Sunday, September 27, 2020

हिमशिखरांच्या सानिध्यात - केदारताल ट्रेक

 


मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी 

      मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळींनी मनात घर केलेले. १४,२३८ फुटांच्या उंचीवरील केदारखरकला आमचा शेवटचा कॅम्प लागलेला. दुपार नंतर धुवांधार स्नोफॉलला सुरवात झालेली. सर्वांनी आयुष्यातील पहिल्यांदाच स्नोफॉलचा बेधूंद आनंद घेतला पण उद्याच्या केदारताल ट्रेकच्या आमच्या समिटावर बर्फाचे गडद ढग जमा झालेले. माउंट थलाईसागर आणि माउंट भ्रिगुपंथ हे एकापेक्षा एक बलाढ्य पर्वत उशाशी असल्यासारखे, टेन्ट मधील चुळबुळ चालूच होती. इतक्या उंचीवर एकसलग झोप कधी लागतच नाही. घट्ट स्लीपिंग बॅग मध्ये कूस बदलून झोपायचे सोंग आणायचे. गेली ३ रात्र झोपेच खोबर झालेले. थंडी इरेला पेटलेली. तंबूवर साचेलेला बर्फ काढण्यासाठी सपोर्ट टीम मधील दीपक दर दोन तासाने तंबू गदागदा हलवायचा आणि पुन्हा झोपेचे तुणतुणे वाजायचे. 
 स्लीपिंग बॅग मधून आवाज दिला - दीपक भाई सो जा.... 
नही सर, बर्फ नहीं निकाला तो कल आप यहा सो नही पायेंगे.. दीपक! 
हलव बाबा! जोरात हलव पण उद्या झोप झाली पाहिजे. 
इतके दिवस केलेली तयारी, २ दिवसांची अशक्यप्राय चढाई सगळ भरभर डोळ्यासमोरून सरकत होतं. 
निसर्गदेवता पावणार का ? 
उद्या स्नोफॉल थांबणार का ? 
केदारताल समिट होणार का ? 
     अश्या असंख्य प्रश्नावळीसह उजाडण्याची वाट पाहू लागलो. 


      उद्याची पाने उलगडताना मागच्या काही दिवसांकडे जावू. असंख्य चर्चासत्रांच्या अखेरीस "केदारताल" हा कमी दिवसांचा पण आव्हानात्मक ट्रेक करायचा हे ठरलं. गंगोत्रीपासून चालू होणारा हा "केदारताल" ट्रेक कठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या एकसंघ चढाईने कसलेल्या गिर्यारोहकांसाठी एक नेहमी आव्हान आहे. एक दोन हिमालय ट्रेक झाल्यावर स्वतःला पुश करून आपली ताकद अनुभवायची असल्यास ह्या ट्रेकसारखा दुसरा चांगला पर्याय नाही. नावातच ताल असलेल्या ट्रेकमध्ये ह्या तलावाजवळ आपला ट्रेक संपतो. ज्याची उंची समुद्रसपाटीपासून १५,४८५ फूट आहे. आजूबाजूच्या माउंट थलाईसागर, माउंट भ्रिगुपंथ, मंदा पर्वत, माउंट जोगीण, माउंट गंगोत्री असे एकापेक्षा एक बलाढ्य पर्वतांच्या सानिध्यात हा ट्रेक म्हणजे एक आगळी वेगळी पर्वणीच. म्हणूनच ब्लॉगचं शीर्षक "हिमशिखरांच्या सानिध्यात - केदारताल" ट्रेक असं सहज सुचून गेले. बस प्लॅन झाला तिकिट्स बुक झाल्या उत्तरकाशीतील सौरभला लीडर म्हणून नेमला. सगळ्या तयाऱ्या झाल्या. 
       इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. वजन तर चंद्राच्या कलेकलेने वाढलेले, खा अजून मिसळ. दणकट ट्रेक पण कमी झालेले. नको म्हणायला तळजाई टेकडी २०-२५ दिवस पळालो. तेवढाच काय तो आधार. दिल्लीत काही राहिलेली ठिकाणे उडवून टाकू म्हणून दुरांतो एक्स्प्रेस साठी १७ मे ला पुणे स्टेशन गाठले. बाकी उनाड टीम थेट डेहराडूनला विमानानेयेणार असल्याने पहिले २ दिवस एकला चलोरे प्रवास होता. गरमागरम वातावरणातून गारेगार थंडीत जाणार हि कल्पनाच सुखावणारी होती. दुरांतोचे शाही सुख अनभवून १८ दिल्लीत पोहचलो. हि गाडी मला फारच आवडते. कित्येकवेळ पुणे दिल्ली प्रवास मी हिच्यातून केला आहे. दिल्लीत आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्याने आज जरा सुखावह वातावरण होते. डेहराडून ला जाण्यासाठी रात्रीची बस असल्याने दिवस मोकळा होता. म्हणजे नियोजनच आखीव रेखीव होते. आधी पाहिलेली ठिकाणे वगळून आज नवी भटकंती करण्याचा बेत होता. थेट पहाडगंज चे युथ होस्टेल गाठले. ४५० रुपयात एक दिवस डॉरमेंटरी उपलब्ध असतात. आपल्या सारख्या घुमक्कड लोकांना परवडेबल. बॅग टाकून सर्वात आधी सालाबाद प्रमाणे पराठेवाली गल्ली गाठली. पोटोबाला नैवद्य दाखवून मनशांती केल्यावर लालकिल्ल्यासामोरून राजघाट गाठले. यमुना नदीच्या काठावर हे महात्मा गांधी ह्यांचे समाधीस्थळ. फार काही लिहीत नाही. गुगलवर आहे सर्व. 
पुढचे ठिकाण उबेरच्या मदतीने अक्षरधाम गाठले. अत्यंत कडक सुरक्षेसह आणि स्वतःच्या "लै" तपासण्या पार करून मंदिरात प्रवेश केला. ज्योतिर्धर भगवान स्वामिनारायण ह्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ बांधलेले हे मंदिर आज जगात सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंदलेले आहे. पुढील मोर्चा सफदरजंग टोम्ब कडे वळवला. शेवटचा मोगल बादशहा मोहम्मद शाह ह्याचा प्रधान सेवक सफदरजंग त्याची ही समाधी. हायला समाध्या पण कैच्या कै भव्य. चिक्कार पैसा संपवायचा कुठं. असो! मोगल वास्तुकलेचा अप्रतिम नमुना. एकटाच उनाडक्या चालू असल्याने दिवसभरातील आखाडे एकदम वेळेत आणि सुखासुखी पार पडत होते. सोलो ट्रिप मला आवडत नसली तरी प्रवासाच्या बाबतीतले असे प्रकार आयुष्यात एकदा अनुभवायला हरकत नाही. 
       पुढील ठिकाण पुराना किल्ला. गेली दोन वर्ष हा किल्ला हुलकावणी देत होता. अखेर त्याच्या प्रवेशद्वारावर धड्कलोच. इसवी सन पूर्व १४०० वर्षांपूर्वी पांडवांचे इंद्रप्रस्थ इथे होते असे हिंदू साहित्य सांगते अर्थात ठोस पुरावे नाहीत. अफगाण राज्यकर्ता शेरशाह सूरी यांनी १५३८ ते १५४५. दरम्यान हा किल्ला बनवला. मोगल बादशाह हुमायूंचा ह्या गडावरून पडल्यामुळे चुकून मृत्यू झाला असेही म्हटले जाते.(संदर्भ: विकिपीडिया) बाकी किल्ला खूप मोठा आहे. खूप पाहण्यासारखे आहे, प्रेमी युगलांसाठी पण भरपूर कोपरे आणि मोठमोठी झाडे आहेत. त्यांना नजरेआड केल्यास किल्ला तुम्हाला जुन्या काळात न्यायला कुठेही कमी पडत नाही. अर्कीयोलोजीचे उत्तम काम. त्याच कौतुक करत बाहेर आलो. ४ वाजले होते. हिटलिस्ट वरील तुघलकाबाद किल्ला हे ठिकाण फक्त बाकी होते. ते इथून २६ किमी लांब असल्याने मग आळस केला आखिर मन को संभालो बोलत पुन्हा होस्टेल गाठले. संध्याकाळी दणकून जेवण करून काश्मिरी गेटला बस पकडली आणि झोपेतच कधी डेहराडून आले कळलेच नाही. 
       वातावरणात गरमी होती. आज सर्व उनाड एकत्र भेटणार हे मोठे सुख होते. चांडाळ मंडळी एकत्र आली कि जो माहोल बनतो त्याला कोणती व्याख्या देता येणार नाही. गेले २ दिवस एकटाच येड्यागत फिरत होतो. सकाळी ७ वा. येणारी उनाड टीम आधी साडे आठ आणि नंतर ११ ला पोहोचणार असा मेसेज धडकला. विमानाने वाटोळं केलं. आता एवढा वेळ काय करायचा ह्याचे कोडं सोडवताना रेल्वे स्टेशन गाठले इथ भाल्याचा हॉस्टेल मित्र यशवंतला भेटलो. तो बंगळूर हुन आलेला. इथून पुढे तो केदारताल ट्रेकसाठी सहभागी होणार होता. पाच सहा ठिकाणे चाळल्यावर Mindrolling Monastery पहायचे ठरले. Rigzin Terdak Lingpa ह्यांनी १६७६ मध्ये बांधले. मठात संपूर्ण तिबेटमधील निंग्मा विद्वान आणि योगी लोकांना प्रशिक्षण दिले जाते. 
      मिंड्रोलिंगमध्ये बौद्ध धर्मग्रंथ, खगोलशास्त्र, तिबेटी चंद्र कॅलेंडर, सुलेखन, वक्तृत्व आणि पारंपारिक तिबेटी औषध शिकण्यावर विशेष भर दिला जातो. अनेक मोठमोठे आकर्षक पुतळे, व्यवस्थित राखलेले गार्डन इथल्या परिसराचे शोभा वाढवणारे. आतमध्ये प्रवेश करण्याची वेळ साडे दहा होती तरी आमच्या निरागस चेहर्यांकडे पाहत वॉचमेन ने आत सोडले. मग काय अक्ख्या परिसरात आम्ही दोघेच उंदडलो. चिक्कार फोटो काढले. 
आता १० वाजत आलेले. पुन्हा डेहराडून स्टेशन गाठले, दणकून नाश्ता हाणला. एक मॅक्स गाडी बाकी टीमला आणायला एयरपोर्टला गेली आणि एक गाडी आम्हाला न्यायला आली. आम्ही एका पार्किंगच्या ठिकाणी बाकी टीमची वाट पाहत थांबलो. साडेअकराच्या सुमारास सगळे प्रगटले. गळाभेटी झाल्या आणि मोर्चा खादाडीकडे वळवला. एका हॉटेल ला पुरी भाजी दणकून खाऊन पुढे एका आईस्क्रीम च्या दुकानात डेहराडून प्रसिद्ध कुल्फी फालुदा वरपला. उनाड आणि खादाड हे समीकरण इथून पुढे लागू होणार होते त्याचा छोटासा टीजर होता. 
दोन मॅक्स मधून आमचा प्रवास वळणदार रस्त्यानी डेहराडून - मसुरी मार्गे प्रवासाला सुरवात झाली. हितल्या पर्वतनामध्ये एक वेगळीच जादू आहे. इतक्या लांबून येणे खर्चिक असले तरी वर्षातून एकदा तरी ह्या मोहमयी दुनियेत स्वतःला गुरफटवून घ्यावे इतक्या कमाल पर्वतरांगा आहेत. 
       तीव्र उताराच्या पर्वत राजीत देवदार वृक्षांची उंच झाडे नदीकाठ रेखत उभी. जिकडे पहावे तिकडे हिरवीगार झाडी लांबच लांब पसरलेले पर्वत. नदी गुळगुळीत दगडांनी यथेच्छ भरलेली. त्या आपटणाऱ्या पाण्याचे खळाळणारे संगीत मोहमयी. अगदी आनंदी मनासारखं. आकाशात अधांतरी उडणाऱ्या पक्षांचे मला नेहमीच कौतुक. निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवरचं ह्या चिरपल्लवी वनश्रीचा देखावा मोठा मनोहारी होता. कुठे एखादा सरळसोट कडा पर्वतापासून निखळलेला दिसायचा. गावामागून गावे जास्त होती. रस्ता सरळसोट नव्हता. अशी वळणावळणाच्या रस्त्यांची आता सवय झालेली. निमुळत्या रस्त्यावर सफाईदार चाललेली आमची मॅक्स गाडी. तिथल्या एकेरी रस्त्यावर समजूतदारपणा मागे पुढे करीत एकमेकाला केलेली मदत. अंध वळणावर केलेले ओव्हरटेक अंगळवणी पडायला लागलेले. दुसऱ्या गाडीतले पोरं ड्रायव्हरच्या हॉर्न वाजवण्याच्या नादाला वैतागलेले. बर्फात गुरफटलेला शिखरमाथा मग त्याखाली देवदार झाडांची गर्दी आणि सरळसोट उतरलेले कडे थेट सुसाट पाळणाऱ्या नदी जवळ विसावतात. आता सूर्य मावळीतला झुकू लागलेला. आकाशातील अद्भुत देखावे आता उठावदार भासू लागले. हि नागमोडी वळणे, हिरवीगार दाट झाडी, थंडीची सुरसुरी, डोंगरात दाटीवाटीने खेचक्या जागेत वसलेल्या वस्तीमधून लखलखणारे दिवे हे सारे देखण्यालायक. 
     आज आम्हाला खरतर राम तेरी गंगा मैली हो गयी मधील फेमस गाव आणि तो धबधबा स्पेशल 'हारशील' गाव गाठायचे होते. पण डेहराडूनला निघायलाच उशीर झाल्याने सौरभ ने हारसील च्या आधी २० किमी 'मल्ला' गावात राहण्याची सोय केली. सौरभ म्हणजे आमचा ट्रेकचा म्होरक्या. इथून पुढं त्याचंच ऐकावे लागणार होते. उत्तरकाशीमध्ये जन्मलेला - मोठा झालेला. इथल्या दर्या खोऱ्या तोंडपाठ. म्हणून त्याला निवडलेला. "अनटच हिमालया" नावाचा ग्रुप ने मोहिमा करतो. 
       प्रवासाचा क्षीण थोडा होताच. पण उत्साह ओसंडून वाहत होता. दोन गाड्यातून प्रवास झाल्याने संपूर्ण टीमची मैफिल अशी रंगलीच नव्हती. एका रूम मध्ये सगळे एकत्र भेटले आणि भट्टी जमली. थोड्या वेळाने सौरभ येऊन त्याची आणि त्याच्या सपोर्ट टीम ची ओळख करून दिली. ह्यात दीपक, सुरज आणि रघु असे होते. ह्यातला रघु म्हणजे कलंदर माणूस, ह्याची प्रचिती पुढच्या पाच दिवसात आली. उद्याच्या प्लॅन सांगितला. उद्या मल्ला येथून ३० किमी वर असलेल्या गंगान्हाणीला गरम कुंडात डुंबायचे आणि गंगोत्री गाठायचे. दिवसभर वातावरण जुळवाजुळवी करून पुढील फ्रेश मनाने ट्रेक सुरु करायचा. 
सकाळी आवराआवर करून झपकेदार वळणांच्या प्रवासाने गंगान्हाणी कुंड गाठले. मागे सतोपंथ ताल ट्रेकला बद्रीनाथला अश्याच कुंडात अंघोळ केली होती. त्याची आठवण झाली. हाय ह्यू हाय ह्यू करीत मस्त गरम पाण्यात यथेच्छ डुंबलो. काय सुख !!! 


फ्रेश होऊन रग्गड नाश्ता केला. आजपासून खाण्यापिण्याचा खर्च सौरीकडे इन्क्ल्युड असल्याने फुल्ल वसुली चालू झाली. पुढे दुपारच्या सुमारास ३४१५ मीटर उंचीवरील गंगोत्री गाठले. हिंदू धर्मियांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते आणि अनेक पौराणिक कथांमध्ये प्रसिद्ध असलेल्या गंगा नदीचा उगम होतो. मे जून महिन्यात चारधाम यात्रेनिमित्त इथली गर्दी थोडी वाढलेली होती. हॉटेलला बॅगा टेकल्या. थंडी फारशी नसली तरी जॅकेट शिवाय फेरफटका मारू शकत नव्हतो. दुपारचे जेवणे उरकून थोड्या विश्रांतीने प्रसन्न वातावरणात मंदिर दर्शनाला बाहेर आलो. असे म्हटले जाते की राजा भगीरथांनी आपल्या ६०००० पुत्रांच्या आत्म्यांच्या आत्म्यांच्या मोक्ष प्राप्ती साठी भगवान शंकराला प्रार्थना केली. शंकर प्रसन्न होऊन देवी गंगेला पाणी सोडण्याची विनंती केली, ज्याने भागीरथांच्या पुत्रांच्या अस्थी शुद्ध केल्या. या पौराणिक कथेने एखाद्याच्या आत्म्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठीचे साधन म्हणून गंगा नदीचे महत्व वाढले आहे. 
        खळाळणाऱ्या नदीचा मोहमयी सूर, भजनाचे सुरेल संगीत, मंदिरातील घंटानाद, मंदिरातील आरती, सुदर्शन पर्वताच्या मागून अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने भक्तिमय प्रसन्न वातावरणात रंगलो दंगलो. जेवणावळ उरकून अंथरुणावर पडलो तेव्हा गेले तीन दिवसांची उजळणी केली. इथून पुढच्या दिवसांत काय काय वाढून ठेवलेय हे त्या गंगामाईलाच ठाऊक. अजून एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार होती. ज्याची इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस फायनली उद्या उजाडणार होता. नव्या दिशेसह, एका नव्या स्वप्नांसह... ही एक वेगळीच नशा, बेहोशी चढवणारी. त्या निद्रेच्या अधीन कधी गेलो कळलेच नाही.
आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन. 

_________________________________________________________________________________________________

भेटू पुढे अखेरच्या थरारक भागात. तोपर्यंत वरील भागाच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

_________________________________________________________________________________________________


महत्त्वाच्या नोंदी: 
गंगोत्रीपासून चालू होणारा हा "केदारताल" ट्रेक कठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या एकसंघ चढाईने कसलेल्या गिर्यारोहकांसाठी एक नेहमी आव्हान आहे. 
एक दोन हिमालय ट्रेक झाल्यावर स्वतःला पुश करून आपली ताकद अनुभवायची असल्यास ह्या ट्रेकसारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
दिवस पहिला: पुणे ते दिल्ली दुरांतो प्रवास, दिल्ली दर्शन- आणि रात्री बसने डेहराडून. (ट्रेन पण सोयीची आहे. तिकीट सेम) 
दिवस दुसरा: डेहराडून ते मल्ला मॅक्स ने प्रवास 
दिवस तिसरा: मल्ला - गंगनानी - गंगोत्री 
दिवस चौथा: गंगोत्री - भोज खरक 
दिवस पाचवा: भोज खरक - केदार खरक 
दिवस सहावा: केदार खरक - केदार ताल - केदार खरक 
दिवस सातवा: केदार खरक - गंगोत्री 
दिवस आठवा: गंगोत्री - डेहराडून - डेहराडून - दिल्ली 
दिवस नववा: दिल्ली - पुणे 
__________________________________________________________________________

सर्वोत्तम काळ: मे - जून / सप्टेंबर - ऑक्टोबर
श्रेणी: कठीण 
उंची: १५४८५ फूट 
तापमान: दिवसा : १३* ते -३* 
रात्री: १* ते -१०* 
_______________________________________________________________

खर्च: हा ट्रेक उनाडचा असल्याने खर्चावर बंधन नव्हते, होऊद्या खर्च टाईप झालेले त्यामुळे आमचा ट्रेक खर्च इथे सांगत नाही. पण जर तुम्हाला करायचा असल्यासडेहराडून ते डेहराडून  १२००० ते १३००० मध्ये उत्तम सेवांसह ट्रेक होतो. 
ज्या व्यावसायिक संस्था आहेत त्यांच्या खर्चात पोर्टरची फी समाविष्ट नसते. शक्यतो पॅकेज घेताना विथ पोर्टर असे घ्यावे. प्रत्येक १० ते १५ जण जाणार असतील तर दोन लीडर फ्री असतात. ( अर्थात हे त्या ट्रेकिंग कंपनीच्या तत्वात असेल तर, पण आपण लावून धरायचं) 

महत्त्वाचं: हिमालय ट्रेकला खर्च हा होतोच पण मिळणारा अनुभव संपूर्ण आयुष्यभर पुरून उरेल इतका असतो. 
विंटर ट्रेक करीत असाल तर चांगले शूज - जॅकेट - थर्मल वेअर अशा महागड्या गोष्टी घ्याव्या लागतात, तर अशा वेळी आधी कोणी हिमालय ट्रेकला जाऊन आले असेल तर त्याच्याकडून मागून घ्यावे किंवा ट्रेक प्लॅन जर ३-४ महिन्यांनी असेल तर हळू हळू शॉपिंग करून घ्यावी म्हणजे ऐनवेळी आर्थिक बाजू कमजोर पडणार नाही.

सहभागी उनाड: केदार पाटील (केपी/रिंगमास्टर/चिडकू), प्रदीप वाघ (काका/ए हॅलो/नाईंटी स्पेशालिस्ट), गणेश कुंदापूरकर (मल्टी टॅलेंटेड) प्रज्योत शिरोडकर (गर्दी), आशय पाटील (गिर्यारोहणातील उभरते सितारे) राजेश्वर नवलपुरे (भाल्या/रोड रोलर/इंडियन ईडोल), निलेश वाघ(मागची सीट/शाकाहारी ते मांसाहारी कन्व्हर्ट वाघ्या), यशवंत रेड्डी (हुं हूँ हूँ) आणि देवा घाणेकर (स्वतः ब्लॉग लेखक) 

______________________________________________________________________









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...