Thursday, September 10, 2020

सफर तैवानची

मित्रांनो आज मी तैवानसारख्या बर्याचजणांना अपरिचित आणि अनवट अश्या भूप्रदेशाची (किंवा देशाची) ओळख करुन देणार आहे. तैवानमधल्या ५ वर्षांच्या वास्तव्यामध्ये तिथे पाहिलेल्या अनेक ठिकाणांची प्रचिंद्वारे ओळख करुन देण्याचा प्रयत्न राहील.
तैवान म्हटले कि आपल्याला आठवतो तो चीन, कारण चीन आणि जगातले बरेच देश तैवानला चीनचाच एक भाग मानतात. भारताच्याही अधिक्रुत धोरणानुसार हा चीनचाच एक भाग आहे. पण खरेपाहता चीनचा तैवानवर कोणत्याहीप्रकारे अंमल नाही. तैवानचे स्वत:चे सैन्यदल आहे, स्वत:चे करंसी आहे, स्वतंत्र सरकार आहे. बर्याच जणांचा गोंधळ होतो तो तैवानच्या नावाने, तैवानचे अधिक्रुत नाव आहे "रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा ROC आणि चीनचे "पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना" किंवा PRC. कम्युनिस्ट क्रांतीनंतर चीनचा नेता चैंग काय शेक च्या नेत्रुत्वाखाली तैवान मध्ये लोकशाही सरकारची स्थापना करण्यात आली आणि तैवानला खरा चीन घोषित करण्यात आले. अगदी १९७१ पर्यंत संयुक्त राष्ट्रांमध्ये तैवान चीनचे प्रतिनीधित्व करत होता, पण नंतर चीनच्या (तैवानमध्ये चीनला Main land china म्ह्णतात) वाढत्या प्रभावामुळे तैवानला ती जागा सोडावी लागली.

जगाच्या नकाशावर अगदी ठिपक्याप्रमाणे आणि पानाच्या आकाराचा हा देश नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. एकुण लोकसंख्या 23,061,689 असून त्याची राजधानी तैपेई (तेथल्या उच्चारांनुसार "थायपेई"), एक अतिशय सुंदर आणि आधुनिक शहर आहे. चाईनिज ही तेथील सरकारी कामकाजाची भाषा असूनसुध्दा Main land china ची चाईनिज आणि येथील चाईनिजमध्ये खूप फरक आहे जसे की, उच्चार, कांजी.

माझे वास्तव्य हे "व्हालियन" (Hualien) नावाच्या तैवानमधील सर्वात मोठ्या परगण्यात होते. व्हालियन हे शहर पूर्व किनार्यावरील सर्वात मोठे शहर आहे, पण पश्चिम किनार्यावरील ईतर शहरांच्यामानाने थोडेसे अविकसित आहे. कदाचित शहराला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहचू नये म्हणून हा निर्णय घेतला गेला असावा. व्हालियनला तैवानचे "स्वित्झर्लंड" म्हणतात (जरी इथे बर्फ पडत नसलातरीही), आणि हे कमी की काय म्हणुन आमचे विद्यापीठ ही तैवानचे सगळ्यात सुंदर विद्यापीठ म्हणुन गणले जाते. विस्तीर्ण अशा ५०० एकरवर हे विद्यापीठ पसरलेले आहे, चोहोबाजुंनी डोंगराने वेढलेला विद्यापीठाचा परिसर, वैशिष्ठयपूर्ण इमारती, मुबलकप्रमाणात हिरवळ आणि असलेले तळं ह्यामुळे विद्यापीठाच्या सौदर्यात भरच घातली आहे.
तर जास्त वर्णन न करता आता आपण प्रचि पाहुयात-
व्हालियन
व्हालियन रेल्वे स्थानक




शहरात मांडलेले अतरंगी बाकडी



शहराचा समुद्रकिनारा













माझे विद्यापीठ- विद्यापीठाची कार्यालयीन इमारत

















विद्यापीठाचे ग्रंथालय-






काही माहिती आणि प्रचि जालावरुन साभार....
 मूलनिवासींची सांस्क्रुतीक स्थित्यंतरे

हा भाग लिहीताना मला आमच्या विद्द्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ श्री. करीम फ्रेडमन* (Kerim Friedman) यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांचा मी आभारी आहे.
* ह्यांची बायको भारतीय आहे, आणि हे गुजरातेतल्या "छारा" जमातीवर भारतीय सरकार आणि पोलिसांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील रामोशी, पारधी जातींप्रमाणे या "छारा" जातीवर गुन्हेगार हा शिक्का ब्रिटीशांच्या काळापासून बसलेला आहे. तेव्हा गावात होणार्‍या प्रत्येक गुन्ह्यात ह्या जातीला दोषी मानले जाते, आणि पोलिस ह्या जातीतल्या लोकांना विनाचौकशी तुरुंगात टाकतात. श्री. करीम फ्रेडमन ह्यांनी ह्या जातीतील शिकलेल्या तरुणांना हातशी धरुन एक संस्था स्थापन केली आहे, जे त्यांच्यावर होणार्‍या अन्याय पथनाट्य, माहितीपट यांच्या माध्यमांतुन समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करतात.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मागच्या भागात बिपिनदाच्या सुचवनीनुसार तैवानच्या मूलनिवासींच्या संस्क्रुतीत, जीवनात बाह्यशक्तिंच्या (युरोपियन, चायनिज आणि जापानी) आक्रमणांमुळे आलेल्या स्थित्यंताराचा लेखा-जोखा ह्या भागात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एकुण तैवानच्या मूलनिवासींच्या लिखित इतिहासाचा विचार करता ह्या कालखंडाचे ढोबळमानाने तीन भाग पाडता येतील.
१) चीनी राजवटीचा कालखंड
२) जापानी राजवटीचा कालखंड
३) वर्तमान सरकारचा कालखंड
यावेगवेगळ्या कालखंडंची माहिती करुन घेण्याआधी आपण तैवानमध्ये असलेल्या आदिवासी टोळ्यांची माहिती करुन घेणार आहोत.
सरकार दरबारी अधिक्रुतरित्या १४ मूलनिवासी गट्/आदिवासी टोळ्यांना मान्यता देण्यात आली आहे, त्या पुढील प्रमाणे- अमी (Ami), अत्याल (Atayal), बुनून (Bunun), कवालान (Kavalan), पायवान (Paiwan), पुयुमा (Puyuma), रुकाय (Rukai), सैसियात (Saisiyat), ताव (Tao), झो (Thao), त्सोउ (Tsou), त्रुकू (Truku), साकिजाया (Sakizaya) आणि सेडिक (Sediq).
त्याशिवाय अनेक टोळ्या अशा आहेत की ज्यानां अजुन मान्यता मिळालेली नाही, त्यापुढील प्रमाणे-
बाबुझा (Babuza), बसाय (Basay), होआन्या (Hoanya), केतागालान (Ketagalan), लुईलांग (Luilang), माकाताव (Makatao), पाझेह/काझाबु (Pazeh/Kaxabu), पापोरा (Papora), क्वाक्वात (Qauqaut), सिराया (Siraya), तावकास (Taokas), त्रोबिवान (Trobiawan).
तैवानमधील मूलनिवासी टोळ्यांचे वितरण एकुण भूक्षेत्राचा विचार करता खालीलप्रमाणे-

(हा प्रचि विकिपीडियावरुन साभार)
सरकारच्या धोरणानुसार, तैवानमधील आदिवासी टोळ्यांची गणना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, त्यामध्ये आपल्या टोळीला अधिक्रुत करण्यासाठी सबंधित टोळीकडून पुरावे सादर करण्यास सांगितले गेले, जेणे करुन त्यांना काही सामाजिक आणि आर्थिक सवलती देता येतील. याप्रयत्नांतुन २००८ पर्यंत एकुण १४ टोळ्यांना मान्यता देण्यात आली. पण तैवानचा इतिहास पहाता कालौघातात कमी झालेली किंवा नामशेष झालेल्या टोळ्यांची संख्या, पुरेश्या कागद्पत्रांची अनुपलब्धता पहाता काही टोळ्या आजही मान्यतेसाठी झगडत आहेत.
एवढया छोटया बेटावर १४ आदिवासी टोळ्या, १४ भाषा, १४ वेगवेगळ्या संस्क्रुती (यात मान्यता नसलेल्या ईतर टोळ्यांची गणती केली नाही) गुण्यागोविंदाने रहात होत्या, ही खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे (भारतासारख्या खंडप्राय देशाशी तुलना करता).
१६-१७ शतकात युरोपियन आक्रमकांनी (पोर्तुगिज, डच, फ्रेंच, आणि स्पॅनिश) तैवानमध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानां काही प्रमाणाच्यावर यश आले नाही. पोर्तुगिज लोकांनी या बेटाच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडून याला "Ilha Formos" किंवा नुसते "फार्मोसा" असे नाव दिले. या युरोपियनांनी व्यापाराच्या हेतुने आपल्या वसाहती स्थापन केल्या परंतु स्थानिक आदिवासी आणि छिंग राजवटीच्या (Qing dynasty) विरोधापुढे त्यांना नमते घेउन आपला बाड-बिस्तरा गुंडाळावा लागला.
यापुढे आपण मुख्यविषयाकडे वळुन, वर नमूद केलेया वेगवेगळ्या कालखंडाची अनुक्रमे माहिती करुन घेउयात-
१) चीनी राजवटीचा कालखंड-
१६ व्या शतकात चीनी मुख्य भूमीवरुन (विशेषतः चीनच्या फुजियान (Fujian) आणि ग्वांगदोंग (Guangdon) प्रांतातुन) तैवानमध्ये स्थलांतरास सुरुवात झाली. मुख्यत्वे हे स्थलांतर झाले ते तैवानच्या पश्चिम किनार्‍यावर जो पूर्व किनार्‍याच्या तुलनेने जास्त सपाट आणि सुपिक होता. पण १८७४ च्या पूर्वी झालेले पूर्व किनार्‍यावर वसाहतीचे प्रयत्न अगदी मोजकी ठिकाणे (जसेकी व्हालियन (Hualien) आणि तायदोंग (Taidong)) सोडता निष्फळ ठरले. याला कारण तेथिल रोगराई आणि स्थानिक आदिवासींचा प्रतिकार. पण १८७४ मध्ये हे सर्व चित्र बदलले आणि हा भाग छिंग राजवटीच्या नजरेत भरला (या आधी राजवटीचे ह्या भागाकडे जाणुन-बुजून दुर्लक्ष करण्याचे धोरण होते, कारण एक तर हा सर्वात दुर्गम भाग होता, दुसरे म्हणजे येथे असणारे आदिवासी (यातल्या काही जमाती/टोळ्या नरभक्षकही होत्या) आणि त्यांच्या कडुन वेळोवेळी होणारे बंड आणि तिसरे म्हणजे मौल्यवान खनिजांचा अभाव, त्यामुळे राजवट ह्या भागापासुन शक्य तितके अंतर ठेवण्याचा प्रयत्न करी).
तीन वर्षांपूर्वी तैवानच्या दक्षिण-पूर्व भागात जापानच्या ओकिनावा भागातील एका जहाजाच्या वादळात झालेल्या मोडतोडीमूळे त्यातील सैनिकांनी/खलाश्यांनी तैवानच्या किनार्‍यावरिल मुदांशे (Mudanshe) गावात आश्रय घेतला पण त्याभागातील पायवान जमातीच्या हल्ल्यामध्ये ५४ जणांचा म्रुत्यू झाला, ह्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जापानच्या राजाने ३००० सैनिकांची तुकडी तैवानवर पाठवली. तसे तैवानचे व्यापारी मार्गांच्या संरक्षणाच्याद्रुष्टीने महत्व पहाता जापानचे आधीपासुनच याभूभागावर लक्ष होते आणि तो फक्त संधीची वाट पहात होता. पण बळी गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला भरपाई आणि सैन्यमोहीमेचा खर्च देण्याच्या बोलीवर छिंग राजाने यशस्वी तह केला आणि जापानच्या राजाने आपले सैन्य तैवानमधुन काढून घेतले. पण ह्या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी छिंग राजवटीने सैन्याच्या जोरावर हा भाग नियंत्रणात ठेवन्याचा प्रयत्न सुरु केला, आणि याचबरोबर चीनीलोकांच्या याभागात स्थिरीकरणावर भर देण्यात आला. चीनी लोकांना याभागात येण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली, यामध्ये जनावरे, शेतीसाठी लागनारी साधने आणि तीन वर्ष करांमधून सुट दिली. पण एकुण परिस्थिती पाहता हे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाही. तेव्हा राजाने ह्या आदिवासी गावांना बी-बियाणे, शेतीची साधने आणि मदत देण्याचा प्रयत्न करुन पाहीला. यात गावाला गावप्रमुख (Toumu) नेमन्यात आला, जो गावाच्या प्रशासनात राजवटीची मदत करेल. खुपदा या गावप्रमुखाला राजवटीच्या ईतर संपन्न शहारांची सहल घडवली जात असे जेणे करुन ह्या संपन्नतेने डोळे दिपून तो त्या आदिवासी टोळीला राजाचे अंकित करेल (ही युक्ती नंतर जापानी लोकांनीही वापरली).
१८८५ साली छिंग राजाने तैवानला एका स्वतंत्र परगण्याचा दर्जा देत लिउ मिंगचुवान (Liu Mingchuan) या सैन्याची पार्श्वभूमी असलेल्या अधिकार्‍याची गव्हर्नर म्हणुन नियुक्ती केली, ज्याची नीती सैन्याच्या जोरावर आदिवासींचे बंड/उपद्रव मोडण्याची होती. यामध्ये त्याने स्थानिक चीनी निवासींचीही मदत घेतली. या सर्वामागे त्याचा एक छुपा हेतु म्हणजे ह्या भागात वाढणारी कापराची झाडे (Camphor Trees) आणि त्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन याच्या निर्यातीवर सरकारची एकाधिकारशाही निर्माण करणे. कारण कापूर हे सोन्याइतकेच मौल्यवान होते ज्याचा उपयोग वेगवेगळ्या औषधींमध्ये, धार्मिक कार्यात, दारुगोळ्यात केला जात असे.
ह्यासर्व प्रयत्नात जागोजागी सैन्यचौक्या निर्माण केल्या गेल्या, आणि तथाकथित संस्कृतीकरणाच्या नावाखाली पोलिसांच्या देखरेखी खाली शाळा सुरु करण्यात आल्या. शाळेत कंन्फुशियन विचारसरणी आणि चीनी भाषा शिकवली जाउ लागली. पण मर्यादित आर्थिक मदत आणि कमी उपस्थिती यांमूळे या शाळा वर्षा दोन वर्षातच बंद पडल्या, आणि पुढे छिंग राजवटीच्या तैवान मधील पडावामूळे आदिवासींच्या या चीनीकरणाच्या प्रयत्नांना खीळ बसली.
२) जापानी राजवटीचा कालखंड-
१८९५ मध्ये छिंग राजाच्या पराभवानंतर तैवानवर जापान्यांचे राज्य प्रस्थापित झाले. त्यानंतरही १९०६ पर्यंत त्याना पूर्वकिनार्‍यावरील आदिवासींच्या संपूर्ण भागावर सत्ता काबिज करता आली नाही. यासाठी सरकारपुरस्क्रुत विकासाचा कार्यक्रम योजावा लागला (जसा छिंग राजवटीने राबवला होता), शतकाच्या तिसर्‍या दशकापर्यंत एकुण ३००० जापानी ह्या भागात निवास करु लागले, यासाठी त्यानां ५००० येन बक्षिशी देण्यात आली. या दरम्यान पश्चिम भागातील चीनी रहिवाश्यानांही ह्या भागात येण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले, या साठी पूर्व किनार्‍यावर दोन साखर कारखाने चालू करुन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या. बाजाराची हमी देउन त्यांना ह्या किनार्‍यावर उसाच्या शेतीसाठी जमिनींचे वाटप करुन तांत्रिक सहाय्य आणि खतांचा पुरवठा करण्यात आला. जापान सरकारने शेतीखाली नसलेल्या जमिनीची मालकी ही सरकारच्या नावाने घोषित केली आणि यावरुन स्थानिक आदिवासी आणि सरकार यांमध्ये असंतोष धुमसू लागला कारण या आदिवासींकडे त्यांच्या जमिनीच्या मालकीची कोणतीही कागदपत्रे नव्हती, आणि सरकारने देउ केलेल्या मुदतीतही आदिवासींनी आपल्या जमिनींच्या मालकीचा दावा केला नाही. (कारण जर दावा केला असता तर त्यांना त्याबदल्यात कर भरावा लागला असता). ह्यासर्व प्रकारामुळे आदिवासींकडून सरकारला प्रतिकार वाढू लागला. १९१५ मध्ये सैन्याच्या मदतीने हा उपद्रव मोडुन काढण्यात आला, ज्यात १०००० जापानी सैनिक, आणि अगणित आदिवासी युद्ध, भूकबळीने मारले गेले.
यानंतर छिंग राजवटीत वापरलेल्या युक्तीनुसार शिक्षणाच्या माध्यमातुन आदिवासींना आपलेसे करण्याचे धोरण अवलंबन्यात आले. यामध्ये त्यांना जापानी भाषा, अंकगणित, आणि जापानी संस्क्रुतीची तोंडओळख करुन दिली गेली. त्याचबरोबर शेती करण्यास शिकवले जेणेकरुन त्यामाध्यमातुन त्यांचा उपद्रव कमी करता येईल. जमातीतल्या जेष्ठांना जापानच्या सहलीवर नेण्यात आले (पुन्हा छिंग राजवटीची युक्ती).
जापानी राजवटीच्या काळात ख्रिश्चानीटीचा सहभाग अतिशय मर्यादीत होता. आदिवासींच्या श्रद्धांवर परिणाम करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशबंदीच्या सबबी खाली मिशनरींना त्याभागात जाण्यापासुन रोखण्यात आले. आदिवासींवर चाललेले अत्याचार कुणाही बाहेरच्या व्यक्तीने बघु नये हाही एक हेतु यामागे होता. तरीही बाहेरच्या जागाशी संबंध आलेल्या आदिवासी आणि आदिवासी युद्धबंदींच्या मार्फत थोडयाफार प्रमाणात ईसाइकरण चालुच होते (पुढे ह्याच मिशनर्‍यांच्या मार्फत चैग काय शेक अमेरिकेचा पाठींबा मिळवण्यात यशस्वी झाला).
पुढे १९३७ च्या चीन्-जापान युद्धानंतर आदिवासींच्या जापानीकरनाला वेग आला, कारण जापान्यांना पूर्ण तैवान आणि तेथील रहिवाश्यांना पूर्णपणे राजाचे मांडलिक करायचे होते. याधोरणा अंतर्गत प्रौढ साक्षरता वर्ग, सायंकालीन भाषा वर्ग सुरु करण्यात आले. इतकेच काय, त्यांना जापानी नावेही घेण्यासाठी, जापानी वेशभूषा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. जो जितका जापानी संस्क्रुतीनुसार वागेल त्याला तितक्या जास्त सवलती जाहीर करण्यात आल्या. दुसर्‍या महायुद्धातही तैवानी आदिवासींनी जापानच्या बाजुने एकदिलाने मदत केली. पुढे दुसर्या महायुद्धातील जापानच्या परभवानंतर तैवानवरील त्यांचे राज्य संपुष्टात आले.
३) वर्तमान सरकारचा कालखंड-
जापान्यांच्या पराभवानंतर आलेल्या चैंग काय शेक च्या सरकारने "माउंटन रिर्जव पॉलिसी" राबवून सर्व आदिवासींना मुख्य प्रवाहात सामिल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची सांस्क्रुतीक आस्मिता नष्ट करुन. एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्क्रुती हे धोरण अवलंबताना पद्द्तशीर पणे त्यांच्या सांस्क्रुतीक मुल्यांचे खच्चीकरण करण्यात आले. पण आदिवासींच्या अस्मितेचे पुनरुज्जीवन करण्यात मिशनर्‍यांचा खुप मोठा हातभार आहे. जापान्यांच्या राजवटीत धर्मप्रसारास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे निराश झालेले मिशनरी, चैंग काय शेकच्या राजवटीत नव्या जोमाने कामाला लागले. १९५० मध्ये संख्येने ३० च्या घरात असलेले मिशनरी १९५७ मध्ये ७०० पर्यंत जाउन पोहोचले. स्थानिक आदिवासींच्या मध्ये काम करणार्‍या मिशनर्‍यांनी त्यांना स्थानिक भाषांमध्ये (काही भाषा रोमन लिपीध्ये लिहून) बायबल देण्यास सुरुवात केली, की जे आधी कधीही झाले नव्ह्ते. यामुळे आदिवासींच्या भाषेला एक नवी ओळख मिळाली.
चैंग काय शेकने त्याच्या कोमिंतांग पार्टी (Kuomintang Party) च्या नेत्रुत्वाखाली, तैवानमध्ये कन्फ्युशियन विचार्-प्रसार, चीनी भाषेचा प्रसार आणि जापानी भाषेचा दैनंदीन जीवनातील वापर नष्ट करण्याचा विडाच उचलला होता. नंतर लगेचच "मार्शल लॉ" लागू करण्यात आला त्यामुळेतर आदिवासी संस्क्रुतीची आणखीनच गळचेपी वाढली (हा "मार्शल लॉ" पुढे अंदाजे चार दशके चालू होता. हा जगातला सर्वाधिक काल चाललेला मार्शल लॉ आहे). पुढे १९८७ मध्ये "मार्शल लॉ" संपल्यानंतर पुन्हा एकदा आदिवासींच्या सांस्क्रुतिक चळवळीने उचल खाल्ली. एव्हाना खुपसे आदिवासी, उच्च शिक्षण घेवून आपल्या सांस्क्रुतिक मुल्यांच्या संपन्नतेची जाणीव झालेले आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा विचार घेउन, त्यासाठी चळवळ उभारण्याच्या कामाला लगलेले होते (यात चर्चचा सिंहाचा वाटा आहे). त्यातुन १९८४ मध्ये "Taiwan Aboriginal People's Movement" चा जन्म झाला. याच्या माध्यमातुन आदिवासींना बरोबरीचे हक्क, सरकारने घेतलेल्या त्यांच्या जमिनी परत करणे, राजकारणात इतरांच्या बरोबरीने समावेश करणे, तैवानमध्येच प्रत्येक टोळीच्या संख्येच्या प्रमाणात स्वायत्त भूप्रदेश देणे यांसारख्या मागण्यांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा लढा चालू आहे.
माझ्या तैवानमधील वास्तव्यादरम्यान या आदिवासीं लोकांशी झालेल्या संवादामध्ये मला त्यांचा त्यांच्या संस्क्रुतीविषयी खुप अभिमान जाणवला. विद्द्यापीठातही संधी मिळेल तिथे संबंधित जमातीतले विद्द्यार्थी आपली वेशभूषा, न्रूत्य, खाद्य सादर करताना दिसायचे. अर्थातच त्यांच्यात आर्थिक संपन्नताही आहे, जर तुम्ही कोणा आदिवासीच्या घरी गेला तरी त्याचे रहाणीमान आपल्या इकडच्या उच्च मध्यमवर्गीयाला लाजवेल इतके चांगले आहे. पण अशा परिस्थितीतही ते आपल्या आदिवासी मूल्यांशी नाळ जोडून आहेत.
आता काही प्रचि-
१) एका आदिवासी खेडयात असलेला पुतळा-

२) आदिवासींनी बनवलेली काही भांडी-

३)

४) न्रुत्य करणारे काही आदिवासी-

५)

६)

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
पुढच्या भागात तैवानच्या एका बेटावर असलेल्या आदिवासी जमातीच्या "बोट ओपनिंग फेस्टीवल"ला उपस्थित राहाण्याचा योग आला होता त्याविषयी

२००८ साली लान-यू बेटावर (Lanyu Island) ( ह्याला ऑर्कीड बेट (Orchid Island) ही म्हणतात) ताव (Tao/Yami)जमातीच्या दुर्मिळ अशा नविन बोटीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला त्याचा हा वृत्तांत-

(आंजासा)
मुख्यविषयाकडे वळण्याआधी आपण बेटाचा थोडा इतिहास आणि भूगोल पाहुयात-
लान्-यू बेट तैवानच्या दक्षिण-पूर्वेला आणि फिलीपिन्स जवळ आहे. हे बेट भूगर्भिय हलचालींतून ज्वालामूखीच्या उद्रेकातून निर्माण झाले आहे. या बेटावर मुख्यत्वेकरुन ताव किंवा यामी लो़कांची पूर्वापार वस्ती आहे. असे मानले जाते की ही जमात फिलीपिन्समधुन साधारण ८०० वर्षांपूर्वी या बेटावर स्थलांतरीत झाली. त्यामूळे ह्यांच्या भाषेत आणि खादयातही फिलीपिन्सशी समानता आढळते. बेटाच्या एकुण ४००० लोकसंख्येपैकी साधारण २४०० यामी/ताव जमातीचे तर उर्वरित हान चीनीवंशीय आहेत.
जापानी राजवटीच्या काळात, या बेटावरील अनोखी प्राणीसृष्टी आणि ताव संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे बेट सर्वसामान्यांच्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. पण नंतर कोमिंगतांग राजवटीच्या (वर्तमान सरकार) काळात हा प्रदेश खुला करण्यात आला.
जगातील इतर सरकारांच्या मूलनिवासींच्या संस्क्रुतीच्या संवर्धनाप्रती अनुत्सुक धोरणांचीच रि ओढत ह्या सरकारने बेटाच्या निसर्गसौंदर्याला नख लावण्याचा प्रयत्न केला. १९७४ साली तैवानच्या "अणूउर्जा आयोगा"ने आण्विक कचर्याच्या विल्हेवाटीसाठी या बेटावरील जागा तब्यात घेण्याचे ठरवले, आणि ह्यासाठी जागा तब्यात घेताना त्यावेळच्या ताव जमातीच्या मुख्याधिकाराशी, की जो अशिक्षित होता, खोटे बोलून, मासे हवाबंद करण्याचा कारखाना उभारत आहोत असे सांगून जागा ताब्यात घेतली. हा सर्व कारभार सरकारकडून गूपचूप चालू होता जोपर्यंत बेटावरिल मिशनर्यांचे तैवान मुख्यभूमीवरील वर्तमानपत्रांतील बातम्याकडे लक्ष गेले नव्हते. हे सर्व समजल्यानंतर बेटावर जनक्षोभ उसळला, आणि यासर्वातून एक आंदोलन उभारण्यात आले, त्यात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या १) ह्या आण्विक कचरा विल्हेवाट आस्थापनेचे दुसर्या टप्प्यातील काम थांबवन्यात यावे, २) बेटावर आण्विक कचरा आणण्याचे काम त्वरीत थांबवावे, ३) आणि ही आस्थापना जून १९९१ पर्यंत बंद करण्यात यावी. आता पर्यंत यातील पहिल्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत, आणि सरकार ह्या आण्विक कचरा विल्हेवाटीसाठी रशिया, चायना, उत्तर कोरिया, आणि सोलोमन बेटांशी चर्चा करत आहे. असो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यक्रमापूर्वी एका मैत्रिणीने, की जी एका आदिवासी जमातीतील आहे, ह्या सोहळ्याविषयी सांगितले आणि मग हो नाही करता-करता मी, माझा मित्र आणि ती मैत्रिण अशा तिघांनी विमानाने जायचे ठरले (कारण ह्या बेटावर जाण्यासाठी बोटीने २.५ तास लागतात आणि ईतरांना जशी बस लागते तशी मला बोट लागते :) ). पण बेटावरच्या या कार्यक्रमानिमित्त होणार्या गर्दीमूळे विमानाची तिकीटे मिळाली नाही. शेवटी बोटीने जाण्याशिवाय काही पर्याय उरला नाही. सकाळी लवकर उठून मैत्रिणीच्या कारने तायतुंग (Taitung) ह्या शहराच्या बंदरावर आलो, आणि तिकीटे काढुन बोटीत चढलो. बोटीत बर्यापैकी गर्दी होती आणि बहुतेक करुन सगळे लान-यूलाच कार्यक्रमासाठी चालले होते. बोट लान-यूला जाताना मुख्य किनार्‍यापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असणार्‍या हिरवी/पाचू बेटांवरुन जाते.
तायतुंग (Taitung) बंदर

आमची बोट

जसा जसा मुख्यभूमीचा किनारा दूर जात होता तस-तसे आम्ही एका वेगळ्याच दुनियेत जाणार होतो

बोटीच्या प्रवासाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती, उलट्यांनी आणि त्यानंतर जाणवनार्‍या अशक्तपणाने (आधीच आम्ही पाप्याचे पितर!) मी बेजार झालो. पोहोचल्यानंतर थोडे खाऊन आणि केलेल्या आरामाने थोडी तरतरी आली मग त्यानंतर मित्राबरोबर समुद्रावर थोडे फिरुन आलो. पण ह्या झालेल्या त्रासामुळे त्यादिवशी काही खास पाहता नाही आले. पुढचे दोन दिवस हे सोहळ्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. पहील्यादिवशी बोटीची साग्रसंगीत पुजा केली जाते, ह्या निमित्ताने संपूर्ण गावाला जेवणावळीचे यजमानातर्फे आग्रहाचे निमंत्रण असते, तसेच संपूर्ण गावही घरातील कार्य असल्याप्रमाणे यजमानाच्या कार्यात राबत असते. दुसर्या दिवशी मिरवणुकीने बोटीच्या जलावतरणाचा कार्यक्रम केला जातो.
बेटाचा पहिला-वहीला नजारा

तैवानमधील इतक्यावर्षांच्या वास्तव्यात मला एकही बकरी/बोकड दिसली/दिसला नाही पण ह्या बेटावर आल्यानंतर सुरुवातीलाच महाराजांचे दर्शन झाले.

दुसर्यादिवशी सकाळी लवकरच भटकंती करायला निघालो. येथे दुचाकी भाडयाने मिळतात, तेव्हा मी आणि माझा मित्र दोघांत एक दुचाकी घेऊन स्वारी भटकायला तयार झाली. सगळा मार्ग हा समुद्र्किनार्‍याने आहे त्यामुळे एका बाजुला निळा अथांग समुद्र आणि दुसर्‍याबाजुला उंच डोंगर या द्वयीने साकार केलेल्या अनोख्या विश्वाचा अस्वाद घेत आपण जात असतो.






मध्ये भेटणारी ही भली मोठी गुहा







किनार्‍यावर सापडलेली ही वेगवेगळ्या प्रकाराची प्रवाळं

किनार्‍यावर नांगरुन ठेवलेल्या यामी लोकांच्या वैशिष्ट्यपूर्ण बोटी/होडया

आता आपण मुख्यविषयाकडे वळुयात. पहिल्या दिवशी बोटीच्या पूजेसाठी गावातील सर्व घरांतून कंदमूळे (ह्याचे नाव माहीत नाही) पाठवली जातात. ह्यांचे बोटीच्या पूजेसाठी विशेष महत्व असते.
गावातुन पूजेसाठी कंदमूळे वाहुन आणताना बच्चेकंपनी त्यांच्या पारंपारीक पोषाखात

नंतर ती बोट कंदमूळांनी अशाप्रकारे भरुन टाकली जाते

कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रेक्षक आणि या जमातीचा अभ्यास करणारे जगभरातून आलेले अभ्यासक

याठिकाणी प्रथमच गोगलगायींची (Snail) भाजी खाल्ली, चवीला एकदम छान होती.

एक यामी स्त्री तिच्या पारंपारीक पोषाखात

फिलीपिन्सच्या ज्याभागातून यामी स्थलांतरीत झाले त्याभागातील जेष्ठांना सन्मानपूर्वक या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येते.
फिलीपिनो पाहुण्यांचे आगमन होताना

यजमान आणि इतर गावकरी त्यांच्या पारंपारीक पोषाखात

गावतील आणि आसपासच्या इतर गावांतील जेष्ठ मान्यवर मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना


इतर जमातीतील आदिवासीही ह्या सोहळ्यासाठी आले होते

त्यादिवशी रात्री पाहुण्यांसाठी आदिवासी संस्कृतीदर्शनाचा कार्यक्रम ठेवन्यात आल होता. कार्यक्रमाचा समारोप फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आला.
आदिवासी आपली कला सादर करताना





दुसर्‍यादिवशी बोटीची पूजाकरून मिरवणुकीने तिचे जलावतरण करण्यात येते, यावेळी बोट सगळेजण उचलुन नेतात व मध्ये मध्ये हवेत उंच फेकून झेलतातही.

ह्या प्रचिमध्ये यांनी जे चित्रविचित्र हावभाव केले आहेत तो बोटीची भुत पिशाच्चा पासुन रक्षण करण्याचा विधी आहे ज्याच्या चलचित्रफिती आपण खाली दिलेल्या दुव्यांवर टिचकी मारुन बघू शकता

१) http://www.youtube.com/watch?v=FSgBOSt5jOk&feature=related
२) http://www.youtube.com/watch?v=tQUaV2rRquQ&feature=related
३) http://www.youtube.com/watch?v=wqK7D5hju2s&feature=related
४) http://www.youtube.com/watch?v=PBh5cic_Ri8&feature=related
५) http://www.youtube.com/watch?v=nK2iRl6vrlI&feature=related
नंतर गावातील जेष्ठ मंडळी होडीमधुन एक फेरी मारुन यजमानाला आशिर्वाद देतात


त्यादिवशीच्या दुपारच्या जेवणाचे एके ठिकाणी आमंत्रण होते त्यात त्यांच्या पारंपारीक खाद्यपदार्थांचा समावेश होता.
हे एका आदिवासीचे घर आहे. बसतोय का विश्वास? आर्थिक संपन्नता येउनही त्यांनी आपले रितीरिवाज आणि संस्कृतीची कास सोडली नाहीये.

परतीच्या प्रवासासाठी लान-यू बंदरातून दिसलेले हे दृश्य


आणि आता ह्या शांत निरपेक्ष विश्वातून पुन्हा रोजच्या रहाटगाडग्याला जुंपण्यासाठी परतत होतो


परतताना बोटीत ह्या आजीबाई वेड्या होत्या का अजुन उतरली नव्हती, पण त्या स्वतःशीच बडबडत होत्या मोठ्याने गाने गात होत्या आणि नाचतही होत्या. बाईंनी चांगले मनोरंजन मात्र केले.

पुढच्या भागात थारोको अभयारण्य आणि लियू लेक
 थारोको राष्ट्रीय अभयारण्य आणि लियू लेक


याजागी मी अनेक वेळा गेलो आहे. पुण्यात आलेल्या माणसाने जसा शनवारवाडा आणि पर्वती पाहिली नाही तर पूणे दर्शन पूरे होत नाही, तसे व्हालियनला आलेल्या माणसाने थारोको राष्ट्रीय अभयारण्य/उद्द्यान (Taroko National Park), लियु लेक (Liyu Lake) पाहणे अगदी मस्टच्! :)
थारोको राष्ट्रीय अभयारण्य हे तैवान मधल्या एकुण आठ अभयारण्यांपैकी एक आहे. बाकी सात यांप्रमाणे १) केंटींग राष्ट्रीय अभयारण्य (Kenting National Park) २) युसान राष्ट्रीय अभयारण्य (Yushan National Park) ३) यांगमिंगसान राष्ट्रीय अभयारण्य (Yangmingshan National Park) ४) श्ये-पा राष्ट्रीय अभयारण्य (Shei-Pa National Park) ५) किनमेन राष्ट्रीय अभयारण्य (Kinmen National Park) ६) दोंगशा आतोल समुद्री राष्ट्रीय अभयारण्य (Dongsha Atoll Marine National Park) ७) तायज्यांग राष्ट्रीय अभयारण्य (Taijiang National Park) तैवानच्या एकुण क्षेत्रफळापैकी ८.६४% क्षेत्र अभयारण्यांनी व्यापलेले आहे.
थारोको राष्ट्रीय अभयारण्य हे जापानी राजवटीच्या काळात १२ डिसेंबर १९३७ साली तैवानच्या गव्हर्नर जनरलकडून घोषित करण्यात आले. पुढे १९४५ साली तैवानच्या स्वातंत्र्यानंतर त्याचा राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा काढुन घेण्यात आला कि जो पुन्हा २८ नोव्हेंबर १९८६ साली बहाल करण्यात आला.
"थारोको" चा त्रुकु जमातीच्या (कि जी थारोको च्या परिसरात आढळते) भाषेमध्ये अर्थ होतो "भव्य आणि सुंदर/रुबाबदार". हे अभयारण्य ९२० वर्ग किमी मध्ये पसरलेले असुन, एकुण तीन परगण्यांमध्ये {तायचुंग, नानताव आणि व्हालियन (Taichung, Nantou, Hualian)} चा विस्तार आहे. आपली राष्ट्रीय अभयारण्याची कल्पना, जसे की प्राणीसंपदेने भरपूर, येथे लागू होत नाही. कारण आदिवासींनी केलेल्या अतिरिक्त शिकारीमुळे अनेक प्राणी एक तर नामशेष झालेले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही प्रकारची हरणे, खारी, माकडे, कशी-बशी तग धरुन आहेत. पण निसर्गाने भरभरुन दिलेले सौंदर्य, संगमरवरी घळ्या (या अभयारण्यात संगमरवर मुबलक प्रमाणात मिळते), त्यांतुन वाहणार्‍या नद्या हे सर्व पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते. नदीप्रवाह खडकाच्या क्षरणाला कारणीभूत ठरुन अनेक शिलाशिल्पे तयार झाली आहेत, निसर्गाची ही अनोखी किमया बघुन तर आपण स्तिमित झाल्याशिवाय राहत नाही.
अभयारण्यात तीव्र उताराच्या घळई, उत्तुंग शिखरे, त्यातुन वाहणार्‍या नद्या आपल्याला ठायी ठायी दिसतील. पण हे सर्व तयार व्हायला लागले ते २०० दशलक्ष वर्ष!. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळचे समुद्रतळाशी एकवर एक थर बसत गेले आणि वर्षानुवर्ष साचलेल्या गाळावर वरुन पडणारा विलक्षण दाब आणि भूगर्भिय उष्णता यांमुळे त्याचे रुपांतर चुनखडक आणि नंतर संगमरवरात झाले. या दरम्यान फिलीपिन्स प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या आपआपसातील टक्करींमधुन हा भाग वर उचलला जाउन समुद्राच्यावर आला. (आजही तैवान आणि खासकरुन व्हालियन भाग भूगर्भिय हलचालींच्या दृष्टीने फारच संवेदनशील आहे. व्हालियन मध्ये ५-५.५ रिश्टर स्केलचा भुकंप हा सर्वसामान्य किंवा "किस झाड कि पत्ती" समजला जातो. मला आठवते एके दिवशी साधारण ३-५.५ रिश्टर स्केलच्या १९ भुकंपांची नोंद झाली होती. आजही हा भूभाग दरवर्षी अर्धा सेंटीमीटर या वेगाने वर उचलला जात आहे)
थारोको मध्ये अनेक प्रागैतिहासिक खुणा आणि स्थळे सापडली आहेत. त्याच बरोबर हा प्रदेश त्रुकु जमातीचे प्रमुख वसतिस्थान राहिलेला आहे. तसे पाहता अत्याल जमातीतून एक गट फुटुन बाहेर पडला आणि त्यांनी सेडीक जमातीची/टोळीची स्थापना केली. कालांतराने सेडीक जमातीतून आणखीन एक गट बाहेर पडला आणि तो या थारोको प्रदेशात स्थायिक झाला आणि त्यांनी स्वत:ला त्रुकु म्हणायला सुरुवात केली. नावाबरोबरच त्यांनी स्वतःचे रितीरिवाज, भाषा विकसित केली. ही जमात प्रामुख्याने भटकी शेती, शिकार आणि मासेमारी करणारी होती. ह्या जमातीत शत्रुचे मुंडके कापण्याची प्रथा होती कि जी नंतर जबरदस्तीने नामशेष करवली गेली. त्रुकु जमातीत सर्वांना ७-८ व्यावर्षी कपाळावर जमातीच्या ओळखीसाठी गोंदवून घेणे आवश्यक होते. १४-१५ व्या वर्षी पुरुषाला त्याच्या प्रथम यशस्वी हेड हंटींग नंतर हनुवटीवर गोंदवले जात तर स्त्रीला साधारण १५ व्या वर्षी तिच्या विणकामावरच्या प्रभुत्वानंतर गालावर.
हे अभयारण्य पाहण्यासाठी आपण व्हालियन रेल्वेस्थानकावरुन सरकारी थारोको दर्शनच्या बसेस मधुन जाउ शकता किंवा स्थानकावरच मिळणार्‍या टॅक्सीने पण जाऊ शकाता. अर्थातच स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने जाणे सर्वात उत्तम.
आता आपण प्रचिंकडे वळूयात, काही माहिती आपण प्रचि पाहता पाहता घेउयात.
अभयारण्याचे प्रवेश्द्वार

अभयारण्याचे माहितीकेंद्र

या माहितीकेंद्रात अभयारण्यात असणार्‍या शिखरांची, प्राण्यांची, वनस्पतींची माहिती दिलेली आहे आणि छोटी प्रदर्शनी पण आहे

अभयारण्यात शिरल्यानंतर सुरुवातीला लागते ते ईटर्नल स्प्रिंग श्राइन (Eternal Spring Shrine), थारोकोमधुन जाणार्‍या महामार्गाच्या निर्माणात ज्या मजुरांचा जीव गेला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे थडगे बांधण्यात आले. लोकांनी येथे येउन प्रार्थना करुन त्यांच्या-त्यांच्या देशाच्या चलनात पैसे दान करण्याची प्रथा आहे.

त्यानंतर लागतो हा झुलता पुल


जंगलात आत दुरपर्यंत चालत जाण्यासाठी उजव्याबाजुला दिसतात तश्या खडक खोदुन ट्रेलस् बनवलेल्या आहेत

जागोजागी वाहणारे निर्झर झरे, पाण्याचे प्रवाह आपले मन प्रफुल्लित करतात



अभयारण्यात असे सुंदर आकृतीबंध असणारे अनेक पुल आहेत

ह्या प्रचित दिसणारी नदी आणि तिने खडकांचे केलेले क्षरण. यात दिसणारा खडक म्हणजे संगमरवर आहे. आणि डाव्याबाजुला खडक खोदुन केलेला रस्ता दिसत आहे


त्यानंतर आपण पोचतो ते "टनेल ऑफ नाइन टर्नस्" ला (Tunnel of Nine Turns) इथे आपण गाडीतुन उतरुन साधारण १ ते १.५ चालत जाउ शकता. हा मार्ग नदीच्या काठाने, कधी बोगदयातुन जातो. ईथे भूस्खलनाचे प्रकार वरचेवर घडत असतात त्यामुळे हल्ली बांधकामावर वापरतो तश्या टोप्या घालण्याची सक्ती केलेली आहे.





नागमोडी वळण घेणारा रस्ता, हा संपूर्ण घाटरस्ता असूनही आपल्याला विनाखड्डा रस्ता दिसेल. किंबहुना सगळीकडेच अश्याप्रकारचे रस्ते दिसतील.

याच "टनेल ऑफ नाइन टर्नस्" च्या दुसर्या टोकाला हा गोरिलाचा आकार असणारा डोंगर आहे. निसर्गाची किमया अगाध आणि तितकीच विस्मयकारी आहे.

त्यानंतर लागते ते "इंडियन हेड रॉक" ह्याला इंडियन हेड रॉक का म्हणतात याचे आतापर्यंत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, पण ते आहे. इथे नदीच्या पहिल्या वळणाच्या उजव्या बाजुला खाली खडकामध्ये एक मानवी चेहरा दिसतो आहे (अर्थातच त्याचा जबडा नदीच्या गाळामुळे दिसत नाही).

असेच खडकांमध्ये सापडलेले चित्रविचित्र चेहरे नि आकृत्या
हा अजुन एक मानवी चेहरा

हे व्याघ्रमुख

जागोजागी अशी विश्रांतीस्थाने केली आहेत जेणेकरुन पर्यटक विश्रांती, खाणे-पिणे करु शकतील



त्याठीकाणी असणारी विविध शिल्पे


नंतर आपण पोचतो ते थियेनशांगला (Tiansiang), हा थारोको दर्शनाचा शेवटचा टप्पा, इथे उंच डोंगरावर सुंदर बुद्धमंदीर आहे


इथे नजरेत भरते ते उलटे स्वास्तिक, बौद्ध धर्मात उलटे स्वास्तिक पवित्र मानले गेले आहे


मंदीराचे प्रवेशद्वार

तिथे असलेली ही बुद्धाची सुवर्णमूर्ती


वरुन मंदीरातुन दिसणारा थियेनशांगचा नजारा

मंदीराच्या सुविनियर शॉप मध्ये असलेली "अवलोकितेश्वराची मूर्ती"

आता आपण पाहू "लियू लेक". हे तळं नैसर्गिक रित्या तयार झालेले तळं असून याला "कार्प लेक" (Carp Lake) ही म्हणतात. हे आमच्या विद्द्यापीठाच्या अगदी जवळ आहे. यात बोटींगचीपण सुविधा आहे.




तळ्याशेजारच्या डोंगरावरुन (Liyu shan) विद्द्यापीठाचे दिसणारे दृश्य

या तळ्यात दरवर्षी "ड्रॅगन बोट फेस्टीवल"ला बोटींच्या शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.


ह्या "ड्रॅगन बोट फेस्टीवल"च्या बक्षिस वितरण समारंभाला सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाची चलचित्रफीत आपल्याला इथे पाहता येइल
भाग-१ http://www.youtube.com/watch?v=a7LiacRgKhs&feature=context&context=C3649...
भाग-२ http://www.youtube.com/watch?v=sgOy_roqE_4&feature=context&context=C3649...
भाग-३ http://www.youtube.com/watch?v=qQVbL-r9K6g&feature=context&context=C3649...
दर जुलै महिन्यामध्ये व्हालियनमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी या तळ्यात प्रकाश-ध्वनी योजनायुक्त कारंज्यांचा कार्यक्रम केला जातो. हा सर्वांसाठी खुला असतो आणि ईतकेच नाही तर व्हालियन रेल्वेस्थानकापासुन या तळ्यापर्यंत मोफत बसेसची सोय केली जाते. हा कार्यक्रम साधारणतः महिनाभर असतो. यात कारंज्याच्या पाण्याच्या तुषारांचा पडदयासारखा वापर करुन लेजर शो तसेच काही चलचित्रेही दाखवली जातात.








ह्या कारंज्यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण चलचित्रफीत आपल्याला इथे पाहता येइल

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...