Saturday, November 7, 2020

रायगड जिल्हा पर्यटनस्थळ

एक सफर चौलची

अलिबाग पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश, चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता.

एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना ? त्याचे उत्तर चौलच्या बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड, त्यातच बंदरात असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या स्थळांचा आपापल्या भाषा-संस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत, पुढे नदी मंडप, दिपमाळ आणि सुंदर पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५ मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे. गाभाऱ्‍याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. पर्जन्य, वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की पर्जन्य कुंड, वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची उणीव ही कुंड भागवत असतात.

या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह ! कमानीची रचना, तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी, हौद तर येथील शाही श्रीमंतीच ! कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा, नागपंचमी, गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे.

चौलचा अगदी प्राचीन उल्लेख "पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी" या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्‍या काळातील चौलशी असलेले नातेसंबध दर्शविते, पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष, "जेटी"ची भिंत, सातवाहन कालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही !
कसे जावे ?

मुंबई-अलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टम-टमच्या सहाय्याने चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टम-टम, एस.टीने चौलला जाता येते. परंतु, पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते.

- श्वेता दांडेकर
dandekarshweta12@gmail.com
9757282750


 काळडोह वाळणकोंड

अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, एका बाजूस दुर्गम सह्यपर्वतरांगा व दुर्सया बाजूस अरबी समुद्र यांच्या मधोमध असलेल्या या निसर्गसंपन्न अशा भुप्रदेशात अनेक रहस्यमय स्थळे आहेत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे. याच रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेला वळणकोंड हा डोह सुद्धा अशाच एका अज्ञात गुढाची सफर आपल्यास घडवतो.

रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सावित्री. ती महाबळेश्वरजवळ उगम पाऊन महाडमार्गे पुढे बाणकोटजवळ समुद्रास मिळते. घोड, गांधारी व काळ व नागेश्वरी या तिच्या उपनद्या आहेत. या पैकी गांधरी हि उपनदी सह्याद्री रांगेत पुनाड येथे उगम पावते तर काळ नदी कोकणदिव्याजवळील कावळ्या घाटाजवळ उगम पावते. सावित्री नदीला बिलगर्णाया या चार नद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. या नद्या लहाव व वाकड्यातिकड्या असून समुद्रास मिळण्याआधीच त्यांची पात्रे कोरडी पडतात. पावसाळ्यात मात्र या नद्यांना पूर येतो पण उन्हाळ्यात या कोरड्या पडतात. याच दक्षीण कोकणातील जमीन सामन्यतरू खडकाळ व नापिक आहे परंतु तित नद्या व खाड्या पुष्कळ असल्याने त्यांच्या काठचा प्रदेश मात्र सुपीक आहे. मुख्य पिक तांदूळ असून नागली, वरी वाल वैगेरे फळे व सर्वसाधारण शाक भाज्या उत्पन्न होतात. मासेमारी व त्यांच्या व्यापार चांगला चालतो.

अशा या विविधांगी रुपाने नटलेला रायगड जिल्ह्याचा महाड तालुका आहे आणि अर्थात या तालुक्याचे ठिकाण असलेले महाड शहरही तितकेच ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर आहे. सातवाहनांच्या काळापासून बाणकोट खाडीवरील एक प्रसिद्ध बंदर म्हणून ख्याती असलेल्या महाडास पूर्वी पाश्चिमात्य देशातील जहाजे हजारोंच्या संख्येने बहुमुल्य असा माल घेऊन थांबायची व येथून तो माल बैलांवर लादून मढ्याघाट, कावल्या-बावल्या घाट तसेच बोराट्याची व सिंगापुरची नाळ इत्यादी मार्गांनी घाटावर नेला जात असे, सह्याद्रीतील या प्राचिन घाटमार्गांवर मालवाहतूक करण्यासाठी काही लेण्यासुद्धा बांधण्यात आल्या यातील गांधारपाले नामक एक प्रसिद्ध लेणी खुद्द महाड शहरातच आहे. या महाडास पूर्वी महाहाट असे नाव होते. येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह तर प्रसिद्धच आहे, याशिवाय महाडने अनेक राष्ट्रपुरुषांसही जन्म दिला क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा कमलाकर दांडेकर, सुरबनाना टिपणीस अशी नावे घेता येतील.

या महाड तालुक्यात शिवाजी महाराजांची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडसुद्धा आहे, हा महाकाय किल्ला पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, काही वर्षांपूर्वी येथे रोपवे करण्यात आला आहे त्यामुळे आता अबालवृद्धांसही हा किल्ला सहजतेने पहाता येतो. मात्र याच रायगड किल्ल्याच्या आसमंतात लपलेली अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजुनही प्रसिद्धीच्या झोतात यायची आहेत. तशी ती स्थानिक भागात प्रसिद्ध आहेत मात्र त्यांना आजही म्हणावे तितके वलय लाभलेले नाही. पूर्वीचा महत्वाचा शिवकालीन मार्ग रायगड ते राजगड हा होता. राजगडावरून राजधानी रायगडास आल्यावर सर्व ताफा याच मार्गाने रायगडास आला. ही वाट कोकणात ज्या ठिकाणि उतरते त्या मार्गावर छत्र निजामपूर नामक खेडे आहे. या गावावरुन काळ नदी गेली आहे, मग दोन-तीन कि.मी. अंतरावर वारंगी नामक खेडे आहे. तिथून काही अंतरावर पाणं, हे पाणं लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. घाटावरील तोरणा व कोकणातील रायगड यांच्या बरोबर मध्ये सह्याद्रीच्या मुख्य रांगेत शिवलिंगासारखा आकार असलेला एक प्रखर सुळका असलेला लिंगाणा दुर्ग हा पूर्वी रायगडचे तुरुंग होता. शिवकालात खुद्द रायगड, तळातली वाडी व लिंगाणा किल्ला हा परिसर तर्फ रायगड या नावाने ओळखला जात असे.

पायथ्याशी असलेल्या पाणं या गावापासून गावापासून किल्ल्याचा चढाव सुमारे चार मैल आहे. तळात लिंगाणामाची नामक छोटे गाव आहे. चढावयास अवघड असलेल्या या किल्ल्यावर पूर्वी वर जाण्यासाठी पार्यया कोरलेल्या होत्या पण आता त्यांची पडझड झाली आहे. शिडीच्या सहाय्याने वर जावे लागते. कड्यावर पाण्याची टाकी व कैदी ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या काही गुहा आहेत. या गुहांच्यावरील प्रखर सुळक्यावर चढाई करण्यासाठी हौशी गिर्यारोहक येथे येत असतात. किल्ल्याच्या पायथ्याला उअजवीकडे दापोली गाव लागते. हे झाले प्राचिन मार्गाचे वर्णन. सद्यस्थितीला महाडमधून एम्.आय.डी.सी. बिरवाडी-मांघरुण मार्गे दापोलीस जाता येते, अर्ध्या पाऊण तासाचा हा मार्ग आहे.

या दापोली गावाजवळ असलेला काळ नदीचा वळणकोंड हा रुद्रभिषण डोह हा निसर्गाचा एक चमत्कारच मानायला हवा. महाडपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेला वळणकोंड डोह येथील पवित्र अशा महाकाय माशांसाठी प्रसिद्ध आहे. या वळणकोंडाविषयी कधीतरी कुणाकडून ऐकिवात आलं होतं आणि इतका गुढ परिसर आपल्याच जिल्ह्यात असून आजवर तिथे जाता आले नाही ही खंत सुद्धा मनात होती आणि जेव्हा तिथे जाण्याचा योग आला तेव्हा क्षणाचाही विचार न करता अवधूत नामक भावाला घेऊन तेथे दाखल झालो. बिरवाडीपासून वारंगीपर्यंतचा परिसर हा वाळणखोरे म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडे रायगड, पोटल्याचा डोंगर, उजवीकडे मुख्य सह्याद्री रांगेतला मढ्याघाट, कावल्याबावल्या घाट, बोराट्याची व सिंगापुरची नाळ हा परिसर, थोडी पुढे नजर टाकल्यास अवकाशाला छेदून गेलेला लिंगाण्याचा सुळका आणि त्याच्याही पलिकडे असणारी पण नाव माहित नसलेली कोकणदिव्याची चार पाच शिखरे या सर्वांच्या मधोमध असलेल्या या प्रदेशातील मार्गावर असलेल्या अनेक गावांच्या नावामध्ये वळण किंवा कोंड असा उल्लेख आढळतो. उदा.केतकीचा कोंड, वाळण खुर्द, पांढेरी कोंड इत्यादी. वारंगी गावच्या वेड्यावाकड्या रस्त्यावर उजव्या बाजूस काळनदी आपली साथ देत असते, मात्र मार्च महिना असल्याने नदीचे पात्र पुर्णपणे सुकून फक्त नावापुरताच नदी वाटत रहाते.
काळडोह वाळणकोंड
निसर्गाची हि अद्भुत निर्मिती पाहताना अचानक गाडी थांबते आणि उजवीकडे अगदी नजरेच्या टप्प्यात असलेला एक हावडा ब्रिज टाईप लोखंडी झुला दिसतो. हा झुला काळनदीच्या वळणकोंड या डोहावरुन वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन दापोलीस जाण्यासाठी बांधला आहे. वळणकोंड हा डोह पाहताक्षणीच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या डोहाबद्दल जितके ऐकले होते तितकेच ते सत्यही आहे याची प्रचिती हा डोह पाहताना आली. तसा मी काळनदी परिसरातील माणगाव व लोणेरे परिसरात र्बयापैकी वावरलेला. मुळात काळ नदी ही सावित्रीची उपनदी, पावसाळ्यात पुर आणणारी ही नदी उन्हाळ्यात पार कोरडी ठाक होऊन जाते. त्यामुळे ज्याची खोलिच कळत नाही असा डोह याच नदीस आहे याची खात्री होत नव्हती. मात्र या नदीबद्द्ल आम्ही बरेच ऐकुन होतो. जिच्या नावातच काळ आहे अशी दरवर्षी निदान एकत्री बळी घेणारी ही नदी. माझ्या मावशीचे घर काळनदीच्या अगदी अलिकड असल्याने सुट्टीत तिथे गेल्यावर आम्ही बच्चेकंपनी दर संध्याकाळी नदीवर जात असू. मध्यंतरी तिथे मगरींचा संचार असल्याची बातमी आली, या नदीची मुख्य नदी सावित्री ही तिथल्या मगरींसाठीच प्रसिद्ध आहे त्यामुळे काही मगरींनी आपला मार्ग या निर्जन नदीकडे वळवला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र नदीच्या पुलावर बसलो असताना पुलाखालीच साधारण सात्-आठ फुटी काळया महाकाय मगरीचे दर्शन आम्हाला झाले होते. अशा या काळ नदीच्या या वळणकोंड डोहाबद्दल ऐकल्यापासून  तो पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. मार्च महिन्यात नदीचे पात्र पुर्णपणे सुकून गेले होते पण हा डोह मात्र पुर्णपणे भरलेला होता आणि याचा आकारसुद्धा प्रचंड होता.

मंदिरात लिंगाणा दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या दापोली नामक खेडेगावात राहणारे आणि वरदायिनी देवी मंदिराचे पुजारी श्री. रेणूसे भेटले. त्यांनी देवीची महती सांगितली. ही देवी परिसरातील पाणं, दापोली, पांढेरी, वाळण खुर्द, माणगाव, देवगड व वाघोली या सात गावांचे मुख्य दैवत. पुर्वीच्या काळी अडल्या नडलेल्यांनी नवस केल्यांनतर त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणुन या डोहातून सोन्या चांदीची भांडी व दागिने येत असत मात्र कार्य झाल्यानंतर भक्र्तांना हे दान परत या डोहात सोडावे लागत असे. मात्र एका भक्ताने हे सर्व साहित्य मिळवल्यावर डोहात परत सोडले नाही यामुळे देवीचा या परिसरावर प्रकोप होवून ती नाहिशी झाली आणि परिसरात दुष्काळ व रोगराईचे संकट कोसळले यामुळे सर्व गावर्कयांनी एकत्र येऊन देवीची करुणा भाकली. तेव्हा देवीने उपवर दिला कि मी आता या डोहामध्ये माशांच्या रुपाने वावरिन तेव्हा या माशांची निगा राखा त्यांचा नाश करु नका, त्यांची पुजा करा तुमच्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होतील. वरदायनी देवीचे मंदिर डोहावर आहे. देवतांच्या इतिहास पाहता त्यांची विभागणी विवीध स्तरामध्ये झाल्याचे आढळून येते वैदिक देवता, पौराणीक देवता, स्वयंभू देवता, अवतारी देवता असे अनेक प्रकार आहेत. काही देवतांचा जन्म हा विशिष्ट दैत्याचा नाश करण्याकरित झाला तर पर्वतक्षेत्रांमध्ये काही देवतांची स्थाने आढणून आली म्हणुन त्यांना पर्वतीय देवता म्हणुन ओळखले जाते. काही देवतांचा जन्म मानवी रुपात झाला असून त्यांनी केलेल्या अतिमानवी चमत्कारांमुळे त्या देवतास्वरुप पावल्या. वरदायिनी देवीची नवसाला पावणारी आणि वर देणारी अशी महाड परिसरात ख्याती आहे.

    डोहाविषयी अधिक माहिती जाणुन घेताना असे कळले की, अनेक वर्षांपासून या डोहातले प्रचंड आकाराचे मासे दैवी मानले जातात व पुजले जात असल्याने त्यांचा नाश करणे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तसा प्रयत्न कोणी केल्यास त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होते. ब्रिटीशकाळात एका इंग्रज अधिर्कायाने हा प्रयत्न केल्याच संदर्भ सापडतात. मुंबईहून रायगडास काही कामानिमित्त आलेला हा अधिकारी या डोहाविषयी आणि डोहातल्या ६-७ फुटी आकाराच्या माशांविषयी ऐकुन होता. डोह पाहताना आतले प्रचंड आकाराचे मासे पाहून त्याला त्यांची शिकार कराविशी वाटली. मात्र उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करुन त्यास ते माशे मारणेच काय तर पकडणेही जमले नाही. सर्व प्रयत्न करताना अंधार पडू लागल्याने हताश अवस्थेत तो तळागडाकडे जाण्यास निघाला. तळागडावर पोहोचताच त्यास अतिशय तिव्र तापाने घेरले व एका दिवसातच त्याचा तिथे मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्रिटीशांनी त्या परिसराची धास्ती घेतली होती.

सुमारे ३०० फुट लांबी व ३० फुट रुंदी असलेल्या या रौद्रभिषण डोहाची खोली आजही कुणालाही मोजता आलेली नाही, फार पुर्वी इंग्रजांनी या डोहाची खोली किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला होता यासाठी त्यांनी टेपचा आधार घेतला होता मात्र सुमारे १००० फुट लांब टेप आत बुडवून सुद्धा याच्या तळाचा ठाव इंग्रजांस लागला नाही याचा अर्थ याची खोली आणखी कितीतरी असली पाहिजे हे स्पष्ट होते. डोहामध्ये कमित कमी २-३ फुट ते जास्तित जास्त ८ फुटांपर्यंत वाढ झालेले अजस्त्र आकाराचे मासे आहेत ज्यामध्ये काडा, कोला आणि शिंगाडा या माश्यांचा समावेश होतो. यातले शिंगाडे ७ ते ८ फुट वाढले आहेत आणि फार क्वचित्र दर्शन देतात. या माशांना प्रसाद म्हणुन कुरकुरे किंवा तांदुळ टाकल्यास एकाच वेळी गर्हिया पाण्यातून हजारो माशे बाहेर येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात हे दृश्य फारच रोमांचकारी असते, मात्र हा प्रसाद देताना अतिउत्साहात डोहाच्या जवळ अजिबात जाऊ नये कारण डोह खोल असल्याने तसेच आजुबाजुस वस्ती नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत एक घटना रेणुसे यांनी सांगितली, या डोहाबद्दल अशीही एक अख्यायिका आहे की, डोहामध्ये अनावधाने एखादा भक्त पडला तरिही त्यास मरण येत नाही, एकदा माशांना प्रसाद देता देता एक भक्त पाण्यात पडला मात्र बघता बघता हजारो माशांचा समुह त्यास पाण्याबाहेर घेऊन आला. अशा या रौद्रभिषण व गुढ अशा डोहास पर्यट्कांनी एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे जेणेकरुन तो याची देही याची डोळा अनुभवायास मिळेल. शेवटी सृष्टीची अनेक गुढ तत्वे आजही विज्ञानाच्या पलिकडे आहेत आणि काळडोह वाळणकोंड त्यापैकीच एक आहे.

महाड - नररत्नांची ऐतिहासिक भुमी

महाराष्ट्राला भुगोलाबरोबरच इतिहास देखील आहे असे आजही अभिमानाने म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात तर इतिहास व भुगोल खचून भरला आहे. अशा या रायगड जिल्ह्यातले एक सुप्रसिद्ध स्थळ म्हणजे जिल्ह्याच्या दक्षीणेकडील तालुक्याचे महाड शहर.

साक्षात शिवाजी महाराजांचे वास्तव्य या परिसरात असल्याने महाड शहराचे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असले तरी शिवकाळापुर्वी सुद्धा महाड हे महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र राहीले असले पाहीजे कारण १५३८ सालीं महाडला भेट देणारा पोर्तुगिज डी कास्ट्रो असें लिहितो कीं  महाड व्यापारी वस्तीचें गांव असून  येथें गव्हाची फार मोठी घडामोड होते. तसेच १७७१ सालीं जॉन फोर्बस याने महाड चांगल्या तटबंदीचें व भरवस्तीचें शहर असल्याची नोंद केली आहे.

महाड हे शहर रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदीच्या म्हणजे सावित्रीच्या तिरावर वसले आहे. या सावित्री नदीस गांधारी, घोड, काळ व नागेश्वरी अशा एकूण चार उपनद्या आहेत. सावित्री नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावून महाडमार्गे बाणकोट खाडीस मिळते. सावित्री नदीच्या या परिसराचे महत्त्व फार प्राचिन असून तिचा उल्लेख पुराणांत सुद्धा आला आहे. स्कंदपुराणातल्या कथेनुसार सावित्री ही ब्रह्मदेवाची पत्नी. एक दिवस ब्रह्माने ब्रह्मारण्यात यज्ञाचे आयोजन केले मात्र सावित्री आभुषणे परिधान करण्यात गुंग राहिल्याने यज्ञास उशीर होऊन पाहुण्यांची गैरसोय नको म्हणुन ब्रह्माने शंकर, विष्णू इत्यादी देवतांची अनुमती घेऊन आपली उपपत्नी गायत्री हिच्यासोबत दिक्षा घेतली मात्र एवढ्यात सावित्रीची तिथे आगमन होऊन समोरचे दृश्य पाहिल्याने तिचा संताप अनावर झाला व तिने सरसकट सर्वांना तुम्ही जलमय होऊन स्त्रीरुपाने प्रसिद्ध व्हाल व गायत्री नदी होऊन सर्व लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील असा शाप दिला मात्र संतापलेल्या विष्णूने सावित्रीसही शाप देऊन जलप्राय केले त्यामुळे त्राग्याने सावित्रीने सह्याद्रीच्या कड्यावरुन उडी टाकून समुद्रास मिळण्याचा मार्ग पत्करला. तिला परत आणण्यासाठी ब्रह्मदेव तिच्या मागोमाग गेले मात्र ती परत आली नाही. आजही सावित्री नदीच्या तिरावर उगमापासून ते समुद्रकिनार्‍यापर्यंत बारा शिवलिंगे आहेत ते पाहता या परिसराच्या प्राचिनत्वाची प्रचिती येते.

महाड परिसराच्या प्राचिनत्वाचा दुसरा पुरावा म्हणजे शहरापासून फक्त तीन कि.मी. अंतरावर असलेली गांधारपाले लेणी. फार पुरातन काळापासून बाणकोटच्या खाडीचा परिसर हे देश व परदेशांतर्गत दळणवळणाचा प्रमुख मार्ग असल्याने व्यापाराच्या या प्रमुख मार्गावर इसवी सनाच्या पहील्या शतकात कोरल्या गेल्या. या लेण्यांमध्ये अस्तिवात असलेल्या तीन ब्राह्मी शिलालेखांवरुन कुमार कंबोज विष्णूपुलीत, वेदश्री व संघरक्षीत अशी तीन नावे मिळतात. काहींच्या मते या लेण्याची निर्मिती करणारा कंबोज विष्णूपुलीत हा याच परिसरात राज्य करत होता मात्र या लेण्यांची निर्मीती सातवाहन काळातच झाली असून त्यांच्याच काळात सध्याच्या अफगाणीस्थानातील गांधार, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, क्रिगिजस्तान इत्यादी प्रदेशावर राज्य करणार्‍या कंबोज या राजवंशाच्या व्यापारी उद्देशाकरीता मिळालेल्या देणग्यांतून या लेण्यांची निर्मिती झाली असावी. कारण या लेण्याचे गांधारपाले (गांधार-पल्ली) हे नाव पाहता कंबोज हे राजघराणे त्याकाळी अफगाणीस्थानातील गांधार येथेच राज्य करीत होते त्यामु़ळे ही शक्यता अजून दृढावते.

या लेण्यांची निर्मिती कोणीही केली असली तरी या लेण्यांच्या निर्मितीचा काळ पहाता महाडचा इतिहास किती पुरातन आहे हे लक्षात येते. महाड या शहराच्या मुळ नावातही इतिहास द्डलेला आहे. महाड हे महा व हाट या दोन शब्दांचे रुप आहे. महा म्हणजे मोठा व हाट म्हणजे बाजार त्याअर्थी बाणकोट खाडीवरील मोठी बाजारपेठ म्हणुन महाड हे नाव या गावास मिळाले असावे. कालांतराने महाहाट या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाड हा शब्द तयार झाला असावा कारण असे अपभ्रंश मध्ययुगात प्रामुख्याने झाले जसे कर्‍हाड पुर्वी करहाट या नावाने व वर्‍हाड पुर्वी वरहाट या नावाने प्रसिद्ध होते.

प्राचिन काळी महाड हे स्थानिय बाजारपेठेचे ठिकाण असले तरी या ठिकाणी लोकवस्ती तुरळक असावी कारण भौगोलिक दृष्ट्या महाड शहर सावित्री नदीच्या तटास लागून असल्याने असल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण त्याही काळी असावे त्यामुळे कदाचित त्याकाळी मुख्य लोकवस्ती आजुबाजुच्या पंचक्रोशीतल्या गावांत असून व्यापार्‍यांच्या व नागरिकांच्या सोयीकरीता हे सर्व व्यापारी वर्षातला ठरावीक काळ हा मोठा बाजार भरवत असण्याची शक्यता आहे. कारण मध्ययुगपुर्व प्राचिन साधनांमध्ये महाडचा थेट उल्लेख अजुनपर्यंत मिळाला नसला तरी प्राचिन काळातली एक मोठी बाजारपेठ म्हणुन महाड निसंशय प्रसिद्ध होती.

महाडचे व्यापारी महत्त्व प्राचिन काळापासून कायम असले तरी राजकिय महत्त्व निजामशाही काळापासून मिळाले असले पाहिजे. याच काळापासून येथे लोकवस्ती वाढू लागली असावी कारण सध्याचा जो महाडचा कोट आहे तो आदिलशाही काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. पुर्वी निजामशहा व नंतर आदिलशहा यांचा मांडलिक असलेल्या जंजिर्‍याच्या सिद्दीच्या ताब्यात महाडचा त्याकाळी कारभार असून महाडच्या उत्तरेस मुल्ला अहमदच्या अखत्यारीत असलेला कल्याण सुभा सुरु होत असे.
महाड - नररत्नांची ऐतिहासिक भुमी
१६५६ साली जावळीकर मोर्‍यांचा पाडाव करुन महाराजांनी महाड स्वराज्यात आणले व खर्‍या अर्थाने या भागाच्या उत्कर्षाचा पाया रचला. महाडपासूनच काही अंतरावर असलेल्या रायगड किल्ला ही शिवरायांनी राजधानीचे ठिकाण केल्याने महाड परिसर मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू बनला व महाडचे वैभव हळूहळू वाढू लागले. महाड शहराचे सध्याचे जे रुप आहे ते अर्थात शिवकालीन आहे. येथील पुरातन विरेश्वर मंदीर व इतर मंदीरे, इथल्या वस्त्या, चवदार, वीरेश्वर व हापूस (हबशी) ही तीन तळी  तसेच इथली नगररचना ही मुख्यत्वेकरुन शिवकाळातच रचली गेली असावी. एकाअर्थी किल्ले रायगड मुख्य राजधानीचे कार्य पार पाडत असताना दुय्यम राजधानीचे ठिकाण हे महाड होते, शिवाजी महाराजांनी निवासाकरीता महाडास एक वाडा बांधला होता, या अगोदरही समुद्रस्नानाची आवड असल्याने बाणकोट खाडीवर महाडात त्यांनी एक वाडा खास समुद्रस्नानासाठी बांधला होता.

महाड हे ऐतिहासिक स्थळ आहेच मात्र अनेक नररत्नांची भुमी म्हणुनही महाड परिसर प्रसिद्ध आहे, या ठिकाणी एकतर या नररत्नांनी जन्म घेतला अथवा इतर नररत्नांची ही कर्मभूमी ठरली स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, संभाजी महाराज, समर्थ रामदास, कवींद्र परमानंद, मुरारबाजी देशपांडे, दादाजी देशपांडे, क्रांतीसुर्य नानासाहेब पुरोहीत, काळकर्ते शि.म.परांजपे, त्र्यंबक कारखानीस, हुतात्मा कमलाकर दांडेकर, हु. वसंत दाते, हु. अर्जुन कानू भोई आणि हु. नथू दौलत टेकावला, सुरबनाना टिपणीस अशा अनेक नररत्नांची महाड ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे. नाना फडणीसांचे महाडचे प्रख्यात राजकिय कारस्थानही प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच १९ व २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला.

महाडचे श्रद्धास्थान ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांचा छबीना उत्सव हा येथील पंचक्रोशीतल्या तमाम नागरिकांचे प्रमुख आकर्षण आहे, हा उत्सव पाहण्यासाठी दुरवरुन पर्यटक महाडला भेट देतात याशिवाय दुर्गराज रायगड, पाचाड येथील जिजाबाईंची समाधी, दासबोधाचे जन्मस्थान शिवतरघळ, गांधारपाले लेणी, सव येथील गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक चवदारतळे ही महाड शहरातील व परिसरातील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. प्राचिनता व आधूनीकता यांचा संगम असलेले महाड शहर व परिसर पाहिल्यावर या परिसरास नररत्नांची भुमी असे का म्हटले जाते याची खर्‍या अर्थाने प्रचिती येते.

महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू


अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२ जून २०१६ रोजी दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षें वाट पाहत होता. स्वाभाविकच, तो समाज आनंदित झाला आहे. ते लोक महाराष्ट्रात खरोखरी अल्पसंख्य म्हणजे बारा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोन-चार हजारांच्या दरम्यान आहेत. पश्चिम बंगालने तेथील ज्यू लोकांना अल्पसंख्याक ही मान्यता दहा वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्यावेळी तेथे फक्त सत्तेचाळीस ज्यू नागरिक होते! महाराष्ट्र हे ज्यू धर्मियांना मान्यता देणारे भारतातील दुसरे राज्य आहे.

अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच, त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल.

महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी म्हणतात, की ज्यू धर्मीयांना तशी मान्यता या आधीच द्यायला हवी होती, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.

मात्र राज्य सरकारकडे त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही! जनगणनेच्या अर्जामध्ये त्यांच्यासाठी वेगळा रकाना (कॉलम) सुद्धा नसे, अधिकारी त्यांना सांगत, की ख्रिश्चन किंवा मुसलमान असे लिहा, त्यामुळे ज्यू धर्मीयांची खरी जनगणना होत नसे. महाराष्ट्रात१९६१ साली पंधरा हजार आठशेएक्कावन्न ज्यू नागरिक होते, तत्पूर्वी ती संख्या तीस हजारापर्यंत असावी. आता मात्र पश्चिम किनारपट्टीवर (मुख्यत: महाराष्ट्रात व केरळमध्ये) चार-साडेचार हजार ज्यू नागरिक असावेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यूंचे योगदान भरीव आहे. ज्यूंचे हे ‘अल्पसंख्याक’ होणे त्याला स्थलांतर हे कारण आहे; पक्षी एकामागोमाग एक उडून जावेत तसे येथील ज्यू नागरिक त्यांच्या धर्मदेशी, इस्रायलला निघून गेले आहेत. ज्यू लोक साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी - इसवी सनपूर्व ७३० मध्ये - पॅलेस्टाईनमधून स्वसंरक्षणाकरता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले. कथा अशी, की त्यांची जहाजे अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ या बंदरकिनारी बुडाली व त्यातून जे वाचले त्या सात-आठ जोडप्यांचे जे वंशज ते बेने-इस्रायली! त्यांचे वंशज महाराष्ट्रात दोन-अडीच हजार वर्षें नांदले. दुसरे जहाज दक्षिण किनाऱ्याला लागले. ते कोचीनला उतरले, ते कोचिनी ज्यू! बगदादहून स्थलांतरित झाले ते बगदादी ज्यू – ते कोलकात्यामध्ये स्थिरावले होते. ‘बेने इस्त्रायल’ या हिब्रू शब्दाचा अर्थ इस्त्रायलची लेकरे!

अपघाताने अलिबाग तालुक्यात आलेल्या निराधार लोकांना स्थानिकांनी आश्रय दिला. त्यांना तेल गाळण्याची कला अवगत होती. म्हणून त्यांनी गलबतांना लागणाऱ्या उंडीच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी विश्रांती घेत. म्हणून त्यांना ‘शनिवार तेली’ असे म्हटले जाई. त्यांनी मराठी भाषा स्वीकारली, ज्या गावात ते राहिले, त्या गावांची नावे त्यांनी स्वीकारली. म्हणून अष्टमीचे अष्टमकर, झिराडचे झिराडकर, चरीकर, मळेकर, रोहेकर, आवासकर अशी आडनावे त्यांच्यात आहेत. त्यांची प्रगती कान्होजी आंग्रे यांच्या काळात चांगली झाली. रायगड जिल्ह्यातील बेने-इस्रायली १७४६ मध्ये मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संख्या मुंबई-ठाण्यात वाढली. त्यांनी रायगड जिल्ह्याप्रमाणेच (कुलाबा जिल्हा) मुंबईतही त्यांची प्रार्थनामंदिरे बांधली. ते सुतारकामासाठी प्रसिद्ध झाले. स्त्रियांनी शाळेत शिक्षिका म्हणून नोकऱ्या पत्करल्या. मुंबईमध्ये भायखळ्याला ‘सर एली कदूरी’ ही शाळा ज्युईश मुलांसाठी सुरू झाली. त्यांचे स्वतंत्र कॅलेंडर प्रसिद्ध होऊ लागले. सण व इतर धार्मिक संस्कार मंदिरात (सिनेगॉग्ज) होऊ लागले, त्या लोकांनी मराठी साहित्यात, संगीत नाटक, किर्तने ह्यामध्ये योगदान दिले. मराठीमध्ये महाराष्ट्रात त्यावेळी बेने इस्रायली समाजाने बावीस लहानमोठी नियतकालिके चालवली. एडवीन रोहेकर, रेचल गडकर (अनुबंध- ग्रंथाली प्रकाशन), नाथान सातामकर, भाई बंदरकर यांनी नाटके, कादंबऱ्या लिहिल्या. बिनयामीन अष्टमकर हे हरिदासबुवा किर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. हिंदी, गुजराथी व ऊर्दू भाषेतही ज्यू समाजाचे योगदान आहे. बनी रुबेन, सिनेनट डेव्हिड, रिबेका रूबेन, डॉ. जेरूषा झिराड, निस्सीम इझीकेल, विजू पेणकर (भारतश्री), डॉ. ई. मोझेस ही आणखी काही प्रसिद्ध नावे! इझिकेल रोहेकर यांनी ज्ञानेश्वरीवर सलग आठ दिवस प्रवचने सोलापूर, अमरावती येथे दिली होती.

इस्रायलचे राष्ट्र १९४८ साली निर्माण झाल्यानंतर, जगातील अनेक देशांतील ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले. भारतात ज्यू समाजाला कोणता त्रास झाला नव्हता. ते सुखी व समाधानी होते. त्यामुळे त्या समाजातील फारच थोडे लोक १९४८ ते १९६० पर्यंत इस्रायलला गेले. इतकेच नव्हे तर तेथे गेलेल्या काही लोकांना परत भारतात यायचे होते म्हणून पंडित नेहरूंनी त्यांच्याकरता विमानही पाठवले होते. सुरुवातीला, जे १९४८ च्या आसपास गेले त्यांना राष्ट्रउभारणीसाठी फार कष्ट करावे लागले. बेने इस्रायलींचे स्थलांतर १९६४ नंतर मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात झाले. ते स्थलांतर मुख्यत्वे धर्मासाठी, मुले-नातेवाईक तिकडे गेले म्हणून किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घडून आले. मराठी भाषिक ज्यू मुख्यत्वे रामले, बेरशेवा, किर्यातगात, दिमोना या शहरांतून राहतात. इस्रायल सरकारने त्यांना घर, नोकरी अशा अनेक सुविधा पुरवल्या. अनेकांनी सैन्यातील सक्तीच्या शिक्षणामुळे इस्त्रायलसाठी लढाईत - अरब-ज्यू संघर्ष - भाग घेतला. इस्रायलच्या प्रगतीमुळे त्यांचीही आर्थिक भरभराट, कष्टाची कास धरल्यामुळे झाली. त्यांना हिब्रू भाषा शिकावी लागली. त्याबरोबरच वेश आणि खाणे-पिणे ह्यात बदल करावा लागला. आता ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते मराठी सर्व जगभर फिरतात; अनेक वेळा भारताला भेटी देतात.

ती मंडळी इस्रायलमधील सिनेगॉग्जमध्ये भेटू लागली. तेथे स्त्रीमंडळे निघाली, त्यातून तेथे महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना झाली. ते ‘१ मे’ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात; सर्वजण एकत्र जमून मराठी पेहराव, मराठी भाषा, मराठी जेवण आवर्जून करतात. मुंबईमधून गेलेला एखादा सांस्कृतिक कलाकार कार्यक्रम सादर करतो. तसेच, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे भारताचे राष्ट्रीय सणही साजरे करतात. फ्लोरा सॅम्युअल या उच्चशिक्षित स्त्रीने सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे ‘मायबोली’ मासिक चालवले, ते अजूनही चालू आहे. त्यांना मराठी भाषा, आपला गाव, आपले शेजारी ह्यांचा विसर पडलेला नाही. येलू पेणकर नावाचे नाटकवेडे मराठी वाचनालयही लूद या शहरी चालवत असत.

मराठी ज्यू-ज्येष्ठ नागरिक मुंबईत विमानतळावर उतरला, की त्याच्या मातापित्यांच्या गावाकडील कबरीवर मेणबत्ती लावण्यासाठी सर्वप्रथम तिकडे जातो. तो कबरस्थान सुव्यवस्थित राहण्यासाठी आर्थिक निधी देतो आणि मगच पुढे भारतभेटीला निघतो. मानवी आयुष्याच्या प्रेम, कष्ट, भावनांचा ओलावा, कर्तव्यनिष्ठा या साऱ्या गुणांचे तेथे दर्शन होते.

काही लोकांच्या वाडवडिलार्जित जमिनी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. जमिनीच्या किंमती अतोनात वाढल्यामुळे, दलाल ज्यांच्या नावावर सात-बाराचा उतारा आहे अशा इस्रायलमधील व्यक्तींचा शोध घेतात, त्यांच्या जमिनींची विक्री करून देतात. काही लोक ते पैसे इस्त्रायलमध्ये घेऊन जातात, तर काही उदार लोक तो पैसा महाराष्ट्रातील स्थानिक शाळांना, दवाखान्यांना दान करतात.

मूळ मराठी लोकांच्या इस्रायलमध्ये जन्मलेल्या पिढीचे लोकही भारतभेटीला येतात. त्यांना मराठी येत नाही तरी थोडेफार शब्द बोलतात, वडापाव-भेळ आवडीने खातात, बॉलिवूडच्या आकर्षणाने मुंबईत फिरतात, ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमामुळे शनिवार वाडा पाहण्यास मुद्दाम पुण्यास जातात.

माधव गडकरी ह्यांच्या प्रयत्नाने इस्रायलमध्ये ‘जागतिक मराठी अकादमी’चे अधिवेशन जेरुसलेम येथे १९९६ साली झाले. त्यावेळी ‘इस्रायल - माणूस आणि देश’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच सुमारास फ्लोरा सॅम्युअल ह्यांचे ‘संस्कृती संगम’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रेचल गडकर ह्यांचे ‘आम्ही भारतवासी बेने इस्त्रायली’ हे पुस्तक व ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञ’ प्रकल्पातून मी लिहिलेले ‘इस्त्रायलची मराठी लेकरे’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली. इस्रायलच्या मराठी स्थलांतरांची कहाणी, त्यांच्या व्यथा, त्यांची कर्तबगारी आणि त्यांचा आनंद सांगणारी ही तीन पुस्तके आहेत. त्यापूर्वी ‘छळाकडून बळाकडे’ हे इस्रायलची माहिती देणारे पुस्तक नाना पालकर ह्यांनी लिहिले होते. त्यानंतर इस्रायलवर काही पुस्तके प्रकाशित झाली, एक्झोडस (अनुवादित) – नीळकंठ देशमुख; २. शालोम इस्त्रायल – अभिजित वैद्य; 3. एक होती बाय (अनुवादित) – आपटे - राजहंस प्रकाशन, ३. जेरुसलेम ओ जेरुसलेम – निळू दामले; ४. छेडिता हृदय हे (अनुवादित) – उषा तांबे - राजहंस प्रकाशन, ५. विशेष पर्व (अनुवादित) – स्नेहा महाजन, ६. जेरुसलेम एक चरित्रकथा(अनुवादित) – सविता दामले - डायमंड पब्लिकेशन ही काही महत्त्वाची पुस्तके मराठीत आहेत.

लिऑन उरीसच्या कादंबऱ्यांचे अनुवादही मराठीत झाले आहेत. ‘शायली’ नावाचे मासिक ठाण्याहून ‘इव्हज् असोसिएशन’ तर्फे प्रसिद्ध केले जाते, ‘मक्काबी’ नावाचे मासिक भाई बंदरकर व त्यांचा मुलगा रेमंड बंदरकर ह्यांनी मिळून, सदुसष्ट वर्षें चालवले. ‘मक्काबी’ नुकतेच बंद झाले आहे.

महाराष्ट्रातील ज्यूंचे वर्णन ‘सूक्ष्मदर्शी अल्पसंख्यांक’ असे करता येईल. त्यांना नुकतीच मिळालेली तशी मान्यता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. ज्यू धर्मीय म्हणजे नेमके कोण ते महाराष्ट्रात माहीत नसते. कोणी त्यांना ख्रिश्चन समजतात. ज्यू समाजाचे मुंबईतील कुलाबा येथील ‘छाबाड हाऊस’ही २००८ साली झालेल्या २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात सापडले होते. त्यामुळे भारतात ज्यू आहेत असे अनेकांना कळले. भारतात त्यांची सिनेगॉग्ज आहेत, त्यांपैकी दहा मुंबईत आहेत, ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग येथे प्रार्थना मंदिरांच्या इमारती आहेत, पण तेथे स्थानिक ज्यू नसल्यामुळे प्रार्थनेसाठी दहा माणसे जमणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यांच्या ए.जे.डी.सी. आणि ओ.आर.टी. ह्या संस्था आहेत. ज्युईश मध्यवर्ती संस्था सुद्धा आहे. इस्त्रायलमधील सधन नागरिक येथील प्रार्थना मंदिरे सुस्थितीत राहवी म्हणून देणग्या देतात. कबरस्थानातून जागा अपुरी आहे. किप्पूर, रोश-हा-शाना आणि हान्नुका(या सणांच्या) सुट्ट्या मिळाव्यात अशी ज्यू समाजाची अपेक्षा आहे. अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ येथे स्मृतिस्तंभ आहे. खंडाळा या खेड्यामध्ये ‘येलिहाउहन्नाबी’च्या रथाच्या टापांचा खडक आहे. त्या स्थानांची निगा राखली जाईल असे स्थानिकांना वाटते. ‘सर एली कदूरी’ या एकेकाळी ज्युईश विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेत ना एकही शिक्षक ज्यू आहे ना विद्यार्थी ज्यू आहेत. मुंबईतील उरलीसुरली तरुण मुले इस्त्रायल भेटीसाठी जातात, तेथील जीवनशैली आणि झगमगाट, आर्थिक सुस्थिती पाहून इस्रायलला स्थलांतरित होतात. अल्पसंख्याक मान्यतेमुळे कदाचित महाराष्ट्रातील उरलेल्यांना अधिक सुरक्षितता, अधिक फायदे मिळतील व स्थलांतराचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वाटते.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांनी तेल अवीव येथे मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेथील युवकही महाराष्ट्राकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. ४ जुलै २०१६ रोजी, ‘तेल अवीव विद्यापीठा’त मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने त्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून सरकारने विजय तापस, कादंबरी भंडारी आणि सोनल गुजर ह्या तीन प्राध्यापकांना तीन महिन्यांसाठी इस्रायलला पाठवले आहे. ‘तेल अवीव विद्यापीठा’तील सव्वीस विद्यार्थी तेथे ‘ग म भ न’चे धडे घेत आहेत. पुढील पिढीमध्ये मराठी आणि महाराष्ट्र या त्यांच्या पूर्व भूमीतील भाषेविषयी, प्रदेशाविषयी औत्सुक्य व आत्मीयता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
  
ज्यू प्रार्थनेत, ‘आम्ही जेरुसलेमला विसरलो तर उजवा हाता कापा’ असे म्हणतो. मराठी ज्यू ‘आम्ही भारताला विसरलो तर दोन्ही हात कापून टाका’ असे सांगतो तेव्हा ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या ओळी आठवतात.

शाही दफन भूमी - खोकरी

Think Maharashtra 19/09/2019

-khokriमुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून घेतात. पण त्या प्रत्यक्षात मशिदी नसून मुरुड संस्थानाचे राजे सिद्दी यांच्या तीन शाही कबरी आहेत.

कबरी दगडी तीन आहेत. त्या सुमारे साडेचारशे वर्ष जुन्या आहेत. सर्वात मोठी कबर सिद्दी सुरूल खान यांची आहे. जंजिऱ्याची सत्ता सुरूल खान यांच्या हातात 1708 ते 1734 या काळात होती. सुरुलखानाची कबर त्याच्या हयातीत बांधण्यात आली असे सांगण्यात येते. सुरुलखानाची कबर उंच चौथऱ्यावर आहे. तेथपर्यत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात जाळ्या कोरल्या आहेत. तसेच, छोटीछोटी कोष्टके बनवली आहेत. कबरीवर सर्वत्र फुलांचे कोरीव काम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरुलखान आणि त्यांचे गुरु यांचे थडगे आहे.

दुसऱ्या दोन कबरींपैकी एक कबर मुघली सत्तेचा नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. ती 1677 ते 1697 या काळात बांधली असावी. सिद्दी कासीम याकुतखान या नावाने ओळखला जात होता. त्याने 1670 ते 1677 आणि पुन्हा 1697 ते 1707 अशी सत्ता उपभोगली. तिसरी कबर याकुतखानाचा भाऊ खैरियातखान यांची आहे. खैरियात खान दंडा राजापुरी प्रांताचा 1670 ते 1677 या काळात प्रमुख होता. खैरियात खान जंजिऱ्याचा प्रमुख 1677 ते 1696 या काळात होता. याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरले आहेत. त्या शिलालेखानुसार खैरियातखानाचा मृत्यू हिजरी 1108 (सन१६९६) आणि याकुतखानाचा मृत्यू 30 जमादिलवल हिजरी 1118 (सन 1707 ) रोजी झाला.

सुरुलखानाच्या कबरीच्या देखरेखीसाठी दोन हजार रुपये वार्षिक महसूल असलेले सावळी-मिठागर, याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या देखभालीसाठी दोडाकल गावाचा महसूल नवाबाने लावून दिला होता. त्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरलेले आहेत. कबरीच्या परिसरात मशिदीसुद्धा आहेत. तसेच, रस्त्याच्या आजुबाजूला अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे समजलेले नाही.

- संकलन ­
(भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे यांच्या फेसबुकवरुन, संपादित -संस्कारित)

स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड

रायगड जिल्ह्यास 'रायगड' हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळाले तो अभेद्य व शिवछत्रपतींच्या राजधानीचे ठिकाण असलेला किल्ला हा रायगड जिल्ह्याची मुख्य ओळख आहे.

याची किर्ती आजच नाही तर पुर्विही इतकी दुरवर पसरली होती की, पाश्चिमात्य यास 'पुर्वेकडील जिब्राल्टर' म्हणुन ओळखत. केळनृपविजयम या कानडी काव्याचा कर्ता रायगडचा उल्लेख 'भुतलावर आश्चर्यकारक म्हणुन गणला जाणारा रायरी' असे करतो. सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून विलग झालेला तरिही तब्बल एक मैलाची दरी असलेला हा किल्ला शिवाजि महाराजांनी त्यांच्या राजधानीचे स्थळ म्हणुन निवडला यात नवल ते काय? रायगडचे प्राचिन नाव रायरी, याशिवाय यादवकाळात या किल्ल्यास तणस व रासिवटा अशिही नावे होती. दुरुन हा किल्ला पाहिल्या एका तेवत्या नंदादिपासारखा दिसतो त्यामुळे यास नंदादिप असेही म्हणत. यादवकाळानंतर जेव्हा दुर्गांचे महत्त्व कमी झाले तेव्हा या किल्ल्यांचा वापर फक्त टेहळणी अथवा कैदखाना म्हणुन केला गेला, निजामशाही काळात रायगडाचाही वापर कैदखाना म्हणुनच केला गेला.
शिवाजी महाराजांना रायगडावर जाऊन भेटणारा ब्रिटिश अधिकारी
आदिलशाही काळात हा परिसर जावळीच्या मोर्‍यांच्या अखत्यारित होता. या मोर्‍यांच्या प्रमुखास 'चंद्रराव' हा किताब असे, १६४८ च्या दरम्यान जेव्हा प्रमुख दौलतराव म्रन पावला तेव्हा त्याच्या वारसांमध्ये किताबासाठी झगडा सुरु झाला तेव्हा त्याच्या बायकोने शिवाजी महाराजांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्याने पोलादपुरकर घराण्यातला 'यशवंतराव' हा मुलगा दत्तक घेतला व त्यास चंद्रराव हा किताब दिला. मात्र एवढी मदत करुनही कालांतराने मोरे शिवाजी महाराजांना न जुमानते झाले त्यामुळे १६५५ नंतर जावळीवर हल्ला करुन शिवाजी महाराजांनि मोर्‍यांचा नि:पात केला व जावळी सोबत याच प्रांतातला रायगड सुद्धा ताब्यात घेतला. हा किल्ला स्वराज्यात आल्यामुळे शिवाजी महाराजांचा खुप फायदा झाला कारण रायगडपासून मुंबई, पुणे व सातारा ही प्रमुख शहरे सारख्याच अंतरावर आहेत, तसेच समुद्र येथून फक्त ४८ मैल असल्यामुळे सिद्दीवर वचक ठेवणे शक्य होणार होते. तसेच किल्ल्याचे भौगोलिक स्थान इतके दुर्गम आहे की सह्याद्रीच्या रांगानी वेढल्यामुळे अगदी जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे दर्शन होत नाही.

रायगड किल्ल्यावर जाण्यास पुर्वी अनेक मार्ग होते, आजही हे दुर्गम मार्ग अनेक स्थानिकांकडून अथवा गिर्यारोहकांकडून वापरात आणले जातात मात्र आधुनिक काळात सर्वसामान्यांनाही जाण्यास सोपा असा मार्ग म्हणजे महाड मार्गे रायगडास जाणारा गाडीमार्ग, या मार्गे महाडपासून रायगड अदमासे १४ मैल अंतरावर आहे. पुर्वी हा मार्ग कोंझर पर्यंत होता व येथून पायी चालत जावे लागायचे मात्र आता थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जातो, अबालवृद्धांना हा दुर्गम गड चढण्यास सोपा जावा म्हणुन काही वर्षांपुर्वी येथे रोप वे ची सुवीधा सुरु करण्यात आली आहे ज्याचा लाभ लक्षावधी नागरिकांनी घेतला आहे. गडवाटेवरुन जेव्हा चालत आपण रायगडावर जाण्यास सुरुवात करतो तेव्हा प्रथम लागतो खुबलढा बुरुज येथेच पुर्वि प्रसिद्ध चित दरवाजा होता. येथून पुढे गेल्यावर लागतो नाणे दरवाजा, पुढे काही बुरुज व नंतर महादरवाजा लागतो. येथे पहारेकर्‍याच्या चौक्या व कोठारे आहेत. पालखी दरवाज्यानंतर बालेकिल्ल्यास सुरुवात होते. रायगडावरील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शिवरायांची समाधी, जगदिश्वर मंदीर, राजवाडा, सिंहासनाची जागा, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, शिर्काई मंदीर. या किल्ल्याचे बांधकाम वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांनि केले त्यांच्या नावाचा शिलालेख जगदिश्वर मंदीराच्या पायरीवर आहे. याशिवाय आणखी एक संस्कृत शिलालेख एका चौथर्‍यावर आहे. किल्ल्यावर एक पोलादी स्तंभ आहे ज्यास संभाजी महाराजांचा मल्लखांब म्हणतात त्यावर सुद्धा एक लेख आढळुन आला आहे. असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रियांचे एक तिर्थस्थानच आहे.

नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे.

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचिन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन म्हणुन प्रसिद्ध असले तरी या गावास अतिशय प्राचिन असा ऐतिहासिक वारसा आहे. नागावचे प्राचिन संस्कृत नाव नागग्राम, महाभारतातल्या नागसत्र यज्ञानंतर जी नागकुळे दक्षीणेत स्थित्यंतरीत झाली व जी गावे वसवली त्यापैकी नागाव हे एक गाव. नागाव मध्ये आजही नागवंशाच्या प्राचीन खुणा अस्तित्वात आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची खुण म्हणजे दश नागांचे मंदीर, या मंदीरात नागाव गावाच्या मुळ दैवत असलेल्या दश नागांच्या मुर्त्या पहावयास मिळतात ज्या अत्यंत प्राचिन आहेत.

अनेक प्राचिन साधनांमध्ये नागावचा उल्लेख नागुम असा सुद्धा करण्यात आला आहे. नागाव मध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात, यापैकी महत्त्वाच्या खुणा म्हणजे नागावच्या वैभवशाली इतिहासाची साक्षी असलेली पुरातन मंदीरे भिमेश्वर मंदीर, सिद्धीविनायक मंदीर, वंखनाथ मंदीर, नागेश्वर मंदीर, दक्षीणमुखी देवस्थान अशी यादी संपता संपणार नाही. ही सर्व मंदीरे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम अशीच आहेत. यापैकी भिमेश्वर हे मंदीर या मंदिरात असलेल्या १२ व्या शतकातल्या शिलालेखामुळे इतिहासप्रेमींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. हा शिलालेख भिमेश्वर मंदीराच्या उत्तरेकडील दरवाज्याच्या पायरीवर कोरला असून आजही सुस्थितीत आहे, यावरिल मजकुर पाहता हा ठाणे-कोकण या भागावर राज्य करणार्‍या कुणा हंबीरराव नामक राजाच्या नावे असून शिलालेखावरील प्रौढी प्रताप चक्रवर्ती ही अक्षरे हा शिलालेख यादवकालीन असल्याची साक्ष देतात. याशिवाय याच मंदीरापरिसरात शिल्पशास्त्राचा अजब नमुना असलेल्या काही मुर्त्या सुद्धा पहावयास मिळतात. येथील सिद्धीविनायकाचे देवस्थान तसे मुख्य मार्गावर असूनही अपरिचितच आहे. या मंदीराचे लाकडी सभागृह आता पुरते मोडकळीस आले असून फक्त गाभाराच सुस्थितीत आहे. या मंदीराच्या गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख कोरला असून भग्नावस्थेत असल्याने पुर्णपणे वाचता येत नाह मात्र यावर सुस्थितीत असलेली 'प्लवंग संवस्तरात कुणा बाळभट्टाच्या नावे असलेले हे दानपत्र असल्याचे लिहीले असल्याने' ह्या शिलालेखावरील बाळभट्ट म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पुरोहीत चौलचे वेदसंपन्न पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे चिरंजीव बाळभट्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाळभट्ट सुद्धा वेद्संपन्न असून शिवराज्याभिषेकात अनेक कार्ये त्यांनी गागाभट्टांसोबत पार पाडली होती. नागाव मधील एक अतिशय देखणे मंदीर म्हणुन वंखनाथाच्या मंदीराचे नाव घेता येईल. हे शिवमंदीर पुरातन असले तरी आहिल्याबाई होळकरांच्या काळात म्हणजे सन १७९० मध्ये या मंदीराचा जिर्णोद्धार झाल्याचे दाखले आढळतात. या मंदीरासमोरील पुष्करणी सुद्धा अतिशय प्रेक्षणीय असून या पुष्करणीमधील कासवे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. या मंदीरातील नंदीची मुर्ती हि अतिशय रेखीव असून अशा प्रकारची दुसरी मुर्ती कुठल्याही शिवमंदीरात सापडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. येथील नागेश्वर हे शिवमंदीर सुद्धा बरेच जुने असून जानकोजी आंग्रे यांनी या मंदीराचा जिर्णोद्धार केल्याची माहिती सापडते.

प्राचिन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नागावं ने शिवकाळात सुद्धा राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानाची भुमिका बजावली होती. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नागावचा समावेश होत असे व शेजारच्या चौल वर पोर्तुगिजांची सत्ता होती तसेच पलिकडे मुरुड येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू जंजिर्‍याचा सिद्दी याची सत्ता असल्याने शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या ताब्यातल्या अनुक्रमे जंजिरा व उंदेरी या ठिकाणांवर काढलेल्या मोहिमांचे आरंभस्थान नागाव हेच होते. १६७० च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी नागाव येथे १६० लहान जहाजे, १०००० घोडदळ व २०००० पायदळाचे सैनिक तयार ठेवून जंजिर्‍याला वेढा घालण्याच्या तयारीने जमावले होते. या सैनिकांसोबत इतर शस्त्रास्त्रांसोबत कुदळी, फावळी, पहारी इत्यादी बांधकामाची आयुधे सुद्धा होती. २४ नोव्हेंबरला या तुकडीने नागाव सोडले मात्र २६ तारखेला महाराज अचानक माघारी वळले व आरमारास परत बोलावून काही काळातच त्यांनी खानदेश व वर्‍हाडवर स्वारी केली व प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. अर्थात नागाव मधून निघालेली ही मोहिम ही महाराजांच्या राजकिय डावपेचांचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यास गनिमीकावा असे प्रसिद्ध नाव आहे.

नागावचा समुद्रकिनारा सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर व डोळ्यांचे पारणं फेडणारा असून सभोवताली दाट सुरुबनाने वेढल्याने किनार्‍याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुरेशी काळजी घेतल्यास या सुरक्षित अशा समुद्रकिनार्‍यावर जलक्रिडेचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

गेली हजारो वर्षे नागावने आपली प्राचिन संस्कृती जपून ठेवल्याने आजही नागाव मध्ये येणार्‍या पर्यटकांना खर्‍या अर्थाने कोकणातल्या एका टुमदार गावात आल्याचा भास होतो. नागावचा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पोहोण्याच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षित असल्याने जलक्रिडेसाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात मात्र समुद्र पर्यटनाबरोबरच नागाव मधील ऐतिहासिक वारश्याचे दर्शन जर या पर्यटकांना देता आले तर खर्‍या अर्थाने नागावचे सांस्कृतीक व ऐतिहासिक वैभव जगासमोर येईल . सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'
प्राचिन काळी नागांव, चौल, रेवदंडा सारखी बंदरे युरोप, अरब तथा आफ्रिकन राष्ट्रांशी व्यापार करण्यामध्ये अग्रेसर होती मात्र मध्ययुगातली अस्थिरता या बंदरांच्या नाशासाठी कारणीभुत ठरली. इतक्या राजकिय स्थित्यंतरातही नागाव, चौल, रेवदंडासारखी गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत ही खरे तर दैवी कृपाच म्हणायला हवी. अष्टागरांचे वैभव असलेले नागाव म्हणजे जणू ऐतिहासिक, सांस्कृतीक, भाषिक, वांशिक व राजकिय ठेव्यांचे एक संग्रहालयच आहे.

नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर

रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल.

यासाठी आपण नागोठणे या गावाचे उदाहरण घेऊ, भौगोलिक दृष्ट्या नागोठण्याचे स्थान महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यात येते. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मात्र नागोठणे हे उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसले आहे. नागोठण्याच्या पश्चिमेकडून अंबा नदी वाहते. अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस ४८ कि.मी. वाहत जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहते. नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्‍याचा तळ रुंद होतोत व नदी सपाट माथा असलेल्या डोंगरांगांमधून धरमतर खाडीला मिळते यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे. अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडिल भाग. पुर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत ३५ कि.मि. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पुर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस १८ कि.मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुदं होते. धरमतपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो. नागोठण्या पासून अंबा नदीस एकही मोठी नदी येऊन मिळत नाही.

परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्य पुर्वेस जि डोंगररांग आहे तिला महालमिरा डोंगर रांग या नावाने ओळखले जाते. आणि नागोठण्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगररांगेस सुकेळी डोंगररांग म्हणुन ओळखले जाते. या डोंगरांगेत सुरगड, अवचित गड आणि सागरगड यासारखे तिन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत. याशिवाय नागोठण्याच्या पुर्वेस नागोठणे गावास लागुनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला पुर्व नागोठणे डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तिन बांजूनी डोंगररांगानी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.

सद्यस्थितीस मुंबई गोवा महामार्गावरिल एक शहरवजा गाव असलेल्या या गावास हजारो वर्षांचा इतिहास आहे हे सांगुन कोणास खरे वाटणार नाही. खर तर नागोठण्याच्या नावातच फार मोठा इतिहास दडला आहे जो महाभारत काळापर्यंत जाऊन पोहोचतो. पुर्व महाभारतातल्या खांडवकांड नामक घटनेनंतर उत्तरेत राहणार्‍या नागलोकांमध्ये आणि पांडवांमध्ये जे वैर झाले त्याची परिणीती उत्तर महाभारत काळातल्या नागसत्र यज्ञामध्ये झाली, या भयानक युद्धात अनेक नागकुळांचा संहार झाला जिवंत राहिलेली नागकुळे दक्षिणेकडे सरकत जाऊन दक्षिणेकडिल अनेक भागांत स्थिरावली. यातिल काही कुळे कोकणात सुद्धा दाखल झाली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल (पन्नगपल्ली), नागोठणे (नागस्थान), नागाव (नागग्राम) अशी ठिकाणे वसवून तेथे राहिली. रायगड जिल्ह्यात अनेक गावांत सापडणार्‍या नागमुर्त्या आणि गांवामधले नागदर्शक नाम हे नागवंशियांच्या रायगड जिल्ह्यातल्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बहुदा नागलोकांच्या जेथे जेथे वस्त्या झाल्या ति ठिकाणे समुद्रतिरी, बंदरावर अथवा खाडीच्या मुखाशी दिसून येतात यावरुन नागलोक हे निष्णात दर्यावर्दी होते असाही सिद्धांत लावता येतो कारण अगदी बुद्धकाळातही नागलोकांची कोकणपट्ट्यात आरमारे होती असे उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळुन येतात याचा अर्थ नागलोकांनीच कोकण पट्टीतली पहिली आरमारे स्थापन केली होती असे ठामपणे म्हणता येईल आणि यापैकीच एक आरमार नागोठणे येथेही स्थापन झाले असावे.

नागोठणे गावास खुप जुना आरमारी इतिहास आहे नागलोकांनी येथे आरमाराचा पाया रचला आणि सातवाहन, मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, गुजरात सुलतान, निजामशहा, आदिलशहा, मराठे, आंग्रे, इंग्रज यांनी या आरमाराच्या इतिहासाच्या इमारतीची पक्की बांधणी करुन उत्कर्षाचे कळस चढवले. मौर्य सातवाहन काळात नागोठण्याचे व्यापारी महत्त्व खुपच वाढले इ.स्.पुर्व २२५ मध्ये चौल्-रेवदंडा, नागोठणे, महाड, मुरुड, गोरेगाव, पेण, पनवेल, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्याद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्‍या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हिणी सारख्या घाटाटून नागोठणे बंदरात आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे आणि देशभरातला माल याच ठिकाणाहून परदेशात निर्यात होत असे. येथुन येणार्‍या व्यापार्‍यांच्या निवासासाठी नागोठणे मार्गे मावळात जाणार्‍या याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खडसांबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरुन काढण्यात आल्या. वरिल सर्व लेण्यांवरुन असे दिसून येते कि इ.स्.पुर्व १०० ते इ.स.३०० पर्यं बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता. नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचिन काळी सह्याद्रीच्या घाटांमधुन चालणार्‍या व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरुन रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्त्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते नागोठणे, नागोठणे ते अष्टम आणि अष्टम ते चौल हा असावा.  इ.स. सनाच्या दुसर्‍या शतकात भारतात आलेल्या भुगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिप्ल्स मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ.स.७० ते ८० च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तिळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी,शिंपल्यांचे दागिने, चांदिचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे. मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही नागोठण्याचे व्यापारी महत्त्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाच्या ताम्रपटात त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्टींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी  यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तिन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. नागोठण्याच्या अंबा नदीवर दिसणारा जो पुल आहे तो याच प्रमुख व्यापारी मार्गावर विजयनगर साम्राज्याच्या राजा अलिया राम राया याच्या काळात बांधण्यात आला होता यावरुन विजय नगर साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती हि महत्त्वाची माहिती कळते. याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे नागोठण्यातून देशावर जाणार्‍या मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतुक सुलभ होण्याकरिता १५८० साली काजि अलाऊद्दीनने अंबा नदीवरिल याच पुलाचा जिर्णोद्धार केला होत पुढे मराठे तसेच इंग्रजांच्या काळातही या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती झाल्याचे उल्लेख मिळतात.

नागोठण्यास फक्त आरमारी इतिहासच आहे असे नाही तर वांशिक, धार्मिक, औद्योगिक, भौगोलिक, भाषिक, व्यापारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागोठण्यास भुतकाळात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण वांशिक किंवा भाषिक इतिहासाबद्दल पहायचे झाले तर नागोठण्यात पाच हजार वर्षांपुर्वीची प्राचिन अशी नागवंशिय संस्कृती स्थिरावली होती. याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मुळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती हि शैवसंस्कृतीमध्ये विलिन झाली असावी. एका वेगळ्या विचारप्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करतां हे लोक मूळचे डोंगरदर्‍यांतले रहिवाशी असावेत, कारण नग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो त्यामुळे  नाग लोक मूळचे डोंगराळ मुलखांतील रहिवाशी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावे. जर यांचीं समुद्रांतरीं द्वीपें (उदा नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टण) होतीं, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळीं असला पाहिजे. नागांचा लोक हे पाताळातले रहिआशी समजण्याचा संस्कृतांत संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवाशी असून, ते पुढें वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाची काहितरी संबध असावा. महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक जमात आहे. हे झाले वांशिक महत्त्व आणि भाषिक महत्त्वाचा विचार करता महाराष्ट्राच्या भाषिक जडणघडणीत नागोठण्याच्या नागवंशी संस्कृतीचा नक्कीच सहभाग होता कारण प्रथम नागवंशिय लोकांनी येथे वस्ती केल्यावर इ.स्.पुर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व महाराष्ट्रिक या तिन संघाचे लोक उदयास आले व या चारही संस्कृतींचा मिलाप होऊन महारट्ट अर्थात मराठी वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रिक त्यांची महाराष्ट्रि भाषा बोलत असत. याच महाराष्ट्रिक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.

वरिल अनेक घटनांवरुन नागोठण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते मात्र इतकेच नव्हे तर नागोठणे हे गाव अनेक वेळा वेगवेगळ्या साम्राज्यांच्या संकरसिमेवरिल संवेदनशिल गाव म्हणुन प्रसिद्ध राहिले आहे. सन १५४२ ते १५६५ हा काळ विजय नगर साम्राज्याचे सम्राट अलिया राम राय यांच्या कारकिर्दीचा काळ या काळात विजयनगर या संपन्न हिंदू साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती. आजही तज्ञ हे मानत असले कि विजयनगर साम्राज्य रत्नागिरी पर्यंत मर्यादित होते तरी रायगड जिल्ह्यात असलेल्या तळे गावातल्या एका मंदिरात विजय नगर साम्राज्य काळातला एक तेलुगु भाषेतला शिलालेख आजही पहावयास मिळतो याशिवाय नागोठणे गावातला अंबा नदीवरिल जो मजबुत पुल आहे तो सुद्धा विजय नगर साम्राज्याच्या काळातच तालिकोटच्या लढाईच्या आधी राम रायाच्या काळात बांधण्यात आला होता कारण तसा प्राकृत भाषेतला शिलालेख या परिसरात दुर्लक्षित स्थितीत पडलेला होता मात्र भारतीयांच्या इतिहासाविषयीच्या उदासिनतेमुळे हा शिलालेख यानंतर अंबा नदीस आलेल्या वारंवार पुरामुळे आता दिसूनही येत नाही. याच पुलाचा जिर्णोद्धार पुढे १५८० साली गुजरातच्या सुलतान अथवा निजामशाही काळात झाला यावेळी जिर्णोद्धार करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम नष्ट करुन त्याऐवजी नविन पद्धतीचे बांधकाम करण्यात आले तसेच पुलावर नविन शिलालेख बसवण्यात आला ज्यावर येथिल काजी अल्लाऊद्दीन याचे नाव दिसून येत होते मात्र दुदैवाने हा शिलालेख सुद्धा आता दिसून येत नाही. सन १४९८ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडे महाराष्ट्रातिल साष्टी, मुंबई,ठाणे वसई पासून नागोठण्याचा प्रदेश होता व उर्वरित महाराष्ट्रात बहामनी राज्य होते. नागोठण्यास त्या काळात गुजरातच्या दक्षिण टोकाकडिल शहर म्हणुन सुद्धा ओळखण्यात येत होते. याच काळी चौलमध्ये पोर्तुगिजांनी शिरकाव केला होता या दोन्ही सत्तांच्या संकरस्थळी नागोठणे असल्याने येथे अनेकदा पोर्तुगिज विरुद्ध सुलतान यांची युद्धे झाली होती. गुजरातचा सुलतान मेहमुद बेगडा याने नागोठण्यात तळ ठोकून चौलवर बरेच हल्ले केले होते. १५२९ साली हेक्टर दे सिल्व्हेरिया ने नागोठण्यावर हल्ला करुन जाळपोळ केली त्याला नागोठण्यातिल सेनापतीने प्रत्युत्तर दिले होते.

मक्का येथून येणार्‍या काही भाविकांच्या जहाजाला लुटल्याने पोर्तुगिजांविरुद्ध गुजरात सुलतान, निजामशाह आणि आदिलशहा अशा तिन सत्ता एकत्र येऊन युद्ध पुकारले होते या काळी नागोठण्यामार्गे सुकेळी खिंडीतून रेवदंडा खाडीत मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ तसेच तोफखाने इत्यादींची वाहतुक झाली होती आणि हि वाहतुक सुकर व्हावी यासाठी नागोठण्याच्या विजयनगर कालिन पुलाचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.

सन १६३६ साली मुघलांनी निजामशाही नष्ट करुन नागोठ्णे आदिलशहाच्या ताब्यात दिले याच काळी पुण्यात शिवाजी महाराजांचा उदय झाला होता. सन १६४३ च्या सुमारास आदिलशाही सत्ता कोकणातली सर्वश्रेष्ट सत्ता होती त्याकाळि नागोठणे विभाग हा सुभे कल्याणच्या अख्यतारित येत असे. सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत् मुल्ला अहमदकडे तर दुसरा सुभा नागोठण्यापासून महाडपर्यंत जंजिर्‍याच्या सिद्दीकडे होता. सन १६५७ साली शिवाजी महाराजांनि कल्याण सुभ्यावर हल्ला करुन हा सुभा स्वराज्यात आणला अशा तर्‍हेने नागोठणे शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. इथे शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरोधात मोहिम उघडली असताना मुघल सुद्धा मराठ्यांवर हल्ले करण्याच्या तयारित होते आणि या कामासाठी औरंगजेब याने त्याचा मामा शाईस्ताखान यास दख्खनवर पाठवले आणि त्याने पुण्यात तळ मांडला. त्याने पुण्यातून कल्याण सुभ्यावर हल्ला करुन कल्याण स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र नागोठणे त्याच्या ताब्यात येऊ शकले नाही. नागोठण्यावरिल मोहिम फत्ते करण्यासाठी त्याने करतलब खान उझबेक याची निवड केली. त्याच्या दिमतीला बलाढ्य सैन्य व अनेक सरदार तसेच देशमुख देऊन नागोठण्यावर कुच करण्यास सांगितले. या खानाने लोणावळ्यावरुन अंबा नदीचा जो उगम आहे ति वाट कोकणात उतरण्यासाठी पकडली मात्र शिवाजी महाराजांना या कटाची अगोदरच माहिती लागून ते स्वतः सैन्यासह या परिसरात दाखल झाले होते. दाट रानात जागोजागी  मराठा सैन्य लपुन खानाच्या सैन्याची वाट पहात होते. मेंढराचा कळप जसा वाघाच्या तावडित येतो तसा कारतालब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीत येऊन पोहोचला होता. महाराजांना दया येऊन त्यांनी आपला वकिल खानाकडे पाठवला मात्र खानाने उद्धट वर्तन करुन नागोठणे आपण ताब्यात घेणारच अशि दर्पोक्ती केल्याने महाराजांनि सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले. मराठे सैन्य मुघलांवर तुटून पडले सैन्याची धुळधाण उडवली व खानास अक्षरशः जबरी खंडणी देऊन माफी मागुन पुण्यास पळ काढावा लागला. या लढाईस उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई म्हणुन ओळखण्यात येते.

महाराजांना या काळात जंजिर्‍याच्या सिद्दीचा सुद्धा सामना करावा लागत होता. पुर्वी आदिलशहा व नंतर मुघलांचा मांडलिक झालेल्या या सिद्दीचे राज्य मर्यादित असले तरी नागोठण्याच्या हद्दीस लागून होते. नागोठण्यास शिवाजी महाराजांचा जहाज बांधणीचा कारखाना असून ते मराठा राज्यातले सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असल्याने सिद्दी बर्‍याच वेळा आपले सैन्य पाठवून नागोठण्यात जाळपोळ करत असे आणि अनावश्यक रक्तपात करुन माणसे, मुले व स्त्रिया गुलाम बनवून मुंबईस नेत असे. सिद्दी संबळने १६७३ मध्ये सुद्धा असे कृत्य केले तेव्हा महाराजांनी रायगड वरुन १०० सैनिक धाडून सिद्दीच्या सैन्याला चकित करुन कापुन काढले. १६७७ मध्ये सिद्दी कासिम परत एकदा नागोठण्यास आला आणि छापे टाकून येथिल रहिवाशांना भंगिकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले तेव्हा महाराजांनि या घटनेचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह सिद्दीवर कुच करायला सांगितले. पुढे नागोठण्याचे सिद्दी व इंग्रजांपासून रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व दौलत खान यांना खाडीसमोरील खांदेरी किल्यावर बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे करताना मराठ्यांना इंग्रजांच्या विरोधाचा सामना करायला लागला. इंग्रजांनी कॅप्टन गेप व केगविन यांना मराठ्यांवर हल्ला करण्यास जहाजे व कुमक सोबत देऊन खांदेरीवर धाडले मात्र मराठ्यांच्या हल्ल्यात गेप ठार झाला व त्याचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. केगविनने मराठा आरमारावर हल्ला चढवला आणि रिव्हेंज हे जहाज घेऊन मराठा गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला. दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठण्यातून परत इंग्रजांवर हल्ला केला व इंग्रजांचे नुकसान केले. पुढे इंग्रजांना नाईलाजाने मराठ्यांशी तह करावा लागला ज्यामधिल कलमे स्वतः शिवाजी महाराजांनी तयार केली होती यामध्ये एका कलमात नागोठणे व पेण परिसरात मराठ्यांच्या शत्रूला प्रवेश देऊ नये आणि सिद्दीने नागोठणे येथून ज्या नागरिकांना, स्त्रियांना व मुलांना धरुन नेले आहे त्यांची ताबडतोब सुटक करण्यात यावी अशी कलमे होती.

संभाजी महाराजांच्या काळातही नागोठण्याचे राजकिय महत्त्व कायम होते. या काळातही सिद्दीचे नागोठण्यावरिल हल्ले थांबले नव्हते. सिद्दीने लहान लहान नौका नागोठण्यास पाठवून कैद्यांना गुलाम बनवून मुंबईस नेल्याचे कृत्य संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनि दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवले होते. १६८१ मध्ये परत एकदा सिद्दीने नागोठण्यात शिरुन जाळपोळ केल्यावर संभाजी महाराजांनी जंजिराच हस्तगत करुन सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले व यानंतर संभाजी महाराजांच्या सर्व जंजिरा मोहिमा सिद्दीने नागोठण्यावर जे अत्याचार केले त्याचा बदला म्हणुनच काढल्या असल्याचे लक्षात घ्यावयास हवे. जंजिरा मोहिमेच्या काळात मुघलांनि हसन अलिखानास मोठे सैन्य देऊन कोकणात मराठ्यांविरुद्ध पाठवुन दिले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून कल्याण कडे जावे लागले मात्र जाताना त्यांनी नागोठण्याच्या रक्षणासाठी १५००० सैन्याची कुमक तैनात करुन ठेवली होती.

शाहू महाराजांच्या काळात भोसले घराण्यात यादवी सुरु झाली या यादवी मध्ये ताराराणींच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी आवाहन करण्यास शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कोकणात धाडले होते. बाळाजी विश्वनाथ हे अवचितगडावरुन नागोठणे प्रांतात येऊन त्यांनि कान्होजी आंग्रे यांची भेट घेतली व आपल्या पक्षात घेतले तसेच  शाहू महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब देऊन संपुर्ण कोकणपट्टीची जबाबदारी सोपवली.

पेशवे काळात नागोठण्यामध्ये नाण्यांची टांकसाळ तसेच तोफ गोळे बनवण्याच्या कारखान्यांची निर्मिती झाली होती. याशिवाज नारायणराव पेशवा खुनाच्या कटात सामिल असलेले रघुनाथराव पेशवे गटातले एक सदस्य सरदार आबाजी महादेव हे नागोठण्याचे नागरिक होते. या गुन्ह्याबद्दल त्यांना नागोठण्यातून अटक करुन कुटूंबियांसह सुरगड किल्यावर अटकेत ठेवण्यात आले होते.

सन १७९६ नंतर आंग्रे घराण्यात जि यादवी सुरु झाली त्यामध्ये सुद्धा नागोठण्याचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता रघोजी आंग्रे मरण पावल्यावर त्यांचे पुत्र मानाजी, कान्होजी व सावत्र पुत्र  जयसिंग यांच्या गृहकलह निर्माण झाल्यावर जयसिंगास अटक करुन त्याच्या परिवारास नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र जयसिंग आंग्रेची पत्नी सकवारबाई हिने नजरकैदेतून सुटका करुन नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेऊन तेथून तिने बंडाचा झेंडा फडकविला आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली कालांतराने जयसिंगाने आपली सुटका करुन घेऊन तो सुद्धा पुण्यास पेशव्यांकडे गेला.

पुढे आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे यांनी जयसिंगाच्या मदतीसाठी अलिबाग येथे कुच केले ग्व्हाल्हेरच्या दौलत राव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावाच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबाग ला आल्यावर सैन्याने हिराकोटला वेढा दिला पण जयसिंग गुपचुप निसटून रात्री नदी पोहत कुलाब्यास आला. बाबुराव यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने नवर्‍याच्या मदतिस जाऊन खांदेरी किल्ला काबिज केला. इ.स.१७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली परत एकदा बाबुरावाच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजीच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन कैदी बनवण्यात आले. यानंतर बाजिराव दुसरा याने बाबुराव यांना सरखेलपद दिले.
नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर
जानेवारी १८१८ मध्ये कर्नल प्रोथर ने ३८० इंग्लिश आणि ८०० स्थानिक सैनिकांच्या सहाय्याने अवचितगड, नागोठणे, सोनगड, पाली हि ठिकाणे ताब्यात घेतली. सन १८१८ ते १८४० च्या दरम्यान ब्रिटीश सत्ता आणि आंग्रे, पंतसचिव यांच्यात गावे ताब्यात घेण्यावरुन देवाणघेवाण झाली. यानंतर सांक्षी, राजपुरी व रायगड उपविभाग ब्रिटीश सत्तेखालील रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यात आले. सन १८३० साली ठाण्याला जिल्हा केल्यामुळे हे सर्व उपविभाग ठाण्यास जोडण्यात आले. ब्रिटीशांच्या आधि हा परिसर आंग्रे आणि पंतसचिव यांच्यामध्ये विभागला होता. नागोठणे विभागातली खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या ताब्यात होती. सन १८३० मध्ये नागोठण्यातला अर्धा भाग ब्रिटीशांना देऊन त्याबदली भोरकरांनी अवचितगडचा निम्मा भाग स्वतःकडे घेतला. पुढे १८३३ मध्ये ब्रिटीशांनी आंग्रेंकडून नागोठणे भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा अर्धा भाग आंग्य्रांना दिला. रघोजी आंग्रे यांचा मुलगा दुसरा कान्होजी याच्या मृत्यूनंतर आंग्र्यांच्या गादीस वारस नसल्याने इंग्रजांनी १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा करुन ब्रिटीश राज्यात विलीन केले आणि ब्रिटीश कायदे लागू झाले. १८४० साली रामोशी स्वातंत्र्य सैनिकांचा एक संघ भोर संस्थानाहून घाटावरुन खालि उतरली आणि त्यांनी  ब्रिटीशांच्या ताब्यातल्या पाली आणि आणि नागोठणे गावावर हल्ला चढवला आणि ति गावे जाळून टाकली. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीशांनि नेटीव्ह लोकांच्या १५ व्या रेजिमेंटला पाचारण केले यामध्ये अनेक रामोशी पकडले गेले किंवा मारले गेले. ऑक्टोबर १८४४ साली तुंगारतन, कर्नाळा, वाक्रुळ, हवेली, अंतोरा हि ठिकाणे ठाणे जिल्ह्यात घेऊन नागोठण्याचा दर्जा कमी केला गेला आणि नागोठण्याचा साक्षी प्रांतात समावेश केला. १८५२ साली इंग्रजांनी कुलाबा एजन्सी रद्द केली आणि या एजन्सी मधली खांदेरी, रेवदंडा, सांक्षी, राजपुरी, रायगड उपविभाग आणि नागोठणे, तळा, निजामपुर, गोरेगाव, बिरवाडी आणि पोलादपुर हे लहान विभाग एकत्र करुन कुलाबा उपजिल्हा तयार केला. पुणे सार्वजनिक सभेने सुरु केलेल्या १८५७-१८७६ च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहिम काढली. १८५६ साली भोर संस्थानाने नागोठण्यात पहिली देशी शाळ उघडण्यात आली. हि रायगड जिल्ह्यातली महाड नंतर उघडलेली दुसरी देशी शाळा होती. डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीने पनवेल, पेण, नागोठणे, गोरेगाव व रेवदंडा येथे शेतकर्‍यांच्या सभा आयोजित करुन दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. सन १८८२ साली तत्कालिन जिल्ह्यातली अलिबाग, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि महाड उपविभागत १०६४ गावांचा समावेश होता. सन १९२१-१९३१ च्या दरम्याने नागोठणे महाल खालसा करण्यात आले.

ब्रिटीशकाळातसुद्धा नागोठणे गावाचे पेठ व महालाचे स्वरुप कायम होते आणि अनेक सरकारी कार्यालये आणि कचेर्‍या तिथे स्थापन झाल्या ज्या आजही येथे पहावयास मिळतात . एक जुन ते ३१ ऑगस्ट हे पावसाचे तिन महिने सोडले तर नागोठणे बंदर त्याकाळि चोविस तास गजबजलेले असे. गोरेगाव, इंदापुर, कोलाड, खांब, पाली सुधागड ते अगदी महाबळेश्वरपर्यंतचे मुंबईत जाणारे प्रवासी नागोठणे बंदरात येत. या प्रवाशांचा नागोठणे बंदराकडे होणारा प्रवास बैलगाडीतून असे आणि जिकडून तिकडून चाळिस पन्नाच कि.मी. बैलगाडीतून येऊनही बोट चुकली म्हणजे दुसर्‍या दिवशी भरती ओहोटीची वेळ पाहून नागोठ्णे बंदरावर बांधलेल्या धर्मशाळ्त प्रवाशांना मुक्काम करावा लागत असे.त्यामुळे परिसरात जिकडे तिकडे बैलगाड्या सोडलेल्या असत व सोडलेले बौल गळ्यातल्या घुंगरांना मंजुळ झटका देऊन रवंथ करताना दिसत. सायंकाळी प्रवाशांच्य पेटलेल्या चुलीमुळे बंदरावर ठिक ठिकाणी चुलींचा उजेड दिसत असे आणि चुलीवर भाजल्या जाणार्‍या भाकर्‍या किंवा घमघमणार्‍या सुक्या मासळीच्या कालवणारे हा परिसर धुंद होत असे. १९१८ च्या दशकाच्या अखेरपर्यंत नागोठणे-धरमतर्-मुंबई या जलवाहतुकिच्या मार्गावरुन तांदुळ, मिठ, मासे, जंगली लाकुड, तांब्या पितळेची भांडी या मालाची निर्यात होत असे. १९१४ ते १५ या दरम्याने धरमतर ते नागोठणे स्टीम बोट सेवा चालत असे मात्र पुढे बंदर गाळात सापडल्याने हि वाहतुक बंद पडली. तरी मुंबईहून महाबळेश्वरपर्यंत प्रवासी नागोठणे बंदरात उतरुन प्रवास करत असत. आजुबाजुच्या डोंगर माथ्यावरिल बेछुट आणि अविरत जंगलतोड यामुळे कोकणातील एकेकाळी हिरवेगार असणारे डोंगर आज उघडे बोडके दिसतात. हि परिस्थिती सुधागड तालुक्यातल्या अंबा नदीच्या उगमापासून नागोठण्यापर्यंत कायम आहे. जंगलतोडीमुळे डोंगरावरिल माती व जमिन जोरदार पावसामुळे सुटून नदीत आली आणि खाडीपर्यंत सरकली त्यामुळे गाळ साचून बोट सेवा बंद पडली. त्यामुळे गेली ५००० वर्षे उत्कर्षाच्या शिखरावर असलेले हे ऐतिहासिक नागोठणे बंदर काळाच्या ओघात नाहिसे झाले आणि नागोठण्याचे व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्वही त्याबरोबर संपुष्टात आले.

नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाकडे पाहिले तर अभिमानाने उर दाटून येतो मात्र इतिहासाचे जतन करण्यामध्ये जि उदासिनता आपण दाखवतो ति नक्कीच दुर्दैवी आहे. नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन होण्यासाठी लोकजागृती होण्याची नितांत गरज आहे यासाठी शहराच्या इतिहासाचे संकलन करुन नागोठण्याच पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, गावातल्या सोळाव्या शतकातल्या ऐतिहासिक पुलाचे तसेच इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे रक्षण करणे, गावात पुरातत्विय दृष्ट्या उत्खनन करुन नाहिशे झालेले शिलालेख अथवा इतर ऐतिहासिक पुरावे शोधून काढणे, गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे आहे अन्यथा नागोठण्याचा वैभवशाली इतिहास इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. कोकणपट्ट्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या अजगराने ठाणे (स्थानक), मुंबई (पुरी), साष्टी, वसई (विषय), नालासोपारा (शुर्पारक), पनवेल (पन्नगपल्ली) अशी अनेक ऐतिहासिक शहरे एकामागुन एक अशाप्रकारे गिळंकृत केली आहेत कि आज तिथे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे कठिण झाले आहे. उद्या नागोठण्याची स्थिती सुद्धा अशीच होण्याआधी या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे अन्यथा शहरीकरणाचा अजगर या ऐतिहासिक शहरास

अशा रितीने गिळंकृत करेल कि या ठिकाणी नागोठणे नावाचे एक गाव अस्तित्वात होते हे देखिल पुढील पिढीच्या लक्षात राहणार नाही.

मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी

रायगड जिल्हा हा विवीधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचीत व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विवीधता पाहता येथे डोंगर, दर्‍या व अरण्यांनी व्यापलेला असा खुप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्यपुर्ण स्थळे अजुन प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील.
मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्‍या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्‍या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्‍यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.

रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्‍या तथा तिसर्‍यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्‍या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही  या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.

अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच  ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत.
चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास
जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे.

मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा संपुर्ण फेरफटका मारणे अगत्याचे ठरते. चांदोरे गावात पुर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तिवात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी गेलेले. मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असल्याने चांदोरेकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागास इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला एवढेच नव्हे तर येथील नागरिकही या उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले, मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक के चांदोरे गावाचा अविभाज्य घटकच झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही अर्थात याबद्दल चांदोरे गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले पाहीजे.

चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे म्हणजे पुर्वेकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे उत्खनन चालू असून अनेक नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. डावीकडल्या रस्त्यावरुन चालायल लागल्यावर प्रथम दिसतो तो विस्तिर्ण असा जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभुमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याचे पारणे फेडतो. जलाशये, विहीरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत, चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवितो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खुप वैभवसंपन्न व भरभराटीत असावे, चांदोरे गावाच्या ज्ञात इतिहासाबाबत अजुन बरीच माहिती प्रकाशझोतात यायची आहे मात्र या गावाचे पुर्वीचे नाव चंद्रपुर असावे असा कयास बांधता येवू शकतो, शिलाहारांच्या ताम्रपटांत व शिलालेखांत अनेकवेळा चंद्रपुर असे उल्लेख येतात अर्थात चांदोर या नावाची अनेक गावे अस्तित्वात आहेत मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातल्या चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या जलाशयाच्या कडेने चालत गेल्यावर प्रथम दिसते ते एक शिवमंदीर, कौलारु छप्पर असलेले हे शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. याच शिवमंदीरात चांदोरे परिसरात उत्खनन चालू असताना सापडलेल्या काही प्राचिन सतीशिळा, विरगळी व मुर्त्या पहायला मिळतात. येथे पहावयास मिळणारी शेषशायी विष्णूमुर्तीरायगड जिल्ह्यात क्वचितच सापडेल. ही मुर्ती पाहता या परिसरात प्राचिन काळी वैष्णवपंथिय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते अर्थात या मुर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्यशैलींशी जुळणारी असल्याने इसवी सनाच्या ७व्या शतकापासून ८व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेचा या गावातील स्थापत्यशैलींशी संबध असण्याची शक्यता बळावते. सन ७५३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजघराण्याची इतिश्री केली. चालुक्य राजघराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्यशैलीमध्ये विष्णूची रुपे पहावयास मिळतात. राष्ट्रकुटांनी चालुक्यांविरुद्ध मदत केल्याबद्दल शिलाहार राजघराण्यास पुर्ण कोकणाची सत्ता दिली त्यामुळे कालांतराने या परिसरावर शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले जे ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले. येथे पहायला मिळणारी मिळणार्‍या सतीशिळा व विरगळी ही याच गावात झालेल्या एका महासंग्रामाच्या प्रतिक आहेत ज्यामध्ये चांदोरे गावाचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्याचे निरिक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आढळून येतो, पुर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारार्तिथी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजाचे स्मारकाप्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालिन युद्धाचे जीवंत प्रसंग कोरले जात. चांदोरेच्या विरगळीमध्ये दाखालेल्या प्रसंगात दोन अश्वारुढ व्यक्ती हातात भाले अथवा तरवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती तर स्त्रीसदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळी सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्यत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वर कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देव्-दानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता आहे.

याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी कारण या शिळेवर कोरलेला प्रसंग हा कुणा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे कारण यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरुढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे तसेच खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी व एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामत धारातिर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय येथे गणपती तसेच इतर देवतांच्या भग्नावस्थेतल्या मुर्त्या सुद्धा आढळून येतात.

या मुर्त्या पाहून आपण मंदीराबाहेर येऊन त्याच रस्त्यास लागलो की काही अंतरावर डाव्या बाजुला पुरातन अवशेष असल्याचा भास होतो अर्थात हेच ते ठिकाण जेथे सध्या उत्खनन चालू आहे. रस्ता सोडून आपण खाली उतरलो कि भरलेल्या गवतातून जाणार्‍या रस्त्याचा आजुबाजुला काही जुन्या घरांची जोती दिसून येतात तसेच उजव्या बाजुस एक भग्नावस्थेतला नंदी दिसून येतो, हे शिवमंदीराचे अवशेष असावेत हे लक्षात येण्यास वेळ लागत नाहीत. याच शिवमंदीरासमोर एक भलीमोठी जांभ्या दगडात खोदून काढलेली पायर्‍यांची विहीर अर्थात पुष्करणी आहे, या विहीरीत जाण्यास रस्ता आहे व याच रस्त्यात काही कोनाडे कोरले आहेत ज्यातल्या एका कोनाड्यात उमा माहेश्वराची मुर्ती दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेले उत्खनन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ते पुरातत्ववेत्ते व त्यांच्या सहकार्‍यांनी या संपुर्ण पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचिन अवशेष अवगत केले आहेत ज्यांच्यावर सध्या अभ्यास सुरु आहे.

चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत स्थित आहे त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर नावाचे एक गाव लागते तिथे अमृतेश्वर हे प्राचिन व सुरेख असे शिवमंदीर आहे, या शिवमंदीराचा व चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता आह. कारण ज्या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदीराबाहेर सुद्धा आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचिन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडावयाचा आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढला आहे, लांबुन लांबुन अगदी परदेशातून पर्यटक हे प्राचिन वैभव पाहण्यासाठी गावास भेट देत आहेत व चांदोरे गावातले नागरिक त्यांना आस्थेवाईपणे मार्गदर्शन करत आहेत. चांदोरे गावच्या उत्खननासोबत रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधून काढण्याच्या पर्वास सुरुवात झाली आहे व भविष्यात याचा फायदा रायगड जिल्ह्याच्या स्थानिक पर्यटन विकासाला व रोजगारास होईल अशी आशा करुयात.

सरसगडाच्या कुशीतले बल्लाळेश्वराचे पाली

रायगड जिल्ह्यास जसा ऐतिहासिक व भौगोलिक वारसा आहे, त्याचप्रमाने धार्मिक व सांस्कृतीक वारसा सुद्धा आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत जी राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत, या देवतेस आपल्याकडे आराध्यदेवतेचा मान दिला जात असल्याने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीची पुजा करुनच केली जाते व ही आजची नव्हे तर पुरातन कालापासून चालत आलेली प्रथा आहे.
सरसगडाच्या कुशीतले बल्लाळेश्वराचे पाली
गणपतींची अनेक स्थाने महाराष्ट्रात आहेत मात्र त्या सर्वांत अष्टविनायक हे सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. गणपतीवर श्रद्धा असणारे सर्व भाविक अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे कधीच चुकत नाहीत. अष्टविनायकांपैकी एकून दोन विनायक खुद्द रायगड जिल्ह्यातच आहेत. यातला एक म्हणजे महडचा वरदविनायक व दुसरा पाली गावचा बल्लाळेश्वर, बल्लाळेश्वरामुळे या गावास 'बल्लाळेश्वराची पाली' असे नामाभिमान प्राप्त झाले आहे. पाली हे गाव मुंबई गोवा हायवेवर लागणार्‍या वाकण गावापासून आठ कि.मी. अंतरावर खोपोली पुणे मार्गावर आहे व मुंबई व पुण्याहून सारख्याच अंतरावर आहे. अंबा नदीच्या तिरावर व सरसगडाच्या कुशीत वसलेल्या या गावास प्राचिन इतिहास आहे, पाली हा पल्ली या नावाचा अपभ्रंश आहे, पल्लीचा अर्थ नगर असा होतो, याशिवाय या गावास इतर कुठेही आढळून न येणारी जुन्या धाटणीची वेस आहे यावरुन पालि हे पुरातन काळापासून एक टुमदर नगर म्हणुन प्रसिद्ध होते हे स्पष्टच आहे . प्राचिन महाराष्ट्राचा सुसंगत इतिहास सातवाहन कालापासून मिळतो, त्याकाळी परदेशातून आयात अथवा निर्यात केलेला माल कोकणातून देशावर जात असे किंवा देशावरुन कोकणात येत असे, अशाच एका महत्त्वाच्या प्राचिन हमरस्त्यावर पाली आहे याला दुजोरा याच परिसरात असलेल्या ठाणाळे-नाडसुर, गोमाशी व घाटमाथ्यावरील अनेक लेण्या देतात. याशिवाय हे गाव ज्या सरसगडाच्या पायथ्याशी वसले आहे तो सरसगड पुरातन कालापासून या व्यापारी रस्त्याचा संरक्षक म्हणुन सेवा करीत होता, आजही या किल्ल्याच्या पोटात अनेक लेण्या, कोठारे व टाक्यांचे अवशेष आढळतात जे प्रामुख्याने सातवाहन कालीन असावेत.

येथील श्री बल्लाळेश्वर व श्री धुंडीराज ही दोन गणेशदैवते तर समस्त भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. या दोनही देवस्थानांना प्राचिन इतिहास असून पुराणात यांचे उल्लेख आढळून येतात. गणेश पुराणात पालीचा उल्लेख 'सिंधुदेशे विख्याता पल्लीनामा भवत्पुरी' असा उल्लेख असून मुद्गल पुराणात 'सिंधुदेशे समाख्याता पल्लीनामा पुरी पुरा' असा उल्लेख आहे यावरुन बल्लाळेश्वराची व पालिची प्राचिनता लक्षात येते. गणेश पुराणात विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे व मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. या कथा पुढीलप्रमाणे, कृत युगात  पल्लीपूर नांवाचे नगर होते. या पल्लीपुरात कल्याण नामक वाणी रहात असे, त्यास बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. हा बल्लाळ लहानपणापासूनच गणेशचिंतनात मग्न असे. गणेशचिंतनान मग्न राहिल्यामुळे त्याचे अभ्यासात व व्यापारात दुर्लक्ष होते, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले मात्र बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री स्वतः प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला मात्र बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. बल्लाळेश्वर फार प्राचिन असल्याचे सर्वज्ञातच आहे मात्र बल्लाळेश्वराच्या मंदिराचे फार पुरातन काळापासून अनेक जिर्णोद्धार झाले असावेत, सध्या जे मंदीर दिसून येते त्याची धाटणी पेशवेकालीन आहे, कारण पेशवे हे गणेशभक्त होते. बाबुराव फडणिस यांनी पुर्वीच्या लाकडी मंदीराचे भक्कम अशा दगडी मंदिरात रुपांतर केले. या मंदिराची रचना करताना अतिशय  वैशिष्ट्यपूर्ण बारकावे वापरले आहेत,  जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत, हे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड काढताना खोदकाम करुन झाले असावेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भलीमोठी पितळेची घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी वसईच्या विजयातून मिळवली होती. तसेच या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेला चुन्याचा प्रचंड घाणा मंदिराच्या प्रांगणात आजही पहावयास मिळतो. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यापुर्वी श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे व दर संकष्टी चतुर्थीस व विनायकीस लाखो भाविक राज्यभरातून दर्शनास येत असतात. श्री बल्लाळेश्वराची मुर्ती अतिशय तेजस्वी असून भव्य आहे, डाव्या सोंडेची ही मुर्ती तीन फुट उंच आहे.

येथील सरसगड हा किल्ला म्हणजे जणू बल्लाळेश्वराची प्रतिकृतीच, खुप दुरवरुन याचे दर्शन झाल्यास साक्षात बल्ला़ळेश्वराचेच दर्शन झाल्याचा आभास होतो. याच्या पगडीसारख्या आकारामुळे यास पगडिचा किल्ला असेहि एक स्थानिक नाव आहे मात्र बर्‍याचदा अनेक पर्यटक याचा सुधागड असा चुकीचा उल्लेख करतात, सुधागड हा वेगळा किल्ला असून सह्याद्रीच्या जवळ आहे. हा किल्ला अतिशय दुर्गम व अभेद्य असून पाहणार्‍याच्या छातीत धडकी भरवणारा आहे. पाषाणाचा एकसंध कडा असल्यामुळे हिवाळ्यात हा थंड झाल्यास पुर्ण पाली गावात गारवा निर्माण होतो व उन्हाळ्यात तापल्यामुळे पाली गावाचे तापमान बरेच तप्त असते. निजामशाही काळात पालीस मामलेदार कचेरी होती, त्यावेळी पालीस मामले अमिनाबाद असेही नाव होते. राजाराज महाराजांचे सेनापत शंकराजी नारायण यांनी हा भाग ताब्यात घेतल्यावर अगदी १९४८ सालापर्यंत हा भाग पंतसचिवांच्याच ताब्यात होता, संस्थाने खालसा झाल्यावर हा भाग रायगड जिल्हास जोडण्यात आला व सुधागड नावाचा तालुका निर्माण करुन पालि हे त्याचे मुख्यालय करण्यात आले. तर असे हे पाली खर्‍या अर्थाने धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिक वारश्याने नटलेले सर्वसंपन्न असे गाव आहे.

अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं


अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या एका अर्वाचिन स्तंभावरुन हे गावं आल्याची चाहूल लागते. आक्षी व नागावं ही जुळी भावंड, निसर्गरम्यताव व ऐतिहासिकता यांच्या बाबतीत या दोन्ही गावांत विलक्षण साम्य दिसून येते.
अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं
गेल्या काही वर्षांपुर्वी अक्षी हे गाव आपल्या निसर्गरम्यतेसाठी व स्वच्छ पांढर्‍या वाळूच्या समुद्रकिनार्‍यासाठी प्रसिद्ध होतं, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अक्षीची ओळख मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं म्हणुन समोर आली आहे.

अक्षी गावात शिरणार्‍या मुख्य रस्त्यास लागलं की काही अंतरावर सोमेश्वराचे प्राचिन शिवमंदीर आहे, याच परिसरात मराठीतला प्राचिन व पहीला शिलालेख पहावयास मिळतो. एका गधेगळीवर कोरलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत असून संस्कृत-मराठी मिश्रीत आहे, संशोधनाअंती या शिलालेखाचा काळ १६ मे १०१२ असा ठरला याचा अर्थ २०१२ साली या शिलालेखास हजार वर्षे पुर्ण झाली. त्याकाळी संपुर्ण कोकण प्रांतावर शिलाहार नावाचे राजघराणे राज्य करीत होते, हे शिलाहार राष्ट्रकुट नामक साम्राज्याचे मांडलिक असून यांच्या तीन शाखा अस्तित्वात होत्या त्यांना उत्तर कोकण शाखा, दक्षीण कोकण शाखा व कोल्हापुर शाखा असे म्हटले जाते. अक्षीचा शिलालेख हा उत्तर कोकणच्या शिलाहार शाखेचा राजा केशिदेवराय याच्या काळातला हा शिलालेख असून केशिदेवाचा महाप्रधान भइर्जु सेणूई याने अक्षी गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दिले असल्याचे या शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. या शिलालेखाबरोबरच या परिसरात आणखी एक यादवकालीन शिलालेख दिसून येतो सन १२९१ सालचा हा शिलालेख यादव नृपती रामचंद्रदेव यांच्या काळातला असून त्यांचे मांडलिक जाईदेव यांचा पुत्र ईश्वरदेव क्षत्रीय याने देवीस एक गद्याण दान दिले असे शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. अर्थात या दोन्ही शिलालेखांमधले उल्लेख हे कालंबिका देवीचे आहेत हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

अक्षी गावातील कालंबिका माता मंदीर व सोमेश्वर महादेव हे शिवमंदीर समस्त अक्षीकरांची आराध्य दैवते आहेत. कालंबिका मंदीराचा जिर्णोद्धार झाला असून देवीचे सर्व उत्सव ग्रामस्थ भाविक अतिशय उत्साहाने साजरे करत असतात. कालंबिका मंदीराच्याच आवारात काही काळांपुर्वी प्राचिन गजांतलक्ष्मीची मुर्ती आढळली, आता तिची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी कालंबिका मंदीराशेजारीच एक छोटेखानी मंदीर बांधून केली आहे. या शिवाय सोमेश्वर महादेव शिवमंदीरही अतिशय प्रेक्षणीय आहे या मंदीरातला प्रवेश धीरगंभीर व मंत्रमुग्ध वातावरणाचा अनुभव देतो. या मंदीरातील नंदीची मुर्ती भलीमोठी
असून एवढी मोठी मुर्ती आजुबाजुच्या परिसरामध्ये क्वचितच पहावयास मिळते.

अक्षी गावाचे नाव कसे पडले असावे हा अभ्यासाचा विषय आहे. अक्षी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ नेत्र किंवा अक्ष असा होतो. प्रत्येक गावाच्या नावामागे एक अर्थ दडलेला असतो ज्यावरुन गावाच्या आद्य इतिहासाचा थोडाफार निष्कर्ष लावता येतो. अक्षी हे गाव साखरखाडीच्या जवळच असल्याने व येथून उत्तर व दक्षीणेकडिल खुप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने टेहळणीसाठी या प्रदेशाचा वापर पुर्वी मोठ्या प्रमाणात होत असावा आणि भौगोलिक दृष्ट्या अक्षी हे गाव अष्टागरांच्या मधोमध येत असल्याने अष्टागराची नेत्रे या अर्थी या गावास हे नाव मिळाले असल्याचा अंदाज लावू शकतो. अर्थात अक्षी हे गाव प्राचिन अष्टागरांपैकी एक असल्याने तसेच या गावातल्या दोन प्राचिन शिलालेखांमुळे हे गाव फार पुर्वीपासून राजकिय व सांस्कृतिकदृष्ट्या वैभवसंपन्न होते याची खात्री पटते. उत्तर आंग्रे काळात म्हणजे १७ फेब्रुवारी १७९७ मध्ये आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे व रघुजी आंग्रे यांचे पुत्र जयसिंगराव आंग्रे यांच्यात अक्षी या गावात तुंबळ युद्ध झाले होते ज्यामध्ये बाबुरावांचा पराभव झाला मात्र कालांतराने बाबुरावांनी जयसिंगरावांचा पराभव करुन दुसर्‍या बाजिरावाकडून सरखेलपदाची वस्त्रे घेतली.

अक्षी गावात फेरफटका मारावा तो चालतच, नारळी पोफळीच्या बागांमधून गेलेल्या रस्त्यांवरुन चालत असताना फळा-फुलांच्या बागांतून आलेला सुगंध वेगळ्या विश्वात घेऊन जातो, येथील समुद्रकिनार्‍यावरील पांढरी वाळू व समोर विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचा निनाद वातावरणात गुढ ध्वनीलहरी निर्माण करीत असतात. अक्षी गावाची एक दिवसाची सफर सुद्धा वर्षभर पुरेल इतका उत्साह देऊन जाते. अलिबाग  चौल रस्त्यावर अलिबागपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या अक्षी गावास भेट देण्याकरीता आपले खाजगी वाहन, बस किंवा रिक्षांचा वापर करता येऊ शकतो, येथील स्तंभापासून साधारणतः १.५ कि.मी. अंतरावर अक्षीचा समुद्रकिनारा आहे जेथे थेट वाहने जाऊ शकतात. अक्षीच्या किनार्‍यावरुन आपल्याला अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते याशिवाय अक्षी गावात राहण्याच्या व खाण्याच्या विपुल सोयी असल्याने हा बीच पर्यटकांसाठी अतिशय सोयीचा आहे. एका वेगळ्या विश्वाचा आनंद घ्यावयाचा
असल्यास अक्षी या गावास एकदातरी भेट द्यायलाच हवी.

विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर

लोकसत्ता टीम

प्राजक्ता म्हात्रे

निसर्गाच्या सान्निध्यात असणारं असं आमचं छोटंसं उरण हे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’प्रमाणेच माझ्या हृदयात घर करून आहे. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या होडय़ांचे विहंगम दृश्य या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. उरणमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणादेखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरुपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. या भागाला देवळांवरून देऊळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठा विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले रिद्धी-सिद्धी विनायकाचे देवस्थान आहे.

हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. रिद्धी-सिद्धी विनायका वरून सदर गाव हे विनायक या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्ष्यांचे गुंजन, तोऱ्यात चालणाऱ्या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री रिद्धी-सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.

रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेख केला आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.

मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून, अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून, पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून, रिद्धी-सिद्धी दोन फूट उंचीच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे, तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी सदर मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदींच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते हेदेखील या देवळाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.

मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतला शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, या गूढ शिलालेखाचा उलगडा सन ९१४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबईच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.

सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढय़ांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडुरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजाआर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. सन १९९३ पासून या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त- फजनदार हे सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंडय़ा अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जिने असून, लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशंना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे- जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंडय़ांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.

गावकरी कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टाकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान केली आहे.

prajaktaparag.uran@gmail.com


विस्मरणातील चौल (अलिबाग जवळील)

 

“चौल” जगाच्या नकाशातील एके काळचे भरभराटीचे बंदर ! इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे. त्याकाळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते ! असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारचं वेगळे भासले. चौल आज समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. जगाच्या नकाशात त्याकाळी “दक्षिण काशी” अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते, कालाय तस्मै नम:, म्हणतात ते हे असे !

 

इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. प्रवासवर्णन लिहिणाऱ्या टॉलेमीच्या दस्तावेजात या सातवाहनकालीन बंदराचा उल्लेख येतो आणि आज विस्मरणात गेलेले चौल त्या काळी किती महत्वाचे व्यापारी बंदर होते, याची प्रचिती येते. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो. पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी, असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले. इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
अशा ह्या ऐतिहासिक चौल बंदराची ओळख बंदरापुरती होती, असेही नाही तर आज चौलमध्ये आल्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याची मोहिनी पडतेच परंतु आजही  काही वास्तू चौल नगरीची ओळख सांगण्यासाठी पर्यटकांची, अभ्यासकांची वाट पाहत उभ्या आहेत. त्यातीलच सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर, काहीसा चौल नगरीच्या बाहेर असलेला कलावंतिणीचा वाडा, घुमट टेकडी, हमामखाना, दत्ताचे मंदिर असलेली टेकडी, पोर्तुगीजांनी बांधलेली ती अभेद्य तटबंदी व त्याच्या बाजूचे खंदक, किनाऱ्यावरील बलाढ्य किल्ला व त्याची तितकीच बलाढ्य प्रवेशद्वार अशा बऱ्याच वास्तू आज त्या काळातील साक्ष देत उभ्या आहेत. हे सर्व मी जेव्हा अभ्यास दौऱ्यात पाहिले तेव्हा खरंच त्या आठवणीत हरवून गेलो. येथील रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत आहे. उतरत्या कौलारू छताचे मंदिर, लांबून घरासारखे वाटते.  (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप आहे. तेथे असणारी दिपमाळ आणि रेखीव पुष्करणी या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर टाकत असते. वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना असून मूळ मंदिराची निर्मिती कधी व कोणी केली ? याची ठोस माहिती मिळत नाही पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.

4

 

हे ऐतिहासिक मंदिरात एक गंमत आहे. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशी नावे असलेली तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला अथवा पावसाने ओढ दिली की, पर्जन्यकुंडावरील फरशी उघडायची. वारा थांबला अथवा वादळस्थिती निर्माण झाली की, वायूकुंड उघडायचे आणि थंडी किंवा गारठा वाढला की, उर्वरित अग्नीकुंड उघडायचे. या गावावर नैसर्गिकरित्या आलेल्या या तीन संकटांचे निवारण करण्यासाठी ही कुंडे महत्वाची होती. खरंच, हे सर्वच तिथे पाहताना खूपच विलक्षण वाटते ! याच्या नोंदी तपासल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. गावोगावीच्या या श्रद्धा आणि त्यासाठीच्या त्या काळातील लोकांनी केलेल्या या योजना वाखाणण्याजोगे आहेत. आज मात्र काळाच्या ओघात अग्नीकुंड आणि वायूकुंड बुजवले, असे ग्रामस्थ सांगतात. पर्जन्यकुंड मात्र आपल्याला दिसते. तरी सुद्धा त्या काळातील लोकांनी केलेल्या अद्भुत कल्पना मनाला सुखावून जातात.

6

 

चौलमध्ये रामेश्वराशिवाय अनेक पुरातन मंदिरे आहेत. यातील समुद्रकिनारी आणि पोर्तुगीजांच्या किल्ल्याजवळील मंदिर म्हणजे सिध्देश्वर मंदिर ! ह्या मंदिरात पोर्तुगीजांच्या काळातील काष्टशिल्प आहे. आज त्या शिल्पाला घंटा टांगल्या आहेत. अप्रतिम कोरीवकाम असलेल्या ह्या शिल्पात पोर्तुगीज टोपीधारी एका चार पायच्या प्राण्याला मारून घेऊन जात आहेत तसेच जंगली प्राण्याची भांडणे आणि त्यांना मारताना असलेले हे शिल्प आपल्याला त्या काळात घेवून जाते. (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर चावीच्या आकाराची उथळ विहीर अगदी शोभून दिसते. हे सर्व आता रेवदंड्यातील  पोर्तुगीजांच्या किल्ल्याच्या बाजूला आहे.

5

 

चौलच्या बाहेरील रस्त्यावर कलावंतिणीचा वाड्याचे अवशेष आहेत. पुरातत्व खात्याकड़े असलेली हि वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे. एके काळी हा वाडा चौलची ओळख होती, असे इतिहासात वाचायला मिळते. हि वास्तू निजामशाही व आदिलशाहीत कितीतरी करमणुकीच्या क्षणांची साक्षीदार असेल. मोठमोठे अधिकारी या वाड्यात येत असतील. कितीतरी लोकांना या वाड्याची मोहिनी असेल. उदयाकडून अस्ताकडे चाललेल्या या वाड्याची आजची स्तिथी खूपच वाईट आहे. या वाड्याची तटबंदी पूर्णतः भग्न झाली आहे. फक्त प्रवेशद्वार आणि त्या समोरील वास्तू आज ठीकठाक अवस्थेत आहेत. आज या वाड्याच्या आत पूर्णतः शेती केली जात आहे.  घुंगरांचा आवाज ऐकलेला आणि नाचगाणे पाहणाऱ्या ह्या वास्तूच्या मागे प्रचंड मोठे तळे आहे. बहुतेक ह्याच वास्तूतील कलाकारांसाठी हि पाण्याची व्यवस्था असू शकेल. ऐतिहासिक नजरेतून त्या वास्तूत जेव्हा आपण शांत उभे राहतो. तेव्हाचा थिरकणाऱ्या घुंगरांचा आवाज आणि नाद कानावर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी हि मुकं वास्तू एकदातरी पाहणे गरजेचे आहे. (फोटोत पाहू शकता.)

9

 

त्याच रस्त्यावर एका छोट्या टेकडीवर अशीच एक मुकं वास्तू म्हणजे घुमट टेकडी ! (खालील फोटोत पाहू शकता.) कोणी व का बांधली ? हे सांगता येत नाही. पण त्यावरील बारीक कलाकुसर मात्र अद्भुत आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच माड आणि त्याच्या कुशीत लपलेले चौल तिथून पाहण्यात एक पर्वणी आहे. समुद्रावरून येणारी दमट गरम हवा मागे उभे असलेल्या दत्ताच्या टेकडीला आदळून पुन्हा जेव्हा घुमट टेकडीकडे येते आणि येताना घुमट टेकडीच्या खाली असलेल्या तळ्यावरून तिचा प्रवास होतो, तेव्हा मात्र ती थंड झुळूक अनुभवण्यासारखी असते. वास्तू छोटी आहे परंतु चौलच्या सौंदर्यात भर घालणारी आहे.

10

ह्याच रस्तावरून रेवदंड्याकडे येताना आता तिठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पोर्तुगीज किल्ल्याचे त्या काळातील महत्वाचे प्रवेशद्वार होते. आजही पोर्तुगाल भाषेत असलेला त्यांचा शिलालेख आणि त्या काळातील त्यांची महत्वाची शिल्पकला उठून दिसते. यामध्ये जागतिक स्वामित्व (आर्मीलरी स्पियर), कोट ऑफ आर्मस आणि तीन भाले एकाच गाठीत बांधून तीस वर्ष सत्ता उपभोगल्याचे शिल्प दर्शनी भागांत लावून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. असे हे शिल्प आपल्याला त्या काळात घेऊन जातात. (खालील फोटोत पाहू शकता)

11

 

पूर्ण किल्ल्यात आल्यानंतर दुसऱ्या गोमुखी प्रवेशद्वाराच्या मागे पोर्तुगीज राजाचा राजमुकुट शिल्प बसवले आहे. त्याकाळी मागे फिरून लवून मुजरा करण्याचे ठिकाण असलेला हा महत्वाचा दरवाजा होता. कितीतरी अधिकाऱ्यांचा मुजरा या मुकुटासमोर झडला असेल पण दुर्दैवाने आज मात्र हे शिल्प वेलींच्या विळख्यात अडकलेले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने हादरून गेलेली पोर्तुगीज सत्तेची शिल्प आज निसर्ग उखडून फेकण्याच्या तयारीत आहे. हे शिल्प पूर्णतः दगडी असून हे पाहणे म्हणजे पर्वणी आहे. असे शिल्प पोर्तुगीजांच्या किल्ल्यांवर खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा खास फोटो तुमच्यासाठी !

8

 

याच किल्ल्यातील चौलची अजून एक प्रसिद्ध वास्तू म्हणजे सातखणी मनोरा ! पोर्तुगीजांच्या या किल्ल्यात सातमजली हा मनोरा त्याकाळी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. (खालील फोटोत पाहू शकता.) आज त्याचे ५ मजले सुस्थितीत आहेत पण हे सर्व पाहताना समुद्रावर दादागिरी करणारी हि सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांमूळे हादरली आणि लक्ष ठेवण्यासाठी अतिदक्ष झाली ह्याचे हे द्योतक पुरावा आहे. या मनोऱ्याच्या आजूबाजूला लांब पल्ल्याच्या तोफा पडलेल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या या तोफा आज मात्र त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या तटबंदीवरुन अफाट आणि अथांग समुद्र दिसतो, इथूनच पोर्तुगीजांनी टेहळणीसाठी खास बांधलेला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या टेकडीवर कोर्लई किल्ला दर्शन देतो. आज तिथे दिपस्तंभसुद्धा आहे.

3

असे हे संस्मरणीय आणि अद्भुत चौल आज फक्त समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. खरं तर प्राचीन ठेवा असलेले मंदिरे आजही स्फूर्ती देतात. शिवरायांच्या दरारामुळे हादरलेली पोर्तुगीजशाही तिथे गेल्यावर समजते. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेले अलिबागमध्ये गेलात तर तिथून चौल-रेवदंडाकडे पावले वळवा आणि नक्की सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर आणि इतर वास्तू पहा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेला ठेवा पहावा आणि इतिहास जागा व्हावा म्हणून हा लेखप्रपंच ! विस्मरणात चौल हा माझा लेख तरुण भारत या वृत्तपत्रांत रविवार, दिनांक २१ मे २०१७ ला फोटोंसकट पूर्ण पानभर आला होता त्याचा फोटो आपण खाली पाहू शकता.

7

लेख कसा वाटला ? हे आपण comment मध्ये आणि sagarblog4@gmail.com या मेल आयडी वर कळवू शकता.

या चौल नगरीचे खाली काही आणखी फोटो खास तुमच्यासाठी !

तटबंदी तोडून तयार केलेला हा रस्ता…. 

12

चौलची ओळख असलेले रामेश्वर मंदिर येथील रेखीव पुष्करणी !

13

पोर्तुगीज किल्ल्यातील सातखणी मनोऱ्याजवळ एकेकाळी दरारा निर्माण केलेल्या आणि आता निपचित पडलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा….

“पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजातील पान क्रमांक २०० वरील प्रकरण ५३ चा फोटो (ज्या मध्ये चौलचा उल्लेख आला आहे. )






No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...