या आठवणींचा कोलाज!
१. येसोमिटी नॅशनल पार्क :
२००४ च्या ऑगस्ट महिन्यात आत्ये बहिणीकडे बे एरियात गेलो असताना २ दिवस येसोमिटीला (योग्य उच्चार यशोमती :D) कॅम्पिंगला जाण्याचे ठरवले. Little did we know then that this beauty can’t be justified in 2 days. ५-६ दिवस कॅलिफोर्निया ला आलेलो असल्याने ह्यापेक्षा अधिक वेळ जाणे शक्यच नव्हते.
पण गेलो नी अक्षरश: प्रेमात पडलो. २ दिवस स्वत: तर गाडीने पार्क जमेल तितका पालथा घातला. पण या अमेरिकेतल्या आमच्या पहिल्या वाहिल्या नॅशनल पार्क ची एक सुंदर आठवण मनात राहिल्ये - आज दहा वर्षानी देखील.
पहिल्या दिवशी भटकताना एके टिकाणी माहिती लावलेली पाहिली : Ranger led trek through the forest at dusk...वॉव! रात्रीचं जंगलात भटकायला मिळणार, बरोबर रेंजर नी ग्रुप मधील इतर लोकं असल्याने काही भीती पण नाही. मग त्याला जायचं नक्की करून रात्री जेवून खाऊन ८ च्या सुमारास त्या जागी जाऊन पोहोचलो. रेंजर बाईंनी सुरुवातीला छान माहितीपूर्ण talk दिला १०-१५ मिनीटं, नी मग आम्ही सर्व निघालो छोट्या ट्रेलला! फार नाही, अगदी १.५ - २ मैलाचा ट्रेल, प्रत्येक जागी थांबत तिथली माहिती देत ती आम्हाला घेऊन जात होती...अतिशय सुंदर अनुभव होता तो...पण त्याची उत्कटता गाठली ती शेवटच्या कार्यक्रमाने. एखाद तास चालल्यावर तिने आम्हाला एका मोकळ्या माळरानावर आणल. सर्वत्र अंधार झालेला एव्हाना. चारी बाजूंनी झाडं नी मधोमध मोकळे पठार अश्या त्या जागी सर्वांना स्थानपन्न व्हायला सांगून बाईंनी बासरी बाहेर काढली नी त्या बासरीच्या सुरांवर आम्हाला १०-१५ मिनीटं नुस्तं संमोहित करून टाकलं...काय जादूभरी वेळ होती...वर तार्यांनी भरलेलं नि:शब्द आकाश, आजूबाजूला जंगल नी आसमंतात पसरलेले ते बासरीचे सुर्...ती आठवण अजून मनात रेंगाळत्ये...१५ मिनीटांनी बासरी थांबल्यावर सर्वजण भानावर आले. परतताना सर्वजण नि:शब्दपणे त्या रेंगाळणार्या सूरांवरच आरूढ होऊन परतलो.
२ च दिवस येसोमिटीला असल्याने पार्क पूर्ण बघून पण झाला नाही....रुखरुखत्या मनाने परतलो ते ठरवूनच की यापुढे नॅशनल पार्कसना जायचे तर भरपूर वेळ घेऊनच्...असं थातुर मातुर नाही.
(त्यावेळी डिजीटल कॅमेरा नव्हता. तेव्हाचे फोटो आता कुठे आहेत ते सापडत
नाही आहेत. त्यामुळे इथे फोटो टाकता आले नाहीत. फोटो बघायचे असतील तर
वरच्या दुव्यावरील बस्केच्या लेखात बघा
पुढच्या नॅशनल पार्कसचे फोटोज टाके न. शिवाय १० वर्षांपूर्वी केवळ २ दिवस
केलेया या ट्रीपमधले बाकी फारसे काही आता आठवत नाही, फक्त पार्क खूप सुंदर
होता नी वर दिलेला अनुभव एवढच आता आठवतय!)
२. ग्लेशियर नॅशनल पार्क : An eternal beauty
पुढच्या उन्हाळ्यात कुठे तरी जाऊ जाऊ बेत करत होतो पण नवर्याच्या सुट्टीचं काही निश्चित होईना. काही नाही तर वॉशिंग्टन स्टेट मधल्याच ऑलिंपिक नॅशनल पार्कला तरी ३-४ दिवस जाऊन येऊ असं म्हणत होतो....पण एक दिवस नवरा ऑफिसमधून घरी आला नी म्हणाला उद्यापासून ८ दिवसांची सुट्टी घेतल्ये...चल जाऊ कुठेतरी...आता एवढे ८-९ हाताशी आहेत म्हटल्यावर मग जरा कुठेतरी लांबच जाऊ असा विचार केला...एका मैत्रिणीला फोन केला नी ग्लेशिअर नॅशनल पार्क, यल्लोस्टोन नॅशनल पार्क नी बॅन्फ व जॅस्पर नॅशनल पार्क ही नावं मिळवली...मग गूगलायला सुरुवात केली...बॅन्फ व जॅस्पर नॅशनल पार्क कॅनडात असल्याने लगेचच मोडीत निघालं...कॅनडाचा व्हिसाच नव्हता...यल्लोस्टोन नी ग्लेशियर चे नेट वर फोटोज बघितले नी ग्लेशियर निवडलं...फोटोज तर भन्नाट होतेच पण ड्राईव्हही कमी होता - १० तास, यल्लोस्टोनला १३-१४ तासांचा ड्राईव्ह होता...
आठ दिवस जमेल तेवढं कॅम्पिंग नी ट्रेकिंग करायचं ठरलं...ग्लेशिअरच्या साईट वरून पार्कातल्या कॅम्पिंग च्या साईट्सची माहिती घेतली...बर्याच ठिकाणी आयत्या वेळी first come first serve नुसार जागा मिळणार लिहिलेलं त्यामुळे तिथे जाऊन जागा मिळवू असं ठरवलं...तो स्मार्ट devices चा जमाना नव्हता त्यामुळे सर्व माहितीच्या प्रिंट्आऊट्स वगैरे काढून सामान जमवा जमव चालू केली... टेन्ट, portable stove, sleeping bags ई. प्रकार होतेच, ते घेतले, खाणं-पिणं प्रकार जमतील तितके घेतले, बॅगा भरल्या नी दुसर्या दिवशी सकाळी निघालो...आम्ही सकाळी आमचं सामान गाडीत भरत होतो, तेव्हा त्याच दिवशी आमचा शेजारी move out होत होता. ते लोकं त्यांचं सारं सामान ट्र्कमध्ये भरत होते...पण आमचं सामान बघून त्याने आम्हाला विचारलं, तुम्ही पण move out होताय का आज? :d
ट्रेकिंग करीता, वाटेत Spokane ला REI मधून शूज घेतले.नविन शूज घालून ट्रेक करण्याच्या यडचप निर्णयाचा पुढे फार त्रास झाला, ते येईलच पुढे.
मॉन्टाना स्टेट मध्ये पसरलेलं ग्लेशिअर नॅशनल पार्क त्यांच्या वेबसाईट म्हटल्याप्रमाणे खरोखरच hiker's paradise आहे. ग्लेशिअर पार्क मुख्यत्वे डोंगरा-डोंगरांवर पसरलेलं पार्क आहे. त्यामुळे सुमारे ७०० मैल ट्रेल्सचं जाळं या पार्कात पसरलं आहे. डोंगरांच्या कुशीत बसलेले तलाव, कुठे वरती कपारीत दडलेला ग्लेशिअर, तर कुठे दरीत कोसळणारे धबधबे यांना नेणारे हे ट्रेल्स. आठ दिवसांच्या आमच्या वास्तव्यात आम्ही छोटे-मोठे ४-५ डे ट्रेक्स केले. यातले अगदी संस्मरणीय ठरले ते म्हणजे - आईसबर्ग लेक नी टू मेडिसीन लेक.
१० मैल roundtrip असणारा iceberg lake trail म्हणजे पार्कातला जेम आहे. डोंगराच्या बाजूने ridge वरून जात, मध्येच जंगलातून तर मध्येच रानफूलांनी भ्ररलेल्या मोकळ्या पठारावरून जाणारी ही ट्रेल. आजूबाजूला बर्फाच्छदित rugged mountain peaks! दूरवरच्या डोंगर उतारांवर दिसणारे lush green meadows...नी सर्वत्र भरलेली शांतता! व्दिनेत्री लावून बघितलं तर कित्येकदा त्या लांबवरच्या हिरव्यागार डोंगर उतारांवर ग्रिझली अस्वलांची कुटुम्ब दिसायची, मस्त पैकी चरतायत, पिल्लं मस्ती करतायत हे दृश्य दिसायचं. कधी एखाद्या कपारीवर माऊंटन गोट्स दिसायचे....चहूबाजूंना अवर्णनीय नजारा!

On the way to Iceberg Lake
ट्रेकर्स फार तुरळक्...वास्तविक ग्लेशियरला येणारे बहुसंख्य जणं ट्रेकिंग करतातच पण मुळात या पार्कात ट्रेल्सच एवढे आहेत की प्रत्येक ट्रेलवर एका वेळी तुरळकच लोकं भेटतात. आता अश्या वेळी या ट्रेल्सवर सर्वांत मोठा धोका असतो तो या ग्रिझली अस्वलांचा. मुळात कुठलाही वन्य जीव स्वतःहून माणसांवर हल्ला करायला येत नाही पण ही त्यांची territory आणि जर अचानक आपण त्यांना सामोरे गेलो तर भांबावून, धोका वाटून ते आपल्यावर हल्ला करू शकतात. याशिवाय जर अस्वलीण बाई त्यांच्या पिल्लांबरोबर असतील तर motherly instinct मुळे ती aggressive झालेली असते. ह्या माहितीच्या पाट्या पार्कात जागोजागी लावल्या आहेत. सर्व ट्रेकर्सना सूचना देण्यात आल्या आहेत की ट्रेल्सवर शक्यतोवर मोठ्या ग्रुपने जा, चालताना शांतपणे चालू नका, आवाज करत जा, जेणेकरून आपल्या अस्तित्वाची जाणीव अस्वलांना येईल. यामुळे त्यांना अचानक सामोरे जाऊन आपण surprise करून सोडत नाही. एकटा- दुकटा ट्रेकर्स असेल तर बरोबर शिट्या, घुंगरू लावलेल्या काठ्या, अस्वलांचा स्प्रे अश्या आवाज करणार्या गोष्टी बरोबर घेऊन जा. या गोष्टी पार्कात सर्वत्र ठायीठायी विकायला आहेत.
आम्ही दोघेच, गृप कुठून आणायचा? मग आम्ही पण दोघांना दोन शिट्या नी घुंगरूवाल्या काठ्या घेतल्या. bear spray पण घेतलाच होता नी तो पटकन हाताशी लागेल असा बॅकपॅकच्या बाहेरच्या कप्प्यात ठेवला पण होता. चालताना आपले काठी आपटत नी शिट्या फुंकत चालतोय आम्ही....चढताना दम लागला तरी या कार्यक्रमात खंड पडू द्यायचा नाही यावर माझा कटाक्ष्.. नवरोबा सोयीस्कररित्या विसरायचे मग त्याच्याही वाटच्या शिट्या मी मारायचे :D. एवढच नाही...आवाज करत, बोलत जा अशीही सूचना रेंजर ने केलेली त्यामुळे मोठ्याने बोलत, मध्ये मध्ये ओरडत नाहीतर गाणी म्हणत चालणारे दोन मनुष्यप्राणी असं एक दृश्य त्या अस्वलांना दिसत असणार!

On the way to Iceberg lake
लांबवर दिसणारी अस्वलं बघून जितकी मज्जा वाटत होती, तितकच - "बाबांनो, लांबच असा, इथे आसपास फिरकू नका" असंही म्हणत होतो.. नशिबाने त्यांनी हे ऐकलं नी कुठल्याही ट्रेलवर ते आमच्या भेटीस जवळ आले नाही! आता विचार केला तर हे वेडे धाडसच वाटते, पण तेव्हा ते केलेले! Bear spray असला तरी आयत्या वेळी तो वापरायला किती सुचला असता शंकाच आहे. आणि अस्वलांच्या हल्ल्याच्या कथा ऐकल्या की तर आपण तेव्हा हे का नी कसं केलं असा विचार येतोच.

आईसबर्ग लेक
त्या १० मैलाच्या राउंड ट्रीपला आम्हाला जवळपास ८-९ तास लागले. १० मैल अंतर तसे फार नाही पण चढाई आणि सततचे शिट्या फुंकणे नी गाणी म्हणणे याने परतताना आमचा बोर्या वाजवलेला त्यात नविन ट्रेकिंग शूज घालून ट्रेक करण्याचा गाढवपणा केलेला. आत जाड सॉक्स घातलेले असूनसुध्दा शूज नी अर्ध्या वाटेत चावायला सुरुवात केली. प्रथम दुर्लक्ष केलं तरी नंतर नंतर ते असह्य होऊ लागलं, शेवटचे २-३ मैल्स तर अशक्य झालं चालणं मला...शेवटी मी शूज काढून घेतले नी सॉक्स वरती शेवटचे १-२ मैल चालून आले.
या ट्रेकचे अधिक वर्णन हवे असेल तर इथे पहा : http://www.hikinginglacier.com/iceberg-lake.html
दुसरा तितकाच सुंदर ट्रेल म्ह्णजे ग्लेशिअर मधल्या टू मेडिसीन भागातला अप्पर टू मेडिसीन लेक ट्रेल.
साधारण ५ मैल राउंडट्रीप अंतर असलेला हा ट्रेल त्या मानाने बराच सोप्पा पण त्याच त्या ग्लेशिअरच्या स्वर्गीय सौंदर्याने पुरेपुर भरलेला आहे. एक बोट राईड घेऊन लोवर टू मेडिसीन लेकच्या दुसर्या काठावर पोहोचून हा ट्रेल चालू करता येतो. परत एकदा निर्जन वातावरणाचा नी आजूबाजूच्या सौंदर्याचा आनंद घेत आम्ही वर पोहोचलो तोवर गारावृष्टीला सुरुवात झाली नी वातावरणात गारवा पसरलेला. पण ती नि:शब्द शांतता नी ते अद्भुत सौंदर्य अनुभवायला आम्ही कित्येक काळ त्या थंडीत तिथेच बसून राहिलो....परत एकदा एक वेगळीच अनुभुती होती त्या वातावरणात. झाकोळून आलेलं आकाश, गारांचा वर्षाव सर्वत्र निस्तब्धता नी आम्ही दोघेच - एक गूढ वातावरण निर्माण झाले होते...एकाच वेळी हे अनुभवत इथेच बसून रहावं, जाऊच नये नी "चल रे बाबा, पटकन जाऊया परत ह्या गूढ जागेतून" अशी माझी अवस्था झाली होती.

On the way to upper two medicine lake

Upper two medicine lake
बाकी अनेक सुंदर ट्रेल्सनी ही ग्लेशिअरची ट्रीप रंगलेली होती.रोज संध्याकाळी परतल्यावर टेंट मध्ये परतण्यापूर्वी एखाद्या लॉजच्या लॉबीमध्ये बसून एखादं कॉकटेल घेणं, इतर ट्रेकर्स शी गप्पा मारणे असा एक कल्चरल प्रोग्रॅम चालायचा.
लॉजच्या बाहेर अनेकदा लोकं त्यांच्या दुर्बिणी ट्रायपॉडवर लावून दूरवरच्या डोंगरांवरील वन्यजीवन निरखत असायचे नी जाणर्या येणार्यांना देखील बघण्याचं आमंत्रण देत असायचे...या सर्व नॅशनल पार्कस मधील हिस्टॉरिक लॉजेस हे एक वेगळेच प्रकरण आहे. ही लाकडी लॉजेस असतात तर सुंदरच, पण ह्यांचे बुकिंग वर्ष-वर्ष आधी होते. या लॉजच्या भल्या थोरल्या लॉबीज मस्त rustic सजवलेल्या असतात. संध्याकाळी थकून्-भागून आल्यावर एखाद्या लॉजच्या लॉबीत पडीक रहाणे हा एक नितांतसुंदर अनुभव आहे. फायरप्लेसच्या अवती भवती असेच ट्रेकर्स दिवसाचे ट्रेक्स आटपून ड्रिंक्स घेत बसलेले असतात्... मग एकमेकांबरोबर दिवसाच्या अनुभवांची देवाण्-घेवाण, कोणाला काय वन्य-जीवन दिसले याचे अनुभव ऐकणे-सांगणे - अश्या बोलाचालीत संध्याकाळ घालवायची नी मग जेवून टेंट मध्ये जाऊन पाठ टेकवायची!
ग्लेशिअरचा हाय लाईट म्हणजे पार्काच्या मधून जाणारा Going to the sun
road! ५० मैल लांबीचा हा रोड वर वर चढत सुमारे ६५०० फूटावर पोहोचतो हा
पार्काचा सर्वांत हायेस्ट पॉईंट्...इथे लोगान पास व्हिजीटर सेंटर आहे.
आजूबाजूनी बर्फाच्छदीत पर्वतांनी वेढलेले हे
व्हिजीटर सेंटर आतून्-बाहेरून बघण्यासारखेच आहे. याच्या बाजूने जाणारी
छोटीशी hidden lake trail आणखी वर चढून जाते नी वरच्या टोकावरून पलिकडील
hidden lake नी आजूबाजूचा नजारा अवर्णनीयच!

Logan pass visitor center

Mountains surrounding the visitor center

On the way to Hidden lake trail

Hidden lake
आठ दिवसांच्या आमच्या वास्तव्यात आम्ही पार्कच्या निरनिराळ्या भागात कँपिंग केलं. यामुळे पार्क संपूर्णपणे explore करता आला, पार्कात अनेक तलाव आहेत. लेक मॅकडोनाल्डस हा सर्वांत मोठा नी प्रसिद्ध! पण एका संध्याकाळी आम्ही पोहोचलो - लेक बोमन या थोड्या बाजूला असलेल्या तलावावर! ती रात्र त्या तलावाच्या काठी कँपिंग करण्याचे ठरले नी मग टेंट उभारून आम्ही उरलेली संध्याकाळ तलावाच्या काठावर बसून घालवली....संध्येचे शांत रंग...परत एकदा ती नि:शब्द शांतता...समोर तलाव, आजूबाजूला जवळपासून दूरवर पसरलेल्या डोंगररांच्या गडद ते फिकट होत जाणार्या रांगा...out of this world अनुभव!


Way to Bowman lake

Bowman lake
या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.
(फोटोज दहा वर्षापूर्वी analaog camera नी काढलेले आहेत नी तेव्हाचे प्रिंटस आहेत. तेच स्कॅन केलेत.)
क्रमशः
या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.
आणि आलो देखील. खरं तर या वर्षी उन्हाळ्यात ऑलरेडी यल्लोस्टोन झालं
होतं, ४-५ दिवस. पण सप्टेंबरच्या पहिल्या-दुसर्या आठवड्यात १-२
मित्र्-मैत्रिणींना आम्ही ग्लेशिअर चं वर्णन ऐकवलं नी वरती येत असाल तर
पुढल्या आठवड्यात जाऊन येऊ ३-४ दिवस हे देखील पटवलं...season अजूनही चांगला
असेल अशी ग्वाहीही काही विचार न करता देऊन टाकली...बहुदा यंदा, गेल्या
वर्षी ठरवल्यानुसार जायचच हा विचार इतका पक्का होता नी ग्लेशिअरची इतकी
जबरदस्त ओढ लागलेली की आम्ही फारसं
weather वगैरे बघण्याच्या भानगडीत पडलो नाही वाटतं, नी मित्रमंडळानी पण नको तेवढा विश्वास टाकून येण्याची तयारी दाखवली...
मग काय सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यातल्या एका मुहुर्तावर आम्ही दोघे नी अजून ३ मित्र्-मैत्रिणी निघालो ग्लेशिअरला. यावेळी हवामान थंड असेल म्हणून कँपिंग मात्र नशिबाने काढले नव्हते. प्रत्यक्ष पार्कात पोहोचलो नी स्वागतालाच कळलं की Going to the sun road हा Logan Pass पुढे बंदच आहे. पार्कात already थोडी थोडी हिमवृष्टी चालू झाली होती. पार्कात यावेळी visitors ची संख्या अगदीच नगण्य होती. हरकत नाही...तेवढं तर तेवढं असा विचार करून आम्ही दोघांनी दुसर्या दिवशी आम्ही आदल्या वर्षी आवडलेल्या पण न झालेल्या Grinnel Glacier ट्रेकला जायची टूम काढली.
सर्व जामानिमा करून निघालो...थंडीची जॅकेट्स, हातमोजे, पायात जाड मोजे, कानटोपी, असं सारं चढवून निघालो. पण trekking चे sturdy shoes आम्हा दोघांकडेच होते (तेच ते गेल्या वर्षी घेतलेले!). बाकी तिघांनी आपले साधे sneakers च घातलेले.
ट्रेलहेड पाशी गाडी लावून आम्ही ट्रेल चढायला सुरुवात केली नी ५व्या मिनिटाला पहिला दणका बसला. पाण्याचा एक ओहोळ डोंगरावरून खाली येत होता नी त्यात पाय घातल्याने ग्रुपमधील एकीच्या शूजच्या पार आत ते बर्फाचं पाणी शिरून तिला हुडहुडी भरली. मग शूज काढा, सॉक्स मधील पाणी पिळून घ्या हे उद्योग झाले...पण ते गारेगार सॉक्स परत घालणे म्हणजे शिक्षाच होती....पण इतक्यात कशी हार मारणार म्हणून निघालो सगळे पुढे. आधीच प्रचंड थंडी नी त्यात एखाद मैल चाललो असू तर पाऊस सुरु झाला. आम्ही आमचे पोंचू चढवले. मंडळींचा उत्साह नी निर्धार खचू लागला. पण आमचा ग्रुपलीडर म्हणजे नवरा सर्वांचे morale boost करत पुढे ढकलतच होता. जवळपास 4 मैल चालून वर जायचं होतं नी हा आपला हे काय, आलंच आता.. हे वळण गेलं की आलंच हे ऐकवत सर्वांची गाडी रेटत होता. अजून एखाद मैल गेला. आमची चालण्याची वाट आता ओहोळातूनच चालली होती. एव्हाना आमच्या दोघांच्या शू़ज मध्ये सुद्धा पाणी गेले होते. सर्वजण गोठलेल्या अवस्थेत चालत होते. परतूया आता असा एक सूर उरलेल्या तिघांचा चालू झाला. मला थंडीही वाजत होती नी पुढे जायचं ही होतं. खरतर यावेळेस सुध्दा ग्रिझली अस्वलांची भीती होतीच्...नी या थंडीपायी पाण्यात पाय घालून घालून एखाद्याला hypothermia व्हायचा अशीही मला भीती वाटत होती. नवरोजींना याचे काही नाही...चाललेत पुढे. अजून १/२ एक मैल चाललो असू नी एकीने एका दगडावर बसकण मारली नी जाहिर केले, मी ही इथे बसणार आहे आता. तुम्ही लोकं वर जाऊन या तोपर्यंत मी इथेच बसणार नी परतताना तुमच्या बरोबर येईन परत खाली...आता कोणाला एकटं कसं सोडून जाणार त्यामुळे सर्वचजणं परतूया असं आम्हा उरलेल्या चौघांचं मत पडलं....ग्रुप लीडर ने तरी देखील "आता आलाच वाटतं शेवटचा Grinnel Glacier पॉईंट" असा काहीसा एक डायलॉग टाकून बघितला पण यावेळी मात्र सर्वांनी त्याला धरून बडवायचीच धमकी दिली. अखेरीस सर्वजणं परतीच्या वाटेवर लागलो....पावसातून- पाण्यातून वाट काढत खालती आलो तोपर्यंत हाता-पायाची बोटं अक्षरशः बधीर झाली होती. हात खिश्यात घालून गाडीची किल्ली काढायला जमत नव्हतं अक्षरशः. कसेबसे गाडीत बसलो नी गाडीचा हीटर सर्वांत वरच्या तापमानाला नेऊन बोटं शेकली...तब्बल ५-७ मिनीटं लागली बोटात प्राण परत आणून steering wheel धरता येईपर्यंत...नंतरचे २ दिवस जे काही पार्कात होतो ते फक्त गाडीने जमेल तेवढे फिरलो नी माफकच उतरून फिरलो.तर असा हा ग्लेशियरचा वेगळाच अनुभव यावेळी.
पण यावरती थांबून कसं चालेल? ४ वर्षांनी परत ग्लेशिअर ची टूम काढून परत एकदा आम्ही ग्लेशिअरला गेलोच. मधल्या काळात अजून एकदा यल्लोस्टोन झाले होते, संसारवेलीवर २ फुले उमलली होती वगैरे वगैरे :D. मोठे युवराज सव्वा वर्षाचे असताना त्याला घेऊन बॅन्फ नी जॅस्परची भटकंती झालेली पण समेवर ग्लेशिअर झालेच पाहिजे ना...!
दुसरे युवराज ६ महिन्यांचे होते नी गेली दोन वर्षे कुठे नॅशनल पार्कात गेलो नाही असे म्हणून आम्ही उन्हाळ्याचं ग्लेशिअरचं बुकींग केलं...यावेळी तर निमूटपणे घरं बूक केली - किचन वगैरे असलेली...एक ३ वर्षाचं नी एक ६ महिन्यांचं, अश्या समुदायाला घेऊन तेच करणे सोयीचे होते. बुकिंग केल्यानंतच्या काळात भारतातून बहिणीने येते म्हणून declare केले. मग काय? समुदायात ती नी तिची ७ वर्षाची मुलगी यांची भर! ही ट्रीप मात्र strictly family trip होती. नाही म्हणायला तरी पण पहिल्या वेळी केलेला एक त्यातला एक सोप्पा आणि तरीही सुंदर असा Avalanche lake हा ५ मैल राऊंडट्रीप असलेला एक ट्रेल करायचं ठरवलं. छोट्याला पाठीवर बॅक कॅरिअर मध्ये नी बाकी जनता चालत असे निघालो ट्रेल वर. परत एकदा पोरं हाकणे हे काम नवरा करत होता. एक ७ वर्षाचं नी एक ३ वर्षांचं - यांना आत्ता आलाच तलाव, मग तलावात तुम्हाला दगडं टाकायला मिळणार, असं काहीही सांगून त्याने २.५ वरती चढवलं...पण वरती खरोखर पाण्यात दगडं टाकून मंडळींना फारच आनंद झाला आणि परत येताना आता परत चालतच खाली जावं लागणार अशी विचारणा झाली....त्यामुळे परत एकदा कसली कसली अमिषं दाखवून सर्वांना खाली आणलं.

Avalanche Lake

KIds playing the Avalanche lake
ग्लेशिअर जवळ "बॅब" नावाच्या एका ठिकाणी एक घर बूक केलेलं...आजूबाजूला फारशी वस्ती नाही, नी घरातून दिसणारा सुंदर नजारा - त्यामुळे ह्याठिकाणी खूपच मजा आली रहायला. मग एकदम टिपिकल barbeque वगैरे प्रकार झाले.
View from the House in Babb

On the right corner is our rented house in Babb

Thats not a photo frame - its a view from the window from Babb house

Lake McDonald Lodge - back side
लेक मॅकडोनाल्ड मध्ये बोट राईड, लोगान पास व्हिजिटर सेंटर च्या आसपास त्यावेळी बर्फ होत. त्यामुळे भाची फारच खूश. मग तिथे बर्फात खेळणे वगैरे family activities अश्या गोष्टींनी ही ट्रीप साजरी झाली पण आम्हाला आपलं ग्लेशिअर ला पुन्हा एकदा पाय लावल्याचा आनंद झाला.

Ferry ride in Lake McDonald
Snow around Logan Pass Visitor Center
यल्लोस्टोन नॅशनल पार्क : Land of surprises
आदल्या वर्षी ग्लेशिअरच्या स्वर्गीय अनुभवानंतर २००५ च्या उन्हाळ्यात ४
जुलैच्या लंबविकांताला जोडून सुट्टी घेऊन अजून २ दिवस असे यल्लोस्टोन करू
असे ठरले. परत एकदा कॅपिंग करू असे ठरले.
सिअॅटल ते यल्लोस्टोन हा जवळपास १२-१३ तासांचा ड्राईव्ह आहे. जवळात जवळचा commercial airport
आहे, बॉईसी, आयडहो येथे. सिअॅटल ते बॉयसी विमानाला २ तास लागत असावेत.
तरीही बॉयसीहून जवळपास ६ तासांचा ड्राईव्ह आहेच. पण आम्ही शुक्रवारी ऑफिसेस
मधून येऊन रात्रीचे विमान घेऊन रात्री उशिरा बॉईसी ला पोहोचून एखाद्या
मॉटेल मध्ये राहून सकाळी बॉइसी हून गाडी रेंट करून पार्कला जाऊ असा एक
(उगिच!) प्लॅन आखला. आम्हाला वाटलं की या प्रकाराने आपण दोन्ही दिशांनी
धरून जवळपास १२-१३ तासांचा ड्राईव्ह वाचवू. प्रत्यक्षात ही ट्रीप म्हणजे
जाणं-येणं नुस्ता गोंधळ!
शुक्रवारी घरी येऊन सामान घेऊन आम्ही विमानतळावर जायला निघालो. पण ४
जुलैचा वीकान्त असल्याने विमानतळाला जायचा रस्ता प्रचंड ट्राफिकने भरलेला.
एरव्ही ४५ मिनीटं लागणार्या रस्त्याला त्या वेळी आम्हाला जवळपास २.५ तास
लागले. नी अर्थातच विमान चुकणार याची जवळपास निश्चीती झाली...तरी पण आम्ही
विमानतळावर पोहोचल्यावर सामान काढून जीवाच्या आकांताने धावत सुटलो नी
विमानकंपनीच्या काउंटर वर पोहोचलो तर विमान नुकतेच रनवे लागले अशी मौलिक
माहिती हाती लागली! Oh! oh!!नंतर एखादे विमान आहे का अशी विचारणा केल्यावर
दुसर्या दिवशी संध्याकाळपर्यंत पुढचे विमान नाही अशी माहिती मिळाली.
हं! आता काय करावे? परत घरी जाऊन दुसर्या दिवशी येणे हा पर्याय होता पण ते
नियमात बसण्यासारखे नव्हते नी शिवाय दुसर्या दिवशी दुपारी विमान घेऊन
बॉयसी ला पोहोचल्यावर नंतर ६ तास ड्राईव्ह म्हणजे दुसरा दिवस वायाच गेला
असता तेही नको होते. मग काय, सर्वानुमते (म्हणजे दोघांच्या मते) इथूनच गाडी
रेंट करून ड्राईव्ह करावे अशी टूम निघाली. मग काय तडक गाडी रेंट केली नी
निघालो. रात्रभर ड्राईव्ह करून पहाटे पहाटे आम्ही आमच्या मॉटेल वर पोहोचलो.
(जे करावं लागू नये म्हणून विमान बुकिंग केलं होतं तेच अखेर नशिबी आलं!)
मग तीन्-चार तास झोपलो नी सकाळी ११ ला पुढे निघालो.
संध्याकाळ पर्यंत आम्ही यल्लोस्टोनला जाऊन आम्ही आमच्या कँपसाईट वर टेंट
उभारला. एव्हाना नवर्याची बॅटरी डाऊन झालेली नी डोकं दुखत असल्याने त्याने
गोळी घेऊन टेंटवर पडून रहाण्याचा पर्याय निवडला. मला मात्र कधी एकदा
आजू-बाजूला फिरून येत्ये असं झालेलं. त्यामुळे मी आपली गाडी घेऊन आजूबाजूला
भटकून आले. जवळूनच यल्लोस्टोन नदी वहात होती नी एका ठिकाणी नदीवर पेलिकन्स
जमले होते, त्यांच्या निरीक्षणात नी फोटोग्राफीत तासभर घालवून मग मी
परतले.
यल्लोस्टोन म्हणजे खरोखरच आश्चर्याने भरलेले ठिकाण आहे. No wonder this is
the most visited park in the US. सुमारे २ मिलीअन चौ. फूट क्षेत्रफळ
असलेल्या यल्लोस्टोन चे मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे तिथे असलेली active thermal
features like geysers, hot springs, mudpots, and fumaroles. या भागात
पृथ्वीच्या उदरामध्ये प्रचंड खळबळ चालू असते नी त्याचे परिणाम म्हणून हे -
कुठे बुड्बुडे येत असलेले चिखलाचे खड्डे (mudpots), कुठे गरम पाण्याचे
झरे(hot springs) पण सर्वात गम्मत म्हणजे इथे असलेले वेळोवेळी जमिनीतून
जोरात बाहेर येणारे गरम पाण्याचे वा वाफेचे फवारे (gysers - गायझर्स).
यल्लोस्टोन मध्ये लहान्-मोठे सुमारे ३०० गायझर्स आहेत. यातला सर्वात
पॉप्युलर नी प्रसिद्ध म्हणजे ओल्ड फेथफुल गायझर. सुमारे प्रत्येक १.५
तासाने हा फवारा जोरदार बाहेर येतो...कधीही खंड न पडता त्याच्या नावाला
जागून! गायझर्स चे व्हिडीओ बघायचे असतील तर इथे
(disclaimer : this video is not mine. With thanks from Youtube) बघा.
फार आश्चर्यकारक नी सुंदर आहे तो बघणं. नी ऐन उन्हाळ्यात त्यातून
लांब-विकांताला तर पार्कात प्रचंड गर्दी असते तेव्हा हा गायझर बघायला एका
वेळी जमणार्यांची संख्या पण हजारोंच्या आसपास असते. नी अक्षरशः स्टेडिअम
मध्ये एखादी मॅच बघायला बसावे तरे चहूबाजूंनी केलेल्या बेंचेस वर लोकं
बसलेली असतात.
Old faithful gyser errupting
गायझर "शो" बघायला जमलेला जनसमुदाय
एक तर पार्क प्रचंड मोठा आहे नी त्यात ४ जुलैची हीSSS गर्दी. त्यामुळे
सर्वत्र जायला भरपूर वेळ लागत होता. पुढले ३-४ दिवस यल्लोस्टोन भटकंतीत कसे
गेले कळलच नाही. पार्कच्या वेगवेगळ्या भागातले सर्व thermal features तर
बघून झालेच शिवाय आवडता ट्रेक चा प्रोग्रॅमही झाला. याशिवाय ranger talks,
ranger led trail - हे ही झालं. एका ठिकाणी सकाळी एका ranger led trek ला
गेलो. कोवळ्या उन्हात फिरवत रेंजर बाई नी पार्कची नी परिसराची, विविध
वनस्पतींची, प्राण्यांची सुंदर माहिती दिली. पण बाई लक्षात राहिल्या
वेगळ्याच कारणानी.
तिने डोक्यावर ranger hat घातलेली. खालच्या ओठाला पांढर्या रंगाचे
sunscreen लावलेले, cricketiers लावतात ना तसे! बोलता तिने मध्ये, "सतत
sun मध्ये फिरत असाल तर sunscreen लावायला विसरू नका" असा एक सल्ला दिला नी
स्वतःची कथा सांगितली. पार्क रेंजर असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत १२-१२
तास उन्हात फिरणे हा तिच्या कामाचा भाग होता. डोक्यावर ranger hat असायचीच
पण त्याच्या flap ची सावली तिच्या वरच्या ओठापर्यंतच पोहोचायची. खालच्या
ओठाला ऊन लागायचे. सूर्यकिरणातल्या UV rays मुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो,
तो तिच्या खालच्या ओठाला झाला. शस्त्रक्रिया करून खालचा ओठ काढावा लागला.
नशिबाने अजून कुठे शरीरावर न झाल्याने थोडक्यात निभावले म्हणायचे. पण मी
तरी पहिल्यांदाच सूर्यकिरणाने होणार्या त्वचेच्या कर्करोगाची केस बघितली
नी ती अजूनही डोक्यात बसल्ये.
बाकी ग्लेशिअर सारखीच इथली लाकडाची हिस्टॉरिक लॉजेस सुध्दा तशीच सुंदर आहेत. त्यातही Old Faithful gyser च्या परिसरातलं Old Faithful lodge आतून्-बाहेरून अतिशय देखणं नी rustic !
काय नाही आहे या यल्लोस्टोन मध्ये? विविध प्रकारचे शेकडो thermal features, घनदाट जंगल, मैलोनमैल पसरलेली उघडी हिरवीगार कुरणं, शेकडो छोटे-मोठे धबधबे, प्रचंड प्रमाणावर वन्य जीवन, Grand Canyon of Yellowstone च्या रूपाने खोल दरी नी तिथले रंगीबेरंगी डोंगर (painted hills) ! एकाच जागेत सामावलेली ही विविधता आश्चर्यचकित करून सोडते.
मोकळी पसरलेली हिरवीगार कुरणं.. नितांत सुंदर! इथे अशी २ मोठ्ठी कुरणं (open meadows) आहेत -
Lamar valley and Hayden valley! सरत्या संध्याकाळी यातल्या एखाद्या
meadow काठाशी तास्-दोन तास बसून रहाणे म्हणजे स्वर्गीय सुख आहे. कधी
meadows वर वन्य जीवन दिसतं...आईच्या आजूबाजूला खेळणारी अस्वलाची किंवा
मूसची पिल्लं असं गोडुलं दृश्य पहावयास मिळतं. एकदा आम्हाला एका वन्यजीव
निरिक्षकाने लावलेल्या spotting scope मधून दूरवर असलेला लांडग्यांचा पॅक
बघायला मिळाला - which is considered a rare site even in Yellowstone.
हे वन्यजीव निरिक्षक किंवा काही व्हिजिटर्स तासचे तास खुर्च्या टाकून या
meadows पाशी पुस्तकं वगैरे निवांतपणे वाचत बसलेले असतात...ह्या लोकांकडे
एवढा वेळ कसा असतो याचं उत्तर त्यांच्याशी बोलताना मिळालं. कित्येक लोकं
विशेषतः जेष्ठ नागरीक या पार्कांमध्ये उन्हाळ्याचे ३-३ महिने रहायला येतात.
आठवड्यातले ३-४ दिवस कुठेतरी हॉटेल, रेस्तॉरंट मध्ये काम करून पैसे
मिळवायचे नी उरलेले दिवस मस्त पार्क भटकायचा - वन्यजीव निरीक्षण -
फोटोग्राफी असे करायचे, शांतपणे वाचन करायचे असा काल ते व्यतित करतात.
आम्हाला त्यांच्या जीवनाचा विलक्षण हेवा वाटला. मी तर रिटायर व्ह्यायची
स्वप्नच बघत्ये 
या जेष्ठ नागरीकांमध्ये सुध्दा २ तट आहेत बरं का! एक तट ग्लेशिअर नॅशनल
पार्कची भलावण करतो तर दुसर्याच्या मते - यल्लोस्टोन अधिक सुंदर! तरी बरं
ही सर्व मंडळी १ वर्ष ग्लेशिअर नी एक वर्ष यल्लोस्टोन नी मग एखादं तिसरं
नॅशनल पार्क करून परत या दोन पार्कस ना येतातच!
Abundant wildlife हे यल्लोस्टोन चं मोठ्ठ वैशिठ्य! मूस, एल्क, ग्रिझली
अस्वलं नी काळी अस्वलं, कोल्हे, लांडगे, हरणांचे ३-४ प्रकार - पूर्वी कधीही
न पाहिलेली ponghorn deers मी इथे पाहिली, शिवाय पक्ष्यांमध्ये trumpeter
swans, pelicans आणि इतर अनेक. त्यातही बायसन्स (bisons) तर इथे लाखोंच्या
संख्येत आहेत. बघावं तिकडे हे बायसन्स कळपाने इथे-तिथे फिरत असतात. हा
प्राणी दिसतो तर महाभयंकर नी सुमारे १ टन वजन! यल्लोस्टोनच्या रस्त्यावरही
फिरत असतात ही मंडळी. या प्राण्याने नुस्ती मान हलवली नी त्याचा धक्का जर
आपल्या गाडीला लागला तरी आपली गाडी शटल कॉक सारखी फेकली जाईल!
याच बायसन्सनी परतीच्या प्रवासाची आमची दाणादाण उडवून दिली. शेवटच्या दिवशी
अर्धा दिवस पार्क फिरून दुपारी जेऊन मग पार्कच्या बाहेर पडायचे नी
रात्रीपर्यत बॉईसीला पोहोचून तिथे परत (त्याच मॉटेलमध्ये) मुक्काम ठोकून
दुसर्या दिवशी सकाळी ७ चे विमान पकडून विमानतळावरून तडक ऑफिसेस गाठायची
असा प्लॅन. पण येताना human traffic jam ने आमची भंबेरी उडवली तर परत
जाताना bison traffic jam ने आमची विकेट घेतली.
झालं असं की, पार्कच्या पूर्वेच्या एका टोकाला आम्ही होतो नी पश्चिमेच्या
बाजूच्या entrance ने आम्हाला बाहेर पडायचे होते...एरवीही हे अंतर कापायला
१.५ तास सहज लागतो.आम्ही सुमारे १-१.३० ला पार्कच्या बाहेर पडण्यास निघालो.
मध्ये एका ठिकाणी जी गाडी थांबवावी लागली ती काही पुढे काढता येण्याचं
लक्षण दिसेना. पुढे पार दूरपर्यंत गाड्यांची रांगच रांग लागली होती. पहिले
काही वेळ गाडीत बसून काढला की हलतीलच आता गाड्या पुढच्या म्हणत. पण छे!
जैसे थे...मग नवरा उतरून पुढे चालत जाऊन पुढच्या गाड्यांमधल्या कोणाला काही
माहिती आहे याची चौकशी करायला गेला तर कोणालाही काहीच माहिती नाही. शेवटी
असेल एखादा अपघात पुढे... निघेल थोड्याच वेळात ट्राफिक असं म्हणून आम्ही
आपले गाडीत बसून राहिलो. या प्रकारे २-२.५ गेले...मध्ये बाहेर उतरून
आजूबाजूला कोणाला काही माहिती आहे का हे विचारून येणे नी मध्येमध्ये गाडीत
बसणे असं सर्वांचच चालू होतं. मग कळलं की १-२ गाड्यांमधील काहीजण चालत पार
पुढे गेल्येत नक्की काय झालय पुढे ते पहायला. त्यांना जाऊनही १-१.५ तास
लोटलेला आणि तरीही ते परतले नव्हते. शेवटी २-२.५ तासांनी ती लोकं आली आणि
कळले की भर रस्त्यात ४-५ बायसन्स नी ठाण मांडून सर्व ट्राफिक जॅम करून
ठेवलाय. नक्की काय कोणाला माहित नव्हतं पण कोणी म्हणत होतं की रेंजर येऊन
काही त्यांना उठवणार नाहीत कारण this place belongs to them...they are the
kings (or queens) here. अरे बापरे! हे काय भलते प्रकरण! या पद्धतीने हे
प्राणी रात्रभर हलणार नाहीत मग आपण काय करायचे? कोणी म्हणत होतं की नाही,
रेंजर येऊन त्यांना उठवतील्...सुमारे ५-६ तासाने बातमी आली की त्या प्राणी
महोदयांनी तिथून उठण्याचे कष्ट घेऊन प्रस्थान केले आहे नी आता ट्राफिक हलत
आहे. नी मग अर्ध्या तासात सगळा ट्राफिक सुलभपणे चालू झाला.
पण या सर्व प्रकारात संध्याकाळचे ७ वाजून गेलेले. यानंतर अजूनही पार्क
बाहेर पडायला एखाद तास नी त्यानंतर बॉईसी ला पोहोचायला ६ तास! मध्ये
जेवायला थांबयचा वेळ पकडला तर सुमारे ८ तास लागणार होते बॉईसीला पोहोचायला.
आम्ही जमेल तशी गाडी हाणत बॉईसीच्या रस्त्याला लागलो. नी परत एकदा रात्रभर
ड्राईव्ह करून पहाटे २-३ वाजता आम्ही मॉटेलला पोहोचलो...विश्रांतीची तर
नितांत गरज होती. पण सकाळी ७ चे विमान म्हटल्यावर ६ ला तरी विमानतळावर
पोहोचणे भाग होते...मग अक्षरशः २ तास झोपून गजर लावून उठलो नी अंघोळी उरकून
विमानतळावर जाऊन यावेळेस मात्र विमान मिळवलेच!
पण तुमच्या उत्साहाला सलाम.
फोटो मस्त आले आहेत. तो पाणी पिऊन मान वर केलेला घोडा तर अगदी झकास!
वा! ३ महिने तेथे जाऊन राहण्याच्या कल्पनेनेही मस्त वाटते.
रेंजर लेड ट्रेक हा मस्त भाग आहे. कारण त्यात बहुदा किस्से ऐकायला मिळत असतील. 
परतीला गव्यांनी चांगलीच वाट लावली म्हणायची. पण रेंजरचे म्हणणे काहीसे योग्य आहे असे वाटले.
(अवांतरः पर्यायी शब्द
मड गिझर चिखलाचे कारंजे?
हॉट स्प्रिंग्ज - गरम पाण्याचे झरे / फवारे
thermal features - औष्णिक आकर्षणे? )
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.