
पूर्वरंग
वित्तीय वर्ष संपत असताना बडोदा ट्रिप संपन्न झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटी वर कंजूस भाऊंनी खरडलेल्या धाग्याचा भरपूर फायदा झाला. त्यामुळे त्याच जागेवर पुन्हा खरडणे पुनरावृत्ती होईल म्हणून थोडे धावते वर्णन लिहीणार आहे. मुख्य उद्देश चावडा घराण्यातील राजाने दहाव्या शतकात बांधलेल्या लकुलिश मंदिर व महमंद शहा बेगडा याने चौदाव्या शतकात वसवलेल्या गुजरातच्या राजधानीला भेट देणे. तेथील अप्रतिम इमारती व मशीदी,लकुलिश मंदीर, शक्तीपिठ मंदीर,जैन मंदिरे,जागतीक ऐतिहासिक धरोहर दर्जा मिळालेल्या पुरातत्व विभागाच्या उत्खनन परिसराला भेट देणे हा होता.
ही सहल करताना ,विषेशत: चंपानेर, पावागढ पहाताना प्रकर्षाने असे जाणवले
की पुरातन पर्यटनस्थळे बघताना काही दिवसांचा,तासाचा वेळ पुरेसा
नसतो.पावागढ,चंपानेर बघावयास कमीत कमी तीन ते पाच दिवस हवेत ते सुद्धा
पुर्वाभ्यास केल्या नंतर.बाकी भोज्याला शिवून आल्यासारखे.....
-------------------------------------------
पुणे ते बडोदा
तेच किल्ले, तेच किनारे
एकसमान ती उदास शहरे
त्याच कहाण्या, त्याच विराण्या
तशीच शिल्पे, तशाच लेण्या..
भग्न स्मृती अन् इतिहास ठेवा...
असे जरी असले तरी हा पर्यटन स्थळांचा मेवा पुन्हा पुन्हा खावासा वाटतो.कधी
मिपाभटक्यां द्वारे मिळतो तर कधी स्वता:भटकल्यावर मिळतो.काही काळ जरी
नैराश्य आले तरी अज्ञाताची ओढ पुन्हा उसळी मारते आणी आतला सिंदबाद पुन्हा
ताज्या दमाने नव्या सफरी करता उतावळा होतो.इतिहासाच्या भग्न खुणा खुणवायला
लागतात आणी मग...
तद्वत,घरात खलबतं सुरू झाली. बहुचर्चित वडोदरा (बडोदा) व आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचे निश्चित झाले.मसलत फत्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वांछित, अवाछिंत सल्ले,गुगल वरच्या फेऱ्या वाढल्या. योजना तय्यार झाली. बकेट लिस्ट तयार झाली.एकता नगर,गरूडेश्वर,स्वामीनारायण मंदिर, पोऐचा आणी स्थानिक प्रेक्षणीय स्थळे, बडोदा बघायचीअसे एकमताने ठरले.पावागढ हे बावन्न शक्तीपिठां पैकी एक असे कुरुक्षेत्र येथील भेटीत कळाले होते व चंपानेर ,वधवाना लेक,डभोई सुद्धा जवळच आहे ते सुद्धा बघून घेऊ असा प्रस्ताव मांडला.तीकडे गेल्यावर बघू म्हणत घरच्यांनी प्रस्ताव तात्पुरता लांबणीवर टाकला.(मी मात्र माझ्य प्रस्तावा वर ठाम होतो, कदाचित तेच माझ्यासाठी मुख्य आकर्षण होते).
बडोदा मुक्कामी राहून आसपास फिरायचे ठरले. सर्व तिकिटे झाली,रहाण्याचे ठिकाण ठरले.ओळखीने स्विफ्ट डिझायर चालकासह मिळाली.यावर्षी कुठेच गेलो नसल्या मुळे अर्थ संकल्पातील तरतूद शिल्लक होती"बजेट तरतुदी नुसार सढळ हाताने खर्च करण्यास काहीच हरकत नाही", अशी हल्की पुटपुट कानावर आली.
दुपारी एक वाजता विमानाने प्रस्थान होते. सकाळी आकरा वाजता ब्रंच करून घरातून बाहेर पडलो.शुक्रवार असूनही रस्त्यावर गर्दी कमी होती.विमानतळावर सुद्धा पटकन काम झाले.काही अपरिहार्य कारणामुळे प्रस्थान वेळ अर्धा तास पुढे ढकलण्यात आली.अजून दोन तास तरी होते. पु. ल.च्या शंकर्या सारखे, मला सुद्धा कुठेही बाहेर गेलो की प्रचंड भुक लागते (ब्रंच करून जेमतेम तासभर झाला होता).बसुन काय करायचंय म्हणून विंडो शाॅपिंग करू या विचाराने इकडे तीकडे फिरू लागलो. विमानतळावर फिरताना वामन आवताराची आठवण झाली. पुणे विमानतळ इन मीन तीन पावलांचा....
यथावकाश,उद्घोषणा झाली. हवाई सुंदरींचे स्मितहास्य सुहास्य वदने स्वीकारताना उगाचच बुवाचें(जितेंद्र अभिषेकींचे) गाणे आठवले ,
सुहास्य तुझे मनास मोही
जशी न मोही सुरा सुरही
तुझ्या लोचनी या प्रकाश विलसे
ज्याची लोभस बघ चंद्रिका ही
तव यौवनाचा वसंत बहरे
ज्याची लोभस बघ कोकीळ हा...
ते लोभस रुपडं बघून काही क्षण थबकलो. दुसरे गाणे आठवले,"नयन तुझे जादूगार", मनातल्यामनात चित्रहार सुरू होण्यापूर्वीच आमच्या कोकिळेने मागुन कोपरखळी मारली, म्हणाली,"चला की लवकर,लवकर". " नाही मी बोलत नाथा..." हे पद सुरू होईल या भीतीने मी पटकन पुढे सरकलो.कार्यकारण भाव कळाला, की भारतीय पत्नी पतीच्या मागे का असते?
निर्धारित सीटवर स्थानापन्न झालो. गुज्जू भाई भरपूर दिसत होते, केम छो? मजामा वगैरे वगैरे शब्द कानावर पडत होते.प्रवास छोटासा, एक तास दहा मिनिटाचा,उत्तम झाला.वडोदरा विमानतळ सुद्धा छोटाच वाटला पण मोकळा, मोकळा.गर्दी अजीबात नव्हती.स्वच्छता, टापटीप, सजावट बघण्यासारखी होती.
दुपारचे तीन वाजले होते. बाहेर आलो.थोडी थंडी,थोडी गर्मी,मस्त प्रसन्न वातावरण होते. उंच,उंच पाम वृक्ष एका ओळीत उभे होते जणू सैनिकांची तुकडी. दुर पाठीमागे मोठा वटवृक्ष आणी त्यावर चाललेला पक्षांचा किलबिलाट जणू मिलीटरी बॅण्ड. तांबट पक्षी " ठक,ठक" असा ठेका धरून आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत होता.जवळच प्रीपेड टॅक्सी बुथ होता.टॅक्सी पकडली,हाॅटेलकडे निघालो. पाच एक कि.मी.अंतरावर, हाॅटेलकडे जाताना शहराबद्दल प्रथमदर्शनी मत बनायला सुरूवात झाली.विमानतळा जवळच मिलीटरी एरीया, स्वच्छ सगळं कसे चकाचक. सैनिक हाॅस्पिटल ची पाटी दिसल्यावर जरा भावूक झालो.खड्डे विरहित रस्ते,वहातूक सुरळीत शिस्तबद्ध, दुचाकीस्वार,चारचाकी चालक लाल,हिरव्या, पिवळ्या रंगाच्या दिव्यांचा योग्य तो मान राखताना दिसले. शहर संपन्न आणी सुखवस्तू असावे याचा अंदाज येत होता.
++++
हाॅटेल सहा मजली,नदीच्या काठावर वसलेले. समोरच सायाजी उद्यान आणी त्याला लागूनच लक्ष्मी विलास पॅलेस. पहिल्याच मजल्यावर रुम होती पण नदीकाठ असल्याने डासाचा त्रास नक्कीच असणार या भीतीने रूम बदली करून घ्या असा आदेश आला. काऊंटर वर थोडी हुज्जत घालावी लागली पण पाचव्या मजल्यावर रुम मिळाली.सहाव्या मजल्यावर टेरेस रेस्टॉरंट आहे त्याचा त्रास होऊ शकतो असे धमकीवजा सांगण्यात आले.भुक लागली असल्याने धमकी कडे दुर्लक्ष करत विचारले जेवण मिळेल काय? ,"होय पण रूम सर्व्हीस, रेस्टॉरंट बंद झाले आहे". सोन्याहून पिवळे...
मस्त खाऊन दोन तास सर्वांनी ताणून दिली. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती, चहा मागवला व तयार होऊन समोरच्याच सायाजी बागेत फिरायला गेलो. बागेत गर्दी होती संपुर्ण भरलेली होती.बागेला लागूनच प्राणीसंग्रहालय, लक्ष्मी विलास राजवाडा आणी म्युझियम असल्याचे कळाले. प्राणिसंग्रहालय पाच वाजता बंद होते,टाॅय ट्रेन (फुलराणी) सध्या बंद आहे,संग्रहालय उद्या अकरा वाजता उघडेल इत्यादी नकारघंटा ऐकू आल्या. थोडेफार फिरून सरळ रेस्टॉरंट वर हल्ला केला.गुजराथी सोडून बाकी सर्व प्रकारचे जेवण उपलब्ध होते. पोटपूजा केली व एकमेकांना शुभरात्री म्हणत निद्राधीन झालो.
4 pm

काळ्या डोक्याची शराटी
वडोदरा,पावगढ आणी चंपानेर--१ https://www.misalpav.com/node/52359
झोपेचं खोबरे होणे हा वाक्प्रचार लहानपणा पासून ऐकतोय पण ते होते कसे हे काहीअजून समजले नाही. जर समजा खोबरे झालेच तर ते चटणी,मोदक इत्यादी पदार्थात वापरता येते का? ...वाचकांना हा एक फालतु जोक वाटेल, मलाही तसेच वाटते. मागे मराठी म्हणी आणी वाक्प्रचार विषयावर लिहीताना असे आढळून आले की यांच्या मागे काहीतरी तर्क,इतीहास, कार्यकारणभाव,असतो.तसाच या वाक्प्रचारा मागे आहे का? कुणाला माहीत असल्यास प्रतिसादणे.
विषय असा आहे की कालचा दिवस प्रवासात एकदम गडबडीत गेल्यामुळे रात्री मस्त झोप लागली.तसेही निद्रादेवी माझ्यावर नेहमी प्रसन्न असते.नेहमीप्रमाणेच पहाटे पाच वाजता जाग आली. सहप्रवासी गाढ साखरझोपेत होते. सकाळी सकाळी उठल्यानंतर एक लिटर पाणी व कडक चहा लागतो.रात्री झोपण्या आगोदर याची तरतूद आहे याची खात्री करून मगच झोपलो होतो.पुडीतला ताजमहाल चहा, पुडीतली साखर,इलेक्ट्रिक किटली बघून जग किती आत्मनिर्भर झालायं व सत्तर वर्षात देशाची किती प्रगती झाली याची साधारण कल्पना आली.माझ्या लहानपणी आई सर्वात आगोदर उठायची, चुल पेटवायची,चहाचे आधण ठेवून मुलांना आवाज द्यायची. असो, चहा बनवून घेतला,नित्यक्रम उरकून ताजा तावाना होऊन बाहेर आलो.(Please don't read between the lines).
बाहेर व्हरांड्यात निरव शांतता होती. हाॅटेलची संरचना गोलाकार होती एक चक्कर मारून जिन्याने खाली फिरायला जावे असा विचार केला.सर्व खोल्या बंद होत्या.कडी कुलूपाविना असलेल्या एका दरवाज्यावर लाल रंगात "फायर एक्झिट" असे लिहीले होते व निळ्या रंगात पळणार्या माणसाचे चित्र चिटकवले होते. कुतूहलापोटी दरवाजा उघडून बघीतला.सहा बाय सहा फुट बाल्कनीवजा लोखंडी छज्जा होता.त्यालाच जोडून खालीवर,जाण्या येण्या साठी मजबूत लोखंडी प्रशस्त जिना होता.छज्जा भरपुर मोठा,पाचव्या मजल्यावर असल्याने सीमेवरील ऑब्झरवेशन पोस्ट मधे बसल्या सारखे वाटत होते.हाच मार्ग छोटे मोठे सामान ने आण करण्या साठी वापरात होता. प्रशस्त छज्जा मधे दोन आराम खुर्च्या,बाजुला काही ग्लास,खाली बाटल्यां कुणीतरी रात्री जगराता केल्याची ग्वाही देत होत्या.
आता पौफटणे,झुंजूमुंजू या शब्दांची अनुभूती येत होती.रजनी आणी उषाताई यांचे हॅण्डिंग टेकिंग ओव्हर चालू होते. हाॅटेल नदीकाठावर असल्याने मस्त थंडगार वारे,उगवत्या सूर्याची कोवळी किरणे तन मन सुखावत होती.शहरात दिवे मंद,विझत चालले होते आणी पक्षांचा किलबिलाट कानी येत होता.अशा वेळेस छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर यांचे ते सुंदर,प्रसिद्ध नाट्यगीत न आठवले तर नवलच म्हणावे लागेल.
प्रिये पहा रात्रीचा समय सरूनि येत उषःकाल हा ॥धृ०॥
थंडगार वारा सुटत । दीपतेज मंद होत ।
द्विग्वदने स्वच्छ करित । अरुण पसरि निज महा ॥प्रिये०॥१॥
पक्षि मधुर शब्द करित । गुंजारव मधुप वरिति ।
विरलपर्ण शाखि होति । विकसन ये जलरुहा ॥प्रिये०॥२॥
अगदी असेच वातावरण होते. खाली वाकून पाहिले असता डोळे फिरत
होते.विश्वामित्री नदी नागमोडी वळणे घेत दुरवर जाताना दिसत होती.बऱ्यापैकी
पाणी होते. तिच्या दोन्ही काठावर घनदाट मोठमोठे वृक्ष,काळ्या दगडी
कातळाच्या नैसर्गिक भिंती, पुर्वेकडे नदीच्या दोन्ही काठांना आणी पर्यायाने
शहराच्या दोन भागानां जोडणारा पुल,जोडून काळा घोडा चौक आणी लागून सायाजी
उद्यानाचा मुख्य दरवाजा.घनदाट वृक्षराजी मुळे जंगल असल्या सारखे वाटत होते
तर दुरवर बहुमंजीला इमारती दिसत होत्या.तरी पुण्या मुंबई पेक्षा कमीच.
पूर्वेकडील अशाच एका इमारतीच्या मागून रश्मीरथ वर येत होता. सूर्योदयाचा तो
नजारा एकदम मस्त होता. सभोवारचा निसर्ग बघून, पाचव्या मजल्यावर खोली
घेतल्याचे पुर्ण समाधान झाले. पुढचे पाच दिवस तरी सकाळ इथेच घालवायची असे
मनोमन ठरवले.
इकडे तिकडे बघत असताना,काळ्या मानेची शराटी (Black Headed Ibis) या पक्षांचा एक थवा हल्के हल्के उडत पुर्वेकडून पश्चिमेस चालला होता.इतके विहंगम दृश्य होते.पटकन रूम कडे पळालो.हळूच दार उघडून कॅमेरा, स्पेअर बॅटरी व बायन्याक्युलर उचलला.परत आलो तर पक्षांचा थवा दुर उडून गेला होता. निराशेने मन झाकोळत असतानाच पहिल्या ग्रुप पेक्षा आणखीन मोठा ग्रुप समोर उडताना दिसला आणी मग एका मागोमाग एक असे बरेच समुह एका विशिष्ट झाडाच्या दिशेने जाताना दिसले जिकडे दुर एका झाडावर काही काळ्या मानेचे शराटी दाटीवाटीने बसले होते.अगदी शाळा किवां सभा भरवल्यासारखे. हिरव्यागार जंगलात त्या झाडाचा शेंडा शुभ्र पाढंरा दिसत होता. पुलाखाली एक छोटेसेच पण नजरेत भरणारे देऊळ होते. पुढे मोठा चबुतरा आणी जुने वडाचे झाड.झाडावर कावळे,मैना,कबुतरे बसलेली होती.तीथे बहुदा अंतीम संस्कार होत असावेत.
https://i.imgur.com/qIF3iMb.mp4
चलचित्र फीत बघण्यासाठी लिन्क्वर टिचकी मारा
आता हाॅटेल व आसपासच्या भागाला जाग आली होती.वेटर्स खालीवर करत होते. कॅमेरा, दुर्बीण बघून प्रत्येकजण थांबून पुढे जात होता. चहा घेऊन चाललेल्या एका धिट्ट वेटरने विचारले, "साब,चाय?",बरोबरच साब, थोडा दुर्बीणसे देखूं क्या?" मी हसून मान डोलावली. सकाळच्या डिप डिप वाल्या चहापेक्षा हा उजवा होता.तरतरी आली.पुढे त्याच वेटरने नदीचे नाव व इतर स्थानिक माहीती पुरवली.
नदीच्या पात्रात/पात्रावर घारी,बगळे, कावळे, शराटी,पाणकावळे,खंड्या सारखे पक्षी आपले भक्ष शोधण्यात मग्न होते. हाॅटेलच्या आवारात पिंपळ,आकाश शेवगा व उंबर तीन मोठी झाडे होती. त्याच्यावर तांबट,सुर्यपक्षी,कोकीळ, गुलाबी मैना,साधी मैना,दयाळ, चष्मेवाला आणी हळद्या एव्हढे पक्षी एकाच वेळी बागडत होते. तांबट दांपत्ये व त्यांची नवजात पिल्ले एकाच ठीकाणी जणू तांबट आळीच.....
=
= गुलाबी मैना
=
=सुभग
=
=ताम्बट दाम्पत्य
=
=कोतवाल
रहदारी सुरू झाली होती. ध्यानी मनी नसताना अनपेक्षितपणे निसर्गाचे एव्हढे सुंदर रूप बघून मन सौमित्र ची एक मला आवडणारी रचना गाऊ लागले. अर्थात याचा संदर्भ फक्त मन मुदित होण्यापुरतीच.
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
पानपान आर्त आणि
पानपान आर्त आणि झाडं बावरून
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
हे सर्व बघता बघता दोन तास वेळ कसा गेला कळालेच नाही. आठ वाजले होते,मोबाईलची घंटी वाजली, चलो बुलावा आया है....
बाकी सहप्रवासी तयार झाले होते. तुम्हीं पुढे व्हा मी कपडे बदलून आलोच म्हणून त्यांना नाष्ट्यासाठी पाठवले.खटाखट आवरले, टकाटक तयार झालो व नाष्ट्या करता प्रस्थान केले. टेरेस रेस्टॉरंट, अतीशय नीटनेटके व प्रशस्त,हसतमुख कर्मचारी आणी ग्राहकांची लगबग. पांढरे ॲप्रन, टोपी घालून खानसामे सज्ज होते.एकदा फेरी मारून सर्व नजरे खालून घातले आणी इथेच चुक झाली. साऊथ इंडियन ते नाॅर्थ इंडियन,ड्रायफ्रूट्स ते फ्रेशफ्रुटस्,चहा काॅफी ते कोकाकोला, अगदी ताजा उसाचा रस सुद्धा, केक,पेस्ट्रीज,मोड असलेली धान्ये,दुधी भोपळा आणी कार्ल्याचा रस सुद्धा ऑन डिमांड होता.( हे काही जास्तच झालयं ना,पण ....) दिक्षित ते दिवेकर आणी आमच्या सारखे फ्रिलान्स फुडीं करता हजर होते. (सबका साथ सबका विकास) मला तर अन्नकोट आहे असेच वाटले. काय खावे आणी काय नाही?,संभवत: माझ्यासारखीच इतरांची अवस्था होती."अजी म्या ब्रह्म पाहीले".पुढील पाच दिवस नाष्टयाचे हेच विश्वरूप दर्शन होणार असल्याने,पंजाबी,साऊथ इंडियन, चायनीज, गुजराथी अशी थीम बनवून एक दिवस एक प्रकारचा नाष्टा ट्राय करायचे ठरवले.मुख्य म्हणजे नाष्टा काॅम्प्लिमेंटरी होता त्यामुळे आणखीनच चविष्ट लागत होता. एव्हढ्यात गाडीवाल्याने आल्याची वर्दी दिली. सर्वांना सांगीतलं आणी पटकन आवरा म्हणून सूचनाही केली.आज गरूडेश्वर,एकता नगर, जंगल सफारी इत्यादी बघण्याचे ठरले होते.
आवांतर,
विश्वामित्री नदी एक पावसाळी नदी आहे, काही महीने कोरडी असते. पंचमहाला जिल्ह्य़ातील पावगढ डोंगरातून उगमपावते व खंबातच्या खाडी मधे अरबी समुद्राला मिळते. बडोदा शहर याच नदीकाठावर वसलेले आहे. ही एक अत्यंत असुरक्षित नदी मानली जाते.या नदीत ३०० च्या वर मगरी रहातात असा अनुमान आहे. पावसाळ्यात जेव्हां नदी दुथडी भरून वाहते तेव्हा शहरामधे घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही......
श्री क्षेत्र गरूडेश्वर
भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई. हसतमुख, कपाळावर गंधाचा टिळा,"छरहरी काया", पस्तीशीतला तरूण.पर्यटन करताना सर्व गुणसंपन्न चालक मिळणे हे सुद्धा खरे नशिबच म्हणले पाहीजे. चालक कसा असावा? तो बोलभांड असावा पण आघाव डबडा नसावा. स्थानिक असो वा नसो पण पर्यटन स्थळ आणी पर्यटंकाची नाडी ओळखणारा असावा.स्मार्ट असावा पण C C (चटक तात्या) नसावा इत्यादी.....
"मै अमरिशभाई,अमरिश जोशी,अगले दो तीन दिन आपका मार्गदर्शक ,हलकेच
स्मितहास्य फेकत त्याने आपली ओळख दिली. प्रत्युत्तरा दाखल मी माझी व
परीवाराची ओळख करून दिली. सर्व जण गाडीत बसलो, गाडी गंतव्य स्थानाकडे
निघाली.कुठे जायचे ते चालकाला माहीत होते.गरूडेश्वर,एकतानगर व केवडिया एकाच
दिशेला असल्याने ते एकाच दिवसात करायचे ठरले होते. सकाळचे नऊ सव्वा नऊ
वाजले होते.प्रशस्त, खड्डे रहित रस्ते,सुरळीत वाहतूक पाहून आपले पुणं
आठवलं.मरणाची घाई पुण्यात कधीही,कोठेही बघा वाहतूक कोंडी.
नुकत्याच संपन्न झालेल्या आयोध्या राममंदिर सोहळ्याचे शहरात जागोजागी
मोठ्ठे मोठ्ठे होर्डिंग्ज अजून दिसत होते. एका रस्त्याला छत्रपती शिवाजी
महारांजाचे नाव दिलेले दिसले.पाटी गुजराथी भाषेत होती. सैनिक अस्पताल
अहमदाबाद येथे काही दिवस राहिलो असल्याने गुजराथी भाषेतील काही अक्षरां
बरोबर जुजबी ओळख झाली होती. जसे,वडोदरा,मराठी तर વડોદરા गुजराथी मधे.
दुकानावरील पाट्या वाचता येत असल्या तरी काही अक्षरे कळत नसल्यामुळे पाट्या
वाचणे हे शब्द कोडे सोडवण्या सारखेच वाटत होते.
आता आम्ही शहराच्या बाहेर आलो होतो. दोन्ही कडेला शेती व हिरवळ,पाणथळ जागां गाडी बडोदा-डभोई रस्त्यावर पळत होती. गुजरात मधील सुहाना मौसम बघून १९७६च्या मंथन चित्रपटातील चुलबूली स्मिता पाटील व तीचे गाणे आठवले...
मेरो गाम काठा पारे
मंथन (1976)
संगीतकार- वनराज भाटिया
गीतकार- निती सागर
गायीका-प्रीती सागर
मेरो गाम काठा पारे
जहाँ दूध की नदियाँ बाहे
जहाँ कोयल कू कू गाये
म्हारे घर अंगना न भूलो ना
म्हारे गामड़ नीला लेर
जहाँ नाचे मोर नडेल
जहाँ दूध की रेलम छेल
जहाँ वड़ती पल्ली छैय्याँ
माँ सुत्ती जाती गैय्याँ
आवो रे
आओ-आओ म्हारे गाम
सबसे प्यारो म्हारो धाम
याद रखियो मेरो श्याम
म्हारे घर अंगना न भूलो ना
कभी रुकना म्हारे गाम
ओ परदेसिया
अगदी असेच वातावरण होते.दोन्ही बाजुला विवीध पक्षी दिसत होते.
वेगळा,अनोळखी पक्षी दिसल्यावर थांबून निरिक्षण करावे,फोटो काढावा अशी तीव्र
इच्छा होत होती पण वेळेचे बंधन आणी सहप्रवाश्यांची संमती या मर्यादा
सांभाळाव्या लागत होत्या.निवडणूक तोंडावर होत्या, राजकारण, विषय निघणे
स्वाभाविक. सौं. चा अतिशय प्रिय विषय आणी कर्म धर्म संयोगाने चालक
महोदयांना सुद्धा या विषयात विशेष रूची, मग मी श्रोत्याची भुमिका घेतली.
प्रवास चालू होता. चालकाने अचानक गाडी साईडला घेतली. ताजी भाजी व जाबं(गुलाबी पेरू) विकायला काही शेतकरी बसले होते.
अमरिशभाईने घरच्यासाठी भाजी पेरू घेतले. गुजराती पेरू सगळ्यात कसे चांगले
हे पटवून देत आम्हाला पण एक किलो खरेदी करायला लावले. पेरू खाता खाता
शहरातील भाजी बाजारा पेक्षा अशा रोड साईडवर मिळणाऱ्या भाज्या किती ताज्या व
किफायतशीर असतात यावर थोडे बौद्धिक घेतले,किती पैशांची बचत झाली याचा
हिशेब सुद्धा त्याने आमच्या समोर मांडला.
आम्ही डभोई-व्हेगा रोडवर वळालो. बडोदा ते श्री क्षेत्र गरूडेश्वर ऐंशी कि.मी. दिड तासाचा रस्ता गप्पांच्या नादात कधी संपला व कधी मंदिर परिसरात येवून पोहोचलो कळाले नाही. श्री क्षेत्र गरूडेश्वर, वाडी,गाणगापुर प्रमाणे दत्तसंप्रदायीक भक्तांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. अतिशय सुंदर स्थान.नर्मदा मैय्याचा किनाऱा, अप्रतीम निसर्ग,स्वच्छ सुंदर बैठे मंदिर यांच्या सान्निध्यात सात्विक भाव न जागतील तर नवलच!
प्रवेशद्वारातून आत गेले की ट्रस्ट चे ऑफिस, धर्मशाळा,रहाण्याची व्यवस्था.दोन प्रसादाची दुकाने. मुख्य महादेव मंदिर, दत्तात्रेय मंदिर आणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज समाधी ही येथील मुख्य मंदिरे.प्रशस्त अशा मुख्य मंदिरात सभा मंडप आणी गर्भगृह. भक्त आणी भगवान यांच्यामधे कुणीच नाही. फार गर्दी नव्हती. इतर मंदिरात सुद्धा दर्शन घेतले. दुपारच्या मध्यान्ह आरती नंतर माफक दरात भोजनाची सोय.तीन दिवस रहाण्या साठी धर्मशाळा.सात दिवस खोली हवी असेल तर आगोदर संपर्क साधावा.इथे हाॅटेल,लाॅज वगैरे काही नाही. काही परिक्रमावासी दिसत होते.
====
====
====
====
====
====

==
मातुल घराण्यातील आमचे आजोबा श्रीपाद दत्तात्रय देशपांडे ,परमपूज्य मामा
देशपांडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. मामाआजोबा, दत्तसंप्रदायातील
अनुग्रहित अधिकारी होते. आजोबा वय वर्ष तेरा असताना पणजोबा बरोबर इथे आले
होते.आठवण का झाली त्यांची सविस्तर माहीती खाली दिली आहे.
नर्मदा किनारी जाण्यास सिमेंटच्या पायर्या आहेत.मंदिर उंचावर असल्याने खाली उतरून जावे लागते.विस्तीर्ण नदीपात्र मन मोहून घेते. भक्त मैय्याच्या प्रेमात पडतोच.बघीतले तेव्हां मी सुद्धा प्रथमदर्शनीच आकर्षित झालो. विस्तीर्ण नदी पात्रात अनेक पाणपक्षी क्रिडा करत होते. काहीजण धार्मिक विधी मधे मग्न होते तर स्थानिक आपल्या दिनचर्येत. विशेष नमूद करावेसे वाटते की पुर्ण प्रवासात जेव्हां जेव्हां नर्मदा दर्शन झाले तेव्हां पायी परिक्रमा करावी अशी तिव्र इच्छा झाली.याचे कारण, नर्मदा एक नैसर्गिक चमत्कार आहे,नर्मदा तीरी असलेले जैववैविध्य, आध्यात्मिक आभा इतर कुठेच अनुभवास आली नाही. विशेष म्हणजे मैय्याशी डायरेक्ट संवाद,पंडित,पुजारी,पंडे असे कुणीच मध्यस्थ नाही.
स्थान महात्म्य म्हणाल तर अनेक अख्यायिका प्रचलित आहेत.गजासुर,भगवान शंकर, नारद, गरूड व त्या बरोबरच नर्मदा महात्म्य जोडलेले आहे.अंतरजालावर भरपूर माहीती आहे, त्याची पुनरावृत्ती करण्यापेक्षा लिंक देत आहे. या लिंकवर वाचक तीर्थक्षेत्रे, दत्तसंप्रदायातील अधिकारी,अनुग्रहित महात्म्यांची माहीती वाचू शकतील. आमचे आजोबा पं. पू.मामा देशपांडे यांचे जीवन कार्य सुद्धा आहे.
दत्त संप्रदायातील अधिकारी व अनुग्रहीत, सर्वमान्य,दत्तस्वरुप श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये महाराज यांनी आपले इहलोकातील कार्य संपवून २४ जुन १९१४ या दिवशी ब्रह्मलिन झाले. स्वामींची समाधी व श्री दत्तात्रेय मंदीर श्री गांडा महाराज यानीं स्वामी आज्ञेनुसार बांधले आहे. दत्ताची संगमरवरी मुर्ती अतिशय सुंदर आहे. महाराज सुद्धा अनुग्रहित होते.
आमचे पणजोबा,प.पू.श्री दत्तोपंत देशपांडे हे प.प.श्री वासुदेवानंद
सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे एक अधिकारी शिष्य आणी पणजी,प.पू.पार्वती
देवी राजाधिराज, श्री अक्क्लकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित
शिष्या. या सत्वशील दांपत्याच्या पोटी २५ जून १९१४ रोजी पं.पू मामांचा
जन्म झाला.श्री क्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्तप्रभूंची या दांपत्याने
मनोभावे प्रार्थना केली.प.पू.श्री टेंब्ये स्वामी महाराजांनी त्यांच्या
भक्तीवर प्रसन्न होऊन,त्यांना ‘पतितोद्धारक पुत्र होईल’असा आशीर्वाद दिला.
प्रसूती वेदना सुरू झाल्यावर पार्वती देवींनी प.पू. टेंब्येस्वामी
महाराजांची करूणा भाकली.श्री स्वामी महाराजांनी दिव्य रूपात प्रकट होऊन
“काळजी करू नये,परवा आमच्याच पूर्णांशाने तुम्हास पुत्र होईल,त्याचे नाव
श्रीपाद ठेवा, आता आम्ही देह सोडत आहोत”,असे सांगितले.गरूडेश्वरी २४ जुन
१९१४ रोजी श्री स्वामी महाराजांनी समाधी घेतली शास्त्रा नुसार स्वामींचा
पार्थिव देह नर्मदा नदी मध्ये विसर्जित केला आणि इकडे पार्वतीदेवींना आषाढ
शुद्ध व्दितीयेला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवण्यात आले.
पं पू मामांचा सहवास आणी आशिर्वाद मला लाभला.२१ मार्च १९९० मधे मामा ब्रह्मलिन झाले. मी स्वताला भाग्यवान समजतो.
(वरील माहीती माझ्या घरातील वडीलधारी मंडळींच्या बोलण्यात अनेकदा आलेली मी ऐकली आहे. माझ्या कुटुंबियांसमवेत अनेक भक्त गणांच्या श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे श्रद्धेला ठेच पोहोचेल असे वक्तव्य कृपया करू नये. )
स्टॅच्यू ऑफ युनिटी
देव,सरीता व पक्षीदर्शन झाल्यावर पुढील प्रवासा साठी निघालो.एकतानगर पुढचा पडाव होता.वडोदरा-श्री क्षेत्र गरूडेश्वर ऐंशी कि.मी. तेथून पुढे दहा बारा कि.मी. केवडिया म्हणजे एकतानगर.नर्मदेच्या काठा काठाने प्रवास सुरू होता.नर्मदा मैय्या लंपडाव खेळत होती.जसजसे गंतव्य स्थान जवळ येत गेले तसतशी नर्मदा निकट येत होती. चालकाने आम्हांला नियोजीत गाडीतळावर सोडले.
मिपाकर कंजूस भाऊंनी माहितीपूर्ण भटकंती डकवली आहे. त्याचा फायदा घेऊन आगोदर नियोजन,तिकीट आरक्षण व कुठे कितीवेळ भ्रमण करायचे हे ठरवले. लिंक देत आहे. माझा अनुभव अगदी थोडक्यात खाली देत आहे.
https://www.misalpav.com/node/51829
एक गोष्ट फार आवडली ती म्हणजे पर्यावरण पुरक वाहन व्यवस्था. ई-रिक्षा चालक महिला होत्या. जंगल सफारी,बटरफ्लाय गार्डन, व्हॅली ऑफ फ्लाॅवर्स व इतर जवळपास असलेली प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी फ्रि राईडस्, माफक शुल्क घेऊन प्रवाशांना वाहन आणी वाहन चालक तत्पर होते.
आम्हीं प्रथम जंगल सफारी व सरते शेवटी एकता का पुतळा बघीतला.
जंगल सफारी
नऊ वर्षाची नात बरोबर असल्याने जंगल सफारीला भेट हीच आमची पर्यटनातील वरीयता.मुख्य आकर्षण डायनो ट्रेल,जापनी उद्यान. इथे प्राणी पक्षी यांची भरपूर संख्या आहे. त्यांचा अधिवास जास्तीतजास्त नैसर्गिक कसा होईल याकडे लक्ष दिले गेले आहे.पर्यटकां साठी पर्याप्त सुचना फलक लावले आहेत.कर्मचारी वर्ग लक्ष ठेवून असतो. खुप मोठा परीसर व उतार चढाव असल्याने इ-वाहन थांबे आहेत.पर्यटक सोयीनुसार चढू किंवा उतरू शकतात.वाहन सेवा फुकट आहे. (कदाचित तीस रुपये असे माफक शुल्क, आता आठवत नाही) खाजगी वाहनांना प्रवेश प्रतिबंध आहे. जंगल सफारी सर्व वयाच्या पर्यटकांना पाहण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.
सरदार पटेल यांचा पुतळा
==
====
==
====
==
पुतळ्याचा आकार आणि तिची भव्यता बघून थक्क झालो.सोबतच विस्तीर्ण नर्मदेचे
पात्र, लोह पुरूष वल्लभभाईच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वा सारखेच भव्य सरदार
सरोवर धरण व सुंदर निसर्गदृश्ये. एकूणच,हे ठिकाण मानवनिर्मित अभियांत्रिकी
चमत्कार व नैसर्गिक सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना,प्रेक्षणीप पर्यटन स्थळ
आहे.
पुतळा व परिसर बघण्यासाठी दोन प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. एक रु.१५०, प्रवेश तिकीट. दुसरे ४५ व्या माजल्यावर,व्ह्यू गॅलरी, पुतळ्याच्या छातीपर्यंत जायचे असेल तर रु. ३८०.माझ्या मते, व्ह्यूइंग गॅलरी भेट ही एक वेळची भेट आहे आणि इथे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे भयंकर चुकत आहात. रु १५० मधे पुतळ्याच्या पायथ्यापर्यंत जाणे तितकेच सुंदर आहे पण पंचेचाळीसाव्या मजल्यावरून दिसणारे नर्मदा व्हॅलीचे सौंदर्य ही काही वेगळीच अनुभुती व संपुर्ण आयुष्यात कदाचित एकमेव मिळणारी संधी सोडतोय असेच मी म्हणेन.
विस मिनीटाचा प्रकाश आणि ध्वनी प्रोग्राम एकदा पाहणे एक वेगळाच अनुभव आहे.या कार्यक्रमाची तिकीटे लवकर संपतात म्हणून आगोदरच बुक करणे इष्ट.हा कार्यक्रम पहाताना काळ वेळ विसरलो होतो. मंत्रमुग्ध करून सोडले होते विषेशता धरणावर पडणारा प्रकाश आणि आवाज.युनिटी ग्लो गार्डन साठी १०० रुपयाचे स्वतंत्रपणे तीकीट बुक करणे आवश्यक आहे.
एका दिवस मुख्य पुतळा,सोबत जंगल सफारी आणि प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमा साठी पुरेसा आहे.गॅलरी, संग्रहालय आणि SOU चे संपूर्ण क्षेत्र, नीटनेटके आणि स्वच्छ आहे.ज्येष्ठ नागरिक आणि अपंग लोकांसाठी गोल्फ इलेक्ट्रिक कार.SOU च्या आजूबाजूला पाणी नसल्याने क्रुझ व एक सुंदर दृश्याला आम्ही मुकलो.
एव्हढी पायपीट केल्यावर पोटोबा साठी पुतळ्याच्या आवारात स्टार बक्स रेस्टॉरंट आहे. खमण बरोबरच कोल्ड काॅफीचा आनंद घेणे हा सुद्धा एक युनिक अनुभव होता. रात्री हाॅटेलवर परतायला उशीरच झाला. दिवस मात्र आयुष्यभर स्मरणात राहाणार आहे.

-
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१
वडोदरा,पावगढ-चंपानेर-२
वडोदरा,पावगढ-चंपानेर-3
-
-
काल दिवसभर झालेल्या पायपीटीने अशी काही गाढ झोप लागली जसे काही आम्हीं घोडे विकून आलो आहोत.
मी नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर उठून व पक्षीदर्शनात दंगलो.आकाश निरभ्र आणी निळेशार होते. दिग्गज कवींच्या निळ्या रंगावरील कवीता मराठी आठवू लागल्या.
असे नाना गुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्यनवे गडे तुझे माझे डोळे
जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्य सोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदिवर निळा
कांलिदीच्या पात्रा प्रमाणे विस्तीर्ण नाही पण कठीण अशा खडकांच्या भिंतीतून मार्ग काढत निरंतर समुद्राकडे वहात जाणाऱ्या बडोद्याच्या विश्वामित्री नदीपात्रात मला वेगळाच निळा दिसला. त्याच्यावरून उडणारे पांढरे बगळे, काळ्या मानेच्या पांढऱ्या शुभ्र शराटी व मोरपंखी, तपकीरी रंगाचे खंड्या( किंग फिशर) उडताना खालच्या वरच्या निळाईत एक वेगळा रंग भरत होते. शेजारीच असलेल्या वटवृक्षावर तांबट कुटुंब बागडत होते तर समोरच्या उंच होर्डिंग्ज वर गुलाबी मैनांची (Rosy Sterling) शाळा भरली होती.
तांबडा,लालभडक सुर्याचा गोळा,बहूमंजीला, नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सांगाड्यातून बाहेर पडत होता.उगवती शेंदरी व मावळती प्रकाशमान झाली.नारायण सुर्वे, बहिणाबाई सुधीर मोघे आणी अनेक दिग्गज कवी,कवयित्रींनी उगवत्या सुर्याचे कौतूक केले आहे.यांच्या पैकी सुधीर मोघ्यांची कवीता मला फारच आवडते. कल्पना बघा किती सुंदर आहे...
रानं जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या...
जबरदस्त वातावरण,भटकंतीचे पैसे वसूल झाले. पाचव्या मजल्यावर फायर एक्झिट, म्हणजे एक प्रकारे मचाण, सर्व शहर एका नजरेतून आकळता येत होते. इथे बसून बडोद्या मधील सकाळ अनुभवणे, अद्भुतच.आता तांबडा भडक सौम्य मार्तंड हळूहळू धवल रंग धारण करत आपले खरे उग्र रूप प्रगट करत होता.आपणही निघायला हवे नाहीतर उशीर होईल असा विचार करून मी खोली कडे मोर्चा वळवला.सर्व जण तयारच होते,मस्त पैकी नाष्टा करून खालीआलो.बघतो तर काय आमचा कुबेरदास आमच्या स्वागतासाठी तयारच होता.आज मी त्याच्याच भाषेत अभिवादन केले,"जय कुबेर", त्याने हलके स्मितहास्य करत गाडी सुरू केली.
गाडी कालच्याच रस्त्यावर धावत होती.आज गप्पात मात्र औपचारिक पणा नव्हता.अमरिश भाई ने त्याचे कुटुंब गुजरातमधे स्थलांतरित कसे झाले! मुलगा कसे छान पौरोहित्य करतो व मुलगी हुशार,महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत असल्याचे कौतुक,अभिमान असे मिश्र भावनिक वर्णन केले. काही जगावेगळे नाही, पण शेवटी तो पण बापच ना! सर्व सामान्य गृहस्थाश्रमी, गृहस्वामीनीचे गोडवे अनिवार्य. मी त्याच्या शेजारीच बसलो होतो. पाठीमागे बसलेल्या सहप्रवासिनीच्या चेहर्यावरचे भाव कसे दिसत असतील याचा अंदाज मला पुढे बसून येत होता. "बघा!!!!".
विषय आजच्या पर्यटन स्थळावर घसरला. आजचे पर्यटन निळकंठ धाम, स्वामीनारायण मंदिर होते.अमरिशभाईने प्राथमिक माहिती पुरवली.बडोद्यापासून ६१ कि.मी.अंतर, नर्मदा काठ,गाव पोएचा स्थित नीलकंठधाम मंदिर आहे. याला स्वामीनारायण मंदिर म्हणून ही ओळखले जाते.
निसर्गरम्य,आध्यात्मिक, सांस्कृतिक परिसर बघण्यास साधारण तीन तास पुरेसे आहेत. येथे भोजन व्यवस्था फारच उत्तम आहे अजीबात चुकवू नका असेही बजावले.बाकी काहीच डोक्यात नसल्याने व वधवाना लेक,डभोई पक्षीदर्शन हा मेन्यू एक विरूद्ध तीन अशा मताने खोडून काढला.दोन अडीच वाजेपर्यंत परत येवू,दुपारी थोडा आराम करू आणी संध्याकाळ शाॅपिंग असा बेत ठरला.
श्री स्वामीनारायण मंदिर पुण्यात सुद्धा आहे पण कधी गेलो नसल्याने कसे असेल या बद्दल काहीच कल्पना नव्हती.गाडी पळत होती, बरोबर सर्वाचेच तोंड पण चालू होते.अमरिश भाईने गाडी बाजुला घेतली.भाजी खरेदी करत आम्हांला अहमदाबादी बोरं घेण्याचा आग्रह करू लागला.चांगली ताजी होती पण भाव मात्र पुण्याचेच होतो. पोऐचा पोहचण्यास थोडा वेळ होता.
श्री स्वामीनारायण संप्रदायाचा इतिहास अंतरजालावरून....
श्री स्वामीनारायण हा एक संप्रदाय आहे. भगवान श्री स्वामीनारायण यांचा जन्म १७८१ मधे उत्तर प्रदेश मधील आयोध्या जवळ छपैया गावात झाला.गुरू स्वामी रामानंद यानी १८०० मधे उद्धव संप्रदायाची दीक्षा दिली. सहजानंद हे नाव दिले.मृत्युसमयी १८०२ मधे संप्रदायाचे नेतृत्व स्वामी सहजानंद याच्यावर सोपवले. संप्रदायाचे जवळपास विस लाख अनुयायी आहेत.असो, गुगलवर सविस्तर असल्याने इथे टंकाळत नाही.
मुख्य रस्ता सोडून गाडी आत मधे वळाली. एकदम वातावरणात बदल दिसून आला. सुंदर चकाचक रोड,नजर जाईल तिथपर्यंत हिरवाई. रस्त्यालगत सुशोभित, एकसारखी कापलेली झाडे, सुशोभीकरण उच्च दर्जाचे व तेव्हढाच उच्च दर्जाचा रखरखाव.
-----
-
अमरिशभाई ने गाडी पार्क केली."तुम्ही फिरून घ्या,झाले की गाडी जवळ या",असे म्हणून स्वारी गायब झाली.अतिशय विस्तीर्ण पटांगण. पार्किंगची उत्तम व्यवस्था.डाव्या बाजूस चाळवजा भक्तनिवास, शेजारी पिलखान्यात देवाचे हत्ती झुलत होते. समोर नेत्रदीपक,भव्य दिव्य मंदिर. १०५ एकर प्रांगणात,इ.स. २०१३ मधे बांधलेले मंदिर ,एक तप उन पाऊस झेलून सुद्धा आज २०२४ मधे नवे कोरे वाटत होते. यावरून रखरखाव किती उत्तम ठेवला आहे याची कल्पना येते.
-----
-
अकरा हत्ती पैकी नऊ प्रतीमांवर सुवर्ण अंबारीत तुतारी वादक,दोन हत्तींवर,दोन्ही बाजूस हाती वैजयंती माळा घेतलेले गरूड व मध्यभागी अतिभव्य सुबक,सुमनोहर,शंख, पद्म धारीत,आशिर्वचन मुद्रेत पद्मासनात बसलेली भगवान विष्णूंची मुर्ती, पारंपारिक पोषाख परिधान केलेले माहूत असे अप्रतिम प्रतिमांचे भव्यदिव्य प्रवेशद्वार.
-
------
-
-----
-
-----
-
-----
-
मंदिराची वास्तुकला,उद्याने,भव्य अतिसुंदर देवांच्या मूर्ती आणी चहूबाजूला चाळीस लाख लिटर नर्मदेच्या पाण्याने भरलेले आरसपानी नीलकंठ सरोवर बघून भक्तांचे मन गदगद झाल्याशिवाय रहात नाही.श्री स्वामीनारायण, घनश्यामजी,नीलकंठ राधाकृष्ण,शेषशायी विष्णू,फर्णीन्द्र,शिवलिंग,गणेश, मारूती मंदिरा समवेत 32 छोटी मोठी मंदिरे आहेत.लाईट शो मधे मंदिर बघणे अलौकिक,अद्भुत अनुभव आहे. अर्थात आम्हीं नाही बघीतला. एक गोष्ट मला फारच आवडली ते म्हणजे प्रकाश चित्रे घेण्यास प्रतिबंध नव्हता. भगवान आणी भक्त या मधे कुठलाही अडसर नव्हता. खुले प्रांगण,दरवाजा रहीत छोटी मंदिरे, कुठेही लांबलचक रांगा नव्हत्या.डोळेभरून दर्शनास अडकाठी नव्हती. भरपुर प्रकाश चित्रे घेतली. भक्तांची भरपूर गर्दी होती.परिसर एव्हढा मोठा माणसांची गर्दी म्हणजे "उंट के मुहंमे जिरा". कमालीची स्वच्छता,सतत सेवक स्वच्छता करण्यात मग्न.परिसरात वावरणारे प्राणी पक्षी सुद्धा मल निस:रणा करता दुर जात असावेत. इथे भरपूर सुर्यपक्षी बागडताना दिसले.
मंदिराच्या डाव्या बाजुलाच भोजनाची प्रशस्त व्यवस्था होती. माफक किमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध होते.कढ़ी खिचड़ी,आइसक्रीम,पाणी पुरी,वडापाव इतर भोजन पदार्थ,चहा,काॅफी, ताक,इतर पेय पदार्थ उपलब्ध होते.किंमती जरी माफक होत्या तरी गुणवत्ता मात्र चोख होती.
मंदिराच्या मागे नर्मदा मैय्याचे विस्तीर्ण पात्र आणी काठालगतची हिरवाई,नेत्र सुखावत होते.पाण्याची मात्रा कमी होती पण निळेशार पाणी नजर बांधून ठेवत होते.नदी पलीकडच्या किनाऱ्यावर कुबेर मंदिर आहे.ते सुद्धा खुपच सुंदर आहे. कुबेर मंदिर बघण्यासाठी प्रथम जीपने नंतर नावेतून नदीपात्र पार करावे लागते.केवट चप्पू घेऊनतयार असतात. केवळ पंधरा मिनिटात किनाऱ्यावरील कुबेर मंदिरात जाता येते.२५० रुपये तिकीट आहे. मंदिरात प्रकाशचित्रण करण्यास प्रतिबंध आहे. गाव "करनाली", दिवाळीतील अमावास्येला इथे खुप मोठी यात्रा असते.
-
-----
असे म्हणतात भावाने लंके मधून हाकलून दिल्यावर कुबेर नर्मदातीरावर तपस्ये करता बसला. खडतर शिवाराधने नंतर भगवान शिव प्रसन्न झाले.लंकेचे राज्य परत मिळवून देण्यास असमर्थ होते म्हणून त्यांनी कुबेरास देवतांच्या धनलक्ष्मीची जबाबदारी दिली,स्वता शिवलिंग रुपाने वास करून राहीले.मैय्याच्या पैलतीरा वरून नीलकंठ धाम मंदीर फार सुंदर दिसते. रजेन्द्रा मेहेन्दळे यानी त्यन्च्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा या लेखात या मन्दीरा बद्दल लिहीले आहे.
आदल्याच दिवशी मिपाकर मेहेंदळे भाऊंचा फोन आला होता.नर्मदा नदीतील शेंदरी रंगाचा छोटा दगड मिळाल्यास घेवून या अशी विनंती केली. जास्त विचारपूस केल्यावर कळाले त्याला गणपती स्वरूप मानतात. देवघरातील शिव पंचायतन याच्यांशिवाय अधूरे आहे. परंतू तोपर्यंत आम्ही गरूडेश्वर सोडले होते आणी पुन्हा नर्मदा मैय्याचे दर्शन होईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने क्षमा मागितली होती.
मेहदळें भौं ची भक्ती आणी अटळ विश्वासा मुळेच नीलकंठ धाम किनाऱ्यावर छोटा तांदळा (गणपती सदृश्य खडा) ,न ध्यानी न मनी अशा उन्मनी अवस्थेत सापडला. कायप्पावर चित्र पाठवले.राजेंद्र भौनी पुष्टी केली.भटकंती संपल्यावर श्रीकृष्ण मधे मिसळपाव आणी खरवस अशी मजुरी घेऊन त्यांचे इष्ट त्यांना सुपूर्द केले.मलाही खुप आनंद झाला. ( एकदा वाटले, मोह झाला,खडा अतिशय देखणा, आपणच ठेवून घ्यावा....)भक्तगण, नर्मदेतल्या प्रत्येक दगडाला शिवस्वरूप मानतात (नर्मदा का हर कंकर है शंकर शंकर).
-
------
छोटा तांदळा (गणपती सदृश्य खडा)
ज्या की रही भावना जैसी.....
प्रभू मुरत तिन देखी तैसी.
कायप्पावरील संभाषण.
[02/03, 5:36 pm] Rajendra Mehendale Mipa:Kaka maze ek kam ahe- मला नर्मदेचा लाल खडा गणपती म्हणुन हवा आहे. कृपया आणाल का?
[02/03, 5:53 pm] Rajendra Mehendale Mipa:सकाळी किवां काल म्हणले असते तर गरूडेश्वरला बघीतला असता. आता माहीत नाही कुठे मिळेल.
[02/03, 5:56 pm] Rajendra Mehendale Mipa:नाही….बघा विचारून /किवा नदी पाशी गेलात तर लक्षात असुदे.
[03/03, 5:35 pm] Rajendra Mehendale Mipa: अरे वा- मिळाला का बाप्पा?
[03/03, 5:35 pm] Rajendra Mehendale Mipa: खूप खूप धन्यवाद
मंदिर बघून झाले होते,नर्मदा तीरावर लांबून का होईना कुबेर भंडारीचे (कृपा आहे) दर्शन घडले. राजेंद्र भौं चे इप्सित साध्य करण्यात साधन बनण्यास मिळाले.सकाळी भरपूर नाष्टा झाल्यामुळे फारशी भुक नव्हती. प्रसाद म्हणून थोडे भोजन घेतले व गाडी जवळ आलो.
आता कुठे?
हॉटेलवर ....चला
"मी आठ तास आणी तीनशे कि.मी.चे पैसे घेणार आहे, ते पुर्ण झाल्या शिवाय हाॅटेल वर सोडणार नाही".
आम्हांला आणखीन कुठे जायचे हे माहीत नाही.
आहो,ठरलेले पैसे देतो, किंवा कमी पैसे घ्या...
कुबेरदास दोन्ही करता तयार नव्हता. म्हणाला मी तुम्हांला काही ठिकाणे दाखवतो. तुम्हांला नक्कीच आवडतील. चला म्हणत गाडी गियर मधे टाकली.
दोन तीन वेगवेगळी मंदिरे दाखवली. मंदिरा सारखी मंदिरे,कंटाळलो होतो. इलाज नव्हता.
बघता बघता गाडी घनदाट जंगलात घुसली. मोबाईलची रेंज सुद्धा गायब झाली.मन साशंक झाले.जंगल घनदाट होत चालले.अचानक रस्त्याचा शेवट आला. एका झाडाखाली पारंपारिक गुजराथी वेषात काही लोक बिडी पीत बसले होते.भाईने गुजराथीत विचारले, नानी मोटी पनौती मंदिर कुठे आहे.(નાની મોતી પનૌટી મંદિર ક્યાં આવેલું છે?). त्यांनी गुजराथीत उत्तर दिले.
जीवात जीव आला. मंदिरा बद्दल विचारतो आहे....
कोपर्यात गंजलेल्या फलकावर નાની મોતી પનૌટી असे शब्द दिसले. गाडी वळवून सांगीतलेला मार्ग पकडला.
एक चहाची टपरी आणी सुकलेल्या झेंडूच्या माळा, तेलाच्या छोट्या बाटल्या,काळ्या फडक्यांचे बंडल, नारळ, साखर फुटाणे व इतर पुजा साहित्य ठेवलेले दुसरे टपरीवजा दुकान. एखाद हातगाडी आणी दोन चार भिक्षेकरी. सिमेंटचे महाद्वार,वर जाणाऱ्या पायर्यां,समोर वस्तीवजा मंदिरांचा समुह.असा सगळा देखावा. राजपिप्पला जिल्ह्य़ातील एक छोटेसे गाव,नर्मदेच्या दक्षिण तटावर, उंच टेकडीवर कुंभेश्वर महादेव,काळभैरव आणी पनौती मंदिर.वास्तू बघून खुप जुने वाटत होते साधारण तीन,चारशे वर्षा पूर्वीचे असावे. आजुबाजूची इतर मंदिरे नंतर बनलेली किवा जिर्णोद्धार केलेली असावीत. इथले पुजारी सोमण वंशीय असून त्यांची नववी,(९) पिढी सध्या इथे नांदत आहे.यावरून अंदाज आला. परिक्रमा वासी मंदिराच्या आवारात आराम करताना दिसले.नानी मोटी मंदिर दोन मजली आहे. तळमजल्यावर पनौती मंदिर व पहील्या मजल्यावर शनी मंदिरआहे.मध्यभागी कुंभेश्वर महादेव,जवळच कालभैरव मंदिर. भैरवनाथा समोर रेलिंगवर काळा कपडा बांधून इच्छापुर्ती साठी भावीक प्रार्थना करतात.असंख्य काळे कापडे बांधलेले दिसले.
नानी मोटी पनौती येथील कुंभेश्वर,काल भैरव, मोटी पनौती,छोटी पनौती,राहू केतू,नर्मदा आणी शनी मंदिर असा पुरातन मंदिरांचा समुह आहे. स्थान महात्म्यानुसार मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्र जप करून भगवान शिव प्रसन्न करून घेतले अमरत्व प्राप्त केले. दुसर्या अख्याईके नुसार कुंभेश्वर शिवलिंग ब्रह्माने स्थापन केले. इथेच शनी महाराजांचा राग शमला. नानी पनौती म्हणजे साडेसाती आणी छोटी पनौती म्हणजे शनी अढैय्या, अडिच वर्ष.
पनौती हा हिन्दी भाषेतला शब्द आहे. व्यंजना पुढे "औती", प्रत्यय लावून अनेक शब्द बनले आहेत. जसे,चुनौती,कटौती,मनौती, बपौती, फिरौती. मराठीत पणवती म्हणतात. औती चा अर्थ खुप पुष्कळ. पनौती म्हणजे अशुभ, कठीण परिस्थीती.ज्योतिषशास्त्रानुसार शनी साडेसाती हा आयुष्यातील कठीण,परिक्षा घेणारा काळ असतो. जनमान्यते नुसार इथे केलेली पुजा अर्चना हा काळ सुसह्य करण्यास मदत करते. इथे नर्मदातीरावर जुने कपडे दान करण्याची प्रथा आहे त्यामुळेच किनाऱ्यावर जुन्या कपड्यांचे ढिग पाहिला मिळाले. छोटीशीच मंदिरे अगदी राहत्या घरासारखी.सभोवताली दाट जंगल,मैय्याचे विस्तीर्ण पात्र, निसर्गाचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न झाले. प्रकाश चित्रे घेतली नहीत. परिसर इतका सुन्दर होता की फोटो घेण्याचेच विसरलो.
नर्मदा भारताची अध्यात्मिक वाहिनी म्हणले तर वावगे ठरणार नाही.पुरातन काळापासून मध्य भारताला सुजलाम सुफलाम करणारी अनेक अख्यायीका,पुराण कथा आणी जनश्रुतींनी वेढलेली,राजा मैखल पुत्री ही रेवा नावाने सुद्धा बहुश्रुत आहे.या नदीबद्दल अनेक रंजक गोष्टी बरोबरच तटाकी मंदिरे प्रसिद्ध आहेत.
संध्याकाळचे चार वाजताच आले होते. तीथेच टपरीवर मस्त स्पेशल चहा घेतला. आता तरी हाॅटेलवर नेईल या आशेने सर्वजण गाडीत बसले.अमरिशभाई म्हणाले, "एक खास मंदिर दाखवतो आणी मग परत फिरू या.परतीच्या रस्त्यावर आहे". आलिया भोगासी असावे सादर,म्हणून सर्व गप्प बसले. थोड्याच अंतरावर कारवान नावाचे गाव आले.
गाडी, मंदिराच्या प्रांगणात उभी केली. भरपुर मोठे प्रांगण,उत्सवाची तयारी चालू असावी. मंडप,लाईट इत्यादी साहित्य येवून पडले होते. एक दोन टेम्पोतून सामान उतरत होते. चौकशी करता कळाले आठ तारखेच्या शिवरात्री महोत्सवाची तयारी चालू आहे, म्हणजे हे शिव मंदिर आहे हे कळाले. भव्य मंदिरात काळ्या ग्रॅनाईट मधे शिवलिंग, लकुलीश भगवान विराजमान आहेत तर भिंतीवर विवीध देवी देवतांची, आयुध आणी अलंकार युक्त मूर्ती लावल्या आहेत. मंदिर अतीशय स्वच्छ, पारंपारिक पोषाख परिधान केल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही. शार्ट, स्कर्ट व तत्सम पोशाख घालून मंदिरात जाणे प्रतिबंधित आहे. मंदिर नवीन आहे.परिसरात प्रकाश चित्रे घेण्यास प्रतिबंध आहे. काही प्रचि अंतरजालावरून साभार.
-
-----
-
नुकतेच बान्धलेले लकुलीश मन्दिर आणी पुरतत्व विभागाने केलेले उत्खनन जागा.
-
----
-
-----
सर्व मंदिर बघून झाल्यावर," देवादारी विसावा पुनर्जन्म नसावा", म्हणत जरा गारव्यात बसलो. जवळच एक गुजराथी पंडितजी बसले होते. त्यानां बोलते केल्यावर कळाले की शंकराचे २८ वे अवतार भगवान लकुलीश दुसर्या शतकात इथेच जन्माला आले. ते पशुपत संप्रदायाचे संस्थापक मानले जातात.
पंडितजी इतीहासावर जास्त प्रकाश टाकू शकले नाही. अमरिशभाईनां सुद्धा काही माहीत नव्हते. एक प्रेक्षणीय शिवमंदिर जिथे शिवरात्रीला गावातील पुरूष शंकराच्या वेशात उत्सवात सामील होतात याच्या व्यतिरिक्त अमरिशभाईनां सुद्धा काही माहीत नव्हते. हॉटेलवर गेल्यावर गुगलवर बरीच माहिती मिळाली.थोडक्यात नमूद करतो.माहिती कळाल्यावर मन हळहळले.इतक्या दुर येवून पुरातत्व विभागाचे उत्खनन व संग्रहालय पहायचे राहून गेले.अधिक माहितीसाठी गुगल खंगाळावे.
कारवन नावाचे हे गाव कायावरोहन या नावाचा अपभ्रंश आहे. ह्या गावाला पुरातत्व विभागाने विषेश दर्जा दिला असून एक संग्रहालय सुद्धा उभारले आहे. पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात दुसर्या शतकातील व त्या नंतरची तांब्याची नाणी, दगडी जाती,औजारे,देवाच्या मूर्ती सापडल्या आहेत. सापडलेल्या काही खंडीत,अखंड मूर्त्या संग्रहालयात ठेवल्या आहेत.
अकराव्या शतकात मोहम्मद घोरी व इतर आक्रांतानी मंदिरे तोडली.कारवान हे पवित्र स्थान चारही युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. कायावरोहण या पवित्र स्थानावर चारही कालखंडात शिवाची दैवी शक्ती अस्तित्वात आहे. ऋषीं विश्वामित्रांना रामायण कालात सापडलेले ब्रह्मेश्वर ज्योतिर्शिवलंग हे इथले स्थान महात्म्य आहे. याचा उल्लेख मार्कंडेय पुराण व स्कंद पुराणा आहे असे कळाले. खरे खोटे भगवान लकुलीश जाणे.
इच्छापुरी-सत्ययुग
मायापुरी-त्रेतायुग
मेघावती-द्वापार युग
कायावरोहन- कलियुग
कायावरोहण या बद्दल अनेक अख्यायीका गुगलवर आहेत.
बडोद्यापासून तीस किलोमिटर अंतरावर असल्याने प्रवास पटकन संपला. कुबेरदास यांच्या चेहर्यावर संतोष दिसत होता.पण काही म्हणा,दोन्ही पर्यटनस्थळे लौकिक दृष्ट्या प्रसिद्ध नाहीत पण ऐतिहासिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक धरोहर म्हणून निश्चीतच प्रेक्षणीय आहेत.अमरिशभाई पैसे घेऊन, उद्या सकाळी भेटू,जय कुबेर म्हणत निघून गेले.....
दुसर्या दिवशी पावागढ,चंपानेर इथे जायचे ठरले होते. ते वर्णन पुढच्या भागात....

पावागड।
वडोदरा, पावगढ-चंपानेर-१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-२
वडोदरा, पावगढ-चंपानेर-3
वडोदरा, पावगढ-चंपानेर-४
अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत. एक दिवसाची भटकंती म्हणजे फक्त भोज्याला स्पर्श करून येण्या सारखेच म्हणावे लागेल.पावागढ,लकुलीश मंदिर आणी चंपानेरची प्रकाश चित्रे खुप जास्त असल्याने लेख दोन भागात विभागून डकवतोय.
पौराणिक,ऐतिहासिक,आध्यात्मिक संदर्भ आणी पाऊलखुणा असलेले चंपानेर-पावागढ एक अलौकिक,अद्भुत प्रेक्षणीय स्थळ आहे. गुजराथ मधील बहुचर्चित गोध्रा(पंचमहाला) जिल्ह्य़ातील हलोल तालुक्यातील गाव.
वैवस्वत मन्वंतरातली राजा दक्ष प्रजापती पुत्री सती, रामायण कालातील महर्षी विश्वामित्र, चौथ्या शतकातील मैतृका,दहाव्या शतकातील वनराज चावडा,पंधराव्या शतकातील सुलतान मेहमूदशहा बेगडा तेआजतागायत एवढा मोठा कालखंड. बघण्या साठी अनेक प्रेक्षणीय वास्तू, कालिकामातेचे मंदिर,सुंदर जैन मंदिरे,मशीदी,हेलीकल वाव,कबूतरखाना,टोंब, धान्याचे कोठारे, किच्छी चौहान राजपुतांचे भग्न राजवाडे,अनेक तलाव,पाणी वितरण व्यवस्था इत्यादींचे अवशेष पुरातत्व विभागाचे उत्खनन आजही चालू आहे.लिहीण्यासारखे सुद्धा बरेच काही,परंतू माझी लेखन क्षमता तोकडी,त्यामुळे जसे सुचले तसे लिहीले.एकंदरीत रखरखाव व्यवस्थित ठेवला तर अजुनही अनेक वर्षे ही पुरातत्व धरोहर येणार्या पिढ्यांना बघता येतील.
-
धान्याचे कोठारे, व पुरातत्व विभागाचे उत्खनन
-
पावागढ म्हणजे किल्ला,डोंगर,चढाई, खंडहर, भग्नावशेष आसा काही पूर्वग्रह. ऐतिहासिक, पुरातत्व स्थळांमध्ये स्वारस्य नसलेले सदस्य, कालच्या अनपेक्षित,ध्यानी मनी नसताना, नानी मोटी पनौती व कारवान (कायावरोहण) या अप्रसिद्ध,प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीनंतर पावगढ-चंपानेर जाण्यासाठी एकमताने तयार झाले.अर्धा डोंगर गाडीने चढता येतो,पुढे उडन खटोला आहे व थोड्याच पायर्या चढाव्या लागतील अशी माहीती अमरिशभाईने दिली आणी सर्वजण आश्वस्त झाले.
दररोज प्रमाणे नाष्टा करून आम्हीं खाली आलो. कुबेरदास हजर होतेच.पावागढ ५५ कि. मी. अंतरावर, चार लेन चा गुळगुळीत रोड,गाडी ८०-९० कि. मी वेगाने धावत एक तास काही मिनीटात चंपानेर गावाच्या वेशी पाशी आली. भग्न वेस आणी ढासळलेले बुरूज, चिरेबंदी तटाच्या भिंती गत वैभवाच्या खुण, सहाशे वर्षानंतर सुद्धा दिमाखात उभ्या होत्या.भाईने गाडी बस थांब्यासमोर थांबवली.
-
-
रस्त्यालगत स्थानिक जीप गाड्या डोंगरावर नेण्यासाठी उभ्या होत्या. या गाड्या डोंगराच्या मध्यभागा पर्यंत ने आण करतात.सुंदर,प्रशस्त डांबरी पण घाट रस्ता,
निसर्ग सौंदर्य मनमुराद व अतिशय लोभस तसाच रौद्र पण आहे.तेथून पुढे उडन खटोला,माफक शुल्क घेऊन मंदिर पायथ्याशी भाविकांची ने आण करतात.
----
----
मुख्य कलिकामाता मंदिर व इतर प्रेक्षणीय स्थळे डोंगरमाथ्यावर आहेत.तीनशे पायर्या चढून जावे लागते.पायर्या मुळे चढण सुकर होते. कालिका माता मंदिराकडे जाण्यासाठी प्रशस्त सिमेंटच्या पायर्यावजा रस्ता आहे. रस्त्याच्या लगत दोन्ही बाजुला विवीध प्रकारची दुकाने, खाण्या पिण्याची उपाहारगृहे आहेत. आम्हीं प्रथम चंपानेर बघावे असा विचार केला. तो निर्णय चुकला असे नंतर वाटले.या भागात भगवान लकुलिश वर लिहीले आहे.
भूगोल
पावागढ डोंगर ज्वालामुखीच्या उद्रेकाची परिणीती आहे. एक एकटाच उंच डोंगर व सभोवताली विस्तीर्ण पठार. इतर डोंगर रांगा थोड्या दुर,सुकले,जोरवन आणी विश्वामित्री नद्यांचे उगमस्थान इथेच आहे.
इतिहास
पावक गढ (Fire hill),पवनगढ (Wind hill) अशी पावागढची नावे जुन्या अभिलेखात सापडतात. कवी चंद बरदाईने आपल्या पृथ्वीराज रासो या नाटकात पावागढावर बाराव्या शतकात राम गौर तुवार राजा राज्य करत असल्याचे नमूद केले आहे.
पावागढ डोंगरात/भागात सापडलेली दगडी अवजारे, हॅण्ड ॲक्सेस,चाॅपर्स,क्लिव्हर्स इ. अश्मयुगीन असल्याची षुष्टी पुरातन विभागाने केली आहे.काही मैतृका नाणी (इ.स.४७० - ७७६) जोरवन नदीपात्रात सापडली आहेत यावरून मैतृका (Maitraka) राजे राज्य करत होते हे सुनिश्चित होते.
२८०० फुट उंचीच्या पावागढ पर्वतावर टप्प्या टप्प्याने पाच समतल पठारे आहेत. जणू त्या पाच पायर्याच. या पठारावर गतकाळातील इतीहासाच्या पाऊलखुणा पसरलेल्या आहेत. उंचीनुसार,सर्वात उंच कालिकामाता, मौलीया, भद्रकाली, माची आणी अटक अशी पठारांची तत्कालीन नावे आहेत. सर्वात उंच पठारावर कालिका मातेचे भव्य, अतिसुंदर मंदिर आहे. मौलिया पठारावर 10"-11" शतकाच्या आसपास छावडा राजांनी बाधलेले लकुलीश मंदिर या भागातील सर्वात जुनी पुरातत्व वास्तू आहे. इंद्र,ब्रह्मा,विष्णू,गजेंद्रमोक्ष,दक्षिणामूर्ती व अंबिका यांसह इतर अनेक देवतांच्या उत्कृष्ट प्रतिमांनी सुशोभित केलेले मंदिर आता भग्न आवस्थेत आहे.हजाराहून अधिक वर्षे उन, पाऊस,थंडी वारा सोसत आजही काही दगडी शिल्प मुळ स्वरूपात आपला गत,वैभव काळ सांगत उभी आहेत.
-
-----
-
मौलिया पठारावर चासिया तलाव आणी अतिसुंदर मंदिर
-
वर नमूद केल्याप्रमाणे जीप मधे बसून रोप वे पर्यंत गेलो.इथे जरी विस्तीर्ण पठार असले तरी थोडे चढावे लागते.रोप वे चे सहा लोकांचे छोटे केबीन सतत केबलने वर खाली प्रवाशांची वहातूक करते.प्रवासात पुरातत्व विभागाची माणसे खाली उत्खनन करताना दिसतात.
-
-
अतिसुंदर लकुलीश मंदिर
लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. लकुलिश या शब्दाचा अर्थ लाठी धारण केलेल परमेश्वर असा होतो. खरेतर लकुलीश एक सुधारणावादी शैवपंथीय संत होते, ज्यांना शिवाच्या अठ्ठावीस रुपात स्थान मिळाले.
लकुलीश यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कारवान गावात ऋषी अत्री यांच्या गोत्रातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. अर्थात लकुलीशांच्या अनुयायापैकी काही व्यक्तींच्या मते त्यांची एक वेगळीच कथा आहे. भगवान शिवांनी एकदा भगवान विष्णुंना वासुदेव स्वरुपात पृथ्वीवर प्रगट झाल्यावर त्याचवेळी अवतार घेण्याचे वचन दिले होते. जेव्हा विष्णूनी वासुदेव रुपात जन्म घेतला तेव्हा भगवान शिव एका मृत ब्राम्हणाच्या शरीरात प्रवेश करुन पृथ्वीवर प्रगटले.हाच तो लकुलीश अवतार मानला जातो.लकुलीश हे सतत भ्रमण करणारे भिक्षु झाले. त्यांनीच शैव पंथातून पुढे पाशुपत संप्रदायाची स्थापना केली.तसेच पाशुपत संप्रदायीनी अध्यात्मिक जीवन कसे जगावे यासाठी सुत्र लिहीले. पुढे याच संप्रदायातील इतर गुरुंनी त्यात भर घातली.अर्थात लकुलिश हेच पाशुपत संप्रदायाचे संस्थापक होते का ? तसेच त्यांनीच त्यांनीच पाशुपत सुत्र लिहीली का ? याबद्दल काही तज्ञांना शंका आहे. त्यांच्या मतानुसार पाशुपत संप्रदाय आधीच अस्तित्वात होता किंवा कमी प्रमाणात प्रसार झालेला होता.त्यांच्या मते पाशुपत आणि इतर शैव संप्रदायाची पुनर्बांधणी आणि संस्थापना, सुधारणा करण्याचे श्रेय लकुलिश यांचे आहे. तसेच या तज्ञांच्या मते पाशुपत सुत्र खुप आधीच लिहीले गेले होते, पण लकुलिश यांनी त्यांना सर्वसामान्यांना समजेल अश्या सोप्या पध्दतीने भाषांतरीत केले. एकतर पाशुपत सुत्रांची रचना एकंदरीत प्राचीन वाटते आणि त्यात ती सुत्रे कोणी रचले याचा उल्लेख नाही असा या तज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या सुत्रांची रचना लकुलिश यांनी केलेली नाही असा दावा केला जातो.
पाशुपत संप्रदाय हा सहा मुख्य सिध्दांतापासून बनला आहे. यामध्ये कारण, कार्य, कला, विधि, योग आणि दुखांत हि सुत्र आहेत. लकुलिश यांनी आर्यांच्या आधीच्या काळातील सिंधु संस्कृतीतील कर्मठ परंपरांचे पुनर्संस्थापन केले. तसेच हठयोग आणि तांत्रिक परंपराचे पुननिर्माण केले. तसेच लकुलिश यानी वैदीक, जैन आणि बौध्द धर्माचा हिंसक मार्गाने विरोध केला.
पाशुपत संप्रदाय पाळत असलेली तपस्वी प्रथा :-
पाशुपत संप्रदायी ज्या उग्र प्रथा पाळतात, त्यात दिवसातून तीन वेळा राखेने स्नान करणे, ध्यान करणे आणि ओम मंत्राचा जप करणे, भगवान शिवाची स्तुती आणि आराधना करताना जोरात हसणे, जीभ हासडणे आणि बैलासारखे डुरक्या देणे याचा समावेश होतो.
भगवान शिव यांना समर्पित झालेली व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असु देत पाशुपत संप्रदायी होउ शकते. या लोकांचा पोषाख काळया रंगाचा असतो. तसेच शिवाचे दर्शन घेण्याची आणि पुजेची पध्दत विशिष्ट प्रकारची असते. याच पध्दतीने केल्या जाणर्या काही अस्पष्ट सिध्दांतामुळे आणि काही रहस्यमय प्रथा, तसेच विकृत आणि विभिन्न परंपरा यातून कापालिक आणि काळामुख या दोन तांत्रिक पंथाना जन्म दिला गेला.
मागील लेखात लकुलिश भगवान यांचे जन्म स्थान कायावरोहण, आताचे कारवान बद्दल सविस्तर माहीती दिली आहे. श्री दुर्गविहारी, जुन्या,जाणत्या,जेष्ठ मिपा सदस्यांनी लेखाची दखल घेत वरील महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रतीसादातून दिली.
मौलिया पठारावर,चासिया(Chasia) तलावा काठी लकुलिश मंदिर आहे.गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि आडवे घटक म्हणून प्रवेशद्वार आहे. पण सुपरस्ट्रक्चर्सचे फक्त काही भागच शिल्लक राहिले आहेत. या सुरेख मंदिराचे शिल्लक राहिलेले संरचनात्मक अवशेष म्हणजे त्याचा पाया. मंदिर उत्तम शिल्पे आणि अर्धवट अधिरचनांनी चित्रित केलेले आहे.दैवी प्राण्यांच्या सुंदर आकृती असलेले स्तंभ, ब्रह्मा, विष्णू, कल्याणसुंदर मूर्ती, दक्षिणामूर्ती,गजेंद्र मोक्ष,इंद्र,बसलेली अंबिका,सुरसुंदर इत्यादी शिल्पे उल्लेखनीय आहेत. मंडपाच्या आठ सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांमध्ये किचक (भार वाहक) आहेत जे अर्धगोलाकार छताच्या अष्टकोनी चौकटीला आधार देतात. मंडपाच्या प्रवेशद्वारावर लकुलीशाची प्रतिमा आहे. मंदिरा समोर भग्न आवस्थेतील नंदिची मुर्ती आहे, डोके मुर्तीभंजकानी तोडले असावे. मंदिराच्या आवारात काही सुस्थितीत काही भग्न अवशेष असलेली अनेक शिल्पे रचून ठेवलेली आहेत.
जैन मंदिरे
लकुलिश मंदिरा समोरच एक जैन मंदिर आहे.
गुजराथ मधे जैन धर्मियांचे बाहुल्य असल्याने जैन मंदिरे ठिक ठिकाणी बघावयास मिळतात. गिरीनार,शत्रुघ्न,पावागढ डोंगरावर मुख्य जैन मंदिरांचे समुह आहेत.
पावागढ मधे दिगांबर जैन पंडितांची मंदिरे आहेत.पार्श्वनाथ मंदिर दुधीया तलावा समोर आहे.मंदिर सुस्थितीत आहे.बंद असल्याने आतमधून बघता आले नाही.रिशभनाथ मंदिर आणी इतर जैन मंदिरे वेळे अभावी बघू शकलो नाही.
-
-
पार्श्वनाथ मंदिर
-
खालील शिल्पांचे सटिक वर्णन प्रचेतसच करू जाणे. माझ्यासारख्या येरागबाळ्याचे काम नव्हे.
प्रकाश चित्रे.
-
-
पट्टीवर लकुलीश शिल्प
-
-----
-
विशेश सुचना- काही प्रकश चित्रे उपलोड करता येत नहीत,पुन्हा प्रयत्न करतो.
----
---
-
----
-
-----
-
-----
-
-----
-
----
-
-----
-
-----
-
-----
-
-----
चित्र सीमा
Junagarh Museum Bikaner
In 1465 Rao Bika & his uncle Rawat Kandhal marched off from Jodhpur with 500 soldiers & 100 horsemen to establish new kingdom towards Deshnoke in Jangaldesh. Eventually in 1485 he built a small fort called Rati Ghati. By 1488 city of Bikaner started coming up. After about hundred years Junagarh Fort was constructed in the city. This Fort now houses a well kept museum having a large number of exhibits related to the royal families of Bikaner.
The Fort is in middle of Bikaner & unlike most forts it is not on a hill but on plain ground. Entry is by tickets & guides are also available. A small restaurant & sale counter offers good souvenirs. Afternoons are hot in Bikaner take care. Some snaps from the museum:
![]() |
| Huge Dubar Hall |
![]() |
| Rifles used by the royality with decorated wooden butts having intricate ivory work |
![]() |
| Variety of arrows with different types of heads |
![]() |
| Houda for the royals which was used while riding on elephants |
![]() |
| Palki or Palenquin for the queen |
![]() |
| Palki for the royals |
![]() |
| Palki with purdah |
![]() |
| Toy store. Those were the wooden toys for the royal kids to play with |
![]() |
| That's how they dressed up & wore jewellary |
![]() |
| Royal two wheeler |
https://jogharshwardhan.blogspot.com/2019/08/junagarh-museum-bikaner.html














No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.