तिकिटाच्या रांगेत माझ्या मागे उभा असलेला एक मोरक्कन आणि त्याच्यामागच्या दोन जॅपनीज तरुणी यांचीही गत माझ्यापेक्षा फार काही वेगळी नाही हे त्यांचेही थकले भागले चेहरे स्पष्टच सांगत होते. पण चेहरे बोलके असून काडीचाही उपयोग नव्हता. मराठी, मोरक्कन किंवा जॅपनीज मूक भावना सुद्धा तिकिट खिडकीपलीकडे बसलेल्या स्पॅनिश युवतीच्या आकलनापलीकडल्या होत्या. कदाचित अशा “दीन-चर्या” बघणे हाही तिच्या दिनचर्येचाच भाग असावा. माझ्यापुढच्या दोन-एक प्रवाशांची तिकिटे यथावकाश निघेपर्यंत एक बस डोळ्यादेखत निघून गेली. परिस्थिति ओळखून मोरोक्कन पुढे आला. सफाईदार स्पॅनिश बोलून त्याने झटपट आम्हा चौघांचीही तिकीटे तर मिळवलीच आणि वर भाव खाऊन दोन नविन जॅपनीज मैत्रिणी सुद्धा खिशात घातल्या. भाषा हे विनिमयाचे किती प्रभावी साधन आहे याचा प्रत्यय पुढच्या काही दिवसांत मला सतत येणार होता.
सकाळचे साडे दहा वाजले होते. पुढची बस सुटायला आता थोडा अवकाश होता. आटोपशीर विमानतळापलीकडच्या अवाढव्य लागो अर्जेंटिनो वरून येणारा गार आल्हाददायक वारा, शिणलेल्या शरीराला तजेला मिळवून देत होता. रंगीबेरंगी बस थोडी जुन्या ढंगाची पण आरामशीर होती त्यामुळे आधीच जड झालेल्या डोळ्यांवर जरा झापड आली.
विमानतळाबाहेर हमरस्त्याला लागताना बसने गर्रकन काटकोनात वळून “उठ आता” म्हणत मानेला जोराचा हिसका दिला. पुढच्या अडीच-तीन तासांत निळाशार लागो अर्जेंटिनो, लागो विद्मा आणि त्यापलीकडे लांबच लांब पसरत गेलेल्या अँडीज पर्वतरांगांनी साधी डुलकी सुद्धा लागू दिली नाही.
बहुतांश लोकांना अर्जेंटिना म्हटलं की सर्वप्रथम फुटबॉल मधले ऑल टाईम ग्रेट मॅरेडोना किंवा मेस्सी आठवतील (माझा एक मित्र टेनिस ग्लॅम गर्ल ग्रॅब्रिएला सॅबॅतिनीच्या आठवणीत हरवून जातो), कुणाच्या डोळ्यांसमोर तिथे उगम पावलेला "टँगो डान्स" येईल. एखाद्या दर्दी खवय्याची भूक तिथले सुप्रसिद्ध अर्जेंटेनियन स्टेक्स आणि वाईन आठवून चाळवेल. क्युबन क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून लढणारा चे गुवेरा अर्जेंटिनाचाच. ओठात सिगार धरलेला, तारांकित बॅरेट हॅट मधला उमदा "चे" आजही बऱ्याच तरुणांच्या टी-शर्ट्स वर दिसेल.
मला मात्र आठवतो तो (कदाचित) ऐंशी-नव्वदच्या दशकातला एक जुना नॅशनल जिऑग्राफिकचा अंक आणि त्यातला बघताक्षणीच भुरळ पाडणारा "माउंट फिट्झ रॉय". जगातल्या या सर्वात लांब पर्वतरांगांमधला फिट्झ रॉय म्हणजे अँडीजचा लखलखता मुकुटमणीच.
एल चॅल्टेनला पोहचेस्तोवर सूर्य पश्चिमेकडे कलला होता. हॉटेलचे आगाऊ आरक्षण न करण्याच्या आगाऊपणाची शिक्षा दोन चार ठिकाणी धक्के खाऊन मिळाल्यावर एकदाची अंग टाकण्याची सोय झाली. गलित गात्रांच्या कुरकुरीला न जुमानता गरम पाण्याने सचैल स्नान केले आणि गाव भटकायला बाहेर पडलो. डोंगरांच्या कुशीतले हे चिमुकले गाव म्हणजे अर्जेंटिनाची गिर्यारोहण पंढरी. अपेक्षेप्रमाणेच हे गाव एकदम “तरूण” होते कारण इतक्या आडबाजूच्या या लहानश्या गावात गिर्यारोहणासाठी म्हणून यायला कमाल वय हा मुद्दा तसा गौण असला तरी धडधाकट शरीर ही किमान अट होती. हॉटेल्स, बॅग-पॅकर्स हॉस्टेलस्, कॅफेज, बेकरीज, रेस्टॉरंट्स् आणि दैनंदिनी लागणाऱ्या सामानाच्या दुकानांची रेलचेल होती. कुणी थकून भागून, दिवसभराची रपेट संपवून परतत होते, कुणी पाठीवरच्या जड सॅक सांभाळत संध्याकाळची एल कलाफातेला जाणारी शेवटची बस पकडायला लगबगीने निघाले होते, काही उद्याच्या भ्रमंतीसाठी आवश्यक असलेली खरेदी करण्यात गुंतले होते तर बरेच जण कॅफेज किंवा बार मध्ये गप्पात रंगले होते. एका रेस्टॉरंटमध्ये अर्जेंटिनियन बियर, मॅलबेक वाईन आणि स्टेकचा आस्वाद घेऊन पोटाची आणि डोक्याची कुरकुर एकदाची थांबवली. दिवस मावळतीकडे झुकला.
स्थानिक पातागोनियन जमातींच्या Tehuelche भाषेत chalten चा शब्दशः अर्थ म्हणजे "स्मोकींग माउंटन". आपल्या गावचे नाव सार्थ करत एकीकडे फिट्झ रॉय शांतपणे ढगात डोकं खुपसून बसला होता आणि दुसऱ्या बाजूला Las Vueltas नदी सकाळच्याच उत्साहाने खळाळत होती.
माझ्यातली मात्र उरलीसुरली राखीव उर्जासुद्धा आता आटली होती. गादीवर पाठ टेकताच काही क्षणांतच गाढ झोप लागली.
ब्राम्हमुहूर्तावर उठून सकाळची आम्ह्निकं उरकली आणि “लगुना दे लॉस त्रेस” च्या मोहिमेवर निघालो. सोसाट्याचा बोचरा वारा, अंधारून आलेले आभाळ आणि पावसाचे हलके तुषार उडवत फिट्झ रॉयने "वॉर्म वेलकम" केले.
रिओ इलेक्ट्रिको नदीवरच्या एका छोट्या पुलावरून सुरू होणारी ही पाऊलवाट गावापासून थोडी दूर आणि (या मोसमात तरी) फार राबता नसलेली होती. पानगळीचा ऋतू नुकताच सुरू झाला होता. इतरत्र कुठेही न आढळणारे बीच लेंगा, बीच निर्रे सारखे उंच वृक्ष तसेच बरबेरिज, ग्वानाको बुश आणि इतर नाना जातींच्या, चटक रंगाच्या खुरट्या झाडा-झुडूपांनी लॉस ग्लेशिअर्स नॅशनल पार्कचे अरण्य गजबजून गेले होते. पांढऱ्या खडीच्या पाऊलवाटेवर वाळक्या काटक्यांनी ठिकठिकाणी सुंदर नक्षी चितारली होती. रिओ ब्लांको नदीच्या बाजूबाजूने मिराडोर ग्लेशियरला नेणारी ही वाट बरोबर आहे याची हमी भरणारे दिशादर्शक अधून मधून दिसत होते. मधूनच उंच लेंगा वृक्षांच्या दाट राईमागून सकाळच्या उन्हात उजळून निघालेले निमुळते पॉइन्सनॉट शिखर डोकावले. फिट्झ रॉय मात्र अजूनही ढगातच होता.
एक गिरकी घेऊन रिओ ब्लँको बाजूच्या डोंगरामागे गडप झाली. आतापर्यंत सहज ओळखू येणारी पाऊलवाट नक्षिदार होत होत शेवटी तिला सामील झाली. दिशादर्शक दिसेनासे झाले. पाण्याचा जोर बघता नदी ओलांडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे इथे तरी भाषेची अडचण नव्हती. ना स्पॅनिश मधले फलक वाचायला होते ना कुणी स्पॅनिश वाटाड्या. आजवर केलेल्या भटकंतीत नद्या - नाले, डोंगर, पायवाटा यांची भाषा थोडीफार कळू लागलीय. त्यावर भरवसा ठेऊन गच्च रानातल्या झाडा - झुडूपांशी धक्काबुक्की करत ओढ्याच्या उजव्या बाजूचा डोंगर चढू लागलो. बराच वेळ नसलेली वाट तुडवल्यावर उंचावरचा हवा असलेला व्हॅन्टेज पॉइंट मिळाला. निसर्गपुत्र थोरोही अशाच कुठल्याश्या अनुभवानंतर म्हणाला असेल… “I took a walk through the woods and came out taller than the trees”.
निळ्या स्फटिकांची मिराडोर ग्लेशियर आणि तिच्या पायथ्याचे छोटेसे तळे इथून स्पष्ट दिसू लागले. डोंगराच्या या निमुळत्या धारेखाली एकीकडे मुसंडी मारून आलो ते गर्द रान होतं तर दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या दगड धोंड्यांचा चाळीस-पंचेचाळीस अंशांचा तीव्र उतार. तोही इतका भुसभुशीत की उतरंडीवरून किती धोंडे निखळून माझ्या सोबतीने उतरतील याचा नेम नव्हता. खाली दरीतल्या प्रचंड शिळा त्याची साक्ष देत होत्या. शेवटी मन घट्ट केलं आणि पाय त्याहीपेक्षा घट्ट रोवत कुठेही न धडपडता सुखरूप उतरलो.
मिराडोर ग्लेशियरच्या थंडगार तळ्यात जरा वेळापूर्वी दरदरून सुटलेला घाम धुतला. निळे स्फटिक वितळून वाहणारा तो चवदार अर्क घोटभर पिऊन तृप्त झालो आणि थोडा वेळ शांतपणे या सुंदर हिमनदीचे दृश्य डोळ्यांत आणि कॅमेरात साठवत बसलो.
जास्त रेंगाळण्याची मात्र इथे मुभा नव्हती. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. परत एकदा त्या भल्या-थोरल्या शिळांच्या दाटीवाटीमधून माग काढत एका पाऊलवाटेला लागलो.
घड्याळ साडेअकरा दाखवत होते. तुरळक ठिकाणी चिखल-पाण्याचे किरकोळ अडथळे सोडल्यास निसर्गाने पुढच्या वाटचालीत फारसा हस्तक्षेप केला नाही. दुरून आता लोकांचा क्षीण कोलाहल ऐकू येऊ लागला. रांगेने कुठेतरी निघालेल्या मुंग्या अचानक कसल्याशा अडथळ्याने परत फिराव्यात तद्वत एका छोट्या पुलापासून लोकं परत फिरताना दिसत होती. जवळ जातो तो हिरव्या गणवेशातल्या एका फॉरेस्ट गार्डने अडवले. फिट्झ रॉयच्या पायथ्याला असलेल्या लगुना दे लॉस त्रेस तळ्याकडे जाणारी शेवटची पाऊण एक किलोमीटरची, सरळसोट चढणीची वाट अपघात होऊ नये म्हणून या मोसमात बंद केली होती. अर्थात ही आडकाठी मुख्य रुळलेल्या वाटेवरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना लागू होती. पण या विरुद्ध आडबाजूने कुणी येईल याची त्या बिचाऱ्याने कल्पनाच केली नसावी.
लगुना दे लॉस त्रेसचे दर्शन तर आता शक्य नव्हते. एका पाणथळीशेजारच्या टेकाडावर बसून आदल्या संध्याकाळी एका बेकरीमधून बांधून घेतलेले भूकलाडू काढले. आपल्याकडच्या करंजी सारखा “एम्पनाडास” इथला लोकप्रिय पदार्थ. आतले सारण फक्त आपल्याला हवे तसे सामिष किंवा निरामिष. दोन एम्पनाडास रिचवून एका सपाट पाषाणावर जरा कलंडलो. या वाटेवर पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ असली तरी “शोल्डर सीझन” असल्यामुळे सध्या फिट्झ रॉयच्या शोल्डर्स वर जास्त भार नव्हता. त्यातही स्थानिक अर्जेंटेनियन पर्यटकांच्या तुलनेत परदेशी पर्यटक नगण्य होते. आदल्या दिवशी बसमध्ये भेटलेल्या जॅपनीज पोरी तेवढ्यात गोड हसून हाय हॅलो करून गेल्या. त्यामुळे असेल किंवा पोटात गेलेल्या एम्पनाडासमुळे असेल, थोडी तरतरी आली आणि पाय परत एल चॅल्टेनच्या दिशेला असलेल्या लगुना काप्री कडे चालू लागले. मागे वळून बघतो तो फिट्झ रॉय अजूनही डोक्यातून धूर काढत बसला होता.
लगुना काप्रिला पोहचेस्तोवर थकलेल्या पायांनी माझ्यापुढे हात टेकले. त्यांनी पूर्णपणे असहकार पुकारण्या अगोदर मीच तळ्याकाठच्या गुबगुबीत हिरव्या गादीवर आडवा झालो. पाठीवरच्या सॅकची उशी केली. तळ्यापलिकडे फिट्झ रॉय आता ढगातून मस्तक बाहेर काढून येणाऱ्या-जाणाऱ्या अभ्यागतांकडे बघत होता. फार कुणी महत्वाचं नाही असं लक्षात आल्यावर परत ढगांमागे गडप झाला. समोर पसरलेला तो सुंदर जलाशय, मधूनच झुळुकेसरशी त्यावर उमटणाऱ्या रेघोट्या, त्यामागे मेघ-मंथन करणारा धिप्पाड फिट्झ रॉय आणि त्याच्या अंगाखांद्यावरून ओघळणाऱ्या हिमनद्या बघत इथंच तासन् तास पडून रहावं असं वाटू लागलं. दिवसभर राबून हतबल झालेल्या हाता-पायांचा अर्थातच या कल्पनेला बिनशर्त पाठींबा होता.
उन्हं कलली आणि डोंगरावरची बहुतेक पावलं आता गावाकडे परतू लागली. मीही स्वतःच स्वतःला थोडा धाक, थोडी सायंकाळच्या मेजवानीची लालूच दाखवली आणि अंधार पडायच्या आत गावात पोहोचेन अशा बेतानं डोंगर उतरू लागलो. गावाची वेस अजूनही दीड दोन तास लांब होती. क्षितिजावर लागो विद्मा आरामात ऐसपैस पसरला होता. डावीकडच्या दरीतून Las Vueltas नदी सतत सोबत करत होती. स्थिर न राहता, न थकता, सतत प्रवाही असणं हाच तिचा स्थायीभाव होता.
दिवसभरात उणेपुरे वीस बावीस किमी. पायपीट झाली होती. पहाटे पोटात गेलेले घोटभर प्रोटीन शेक आणि दुपारचे दोन एम्पनाडास एवढ्या तोकड्या भांडवलावर आज बरेच काही कमावले होते. पण आता मात्र सडकून भूक लागली होती.
वाटेवरच्या झाडांच्या बेचक्यातून गावातली रंगीबेरंगी घरटी दिसू लागली. थोड्याच वेळात गावाची वेस लागली. रस्त्याकडेच्या एका छोट्या रेस्टोबार मधून जॅझचे हलकेसे स्वर कानावर येत होते. थकलेले पाय नकळतच तिकडे वळले. बार काऊंटर वर बसताच कोरड पडलेल्या घशातून मला ज्ञात असलेले परवलीचे एकमेव स्पॅनिश वाक्य बाहेर पडले… “उना सर्वेजा पोर फवोर !!!”
क्रमशः
प्रसिद्ध ब्रिटिश गिर्यारोहक जॉर्ज मेलरीला एकदा एका पत्रकाराने प्रश्न केला, "व्हाय क्लाइंब माऊंट एव्हरेस्ट ?” त्यावर तो चटकन् उत्तरला, "बिकॉज इट इज देअर!” त्याच ढंगात जर मला विचारलं की का रे बाबा अर्जेंटिनाला का जावं तर मीही लगेच म्हणेन “तिथे रॉय आहे म्हणून!” अर्थात कुणी पत्रकार असं मला विचारणार नाही आणि काही वदलो तर ते प्रसिद्धीही पावणार नाही. पण अर्जेंटिनाच्या इतक्या कोपऱ्यात रॉयच मला ओढून घेऊन गेला होता एवढं मात्र खरं.
अर्जेंटिनाच्या, खरंतर जगाच्याच या कोपऱ्यात पहाटेचे सहा वाजले होते. अजूनही पुरतं उजाडलं नव्हतं. रात्री पावसाची एक जोरदार सर सडा टाकून गेली होती त्यामुळे वातावरण कुंद होतं. आदल्या दिवशी कितीही दमणूक झाली असली तरी जाग मात्र ठरल्या वेळेलाच आली. लवकर उठणं तसं अंगवळणी पडलं असलं तरीही काल ते अंग इतक्या कोनांतून वळलं होतं की आता एकशे-ऐंशी अंशाचा वगळता इतर कुठलाही कोन, नको वाटत होता. उशीत डोकं खुपसून निपचित पडून होतो तेवढ्यात तळमजल्यावरच्या रेस्टॉरंटमधली खुडबुड ऐकून चहा-कॉफीची तलफ आली. शूचिर्भूत झाल्याशिवाय चहा-नाश्ता काही मला मानवत नाही तेव्हा खांद्यावर टॉवेल टाकून लगोलग वॉशरूम मधे घुसलो. शॉवरखाली उभं राहिलं की सगळी मरगळ धुतल्या जाते आणि "आता मी जग जिंकणार!" असा ओव्हर कॉन्फिडन्स कुठूनसा येतो कुणास ठाऊक. दुर्दैवाने हा प्रभाव जेमतेम तासभरच टिकतो तेव्हा त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा म्हणून झटपट आवरलं आणि रेस्टॉरंटच्या कोपऱ्यातल्या एका खिडकीपाशी जाऊन बसलो.
इथला अर्जेंटेनियन “ब्रेक-फास्ट” हा फक्त उपास सोडण्या इतपतच लायकीचा होता. तरीही यथेच्छ उदरभरण उरकून, “यज्ञकर्म” संध्याकाळी तब्येतीत करू असं स्वतःलाच आश्वासन देत बाहेर सटकलो. डोक्यावर मळभ दाटलं होतं. अगदी बदाबदा पाऊस पडायची लक्षणं नसली तरी एखाद दुसरी सर चिंब करून जाईल याची धास्ती मात्र होती. तसा हा प्रदेश आणि त्यातही हा ऋतू जरा लहरीच आहे. कधी पाऊस येईल, कधी तुफान वारा सुटेल कधी बर्फवृष्टी होईल काही म्हणून सांगता यायचं नाही.
रिओ फिट्झ रॉयने कवेत घेतलेला लहानसा रस्ता सकाळचे दहा वाजले तरी पेंगलेलाच होता तेव्हा वाट कोण दाखवणार? मला या काळजीत बघून अचानक कुठुनसा एक गाईड आपली झुपकेदार शेपटी हलवत दिमतीला हजर झाला आणि नेमक्या वाटेकडे घेऊन गेला. पायथ्याची लगुना तोरे ची पाटी बघितली आणि मनोमन या आगंतुकाचे आभार मानत चढाला लागलो. मी व्यवस्थित मार्गस्थ झालो याची खात्री पटल्यावरच हा स्वयंसेवक त्याच्या पुढच्या कामगिरी साठी चालता झाला. महाराष्ट्रात दुर्गभ्रमण करतांना असा अनुभव बऱ्याचदा घेतलांय. निष्काम कर्मयोग्यासारखे कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि कसलीही कुरकुर न करता हे “कुक्कुर-स्वयंसेवक” वाटाड्याची जबाबदारी चोख पार पाडतात.
रात्रीच्या सरीमुळे पाऊलवाट अजूनही ओलसर होती. सोवळा होऊनच निघालो असलो तरीही ढगांनी “प्रोक्षण” करून मला परत एकदा पवित्र करून घेतलं. माथ्यावरचं काळं करडं आभाळ आणि त्याखालचा हिरवट, मातकट भवताल एखाद्या कृष्णधवल चित्रपटासारखा वाटत होता.
बऱ्यापैकी उंची गाठल्यावर वाट एका खिंडीतून पलीकडल्या रिओ फिट्झ रॉयच्या खोऱ्यात शिरली आणि… एखाद्या निष्णात चित्रकारानं कच्च्या रेखाटनाचं, ब्रशच्या दोन चार फटकाऱ्यात अफलातून चित्रामध्ये रूपांतर करावं, तसं समोरचं दृश्य एकदम बदललं…खरंच, निसर्ग निःसंदिग्ध सर्वश्रेष्ठ चित्रकार आहे. आपल्या ठसठशीत आणि चटक रंगसंगतीच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेला विख्यात डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन हॉघ म्हणतो, शरद ऋतूत झरझर बदलत जाणारं सौंदर्य चितारण्यासाठी माझ्याजवळचे हात, कॅनव्हॉस आणि रंग अपुरे आहेत !
मिराडोर देल तोरेच्या गॅलरीतून शरद ऋतूतलं हे भव्यदिव्य निसर्गचित्र डोळेभरून पाहून घेतलं.
वाट चढत जेवढी वर घेऊन आली होती तेवढीच पुन्हा उतरत तळात घेऊन गेली. सतत चढ-उतारांची पण तशी अगदीच सोपी असलेली ही रेताड, खडकाळ पाऊलवाट कधी खुरट्या, रंगीबेरंगी ग्वानाको झुडुपांमधून तर कधी लेंगा वृक्षांच्या गच्च रानातून गेलेली आहे. एका बाजूने फेसाळत वाहणाऱ्या रिओ फिट्झ रॉयचा एखादा लहानसा प्रवाह मधूनच खोडसाळपणे वाटेला छेद देऊन जातो. तिथे टाकलेले लाकडी ओडक्यांचे साधे, छोटेसे पूल तर कुठे घसरड्या चढावर लावलेल्या लाकडी पायऱ्या, वाटेचे सौंदर्य अधिकच खुलवतात. पण हा मानवी हस्तक्षेप अगदीच नगण्य आणि तो सुद्धा कुठेही विद्रुपीकरण होऊ न देता केलेला. निसर्ग जसा आहे तसाच ठेवण्याकडे कल.
मध्यान्ह झाली तसं आभाळ निवळलं आणि ढगांच्या पडद्याआडून समोरच्या “रंग”-मंचावर हळूहळू एकेका पात्राचा प्रवेश होऊ लागला. डावीकडचा आडवा सेरो सोलो, त्याला लागूनच शुभ्र-धवल ॲडेला पर्वतरांग, अगदी उजवीकडच्या कोपऱ्यात आगुखा बिफिडा, तोरे पच्मामा, तोरे अचाचीला, तोरे इंती आणि अजून बरीच कितीतरी शिखरं हारीनं उभी होती. पण कदाचित प्रमुख पात्रांची एन्ट्री शेवटच्या अंकासाठी राखून ठेवली असावी.
दे ॲगोस्टीनी कँपसाईटला वळसा घालून वाट लहानश्या चढावरनं लगुना तोरेच्या काठावर गेली आणि नाट्याचा शेवटचा अंक सुरू झाला. ढगांचा दाट पडदा अखेर वर गेला आणि त्यामागून उंचच उंच सेरो तोरे आणि त्याबाजूची तोरे एग्गर, पुंटा हर्रोन आणि आगुखा स्टँडहार्टची शिखरं प्रकट झाली. रॉय मात्र आज ढगांमागे विंगेत उभा राहून इतरांना तोरा दाखवायची थोडी संधी देत होता कारण तोरे शिखरं कितीही आडदांड वाटत असली तरीही या इलाख्यात खरी दादागिरी रॉयचीच. बाजूच्या प्लीएगे तुंबादोवरून बघितलं तर हे सहज लक्षात येतं.
लगुना तोरेकाठी घटकाभर घुटमळलो. या तळ्याचं पाणी दिसायला जरी राखी-मातकट असलं तरी त्यापुढच्या नदीखोऱ्याला मात्र रंगवून टाकण्याचं त्यात सामर्थ्य होतं. तोरे ग्लेशियर मधून तुटलेले निळे काळे हिमनग तळ्यात आरामात डुंबत पडले होते. सूर्योदयाच्या वेळी ही सर्व तोरे शिखरं काही मिनिटं तांबड्या लाल रंगात उजळून निघतात. ते बघायला मिळणं म्हणजे खरं तर एक पर्वणीच मात्र त्यासाठी रात्रीच दे ॲगोस्टीनी कँपसाईटला तळ ठोकून बसायचं आणि रामप्रहरी उठून तळ्याकाठी हजेरी लावायची. पण तो योग नव्हता. तरीही इतक्या विलक्षण देखाव्याचा साक्षीदार केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून दुसऱ्या प्रहरी का होइना, तळ्यातल्या बर्फाचा एक लखलखता स्फटिक उचलून अर्घ्य अर्पण केलं.
परतीच्या वाटेला लागलो. वाटेवरचा “व्हॅली ऑफ डेथ अँड रीबर्थ” हा पट्टा एकदम मुलुखावेगळा (अर्थात हे काही अधिकृत नाव नाही). नारिंगी, हिरव्या झुडपांमधून निष्पर्ण वृक्षांचे पांढरेधोप बुंधे आपले असंख्य हात उंचावत समोरच्या सेरो तोरे शिखराची प्रार्थना करताहेत असं काहीसं हे दृष्य बघितल्यावर वाटलं. या काळातला, वसंत ऋतूतला, रंगपंचमीचा आपला उत्सव इथे त्याच वेळी पण शरद ऋतूत निसर्गच साजरा करतो. दोन डोळ्यांनी किती आणि काय काय बघावं? सरळ नाकासमोर न चालता थोड्या थोड्या वेळानं थांबत पाठी वळून बघितलं तर बदलत जाणाऱ्या छाया प्रकाशात दर वेळी निराळेच रंग बघायला मिळतात. तेव्हा सहस्राक्ष इंद्राइतके अगदी अंगभर नाही तरी निदान पाठीवर डोळ्यांची अजून एक जोडी जरा सोयीची झाली असती असा विचार नक्कीच डोकावून जातो.
दमून भागून परत एकदा मिराडोर देल तोरे ला पोहोचलो. इथून वाटेनं वळण घेतलं की तोरे शिखरं नजरेआड जाणार होती म्हणून एका सावलीखाली आरामात बैठक मारून संध्याकाळच्या सोनेरी उन्हात झळाळणारं ते निसर्गवैभव एकवार बघून घेतलं.
इथून पाय निघेनात…आजवर दृष्टीआड असलेल्या इतक्या अलौकिक सृष्टीनं अवाक् तर केलंच होतं आणि आता ढोपरं आखडल्यामुळे “अ-वॉक” व्हायचीही वेळ आली होती. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ! म्हणत स्वतःच्याच पायांपुढे हात जोडायचीही सोय नव्हती. आजवरच्या अनुभवांतून बोध घेऊन सुद्धा नी-कॅप्स जवळ ठेवल्या नाहीत तेव्हा अक्कल काय गुडघ्यात गेली होती काय रे? असा मलाच त्यांनी उलट सवाल केला असता. तेव्हा तिरक्या चालीनं आणि धीम्या गतीनं रखडत, रडत-खडत शेवटच्या टेकाडावरनं गावात उतरलो.
लटपटत्या पायांनी हॉटेल गाठलं आणि बिछान्यावर झोकून दिलं. अर्धवट ग्लानीत कधीतरी वाचलेली टॉलस्टॉयची एक समर्पक गोष्ट आठवली…
दिवसभरात पायाखालून घालशील तेवढी जमीन तुझी असं आश्वासन मिळाल्यावर, जास्तीत जास्त जमीन हस्तगत करायच्या लोभानं एक गरीब शेतकरी दिवस मावळेपर्यंत छाती फुटेस्तोवर धावतो आणि सरतेशेवटी काहीही प्राप्त न करता गत:प्राण होतो. आठ दहा दिवसांच्या तुटपुंज्या रजेवर, अलम् पातागोनिया पादाक्रांत करायची लालसा बाळगून असलेला मी तरी कुठे वेगळा होतो? पण गोष्टीनं थोडं शहाणपण मात्र नक्कीच आणलं होतं. पुढच्या दिवसासाठी आखलेल्या, एकाच वेळी सर्व शिखरांचं दर्शन घडवणाऱ्या आणि म्हणून अधिकच मोहात पाडणाऱ्या, प्लीएगे तुंबादोच्या मोहीमेचा हट्ट सोडून दिला.
पहाटेच एल चॅल्टेन मधून चंबुगबाळं आवरलं आणि एल कलाफातेच्या बस मध्ये चढलो. तांबडं फुटलं तसं एक मोठ्ठी जांभई काढून बस सावकाश धावू लागली. गावात अंगावर येऊ पहाणारी अजस्त्र शिखरं, लांब जाऊ लागलो तशी लहान होत गेली. बरंच काही राहून गेलं ही चुटपुट बसमधल्या बहुतेकांच्या मनात असावी कारण हळूहळू उजळत जाणाऱ्या रॉयकडे पुनःपुन्हा वळून बघणारा मी काही बसमध्ये एकटाच नव्हतो.
क्रमशः





































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.