मित्रांसोबत वा घराच्यांसोबत आपण नेहमीच फिरतो, पण जी मज्जा सोलो ट्रिप म्हणजेच एकट्याने फिरण्यात आहे ती काही औरच, या ट्रिप मध्ये तुम्हाला स्वता सोबत पूर्ण वेळ मिळतो स्वतःला ओळखता येत, स्वतःच्या मर्जी प्रमाणे प्लान करता वा ऐन वेळी बदलता येतात. आपल्याआवडीच्या जागा पाहतायेतात आणि सर्व काही आपल्या मर्जीने. बजेट बॅग पॅकिंग, सोलो ट्रिप या गोष्टींची नेमकी व्याख्या काय ते माहीत नाही, पण यातलाच आपल्याला झेपेल असा काहीतरी प्रकार करून बघावा अस खूप दिवसापासून वाटत होत.या पूर्वी एक एक दिवसासाठी कर्नाळा, अर्नाळा,सिंहगड एकट्याने फिरून आलो होतो, त्यामुळे आता एकट्याने फिरायची सवय झाली होती, मग आता राज्याबाहेर एकट्याने जाऊन बघुयात म्हणून ठिकाण शोधायला सुरवात झाली. मिळणाऱ्या 3 दिवसाच्या सुट्टी मध्ये जास्त लांब जाण शक्य नव्हतं आणि या पूर्वी फक्त उत्तर भारतात फिरणं झालेलं असल्याने आता दक्षिणेकडे जाऊयात, त्यांमुळे भरपूर दिवसापासून लिस्ट मध्ये असलेल ठिकाण म्हणून मग हंपीला जायच ठरलं. तस हंपी ला फक्त तीन दिवसा साठी जाणे हा मूर्खपणाच, कारण हंपी ही जागा घाईगडबडीत फिरण्यासारखी नाही, नुसता भोज्या करण्यासाठी तर अजिबात नाही.26 जानेवारी ते 28 जानेवारी 2020 ही तारीख ठरली, त्या प्रमाणे पनवेल ते हॉस्पेट रिटर्न्स तिकीट काढून झाल्या नंतर जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा पहिला प्रश्न कोणासोबत जातोय, ह्या प्रश्नाच उत्तर एकटा जातोय हे दिल्या नंतर पडायचे ते शब्द कानावर पडलेच, त्यातल्या त्यात ट्रेकिंग साठी नाही जात कळल्या नंतर शाब्दिक मार थोडा कमी मिळाला. या ट्रिप मध्ये फारशी काही डिटेल प्लानिग करायची नाही असे ठरवल असलं, तरी सुदधा हंपी बद्दल थोडीफार माहिती जमवली, आणि बॅग भरायला आणि सामानाची जमवा जमव करायला सुरुवात केली, हंपी जरी काही फार लांब नसला तरी आपण जेव्हा मातृभाषेपासून लांब जातो तेव्हा थोडीफार भीती मनामध्ये असतेच.
25 ला शनिवारी संध्याकाळी कळंबोली वरून बस पकडायची होती, त्यामुळे ऑफिस मधून लवकरच निघालो बॅग सकाळीच भरून ठेवली होती, त्यामुळे लगेच बॅग पाठीवर मारून घर सोडलं आणि बसच्या वेळेच्या आधीच कळंबोली गाठली,बस तशी थोडा उशिराच आली, बस मध्ये बसल्या बसल्या अगोदर घरी आणि एकदोन मित्रांना माझा लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवला, त्यामुळे कुठे पोहोचला ह्या प्रश्नासाठी आता फोन येणार नव्हते.रात्री बस एका ठिकाणी जेवणा साठी थांबली जेवण आटपून बस मध्ये झोपी गेलो तो थेट पहाटे 6 च्या सुमारास उठलो, मोबाईल मध्ये लोकेशन बघितलं तर अजून हॉस्पेटला पोहोचायला साधारण एक दिड तास लागणार होते, बसच्या खिडकीचा पडदाबाजूला सरकवला बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती, सूर्योदयापूर्वीच्या भगव्या छटा आसमंतात पसरल्या होत्या आणि खाली हिरवीगार भात शेती मध्येच नारळीच्या बागा एक विलक्षण नजारा डोळ्यासमोर धावत होता.26 जानेवारी अर्थात भारताचं प्रजासत्ताक दिन असल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शाळांमध्ये झेंडावंदना साठी सुरू असलेली लगबग दिसत होती. 7:30 वाजता होस्पेट मध्ये पोहोचलो बसखाली उतरलो तेव्हा हंपी ला घेऊन जाणारे बरेच रिक्षावाले उभे होते, ते हंपीला सोडण्याचे साधारण 150-200 रुपये घेतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून थोड्याच अंतरावर असलेल बसस्टँड गाठलं, थोड्याच वेळात हंपी साठी बस लागली होस्पेट ते हंपी हे अंतर 12-13 किमी आहे.
बस जसजशी हंपीच्या जवळ पोहोचु लागली तसतश्या छोट्या छोट्या टेकड्या दिसू लागल्या, एकवर एक उभ्या असलेल्या मोठमोठ्या शिळा लक्ष वेधू लागल्या, बस आता हंपीत पोहोचली विरुपक्ष मंदिराच्या समोर बस मधून खाली उतरलो, समोर दिसणाऱ्या विरुपक्ष मंदिराच्या त्या भव्य 105 फूट उंच गोपुराला दुरूनच हात जोडून आधीच ठरवल्या प्रमाणे तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्याकडे चालू लागलो, तुंगभद्रे पलीकडे असणाऱ्या हिप्पी आयलंड वर मुक्कामाची जागा शोधून मग पूर्ण हंपी फिरायची असा प्लॅन होता, पण तिथे समजलं की नदी पार करण्यासाठी असलेली बोट संध्याकाळी लवकर बंद होते, त्यामुळे मग मागे फिरून विरुपक्ष मंदिरा शेजारी असलेल्या वस्तीत रहायच ठरवलं, इथे 200- 1000 पर्यंत छान पैकी होमस्टे उपलब्ध असतात, थोडीफार शोधाशोध केल्यानंतर दोन दिवसाकरिता एक होमस्टे बुक केल खांद्यावरची बॅग उतरली आणि अंघोळ उरकून तयार होऊन लगेच बाहेर पडलो. होमस्टे समोरच्या एका टपरीवर नाश्त्यासाठी बसलो एक मसाला ढोसा आणि एक प्लेट इडली असा भरगच्च नाश्ता झाला, आता दुपारी जेवण वेळेत नाही मिळाले तरी चालणार होते.
घड्याळात 10:30 झाले होते, नेमकी हंपी फिरायची सुरुवात कोठून करावी हे ठरवलं नव्हतं, आता थोडाफार गोंधळून जातो की काय असच वाटू लागलं, सोबत एक छोटी बॅग त्यामध्ये एक टॉर्च आणि दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि विरुपक्ष मंदिराकडे चालू लागलो. विरुपक्ष मंदिराच्या समोरून हेमकुटा टेकडीवर चढायला सुरुवात केली टेकडीवर अनेक लहान-मोठे मंदिर, काही तुटलेले अवशेष दिसत होते, पुढे चालत गेल्यानंतर कडेलेकलू गणेश मंदिरात पोहोचलो, कोरीव शिल्पेअसलेल्या स्तंभांवर उभं असलेलं सभामंडप आणि आत गाभाऱ्यात साधारण 15 फूट उंच एकपाषाणी असलेल्या गणरायाच्या दर्शनाने हंपी बघायला सुरवात झाली हा योगायोगच.तिथूनच थोड्याच अंतरावर ससेविकालु गणेशाच मंदिर आहे, दगडी खांब आणि मंडप असलेल्या ह्या मंदिरात गणपतीची सुंदर मूर्ती आहे आकाराने कडेलकलू गणेश मूर्ती पेक्षा कमी आहे ह्या मूर्तीच्या पोटा भोवती नाग गुंडाळलेला आहे, एकाच परिसरात एकाच देवतेची दोन मंदिरा वरून विजयनगर साम्राज्यातील सामाजिक विषमता असावी याची जाणीव करून देत होती.तिथून पुढे दक्षिणेकडे खाली उतरत गेल्यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या उग्रनरसिंहाच्या भव्यमूर्ती जवळ पोचलो शेषनागाच्या आसनावर बसलेला नरसिंह आणि त्याच्या डोक्यावर असलेल शेषनागाच छत्र, नावाप्रमाणेच उग्र डोळे या मूर्तीच्या सौंदर्यात भर घालतात, परकीय आक्रमकांनी हंपीतील जवळ जवळ सर्वच मंदिर व वास्तू उध्वस्त केल्या आहेत, उग्र नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आता तिथे नाही ती मूर्ती सध्या कमलापुरा येथील संग्रालयात असल्याचं समजलं. उग्र नरसिंहाच्या मूर्ती शेजारीच बडवलिंग मंदिर आहे इथे एकाच शिळे पासून तयार केलेल 3 मीटर उंच शिवलिंग आहे शिवलिंगाखाली पाणी साचलेलं असल्याने शिवलिंगा जवळ पोहोचता आलं नाही.तिथून बाहेर पडत वरच्या दिशेला लागलो आणि कृष्ण मंदिराजवळ पोहोचलो,
![]() |
| कृष्ण मंदिर |
विजयनगरच्या राजधानीचे हे ठिकाण त्यामुळे ज्यावेळी आक्रमकांनी हंपी उध्वस्त केली त्यावेळी कदाचित सर्वाधिक विध्वंस ह्याच ठिकाणी झाला असावा,इथे मुख्य राजवाडे व ज्या काही मोजक्या वास्तू शिल्लक आहेत त्यांच्या भव्यते व सुंदरते वरून इतर मुख्य वस्तू किती सुंदर असाव्यात याची कल्पना येते.बसथांब्यावरून आत चालत गेल्यानंतर सुरवातीला विजयनगरमधील राण्यांच स्नानगृह आहे, हि वास्तू सुस्थितीत आहे चौकोनी आकाराची हि बाहेरच्या बाजूने बंदीस्त आहे आणि चारही बाजूने खंदकाच्या प्रमाणेच खोदलेले आहे, पण खंदकाला जेव्हढी रुंदी असायला हवी तेव्हढी तिथे दिसली नाही, त्या बाबत विचारणा केली असता स्नानगृहातील पाणी स्वच्छ असावं म्हणून ते आधी बाहेरसाठवलं जायचं आणि त्याच खंदकामधलं पाणी आत वापरलं जायचं अस समजलं, आतल्या बाजूस असलेल्या कमानी आणि खिडक्यांवर सुंदर नक्षीकाम पहावयास मिळतो, विजयनगरमधील पाणी व्यवस्थापनातील कमाल आपल्याला पहावयास मिळतो. तिथून पुढे गेल्यानंतर रॉयल एन्क्लॉसर या भव्य प्रांगणा जवळ पोहोचलो, या ठिकाणी फक्त चौथरे शिल्लक आहेत या मधील महानवमी डिब्बा हा भव्य चौथरा कमाल आहे चौथऱ्यावर सुंदर असा कोरीव काम आहे वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत त्यावरून संपूर्ण परिसर पाहता येतो, महानवमी डिब्बाच्या उजवीकडे सुंदर अशी पायऱ्या पायऱ्यांची पुष्करणी आहे, चौकोनी आकाराची असलेली ही पुष्करणी पाच थरांच्या पायऱ्या पायऱ्यांची सुंदर रचना आहे, त्यात पाणी सोडण्यासाठी दगडांपासून तयार केलेली रचना आज सुद्धा तिथे पहावयास मिळते,
![]() |
| पुष्करणी |
याच परिसरात दरबार आणि राजवाड्याचे अवशेष आहेत पण ते सुस्थितीत नाहीत, या ठिकाणी एक भूमिगत खलबतखाना आहे उंच उंच पायऱ्या उतरून आत खलबतखान्यात उतरलो अंधार असल्याने सोबत आणलेल्या टॉर्चचा इथे उपयोग झाला, या जागेच्या रचणे वरून हि जागा कदाचित राज्यातील मौल्यवान वस्तू व खजिना लपून ठेवण्यासाठी हि कदाचित वापरली जात असावी असे मला वाटले,खलबतखान्यातून बाहेर पडत हरिहर राज्याच्या महालाकडे गेलो आता तिथे फक्त या राजवड्याचा पाया शिल्लक आहे, या वास्तू चा पाया व तिथे असलेल्या पायऱ्या हि वस्तू किती भव्य असावी याची जाणीव करून देतात . तिथून मागे वळून रॉयल एन्क्लॉसर च्या बाहेर पडलो, हजार राम मंदिरात न शिरता कमलमहल आणि राण्यांच्या महालाच्या दिशेनं गेलो, इथे तिकीट घेऊन आत शिरलो समोरच इथे सुध्दा महालाचा फक्त पाया शिल्लक आहे वेगवेगळ्या थरांवर सुंदर असा कोरीवकाम केलेलं असल्याने मूळ राजवाडा किती सुंदर असावा याची आप आपल्या परीने कल्पना करण्याचे स्वतंत्र आपल्या या हि ठिकाणी आहे. बाजूलाच दोन मजली कमल महाल ही वास्तू सुस्थितीत आहे आत जाण्यास बंदी असल्याने तिथून पुढे सरकलो ,पुढे भव्य अशी हत्तीशाळा आहे मध्यभागी एक मोठा घुमट असलेली एक खोली आणि दोनही बाजूना छोटे घुमट असलेले पाच पाच खोल्या अश्या एकूण अकरा खोल्या असलेली ही भव्य हत्तीशाळा बघून झाली.
![]() |
| हत्तीशाळा |
![]() |
| हजार राम मंदिर |
दक्षिण हंपीमधील जवळ जवळ सर्व ठिकाण फिरून झाली होती, म्हणून मग बसथांब्या जवळ पोहोचलो तेव्हा पाताळ शिवमंदिर राहून गेल्याच लक्षात आलं, मग पुन्हा पायपीट सुरू करून पातळशिवमंदिर गाठलं. जमीनच्या खाली असल्याने या मंदिराला पाताळ शिवमंदिर असे नाव दिले आहे, पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेशकेला दुपारी वेळ असल्याने इथे या वेळी कोणीच नव्हतं, जमिनी खाली असल्याने मंदिरात अंधार व पाणी साचलेलं होत बॅग मधून टॉर्च काढली आणि आत जाण्याचा प्रयत्न केला, जवळजवळ गुडघाभर पाण्यापर्यंत आत गेलो पण पुढे पाणी जास्त असल्याने मागे फिरलो,
![]() |
| पातळशिवमंदिर |
![]() |
| सूर्यास्ता नंतर विलक्षण नजारा |
![]() |
| विद्युतरोषणाईने उजळून निघालेला विरुपक्ष मंदिर |
साधारणपणे अर्धपाऊन तास या मैफिलीचा आनंद घेतला असेल घड्याळात 8 वाजायला आले होते आणि पोटात सुध्दा कावकाव सुरू झाली होती, त्यामुळे हेमकुटाचा निरोप घेत रूम गाठली फ्रेश होऊन जेवणासाठी मँगो ट्री कॅफे गाठलं, पण तिथे असलेली गर्दी बघून तिथून काढतापाय घेत विरुपक्ष मंदिरा समोर असलेल्या छोट्याश्यागाडीवरती गोभी मंचुरीयन, फ्रयराईस आणि नूडल्स फस्त केले, सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी मातंगा टेकडीवर जायचं असल्याने त्याबद्दल थोडी चौकशी केली आणि रूम वर येऊन ताबडतोब झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजण्याच्या अगोदरच जागा झालो, घड्याळात 5 30 झाले होते फ्रेश होऊन मतंगा टेकडीवर जायला तयार झालो, सूर्योदय साधारण 7 च्या आसपास असल्याने 6 वाजताच बाहेर पडलो विरुपक्ष मंदिराच्या अगदी सरळ रेषेत समोरच्या बाजूला चालत गेलो कि मतंगा टेकडी लागते, रस्त्याच्या बाजूला विजेची सोय असल्याने टॉर्च चा वापर करावा लागला नाही, मतंगाच्या पायथ्याशी पोहोचल्या नंतर वर जाणारे टॉर्च दिसले बॅग मधून टॉर्च काढून मातंगा चढायला सुरुवात केली आणि वर जाणाऱ्या त्या टॉर्चना ओव्हरटेक करत मतंगाच शिखर गाठलं. मतंगावर देवीच मंदिर आहे सूर्योदय बघण्यासाठी मंदिरावर जाऊन पोहोचलो तिथे आधीच काही परदेशी पर्यटक बसले होते, अंधार दूर होऊन सूर्योदयापूर्वीच्या रंगछटा आता दिसायला सुरुवात झाली होती, खाली हिरवीगार शेती आणि नारळीच्या बागा आणि लहान मोठ्या टेकड्या आणि टेकड्या च्या मागून होणाऱ्या सुर्यदेवतेच्या एन्ट्रीने निसर्गाच्या रंगमंचावचा तो अप्रतिम सोहळा पार पडला.
![]() |
| मतंगा टेकडीवरचा सूर्योदय |
आज तुंगभद्रानदीच्या पलीकडचा भाग फिरायचा होता, त्यामुळे मतंगावरून काढता पाय घेत रूम गाठली 8.30 वाजता अंघोळ उरकून होमस्टेशेजारी असणाऱ्या गाडीवर जाऊन मस्त पैकी मसाला ढोसा फस्त केला आणि बॅग घेऊन बाहेर पडलो आणि चालत तुंगभद्रेच्या तिरावर पोहोचलो, नदीपार करण्यासाठी एकच मोटर बोट आहे, नदी पार करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये घेतात, अगदी 5 मिनिटात पल्याड पोहोचलो. इथे फिरण्यासाठी भाड्याने सायकल आणि बाईक मिळतात, मला संध्याकाळ पर्यंत हा परिसर फिरायचा होता त्यामुळे मी स्कुटर भाड्याने घ्यायच ठरवलं, 250 रुपयात एका दिवसासाठी गाडी ठरवली आणि तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल थोडीफार माहिती मिळवली मग स्टार्टर मारून सरळ सनापूर तलावाच्या दिशेने निघालो. दुतर्फा नारळाची झाडे हिरवीगार भातशेती आणि त्याच्या मधुन जाणारा रास्ता अश्या सुंदर रस्त्यावर गाडी चालवायला पण वेगळीच मज्जा येत होती, एक दोन ठिकाणी विचारपूस करून सनापूर तलावा जवळ पोहोचलो, सूर्यमाथ्यावर यायला सुरुवात झाली, सनापूर तलावाच्या सर्वच बाजूला आणि पाण्याच्या मधेच असणाऱ्या ग्रॅनाईट च्या दगडांच्या लहान मोठ्या टेकड्या सनापूर तलावाच्या सौंदर्यात भर घालत होत्या, सनापूर तलावाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावरन तलावाचा फेरफटका मारला आणि मागे फिरलो.
हंपीमध्ये तुंगभद्रेच्या पलीकडच्या या भागात रामायणा सोबत आपले नाते सांगणाऱ्या अनेक जागा आणि वास्तू आहेत, त्याकडे मोर्चा वळवला आणि सर्वात आधी अंजनी टेकडीचा पायथा गाठला,देशात हनुमानाच्या जन्माची जी 4 ते 5 ठिकाण सांगितली जातात त्यातलंच हे प्रमुख स्थान. हंपी ही रामायण काळातील किष्किंधा नागरी असल्याचं सांगितलं जात, त्यामुळे हेच ठिकाण हनुमानाच जन्मस्थान असावं अस वाटत, गाडी पायथ्याला लावून पायऱ्या चढायला सुरुवात केली, संपूर्ण पायऱ्यांवर पत्राशेड असल्याने उन्हाचा त्रास जाणवला नाही. मात्र त्या साधारण 575 पायऱ्या चढताना थोडी दमछाक झाली, टेकडीचढुन वर असलेल्या मंदिरात पोहोचलो दर्शन घेतल्या नंतर थोडा वेळ मंदिरात बसून बाहेर पडलो, मंदिरात जाण्यापूर्वी पायातले बूट काढले असल्याने तापलेली दगड पायाला चटके देत होती, त्या परीस्थित तिथला परिसर अनवाणीच फिरत असताना एक आईस्क्रीमवाला दिसला त्याच्या कडे कुल्फी विकत घेतली भर उन्हात अश्या डोंगरमाथ्याला थंडगार कुल्फी ची मज्जा ती प्रत्येक्ष अनुभवल्या शिवाय कळणार नाही, मंदिराला पुन्हा बाहेरून नमस्कार करून टेकडी उतरायला सुरुवात केली,
![]() |
| हनुमान जन्मस्थान मंदिर |
टेकडी उतरत असताना वाटेत वर चढणाऱ्या दमलेल्या लोकांना 5 मिनिटात पोहोचाल हा आपला ट्रेकिंगचा डायलॉग चिपकवत खाली उतरलो. पुन्हा स्कूटर वर स्वारहोत पंपा सरोवर गाठलं, शबरी रामाची ह्याच पंपा सरोवर जवळ वाट बघत होती अशी कथा ह्या ठिकाणी सांगितली जाते तसेच अनेक हिंदू देवदेवतांच्या कथा इथे घडल्याचे दाखले इथे दिले जातात,पंपा सरोवराच्या शेजारी असलेल्या आश्रमात थोडा वेळ घालवून मागे फिरलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे वाटेत एका हॉटेल मध्ये थांबलो चारीबाजुनी हिरवीगार भात शेती आणि मध्यभागी असलेल्या त्या हॉटेलात शेतातून थंडगार हवा येत होती, त्यामुळे जेवण आटपून तिथे डुलकी घेण्याचा मोह आवरला नाही, आजची संध्याकाळ हिप्पी आयलंडवर जिथे सूर्यास्त बघायला लोक जमतात त्या टेकडीवर घालवायची होती, परंतु संध्याकाळी नदीपार करणारी बोट बंद असते त्यामुळे लवकरच रूम गाठावी लागणार होती, म्हणून मग परतीची वाट धरली आणि नदीपार करून रूमवर आलो.
संध्याकाळचा आता काहीच प्लान नव्हता आणि सकाळपासून झालेली धावपळ त्यामुळे झोपण्याचा प्रयत्न केला, पण एखादया ठिकाणी गेल्यावर झोपून वेळ वाया घालविल तो भटक्या कसला, त्यामुळे फ्रेश होऊन बॅग खांद्यावर मारली आणि विरुपक्ष मंदिराच्या समोरच्या सरळ रस्त्यात चालायला लागलो आणि एकलनंदी जवळ पोहोचलो एकच दगड कोरून तयार केलेल्या त्याभव्य नंदीला वंदन करून टेकडी पलीकडे असलेल्या अच्युतराय मंदिराची वाट धरली, सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती त्यामुळे अच्युतराय मंदीरात प्रवेश न करता विठ्ठल मंदिराच्या रस्त्याला लागलो, अच्युतराय मंदिर ते विठ्ठल मंदिर हा मार्ग तुंगभद्रेच्या कडेने जातो या मार्गात अनेक लहान मोठे मंदिर व इतर अवशेष आहेत, त्या सर्व भग्नवस्तू डोळ्यात साठवत विठ्ठल मंदिरा जवळ पोहोचलो तिकीट खिडकीवर पोहोचलो तेव्हा 5-30 झाले होते आणि मंदिर 6 वाजता बंद होतो हे समजल्यामुळे थोडासा हिरमोड झाला,केवळ अर्ध्या तासात घाईगडबडीत बघण्यासारखा विठ्ठल मंदिर नाहीच नाही हे माहिती असल्याने मंदिरात न जाता मागे फिरून आजचा सूर्यास्त तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून बघायचा निर्णय घेतला.
![]() |
| तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून दिसणारा सूर्यास्त |
पायात शूज असल्याने नदीपात्रातील वाळूत चालायला जमत नव्हतं त्यामुळे पायातले शूज काढून चालण्याचा प्रयत्न केला खरा, पण दिवसभर उन्हात तापलेल्या त्या वाळूचे चटके बसायला सुरुवात झाली तेव्हा आगीतून फुफाट्यात आल्यासारख वाटू लागले. झपझप पावले टाकून नदीच्या प्रवाहाजवळ पोहोचलो, एका दगडावर बसून पाय पाण्यात मोकळे सोडले तुंगभद्रेच्या त्या वाहत्या पाण्यात दिवसभराचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला.दूरवर नदीपात्रात कोराकल राईड सुरू होत्या समोर सुर्यदेवतेची अस्ताला जायची तयारी सुरू झाली होती, दूरवर दिसणार विरुपक्ष मंदिराच गोपूर आणि त्याच्या पल्याड अस्ताला जाणारा सूर्य आणि नदीच्या पात्रात त्याच पडणार प्रतिबिंब ह्यात गुंगून गेलो असता अचानक कानावर शिट्यांचा आवाज येऊ लागला.आवाजाच्या दिशेने नजरफिरवली असता कोणी तरी हात वर करून इशारा करतोय हे कळलं त्यामुळे तिथून उठून त्याच्यादिशेने गेलो असता नदी मध्ये मगरी असल्याने तिथे असे बसने धोकादायक असल्याचे त्यांच्याकडून कळले,त्यामुळे तिथून काढतापाय घेत परतीला लागलो,
एकलनदी शेजारच्या मंडपात येऊन बसलो एव्हाना सूर्य अस्ताला गेला होता आणि सुर्यास्ताला नंतर च्या छटा आसमंतात पसरल्या होत्या या ठिकाणाहून एकदम सरळरेषेत रस्ता विरुपक्ष मंदिरात जातो याच ठिकाणी थोडा वेळ घालवून होमस्टेवर पोहोचलो फ्रेश होऊन जेवणासाठी बाहेर पडलो ,आज पण मँगो ट्री कॅफे हाऊसफुल्ल होता त्यामुळे पुन्हा आपल्या कालच्या टपरीवर जाऊन जेवण अटपल आणि परत येत असताना हंपीच्या मार्केट मध्ये फेरफटका मारला मग रूम वर येता क्षणी झोपी गेलो .
दिवस तिसरा आज सुद्धा अलार्म वाजण्याच्या आधीच जाग आली आज हंपी मधील शेवटचा दिवस होता आणि हंपी मधील प्रमुख आकर्षण विठ्ठल मंदिर अजून बघायच बाकी होत, आजचा सूर्योदय हा विठ्ठल मंदिरातून अनुभवायचा या उद्देशाने 5 30 वाजताच रूम च्या बाहेर पडलो, दोन दिवसा साठीच होमस्टे आता खाली करायचं होत त्यामुळे मोठी बॅग पॅक केली आणि रूमची चावी जमा केली आणि मोठी बॅग होमस्टेच्या मालकांकडे ठेवून छोटी बॅग पाठीवर मारून विठ्ठल मंदिराकडे निघालो. कालच चौकशी केलेली असल्याने तिकीट खिडकी 6 वाजता उघडते हे माहीत झाल होत साधारण 2.5 कि मी अंतर असल्याने अर्ध्यातासात आरामात पोहोचेल म्हणून जास्त काही घाई नव्हती मतंगाच्या पायथ्यापर्यंत रस्त्यावरचे दिवे असल्याने आणि मतंगावरचा सूर्योदय बघायला जाणारे पर्यटक असल्याने तिथवर काहीच प्रश्न नव्हता, मात्र तिथून पुढे अंधारातुन एकट्याने जायचं होत बॅग मधून टॉर्च काढली आणि मतंगाची वाट सोडून विठ्ठल मंदिराच्या वाटेला लागलो आजूबाजूला पडलेल्या वास्तूंचे अवशेष आणि अंधारातून रास्ता काढत होतो, मध्येच तुंगभद्रचे पाण्याच्या आवाज येत होता सोबतीला रातकिड्यांचा आवाज होताच नदीच्या दिशेने येणारा थंडवारा अंगाला झोबत होता, त्यामुळे पावलांनी वेग घेतला आणि एकदाच विठ्ठल मंदिरा जवळ पोहोचलो.
घड्याळात 5.55 झाले होते, जेव्हा तिकीट खिडकीवर पोहोचलो तेव्हा वेळेआधी पोहोचलेले कर्मचारी बघून सुखद धक्काच बसला, तिकिट काढण्यासाठी गेलो असता आजचा दिवसातील पहिलच तिकीट असल्याने सुट्टे पैसे नाहीत अस सांगण्यात आलं, शिल्लक पैसे नंतर घेतो सांगून मंदिराकडे वळलो, पण मंदिराला कुलूप होत शेजारी डुलक्या देणाऱ्या पाहरेकऱ्याला आवाज देऊन उठवलं, त्याने डोळे चोळातच मंदिराचं कुलूप उघडलं आणि मंदिरात कोणत्याठिकानी प्रवेश बंद आहे या बद्दल माहिती देऊन साहेब पुन्हा डुलक्या घ्यायला आपल्या शय्यासनावर गेले, सूर्योदय व्हायला साधारण 15 मिनिटे होती पण सूर्य देवतेच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या रंगछटा आसमंतात पसरायला सुरुवात झाली होती, त्या विश्वप्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या भग्न गोपुरातुन मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला, मंदिर चारही बाजूनी बंदीस्त आहे, पूर्वेकडचा मुख्य दरवाजा आणि उत्तर-दक्षिण दोन दरवाजे असे एकूण तीन गोपुरात असलेले दरवाजे आहेत, मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्याने समोच एक तुळशी वृंदावन लागलं त्याच्या मागे तीन आणखी चौथरे होते आणि त्या चौथऱ्याच्या मागे आणि मंदिराच्या सोमोर होत हंपीची ओळख बनलेलं जगविख्यात दगडी रथ, पूर्ण मंदिर परिसरात माझ्या शिवाय कोणीच नव्हता त्यामुळे फोटो काढू कि मंदिर फिरू आता नेमकं काय करू हेच कळत नव्हतं, शेवटी काहीच न करता दगडी रथा समोर बसून सूर्योदय अनुभवा म्हणून ट्रॅयपॉड वर मोबाईल सेट केला आणि तिथेच बसलो
![]() |
| विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात अनुभवालेला सूर्योदय |
सूर्योदयाला सुरवात झाली गोपुरा बाजूने सुर्य आपल्या रंगछटा बदलत वर वर येत होता, मधेच एखादी खार अगदी माझ्या समोरून उड्या मारत ये जा करत होती सूर्योदयाच्या तो सुंदर क्षण कधीच न संपवा असाच होता. सूर्योदय तर मस्तपैकी अनुभवला होता आता मंदिर फिरून घेऊ म्हणून उठलो, अजून सुद्धा एकही माणूस इकडे फिरकला नव्हता त्यामुळे मनातून खुश होत मंदिर फिरायला सुरुवात केली . मंदिरात चारही बाजूंना चार मंडप आहेत स्वयंपाकगृह मंडप, भजनगृह मंडप,कल्याण मंडप आणि मध्यभागी महामंडप. पूर्वी कल्याण मंडपात विठ्ठल रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा केला जायचा, त्या मंडपात विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. संपूर्ण विठ्ठल मंदिरातील स्तंभ, संगीत-स्तंभ म्हणून ओळखले जातात. हे स्तंभ पोकळ नाहीत. असे असुनही त्या स्तंभावर वाजवल्याने आजही ‘सारेगामापाधानिसा’चे स्वर ऐकू येतो, परंतु आता ह्या स्तंभाजवळ जाता येत नाही मंदिराच्या चौथऱ्यावर जाण्यास बंदी आहे त्यामुळे पूर्ण मंदिराला परिक्रमा करून घेतली, मंदिर परिसरात असलेली चाफ्याची झाडे बहरलेली होती त्यामुळे मंदिर परिसरात सुगंध दरवळत होता.
![]() |
| विठ्ठल मंदिर |
हंपीत आल्याबरोबर फिरताना करत असलेली घाई आता आपोआप कमी झाली होती, आता एकाच ठिकाणी जास्त वेळ द्यावासा वाटत होता, विठ्ठल मंदिरातून बाहेर पडल्यावर विठ्ठल बाजार आणि त्याच्या समोर असलेला शिव मंदिर बघून अच्युतराय मंदिराची वाट धरली, आता ऊन वाढायला सुरवात झाली होती त्यामुळे झपझप पावले टाकत अच्युतराय मंदिर गाठलं, मंदिराच्या प्रवेश मार्गात अतिशय सुंदर पुष्करणी आहे, ह्या पुष्करणी च्या मध्यभागी चार दगडी खबांचे मंडप आहे, खांबावर कोरीव शिल्प आहेत तसेच चौथऱ्यावर हत्तींची शिल्प कोरली आहेत, हम्पी मधील इतर मुख्य मंदिरा प्रमाणे अच्युतराय मंदीराच्या समोर सुद्धा बाजारपेठेचे अवशेष आहेत, मंदिराच्या भग्न गोपुरातून मंदिराच्या आत प्रवेश केला, मंदिराला दोन आयताकार तटबंदी आहेत, हा मंदिर अच्युतरायाच्या कारकिर्दीत तयार केला असल्याने हा मंदिर अच्युतराय मंदिर या नावाने ओळखला जातो. हा मंदिर तिरुवेन्गलनाथ ह्या भगवान विष्णूच्या रुपाला समर्पित आहे, मंदिराच्या खांबांवर सुंदर शिल्पकाम केलेलं आहे, मुख्य गाभाऱ्यात कोणतीही मूर्ती नाही, मुख्य गभऱ्यातून बाहेर आलो आणि प्रदक्षिणा मंडपात येऊन बसलो, बाहेर ऊन तापलं होत, दगडीखांबांवर उभा असलेला दगडी मंडपात थंडावा होता आणि हंपी मधील इतर मंदिराच्या तुलनेत पर्यटक इथे फिरकत नाहीत त्यामुळे शांतता होती, ट्रायपॉड सेट करून फोटो काढून घेतले,
![]() |
| अच्युतराय मंदिर |
आता दुपारचे 12 30 वाजले होते मी तयार केलेल्या लिस्ट मधील सर्वच ठिकाण फिरून झाली होती, कोराकल राईड करायची तेव्हढी बाकी होती, बांबू पासून तयार केलेली गोलाकार होडी म्हणजे Coracal, हंपी मध्ये तुंगभद्रा नदी आणि सनापूरलेक मध्ये फार सुंदर कोराकल राईड उपलब्ध असतात, संध्याकाळच्या शांत वातावरणात कोराकल राईडची मज्जा वेगळीच, पण मागील दोन दिवसात माझी वेळेची सांगड न बसल्याने मला काय कोराकल राईड करता आली नव्हती, त्यामुळे चक्क दुपारी 12:45 वाजता मी तुंगभद्रा नदीत कोराकल राईड साठी चक्रपाणी तिर्थ हे ठिकाण गाठलं, वाटेत काकडी आणि कैऱ्या विकायला होत्या ऊन जास्तच वाढत होता, काकडी आणि कैरी खाऊन घेतल्या होत्या त्यामुळे इतक्यात जेवण्याचा प्रश्न नव्हता, भर दुपारी कोणी इकडे फिरकत नसल्याने होडीवाला झाडाखाली झोपला होता, त्याला उठवले असता एका माणसासाठी तो काय तयार होत नव्हता, त्याला तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतर तो तयार झाला, तोही फक्त नदीच्या मध्यभागातून परत आणणार ह्या बोली वर तो तयार झाला, भर उन्हात नदीत नौकायनाचा हट्ट मी का करत होतो ते माझे मला ही कळत नव्हते. बांबूपासून तयार केलेल्या त्या गोलाकार होडीत बसल्या पासून नदीच्या मध्यभागी पोहोचे पर्यंत नदीपल्याडच्या भव्य शिळा जवळ येत असल्याचा भास होत होता, मध्यभागी गेल्यावर नावाड्याने पकडून ठेवायला सांगितले त्यानंतर त्याने एकाच बाजुला जोरात वल्हे मारायला सुरुवात केली, त्यामुळे होडी गोल गोल फिरु लागली त्याने आणखी जोर लावला होडी आणखी वेगाने गोल गोल फिरू लागली थोडयावेळाने तो थांबला आणि किनाऱ्याकडे वळलो एक अनोखा अनुभव घेऊन होडीतून बाहेर पडलो ,आणि परतीच्या वाटेला लागलो,
![]() |
| कोराकल राईड |
हंपीच्या वस्ती पर्यंत पोहचे पर्यंत १:३० झाले होते, जेवण्यासाठी हंपीतील प्रसिद्ध मँगो ट्री कॅफे गाठलं, रात्री सारखी गर्दी नसल्याने आत प्रवेश केला, कॅफे परदेशी पर्यटकांनी भरला होता जेवण यायला थोडा उशिरच झाला, जेवल्यानंतर या कॅफेची प्रसिद्ध अशी थंडगार बनफी-पाय खाल्ली आणि ढेकर देत बाहेर पडलो, हंपीत उतरल्या बरोबर जे पाहिलं मंदिर नजरेस पडलं होत, ज्या मंदिराला मध्यवर्ती ठेवून संपूर्ण 3 दिवसाचा कार्यक्रम आखला होता आणि ज्या मंदिराच्या अगदी बाजूलाच मुक्काम होता, त्या विरुपक्ष मंदिरात आजून जाणं झाल नव्हतं, हंपीत आल्या पासून अनेक मंदिर फिरलो त्यातील अंजनेरी वरील हनुमान मंदिर वगळता कोणत्याही मंदिरात पूजा होत नव्हती, कारण की तिथे मूर्त्याच नव्हत्या आणि ज्या ठिकाणी मुर्त्या होत्या त्या भग्ना अवस्थेत. हंपी मधील पूर्वी पासून पूजा होत असलेल एकमेव मंदिर म्हणजे विरुपक्ष मंदिर त्यामुळे इथे भाविकांची गर्दी असते, हंपीत मंदिरात देव नसल्याने कोठेही पायातून बूट काढावे लागले नव्हते, विरुपक्ष मंदिराबाहेरील चप्पल स्टँडवर बूट ठेऊन भव्य गोपुरातून मंदिरात शिरलो, गोपुरावर देवदेवतांची शिल्प आहेत, लाईनला लागून मंदिरात शिरलो दुपारची वेळ असल्याने दर्शन लवकरच झाले, मंदिराच्या गर्भगृहात अनेक शिल्प आहेत पण दर्शनासाठी गर्दी असल्याने ती पाहायला जास्तवेळ देता आला नाही समोरच्या रंगमडपात मात्र निवांत वेळ देता आला, रंगमडपातील छतावरची भिंती चित्रे कमाल आहेत, त्यात अनेक पौराणिक घटनांचे प्रसंग चित्रित केले आहेत त्यात भगवान विष्णूचे दशावतार, शिव पार्वती लग्नाचा प्रसंग, द्रौपदी स्वयंवर असे प्रसंग आहेत, त्याच बरोबर अनेक शिल्प सुद्धा कोरली गेली आहेत, विरुपक्ष मंदिरात खूप मोठ्याप्रमाणात वैशिष्ट्य पूर्ण शिल्प आहेत ती सगळी मला काय बघता आली नाही,
संध्याकाळी होसपेट वरून परतीची बस पकडायची असल्याने मंदिरातून घाईघाईने बाहेर पडलो, आणि मुक्कामाच्या घरात जाऊन बॅग घेऊनआणि पाठीवर मारली, पुन्हा विरुपक्ष मंदिरा समोर आलो मंदिराच्या भव्य गोपुराला बाहेरून वंदन करून या तीन अविस्मरणीय दिवसासाठी धन्यवाद मानून पुन्हा एकदा कधीतरी निवांत हंपी यात्रा घडावी हेच मनोमन देवाकडे मागून परतीची बस पकडली.















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.