Wednesday, May 24, 2023

वेळणेश्वर

http://www.misalpav.com/node/51319

1

रास्तों पर निगाह रखने वाले, मंज़िल कहाँ देख पाते हैं|
सफर तो ताउम्र हैं, दरमियाँ सुकून के दो-पल कमाने है|

घड्याळाच्या काट्याला बांधलेलं आयुष्य स्वीकारून आता उणीपुरी दोन दशके सरायला झालीत. प्रवास सुरु आहे आणि राहील ही, रस्ता पायाखाली तर आहे पण पोहोचणार कुठे व कधी याचा काहीचं अदमास अजूनही लागलेला नाही. त्यामुळेच एखाद्या अनवट वळणावर वाट थोडी वाकडी करून, चाकोरीबद्ध जगण्याला हुल देण्याची लागलेली खोडं काही जाता जात नाही.

2

सह्याद्री आणि समुद्र म्हणजे चाकोरीला मोडण्यासाठी नेहमीच आव्हान देणाऱ्या जागा. वाट वाकडी करून उतरायचं असेलच तर याशिवाय दुसऱ्या पर्यायाचा विचार मी सहसा करत नाही.

3

हया वेळेस वाकडी केलेली वाट मला "वेळणेश्वर" या छोट्याशा पण नितांतसुंदर गावाला घेऊन गेली. अपार निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी, माडा-पोफळी, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे, डोंगरउतारांवरील खाचरांची नक्षी आणि पार्श्वभूमीला समुद्राची घनगंभीर गाज...... निसर्गाचा वरदहस्त या अपरांतक प्रदेशाला लाभला आहे.

4

गुहागर-तवसाळ रस्त्यावरून डाव्या हाताला वळून सड्यावरून जाणारा सपाट रस्ता संपला की मग तीव्र उतारांचा वळणा-वळणांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो. वळणावरून गाडी पास होतांनाच समोर अथांग सिंधू-सागराचं अमोघ दर्शन होतं.

5

वेळणेश्वर हे गुहागरपासून साधारण १५ किलोमीटरवर, वेळणेश्वर-महादेवाच्या साथीने सुमारे १२०० वर्षांपुर्वीपासून जागते-राबते गाव, सभोवताली नारळ-पोफळीच्या बागा, अर्धचंद्राकृती, सुरक्षित आणि स्वच्छ समुद्रकिनारा. किनाऱ्यावरून डाव्या हाताला दिसणारा जिंदाल औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि उजव्या हाताला सुरू होऊन मागे जाणारी टेकडी, झाडांच्या गर्दीतून माना उंचावणारी घरे, रिसॉर्ट्स असा इथला परिसर.

6

कोकणातील अनेक घराण्यांचं कुलदैवत असणाऱ्या इथल्या वेळणेश्वर महादेवाच्या मंदिराचा परिसर तर अक्षरक्ष: भुरळ पाडणारा आहे. प्रशस्त मंदिर आवार, साधारण १० फुट उंचीची दीपमाळ, घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच -तीन फुटी लांबीची पिंड असून पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणातील मुर्त्या आहेत. मुख्य मंदिराला लागुनच काळभैरव, गणपती, लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत.

7

तसेच गावराखा, भुताई या ग्रामदैवतांचं ही एकमंदिर मुख्य मंदिराला लागूनच आहे. संपुर्ण मंदिर परिसर आकर्षक रंगसंगतीमध्ये रंगवला आहे व कटाक्षाने स्वच्छ राखला जातो. मन प्रसन्न करणारी ऊर्जा इथे जाणवत राहते.

8

पर्यटकांसाठी गावात घरगुती तसेच जवळपास काही हॉटेल्स-रिसॉर्ट्स मध्ये सोय होते. वेळणेश्वर भक्त निवासही उपलब्ध आहे.

9

जेवणाबद्दल बोलायचं तर मत्स्यप्रेमींची थोडी निराशा होते कारण पापलेट-सुरमई सारख्या माशांची इथे वानवा आहे. आधी सांगून ठेवलं तरच सोय होऊ शकते. इतर शाकाहारी-मांसाहारी जेवण मात्र अप्रतिम मिळते. MTDC रिसॉर्टचं लोकेशन तर एकदम लाजवाब आहे.

11

समुद्रकिनारा अजिबात गर्दी नसलेला, कुठल्याही प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा गोंगाट नसलेला, पांढऱ्या शुभ्र वाळूचा आहे. किनाऱ्यावरून छोट्या मासेमारी बोटी अतिशय सुंदर दिसतात. या ठिकाणावरून आम्ही पाहिलेल्या सूर्यास्ताचं वर्णन करण्यास तर शब्द ही थिटे पडावे अशी गत.....

11

असो, दोन दिवस निवांत घालवावे अशी ही सुंदर जागा सदोदित अशीच राहो ही वेळणेश्वर चरणी प्रार्थना !!!

Sunday, May 21, 2023

मावळे ट्रेकर ब्लॉग बॅकअप

 

गिर्येचा रामेश्वर – Rameshwar Temple, Girye

गिर्येचा रामेश्वर
रामेश्वर वाडी, देवगड तालुका, सिंधुदुर्ग.

आता विजयदुर्गावरून परतीचा प्रवास सुरू करून अधांर पडला होता. देवगड मालवण रस्त्याने जाताना रामेश्वर अशी पाटी दिसते. रस्त्याला लागूनच एक-दिड किलोमीटरवर रामेश्वराचे मंदिर होते. आम्ही गाडी फिरवली लगेच. काळोखात गाडीच्या उजेडात आम्ही मंदिर नाहीतर त्याचा कळस तरी दिसतोय काय ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण फोकसमध्ये आम्हाला फक्त प्रवेशद्वार दिसले. आम्ही गेलो तिथे. अगदी प्रवेशद्वारात उभे राही पर्यंत मंदिर काय आम्हाला शोधता आले नाही.

मंदिराचे प्रवेशद्वार एकदम छानसे आहे. वरती दोन हत्ती स्वागताला आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार हे जहाजाची डोलकाठी स्वरूपात आहे. जवळच दोन तोफांचे चौथरे आहेत आणि एका चौथऱ्यावरच तोफ दिसते. २०१४ साली एक तोफ चोरीला गेली. जांभा दगडावर लांबलचक १००-१५० मीटरचा खोदलेला  मार्ग आहे.

खाली उतरल्यावर प्रवेशद्वाराजवच एक मोठी घंटा दिसते. पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप यांनी ती अर्पण केलेली आहे.  समोरच प्रवेशद्वाराजवळ सात दिपमाळ आपले लक्ष वेधून घेतात.  श्रीमंत सवाईराव माधवराव पेशवे यांचे सुभेदार गंगाधरपंत भानू (नाना फडणवीसांचे बंधू) यांनी ३०० वर्षापूर्वी मंदिराचे बांधकाम केलेले आहे. पेशव्यांचे सरदार आनंदराव धुळप यांनी पुर्वेकडील प्रवेशद्वार आणि उत्तरेकडील जांभा दगडातील मार्ग उभारलेला आहे.

मंदिराच्या समोरच रेखीव नंदी आहे. पुर्वी मंदिरात नंदीवर बसलेले श्रीदेव रामेश्वराची चांदीची मूर्ती होती पण ती २००९ साली चोरीला गेली. सध्या मंदिरात पिंडीची पुजा केली जाते. मंदिरासभोवती असणारी दगडी फरसबंदी आणि तटबंदी कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांनी केलेली आहे. जवळच संभाजी आंग्रे यांची समाधी दुर्लक्षीत अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला  रामायण आणि महाभारतावर आधारीत भिंतीचित्रे दिसतात.

दरवर्षी माघ महिन्यात इथे महाशिवरात्रीचा उत्सव असतो. इथून पालखी निघते. मंदिरात असणारे रामेश्वराचे मुखावटे आपले लक्ष वेधून घेतात. सध्या रात्रीच्या वेळेस गावकरी मंदिरात आळीपाळीने राखण करत असतात.

रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आता पुढच्या प्रवसाला…

विशाल चं. अडखळे
(मावळे ट्रेकर्स)

प्रवेशद्वार
जांभा दगडावरील मार्ग
प्रवेशद्वार (खाली उतरल्यावर)
सरदार आनंदराव धुळप यांनी अर्पण केलेली घंटा
दगडी दिपमाळ
मंदिर
नंदी
शिवलिँग
पालखी

संभाजी आंग्रे यांची समाधी

https://mavletrekkers.wordpress.com/2019/12/31/girye-rameshwar-temple-goraikar-mavle-trekkers-temples-in-sindhudurg/

चंडीका देवी मंदिर, दाभोळ

चंडिका देवी मंदिर, दाभोळ.

ठिकाण – चंडीका देवी मंदिर, दाभोळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
जवळचे रेल्वे स्टेशन – खेड.
जवळचे एसटी स्टॕंड – दापोली.

मनमोहक आणि सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे ‘सी गल’ पक्षी, याच दरम्यान मधूनच कधीतरी घडणारे डॉल्फीनचे दर्शन, हर्णे बंदरावरचा मासळी बाजार, सुवर्णदुर्ग, मंडणगड,  बाणकोट यांसारखे गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्हातील दापोली तालुक्यात वसलेले दाभोळ हे गाव “दालभ्य” ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य झालेले असून एक निसर्गरम्य आणि हिरवेगार गाव अशी ओळख आहे.

दाभोळ बंदराजवळ वाशिस्ठी नदीच्या तीरावर चंडीका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडल्या डाव्या बाजूच्या पठारावर तीन किलोमीटर अंतरावर चंडिकादेवीचे मंदिर आहे. एकसंध कातळात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शेंदूर लावलेली मूर्ती आहे. अशा या श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया या मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण दाभोळवर देवीच्या नजरेची सावली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. चंडीका देवीचे मुख नैऋत्य दिशेला असून देवीला चार हात आहेत. उजव्या हातात तलवार, डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुधे आहेत. 

देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे.  गुहेचे तोंड चांदीच्या पत्र्याने मढवलेले असून, लहान असल्याने आत वाकून जावे लागते. गुहेत अंधार असून ठिकठिकाणी दिवे लावलेले आहेत तसेच कृत्रिम दिवे किवा टाॕर्च घेऊन जाण्यास मनाई आहे. नवरात्रीत मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरती होते आणि दसर्‍याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे रूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावते अशी ओळख आहे. उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात.

शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली होती. तेव्हा मोहिमेदरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिली होती, असा इतिहासात उल्लेख आलेला आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले असल्याचे येथील  स्थानिक सांगतात.  फार पूर्वी दालभ्य ऋषींनी इथल्या गुहेत तप-साधना केल्याचे सांगितले जाते.

खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमीरूद्दीन बालापीर, अंडा मशिद आपले वैशिष्ट्ये जपून आहेत. अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे.
चिपळूणकडून येणारी वशिष्टी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळ गड, टाळकेश्वराच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारुती मंदिर, समुद्रकिना-याला लागूनच वाढलेले सुरुचे दाट वन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड आपल्या हिरव्यागार झावळय़ांचा गुच्छा करून वा-याच्या झुळकीने येणा-यांचे स्वागत करत असतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तर ही निसर्गाची शोभा बघण्यासारखीच असते.

– विशाल चं. अडखळे.
मावळे ट्रेकर्स

Insta ID – Trekkie_Vishu

गाव किलोमीटर दर्शक – Milestone

गाव किलोमीटर दर्शक
(माईल स्टोन)

“0 कि.मी.” अशी प्रवासात रस्त्यावर पाटी दिसली आणि आपला प्रवासाचा शेवट तिथे होणार असला की प्रवास कितीही लांबचा असूदे आपला प्रवासाचा थकवा लगेच दुर निघून जातो,  शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि ओढ लागते तिथे पोहचण्याची. काहींना प्रवासाचा वैताग आला असेल तर त्यांना पाटी बघून हायसं वाटतं ! आणि खिडकीत बसलेल्या काही उत्साही मंडळींना प्रवास संपल्यामुळे कधी हिरमुसल्यासारखं वाटत !

असे हे गाव किलोमीटर दर्शक (माईल स्टोन) आपल्याला ठिक ठिकाणी हमरस्त्यावर/ हायवेवर मोठ्या गावाच्या किंवा शहराच्या नावाने लावलेले दिसतात. त्यावरचा भाग काही ठराविक रंगाने रंगीत केलेला असतो आणि खाली ठिकाणाचे नाव आणि किलोमीटर दर्शवलेले असते. बहुतेक प्रवासी फक्त किलोमीटर आणि ठिकाणाचे नाव सोडून कशावर जास्त लक्ष देत नाहीत.

यावर खालच्या भागातील रंग हा पांढरा असतो आणि त्यावर काळ्या अक्षरात किलोमीटर आणि ठिकाणाचे नाव लिहिलेले असते. तर वरच्या भागात लावलेल्या रंगाचं पण गुपीत आहे. हे रंग पिवळ्या, हिरव्या, काळ्या/निळ्या, लाल रंगात असतात आणि त्यावर महामार्ग क्रमांक लिहिलेला असतो. पिवळा रंगातले किलोमीटर दर्शक हे राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) लावलेले असतात. हिरव्या रंगातले किलोमीटर दर्शक हे राज्य महामार्गावर (State Highway) लावलेले असतात. काळ्या/निळ्या रंगातले किलोमीटर दर्शक हे कोणत्यातरी मोठ्या गावाचं किंवा जिल्ह्याच अंतर दर्शवितात आणि लाल रंगातले किलोमीटर दर्शक हे आपण कोणत्यातरी गावात आहोत हे दर्शवितात.

पुर्वी google map सारखे साथीदार प्रवाशांच्या, वाटसरूंच्या सोबतीला नव्हते तेव्हा या दगडी दर्शकांनी अगदी मोलाची कामगिरी बजावलीय आणि या आजच्या काळातही वाटसरूंना वेळप्रसंगी यांचाच आधार वाटतो.

– विशाल अडखळे.

(मावळे ट्रेकर्स)

फोटो साभार – स्वप्निल लोंढे



आंबेनळी घाट, जावळी -Ambenali Ghat, Jaoli.

आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर आहे. हा राज्य महामार्ग क्र.७२  असून एकूण ४० कि.मी. लांबीचा गाडीरस्ता आहे. घाटाची उंची सर्वसाधारणपणे ६२५ मी (२०५१ फुट) आहे. 

महाबळेश्वर ते पोलादपूर मध्ये दोन घाट आहेत ‘फिट्झेराल्ड’ हा महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशी पर्यंत आहे तर दुसरा ‘आंबेनळी’ हा कुंभरोशी ते पोलादपूर पर्यंत आहे. (संदर्भ – महाराष्ट्रातील घाट रस्ते). जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. जावळी म्हणजे सह्याद्रीतलं काळीज! जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचा प्रदेश खुपच घनदाट. दिवसा जमीनीवर सुर्यकिरणे पडणे देखील कधी मुश्कील होत. जावळीच्या खोऱ्यात उतरणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या तोंडात उतरण्यासारखे झाले.

जावळी मुलखात पारघाट, कोंडेनळी घाट, रडतोंडी घाट, ढवळाघाट, हातलोटचा घाट, सापळाखिंड, कावल्या-बावल्या, अन्नछत्राची नाळ, बोराटयाची नाळ, वरंधा-घाट, आंबेनळीघाट इ. सुमारे 60-62 घाट होते.

१५ जानेवारी १६५६ या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले आणि चंद्रराव मोरेंचा पाडाव करून जावळी ताब्यात घेतली. त्यानंतर १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवरायांनी जावळीच्या प्रतापगडावर स्वराज्यावर धावून आलेला अफझल  खानासारखा राक्षसी शत्रू जाया केला. पोवाडेकार म्हणतात. “जाऊ जाणे येऊ नेणे अशी गत अबदुल्ल्याची झाली.”

हा घाटरस्ता ऐतिहासिक काळातील असून सोंडेवरून उतरणाऱ्या  ऐसपैस वळणदार पायवाटा आज ही इतिहासाच्या पाऊलखुणा जपून आहे. शिवकाळात हा रडतोंडीचा घाट म्हणून परिचित होता. गंमतीने म्हणायचे तर, अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या अफाट सैन्याला स्वराज्याच्या मावळ्यांनी इथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी पार रडतोंडीला आणले होते म्हणून हा रडतोंडी घाट! प्रतापगड भेटीच्या वेळी अफझलखानाची छावणी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पारसोंड या गावी पडलेली. पारसोंड या गावातून प्रतापगड दिसत नाही पण प्रतापगडावरून गाव दिसतो, हिच ती सह्याद्रीची आणि महाराजांची किमया!

आंबेनळी घाटाच्या पुर्वेस प्रतापगड आणि महाबळेश्वर, पच्छिमेस महाड पोलादपूर, दक्षिणेस सुमेरगड  आणि उत्तरेस  चंद्रगड, मंगलगड आणि रायगड आहे.  ह्या घाटमार्गातून तान्हाजी मालुसरे यांचे ऐतिहासिक गाव उमरठ, चंद्रगड (ढवळे गाव), प्रतापगड आणि  महाबळेश्वर येथे जाता येते.  तर उत्तरेस सावित्री आणि ढवळी नदी आहे.

जवळची पाहण्यासारखी ठिकाणे :-
१) तान्हाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी  आणि शिवकालीन कुंभळजाई मंदिर (उमरठ गाव)
२) मोरझोत धबधबा (खोपड गाव)
३) चंद्रगड  (ढवळे गाव)
४) प्रतापगड
५) महाबळेश्वर
६) बहिरीची घुमटी (चंद्रगड ते आॕर्थर सीट ट्रेक दरम्यान)
७) आदीशक्ती श्रीरामवरदायिणी मंदिर (पार गाव)
८) कोयना नदीवरील शिवकालीन पूल

कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात आता गाड्यांची वर्दळ देखील बरीच वाढलेली आहे. या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाण ही बरेच वाढलेले आहे.

– विशाल चं. अडखळे.
(मावळे ट्रेकर्स)

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...