गाड्या बदामी सोडून २० किमी वर असणाऱ्या पट्टकदल कडे ज्या वेगाने निघाल्या त्याच वेगाने पोटात भुकेचे थैमान माजलेले. मंदिर समूह आकर्षित करीत असला तरी गाड्या पार्क करून आधी जेवणासाठी हॉटेल शोधले. चटकदार ठेचा, ज्वारी - बाजरीच्या भाकऱ्या आणि वाटीतले दही वर दही अश्या लज्जतदार जेवणाच्या आस्वादानंतर तिकिट्स काढून मंदिर समूहाकडे वळलो. पट्टडकल कि पट्टदकल अश्या जीभ वेडीवाकडी करून ते नाव नीट उच्चारण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. योग्य कि अयोग्य हे त्या चालुक्यांनाच माहिती. इथे मुख्य म्हणजे एकाच ठिकाणी १० मंदिरे आहेत. पुरातत्व विभागाने फुलवलेल्या बागेतून जाताना सुरवात कुठल्या मंदिरापासून करायची हा पेच निर्माण झाला. वेळेच्या तालावर नाचतो म्हणून क्लॉक वाईज फिरायचे ठरवून सुरवात केली. ह्या जागेने एकेकाळी प्रचंड वैभव पाहिले असेल. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ह्या ठिकाणाचं नाव आहे. पट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती.
भव्य दिव्य मंदिराचा समूह पाहून डोळे विस्फारतात. मुर्त्या नसल्या तरी मंदिरांची स्थिती, त्यावरील कोरीवकाम, प्रसन्नता, भाव आजही त्या काळच्या शिल्पकाराच्या कलेचे ठसठशीत पुरावे आहेत. हि मंदिरे प्रचंड मोठी असून भक्कम आहेत. मंदिरांमधील खांबांवर नाजूक नक्षीकाम दिसते . अनेक प्राणी आणि विष्णू,शंकर, राम यांच्या जीवनावर आधारित अश्या अनेक पौराणिक कथा कोरल्या आहेत.
कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते. येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे सापडली आहेत; त्यांचा वापर येथील मंदिराच्या शिल्पकलेसाठी झाला असावा असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ‘ए गाइड टू जॉग्रफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे.
म्हणजे त्या काळात हे व्यापारीदृष्टय़ा प्रगत शहर असावे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात. (संदर्भ: विकिपीडिया)
२ तासात मंदिर दर्शन आटोपून मोर्चा ऐहोळेकडे निघाला. १० किमी चे अंतर ह्या तुळतुळीत रस्त्यावर काहीच नाही. अहीहोले मंदिर समूह म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची शाळा समजली जाते. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात. गेट मधून प्रवेश केल्यावर पहिलेच तुम्हाला आकर्षित करणारे दुर्गादेवी मंदिर दिसते. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुळाकृती आहे. दिल्लीतल्या संसद भावनासारखी दिसते. मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. सकाळ पासून नुसतीच मंदिरे पाहत असलो तरी आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणाहून येत होती.
जमदग्नीपुत्र परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा करून आपला रक्तलांछित परशू मलप्रभेच्या पात्रात धुतला तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. जनमानसाला सुशील, सत्शील करण्याचा हेतू त्यामागे दिसत होता. (संदर्भ: सौ. पौर्णिमा केरकर ह्यांच्या शिल्पकलेचा अनुपम आविष्कार मधून)
आजच्या भटकंतीचे डोळे भरून दर्शन घेतल्यावर होस्पेट ला मुक्कामी निघालो. प्रशस्त हायवेने होस्पेटसारख्या गजबजलेल्या शहरात सुसज्ज हॉटेल मध्ये आमचे डेरे पडले. आज थाट राजेशाही होता. तसाच आज आमची भटकंती टीम मधील खुशीचा वाढदिवस सुद्धा होता. जेवणाच्या पंगती बसायच्या आधी केक कापून - फासून झाला. वाढदिवसाच्या दिवशी अश्या आठवणीने सजलेला दिवस जावा असे प्रत्येकालाच वाटते.
काल पासूनचा चिकनचा उपवास आज सोडला आणि मऊशार गादीवर थंड हवेत झोपी गेलो.
आजचा संपूर्ण दिवस "हंपी" ह्या जादुई भागात भटकंती करायची होती. सकाळी हॉटेलच्या खर्चातील नाश्ता हादडला.
आमचा मोर्चा हंपीचे सर्वात प्रसिद्ध आणि स्थापत्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार असलेले मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर पाहण्याकडे निघाला. गाडी पार्क केली आणि कळले कि पार्किंग पासून मंदिर ३ एक किमी आहे. इथे इको बस पण उपलब्ध होत्या पण त्या टाळून आम्ही पायगाडी पकडली. दोन्ही बाजूच्या दहा एक फुटांच्या शिळांच्या चौकटी आणि मधोमध एक लाल मातीची वाट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारपाशी घेऊन आली. एवढ्या मोठ्या भागासाठी एखादा गाईड घ्यावा असा ठराव सर्वानुमते पास झाला. त्याने सहजासहजी जे आपल्या नेत्रांना दिसेल त्या पलीकडचे एक एक पैलू खुले केले आणि आम्ही कानटवकारून ऐकू लागलो.
भव्य उंचीच्या गोपुरातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्या केल्या समोर ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ आहे. तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नव्हते. आजूबाजूची गर्दी हटवून एक मोकळा फोटो काढताना तारांबळ उडाली. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीच्या अनेक शिल्पापैकी हे एक महान शिल्प आहे.
विजयनगर साम्राज्यातील कलाविष्काराचा मेरुमणी आणि जगातील एक महान शिल्प म्हणून त्याची गणना नक्की होते. येथील अलंकर, शिल्पे, पन्नासच्या रुपयांच्या नोटेवर असणारा दगडी रथ आणि प्रत्यक्ष मंदिर हे सारेच स्वप्नवत आहे. ह्या मंदिरातली मुख्य विठोबाची मूर्ती पंढरपुरास नेली असे अनेक अभ्यासक सांगतात.
मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती होती त्याचा चौथरा आहे. देव्हार्याच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे. इथल्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.
संगीत महाल तर इथला जादुई कलाविष्कारच आहे. प्रत्येक खांब वाजवल्यावर त्यातून संगीत ऐकू येते. आणि तो संगीताचा कोणता आवाज आहे ह्याचे त्याच्या बाजूच्या खांबावर शिल्प कोरलेले. अद्भुत होतं सार. दोन तास इथे कोपरांकोपरा पाहिल्यावर मग काढता पाय घेतला.
इथं दुसरा गाईड संवादकौशल्याने वाजवी दरात ठरला. त्याने एक एक गोष्ट उलगडून सांगितली. बाहेरून अतिशय साधे वाटणारे हे कुंड आतून सुशोभित केले आहे. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.
पुढची स्वारी मुख्य विजयनगरच्या मुख्य राजवाड्यकडे वळली. ऊन तापलं होतं तरी एक एक भाग बघण्याचा आवेश कमी झाला नव्हता. भव्य बुरुजाच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर नजर जाईल तिथपर्यंत लांब - लांब नुसतं अवशेष दिसतात. हंपी जसे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच जलव्यवस्थापनासाठीही. राजवाड्यात आणलेले पाण्याचे मार्ग तुम्हाला चक्रावून सोडतात. राजवाडय़ाचे अवशेष, राणीवश्याची जोती, हत्तीखाना, टांकसाळ, दंडनायकाचा म्हणून ओळखला जाणारा महाल, भोजनशाळा आणि सामान्यांच्या घराची जोती अशा एक ना दोन, अनेक स्थापत्यावशेषाची जंत्री देता यईल.
आमचा गाईड एक एक वास्तू अतिशय सुरेख उलगडून सांगत होता. पुढचे ठिकाण हिंदू वास्तू पद्धतीने बांधलेले उत्तम देवळाचे प्रतीक असलेले हजारा राम मंदिर गाठले. एकदा का तुम्ही राजवाडा परिसरात गाडी पार्क केली कि आता पुढचं सगळं पायीच हिंडावं लागतं. हजारा राम मंदिर हे प्रत्येक राजाचे हे पूजा करण्याचे पुरातन मंदिर होते. कृष्णदेवरायाच्या काळात त्याचे भव्य शिल्पात रूपांतर झाले. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग चित्रस्वरूपात सर्व भिंतीवर चितारलेले आहेत.
आता मात्र काही मंडळी टीम मधून गळाली. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा महाल म्हणजे झेनाना तटबंदी, हे पाहण्यासाठी एका महादरवाज्यातून आत घुसूलो. सकाळी विठ्ठल मंदिरासाठी काढलेली तिकीट इथे चालते. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. पुरुषांना प्रवेश नसलेल्या ह्या ठिकाणी सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या.
पुढे आमच्या नजरा खिळल्या त्या लोटस महालावर. आत त्या काळची एसी आहे ती तुम्हाला दाखवतो म्हणून गाईड ने आधीच ह्याच जास्त आकर्षण वाढवून ठेवलेले. हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.
चारी दिशांना पाहून एका तटबंदीच्या छोट्या दरवाजातून हत्तींना ठेवण्याकरता दगडी महालाच्या परिसरात आलो. ह्याला एकूण ११ मोठाली दालने आहेत. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा आणि वेगळया नक्षीकामाचा आहे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. इतकी मोठी वास्तू पाहून राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते हे अधोरेखित होते. तिकीट काढलीच आहे म्हणून इथले संग्रहालय सुद्धा पाहून घेतले.
आता मात्र शरीरातील ऊर्जा संपत आली होती. घड्याळात साडेतीनच्या काटा क्रॉस केलेला. भूक तर भुंकत होती. आता टीमचे दोन भाग झाले. सकाळी ज्यांचे विठ्ठल मंदिर राहिले होते ते तिकडे गेले आणि आम्ही विरुपाक्ष मंदिराकडे निघालो. मंदिराच्या बाहेर पुन्हा एकदा लज्जतदार जेवणाचा स्वाद घेतला. आता शरीरातली ऊर्जा वाढली. विरुपाक्ष मंदिरात आत घुसताना आपण जसे हार - नारळ घेतो त्या टाईप एक आजी केळं वाटतं होती दरवाज्याबाहेर असलेल्या हत्तीसाठी. हे केळं खुशी हातात घेऊन चालत असताना अचानक जंगल बुक टाईप माकड खुशीच्या हात धुवून माग लागलं. क्षणभर तिला काय करायचेय ते सुचलंच नाही. त्यामुळे तिने पळ काढला. ती पुढे आणि माकड मागे. पोलीस कर्मचारी तिच्या अगदी जवळ उभा राहून कन्नड मध्ये केळं टाक म्हणून सांगत होता पण काहीच ऐकायच्या मनस्थितीत नसलेली ती ते कानडी काय ऐकेल. शेवटी काय करावं काय नाही करावं ह्या नादात हातातील केळं टाकल्यावर त्या माकडाने बिचारीचा पिच्छा सोडला आणि एकच हशा पिकला.
१०५ फूट उंचीच्या आणि जवळ जवळ १० मजल्यांच्या गोपुरातून मंदिरात प्रवेश केला. आजही पूजा अर्चा होत असलेले हे मंदिर विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच.
आज ३१ डिसेंबर होते त्यामुळे मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी सनसेट पॉईंट गाठला. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून वर्षभर केलेल्या भटकंतीच्या आठवणी झरझर नजरेसमोरून गेल्या. " खरं तर गेली अनेक वर्षें या सह्याद्रितल्या द-या-खाे-यांनी, घनगर्द रानावनांनी ,डाेंगरी पायवाटांनी , हस-या रानफुलांनी,पक्षांच्या चिवचिवटांनी , गिरीदुर्गांच्या काऴ्याकभिन्न तटांनी, अनं अफाट विश्वाच्या आसमंताने माझं भटकंतीचं विश्व अक्षरशा रंगवुन टाकलयं..! या उनाडकीच्या छंदामुऴे सह्याद्रीतलं शांत/ राैद्र / दिमाखदार / रुबाबदार रुपडं व निसर्गच्या अनेक कलाविष्कारांच्या धुंडाेऴ्याने मनं खराेखरीचं आनंदुन गेलय..वेडावुन गेलय !!
बेधुंदपणाने !!!!!
हे सरतें २०१८ होते. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता हा.
बराच वेळ रेंगाळून झाल्यावर मग काढता पाय घेतला. आता मुक्कामाची जागा शोधणे होते. आधी ठरल्याप्रमाणे टेन्ट लावायचे होते पण नक्की कुठे ह्यात शोधाशोध रात्री ९ वाजेपर्यंत चालली आणि सर्वेश आणि डॉक्टर ह्यांनी एका छोट्या कॅम्पिंग साईटवर आजची व्यवस्था लावली. ३१ डिसेंबर वाया घालवला असा नको म्हणून ढिंचॅन्ग ढिंचॅन्ग हि पण इच्छा पूर्ण झाली. बार्बेक्यू चिकन - डान्स - गिटार वादन - काऊंटडाऊन आणि केक कापून नवीन वर्षाचं स्वागत झालं.
सकाळी जाग आली तेव्हा मस्त सूर्याची किरणे टेन्ट मध्ये घुसली होती. आता आवरायला हवं. सगळं आवरून निघे पर्यंत ९ वाजले. तुळतुळीत रस्त्यावर गाडी चालवताना झोप नको यावी म्हणून अभिजित ला जागे ठेवण्याचे काम बऱ्याच वेळा चालले. हंपी सोडली तेव्हा मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले. . बदामी - पट्टडकल - ऐहोले आणि हंपी इथली कुठलीही गोष्ट सामान्य नाहीच. इथल्या दगडादगडाला कसल्यातरी दंतकथेचा आधार आहे असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती नाही.एकमेकांवर आदळलेल्या, कलंडलेल्या, ओघळलेल्या, गळ्यात पडलेल्या क्वचित कुठेतरी एकमेकांवर नाजुकपणे रचून ठेवल्यासारख्या शिळा.. प्रत्यक्षामधे कित्येक टन वजनाच्या असतील कुणास ठाऊक. त्यातही शिल्पकलेचे कोंदण, काढा कशी हवी तशी चित्रं. ही करामत नक्की कोण करत असावं? दिवसाच्या चोवीस तासामधल्या मिनिटांचा हिशोब चक्क निष्फळ वाटायला लागतो. कित्येक दशलक्ष वर्षं!! तितकी वर्षं या शिळा इथे उभ्या आहेत. प्रत्येक गोष्टीचा मूक साक्षीदार बनून.
बाहेरच्या देशात - राज्यात आपण आलो कि आपला देश - राज्य ह्यात नेहमीच तुलना होते. महाराष्ट्रातील हंपीच्या तोडीचे एक प्राचीन शहर आजही उपेक्षिताचे जीवन जगत आहे. दौलताबाद…. देवगिरी, ज्या शहराने महाराष्ट्राचे व्यक्तिमत्त्व घडवले. हे भग्न शहर महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची साक्ष देते. कर्नाटक आपल्या पूर्वजांच्या स्मृती अभिमानाने मिरवते आहे. परंतु महाराष्ट्राच्या गतवैभवाच्या साक्षीदारांचे भविष्य काय आहे, याचे उत्तर अजून आपल्याला सापडलेले नाही.
कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पुण्यात पोहचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजलेले. गेल्या तीन दिवसात काय - पहिले ह्याचा हिशोब आता पुढे कित्येक दिवस करायचा होता. भूतकाळाच्या त्या इवलाश्या झरोक्यामधून पलिकडे काहीतरी दिसतंय का ते बघण्य़ाचा दुर्दम्य अट्टहास चालू झाला.. पलिकडे बदामी - पट्टडकल - ऐहोले आणि हंपी सुहास्य मुद्रेनं उभी असते. अंगावर जितके मौल्यवान दागिने तितकेच जखमांचे व्रणदेखील. रात्रीच्या अंधारामध्ये काळोखाच्या सावलीसारखे दिसणारे छोटेमोठे डोंगर आज परत सूर्याच्या किरणांनी वेगवेगळ्या रंगानी चमकत होते. नजरेसमोरून वाहणारी तुंगभद्रा तिच्या मार्गाने जातच होती.. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेले मंदिरांचे अवशेष आज मला ताठ मानेने “देव नसला म्हणून काय झालं? आमचा प्रत्येक दगड म्हणजे एका जिवंत इतिहासाची निशाणी आहे” म्हणून सांगत होते.. मी हात सहज पुढे करतो. एखाद्या शेकडो वर्षापूर्वीच्या दगडावरून फिरवतो. ती निर्जीव अजस्त्र शिळा त्या स्पर्शानं शहारते. माझ्या अंगावर त्या शहार्याचे रोमांच उठतात. कुठ्तरी कसल्यातरी अज्ञाताला माझी ओळख पटते. त्या क्षणापुरती मी माझा राहत नाही. कालच्या कुठल्यातरी पटलावर आम्ही दोन्ही एकच होऊन जातो. ही अख्खी सृष्टी एकच होऊन जाते. पण तो क्षण पुढे सरकतो. माझा हात अजून त्या शिळेवरच असतो, नजरेसमोर हंपी पसरलेली असते. त्या क्षणाच्या आठवणी दोघांच्या मनामध्ये कायमच्या कोरलेल्या राहतात. शिळेवर कोरलेल्या एखाद्या मूर्तीसारख्याच.
आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेण आणि पुन्हा नव्याने जगेन.
_________________________________________________________________________________
__________________________________
_______________________________________
__________________________________
_______________________________________
अट्टाहास:
पुरातत्वीय काही खजिना त्याच सोनेरी झळाळीने कित्येक काळ तसाच रहावा असे बऱ्याच वेळा वाटते पण आधीच्या दिग्गजांनी ह्या विषयी लिहले नसते तर आपण आज ह्या ठिकाणी नसतो, त्यामुळे भ्रमंतीची जाण असलेल्या आणि आपल्या प्रवासावर नितांत प्रेम करणाऱ्या समस्त घुमक्कडांना आपले अनुभव सांगितल्यास त्या भटक्याच्या मनात, ज्ञान वाटणारा एका वेगळ्या उंचीवर पोहचेल. आपण कमावलेलेल्या मौल्यवान ज्ञानाचा, आपल्या भटकंतीचा आणि अनुभवाचा कधीही गर्व नसावा.
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे, सकळजन।
शहाणे करुन सोडावे, सकळजन।
_________________________________________
महत्त्वाच्या नोंदी :
उत्तम कालावधी : उन्हाळा सोडून कधीही.
दिनांक : २९-३०-३१ डिसेंबर २०१८
आजची भटकंती: दुपारी बदामी किल्ला पाहून झाल्यावर पट्टडकल - ऐहोले - होस्पेट - हंपी
पाण्याची व्यवस्था : सोबत पाणी असावे.
कसे जाल : पुणे सोलापूर हा मार्ग गुगल मॅप दाखवत असेल किंवा कमी किमी भरत असेल तरी एन एच ४ ने जाणे सोईचे पडते.
हे चुकवू नका : विरुपाक्ष मंदिराजवळ असणारा सनसेट पॉईंट आणि सनसेट. तुम्हाला झक्कास फोटो हवे असतील तर सूर्यास्त झाल्यावर १० मिनिटे थांबा मग आकाशात विविध रंगछटा उमटतात.
अडचणी : सारखी सारखी मंदिरच पाहावी लागतात त्यामुळे एखादा नास्तिक प्राणी सोबत असल्यास तो त्रास देऊ शकतो.
अजून :
१. संपूर्ण प्रवासात तुमचा गाडी ड्रायव्हर हुशार हवा. त्याला निघायच्या आधी पुरेशी झोप द्या.
२. ट्रेन ने प्रवास होईल पण तुमची कमी ठिकाणे होतील.
३. मुळात ही प्रत्येक ठिकाणे एका दिवसात संपणारी नाही आहेत, तरी जेवढे जमेल तेवढे बघा आणि व्यवस्थित बघा.
४. एकदा हंपी - बदामी मध्ये घुसलात कि मग व्हेज जेवण मिळते साधे पण अतिशय चविष्ठ.
५. विठ्ठल मंदिराजवळ गाईड न चुकता घ्या. (५०० रु. घेतो)
६. ट्रेन ने गेलात तर लोकल टमटम आहेत आपल्याकडे असतात तसे पण भाषा त्यांना समजत नाही त्यावेळी बरीच अडचण होते. पण आपल्याला कामचं करायचेय तर फक्त त्यांना ठिकाण - नाव सांगावे.
७. शक्यतो प्रयत्न करा एखादी कार घेऊन जा इनोव्हा टाईप ( ६ जण बसतात- ड्रायव्हर सोडून) किंवा स्वतःची बाईक.
८. खर्च: ३०-४० रु अशी एंट्री फी आहे वेगवेगळ्या ठिकाणी. जेवण - नाश्ता स्वस्त आहे. मुंबई - पुण्याच्या मानाने. हॉटेल ओयो वर बुक करा होस्पेट ला स्वस्त मिळतात.
९. ट्रेन ने गेलात तर लास्ट ठिकाण हुबळी. तेथून लोकल बस (स्वच्छ) बदामी - हंपी साठी सुटतात.
१०.. हॉटेल चा खर्च वाचवायचा असल्यास टेन्ट पण लावू शकता पण तुम्ही फ्रेश होणार नाही आणि मोठ्या ट्रिप ला फ्रेश नसलो कि चिडचिड होते.
११. कार ने गेलात तर पर हेड ४-५ हजारात काम होईल मुंबई ते मुंबई ( माझा अंदाज) (जेवण - नाश्ता - स्थळांची एंट्री फी - गाईड - ट्रॅव्हल - चटर:फटर खर्च)
१२. ट्रेन ने गेलात तर नॉन एसी २-३ हजार खूप होतील.
गाईड मिळतात.
सहभागी : डॉ. सुनील धुमाळ, सर्वेश धुमाळ, अभिजित शिंदे, चैतन्य, राहुल सावंत, पल्लवी सावंत, ख़ुशी कांबळे आणि देवा घाणेकर.


























No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.