Wednesday, September 9, 2020

झिरो व्हैली- अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील राज्यामध्ये आकाराने सर्वात सर्वात मोठे राज्य असुन त्याचे क्षेत्रफळ ८३७४३ चौरास किलोमिटर इतके आहे. हे राज्य म्हणजे भारताची संरक्षक भिंत असुन याच्या पश्चिमेस भुतान, उत्तरेस नेपाळ, इशान्येस चीन आणी पुर्वेला बर्मा हे देश आहेत. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमेनी (१६८० कि.मि) वेढलेले असे हे राज्य आहे. १९७२ पर्यंत या भुभागास (NEFA) North East Frontier Agency असे संभोधण्यात येत असे. २०/०१/१९७२ ला यास केन्द्र शासीत प्रदेश म्हणुन मान्यता मिळाली व २०/०२/१९८७ रोजी हे भारताचे स्वयंपुर्ण राज्य म्हणुन अस्तित्वात आले.
गर्द हिरवी जंगले, खोल नद्यांच्या दर्‍या आणि मनमोहक पठारे, उत्तरेस बर्फाच्छादीत पर्वत रांगा तर दक्षिणेस ब्रम्हपुत्रेचा सखल प्रदेश असा निसर्गानी भरभरभरुन वर्षाव केलेला अतिसुंदर प्रदेश म्हणुन याचे वर्णन करता येईल आकारमानाने सर्वात मोठे राज्य असुनही येथील लोकसंख्येची घनता मात्र प्रती चौरस कि.मी मागे केवळ १५ इतकी आहे. या विशाल प्रदेशाच्या निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात.
इथे अनेक धार्मीक स्थळे आहेत. मोठ्या संख्येने यात्रेकरु येथील तवांग मधील बुध्दधर्मीयांसाठी सर्वोच्च असलेल्या मठापैकी एक असलेल्या मठात येत असतात. त्याच प्रमाणे लोहीत जिल्यातील परशुरामकुंड, दिबांग जिल्यातील रुक्मीणीचे जन्मस्थान असलेले भिष्मक नगर, पश्चिम सियांग जिल्ह्यातील मालिनिथान व इटानगर ही अरुणाचल ची राजधानी असलेल्या शहरातील इटाफोर्ट येथे यात्रेकरु व पर्यटक नियमीत येत असतात. झिरो जिल्यात नुकतेच २८ फुट उंच व २२ फुट व्यास असलेले विशाल शिवलिंग सापडले असुन तेथे ही पर्यटकांचा ओघ सुरु झाला आहे.
परशुरामकुंडात स्नान करण्यासाठी मकर संक्रांतीला इथे भाविकांची मोठि गर्दी उसळते. गेल्या वर्षी ही संख्य ६०००० होती. बहुतेक यात्रेकरु मणिपुर, महाराष्ट, राजस्थान, बिहार, आसाम, अरुणाचल, उत्तर प्रदेश या राज्यातुन आले होते.
कालीका पुराणात व महाभारतात देखिल अरुणाचल चा उल्लेख आहे. पुराणातील प्रभु पर्वत म्हणजे आजचे अरुणाचल. येथे व्यास मुनींनि ध्यान धारणा केली. परशुरामाने आपले पाप क्षालन केले तेही येथेच व कृष्णाचे रुक्मीणीशी लग्न झाले तेही येथेच.
प्रशासनीय दृष्ट्या या राज्याचे १६ जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्याची नावे ही येथील नद्यांच्या नावाने दिली गेली आहेत. ति जिल्हे खालील प्रमाणे:- १) तिराप २) चांगलांग ३)लोहीत ४) आन्जॉ ५) दिबांग व्हैली ६) लोअर दिबांग व्हैली ७) ईस्ट सियांग ८)अप्पर सियांग ९) वेस्ट सियांग १०) अप्पर सुबानसिरि ११) लोअर सुबानसिरी १२) कुरुंग कुम्ये १३) पापुम्पारे १४) ईस्ट कामेंन्ग १५) वेस्ट कामेंन्ग व १६) तवान्ग
२००१ च्या लोकगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या १० लाख ९७ हजार ९६८ इतकी होती. येथे २० उप-विभागीय केन्द्रे, १०८ सर्कल्स, २० मुख्य शहरे व ३८६३ गावे आहेत. येथील साक्षरतेचे प्रमाण ५४.७४% आहे.
अरुणाचलचे लोक
अरुणाचलमध्ये २६ मुख्य जनजाति तर १०७ पोट जमाति आहेत. मुख्य जनजातित ठळक अशा जनजाती म्हणजे मोन्पा, शेर्दुक्पेन, आका, मिजि, निशी, अपातानी, पहाडी मिरि, तागिन, गालो, आदि, मेम्बा, कम्बा, इदु, मिश्मि, दिगारु मिश्मि, मिजो मिश्मि , तन्ग्सा, तुसा, वान्चो, नोक्टे, खाम्प्ति, सिन्ग्पो इत्यादि. यातील मोन्पा, शेर्दुक्पेन, खाम्प्ति, सिन्ग्पो व मेम्बा या जमाती बुध्दिस्ट आहेत. हिनायना व महायना सारखे प्रवाह निरनिराळ्या जमातीत प्रबळ आहेत. आणि ते प्रामुक्याने तवान्ग, वेस्ट कामेन्ग , अप्पर सुभानसिरि, वेस्ट सियांग, अप्पर सियान्ग आणि लोहित व चान्गलन्ग जिल्ह्यातील काही भागात वसलेले आहेत. नेफा च्या काळापासुन ज्या चकमा जमातिचे पुनर्वसन तात्पुरते चान्ग्लान्ग जिल्ह्यात केले गेले होते ते बुध्द धर्मिय आहेत. तानी हे स्वत:ला आबोतानी चे वंशज मानतात व आबोतानी हे पृथ्वीवरिल प्रथम मानव होते असा त्यांचा विश्वास आहे. निशि, गालो, आदि, तागिन, पहाडी मिरी व आपातानी हे देखिल स्वतःला याच वंशावळीचे मानतात.
तानी जमातिचे लोक "दोनी" व "पोलो" म्हणजे सुर्य व चंद्र यांना सर्वोच्च देव मानतात.
तिरप जिल्ह्यातील वानजिल्ह्यातील, तुत्सा तर चांगलांग जिल्ह्यातील तांगसा, सिंग्फो या जनजातीत रंगफ्राईजम चळ्वळ जोरात सुरु आहे. रंगफ्रा हा त्यांचा सर्वोच्च निर्माता.. 'रंग' म्हणजे पृथ्वीचे संचालन करणारी शक्ती आणि 'फ्रा' म्हणजे विश्वास, शांती, त्याग, श्रध्दा. बुध्दाला मानणारे सोडले तर सर्वच जनजातींमध्ये पशुबळी हा धार्मीक विधिचा एक भाग आहे. घरातील आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्याच्या स्थानीक दैवतेला साकडे घालण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी त्यांच्या स्थानिक देवतेला संतुष्ट करण्यासाठी पशु बळी देणे ही सर्वच जनजातीमध्ये नियमीत प्रथा आहे.
प्रत्येक जनजातीमध्ये त्याचा स्वतंत्र धर्मगुरु असतो. आणी तो विशिष्ठ संप्रदाय त्या धर्मगुरुचा आदर करतो कारण त्याच्यामध्ये जन्मतःच काही दैवी शक्ती आहेत अशी त्यांची श्रध्दा असते. हे धर्मगुरु दैवी शक्ती असलेले, विशुध्द अंतःकरणाचे, आणि स्वर्गीय मनाचे असतात. ते कुठलेही लेखी साहित्या च्या आधारा शिवाय मंत्र पठण करु शकतात. आपल्या दैनंदिन समस्यासाठी या समुदायाचा मोठा वर्ग या धर्मगुरुंचा सल्ला घेतो.
येथील लोक शेतीशी संबंधीत सण हे उत्साहाने साजरे करतात. हे उत्सव ते देवाला भविष्यातील भरभराटीसाठी आणी भरघोस पिकासाठी आशिर्वाद मागण्यासाठी व आभार मानण्यासाठी असतात. या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. जसे मोपीन, सोलुन्ग, लोस्सर, द्री, सि-डोनी, न्योकुम, रेह. इ. संपुर्ण जनजाति हे उत्सव साजरे करण्यासाठी येतात. यात पारंपारिक वेषभुशा करुन केलेले नृत्य, पशु बळी देणे, घरी बनविलेले पारंपारिक मद्य प्राशन, व सर्व समुदायाला जेवण ह्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
धर्मांतरण
ब्रिटिश राजवटित हे राज्य इतर इशान्यभारतातील राज्याच्या विपरित, ख्रिश्चन धर्मप्रचारकाच्या धर्मांतरण कारवायां पासुन पुर्णपणे मुक्त होते. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर धर्मप्रचारकांनी या पहाडी प्रदेशांतिल काही कप्प्यांना आपल्या कारवायांचे लक्ष्य बनविले. लगेच येथील जनजातींना आपल्या वेगळ्या संस्कृति वर व शांत सामाजिक जिवनावर धर्मप्रसारकांच्या होत असलेल्या आक्रमणाची जाणीव होउ लागली. त्यांनी या विरुध्द १९७४ मध्ये लढा उभारला आणि धर्मप्रसारकांना राज्यापासुन दुर ठेवण्यात पुढील २ दशके तरी यशस्वी झाले.
राज्याच्या पश्चिम व मध्य भागात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे अस्तित्व व धर्मांतरणाचा वेग हा या लढ्यामुळे नाममात्र राहीला. मिशनर्‍यांनी मग आपल्या या कामाच्या व्युहरचनेमध्ये बदल करुन अरुणाचल - आसाम या सिमावर्ती भागात अरुणाचली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक संस्था स्थापन करण्याचा सपाटा लावला. त्यांनी ओडलगुडी जिल्ह्यातजिल्ह्यातील, नॉर्थ लखिमपुर जिल्ह्यातील हरमोती, सोनित्पुर जिल्ह्यातील बालिपारा , धेमाजी जिल्ह्यातील सिलापथार, तिन्सुखीया व दिब्रुगढ इत्यादी ठीकाणी वस्तिगृहाची स्थापना करुन विध्यार्थ्यांना त्यांच्या रानटी परंपरेपासुन तुम्ही कसे वेगळे आहात हे बिंबविण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांचा धर्म आधुनीकतेच्या नावाखाली बदलविण्यास भाग पाडले. मग या सुशिक्षीत झालेल्या नव ख्रिश्चनांनी येथील राजकारणी नेते व सरकारी अधिकार्‍यांवर प्रभाव टाकुन त्यांना ख्रिश्चन धर्मप्रचारकांच्या कारवायांबद्दल अनुकुल मत तयार केले.
यानंतर ख्रिश्चन मिशनर्‍यांना जरी राज्यात प्रवेश बंदी होती तरी देखील परिस्थीती इतकी बदलली कि राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी मदर टेरेसा यांना याचुली येथे चर्च संस्था उघडण्यास १९९८ मध्ये परवानगी दिली. आज अरुणाचल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात ख्रिश्चन मिशनर्‍यांचा वावर आहे. आज येथे धर्मांतरणाचा वेग वाढतो आहे. २००१ च्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या २२% इतके आहे व ते आज सुमारे २५% पर्यंत पोचले आहे.
चर्च चे मुख्य लक्ष्य हे प्रामुख्याने येथील जनजातीचे धर्मगुरु हे असतात कारण त्यांचा जनजातिवर प्रभाव असतो. काही धर्मगुरुअ हे त्यांना दिल्या गेलेल्या आमिषाला बळी पडतात. धर्मांतरणाचा येथील वाढता वेग ही येथील गंभीर बाब आहे आणि हे असेच चालु राहीले तर हे राज्य ख्रिश्चन राज्य होण्यास विलंब राहणार नाही आणि तसे झाल्यास तो देशाच्या एकात्मतेला धोका होउ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.
The National Socialist Council of Nagalim (NSCN) या संघटनेने अरुणाचलच्या अर्ध्यी भागावर तो ग्रेटर नागालीम चा भाग असल्याचा दावा केला आहे. बंडखोर गटांनी तयार केलेल्या नकाशात अरुणाचलचे सहा जिल्हे हे त्याचे असल्याचे दर्शविले आहे. ही तीच सघटना आहे जीचे घोष वाक्य "Nagaland for Christ" आहे. त्यांना सभोवतालचा प्रदेश हा त्यांच्या राज्यात सामील करावयाचा आहे. या संघटनेने तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बर्‍याच तरुणांना आपल्या संघटनेत भरती करुन घेतले आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही काळजी करण्यासारखी आहे.
अरुणाचल प्रदेशाचे पहिले लेफ्ट. गवर्नर हे के.ए.ए.राजा हे होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनर्‍यांपासुन या भुभागाचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच काळात येथे District Art and Curture Officer(DACO) चे पद निर्माण करण्यात आले आणि प्रत्येक जनजातीचे वेगळे सांस्कृतिक मंडळ निर्माण केले. या द्वारे प्रत्येक जमातिचा वैशिष्ट्यपुर्ण सांस्कृतीक वारसा जतन व विकसित करण्याला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी रामकृष्ण मिशन व विवेकानंद केन्द्रांना अरुणाचलात आमंत्रित केले व त्यांना येथिल निरनिराळ्या भागात शाळा व वैद्यकिय प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहीत केले.
"स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होईल" या विचाराने विवेकानंद केंद्र आज अरुणाचलमध्ये चार ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण केंन्द्र चालवित आहे. शिवणकाम, विणकाम, लोणची, सॉस - जैम बनवणे, कापड विणने हे शिकवलं जाते. कोवळ्या बांबूचलोण्ण्चं इथे खुप प्रसिध्द आहे. या चार केन्द्रामधुन सुमारे ५०० च्या वर मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.

दिवंगत तालोम रुक्बो

श्री तालोम रुक्बो हे येथील एक महान द्र्ष्टे व्यक्तिमत्व होते. त्याची येथील बदलत्या वातावरणावर बारीक नजर होती व येथील धर्मांतरणाच्या कार्यकलापाला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्यात प्रयत्नशील होते. त्यांनी 'तानी' जनजाती मानत असलेली 'दोनी-पोलो' ही धर्मश्रध्दा लोकप्रिय करण्याचा निश्चय केला.त्यांनी जर्मनी येथे १९८६ मध्ये झालेल्या धर्मसभेत 'दोनी-पोलो" धर्माचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पासीघाट येथे १९८९ मध्ये 'गांगीन' (प्रार्थना केंन्द्र) स्थापन केले व आपल्या भाषेत प्रार्थना गीताची रचना केली. त्यांनी 'आदि' जनजातीच्या स्थानीक श्रध्दा व संस्कृती जपण्यासाठी 'दोनी-पोलो' येलम केबान्ग' या' संस्थेची स्थापना केली.
अरुणाचलातील चांगलांग व तिरप या जिल्ह्याचे स्थान वैशिष्ट्यपुर्ण आहे. आसाम व नागालैंड या राज्यांमधील हा चिचोळा भूप्रदेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर नागा भुमीगत संघटना दावा सांगत आहेत. तो प्रत्यक्षात यावा म्हणुन बंदूकीच्या जोरावर या जिल्ह्यातील जमातीचे पाश्चात्यीकरण करण्याचा विडाच, या भूमीगत संघटनेने उचलला आहे. या पाश्चात्यीकरणाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने 'रंगफ्रा' चळवळीद्वारे होतो. या दोन्ही जिल्ह्यात रंगफ्रा' देवतेची ६२ मंदिरे उभारली गेली आहेत. ७० हजार नागरिक या चळवळीत सामील आहेत. रंगफ्रा मंदिरामध्ये दर रविवारी प्रार्थना होते, त्याचप्रमाणे घरोघरी पूज व रंगफ्रा देवतेच्या प्रतिमेपुढे आपल्या प्रथेप्रमाणे दिवाही लावला जातो. २००४ मध्ये एन.एस.सी.ए. च्या बंडखोरांनी २ रंगफ्र मंदिरे उध्वस्त केली. परंतु स्थानिक जनतेने दहशतीचे वातावरण असुनसुध्दा त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली.
अरुणाचलमध्ये निशी जनजाती ही प्रमुख असुन ख्रिश्चन मिशनृयांची ती प्रथम लक्ष्य बनली . आज या जनजातीचे ५०% लोक हे ख्रिश्चन झालेले आहेत मात्र जनजागृती च्या विविध चळवळीने यांच्या मध्येही अस्तित्व गमावल्याची भावना निर्माण होत आहे. व त्यांचा परतिचा प्रवास सुरु झाल्याच्या बातम्या येत असतात. चर्च चा प्रयत्न अर्थात च याला मोडता घालण्याचा दिसुन येतो. त्या साठी ते कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार असतात.
पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांची भेट या राज्याला झाल्यानंतर बराच विश्वास येथे निर्माण झाला आहे. पण ह्या भेटी वारंवार झाल्यास येथील लोकांच्या मनात भारत आपल्या पाठीशी आहे ही भावना दृढ होइल व येथील स्थानिक चळवळीला बळ मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री श्री दोरजी खन्डु यांनी देखिल पर्यटकाना मोठ्या प्रमाणात या सुंदर राज्याला भेट देण्याचे आव्हान केले आहे. भारतातील पर्यटकांचा ओघ जसजसा वाढेल तसतसा येथे सुरु असलेल्या चोरट्या कारवाया देखील पितळ उघडे पडण्याच्या भितीने कमी होतिल यात शंका नाही.

अरुणाचल प्रदेशाच्या वेस्ट कामेंग जिल्ह्यातील एक टुमदार शहर म्हणुन बोमडीला चे वर्णन करता येईल. समुद्र सपाटीपासुन अंदाजे ९००० फुटावर असलेले हे शहर सर्व बाजुने हिमालयाच्या रांगांनी वेढलेले आहे. बुध्द धर्मीयांचे प्राबल्या असल्याने येथील लोक हे सुशिक्षीत व संस्कृतीक दृष्ट्या खुपच समृध्द आहेत. मात्र येथे जायला केवळ रस्ता हाच एक उपाय आहे. याच्या उत्तरेस असलेल्या तवांग ला गुवाहाटी येथुन हेलीकॉप्टर सेवा आहे. माझ्या दोन दिवसांच्या येथील वास्तव्यात मला स्वर्गात असल्याची अनुभुती आली. भारताच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे ६९% साक्षरता येथे आहे. लोकसंख्या मात्र १०००० च्या आसपास आहे. येथे अन्य भागातुन येणार्‍या रस्त्यांची देखभाल ही मिलीटरी कडे आहे. येथे कायम पाउस येत असल्याने प्रवासात कायम २-३ फुट माती असते व ती साफ करण्याचे काम मिलीटरी सतत करुन वाहतुक सुरळीत करित असते.
अरुणाचलची राजधानी इटानगर होण्याआधी १० कि.मी. आधी नहरलगुन येथे शासकीय कार्यालये होती. त्यामुळे हे शहर मुख्य आहे. येथे हेलीपैड असुन केन्द्रीय मंत्री किंवा अन्य उच्चाधिकारि प्रथम येथे येतात. येथुन बोमडीला येथे जाण्यासाठी लहान बसेस जातात. संपुर्ण प्रवास हा रात्रीचा असतो. सकाळी ६ वाजता निघणारी बस ही बोमडीला येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता पोचते. अरुणाचल सिमेतुन निघुन ही बस आसाम च्या सखल प्रदेशात प्रवास करुन पुन्हा अरुणाचल सीमेत प्रवेश करते. त्यामुळे रात्री दोनदा चेकींग होते. अरुणाचल सीमेतुन पापेनपारे जिल्ह्यातुन बाहेर निघुन आसाम मधील सखल प्रदेशातील प्रवास केल्यानंतर पुन्हा बस वेस्ट कामेंग जिल्ह्यात प्रवेश करते. बुलढाण्याचे वन अधिकारी श्री बेडेकर यांचे अपहरण याच जिल्ह्यात झाले होते. हा जिल्हा पुर्ण पहाडी आहे. एका बाजुला कडा आणी दुसर्‍या बाजुला नदी यामधील लहानशा रस्त्यातुन बस मार्ग आक्रमण करीत असतांना झोप लागणे शक्य नसते. त्यात रस्त्यावर २-३ फुट चिखलात बस बरेचदा अडकते व चिखल साफ होत पर्यंत थांबुन राहते त्यामुळे संपुर्ण प्रवास हा थरारक असतो.
वाटेत दिसणारी झुम
हिमालयाच्या पर्वत रांगा
बोमडीला च्या ८ हजार फुट उंचीचा चढ चढत असतांना बसचा वेग १० कि.मी इतका असतो

बोमडिला सभोवतालची गावे व तेथे जाणारे वळणदार रस्ते
बोमडिला येथील उंच वसवलेला बुध्दाचा मठावरुन बोमडिला शहराचे विहंगम दृश्य

गावात जाणारे वळणदार रस्ते

विलोभनीय बोमडीला

 
 आमचा बोमडिला ला जाण्याचा प्रवास रात्रीचा असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत परंतु परतीच्या प्रवासात हा प्रवास किती थरारक होता यासाठी मुद्दाम प्रपंच
एकी कडे खोल नदी व दुसरीकडे पहाड त्यात पाउस आणि वारंवार रस्त्यावर साचणारा चिखल यातुन मार्गक्रमण म्हणजे चालकाची कमाल होती.
बोमडिला हुन १५०० फुटावर बुधदाचा मोठा मठ आहे. या मठाद्वारे येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविली जाते येथे त्यांच्या राहण्याची व जेवण्याची देखील मोफत सोय असते.

मठावरुन दिसणारी मनमोहक दृश्ये

मठधिपती व तेथील भिख्खुंचे निवास स्थान

महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचे मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते बोमडिला येथे राज्याच्या उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् दोन वर्षानंतर ते त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत.

त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्‍शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो हृषीकेश दिवेकर हा तेथील शाळेत प्राचार्य पदाचीही जवाबदारी सांभाळतो.

 
अरुणाचल प्रदेशात माझा प्रथम प्रवेश झाला तो २००९ मध्ये. नहरलगुन येथे वर्ध्याचे श्री प्रदिप जोशी यांच्या निमंत्रणानुसार मी गुवाहाटी येथुन रात्री च्या बस ने निघालो व दुसरे दिवशी नहरलगुन येथे पोचलो. मला घ्यावयास ते स्वतः आले होते. अरुणाचल वर श्री शशीधर भावे यांचे पुस्तक मी वाचले होते. त्यात श्री अशोक वर्णेकर यांच्या शाळेच्या प्रकल्पाबद्दल त्रोटक माहिती होती. एक मराठी माणुस इतक्या लांब येउन काही तरी भव्य काम उभारतॉ त्यामुळे त्यांना भेटण्याची व त्यांच्या बद्दल जाणुन घेण्याची मला कमालीची उत्सुकता होती.
शशीधर भावे यांची भेट ही माझी नुकतीच पुण्यात झाली होती व त्यांचेसोबत मुंबई ला मी इशान्य भारतातील विध्यार्थ्यांच्या वस्तिगृहाच्या व्यवस्थापकांच्या बैठकी साठी गेलो होतो व परत बसने येतांना त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. पंचाहत्तरीला पोचलेला हा उत्साही तरुण मला पाहताक्षणीच भावला. अरुणाचलला त्यांचा इतका प्रवास झाला होता की ते म्हणजे अरुणाचलचे चालते बोलते माहितीचे आगार.
नहरलगुन ला पोचल्या नंतर मी प्रदिपजींना वर्णेकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी स्वत; तिकडे आपण जाउ म्हणुन मान्यता दिली. माझे तेथील काम आटोपल्यानंतर मी त्यांना वर्णेकरांना भेटण्याबद्दल मी मोकळा असल्याबद्दल सांगितले. त्यांनी लगेचच तेथील एक कार्यकर्ते, चंद्रपुरचे उत्तम इंगळे यांना मला घेउन येण्यास सांगीतले.व ते स्वतः पुढे गेले.
नहरलगुन येथुन पार्वतीपुर ला जातांना लागणारी ब्रम्हपुत्रेचे उपनदी 'डिक्राम'



नहरलगुन हुन १० कि.मी.वर आसाम सीमेचे ठाणे आहे तेथुन १ कि.मी वर पार्वतीपुर गाव आहे तेथे श्री अशोक वर्णेकर यांची भेट झाली. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपण खुप जुने मित्र असल्याची माझी भावना झाली. आश्चर्य म्हणजे ते मुळचे नागपुरचे व त्यात ही मी जेथे १० वर्षे काढली त्या अभ्यंकर नगर मधील. मग काय बरीच मंडळि हि त्यांची व माझी कॉमन ओळखीची निघाली व गप्पा खुप रंगल्या. त्यात कळलेली माहिति रोचक तर होतीच पण ध्येयाने पछाडलेला माणुस काय करु शकतो ह्याचे मुर्तिमंत उदाहरण माझ्या समोर होते.
सुमारे वीस वर्षापुर्वी वर्णेकर दांपत्य मुंबईला एका॑ चांगल्या पगाराच्या प्राध्यापकाच्या पदावर कार्यरत होते. नुकतेच लग्न झालेले त्यामुळे संसार ही छान चालला होता. पण ध्येय वादी माणुस हा चाकोरीतील नोकरीत कायम अस्वस्थ असतो. तसेच हेही होते. त्यावेळी विवेकानंद केंन्द्राची अरुणाचल मध्ये काम करण्याची इच्छा असलेल्यांना नोकरी साठी अर्ज करण्याबद्दल जाहिरात पेपर मध्ये त्यांनी वाचली आणि दोघांनीही चांगल्या पगाराचि नोकरी सोडुन देण्याची तयारी दाखवित अर्ज केला. त्यांना लगेच नियुक्तीबाबत पत्र आले व दोघेही नहरलगुन ला रुजु झाले. २-३ वर्षातच त्यांना मनासारखे करता येत नसल्याची जाणीव झाली व स्वत; शाळा सुरु करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. लगेच त्या अनुषंगाने जागेचा शोध सुरु झाला व सुदैवाने त्यांना हवी असलेली जागा त्यांना भाड्याने मिळाली. विवेकानंद केन्द्राची नोकरी सोडुन त्यांनी शाळा सुरु केली. शाळा मनासारखी सुरु झाली होती लोकांचा प्रतिसाद ही उत्तम होता पण २-३ वर्षानी जागा मालकांनी ती जागा चांगली ऑफर आल्याने विकायचा निर्णय घेतला. या दांपत्याने धीर सोडला नाही. त्यावेळी म्हणजे १३-१४ वर्षापुर्वी त्यांनी थोडे बहुत पैसे जमा केले होते. त्यांनी स्वत्;ची जागा घेण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या जागेचा शोध पुनः सुरु झाला. अरुणाचल सीमेपार आसाममध्ये पार्वतीपुर या छोट्या खेड्यात त्यांना मनासारखी १ एकर जागा नजरेत आली ती त्यांनि विकत घेतलि दहा हजार रुपयात. व तेथे राहण्यासाठी व शाळेसाठी अशी एक लांब लचक झोपडी शाकारली. विध्यार्थ्यांचा प्रश्न होता कारण ते एक लहानशे खेडे होते. त्यांच्या शाळेतील आज असलेल्या विध्यार्थ्याबाबत हि एक ईतिहास आहे.
ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांना आसाम मध्ये चहाचे मळे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागली. त्यांनी भारताच्या निरनिराळ्या आदिवासि भागातुन मजुर गोळा करुन त्यांना मळ्याच्या कामासाठी लावले. हे मजुर, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार उत्तरप्रदेश आदि राज्यातुन आणले गेले. त्यांना तेथेच वसवले गेले. कालांतराने अनेक वर्षे एकत्र राहिल्याने त्यांचे संक्रमण झाले. या संक्रमणातुन निर्माण झालेली आजची ही जमात 'समदी' म्हणुन ओळखली जाते. आजही हे चहाच्या मळ्यात काम करतात तसेच इतरही तत्सम काम करुन आपली उपजिवीका करतात.
वर्णेकरा दांपत्यानी या मुलांना शिक्षण देण्याचे ठरविले. आज या शाळेत १५०-२०० इतके विद्यार्थि असुन येथील शिक्षक देखील याच शाळेतुन शिकुन शिक्षक झाले आहेत. आज येथे त्यानी मुलासाठी निरनिराळे वर्गासाठी वेगळे कक्ष बांधले आहेत. शिक्षकांसाठी कक्ष, त्यांच्या श्रध्दास्थानाचे मंदीर वगैरे सुविधा केलेल्या आहेत.
त्यांची मुले देखील याच शाळेत शिकली. पुढील शिक्षण देखील इटानगर येथे पण इथुन जाउन येउन पुर्ण केले राहुनच त्यानी घेतले. त्यांची एक मुलगी पायलट असुन मुलगा हा बेंगलोरल इंजिनीअर त्यांची वृध्द आई नागपुर ला असते तीची सेवा व्हावी या उद्देशाने दोघांपैकी एक आलटुन पालटुन नागपुरला तिच्या जवळ राहतात. त्यावेळि शाळेचि व्यवस्था दोघांपैकी एक सांभाळतात. मी गेलो तेंव्हा सौ. वर्णेकर या पाहुण्यांसोबत गुवाहाटी ला गेल्या होत्या त्यामुळे त्यांची भेट होउ शकलि नाही.
श्री अशोक वर्णेकर आपल्या स्वप्नपुर्ती चे स्वरुप पहातांना

अशोक वर्णेकर व मागे त्यांचे कार्यालय व घर

सनदी मुले मधल्या सुट्टीत

शिक्षकांसाठी खोली

येथील लोक शिवाला मानतात त्यामुळे शाळेतील शिवमंदिर. विध्यार्थी या मदिराकडे तोंड करुन प्रार्थना म्हणतात.


या शाळेत शिकुनच तयार झालेला शिक्षक वर्ग.

इशान्य भारतात सेवा भारती पुर्वांचल ही संस्था आरोग्य , शिक्षण व स्वयंरोजगार या संदर्भात कार्य करते. पुण्यात सौ.पुनमताइ मेहता या व्यवसायाने उद्योगपती असलेल्या महिला तेथील भागाच्या प्रभारी म्हणुन काम पहातात. त्यांचा फोन नं ९४२२०८८६८४ आपण केव्हाही त्यांना फोन करुन आपण काय करु शकता याबद्दल चर्चा करु शकता.
 
 
नहरलगुन येथे मुक्कामास असतांना मला एक सुखद धक्का बसला तो श्री अविनाशजी बिनीवाले यांचे भेटीने. अकाउंट्स च्या कामासाठी मला अरुणाचलमधील पासीघाट येथे जाण्याचा योग आला. तेथे सियांग नदिच्या विशाल पात्रावर तेव्हढाच विशाल पुल बांधण्यात आला आहे. पासीघाट हे अरुणाचल मधील सर्वात जुने शहर आहे. नहरलगुन हुन बस ने इथे पोचण्यास सुमारे ५ तास लागतात अर्थात च आसाम मधुन जावे लागते. इशान्य भारतातील कुठल्याही एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाण्यासाठी आसाम मधुन जावेच लागते. पासीघाट ला संस्थेच्या गाडीने प्रवास झाला असल्याने अरुणाचलच्या खेड्याना भेटी देता आल्या व तेथील अंतरंगाची ओळख झाली. एक दिवस मुक्काम करुन आम्ही दुसरे दिवशी संध्याकाळी नहर लगुन ला परतलो.
पासीघाट चे फोटो.

सियांग नदिवरील राजीव गांधी पुलावरुन दिसणारे दृश्य




पासीघाट येथील आमचे यजमान एक अरुणाचली कुटुंब

अविनाशजी बिनीवाले नहरलगुन येथे मुलांचे इंग्लीश स्पिकींग चे वर्ग घेत असत. नहरलगुन ला दोन ठीकाणचे १५ दिवसांचे वर्ग आटोपुन ते पासीघाट व झ्रिरो ला जाणार होते. नहरलगुन चे मुक्कामात त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांच्यास गप्पा ऐकणे हा एक सुखद व माहितीपुर्ण कार्यक्रम असावयाचा. दरम्यान च्या काळात मी ५ दिवसासाठी झिरो येथे विद्याभारतीच्या शाळेच्या कामासाठी जाउन आलो. झिरो म्हणजे सभोवती डोंगरांच्या रांगा व त्यात वसलेले हे शहर भाताच्या पेरण्या नुकत्याच आटोपल्या असल्याने निळ्या डोंगरांच्या प्रुष्टभागावर हे धानाची हिरवी गार शेते म्हणजे डोळ्यांना मेजवानीच होती.
अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबानसिरी जिल्ह्यातील अत्यंत सुरेख थंड हवेच्या ठीकाणापैकी एक असलेले शहर म्हणजे "झिरो" समुद्र सपाटी पासुन सुमारे ५७०० फुटावर हे ठीकाण आहे. हे शहर ओल्ड व न्यु झीरो अशा दोन भागात विभागले असुन या दोन ठीकाणामधील अंतर ५ कि.मी इतके आहे.आपातानी जमातीचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेले हे शहर पाइन व बांबुंच्या जंगलानी वेढलेले असुन धानाच्या शेतांनी सुशोभित केलेले दिसते. कृषि व मासेमारी हे येथील प्रमुख उपजीविकेचे साधन असल्याने धानाची शेते व मासेमारीसाठी ठिकठीकाणी तळे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपातानी या जनजातीचे वैशिष्ट्य असलेल्या खास डिझाइन असलेल्या शाली तयार करणे हे देखीलयेथील प्रमुख आकर्षण आहे.
झिरो येथील फोटो.


.
झिरो येथील शाळेची इमारत

शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत अस्मादीक.

२००४ मध्ये एका स्थानीक ट्रायबलला एक विशाल झाड तोडत असतांना त्या झाडाच्या पलिकडे एक विशाल शिवलीगाच्या आकाराचा खडक दिसला तेथेच बाजुला गणपतीची आक्रुती असलेला एक लहान खडक आढळला. लगेचे ही बातमी वार्‍यासारखी सर्वदुर पोचली. मला देखील तेथे जाउन फोटो काढण्याची इच्छा होती. मी शाळेच्या मुख्याध्यापकासोबत मोटारसायकल्ने त्या दुर्गम भागाला भेट दिली व तेथील फोटो घेतले. अरुणाचलच्या बहुतेक वरिष्ठ अधिकायांनी येथे भेट दिली असुन येथे नित्य पुजा होत असते. हा भाग विकसीत करुन येथे एक विशाल शिवमंदिर बांधावयाचा मानस असुन त्या संबधात स्थानीक बाहेरच्या धनिकांनी देणग्या देण्यास सुरुवात ही केली आहे. २ वर्षात येथे विशाल मंदिर होईल यात शंका नाही. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या पायर्या करुन हा प्रवास सोपा केल्या गेला आहे.
विशाल शिवलींग व परिसर



गणपतीचा आकार असलेला खडक


शिवलींगाकडे जाणारी वाट









अरुणाचल प्रदेश

       २५/११/२०१९

            गुवाहाटी इंटरसिटी एक्सप्रेस ने  शिवसागर ते गुवाहाटी असा रात्रीचा प्रवास केला. ट्रेन वेळेत म्हणजे सहा वाजता स्टेशनला पोहोचली. आजचा आमचा नवीन सारथी श्री. राहुल देव आपली गाडी घेऊन आमची वाटच पाहत होता . आजपासून तो आमच्याबरोबर पुढे दहा दिवस  राहणार होता. आज आम्ही  गुवाहाटी ते तवांग प्रवासाला सुरुवात केली. हे अंतर 444 किलोमीटर. साधारण तेरा तासांचा  खडतर प्रवास होता.
            अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य  भागातील एक प्रमुख राज्य.अरुणाचलला भेट देण्यासाठी आपल्याला इनर लाईन परमिट घ्यावे लागत. भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो म्हणून राज्याला "अरुणाचल प्रदेश" म्हणजेच सर्वप्रथम सूर्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या प्रदेशाचा उल्लेख भारताच्या कालिकापुराण तसेच महाभारत आणि रामायण  मध्ये आढळतो. निसर्गानी स्वतःच्या हाताने याला   नटवलेले आहे. या राज्याच्या सीमा चीन, म्यानमार व भूतान यांना लागून आहेत त्यामुळे हा  अतिसंवेदनशील प्रदेश आहे. येथे येण्यासाठी रोड, रेल्वे व हवाई वाहतूक यांची मदत घेता येते .   
           या भागात अंधार लवकर होतो त्यात पूर्ण प्रवास  डोंगरदऱ्यातून -घाटाघाटातून असल्याने आजचा मुक्काम सहा ते सात तासानंतर येणाऱ्या बोमडीला या गावी  होता.

                         बोमडीला



 भारताच्या पूर्व हिमालयीन  रांगांच्या कुशीमध्ये वसलेलं हे छोटसं टुमदार गाव. फारशी वर्दळ नसलेल, एकांतात असलेल्या या गावात  सध्या पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. तवांगला भेट देणाऱ्या प्रवासी लोकांचा हा विश्रांतीचा थांबा झाला आहे. आपसूकच येथे होमस्टे आणि हॉटेल्स यांची उत्तम सोय झाली  आहे. आजचा आमचा पूर्वनियोजित होमस्टे "अनु होम स्टे "
स्वच्छ, सुंदर असा होता. आमचे होस्ट खूपच चांगले होते.
बोमडीला मध्ये काय काय पाहण्यासारख आहे हे सांगतानाच त्यांनी तीन दिवस सुरू असलेल्या बोमडीला फेस्टिवल बद्दल ही  सांगितले. हा तर  दुग्धशर्करा योग होता. कारण बऱ्याच दिवसांची इच्छा उद्या सकाळी लामांचे मुखवटा नृत्य पाहून पूर्ण होणार होती. येथे  बहुतांशी लोक मासाहार करतात . सध्या येथे ऑर्डर प्रमाणे शाकाहारी पदार्थ पण मिळतात. फारशी भूक नसल्यामुळे आम्ही रात्री सोबत आणलेला इन्स्टंट गोड शिरा बनवून खाल्ला.
              बोमडीला आपल्या निसर्गसौंदर्याने पर्यटकास आकर्षित तर करतेच पण येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, सफरचंदाच्या बागा प्रेक्षणीय आहेत. त्याचबरोबर येथील क्राफ्ट सेंटर - हातमागावर बनवलेले कारपेट , पारंपारिक मुखवटे, वॉल हँगिंग यासाठी प्रसिद्ध आहे. इथलं म्युझियमही पाहण्यासारखा आहे.शिवाय हे ठिकाण सध्या ट्रेकर्सना सुद्धा साद घालते.

            दि.२६/११/२०१९

       आज आम्ही फार उत्सुक होतो ते मुखवटा नृत्य पाहण्यासाठी. तिबेटीयन लोक कथेनुसार बुद्ध लामा पद्मसंभव यांनी या नृत्याची सुरुवात दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी केली.
आणि आजही त्याचे अनुकरण बुद्ध लामा करतात चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची मुखवटे लावून रंगबिरंगी वस्त्रांचा पेहराव करून   आपल्या पारंपारिक वाद्यांच्या तालावर लामा नृत्य करतात. नृत्याचा मुख्य उद्देश मानवजातीच्या भल्यासाठी आहे. हे पाहण्यासाठी येणारे बौद्ध लोक आपल्या पारंपारिक वेशात आपल्या कुटुंबासहित आलेले असतात.
लामां चे मुुुखवटा नृत्य.     
बुद्ध मठ  अगदी सुंदर सजवलेला होता. वातावरण उत्साही .
सर्वत्र रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या महिला, पुरुष, छोटी मुलं ये जा करत होती त्यातील एका महिला ग्रुपने आमचं चहा व नाश्ता देऊन आदरतिथ्य केलं. मठाच्या आवारातच बौद्ध लामांची मुलांसाठीची रहिवासी शाळा होती . शालेय अभ्यासक्रमाबरोबरच तिथे बौद्ध संस्कार शिकवले जातात. वेळेच्या अभावामुळे आम्ही थोडावेळ नृत्याचा आस्वाद घेऊन तिथून तवांग साठी निघालो.
              
 
 बाळाला पाठीला बांधुन
उत्सवात सहभागी महिला

                   पारंपारिक वेशातील छोटुकली
                याकच्या केसांची टोपी घातलेली महिला.
          
      पारंपारिक वाद्ये

अरुणाचल - तवांग -( लामांची भूमी) भाग 1

२७/११/२०१९
           बोमडीला चा निरोप घेऊन तवांग साठी निघालो. अंतर 177 किमी. साधारण सहा तासांचा प्रवास तवांगला पोहोचायला रात्र होणार होती कारण इथे  रात्रीची चाहूल चार नंतर सुरू होते. शिवाय रस्ताही म्हणावा तितका चांगला नव्हता.
        बोमडीला पासून 75 किलोमीटर वर सेला पास लागतो तिबेटियन भाषेत 'ला' म्हणजे 'पास'. हा रस्ता समुद्रसपाटीपासून 13700 फूट उंचीवर आहे. सेला पास हा अरुणाचल प्रदेशची  रक्तरेखा (लाईफ लाईन) आहे कारण तवांगला येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे जो पुर्ण भारताला तवांगशी जोडतो. हा रोड वर्षभर चालू असतो. फक्त तो नैसर्गिक आपत्ती म्हणजे  भूस्खलन किंवा मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली तर तो तात्पुरता बंद असतो.
     
प्रवाशांचे स्वागत करणारी तवांग ची कमान
सेला लेक..
  सेला पास मधील ' सेला' बद्दल आख्यायिका सांगितली जाते. १९६२ च्या भारत चीन  युद्धात भारताचा शूर शिपाई जसवंत सिंग रावत हा  एकटाच चिनी सैनिकांशी या पास जवळ लढत होता आणि तिथली  एक आदिवासी मुलगी तिचे नाव ' सेला' , ती त्याला जेवण आणि पाणी पुरवत असे जेव्हा लढता-लढता हा सैनिक गतप्राण झाला तेव्हा त्याचे मृत शरीर बघून सेला  ने तिथेच आपला प्राण त्याग केला. जसवंत सिंग यांना मरणोत्तर महावीर चक्र दिले गेले तर  हा पास त्या वीर तरुणीच्या नावाने ओळखला जाऊ लागला. येथेच भारत सरकारने जसवंत स्मृतिस्थळ बांधले असून त्यात भारत चीन युद्धात शहीद झालेल्या विर  सैनिकांची  फोटो सहित माहिती आहे. त्याच बरोबर येथे मिलिटरी  कॅन्टीन पण आहे. येणाऱ्या प्रवाशांना येथे चहा-कॉफी मोफत मिळते तर डोसा, बटाटेवडा असे नाश्त्याचे पदार्थ ऑर्डर प्रमाणे   गरमागरम तयार करून दिले जातात.  तसेच येथील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना आपल्या गरजेच्या वस्तूही खरेदी करता येतात. आम्ही येथे थांबून आपल्या वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या सैनिकांना  अभिवादन करून, चहा - नाश्ता व खरेदीचा आनंद  घेतला.
            येथील बर्फवृष्टीचा आनंद लुटायचा असेल तर पर्यटकांनी डिसेंबर अखेर जानेवारी-फेब्रुवारी मध्ये यावे सेला पास आणि  सेला लेक पूर्ण बर्फाच्छादित असतात. हेे दृश्य खूपच विहंगम असते आपण नंदनवनात असल्याचा भास होतो. पण बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.
            सेला पासला आम्हाला भयानक अशा वाऱ्याला सामोरं जावं लागलं . त्या वाऱ्यासमोर आम्ही दहा मिनिटे सुद्धा तग धरू शकलो नाही. वातावरणात बदल होत चाललेला होता आणि हळूहळू ढग रस्त्यावर यायला लागले होते. तवांग साठी आम्हाला  अजून 21 किलोमीटर  प्रवास होता. फोग लाईट लावून गाडी चालवावी लागत होती. रस्त्यावर उतरलेल्या त्या ढगावर स्वार होऊन आम्ही सैर करत जात होतो. मन एकीकडे अत्यंत नयनरम्य दृश्य अनुभवत होते तर मनाच्या एका कोपर्‍यात निसर्गाच्या या अफाट दृश्याची भीतीही वाटत होती.

                          रस्त्यावर आलेले ढग
               
                विश्वशांतीसाठी बौद्ध मंत्र लिहिलेल्या पताका
               गाई प्रमाणेच बहुपयोगी असलेला याक प्राणी 

       साधारण साडेतीन ला तवांग येथे पोहोचलो  भारताच्या ईशान्य कोपऱ्यात असलेला हा प्रदेश   भूतान  व तिबेट यांच्या सीमा रेषांनी वेढलेला आहे.    समुद्रसपाटीपासून 3048 मी उंचीवर स्थित आहे . 'लामांची भूमी ' अशीही त्याची ओळख आहे.  येथेही प्रवाशांची  राहण्यासाठी होम स्टे व हॉटेल्स यांची उत्तम अशी सोय आहे. सध्या शेतीबरोबरच पर्यटन व्यवसाय हा येथील लोकांच्या उत्पन्न  वाढीचे  साधन झाले आहे. येथील लोक आनंदी आणि शांत स्वभावाचे आहेत.  आजच्या आमच्या होम स्टे चे नाव 'Dondrub Homestay '. नेहमीप्रमाणेच सुंदर स्वच्छ होम स्टे होता .

                                                                                       
येथील आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणे :-                                              
   १) तवांग  मॉनेस्ट्री 
   २) Sangetsar  Lake किंवा माधुरी लेक
   3)नुरणाग धबधबा - Nuranag Falls
   ४) तवांग वॉर मेमोरियल
   ५) पी टी स्तो लेक .
   ६) बुमला पास.
         
   *  तवांग  वॉर मेमोरियल  -:  येथे संध्याकाळी साडेपाचला लाईट शो असतो. 1962 च्या भारत-चीन युद्धाची डॉक्युमेंट्री फिल्म येथे दाखवली जाते. त्यामध्ये युद्धात बिकट परिस्थितीत पण देशासाठी आपले बलिदान देणाऱ्या जवानांना पाहून अभिमानाने ऊर  भरून येतो. येथे युद्धात शहीद झालेल्या जवानांचे फोटो व माहिती संग्रह आहे त्यांना अभिवादन करून आम्ही आमच्या होम स्टे वर परत आलो.  
       उद्या आम्ही बुमला पास ला जाणार आहोत.

बुमला पास ( भारत- चीन सीमा रेषा)

  २८/११/२०१९   

                   
   

         तवांग ते  बुमला पास अंतर 37 किमी  आहे. समुद्रसपाटीपासून १५२०० फूट उंचीवर असलेला  बुमला पास हा भारत व चीन यांना जोडणारा रस्ता आहे. पूर्वी या रस्त्याने दोन्ही देशाचे व्यापारी एकमेकांशी व्यापार करत. 1962 च्या युद्धानंतर हा पास पूर्णपणे बंद करण्यात आला. 2006 ला हा पास व्यापारी दळणवळणासाठी खुला करण्यात आला. याच मार्गे दलाई लामा तिबेटमधून चिन्यांना हुलकावणी देत भारतात शरणार्थी म्हणून आले.
      अरुणाचलमध्ये प्रवास करताना पर्यटकांना इनर लाइन परमिट घ्यावे लागते त्याचप्रमाणे बूमला पास पाहण्यासाठी प्रत्येक  पर्यटकाला तवांग डेप्युटी कमिशनर ची परवानगी घ्यावी लागते.  ही परवानगी ज्या त्या दिवशीच दिली जाते. हवामान खराब असल्यास, अति बर्फवृष्टी झालेली असल्यास परवानगी नाकारली जाते . ही परवानगी पर्यटकांना हॉटेल्स, होम स्टेज यांच्या मदतीने फार कष्ट न करता मिळू शकते. तसेच येथे जाण्यासाठी आपण आणलेली वाहने चालत नाहीत तर  तवांग मधील खास वाहनांनी तेथे जाता येते. त्यासाठी आपल्याला साधारण ५०००/ रु. खर्च मोजावा लागतो. डिसेंबर-जानेवारीमध्ये येथील रस्ता पूर्णपणे बर्फाखाली असतो हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी डिसेंबर-जानेवारीमध्ये जाणे योग्य पण क्वचित प्रसंगी जास्त हिमवृष्टी किंवा दरडी कोसळून नैसर्गिक विघ्न आली तर तर तिथे जाता येत नाही. एप्रिल-मे महिन्यात येथील rhododendron ची लाल - पिवळी फुले फुललेली असतात. (या वनस्पतीपासून होमिओपॅथीमध्ये अंगदुखी वरचे औषध बनवले जात.)  पावसाळा जर सोडला तर बाकीच्या महिन्यात आपल्याला निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांचा  आस्वाद घेता येतो. या रस्त्यावरचा प्रवास म्हणजे  उंच- उंच पहाड, खोल दरी   आणि निळ्याशार पाण्याची छोटी-मोठी सरोवरे. एकांत कशाला म्हणायचं हे इथे येऊनच अनुभवायचं.
           वारंवार होणाऱ्या  नैसर्गिक आपत्तीमुळे येथील रस्त्यांची स्थिती फारशी चांगली नाही पण सध्या रस्त्यांची योग्य ती काळजी केंद्र सरकार घेत आहे. येथे पोहोचल्यावर आपले सर्व सामान आर्मीच्या लोकांच्याकडे सुपूर्त करावे लागते . आर्मी ऑफिसर आपल्याला ठराविक अंतरावर नेऊन चीनचा भाग आणि भारताचा भाग यांची माहिती देतात. हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला फक्त पंधरा मिनिटांचा अवधी मिळतो. येथे फोटो काढण्यास सक्त मनाई  आहे.  भारत व चीन सैनिक आपले 'राष्ट्रीय दिवस '  एकमेकांना शुभेच्छा देऊन  साजरे करतात. त्यादिवशी स्थानिक लोकांच्या मदतीने   भारतीय सैनिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन करून चिनी  सैनिकांचे आदरातिथ्य करतात. पर्यटकांना येथे भारतीय सेनेतर्फे चहा दिला जातो.

               संजेस्तर स्तो -  (माधुरी लेक )  


                          तळ्याचे विलोभनीय दृश्य

     बुमला पास पासून सात किमी वर परतीच्या प्रवासात आम्ही संजेस्टर स्तो पाहावयास निघालो. याला सध्या 'माधुरी लेक'    या नावानेही ओळखले जाते. प्रख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे 'कोयला' चित्रपटातील एक गाणं इथं चित्रित झालं आहे.
     
            आजही तळ्याच्या पाण्यामध्ये झाडांची खोडं भूकंपाची साक्ष देत  उभी आहेत
हे तळ खूपच विलोभनीय आहे पण त्याला एक दुःखाची किनार आहे.  शापित सौंदर्य कशाला  म्हणतात ते हे तळ पाहून लक्षात येतं.
     इथे लोक वस्ती होती. 1950 ला झालेल्या भूकंपात इथली वस्ती पूर्णपणे नष्ट झाली आणि या तळ्याचा उगम झाला, विशेष म्हणजे या गावातील शिवमंदिर  कोणतीही हानी न होता आजही सुस्थितीत आहे.  आर्मीचे जवान या मंदिरात दररोज पूजाअर्चा करतात.
पर्यटकांसाठी भारतीय आर्मीने येथे एक कॅफे सुरू केलेले आहे.  हुडहुडी भरणाऱ्या थंडीत वाफाळता चहा आणि गरम नाश्ता कोणाला आवडणार नाही? खाण्याबरोबरच येथील मिलिटरी कॅन्टीन मध्ये खरेदीचाही आनंद लुटता येतो. डिसेंबर - जानेवारी मध्ये हे तळ पूर्णपणे बर्फाने आच्छादलेले असते.  वेळेचे भान राखत एक तास  आपण इथे घालवू शकतो.
                हे सर्व पाहण्या साठी आम्हाला साधारण दिड-दोन वाजले. आमचा तवांग कडे परतीचा प्रवास सुरू झाला . या परतीच्या प्रवासात आपल्याला बुद्धाचा सुबक, सुंदर असा मोठा पुतळा पहावयास मिळतो.
               
                                                                   
              
                पाच वाजत आले होते अंधार पडायला लागलेला. काल आम्ही तवांग वॉर मेमोरियल लाईट अंड साऊंड शो पाहिला
आता आम्ही तवांग वर मेमोरियल पाहण्यासाठी निघालो.

 तवांग वॉर मेमोरियल  :-

         येथे 1962 मध्ये झालेल्या भारत -चीन युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे फोटो, त्यांना  मरणोत्तर मिळालेली पारितोषिके ते वापरत असलेले साहित्य, शस्त्र इत्यादी  वस्तूंचा संग्रह आहे . आमच्या शोर शहीद जवानांना अभिवादन करून आम्ही होम स्टे वर परत आलो.
                     

                   # अतुल्य भारत नयनरम्य भारत #

 

तवांग मॉनेस्ट्री  *  भाग-३

२९/११/२०१९

   
   भारताच्या ईशान्य कोपऱ्यात असलेला हा प्रदेश   भूतान  व तिबेट यांच्या सीमा रेषांनी वेढलेला आहे.    समुद्रसपाटीपासून 3048 मी उंचीवर स्थित आहे . 'लामांची भूमी ' अशीही त्याची ओळख आहे.  तिबेटियन  लामा  लॉड्रे यांनी १६८१  मध्ये पाचवे दलाई लामांच्या  इच्छेखातर ही गोंपा उभा केली.  तवांग हा तिबेटियन शब्द असून त्याचा अर्थ 'घोड्याने निवडलेली जागा '. याची  एक अख्यायिका आहे.  मठ  बांधण्यासाठी जागेच्या शोधात लामा  लॉड्रे   घोड्यावरून तिबेटमधून इथे आले आणि इथे त्यांचा घोडा थांबला तो पुढे जाईच ना. हाच ईश्वरी संकेत मानून  त्याच जागेवर  बौद्ध मठाची स्थापना झाली म्हणून याला तवांग म्हणतात.  तिबेटचे सहावे लामा यांचा जन्म येथे झाला म्हणून   बौद्ध लोकांसाठी हा मठ अति महत्त्वाचा आहे . जगातील नंबर दोन चा मोठा असा हा बौद्ध मठ  आहे . नंबर एक चा मोठा मठ तिबेटमधील ल्हासा येथे आहे . 
     १६ व्या शतकाचा इतिहास असलेली ही इमारत गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विस्तारली  आहे. इमारतीच्या एका भागात बौद्ध लामा वापरत असलेल्या वस्तू, कपडे, शस्त्र,   यांचे संग्रहालय आहे पर्यटकांनी ते आवर्जून पहावं.  येथे बौद्ध मुलांची रहिवासी शाळा आहे.पाठ्य पुस्तका व्यतिरिक्त त्यांना बोधिसत्वाची शिकवणही येथे दिली जाते. मठाला भेट देण्याची आमची वेळ आणि मुलांच्या शाळेची प्रार्थनेची वेळ एकत्र आल्यामुळे आम्ही त्यांच्या प्रार्थनेला हजर राहिलो. प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रगीत म्हटलं आणि अक्षरशः आमच्या अंगावर रोमांच शहारले. अभिमानाने  मन भरून आलं.
                   
                           छोटा लामा विद्यार्थीदशेत

                        तवांग मॉनेस्ट्री मधील मुलांची शाळा
                     
                       प्रार्थना म्हणताना छोटे लामा
          जानेवारी महिन्यातील  वार्षिक 'तोर्जिया ' उत्सव लामांच्या  मुखवटा नृत्यासाठी प्रसिद्ध आहे .   इथून साधारण  आठ- नऊ किमी अंतरावर ऍनि गोम्पा  (मॉनेस्ट्री )आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त महिला लामा  साठी आहे. महिला लामा म्हणजेच  साधवी. या ब्रह्मचर्य जीवन जगतात .   तसेच ध्यान-धारणा व साधना यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करतात. वेळेअभावी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही त्याची हुरहूर आजही मनाला जाणवते.
            आम्ही आत्ता तवांग मधून बाहेर पडून दिरांग या गावी मुक्कामाला जाणार होतो . अंतर  134 किमी आणि लागणारा वेळ साधारण साडेचार  तासांचा होता. या प्रवासात वाटेत आवर्जून पाहण्यासारखा आणि अजून पर्यटकांना फारसा माहीत नसलेला 'नूरनांग धबधबा' आहे. तवांग पासून तो  ३३ किमी अंतरावर आहे. वाटेत जंग किंवा जुंग गावापासून दोन किमी अंतरावर हा धबधबा आहे. नूरनांग नदीचा प्रवाह तवांग नदीत मिळताना निर्माण झालेला  हा धबधबा 100 मीटर उंचीचा आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्यावर हायड्रोलिक प्लांट उभा केलेला आहे आणि त्याद्वारे स्थानिक लोकांची विजेची गरज भागवली जाते.

                             नूरनांग धबधबा
          
कॅमेऱ्यात कैद केलेले इंद्रधनुष्य

            आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता.
पडणारे पाणी इतकं वेगाने पडत होतं की तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांचा मारा तुम्हाला लांबूनच भिजवतो.  बऱ्याच वेळा काही गोष्टी ठरवून सुद्धा होत नाहीत पण अनपेक्षितपणे त्या घडल्या की जो आनंद होतो तो गगनात मावत नाही.आणि असाच गगनात न मावणारा आनंद आम्ही अनुभवला . याची देही याची डोळा पाहिला.आम्हाला आज जमिनीवर इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. धबधब्याचे पडणारे पाणी,  त्याचे उडणारे तुषार आणि सूर्यकिरणांचा संयोग होऊन आम्हाला अप्रतिम असं इंद्रधनुष्य पाहायला, अनुभवायला मिळालं. ते कॅमेऱ्यात कैद करताना इथून करू का तिथून करू या कोनातून करू का त्या कोनातून करू अशी अवस्था झाली. पण मनःपटलावर कोरलेलं ते इंद्रधनुष्य आजही मला खुणावत.
             

            वेळेचे भान ठेवून आम्ही धबधब्याचा व्यथित मनाने  निरोप घेतला आणि दिरांग साठी गाडीत बसलो.

 दिरांग मध्ये पाहण्यासारखे-:

१) नॅशनल रिसर्च सेंटर ऑन याक -
२) दिरांग मॉनेस्ट्री
३) गरम पाण्याचे झरे
४) कालचक्र गोम्पा
५) संगती व्हॅली

      गरम पाण्याचे झरे :-

            दिरांग गावात जाण्याअगोदर रस्त्याच्या डाव्या बाजूला 'दिरांग गरम पाण्याचे झरे' असा बोर्ड आहे. थोड्या उतारावर दिरांग नदीच्या काठी  गरम पाण्याचा प्रवाह येतो. ते पाणी कुंड वजा चौकोनात साठवले जाते. पर्यटक येथे गरम पाण्यात स्नान करून आपला प्रवासाचा कंटाळा घालवू इच्छितात. खूप उत्साहाने गेलेलो. मस्त गारठा होता आणि आंघोळीची तीव्र इच्छा होती पण प्रथमच ह्या पूर्ण टूरमध्ये इथे आमची निराशा झाली. गरम पाण्याच्या कुंडाची अवस्था बघून मन विषण्ण झाले.
  रिकाम्या पाण्याच्या बाटल्या,दारूच्या बाटल्या, खाण्याच्या वस्तूंचे प्लास्टिकचे वेस्टन आणि बरच काही अक्षरशः उकिरडा झाला होता. गावातली तरणीताठी मुलं तिथेच आंघोळी करत होती.मनात विचार आला हीच आपली तरुण पिढी तिच्या जोरावर आपण जागतिक स्तरावर उंच उड्या घेणार आहोत. पंतप्रधान  मोदींचं स्वच्छता अभियान बहुतेक इथं माहीत नसाव. उलट्या पावली माघारी फिरलो आणि गावाच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
             अंधार दाटून यायला लागला होता. आजचा आमचा होम स्टे ' Gonpolak Homestay'  आधीच बुक केलेला होता. इथल्या रूम खूपच मोठ्या होत्या . खरंतर हा होमस्टे वाटतच नव्हता हॉटेलचे रूप होते. गाव छानस टुमदार होतं. निसर्गानं आपलं कौशल्य पणाला लावून त्याला सजवलेलं होतं. होम स्टे च्या हॉलमध्ये छोटीशी लायब्ररी होती. फोटो आणि कलात्मक वस्तूंचा संग्रह होता. घरमालकांची बाजूलाच 'किवी' ची बाग होती.
             
           
                       प्रवासात रस्त्यावर आलेले ढग
                      दिरांग मधील आमचा होम स्टे
वाळण्यासाठी ठेवलेली मक्याची कणसे
                    डोंगर उतारावर केलेली शेती
पहाटे झाडाच्या शेंड्यावर थव्याने बसलेले पक्षी

             आपल्या नेहमीच्या घाई गडबडीच्या, धकाधकीच्या  बिझी शेड्युलमधून निवांतपणे  निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर पर्यटकांनी  दिरांगला भेट द्यावी .
                         
           डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले सुंदर शांत गाव
 

झिरो व्हॅली - अरुणाचल प्रदेश

                             
                        
                       
                                  
              २२ नोव्हेंबर . पहाटे पाचला ट्रेन नहरलागुन स्टेशनवर पोहोचली हे अरुणाचलमधील गाव आहे इथे  पर्यटकांना  अरुणाचल प्रदेश मध्ये एन्ट्री करण्यासाठी इनर लाईन परमिट घ्यावं लागतं. त्यासाठी रेल्वे स्टेशनवर फारच चांगली सोय केलेली आहे पंधरा मिनिटात प्रवाशांना इनर लाईन परमिट मिळतं. झिरो व्हॅली येथून १०० कि. मी. आहे. गाडीने हे अंतर पार करायला आम्हाला साडेपाच  तास लागले कारण रस्ता खूप खराब होता. येथे आमचा  होम स्टे होता. आमचे होस्ट ' कागो' स्वतः आपाथानी होता  .विनंतीवरून  त्याने आम्हाला त्याच्या घरी नेले  आणि जागतिक वारसा लाभलेल्या आपाथानी लोकांना जवळून भेटण्याचा , अनुभवण्याचा आम्हाला आनंद मिळाला.
              जागतिक वारसा लाभलेली ही झिरो घाटी अरुणाचल प्रदेश च्या लोअर सुबानसिरी  जिल्ह्यात स्थित आहे. येथे आसाम मध्ये असणाऱ्या  आदिवासी जनजाति पैकी तीन नंबर चा 'आपाथानी  ' समुदाय वास्तव्य करून आहे.
 
             चहूबाजूंनी हिरव्या गार डोंगर रांगांमध्ये हा  एखाद्या बशी सारखा दिसतो. डोंगरावरची ही झाडं इतकी खचाखच भरलेली आहे कि डोंगराची फूटभर जमीन सुद्धा दिसत नाही. डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर आलेल्या मातीमुळे हा प्रदेश सुपीक बनला आहे. याचा पुरेपूर फायदा या लोकांनी भाताची शेती व मत्स्य पालन करण्यासाठी केला आहे.कोणत्याही प्रकारचं आधुनिक अवजार व रासायनिक खत न वापरता ते शेती करतात. तरी देखील त्यांचं शेती उत्पन्न स्थिर आहे. अजब म्हणजे भाताच्या शेतीत माशांचे संवर्धन करतात.
       
  शेतातून आलेले धान्य ते आपल्या घरी साठवत नाहीत तर वस्तीच्या सुरुवातीला त्यासाठी काही घरे बांधलेली असतात त्यामध्ये त्याची साठवणूक केली जाते . अपघाती आग लागून नुकसान झालं तर धान्य तरी वाचावं सुरक्षित रहावे यासाठी केलेली ही  तरतूद आहे.
      आपाथानी  लोकांनी आपला शेतीचा परंपरागत वारसा संपूर्ण जगासमोर ठेवला आहे. त्यांनी सर्व जगाला  निसर्गाला हानी न पोहोचवता आपल्या जगण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कसा करायचा याचा आदर्श दिला आहे.   आजच्या आधुनिक काळात सुद्धा आपाथानी आपले राखीव जंगल तोडत नाहीत तर  संवर्धन करतात. मला वाचलेलं आठवतंय पूर्वी आपल्याकडे गावाच्या सभोवती राखीव जंगल असायच त्याला 'देवराई ' म्हणत त्यातील झाडं देवाची आणि ती कापण्याला सक्त मनाई असायची. पण सध्या आधुनिकतेच्या नावावर आणि वाढत्या लोकसंख्येमुळे या सगळ्या देवराया आपण नष्ट  केल्या आहेत.
        हे लोक सूर्य आणि चंद्र यांची उपासना करतात. इतर आदिवासी समाजा सारखे स्थलांतर करत नाहीत. ते स्थिर या जागी टिकून आहेत. ते स्वतःला तिबेटियन वंशाचे समजतात. येथे वेत -बांबू विपुल प्रमाणात मिळतो त्याचा पुरेपूर वापर त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात केला आहे. यांची पारंपारिक घरं बांबूची एका लांबलचक खोलीची असतात .दोन घरांमध्ये अंतर असतं . घराचा खालचा भाग डुकरं ,कोंबड्या,बदकं, कुत्री यांच्या या साठी रिकामा असतो.  घरात जाण्यासाठी बांबूच्या पायऱ्या बनवलेल्या असतात . घराच्या मध्यभागी चुल असते  तिच्यावर लाकडं ठेवण्याची सुविधा असते तिथेच हे लोक स्वयंपाक करतात जेवतात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतात आणि रात्री तिथेच झोपतात
पाहुण्यांचे स्वागत ते काळा चहा देऊन करतात   यात मिरी आणि तमालपत्र यांचा वापर केलेला असतो .लोक गाई पाळतात पण त्यांच्या दुधाचा वापर करत नाहीत. घरा मध्ये त्यांचा वावर नसतो. त्यांच्या गाई जंगलात असतात.प्रत्येक कुटुंबाची आपापल्या प्राण्याच्या कानाला एक खूण असते त्यावरुन ते आपापले प्राणी ओळखतात.  त्यां याशिवाय हे लोक घरीच तांदळाची दारू बनवतात, पाहुणचारासाठी याचा सर्रास वापर केला जातो. भात हे यांचे मुख्य अन्न आहे भाताबरोबर वेगवेगळ्या प्राण्यांच मास ते खातात अगदी उंदीर, माकड, पक्षी यांचा त्यात समावेश असतो. ऐकून पोटात ढवळलं . पारंपारिक सणाच्या दिवशी सर्व लोक एकत्र येऊन मिथुन , गाय यांचा देवाला बळी देतात. 
         
  .
         



 

यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा आपाथानी महिला. चेहऱ्या च्या  कपाळ, नाक, हनुवटी या भागांवर गोंदलेल असतं आणि दोन्ही नाकपुड्यात  लाकडाच्या चमक्या असतात. चमकी चा आकार साधारण आपल्या रूपयाच्या नाण्या एवढा असतो.१९७० सालापासून ही प्रथा बंद झाली आहे. ही प्रथा कशासाठी होती त्याचं  ठोस कारण कोणी सांगू शकत नाही पण या जमातीच्या महिलांना कुणी पळवून नेऊ  नये म्हणून त्यांना असा विद्रूप करत असं बोललं जातं.
               आपाथानी महिला कष्टाळू आहेत. सकाळी घरातला स्वयंपाक आवरून त्या सहा -साडेसहाला बांबूच्या बास्केटमध्ये आपलं जेवण घेऊन शेतात जातात . शेती आणि घर यामध्ये यांचे योगदान मोठे आहे. विशेष म्हणजे इथली एक महिला IAS ऑफिसर झाली आहे तर बऱ्याच महिला इंडियन फॉरेस्ट सर्विस मध्ये नोकरीला आहेत.
            झिरो व्हॅली म्हणजे सात खेड्यांचा समूह आहे.  दरवर्षी एका वस्तीला सण साजरा करण्याचा मान मिळतो.  मार्च च्या शेवटी त्यांचा  फ्रेंडशिप फेस्टिवल असतो सध्या आपण साजरा करतो तो एका दिवसाचा असतो पण हा पूर्ण एका महिन्याचा असतो.  सप्टेंबर मध्ये झिरो संगीत महोत्सव असतो त्यावेळी तिथे देशभरातील गायक आलेले असतात. महिला व पुरुष रंगीबेरंगी परंपरागत कपडे घालून, गळ्यात रंगीत मण्यांच्या माळा घालून लोकनृत्य करतात .  पूर्वी बालविवाहाची पद्धत होती पण आता ती नष्ट झाली आहे.  सध्या सर्रास प्रेमविवाह होत आहेत. छोट्या छोट्या प्रश्नांसाठी ते कोर्टकचेऱ्या न करता गावातील पंचायतीचा निर्णय मान्य करतात.
              या लोकांची बोलीभाषा आपाथानी आहे  पण त्याची लिपी नाही. याशिवाय त्यांना हिंदी आणि इंग्लिश चे ही ज्ञान आहे सध्या आधुनिक  जगाशी ते एकरूप होताना दिसतात पण आपल्या  निसर्गाशी प्रतारणा न करता.
            


  कागो, त्याच्या काकी, त्याची आई, त्याची भावंडे या सगळ्यांनी आमचं आदरातिथ्य केलं त्यांच्या त्या आपलेपणा मूळ आम्ही भारावून गेलो.  कागो ची मोठी बहीण 'बुधी ' लग्नानंतर दिल्लीत वास्तव्य करून आहे. तर धाकटी बहीण गुवाहटी ला नर्सिंगचा कोर्स करत आहे. त्याच्या आईने आम्हाला तिचे पारंपारिक कपडे आणि दगडी मण्यांचे दागिने दाखवले त्यातील एका मन्या ची किंमत दोन ते तीन हजार रुपयापर्यंत असते.  गप्पा मारण्यात दोन-अडीच तास कसे गेले समजलं नाही.शेवटी जड मनाने आम्ही त्यांचा निरोप घेतला.
             आज आम्ही अशा ठिकाणी आलो होतो की आम्हाला व्हेज फूड मिळणं मुश्किल होतं. आम्ही आमच्या होमस्टे वर येऊन तिथलं किचन ताब्यात घेऊन आमच्या बरोबर असलेल्या तांदळाचा छानसा मसालेभात करून खाल्ला. होम स्टे घेतलेल्या चा हा एक फायदा असतो.
*आवर्जून पाहण्यासारखी आणखी काही ठिकाणे
१) टॅली व्हॅली वाइल्डलाइफ  सेंचुरी.
२)  सिद्धनाथ टेम्पल --- जगातील सर्वात मोठे स्वयंभू शिवलिंग.
३). किले पाखो _ झिरो पासून सात किलोमीटरवर हा स्पॉट आहे इथून एका बाजूला झिरो तर दुसर्‍या बाजूला  ंहिमालयातील बर्फाच्छादित शिखरे दिसतात.
४) टीपी ऑर्चिड रिसर्च सेंटर- निसर्ग आणि मानवाचा सुंदर मेळ येथे पाहायला मिळतो
५) झिरो पुतोर- भारताच्या स्वातंत्र्यानंतर ची पहिली सैन्य छावणी येथे आहे.
 ६) मेघना केव्ह टेम्पल   - शंकराचं मंदिर.   
                                                        सुनिता शहा
 






No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...