'अवीट सह्यभटकंतीच्या जोडीला जुळली, पहिलीच उत्तुंग अशी हिमालयीन साथ;
स्वर्गसम 'देवरीया ताल', मखमली 'चोपता' नि पंचकेदारी सर्वोच्च असा 'तुंगनाथ'!'
स्वर्गसम 'देवरीया ताल', मखमली 'चोपता' नि पंचकेदारी सर्वोच्च असा 'तुंगनाथ'!'
देवरिया ताल :
'ट्रान्स-सह्याद्री', 'स्टेप' आणि माझी पहिली हिमालयन भटकंती..
'दी जायंट मॅन इन दी जायगँटिक सह्याद्री' अर्थात 'गिर्यारोहणातील महागुरू' नि 'सह्यभटकंतीतील महामानव' अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली दि. ०७ ते १३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत आयोजिण्यात आलेली 'ट्रान्स-सह्याद्री' ही एक दीर्घ भटकंती मोहीम.. आणि, पुणे-मुंबईतील काही मोजकेच भटके नि ज्यांच्यासाठी या मोहिमेचं खास आयोजन केलं गेलं होतं, त्या 'स्टेप' या दिल्लीस्थित भटकंती-संस्थेचे पदाधिकारी व काही सदस्य या सर्वांचा मेळा जमलेला. आणि, अगदी पहिल्याच दिवशी सांधणमधील मुक्कामात श्री सोमनाथ पाल, यांच्याशी ओळख व गप्पा झाल्या नि बोलता बोलता मी 'स्टेप'चा 'आजीवन सदस्य'ही बनलो. पाठोपाठ, त्या चार दिवसांत इतर सदस्यांचीही ओळख झाली आणि या सर्वाचा परिपाक म्हणून की काय, 'स्टेप'कडून एप्रिल महिन्यात नियोजित असलेल्या हिमालयीन भटकंतीसाठी मी लगेचच होकारही भरला. साहजिकच, त्यामुळं, आजवर कल्पनेचे वारु असलेल्या मनोरथातूनच फिरत असलेली माझी हिमालयीन भटकंती अखेर वास्तवाच्या जवळ आली.स्टेप' (Society for Trekking and Environmental Preservation) ही पर्यावरणाचे हित जोपासत विविध हिमालयन भटकंतींचं नियमित आयोजन करणारी दिल्लीस्थित अशी एक सुपरिचित भटकंती-संस्था असून आजमितीला तिचे ३.७ हजार सदस्य आहेत.
बरंच काही पहिल्यांदाच..
अर्थात, 'देवरीया ताल, चोपता नि तुंगनाथ' ही माझी पहिलीच हिमालयीन भटकंती. पहिल्यांदाच इतक्या दूर.. पहिल्यांदाच इतके दिवस.. आणि भटकंती निमित्ताने त्याआधीचा दीर्घ प्रवासही पहिल्यांदाच आणि तो ही एकट्याने! हे सगळं पहिल्यांदाच घडत होतं. नाही, म्हणजे दूरवर फिरणं झालंय या आधीही, नाही असं नाही, पण ते सहलनिमित्ताने! नाहीतरी आजतागायत माझी सत्तर टक्के भ्रमंती ही नेहमीच नवनवीन गट-संस्था, अगदीच नवसवंगड्यांबरोबर झालेली, त्यामुळे 'नव-नवीन-नाविन्या'चा मी तर आधीपासूनच 'आदी'! साहजिकच, या 'पहिल्यांदा'च्या सर्व 'भीती-कल्पना' 'मोडी'त काढत मी आवराआवरीला, मुख्य म्हणजे खरेदीला, सुरुवात केली.
प्रस्थान..
यथावकाश तो 'सुदिन'ही उगवला. १३ एप्रिल! तयारी तर आदल्या रात्रीपर्यंत
चाललेली. पहिलीच हिमालयीन भटकंती ती, नि खरेदीही भली मोठ्ठी! त्यामुळं, ही
तयारी आता किती पूर्ण नि किती अपूर्ण, हे भटकंतीतील अनुभुतीपश्चातच कळणार
होतं, जरी यादीनुसार तर सगळंच घेतलेलं होतं.
दि. १३ एप्रिल.. अहमदनगरहून सायंकाळी पावणेसहाची जलद लोहगाडी होती.
त्यामुळे निदान अर्धा तास तरी आधी तिथं पोहोचण्याच्या बेताने मी एक तास
अधिकचा धरून तीन वाजताच शिरूरहून 'लालपरी'ने निघालो. प्रवासात काय, काहीही
खोळंबा होऊ शकतो. त्यात इतर साथी बरोबर असतील तर प्रश्न अलाहिदा. काहीही
'जुगाड' होऊ शकतो. पण, तुम्ही जर एकटेच असाल तर हा असा जास्तीचा वेळ राखून
ठेवत निघालेलं केंव्हाही सोयीस्करच! आणि, हे मला तसं नित्याचंच. कारण, इथं,
सह्याद्रीत फिरतानाही ही काळजी मला नेहमीच घ्यावी लागते. पण,
सुदैवाने, आज काहीच अडचण वा खोळंबा झाला नाही, साहजिकच, मी वेळेच्या एक
तासभर आधी अहमदनगरला पोहोचलो. काही वेळाने जेवण करून घेतलं नि गाडी येताच
आपल्या जागेवर स्थानापन्न झालो. गाडीही वेळेवर आली होती
नि निघालीही अगदी वेळेत. वाटेतही कसलीच अडचण आली नाही
आणि मी एकदाचा 'हजरत निजामुद्दीन'ला सुखरूप पोहोचलो, तेही अगदी वेळेत! आणि
मुंबईहून निघालेले 'मेहुल रमैया'सह आणखी दोन मुंबईकर सवंगडी तिथं
साडेसहाला पोहोचणार होते. मग तेवढ्या वेळात, वाट पाहत एका ठिकाणी थांबून
सतरा जणांना 'तोंड' देण्यापेक्षा मी आपलं स्थानक परिसर, बाजार इ. थोडंसं
पाहून घेणंच पसंत केलं. अखेर मुंबईकरही वेळेवरच आले नि आम्ही सर्व निघालो.
'स्टेप'च्या नियोजनानुसार आज आम्हां मराठी मंडळींचे यजमान असतात, येथेच जवळच राहणारे, 'स्टेप'चे संस्थापक सदस्य श्री. नरेंद्र कुमारजी आणि दिल्लीहून पुढे भटकंतीला निघण्याच्या वेळेपर्यंत आम्ही त्यांच्याकडेच 'पाहुणे' असणार असतो. मुळात स्टेपच्या वतीनं केलेलं भटकंतीचं संपूर्ण नियोजनच अत्यंत सुरेख असंच होतं.
'स्टेप'च्या नियोजनानुसार आज आम्हां मराठी मंडळींचे यजमान असतात, येथेच जवळच राहणारे, 'स्टेप'चे संस्थापक सदस्य श्री. नरेंद्र कुमारजी आणि दिल्लीहून पुढे भटकंतीला निघण्याच्या वेळेपर्यंत आम्ही त्यांच्याकडेच 'पाहुणे' असणार असतो. मुळात स्टेपच्या वतीनं केलेलं भटकंतीचं संपूर्ण नियोजनच अत्यंत सुरेख असंच होतं.
'सारी'कडे..
दिल्लीमधील सर्व सहभागींसह भटकंती पायथ्याच्या 'सारी' या गावी पोहोचण्यासाठी दोन छोट्या बसगाड्या आज रात्री १० वाजताच निघणार असतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही 'सारी' या गावी पोहोचणार असतो. म्हणजे साधारण १६ तासांचा हा बसप्रवास असतो. म्हणजे माझी पहिली हिमालयन भटकंती अजूनही १६ तास माझ्यापासून दूर होती.
दिल्लीमधील सर्व सहभागींसह भटकंती पायथ्याच्या 'सारी' या गावी पोहोचण्यासाठी दोन छोट्या बसगाड्या आज रात्री १० वाजताच निघणार असतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही 'सारी' या गावी पोहोचणार असतो. म्हणजे साधारण १६ तासांचा हा बसप्रवास असतो. म्हणजे माझी पहिली हिमालयन भटकंती अजूनही १६ तास माझ्यापासून दूर होती.
आणि, अखेर तो रात्रीचा प्रवासही सुरु झाला. दिवसभराचा शीण, आपुलकीमय आतिथ्य आणि आरामदायी बस यांचा एकत्रित परिणाम म्हणून चांगलीच झोप लागली. दिवस उजाडताच आलेल्या 'ब्यासी'
गावाजवळ बस थांबली अन आम्ही जागे झालो. कारण, सकाळची आन्हिकं उरकण्यासाठी
हेच नियोजित आणि सोयीचेही असंच ठिकाण होतं. आम्ही सर्वजण येथे 'ताजेतवाने'
झालो. त्यानंतर चहाही झाला अन पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. पुढे 'श्रीनगर' (उत्तराखंड) येथे थांबून चहा-नाश्ताही झाला. इथंही एक श्रीनगर आहे, हे इथंच कळलं.
![]() |
| सारी |
'सारी'पर्यंतचा बसप्रवास ही एक उत्तम निसर्गानूभूति होती. दोन्ही
बाजूंनी उंचच उंच उघडी-बोडकी पर्वतराजी, त्यावर नाममात्र अशी हिरवाई, दुरुन
इवलीशी दिसणारी ती घरे, छोट्या-छोट्या वस्त्या, जाळीदार नक्षी
काढल्यासारख्या त्या पाऊलवाटा, मध्येच कुठेतरी एखाद्या टेकडीवर एखादं
श्रद्धास्थानही आणि, आणि या पर्वतरांगेच्या मधूनच नागमोडी वाहणारी
सुरुवातीला ती 'अलकनंदा'.. नि पुढे ती 'मंदाकिनी'! आणि, त्यांच्या त्या
किनाऱ्या-किनाऱ्याने पळणारे ते रस्ते.. कधी डाव्या, कधी उजव्या, तर कधी
दोहोबाजुंनी! 'तिलवाडा' जसजसं जवळ येऊ लागतं तसतसं हिरवीगार
पर्वतराजी, उंचच उंच वृक्षराजी दिसू लागली. कुठं शेतीची क्षेत्रेही आकाराने
थोडी मोठी तर कुठं त्यात उभी पिकेदेखील दृष्टीस पडू लागली. काहीसं उंचावर
आल्यानं हवेत आता गारवाही जाणवू लागला आणि भर दुपारची वेळही जशी रम्य
सायंकाळच भासू लागली.
पहिला दिवस.. भटकंती सुरु..
भर गावातच असलेल्या एका कमानीमधून सिमेंट पायऱ्यांच्या वाटेने आम्ही वर निघालो. हा रस्ता शेवटपर्यंत पूर्ण दगडी फरसबंदीचा आणि सलग वर-वर चढत जाणाराच आहे. साहजिकच, काहीसा दमखाऊ असला तरी राखीव चालीनं चालल्यास तो आपणांस सहज वर घेऊन जातो. जोडीला भटकंती-मार्गावर दोहोबाजूने असते मस्त, आकर्षक अन भरपूर अशी हिरवाई, नवलाईच जणू! सरळसोट अन उंचच उंच अशी सुचिपर्णी! आणि, इतर झाडीही भरपूर असते नि त्यात असतो लाल-गुलाबी फुलवाला 'बुऱ्हांश'ही मुबलक!
![]() |
| लाल, गुलाबी फुलवाला बुऱ्हांश |
या फुलांचे गुच्छ म्हणजे हिरव्या पार्श्वभूमीवर काढलेली गुलाबी
वेलबुट्टीच जणु! या फुलांचा कोकमसारखा सरबत इथं सर्रास बनवला जातो.
थोडक्यात काय, नावात जरी 'बुरा' अंश असला तरी प्रत्यक्षात मात्र यात 'भला'
अंशच बऱ्याच प्रमाणात असतो, अन्यथा इतक्या आवडीने नि इतक्या प्रमाणात सरबत
बनते ना! अर्थात, त्याला मागणीही तेवढी आहे.
साधारणत: दोन तासांच्या दमदार चालीनंतर आम्ही काहीसं माथ्यावर पोहोचतो. इथं पोहोचताच, आपल्या दॄष्टीस पडतं एक चोहोबाजूंनी मध्यवर्ती उतार असलेलं, भव्य-दिव्य अन हिरवंकंच असं खोलगट मैदान! त्यात मध्ये कमी अन चोहोबाजूंनी विपुल अशी वृक्षराजी.. ज्यात, इथंही, 'बुऱ्हांश'चंच प्रमाण मुबलक! आणि.. आणि, दूरवर त्या क्षितिजरेषेवर आज प्रथमतःच घडलेले ते 'हिमदर्शन!' चित्ताकर्षक अशीच ती 'चौखंबा पर्वतरांग!' आणि, या सर्वांच्या मध्यभागी पण थोडंसं उजवीकडे, अगदीच 'खुलके' नि 'बहोत खिलके' दिसत असलेला तो एक ईवलासा पण अतिशय सुंदर असा तलाव.. 'देवरिया ताल'! 'देवरीया ताल' हेच त्याचं नाव आणि त्या तलावाकाठीच असतात आमच्या आजच्या मुक्कामासाठी लावलेल्या निळ्याशार तंबू-राहुट्या! आमचा आज इथंच या स्वर्गसम वातावरणातच असतो मुक्काम आणि आम्हांस ही एक असते पर्वणीच.. एक सुवर्णसंधीच!!
![]() |
| देवरिया ताल... ३ |
हे असं, इतकं अजब, एवढं गजब आणि कितीतरी विलोभनीय असं दृश्य ते.. अगदी प्रथमच पहात होतो मी. दृश्य कसलं, खरं तर एखाद्या उत्कृष्ठ चित्रकाराने अगदी फुरसतीत चितारलेले जिवंत चित्रंच जणू! माझा भटकंती-उर अतिशय अभिमानाने भरून-फुलून आला. मी आनंदलो, मी अत्यानंदलो. ध्यानी, मनी सगळा आनंदीआनंदच झाला. संपूर्ण सृष्टीत सजलेला वसंत दृष्टीत मावेनासा झाला. आंधळ्यानं एक डोळा मागावा नि देवानं त्याला दोन डोळे द्यावेत. जणू भजनाला स्वत: पांडुरंगानंच यावं नि रास-रंगाला प्रत्यक्ष कान्हानंच अवतरावं, अशातली गत झाली! निरातिशय सुंदर आणि अगदीच अप्रतिम असंच दृश्य होतं ते! जणू काही केवळ स्वप्नांतच पाहिलेलं!
खरं तर, तिथून हलुच नये असं वाटत होतं. पण मुक्कामच मुळी जर तिथंच, त्या'मध्ये'च होता, तर नुकसान असं काहीच होणार नव्हतं. मी जलद खाली आलो, पाठपिशवी तंबूत सोडली नि छायाचित्रयंत्र तसंच सोबत ठेवत अन कपडेही न बदलता तसाच बाहेर आलो. तोवर इतरजण मस्त 'गरम भजिया नि चहा'सोबत' तिथल्या त्या सौंदर्याचं 'रसपान' करीत होते. मग मीही त्यात सामील झालो. तिथल्या सुर्यास्तापर्यंत या रसपानात कसलाही खंड पडला नाही. यापूर्वी कधीही न अनुभवलेले आणि म्हणूनच अत्यंत किंमती, अगदीच अमोल आणि अवर्णनीय असंच सुख माझ्या पदरी पडत होतं.
![]() |
| देवरिया ताल.. ४ |
'रुद्रप्रयाग'पासून केवळ ४९ किलोमीटर अंतरावर असलेलं 'देवरीया ताल'
हे एक अतिशय सुंदर नि अत्यंत मनमोहक असंच एक भक्ती, भटकंती आणि,
पर्यटनस्थळही! एक छान असं कुरण.. घनदाट वनराई अन हिरव्यागार गवतांच्या
त्या मखमली कुरणांनी मस्तपैकी वेढला गेलेला तो एक अतिशय रम्य अन सुंदर असा तलाव.. देवरिया ताल! इथल्या तलावाबाबत असं
सांगितलं जातं की, प्रत्यक्ष 'देव-देवता' आणि 'पऱ्या'ही इथं स्नानासाठी
येत असत. आणि, म्हणून, देवरिया ताल! आणि इथलं आणखी एक खास असं वैशिष्ट्य
असं की, हिमालयातील 'गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि नीलकंठ'
या पाच गिरिशिखरांसह अखंड 'चोखंबा' पर्वतरांगेची अप्रतिम छायाही इथं
या तलावाच्या पाण्यात, प्रतिबिंबित होते. आणि, साहजिकच या बहारदार अशा ठिकाणी एक मुक्काम म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गानुभूतीच की!
![]() |
| देवरिया ताल..५ तलावात पडलेलं चौखंबा पर्वतरांगेचं प्रतिबिंब |
दुसरा दिवस.. चोपता,
दी मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया :
आज आमचा दुसरा दिवस. आजची आमची मजलही खूप मोठी असतेय. सुमारे १४ कि.मी.चा
पल्ला आणि जवळजवळ नऊ-दहा तासांची सफर पार करावयाची असते. आणि मध्ये ना
असतेय कुठं एखादं गाव, ना एखादी वाडी-वस्ती आणि जर भेटलंच कुणी क्वचितच तर
त्या असणार असतात फक्त मेंढ्या आणि त्यांच्या सोबतचे मेंढपाळ!![]() |
| देवरिया ताल.. ७ |
माथ्यावरुनचा निसर्गनजारा..
'देवरिया ताल'ला उजवीकडे ठेवत भल्या सकाळीच आमची वाटचाल सुरु झाली. पहिला तासभराचा टप्पा केवळ विरळ वनराजी आणि सलग अशी उभी चढण असल्याने काहीसा कंटाळवाणा आणि काहीसा कठीणही गेला. पण एकदाचे माथ्यावर आल्यानंतरच काय ते काहीसे हायसं वाटलं. एव्हाना सव्वा-दीडतासभराची चढाई झाली होती आणि ती सलग नि उभी असल्याने थोडं थकायला-दमायलाही झालेलं होतं. इथं येताच जरा बरं वाटल्यानं थोडं थांबणं झालं. पण, सहजच मागे वळून पाहतो तो काय, सगळा थकवा निघून जाईल, असाच निसर्गनजारा उभा होता आमच्यासमोर! संपूर्ण भोवतालच इथून अगदी चांगल्यापैकी निरखता येत होता. दूर तिकडे डावीकडे खोलवर 'सारी' गाव तर इकडे समोर 'देवरिया ताल'! आणि माथ्यावरुन दिसणाऱ्या त्या खोल खोल दऱ्या, ती खोरी, त्यात कुठं उघडे-बोडके ते डोंगर तर मध्येच कुठं ती दाट नि हिरवीगार अशी वनराई, ती शेती अन ती घरे, त्या डोंगरवाटा.. सारं काही 'मनलुभावन' असंच होतं. सारा परिसर अगदी खुलून दिसत होता,
![]() |
| माथ्यावरून दिसणारा भोवताल |
आणि, "मग, पुन्हा केंव्हा येताय आमच्याकडे परत?" जणु अशीच विचारणा करतसा भासत होता! इथं, त्या खुशीत मग, थोडं छायाचित्रण होतं, थोडा आराम होतो नि थोडंफार खाऊ-पिऊही! आता बऱ्यापैकी आराम आणि पोटालाही आधार मिळालेला असतो. साहजिकच, आमची भटकंतीसेना पुन्हा एकदा नव्या दमाने आपल्या लक्ष्याला भिडते.
जणू सह्यादीसमच..
प्रवास काहीसा जंगलवाटेचा नि दाट झाडा-झुडपांचा होता. जंगल मघाइतकं विरळ नसलं तरी फार दाट असंही नव्हतं आणि साधारण सहाएक तासपर्यंत वाटेवर पाण्याचा ठिपुसही नजरेस पडणार नव्हता. त्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन करीतच आम्ही निघालो होतो. पाण्याचा जपून वापर करीत चालत राहणं, ही त्यावेळची गरजच होती. काही वेळातच उतार लागून वाटेत उंच अन घनदाट अशी वनराई मिळाली. दाट वृक्षराजीमुळं खाली पाऊलवाटेत नि जमिनीवरही सर्वत्र दूरवरपर्यंत पानगळ पसरलेली दिसत होती. वाटेतली ती पानगळ, त्यातून चालताना होणारा तो मंजुळ रव, सोबतीला पक्ष्यांची मधुर किलबिल.. सारं काही भासत होतं अगदी सह्याद्रीसमच! इतकं की, क्षणभर, आपण हिमालयात आहोत, हेच विसरायला झालं. थोडी उघडीप मिळता नि थोडं वर, दूरवर नजर टाकता दॄष्टीस पडणारी हिमशिखरेच काय ती अपवाद! जी आम्हांला हिमालयीन वास्तवाची जाणीव करून देत होती.
![]() |
| चोपताचे खास सौंदर्य |
एव्हाना बारा वाजत आलेले. दाट जंगलामुळं उन्हाची फारसी जाणीव होत नव्हती, त्यामुळं पाणीही फारसं लागत नव्हतं. अधून मधून विश्रांती घेत वाटचालही आरामात चालू होती. मध्येच लागलेल्या माळावर काही मेंढ्या संपुर्ण माळभर अनेक छोटे-मोठे गट करून चरत असलेल्या दिसल्या. थोडं अंतर जाताच चार मेंढपाळही एका झाडाखाली छान गप्पा मारताना दिसले. त्यांना पाण्याबाबत विचारता, "साधारणतः: तासाभरात मिळेल.", अशा अर्थी काहीतरी ते पुटपुटले. पण जे काही समजलं त्यावरून आता फार तर तासाभरातच पाणी मिळणार असल्याचं लक्षात आलं होतं. आणि, एवढा अंदाजही आम्हा भटक्यांना पुरेसा ठरणार होता. त्यानुसार उरलेल्या भटकंतीत पाण्याचं नियोजन सोप्प होणार होतं. जल हैं तो जीवन हैं।
दगडी पूल आणि त्याखालून वाहणारी नदी आणि ते कमालीचं शीतल जल..
आता भर दुपार झालेली. आमची वाटचाल चालूच होती नि काहींचं 'हाश्श, हुश्श'ही! तेवढ्यात सुदैवानं एक रम्य असा उतार सुरु होतो. उजव्या बाजुला काहीशी खोल दरी नि डावीकडेच्या उतारावर उंचावरून उतरत आलेली ती रम्य वृक्षराजी! तीही अगदी ताडामाडासारखी उंचच उंच, सुचिपर्णीच ती! आणि या दोहोंच्या मधूनच थाटात चाललेली ही वाट! काहीसी रुळलेली. आणि बऱ्यापैकी रुंदही. इतकी की चारचाकीही सहज जाईल.. अन थोडं पुढं एक अप्रतिम अन उठावदार असं वळण घेतलेलीही! मनात आलं, एवढी रुळलेली म्हणजे नक्कीच जवळपास वस्ती असणार! पण ते उगाचच होतं. ती केवळ कल्पनाच होती ती. आडाखे होते ते.. जे कि चुकले होते. वस्ती वगैरे काहीही लागली नाही, परंतु, ज्याची अत्यंत आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो त्या पाण्याच्या खळखळाटाचा आवाज मात्र ऐकू येऊ लागला होता. अर्थात, मघाशी त्या मेंढपाळांनी सांगितलेलं हेच ते पाणस्थळ बहुदा! आता ते जवळ आलं असावं, हे स्पष्ठ होतं. आणि, वाटही पाण्यासाठीच्या रहदारीमुळेच इतकी उठावदार बनल्याचंही आमच्या लगेच लक्षात आलं. पुढच्या काही मिनिटांतच ते छानसं वळणही जवळ आलं. ते वळण घेऊन पुढे निघताच आम्हाला दिसला समोर एक सुंदरसा दगडी पूल.. आणि आणखी थोडं पुढं जाता दिसला तो त्याखालून जाणारा जलप्रवाह!ती नदी! आम्ही आनंदित झालो आणि खूप उत्साहीही. या आनंदातिशयात आणखी पुढे जात आम्ही खाली पात्राकडे वळालो. पाणी फार दिसत नव्हतं पण जे दिसत होतं त्यात सहज काम भागणार होतं. झालेला शीण नि आलेली मरगळ नक्कीच दूर होणार होती. भटक्यांना आणखी ते काय लागतं?
![]() |
| चोपता मार्गावर दिसलेला साकव नि तो जल, नव्हे, जीवनप्रवाह! |
हे दृश्य एक ग्रामीण ढंगाचं, रम्य अन उठावदार असंच ते होतं. दोन्हीही अत्यंत देखणे वाटत होते. अगदी जिवंतही! जणु आत्ता आमच्याशी काही बोलतील असेच! आम्ही जसजसं जवळ जाऊ तसतसा पात्रातील खळाळणाऱ्या त्या पाण्याचा 'मंजुळ रव'ही कानांत अधिकच गुंजत होता. आता आम्ही पात्राच्या खूपच जवळ आलेलो होतो. पाणी पाहून मनही चांगलंच खुललेलं, फुललेलं होतं. साहजिकच, प्रवाहाकाठी पोहोचतो न पोहोचतो तोच प्रचंड खुशीत अन भलत्या घाईतच आम्ही आमच्या पाठपिशव्या थकल्या जीवापासून अलग केल्या, मग बुटही ऊतरविले आणि उत्साही, अत्युत्साही ते मन त्या जलाकडे धावलं. एके ठिकाणी जलाचा बऱ्यापैकी खोल असा 'आशय'ही दिसला, पण, पाणी कमालीचं 'शीतल' ते. नमनालाच घडाभर तेल गेलं पण त्या जलात झोकून देणं सोडा साधं उतरणंही काही जमलं नाही. अखेर, थोडं धाडस करीतच ज्यानं-त्यानं आपल्या सोयीनं आपापला कार्यभाग साधून घेतला, पण, तेवढ्यानंही खूप बरं वाटलं. मग, मिळालेला हा ताजेपणा आणि त्याचबरोबर सुमारे अर्ध्यातासापेक्षाही जास्त वेळ मिळालेली विश्रांतीही आम्हाला खूपच उत्साह देऊन गेली. तेवढ्यात, काही सहकारीही तिथं येऊन पोहोचले. काही अद्यापही मागेच होते.
नदीपल्याड..
घड्याळाकडे पाहता एव्हाना तीन वाजून गेलेले असतात. मग आलेल्यांचं स्वागत करीत नि त्यांना सन्मानाने जागा देत आम्ही आमचा मोर्चा तिथून हलवला अन नव्या उत्साहाच्या त्या नव्या दमातच नदीपात्र ओलांडलं आणि उजव्या हाताच्या वळणाने वर चढणीला लागलो. ही चढण तशी थोडीच होती, पण वर येताच पुन्हा दृष्टीपथात आली ती हिरवा शालू ल्यायलेली ती मखमली भूमाय अन सारेच ते सगे-सोयरे.. ती वृक्षवल्ली! आणि, इथंही, तो बुऱ्हांश दिसला अगदी मुबलक प्रमाणातच! मग, या सर्वांच्या संगतीने पुढची साधारण तासभराची सरळ फरसबंदी वाटेची चाल सहजच पूर्ण करीत आम्ही सदाहरित 'चोपता'च्या शिवेवर येऊन धडकलो. आता चोपता खूपच जवळ आलेलं असतंय. म्हणजे हाकेच्या अंतरावरच! वाहनांचे आवाजही कानी येऊ लागतात. मग, उर्वरित जंगल उत्साहात पार करीतच आम्ही आमचं मार्गक्रमण करीत असतो. अंतिमतः एक छोटासा चढ चढून वर येताच, अगदी अचानकच, आम्ही येऊन धडकतो ते थेट डांबरी रस्त्यावरच!
अचानक आलेला हा रस्ता पाहून निर्वाणीचा 'हुश्श' करत, 'आलं बुआ एकदाचं' या भावनेतच अनेकांकडून सुटकेचा निश्वास बाहेर पडतो. आता पुढं काय, डावी की उजवी असा प्रश्न पडतो न पडतो तोच रस्त्यावरील ताज्या नि स्पष्ठ अशा सफेद खडूने केलेल्या बाणखुणा दृष्टीस पडतात. त्या आमच्यासाठीच असतात. कारण तसा उल्लेखही तिथं असतो. मग त्यांचा मागोवा घेत आम्ही जवळच, साधारण दोनेकशे मीटर, असलेल्या आमच्या त्या मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचतो.
![]() |
| चोपताचे ख़ास सौंदर्य.. २ |
चोपता.. अर्थात तुंगनाथ पायथा दृष्टीक्षेपात ..
तिथं पोहोचताच पहिली पाठपिशवी पाठीपासून विलग झाली नि तंबूत स्थिरावली, निवांत झाली. अद्यापही काही सोबती यायचे असतात. मग तेवढीच एक संधी साधत मी बाहेर आलो. चोहीकडे नजर फिरली आणि दिसलं ते आजूबाजूला.. एक विषमतल असं मैदान, त्यातच उभारलेल्या त्या आमच्या तंबू-राहूट्या. त्यांच्या सोबतीला आजूबाजूलाही आणखीही काही. आणि, एक रस्त्याची बाजू सोडली तर मैदानाभोवती तिन्ही बाजूस प्रचंड अन प्रसन्न अशी वृक्षराजी! आणि, रस्त्यापलीकडे, समोर, पुन्हा कालसारखंच एक मैदान! फरक इतकाच की ते चोहोबाजूने मध्याकडे उतरलं होतं तर आजचे हे दोन्ही बाजूने सरळ खाली उतरलेलं.
हे मैदानही खूपच सुंदर होतं. शिवाय अगदीच हिरवंगार नि भोवती तिन्हीही
बाजूला दाट झाडी आणि मध्ये वर वर चढत जाणारी ती मखमली हिरवी चादर, त्यावर
अध्येमध्ये एखाद-दुसरं झाड-झुडूप आणि इतस्ततः चरत असलेल्या काही मेंढ्या!
एका बाजूला, मघाचाच पण वळून पुन्हा समोर आलेला तो डांबरी रस्ता नि त्याच्या
डावीकडे उभी केलेली काही वाहनं तर उजवीकडे चार-सहा दुकानं. त्याही वरच्या
पट्ट्यात पुन्हा ती मखमली नि समृद्ध अशी हिरवाई, त्यात डावीउजवीकडे
नि समोर काही छानश्या रंगीबेरंगी इमारती आणि त्याहीवर.. उंच.. ती
हिमाच्छादित गिरीशिखरे! आणि अशा रुपात दडून बसलेलं ते मूळ शहर.. चोपता!
थोडक्यात, पहिल्याच नजरेत थोडं दुरूनच आम्हांला जे दिसलं नि जे निरखता
आलं ते 'चोपता' हे असं होतं! शीतल-हिरवं नि रम्य-बहारदार, रंगी-बेरंगी
चोपता! भारतवर्षाचं छोटं स्वित्झर्लंड! सुमारे नऊ हजार फूट उंचीवर वसलेलं,
घनदाट वनराईने बव्हंशी 'देवदार' नि 'लाल-गुलाबी बुर्हांस' यासारख्या
वृक्षांनी गच्च वेढलेलं, मखमली गवत नि सुंदर फुलांनी बहरलेलं, एक सदाहरित,
आणि म्हणूनच 'मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जाणारं, हे
'चोपता', आता ते एक नितांत सुंदर अन 'होऊ घातलेले' थंड हवेचे ठिकाण म्हणून
चांगलंच प्रसिद्धीस येत आहे. मे ते जुलै आणि सप्टेंबर ते डिसेंबर या
काळात इथलं वातावरण इथल्या हिरव्यागार कुरणांनी व सदाहरित वनराईमुळे
खूपच सुरेख, अतिशय सुंदर नि साहजिकच अत्यंत सुखद असंच असतंय.
इथं आमचे दोन मुक्काम होतात. इथं आदल्या रात्री भोजनपश्चात फुललेला
'गीत-बहार' तर अगदीच अविस्मरणीय! सर्वांनीच भेंड्याव्यतिरिक्त आपापल्या
आवडीची 'गीतं' गायली, त्यामुळंही या कार्यक्रमाला एक भलताच 'बहार' आला.
तिसरा दिवस.. 'तुंगनाथ' :
आजचा आमचा येथील भटकंतीचा तिसरा अन शेवटचा दिवस. 'तुंगनाथ'.. भक्त असो वा भटके.. तुंगनाथजींना भेट देण्यासाठी येणारांकरिता चोपता हाच पायथा तथा पायथ्याचं गाव आणि
या पायथ्यापर्यंत आहे छान गाडीरस्ताही.. त्यामुळे शिवभक्त इथपर्यंत
वाहनाने येऊ शकतात. अशी काही वाहने या इथं पायथ्याशी उभी केलेलीही आपणास
दिसून येतात. इथून पुढं मात्र जावं लागतं ते पायीच आणि ही 'मजल' आहे साधारण
तीन ते सव्वा तीन कि.मी. आणि साधारण चालीनं सुमारे तीन ते साडेतीन तास!
सलग अशी अन वर-वर चढणीची नि पूर्ण फरसबंदीचीही!
![]() |
| तुंगनाथजींच्य मंदिराकडे जाणारा मार्ग |
सुरुवातीला अगदी दुकानांच्या रांगेतच परंतु मध्येच असलेल्या एका सुंदर
नि छोट्याशा कमानीतून प्रवेश करीत आम्ही पायऱ्याने वर निघतो. साधारण
अर्धा-पाऊणतासभर 'विविध वृक्ष-वनस्पतींच्या समृद्ध साथीने पुढे पुढे जात
रहातो. इथल्या वृक्षराजीतही बव्हंशी 'लाल बुर्हांस'च दृष्टीस पडतो. वाटेत
अनेक हिमशिखरांचंही दर्शन होत रहातं. नंतर मात्र वृक्षराजी कमी कमी होत
जाऊन दोन्ही बाजूंना दिसू लागतात एकतर हिरवीगार कुरणं जसा हिरवाकंच मखमली
गालिचाच! नाहीतर, छोट्या-मोठ्या टेकड्या नि दरी-खोऱ्यांसह त्यांत गर्द
झाडीतरी! त्यांतही जणु लाल-गुलाबी अंगरखा घातल्यागत उठून दिसणारा तो
रूबाबदार 'बुर्हांस' आणि चारही रंगांची उधळण करीत नुकतीच फुललेली ती
'कागाडी'!
![]() |
| तुंगनाथजी मंदिर मार्गावर आढळलेली विविध फुले आणि फुलपाखरू |
आणि, पार्श्वभुमीला दुरवरपर्यंत पुन्हा एकदा, ती हिमाच्छादित गिरीशिखरे! हा नजारा, खरं तर, प्रत्यक्ष अनुभवावा असाच! मंदिराच्या
जसजसं आपण जवळ येतो तसतसं दोनच दिवसांपूर्वी झालेल्या हिमवर्षावाच्या
शिल्लक राहिलेल्या थोड्याफार पाऊलखुणा आपल्याला वाटेच्या कडेलाच व थोडं
दुरवरही बर दिसू लागतात. आता आपण मंदिराच्या एकदम जवळ जवळच आलेलो.
तुंगनाथ मंदिर..
इथं एक रस्ता सरळ डाव्या हाताने तुंगनाथजींकडे जातो तर दुसरा तसाच उजवीकडे सरळ पुढे निघत गोपेश्वर तथा चंद्राशीलाकडे जातो. आम्ही सुरुवातीला डावी वाट पकडत नि तो रुंदसा पायरीमार्ग चढून त्या भल्या मोठ्या मंदिरपरिसरात त्या भल्या मोठ्या कमानीतून प्रवेश करते .
इथं एक रस्ता सरळ डाव्या हाताने तुंगनाथजींकडे जातो तर दुसरा तसाच उजवीकडे सरळ पुढे निघत गोपेश्वर तथा चंद्राशीलाकडे जातो. आम्ही सुरुवातीला डावी वाट पकडत नि तो रुंदसा पायरीमार्ग चढून त्या भल्या मोठ्या मंदिरपरिसरात त्या भल्या मोठ्या कमानीतून प्रवेश करते .
![]() |
| तुंगनाथजींचं मंदिर |
तसं हे एक तीर्थक्षेत्रही! त्यामुळे भटक्यांच्या जसा 'ध्यास' आणि 'वास' इथं तसा भक्तांचाही!' हे स्थळ आहे समुद्रसपाटीपासून सुमारे अकरा हजार फूट उंच, त्यामुळं, हे आहे जगातील सर्वांत जास्त उंचीवर असणारं एकमेव शिवालय! शिवाय,
पंचकेदारमधील एक, अनुक्रमे तिसरं आणि एकूण पाचांमधीलही सर्वोच्च!
साहजिकच, इथं शिवभक्तही येतात, एवढ्या उंचीवर आणि ते ही बहुसंख्येने!
मात्र, हिवाळ्यात येथील मंदिर-आस्थापना सहा महिन्यांसाठी पूर्णतया बंद
असते. साधारण नोव्हेंबरमध्ये एके सकाळी अन शुभमुहूर्तावर पूजा सुरू होते.
तुंगनाथजींना शृंगार करून नैवेद्य दिला जातो. स्वयंभू लिंगस्वरूपाला
समाधीरूप दिलं जाऊन पूजा केली जाते आणि वैदिक मंत्रोच्चार तथा रूढ
प्रथा-परंपरांचं विधीवत पालन करीत ही पालखी निघते. हा पालखी- सोहळा साधारण
५० कि.मी. नि १०-१२ तासांचा आहे आणि ही पालखी वाटेत दोन मुक्काम करीत
तिसऱ्या दिवशी 'उखीमठ'च्या अलीकडे मुख्य रस्त्यापासून थोडं आत असलेल्या
'मक्कूमठ' या गावातील 'मार्कंडेय मंदिरा'त साधारण सहा महिन्यांसाठी
विराजमान होते.
कस्तुरीमृग हा उत्तराखंड राज्याचा राष्ट्रीय प्राणी असून त्याच्या सरंक्षण व संवर्धन हेतुतून बनवण्यात आलेलं 'केदारनाथ वन्यजीव संरक्षण व संवर्धन अभयारण्य' इथल्या 'चमोली' नि 'रुद्रप्रयाग' या दोन जिल्ह्यांतील सुमारे ९७५ चौ. मी. क्षेत्रामध्ये वसलेलं आहे. तुंगनाथजींच्या दर्शनासाठी या अभयारण्यातुनच जावे लागते. हे अभयारण्य प्रवेशनिषिद्ध असं क्षेत्र असून शिस्त नि स्वच्छता राखण्याची हमी नि आवश्यक ते प्रवेशशुल्क भरूनच वनखात्याच्या पूर्वपरवानगीसह आत जाता येते.
स्वतःची तंबु-राहुटी असतानादेखील त्याचा आकार, प्रकार
आणि त्यासाठी वापरलेली जागा यावरून त्याची वेगवेगळी शुल्कआकारणी होते, काही
अंतर पुढे गेल्यावर या वाटेवरच आपणांस 'हेमवती नंदन बहुगुणा गढवाल
विश्वविद्यालय, श्रीनगर, गढवाल अंतर्गत 'उच्च शिखरीय वनस्पती शरीररचना
शास्त्र संशोधन संस्था' (High Altitude Plant Physiology Resaerch Centre) असल्याचेही दिसून येते.
तुंगनाथजींचे ते मंदिर आणि मंदिर परिसरात असलेली ती अनेक देवतांची आणखी
काही छोटी छोटी मंदिरे.. एकूणच, मंदिराचा तो देखणा आणि पवित्र परिसर आपला
थकवा क्षणांतच पळवून लावतो. थोडा आराम आणि मग मनोभावे पूजा-आरती करून नि
प्रसाद वाटप करूनच आम्ही पुढे निघतो ते तिथून आणखी पुढे असलेल्या 'चंद्रशिला' तथा 'गोपेश्वरा'कडे!
'गोपेश्वर' तथा 'चंद्रशिला' :
![]() |
| थोडं दुरूनच दिसलं ते गोपेश्वर मंदिर हे असं.. |
तुंगनाथजींच्या मंदिरापासून साधारण एक ते सव्वा कि.मी. वर असलेलं हे
ठिकाणही अतिशय निसर्गरम्य असंच आहे. तुंगनाथजींच्या मंदिराचे अगदी मागूनच
हा रस्ता जातो. सुरुवातीला हा रस्ता अरुंद अन साधारणच आहे. पण, थोडं पुढं
गेल्यावर एक रस्ता मधूनच एका उंच पर्वत-कड्याच्या बाजूनं सरळ वर निघतो तर
मूळ रस्ता सरळ पुढे वळण घेत फिरुन वर येतो. आम्ही मुद्दाम हा चढणीचा पण
जवळचा निवडला. तेथून पुढे मात्र तो जरी कच्चाच, डोंगरी पण चांगलाच रुळलेला
असा आहे.
इकडे मात्र हिरवळीचा काहीसा अभाव जाणवतो. पण, पुढे उंचावर निघून गेल्यावर
मात्र सभोवती दिसणाऱ्या दऱ्याखोऱ्यांनी बऱ्यापैकी हिरवळ दृष्टीस पडते.
त्यातही 'बुऱ्हांश'चं प्रमाणही लक्षवेधी आहे. रस्ता सलग आणि अतिशय चढणीचा
असल्याने हवेतल्या ऑक्सिजनची मात्रा आणखी कमी कमी होत जाते, त्यामुळे श्वास
घ्यायला एखाद्याला त्रासही होऊ शकतो, मात्र, शिस्तीने व सफाईदारपणे
निघाल्यास ही अडचणही येत नाही. निवांत चालीनं साधारणपणे तासभराच्या आतच
आपण येथे पोहोचतो.
सुमारे १३,३०० फुट उंच असलेल्या या लहानशा टेकडीवर, एका लहानशा मंदिरात श्री 'गोपेश्वरजी' विराजमान आहेत. इथं पोहोचल्यावरही थोडा आराम होतो नि सर्वजण आल्यावरच गोपेश्वरजींचीही भक्तिभावाने पुजा, आरती केली जाते. प्रसाद वाटपही होतो. त्यापुढेही साधारण उजवीकडे अंतिम टोकाला उघड्यावरच एक लहानशी शिवपिंडही आहे.
आम्ही तिकडेही जाऊन येतो. इथं, बाजूला असलेल्या संगमरवरी शिलांवर सदर
जागेस 'आदिनाथ पिठाधिश्वर श्री त्रिलोकनाथजी यांचा आखाडा' असे उल्लेखिलेले
दिसून येते.
![]() |
| श्री आदिनाथ पिठाधीश्वर श्री त्रिलोकनाथजी महाराज यांचा आखाडा |
या शिखरावरून सभोवती, चोहोबाजूला आणि खोलवर खाली दिसणारा तो निसर्गनजारा तर केवळ प्रसन्न अन
अत्यंत मोहनिय असाच आहे. एकंदरीत, ही शिखरं यावेळी जरी बऱ्यापैकी उजाडच असलेली दिसत असली तरी भोवताली जिथून कुठून पाण्याचा एखादा स्त्रोत निघतो त्याच्या आजूबाजूची हिरवाई मात्र अत्यंत मोहक अन आकर्षक अशीच दिसते. त्यातच इथल्या, अलकनंदा अन मंदाकिनी या नद्यांच्या खोर्यांचं सुंदर दृश्यही अत्यंत छान नि मनमोहक असंच आहे.
आमच्या या भ्रमंतीतील हे असतंय शेवटचं ठिकाणं! मग मनसोक्त छायाचित्रण होतं. तत्पश्चात जरा निवांत होत आरामही होतो. आणि, पाच वाजेपर्यंत खाली मुक्कामस्थळी पोहोचण्याबद्दल कप्तानाकडून मिळालेल्या सुचनेनुसार, जो-तो, यथावकाश, सोबत अध्यात्मिक आणि भटकंती सुखाची जरा मोठीच पुरचुंडी बांधून घेत आपल्या 'दमा'नुसार एक-एक करीत वा गटागटाने उतरत पायथ्याशी येऊन पोहोचतो.
भटकंती समाप्ती..
आता भटकंती, खऱ्या अर्थाने, पूर्णतया संपलेली असते. एक मुक्ततेची भावना मनी वसलेली असते. पण त्याहूनही वरचढ असलेली 'तृप्तते'चीही भावनाही त्याचवेळी हृदयी उतरलेली असते. एका सह्यभटक्याला आता हिमालयाचीही साथ मिळाल्याचा अपरिमित आनंद झालेला असतो. आणि, याकामी मदत व सहकार्य झालेल्या सर्व सहकारी नि सहाय्यक घटकांचा तो प्रचंड ऋणी असतो. उंची अन थंडीची अकारण असलेली अनामिक भीतीही आता गायब झालेली असते. कुवतीनुसार आणखी उंचावर, हिमाच्छादित शिखरांवर नि त्यांच्या भोवतीने भटकंती नि वास करण्यासाठीची सादही हिमालयाने पुन्हा लवकरच आपल्याला घालावी, अशीच त्याची भावना, मनीषा असते.
आता भटकंती, खऱ्या अर्थाने, पूर्णतया संपलेली असते. एक मुक्ततेची भावना मनी वसलेली असते. पण त्याहूनही वरचढ असलेली 'तृप्तते'चीही भावनाही त्याचवेळी हृदयी उतरलेली असते. एका सह्यभटक्याला आता हिमालयाचीही साथ मिळाल्याचा अपरिमित आनंद झालेला असतो. आणि, याकामी मदत व सहकार्य झालेल्या सर्व सहकारी नि सहाय्यक घटकांचा तो प्रचंड ऋणी असतो. उंची अन थंडीची अकारण असलेली अनामिक भीतीही आता गायब झालेली असते. कुवतीनुसार आणखी उंचावर, हिमाच्छादित शिखरांवर नि त्यांच्या भोवतीने भटकंती नि वास करण्यासाठीची सादही हिमालयाने पुन्हा लवकरच आपल्याला घालावी, अशीच त्याची भावना, मनीषा असते.
'तुका म्हणे प्रेम मागतो आगळे, येथे फळ भोगू वैकुंठीची'.. तुकाराम
महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्हासही आता या इथंच स्वर्गसुख भोगण्याची
आत्यंतिक इच्छा आहे. सह्याद्री नि हिमालयात जे सुख आहे ते काय
स्वर्गसुखाहून कमी का आहे, की वेगळे आहे? खचितच नाही.
अखेरची रम्य सायंकाळ..
आज, या रम्य सायंकाळी, एका वेगळ्याच उत्साहात प्रत्येकजण ताजातवाना झालेला असंतो. एका भावनिक वातावरणातच चहापान होतं नि त्यानंतर तशाच भावनिक वातावरणात आयोजित झालेल्या त्या छोट्याश्या 'अभिप्राय आणि यशस्विता प्रमाणपत्र वितरण समारोहा'सही तो हजेरी लावतो. अभिप्राय होतात, प्रमाणपत्र वाटपही होतं. सर्वांच्याच चेहऱ्यावरुन यावेळी एक कठीण तरीही अत्युत्तम अशी हिमालयन भटकंती पूर्ण केल्याचा अमीट आनंद ओसंडून वाहत असतो.
अखेरचं 'एकत्र येणं, मौज-मजा, गाणं-बजावणं, संपर्क क्रमांक अन राहत्या
पत्त्यांची देवाण-घेवाण, पुन्हा भेटण्याचे वादे-इरादे.. इ. सर्व कालच्या
'गीत-बहार' कार्यक्रमावेळीच झालेलं असतंय. मग उद्याच्या तयारीला
लागण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या तंबूत शिरतो. काही वेळातच जेवणही येतं, आज
अखेरचा दिवस, त्यामुळे आज तशी मेजवानीच! त्यामुळे, इकडच्या-तिकडच्या
गप्पा-टप्पांत तिचाही छानपैकी आस्वाद लुटला जातो.. आणि, उद्याच्या
घरपरतीच्या आनंदात पण सुंदर निसर्गाच्या विरहाच्या दुःखात प्रत्येकजण
निद्राधीन होतो ते सकाळी लवकर उठण्याच्या हिशेबानेच.
निरोप..
निरोप..
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवराआवर करून आम्ही तयार होतो. बोलावलेल्या
बसगाड्याही आलेल्या असतात. चहापान होताच आम्ही 'चोपता'ला पुन्हा येण्याचं
आश्वासन देत परतीच्या प्रवासाला निघतो.
.
- सह्यभ्रमर

















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.