Wednesday, July 24, 2024

उडत्या ड्रॅगनच्या देशात -

 ह्यावर्षी मार्चमध्ये भूतान अर्धमॅरेथॉनचा दौरा करतानाच ठरवलं होतं, दीप्ती आणि ख़ुशीला हा देश दाखवायचा.  घरी परत आल्यानंतरच्या माझ्या सुरस कहाण्या ऐकून दोघीही तयार झाल्या.

मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मी काढलेला एक फोटो

माझ्या मार्चमधल्या भूतान दौऱ्याच्या अनुभवावरून प्लॅन बनवला.  त्याप्रमाणे विमानाची तिकिटे काढली.  पुढच्या महिनाभरात हॉटेल बुकिंग केले.  मी प्लॅन अनेकदा तपासून पहिला.  प्लॅनमध्ये काही गडबड नाही ह्याची पूर्णपणे खात्री करून घेतली.आठ दिवसांच्या प्लॅनची रूपरेषा
दिवस पहिला : पुणे ते बागडोगरा विमानाने प्रवास, तिथून पुढे टॅक्सीने जयगाव व बॉर्डर ओलांडून फुनशिलींगमध्ये मुक्काम
दिवस दुसरा : सकाळी परमिट काढून फुनशिलींग ते थिंफू प्रवास, आणि थिंफूमध्ये मुक्काम
दिवस तिसरा : थिंफू आणि आजूबाजूला भटकंती
दिवस चौथा : टायगर्स नेस्ट ला भेट व इतर थिंफूमधील ठिकाणे
दिवस पाचवा : थिंफू आणि आजूबाजूची उरलेली भटकंती
दिवस सहावा : थिंफू ते पुनाखा प्रवास (वाटेत डोचूला पास) 
दिवस सातवा : पुनाखा ते गेलेफू प्रवास
दिवस आठवा : गेलेफू ते गुवाहाटी टॅक्सीने प्रवास, पुढे विमानाने पुण्याला परत

वैधानिक इशारे
१. भूतानच्या सफरीत आलेले माझे अनुभव मि कथन करत आहे.  तुमचे अनुभव नक्कीच वेगळे असणार.  तुमच्या अनुभवांना मि जबाबदार नाही आणि माझ्या अनुभवांना तुम्ही जबाबदार नाही
२. भूतान हे ऑफबीट डेस्टिनेशन आहे.  हौशी आणि नवख्या पर्यटकांनी भूतानची वाट धरूच नये.  जायचंच असेल तर जाण्यापूर्वी स्वतः जाणून घ्या आपण कुठे जायचा विचार करतोय आणि तिथे काय एक्सपेक्ट करायचं.  नंतर गेल्यावर चिडचिड नको.


भारतीय नागरिकांना भूतानमधे पर्यटनासाठी व्हिसाची आवश्यकता नाही.  पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र दाखवून परमिट बनते.

भूतानमधे पारो ह्या एकाच ठिकाणी भारतातून विमाने जातात.  विमान प्रवास बराच महागडा आहे.  त्यामुळे भूतानला विमानाने जाण्याऐवजी पुणे ते बागडोगरा विमानाने प्रवास करून पुढे टॅक्सीने जायचा प्लॅन मी बनवला.  भूतान मधून परत येताना गेल्या मार्गानेच न येता गेलेफू मार्गे गुवाहाटीला जायचे आणि तिथून विमानाने पुण्याला परतायचे अशी माझी योजना कागदावर तर परिपूर्ण वाटत होती.  प्रत्यक्षात ह्या योजनेत काही त्रुटी राहू नयेत म्हणून परत परत सर्व प्लॅन तपासला.  प्रत्येक दिवशी काय बघायचे, कुठे जायचे त्याचा डिटेल प्लॅन पण मी बनवला.  त्याची सहा पानी प्रिंटआऊट बरोबर घेतली.

ह्यावर्षी मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात जे टॅक्सी ड्रायव्हर भेटले त्यांच्यापैकी एकाचा मोबाईल नंबर मी माझ्याकडे ठेवला होता.  ह्याची वॅगनआर गाडी नवी कोरी होती.  माणूस बोलका.  दामचोई दोरजी.  पुण्यातून निघण्याच्या सात दिवस आधी त्याला WhatsApp वर कॉन्टॅक्ट केले.  त्यानेही ओळख विसरलेली नव्हती.  फुनशिलींग पासून गेलेफू पर्यंत आम्हाला फिरवायला तयार.  मार्चच्या दौऱ्यातला फुनशिलींग ते थिंफू हा प्रवास वाट लावणारा होता.  जुनी सात सीटर जीप.  मी सर्वात मागच्या सीटवर बसलेलो.  थिंफूला पोहोचेपर्यंत शरीरातली सर्व हाडं खिळखिळी झालेली.  उलटी येण्याची वेळ येता येता वाचली.  तो अनुभव लक्षात घेऊन आम्ही दोन वॅगनआर गाड्या ठरवल्या.  दामचोई दोरजीची एक आणि त्याच्या मित्राची एक.  थोडे पैसे जास्त गेले तरी चालतील पण प्रवास धक्कादायक होऊ नये.  जाताना बागडोगरा ते फुनशिलींग आणि परत येताना गेलेफू ते गुवाहाटी ह्या प्रवासांसाठी एकच मोठी गाडी ठरवली.  दोन गाड्यांचा गोंधळ नको.

भूतान हे नाव बहुतेक संस्कृत शब्द भौत्त अंत (म्हणजे तिबेटच्या शेवटी) चा अपभ्रंश असावा.  भूतान हा तिबेटच्या टोकाला असलेला भाग.  इथले रीती रिवाज, धर्म, संस्कृती वगैरे वगैरे बरेचसे तिबेट सारखेच.  पण अनेक शतकांपासून हा भाग तिबेट पासून वेगळा राहिलाय.  आणि आता चिनी ड्रॅगन ने तिबेट घशात घातल्यापासून त्यांचं आणि ह्यांचं पटतच नाही.  १९६० पर्यंत भूतान आणि तिबेट मध्ये व्यापार चालू होता.  त्या वर्षी निर्वासितांचा मोठा लोंढा तिबेट मधून भूतान मध्ये आला आणि तेव्हा पासून तिबेट-भूतान बॉर्डर पूर्णपणे बंद आहे. सध्या तर चीन आणि भूतान हे शत्रू देश आहेत.  भारत हा भूतान चा सर्वात मोठा मित्र देश. 

ऑक्टोबर हा भूतानच्या पर्यटनासाठी चांगला महिना आहे असे समजले.  फार थंडी नाही.  पाऊस नाही.  ऑक्टोबर उजाडेपर्यंत आमच्या घरी भूतान हा विषय बऱ्याचदा चर्चेत होता.  द्रुक यूल म्हणजे काय ते खुशीलाही माहिती झाले होते.

दिवस पहिला - पुणे ते फुनशिलींग

दिवस दुसरा - फुनशिलींग ते थिंफू

दिवस तिसरा - थिंफू आणि आजूबाजूला भटकंती

दिवस चौथा - टायगर्स नेस्ट

दिवस पाचवा - थिंफूमधली उरलेली भटकंती

दिवस सहावा - थिंफू ते पुनाखा

दिवस सातवा - पुनाखा ते गेलेफू

दिवस आठवा - गेलेफू ते पुणे

दिवस पहिला - पुणे ते फुनशिलींग

सफरीच्या पहिल्या दिवशीच पुण्याहून भूतानमधल्या फुनशिलींग ह्या ठिकाणी पोहोचायचे होते.

भारतीय नागरिक फुनशिलींग मधे व्हिसा शिवाय आणि परमिट न काढता राहू शकतात.  फुनशिलींग सोडून पुढे जाण्यापूर्वी इमिग्रेशन ऑफिस मधे जाऊन परमिट काढावे लागते.  आज आम्ही फुनशिलींगला पोहोचून तिथे राहणार होतो.

पहाटेच्या सहा वाजून पाच मिनिटांचे पुणे ते कोलकता विमान पकडण्यासाठी आम्ही वेळेत हजर होतो पुणे विमानतळावर.  ख़ुशी मोजत होती तिचा हा कितवा विमान प्रवास आणि आत्तापर्यंत विमानातून कुठे कुठे गेलीये ते.  विमानाच्या खिडकीतून ख़ुशीने भरपूर फोटो काढले.

विमानाच्या खिडकीतून
कोलकता विमानतळावर आम्ही ब्रेकफास्ट केला.  पुढचं कोलकता ते बागडोगरा विमानही वेळेत सुटलं.

कोलकता एअरपोर्टच्या रनवे वर विमान उडण्यासाठी धावताना...
समोरच्या रनवे वर एक विमान नुकतंच उतरलंय


बागडोगरा ते फुनशिलींग टॅक्सी आम्ही आधीच ठरवली होती.  विमानतळातून बाहेर आल्यावर कॉल करून टॅक्सिवाला सापडला.  ह्याच्या इनोव्हातुन प्रवास चांगला झाला.  बागडोगरा ते फुनशिलींग रस्ताही सपाट गुळगुळीत आहे.

बागडोगरा ते फुनशिलींग जाण्यासाठी तीन मार्ग आहेत हे मी गुगल मॅप मधे बघून ठेवलं होतं.  अंतर कमी जास्त असले तरी गुगल मॅप प्रमाणे तिन्ही रस्ते साधारण चार तासाचे.

बागडोगरा ते फुनशिलींगचे तीन मार्ग... गुगल मॅप मधे

आमच्या ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार आम्ही मधला १७१ किलोमीटरचा रस्ता पकडला होता.  कारण म्हणे हया रस्त्याला आजूबाजूला पाहण्यासारखी दृश्य आहेत.  मला वाटतं हा बाता मारत होता.  खरं कारण म्हणजे इतर दोन्ही रस्त्यांना ट्रॅफिक जास्त असणार.

जेवणासाठी आधी एक हॉटेल लागतं आणि नंतर एक ढाबा असे दोन ऑप्शन ड्रायव्हरने आम्हाला दिले.  लगेच भूक नसल्याने पुढच्या धाब्यावर थांबूया असे आमचे ठरले.

जेवायला थांबलेल्या ढाब्यावर...
आमचा ड्राइवर आणि ढाब्याचा मालक गप्पा मारतायत

सोनू दे ढाब्यावरचं जेवण स्वस्त आणि मस्त होतं.  सर्वजण पोटभर जेवलो.  जेऊन झाल्यावर ढाब्यासमोरच्या रस्त्यावर मी थोडी फोटोग्राफी केली.  रस्त्याला वर्दळ फारशी नव्हती.  थोड्याफार स्थानिक गाड्या आणि अधून मधून मालवाहतुकीचे ट्रक.

ढाब्यासमोरच्या रस्त्यावर माझी फोटोग्राफी
माझ्या रिक्वेस्ट प्रमाणे ड्राइवरने एका चहाच्या मळ्यासमोर गाडी थांबवली.  कुठल्या चहाच्या मळ्यासमोर गाडी थांबवायची हे बहुतेक त्याचे सवयीने ठरलेले होते.  चहाच्या मळ्यात शिरून आम्ही फोटोग्राफी केली.

कुठल्याच चहाच्या मळ्याला कुंपण नव्हते.  कारण जनावरं चहाच्या झाडांना तोंड लावत नाहीत म्हणे.  हि माझी ऐकीव माहिती.  खरे काय ते अजून मला समजले नाहीये.

चहाच्या मळ्यात शिरून फोटोग्राफी
चहाच्या झाडांना सावलीसाठी मधेमधे उंच सदाहरित झाडं लावली होती.

इथून निघालो तेव्हा चार वाजले होते.  तासाभराने दूरवर उंच उंच डोंगर दिसायला लागले.  सपाट भागापर्यंत भारत आहे आणि हिमालयाचे पर्वत जिथून सुरु होतात तिथपासून भूतानचा भाग.

मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यावेळी गाड्यांसाठी एन्ट्री आणि एक्सिट एकाच गेटमधून होते.  आता एन्ट्री आणि एक्सिट गेट वेगवेगळी आहेत.  म्हणजे वर्दळ वाढलीये तर.

सहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल भूतान रेसिडेन्स मध्ये पोहोचलो.  हॉटेलच्या पार्किंग मध्ये पोहोचून बघतो तर काय, दामचोए दोरजी समोर स्वागताला हजर.

हॉटेल बुकिंग करून ठेवले होते.  त्याचे ई-मेल काउंटरवर दाखवले.

DD ने (म्हणजे दामचोए दोरजी) हॉटेलच्या काउंटरवरच्या मुलाला इमिग्रेशन फॉर्मचे सहा प्रिंट काढायला सांगितले.  फॉर्म कसे भरायचे ते त्याच्या माहितीप्रमाणे DD ने मला सांगितले.  फॉर्म भरूनच इमिग्रेशन ऑफिसमधे गेल्यामुळे उद्या सकाळचा वेळ वाचणार होता.

मी माझा आठ दिवसाचा प्लॅन DD ला दाखवला.  त्याने कुठल्या दिवशी कुठून कुठे जायचंय अशी थोडक्यात माहिती त्याच्याकडच्या एका कागदावर लिहून घेतली.  उद्या सकाळी आठ वाजता यायचं ठरवून DD ला निरोप दिला.

ह्या हॉटेलमधेच न जेवता बाहेर कुठेतरी जेवायचे ठरले.  इथून बॉर्डर जवळच आहे.  बॉर्डर क्रॉस करून भारतात जेऊन परत येऊया असा मी प्रस्ताव मांडला.  हॉटेलमधून बाहेर तर पडूया, मग बघू कुठे जेवायचे ते, असे ठरले.  बॉर्डरच्या दिशेने (म्हणजे उताराच्या दिशेने) चालत गेलो.  आमच्या हॉटेलपासून बॉर्डर एक किलोमीटर वर होती.  भिंतीपलीकडे कोपऱ्यावरच्या बिल्डिंगमधे मला ते रेस्टोरंट दिसले जिथे मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात आम्ही जेवलो होतो.  त्यावेळी इथे छान भारतीय जेवण मिळाले होते.  तिथे जेवायला गेलो.  ह्यावेळी जेवण एकदम बकवास होते.  भूतानमधली चांगली रेस्टोरंट सोडून कशाला इथे आलो असे झाले.  स्वतः प्लॅन बनवून ट्रिप करायची म्हटल्यावर असे बरे वाईट अनुभव येणारच.  सगळंच आपल्या मनासारखं होत नाही.

गाड्यांसाठीच्या गेटमधून चालत जायला बंदी आहे.  चालत बॉर्डर क्रॉस करण्यासाठी बाजूला वेगळी जागा आहे.  एन्ट्री आणि एक्सिट साठी दोन वेगवेगळे मार्ग.  दोन्हीकडे सिक्युरिटी गार्ड कायम बसलेले.  जा ये करणाऱ्या भारतीय आणि भूतानी माणसांची कसलीही ओळखपत्र ते मागत नव्हते.  भारतीयांना फुनशिलींगमधे पासपोर्ट शिवाय प्रवेश आहे.  भूतानचे नागरिक तर रोजच सर्रास भारतात ये जा करतात.

आपल्या देशाची बॉर्डर चालत ओलांडणे हा माझ्यासाठी मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यातला भारी अनुभव होता.  अलीकडे आणि पलीकडे प्रचंड विरोधाभास.  एका भिंतीने विभागलेली दोन वेगवेगळी जगं.

भूतानच्या बाजूने पाहिलेले बॉर्डर गेट
जेऊन झाल्यावर परतताना गाड्यांच्या गेटजवळ फुनशिलींग लिहिलेला मैलाचा दगड दिसला.  इथल्या गार्डला विनंती केली आम्हाला इथे फोटो काढायचाय.  आम्ही टुरिस्ट आहोत हे समजल्यावर तो हो म्हणाला.

बॉर्डर गेट समोर भूतानच्या बाजूला उभे मी आणि ख़ुशी
भारताचे मुंबई जसे आर्थिक आणि व्यापारी केंद्र आहे तसे भूतानचे फुनशिलींग.  भूतान आणि भारतामधील व्यापार मुख्यत्वे जयगाव आणि फुनशिलींग मधून चालतो.

हॉटेलकडे परत जाताना वाटेत एका सुपर मार्केट मधून टूथपेस्ट घेतली.  पुण्याहून निघताना टूथपेस्ट राहून गेली होती.  फुनशिलींगमध्ये आज टेम्परेचर ३४ होतं.  हॉटेलच्या रूम मधला AC पूर्ण रात्र चालू ठेवला तेव्हा चांगली झोप लागली.

झोपण्याआधी मी आमचे फॉर्म भरले. फॉर्म आणि बरोबर लागणारी कागदपत्रं, पेन अशी एक पिशवी तयार केली.  उद्या सकाळचं पाहिलं काम इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट काढणे.  मग फुनशिलींग मधल्या एक दोन जागा बघून थिंफूकडे प्रयाण.

आजचं पाहिलं आणि महत्वाचं काम इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट काढणे.

सकाळी लवकर उठून आवरले.  ब्रेकफास्ट केला.  ठरल्याप्रमाणे DD आणि दुसरा ड्राइवर दोन मारुती Wagon R घेऊन सकाळी आठ वाजता हॉटेलच्या पार्किंगमधे हजर होते.  त्यांनी आम्हाला इमिग्रेशन ऑफिसच्या बाजूच्या पार्किंगमधे सोडले.  इमिग्रेशन ऑफिस समोर एक रांग लागली होती. मी त्या रांगेत उभा राहिलो.  लगेच लक्षात आले कि मी चुकीच्या रांगेत उभा आहे.  हि रांग डेली वर्क परमिट साठीची आहे.  युपी बिहारी लेबरर्स साधारणपणे रांग दिसेल अशा प्रकारे धक्काबुक्की करत होते.  भूतानमधे लेबरर्स भारतीय जातात, जे बिल्डिंग बांधायची, रस्ते बनवायची कामं करतात.

तोपर्यंत DD तिथे आला.  त्याने मला दुसरी रांग दाखवली.  ह्या टुरिस्ट च्या रांगेत मोजकी चार पाच माणसं होती.  एवढ्या सकाळी आल्यामुळे गर्दी नव्हती.  माझ्यासारखा फॉर्म भरून तयारीनिशी आलेला आणखी एकच होता.  थोड्या वेळाने स्टाफची माणसं आली.  रांगेतले माझ्यापुढचे दोन जण कागदपत्रं आणायला निघून गेले.  त्यामुळे माझा दुसराच नंबर लागला.  माझ्याकडे सर्वांचे फॉर्म भरून कागदपत्रांसहित तयार होते.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यामुळे सर्व प्रोसेस मला माहिती होती.  जर स्वतःहुन भूतानला जात असाल तर तुम्ही बनवलेली itinerary बरोबर ठेवा.  तुमचा जो काही प्लॅन असेल तो डिटेलमधे प्रत्येक दिवसाप्रमाणे बनवून एक प्रिंट बरोबर न्या.  आमचे फॉर्म आणि कागदपत्रं तपासल्यावर काउंटर वरच्या स्टाफने माझ्याकडे itinerary मागितली.  माझ्याकडे प्रिंट तयार असल्यामुळे मी लगेच पिशवीतून काढून दिली.

काउंटर वरच्या स्टाफने आमचे फॉर्म तपासून मागे पाठवले आणि आम्हाला तयार राहायला सांगितले.  बोलावल्यावर वरच्या मजल्यावर जायचे होते.  दोन मिनिटात एक माणूस बोलवायला आला.  त्याच्या मागून सर्वजण वरच्या मजल्यावर गेलो.  कुठल्या काउंटर वर जायचं ते मी बघितलं.  तीन पैकी एका काउंटरवर आमचे फॉर्म दिले.  इथे प्रत्येकाचा फोटो काढण्यात आला आणि हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.  सकाळी स्टाफ फ्रेश असल्याने पटापट कामं होत होती.  आता आमचा फॉर्म एक माणूस खालच्या मजल्यावर घेऊन गेला आणि आम्हाला बसायला सांगितले.  थोड्याच वेळात तो प्रोसेस पूर्ण करून आमचे आणि इतरांचे फॉर्म घेऊन परतला.  एका काउंटरवर परमिट बनवून माझ्याकडे दिले.  झाले.  आता आम्ही थिंफूला जायला नऊ वाजताच मोकळे.

DD च्या सल्ल्याप्रमाणे मी रस्त्यापलीकडच्या दुकानातून भूतानी सिमकार्ड विकत घेतले.  शंभर रुपये टॉक टाइम असलेलं सिम कार्ड एकशे ऐंशी रुपयांना मिळाले.  एक महिना व्हॅलिडिटी.  ह्या भूतानी सिमकार्डचा ट्रिपमधे खूप उपयोग झाला.

हॉटेलवर परतून बॅगा घेतल्या आणि चेक आऊट केलं.

फुनशिलींग मधल्या हॉटेल भूतान रेसिडेन्सच्या काउंटर समोर
पावणेअकरा वाजता आमची थिंफूच्या दिशेने सफर सुरु झाली.  बॉर्डर जवळच एक सुंदर नितांत जागा आहे ती पाहून पुढे जायचा बेत मी DD ला सांगितला.  त्याचं म्हणणं तिथे वेळ न घालवता आपण पुढच्या एका जागेजवळ थांबूया.  तिथून उंचावरून पूर्ण फुनशिलींगचा व्हू दिसतो.  आणि आधी crocodile zoo मधे जाऊया.  त्याप्रमाणे आधी crocodile zoo ला भेट दिली.

फुनशिलींगच्या crocodile zoo मधली मगर
इथून पुढे थिंफूच्या रस्त्याने निघालो.  फुनशिलींग सोडल्यावर एका बौद्ध monastery जवळ आमच्या गाड्या थांबल्या.  आम्ही गाडीतून उतरतोय तोवर पाऊस आला. DD ने गाडीतून एक भलीमोठी छत्री काढून दिली.  नक्की कुठे जायचेय ते काही कळत नव्हते.  एक लोखंडी गेट दिसले.  ते ढकलून आत शिरतोय तोवर दुरून एक रखवालदार शिव्या घालत पळत आला.  त्याचं म्हणणं इथे प्रवेश बंद आहे.  तुम्ही दार उघडलेतच का.  इथे प्रवेश नाही म्हटल्यावर दीप्ती, ख़ुशी, आणि मी दुसरीकडे काही आहे का ते पाहायला निघालो.  थोड्या अंतरावर काही पर्यटक दिसले.  आम्ही तिकडे गेलो.  इथे काही स्तूप होते.  डोंगराच्या कडेवरून फुनशिलींगचा मस्त व्हू दिसत होता.

ढगाळ वातावरणात डोंगराच्या कडेवरून पाहिलेलं फुनशिलींग
परत एक पावसाची सर आली.  पाऊस थांबल्यावर आम्ही भरपूर फोटोग्राफी केली.

स्तूपांभोवती प्रदक्षिणा घालणारी एक बौद्ध भिक्कू
दुपारच्या बारा वाजता थिंफूकडे मार्गस्थ झालो.  फुनशिलींग ते थिंफू साधारण पाच तासाचा रस्ता आहे. एकशे पासष्ठ किलो मीटर.  माझ्या मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हा प्रवास वैतागवाणा झाला होता.  त्याला करणेही तशीच होती.  ह्यावेळी योग्य प्लॅनिंग केल्यामुळे तोच प्रवास मजेदार वाटला.

फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक
फुनशिलींग समुद्रसपाटीपासून २९३ मीटर उंचीवर आहे तर थिंफू २३२० मीटर उंचीवर.  आम्हाला २०२७ मीटर चढून जायचे होते.  म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून कुठेतरी पर्वतरांगात.

खुशीला एकदा उलटीचा त्रास झाला.  ह्या नंतर पुढच्या आठ दिवसात तिला उलटीचा त्रास कधीच नाही झाला.  अर्धा तास दाट धुक्यातून गाडी चालली.  इथे शिकाऊ ड्रायव्हरचं काम नाही.

फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक

१९६१ मधे फुनशिलींग ते थिंफू रस्ता बांधण्यासाठी तीस हजार लेबरर्स (भारतीय आणि नेपाळी) खपत होते म्हणे.  चिनी आक्रमणाचा धोका ओळखून त्याकाळी जीप जाईल असा रस्ता घाईघाईने बांधण्यात आला.  ह्या हिमालयीन पर्वतरांगात रस्ते बांधणे हे सोपे काम नाही.

भूतानमधील मुख्य रस्त्यांची देखभाल बॉर्डर रोड ऑर्गनिझशन ह्या भारतीय सेनेच्या अभियांत्रिकी दलाकडून केली जाते.  इतर छोटे मोठे रस्ते भूतान सरकारचे खाते सांभाळते.

फुनशिलींग ते थिंफू रस्त्याकडेचा एक फलक
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच्याच.  दरड बाजूला करून रस्ता मोकळा करणं हे मोठं जिकरीचं काम.  ह्या कामाला भारतीय लेबरर्स जुंपतात.

डॅम व्हू रेस्टोरंट मधे जेवणासाठी थांबलो.  जिल्हा चुखा, गाव वांगखा.  जेऊन झाल्यावर शेजारच्या दुकानात थोडी खरेदी झाली.

समोरच्या डोंगरावर गावातली घरं आणि त्यांच्यापलीकडे एक monastery दिसत होती.  मी तिथे जायचं ठरवलं.  मी थोडं वर गेल्यावर दिप्ती आणि ख़ुशीनेही यायला सुरुवात केली.  गावातली घरं ओलांडून पलीकडे जायची वाट काही सापडेना.  वाट शोधत शोधत सगळ्या घरांच्या पलीकडे पोहोचलो.  एका मोठ्या दगडावर चढून मी फोटो काढले.

दगडावर चढून माझी फोटोग्राफी...
समोर वांगखा गावातली घरं
सर्वत्र हिरवीगार झाडं
पलीकडचा पर्वत अर्ध्यानंतर ढगात हरवलाय
वरून मी दीप्ती आणि ख़ुशीला रस्ता दाखवला कसे वरपर्यंत यायचे ते.  मी पुढे monastery पर्यंत जाऊन बघितले.  आपल्याकडे गावचे एक मंदिर असते तशी वांगखा गावची हि monastery होती.  खास बघण्यासारखे काही नव्हते.  आता उतरायला सुरुवात केली.  बघतो तर ख़ुशीच्या पायावर एक जळू.  आम्ही आपापले पाय तपासले.  इथून पटकन खाली उतरलो.  माझ्या दोन्ही बुटात चुरचुरत होतं.  खाली गेल्यावरच बघू म्हटलं.  आधी सगळ्यांना खाली पोहोचूदे.

खाली पोहोचल्यावर मी बूट आणि सॉक्स काढले.  दोन्ही पायाला एक एक जळू चावली होती.  दोघींनाही सॉक्स मधून काढून मारले.  दीप्ती ने जरा जास्तच काळजीने माझे दोन्ही सॉक्स आणि पॅन्ट चांगल्या प्रकारे झटकली.  जंगलात जळू चावण्याचा मला आधी अनुभव होता.  त्यामुळे मी बिलकुल पॅनिक झालो नाही.  ह्या छोट्या अनुभवावरून लक्षात आले - भूतानमधे ट्रेकिंग करणे जरा अवघडच असणार.  बघू पुढे कधीतरी भूतानमधे ट्रेकिंगचा माझा प्लॅन आहे.

वांगखा गावातून पुढे गेल्यावरही दाट धुक्यातून प्रवास.  आता रस्ता बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांनी भरलेला.

बऱ्याच वेळाने आमच्या ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली.  इथून दरीत दिसत होतं आम्ही कुठून चढून आलोय ते. थिंफूकडे जाणारा नवीन रस्ता बनवण्याचं काम आणि नदीही दिसत होती.  ढग बऱ्याच खालच्या पातळीवर होते.

थिंफूला जाताना रस्त्याकडेला क्षणभर विश्रांती
सातनंतर कधीतरी थिंफूमधे पोहोचलो.  नेमसेलिंग हॉटेलमधे आम्ही चार दिवसांचं रूम बुकिंग केलेलं होतं.  आम्हाला निळ्या रंगसंगतीतली रूम मिळाली.  दमल्यामुळे नेमसेलिंग हॉटेल मधेच जेवलो.  बाहेर कुठे गेलो नाही.

उद्याचा कार्यक्रम थिंफू आणि आजूबाजूला भटकंती.

आजचा दिवस थिंफू आणि आजूबाजूला भटकंती.  कुठे कुठे जायचे ते मी DD ला (म्हणजे आमच्या ड्रायव्हर ला) आधीच दाखवले होते.  त्याचे म्हणणे "हि सर्व ठिकाणं दाखवून मी अजून पण ठिकाणं दाखवतो जी तुमच्या लिस्टमधे नाहीयेत".  त्याच्या प्लॅन नुसार जायचे ठरवले.

आज शनिवार असल्याने इमिग्रेशन ऑफिस बंद होते.  रविवारीही इमिग्रेशन ऑफिस बंद.  त्यामुळे परमिट एक्सटेन्ड करायला सोमवार उजाडणार होता.  पण आमच्या प्लॅनला काहीही धोका नव्हता.  आम्ही मंगळवारी थिंफू सोडणार होतो.  आणि सोमवारी टायगर्स नेस्ट ला जायला आमचं सध्याचं परमिट पुरेसं होतं.  भूतानमधे एन्ट्री केल्यावर जे परमिट देतात ते घेऊन फक्त थिंफू आणि पारो एवढेच फिरता येते.  ह्याच्या पलीकडे कुठेही जायचे असल्यास थिंफू मधल्या इमिग्रेशन ऑफिसमधे जाऊन परमिट एक्सटेन्ड करावे लागते.  आम्हाला पुनाखा आणि गेलेफू साठी परमिट एक्सटेन्ड करायचे होते.

आजची सुरुवात झाली मेमोरियल चोरटेन पासून.  समोरच्या पार्किंग मधे गाडी लावून आमचा ड्राइवर तिथे थांबला.  प्रौढांसाठी तीनशे रुपये तिकीट होतं. मुलांना तिकीट नाही.

आतमधे बौद्ध साधक जप आणि ध्यान करत बसलेले.  त्यांना पर्यटकांची सवय होती.  त्यातल्या कोणाचीही चिडचिड झाली नाही.

थिंफूमधील मेमोरियल चोरटेन
भूतानच्या तिसऱ्या राजाच्या स्मरणार्थ त्याच्या आईने हि वास्तू बांधून घेतली.  थिंफूमधे गेलात तर इथे अवश्य भेट द्या.  तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला सगळी डीटेल माहिती देईल.  गाईड नसला तरी हरकत नाही.  सर्व काही व्यवस्थित पाहून घ्यावे.  चार गोष्टी नाही समजणार.  सगळंच समजून घ्यायचं असेल तर गाईड घेऊन भूतानची सफर करावी.  त्याचे पैसे मोजायचीही तयारी असावी.  पैसे तर देणार नाही आणि तरीपण सगळं सांगा असला आडमुठा स्वभाव असला तर भूतान काय इतर सगळ्या ठिकाणी हीच बोंब होणार.  अशांनी वीणा वर्ल्ड, केसरी बरोबर जाणे चांगले.  स्वतःच फिरायला जाऊ नये.

मेमोरियल चोरटेनच्या प्रवेशद्वाराशेजारील फलक
इथल्या आवारात फिरताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरावे.  उलट्या दिशेने जाऊ नये.  मेमोरियल चोरटेन संपूर्ण पाहून बाहेर यायला अर्धा तास लागला.

मेमोरियल चोरटेनच्या पार्किंगमधली एक गाडी
पार्किंगमधे विविध मोटारी उभ्या होत्या.  निसान नवारा इथे पॉप्युलर आहे असे DD (म्हणजे आमचा ड्रायव्हर) सांगत होता.  भूतानला गरीब देश समजण्याची चूक भारतीयांनी कृपया करू नये.  भारत हा श्रीमंत जनतेचा गरीब देश आहे.  भूतान हा सुखी जनतेचा श्रीमंत देश आहे.

आता आम्ही जाणार होतो बुद्ध डोरडेन्मा हा भव्य पुतळा पाहायला.  प्रवेशद्वारापर्यंत गाडीने जाता येते.  इथे आम्हाला सोडून आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन थोड्या खाली गेला.  कारण प्रवेशद्वारासमोर पार्किंग नाहीये.  बुद्ध बघून झाल्यावर DD ने आम्हाला समोरच्या पायऱ्या उतरून खाली यायला सांगितले.  तिथल्या पार्किंगमधे तो थांबणार होता.

आज इथे काहीतरी इव्हेंट होता.  त्यामुळे सगळीकडे बरीच लगबग होती.  आजच्या इव्हेंट मुळे काही भागात जायला प्रवेश नव्हता.

ब्रॉंझच्या ह्या पुतळ्याला सोन्याचे आवरण आहे.  इथलं सगळंच गोल्डन थिम मधे.

थिंफूजवळचा बुद्ध डोरडेन्मा
थिंफूमधे सगळीकडून हा डोंगरमधला भव्य पुतळा दिसतो.  जणू काही थिंफूच्या जनतेसाठी समोर ध्यानस्थ बसलाय.

बुद्धाच्या चहूबाजूंना अशा देवतांच्या मुर्त्या आहेत
जर तुम्हाला ट्रेकिंग किंवा रनिंगची आवड असेल तर भल्या पहाटे उठून इथे चालत किंवा पळत जा.

पायऱ्या उतरून आम्ही पार्किंगमधे गेलो.  गाड्यांच्या दाटिवाटीत आमच्या गाड्या शोधल्या.  डोंगर उतरून जाताना थिंफू शहराचा सुन्दर व्हू दिसतो.  रस्त्याकडेच्या दगडावर बसून मी फोटो काढला.

डोंगरांमधल्या दरीत पसरलेलं थिंफू शहर
रस्त्याकडेच्या दगडावर बसून मी काढलेला फोटो
थिंफू हि राजधानी आणि भूतानमधले सर्वात मोठे शहर.  लोकसंख्या फक्त एक लाख पाच हजार.  अहो आमच्या पुण्यात ह्याच्या पस्तीस पट लोकं राहतात.  बाजूचं पिंपरी-चिंचवड पकडून पंचावन्न पट.  थोडक्यात, भारताच्या एखाद्या कोपऱ्यातही ह्यांच्या सबंध देशाच्या जनतेपेक्षा जास्त लोकं सापडतील.  आणि पूर्ण भारतात जितकी झाडं आहेत त्यापेक्षा जास्त इथे भूतानमधे असतील.  दोन शेजारी देशांमधला केवढा हा विरोधाभास.

आता पुढचं ठिकाण चानगानखा लखांग हा प्राचीन बौद्ध मठ.  तुमच्याबरोबर गाईड असेल तर तो तुम्हाला इथली सर्व डिटेल माहिती सांगेल.  आम्ही सर्व फिरून घेतले आणि जमेल तेवढे जमेल तसे समजून घेतले.

चानगानखा लखांगच्या आवारात
भूतानमध्ये सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.  इथे आधी असलेल्या बॉन धर्माबरोबर बौद्ध धर्माची कुठलीही भांडणं झाली नाहीत.  भारतवर्षात उगम पावलेल्या सर्वच धर्मांची हि खासियत आहे.  हिंदू, बौद्ध, जैन, शीख हे सर्व एकमेकांचे शत्रू कधीच नव्हते.  ख्रिस्ती आणि इस्लामची बात मात्र वेगळी आहे.  ह्यांचा उद्देशच मुळी इतर धर्मांच्यावर कुरघोडी करण्याचा असल्यामुळे भांडण तंटे हे आलेच.  सध्याच्या जगात जिथे अमेरिकेसारखा बलाढ्य देशही इस्लामच्या राक्षसाला चुचकारतोय तिथे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच देशांनी इस्लामला विरोध केलाय.  भूतान मध्ये धर्मांतर घडवून आणण्याला कायद्याने बंदी आहे.  भारतात तर Proselytism असं काही असतं आणि ते आपल्या देशात पद्धतशीरपणे केलं जातं ह्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.

चानगानखा लखांगच्या आवारात
झॉन्गखा हि भूतानची राष्ट्रीय भाषा.  झॉन्ग म्हणजे डिस्ट्रिक्ट (जिल्हा) आणि खा म्हणजे भाषा.  थोडक्यात झॉन्गखा म्हणजे जनतेची बोलीभाषा.  लिहिण्यासाठी तिबेटी वर्णमाला वापरतात.  पश्चिम भूतान मधली, म्हणजे जवळ जवळ २५% जनतेची हि मूळ भाषा.  भूतानच्या पूर्वेकडील भागात शांगला आणि इतर काही भाषा ह्या मूळ भाषा आहेत.  भूतानच्या दक्षिणेकडील काही भागात नेपाळी मूळ भाषा आहे.

अब अगला पडाव मोतीथांग टकिन प्रिझर्व, म्हणजे प्राणीसंग्रहालय, आणि त्याच्याआधी BBS टॉवर.  BBS टॉवर प्राणीसंग्रहालयाच्या रस्त्याला पुढे जाऊन डोंगरावर आहे.  आधी तिकडे गेलो.  BBS टॉवरच्या आवारात जात येत नाही.  पण इथल्या रस्त्यावरून थिंफूचा सुंदर व्हू दिसतो.

प्राणी संग्रहालयाची वेळ आहे सकाळी नऊ ते दुपारी चार.

जाळ्या लावून बंदिस्त केलेल्या मोठमोठ्या भागात टकिन सोडलेले आहेत

ह्या प्राणीसंग्रहालयात फक्त टकिन आणि हरणेच आहेत.  त्यामुळे पर्यटकांची गर्दी नव्हती.  आमच्यासारखे काही मोजकेच आलेले होते.

भूतानचा राष्ट्रीय प्राणी टकिन
साधारण मेंढ्यासारखे दिसणारे टकिन बऱ्यापैकी माणसाळले वाटले.  ख़ुशीने त्यांना आणि हरणांना भरपूर गवत भरवले.

प्राणीसंग्रहालयाच्या आवारात चक्क लाकडाच्या ओंडक्यांपासून बनवलेली खुर्च्या टेबलं होती.

लाकडाच्या ओंडक्यांपासून बनवलेली खुर्च्या टेबलं
पाऊण तासात आम्ही प्राणीसंग्रहालय पाहून बाहेर आलो.  आता जेवणाची वेळ झालेली.  आम्ही थिंफूकडे निघालो.  वाटेत एका ठिकाणी DD ने गाडी थांबवली. इथून समोर ताशीछो झॉन्ग आणि त्याच्या पलीकडे राजाचा प्रासाद दिसत होता.

डोंगरउतारावरची भातशेतं आणि पलीकडे ताशीछो झॉन्ग

दुपारच्या जेवणाला थिंफूमधल्या चुल्हा रेस्टोरंट मधे जायचं ठरलं.  DD च्या डोक्यात एक आयडिया आली - आज तुम्ही ट्रॅडिशनल भूतानी जेवण का नाही जेवत, मी घेऊन जातो तुम्हाला एका जागी.  आम्ही होकार दिला.  आम्ही पोहोचलो फोक हेरिटेज म्युझीयम मधे.  आधी म्युझीयम बघून मग जेवायचे ठरले.  एका दीडशे वर्ष जुन्या दुमजली घराचे म्युझीयम बनवले आहे.  हे बघून पूर्वीच्या काळी भूतान मधे लोक कसे रहात असत त्याची कल्पना येते.  हे कुण्या श्रीमंत माणसाचे घर असणार.  त्या काळचे गरिबांचे घर म्हणजे एकच मोठी खोली.

फोक हेरिटेज म्युझीयम पाहून आपल्याकडच्या प्राचीन कोकण म्युझीयमची आठवण झाली.

थिंफूमधील फोक हेरिटेज म्युझीयम

म्युझीयम पाहून झाल्यावर भूतानी पारंपरिक बैठकीप्रमाणे जेवायला बसलो.

ट्रॅडिशनल भूतानी जेवण
एमा म्हणजे मिरच्या, दातशी म्हणजे पनीर, केवा म्हणजे बटाटे.  थुक्पा म्हणजे सूप मिक्स नूडल्स.  ना जा म्हणजे दुधाचा चहा, सु जा म्हणजे लोण्याचा चहा.  थोडक्यात, जा म्हणजे चहा.

जेऊन झाल्यावर आम्ही थिंफू मधला ताशीछो झॉन्ग बघायला निघालो.  १९६८ पासून भूतान सरकारचं कामकाज इथूनच चालतं.  सोमवार ते शुक्रवार इथे पर्यटकांना पाच नंतर प्रवेश असतो.  आज शनिवार असल्याने सरकारी कामकाज आज बंद होतं.  त्यामुळे पर्यटकांना आज दिवसभर प्रवेश होता.

इथे पर्यटकांना गाईडशिवाय प्रवेश नाही.  आमच्याबरोबर गाईड नसल्याने तिथला एक गाईड आमच्याबरोबर आला.  ह्या झॉन्गला तीन प्रवेशद्वारं आहेत.  पहिले राजा मंत्रिमंडळ इत्यादींसाठी, दुसरे सर्वसामान्य नागरिकांसाठी, आणि तिसरे बौद्ध भिक्खू वगैरेंसाठी.  आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या प्रवेशद्वारातून आत गेलो.  बॅगा स्कॅन झाल्या, आमची तपासणी झाली आणि आम्ही आमच्या गाईड बरोबर पुढे गेलो. 

ताशीछो झॉन्गचं पाहिलं प्रवेशद्वार - राजा, मंत्रिमंडळ इत्यादींसाठी
झॉन्ग बाहेरून बघताना बंदिस्त वाटला तरी आतमध्ये भलीमोठी मोकळी जागा असते.

ताशीछो झॉन्गच्या आवारात
गाईड बरोबर आम्ही झॉन्गचा काही भाग पाहिला.  काही भागात पर्यटकांना प्रवेश बंद आहे.

ताशीछो झॉन्ग मधल्या एका भिंतीवरची मूर्ती
ह्या झॉन्गचं पाहिलं बांधकाम १२१६ मधे झालं होतं.  १६४१ साली आज आहे तसा झॉन्ग बांधला गेला.  १७७२ मधे हा झॉन्ग आगीत जळाला.  त्या जागी आजचा झॉन्ग बांधला गेला.

झॉन्ग पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा साडेचार वाजून गेले होते.  इथे बाहेर थांबा, थोड्याच वेळात झेंडा उतरवण्याचा समारोह होईल असे आमच्या गाईडने सांगितले.  आम्ही झेंड्याजवळ जाऊन थांबलो.  पावणेपाच वाजता सर्वात पुढे पायघोळ कपडे घातलेले तिघेजण, त्यांच्यामागे आणखी एकजण आणि त्याच्या मागून सैनिकांची एक तुकडी आली.  त्यांनी समारोहपूर्वक झेंडा उतरवला.  झेंडा घेऊन आल्या मार्गाने सर्वजण परत गेले.  प्लॅनमधे नसताना अनपेक्षितपणे हा छोटासा समारोह बघायला मिळाला.

ताशीछो झॉन्ग मधला संध्याकाळचा झेंडा उतरवण्याचा समारोह
ज्ञात असलेल्या इतिहासापर्यंत भूतान नेहमी स्वतंत्र प्रदेश राहिलाय.  त्यामुळे ह्या देशाला स्वतंत्रता दिवस नाहीये.  एका बाजूला दूर दूर पर्यंत पसरलेलं जगाचं छप्पर तिबेट आणि दुसऱ्या बाजूला सपाटीवरचा भारत.  मधल्या हिमालयातील हा छोटासा देश.  ब्रिटिशांनी पूर्ण भारत खंडावर राज्य केलं पण भूतान आणि नेपाळ त्यांच्या हाताबाहेर राहिले.  कधीकाळी तिबेटी आणि मोंगोल अशा एकत्रित सेनेचं आक्रमणही भूतान्यांनी परतवून लावले होते.

ताशीछो झॉन्गच्या पार्किंग मधली एक आलिशान मोटार
ताशीछो झॉन्गच्या पार्किंग मधे काही आलिशान मोटारी थांबलेल्या.

पार्किंग मधे आमची टॅक्सी आणि मागे ताशीछो झॉन्ग
साडेपाचच्या आसपास हॉटेलमधे परतलो.

जेऊन झाल्यावर हॉटेलच्या जवळपास फिरायला बाहेर पडलो.  फुनशिलींगहुन थिंफूला येताना वाटेतल्या दुकानात चॉकलेट मिळाले होते तसले ख़ुशीला हवे होते.  ते शोधण्याची मोहीम फत्ते केली.

थिंफूच्या एका सुपर मार्केटमधील खाऊ
भारतीय चलन भूतानमधे सगळीकडे चालतं.  दुकानदार सुट्टे परत देताना भारतीय माणूस बघून त्यांच्याकडे असल्या तर भारतीय नोटा देतात.  आपला एक रुपया म्हणजे ह्यांचा एक गुलत्रम.  आणि आपला एक पैसा म्हणजे ह्यांचा एक चेत्रम.  ह्यांची करन्सी भारतीय करन्सी बरोबर समान किमतीला जोडलेली आहे.  म्हणजे रुपयाचा भाव चढला उतरला कि ह्यांच्या गुलत्रमचा भाव तसेच हेलखावे खातो. 

आपले ATM कार्ड इथल्या ATM मधे चालते.  पैसे काढता येतात, पण प्रत्येक वेळी शंभर रुपये चार्ज पडतो.  मागच्या वेळच्या अनुभवावरून ह्या वेळी पुरेशी कॅश बरोबर घेऊन आलो होतो.

भूतानमधे रात्री नऊनंतर सगळीकडे सामसुम असते.  रात्री नऊला बहुतेक रेस्टोरंट बंद होतात.  काही मोजकीच दुकानं उघडी दिसतात.  आधीच इकडे लोकसंख्या कमी.  नऊ नंतर रस्त्याला फारसं कोणी भेटत नाही.

उद्या टायगर्स नेस्ट वर मोहीम व जमल्यास पारोमधील इतर ठिकाणांना भेटी. 

आजचा प्लॅन होता टायगर्स नेस्ट वर मोहीम व वेळ मिळाल्यास पारोमधील काही ठिकाणांना भेटी.  सकाळी आठ वाजता आवरून ब्रेकफास्ट करून आम्ही तिघे तयार होतो.

थिंफू सोडल्यावर बबेसा नावाचा भाग आला.  इथे एका चोरटेन (म्हणजे स्तूप) समोर आमच्या ड्राइवरने गाडी थांबवली. पुण्यात असताना मी त्याला WhatsApp वर ह्या ठिकाणाचा फोटो पाठवला होता.  त्याची आठवण ठेऊन त्याने इथे गाडी थांबवली होती.  मी एकटाच गाडीतून उतरलो.  चोरटेन पाहून झाल्यावर चहूबाजूंनी फोटो काढले.

बबेसा मधील एक चोरटेन (म्हणजे स्तूप)
सकाळच्या सुंदर वातावरणात नदीच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यावरून आम्ही पारोच्या दिशेने प्रवास सुरु केला.  साधारण अर्ध्या तासाने पुलावरून नदी पार केली.  इथे मी गाडीतून उतरून आजूबाजूच्या सगळ्या फलकांचे फोटो काढले.  मी सांगेन तिथे DD (आमचा ड्राइवर) गाडी थांबवायचा.  आत्तापर्यंत त्याला कळले होते मला कुठे आणि कसले फोटो काढायचे असतात ते.

दिशादर्शक फलक
पुलापलीकडच्या  रस्त्याला पारो छू सोबतीला होती.  छू म्हणजे नदी.  नदीशेजारच्या रस्त्याने अर्ध्या तासाच्या अंतरानंतर DD ने स्वतःहून गाडी थांबवली.  तसे ह्याच्याआधी माझे दोन फोटो ब्रेक झालेले होते.  आता इथून समोर पारो एअरपोर्ट नजरेच्या टप्प्यात होते.  भूतानमधे येण्यासाठीचे हे एकमेव विमानतळ.  एकच रनवे.  फक्त तीनच विमान कंपन्यांची विमानं इथे येतात.  द्रुक एअर, भूतान एअरलाईन्स, आणि बुद्ध एअर.

एक हेलीकॉप्टर इंधन भरण्यासाठी थांबलेले.  इतर विमानतळांवर असतो तसला गजबजाट कुठेही दिसत नव्हता.  पूर्ण भूतान असेच आहे.  गर्दी गडबळ गोंधळ गोंगाट कुठेच नाही.

ह्या विमानतळावर विमान उतरवणे आणि उडवणे भलते अवघड आहे म्हणे.  अनुभवी पायलटचेच काम आहे इथे.  का तर हा विमानतळ दरीत आणि चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे.  रनवे पण छोटा आहे.  आम्ही थांबले होतो त्या पॉईंट वरून विमान उतरताना किंवा उडताना छान दिसते अशी DD ची माहिती.  पुढचे विमान अकरा वाजता येणार होते.  त्याला एक तास वेळ असल्यामुळे आम्ही जायच्या तयारीत होतो.  तेवढ्यात एक विमान येताना दिसले.  त्याचे लँडिंग पाहायला मिळाले.  हे एक private विमान होते.

पारो एअरपोर्ट
हे आगळंवेगळं विमानतळ पाहून पुढे गेल्यानंतर दहा मिनिटात मी DD ला परत गाडी थांबवायला सांगितली.  मार्चमधल्या भूतान दौऱ्यात रस्ताकडेच्या फलकांचे फोटो काढायचे राहून गेले होते.  ह्यावेळी मी बऱ्याच ठिकाणी गाडी थांबवायला सांगून फोटो काढले.  DD ने तसे कबूल केले होते,  पाहिजे तिथे गाडीतून उतरून फोटो काढा म्हणून.  दीप्ती आणि ख़ुशीला माझी आवड माहिती असल्यामुळे त्यांचीही काही कुरकुर नव्हती.

किती साधा सरळ सोपा मेसेज.  पण आज सर्व जगाला एकतर कळतंय पण वळत नाहीये किंवा कळतच नाहीये.
DD ने टायगर्स नेस्ट झाल्यावर परतताना पारोमधे हॉट स्टोन बाथचा प्रस्ताव मांडला.  माणशी बाराशे रुपये.  चार किंवा जास्त माणसं असतील तर माणशी अकराशे रुपये.  जर हॉट स्टोन बाथ घ्यायचा असेल तर त्यांना तासभर आधी सांगावे लागते.  तयारी करण्यासाठी.

पुढच्या पाच मिनिटात दूरवर टायगर्स नेस्ट दिसायला लागले.  पारो गाव पार करून आम्ही पुढे गेलो.  गाव अशासाठी कि शहरीपणा कुठेच दिसला नाही.  पण गबाळेपणा गलिच्छपणा कुठेच नव्हता.  सर्वत्र शेतं, घरं, वगैरे वगैरे टुमदार आणि नीटनेटके.  आजचा पहिला कार्यक्रम टायगर्स नेस्ट असल्यामुळे आम्ही पारोमध्ये थांबलो नाही.  रस्त्यात एक लोखंडी पूल लागला.  भूतान मधले बहुतेक पूल छोटेसे आणि लोखंडी आहेत.

टायगर्स नेस्टच्या पायथ्याला पार्किंगच्या जागेत आमची गाडी थांबली.  इथून पुढे एकतर डोंगर चढून जायचे होते किंवा घोड्यावरून.  घोडा निम्म्या अंतरापर्यंत जातो.  तिथून पुढे चालतच जावं लागतं.  मी तिकिटं काढली.

इथे तिकिटं काढल्याशिवाय वर जाऊ नका.  वर पोहोचल्यावर तिकिटं तपासून मगच टायगर्स नेस्टमधे प्रवेश देतात.

दीप्ती आणि ख़ुशी साठी घोडे ठरवले.  प्रत्येकी सहाशे रुपये.  मी चालतच जाणार होतो.  प्रत्येकी पन्नास रुपये देऊन आम्ही काठ्या घेतल्या.  खरंतर काठ्या घेतल्या नसत्या तरी चाललं असतं.  कधीच ट्रेकिंग न केलेल्यांनी मात्र काठ्या घ्याव्यात.

वाटेत लागलेला एक फलक

सुरुवातीचा थोडा वेळ सोपा चढ होता.  नंतर मोठा चढ लागला.  ज्यांनी ट्रेकिंग फारसं केलेलं नाही त्यांनी घोडा घेणंच उत्तम.  नाहीतर पूर्ण दिवस टायगर्स नेस्ट मधेच जायचा आणि पारो बघायचे राहून जायचे.

जायची वाट सोडली तर पूर्ण डोंगरभर झाडंच झाडं.  आजही भूतानच्या  ७२% भागात जंगलं आहेत.

हे जर सगळ्यांना समजलं आणि उमजलं तर जग किती वेगळं असेल
खाली उतरून येणारी माणसं वाटेत भेटत होती.  खाली येणारे घोडे चार पाचच्या कळपाने उतरत होते.  काहींबरोबर मालक होते.  काही कळप स्वतःच उतरत होते.  रोजचा रस्ता असल्याने घोड्यांना सवय होती.  आणि वर जाणारे घोडेवाले खाली येणाऱ्या घोड्यांना हाका देऊन उतरवत होते.  सर्व घोडेवाले सगळ्या घोड्यांना मदत करत होते.  फक्त आपल्यापुरतं न बघता सर्व कम्युनिटीला सर्वांनी मदत करावी हे ह्या अनपढ घोडेवाल्यांना समजते.  आमच्या सोसायटीतल्या एज्युकेटेड मेंबर्सना पाठवा इथे चार गोष्टी शिकायला.

टायगर्स नेस्टच्या वाटेवर...  मागे दूरवर घोडेवाल्याचे गाव दिसतंय
इथे घोडे रोज एक किंवा दोन फेऱ्या करतात.  साधारण निम्म्यापर्यंत जाऊन घोडे थांबले.  तोपर्यंत मी थोडं पुढे कॅफेटेरिया पर्यंत जाऊन एक फोटोसेशन केलं होतं.  आमचे घोडे आणि माणसं आलेली पाहून मी परत त्याजागी गेलो.  कॅफेमध्ये चहाकॉफीचा ब्रेक न घेता आम्ही पुढे निघालो.  इथून वरपर्यंत पायगाडीचा प्रवास होता.  ख़ुशीला घेऊन मी पुढे गेलो.  दीप्ती थोड्या मागून येत होती

रोज शे दोनशे माणसांनी तुडवलेला धोपटमार्ग चुकण्याची शक्यताच नाही.

टायगर्स नेस्टच्या वाटेवरचा दिशादर्शक

१६९२ मध्ये इथे पहिले बौद्ध देवालय बांधले होते.  सतराव्या आणि अठराव्या शतकात इथे जाण्याची वाट अतिशय अवघड आणि धोकादायक होती.  आता सव्वाचारशे वर्ष वापरात असल्यामुळे हि वाट तब्येतीने धडधाकट असलेली कोणीही व्यक्ती चढू शकते.

ख़ुशीला मी शेवटपर्यंत हात धरून घेऊन गेलो.  चढ काही केल्या संपेना.  ख़ुशी आता मधेमधे बसायला लागली.  तिचा ब्रेक होईपर्यंत माझे छोटेसे फोटोसेशन व्हायचे.

उन्हात न्हालेलं टायगर्स नेस्ट आणि तिथपर्यंत पोहोचायची वाट

१९९८ मध्ये टायगर्स नेस्ट आगीत खाक झाले होते.  २००५ पर्यंत ते परत पूर्वीसारखे बनवले.

टायगर्स नेस्ट हाकेच्या अंतरावर आलं तेव्हा दीप्ती आम्हाला येऊन मिळाली.  वाटेत एक सुंदर धबधबा लागला.  दोन सिंहगड एकामागूनएक एवढं चढायला आहे टायगर्स नेस्ट.

टायगर्स नेस्ट जवळचा धबधबा
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक चेकपोस्ट आहे.  इथे आपले सर्व सामान ठेवावे लागते.  जर काही किमती सामान बरोबर घेऊन गेलात तर एक छोटे पॅडलॉक बरोबर न्या.  इथल्या लॉकर मधे सामान ठेऊन लॉक लावू शकाल.  आम्ही बॅग आणि काठ्या इथल्या सामानघरात ठेवल्या.  तोकडे कपडे घालून इथे प्रवेश मिळत नाही.  अंगभर कपडे घालून जा.  माझ्या टीशर्टला कॉलर नव्हती.  मला तिथे पडलेल्या शर्टपैकी एक शर्ट घालायला सांगितले.  एका गार्डने तिकिटं तपासली.

आम्ही टायगर्स नेस्ट मधे प्रवेशलो होतो.  एकेक बौद्ध देवालय पाहत पुढे जात राहिलो.  शेवटी एक भन्नाट जागा पाहायला मिळाली.  डोंगरकपारीत उतरून जायला छोटीशी बोळकांड आणि लाकडाची तुटपुंजी शिडी.  मी पुढे, ख़ुशी मध्ये, आणि दीप्ती मागे असे हळूहळू उतरून गेलो.  अंधाऱ्या गुहेत उतरून गेल्यावर एक वाघाचा फोटो ठेवलेला आणि त्याच्यासमोर दिवा लावलेला.  सतराव्या शतकातली हि ध्यानाला बसायची जागा असणार.  पूर्ण जगापासून दूर.  एकांतात.  डोंगराच्या पोटात जिथे कॉस्मिक रेज पण पोहोचू शकत नाहीत.

टायगर्स नेस्टचे प्रवेशद्वार... परतताना आतून बघितलेलं
उतरताना व्हू पॉईंट वरून परत एकदा टायगर्स नेस्टची फोटोग्राफी झाली.

डोंगरकड्यावरचं टायगर्स नेस्ट... कोणिकाळी अगम्य दुर्गम... आज सर्वांच्या आवाक्यात असलेलं
उतरण्याचा रस्ता सोपा आहे.  घसरण गचपण कुठेच नाही.  पण थकल्यामुळे ख़ुशी आणि दीप्तीचा वेग मंदावला होता.  आता चढून वर येणारे कोणीच दिसत नव्हते.  सगळे खाली उतरणारेच.

टायगर्स नेस्टची वाट उतरताना
शाळेचा ड्रेस घातलेली काही मुलं सकाळपासून मागे पुढे दिसत होती.  त्यातल्या एकाबरोबर माझ्या गप्पा सुरु झाल्या.  उतरून जाईपर्यंत आमच्या गप्पा चालल्या.

टायगर्स नेस्टची वाट उतरताना

पार्किंगमधे पोहोचलो तेव्हा साडेचार वाजले होते.  आता आम्ही पारोमधे हॉट स्टोन बाथ घ्यायला निघालो.  पाऊण तास आमचा हॉट स्टोन बाथ चालला.  हॉट स्टोन बाथ नंतर थोडा वेळ मला चक्कर आल्यासारखे होत होते.  त्यानंतर भूतानी ड्रेस घालून मनसोक्त फोटोग्राफी केली.

भूतानी ड्रेस घालून फोटोग्राफी
पारोमधे एका ठिकाणी शॉपिंगसाठी थांबलो.  पण ह्या दुकानात फारशी व्हरायटी नव्हती.  किमती पण जास्त होत्या.  त्यामुळे शॉपिंग उद्या थिंफूमधे करायचे ठरले.  मार्चमधल्या भूतान दौऱ्यामुळे मला थिंफूमधल्या दुकानांची माहिती होती.

दुकानासमोरच्या रस्त्यावरून रिंपुंग झॉन्गचं अप्रतिम दृश्य फोटोत पकडलं.  १६४६ साली बांधलेला हा झॉन्ग, म्हणजे भुईकोट किल्ला.  वेळेअभावी इथे भेट देणं राहून गेलं.

रात्रीच्या अंधारात उजळलेला रिंपुंग झॉन्ग

आता पारोमधली इतर ठिकाणं पाहायला वेळ नव्हता.  थिंफूमधे परतायचे होते.  सकाळी जो प्रवास मजेदार आणि आल्हाददायक होता तो आता रात्री कंटाळवाणा वाटू लागला.

आज आम्ही रहात असलेल्या नेमसेलिंग हॉटेलमधे न जेवता जवळच्या चुल्हा रेस्टोरेंट मधे गेलो.

उद्या थिंफूमधल्या उरलेल्या ठिकाणची भटकंती. 

आजचा कार्यक्रम होता थिंफूमधील उरलेली भटकंती.  आवरून ब्रेकफास्ट करून सकाळी साडे आठ वाजता तयार होतो.  आज ख़ुशीने भूतानी ड्रेस किरा घातला होता.  तिचा नेमसेलिंग हॉटेलच्या स्टाफ बरोबर फोटो काढला.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मी तिला हा ड्रेस घेतला होता.  तो घालायचा आज मुहूर्त मिळाला.

भूतानमध्ये बरेचजण रोजच त्यांचा राष्ट्रीय ड्रेस घालतात.  शर्ट पॅन्ट किंवा वेस्टर्न कपडे घातलेले कमी दिसतात.

भूतानी ड्रेस (किरा) घालून ख़ुशी नेमसेलिंग हॉटेलच्या स्टाफ बरोबर
मी हॉटेल जवळच्या भागात एक फेरफटका मारून आलो.  रस्त्याला शाळेत जाणारी मुलं आणि कामावर जाणारी माणसं.  जवळच एक छोटेसे गार्डन दिसले.  भूतान - थायलंड फ्रेंडशिप पार्क.

हि काही खासकरून पाहण्याची जागा नाही.  थिंफूमधे गेलात तर इथे जायचे कष्ट घेऊ नका.  वाटेत लागले तर ह्या गार्डनमधे दहा मिनिटे थांबा.

भूतान - थायलंड फ्रेंडशिप पार्क

आजच्या भटकंतीतले पहिले ठिकाण रॉयल टेक्सटाईल म्युझीयम.  इथे जाताना एक तास हाताशी ठेऊन जा.  म्युझीयमची वेळ आहे सोमवार ते शनिवार नऊ ते चार.  रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी बंद.

तिकीट काउंटरच्या कडेला एक भलामोठा स्क्रोल भिंतीवर सोडला आहे.

थिंफूच्या रॉयल टेक्सटाईल म्युझीयम मधला भलामोठा स्क्रोल
समोर ख़ुशी उभी आहे, स्क्रोलची उंची समजण्यासाठी
आत शिरल्यावर पहिल्या रूम मधे एक छान documentary पाहिली.  कपड्यांना भूतानी संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे.  म्युझीयम मधली मांडणी अतिशय योग्य प्रकारे केलेली आहे.

म्युझीयमच्या बिल्डिंगमधे त्यांचेच दुकान आहे.  दुकानातील किमती थिंफू मधल्या दुकानांपेक्षा जास्त होत्या.  म्युझीयम पाहून झाल्यावर आवारातल्या समोरच्या बिल्डिंग मधे गेलो.  इथे काही स्त्रिया पारंपरिक भूतानी पद्धतीने विणकाम करत होत्या.  प्रत्यक्ष विणकाम करताना बघायला मिळाले.

पारंपरिक भूतानी पद्धतीने चाललेले विणकाम


इथून आम्ही निघालो जवळच असलेल्या नॅशनल इन्स्टिटयूट फॉर झोरीग चुसुम कडे.  झोरीग चुसुम म्हणजे पारंपरिक कला.  नॅशनल इन्स्टिटयूट फॉर झोरीग चुसुम हि भूतान सरकारने चालवलेली शैक्षणिक संस्था आहे.

विद्यार्थी कापडावर चित्र काढताना
ह्या चित्रांना थान्गका असं म्हणतात

आमचं पुढचं ठिकाणही जवळच होतं, भूतानची नॅशनल लायब्ररी.  तीन मजल्यांवर अतिशय चांगला प्रकारे पुरातन बौद्ध लेखांचा संग्रह ठेवण्यात आलाय.

नॅशनल लायब्ररी मधील एक फलक
स्वतःच्या देशाच्या परंपरांचा, कलांचा सर्वप्रथम स्वतःला अभिमान असला पाहिजे.  तर मग ते सर्व जगाला दाखवता येते.  स्वतःचे रीतिरिवाज, धर्म, परंपरा आधुनिकीकरणाच्या नावाखाली सोडल्या तर मग त्याची जागा घ्यायला दाऊदच्या काळ्या पैश्यावर चालणाऱ्या बॉलीवूडची नवी संस्कृती आहेच.

भूतानच्या नॅशनल लायब्ररी मधे जतन करून ठेवलेले प्राचीन लेख
नॅशनल लायब्ररी मधलं फारसं काही आम्हाला समजलं नाही.  पण स्वतःच्या देशाची परंपरा कशा प्रकारे जतन करून ठेवावी त्याचे हे उत्कृष्ठ उदाहरण आहे एवढे मात्र समजले.

आता आमची स्वारी निघाली कोरोनेशन पार्क कडे.  समोरच्या पार्किंग मधे गाडी लावून आमचा ड्राइवर थांबला.  आम्ही नदीशेजारच्या पार्क मधे शिरलो.  इथे संध्याकाळी यावे असं मी वाचलं होतं.  आम्ही भर दुपारी आलो होतो.  कुठलातरी इव्हेंट पार्क मधे नुकताच पार पडला होता.  त्याचे स्टॉल्स काढण्याचं काम चालू होतं.

ऊन बऱ्यापैकी होतं.  पण थोडा वेळ फिरायला हरकत नव्हती.  पार्क मधला बुद्धाचा पुतळा दुपारच्या उन्हात तळपत होता.

कोरोनेशन पार्क मधला बुद्धाचा पुतळा
पार्कच्या बाजूच्या नदीमधून स्वच्छ पाणी वेगाने वाहत होतं.  इथल्या नद्यांना बारमाही पाणी असतं.  पावसाळ्यात पावसाचं पाणी, आणि उन्हाळ्यात पर्वतांवरचं बर्फ वितळून त्याचं पाणी.

कोरोनेशन पार्क मधला ड्रॅगन (किंवा तसलाच कोणीतरी)
थिंफू मधे खूप वेळ असेल तरच ह्या पार्क मधे या.  नाहीतर जवळचं चांगलिमिथान्ग स्टेडियम बघा.  किंवा इतर अनेक चांगल्या जागा आहेत थिंफू आणि आजूबाजूला.  आमचं पार्क मधे फिरणं होईपर्यंत आमच्या ड्रायव्हरने पार्किंग मधे जेऊन घेतलं होतं.  टॅक्सी जिथे पार्किंग मधे थांबतात तिथे एका मारुती व्हॅन मधून जेवायला मिळते.  ड्रायव्हर वेळ मिळेल तसे तिथे जेवतात. हे मी भूतान मधल्या इतर ठिकाणीही पाहिलंय.

पार्किंगच्या पलीकडे काहीतरी छान जागा दिसली.  जाऊन पाहतो तर काहीजण तिरंदाजीचा सराव करत होते.

तिरंदाजीचा सराव

भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे तिरंदाजी.  खुरू हा सुद्धा इथला लोकप्रिय खेळ.  आमच्या सफरीत तिरंदाजी आणि खुरूचा योग काही आला नाही.

ड्रायव्हरला आता मी पोस्ट ऑफिस म्युझियम कडे गाडी न्यायला सांगितली.  नाहीतर ते बघायचे राहून गेले असते.  पोस्ट ऑफिसच्या बाजूचे हे पोस्टल म्युझियम आम्ही परवा पहाटे फिरत फिरत आलो तेव्हा पहिले होते.  तेव्हा बंद होते.  इथे आले पाहिजे हे बाहेरची सजावट बघून तेव्हाच समजले होते.

पोस्ट ऑफिस म्युझियम मधली भिंतीवरची सजावट
थिंफू मधे आलात आणि पोस्टल म्युझियम पहिले नाहीत तर बरंच काही मिस कराल.  इथे नक्की भेट द्याच.  आणि तासभर वेळ काढून या.

आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या.  ड्रायव्हरला गाडी क्लॉक टॉवर जवळ न्यायला सांगितली.  इथे गाडी सोडून आम्ही जेवणाच्या शोधाला लागलो.  याक रेस्टोरंट आजचे भाग्यवान विजेते ठरले.

क्लॉक टॉवर जवळचे याक रेस्टोरंट
जेऊन झाल्यावर क्लॉक टॉवर परिसरात थोडा फेरफटका मारला.  एक माणूस दोन गोड कुत्र्याची पिल्लं घेऊन जाताना दिसला.  ख़ुशीला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता.  मी पळत जाऊन त्याला थांबवले.  त्याने तयारी दर्शवली.  ख़ुशीने त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले.  नेहमीप्रमाणे काही वेळानंतर "आपण कुत्रा पाळायचा का", "आपण मांजर पाळायचं का" असल्या प्रश्नांची मला योग्य आणि समर्पक उत्तरं द्यावी लागली.

क्लॉक टॉवर परिसरात फिरताना
इथल्या पार्किंग मधे विविध गाड्या उभ्या होत्या.  त्यातल्या निवडक गाड्यांचे मी फोटो काढले.  गाड्यांची फोटोग्राफी हा माझा आवडता उद्योग आहे.

थिंफू मधल्या क्लॉक टॉवर जवळच्या पार्किंग मधली निसान टेरेनो
भारतीयांनी भूतानला गरीब देश समजण्याची चूक कृपया करू नये.  इथे सर्व कॉन्ट्रॅक्ट लेबर भारतीय (युपी, बिहारी) आहेत, जे बिल्डिंग बांधायच्या रस्ते बनवायच्या वगैरे मोलमजुरीच्या कामाला आहेत.  आणि जर तुम्ही जरा डोळसपणे पहाल... म्हणजे जनतेचे राहणीमान, सार्वजनिक शिक्षणव्यवस्था, सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, कुटुंबव्यवस्था... ह्या सर्वांचा विचार करता भूतान भारतापेक्षा बरेच प्रगत राष्ट्र आहे.

प्रगत म्हणजे नक्की काय ह्याची आज बऱ्याच देशात गल्लत झालेली आहे.  निसर्गाला ओरबाडून शहरीकरण करणे, सर्व जंगले नष्ट करून तिथे कारखानदारी चालू करणे, म्हणजे प्रगती झाली असा समज बऱ्याच राष्ट्रात आहे.  ह्या सगळ्यात आपली जनता सुखी समाधानी आहे का, आपला समाज कुठल्या दिशेला चाललाय ह्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.  वरवर दिसणारी हि प्रगती हे केवळ फसवे आकडे आहेत हे समजण्याइतकी बऱ्याच देशातली प्रजा हुशार नाही आणि शासकांना त्याच्याशी देणंघेणंच नाही.  भूतानची प्रजा गेली कित्येक शतके भाग्यवान ठरलीये.  प्रजेची खरीखुरी काळजी घेणारे शासक ह्या देशाला लाभलेत.

आमच्या ड्रायव्हरला नेक्स्ट कुठे जायचे विचारले तर काही उत्तर नाही.  पावणे पाच वाजले होते.  आता उरलेल्या वेळात शॉपिंग करायचे ठरले.  दिवसभर फिरल्यामुळे सगळे थकलेलो होतो.  एका ब्रेकची आवश्यकता होती.  हॉटेलवर थोडा वेळ आराम करून शॉपिंगला यायचे ठरले.

थिंफूमधील एक दुकान.  छोटे मोठे आकाशकंदील (किंवा त्यासारखे काहीतरी) आणि इतर कापडी वस्तू विकायतायत
भूतान हे काही शॉपिंग डेस्टिनेशन नाही.  पूर्ण भूतान मधे एकही मॉल नाही.  शॉपिंग ट्रिप करायची असेल तर दुबईला जावे.  भूतानच्या वाटेला येऊच नये.

दीप्ती आणि ख़ुशीला शॉपिंगची फारशी हौस नाही.  ह्या दोघींपेक्षा मलाच शॉपिंगची जास्त हौस आहे.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात माझं भूतान मधलं बरंचसं शॉपिंग झालं होतं.  त्यामुळे आमचं आजचं शॉपिंग थोडक्यात आटपलं.

मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मला एका दुकानात सोनेरी चकाकणारी नाणी दिसली होती.  मी विचारल्यावर दुकानातला मुलगा आधी हि नाणी मला विकायला तयार झाला होता.  पण विचार बदलून त्याने मला नाणी विकायला नाहीत म्हणून सांगितले होते.  ते दुकान सापडले.  आता एक बाई दुकानात बसल्या होत्या.  त्यांना मी नाणी विकताय का म्हणून विचारले.  हो म्हणाल्या.  पंचवीस चेत्रम म्हणजे पंचवीस पैसे मूल्याची सोनेरी चकाकणारी हि नाणी आता चलनातून बाद झालेली होती.  दहा रुपयाला एक अशी पाच नाणी घेतली.  माझ्या आणि खुशीच्या नाणी, नोटा, स्टॅम्पच्या संग्रहात अजून एक वाढ.

भूतान मधली बरीचशी दुकानं एकतर बायकांच्या मालकीची असतात किंवा बायका चालवतात.  भूतानमध्ये आजही पुरुषप्रधान पद्धत नाही.  विसाव्या शतकापर्यंत तर लग्न झाल्यावर मुलगा मुलीच्या घरी राहायला जायचा.  सर्व प्रॉपर्टी बायकांच्या मालकीची असायची.  आईची प्रॉपर्टी तिच्या मुलींना मिळायची, मुलाला नाही.  एकविसाव्या शतकात चित्र बदललंय.  आता लग्न झाल्यावर मुलाने मुलीच्या घरी जायचे का मुलीने मुलाच्या घरी ते परिस्थिती बघून ठरवले जाते.  हुंडा म्हणजे काय ते आजही इथे कोणाला माहिती नाही.  ह्या पद्धतींमुळे समाजातल्या अर्ध्याअधिक समस्या, जशा आपण आपल्या आजूबाजूच्या जगात पाहतो, येतच नाहीत.  असं नाहीये कि ह्यांच्या समाजात काही समस्याच नाहीत.  समस्या ह्यांच्याकडे पण आहेत.  पण त्या मोजक्याच आहेत.  आपल्यासारख्या पोत्यापोत्याने नाहीत.

इथली एक समस्या म्हणजे पिऊन पडणारे किंवा धिंगाणा घालणारे.  इथे दारू स्वस्त आहे.  दारू किराणा दुकानात पण मिळते.  विकायला परमिट लागत नाही.  भूतानमध्ये फळांचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं.  इथे manufacturing कॉस्ट सगळ्याचीच कमी आहे.  फळं मुबलक असल्याने दारूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं.  शाकाहारी माणसंही कमी.  मांसाहारी जास्त.  असो.

शॉपिंग आटोपल्यावर पोटपूजेची आठवण झाली.  आज दुपारी क्लॉक टॉवर जवळ फिरताना आपल्याकडे कॅफे कॉफी डे असतं तसं एक रेस्टोरंट दिसलं होतं.  तिथे गेलो.

थिंफूमधल्या क्लॉक टॉवर जवळचं टॉवर कॅफे

इथली घड्याळं भारतीय वेळेच्या अर्धा तास पुढे चालतात.  वेळेत अर्ध्या तासाचा फरक.  पण इथली जनता भारतीयांपेक्षा अनेक पटींनी सुखी समाधानी वाटते.  पूर्ण भूतानमधे कुठेच भिकारी नाहीत.  कुठेही कचऱ्याचे ढीग नाहीत.  ट्रॅफिक नजर लागण्याइतकं शिस्तबद्ध.  गर्दी, कोलाहल, फसवाफसवी, चोऱ्यामाऱ्या कुठेही नाही.  इथे गरिबी नाही असं काही नाही.  पैश्याने गरीब लोक सगळीकडे दिसले.  पण गरिबी पैश्यात मोजायची नसते हा धडा इथे बऱ्याचदा मिळाला.  घरी परत येईपर्यंत गरिबी आणि श्रीमंतीच्या माझ्या व्याख्या बदलल्या.  जणू काही आदर्श देश कसा असावा, त्याचा गुणवान राजा आणि त्याची समाधानी प्रजा कशी असावी, आणि त्यांची योग्य जीवनपद्धती कशी असावी ह्याचा पाठच जगाला घालून देतायत इथे द्रुक यूल (म्हणजे भूतान) मधे.
प्लॅन प्रमाणे आज थिंफू सोडून पुनाखा कडे प्रयाण.  कालच परमिट एक्सटेन्ड केल्यामुळे आज सकाळी ब्रेकफास्ट नंतर नऊ वाजता पुनाखाला निघायचा बेत होता.  थिंफू ते पुनाखा साधारण नव्वद किलोमीटर आणि अडीज तास.  वाटेत डोचूला पासचा ब्रेक पकडून तीन तास.

पुनाखाकडे प्रयाण केल्यानंतर अर्ध्या तासाने चेकपोस्टपाशी पोहोचलो.  इथे परमिट चेक करून घेतले.  मी पटकन एक फोटो काढला.

चेकपोस्ट

चेकपोस्ट पासून निघाल्यावर दहा मिनिटात डोचूला पास आला.  इथे वीसेक गाड्या थांबलेल्या.  पर्यटकांची वर्दळ.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात हि जागा स्वप्नवत वाटली होती.  गर्दीमुळे आज साध्या वेशात आलेल्या राजासारखी भासली.

समोरच्या टेकडीवरच्या द्रुक वान्ग्याल हखांग (म्हणजे एक बौद्ध मठ) कडे आधी मोर्चा वळवला.  हि वास्तू २००८ मधे बांधून पूर्ण झाली.  भूतान मधल्या सध्याच्या राजसत्तेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हि वास्तू बांधली आहे.  सर्वच देशात आता राजसत्ता एकतर निकाली निघाली आहे किंवा फक्त नावापुरती शिल्लक आहे.  इथे भूतान मधे मात्र आजही राजसत्ता आहे.  जनतेमधे राजाला देवासमान स्थान आहे.  भूतानमधे सर्व दुकानांमधे, हॉटेलांमध्ये, सार्वजनिक इमारतींमधे राजाचे किंवा राजाच्या कुटुंबाचे फोटो लावलेले असतात.  जनतेला लोकशाही नकोय.  आधीच्या राजानेच राज्यघटनेत बदल करून भूतानमधे लोकशाही आणलीये.  पण जनतेमधे आजही राजाच लोकप्रिय आहे.  त्याचे कारणही तसेच आहे.  इथले चार पिढ्यांचे राजे हुशार आणि प्रजेची काळजी घेणारे होऊन गेलेत.  इतर ठिकाणांसारखे उडाणटप्पू खुशालचेंडू राजे इथे अस्तित्वात नाहीत.

द्रुक वान्ग्याल हखांग च्या पायऱ्यांवर ख़ुशी आणि दीप्ती
फोटोसाठी उभं राहिल्यावर ख़ुशी नेहमीप्रमाणे काहीतरी उद्योग करतीये

द्रुक वान्ग्याल हखांग पाहून झाल्यावर, यथेच्छ फोटोग्राफी झाल्यावर, मग टेकडी उतरून रस्त्यापलीकडचे एकशे आठ चोरटेन पाहायला निघालो.  आज धुकं नसल्याने दूरवरचे बर्फाचे पर्वत दिसत होते.  पण पर्यटकांच्या गर्दीमुळे थोडा वैताग आला.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात गर्दी नसताना हि जागा स्वप्नवत वाटली होती.  एकशे आठच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर फारच छान.  जरा शोधा ह्याचे उत्तर.  फार वेळ नसेल तर इथून सुरुवात करा.

डोचूला पास ...
रस्त्यापलीकडच्या टेकडीवरून पाहिलेले एकशे आठ चोरटेन
दूरवर ढगांच्या रांगेत लपलेली बर्फाच्छादित शिखरं

भूतान मधला सर्वात उंच पर्वत गंगखर पुएनसुम इथून दिसतो म्हणे.

८० च्या दशकापर्यंत भूतानच्या १०% भागात हिमनद्या होत्या.  इथल्या हिमनद्या वितळतायत.  दरवर्षी तीस ते चाळीस मीटरने वितळतायत.  २०३५ पर्यंत भूतानमधल्या सर्व हिमनद्या वितळलेल्या असतील असा अंदाज आहे.  सर्व जगभरच हिमनद्या वितळतायत.  हिमनद्या वितळण्याचं आणि आमचं काहीच नाही हो, असं म्हणणं म्हणजे "मी नाही त्यातली..." चा प्रकार.  आपण सर्वमिळून पृथ्वीची वाट लावतोय.  ग्लोबल वॉर्मिंग हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे.

डोचूला पास ला आम्ही तासभर होतो.  इथून पुढे वाटेत एका गार्डन मधे थांबूया असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले.  कुठले गार्डन ते मला माहिती नव्हते.  अर्ध्या तासाने आम्ही पोहोचलो रॉयल बोटॅनिकल पार्क समोर.

रॉयल बोटॅनिकल गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळील फलक
पर्यावरणाविषयी उपयुक्त माहिती देणारं एक छोटं प्रदर्शन आधी पाहिले.  मग निघालो आजूबाजूला फेरफटका मारायला.  इथे सेहेचाळीस प्रकारची ऱ्होडोडेंड्रोन झाडं आहेत.

रॉयल बोटॅनिकल गार्डन मधला एक फलक

इथून छोट्या मोठ्या अंतराच्या ट्रेकिंगच्या वाटा आहेत.  इथे मधमाश्या बऱ्याच होत्या.  त्यामुळे आम्ही जवळपासच्या भागात अर्धा तास फेरफटका मारून बाहेरचा रस्ता पकडला.  ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी ह्या जागेसाठी दोन तीन तास वेळ ठेवावा. बरोबर इथला माणूस घेऊन जंगलात दोन तासाचा मस्त फेरफटका होईल.  पेहराव व्यवस्थित करावा. फुल पॅन्ट आणि फुल हाताचा शर्ट.  हूड असेल तर आणखीन छान.

रॉयल बोटॅनिकल गार्डन पासून पुनाखा साधारण दीड तासाच्या अंतरावर होते.  म्हणजे आम्ही जेवायला पुनाखात पोहोचणार होतो.  जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायलाही वेळ असणार होता.

पुनाखा कडे जाताना गाडीत बसल्या बसल्या फोटोग्राफी ...
गर्द झाडीभरल्या जंगलातून गेलेला रस्ता
रस्त्याला फारशी वर्दळ नाही
कसलीही घाई गडबड न करता गाडी चाळीसच्या स्पीडने आरामात चाललेली

रस्त्यात एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली.  पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी.  मी पण उतरलो पाणी भरून घ्यायला.  भूतान मधे नदीचं पाणी पीत नाहीत.  फक्त झऱ्याचं पाणी पितात.  इथे वर्षभर पाण्याला काही तोटा नाही.

पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी थांबलो तिथला फलक

एक छोटा धबधबा होता बाजूलाच.  त्याचा सुंदर फोटो मिळाला.  निसर्गसौन्दर्याने नटलेल्या ह्या देशात राहणाऱ्यांचा हेवा वाटला.

रस्त्याच्या कडेला लागलेला एक छोटा धबधबा

इथून पाऊण तासात पुनाखा मधल्या दामचेन रिसॉर्टला पोहोचलो.  आमच्या मागोमाग कॉक्स अँड किंग्स च्या गाड्या दाखल झाल्या.  हि मंडळी डोचूला पास आणि रॉयल बोटॅनिकल गार्डनलाही आमच्या बरोबर होती.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात मिळालेली पहिल्या मजल्यावरची रूम फारच छान होती.  त्या अनुभवावरून इथे आलो होतो.  ह्यावेळी तळमजल्यावरच्या रूम मिळाल्या.  ह्या तळमजल्यावरच्या रूम बहुतेक नेहमी वापरात नसाव्या.  आमच्या रूम मधे एक पालीचं पिल्लू होतं.  बाथ टब तुटलेला होता.  रूम बदलून देणार का म्हणून मी विचारले तर नाही असे सांगण्यात आले.  एकच दिवस राहायचे असल्याने आम्ही विषय सोडून दिला.

जेऊन झाल्यावर पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल बघायला निघालो.  हॉटेलच्या बाहेर येऊन बघतो तर आमचा ड्राइवर गायब झालेला.  त्याला कॉल करून बोलावून घेतले.

१९५५ पर्यंत पुनाखा भूतानची राजधानी होती.  इथली प्रेक्षणीय स्थळं दोनच.  पुनाखा झॉन्ग आणि झुलता पूल.  दोन्ही जवळ जवळ आहेत.  आधी लागतो पुनाखा झॉन्ग.  फो चू आणि मो चू नद्यांच्या संगमाजवळ बांधलेला हा भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचा जुना आणि मोठा झॉन्ग.  फो चू आणि मो चू एकत्र आल्यानंतर ह्या नदीला पुना सांग चू म्हटले जाते.  भारतात आल्यावर हि संकोश नदी म्हणून ओळखली जाते.

नदीपलीकडून दिसलेला पुनाखा झॉन्ग
आमची आजची पार्किंगची जागा म्हणजे मार्चमधल्या भूतान मॅरेथॉनचा शेवट जिथे झाला ती जागा.  त्यावेळी मॅरेथॉन हे एकच उद्दिष्ट असल्यामुळे हा झॉन्ग बघायचे राहून गेले होते.  आता नदीवरचा पूल पार करून झॉन्ग बघायला निघालो.

तिकिटं काढताना आम्हाला विचारले तुमच्याबरोबर गाईड आहे का म्हणून.  मी नाही सांगितल्यावर एक गाईड आम्हाला दिला.  गाईडचे वेगळे काही चार्जेस नव्हते.  पण झॉन्ग पाहून झाल्यावर गाईडला शंभर दोनशे वगैरे टीप द्यावी अशी अपेक्षा तिकिट काउंटर वर सांगण्यात आली.

पुनाखा झॉन्ग मधली एक वास्तू

झॉन्ग म्हणजे किल्ला.  हा झॉन्ग आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसारखा डोंगरी किल्ला नाही.  ह्याला भुईकोट किल्ला म्हणता येईल.  झॉन्ग हे प्रत्येक जिल्ह्याचे धार्मिक, प्रशासकीय, आणि सामाजिक केंद्र असते.  झॉन्ग मधला साधारणपणे अर्धा भाग प्रशासकीय उपयोगासाठी आणि अर्धा धार्मिक उपयोगांसाठी असतो.  प्रशासन आणि धर्म एकत्र ठेवल्याचे फायदे सांगावे तेवढे कमी.

पुंगतांग देवा छेनबी फोद्रांग (म्हणजे the palace of great happiness) नावाचा हा झॉन्ग १६३८ मध्ये बांधलेला.  आमच्या गाईडने आम्हाला झॉन्गमधे फिरवून झॉन्गची माहिती दिली.  झॉन्गच्या ठराविक भागातच पर्यटकांना फिरता येते.

पुनाखा झॉन्ग मधील एक इमारत


पुनाखा झॉन्ग पाहून झाल्यावर आम्ही समोरचा बौद्ध मठ पाहायला निघालो.  इथे बरोबर गाईड नसल्यामुळे ह्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती कळली नाही.  इथल्या आवारात एक मांजर झोपली होती.  मांजरीबरोबर ख़ुशीचा वेळ मजेत गेला.  नंतर "आपण एक मांजर पाळूया ना", "आपण एक बंगला बांधूया ना" अशा प्रश्नांची मला योग्य व समर्पक उत्तरं द्यावी लागली.

मांजर आणि ख़ुशी

आम्ही इथून बाहेर पडल्यावर मठाचे दार बंद करण्यात आले.  आता आमची स्वारी निघाली जवळच्या झुलत्या पुलाकडे.  इथे फिरताना माझ्या मार्चमधल्या भूतान अर्धमॅरेथॉनच्या आठवणी जाग्या झाल्या.  अर्धमॅरेथॉन चा ट्रॅक ह्या पुलावरून होता.

पुलावर पहिल्या मिनिटभरासाठी काहीतरी वेगळे वाटत होते.  नंतर सवय झाली.

पुनाखा सस्पेन्शन ब्रिज
हा भूतानमधला सर्वात मोठा झुलता पूल.  पुलाच्या पलीकडे गेल्यावर तिथे थोडा वेळ थांबलो.

पुलाच्या पलीकडची शेतं, घरं, डोंगर
पुनाखामधे कधीच बर्फ पडत नाही.  इथले हवामान थिंफूपेक्षा उबदार असते.  थिंफूमधे दरवर्षी बर्फ पडतो.  पुनाखाचा परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे.

झुलत्या पुलाकडच्या वाटेत एक कुंपण होते, आणि कुंपण ओलांडायला एक छोटीशी लाकडी शिडी.

कुंपण ओलांडण्यासाठी छोटीशी शिडी
हॉटेल मधे परत जाण्यासाठी गाडीत बसलो तेव्हा पावणे सहा झाले होते.  हळुहळु अंधार पडायला लागला होता.

दुपारचे जेवण उशिरा झाल्यामुळे रात्रीचे जेवण सर्वांनाच नको होते.  साडेआठ वाजता मी फेरफटका मारायला बाहेर पडलो.  हॉटेलच्या गेटबाहेर येताच लक्षात आले - बॅटरी घ्यायला पाहिजे.  परत रूममध्ये जाऊन बॅटरी घेऊन आलो.  बऱ्याच रस्त्यांवर अंधारच होता.  मधेच कुठेतरी स्ट्रीट-लाइट होते.

एका किराणा मालाच्या दुकानातून दोन छोट्या ज्युसच्या बाटल्या घेतल्या.  फिरता फिरता पिऊन जी काही थोडीफार भूक होती ती संपवली.  मार्चमधल्या भूतानच्या दौऱ्यात जिथे जेवलो होतो ते हॉटेल शोधून काढले.  जवळच होते.

इथे फिरताना मी लहान असताना खेडला राहायचो त्याची आठवण झाली.

एक लोखंडी पूल पार करून नदीच्या पलीकडच्या बाजूला जाऊन परत फिरलो.  उद्या सकाळी उठून गेलेफूकडे प्रयाण.

लोखंडी पूल

भूतानच्या सफरीत आपल्या रोजच्या जीवनातल्या संकल्पनांना धडाधड तडे जातात.  १९६१ पर्यंत इथे डांबरी रस्ते नव्हते.  दळणवळणाची साधने होती - चालत जाणे किंवा खेचर अथवा घोड्यावरून.  भारताच्या बॉर्डर पासून थिंफूला जायला सहा दिवस लागायचे म्हणे.  आजही रस्त्यांची स्थिती बऱ्याच ठिकाणी जेमतेमच.  पूर्ण भूतानमध्ये एकाच विमानतळ चालू स्थितीत आहे.  एक थिंफू सोडलं तर इतर कुठेही आधुनिक इमारती नाहीत.  तरीही एक गोष्ट जाणवली - जगण्याचा अर्थ ह्यांना जेवढा उमगलाय तेवढा दुसऱ्या कुठल्या देशाला उमगला असण्याची शक्यता कमीच.  उगाच नाही हे GDP च्या ऐवजी GNH च्या गोष्टी करत.  शेवटी माणसाचं जीवन म्हणजे काय, एका वाक्यात सांगायचं तर pursuit of happiness.  आणखी कशाच्या मागे आपण सगळे वर्षानुवर्ष धावतोय.  ह्या एकविसाव्या शतकात जिथे टेकनॉलॉजि ओसंडून वाहतिये पण शहाणपणाचा पत्ता नाही, अशा जगात स्वतःचे वेगळेपण जपलेला हा छोटासा समृद्ध देश खरोखरच The last shangri la आहे.

आजचा कार्यक्रम पुनाखाहुन गेलेफू ह्या बॉर्डरच्या गावी पोहोचणे.  गूगल मॅप प्रमाणे दोनशे किलोमीटर आणि सहा तास.

आज मी ब्रेकफास्ट नाही केला.  भूक लागली तर नंतर बघू म्हटलं.

आम्ही हॉटेलच्या आवारात आणि आजूबाजूला फेरफटका मारला.  हॉटेलच्या बाजूलाच नदी आहे.  काल उशीर झाल्यामुळे तिकडे गेलो नव्हतो.  आज नदीजवळ फोटोग्राफी केली.  ख़ुशीने नदीच्या पात्रातला एक दगड बॅगेत घेतला.  वर्षभर वाहत्या पाण्याच्या प्रवाहात राहून इथले दगड गोलाकार, चपटे असे बनलेत.  वेगवेगळ्या आकाराचे.

प्रवासाला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आम्ही पुनाखा जिल्हा सोडून वांगड्यु जिल्ह्यात प्रवेश केला.  पहिले दोन तास नदीच्या सोबतीचा रस्ता.  नदीचं पाणी सुसाट धावत सुटलेलं.  आमचा ड्रायव्हर कित्येकदा तीसच्या वेगाने गाडी चालवत होता.  असं वाटत होतं नदीचं पाणी आमच्या पुढे निघतंय आणि आम्ही मागे.  मला असलेली माहिती म्हणजे ह्या जिल्ह्यात फोबजिखा हा भाग आहे जिथे दुर्मिळ काळ्या मानेचे करकोचे येतात हिवाळ्यात.  आम्हाला मात्र कुठल्याही करकोच्यांच्या मागे ना जाता आज गेलेफू गाठायचं होतं.  आजच्या प्रवासात बरीच सुंदर फुलपाखरं दिसली काळ्या आणि निळ्या पंखांची.

सकाळी एक महाअजस्त्र hydroelectric प्रोजेक्ट दिसला नदीच्या पलीकडे.  ह्याचं नाव कळलं नाही.  आमचा हा ड्रायव्हर काही हुशार नव्हता.  त्यामुळे त्याला माहिती असण्याचा प्रश्नच नाही.  भूतानच्या निर्यातीमध्ये बेचाळीस टक्के हिस्सा आहे अशा प्रोजेक्ट्स पासून मिळालेल्या विजेचा.  भूतान मधून वीज भारताला निर्यात होते.

भूतान मध्ये कुठेही रेल्वे नाही.  हिमालयाच्या पर्वतरांगात रेल्वे उभारणे सोपं नाही.  आणि फक्त सात लाख लोकसंख्या असलेल्या देशाला रेल्वेची गरजच काय.

आजच्या प्रवासात बरेच पूल लागले.  सगळे लोखंडी.  जपानच्या मदतीने बांधलेले.

नदीवरचा लोखंडी पूल
वांगड्यु जिल्ह्यानंतर आम्ही सिरांग जिल्ह्यात पोहोचलो.  दहानंतर एकाठिकाणी टॉयलेट ब्रेक साठी थांबलो.  ह्या रस्त्याला मोठे रेस्टोरंट कुठेच नसणार हे आत्तापर्यंतच्या प्रवासात लक्षात आले होते.  त्यामुळे बरोबर घेतलेला दिवाळी फराळ वगैरेवरच जेवणापर्यंत राहायचे होते.  मिंडु हाम रेस्टोरंट मधे आम्ही पॉपकॉर्न घेतले.

मिंडु हाम रेस्टोरंट
गाव रेलँग थांग
जिल्हा सिरांग
रस्त्याकडेला गावं वस्त्या जिकडे असतील तिकडे रस्त्याच्या कडेला छोटी दुकानं थाटलेली.  भाज्या, फळं वगैरे विकायला.  एका बाईंच्या दुकानात बांबूचं लोणचं आणि पेरू घेतले.  बाईंनी एक केळ्याचा मोठा घड आम्हाला भेट दिला.  जगभरात कुठेही गेलं तरी गावातली माणसं शहरातल्या माणसांपेक्षा साधीसुधी, जास्त माणुसकी असलेली भेटतात.  खरंच, माणसाने मनाने श्रीमंत असावं, पैशाने नव्हे.

रस्त्याकडेच्या दुकानात दीप्ती आणि दुकानाच्या मालक
बाराच्या दरम्यान मला झोप अनावर झाली आणि मि पंधरा मिनिटांची एक डुलकी घेतली.  बाकी पूर्ण ट्रिप मधे मि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर जागा होतो.  नेमक्या ह्या पंधरा मिनिटात रस्त्याकडेचे काही सुंदर स्पॉट सुटले.  रस्त्याबाजूला एकदम खोलवर दरी आणि समोर खळाळत वाहणारी नदी.  नंतर आम्ही जसजसे उतरत गेलो तसतशी दरीची उंची कमी होत गेली.

रस्त्याला तुरळक कुठेतरी गाड्या भेटल्या.  बाकी असे वाटत होते पुनाखाहुन गेलेफूला जाणारे आज आम्हीच.  रस्त्याकडेला दोन छोटेसेच पण सुंदर धबधबे लागले.  गाडीतून उतरून मी फोटो काढले.  आमच्या महाराष्ट्रात धबधबा म्हणजे काय अप्रूप.  इथे भूतानमधे जावं तिथे धबधबे.

रस्त्याच्या कडेला लागलेला एक छोटा धबधबा
ह्या धबधब्याच्या तळाला बऱ्यापैकी पाणी साठलेले.  पाण्याखाली शिरायचा मोह कसाबसा टाळून मि गाडीत जाऊन बसलो.  गेलेफू जवळ आले तसे जाणवायला लागले आपण हिमालय उतरून आलोय आता.  झाडांचे आकार आणि प्रकार बदलले.  आम्ही सरपांग जिल्ह्यात प्रवेशलो होतो.  आत्तापर्यंत आम्ही सर्व पेरू खाऊन संपवले.  मि एकट्यानेच चार पाच खाल्ले.

गेलेफूपासून तासाभराच्या अंतरावर

दुपारी तीनच्या आताच गेलेफूमधे पोहोचलो.  आमच्या ड्रायव्हरला हॉटेलचा पत्ता माहिती नव्हता.  मी हॉटेलमधे कॉल करून आम्ही येत असल्याची वर्दी दिली.  ड्रायव्हरने पत्ता जाणून घेतला.  आम्ही जिथे होतो तिथून हॉटेल दोन मिनिटाच्या अंतरावर होते.

आमची गाडी थांबली होती तिथे रस्त्याच्या कडेला आठ दहा आसामी कामगारांचं टोळकं आपापल्या बॅगा सांभाळून उभं होतं.  आमचा ड्रायव्हर त्यांच्याशी बोलून आला.  आम्हाला गेलेफूमधे सोडल्यानंतर परत जाताना त्याला हि गिऱ्हाइके हवी होती.  इथून अशा कामगारांच्या टोळ्या कामासाठी भूतानला नेहमी जात असणार.  भूतानमधे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर भारतीय असतात.  इथे बांधकामाची कामं, रस्ते बांधायची कामं असली सगळी कामं युपी, बिहारी, आसामी लोकं करतात.

गेलेफूमधे बघण्यासारखे काहीच नाही.  थिंफू, पुनाखा हि ठिकाणं बघून झाल्यावर गेलेफू गावरान वाटते.  त्यामुळे जर तुम्ही थिंफू किंवा पुनाखाहुन गेलेफूला जात असाल तर पोहोचण्याची घाई करू नका.  वाटेतले धबधबे, निसर्गरम्य ठिकाणं बघत बघत संध्याकाळी गेलेफूला पोहोचा.  एखादा ड्राय-फिट एक्सट्रा ड्रेस बरोबर घेतलात तर एखाद्या धबधब्यात डुंबाडुंबी करू शकाल.  पण तुमच्या ड्रायव्हरच्या संमतीनेच कुठल्याही धबधब्यात जा.  कारण इथे झऱ्याचे किंवा धबधब्याचे पाणी पिण्याला वापरतात.  नदीचे पाणी भूतानमधे पीत नाहीत.  थिंफू आणि पुनाखाला जाताना रस्ताच्या कडेला जे धबधबे होते तिथे सगळीकडे फलक लावलेले होते - ह्या ठिकाणी गाड्या धुवायला मनाई आहे.

गेलेफूचे हॉटेल बुकिंग करून ठेवलेले बरे.  तशी इथे गल्लोगल्ली हॉटेलं आहेत.  पण रात्री उशीर झाला आणि कोणी घेत नसेल तर बोंब उडेल.

हॉटेलमधे पोहोचल्यावर जेवण मिळेल का ते विचारले.  हॉटेल मालकाने हो म्हणताच जेवणाची ऑर्डर दिली.  आम्ही रूममधे बॅगा ठेऊन आवरून जेवायला आलो.  तरी काही बनलेले नव्हतेच.  भूतानमधे ऑर्डर दिल्यावर लगेच काहीच मिळत नाही.  भारतात रेस्टोरंटच्या किचनमधे जशी सगळी तयारी आधीच करून ठेवतात तशी इथे करत नाहीत.  आपण ऑर्डर दिल्यावर सगळी फ्रेश सुरुवात.  इथे भारतीय स्टाफ असल्याने जेवणाला भूतानी टच नव्हता.

जेवल्यानंतर उद्याच्या गुवाहाटी प्रवासासाठी गाडी ठरवण्याकडे वळलो.  उद्या काली पूजा असल्यामुळे फारसे कोणी ड्रायव्हर उपलब्ध नव्हते.  हॉटेलचा मालक फारच हेल्पफुल होता.  त्याने खटपट करून एक गाडी बघून दिली.  एक जुनी मारुती ओम्नी.  ड्रायव्हर राजू ख्रिस्ती असल्यामुळे त्याला उद्याच्या काली पूजेचं काही नव्हतं.  गुवाहाटी एअरपोर्ट पर्यंत सोडण्याचे साडेपाच हजार.  दुसरी कोणती गाडी मिळत नसल्याने हेच फायनल केलं.

गेलेफू ते गुवाहाटी प्रवासासाठी ठरवलेली मारुती ओम्नी
मी राजूचा मोबाईल नंबर घेतला.  गाडीचा एक फोटो काढला.  उद्या सकाळी सात वाजता राजू बॉर्डर पलीकडे थांबणार होता.  सकाळी आम्हाला बॉर्डरपर्यंत सोडायचं हॉटेलच्या मालकाने कबूल केलं.

ह्या गाडीला कॅरियर नव्हतं.  आसाममधे कुठल्याच गाड्यांना कॅरियर नसते, असे आम्हाला सांगण्यात आले.  इथे गाड्यांना कॅरियर लावू देत नाहीत.

गेलेफूच्या हॉटेल खामसंग मधला नोटीस बोर्ड
आठ वाजता जेवणाची ऑर्डर देऊन मी फेरफटका मारायला बाहेर पडलो.  आता हॉटेलमधे काही पर्यटक आलेले दिसले.  त्यांचं बुफे डिनर चालू होतं.

गेलेफूमधे सगळीकडे अर्धा भूतानी आणि अर्धा भारतीय टच जाणवला.


सकाळी आवरून ब्रेकफास्ट न करताच तयार झालो.  भल्या पहाटेच बॉर्डर ओलांडून जायचा बेत होता.  हॉटेलच्या मालकाने कबूल केल्याप्रमाणे आम्हाला डस्टर गाडीतून बॉर्डर पर्यंत सोडले.  हॉटेल पासून बॉर्डर जेमतेम पाच मिनिटाच्या अंतरावर.  इतक्या सकाळी इमिग्रेशन ऑफिसच्या खिडकीत कोणीच नव्हते.  हॉटेलचा मालक हुशार आणि हेल्पफुल होता.  त्यानेच इमिग्रेशन ऑफिसमधे आणि बॉर्डरवरच्या भूतानी रखवालदारांशी बोलून आम्हाला पलीकडे जायला मदत केली.  इमिग्रेशन ऑफिसमधे आमचे परमिट परत द्यावे लागणार होते.  कालच मि फोटो काढून ठेवले होते.

फुनशिलींग मधे बनवलेलं परमिट


बॉर्डर पलीकडे ठरल्याप्रमाणे राजू ओम्नी गाडी घेऊन तयार होता.  गाडीत आमचे सगळे सामान घुसवले.  मग आम्ही घुसलो. गाडीच्या मागून मि पटकन एक फोटो काढला बॉर्डर गेटचा.

गाडीमागून मी पटकन एक फोटो काढला बॉर्डर गेट चा
रस्त्याची अवस्था फारच दयनीय होती.  छोट्या मोठ्या खड्ड्यांनी भरलेल्या धूळयुक्त रस्त्यावरून गाडी धावायला लागली.  पलीकडचे भूतान आणि इकडचे आसाम ह्यामधला फरक शेंबड्या पोरालाही सांगता येईल.  दोनच मिनिटात एक चेकपोस्ट लागली.  राजू गाडीतून उतरून चेकपोस्ट वर एन्ट्री करायला गेला.  गाडी चालू ठेऊनच.  लगेच परतला आणि पुढचा प्रवास सुरु.

बॉर्डर क्रॉस केल्यावरची भारतीय चेकपोस्ट

पुनाखाहुन आल्यावर काल आम्हाला गेलेफू गरीब गाव वाटत होतं.  आता बॉर्डर क्रॉस केल्यावर गेलेफू श्रीमंत आणि आसामचा हा भाग गरीब आहे हे स्पष्ट दिसत होतं.  इथल्या एकंदर परिस्थितीवरून कोणीही टुरिस्ट भारतातून भूतानला जाण्यासाठी इथे येत नाहीत हे लक्षात आले.  बहुदा भूतानहुन बॉर्डर क्रॉस करून भारतात जाणारे आमच्यासारखे टुरिस्टहि दुर्मिळच.  लेबर म्हणून जाणारे भारतातले कामगार हेच मुख्यतः इथले बॉर्डर क्रॉस करणारे.

जवळजवळ अर्धा तास रस्ता म्हणजे चाळण्यातली चाळणीतली चाळण.  नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत गेली.  मधेच काही फुल्ली लोडेड टाटा ट्रक भूतानच्या दिशेला गेले.

रस्ता मोकळा असल्याने आम्ही भराभर अंतर कापत गेलो.  बोन्गाइगाव आणि न्यू बोन्गाइगाव आल्यावर फोटो काढून अमितला पाठवले.  त्याच्या गावचे फोटो.  बोन्गाइगाव आणि न्यू बोन्गाइगाव सोडून पुढे गेल्यावर रस्त्यावरचं ट्रॅफिक परत ओसरलं.

गुगल मॅप प्रमाणे गेलेफू ते गुवाहाटी एअरपोर्ट ह्या दोनशे पंचविस किलोमीटर अंतराला पाच तास लागणार होते.

गुगल मॅप मधे गेलेफू ते गुवाहाटी एअरपोर्ट
मोबाईल मधलं भूतानचं सिमकार्ड काढून मी त्याजागी माझं व्होडाफोनचं सिम टाकलं.  लांबच लांब नरनारायण सेतू वरून आम्ही ब्रह्मपुत्रा नदी पार केली.  सव्वादोन किलोमीटरच्या ह्या पुलावरून आमची गाडी बराच वेळ जात होती.

ब्रह्मपुत्रा नदीवरचा नरनारायण सेतू
इथून गुवाहाटी एअरपोर्ट पर्यंतचा रस्ता आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता.  बॉर्डर जवळच्या रस्त्यापुढे आता सगळेच रस्ते सपाट गुळगुळीत वाटत होते.

गुवाहाटी एअरपोर्ट कडे जाताना...

रस्त्यात कुठलेही विघ्न न येता आम्ही गुवाहाटी एअरपोर्टला बाराच्या सुमारास पोहोचलो.  गेलेफू पासूनचा पूर्ण प्रवास काही न खाता पिता झाला.  रस्त्यात ब्रेकफास्ट साठी जागा पूर्णवेळ शोधत होतो, पण एकही चांगली जागा दिसली नाही.  राजुलाही हे माहिती असावे.  त्याने कुठेही न थांबवता गाडी सुसाट पळवत आणली.  गुवाहाटी एअरपोर्ट जवळ आल्यावर तो एकदा रस्ता चुकला तेवढाच एक छोटा ब्रेक.

आम्ही साडेतीन तास लवकर पोहोचलो होतो.  एअरपोर्ट मधे शिरण्याआधी समोर खादंतीकडे मोर्चा वळवला.  गुवाहाटी एअरपोर्ट वर यथेच्छ टाइम पास करून झाला.  आमचे गुवाहाटी ते कोलकता विमान वेळेत होते.

विमानाच्या खिडकीतून ख़ुशीची फोटोग्राफी
पुढचे कोलकता ते पुणे विमानही वेळेत होते.  गेलेफू ते गुवाहाटी एअरपोर्ट पर्यंतच्या प्रवासात ख़ुशीने चांगल्या झोपा काढल्या होत्या.  त्यामुळे तिने दोन्ही एअरपोर्ट वर आणि दोन्ही विमान प्रवासात मस्त एन्जॉय केले.

आपल्या विमानाची तयारी होतेय
पुण्यात विमानाच्या बाहेर पडल्यावरच हवेतला फरक जाणवला.  दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेत नको तेवढा धूर.  भूतानच्या स्वच्छ हवेतून आल्यावर इथे गुदमरायला होत होते.  रस्त्यांवर कचराच कचरा.  जाऊदे.  एक दोन दिवसात सवय होईल.
















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...