तिरुपतीला जाण्याचे यंदा दुसरे वर्ष. मागील वर्षीचा अनुभव असल्याने यंदा लवकर रेल्वे बुकिंग करून ठेवले. पंजाबमधील अमृतसरप्रमाणे वेल्लूर (तमिळनाडू)मध्ये देखील लक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहायचे असल्याने ४ दिवसांची रजा घेऊन तिरुपती, सुवर्ण मंदिर व श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क पाहून आलो. त्या विषयी...
पहिला दिवस (१/११/२०१६)
सोमवार, दि. ३१ आॅक्टोंबरला पुणे स्टेशनला जाण्यास निघालो. अर्ध्या तासातच
पुणे स्टेशनात पोहचलो. 17411 महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला आमच्या
पाहुण्यांकडे उतरलो. सकाळी आवरून मिरजकडे जाण्यासाठी एसटीने निघालो. १२.३०
पर्यंत मिरजला पोहचलो. तेथून दुपारी १.२५ च्या 17416 हरिप्रिया गाडीने आमचा
प्रवास सुरू झाला. दुपारी २.३० ला घरून आणलेले जेवण झाले. रात्री ९ वाजता
लोंढा जॅक्शनवर बाहेरील जेवण केले. सकाळी ९ वाजता गाडी तिरुपतीला पोहचली.
चार महिने अधिच बुकिंग केले होते. त्यामुळे दिवाळीची गर्दी असून देखील
गर्दी जाणवत नव्हती. तिरुपतीमधील राहण्याची सोय आॅनलाईन करून ठेवली होती.
तिरुपतीमधील विष्णु निवासममध्ये जाऊन रुम ताब्यात घेतली. अतिशय सुंदर,
स्वच्छ असलेली रुम पाहून सर्व थकवा क्षणात निघून गेला. संपूर्ण इमारतीमध्ये
लिफ्टची सोय होती. आमची रुम चौथ्या मजल्यावर होती. इमारतीवरून तिरुमला
देवस्थानचा डोंगर, पर्यटकांसाठी टीटीडीच्या बसेस, रेल्वे स्टेशन परिसर दिसत
होता.
दिवस दुसरा (२/११/२०१६)
आवाराअवर करून सकाळी ११ वाजता खालील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा
करण्यास गेलो. उत्तपे, डोसा, इडली असा नाष्टा करून आम्ही तिरुमलावरील
तिरुपती दर्शनासाठी निघालो. हॉटेलच्या बाहेरच असलेल्या टीटीडी तिरुमला
बससेवेचे कर्मचारी बसलेले होते. खासगी गाडी न करता तिकीट काढून बसमध्ये
बसलो. दहाच मिनिटात गाडी तिरुमला डोंगराच्या मुख्य चेकपोस्टपाशी येऊन
थांबली. तेथे प्रवाशांच्या बॅगांचे स्कॅनिंग, तसेच वैयक्तिक झाडाझडती देऊनच
प्रवेश दिला जात होता. एवढी गर्दी असताना देखील पाच मिनिटात तपासणी
प्रक्रिया लवकर झाली. वळणदार रस्त्यांवरून गाडी धावत होती. तिरुपतीमधील
छोटे घरे, उंच इमारती, रस्ते, झाडे हळूहळू लहान होताना दिसत होती. एकेरी
रस्ता असल्याने समोरून येणाºया वाहनांची चिंता ड्रायव्हरला नसल्याने गाडी
सुसाट वेगाने धावत होती. पाऊण तासातच आम्ही तिरुमला डोंगरावरील
बसस्टॅण्डमध्ये येऊन पोचलो. मुख्य मंदिराबाहेरील हॉटेलमध्ये चहा, नाष्टा
करून कल्याण कट्टा येथे जाऊन केस दान करून झाले. कुठल्याही प्रकारचा जादा
दर न देता केवळ मोफत दर्शन घेण्याचे ठरवले होते. थोड्यावेळ मार्केटमध्ये
हिंडून देवदर्शनासाठी हुंडीमध्ये जाण्यास निघालो. दुपारी ३ वाजता
हुंडीमध्ये जाऊन बसलो. हुंडीमध्ये गेल्यावर ७० रुपयांमध्ये ४ लाडूचे कुपन
दिले जात होते. पूर्वी दर्शन घेतल्यावर प्रत्येकी दोन लाडू दिले जात होते.
परंतु काही कारणामुळे आता ही प्रक्रिया बंद करून हुंडीतच पैसे व कुपून
देण्यात येत होते. मीही रांगेत उभे राहून कुपून घेतले. संध्याकाळी ६ ला
भाविकांसाठी दूध आले. पाहिजे तेवढे दूध प्या विनामूल्य. रात्री ९ वाजता
भाविकांसाठी पोटभरून भाताची खिचडी आली. पुन्हा रांगेत उभे राहून पोटभर
प्रसाद खाल्ला. हुंडीमध्येच खालील बाजुस प्रसाधनगृहाची सोय असल्याने गैरसोय
झाली नाही. रात्री १०.३० ला हुंडीचे दरवाजे उघडण्यात आले.
‘गोविंदा गोविंदा’च्या नमघोषात सर्व भाविक मुख्य मंदिराकडे जाण्यास निघाले.
गर्दी असून, देखील योग्य व्यवस्थापनामुळे तिरुपती व्यंकेटशाचे चांगले
दर्शन झाले. रात्री १२.३० मंदिराशेजारील असणाºया लाडू विक्री केंद्रावर
जाऊन कुपन देऊन लाडूचा प्रसाद घेतला. सर्व वातावरणात साजूक तुप, वेलचीच्या
वास पसरलेला होता. रात्रभर केलेल्या प्रतिक्षेचा क्षीण केव्हाच निघून गेला
होता.
दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत बसस्टॅण्डकडे येण्यास निघालो. पहाटे
तीननंतर बस सुरू होणार असल्याने आम्ही बाजारपेठेत खरेदी करण्यास निघालो.
विविध प्रकारचे बालाजीचे फोटो, धार्मिक साहित्य, टोप्या, लहान मुलांची
खेळणी, विविध दगडी सामान, महिलांसाठी गृहपयोगी वस्तू, शोभिवंत वस्तूंनी ही
बाजारपेठ भरलेली असते. पहाटे ३.३० ला पुन्हा तिरुपतीला जाण्यासाठी असणाºया
बसमध्ये जाऊन बसलो. पाऊण तासातच आम्ही राहत असलेल्या विष्णू निवासमपासून
काही अंतरावर बसने आम्हाला सोडले. रुममध्ये येऊन सकाळी ९ पर्यंत विश्रांती
घेतली. सकाळी निवासस्थानाचे कर्मचारी तुमची १ दिवसाची मुदत संपल्याचे
सांगण्यासाठी आला. आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते. पुढे
एक्सटेंशन देण्यासाठी पुन्हा नवीन रुम व प्रोर्सिजर करावी लागते. थोडीफार
मिन्नतवारी केल्यानंतर आम्हाला १ दिवसाचे एक्सटेंशन देण्यात आले.
दिवस तिसरा (३/११/२०१६)
सकाळी नाष्टा करण्यासाठी आम्ही पुन्हा निवासस्थानम्च्या हॉटेलमध्ये आलो.
कंबो पॅक म्हणून इडली, डोसा, उत्तपा, मेदूवडा असा भरपूर नाष्टा (जेवण) करून
आम्ही हॉटेल बाहेर पडलो. आज आम्हाला वेल्लूर(तमिळनाडू) येथील श्रीपुरम
येथील धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिराचे दर्शन
घेण्यासाठी जायचे होते. त्यासाठी आम्ही गाडीची चौकशी करण्यासाठी निघालो.
बाहेर पडल्याबरोबरच टुरिस्ट गाड्यांचे चालक चौकशीसाठी आले. चक्क हिंदीमधून
संवाद साधून ते आमच्या बरोबर ‘हमारे साथ चलिऐ’ असे सांगत होते. तवेरा,
सुमो, ट्रॅक्स अशा विविध गाड्या यासाठी येथे सज्ज असतात. बरीच घासाघीस करून
झाल्यावर ३००० रुपयांत ओल्ड बालाजी, गोल्डन टेंपल व गणपती मंदिर
दाखवण्याचे ठरवून आम्ही अखेर सुमोमधून प्रवासाला निघालो. गोल्डन टेंपल
मंदिर तिरुपतीपासून (रेल्वेस्टेशनपासून) सुमारे १२० ते १३० किलोमीटर
अंतरावर आहे. सकाळी ११ वाजता आमचा प्रवास सुरू झाला. प्रथम ओल्ड बालाजीचे
मंदिर दाखवण्यात आले. हे मंदिर म्हणजे तिरुमला मंदिराच्या डोंगराच्या
पायथ्याला असलेल्या एका छोट्याश्या गावातील मुख्य रस्त्यावरील मंदिर. मंदिर
तसे छोटे परंतु नक्षीकाम, सुंदर सुबक मूर्तीने नटलेले, मोठाले गोपुर,
सर्वत्र स्वच्छता असलेले हे मंदिर आहे. मंदिरातील बालाजीची मूर्ती देखील
आकर्षक आहे. बहुतांश पर्यटकांना याबाबत माहिती नव्हती. या मंदिराच्या काही
अंतरावर तिरुमलावर जाण्यासाठी पायी मार्ग होता. मंदिरातील खिचडीचा प्रसाद
घेऊन आम्ही वेल्लूरकडे जाण्यास निघालो. वाटते चंद्रगिरीचा किल्ला दिसतो.
आपल्याकडे असणाºया सह्याद्रीच्या उंचंच उंच रांगा येथे दिसत नाही. छोट्या
डोंगरावरती प्रचंड मोठे असे दगड तेही एकावर एक जणू कोणी तरी आणून ठेवले
असावेत अशा प्रकारे येथील डोंगर दिसतात. हिवाळा असून देखील हवेत गारठा
नव्हता. वाटेत विक्रेत्यांकडून सोनकेळी घेऊन आम्ही पुढे निघालो. वेगळ्याच
प्रकारची ही केळी होती. चवीला एकदम गोड. आपल्याकडे असणाºया सोनकेळीला थोडी
वेगळीच चव असते.
ड्रायव्हरशी गप्पा मारताना त्याने पोलिसांकडून चाललेल्या हप्त्यांविषयी
सांगितले. प्रवाशी पाच भरा अथवा सहा भरा. हप्ता हा ठरलेलाच असतो. किमान २००
रुपये हातावर टेकवल्याशिवाय गाडी पुढे जाऊन देत नाही. कारण तमिळनाडू
हद्दीत हे मंदिर येते. तमिळनाडूमध्ये चंदनचोरी मोठ्याप्रमाणात होत असल्याने
अनेक ठिकाणी पोलिसांनी टोलनाके, चौक्या बसविल्या होत्या. नशिबाने आम्हाला
कोणतीही अडचण आली नाही. वेल्लूरजवळील असलेल्या वेल्लूर किल्ला बाहेरूनच
पाहिला. नॅशनल हायवे असल्याने रस्ता चांगला होता. दुपारी ३ वाजता आम्ही
सुवर्णमंदिराच्या बाहेर पोहचलो. एव्हाना पुन्हा भूक लागल्याने आम्ही जेवण
करण्यासाठी मंदिराच्या बाहेरून बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन
महाराष्ट्रीयन जेवण जेवलो. दोन दिवसांपासून पोळीचे दर्शन न झाल्याने जेवण न
जेवल्यासारखे वाटत होते. मनसोक्त पोळ्या पोटात ढकलून भूक भागवली.
स्वर्ण मंदिर :
हे मंदिर वेल्लूर शहराच्या दक्षिण भागात आहेत. थिरूमलाई कोडी या गावात या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास १५०० किलोग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. २४ आॅगस्ट २००७ रोजी हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री लक्ष्मी नारायणी मंदिर श्रीपुरम नावाने ही मंदिर ओळखले जाते. या मंदिराच्या बांधकामासाठी ३०० कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा वापर करण्यात आला आहे. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी होती. वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. १०० एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चारीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना चांदणीच्या आकारात आहे. या आकारातून तयार केलेल्या मार्गातूनच आपल्याला जावे लागते. संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालूनच आपण मुख्य मंदिरात येतो. संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले हे मंदिर आहे. वाटेत भाविकांसाठी धार्मिक तसेच मंदिर ट्रस्टतर्फे बनविण्यात आलेल्या कलाकुसर गोष्टी विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून ‘सर्व तीर्थम’ नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे. पाण्यासारखा पैसा कसा वाहतो ते या ठिकाणी दिसून येते. या पाण्यात भाविकांनी नोटा, चिल्लर भरमसाठ टाकून दिलेली दिसते. विशेषत: १००, ५०० च्या नोटांचा येथे खच पडलेला आहे. मंदिर पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते. नारायणी अम्मा नावाच्या संन्यासीने हे मंदिर बनविले आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. भाविकांसाठी बसण्याची, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आलेली आहे. संध्याकाळी ६.३० ला मंदिर पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येताना वाटेतील गणपतीचे मंदिर पाहून रात्री १० ला आमच्या मुक्कामी परत आलो.
कसे जाल :
देशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे,
विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून
महालक्ष्मी मंदिर सात किलोमीटर अंतरावर आहे.
तिरुपतीवरून १२० ते १३० किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. येथून खासगी बस,
ट्र्ॅक्स, रेल्वेने येता येते. वेल्लूर येथे उतरून पुन्हा बसने, रिक्षाने
येथपर्यंत पोहचता येते.
दिवस चौथा (४/११/२०१६)
सकाळी ९.२० ला विष्णू निवासम्मधून रुम सोडली. आवश्यक त्या बाबी पूर्ण
करण्यासाठी निवासमच्या काउंटरवर जाऊन अनामत रक्कम परत मिळाली. रेल्वे
स्टेशनवर जाऊन आमच्याकडील बॅग्ज या लगेज रुममधे जमा केल्या. २४ तासाला २०
रुपये असे किरकोळ रक्कम भाडे असल्याने आमची चांगली सोय झाली. तेथून रिक्षा
करून एसव्ही नॅशनल पार्क पाहण्यासाठी निघालो.
श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क
तिरुमला डोंगराच्या डाव्या बाजूला असणाºया डोंगराच्या पायथ्याशी हे एस.
व्ही झू पार्क आहे. सुमारे २९० हेक्टर परिसरात हे पसरलेले आहे.
श्री व्यंकेटेश्वरा झुओलॉजिकल पार्क हे त्याचे पूर्ण नाव. अतिशय योग्य
व्यवस्थापनामुळे व सर्व प्रकारचे प्राणी पहायला ठेवले असल्याने प्रसिद्ध
झाले आहे. या ठिकाणी मार्जर वर्गातील म्हणजेच वाघ, सिंह, ब्लॅक पँथर,
चित्ता, बंगल टायगर असे विविध हिंस्त्र पशु मोकळ्या वातावरणात आपल्याला
पाहण्यास मिळतात. याप्रमाणेच जिराफ, गवे, लांडगा, हत्ती, बंगाल टायगर,
चित्ता, वाघ, सिंह, सिंहीण, बिबळ्या, हाईना, तरस, निलगाय, रानडुकरे, हरिण,
काळवीट तसेच पक्ष्यांमध्ये मोर, काकाकुवा, पोपट, मैना, पांढरा मोर, कासव
तसेच विविध जातीचे छोटे पक्षीही पिंजºयात आपणास पहायवास मिळतात.
या ठिकाणी २५ रुपयांत प्रति व्यक्तीला वाघ व सिंह गाडीत बसून मोकळ्यावरील सिंह व वाघ पाहता येतात. आपण पिंजºया असलेल्या गाडीतून सुमारे २ किलोमीटरचा प्रवास करतो. या प्रवासात रस्त्यावर बसलेले वाघ व सिंह पाहून आपली चांगलीच तारांबळ उडते. मात्र, आपण गाडीत असल्याने व रोजची सवय वाघ सिंहांना असल्याने मनातील थोडी भिती कमी होते. जवळून हे प्राणी पाहिल्याने एकदम वेगळ्याच विश्वात आपण जाऊन येतो. प्रवेशद्वाराजवळच संपूर्ण पार्क मधील महत्त्वाची ठिकाणे पाहण्यासाठी २५ रुपयांत इलेक्ट्रीकवर चालणाºया गाडीची सोय केली आहे. ४५ मिनिटांत संपूर्ण पार्कची सफारी आपल्याला करता येते. मात्र, आम्ही सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरामध्ये पसरलेले प्राणी संग्रहालय पायीच हिंडलो. मनसोक्त विविध प्राणी पाहून एकदम नॅशनल जिओग्राफी चॅनलवरील प्राणी पाहत असल्याचा भास झाला.
उद्यान पाहून दुपारी ३ ला आम्ही परत तिरुपतीला आलो. तेथून जवळच असलेला
निद्रा मुद्रेत असलेला बालाजीचे मंदिर पाहण्यास निघालो. तिरुपतीमधील
कुठल्याही मंदिरात जा. भाताची खिचडी प्रसाद म्हणून भाविकांना खायला मिळते.
तेव्हा बाहेरच्या हॉटेलमधील नाहक खर्च आपल्याला वाचवता येतो. येथेही मी
खिचडी खाऊन तृप्त झालो. मी प्रसादाच्या रांगेत उभा होतो. प्रसाद
द्रोणामध्ये देण्याची येथली पद्धत आहे. मी हात पुढे केल्यावर अचानक
वाढप्याने माझ्या दोन्ही हातात भसकन खिचडी टाकली. बहुधा द्रोण संपले होते.
गरम गरम खिचडी तशीच हातात घेऊन पटकन संपूनही टाकली.
दुपारी ४ ला पद्मावतीचे मंदिर पाहण्यास रिक्षेने निघालो. तिरुमलावरीत
तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर पद्मावतीचे दर्शन घेण्याची किंवा
कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याशिवाय हे दर्शन
पूर्ण होत असे म्हणतात.
येथे पोहचल्यावर २५ रुपये देऊन विशेष पासाने दर्शन रांगत उभे राहिलो. पाऊण
तासाने एकदाचे दर्शन झाले. या ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून दहीभात दिला
जातो. थोडावेळ बाजारपेठ फिरून संध्याकाळी ७ ला तिरुपतीला
रेल्वेस्टेशनमध्ये येऊन आमच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली.
विशेष नोंदी :
तिरुमला बसस्टँण्डवरून तिरुपतीला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता बसेस सुरू
होतात. रात्री १२ वाजता बंद होतात. (तिरुमला म्हणजे डोंगरावर व तिरुपती
म्हणजे डोंगराखाली)
तिरुमला व तिरुपतीचे रुमचे आॅनलाईन बुकिंग १ दिवसांपुरतेच मर्यादित असते.
दुसºया दिवशी रुम खाली करण्याची वेळ येते. तेव्हा वेळेअधीच काउंटरला जाऊन
रुम एक्सेटेंशनसाठी चौकशी करावी लागते. बहुधा गर्दीच्या वेळी एक्सेटेंशन
दिले जात नाही.
भ्रष्टाचार :
प्रत्येक ठिकाणी मंदिरामध्ये त्यांच्याकडील बाहेर बाजूस असलेल्या काउंटरवर
आपल्याकडील मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बॅगा ठेवाव्या लागतात.
या बॅगा काही ठिकाणी मोफत ठेवण्यात येतात. परंतु या ठेवाताना तेथील
कर्मचारी प्रवाशांकडून पैशांची मागणी करतात. ‘खुशी से देना’ असे ही वर करून
सांगतात. १० रुपये दिले तर परत देतात. किमान ५० रुपये तरी मागतात. बर ही
(अ)सुविधा फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच. त्यांच्याकडील लोकांना मोफत
सुविधा पुरवली जाते.
भाषेचा अभिमान :
तिरुपतीमध्ये दुकानदार, विक्रेते सोडल्यास आपल्याला भाषेचा प्रचंड अडथळा
येतो. एकतर ते काय बोलताहेत ते आपल्याला कळत नाही. तेलगु, मल्याळी, कन्नडी
अशा विविध भाषेत येथे संवाद साधतात. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी. ‘हिंदी
नही आती’ असे स्पष्ट येथील लोक सांगतात. तेव्हा मार्ग चुकल्यास, गाडीसाठी
चौकशी केल्यास खूप अडथळा येतो. फक्त हॉटेल मालक, कर्मचारी, विक्रेते केवळ
धंदयासाठी आपल्याशी हिंदीतून बोलतात.
तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) - भाग १
तमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षापासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी..
भारतातील तीर्थक्षेत्रंमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे.
देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश
राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्हय़ात तिरुपती हे शहर. याच शहराच्या
जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे
म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा
आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून
या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळय़ातही
थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही
म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.
‘तिरु’
म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ
भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला
जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून
सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे
अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती
होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे 5क् हजारांहून भाविक या ठिकाणी
दर्शनास येत असतात. ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राrाोत्सव साजरा केला
जातो. सुमारे 9 दिवस हा उत्सव असतो.
तिरुपती मंदिराविषयी :
मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती
सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे.
मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते.
लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतक:यास
आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील
राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला.
त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
बालाजीच्या
मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान
2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस
आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर
दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली.
म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठय़ा देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात
मंदिराचे प्रशासन हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933
पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये
‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला
तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात. हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर
आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने
केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा
देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला
दिल्याचे वृत्तपत्रतून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी
किंवा त्याच्या बाहय़रूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता
ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.
कल्याण कट्टा / केसांचे दान :
तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण
होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान
करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर
विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे
वृत्तपत्रत देवस्थानला 74 कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले
होते. इंटरनेटद्वारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या
लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या
लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.
मंदिराच्या
बाहेरील बाजूस एका मोठय़ा इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक
आपले केस दान करतात. येणा:या भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात
येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणा:या पुढे जाऊन उभे राहावे
लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते.
दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.
येथील व्यवस्थाही
पाहण्या जोगी आहे. केस काढणा:याला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते
लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत
असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई
कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान
करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट
भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
हुंडी / दान :
अलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा
होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे
विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या
ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक
निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत
विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे
उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या
काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख
स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात.
भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे
केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठय़ा,
सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.
खरा
भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन
व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी
शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू
लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक
पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान
वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा
सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा
यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणा:यांच्या संख्येत वाढ होताना
दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख
कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे.
वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान
200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का? हा
प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात,
सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर
गोरगरीबांसाठी अन्नछत्रलय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल,
पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी
गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठय़ा
प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही
महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली.
त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना
खरच स्वागताहर्य़ म्हणावी लागेल.
सुरक्षा व्यवस्था
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून तसेच पायी चालत जाणा:या भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणो हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणो गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रस होताना दिसत नाही.
आदर्श घ्यावा
तिरुपतीप्रमाणो आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु
पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर
सुशोभीत केलेला आहे. देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे
मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणो
पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे
विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात
उभी केली. येणा:या लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भक्तांसाठी
सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र,
धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणो सहज शक्य आहे.
संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी
(खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच
आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.
पर्यटन वाहन व्यवस्था
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यावर वेळ मिळाल्यास डोंगरावरील पर्यटन स्थळे व
काही मंदिरे पाहण्यास विसरू नका. सुमारे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेली
ही ठिकाणो नयनरम्य परिसरामुळे देखणी व चिरस्मरणात राहणारी ठरतात.
देवस्थानतर्फे स्वत:ची पर्यटकांसाठी बस आहे. मात्र, तिची वेळ माहिती करून
घेणो गरजेचे आहे. केवळ 45 रुपयांत ते काही मंदिरे दाखवितात. मात्र, प्रचंड
गर्दीमुळे आम्ही ही बस नाकारली.मंदिर परिसरात सुमो, जीप गाडय़ा, तवेरा,
क्वॉलिस यांसारख्या गाडय़ा भाडय़ाने उपलब्ध आहेत. डोंगरावरील पर्यटनस्थळे ते
आपणास दाखवून आणतात. सुमारे 1000 रुपयांमध्ये 5 पर्यटनस्थळे दाखविली जातात.
एका सुमोत 11 जण सहज बसतात. ही स्थळे पाहण्यास सुमारे तीन ते चार तास इतका
वेळ लागतो. जादा पर्यटक मिळावेत यासाठी ड्रायव्हर आपल्यामागे घाई करताना
दिसून येतो. आपण मात्र, मनसोक्त ही पर्यटनस्थळे पाहवीत. खाली तिरुपतीमध्ये
सुद्धा अनेक पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत. तिरुपतीला जाऊन तेथून गाडी
ठरविल्यास ते फायदेशीर ठरते. कारण वरून गाडी ठरविल्यास एकतर ते जादा दर
सांगतात. आपली अडचणीची वेळ लक्षात घेऊन वाटेल तो दर सांगतात. खाली
तिरुपतीला जाण्यासाठी सुमारे 1500 रुपये असा दर सांगतात. आम्ही तिरुपतीवरून
तिरुमलावर 700 रुपयांत वर आलो. मात्र, खाली जाण्यासाठी 67 टर्न असल्याचे
कारण व जादा माणसे घेऊन जाता येत नसल्याचे कारण सांगून हे ड्रायव्हर अडवणूक
करतात.
स्वच्छतेबाबत
एकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंटय़ा, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंडय़ा ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणो स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणो मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे.
काही टिप्स :
- तिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येते.
- विमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.
- शक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.
- कुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.
- तिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणो पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.
जायचे कसे :
- तिरुपती हे ठिकाण लोहमार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणो, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.
- जवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने डोंगरावर जाता येते.
- पुण्याहून
संध्याकाळी 7.15ला सुटणा:या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती
एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते
चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत.
आमचा प्रवास :
तिरुपतीला
जाण्याची सर्व तयारी जय्यत झाली होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बिस्कीटे,
चिवडा, लाडू, फुटाणा, वेफर्स, एकवेळचे जेवण, घेऊन सॅक चांगली जड झाली
होती. पुणं स्टेशनात 6 ला पोहचलो. गाडी संध्याकाळी 7.15 ला होती. गाडी
नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार याची चिंता लागून राहिली होती. अखेर
प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस येणार असल्याची घोषणा
होताच प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. तेथील अस्वच्छता पाहून नकळत हात
नाकाला गेला. असो. त्यात आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. जागा मिळेल का
नाही? याची चिंता लागून राहिली होती. अखेर गाडी आली. डब्यात चढून प्रथम
टिसीला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अखेर पाच सहा डबे शोधल्यावर एकदाचा टिसी
सापडला. पण आत्ताच काही सांगता येणार नाही. आहे तेथे जाऊन बसा असे सांगताच
आम्ही परत डब्यात येऊन बसलो. दौंडला अखेर 3 बर्थ प्लेस देतो असे सांगताच
आनंद झाला. तब्बल 18 तासांनंतर दुपारी 3 वाजता एकदाचे तिरुपती स्टेशनात
पोहोचलो. स्टेशनाबाहेर येताच तिरुमलावर जाण्यासाठी प्रायव्हेट टुरिस्टवाले
जमा झाले. शासकीय दरात घेऊन जातो. थेट हॉटेलवर सोडतो असे सांगून झाल्यावर
आम्ही सर्व सुमोत बसलो. काही वेळातच तिरुमला डोंगरावर जाण्याच्या वाटेवर
लागलो. घाटाखाली प्रथमत: सर्व बॅगांची तपासणी झाल्यावर पाऊण तासातच
तिरुमलावरील कौस्तुभ हॉटेलमध्ये पोहचलो. मात्र, तेथे रुम शिल्लक नसल्याने
रुम खाली होण्याची वाट पाहत बसावे लागले. अखेर संध्याकाळी 8 ला सप्तगिरी
रेस्ट हाऊसमध्ये रुम मिळाली. फ्रेश होऊन कल्याण कट्टय़ावर जाऊन केसदान करून
आलो. डोके हलके झाल्याने कसे तरी वाटत होते. रात्री 11 वाजता मुख्य
मंदिरातील मोफत दर्शन रांगेत जायला निघालो. वाटेत एका ठिकाणी मोबाईल व चपला
जमा करून पावती घेऊन दर्शन रांगेला लागलो. लांबच लांब चालायच्या प्रतीक्षा
रांगा होत्या. अर्ध्या तासातच एका मोठय़ा हुंडीत येऊन बसलो. तेथे गरमागरम
भाताची खिचडी तयार होती. तेथील पाय:यांवर मस्तपैकी पसरलो. पहाटे 3 वाजता
एकदम गडबड झाली, सर्वच भाविक सावरून दर्शनासाठी तयार झाले होते. बालाजीच्या
या हुंडीमध्ये एकवेळी किमान 500 भाविक सहज बसतात. अशा 50 हुंडय़ा आहेत.
आम्ही गेलो तेव्हा नशिबाने गर्दी कमी होती. मुख्य मंदिरात पोहचण्यास
पहाटेचे साडेचार वाजले. मात्र, दर्शनाची आस लागल्याने वेळ कसा गेला ते
कळलेच नाही. वाटेत वीस रुपयांना दोन लाडूची कुपने घेतली. अखेर ज्यासाठी
येथे र्पयत आलो ती वेळ आली. बालाजीचे मंदिर जुने असल्याने आतील सजावट, दगडी
बांधकाम पाहत चांगला वेळ गेला. पहाटे 5 वाजता बालाजीचे दर्शन घेऊन मन एकदम
प्रसन्न झाले. गाभा:यात तुपाचे दिवे जळत होते. कुठलाही कृत्रिम प्रकाश
त्या ठिकाणी नव्हता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. एकदाचे दर्शन घडले. एवढय़ा
सकाळी दर्शन घेण्याची वेळ पाहिल्यांदाच. आता झोप डोळय़ावर चांगलीच येऊ
लागली होती. मंदिराबाहेरील लाडू वाटप केंद्रात लाडू घेऊन पुन्हा सप्तगिरी
हॉटेल आलो. मस्तपैकी 11 र्पयत ताणून दिली. पुन्हा फ्रेश होऊन तिरुमलावरील
पाच ठिकाणो पाहिली. संध्याकाळी बाजारपेठ हिंडून बाजारातील वस्तूंचे दर्शन
घेतले. दुस:या दिवशी तिरुपतीला गाडी ठरवून तिरुपतीतील ठिकाणो पाहून रात्री 9
च्या हरिप्रिया एक्सप्रेस गाडीत बसलो. जातानाचे तिकीट कन्फर्म असल्याने
चिंता नव्हती. तिरुपतीतील प्रचंड गरमीमुळे हैराण झालो होतो. गाडी सुरू
झाल्यावर पहाटे गारवा आल्यावर बाकीच्यांना झोप लागली. प्रवास म्हटला की मला
झोप अशी कमीच लागते. वाटेतील ठिकाणो पाहत पहाटे 5 ला थोडी झोप घेऊन सकाळी 8
ला उठलो. अजून मिरज बरेच अंतरावर होते. तेव्हा रेल्वेत फेरफटका मारायला
सुरूवात केली. रेल्वेत टाईमपास करायचा असेल तर सर्व रेल्वे डब्यात हिंडून
यायला पाहिजे. नानाविध लोक त्यांचे पेहराव, वागण्याच्या त:हा समजतात व
आपला वेळही चांगला जातो. रेल्वेत विक्रेतेही किती प्रकारचे येतात. भेळ, चणो
फुटाणा, कैरी, थंड पाण्याची बाटली, कटलेटवाले, कलाकंद विकणारे, वेगवेगळय़ा
माळा, चहा, कॉफीवाले असे एक ना अनेक विक्रेतेही टाईमपास करतात. दुपारी 3
वाजता मिरजेला उतरलो. तेथून 4.45 ची महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याचा
प्रवास सुरू झाला. रात्री 10.45 ला पुण्यात दाखल झालो.
![]() |
बाजारपेठ |
बाजारपेठ
मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत.
याचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगडय़ा, गळय़ातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साडय़ा, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.
![]() |
मंदिराकडे जाण्याचा मार्ग |
हॉटेल्स / उपाहारगृहे
महाराष्ट्रातून एवढय़ा लांबवर आलेल्या भाविकांना येथे जेवणाची थोडी अबाळ होताना दिसते. मात्र, आपल्या जेवणातील काहीसा भाग हा साऊथ व नार्थ इंडियन झाल्यामुळे ही गैरसोय दूर होते. मसाला डोसा, उत्तप्पा, इडली, मेदू वडा, मिरचीची भजी, मसाले भात, रस्सम, दही भात, आपल्याला खायला मिळतो. काही हॉटेल्स महाराष्ट्रीयन पदार्थ देताना दिसतात. मात्र, त्याला आपल्याकडील चव नाही. या ठिकाणी चक्क चायनीज व्हेज ही मिळते. फक्त व्हेजच कारण तिरुमलावर नॉनव्हेज खाण्यास बंदी आहे.
मंदिर परिसरातील हॉटेल्स पाहून आपण नक्की कुठे आलो आहोत? याचा विचार करण्यास भाग पडते. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक रेस्ट हाऊस या ठिकाणी आहेत. मात्र, त्या हॉटेल्समधील जेवण महाग आहे. त्यापेक्षा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये स्वस्त आहे.
![]() |
सप्तगिरी रेस्ट हाऊस |
भाविकांसाठी विश्रामगृह :
दररोज हजारोंच्या संख्येने येणा:या भाविकांना राहण्याची सोय येथे माफक दरात उपलब्ध करून दिली जाते. आम्ही कोणतेही बुकींग न करता येथे गेलो होतो. त्यामुळे विश्रामगृह मिळण्यासाठी फार श्रम घ्यावे लागले. मात्र, ऑनलाईन विश्रामगृह बुकिंगची सोय उपलब्ध आहे. सप्तगिरी रेस्ट हाऊस अथवा कौस्तुभ रेस्ट हाऊस प्रमाणो अनेक मोठी विश्रामगृह या भागात आहेत. अनेक धार्मिक संस्थांचीही खासगी विश्रामगृह येथे उपलब्ध आहेत. अॅडव्हान्स 600 रुपये भरून दिवसाला 100 रुपये व 24 तासानंतर 100 रुपये नंतरच्या 48 तासाला 300 रुपये जादा या दराने ही विश्रामगृह उपलब्ध आहेत. एसी, नॉन एसी, संडास बाथरूम अॅटच असल्यामुळे गैरसोय होत नाहीत. अतिशय माफक दरात असलेल्या या विश्रामगृहांमध्ये दररोज हजारो भाविक राहतात.
प्रति महात्मा गांधीजी
प्रत्येक पर्यटनस्थळी काही ना काही तरी आर्कषण असते. तिरुमलावर श्रीवारी पादुला व सिला तोरणम् या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील पुतळा दिसतो. प्रथम दर्शनी हा पुतळा आहे अशी आपली समजूत होते. जेव्हा लोक त्याच्याबरोबर फोटो काढू लागतात तेव्हा हा पुतळा नसून, अंगावर कलर लावलेला खराखुरा माणूस असल्याचे कळते. विशेष म्हणजे पर्यटक नसतानाही केवळ पोटासाठी हा मनुष्य भर उन्हात अंगावर कपडे, पायात चप्पल नसतानाही पुतळ्यासारखा उभा असतो. लोक मात्र टिंगलटवाळी करत, कधी पुतळय़ाला चष्मा लावून, कधी टोपी लावून, चित्रविचित्र भाव दर्शवत फोटो काढत असतात. पण तरी सुद्धा चेह:यावरील भाव न बदलता, कशाचीही पर्वा न करता केवळ पोटासाठी हे काम करत असतात.
श्रीवारी पादूला :
हे ठिकाणी मुख्य मंदिरापासून अंदाजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला डोंगरावरील अजून थोडय़ा उंचीवर हे ठिकाण असल्यामुळे उंचावरून मंदिर परिसर सुंदर दिसते. पुरणकथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे भगवान वेंकटेश्वर स्वामींनी या ठिकाणी प्रथम पदस्पर्श केले. याला नारायणगिरी डोंगर असे म्हटले जाते. या ठिकाणी वेंकटेश्वराच्या पादुका ठेवण्यात आलेला आहे. सुमारे 300 पाय:या चढून गेल्यावर हे स्थळ आहे. वरून तिरुमला व बालाजीचे मंदिर दिसते. सुरूचीची झाडे या परिसरात मोठय़ाप्रमाणात दिसून येतात. वाटेत सिलातोरणम् हे पर्यटन स्थळ आहे.
सिलातोरणम् / रॉक गार्डन :
सिलातोरणम् या शब्दात दोन शब्द आले आहेत. सिला म्हणजे दगड व तोरणम् म्हणजे तोरण. मंदिरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. दगडी तोरण असलेला दगडांचा पूल या ठिकाणी दिसतो. या ठिकाणापर्यंत वाहने जातात. ज्युरासिक कालातील म्हणजे सुमारे 1.5 बिलियन वर्षापूर्वीचे हे पाषाण असल्याचे सांगितले जाते. सुमारे 25 फूट लांब व 10 फूट उंच असा हे तोरण आहे. त्याच बरोबर अंदाजे 26 फूट उंच दगड छोटय़ा दगडावर उभा असलेला दिसून येतो. तेथून खाली शंकराचे मंदिर आहे.
![]() |
सिलातोरणम् |
आकाशगंगा जलप्रपात
आकाशगंगा जलप्रपात बालाजी मंदिरापासून उत्तरेला 3 किमी. अंतरावर आहे. या पाण्याने तिरुपती बालाजीला स्नान घातले जाते. मे महिन्यात सुद्धा या ठिकाणी चांगले पाणी पहायला मिळते. त्याचबरोबर मंदिर परिसरात श्री राधा-कृष्ण, शिव, हनुमान, गणोश आदी देवतांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर , वैकुंठ, पांडव, जांबली इत्यादी तिर्थे आहेत. या शिवाय श्री वराहस्वामी मंदिर, श्री बेदी अंजनेयस्वामी मंदिर, स्वामी पुष्करिणी, श्री करिया मणिक्यस्वामी मंदिर, श्री चेन्नाकेशवस्वामी मंदिर, श्री वेणुगोपालस्वामी मंदिर, श्री प्रसन्ना वैंकटेश्वरस्वामी मंदिर आदी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत.
पाप विनाशम् :
मुख्य मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटरवर हे स्थान आहे. या ठिकाणी छोटा डॅमही आहे. येथेच सिंहाच्या आकाराच्या मूर्तीतून बारामही पाणी पडत असते. या ठिक़ाणी स्नान केल्यास सर्व पापांचे विनाश होते असे सांगितले जाते.
इस्कॉन मंदिर
तिरुपती शहरापासून सुमारे 3 किलोमीटरवरील अंतरावर हे इस्कॉन मंदिर आहे. लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. मुख्य मंदिर रस्त्यालगत आहे. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर असून, मंदिरही सुंदर आहे. श्रीकृष्ण व गोपीका यांच्या सुबक मूर्ती या ठिकाणी आहेत. मंदिरातील नक्षीकाम व काचेच्या फ्रेमवरील चित्रकाम सुंदर आहे. दर्शन घेऊन झाल्यावर इस्कॉन मंदिरातील धंदेवाईकपणा आपणास कंटाळवाणा ठरतो. कारण परतीच्या मार्गावर धार्मिक ग्रंथ, श्रीकृष्णाचे चित्र असलेले लहान मुलांचे, मोठय़ा माणसांचे कपडे, विविध सुवासिक उदबत्त्या विक्रीस मांडण्यात आलेल्या आहेत. वस्तू पाहिल्यावर नको असल्यास त्या घेण्यासंबंधित प्रचंड आग्रह केला जातो. हा आग्रह नकोसा वाटतो. येथे जेवण्याची सोय होते. श्री पद्मावती मंदिराप्रमाणे याही ठिकाणी प्रसाद म्हणून डाळभात दिला जातो. एके ठिकाणी गाय व वासरू (गोशाला) तसेच अनाथ मुलांच्या संगोपनासाठी दान स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे.
श्री कपिलेश्वरस्वामी मंदिर :
तिरुपतीमधील हे एकमेव शिवमंदिर आहे. शहरापासून सुमारे 3 किलोमीटर असणा:या हे मंदिर तिरुमलाच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे. कपिलातीर्थमला धबधबा आहे. यालाच अलवर तीर्थम असेही नाव आहे. या मंदिरात महाशिवरात्रीला उत्साह साजरा केला जातो. आम्ही मे महिन्याच्या अखेरीस गेलो होतो. आश्चर्य म्हणजे मे मध्ये ही येथील धबधबा अटलेला नव्हता. शेजारीच पाण्याचे कुंड आहे. परिसर सुंदर असून, धबधब्यार्पयत जाण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस खोदून आकर्षक मार्ग तयार केला आहे. भाविक लोक या ठिकाणी स्नान करून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. प्रवेशद्वारापाशी मंदिर असून, त्यात त्यात विष्णूच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती सुरेख आहे.
श्री पद्मावती समोवर मंदिर
तिरु चनूर अर्थात अलमेलुमंगपुरम : तिरु पति शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असणा:या या मंदिराला खूप महत्त्व आहे. भगवान व्यंकेटशाची पत्नी पद्मावती हिचे हे पद्मावती मंदिर आहे. बालाजी हे भगवान विष्णूचे रूप असे मानले जाते आणि पद्मावती हे लक्ष्मीचे रूप आहे. बालाजीचे दर्शन झाल्यावर पद्मावतीचे दर्शन घेतले जाते नाहीतर ही यात्र संपूर्ण होत नाही. मंदिरात नारळ घेऊन जाण्यास परवानगी नाही. मंदिरा बाहेर नारळ फोडण्याची व्यवस्था केली आहे. मंदिर मोठे व प्रशस्त आहे. दर्शनानंतर प्रसाद म्हणून वाटीत गरम दहीभात दिला जातो. शेजारीच 10 रुपयांमध्ये प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. तिरुमला बालाजी म¨दरातील लाडू व या लाडूचा प्रसाद वेगळा आहे. शुद्ध तुपातील हा लाडू भाविकाचे नक्कीच पोट भरून जातो. मंदिरा बाहेरील परिसरात धार्मिक वस्तू विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.
तिरुपती दर्शन - कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी
तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी त्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....
पुण्यातून रात्री १२.१० च्या चेन्नई एक्सप्रेसने रेणुगुंठा या ठिकाणी सायंकाळी ५ ला उतरलो. तिरुपतीला जाण्यासाठी पुण्यातून पाच ते सहा रेल्वेगाड्या आहेत. आपल्या सोईनुसार रेल्वेचे ४ महिने आधी बुकिंग केल्यास सोयीचे ठरते. शक्यतो रात्रीचा प्रवास असल्यास वेळ पटकन निघून जातो. नाहीतर १८ ते १९ तास रेल्वेत बसून कंटाळा येतो. रेणुगुंठा येथे उतरून तिरुपती येथील बालाजी संस्थानच्या लॉजवर जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी तिरुपती संस्थानतर्फे भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची सोय उपलब्ध असते. रिक्षावाल्याला सांगून देखील त्याने स्टेशनजवळच्या विष्णू निवासमवर न नेता दुसºयाच निवासावर आम्हाला नेऊन सोडले. तेथे चौकशी केल्यावर हे ते नव्हे असे कळले. रेल्वे स्टेशनजवळच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी पुन्हा बाहेर येऊन आम्ही रिक्षा केली. विष्णू निवासम्ची ही इमारत तिरुपती रेल्वेस्टेशनसमोरच असून, सुमारे दोन हजार रुम्स भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. आधिच बुकिंग केल्यास येथे राहण्याची अल्पदरात सोय उपलब्ध होते. आम्हाला मिळालेली रुम अतिशय स्वच्छ होती. दोन बेड, चादर, उश्या, संडास बाथरूम, आंघोळीसाठी गरम पाणी, फॅन अशा सर्व सोयींनीयुक्त असलेली ही रुम्स आधी दोन महिने बुक करावी लागते. सुमारे ३०० रुपयात आपल्याला ही उपलब्ध होते. याच इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये सायंकाळचे जेवण करून आम्ही पद्मावती मंदिर व इॅस्कॉनचे मंदिर पाहण्यास निघालो.
भक्तनिवासातून ८ ला खाली आलो. बाहेरील उभ्या असलेल्या रिक्षा स्टँडवरून रिक्षा केली. ४०० रुपयांत इस्कॉन व पद्मावती मंदिर दाखवून परत सोडण्याचे ठरवले. पद्मावतीचे मंदिर रात्री ९ नंतर बंद करण्यात येते. खरेतर बालाजीचे दर्शन घेऊन झाल्यावर पद्मावती देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मात्र, दुसºया दिवशी वेळ नसल्यामुळे आम्ही दर्शन आदल्या दिवशीच घ्यायचे ठरले. दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ तेथील दुकानांमध्ये खरेदी केली. रिक्षा ड्रायव्हरने वेळेत आम्हाला या ठिकाणी नेऊन सोडले होते. कारण दर्शन रांगेत उभे राहणाºयांमध्ये आम्ही शेवटचेच होतो. ९ नंतर दर्शनरांगा बंद करण्यात आल्या. पद्मावती देवीचे दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या निवासस्थानी आलो.
दुसºया दिवशी सकाळी ८ ला आवरून तिरुमला डोंगरावर जाणाºया बसमध्ये बसलो. या बसचे तिकीट भक्तनिवास स्थानाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये दिले जाते.
विष्णू निवासम्च्या गेट बाहेर तिरुमलावर जाण्यासाठी शासकीय बस उपलब्ध असतात. ५३ रुपये प्रौढांसाठी तर लहान मुलासांठी २९ रुपये असे गाडी भाडे आहे. रिटर्नचे तिकीट काढल्यास माणशी १० रुपये कमी पण होतात. या शिवाय खासगी बस, जीप उपलब्ध असतात. मात्र, त्यांचे भाडे मनमानी असते. मनात येईल तो आकडा सांगून ते मोकळे होतात. थोडी तडजोड करता येते. खासगी जीपचा एक फायदा असा होतो की आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी थांबून वाटेतील स्थळे पाहता येतात. पण तसे ड्रायव्हरशी बोलावे लागते. तिरुमलावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य डोंगरच्या खाली प्रवाशांची व बॅगांची यंत्राद्वारे तपासणी केली जाते. यासाठी शक्यतो कमी बॅग घेऊन जाणे आवश्यक असते. आम्ही रुमवरच बॅगा ठेवल्याने त्रास झाला नाही. तिरुमलावर जाण्यासाठी प्रशस्त रस्ता असून, २५ किलोमीटर वर तिरुपतीचे मंदिर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी असल्याने वातावरण उन्हाळ्यातही थंड होते. सुमारे दीड तासातच आम्ही वर पोहचलो. वर व खाली उतरण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत. घाट मार्गाने आम्ही साडे नऊला वर पोहचलो. वरती डोसा, इडली खाऊन कल्याण कट्टावर गेलो.
कल्याण कट्टा :
बालाजीसाठी डोक्यावरचे केस काढणे ही प्रथा आहे. या केसांचाही पुढे मोठा आर्थिकदृष्ट्या वापर केला जातो. यातून बरेच पैैसे कमवले जातात. असो. तर कल्याण कट्टा येथे मोठी इमारत असून, यात महिला व पुरुष, लहान मुले असे भक्त आपले केस कापून देवाला अर्पण करतात. यासाठी छोट्याश्या रांगेत उभे राहून आपल्याला एक कुपन व ब्लेड देण्यात येते. कुपनवर न्हावी व खोली क्रमांक दिलेला असतो. त्या-त्या नंबरच्या खोलीत प्रवेश करून केस काढणाºया नाव्हासमोर जाऊन उभे राहायचे. मग तो आपल्याला केस भिजवून येण्यास सांगतो. थोड्याच वेळात मान खाली घालून खराखरा करून डोक्यावर वस्ताºयाने केस उतरवले जातात. या न्हाव्याकडून केस काढताना पैसे मागितले जातात. त्याला आपण होकार दिला तर ठिक नाही तर डोक्यावर एखाद दोन वार करून डोके काहीप्रमाणात रक्तबंबाळ केले जाते. संस्थानकडून न्हाव्याला पैसे न देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. मात्र, येथे गुपचूप पैसे घेतले जातात. पैसे मागण्याची ही प्रथा ‘खुशी’ या नावाने ओळखली जाते. अगदी मोबाईल, चप्पल जमा करण्याच्या ठिकाणी सुद्धा येथील कर्मचारी १०, २० रुपयांची ‘खुशी’ मागतात. मी मात्र, त्यांना ‘खुश’ न करताच माझे काम काम करून घेतले. केसं उतरविल्यानंतर खालील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करून कपडे बदलून आम्ही बालाजी दर्शनासाठी पुढे गेलो.
आम्ही दोन महिने आधि आॅनलाईन दर्शनासाठी पास काढला होता. ३०० रुपये प्रती माणशी असे हा पास असतो. यात प्रसादासाठी २ लाडू देण्यात येतात. दर्शनाची वेळ सकाळी ११ वाजता होती. पास चेक करण्याअगोदर स्त्री व पुरुषांनी ठराविक ड्रेस परिधान करणे गरजेचे असते. तश्या सूचना अगोदरच दिलेल्या असतात. मात्र, गडबडीत जीन्स पॅन्ट व ओढणी न घेता गेल्यास दरवाजातच अडवून बाहेर बाजूस असलेल्या विक्रेत्याकडून ओढणी व पंचा विकत घ्यावा लागतो. दर्शन रांगेत ११ वाजता उभे राहून आम्ही पुढे गेलो. वाटेत आपल्याकडील बॅगा व मोबाईल तेथील काउंटरवर जमा कराव्या लागतात. त्यांच्याकडून तशी पावती आपल्याला मिळते. ही सुविधा मोफत आहे. तरी पण येथे ‘खुशी’ मागणारे कमी नाहीत. पैसे देण्याची गरज नाही. या पास शिवाय मोफत दर्शन घेणारे व अजून १००० रुपये देऊन विशेष पास घेणारे असे सगळेच जण वेगवेगळ्या मार्गाने या रांगेत पुढे आपल्याला येऊन मिळतात. बºयाचश्या फरकाने येथील भक्तांना पैैश्याच्या जोरावर दर्शन घेणे सोपे जाते. जितके पैैसे पाससाठी जास्त तितके लवकर दर्शन. नाहीतर मोफत पास घेणाºयांना २४ ते ३६ तास हुंडीत बसणे भाग पडते. मागे दोन वेळा हा अनुभव घेतला होता. गदीनुसार साधारणपणे ४ ते ५ तर कधी २४ तासांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेणारे भाविक येथे पहायला मिळतात. या आधिच्या ट्रिपमध्ये दर्शनासाठी आम्ही ८ तास घालवले होते. सुमारे १ तास रांगेत चालल्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात येऊन पोहचलो. अगदी ५ ते १० सेकंदातच समोर बालाजीची आकर्षक मूर्ती डोळ्यांसमोर येते. डोळे मिटून उघडेस्तोवर आपण पुढे सरकलेले असतो. झाले एकदाचे दर्शन. मंदिराच्या परिसरातील भिंतीवर जुन्या तमिळ भाषेतील कोरीव लेख दिसतात. कोरीव काम आपल्याकडील मंदिरा इतके पहावयास मिळत नाही. जमिनीवर एक प्रकारचा तेलकट प्रकार पायला लागतो. काय आहे ते पाहिल्यास वातावरणातून उडत आलेले तूप असते. भाविकांना देण्यात येणाºया साजूक तुपातील लाडू बनविण्याचे केंद्र मंदिरा बाहेर असल्याने येथे जमिनीला व वातावरणात एक प्रकारचा सुगंध दरवळत असतो. मंदिराच्या आवारात आपल्याला द्रोणात गरम भात प्रसाद म्हणून दिला जातो. एकंदरीतच येथील भक्तीमय वातावरण, बालाजीला पाहण्यासाठी अबालवृद्धांची सुरू असलेली चढाओढ, गर्दी, लोकांच्या भावना यातून आपण कुठेतरी सावरून मुख्य दरवाज्यातून बाहेर येतो. येथून पुढे कोणतीही सूचनाफलक नसलेल्या मार्गाने विचारात, गर्दीच्या मागे जात आपण लाडू मिळण्याच्या ठिकाणी येऊन पोहचतो.
अापल्याकडील पासवर असलेल्या लाडूच्या संख्ये इतके लाडू आपल्याला रांगेत उभे राहून मिळतात. विशेष म्हणजे हे लाडू घेण्यासाठी जरी गर्दी होत असली तरी या ठिकाणी प्रसादासाठी अनेक काउंटरर्स उपलब्ध असल्याने ५ ते १० मिनिटातच आपले काम पूर्ण होते. लाडू मात्र, साजूक तुपातला, काजू, बदाम, बेदाणे युक्त असा असतो. अशा प्रकारे प्रसाद मिळल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातून बाहेर पडलो. आता वेळ होती आमचे मोबाईल व बॅगा घेण्याची. तर बॅगा व मोबाईल जेथे जमा केले तेथे मिळत नाहीत. तर मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्याच्याकडेला असलेल्या एका इमारतीत आपले सर्व सामान आणले जाते. पावती दाखवून आपल्याला मोबाईल सुस्थितीत मिळतात. बॅगा व चपला देखील मिळतात. एवढे फरफेक्ट नियोजन या ठिकाणी असते. याचे आश्चर्य वाटते.
यानंतर वेळ होती ती जेवणाची. दुपाराचा १.३० वाजला होता. परिसरात असणाºया खाद्यविक्रेत्यांच्या स्टॉलवर जाऊन पोळी-भाजी, डोसा, दही भात, उडीदवडे, चायनीज, कोल्डड्रिंक्स असे खाद्यपदार्थ आपल्याला खायला मिळतात. मात्र, उच्चभ्रू सुखसोईनी युक्त असे हॉटेल या परिसरात नाही. त्यामुळे काहीजणांना हे आपण कुठे येऊन असे रस्त्यावर येऊन खातोय असा प्रश्न मनात येतो. पण असा अनुभव कधीतरी घेणे नक्कीच वेगळे ठरते. जेवण करून आम्ही येथील मार्केटमध्ये जाऊन खरेदी केली. बालाजीच्या आकर्षक मूर्ती, महिलावर्गासाठी अभुषणे, दागिने, लहान मुलांसाठी खेळणी असे या मार्केटचे स्वरुप असते. विशेष म्हणजे येथील विक्रेते चक्क आपल्याशी हिंदी संभाषण करतात. कारण धंदा आहे. तेव्हा त्यापुरती त्यांची मातृभाषा थोडी बाजूला ठेवतात.
सायंकाळी ५ वाजता आम्ही बसस्टँडवर येऊन पोहचलो. येथून तिरुपती, वेल्लूर जाण्यासाठी बसेस सुटतात. गर्दीच्या वेळी या बसेस फॅमिलीसोबत पकडणे मोठे कठीण काम असते. कारण बस येताच बसच्या दोन्ही बाजूकडून माणसे खिडक्यातून आत उड्या मारतात. टॉवेल ठेऊन जागा अडवतात. दरवाज्यामधून जाणे तर फारच कठीण. प्रचंड धक्का बुक्की करत अनेक गाड्या सोडल्यानंतर आम्ही कंडक्टरला विनंती करून उभ्याने प्रवास करण्यास राजी केले. त्यानेही आम्हाला उभे राहण्यास मंजुरी दिली. बस पकडण्यासाठी फारच मोठे दिव्य करावे लागते. पण मजा आली. एक तर त्यांची भाषा वेगळी आपण मराठी भांडणार ते तमिळीमध्ये म्हणजे कोणालाच काही कळणार नाही. नुसताच राडा. सुमारे तासभराच्या प्रवासानंतर सायंकाळी ६.३० ला तिरुपती निवासस्थावर पोहचलो.
आमचा राहण्याचा कालावधी २४ तासांचा असल्याने निवासस्थानकाच्या कर्मचाºयाने कुलूपावर छोटे कुलूप लावले. विनंती केल्यानंतर अर्धा तास वाढीव मिळाला. आवरून ७ ला खाली आलो. आमची कोल्हापूरला जाण्यासाठीची हरिप्रिया ट्रेन रात्री ९ ची होती. स्थानकाच्या बाहेरील बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये जेवण करून स्थानकात येऊन बसलो. एक मात्र, जाणवले की येथील स्थानक आपल्या पुण्यातील स्थानकापेक्षा खूप पटीने स्वच्छ असते. प्रचंड गर्दी असूनही रेल्वेस्थानक खूपच स्वच्छ होते. रात्री ९ ला आमचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठीचा प्रवास सुरू झाला. दुसºया दिवशी दुपारी ४.३५ ला ही गाडी कोल्हापूरला पोहचते. सुमारे १९ तास ३५ मिनिटे व ९०४ किलोमीटरचे अंतर कापून गाडीने आम्हाला कोल्हापूरात सोडले. रेल्वेस्थानकातून रिक्षा करून महालक्ष्मी मंदिर परिसरात असणाºया घरगुती लॉज शोधण्यास रिक्षा ड्रायव्हरला सांगितले. त्यानेही आम्हाला वांगेआळीत नावाच्या परिसरात आणून सोडले. घरगुती लॉज चालविणारे या परिसरात खूपजण आहेत. आम्ही फक्त फ्रेश व दर्शन घेऊन निघणार असल्याचे सांगितल्यावर ५०० रुपयांत मालक तयार झाला. सायंकाळी ८ ला आवरून मंदिराकडे निघालो. मात्र, मंदिरात बाहेरच्या दरवाज्याच्या बाहेर गेलेल्या रांगा पाहून आम्ही लांबूनच महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तेथून कोल्हापूरचा बाजार पाहत पाहत रांकाळ्याला आलो. सुंदर ठिकाण आहे. आमची पुण्याकडे जाण्यासाठी असणारी गाडी सह्याद्री एक्सप्रेस रात्री १०.५० होती. दोन रात्र तीन दिवस असलेली आमची तिरुपती बालाजी व महालक्ष्मी दर्शनची ही ट्रिप आमच्याबरोबर असलेल्या मित्रांमुळे आणखीच मजा आली.
भाषेचा अभिमान :
येथील लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान पहायला मिळाला. रिक्षा ड्रायव्हर, दुकानदार, किरकोळ विक्रेते सोडले तर हिंदीतून कोणीही बोलत नाही. रस्त्यावर जाणाºया-येणाºया माणसाकडे मदत मागितल्यास ‘नो हिंदी’ असे बजावून सांगतात. हिंदी राष्ट्रभाषा असून ही परिस्थिती?. त्यामुळे आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे.
काही टिप्स :
- आॅनलाईन रेल्वे बुकिंगसाठी वेवसाईट : https://www.irctc.co.in
- आॅनलाईन तिरुपती निवासस्थान व भक्तनिवास वेबसाईट : https://ttdsevaonline.com/#/login
आम्ही केलेल्या रेल्वेगाड्या :
- पुणे ते रेणीगुंठा : मुंबई - पुणे - चैैन्नई एक्सप्रेस रात्री ००.१० मिनिटे. (पुणे) पोहचते दुसºया दिवशी : दुपारी ४.४० (१९ तास प्रवास) (१२१६३ ट्रेन क्रमांक)
- रेणीगुंठा ते कोल्हापूर : हरिप्रिया एक्सप्रेस : रात्री ९ वाजता रेणीगुंठा येथून - कोल्हापूरला पोहचते ४.३५ ला (१६.३५ मिनिटे प्रवास (१७४१५ ट्रेन क्रमांक)
- कोल्हापूर ते पुणे (मुंबई) : सह्याद्री एक्सप्रेस (रात्री १०.५०) पुण्यात पोहचते सकाळी ६.३० ला. (३२० किलोमीटर, ८ तास) ही गाडी पुणे, पिंपरी, चिंचवड व लोणावळापर्यंत थांबते