Sunday, September 27, 2020

हिमशिखरांच्या सानिध्यात - केदारताल ट्रेक भाग: 2

 


भाग १ इथे वाचा 
स्वप्‍नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी
एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी.
------- सुधीर मोघे--------
       आज पासून नवीन अध्यायाला सुरवात होणार होती.  गंगोत्री ते भोजखरक अशी ३ हजार फुटांची चढाई करायची होती. गंगोत्री ह्या पवित्र ठिकाणापासून ट्रेकचा शुभारंभ होणार होता. नको असलेले सामान वेगळं केलं. पॅक लंच घेतला. वाघोबा आणि मी दोघानींच पोर्टर घेतला नव्हता. वाघोबा तसा अंगामसाने काटक शरीरयष्टीचा, आणि मी खात्या पित्या घरचा, ह्या अगोदरच्या सर्वच ट्रेकला मी पोर्टर घेतला होता. पण ह्यावेळेस कुठून आत्मविश्वास आलेला कुणास ठाऊक. नाही झेपले तर फिजीती चिक्कार होणार होती.
       सकाळचे ८ वाजून गेले असतील. गणपती बाप्पाचा जयजयकार करून गंगा मैय्याला वंदन केले आणि केदारगंगेचा पूल ओलांडला. लाकडी घरांच्या मागून चढाईस भिडलो. तेव्हा माहिती नव्हते हीच चढाई अखेर पर्यंत पिच्छा पुरवेल.  झिकझॅक स्टाईल आरामात चढलो. सुरवातीचा जोश असतोच.
एकसलग चढाईने पुढे तासाभरातच होश उडाला. उभ्या चढाईने जास्तीत जास्त उंची कव्हर होत असली तरी धाप पण तितकीच लागत होती. ह्या आधी हिमालयीन ट्रेकचा अनुभव असलेले भिडू मागे पुढे रेंगाळत होते. गणी पहिल्यांदाच ट्रेक ला आला असला तरी त्याच्या फिटनेस तगडा होता. तो आघाडीच्या फळीत होता. देवदार वृक्ष डोंगर उतारावर दाटीवाटी करून आभाळाशी स्पर्धा करत होते. आता थोडी आडवी चाल सुरु झाली. डाव्या हाताचे केदार गंगेचे खळाळणारे पात्र मोहमयी संगीत निर्माण करीत होतं. त्या तालात कदम कदम बढाये जा चालू होतं.  त्या पात्रात बेसावध क्षणी हत्तीदेखील वाहून नेण्याची त्याची असामान्य क्षमता होती.  दीड तासांच्या चढाई नंतर  भोज वृक्षाची झाडे लागली. ह्या झाडाची साल कागदासारखी असते. साल टिकाऊ असल्याने अनेक प्राचीन ग्रंथ ह्या पानावर लिहलेले आहेत.  व्यासांनी सांगितलेले महाभारत गणेशाने लिहले ते ह्याच पत्रकावर असे सांगितले जाते. थंडीपासून  बचावासाठी स्थानिक लोक चप्पल आणि बुटांमध्ये ह्या पानांचा वापर करतात. ह्या झाडावरील रंगीन फुले देखणी होती.
        डोंगर धारेवरून हळूहळू चढाई कस अजमावीत होती. मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घेत तालबद्ध चढाई चालू होती. सकाळी चढाई चालू करून जवळ जवळ ४ तास होत आले होते. सुरज - सौरभ - दीपक - रघु यांची डोंगरातली चाल, त्यांचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं, सलगी पाहून आमचा जोष वाढतच होता. 
         आता बहुप्रतीक्षेतील स्पायडर वॉल आली. युट्यूब पाहून ती चढून जाण्याची मानसिक तयारी केली होती. पण आता समोर दिसणारी स्थिती वेगळी होती.  कारण बर्फाने ती पूर्ण झाकून गेली होती. तिथं आता दुसरा मार्ग तयार झालेला. हा फारच भयंकर होता. एका बाजूला मोठी कातळ वॉल आडवी आलेली तिच्या खालून वाकून जायचे होते पण डाव्या हाताला बर्फाची वॉल होती. ही वॉलमध्ये पुढे मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे  थेट दरी. एक चुकी आधी त्या बर्फाच्या लादीवर  लोळवणार आणि मग मोठ्या खड्ड्यात आपटणार ते हि बर्फावरच. मग आतून बोगद्याने थेट दरीत. भयंकर होतं. दोन तीन जण त्या खडकाखालून सहज निसटून गेले. तेव्हा धीर आला.  तरीसुद्धा जमेल तितके वाकून जाताना पाठीवरची बॅग सांभाळून पुढे सरकलो. सौरी ने हात दिल्यावर वर आलो तेव्हा जीवात जीव आला.
        मध्ये मध्ये अनके बर्फाच्या वॉल जीव मुठीत धरून क्रॉस केल्या. वॉल वर सरकलो तर थेट दरीत घसरगुंडी ही पहिली भीती आणि दुसरी भीती अशी कि हि बर्फाची वॉल कातळावर तयार झालेली असते आणि कातळ आणि बर्फ ह्यात थोडा गॅप असतो त्या गॅप मधून पाणी वाहत असतं.  एकंदरीत ती वॉल मजबूत नसतेच. वजनशीर माणसे जाताना सरकली तर   . . . . . . . .
        अजून थोडी चढाई केली आणि कॅम्प साईट दिसली. प्रचंड खुश झालो. पण क्षणार्धात साऱ्या आनंदावर विरजण पडले जेव्हा कोणीतरी म्हणाले अरे  लोअर भोज खरक आहे आपला कॅम्प अजून वर अप्पर भोज खरक ला आहे.
हायला तिथंच त्याला बडवून काढावेसे वाटले.
          पण अंगात त्राण कुठं होता. दुपारच्या जेवणाचे डब्बे उघडले.  हिमालयात भूक लागत नाही, पण आपण हाणायचं.
          डब्बा संपवून थोड्याश्या विश्रांतीने पुन्हा चढाईस सुरवात केली. जे ह्या कॅम्पवर राहणार होते त्यांना लकी समजून आम्ही उभ्या चढाईस भिडलो. झिगझॅग स्टाईल चढाई  भराभर उंची कव्हर करत होती. भाल्या ह्या नादात बराच मागे पडला. पजु ला पण ह्या पट्ट्यात त्रास जाणवू लागला. बाकी टीम फिट होती. अखेर आम्ही अप्पर भोज खरक ह्या आमच्या ठरलेल्या कॅम्प ठिकाणी पोहचलो. काय आनंद.  आज बरीच चढाई केली होती.  काही रिस्की पॅच कव्हर केले होते.  एका  दगडावर बसून महाकाय पर्वत डोळयांत साठवू लागलो. मध्ये मध्ये काळ्या कपारीत बर्फाचे अडकलेले गोळे लक्षवेधी. समोरच्या डोंगरातून वारंवार रॉक फॉल होत होता. त्याचा घणांणनारा आवाज धडकी भरवणारा. तंबू लावले जाऊ लागले. प्रत्येक जण आपली सोयीची जागा निवडू लागला. सूर्यराव क्षितिजापलीकडे जाऊन बराच वेळ झालेला तरी पूर्ण अंधार पडला नव्हता. घड्याळात ४ वाजले असतील. 



  
 थोडी थोडी थंडी जाणवत होती म्हणून जाड जॅकेट चढवले. गणी आणि पजू ढासळले होते. भाल्या मागे पडला असला तरी त्याला कुठला त्रास जाणवत नव्हता. जवळ जवळ एक दीड तासानंतर तो कॅम्प साईटवर पोहचला. त्याच्या सोबत सपोर्ट टीम मधील सुरज थांबलेला. उंचीवर आल्या आल्या झोपायचे नसते म्हणून चुळबुळ चालू होती.
       राजूकाका, मी आणि पजू तंबू पार्टनर होतो. पजू लगेच स्लीपिंग बॅग मध्ये घुसला.
७ च्या आसपास जेवणाची लगबग सुरु झाली. नेमकी आज भेंडीची भाजी होती. 
आपली जानी दुश्मन.
पण उंचीवर खाल्ले पाहिजे म्हणून मनावर दगड ठेवून खाल्ली. आयुष्यात पहिल्यांदाच ! 
     पोटभर जेवलो. स्वीट मध्ये खीर केली होती. ती वरपली. आज ट्रेकच्या पहिल्या दिवशी काय काय उचापत्या केल्या ह्याची उजळणी करून स्लीपिंग बॅग मध्ये गुडूप झालो.
      तंबू बाहेर केपी ची कुजबुज ऐकल्याशिवाय जाग येत नाही. अरे उठा रे ... उठा ! बाहेर कसली सोनेरी किरणे आलेत. लवकर या. देवा ..... > >>>>>>>
      बाहेर ये असा जप सुरु झाला. पुढे रोज हाच अलार्म ऐकायला लागणार होता. आधी च्या सर्वच हिमालय ट्रेक ला ह्याची सवय झाल्याने पुन्हा अर्धा तास झोपून मग तंबू बाहेर आलो. बाहेर नजारा अफलातूनच होता. सूर्याच्या सोनेरी किरणांनी माउंट थलाईसागर आणि माउंट भ्रिगुपंथ ह्या शिखरांनी सोनेरी मुकुट घातलेला. 
आजूबाजूची अनेक अनामिक सुळखे उजळून निघालेले. अशी दृश्य शब्दात मांडता येत नाहीच.


        नाश्त्याची तयारी झाली होती. आलू पराठा आणि फुलके + बटाटयाची भाजी असा आजचा मेनू होता. दणकट न्याहारी केली. काल ढेपाळलेले वीर आज फ्रेश होते. वॉर्मअप चा एक मजेशीर गेम सौरभ ने घेतला. मजा आली. उत्साह वाढला. आज साडेचार किलोमीटर चे अंतर कापायचे होते. १२७७२ पासून १४२३८ फुटापर्यंत चढाई करायची होती. कालच्या तुलनेत आज चढाई कमी असली तरी आज वाटेत जास्त धोके होते. केदार गंगा पार करायची होती. त्याच भागात लँड स्लाईडची मोठी भीती होती. आता आलोच आहोत तर करा चालू .....
अर्ध्या तासात रिदम आला.
          आता आम्हाला आमची बाजू सोडून केदार गंगेचे पात्र पार करून पलीकडच्या बाजूने चढाई करायची होती. आमचा कॅम्प सर्वात अप्पर भोज खरक ला लागल्याने सकाळी पहिली सुरवात आमच्याच ग्रुप ने केली होती. डाव्या घसरणाऱ्या वाटेने आधी सौरभ पुढे गेला.  आवाज देऊन एकेकाला बोलावू लागला. वरून दगड धोंडे घसरून येत होते, येताना सोबत अजून चार पाच आणत होते. हे जेव्हा थांबलेले असतील तेवढ्याच वेळात  भरभर तो रस्ता कापायचा आणि नदी पार करायची. शिवाय वाट सोपी नव्हतीच, तीव्र उताराची आणि भुसभुशीत मातीची.  डाव्या बाजूला खोल दरी नदीला टेकलेली. चुकून त्या घसाऱ्या मातीवरून सटकलो तर थेट नदीत. आता वरून येणारे दगड बघायचे कि खाली पायाखाली घसरणारी माती अश्या द्विधा मनस्थिती सापडलो.
          एक इंचाचा दगड कपाळ मोक्ष साठी पुरेसा होता. हे फारच भयावह होते. पण हे दिव्य पार करायचेच होते. कालच्या आईस वॉल परवडल्या असे वाटू लागले. एक एक जण हे शिवधनुष्य पेलू लागले. माझा नंबर आला तेव्हा खरा थरार अनुभवला. जीव अक्षरशा मुठीत घेऊन तो भुसभुशीत पॅच आणि नदी पार केली. माझ्या मागे असणारा आशय आला तेव्हा त्याच्या पुढ्यात ४ -५ किलोचा दगड येऊन पडला तेव्हा थरकापच उडाला.
         सर्वानी सुरक्षित हा पॅच पार केला भगवान शंकर पावला. केदार गंगेच्या पात्रातून डाव्या बाजूने चढाई करून पुन्हा मोर्चा उजवीकडच्या डोंगर धारेवर चढला. आता एकसलग बर्फावरून चढाई चालू झाली. शुभ्र पांढरा बर्फ आम्ही नांगरु लागलो. दमल्यावर मध्ये मध्ये विश्रांती घेतच चढाई करत होतो. मध्ये एका कड्यात ब्लु शीप ने दर्शन दिले. हिमालयीन प्राणी जो शेळी सारखा  दिसतो. राखाडी रंग असतो कधी कधी थोडीशी निळसर रंगछटा असते. मेल ब्ल्यू शिप ची शिंगे पिळदार मिश्यासारखी असतात आणि फिमेल ची शिंगे सरळ असतात. ही शिंगे फारच मजबूत आणि जड असतात. ७-८ ब्ल्यू शिप उभ्या कड्यावर लीलया ये जा करत होत्या. त्या कड्यात त्यांचं काय हरवलं होतं कुणास ठाऊक. दगडावर ठेवलेल्या शिंगांनी वेगवेगळ्या पोझ देऊन फोटोग्राफीची हौस भागवून घेतली.



        पुन्हा दोन तीन आईस वॉल लागल्या. आता ह्या वॉल ची लांबी थोडी मोठी होत होती. एका वॉलवर मी, माझ्या मागे राजू काका आणि त्यांच्या मागे सौरभ चालत होता. एका अवघड स्टेपला काकांचा पाय घसरला आणि डोळ्याची पापणी लावायचा आत काका १० एक फूट वॉल वरून घसरले. हे पाहताच क्षणार्धात सौरभ ने मागून झेप घेऊन त्यांना बर्फात दाबून त्यांना होल्ड केले. क्षणभर गोंधळेच. कसे बसे वाटेवर धडपडत वर आले आणि ५ मिनिटे थांबून विश्रांती घेतली.
काका कसे पडलात ?
काही आठवत नाय रे ..... काका.
        तासाभराच्या चढाईने कॅम्प साईट गाठली. इथं आधीच बरेच तंबू लागलेले. ऐसपैस सपाटीवर टेन्ट लागले होते.  आमचे टेन्ट लागेपर्यंत सगळ्यांनी उन्हात लोळून घेतले.  पण हिमालयातील हवामानावर भरोसा नसतो.  हळू हळू हिमवर्षावाला सुरवात झाली. आनंदी आनंद गडे. आयुष्यातील पहिल्यांदाच हा सोहळा अनुभवत असल्याने सर्वांनी भरपूर आनंद लुटला.
      काकांनी आज आपण वाचल्यामुळे कांदा भजी बनवली आणि सर्वांना आनंदाने खाऊ घातली. भरपूर जेवलो. इकडे सौरभ ला राशन संपेल अशी भीती वाटू लागलेली.
      तंबुवर भुरभुरत्या बर्फाने छान सजावट केली होती. तंबु वरील बर्फ पाडायच्या नादात मी बर्फावरून दाणकन घसरून पडलो. ढुंगणाचा चक्काचूर झाला.  हे सर्व पज्याने कॅमेरात शूट केले. कल्याण !!!!
आज सर्वच टीम फिट होती. का करतो आपण हे सारं ह्याच कोडं इथं आल्यावरच सुटतं. अद्भूत निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा, निसर्गाला अधिकाधिक जवळून अनुभवण्याचा, त्याला आपल्या कवेत घेऊन गुजगोष्टी करण्याचा हा एक सर्वात शिस्तबध्द आणि सोपा मार्ग आहे.
बाजूच्या कॅम्प मध्ये  नाशिक मधून आलेले बापूसाहेब पगारे, पंडित धोंडगे आणि इतर नाशिककर मंडळी भेटली. हिमालयात सह्याद्रीकर भेटणे म्हणजे केवढा मोठा सुवर्णयोग. गळाभेटी झाल्या. जुन्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी आजच केदारताल समिट केलेला. किरकोळ आहे असे सांगून आमची भीती पळवली. बापूसाहेब म्हणजे कलंदर व्यक्तिमत्व. ह्यांच्या प्युअर जोक वर पोटभरून हसलो होतो. मा. पंडित धोंडगे ह्यांच्या जादुई हाताच्या चवीचे जेवण दोन ट्रेकला चाखले होते.
तंबू मध्ये उनो चा गेम रंगवला. कॅम्प साईटवर दुपारी १ लाच आल्याने बराच वेळ काढायचा होता. मैफिल चांगली जमली. हिमवर्षावाने सूर्यास्त अनुभवण्याची संधी हुकली.  सूप - चहा ह्यांच्या डोस घेत घेत संध्याकाळ झाली. जेवण उरकून उद्याच्या महत्वाच्या दिवसासाठी मनाची तयारी करू लागलो.
   समिट च्या दिवशी कायम घाई असते पण आज तसे नव्हते . सगळे निवांत उठले होते. रात्रभर थंडीने बेजार झालो होतो. हिमवर्षाव सकाळच्या पारी कधी तरी थांबला होता.  आज सूर्यनारायण उगवले होते.  समिट च्या आशा पल्लवित झाल्या. नाश्ता करून चढाईस भिडलो. 14,238 ft पासून  15,485 ft पर्यंत साडे पाच किमी चढाई करायची होती.  आज पाठीवर ओझे नव्हते हे मोठे सुख होते. पाण्याची बॉटल, चटर फटर खायचे , कॅमेरा आणि स्टिक अश्या निवडक सामानाने चढाई चालू केली. मंडळी भरभर पुढे जाऊ लागली. आज बर्फच बर्फ होता.. काल झालेल्या हिमवर्षावाने सगळीकडे फ्रेश बर्फ ओतलेला. तो तुडवत पावले पडू लागली. ह्या नादात मी मागे पडलो. थोडे थकल्यासारखे जाणवू लागले. ह्यात केपी ला हवा असलेला फोटो मिळाला. (कुठला तो ट्रेक ला भेटल्यावर सांगेन) सौरभ हिंमत वाढवत होता. आघाडीच्या फळीतील आशय - वाघ्या मागून येणाऱ्यांची मजा बघत होते. काका आज समिट ला नव्हते आले. त्यांना केदार खरक पर्यंत आलेल्याचे समाधान होते. असं दिलखुलास आयुष्य जगत समाधानी राहता आलं पाहिजे.



       एक चढ तर दगड आणि बर्फ ह्यांच्या मिश्रणातला होता. इथं सर्वच जणांनी वेळ घेतला. पुढे छोटे छोटे चढ पार करत आणि बोल्डर्स लागले. हे बोल्डर्स तुम्हाला चकवू शकतात. कारण सगळीकडे सेमच सेम भूलभुलैया. मिनी केदारताल ला वळसा घेऊन पुन्हा चाल धरली. हिंमतीची परीक्षा सुरु झाली होती. पुढील तासाभरात अनेक लहान थोर चढ संपून क्षितीजावर काही हवंहवंसं दिसू लागलं. माउंट थलाईसागर आणि माउंट भ्रिगुपंथ अगदी हात लावावे इतके जवळ भासू लागले. थकलेल्या गात्रांनीही वेग घेतला. इप्सीत जवळ येवू लागलं. कालपासून रूसलेल्या हवामानानेही सकाळच्या सत्रात चांगली साथ दिली होती. आजूबाजूची धुक्यात डोकं खुपसून बसलेली शिखरं आमच्या हालचालींकडे निरखून पहात होती.
              एका बर्फाच्या पॅच मध्ये कंबरेभर आत गेलो. वजन इफेक्ट!
मला काढायला आलेला सौरभ तो हि रुतला.  त्याच्या मागून आलेला सुरज तो हि ...
अरे काय चाललंय !!!
त्यात पजूचा कॅमेरा आमच्यावर धरलेला. नुसती फजितीवर फजिती.
काय सांगू नका.
व्हिडीओ जास्त विनोदी बनू नये म्हणून कसा बसा बाहेर आलो आणि हुश्श एकदाचे.
           केदार तालच्या माथ्यावर पोहचलो. खाली केदारताल पाहून क्षणभर आपण जे करण्यासाठी हट्टाहास केला ते आपल्या नजरेसमोर होतं. केदारतालचे  अस्सल आरस्पानी, सौंदर्य पाहताच सर्वजण सुखावून गेलो. ह्या निव्वळ सुखाची मोजदाद करता येणार नाही.
         केदारताल च्या काठावर जाण्यासाठी उतार उतरलो. काठावर आलो. संपूर्ण तलाव बर्फ झाला होता. पण इथले दृश्य लावजवाब होते. असं म्हणतात की या सरोवराच्या किनारी देव-देवतांचा वावर असतो. स्वच्छता, शांतता, असमंतात भरून राहिलेला एक अवर्णनिय आनंद यांमुळे त्या निखालस जलसौंदर्यात सुखनिधान निसर्गदेवतेचा वावर नक्की असावा असे वाटून गेले. थंडी प्रचंड लागत होती. महागड्या जॅकेटमध्ये थंडी सहज घुसत होती. लहरी वातावरणावर विसंबून चालणार नव्हते. फटाफट कॅमेरे चमकू लागले.
जल्लोष - आनंदी आनंद !!!!!



        हीच वेळ होती. आमच्या सर्व साहसी चमुने कौशल्याचे प्रदर्शन घडविले होते. मागील अनेक हिमालयीन मोहिमांना कमावलेले अनुभव आजमावून इथवर पोहचलो होतो. साहसाची पूर्तता करू दिल्याबद्दल केदारतालला मनातून साष्टांग दंडवतच घातला.
         केदारतालला विधीवत श्रीफळ अर्पण केले गेले.  सौरभने काही पुजाविधी केल्या. इतक्या बिघडलेल्या परिस्थितीतही शिखरचढाई सुखरुप आणि यशस्वी झाल्याबद्धल त्याने सुगंधी धुप जाळून त्या शांत, निरव वातावरणात आमचे आध्यात्माशी डायरेक्ट कनेक्शन जोडून दिले. देशाच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रध्वज तिरंगा. शिवरायांचा भगवा. सन्मानाने फडकवण्यात आला.
एक उनाड क्लिक झाला आणि केदार तालचा निरोप घेतला. उतरताना घाई होती कारण हिमवर्षाव कधीही चालू होऊ शकत होता. तसे वातावरणात बदल पण दिसू लागलेले. भरभर उतराई मध्ये पण दम लागत होता. कमी वजनाची मंडळी बर्फावरून घसरगुंडी करत जात होती. पण . . . .  
        आपण करायला गेलो कि बर्फात रुतून बसायचो. आपलं वजन काय आणि आपण करतो काय ....
         कॅम्प गाठायच्या आधी हिमवर्षावाने गाठलेच. आज त्याचा स्पीड आणि क्षमता जास्त होती. आल्या आल्या तंबू मध्ये घुसून नको तिथे घुसलेला बर्फ आधी बाहेर काढला.
मन खूप हलकं हलकं वाटत होतं. ज्या गोष्टीसाठी इतकी तयारी केली होती ती साध्य झाली होती. पुन्हा मैफिल जमली. समिटला केपी आणि आशयचा  भाल्या ने एक अजरामर फोटो काढला. त्याची फ्रेम बनवून केपी लवकरच घरी लावणार आहे.
हिमवर्षाव प्रचंड प्रमाणात होत होता. संध्याकाळी गाण्यांची सुरेल मैफिल जमली. मराठी, हिंदी, गढवाली गाण्यांनी केदार खरक कॅम्प तल्लीन झाला. सुरज ने गायलेले ....  हुस्न पहाड़ों का, क्या कहना
.... ह्या गाण्याच्या दिवाने केले.... 
छोटे-छोटे झरने हैं, के झरनों का पानी छू के, कुछ वादे करने हैं !
झरने तो बहते हैं, क़सम ले पहाड़ों की, जो कायम रहते हैं !!
               काय अर्थ आहे राव ह्या ओळीत. त्यात लता दीदीच्या जादुई आवाजाने गाणे अजून अजरामर केलंय. म्हणूनच हि गाणी आजही एव्हरग्रीन आहेत.
गाणे गुणगुणतच झोपी गेलो. तंबू बाहेर बर्फ पडतच होता.



            आज वातावरण खास नव्हते. अनेक ग्रुप आज समिट न करता परत फिरणार होते. रात्रभर कोसळणाऱ्या बर्फाने तंबूबाहेर फूटभर बर्फ साचले होते. नाश्ता करून निघण्याचे ठरले. आज आम्हाला एका दिवसात थेट गंगोत्री गाठायची होती. पल्ला मोठा होता. ज्यांनी पोर्टर घेतलेले ते आता उपलब्ध नव्हते. त्यामुळे ज्यांच्या बॅग पोर्टर कडे होत्या त्या परत त्यांना घ्याव्या लागल्या होत्या. धुक्याआड लपलेल्या शिखरमाथ्याना पुन्हा एकदा वंदन करून माघारी फिरताना हिमपुष्पांचा वर्षाव सुरु झालाच. ह्या वर्षावातच आम्ही परतीच्या दिशेने मार्गस्थ झालो. भरभर उतराई चालू होती. वाटेवर नवीन फ्रेश बर्फ आल्याने वाट अजून घसरडी झालेली. एक पोर्टर आपल्या सामानासह ४० -५० फूट बर्फात घसरला. दुसऱ्या पोर्टर ने मागून जाऊन त्याला अडविले. हा सिन थरकाप उडवणार होता. 
परवाच्या अवघड रॉक फॉल च्या जागेवर पुन्हा तारांबळ उडाली. आता तो पॅच चक्क चढून जायचा होता. म्हणजे मनाची आणि शरीराची प्रचंड ऊर्जा तयार करावी लागणार होती. केली.....
      खूप धाप लागली. १० मिनिटे बसलो. सगळ्यांनी तो भाग सुरक्षित पार केला.  मग मात्र सुसाट निघालो.  अप्पर भोज खरक, लोअर भोज खरक, स्पायडर वॉल मागे पडू लागले. आता स्नो फॉलची जागा पावसाने घेतली होती. मंदिरातील घंटेचा आवाज ऐकला तेव्हा आपण जवळ आलोय ह्याची खात्री झाली. आशय - पज्या - वाघ्या - गणी भाई - यशवंत  हि आघाडीची फळी खूप आधीच पोहचली.  मधल्या फळीत मी एकटाच होतो. माझ्या मागे केपी - भाल्या निवांत आले.
हॉटेल ला गरमा गरम पाण्याने ४ दिवसानंतर अंघोळ केली.. निव्वळ सुख !!!
जेवण उरकून जाडश्या ब्लॅंकेट मध्ये गुडूप झालो.
     आज परतण्याचा दिवस. खूप साऱ्या आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी जमा केल्या होत्या. सौरभ आणि टीम सारखे मित्र जमा केले होते. उनाडांवर आणि  उनाड जगण्यावर प्रेम अजून वृद्धिंगत झाले.
     गंगा मैयाचे दर्शन घेऊन  पुन्हा बोलेरो ने डेहराडून कडे मार्गस्थ झालो. डेहराडून - दिल्ली  - पुणे असा प्रवास संपवीत ‘पुनरागमनाय  म्हणत नव्या ऊर्जेने आयुष्याला भिडायला तयार झालो !
आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन.
__________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________

ट्रेक चा संपूर्ण व्हिडीओ:
































____________________________________________
______________________________________________________________

प्रेम असू द्यावे_

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...