https://www.maayboli.com/node/83829
किलीमांजारो ट्रेकचे वर्णन मायबोलीबर टाकल्यावर पुष्कळ प्रोत्साहन मिळाले. इतर ट्रेकबद्दल लिहा, फोटो टाका वगैरे अभिप्राय त्यावर होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्या ट्रेकचे वर्णन आणि फोटो दुसऱ्याला दाखवायचे म्हणजे तात्काळ ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ आणि त्यातले epic dialogue आठवून धडकी भरते. तर ती धाकधूक मनात ठेऊनच, नुकताच Tour du Mont Blanc हा युरोपातील ट्रेक केला त्याबद्दल लिहित आहे. एकूण अनुभव कितीही उच्च असला तरी तो बराचसा स्वतःपुरता असतो. इतरांपर्यंत तो तसाच पोहोचवण्याचे सामर्थ्य नाही पण प्रयत्न करीत आहे. किलीमांजारो ट्रिपच्या वर्णनात येणारे कुटुंबीय, काही मित्रमंडळ यांची नावे इथेही आहेत, ती मजकूरातील संदर्भाने लक्षात येतील असे वाटते, म्हणून बदलत नाहीये.
---------------------------------------------------
किलीमांजारो ट्रेक संपल्यावर २-३ वर्षे कोरोना , घरांतील जेष्ठांची आजारपणे
आणि त्यामुळे कोरोना काळातल्या अमेरिका-भारत प्रवासातील विविध भानगडी
यांतच गेली. फक्त एकदा कोलोरॅडो ट्रिप केली तेव्हा Mount Bierstadt हे एकच
fourteener ( १४००० फुटांच्या वरचे शिखर) पायी असे केले. जरा स्थिरस्थावर
झाल्यावर Tour du Mont Blanc खुणावू लागले. २०२२ च्या उन्हाळ्यात
जमण्यासारखे नव्हते. ऑगस्ट २०२२ नंतर नेहमीच्या चालण्याची पार्टनर अनिता
सिंग पाठी लागली, की कशाला थांबलो आहोत, booking करूया वगैरे. तेव्हा मी
शोधाशोध सुरु केली. त्याबरोबर आनंदने (नवरा) लगेच हिमालय आणि इतर पर्याय
सुचवायला सुरुवात केली ( सगळ्यांच्याच घरी असे होते का ?). “हिमालय उत्तमच
आहे, पण मला आल्प्स -युरोपात(च) ट्रेक करायचा आहे” हे मी त्याच्या गळी
उतरवले. ( हे ही सगळ्यांच्या घरी होते का ?)
कसे जायचे यासाठी पर्याय भरपूर होते. गाईड न घेता, तंबू, खाणे, पिणे सगळे स्व:त करूया अशी एक सूचना ( देव जाणे काय विचार करून ) घरातून आली. ती कितीही आकर्षक वाटली तरी आपल्या वकुबापलिकडची आहे हे माहीत असल्याने त्या फंदात पडले नाही. लॉज, हॉस्टेल घ्यायचे तरी, किमान ७ दिवसांचा ट्रेक, ६ रात्री वेगवेगळ्या ठिकाणी बुकिंग करणे फार जिकिरीचे वाटले. Utracks कंपनीचे ७ दिवस guided walk चे पॅकेज बहुगुणी आखूडशिंगी इ. इ. असल्याने तेच घ्यायचे ठरले. दीपशिखा उर्फ DS,जी माझ्याबरोबर किलीला आली होती, TMB चे कळताच तिने स्वतःचे नाव नोंदवले. आम्ही घरचे ३ आणि २ मैत्रिणी असा ग्रुप जमला. एकूण मजा घेत जास्त कष्ट नाहीत असा ट्रेक करायचे ठरवले. ११० किमी ७ दिवस किंवा १६० -१७० किमी १० दिवस असेही पुष्कळ variants आहेत. ट्रेकचा routeही अगदी एकाच्या एक असा नाही, वातावरण आणि एकूण आपापल्या capacity नुसार सोपे अवघड routes, पुष्कळ आहेत. आमचा त्यातल्या त्यात moderate - tough म्हणता येईल असा route होता. सरासरी १५-१६ किलोमीटर दर दिवशी. अर्थात डोंगरात किलोमीटरला फारसा अर्थ नसतो असे माझे प्रामाणिक मत आहे, कधी कठीण वाटेवर ४५ -५० मिनिटेही एकेक किमी साठी लागतात.७ दिवसांत ११० किलोमीटर ( हा.का.ना. का. !) अशा हवेत मी, अनिता व DS होतो. तिथे जाईपर्यंत नवऱ्याने जमिनीवर आणण्याचे काम केले, उरलेले ट्रेक व गाईडने केले.
२५ जून ते १ ऑगस्ट असे ट्रेक चे बुकिंग केले. बुकिंग केल्यावर, एक नवरा कमी की काय म्हणून अनिता आणि DS यांना असंख्य प्रश्नाचे भुंगे चावायला लागले. किरण कुलकर्णी (ऑरलँडोचे ट्रेकप्रेमी - पहा किलीवर्णन ! किती ती जाहिरात !) यांनी हा ट्रेक केलेला असल्याने, एक दिवस त्यांना व बायको -पारूला जेवायला बोलावले. तसेच अनिता व DS यांनाही बोलावले आणि दोघांची (गाठ) लावून दिली. याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी पारूचा फोन आला की त्या दोघांनाही आमच्याबरोबर ट्रेकला यायचे आहे. अधिकस्य अधिकं फलं ! utracks शी बोलून त्यांचीही नावे आमच्या group मध्ये नोंदवली. राहण्याचे पर्याय होते त्यात स्वस्तातला हॉस्टेल चा पर्याय निवडला. थोडे अधिक घालून स्वतंत्र खोली मिळाली असती पण त्याच्या गरज वाटली नाही, एकतर बाथरूम common च असणार आणि एकत्रच जास्त मजा करता येईल असा हेतू होता.
ट्रेकचे बुकिंग सहज झाले पण विमानाचे बुकिंग ही एक खास प्रोसेस होती. आमचा ट्रेक Chamonix ( उच्चार शामनी) फ्रांस येथून चालू होणार होता. हे स्वित्झर्लंड फ्रांस बॉर्डरजवळचे फ्रांस मधले लहानसे शहर आहे. त्याला सर्वात जवळचा एअरपोर्ट जिनिवा नाहीतर झुरिक. पण जिनिवाच जास्त सोयीस्कर. एकूण प्रवाश्यांपैकी मी व मुलगा ऑर्लॅंडो - युरोप - मुंबई - ऑर्लॅंडो, नवरा, अनिता व DS - ऑर्लॅंडो -युरोप - ऑर्लॅंडो , कुलकर्णी तसेच पण काही दिवस स्विर्झर्लंडमध्ये घालवून परत येणार होते. स्वस्त, मस्त, लोकशाहीसंमत पर्याय निवडताना ज्या काही कसरती केल्या त्या अभूतपूर्व होत्या. शेवटी साधारण एकदाच वेळी मायामीहून निघणाऱ्या आणि सुमारे एकाच वेळी जिनीवाला पोहोचणाऱ्या, अनुक्रमे लिस्बन पोर्तुगाल आणि हिथ्रो लंडन यांच्या मार्गे जाणाऱ्या २ विमानांवर बुकिंग केले. मी व मुलगा लिस्बनमार्गे, उरलेले ३ मेम्बर लंडनमार्गे तर कुलकर्णी एक दिवस आधीच्या विमानाने त्यांना लंडनला काही काम असल्याने लंडनमार्गे.
हे सर्व काम आणि हॉटेल बुकिंग जानेवारी २०२३ मध्ये उरकून स्वस्थ बसलो. आता किरकोळ बस बुकिंग, इतर माहिती काढणे इतकेच राहिले होते. ऑर्लॅंडोत पारुने आमची बरीच हव्वा केल्याने सगळे विचारीत. मी सगळ्या बुकिंगची कथा सांगत असे. एका काकूंनी तर,” काय म्हणे तू मैय्यादेवींना भेटायला आल्प्समध्ये जाणार” वगैरे बोलून माझी विकेट घेतली ( पहा - असा मी असामी ). नवऱ्याची टिप्पणी म्हणजे सगळे बुकिंग झाले आहे फक्त बॉडीबरोबर बुकिंग बाकी आहे. खरं सांगायचं तर तेच तसं लाइटली घेतलं. आठवड्यात ३-४ वेळा जिम, कधी वीकेंडला ७ मैलाच्या black bear trail ला जाणे याहून जास्त काही केलं नाही. याबद्दल जरा चुटपुट आहे, पण तरी ट्रेक एकूण झेपवला. हा ट्रेक म्हणजे Mont Blanc ( फ्रेंच उच्चार मॉं ब्लॉ ) या आल्प्समधील पर्वतरांगातील सर्वांत उंच शिखराच्या भोवती घातलेली प्रदक्षिणाच. सुरुवात फ्रांसमध्ये करून मग स्वित्झर्लंड - इटली - पुन्हा फ्रांस अशी clockwise किंवा उलट फ्रांस- इटली - स्वित्झर्लंड - पुन्हा फ्रांस अशी counter clockwise करतात. आम्ही clockwise केली, पण त्याला काही खास कारण नाही. रस्त्यात उलट जाणारे लोकही खूप भेटले. एका देशातून दुसऱ्या देशांत पायी चालत जाणे याचे उगीचच कौतुक होते. प्रत्यक्षात डोंगरात देश कधी ओलांडला ते कळत नाही कॅनडा-अमेरिका बॉर्डरसारखेच . मी केलेल्या अन्य ट्रेकला बहुतेककरून एक summit point होता, तर इथे रोजचा एक high point. रोज एक डोंगर चढायचा आणि एक उतरायचा म्हणजे पायथ्याशी ( गावडेवाडी !! पहा - वाऱ्यावरची वरात ) आमचे रोजचे राहण्याचे ठिकाण. एकूण उंची ८०००-९००० फूट फक्त, आपण याच्या दुप्पट उंचीवर जाऊन आलो आहोत, याचा माज नव्हता पण त्याने ढिलाई आली होती. Always respect the mountains हे कधी विसरत नव्हते पण या प्रदक्षिणेने ते अधोरेखित केले हे नक्की.
शेवटच्या १० दिवसांत तिथल्या लोकल बसचे बुकिंग करताना क्रेडिट कार्ड
compromise वगैरे झाली, नवीन कार्ड आम्ही प्रवास सुरु करण्याच्या अगोदर
येणार नव्हती. पण दुसरी होती. आम्ही जाणार ती सगळी अगदी लहान लहान गावे,
त्यात क्रेडिट कार्ड चालणार नाही किंवा हाताशी हवे म्हणून बँकेतून युरो
आणले. २१ जूनला रेंटल गाडी आणणे, २२ ला ऑर्लॅंडो-मायामी प्रवास, मग विमान,
२३ ला जिनीवा - शामनी बस, शामनी ते Les Houches या जवळच्या गावात हॉटेल
होते तिथे जाण्याची बस व टाईमटेबल, २४ जूनला शामनीच्या आसपासची
attractions, २५ जून ते १ जुलै ट्रेक, २ जुलैला शामनी-जिनीवा बस आणि
जिनीवात काय करायचे, ३ जुलैला परतीचा प्रवास, खाण्याची ठिकाणे, रस्ते,
wifi, हवामान, पाऊस, internet कोणाचे कधी वापरायचे याचा काटेकोर , अक्षरश:
hour to hour plan केला पण ........
२२ जूनला मायामीच्या रस्त्याला लागलो. मायामीजवळ पोहोचल्यावर युरो आणि डॉलरचे पाकीट घरीच विसरल्याचे लक्षात आले. ते घेण्याची जबाबदारी नवऱ्याची होती. एरवी काय झाले असते याची कल्पना न केलेली बरी पण ट्रेकच्या सुखस्वप्नांत असल्याने मला काहीही वाटले नाही, मी एकदम कूल वगैरे होते. पारू आणि DS कडे युरो होते ते लागतील तसे वापरायचे ठरले.
एअरपोर्टवर आमचे मार्ग वेगळे झाले. check-in च्या रांगेत लागतो न लागतो तो अनिताचा फोन की त्यांचे ब्रिटिश एअरचे विमान रद्द झाले आहे, पुढचे २ दिवसांनी मिळेल, alternative बघत आहोत वगैरे. आपण पुढे जायचे की नाही , यावर असे ठरले की आम्ही पुढे जायचे. रांगेत असताना हे लोक वेळेत पोहोचले नाहीत तर कसे करायचे याचा विचार चालू झाला. काही कपडे आणि ट्रेकसाठी आवश्यक गोष्टी आनंदच्या सामानात होत्या, पण तरी असे लक्षात आले, की जुजबी गोष्टी खरेदी करून मला व मुलाला ट्रेक सुरु करता येईल, हे लोक नंतर join करू शकतील. आमचे विमान निघायच्या अगोदर कळले की यांना वॉशिंग्टन डी सी मार्गे जिनीवाचे विमान कदाचित मिळू शकेल पण layover खूप कमी असल्याने risk आहे. आमचा मायामी लिस्बन प्रवास मस्त झाला. लिस्बनला पारूशी बोलणे झाले, ते लोकही हिथ्रोहून जिनिवाला येण्यास निघत होते. आमचे उरलेले ३ मेम्बर बहुतेक २४ दुपारपर्यंत जिनीवाला पोहोचतील असे कळले. पुढचे पुढे बघू असा विचार करून लिस्बन एअरपोर्टवर जिनिवाच्या विमानाची वाट बघत होतो. इथे एकही देसी माणूस दिसणे शक्य नाही वगैरे बोलत असताना आमच्या समोरून चक्क डॉ. विनय सहस्र्बुद्धे ( भाजप - राज्यसभा खासदार) गेले. ते आमच्याच विमानात होते. जिनीवात उतरल्यावर बॅग्स घेण्याच्या इथे त्यांना हॅलो केले तर गृहस्थ म्हणतो - “sorry हं, मी ओळखलं नाही तुम्हाला.” मी म्हटलं, “तुम्ही मला ओळखत नाहीच, पण मी ओळखते तुम्हाला, तुमचे interview भाषणे वगैरे ऐकली आहेत.” त्यांना धक्काच बसला, “मी काही प्रसिद्ध व्यक्ती वगैरे नाही”. मी म्हटले, जो तो आपल्याला रस आहे अशा गोष्टीच्या शोधात असतो, म्हणून मला तुम्ही माहीत आहात. असो ! जिनीवात भारत सरकारच्या कामासाठी होते आणि युरोपातील देवळांच्या चित्रांचे प्रदर्शन की काहीतरी लिस्बनला होते त्यासाठी १ दिवस गेले होते. त्यांनीही आमची आपुलकीने चौकशी केली. आता यात राजकीय रंग आणायचे काही कारण नाही पण एकूण छान वाटले बोलून त्यांच्याशी. गृहस्थ अगदी साधा, down to earth, पारदर्शी वाटला.
लिस्बनचा अगदीच गरिबडा असला तरी जिनीवा एअरपोर्ट भपकेदार असेल अशी माझी
समजूत होती, पण त्यामानाने साधाच निघाला, किमान arrival ला तरी तसाच वाटला.
कुलकर्णी तिथे भेटले. जिनिवा शामनी बसची बाहेर वाट बघत बसलो. हवा छान
होती. बसायला बेंच वगैरे एकूण कमीच असल्याने मांडा ठोकून फुटपाथवर बसलो
होतो. स्वच्छ तर इतके होते की तिथे तसेच आडवे व्हायलाही हरकत नव्हती.
शामनीचा प्रवास सुरु झाला आणि अहाहा !
नितळ आकाश, हिरवे डोंगर, टुमदार रस्ते आणि घरे , डोळे सुखावले होते. पुढचे
७-८ दिवस अशाच, याहून सुंदर वातावरणात आपण असणार आहोत या कल्पनेने प्रसन्न
वाटत होते. ७५-८० मिनिटांत बस शामनी गावातल्या मुख्य stand वर पोहोचली,
त्या जागेचे नाव chamonix sud. गुगलमध्ये हे ठिकाण १० वेळा तरी पाहिले
असल्याने ओळखीचेच वाटत होते.
टिपिकल हिलस्टेशन होते. तिथेच १ नंबरच्या बसला थांबलो, बरोबर मोठ्या बॅग.
जेटलॅगमुळे आलेले जडत्व वगैरे. बस आली आणि संध्याकाळची चर्चगेट - विरार
लोकल बरी म्हणावी अशी गर्दी ( मुंबईबाहेरच्या लोकांनी मुंबईत जाऊन स्वतः
अनुभव घ्यायला हरकत नाही). हॉटेलवाल्या बाईने सांगितले होते की तिकीट कोणी
विचारत नाही, त्याचे कारण कळले. तरी आम्ही काढले होते. कसेबसे घुसलो. दर २
-४ मिनिटांवर स्टॉप. आम्ही राहणार ते हॉटेल les houches नावाच्या गावात
होते. माझ्या अकलेने मी त्याला लेस हचेस किंवा हुचेस म्हणत होते. कुलकर्णी
म्हणाले असे नाव नाही पण बरोबर उच्चार त्यांनाही आठवेना. तर बरोबर उच्चार ल
/ ला/ ली ( यांच्या मधले काहीतरी) हूश असा काहीसा होता, असाच प्रकार
प्रत्येक स्टॉपला. पूर्वपुण्याई (गुगलची) जबर म्हणून योग्य ठिकाणी उतरलो
आणि १०० पावलांवरच्या हॉटेल रॉकी पॉप मध्ये एकदाचे येऊन पडलो. हाच तो
स्टॉप आणि शेजारचे हॉटेल.
हॉटेल सुरेख होते, सगळ्या सोयी छान, तिथे काम करणारे आणि पाहुणे म्हणून
आलेले सुरेख देखणे फ्रेंच पुरुष आणि बायापण. खायला प्यायला उत्तम, खोलीतून
आणि बाहेरून मस्त डोंगररांगांचे दर्शन फक्त एकमेकांचे बोलणे एकमेकांना
कळेना. आम्ही फ्रेंच भाषेवर अनन्वित अत्याचार केले आणि त्यांचे इंग्लिशही ४
शब्दांपलीकडे जात नव्हते. Google translator वगैरे वापरून जमेल तितके केले
पण तितका वेळ नसायचा, पुढचे गिऱ्हाईक तयार. संध्याकाळी गावात फिरायला
निघालो. रस्त्याच्या कडेला सुंदर सुवासिक मोठे गुलाब , रानफुले. सगळा
landscape केवळ वेड लावेल असाच होता. Love in the air. डोळ्यांत भरलेल्या
गोष्टी म्हणजे अशक्य स्वच्छता आणि देखणी फ्रेंच जनता. खरेतर chamonix मध्ये
जाऊन फ्रेंच रेस्तरॉ मध्य जेवण्याचा प्लॅन होता पण दमल्याने आणि बस रात्री
८ नंतर तुरळक असल्याने ‘ल हूश’ मधेच आधीच शोधून ठेवलेल्या ‘गांधी’
नावाच्या रेस्तरॉ मध्ये जेवायला गेलो. युरोपमध्ये फार महाग आहे असे जो तो
सांगत होता, कदाचित हे फार लहान गाव असेल म्हणून पण इतके काही महाग वाटले
नाही. छान चहा मिळाला आणि पंजाबी जेवणपण.जेवण अप्रतिम होते. फुलांना वास
असतो, भाज्यांना चव असते ही गोष्ट अमेरिकेत राहून विसरायला झालेली तिचा
प्रत्यय येत होता. तृप्त होऊन -’ अशी सुखे मी सदना आले, शांतीत अहा झोपी
गेले. Bonjour Bonjour Bonjour Bonjour स्वप्नी बोलले बोल कितीकदा’ .
आमच्या खिडकीतून.
कॉमन एरिया

सकाळी लवकरच निघालो. Chamonix मध्ये येऊन ब्रेकफास्ट घेतला , उत्तम
कॉफी, फ्रेंच pastry - croissant अगदी झक्कास होते. Aiguille du midi
म्हणजे needle of the day या आल्प्समधल्या peak वर ट्रॉलीने वर जाऊन
बघण्यासाठी तिकीट अगोदरच काढले होते. या ठिकाणाचा उच्चार मी काही अनाकलनीय
कारणाने आणि मोठ्या आत्मविश्वासाने ‘ऑग दि मिडी’ असाच शेवट पर्यंत करत
राहिले पण खरा उच्चार आग्वई दु मीदी च्या आसपास जाणारा आहे. असे यासाठी
म्हटले कारण मी १० फ्रेंच लोकांच्याकडून तरी तो शब्द पुनःपुन्हा म्हणून
घेतला पण प्रत्येकाच्या उच्चारात किंssचित फरक वाटला.
शामनी मधून ट्रॉली निघते ती एका स्टॉपला मग पुन्हा दुसरी ट्रॉली घेतली की आग्वई दु मीदीला.
ही जागा Mont Blanc ( १५७०० फूट) पेक्षा कमी उंचीवर ( सुमारे १२६०० फूट)
आहे पण शामनी valley ( ३५०० फूट) आणि सर्व डोंगररांगा स्वच्छ दिसतात.
ही त्या भागातील आणि बहुतेक युरोपातीलाच सर्वात मोठी ट्रॉली \ ट्राम \
गंडोला आहे. खाली valley मधून खरोखर एक सुईसारखी दिसते म्हणून तिचे नाव
needle of the day. सकाळी स्वच्छ ऊन होते. वरून valley, अथांग पसरलेला
बर्फ, त्यावर ठोकलेले तंबू, बर्फावर सुरीने कापल्यासारख्या दिसाव्यात अशा
वाटा मस्त दिवस होत्या. Mont blanc चे ही दर्शन झाले. पर्यटकांच्या
गर्दीतही अशा उंचीवर विशेषतः बर्फाच्या सानिध्यात एक विलक्षण शांतता अशा
ठिकाणी जाणवते. हा आल्प्स आहे आणि पूर्वेकडे हिमालय आहे. दोघे भाऊ, एकच
उंचीवरून एकमेकांकडे पाहत असतील - मध्ये मध्ये कोणीही नाही , पण आपण
त्यांच्या मूक संवादाचे साक्षीदार आहोत असे काहीसे विचार डोक्यात येत होते.
अशा ठिकाणची magnanimity निःशब्द करते. तिथे सगळीकडून बंद असलेला glass
box होता, त्यात उभे राहिले की सर्व बाजूंनी पाठच्या बर्फाच्छादित
पर्वतरांगा दिवस होत्या, तिथे फोटो काढले. वर पुष्कळ वारा होता आणि प्रखर
ऊन पण. तिथे ढग हलताना बघून उगीचच मेघदूत आणि त्यातल्या मार्गाची आठवण आली.



२ एक तासांनी पुन्हा ट्रॉली घेऊन खाली आलो. तोवर उरलेली ३ मंडळी जीनिवात
उतरल्याचे कळले. पण आयत्यावेळी त्यांना बस मिळत नव्हती आणि टॅक्सीवाल्याशी
हुज्जत घालणे चालू होते. आपण तिथे नाही या कल्पनेने हायसे वाटले. ते
कदाचित अजून तास दोन तासात पोहोचतील तोवर आपण हॉटेलला जाऊन त्यांच्या
स्वागताला तयार राहू असा विचार केला. Chamonix Sud ला येऊन बस पकडली आणि
भलतेच stop दिसायला लागले. आम्ही भलतीच बस चुकून पकडली होती. माझ्या
आत्मविश्वासपूर्ण फाडफाड फ्रेंचमध्ये मी बस ड्राईव्हर आणि बाकीचे passenger
यांच्याशी “भय्या ये बस काही जाती है, मुझे अमुक जगह जाना है, कहा उतरू?”
छाप संवाद चालू केला. मुलाने आपली अडाणी आई अगदीच लाज आणत आहे वगैरे लूक
दिला. मुंबईत राहत असताना बाहेरगावहून आलेल्या लोकांशी चुकून उद्धटपणाने
वागले असेल, नकळतपणे दुर्लक्ष केले असेल ते सर्व इथेच भोगावे लागते असे
म्हणून सोडून दिले. शेवटी एका les pres नावाच्या अतीव सुंदर गावात उतरलो (
लिहीले तरी असेच होते, उच्चार काय होता देव जाणे). तिथे योग्य बस यायला १०
मिनिटे होती, तेवढ्यात स्टॉप शेजारच्या दुकानात गेलो, मस्त wrap, sandwich
दुपारच्या खाण्यासाठी घेतले. मुलगा आणि किरण कुलकर्णींनी त्यावरून यथेच्छ
टिंगल केली पण मी व पारू बधलो नाही. एका मोठ्या पातेल्यात काही आमटीसारखे
रटरटत होते ती ‘curry’ आहे असे कळले.
योग्य बस घेऊन हॉटेलला आलो. नवीन आलेल्या ३ मेम्बरना जेवल्यावर जास्त
विश्रांतीची संधी न देता पुन्हा बसमध्ये चढवून Chamonix Sud ला आणले आणि
Aiguille du midi च्या रांगेत लावून दिले. त्यानंतर आम्ही उद्या ट्रेकचे
लोक ज्या Chamonix GARE ( म्हणजे रेल्वे स्टेशन) SNCF ( रेल्वे कंपनी ) इथे
भेटणार तिथे कसे जायचे , तिथली टेहळणी केली. Chamonix गावात जरा फिरलो,
खरेदी केली. इथे चिक्कार पर्यटक होते, खान पान जोरात चालू होते.
कचऱ्यासाठी जमिनीत खोल खड्डे केलेले होते आणि त्यात प्रचंड मोठ्या बॅग्स.
मुन्सिपाल्टीच्या गाड्या त्या बॅग्स उचलून गाड्यांत रिकाम्या करताना,
गावातले दिवसाचे व्यवहार पाहिले आणि अर्थातच चर्चा. कोणी म्हणेल त्यात काय
बघायचे , पण त्यात (सुद्धा) मजा असते - केल्याने देशाटन इ. इ. Chamonix हे
मुख्य गाव आणि आजूबाजूची खेडी यांनी बनलेली शामनी Valley आल्प्स मधले
touring, trekking, hiking, skiing सगळ्यांसाठीच मध्यवर्ती आहे तरी
बजबजपुरी अजिबातच वाटली नाही. देशोदेशीचे पण प्रामुख्याने युरोपिअन ,
caucacious आणि एकूण साहसी, शारीरिक क्षमतेची कसोटी बघण्याची आवड असलेले,
किमान फिटनेस फ्रीक म्हणता येतील असेच लोक दिसत होते. त्यात पुष्कळ फ्रेंच
पुरुष असावेत - जरा थोड्या निरीक्षणाने फ्रेंच कोण, जर्मन कोण वगैरे अंदाज
बांधायला आवडतं. एका जर्मन कंपनीत काम करत आहे आणि कामाच्या निमित्ताने
अनेक कॅनेडियन फ्रेंचांशी संबंध आला आहे, who doesn't like french men
(नुसते बघायला) ? तर ते एकगठ्ठा बरेच बघायला मिळाले.
प्रकाश उशीरापर्यंत असायचा पण संध्याकाळ होत आली तसे हॉटेलला परतलो.
तेवढ्यात Aiguille du midi ला वर गेलेले आमचे ३ मेम्बर तिथेच अडकून
पडल्याचे कळले. ७ ७:३० ८ कधी येऊ याची काही खात्री नाही असेही कळले. कारण
असे की प्रखर उन्हामुळे ट्रॉली वाहून नेणाऱ्या केबल्स-तारा तुटल्या होत्या
आणि ट्रॉलीचा अपघात होऊ शकतो म्हणून ती बंद केलेली. मग global warming
वगैरे चर्चांना आम्हाला अधिक खाद्य मिळाले. ती मंडळी ८ च्या आसपास परत आली
तेव्हा जवळजवळ अर्धमेली झालेली होती पण माणूस अधांतरी डोंबाऱ्यासारखा
तारांवर चढून ट्रॉली manage करत आहे हे बघण्याचाही अनुभव मिळाला. हा तो
फोटो.
शेवटी गांधीबाबाचेच जेवण आणून खाल्ले, ते सुंदर होते पण फ्रांस मध्ये येऊन
भारतीय जेवण जेवायला लागल्याने अनिताचा पापड अधिकच मोडला. अर्थात दुसरा
पर्याय नव्हता. आपल्याला हवे तसेच होईलच , मिळेलच असे नाही व ते
मानसिकदृष्ट्या पचवणे हा एक धडा असतो. ट्रेकमध्ये आमचे सामान एका ठिकाणहून
दुसऱ्या ठिकाणी गाडीने जाणार असल्याने १५ किलोची मुभा होती, त्यामुळे आम्ही
रग्गड सामान भरले ( याची गम्मत पुढे), एरवी जुलैनंतर या कामासाठी खेचरे
वापरली जातात, तेव्हा ७ किलोच्या वर सामान देता येत नाही. सगळी तयारी करून
अतीव दमलेल्या आणि तरीही उद्या सुरु होणाऱ्या ट्रेकच्या उत्सुकतेत झोपलो.
रविवार
२५ जून. हॉटेलमध्ये जास्तीच्या बॅग ठेऊन दिल्या. Chamonix GARE SNCF उर्फ
Chamonix रेल्वे स्टेशनला uber ने जायचे ठरले होते पण हॉटेलवाल्याने उबर
मिळणार नाही असे सांगितले ( tripadvisor च्या नानाची टांग !). टॅक्सीबद्दल
विचारल्यावर एक दोन नंबर देऊन आज रविवारी हे ही मिळणार नाहीत असे गोड
आवाजात सांगितले. १५ किलोच्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन नेहमीच्या स्टॉपला आलो.
एरवी अगदी वेळेत असणाऱ्या बस रविवारी लेट. एकदाची बस आली. गर्दीत घुसलो आणि
( त्यातल्या त्यात) सोयीच्या stop ला उतरलो. मग १०-१५ मिनिटे १५ किलोहून
अधिकच भरलेल्या बॅग आणि बॅगपॅक घेऊन आमची वरात Chamonix रेल्वे स्टेशनला
चालत चालत निघाली. ७ दिवसात ११० किमी चालण्यासाठीच इथे आलो असलो तरी ती १०
मिनिटे काही मंडळींनी ‘किती ती गैरसोय’ चे माफक हावभाव केले. सर्व planning
माझे असल्याने मला अपराधी भावना. आधी विमानांनी सर्व गोंधळ झालेला, आतातरी
वेळेवर पोहोचतो की नाही असे वाटले. एकदाचे पोहोचलो या आमच्या मुख्य
गाईडला भेटलो. सर्व पार्सले एकदाची त्याच्या हवाली केल्यावर मला हायसे
वाटले. आता ज्याचे त्याचे पाय - ज्याने त्याने बघून घ्यावे, अशी भावना
झाली. मी सुद्धा इथे प्रथमच एक प्रवासी म्हणून आले होते, आता कोणाकडेही
लक्ष न देता आपण आपला ट्रेक enjoy करायचा असे ठरवले.
आम्ही ७ जण, शिवाय जर्मनीमधील सुझन , ऑस्ट्रेलिअन जेस आणि तिच्या
मैत्रिणीची आई शॅरन, अबूधाबीचा सईद आणि CERN मधून रिटायर्ड झालेला जरासा
वयस्कर मार्क असा आमचा group होता. मार्कने हा ट्रेक बाईकवरून पूर्वी
केलेला. तो त्याच भागातला, भरपूर ट्रेक केलेला प्रचंड अनुभवी, उंच. तो
सर्वांच्या पाठी धीरदात्तपणे हळू हळू चालत असे. अनेक वेळा फ्रेड त्याच्यावर
assistant सारखा विसंबून असे. आमचे १५ किलोचे बोजे गाडीवाल्याला दिले,
लंचसाठीचे सामान बॅगपॅकमध्ये भरून पाठीला लावली आणि चालायला सुरुवात केली.
या भागात भरपूर वेगवेगळ्या रेस, अख्खी TMB सुद्धा असते. फ्रेडने पूर्वी ४४ तासांत १६०-१७० किमीचे पूर्ण TMB केले होते. त्या दिवशी पण अशीच कोणतीतरी रेस होती आणि त्यातले रनर्स - विनर्स एकेक करून येत होते. सुरुवातीला गावातून चालताना तिची मजा, उत्साह बघायला मिळाला. लवकरच रस्ता संपून पायवाट लागली. बाजूला पॅराशूट घेऊन बऱ्याच लोकांचा आकाशात मुक्त विहार चालू होता. वाट क्वचित घरांच्या पुढून , मागून जात होती. त्या सुंदर, सुबक , टुमदार घरात डोकावून बघण्याचा मोह आवरला नाही. अर्थात आत काहीही दिसले नाही. मात्र प्रत्येक खिडकी आणि जिथे म्हणून जागा दिसेल तिथे भरपूर कुंड्या आणि त्यात वेड्यासारखी बहरलेली सुगंधी रंगीबेरंगी फुले. संपूर्ण ट्रेकभर गाव आले की असेच असायचे. लहानपणी वाचलेल्या fairy tails च्या पुस्तकांतली चित्रेच डोळ्यांसमोर दिसत होती. किरण कुलकर्णींना गाण्याची लहर आली की ते हे एक गाणे सुरु करायचे
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिसपे बादलो की पालकी उड़ा रहा पवन
दिशाये देखो रंगभरी चमक रही उमंग भारी
ये किस ने फूल फूल पे किया सिंगार है
ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार
हे गाणं , गाणं म्हणून मला फारसं आवडत नाही तरी शब्द तंतोतंत होते हे
खरेच. सुंदर पायवाट, माफक चढ उतार , रस्त्याला फुललेली ता ना पि हि नि पा
जा रंगांच्या असंख्य छटांची रानफुले.
उजव्या हाताला पर्वतरांगेतील लहान मोठी शिखरे. पुढून फ्रेड आणि पाठून मार्क
प्रत्येकाची माहिती आणि महती सांगू लागले. बहुतेक वेळा अमुक alpenion इथे
चढाई करायला गेला आणि नंतरची दुर्दैवी कहाणी. मी मनात म्हटले की जरा बऱ्या
कथा पण सांग की.
आमच्या आगे मागेच utracks चा अजून एक ग्रुप होता. त्यांची गाईड एक मस्त
मध्यमवयीन बाई होती. तिचे आणि फ्रेडचे अधूनमधून फ्रेंचमध्ये गोड गुटरगू
चालायचे. आम्ही चालताना इतर जे ४-५ मेम्बर्स होते त्यांच्याशी ओळख वाढवत
होतो, गप्पा मारत होतो. ऑस्ट्रेलियन शॅरनला क्रिकेटमध्ये रस आणि माझ्या
मुलाला तर भारीच. Ashes चालूच होती तेव्हा त्यांचे बऱ्यापैकी जमले. पहिले
तास २ तास वेगवेगळ्या combination मध्ये त्या सर्व नुकत्याच ओळख
झालेल्यांशी इतक्या गप्पा झाल्या की फ्रेड अवाक झाला. १ च्या सुमारास लंचला
थांबलो ते एका सुंदर ओढ्याच्या कडेला, झाडांच्या सावलीत.
आमच्या बॅगपॅकमध्ये भरलेल्या विविध गोष्टी बाहेर काढल्या. प्रत्येक दिवशी
उत्तम ब्रेड आणि वेगवेगळे चीज, शिवाय अफलातून सॅलड्स ( त्या फ्रँकच करायचा)
, मग चॉकोलेट्स , कधी yogurt, रसरशीत केळी, आलुबुखार, पीच, नेक्टरीन,
अंडी, मांसाहारी मंडळींसाठी sausage वगैरे. मांसाहारी मंडळींची मुख्य
पंचाईत अशी झाली की मांसाहारात पोर्कच मुख्यतः होते. चिकन व फिश एकेकदा.
सईदला पोर्क निषिद्ध म्हणून बहुतेक बीफ होते जे आमच्या मांसाहारींना चालले
नसते. पुढच्या वेळी काय हवे यापेक्षा काय चालणार नाही हे सांगण्याची सूचना
देण्यात आली. शाकाहारींना काहीच अडचण नव्हती. जेवण झाल्यावर प्लेट्स
बाजूच्याच खळाळत वाहत्या ओढ्यात धुवाव्या की पानांनी साफ करून मुक्कामाच्या
ठिकाणी धुवाव्या व त्या अनुषंगाने जलप्रदूषण वगैरे घनघोर चर्चा झाल्याचे
आठवते. मी फक्त बर्फाचे पाणी असल्याने थंडगार असलेल्या ओढ्याच्या पाण्यात
पाय बुडवले (जलप्रदूषणाच्या भीतीने घाबरत घाबरत) आणि गरम झालेल्या पायांचे
लाड पुरवले. एकूण तसे गरम होते, फ्रान्समध्ये डोंगरात असू नये तसे त्यामुळे
ग्लोबल वॉर्मिंग वगैरे विचार आणि एकूणच सगळे इतके स्वच्छ होते की आपल्या
अस्तित्वाने आणि जगण्याने ते घाण करीत आहोत असा अपराधगंड अशा विचारात पुढे
चालत राहिले.
मध्ये एक ब्रेक घेतला तिथे ३-४ जण भारी rock climbing करताना दिसले. आमच्या
अस्तित्वाची दखल न घेता त्यांचे चालले होते आणि एखादा परफॉर्मन्स बघावा
तसे श्वास रोखून आम्ही बघत होतो, टाळ्याही वाजवत होतो. चालताना जरासा
विरंगुळा. मग पुढच्या रस्त्याला लागलो. ३ च्या सुमारास बहुतेक गाव दिसू
लागले - Argentine नावाचे.
फुलांचे ताटवे, ओढे, ब्रिज, लहान मोठी घरे, सरकारी कचेऱ्या, हॉटेल. कुठे
बघू आणि कुठे नको. गोल दंड फिरवून घेण्याचे वॉटर फौंटन पण होते आणि त्यातून
बर्फासारखे गार पाणी. पारुने लगेच पुढला प्लॅन जाहीर केला की ती इथे
airbnb वगैरे घेऊन कधीतरी महिनाभर राहणार आहे. असे कोणतेही गाव आले की हे
प्लॅन जाहीर व्हायचे. आम्ही सुद्धा - तुम्ही गेलात की पाहुणे म्हणून आम्ही
येतोच लगोलग वगैरे चेष्टा चालायची. इथे लोकांनी कॉफी वगैरे घेतली आणि Le
Tour च्या रस्त्याला लागलो. तो रस्ता जरा वैतागवाणा होता म्हणजे इतर
दिवशीच्या सुंदर routes च्या मानाने . आधी Trient चा फाटा लागला पण तो पाठी
टाकून आम्ही Le Tour च्या दिशेने निघालो. मध्ये मध्ये अमुक ठिकाणी
avalanche आल्याने जागच्या जागी कसे लोक गेले वगैरे दाखवणे चालू होते.
त्याचे वर्णन इतके प्रत्ययकारी होते की आता वरून एका क्षणात काहीतरी
आपल्यावर कोसळून राम नाम सत्य होईल वगैरे भीती वाटायला लागली. अखेर डाव्या
बाजूला एका उंचवट्यावर एक लहान बिल्डिंगसारखे दिसू लागले, आपण तिथेच राहणार
आहोत असे कळल्याने मंडळी जोमाने चालायला लागली पण अख्खा वळसा घालून तिथे
पोहोचेपर्यंत अर्धा तास तरी गेला.
Le Tour मुक्कामी पोहोचलो.
राहण्याच्या सगळ्या ठिकाणी एक सोय उत्तम होती. Hiking shoes, poles एका
बाहेरच्या खोलीत काढायचे आणि मग slipper चपला जे काही असेल ते घालून तिथे
वावरायचे. त्यामुळे बुटाची घाण आत येत नसे. आमचे सामान आलेले होते. आणि
राहण्याची जागा ३ ऱ्या मजल्यावर. १५ किलोचे पोते उचलून मजल दरमजल करत तिथे
पोहोचलो. रांगेने लहान लहान खोल्या, प्रत्येक खोलीत ३-४ Bunk bed अशी रचना.
खिडकीतून खालचे खोरे अफाट दिसत होते. बाथरूम अतीव स्वच्छ. अंघोळीला गरम
पाणी. अजून काय हवे ?
पहिल्या दिवसापासून एक क्रम ठेवला. दुसऱ्या दिवशीचे कपडे आणि इतर सामान -
माझे व चिरंजीवांचे काढून ठेवायचे म्हणजे सकाळी शोधाशोध करायला नको.
चिरंजीवांनी बॅगेत भरलेल्या नको नको त्या गोष्टी काढून जरा बॅगपॅक हलकी
करायची. नवऱ्याला सेल्फ सर्विस होती. मी चिरंजिवांची valet असल्यासारखे
एकूण चालले होते. रोज मुक्कामी पोहाचलो की पारूचे अंथरुणावर पडणे आणि माझे व
महावस्ताद वकिली युक्तिवाद करणाऱ्या चिरंजीवांचे तुंबळ वाग्युद्ध जुगलबंदी
चालायची. पारूला पडल्या पडल्या करमणूक. चिरंजीवांची दिवसभरातील घडामोडी,
राहण्याची जागा यावर विशेष टिप्पणी आणि त्यावर दोघांनी hysterically हसत
राहायचे. हा शो रोजचा.
अनिता आणि DS सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्यांच्या त्वेषाने अंघोळ करून आवरण्याच्या कामात. नवऱ्याने खास ट्रिपसाठी मोठी लेन्स घेतलेली , तो कॅमेरा घेऊन भलतीकडे. इतर मेम्बर आमच्या देशीपणाला जरा घाबरून, सांभाळून आपापले आवरत. एकूण सोय कल्पनेपेक्षा अतिशय झकास होती. अंघोळीसाठी नंबर लागण्याची वाट बघत असताना एक मध्यमवयीन , जरा वयस्करच जोडपे समोर आले. बाईंनी केस नुसतेच धुवून सोडले होते. तिच्या नवऱ्याने मला अचानक रेफ्री केलं . “काय वाटतं तुला - हिने खाली कॉमन रूम मध्ये जाण्याआधी जरा केस नीट करायला पाहिजेत ना ? “ काकू म्हणाल्या - “इतकं वाईट दिसत नाहीये, नाही का ? काय वाटतं तुला ?” ते नक्की माझ्याशीच बोलताहेत ही खात्री केली , काकूंना म्हटले - जरा ब्रश तरी फिरवा, बरे दिसतील. काकूंना पटले, काका खूष झाले. कॉमनरूममध्ये पुन्हा भेटल्यावर ‘my body my choice’ वर लहानसे भाषण काकांना दिले. काकू पण खूष.
फ्रेश होऊन तीन मजले खाली उतरलो आणि कॉमन रूम मध्ये टेबलापाशी आपापली
कॉफी - ड्रिंक्स घेऊन गप्पा मारत बसलो. आमच्यापाशी चकली - कचोरी वगैरे
खुसखुशीत माल होता, गोरे लोक आवडीने खात होते. नवरा आग्रहाने वाढत होता.
तरी पहिल्या दिवशी आमचे देशी लोकांचेच टेबल झाले, तेव्हा दुसऱ्या
ब्रेकफास्टपासून मात्र आवर्जून वेगवेगळे, सरमिसळ करून किंवा सगळेच एकत्र
बसलो. पहिल्या दिवशी चक्क
पुलाव बिर्याणीच्या जवळ जाईल असा curry मध्ये शिजवलेला उत्तम भात होता. आंब्याचे आईस्क्रीम. सॅलड , चीज ब्रेड तर असायचेच.

यंदा भरपूर रेकॉर्डेड गाणी आणली होती. संध्याकाळी बाहेर बसून डोंगरदऱ्या
बघत यमन, मारवा,मारुबिहाग काही ना काही ऐकायचे ठरवले होते पण आज काहीच झाले
नाही. जेवण झाल्यावर फ्रेडने ३-४ वेगवेगळे नकाशे जोडून जमिनीवर ठेवले.
चांगले ८ x ८ फूट तरी असेल आणि ट्रेकबद्दल आमची शाळा चालू झाली. आज
फ्रांस, मग ३ रात्री स्वित्झर्लंड, १ इटली आणि शेवटी पुन्हा फ्रांस,
terrain कसे बदलेल, snow कुठे आहे, steep कुठे आहे, extreme downhill कुठे
याची उजळणी झाली. लोकांना दुनियाभरचे प्रश्न आणि मला काहीच नाहीत. जो होगा
वो देखा जायेगा. उद्या फ्रांस स्वित्झर्लंड सीमा क्रॉस करण्याच्या
उत्सुकतेत झोपी गेलो.
क्रमश:
फळे, कॉफी, cereals - भक्कम ब्रेकफास्ट करून ८च्या सुमारास निघालो. सकाळी
steep uphill होता, थोडे switchbacks होते. Mount Whitney ला पहाटे ३:३० ते
६ असे एकूण १०० Switchbacks जे एकदाचे पायाने घडले त्यानंतर मी
switchbacks साठी (मानसिकदृष्ट्या) कूल असते. आणि आज ठरवून गाणी ऐकत चाल
सुरु केली. आज (आणि नेहमीच ) मूड लता. कुछ दिलने कहा, आजा रे परदेसी,
पाकिजा आणि काय काय ! इस मोडसे जाते है च्या सुरुवातीचा आलाप, किंवा यार
सिली सिली ऐकताना डोंगर हवाच. चढ कधी संपला ते कळलेही नाही. डोंगर चढताना
गाणे ऐकू नये, आवाजावर लक्ष हवे असा फ्रेडचा सल्ला होता. पण मी ऐकत असलेले
गाणे loud orchestra, music नव्हतेच. शिवाय त्या निसर्गसौन्दर्याला साजेसे
आणि त्या तोडीचेच होते. त्यामुळे मी लक्ष दिले नाही, गाणे ऐकलेच. फ्रेडच्या
चांगले गाईड असण्याची एक खूण म्हणजे पारू आमच्यात वयाने बरीच मोठी, चढ आला
की ती पाठी पडायची. मग आज त्याने पुढे तो, मागे पारू आणि इतर सगळे त्या
पाठी हा क्रम ठरवून दिला. चिरंजीवांची त्यामुळे बरीच चिडचिड झाली खरी. पण
इतर सर्वांना किंचित संथ गतीत गेल्याने अजिबात दम लागला नाही आणि एकटे पाठी
पडण्याची वेळ पारू वर आली नाही.

शामनी valley आता खूप पाठी पडली होती. Mont Blanc च्या north west ला अरुंद
वाटेने आम्ही स्वित्झर्लंडकडे कूच करत होतो. वरून Le Tour आणि आजूबाजूचे
खोरे दिसत होते. १० -१०:३० नंतर कॅनवास चांगला रुंदावला. एके ठिकाणी अचानक
पूर्वेच्या एका शिखराकडे हात करून , इथे इंडियन एअरलाईनचे विमान ६६ साली
क्रॅश झालेलं त्याने सांगितलं. कालपासून त्याने अशा अनेक घटना सांगितलेल्या
पण ते ऐकल्यावर स्तब्ध झाले. हेच ते शिखर जिथे होमी भाभांचे विमान क्रॅश
झालेले. विमानाचे भाग, शासकीय कागदपत्र, आणि अजून काय काय पर्यटकांना
मिळायचे, अजूनही मिळते हे ही त्याने सांगितले. २ मिनिटे नकळतपणेच भाभांसाठी
मूक होऊन श्रद्धांजली वाहिली गेली. काहीतरी वेगळे feeling आलं जे शब्दांत
मांडणे कठीण आहे.
नंतर Landscape एकूणच जरा बदलत गेले आणि घंटांचे आवाज सुरु झाले. मग हळूहळू
त्याच त्या - स्विसप्रसिद्ध गळ्याला घंटा बांधलेल्या गायी कुठे कुठे
दिसायला लागल्या. लहानपणी ‘Heidi’ ची पुस्तके वाचली होती त्यातील चित्रे
डोळ्यांसमोर दिसू लागली. दूरवर पसरलेले मऊ हिरवेगार वाऱ्याने हलणारे गवत,
त्यावरची विविधरंगी रानफुले, समोर बर्फाच्छादित डोंगररांगा, स्वच्छ प्रकाश
आणि कानांत ‘मौसम है अशिकाना‘


फ्रेडने एके ठिकाणी थांबवले, तिथून पुढे फ्रेंच valley दिसणार नव्हती आणि
view खतरनाक होता. फोटो काढले, valley ला अच्छा केले आणि निघालो. मध्ये
एकदा ब्रेक घेऊन गवतावर यशराज ‘सिलसिला’ वगैरे style झोपणे लोळणे इत्यादीही
प्रकार केले, फक्त शिफॉनच्या एकरंगी साड्या आणि लिपस्टिक नव्हत्या.
१२ - १२:२० ला डोंगरमाथ्याला फ्रांस स्विस बॉर्डरला पोहोचलो आणि लंच घेतला.
बॅगपॅक जरा हलकी झाली. पुन्हा कचरा तिथे टाकायचा की डब्यात भरून खाली
न्यायचा हे ठरवताना अनिता चटकन काहीतरी लागेलसे बोलली. कदाचित सर्व
प्लांनिंगचा stress, एकूण अनुभवाने, थोडे दमल्याने, गाण्यानेही overwhelm
झाल्यामुळे असेल पण डोळ्यांना पाणी आले. मग एकटीच काही काळ north facing
swiss valley च्या दिशेला बघत बसून राहिले. आपण इथे आपल्या आनंदासाठी आलो.
गेल्या २-३ वर्षांत अनेक घरगुती कारणांनी त्रासलेले असताना इथे येण्याच्या
कल्पनेने उमेद दिली, आता इथे प्रत्यक्ष असताना फालतू कारणांनी मूड खराब
करण्याचे कारण नाही. वगैरे समजूत आपोआप पटली. असे क्षण प्रवासात,
निसर्गाच्या सहवासात यावेत - ते सक्षमपणे झेलून पुढे जाण्याचं सामर्थ्य
आपोआप मिळतं.
प्रफुल्ल मनाने descent चालू केला. मी डोंगरात आणि एरवीही किती पावले, किती
किमी चाललो या गोष्टींकडे लक्ष देत नाही, म्हणजे ते जातच नाही. ते एक
प्रकारे माझे meditation असते आणि किती ते मोजत नाही. पण मंडळींना उत्साह
होता, त्यामुळे त्याबद्दल चर्चा, फ्रेडकडून माहिती काढणे चालू होते. आज
काहीतरी १७-१८ किमी असणार होते. तसे खडकाळ , भरपूर उतार, मध्येच क्वचित
बर्फ नाहीतर पाणी ओलांडले. डावा गुडघा जरा कमजोर झाला आहे, त्याने descent
वर त्रास दिला, खरेतर गुडघ्यापेक्षा उतरताना तो त्रास देईल या कल्पनेनेच
जास्त त्रास होत आहे, हे नवऱ्याने पटवले, सतत बरोबर राहिला. उतरून खाली
valley त आलो तर जवळजवळ एक किमीच्या रस्त्यावर आजूबाजूला फुलांची शेती
असावी अशी वाटली, दोन्ही बाजु फुलेच फुले, त्यामधून चालत असे
स्वित्झरलँडमध्ये स्वागत झाले.

तिथे मोठे campground होते, मला वाटले इथेच राहणार, पण दिल्ली अभी दूर थी.
३० -४० मिनिटांचा एक अशक्य steep चढ जीवाच्या ओढीने चढत राहिलो. नंतर एक
मोठा ब्रिज आला, डोंगरकडेने जाणारा, आणि दुसऱ्या बाजूला खोल valley. त्या
view ने सगळा शिणवटा गेलाच. आणि मुक्कामाच्या ठिकाणी Col De La Forclaz ला
पोहोचलो !
तिथे प्रथमच wifi मिळाल्याने सगळे एकदम busy झाले. लॉजच्या बाहेर बसायला
मस्त वाटत होते, पाठी कोणतातरी highway होता आणि समोर डोंगर आणि हवा ही
crisp होती. पण आत शिरलो तर राहण्याची जागा epic होती. बिल्डिंग मध्ये
अंधाऱ्या अरुंद पॅसेज आणि वेड्यावाकड्या जिन्यांतून वाट काढत दुसऱ्या
मजल्यावर १५ किलोचे पोते घेऊन चढलो. एका मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांत
कोंबलेले ३५-४० जण आणि पुरुष बायका मिळून १ बाथरूम ( पण स्वच्छ !) आणि एकच
इलेक्ट्रिक प्लग असा प्रकार होता. एका प्लग वर ३० एक तरी devices charge
केली जात होती. आम्ही attic मध्ये असणार, त्यामुळे खोलीला फार तर १ चौरस
फूटाच्या २ खिडक्या होत्या. जेवण - Veggie burger, basil soup आणि
strawberry icecream मात्र छान होते पण स्टाफ खडूस. पहिल्या दिवशीच्या
मानाने आम्हाला फारच जाणवले. बंक बेडवर डोक्यावर जेमतेम २ फूटांवर पायांकडे
उतरत जाणारे छत होते. मी छतालाच पाय लावून झोपले. त्या जागेचे स्वरूप आणि
भाव बघता चिरंजीवांनी स्वित्झर्लंडमधली महागाई पासून नाझी concentration
camp इत्यादींवर प्रवचन केले. पारू-किरण हसत राहिले. कशी का होईना,
स्वित्झर्लंडमधली पहिली रात्र आम्ही आनंदाने साजरी केली.
क्रमश:
सकाळी ८ ला निघालो. सकाळी ascent होता, तसे असले की बरे असते. दुसऱ्या
group मधले आगे मागे असायचे ते मेंबर आज दिसले नाहीत, तर कालच्या
शिणवट्यामुळे आज बरेचसे अंतर ते बसने कापणार आहेत असे कळले. मग आम्ही
आपापली पाठ थोपटली. वारंवार चढत गेलो तशी राहिलो ती बिल्डिंग,रस्ते, खालची
valley दिसायला लागली. इतक्या खालून गायीच्या घंटांचे निनाद ऐकू येत होते.
मग फ्रेड सर्वांत जास्त दूध देणाऱ्या गाईला राणीसारखा मुकुट, रांगेत पहिला
मान, गावागावांतील गाईंच्या लढतीच्या प्रथा, त्यात होणारे अपघात वगैरेबद्दल
सांगत होता. कसे कोण जाणे Animal Welfare वाले तिथे पोहोचले नसावेत.
भूतदया या तत्वाबद्दल शंका नाही पण ७०-७५% टक्के मांसाहारी आणि जीवो जीवस्य
जीवनं याही तत्वाने चालणाऱ्या जगात Animal Welfare बद्दल ज्या चमत्कारिक
गोष्टी कानी येतात त्या व्यवहार्य नाहीत असेच वाटते. तसेच अशाच प्रथा
भारतीय खेड्यापाड्यात अनेक आहेत, त्या मात्र मागास आणि इथे युरोपात मात्र
ते कित्ती कित्ती आपल्या प्रथांना जपतात याचे कौतुक अशा वर्गालाही एकदा
मनात मनसोक्त नावे ठेवून घेतली. आमच्यापैकी कोणी तसे नव्हते. यावरूनच चालू
झालेल्या चर्चेत, (कोणाचाही विश्वास बसणार नाही पण सत्य आहे) सईदने ‘मराठी
लोक व्यापारात, आर्थिक उलाढालीत मागे का” अस्साच प्रश्न विचारला. मी थक्क
झाले. तो जन्माने अबूधाबीचा आणि तिथेच राहणारा इन्व्हेस्टर आहे. त्याला
मराठी - पंजाबी - तामीळ वगैरे फरक माहीत होतेच आणि वर आपले व्यवच्छेदक
लक्षणही माहित होते. मग माझ्या मगदुराप्रमाणे मी आणि कुलकर्ण्यांनी त्याचे
शंकानिरसन केले. कुलकर्णी स्वतःचा उद्योग चालवून आज ५० पेक्षा जास्त
लोकांना उत्तम रोजगार देत आहेत, त्यामुळे त्यांचा यावर बोलण्याचा अधिकार
निश्चितच अधिक पण माझे नाक खुपसणे पण त्यांनी प्रेमाने खपवून घेतले.

आधी चढून मग जरासे उतरलो तिथे मोठे पठार meadow सारखे होते. आणि मग पुन्हा
चढायला लागलो. चढ उत्तर सतत असायचे. डोंगर माथ्यावर जाऊन उताराला लागलो
तेव्हा फ्रेडने आता इथल्या cottage शी ब्रेक घेऊ, तिथल्या बाईशी नम्रपणे
बोला, नाहीतर मला पुन्हा ती इथे पाय ठेऊ देणार नाही वगैरे सांगितले. एका
स्विस बाईने चालवलेले लहानसे cottage - ‘Bovine’ होते. तिथे वाहन येत नाही.
त्या बाईचे ८० च्या घरातले आई वडील सुद्धा टेकड्या चढूनच तिथे आले होते.
बसायला बाक, पाण्याची सोय होती, आजूबाजूला कुरणे आणि त्यात गायी विहरत
होत्या. आणि तिने केलेले घरगुती अत्यंत उत्कृष्ट केक, पाय वगैरे विकायला
ठेवले होते. क्रेडिट कार्ड अर्थात चालणार नव्हते. पारुने माझी गरिबी लक्षात
घेऊन मला काही युरो उसने दिले आणि मी chocolate केक घेतला. इतका सुंदर
chocolate केक मी आयुष्यात प्रथमच खाल्ला याबद्दल मला तीळमात्र शंका नाही.
तो केक खाण्यासाठी तिथे पुन्हा जायला मी एका पायावर तयार आहे. तिथे असणं
साजरं करण्यासाठी ६-७ मिनिटांची भीमसेन जोशींची शुद्ध कल्याणमधली एक अलौकिक
चीज ऐकली. सगळ्याचेच सार्थक झाले.
थोडा वेळ घालवून निघालो, बराच descent होता. पारूची चढावर जी अवस्था साधारण
उतारावर माझी तशी होते अशी भीती होती. मग फ्रॅन्कच्या पाठी मी आणि
माझ्यापाठी सगळी मंडळी, गुडघा जरा कुरकुर करत असला तरी आपल्यामुळे उशीर नको
या भावनेने तसे भरभरच उतरत होते. ऊन वाढत होते, आणि एकूण वाट खडकाळ. आता
आम्ही Mont Blanc च्या उत्तरेला होतो आणि उजवीकडे East ला सरकत होतो.
अर्थात आता ते शिखर , बरेच दक्षिणेला असल्याने दिसत नव्हते. जेवायला थांबलो
तिथे नावाला सावली नाही पण view सुंदर. सगळा Downhill नेटाने केला.
आजूबाजूला बघण्यात इतके नेत्रसुख होते की काही वाटले नाही, विचारमुक्त
अवस्थेत सर्व आसमंत स्वतःत indulge करत उतरत होते. ३ च्या आसपास बरेच ओढे,
पाणी लागले. आणि मग एका ठिकाणी थांबलो. काहीतरी २-३ डिग्री तापमान असलेले
प्रचंड गार पाणी वेगाने कोसळत होते. त्यात पाय बुडवून बसले, काही सेकंदांतच
बाहेर काढायला लागले पण सगळं शिणवटा एकदम गेला. आजुबाजुला प्रचंड हिरवगार.
समोर typical स्विस खेड. फोटो कितीही काढले तरी डोळा जे टिपत असतो ते
कोणत्याही कॅमेऱ्याला शक्य नाही. हे वर्णन लिहिताना तिथे असल्याचा भास
होतो, गार पाण्याचा स्पर्श पायांना आपोआप होतो. मेंदूत आणि पंचेंद्रियांतच
ती सगळी फ्रेम राहून गेलेली आहे.
वाटेतलं छोटंसं घर
बाजूने वाहणारा ओढा
आता मुक्कामाची जागा जवळ आलीये असे कळले. पण पुढे एक सुंदर धबधबा होता तिथे
अजून रेंगाळलो आणि त्याच्याच कडेने चालत चालत Champex lake जवळ Arpette ला
मुक्कामी पोहोचलो. जाताना वाटेत अगदी middle of nowhere दिसलेले हे नवल.
हे कोणासाठी होते नकळे, आम्ही इथे ४ लाच पोहोचलो, तेव्हा अजून अर्धा तास
थांबूया असे फ्रेडला सुचवले, त्याने हसत हसत आमची मागणी धुडकावत लावत तसेच
रेटत पुढे नेले.
मुक्कामाकडे जाणारी वाट
धबधब्याच्या कडेने चढत गेलो तेव्हा वर इतकी मोठी जागा असेल असे वाटले
नाही. एकूण परिसर मोठा होता. राहण्याच्या खोल्या, शूज ठेवण्याची जागा,
खाण्याची जागा, त्यापाठी अप्रतिम हिरवळ , कपडे वाळत घालायला जागा सगळंच
मुबलक आणि पाठीमागे मोठे मोठे उभे डोंगर. स्विसमधल्या पहिल्या रात्रीनंतर
हा सुखद अनुभव होता. लोकही मवाळ वाटले. अंघोळीचे पाणी मात्र गरम होते की
नाही यावर वाद होता, आम्ही गरम मानून घेतले. इतकी वर्दळ असून सगळे कसे आताच
साफ केल्यासारखे चकाचक असायचे मात्र. राहण्याच्या खोल्या फारतर दुसऱ्या
मजल्यावर असतील आणि एव्हाना १५ किलोचे पोटे उचलून चढण्याचा सर्व झाला होता.
आम्ही हिरवळीवर बसलो, दुसरा group नाचतही होता (आज बसने आले होते ते इथे) ,
आम्हीही ४ पावले टाकली. इतर कोणी नव्हते म्हणून एकटी पत्ते खेळले. जेवायला
ब्रेड, सूप , सलाड , चीज वगैरे नेहमीची मंडळी झाल्यावर चक्क छोले आणि जीरा
राईससम प्रकार होता. गोऱ्या मंडळींना फारसे आवडले नाही, आमच्यापैकीपण
अनेकांना. सईदने जोरात निषेध नोंदवला. त्यांच्या भावनेशी पूर्ण सहमत असले
तरी मी जेवण चांगले एन्जॉय केले. आज झोपल्या झोपल्या बऱ्याच गप्पा मारल्या.
रात्री जेवणानंतर चिरंजीव व पारू आपापली ipad घेऊन की ठराविक एपिसोड बघत
असत, त्यांना आजूबाजूच्या जगाशी तेव्हा काही देणे घेणे नसायचे, त्यावरून
त्यांची बरीच चेष्टा केली. त्यांन ते न कळत नसल्याने आम्ही सुखात आणि ते
सुद्धा. अनिता दुसऱ्या room मध्ये होती, तिने जरा मित्रमंडळ जमवले होते हे
बघून बरे वाटले. फ्रेड, दुसऱ्या ग्रुपची गाईड मुलगी आणि मंडळी एकूण रंगात
आली होती. या मंडळींचे बोलताना तोंडच नाही डोळे, हात, पाय सगळेच बोलतात असे
वाटायचे. म्हणजे हातवारे नाहीत, पण एक abstract, विशिष्ट देहबोली होती हे
जाणवायचे. त्या दुसऱ्या ग्रुपच्या गाईड बाईने मला खरोखर मोहून टाकले. ३५ शी
ची वगैरे बाई असेल नसेल. सकाळी ८ ला बघा नाहीतर रात्री १० ला तशीच टवटवीत
असायची आणि सटासट फिरत असायची. पुष्कळ ओझे पाठीवर घेऊन तिच्या ग्रुप मधल्या
अशाच १०-१२ लोकांना हाकत असायची. पण तिचा धाक होता, खडूस मास्तरीणीला
घाबरावं तसं तुच्या ग्रुप मधल्या लोकांना तिच्याबद्दल वाटत असावं. जास्त
बोलायची नाही, कामापुरतेच. फ्रेड मात्र रंगीला रतन होता. रात्री जरा ४ घोट
घशाखाली गेले की एकदम खुलायचा. अर्थात त्या वेळीसुद्धा त्याच्यातला गाईड
पूर्णपणे सावध असायचा हे निश्चित. आमचे पाय किंवा दुखल्याखुपल्याबद्दल
विचारायचाच. टेकाडावरच्या त्या सुंदर स्विस खेड्यातली रात्र अगदी सुखात
गेली.
क्रमश:
ब्रेकफास्ट जवळजवळ सगळीकडेच अंडी, toast, वेगवेगळ्या जेली, croissant,
coffee , फळे , cereal असा भरपूर असायचा. Cereal बरोबर दुधाऐवजी दही
असायचे. आज आमचे स्विसमध्येच दक्षिणेला La Fouly कडे प्रस्थान होते.
लॉजच्या इथून खाली उतरत होतो तेव्हा बाजूला पाटाच्या बाजूने चालत होतो.
शेतीसाठी बहुदा चांगले लाकडी लहान मोठे पाट सुबक बांधलेले. त्यातले खळाळते
स्वच्छ थंड पाणी, त्याचा आवाज. त्याला पूरक म्हणून पुन्हा लता सुरु केली.
मध्ये मध्ये किशोर-रफी पण. हे लोकही माझ्याबरोबर या पृथ्वीवरच्या स्वर्गात
आलेत ही भावना होती.
काही वेळातच Champex Lake लागला.
त्याचे पाणी गार पण अजून खाली असल्याने कालच्या धबधब्याच्या मानाने कमीच
होते. मार्क सरळ कमरेपर्यंत अगदी छातीपर्यंत त्यात जाऊन उभा राहिला. आम्ही
पण गुढग्यापर्यंत गेलो. आनंदला पायाला जरा blister आल्याचे लक्षात आले, मी
आशा करत राहिले की ते वाढणार नाही कारण त्याचा असह्य त्रास होतो पण नशिबाने
ते पुढे वाढले नाही. लक्षात आले आपले शूजही जुने झालेत. याच एका old and
faithful shoes वर Angels Landing Utah , Inca Trail Peru , Mount Mitchell
( २ वेळा), Colorado मध्ये Pikes Peak आणि Mount Bierstadt, किलीमांजारो
झाले आणि आता TMB सुरू आहे. त्यांनी दगा दिला नाही. एकही blister आला नाही
आणि शूज सुखरूप घरी परत आले.
आमच्याबरोबरचा group लेकपाशी फारसा रेंगाळला नाही, आम्हाला उशीर झाला
असावा, तेव्हा वेळ भरून काढण्यासाठी म्हणून फ्रेडने अत्यंत steep आणि अरुंद
अशा दुहेरी कठीण पायवाटेवर नेले. रस्त्यात अर्धवट पडलेल्या , कापलेल्या
झाडांच्या खोडातच कोरलेले लहान मोठे प्राणी , मोठी artistic वाट होती.
अनेकदा घसरायला झाले. पण एकूण मजा आली.
एके ठिकाणी थांबवले, तिथे समोरच्या खडकांत २ -३ लोखंडी दरवाजे, हा प्रकार
काय विचारलं तर ते म्हणे इथे सैनिकांना व नागरिकांना युद्धकाळात
लपण्यासाठीचे बंकर होते. एकेक महिन्याचे supplies वगैरेही साठवले जायचे. या
एक प्रकारे middle of nowhere मध्ये आसपास कितीही सुंदर असले तरी असे लपून
राहणे भीषणच असणार. शॉर्टकट संपला तिथे प्रचंड लाकडाची रास. आमच्या
बरोबरच्या group च्या जरा आधीच आम्ही तिथे पोहोचलो. त्यांच्या गाईडने जरा
आमच्याकडे ‘हे कसे काय इतक्यात पोहोचले’ म्हणून कुतूहलाने पहिले. आमच्यातील
एक दोघे जण, विशेषतः सुझनला असे वाटायला लागले की काही करून रोज ५ च्या
आधी फ्रेड आपल्याला मुक्कामी पोहोचवत नाही, कदाचित त्याची लॉज वाल्यांना
सोयीचे पडावे म्हणून arrangement असेल. अर्थात त्याने आम्हाला तसे काही
सांगितले नाही. दुसरा group काही करून आमच्या आधी जरा पोहोचतो म्हणून
त्यांना राहण्याच्या खोल्या जरा बऱ्या, किमान खालच्या मजल्यावर मिळतात. आज
आपण लवकर पोहोचण्याचे बघू म्हणून तिने canvassing सुरू केले.
डोंगरातली पायवाट संपली आणि पायथ्याशी Essert नावाचे अतिसुंदर गाव
लागले. वाऱ्यापासून रक्षण व्हावे म्हणून गावातील सगळ्या घरांची छते एकाच (
बहुदा ) दक्षिणोत्तर दिशेत होती.
गावात curfew होता की नकळे पण माणूस एकही दिसला नाही. मात्र जिथे तिथे सुंदर टुमदार घरे,
कडेला फोडून ठेवलेल्या सरपणाच्या भिंती,
खिल्लारांसाठी वाळक्या गवताचे भारे आणि जागा मिळेल तिथे कुंड्या आणि रस्त्याच्या कडेला जमिनीत बहरलेली फुले.
इथे सगळीकडेच पाण्यासाठी अतिसुंदर सोय होती. मोठ्या झाडाचे खोड आडवे करून
कोरून त्याला tub सारखे बनवलेले, वरून संततधार पाणी, तेही खोडापासूनच
बनवलेल्या नळांत, अर्थात खाली drainage असणार पण एकूण सौन्दर्यदृष्टी बघून
अतिकौतुक वाटले.
फुलझाडांचे वाफेही अशा कोरलेल्या लाकडांत सर्वत्र दिसायचे. फुले तर अशी
बहरलेली की जणू पाहुणे येणार म्हणून खास सजावट करून ठेवल्यासारखी वाटावी
अशी. लहान मुलांसाठी सुंदर बाग ( खरेतर वेगळ्या बागेची गरजच नाही,
प्रत्येक घरच बागेसारखे होते) झोपाळे, सीसॉ , zipline सुद्धा होती. फक्त
मुलेच नव्हती. बागेत आम्ही आमची हौस भागवून घेतली. त्या सुंदर गावात
झोपाळ्यावर झोके घेताना पुन्हा लहान लहान झाले. तिथून आम्हाला बाहेर
काढताना फ्रेडला मोठ्ठे लोक लहानांना ओरडून बाहेर काढतात तसे करावे लागले.
बागेपासून पुन्हा डोंगरातील पायवाट सुरु झाली. मध्ये पाणी - ओढे, थोडे निसरड्या जागाही अनेक ओलांडल्या. आज जेवायची जागा सुंदर होती. सगळीकडे उंच झाडं, त्यांची सावली, बसायला, पाठ टेकायला किंवा अगदी टेबल म्हणून वापरता येतील असे दगड. बहुतेक त्यांची आवडती जागा असावी. इतर group पेक्षा आधी पोहोचल्याने आपल्याला ही मिळाली म्हणून फ्रेड खुशीत होता. नाहीतर नक्कीच त्यांनीच ती पटकावली असती
जेवणानंतरच्या रस्त्यात पुन्हा एक छोटेसे तळे लागले. आनंदच्या पायाची ब्लिस्टरसाठी तपासणी झाली, जैसे थे. मी नेहमीप्रमाणे थंडगार पाण्यात पाय बुडवून बसले. इथे जास्त वेळ दवडायला नको, म्हणून मंडळींनी लवकर बाहेर काढले. पुढची वाट अधिक अरुंद, डावीकडे झिजणारे ढासळणारे कडे, उजवीकडे दरी असा प्रकार. एक दोन वेळा चेन धरून जावे लागले. अजून काही वर्षांत ही वाट शिल्लकच राहणार नाही, इतकी अरुंद झाली आहे आणि अधिकाधिक ढासळत आहे, जरासे वाईट वाटले. सर्व glacier वितळण्याच्या आधी एकदा अंटार्क्टिकाजवळ जायचे आहे वगैरे गप्पा झाल्या.
नंतर एकदा मोठा ओढा ओलांडल्यावर वाट सरळ होती. भरभर चालत होतो. फ्रेड मात्र काही ना काही दाखवत होता, क्चचित वेळ काढत आहे असे वाटले पण ठीकच होते. मध्येच एका ठिकाणी थांबवून झाडांमधला sexual intercourse वगैरे दाखवतो म्हणून त्याने थांबवले. मंडळी एकदम उत्साहाने पुढे सरसावली. आमचे highschool मधले चिरंजीव जरा अधिकच. मग एखाद्या काडीने एका विशिष्ट फुलाच्या मध्यभागी स्पर्श केल्यावर फुलाच्या दांड्यातून पांढरा चीक , स्त्राव बाहेर येत होता याचे demonstration झाले. फ्रेड अगदी उत्साहाने दाखवत होता. डोंगरात तो बराच भटकलेला होताच, शिवाय पूर्वी एका botanist कडेही काम करत होता त्यामुळे त्याला बरीच माहिती असायची. पाचव्या दिवशी vanilla ची फुले , कधी अतिशय विषारी किंवा दात पडणारे झुडूप, रंगासाठी वापरले जाणारे झुडूप वगैरे दाखवत असे. हा भाग बराचसा माझ्या डोक्यावरून गेला.
बरेच चाल चाल चालल्यावर एक लहान धरण आणि एकदाचे La Fouly गाव लागले. अर्थात एक उंच दरड चढल्यावरच गावातला मुख्य रस्ता लागला. डाव्या बाजूला मोठी मोठी हॉटेल्स , अगदी गोल्फ वगैरेही आणि उजव्या हाताला उंच उंच कडे. अर्थात आमच्या ट्रेकच्या बजेटमध्ये ही हॉटेल बसणारी नव्हती हे माहीतच होतं . पारू राहायला जाईल तेव्हा आम्ही तिचे पाहुणे म्हणून जाऊ वगैरे तिला चिडवले. तो रस्ता संपता संपेना. संपला तरी हॉटेलचा पत्ता नव्हता, तेव्हा कळले की डावीकडच्या झाडीतून अजून १०० एक फूट वर चढल्यावरच आम्हाला गती म्हणजे डोकं टेकायला जागा मिळणार आहे. पाय भरपूर बोलू लागले होते पण चढत राहिलो. वाट छान होती पण पोहोचण्याची घाई होती. लॉजच्या दारात सुंदर पाउंड केक आणि lemonade ने स्वागत झाल्याने प्रसन्न वाटले. बाहेर छान आरामखुर्च्या होत्या, वरून गाव आणि दरीचा, आणि डोंगरमाथ्याचा view सुंदर होता.
इथे मी प्रथमच एका छोट्या रिकाम्या जागेत दक्षिण पूर्वेकडे तोंड करून सईदला नमाज पढताना किंवा जी काही प्रार्थना असेल ती करताना पहिले. नुसते डोक्यात नोंदले गेले म्हणून लिहिले इतकेच, बाकी काही अर्थ नाही. बाकी आम्हाला कोणालाच असा काही व्याप नव्हता. अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या रस्त्यात, गावांतसुद्धा कसे काय ते माहित नाही पण एकही चर्च , किमान क्रॉससुद्धा दिसलेला नव्हता.
राहण्याची जागा ( नेहमीप्रमाणे) ३ ऱ्या मजल्यावर, भरपूर वेडेवाकडे जिने
अर्थात १५ किलोचा भर वाहत गेल्यावरच आली. पण एका प्रचंड मोठा लांबच्या लांब
आणि रुंद असा हॉल होता. प्रत्येकाला स्वतंत्र बेड, एका रांगेत किमान ८ बेड
होते. मध्ये भरपूर जागा. तिथे मोठे टेबल. मोठ्या खिडक्या. अगदी झक्कास
होते. बाथरूमसाठी ३ मजले उतरून यावे लागले तरी काही वाटले नाही.
जेवायला स्विस raclette हा एक मस्त प्रकार होता. मांसाहारींसाठी पोर्क
किंवा अन्य मांसाचे तुकडे, शाकाहारींसाठी उकडलेले बटाटे, टोमॅटो, छोट्या
pickled आणि अत्यंत चविष्ट काकड्या, pearl onion प्लेट मध्ये घ्यायचे. समोर
एक griddle आणि मध्य चौकोनी चमचा दिलेला होता. त्या चमच्यांत raclette चीज
टाकून धग दिली की ते वितळते. ते गोल्डन brown चीज भाज्यांवर ओतायचे आणि
स्वाहा !
तो प्रकार भलताच चविष्ट होता. मजा आली. त्यानंतर on the house म्हणून छोटे
liquor shots आले. चीज पचायला कठीण, liquor पचनाला मदत करते असे सांगण्यात
आले. At the end of such a grueling day it can help almost everything !
झोपायला वर आले, माझ्या शेजारी सुझन होती. आम्ही एरवी इथल्या तिथल्या गप्पा मारल्या असल्या तरी पर्सनल फारसे बोललो नव्हतो. तिला insta story साठी जरा मदत हवी होती, ती केली आणि तिने तिची सगळी कहाणीच मला सांगितली. मी ऐकत राहिले. तिची श्रोत्यांची गरज भागवत राहिले. आयुष्यातील सर्व कटकटीला कंटाळून ती म्युनिकमधून निघाली ते एका लग्नासाठी प्रथम एकटीच गाडी चालवत क्रोएशियाला गेली होती, तिथे फिरून मध्ये एक असा ट्रेक करून मग या पुढच्या TMB साठी आली होती. ट्रेक संपल्यावर मात्र शामनी मध्ये पार्क केलेली गाडी घेऊन पुन्हा म्युनिकला, जवळजवळ २ महिने आणि २००० मैलाचा प्रवास करून परतणार होती. अशा मंडळींबद्दल मला नेहमी अपार कौतुक असते. मी ते सढळ कंठाने केले, जरा pep talk दिला आणि काहीतरी चांगले केले या आनंदात झोपी गेले.
क्रमश:आज प्रथमच खोलीच्या खिडकीतून सूर्योदय पाहिला. सकाळी निघता निघता सईद
आणि माझा जरासा प्रेमळ संवाद झाला. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या
दोन्हीला जेवण असाच शब्द आहे, या एका गोष्टीवरून त्याने हिंदी, संस्कृत,
मराठी वगैरे भाषा किती अपुऱ्या वगैरे आहेत अशी टिप्पणी चालू केली. त्याच्या
अरेबिकमध्ये किंवा रशियनमध्ये म्हणे यालसाठी २ वेगळे शब्द आहेत. या एका
गोष्टीवरून भाषा समृद्ध आहे अथवा नाही वगैरे ठरवणे अगदीच बालिश आहे वगैरे
माझे युक्तिवाद सुरु झाले. शेवटी संपूर्ण दिवसासाठी energy लागणार ती इथे
दवडू नये म्हणून त्याला तुझेच अगदी बरोबर आहे आहे वगैरे सांगितले. खुश होऊन
त्याने मला स्वतःची अरेबिकमध्ये उजवीकडून डावीकडे लिहीत असलेली डायरी
दाखवली, त्यातले काहीही कळात नसले तरी गंमत वाटली. मी त्याच्या मताला कबुली
दिल्याने बहुतेक परतफेड म्हणून त्याने इतर जग रानटी अवस्थेत असतेवेळी
असलेली महान भारतीय संस्कृती, silk route, मसाले आणि अन्य गोष्टींचा हजारो,
किमान शेकडो वर्षांचा व्यापार , भारताचे strategic स्थान आणि बळ,
तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला माहित नाही वगैरे आपली लाल केली. या
सगळ्याला हो हो म्हणायला माझे काही गेले नाही. तर ट्रेक म्हणजे नुसता ट्रेक
नसतो, नुसतंच चालणं, फोटो, खाणं वगैरे नसतं. त्यापलीकडेही असं बरंच काही
काही असतं.
आज स्वित्झर्लंडला टाटा करून आम्ही इटलीमध्ये शिरणार होतो. अनिता आणि DS
सिंगल असल्याने इथेच तुम्हाला BF मिळणार आहे वगैरे चेष्टा चालायची, त्या
चांगल्या मैत्रिणी आणि चेष्टा अगदी healthy. पैकी मी फ्रेंच ( नवऱ्याला या
सगळ्यांत फारसे मत नव्हते ) आणि DS ने स्विस पुरुषांसाठी आधीच जागा अडवली
होती. त्यामुळे अनिताने ‘मुझे कोई इटालियन माफिया मिलनेवाला है’ वगैरे
डायलॉग मारले. त्या इटलीमध्ये कोणीतरी हमरे गाव कोई आयेगा वगैरे गाणी गात
असणार.
सुरुवातीची वाट सरळ गावातूनच होती. जिकडे तिकडे कुरणे, गाई, त्यांच्या
घंटा, डोंगराची background, थोडी शेती, लहानमोठी घरे, आणि कधी नव्हे गवत
कापणारे लोक वगैरे दिसत होते. सगळं अगदी picture perfect.
जरा चढ होता पण gradual. जसे वर जाऊ तसे खालचा विस्तीर्ण canvas अधिकाधिक अहाहा म्हणायला लावत होता.
हवासुद्धा जरा गार झाली. एके ठिकाणी एक उंच शिखर मार्कने दाखवले. फ्रांस,
स्वित्झर्लंड आणि इटली या तिघांची बॉर्डर. स्वित्झर्लंडकडे तोंड करून उभे
राहिल्यास डावा पाय फ्रांसमध्ये, उजवा इटलीत ठेऊन स्स्वित्झर्लंडच्या
भूमीवर मूतता येते असा भूभाग, हे त्याने केलेले वर्णन. यावर व्यक्त कसे
व्हावे हे कळेना. ते ठिकाण काही आमच्या वाटेत नव्हते याची चुटपुट लागली,
ज्यांना जमेल त्यांनी जाऊन जरूर प्रयत्न करावा.
तासाभरात एके ठिकाणी लांबच्या लांब आडवी बिल्डिंग , बाजूला गोठा, कॉफी house होते. तिथे जरा वेळ रेंगाळलो. काही गायींच्या पार्श्वभागात काहीतरी लांबच्या लांब injection सारखे घालण्याचे काम चालू होते. हा प्रकार artificial insemination साठी असल्याचे समजले. तिथून GMO, organic वगैरे चर्चा. एक खरे आहे की दूध, दही, चीज , भाज्या, फळे, ब्रेड सगळ्यांनाच अंगभूत छान चव होती, उगीच साखरेचा मारा नाही. ब्रेड चीजपासून बहुतेक सगळेच जवळच्या खेड्यातूनच घेतले जायचे. अमेरिकेत आपण खातो ते अन्नघटक तसेही निकृष्ट हे माहीत असले तरी इथल्या पदार्थांच्या चवीच्या मानाने ते दारिद्र्य खूपच खुपले. अर्थात भारतातही फळे , भाज्या अशाच चांगल्या चवीच्या असतात, मिळू शकतात.
कॉफी हाऊस च्या पुढे वर जाताना, वरून येणाऱ्या बर्फाच्या पाण्यामुळे
तयार झालेली असेल पण लांबच्या लांब भेग होती. आता पाणी नसले तरी बर्फ
वितळल्यावर तिथूनच पाण्याचा मार्ग जात असेल. जरासे वर पोहोचल्यावर पुन्हा
ब्रेक घेतला, इथे मी चक्क pushup वगैरे केले. ५ दिवस रोज १५-१६ किमी चालून
रोज सकाळी पाय तयार असायचे, आणि त्यासाठी खास मेहनत केलेली नव्हतं तरीही
याबद्दल ईश्वर किंवा जे कोणी आहे त्याचे आभार मानले.
डोंगर चढत, ओलांडत पुढे जात राहिलो, पुष्कळ चढच होता पण मी त्यावर अगदी
comfortable असायचे. मध्ये थोडा बर्फही होता पण इतका अवघड नव्हता
ओलांडायला. अखेर १२ च्या सुमारास स्वित्झर्लंड इटली बॉर्डरला डोंगरमाथ्यावर
एखादे summit सर केल्याच्या आनंदात जरा उभे होतो.

नवऱ्याने काहीतरी सांगायला सुरुवात केली तर ‘ओ मराठी मराठी’ असे उत्साहात
जवळजवळ ओरडत धावत येत एक माणूस पुढ्यात उभा राहिला. आतापर्यंतच्या
ट्रेकमध्ये मराठी सोडाच एकही भारतीयही दिसला नव्हता आणि अचानक स्विस इटली
बॉर्डरला चक्क मराठी माणूस भेटला. तो एकटा ,अगदी एकटाच ट्रेक करत होता,
फक्त आमच्या उलट दिशेने. त्यालाही एकही भारतीय भेटला नव्हता, त्यामुळे तो
खूष आणि आम्हीही एकूण त्याची एकटे करण्याची जिद्द बघून भारावलो. त्यातून
अहो आश्चर्य म्हणजे तो पुण्यात नवऱ्याचे घर जिथे आहे तिथे ४ बिल्डिंग
पलीकडे राहणारा निघाला. तो जरा आमच्यापेक्षा वयाने लहान असावा तरी लगेच
त्याचे कॉलेज, मित्र, झालंच तर बायको वगैरे सगळी connection जुळवून
त्यांच्या सासर्यांना आमच्या घरची मंडळी ओळखतात असा निष्कर्ष निघाला. आम्ही
जोरजोरात शुद्ध मराठीत तिथे तुळशीबागेत भेटल्याच्या थाटात गप्पा सुरु
केल्या. ( तुळशीबाग चालणार नसेल तर पुणेकरांनो, तुमच्या आवडीचे ठिकाण
निवडा. मी पुण्याची नाही त्यामुळे चू भू दे घे) . आमच्या group मधल्या
सगळ्या मंडळींसाठी तो एक गमतीचा विषय झाला. अनिता आणि DS ( अमराठी
असल्याने), तुम्हे कही भी मराठी लोग मिल जाते है वगैरे नवऱ्याला चिडवू
लागल्या. त्याची लोणावळा चिक्की आणि आमची श्रीखंड गोळी अशी देवाणघेवाण करून
तोंड गोड करून त्याला टाटा केलं आणि पुढे निघालो.
थोडे खाली येऊनच लंच घेतला. सलाड ब्रेड नेक्टरीन वगैरे नेहमीचं होतंच पण
dessert म्हणून त्याने एक पदार्थ दिला - macaroon सारखे स्वरूप पण फारच
हलकं. जिभेवर ठेवताक्षणी असे काही विरघळले - की क्या बात है ! पुन्हा
पुन्हा मागून खाल्ले.
आता descent होता, त्यामुळे मी पुढे , पण एकूण बऱ्या वेगात चालले होते.
अरुंद असला तरी सुंदर route, जागोजागी फुलं पसरलेला आणि उतरताना खालची
इटालियन बाजूचे उभे कडे, खालचे सुरीने कापल्यासारखे लांब लांब लांब रस्ते ,
कुठे ओढे !
१,२ ठिकाणी लोक शॉर्टकट घेताना दिसले तिथे, त्याचे असे म्हणजे होते की इथे
काही ठिकाणी बर्फाखाली खडक नाहीये, पोकळ आहे. असाच रस्ता ओलांडताना भसकन
पाय खाली जाऊन १-२ माणसे गेल्याच आठवड्यात दरीत कोसळल्याचे त्याने
सांगितले. यावर तोंड बंद, कोण कशाला मरायला इथे येतात असे वैतागून म्हटले
असते, पण जाऊ द्या झालं.
आज चालणे २:३० ला वगैरेच संपणार होते कारण डोंगरपायथ्याला बस पसडून आम्ही आजच्या मुक्कामी courmayeur ला जाणार होतो. दुसऱ्या group चा चुकवत आम्ही भरभर निघालो कारण बसला भरपूर गर्दी असते, दुसरा ग्रुप आधी पोहोचल्यास आम्हाला बसमध्ये शिरायला जागा मिळणार नाही असे फ्रेडने सांगितले. भरभर उतरून बरोबर वेळेत पोहोचलो आणि बसमध्ये शिरलो. आधीच तशी भरलेली होती, आणि मग eventually ती इतकी भरली की ‘म्हैस’ मधे आहे तशी ती माणसे आणि सामानाचे सारण गच्च भरलेली एक प्रचंड गतिमान करंजी झाली. कुणी कुणाच्या पायाशी, कुणी मांडीवर, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा प्रकार झाला. दुसऱ्या group लाही त्यातच कोंबण्यात आले. मी व DS पाठीला पाठ लावून उभे होतो तिथे २ तगडे hikers, भरपूर वाट तुडवून आलेले, दोनाच्या सीटवर बसले होते, तेच चक्क उभे राहिले. एक क्षण आम्हाला वाटले - स्त्रीदाक्षिण्य…. पण कसले काय, बसमधली सीट fold होण्याची सोय असल्याने ती fold करून बसमध्ये इतरांना जरा जागा करावी म्हणून बसलेले होते ते उभे राहिले. मी त्यांना मनोमन नमस्कार केला.
पाऊण एक तास तशा अवस्थेत प्रकाश करून courmayeur ला पोहोचलो.
आतापर्यंतच्या मानाने चांगलं मोठं गाव किंवा शहर होतं. मुन्सिपाल्टी होती
कारण तिची बिल्डिंग आम्हाला नंतर दिसली. आधी ती मुन्सिपाल्टीची बिल्डिंग
होती हेच कळत/ ठरत नव्हते.
नशिबाने हॉटेल स्टॉपला थांबलो तिथे शेजारीच होतं. एका म्हातारीच स्वतःच घर व
त्यालगत २ मजली बिल्डिंग बांधून तिथे राहण्याची सोय असं स्वरूप.
इथल्या bathroom मध्ये toilet आणि शेजारी चक्क वेगळे bidet असा प्रकार
होता. खाली बसण्याची जागा किमान १०० वर्षे आहे तशीच असावी, व्हिक्टोरियन
कोच, खुर्च्या, खोलीच्या मधोमध fireplace, तिथून एक लोखंडी पाईप
भिंतीपर्यंत नेऊन धूर बाहेर सोडण्याची व्यवस्था होती. भिंतीवर टिपिकल
चित्रे, taxidermy केलेली मुंडकी असा थाट होता. अशी खोली बघायला मिळाली
याबद्दल भारीच वाटले.
तिथे एक कॅनेडियन भेटला. त्याने २००० मैलांची संपूर्ण appalachian trail
केलीच होती आणि अजून बऱ्याच. इथेही TMB करून तो फ्रांसच्या coast पर्यंत एक
trail जाते तिथपर्यंत जाणार होता. अशी random माणसे भेटतात, वेगवेगळे
अनुभव कळतात, एकूण संपन्न करणारा प्रकार आहे.
चिरंजीवांचे शूजचे sole पुढच्या बाजूला जरा उचकटलेले दिसत होते ते फिक्स करण्याच्या कामावर निघालो. नवे शूज घेण्याइतकी वाईट स्थिती नव्हती, एका लहान दुकानात शूजसाठी glue बरोबर सापडला. तो लावून शूजवर वजन ठेऊन ते फिक्स केले. मग गावात भटकत राहिलो. फुलांच्या डायल असलेली घड्याळे, टुमदार बिल्डींग्स, जुने चर्च होते. मध्ये ८-१० वर्षांच्या दिसणाऱ्या मुलांचे जथ्थे रस्त्यात गाणी वगैरे म्हणत बागडत जाताना दिसले. सगळं स्वप्नवत. बहुतेक summer camp ची गावातून फेरी मारण्याची activity होती. काही भारी, इटालियन leather च्या वस्तूंची दुकानेही होती. ३०० युरो किमतीची पर्स दिसल्यावर मी पुढे गेले नाही. दगडांनी बांधलेले छोटे छोटे रस्ते, पेरूमधील Cusco या शहराची आठवण झाली. Bus stop च्या शेजारी कसलेतरी मोठे vending machine दिसले, जाऊन बघते तर condom चे vending machine. Courmayeur बद्दल आमच्या ज्ञानात भर. अजून काही नाही. .
मग मोर्चा तिथल्या प्रसिद्ध Gelato च्या दुकानाकडे वळवला. मगाचच्या मुलांचा जथ्था आता इथे आलेला. अप्रतिम gelato होते. रात्री जेवायला चांगले इटालियन रेस्टॉरंट आहे असे कळल्याने उत्सुक होतो. सुरुवातीला वाईन मागवल्या त्या छान होत्या. मग ब्रेड आले चीज आले. नंतर एक अतिशयच al dente ( थोडक्यात अर्धवट शिजलेला) असा पास्ता. तो काही घशाखाली गेला नाही. अजून मेन कोर्स आहे म्हणून सांगण्यात आले म्हणून थांबलो तर शाकाहारींना सुमारे ४ वेगवेगळ्या चीजचे लगदे व त्यावर कोथिंबीर फक्त अशी काहीशी डिश अवतरली. मांसाहारी मंडळींना आपापले meat आणि बाजूला उकडलेले बटाटे, फ्रेंच बीन वगैरे प्रकार होता. आमची तोंडे बघण्यासारखी झाली. ते एकूण जेवण म्हणजे भरपूर चेष्टेचा विषय झाला. मालकाला बोलावले. फ्रेड त्याला समजावू लागला ( इटालियन मध्ये) . त्याने त्याचे तोंड अखंड चालू ठेवत, त्याबरोबर हात, पाय हलवणे, पोट पुढे काढत कमरेवर हात ठेवणे, चष्मा वर खाली करणे, आमची डिश उचलून वास घेणे वगैरे अनंत लीला करून अन्नाने नाही पण हसवून आमचे उदरभरण केले. आमच्याकडे अडचणीला असावीत म्हणून काही madras lentil ( readymade उसळ) पाकिटे होती. ती आम्हाला गरम करून देशील का वगैरे पारू त्याला पटवू लागली. त्यावर कुलकर्णी दाम्पत्याचे एक भांडण होऊन अजून छान मसाला मिळाला. (किरण कुलकर्णी मांसाहारी असल्याने त्यांचे काम झाले होते). शेवटी मांसाहारींच्या ताटातील ४ बटाटे आणि शेंगा खाऊन तो दिवस संपवला. courmayeur ची आठवण म्हणून नवऱ्याने ते चीजचे लगदे नीट पॅक करून घेतले आणि स्वतःच्या पाठीवर वाहून ऑर्लॅंडोत आणून फ्रीजमध्ये विराजमान केले आहेत. Aged Cheese म्हणून पुढेमागे ते विकण्याचा त्याचा मानस असावा अशी माझी समजूत आहे.क्रमश
Courmayeur मधून सकाळी खचाखच भरलेल्या बस मधून प्रवास करून जिथून पुढे
ट्रेक चालू करणार होतो तिथं पोहोचलो. आता तास २ तासात फ्रान्सच्या दिशेने
कूच करणार होतो. बसमध्ये जागा मिळाली, शेजारी एक म्हातारा होता, सॅन दिएगो
मधला पण मूळचा ऑस्ट्रियन. तो असाच कुठे कुठे फिरलेला. एकेकटे फिरणारे असे
बरेच भेटले, त्यांची कमाल वाटते. एकेकटे असते तरी ( किंवा म्हणूनच) कोणीही
भेटला तरी गप्पा मारायला उत्सुक असतात. आपल्यालाही नवीन गोष्टी कळत जातात.
आधी अगदी थोडा चढ आणि मग पुष्कळ वेळ सरळसोट रस्ता होता, एका बाजूला सतत
ओढा. अशी पाण्याची सोबत असलेले routes मला आवडतात. दोन्ही बाजूला थोडे दूर
डोंगर होते. असा लांबच लांब रस्ता चालताना सतत काही बदलत नसतं, मग इतर
विचार घोंघावतात. आज ट्रेकशी शेवटची रात्र. उद्या संपणार. खूप काही पाहिलं.
पण ते निसटून जाईल असं वाटलं. ट्रेकहून भारतवारी करून परत आल्यावर
महिन्याभराने फोटो पाहिले, ते ही वरवरच. हे वर्णन लिहायला घेतलं तेव्हा
आपोआप लहान मोठे रस्ते , वळणे, खुणा कुठेही document केलेल्या नसताना
स्वच्छ आठवल्या, ट्रेकच्या पुनःप्रत्ययाचाच आनंद मिळत आहे. त्या लांब
रस्त्यावर असतानाच हे लिहून ठेवायचं असं ठरवलं हे आठवलं. चालताना हरिप्रसाद
चौरासियांच्या चंद्रकंसच एक सुंदर रेकॉर्डिंग होतं, ते ऐकलं. पुढे
टाकलेल्या १०० दागिन्यांतला एकच आवडून तो बरोबर उचलावा तसं, रोज काय ऐकावं
हे ठरवताना झालं. प्रत्येक जागा तिचं गाणं कोणतं ते सांगत होती. हे ऐकू की
ते असं confusion झालं नाही आणि सुरु केलेलं गाणं विसंगत वाटलं, मग मोर्चा
दुसऱ्याकडे वळला, असं ही झालं नाही. अनिता आणि माझ्यात पहिल्या १-२ दिवसांत
किंचित तणाव आलेला. मग आम्ही एकमेकींना जरा space देत होतो. त्या
रस्त्यावर काय झालं कुणास ठाऊक, आम्ही नकळतपणे एकत्र चालू लागलो पुन्हा
एकदा - आमच्या इथल्या markham woods वर चालतो तशा.
थोडा वेळ नवऱ्याबरोबरही चालले. कधी बोलत किंवा निशब्द. There was something magical about it.
मग डोंगरपायथ्याशी पोहोचलो आणि चढायला सुरुवात झाली. फ्रांसमध्ये चांगली
हवा होती तर स्विस आल्प्समध्ये चक्क प्रखर ऊन आणि उकाडा होता. इटलीच्या
आसपास जरासा पाऊस, ढगाळ अशी हवा. तर आज प्रचंड गारठा असणार आहे असे कळले.
आणि मी शॉर्ट घातली होती. पण अंगात jacket धरून ३ लेअर. मग knee cap
घातल्या. त्यात गुडघ्याला आधार द्यावा यापेक्षा पायाला उब मिळावी हा हेतू
होता. Gloves घातले आणि कान घट्ट बंद केले. चढ असेपर्यंत थंडी वाजली नाही
पण एका पॉईंट नंतर प्रचंड प्रचंड गारठा, भणाणणारा गार वारा, धुकं, summit
च्या जवळ गेल्यावर चिरंजीवांना ४ layer आणि सगळे पॅक असून थंडी भरली,
दातकडी वाजत होती. मग फ्रेडने स्वतःकडचं जॅकेट दिलं. माझ्या मानाने सगळेच
पॅक होते. गारठा असला तरी आपण तो सहन करू शकतो. Summit जवळच आहे, खाली
उतरायला सुरुवात केली की गारठा कमी होईलच असा हिशोब होता. आता पुष्कळ
दक्षिणेला Mont Blanc जिथून सगळ्यांत जवळून बघता येतो अशा पॉईंटला Mont
Blanc च्या पूर्वेकडे होतो. पण धुक्यामुळे काहीही दिसले नाही. तिथे
परिसराचे एक मोठे 3-D model होते त्यावर आपण कसे कसे आणि कुठे गेलो,
राहिलो, सगळं फ्रेडने दाखवलं.
मग पुढे वर चढत राहिलो. २-३ वेळा बर्फ ओलांडला पण तस चांगला घट्ट होता, भीती वाटली नाही किंवा घसरायला पण झाले नाही.
Summit अगदी समोर असताना एका प्रचंड मोठ्या शिळेच्या ओडोश्याला थांबून
जेवायचे ठरवले, त्यातल्या त्यात तिथे एका बाजूने protection असल्याने उब
मिळाली असती. तरी थंडीमुळे उघड्यावर फारसे खाल्ले गेले नाही. चिप्स, बहुतेक
नेक्टरीन आणि जरासे सॅलड असे काही सटरफटर खाल्ले. जेवणानंतर summit ला
गेलो. Alps गारठा, धुकं, वारा असा असेल याची माझ्या डोक्यात जी काही कल्पना
होती ती एकदाची सत्यात उतरली होती त्यामुळे मी बऱ्यापैकी काकडत असूनही
मजेत होते, समाधानी होते.
उत्तार तसा सरळ होता. फार खडक किंवा steep नव्हते. उलट बाजूने summit कडे
येणारे group भेटत होते. आम्ही त्यांना few min, almost there वगैरे सांगून
प्रोत्साहन देत होतो. इटलीच्या बाजूने उतरताना मोठा landscape होता तसाच
इथेसुद्धा दिसत होता. खाली पायथ्याशी एक छोटी मेटॅडोरसारखी गाडी दिवस होती,
ती आपण घ्यायची आहे असे कळले.
उतरलो तिथे चीजची मोठी factory होती पण चीज करताना , काही प्रोसेस वगैरे
बघायला मिळाली नाही. ४०० लिटर दुधापासून ४० किलो चीज बनते. चीज तारीखवार,
प्रकारानुसार साठवण्याची मोठी मोठी अंधारी गोदामे पण होती. शेळ्या मेंढ्या
फिरत होत्या. अचानक मोठ्यामोठ्याने घंटांचा आवाज सुरू झाला. एव्हाना हा
आवाज परिचयाचा होता. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने वरून गाईंचा प्रचंड कळप
जवळजवळ दौडत खाली येत होता. त्यांची कसली तरी वेळ झाली असावी. गायीच्या
आसपास shepherd dogs सुद्धा होते. त्या धष्टपुष्ट गायी अगदी आमच्या वरच
होत्या, मध्ये कुंपण नाही, फक्त लहानसा बांध होता. चुकून त्यातल्या काही
आमच्या दिशेने आल्या तर आमचा काय चेंदामेंदा होईल हा विचार आला नाही, आम्ही
त्यांचे उतारावरून वेगाने खाली उतरणे आ वासून बघत होतो आणि त्यांचा रोजचा
मार्ग त्या चुकणार नाहीत, आमच्या वाटे येणार नाहीत याची खात्री होती.

मॅटेडोर येईपर्यंत गायी बघण्यात वेळ कसा गेला ते कळलं नाही आणि पाय आता
चांगलेच दुखत आहेत हे ही विसरले. मॅटेडोर ने ३-४ किलोमीटरच गेलो असू पण ते
ही मोलाचे वाटले. आमच्या बरोबरचा दुसरा ग्रुप, आधीच खाली आला आणि
मॅटेडोरसाठी थांबून कंटाळून चालत होता, ते रस्त्यात दिसले. सरळ असला तरी
बऱ्यापैकी चढ होता. आम्ही त्यांना वाटेत हात हलवून दाखवत extra credit
आनंदाने देऊन टाकले.
Les Chapieux मधील राहण्याच्या जागी पोहोचलो तेव्हा पाऊस पडत होता. म्हणून
भराभर आत घुसलो. पहिल्याच मजल्यावर बाथरूममधून सरळ जायला सांगण्यात आले.
कुलकर्णी दोघे, आम्ही तिघे, DS, शॅरन आणि जेस इतके आत घुसलो. लहान खोलीत
कसेबसे ४ बंक बेड माववले होते. सुरुवातीला आमचाच गोंधळ इतका होता की शॅरन
आणि जेस खोलीच्या बाहेरच उभ्या होत्या, त्यांना आत येण्यास जागा नव्हती.
शेवटी आम्हाला लाज वाटून त्यांना वाट करून दिली, पण त्या अगदी कूल होत्या.
आमचा रोजचा - मी व चिरंजीव यांचे - exchanging few words - त्यावर चिरंजीव
आणि पारूची हास्यजत्रा , त्या ही त्यात सामील झाल्या. खोलीचा entrance
बाथरूममधून आहे यावर टिप्पणी, इथपासून हसणे चालू होऊन कुठपर्यंत जाईल याला
धरबंध नसायचा. पण खूप मजा यायची.
शेवटची रात्र. उद्याचे कपडे काधून घेतले आणि सामानाचे पोते (अक्षरश: पोते)
एकदाचे बंद करून ठेवले. आता पुन्हा हा कार्यक्रम करायला लागणार नव्हता.
घाम, दमटपणा, थंडी, महाल, पाऊस सगळ्या मोसमासाठीचे कपडे घेतलेले, आता अगदी
चोंदले होते.
जेवायला खाली गेलो तेव्हा कळले, की उरलेल्यांना बिल्डिंगच्या आत खोली
नव्हती तर कुठेतरी बाहेरच्या बाहेर शेड जागा मिळाली होती. याची आधी कल्पना
नव्हती. थंडी आणि पाऊस दोन्ही असणार होते आणि बाथरूमसाठी त्यांना आमच्या
इथे यायला लागले असते. वाईट वाटले. अर्थात आधी सर्व रात्री मी रोजच बंकबेड
वर खबदाडात कशीबशी वर जाऊन झोपत होतेच, आजही फारसे वेगळे नव्हते. या
सगळ्याची तयारी इथे येण्याआधीच केली होती.
जेवायच्या टेबलवर आज अगदी मजा होती. Last Supper / Dinner आणि आम्ही एकूण
नेमके १३ जण. फ्रेड व चिरंजीव चेस खेळत बसले. आम्ही आजूबाजूला असेच एकेकटे
कोणाशी बोलत होतो. २ तरुण मुले आली होती. ती जेवणार होती अन त्यांना
झोपायला जागा अशी नव्हती. मग इथे कुठे tent टाकू वगैरे त्यांचे setting
चालेल होते. एक seattle ची asian origin ची तरुण मुलगी पण अशी एकटीच TMB
आणि आसपास एकटीच महिनाभर फिरत होती. त्या मुलांचे पण असेच होते. अगदीच
Aimless wanderer म्हणावे तर तसेही नाही, त्यांचे वैयक्तिक goal होते.
जेवायला सूप, ब्रेड नेहमीचे यशस्वी आणि अजून जी काही डिश होती ती आपल्या
साध्या मुलाच्या डाळीच्या खिचडीच्या जवळपास जाणारी होती. ट्रेकच्या अखेरीस,
कोणताही प्रवास संपताना खिचडी हा एक आवडता प्रकार आहे हे यां फ्रेंचांना
कसे कळले ? आम्ही मिटक्या मारत खाल्ली. नंतर मातीच्या मडक्यातलं panna
cotta. हा flan किंवा खरवासाच्या जवळ जाणारा प्रकार. नंतर पुन्हा एकदा
house liquor - Genepi चे shots आले, पचनास मदत म्हणून, बाकी काही उद्देश
नाही.
ते हलके आहे हे सांगण्यात आले पण एक घोट घेल्यावर ब्रह्माण्ड आठवले. रम
वोडका वगैरे सोडा, आपल्याकडे पहिल्या धारेची , हातभट्टीची वगैरे जी काही
असते म्हणतात ती अशीच असणार असे वाटले. त्यात हलका बडीशेपेचाही नोट होता,
त्यामुळे ही पचनास चांगली असेल यावर माझा झटकन विश्वास बसला. एवढ्याश्या
शॉटने माझे विमान आकाशात उत्तुंग उडून बंकबेडवर कधी जाऊन पडले ते कळलेच
नाही.
क्रमश:
आज
finale त्यामुळे फ्रेडलाच प्रचंड घाई होती. रोज आम्हाला वारंवार ब्रेक
देणाऱ्या त्याने आज जराही विश्रांती न देता घोड्यावर बसवले. ७:३० ७:४० ला
वगैरेच निघालो. आधी बराचसा चढ आणि त्यात आम्ही निवडलेला रस्ता म्हणजे
अक्षरश: गायींची सकाळची किंवा एकूणच दिवसभरात कधीही करायची आन्हिके
करण्याची जागा होती. कालच्या चीज फॅक्टरीला टेकाडावरून ज्या गायी उतरत
होत्या, त्याच्या मागच्या बाजूला हा रस्ता असावा असे वाटते. दगड माती बर्फ
पाणी गवत फुले सिमेंट डांबर लाकूड लोखंड एवढ्या सगळ्या गोष्टींवरून ७ दिवस
चाललो होतो. आज शेणावरून चालणे झाले, काही राहिले म्हणून नाही. अनायासे
शेणखत मिळत असल्यानेचे असेल पण वाटेने सुंदर सुंदर फुलझाडे झुडुपे अगदी
बहरली होती.
काळ मुक्कामाच्या इथे भेटलेली २ तरुण मुले, बाहेरच कुठेतरी झोपली होती
बिचारी आणि आत मजेत चढत होती. त्यांची दुसऱ्या एका म्हाताऱ्याबरोबर रेस
चालू होती, त्यांच्यातल्या त्यांच्यात. ती सगळी मंडळी आम्हाला पास करून
पुढे गेली. दम लागला तर क्चचित बसत होतो, अगदीच नाही असे नाही पण एकूण
नेहमीपेक्षा जास्त वेगाने पुढे जात होतो हे नक्की. एक बर्फाचा आणि मग
पाण्याचा मोठा patch ओलांडायचा होता, तो झाल्यावर फ्रेडने बाकीचांना ‘सुटा’
म्हणून मुभा दिली आणि वर एक mountain hut आहे तिथे थांबा असे सांगितले.
त्याप्रमाणे आम्ही पुढे पुढे गेलो. आणि वर जाऊन बसलो. पाठोपाठ पारू-
कुलकर्णीपण आलेच. मग पुढे निघालो. अजून दोन तीनशे फुटांवरच आजचे summit
होते. Trip मधले शेवटचे summit, इथून आता पुढे फक्त खाली उतरणार म्हणून
तिथे बऱ्यापैकी फोटोसेशन झाले.
उतार सुरु झाला आणि आपण कोलोरॅडोत तर नाही अशी भावना झाली. अशक्य दगड, शिळा
होत्या. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा म्हणत म्हणत फ्रॅन्कच्या
पावलांवर पाऊल ठेऊन पुढे सरकत होते. आजही ती वाट डोळ्यांसमोर आली तर काटा
येतो. Descent पण तसाच जबरदस्त होता. आम्ही किमान उतरत तरी होतो. आम्हाला
उलट येणारे लोक त्यावरून चालत येत होते , त्यांची मला जास्त दया आली.
विशेषतः असे उतरताना एक एक पाऊल , एकेक क्षण alert रहवे लागते. या
उतारावरऊन दरीत कोसळण्याची भीती नसली तरी किंचित पाय वाकडा-विचित्र पडला,
मुडपला, मुरगळला तर काय होईल हा भीतीचा गोळा होता. ७ दिवस फिरताना मध्ये
३-४ वेळा तरी हेलिकॉप्टर दिसलेले. डोंगरात हेलिकॉप्टर दिसणे ही फारशी
चांगली खूण नाही इति फ्रेड. तेव्हा आपल्याच दोन्ही पायांवर धडपणे खालपर्यंत
उतरायचे आहे इतकेच डोक्यात ठेवले. मात्र या वेळेसाठी साजेसे माझ्याकडे
रेकॉर्डेड गाणे नव्हतेच. उतरताना पडोसन मध्ये ‘एक चतुर नार’ च्या
कडव्यांमध्ये आणि शेवटीपण किशोर जे काही गातो ते आणि तेच डोक्यात येत होते
आणि त्याची गंमतही वाटत होती. शेवटच्या आरडाओरडीत सुनील दत्त खाली कोसळत,
पडत असतो तसेच आपण फरपटत किशोरकुमारने म्हणजे फ्रेड ने सेट केलेल्या फास्ट
लयीत उतरत आहोत असे वाटायला लागले. एकदाचे खाली पोहोचलो कीच डोक्यातले ते
गाणे आणि गाण्यातला शेवटचा कल्लोळ एकदाचा संपेल असे वाटले.
उतारावर फोटो काढता येतील अशी परिथिती नव्हती, हा फोटो डेंजर उतार संपला तेव्हा
तेवढ्यात फ्रेड अचानक म्हणाला “STOP” आणि त्याने सर्वांना एकदम चिडीचूप
केले. बघतो तर ५० एक फुटांवर ibex बसले होते, त्यांचे चारणे, मुक्त विहार
चालू होता, आमची दखलही न घेता. आम्हीही थोडे त्यांना न्याहाळून आमच्या
वाटेल लागलो.
अगदी १ पर्यंत वाट अशीच तुडवत राहिलो आणि शेवटी थांबून जेवायचे ठरवले. आज
कुसकुसचे ( वरीसारखे धान्य) सॅलड होते. बीट, टोमॅटो , मक्याचे दाणे, कधी
कोणती धान्ये, क्चचित टोफू, ऑलिव्ह, green leafy काहीही आणि त्यावर काही
dressing अशी सॅलड फ्रेड उत्तम बनवत असे. गाईडच्या ट्रैनिंगमध्ये याचेही
ट्रैनिंग होते. ब्राउनीसुद्धा अतिगोड नाही, अति moist किंवा कोरडी पण नाही,
थोडक्यात perfect bliss point होता. इथे पोहोचेपर्यंत विशेषतः: डाव्या
गुढग्याने गुढगे टेकायला सुरुवात केली होती पण मी रेटून नेट होते, आता
शेवटच्या २-३ तासांचा प्रश्न होता. जरा stretch केले, biofreeze चोपडले,
तेवढ्यावर उरलेला प्रवास झाला असता. नंतरची वाट जरा सरळ होती. एका वळणावर,
तिथल्या एका माणसाने जरा बाजूने चालायला सांगितले. प्रकार काय म्हणून बघत
आम्ही २ मिनिटे त्याच्याजवळच थांबलो तर TMB रेस करणारे काही लोक पाठून
जोरजोरात पळत येत होते. त्यात एक बाईपण होती. आम्हाला त्यांना cheer करायला
म्हणून ओरडण्याचे त्राणही फारसे नव्हते पण तरी ओरडलो. आमची अवस्था बघून
तेच आम्हाला cheer करून गेले.
पुढे उतरत राहिलो, आता फार अवघड नसले तरी शरीराने थकायला झाले होते, कदाचित
आता तास दोन तासात ट्रेक संपणार म्हणून तसे वाटत असेल. शेवटच्या तासात आता
अजून अर्धा तास, अजून १०० मीटर वगैरे मधाचे बोट तो लावत होता. १०० मीटर
horizontal की vertical असे मी विचारले, पण दुर्दैवाने त्याच्या डोक्यावरून
गेले. जमिनीवरचे अंतर धरायचेच नाही, किती वर किंवा किती खाली हीच मोजपट्टी
होती. ३०० मीटर म्हणजे ३०० मीटर किंवा कदाचित अधिक down असाच त्याचा अर्थ.
मध्ये एक सुंदर धबधबा लागला, तिथपर्यंत पोहोचता येणार नव्हते. तसे अनेक
धबधबे वाटेत बघितले, त्यामानाने या शेवटच्याला त्याचे dues नीट दिले नाहीत
असे वाटते, कारण त खरोखर सुंदर होता.
एकदाचे Notre Dame La Gorge चर्च आले. एरवी कोणत्याही दिवशी मध्ये असे
चर्च लागले असते तर आम्ही आत डोकावलो असतो आज मात्र , नुसते बाहेरून बघत,
हं ठीक आहे असा शेरा देऊन पुढे निघालो. हे ते प्रसिद्ध Notre Dame नव्हे
असेच खूप जुने १४-१५ च्या शतकातले आहे. तसेच चर्च जिनिव्हामध्ये नंतर
पहिले. या चर्चचे महत्व म्हणजे इथे रास्ता संपून दोनदार चालू होतो ( किंवा
उलट). इथे प्रदक्षिणा पूर्ण झाली.

तिथून हॉटेलपर्यंत मोठ्या गाडीनेच जाणार होतो. गाडीवाल्याने आमच्या माथी ४
पावले कमी चालण्याचे पाप नको म्हणून लांब रस्त्यावर parking मध्ये सगळ्यात
लांब spot शोधून गाडी पार्क केलेली. साडेतीनच्या सुमारास तिथपर्यंत
पोहोचलो. आता ज्याला त्याला आपापले मार्ग दिसत होते.
सर्वांनाच आणि विशेष करून फ्रेडला निरोप देताना वाईट वाटले. आमचे १५ किलोचे सामान रोज ज्या बॅगमधून जायचे त्याला टॅग दिले होते त्यावर मेंढीचे चित्र होते. पहिल्याच दिवशी यावरून त्याने I am shephard and you are sheep असा विनोद केला होता. पण खरोखर shephard पाळेल, हाकेल तसेच तो आम्हाला हाकत होता हे खरे. त्याने दिलेला एकूण support, त्याचे माहिती सांगणे, सर्वांना सामावून घेणे कौतुकास्पद होते. या माणसाची शारीरिक capacity ( म्हणजे तशी सगळ्याच guide ची) अफलातून,दुसऱ्याच दिवशी तो डोलोमाईट्स ट्रेकला असाच ग्रुप घेऊन जाणार होता. कायम डोंगरभागांत राहिलेला. घरी जाणीवपूर्वक टीव्हीसुद्धा घेतलेला नाही. चालताना, संध्याकाळी भरपूर गप्पा मारायचा. फ्रेंच लोक ग्रुप मध्ये नाहीत यामुळे खुश होता. या फ्रेंच माणसाला, अन्य फ्रेंच माणसे खडूस असतात, लाऊड असतात वगैरे वगैरे म्हणून नको होती. हे एकूण relate झाले. पुन्हा युरोपात गाईड घेऊन ट्रेकला गेले तर फ्रेडलाच विचारेन हे निश्चित.
गाडीवाल्याने आमची मुटकुळी हॉटेलच्या दारात आणून टाकली. पोटी घेऊन २-३ मजले चढण्याची सवय जाऊ नये म्हणून या वेळी हॉटेलवाल्याने २ऱ्या मजल्यावरच खोल्या दिल्या. पोती बॅगा सगळेच वाहून वर नेले. ७ दिवस चाललेला ट्रेक संपला. तो कधीपासून करण्याचे डोक्यात होते ते साध्य झाल्याने भरून पावले. अशा एका break ची नितांत गरज पुरवली गेली. आहे त्या शारीरिक, मानसिक क्षमतेची कसोटी झाली. comfort झोन च्या बाहेर पडणे - अधून मधून का होईना गरजेचे असते, ते ही झाले. इतपत फिटनेस होताच की ट्रेक केला पण recover अगदी लगेच झाले पण अजून stamina वाढवण्यासाठी बळ मिळाले, उमेद मिळाली. स्वतःशी संवाद झाला. आल्प्सला त्याच्या भव्यतेच्या तोडीचे संगीत ऐकवले, त्या वातावरणासह ते माझ्याही कानांत भरून घेतले. अगदीच कधी low वाटले तर या ७-८ दिवसांची डबी उघडेन, एकेक रस्ता, वळण, ओढे,वाटेवरच्या अनेक क्षणांचे अवलोकन करेन. आहे त्या गोष्टीतून बाहेर येण्याएवढे बळ मिळेल ही खात्री वाटावी इतकं संचित निश्चित गाठीला लागलं. शिवाय TMB चा ही शिक्का बसल्याने आमचा भाव मित्रमंडळीत एकूणात थोडा वधारलेला आहे. आल्प्समधली मैयादेवी मला पावली असे म्हणायला हरकत नाही.
Tour Du Mont Blanc सुफळ संपूर्ण !
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.