गेल्या आठवड्यात शनिवार-रविवारला जोडून बुद्ध पौर्णिमेची सुटी आली आणि आम्ही चिकमगळूर भागात फिरायला जायचं ठरवलं.
चिकमगळूर हा भाग पश्चिम घाटात आहे. डोंगरदर्या, जंगले यांनी नटलेला
आहे. अनेक प्रेक्षणीय ठिकाणे या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी आम्ही ’कळसा’
भागातली काही ठिकाणं आणि हळेबिडू इथलं होयसळांच्या काळातलं पुरातन मंदिर
बघण्याचं ठरवलेलं होतं. तीनच दिवसांची ही सहल असल्यामुळे एवढंच पुरेसं
होतं. बंगळूरहून साधारण साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे.
शुक्रवारी सकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास घरून निघालो. बंगळूर-मंगळूर
राष्ट्रीय महामार्गाला लागलो. वाटेत नाश्ता करून आणि कॉफी पिऊन पुढे
निघालो. हासन हे या मार्गावरचं सर्वात मोठं शहर आहे. एच. डी. देवेगौडा
यांचा हा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ
आलेल्या असल्यामुळे प्रचाराचं वातावरण थोडंफार जाणवत होतं.
बेलूरच्या थोडं पुढे गेल्यावर घाटाचा रस्ता सुरू झाला. रस्ता एकदम छान
होता. कोकणातल्यासारखीच आजूबाजूला झाडी. पुढे पुढे गेल्यावर मग
डोंगरउतारांवरचे चहाचे मळे आणि कॉफीच्या बागाही दिसायला लागल्या. आम्ही
जिथे राहणार होतो, त्या हॉटेलचं नाव ’कापी काडु’ असं होतं. कापी म्हणजे
कॉफी आणि काडु म्हणजे जंगल. दुपारी एक-दीडच्या सुमारास आम्ही तिथे पोचलो.
ही एक कॉफी इस्टेटच आहे. शिवाय सुपारीची बाग आहे. त्यातच मधे छोटं हॉटेल
बांधलेलं आहे. हॉटेलचे मालक भेटले. त्यांच्या वडिलांनी चाळीसेक
वर्षांपूर्वी ही इस्टेट विकत घेतली. हे हॉटेल मात्र त्यांनी अगदी अलीकडे
बांधलेलं आहे. या परिसरात फिरताना हे ’मॉडेल’ सगळीकडे दिसतं. कॉफी आणि
सुपारीची बाग आणि त्याला जोडूनच होम स्टे/ हॉटेल.

साधी, मोठी खोली होती. हवा छान होती. पावसाळी हवामान होतं. समोरूनच भद्रा नदी वाहत होती. ही नदी इथून जवळच असलेल्या कुद्रेमुख भागात उगम पावते. शिवमोग्याला ती तुंगा नदीला मिळते आणि मग पुढे ती तुंगभद्रा म्हणून वाहते. तुंगभद्रा नदी आम्ही काही वर्षांपूर्वी हंपीला गेलो असताना पाहिली होती. तिचं हे बाल- किंवा किशोरीरूप आहे असं म्हणायला हरकत नाही. मे महिन्यातही खळाळत वाहण्याइतकं पाणी तिला होतं. नदीत उतरून पाण्यात खेळायचं असेल, तर सुरक्षित जागाही तिथे आहे. तिथे काही सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे असं कळलं. तिसर्या दिवशी तिथे चित्रीकरणाची तयारी चालू असलेली आम्हीही बघितली. एक जीप किनार्यावरून जोरात पाण्यात येताना दोन-तीन वेळा दिसली. कुठला तरी पाठलागाचा वगैरे सीन असणार! आम्ही काही नदीच्या पाण्यात उतरलो नाही, पण आमच्यानंतर दुपारी उशिराने तिथे मुंबईची दोन कुटुंबं येऊन पोचली, त्यांनी मात्र पाण्यात खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नदी, समोर दिसणारं जंगल आणि त्यातली उंच उंच झाडं बघून इथे बरेच पक्षी दिसतील, हा माझा अंदाज खरा ठरला.
प्रवासातून आल्यावर थोडे ताजेतवाने होऊन आम्ही लगेचच जेवायला गेलो. जेवण
तिखट आणि चविष्ट होतं. प्रत्येक जेवणात काही ना काही स्थानिक खासियतीचा
पदार्थ होताच. पोळ्या, दोन भाज्या, एखादी चटणी किंवा कोशिंबीर, भाताचा
पुलावासारखा एखादा प्रकार, सांबार, रसम आणि शिवाय साधा पांढरा भात आणि गोड
पदार्थ असा एकंदर प्रत्येक जेवणाचा मेनू होता. पहिल्या दिवशी गोड म्हणून
गूळ आणि ओल्या नारळाचं सारण भरलेली पोळी होती. ’अप्पे मिडि’ नावाचे, मलनाड
भागात येणारे खास लोणच्यासाठीचे लहान लहान आंबे (कैर्या) असतात. छोट्या
छोट्या अख्ख्या कैर्यांचं हे लोणचं एकदम वेगळंच, चटकदार लागतं. यापूर्वी
नाव ऐकलं असलं, तरी इथे पहिल्यांदाच हे लोणचं खाल्लं. ते खूपच आवडल्यामुळे
नंतर परत निघताना लोणच्याची एक बाटली विकत घेतली!
थोडी विश्रांती घेऊन मग आम्ही नदीच्या काठाने फिरायला गेलो. नदीपात्रातल्या मोठ्या सपाट खडकांवर निवांत बसलो.
ढगाळ हवेमुळे फार ऊनही नव्हतं. पक्षी दिसत होते. या काठावरून त्या काठावर
उडत जाणारे मलबार राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल) बघणं, रॅकेट-टेल्ड
ड्रॉंगो आपली लांबलचक आणि टोकाला पिसासारखा आकार असणारी शेपटी मिरवत उडताना
बघणं म्हणजे ’आहाहा’ अनुभव! अनेक पक्ष्यांचे आवाज येत होते. तांबटासारख्या
काहींचे आवाज ओळखता येत होते, अनेक आवाज ओळखता येत नव्हते.

मलबार राखी धनेश
रॅकेट-टेल्ड ड्रॉन्गो (पल्लवपुच्छ कोतवाल)
हॉटेलमालकांशी थोड्या गप्पा झाल्या. ते म्हणाले की नदीच्या पलीकडच्या
बाजूला हरणं, रानडुकरं सर्रास दिसतातच, पण गेल्या वर्षीपासून हत्तीही
दिसायला लागले आहेत. ते बागेत घुसून नुकसानही करतात. त्यांच्या दृष्टीने
हत्ती त्रासदायक असणं बरोबरच आहे, पण आम्हाला मात्र हत्ती बघायला मिळाले
असते तर आनंद झाला असता. 
संध्याकाळी चहा-खाणं झाल्यानंतर अंधार पडत असताना अंगणात निवांत बसलेलो
असताना मलबार व्हिसलिंग थ्रश ( मलबार शीळकरी कस्तुर) या पक्ष्याची शीळ ऐकू
येऊ लागली. माणसाने शीळ वाजवावी, तशा आवाजातली ही सुरेल शीळ रेकॉर्ड
करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. पश्चिमेला आकाशात शुक्र
छान तेजस्वी दिसत होता. बाकीच्या आकाशात मात्र ढग होते. त्या दिवशी
छायाकल्प चंद्रग्रहण होतं, पण ढगांमुळे चंद्र दिसत नव्हता.
शुक्र

रात्री जेवायच्या वेळेस अजून एक कुटुंब येऊन पोचलं. ते आदल्या दिवशी
येऊन आज दिवसभर ’टेम्पल व्हिजिट’ करत होते असं कळलं. या भागात कळसेश्वर,
अन्नपूर्णेश्वरी आणि अजून बरीच देवस्थानं आहेत. बेलूर तर प्रसिद्धच आहे.
शृंगेरीलाही इथून रस्ता जातो.
दुसर्या दिवशी कुठे कुठे जायचं हे आम्ही ठरवत होतो. राणी झरी पॉईंट आणि
क्यातनमक्की नावाचा सनराईज/सनसेट पॉईंट ही दोन ठिकाणं नक्की बघावीत असं
हॉटेलच्या स्टाफचा आग्रह होता. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानही इथून अगदी जवळ
आहे. पण तिथे जाण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागते असं सगळेजण सांगत होते.
मात्र कुठल्याही वेबसाईटवर असा उल्लेख दिसत नव्हता. कुद्रेमुख शिखरावर
चढाई करायची असेल तर आगाऊ परवानगी घ्यावी लागते असंच सगळीकडे लिहिलेलं
होतं. कुद्रेमुख हे मलयनगिरीनंतर कर्नाटकातील दुसर्या क्रमांकाचं उंच शिखर
आहे. कन्नडमध्ये कुद्रे म्हणजे घोडा. मुख म्हणजे अर्थात तोंड. या शिखराचा
आकार एका बाजूने घोड्याच्या तोंडासारखा दिसतो म्हणून हे नाव पडलेलं आहे.
ट्रेकिंग वगैरे करण्याचा आमचा यावेळी विचार नव्हता. पण तिथे बरेच पक्षी
दिसतात, ते बघायची मात्र इच्छा होती. त्यासाठी परवानगी लागणार नाही असं
आम्हाला वाटत होतं त्यामुळे उद्या तिथे जाऊन तर बघू, आत सोडलं तर जाऊ,
नाहीतर परत फिरू असं ठरवलं.
पहाटे चारच्या सुमारास जाग आली तेव्हा बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं म्हणून आम्ही दोघं जरा वेळ खोलीच्या बाहेर खुर्च्यांवर जाऊन बसलो. शांतता असली, तरी नदीचा खळखळाट, जंगलातून येणारे काही पक्ष्यांचे अनोळखी आवाज ऐकू येत होतेच. थंडी होती. बराच वेळ छान गेला. अचानक नदीच्या पात्रातून कुठला तरी प्राणी अलीकडच्या काठावर उडी मारून चढल्याचं दिसलं. नंतर मात्र काही आवाज आला नाही आणि काही दिसलं नाही, पण कुणीतरी टॉर्चचा प्रकाश अलीकडच्या काठावर टाकत होतं. हा काय प्रकार असावा ते तेव्हा समजलं नाही, पण दुसर्या दिवशी राघव (हॉटेलचे मालक) यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की रात्री इथे मासेमारी करायला लोक येतात, त्यांच्यापैकी कुणीतरी असणार. प्राणी कुठला होता ते मात्र कळलं नाही.
सकाळी उठून चहा-नाश्ता आटपून कुद्रेमुखला जाण्यासाठी निघालो. अर्ध्यापाऊण तासात तिथे पोचलोदेखील. पण प्रवेशाच्या ठिकाणी असलेल्या वनखात्याच्या अधिकार्यांनी अडवलं आणि परवानगी घेतली आहे का, असं विचारलं. ती आमच्याकडे नसल्यामुळे (ट्रेकिंग करायचं नसेल तरी) आत जाता येणार नाही हे त्यांनी संगितलं. कालपासून सगळ्यांकडून हे ऐकलं होतंच, पण आता खुद्द कुद्रेमुखातून ( from Horse's mouth) ते ऐकलं असा विनोद करत आम्ही मागे फिरलो आणि राणी झरीला जायच्या रस्त्याला लागलो!
रंगनाथिट्टू, श्रवनबेलगोला यापेक्षा चिकमगळुर वेगळं आहे. सकलेशपुरही आहे. हा भाग खूप सुंदर आहे.
आम्ही उडुपी रेल्वे स्टेशन सुरुवात(कृष्णमंदीर), श्रृंगेरी(मठ परिसर आणि शारदंबा देवस्थान), चिकमगळुरू (इनाम दत्तपीठ उर्फ बुधनगिरी शिखर-माणिक्यधारा धबधबा-होन्नेमारा धबधबा, बेलवडी-हळेबिडू-बेलूर, कडूर रेल्वे स्टेशनहून परत ठाणे अशी सहल केलेली. कुठल्या रिझॉटला नाही राहिलो परंतू जमेल तेवढं पाहिलं. (मार्च २०२०)
जो
(केवळ) गूगल मॅपवर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला, असा अनुभव कधी कधी
येतो, तसा आम्हाला राणी झरीच्या बाबतीत आला. नकाशात राणी झरी एज पॉइंट आणि
राणी झरी व्ह्यू पॉइंट असे दोन पॉइंट्स अगदी शेजारी शेजारी दिसत होते.
आम्हाला वाटलं, आपल्याला कुठलाही चालेल. कुद्रेमुखाहून निघताना आम्ही
एज पॉइंट निवडला. मुख्य रस्ता सोडल्यावर अत्यंत अरुंद, वळणावळणाच्या आणि
खडबडीत रस्त्यावरून बराच वेळ गाडी चालवल्यावर एका ठिकाणी उजवीकडे एकदम
सुरेख दृश्य दिसलं. पुढे आलेला एक कडा आणि लांबच लांब पसरलेल्या दर्या आणि
डोंगर.
समोरच्या बाजूला दिसणारं दृश्य
तिथे जरा वेळ थांबून पुढे निघालो. जरा वेळाने गूगल मॅपने अचानक ’मागे
फिरा, मागे फिरा’ असा आग्रह करायला सुरुवात केली. तोवर आम्ही चढण संपवून
उताराला लागलो होतो. वाटेत तर कुठला फाटा दिसला नव्हता. या अशा रस्त्यावरून
परत परत यू टर्न मारणं शक्यतो टाळावं, म्हणून तिथे जवळच असलेल्या एका होम
स्टेमधल्या लोकांना विचारलं, तर त्यांनी राणी झरीला जाण्यासाठी अजून पुढे
बर्यापैकी अंतर आहे असं सांगितलं. गूगल तर मागे वळायला सांगत होतं. शेवटी
असं ठरवलं की आधी गूगलचं ऐकून मागे जाऊन बघू. एखादेवेळी दुसरा रस्ता असेल.
मागे जाऊन पाहिलं, तर उजवीकडे दोन कच्चे रस्ते जात होते. तिथून वर तीनेक
किलोमीटर चालत जाऊन हा पॉइंट आहे असं गूगलचं म्हणणं होतं. चालायला आमची
हरकत नव्हती, कारण बारा वाजायला आलेले असूनही फारसं ऊन नव्हतं. शिवाय गाडी
खाली ठेवून थोडं चढावं लागतं, हेही आम्ही सगळ्यांकडून ऐकलं होतं. पण आम्ही
चालायला सुरुवात केली आणि थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक तीन मोठे कुत्रे
जोरात भुंकत आमच्याकडे यायला लागले. आसपास कुणी मनुष्यप्राणी नव्हता. हे
ठिकाण तर अगदीच एका बाजूला. त्यामुळे आम्ही घाबरून लगेचच माघार घेतली.
कुत्र्यांनीही जरा वेळाने आमचा नाद सोडला आणि आम्ही परत गाडीत येऊन बसलो.
अजूनही कुत्र्यांच्या भीतीने धडधडत होतं. तिथे कदाचित पुढे असंच एखादं होम
स्टे असेल आणि त्यांचे ते पाळलेले कुत्रे असतील, त्यामुळेच ते आपल्या
हद्दीचं संरक्षण करत असावेत.
असो. मग गूगलचा नाद सोडून माणसांनी सांगितल्याप्रमाणे पुढे गेल्यावर एक
चांगला रुंद रस्ता लागला. दहापंधरा मिनिटांत राणी झरी कॉफी शॉप दिसलं. हीही
खूण जुळली. तरी (ताक फुंकून प्यावं म्हणून) कॉफी पिण्याच्या निमित्ताने
गाडी थांबवून त्या कॉफी शॉपमधे गेलो आणि त्यांच्याकडून रस्त्याची खात्री
करून घेतली. मुख्य रस्ता सोडून वर जाणार्या वळणावळणाच्या आणि पुढे पुढे
खराब होत गेलेल्या रस्त्याने वीसपंचवीस मिनिटं गाडी चालवल्यावर अखेर आम्ही
इष्ट स्थळी पोचलो. गाडी तिथे ठेवून एक लहानसा चढ चढून व्ह्यू पॉइंटला
पोचलो. आहाहा.. काय सुंदर दृश्य होतं!

चारही बाजूंना खोल दर्या, लांब लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या
डोंगररांगा (मला आधी वाटायचं की सह्याद्री हा पश्चिम घाटाचा फक्त
महाराष्ट्रातला भाग आहे. पण तसं नाहीये. पूर्ण पश्चिम घाटाचंच सह्याद्री हे
दुसरं नाव आहे.). हा या भागातला पश्चिमेकडचा सर्वात शेवटचा उंच बिंदू आहे
असं समजलं. यानंतर थेट समुद्रापर्यंत मधे कसलाच अडथळा नाही, त्यामुळे हवा
चांगली स्वच्छ असेल आणि आपल्याकडे दुर्बीण असेल तर इथून अरबी समुद्र दिसू
शकतो. आम्ही गेलो तेव्हा हवा स्वच्छ नव्हती, त्यामुळे तो प्रश्न मिटला! पण
आजूबाजूचं दृश्य खरोखरच अप्रतिम होतं. सिंहगड, रायगड किंवा कुठल्याही
किल्ल्यावर चढताना आपण दमतो, पण एकदा का वर पोचलो, की मागे वळून खालचं
दृश्य बघताना आणि भणाणणारा वारा अंगावर घेताना त्या सगळ्या दमण्याचं चीज
झाल्याची भावना मनात निर्माण होते. इथे आम्ही तशा अर्थाने दमलेलो नसलो, तरी
तीच भावना इथेही मनात आली. आधी आम्ही जिथे जायला निघालो होतो, तो ’एज
पॉइंट’ इथून खूप जवळ होता, दोन्ही पॉइंट्सच्या मध्ये पायवाटही असलेली
दिसली. पण रस्त्याने यायला मात्र वीसेक किलोमीटरचा वळसा होता! आम्ही काही
त्या पायवाटेने तिकडे जायचा प्रयत्न केला नाही. अशा ठिकाणी स्थानिक
मार्गदर्शक सोबत असल्याशिवाय जाणं धोकादायक असू शकतं याचा अनुभव नुकताच
घेतला होता! चारही बाजूंना दिसणारं दृश्य डोळ्यात साठवून आम्ही खाली उतरलो.
गाडीत बसून खाली यायला निघालो. उतरताना एका वळणावर अचानक एक मोर दिसला!
आम्ही गाडी थांबवली आणि फोटो काढले. मग गाडी हळूहळू त्याच्याजवळ नेली तरी
तो न बिचकता चालत राहिला. गाडी अगदी जवळ गेल्यावर मात्र तो धावत निघून
गेला.
खाली मुख्य रस्त्यावर आल्यावर त्या कॉफी शॉपमधून स्थानिक चहा आणि कॉफीचं एकेक पाकीट विकत घेतलं. आता भुका लागल्या होत्या त्यामुळे तडक ’कापी काडु’मध्ये जायला परत निघालो. त्या दिवशी दुपारच्या जेवणात आमसुलांचं रस्सम होतं. सोलकढी नाही, रस्समच. आमसुलं, मिरची, मीठ आणि फोडणी, इतकेच घटक असावेत, पण चव मस्त जमली होती!
संध्याकाळी क्यातनमक्की सनसेट पॉइंटला जाण्यासाठी आदल्या दिवशी जीप
सांगून ठेवली होती. त्यानुसार साडेचार वाजताच एक ड्रायव्हर महिंद्रा थार
घेऊन हजर होता. आधी पंधराएक मिनिटं छान गुळगुळीत रस्त्यावरून गेलो. हाच
रस्ता पुढे शृंगेरीला जातो. मग एक कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने थोडा
वेळ गेल्यावर एक चेक पॉइंट आला. तिथे प्रवेश फी दिल्यावर मग मात्र पुढे जो
काही रस्ता सुरू झाला, त्याला ’रस्ता’ म्हणणं ही अतिशयोक्ती होईल. खडकाळ
रुंद वाट असं त्याचं वर्णन करता येईल. दोन्ही हातांनी जिथे जमेल तिथे जीपला
घट्ट धरून आम्ही एकमेकांची त्रेधातिरपिट बघून हसत होतो. मी मागच्या सीटवर
बसले होते. जीपच्या समोरच्या बाजूला बघितलं तर ’इथून आपण कसे जाणार?’ असा
प्रश्न त्रास देत असल्यामुळे, त्यापेक्षा मागच्या बाजूच्या रस्त्याकडे बघून
’अरे वा! आपण इथून पुढे आलो’ असा विचार करणं सोपं होतं. शेवटी एकदाचा तो
रस्ता संपला! समोर एक बंद गेट होतं. त्याच्या शेजारून पायी आत जायला जागा
होती. तिथून वर चढायचं होतं. इथे अजिबात झाडी नव्हती. सगळा गवताळ भाग. मला
चक्राताजवळच्या बुधेर गुंफांच्या परिसराची आठवण झाली. तिथेही आपण वर चढताना
भरपूर झाडीतून चढतो, पण वरती पोचल्यावर असाच गवताळ भाग आहे. इथेही
आजूबाजूला गाईगुरं चरत होती. वरच्या टोकावर पोचलो आणि परत एकदा सभोवतालचं
भव्य दृश्य बघून डोळे विस्फारले! लांबच लांब पसरलेल्या डोंगरदर्या आणि
त्यावर तरंगणारे ढग. हे दृश्य पाहण्यासाठी त्या खडकाळ रस्त्यावरून
येण्याची किंमत तेवढी द्यावी लागते!
तिथे बसण्यासाठी चक्क तीनचार बाक ठेवले आहेत. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त,
दोन्ही सुंदर दिसत असणार यात शंकाच नाही. पण आत्ता मात्र ढग असल्यामुळे
आम्हाला सूर्य दिसलाच नाही. घाट चढून वर जाताना निसर्ग रौद्रसुंदर वाटतो.
शिखरावर पोचलं की मात्र रौद्रता न जाणवता फक्त भव्यता जाणवते. तिथून बघताना
भीती वाटत नाही. त्या भव्य रूपाबद्दल एक प्रकारचा आदर वाटतो.
सगळ्या बाजूंना फिरून पाहताना वेळ कसा गेला ते समजलं नाही. आमच्याशिवाय काही इतरही पर्यटकांचे गट तिथे आलेले होते.
हुडहुडी भरवणारा गार वारा वहात होता. या तीनही दिवसांमध्ये आम्ही सध्या
उन्हाळा सुरू आहे, हे जवळजवळ विसरूनच गेलो होतो. समोरून ढगांची एक फळी
आमच्या दिशेने चालून येत होती. गारवा वाढत होता, पावसाचे तुरळक थेंब पडत
होते. काळोख पडण्याच्या आत त्या खडकाळ वाटेवरून पलीकडे गेलेलं बरं, असा
विचार करून आम्ही खाली उतरलो. या असल्या रस्त्यांसाठी महिंद्रासारख्या रफ
& टफ गाड्याच हव्यात आणि चालकही तितकाच ’तयार’ हवा. उतरताना तर त्या
रस्त्यावर मला जास्तच भीती वाटत होती. पण अर्थातच आम्ही सुरक्षितपणे
खालपर्यंत पोचलो आणि हॉटेलवर परतलो. आज संध्याकाळच्या चहाबरोबर कांदा भजी
होती.
आज रात्री इथे फक्त आम्हीच होतो.बॅगांची थोडीफार आवराआवर केली. उद्या
सकाळी इथून निघून वाटेत हळेबिडूला थांबून बंगळूरला परत जायचं होतं.
हॉटेलमध्ये दगडगोट्यांपासून बनवलेली दोन चित्रं लावली होती.
१
२
तिथे दिसलेले काही पक्षी
सुतारपक्षी (greater flameback)
हाही तोच आहे.
Vernal hanging parrot
हाही तोच.
खंड्यावलोकन 

निघायच्या दिवशी सकाळी कॉफी इस्टेटमध्ये एक चक्कर मारली. कॉफीव्यतिरिक्त त्या बागेत फणस, आंबे, सुपारी, त्यावर चढवलेले मिरीचे वेल होते. मला आमच्या गावाला (कॉफी वगळता) हे सगळं बघण्याची सवय आहे. मात्र एक फरक म्हणजे इथे ही निव्वळ एक ’इस्टेट’, उत्पन्नाचं साधन आहे असं वाटतं. चूक-बरोबर असा मुद्दा नाही, पण फरक जाणवतो, एवढं खरं. असो!
आज नाश्त्याला चविष्ट नीर दोसे आणि चटणी होती. कॉफी पिऊन कापी काडुचा
निरोप घेतला. इथून अप्पे मिडि लोणच्याची बाटली आणि राणी झरी कॉफी शॉपमधून
इथल्या स्थानिक कॉफी आणि चहाची एकेक पाकिटं विकत घेतली होती. हा शांत,
निवांत परिसर खूपच आवडला होता. खूप पक्षीही दिसले होते. परत अशीच एक ट्रिप
काढून तेव्हा कुद्रेमुखला ट्रेकिंग करण्याचा बेत मनात आखत आम्ही हळेबिडूला
जाण्यासाठी निघालो. बेलूरपर्यंतचा रस्ता आता ओळखीचा होता. दुपारी
बारा-साडेबाराला हळेबिडूला पोचलो.
हळेबिडू किंवा हळेबीड ही होयसळांच्या काळातली राजधानी. तिथल्या होयसळेश्वर
मंदिरापाशी आम्ही पोचलो. याला ’द्वारसमुद्र’ असंही म्हटलं जात असे.
मंदिराच्या बाहेर एक मोठा तलाव आहे, त्यावरून हे नाव पडलं आहे. बाराव्या
शतकात बांधलेलं हे शंकराचं मंदिर आहे. अशी एक कथा सांगितली जाते की सळा
नावाचा एक मुलगा गुरुकुलात शिकत होता. त्या गुरूंच्या आश्रमात एका वाघाने
हल्ला केला. वाघाला पाहताच बाकी सगळी मुलं पळून गेली, पण सळा मात्र शूर
होता. वाघ आपल्या गुरूंना मारून टाकणार हे पाहताच त्याने वाघावर हल्ला केला
आणि वाघाला मारलं. तो वाघाशी लढत असताना त्याचे गुरू ’होय सळा’ असं ओरडून
त्याला प्रोत्साहन देत होते. याच मुलाने पुढे साम्राज्य स्थापन केलं,
त्याचं नाव होयसळा. वाघाशी लढाई करणारा लहान मुलगा हे होयसळांचं राजचिन्ह
बनलं. हे राजचिन्ह आणि इतरही कित्येक सुंदर शिल्पांनी नटलेलं हे मंदिर आहे.
मुसलमानी आक्रमणांमुळे अनेक शिल्पं भंगलेली आहेत, पण अनेक शिल्पं टिकूनही
आहेत.
तिथे आम्ही एका गाईडला सोबत घेतलं. त्यांनी चांगली माहिती सांगितली. पण अशा
ठिकाणची शिल्पं नीट समजून घेऊन बघायची म्हटली तर दोन-तीन दिवस तरी हाताशी
हवेत. यावरून आठवलं, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कार्यक्रमात श्री. प्र.
के. घाणेकरांनी प्रसिद्ध मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर
यांच्याबरोबर वेरुळचं कैलास लेणं पाहिल्याची आठवण सांगितली. जवळजवळ सातआठ
तास डॉ. देगलूरकर कैलास लेणं दाखवत होते. शेवटी जेवणाची वेळ उलटून चालली
म्हणून थांबावं लागलं, तोपर्यंत कैलास लेणं फक्त एक तृतीयांशच बघून झालेलं
होतं!
कोणार्कचं सूर्यमंदिर, हंपी अशा ठिकाणची विपुल शिल्पं बघताना जसं वाटलं
होतं, तसंच इथेही वाटलं, की इथे वेळ काढून परत परत आलं पाहिजे.
या मंदिराचे दोन भाग आहेत. इथे दोन शिवलिंगं आहेत, होयसळेश्वर आणि
शांतलेश्वर अशी. होयसळेश्वर हे राजासाठी आणि शांतलेश्वर हे राणीसाठी. या
दोन शिवलिंगांसमोर मंदिराबाहेर दोन मोठे मोठे स्वतंत्र नंदीही आहेत. भारतात
जे सर्वात मोठे नंदी आहेत, त्यात हे दोन्ही नंदी सातव्या-आठव्या
क्रमांकांवर आहेत. म्हैसूरच्या चामुंडी टेकडीवरचा नंदी आणि बंगळूरच्या
बसवनगुडीच्या मंदिरातला नंदी हे दोन महाकाय नंदी यापूर्वी बघितले होतेच.
हळेबिडूचे हे दोन्ही नंदीही सुंदर, सौष्ठवपूर्ण आहेत.
नंदी
दोन्ही नंदींवर असलेलं कोरीव काम वेगवेगळं आहे.
’सोपस्टोन’ प्रकारच्या दगडाचा वापर करून हे मंदिर आणि त्यातली सगळी
शिल्पं कोरलेली आहेत. हा दगड आधी जरा मऊसर असतो, ज्यामुळे त्यावर कोरीव काम
करणं सोपं जातं. जसजसा हवेशी संपर्क येतो, तसतसा तो कडक होत जातो.
ब्रह्मा-महेश- विष्णू. ( हे शिवमंदिर असल्यामुळे महेश मध्यभागी
)
द्रोणाचार्यांनी रचलेला चक्रव्यूह.
( अशा ठिकाणी स्वतःची नावं कोरून ठेवून भारतीय शिल्पकलेबद्दलचा आणि इतिहासाबद्दलचा आपला जाज्ज्वल्य अभिमान सिद्ध करण्याच्या अखिल भारतीय परंपरेचं पालन इथेही केलेलं दिसतं!)
ऊन खूप तापलं होतं, भूकही लागली होती. शिवाय संध्याकाळपर्यंत बंगळूरला पोचायचं होतं. त्यामुळे तिथलं संग्रहालय बघण्याचा बेत रद्द केला आणि जेवणासाठी चांगलं ठिकाण शोधू लागलो. हळेबिडूच्या बाहेर ’इतिहाकला’ नावाचं रेस्टॉरंट गूगलने सुचवलं, तिथे जेवायला गेलो. जेवण खरोखरच छान होतं. जेवून जे निघालो, ते थेट बंगळूरला गेल्यावरच गाडीतून उतरलो! तीन दिवसांची छोटीशी पण मस्त ट्रिप संपली!
उत्तम. या ठिकाणी २-३ वेळा गेलो आहे. दर वेळी काहीनाकाही नवीन माहिती कळते. इथे इतकी जास्त शिल्पं आणि त्यांचं डीटेलिंग आहे की एक भेट पुरत नाही. विष्णू मंदिरात बाहेर हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याची पूर्ण अन्ननलिका काढून हातात धरलेला उग्र नरसिंह, त्याची नखं हिरण्यकश्यपूच्या मांडीत रुतून आरपार जाऊन पलीकडून बाहेर आली आहेत - ह्या लेव्हलचं डीटेलिंग. किंवा कृष्णाने जो गोवर्धन उचलला आहे, त्यावर वरती झाडं, त्यावर माकड, आजूबाजूला साप, हरण, इतर प्राणी - काहीच्या काही कोरलं आहे. शिव मंदिरात एका शंकराच्या शिल्पाच्या डोक्यावर साखळीला लोंबकळत असलेली घंटा आहे - सगळं दगडी. साखळी पण एका दगडातून कोरली आहे आणि तिची एक एक लिंक एकात एक अडकली आहे आणि ती हलते. पायाने ताल धरणाऱ्या एका नर्तकीच्या पायाचा अंगठा इतक्या नजाकतीने वरती उचलला गेलेला दाखवला आहे की असं वाटतं की पुढच्या ठेक्याला ही हलेल. ह्या मंदिरांवर आक्रमणं झाली तेव्हा ही शिल्पं फोडणारे लोक फोडून फोडून दमले असं म्हणतात.
शंकराच्या एका हातात मक्याच्या कणसासारखं कणीस आहे....
ते बहुदा 'बीजापूरक' असावे - म्हाळुंग. अनेक बिया असलेले एक देशज फळ. कोल्हापूरला अंबाबाईच्या मूर्तीच्या एका हातात आहे.
मका / डाळिंब ही भारतात उशिरा आली. सीताफळ, रामफळ मात्र आद्य, देशज. असो. अवांतर झाले
इकडे रेंगाळायचं तर सात दिवस हवेत इतक्या जागा आहेत. देवळं, शिल्पं, तलाव, बाजार, कापी मळे,बुधनगिरीवरची शिखरे, ट्रेकिंग,धबधबे.
चिकमगळुरवरून जावागल रोडने 'बेलवडी ' देऊळ - जावागल मार्गावर हळेबिडू फाटा्याने हळेबिडू आणि तिथूनच पुढे बेंगळुरू.
बाकी नाव कोरण्याबाबत सहमत. नंदीच्या चेहेऱ्यावर खालच्या बाजुला पण ऊर्दू अक्षर कोरलेली आहेत.. गाईड ने दाखवली.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.