महाराष्ट्रामध्ये ‘गणपतीची’ अनेक वेगवेगळी वेगवेगळ्या काळातली ठिकाणे आहेत. अश्याच काही गणपतींची ठिकाणे ही बऱ्याचदा आडवाटेवर आपल्याला पहायला मिळतात. असेच एक सुंदर ‘गणपतीचे’ मंदिर आपल्याला निसर्गरम्य कोकणातील ‘मुरुड’ तालुक्यामध्ये असलेल्या ‘नांदगाव’ या गावामध्ये पहायला मिळते. ‘नांदगाव’ येथे हा गणपती ‘नांदगावचा सिद्धीविनायक’ म्हणून प्रसिद्ध आहे.
‘फणसाड’ अभयारण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ‘नांदगाव’ वसलेले आहे. या नांदगावच्या ‘सिद्धिविनायक’ याला भेट द्यायची असेल तर आपली स्वतःची गाडी असेल तर उत्तम तसेच ‘मुरुड’ आणि ‘फणसाड’ येथून देखील नांदगाव येथे येण्यासाठी आपल्याला गाड्या मिळतात. ‘रेवदंडा-मुरुड’ या रस्त्यावर असलेले हे ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर अत्यंत सुंदर आहे. या नांदगावच्या ‘सिद्धीविनायक’ मंदिरापासून अगदी जवळच समुद्र किनारा आहे. काही संस्कृत पोथ्यांमध्ये तसेच इतिहासामध्ये या नांदगावचा उल्लेख हा ‘नंदीग्राम’ असा देखील आलेला आढळतो.
‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर अत्यंत सुंदर आहे.
१६ व्या शतकात येथे ‘नंदीग्राम’ म्हणजेच ‘नांदगाव’ येथे राहणाऱ्या एका ब्राम्हण कुटुंबामध्ये ‘गणेश’ यांचा जन्म झाला. या ‘गणेश’ यांचे ज्योतिषशास्त्रावर एवढा सूक्ष्म अभ्यास होता कि त्यांनी वर्तवलेली भविष्य अचूक ठरत असत. म्हणून गावातील लोकं त्यांना दैव जाणणारे म्हणजेच ‘दैवज्ञ’ असे म्हणू लागले. या ब्राम्हण असलेल्या ‘गणेश दैवज्ञ’ यांच्यावर गणपतीची कृपा होती. या ‘गणेश दैवज्ञ’ यांनी इ.स. १५५० मध्ये रचलेला ‘ग्रहलाघव’ नावाचा सगळ्या भारतामध्ये हा प्रसिद्ध झाला होता. ‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेल्या ‘ग्रहलाघव’ ग्रंथामध्ये ग्रहांच्या गणिताचा अभ्यास करण्याविषयी १९२ श्लोक ‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेले आहेत. पुढे जवळपास ४०० वर्ष याच ‘ग्रहलाघव’ ग्रंथावर आधारित पंचांगे बनवली जात होती.
‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेला ‘ग्रहलाघव’ ग्रंथ.
‘नांदगाव’ येथील ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर हे नव्याने जीर्णोद्धारीत केलेले आहे. त्यामुळे आपल्याला या मंदिरात बाकी कलाकुसर अशी बघायला मिळत नाही. मंदिराला सभामंडप आणि गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये आपल्याला गणपतीची सुंदर पाषाणमूर्ती पहायला मिळते. या पाषाणमूर्तीची स्थापना ही ‘ग्रहलाघव’ ग्रंथाचे लेखक ‘दैवज्ञ गणेश’ यांनीच केलेली आहे. उंच असलेली पाषाणाची गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. मांडी घालून बसलेल्या या मूर्तीचे हात मात्र आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. नांदगावच्या या सुंदर ‘सिद्धीविनायक’ गणपती मंदिराला भारताचे पहिले राष्ट्रपती ‘डॉ. राजेंद्रप्रसाद’ यांनी देखील भेट दिली होती असा एक संदर्भ आढळतो.
असे हे नितांत सुंदर समुद्रकिनारी असलेले नांदगाव येथील ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर नक्कीच बघण्यासारखे आहे. या सुंदर आणि शांत ठिकाणी भेट देऊन आपण येथील समुद्रकिनाऱ्यावर देखील फेरफटका मारू शकतो आणि आपला दिवस नक्कीच सत्कारणी लावू शकतो. असे हे नांदगावचा वारसा असलेले ‘सिद्धीविनायक’ मंदिर भेट देण्यासारखे आहे.
पाषाणमूर्तीची स्थापना ही ‘ग्रहलाघव’ ग्रंथाचे लेखक ‘दैवज्ञ गणेश’ यांनीच केलेली आहे.
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
पुणे – पौड – मुळशी – कोलाड – रोहा – फणसाड – नांदगाव.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.