Wednesday, November 11, 2020

वाशिम जिल्ह्याची भटकंती

 

विदर्भ पर्यटनाच्या या शेवटच्या टप्प्यावर आपण आपली भटकंती वळवूयात वऱ्हाडातल्या वत्सगुल्म उर्फ बासम अर्थात वाकाटक राजाची राजधानी असलेल्या वाशिम जिल्ह्याकडे !

ऐतिहासिक शहर वाशिम

वाशीमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन) वाशीम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशीमचे बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले.

वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती. त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजिकच्या अकोला जिल्ह्याला जोडण्यात आला. २६ जानेवारी १९९८ मध्ये पुन्हा वाशीम हा जिल्हा घोषित करण्यात आला.

रिसोड

रिसोड हे एक पौराणिक शहर आहे. रिसोडचे मूळ नाव ऋषिवट असे आहे. असे म्हणतात की रिसोड परिसरात पुराणकाळी असंख्य वडाची झाडे होती. तिथे ऋषिमुनी तपस्या करीत असत. रामायणात उल्लेख असणारा दंडकारण्याचा हा भाग आहे. संतांची भूमि म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. या ठिकाणी अनेक महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. रंगारी लोकांचे शहर म्हणूनसुद्धा रिसोडची ख्याती होती. रिसोड हे तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते. या तलावांमुळे रिसोडला नेहमीच लष्कर आपले तळ ठोकून असत. १७२४ साली येथील रहिवाशांनी हे तलाव नष्ट केले. तरीही आजतागत पिंगलाक्षी देवी तलाव अस्तित्वात आहे. रिसोड क्षेत्र लखूजी जाधवांना मिळाल्यावर काझीखानाने रिसोडवर मोठा दरोडा घालून हा परगणा लुटला होता. १८५७ च्या दरम्यान पेंढारे व रोहिल्यांनीही रिसोडवर दरोडे घातले होते. मात्र त्यांना रहिवाशांनी एकत्रित येऊन लढा दिल्याचे इतिहास सांगतो.

विदर्भ प्रांतातील हा तालुका मराठवाड्याच्या सीमेस लागून आहे.

महत्त्वाचे म्हणजे रिसोडला कापसाची व अन्य कृषिउत्पादनांची अधिकृत बाजारपेठ (Agri and Cotton Market Committee) १८९९ साली स्थापन झाली.

अमरदासबाबा संस्थान

अमरदासबाबा मंदिर संस्थान हे रिसोड गावातील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. संत अमरदासबाबा हे रिसोड गावात वास्तव्यास असणारे योगी होते. अमरदासबाबा मंदिर हे त्यांचे पावन समाधी स्थळ आहे. मंदिराचा परिसर अतिशय रम्य असून तेथे गंगा माँ उद्यान सुद्धा आहे. मंदिराच्या कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिर परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. त्याचप्रमाणे मारूती व इतर देवी - देवतांची मंदिरे आहेत. महाशिवरात्री पर्वावर येथे मोठी जत्रा असते. या काळात गावाच्या आठवडी बाजाराचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येते.

कारंजा लाड

जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे महात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषीवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने 'कारंजा लाड' असा या गावाचा उल्लेख केला जातो. वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत. अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण दिले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो. किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी अगदि आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणी देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढ्यान्‌पिढ्या सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आज कारंज्यात अस्तित्वात असल्याचे बोलले जाते. मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील भुयारी वाटा मात्र पर्यटकांसाठी अजूनही शिल्लक आहेत.

नृसिंह सरस्वती

हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील हिंदू गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हेच नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असले पाहिजे हे प्रथम वासुदेवशास्त्री सरस्वतींनी शोधून काढले. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथे मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चेची शाश्वत व्यवस्थाही केली. आज हजारो दत्तोपासकांच्या नित्य-नैमित्तिक गर्दीने हे स्थान गाजते-जागते बनले आहे. या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्री करंजमाहात्म्य' नावाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचे नाव वसिष्ठ ऋषीचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषीशी निगडित आहे. कारंजे येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.

जैनांची काशी

कारंजा लाड गावातली जैन मंदिरे, शिक्षण संस्था तसेच आश्रमशाळा यामुळे या नगरिस 'जैनांची काशी' असेही संबोधले जाते. चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर (पद्मावती देवीचे मंदिर) मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर ही देहरासरे प्रसिद्ध आहेत. संमतभद्र महाराज यांनी १९१८ मध्ये स्थापन केलेला 'महावीर ब्रह्मचर्याश्रम' गरजु जैन विद्यार्थाना अनमोल ठरतो. संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४ मध्ये स्थापन झालेला 'कंकूबाई श्राविकाश्रम' म्हणजे जणू सावित्रीचा शिक्षण वसाच !

कारंजा एक ऐतिहासिक-सांस्कृतिक शहर

स्वराज्याच्या मोहिमेच्या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले लोकमान्य टिळक ९ जानेवारी १९१७ ला कारंजाला आले. कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांना कारावास भोगावा लागला.

१७ नोव्हेंबर १९३३ मध्ये गांधींजी आणि १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर कारंज्यात आले होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत जे.डी. चवरे विद्यामंदिरचे शिक्षक देवराव पासोबा काळे यांनी चौकात इंग्रज सरकारविरुद्ध भाषणे दिली. त्यामुळे त्यांना १३ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. त्याच शाळेचे विद्यार्थी अवधूत शिंदे व उत्तमराव डहाके यांनीही तुरुंगवास भोगावा लागल्याचे नमूद केले आहे. या चळवळीतील २० स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेला दगडी खांब स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. आता तो जेसिज गार्डनमध्ये हलवण्यात आला आहे.

कारखाने आणि इतर उद्योगधंदे चवरे कुटुंबियांची स्वयंचलित सूतगिरणी, बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेली कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी, रुईवालेंचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, प्रमोद चवरे आणि बागवान यांचा हॅन्डमेड कागदाचा कारखाना तालुक्याला उद्योजगतेकडे घेऊन जाते. नानासाहेब दहीहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ.शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.

शांता दहीहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या. कारंजामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा आहे.

अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर शिरपुर

जगप्रसिद्ध अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ति शिरपुर मधील पवईमंदिरात स्थापलेली आहे. काळ्या पाषाणाच्या या मूर्तिसंदर्भात बऱ्याच पौराणिक सांगितल्या जातात. कट्टर दिगंबरपंथी श्रीपाल यांनी पवई येथे या अधांतरी मूर्तिची स्थापना केल्याचा उल्लेख आढळतो. मुघल काळात विहीरीत लपविलेली ही मूर्ति ३ फुट ८ इंच ऊंच आणि २ फुट ८ इंच रुंद असून अर्धपद्मासन अवस्थेत विराजमान

पवईच्या भुयारात स्थापलेली आहे. बऱ्याच वर्षापासुन पंथ भेदाच्या भोवऱ्यात अडकलेली ही मूर्ति अत्यंत अतिशयसंपन्न आणि मनोवेधक आहे. या मूर्तिच्या शीर्षावर सप्तफणा असून ती डाव्या बाजूने फक्त एक बोटभर टेकलेली असून मागील भाग व इतर बाजूने पूर्णतः अधांतरी आहे. या मूर्तिच्या दर्शनासाठी भुयाराला एक झरोखा केलेला आहे. साऱ्या विश्वाचे व्याप विसरून वाटसरू पवईत काही काळ विसावतो आणि मुलनायकाच्या दर्शनाने प्रसन्न होतो.

पौराणिक नगरी अनसिंग

एक शिंगी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे या गावास अनसिंग असे नाव पडले. रामायणकालीन पौराणिक कथा असे सांगते की विभांडक यांचा मृग-पुत्र श्रृंगऋषी यांस एक शिंग होते ज्याला पिता विभांडक याने विश्वापासून दूर ठेऊन सर्व शिक्षण दिले. श्रृंगऋषी मुनींनी केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञामुळे राजा दशरथ यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी पुत्ररत्न प्राप्ती झाली असे मानले जाते. गावात श्रृंगऋषीचे मंदिर असून येथे मोठी यात्रा भरते. तसेच येथे पद्मप्रभु दिगंबर जैन मंदिर असून गाभाऱ्यातील प्राचीन मूर्ति, वेदी, शिखर मंदिरातील रेखीव काम मन प्रसन्न करते. वाशिम-पुसद मार्गावर स्थित हा गाव परिसरातील जवळपास चाळीस खेड्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आणि शिक्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. वाशिमहून गावाकडे मार्गक्रमण करताना कित्येकदा मनोहारी हरणांचे दर्शन होते.

आपण पूर्व आणि पश्चिम विदर्भाची. ईथल्या ऐतिहासिक वास्तुंची... तलावांची.. जंगलांची आणि मनःशांती देणाऱ्या मंदिरांची मोठ्या आनंदाने भटकंती केली. वऱ्हाडी ठेचा भाकरी, सावजी जेवण, पुरण पोळी, शेगाव कचोरी, कोथिंबीर वडी, पाटोडी असोत वा साधी बेसन खिचडी ईथल्या हवा पाण्यात आणि ईथल्या मातीत वरवरचा दिसणारा गोडवा फारसा नसला तरी ईथल्या माणसांची आंतरिक आपुलकी लोभसवाणीच!

लेखन आणि संकलन - तृप्ती अशोक काळे

नागपूर, संपर्क- ८२७५५२१२६३

 https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/93593f92693094d92d-92a93094d92f91f928-93593e93693f92e

 हे शहर पुराणकाळापासून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते. वाकाटक राजाच्या एका शाखेची राजधानी याच शहरात होती. सातवहनाचा कालखंड या शहराने अनुभवला. वाशीमपासून 20 किलोमीटर अंतरावर असणार्‍या शिरपूर येथील प्रख्यात पौळी मंदिराचे बांधकाम राष्ट्रकुट राजवटीत झाले होते.

वाशीम : आत्ताचे वाशीम म्हणजेच पुराणकालीन वत्सगुल्म नगरी सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, निजाम, भोसले यांच्या राजवटी या शहराने पाहिल्या. मात्र याच वाशीमच्या मातीत सम्राट अशोक कालीन बौद्ध स्तुपाचे अवशेष दडले आहेत. इतिहास संशोधक वि. भी. कोलते यांनी तसे पुरावेही सादर केले होते. 

वाशीम शहर पुराणकाळापासून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर होते. वाकाटक राजाच्या एका शाखेची राजधानी याच शहरात होती. सातवहनाचा कालखंड या शहराने अनुभवला. वाशीमपासून 20 किलोमीटर अंतरावर असणार्‍या शिरपूर येथील प्रख्यात पौळी मंदिराचे बांधकाम राष्ट्रकुट राजवटीत झाले होते.

वाशीम शहराच्या शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक या दरम्यान राठी कॉम्पलेक्सच्या मागे 2005 साली एका मोबाईल कंपनीने टॉवरचे बांधकाम करण्यासाठीच खोदकाम केले होते. खोदकामात पुरातन विटा, मूर्त्या व पुरातन बांधकामाचे अवशेष मिळाले होते. वाशीम येथील काही सजग नागरिकांनी हा सांस्कृतिक ठेवा जतन व्हावा यासाठी पाठपुरावा करून मोबाईल टॉवरचे काम बंद पाडले होते.

त्यानंतर नागपूर पुरातत्व विभागाचे तत्कालीने संचालक र. ना. हेगडे यांच्या नेतृत्त्वात 19 नोव्हेंबर 2005 साली शेतसर्व्हे नंबर 339 मध्ये चाचणी उत्खनन करण्यात आले. या उत्खननामध्ये उत्तर -दक्षिण लांबीची 11 थराची व सव्वा मीटर रुंदीची भींत आढळून आली होती. ही भींत एखाद्या मोठ्या वास्तूच्या परकोटाची असावी? असा कयास लावला जात होता. पुरातत्व विभागाने चाचणी उत्खननानंतर येथे पुन्हा कोणतेही उत्खनन केले नाही.

Image may contain: shoes, outdoor and nature

इतिहास तज्ञांच्या मतानुसार या उत्खननात निघालेले बांधकाम सातवहन किंवा वाकाटक कालीन असावे, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. वि. भी. कोलते यांनी उत्खननात निघालेल्या वस्तूंची पाहणी केली असता, हे अवशेष सम्राट अशोककालीन एखाद्या बौद्ध स्तुपाचे असण्याची शक्यता व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी एक निवेदनही प्रसिद्ध केले होते. परकोटाच्या संरक्षण भिंतीच्या आत सम्राट अशोककालीन स्तुप दडलेला असावा, कारण उत्तर ते दक्षिण या मार्गावर तत्कालीन वत्सगुल्म हे शहर प्रख्यात होते. त्यामुळे सम्राट अशोकाच्या काळात येथे बौद्ध स्तुपाची येथे उभारणी केली गेली असावी असा कयासही डॉ. वि. भी. कोलते यांनी काढला होता. 

सांस्कृतिक ठेवा उघडकीस येऊ शकतो
वाशीम ही पुरातन भूमी आहे. या भूमिमध्ये अर्वाचीन इतिहासाचे अवशेष दडलेले आहेत. वाशीम येथील चाचणी उत्खननानंतर पुरातत्व विभागाने आणखी उत्खनन करायला पाहिजे होते. आताही पुरातत्व विभागाने हे उत्खनन केले तर सम्राट अशोककालीन सांस्कृतिक ठेवा उघडकीस येऊ शकतो. हे उत्खनन झाले तर शहराच्याच नव्हे तर राज्याच्या इतिहासाला वेगळी कलाटणी मिळू शकते. 
-प्रा. रवी बाविस्कर, इतिहास संशोधक 

 

केशवाची एक प्राचीन मूर्ती: कुपटा (ता-मानोरा, जि- वाशिम)

वाशिम जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे शोधतांना मानोरा तालुक्यातील कुपटा या गावी जाणे झाले. ते फक्त येथील जलकुंड पाहण्याच्या निमित्ताने. कुपटा अगदी छोटासा गाव. तेथे पोहोचल्यावर लोकांना बारव किंवा जलकुंड गावामध्ये कोठे आहे असे विचारत आम्ही अगदी गल्लीबोळातून गावाच्या बाहेर असलेल्या एका हेमाडपंथी मंदिरापर्यंत पोचलो. यादव कालीन शिवाचे हे मंदिर आणि त्यासमोर एक विस्तीर्ण बारव दिसला. एवढा विस्तीर्ण बारव बघून मनात खरोखरच हिडन ट्रेझर मिळाल्याचा आनंद झाला.!! कारण बुलढाणा जिल्ह्या सारखी संपदा वाशिम जिल्ह्यात नाही याची खंत मनात होती. म्हणूनच एवढी मोठी बारव त्याला देवकोष्टके पाहून मनस्वी आनंद झाला. वाशीम येथील देवतलाव सोडल्यानंतर वाशीम जिल्ह्यात एवढा प्रचंड देव कोष्टके असणारा बारव सापडत नाही.!

शिव मंदिरासमोरील बारव
यादव कालीन शिव मंदिर

या बारवा शेजारी असलेलं यादवकालीन शिवाचा मंदिर दगडी बांधणीचं, मात्र आमच्या जीर्णोद्धाराच्या पद्धती- काय सांगावे..? मंदिराच्या आत दोन्ही बाजूने देव कोष्टके आहेत त्यात खंडित मूर्ती आहेत. एका देव कोष्टकात गरुडावर विराजमान विष्णू लक्ष्मी ची खंडित मूर्ती आहे.

खोलेश्वर मंदिराप्रमाणे मंदिराचा गाभारा थोडा सखोल आहे व त्यात शिवपिंड आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस वीरगळ ठेवलेली आहे. घोड्यावर बसलेला वीर योद्धा वीरगती प्राप्त झाला म्हणून त्याची पत्नी सती झाली.सती त्व दाखवणारा तिचा बागडे यांनी भरलेला हात. पूजनीय आहे म्हणून पूजन करताना दाखवलेली आकृती. आणि सर्वात वर चंद्र-सूर्य आकृती चंद्र-सूर्य असेतो किर्ती महान असल्याचे सिद्ध करतात.

शिव मंदिरा बाहेरील वीरगळ

गावामध्ये आणखी चौकशी केली असता केशव मंदिराची माहिती मिळाली. त्या रस्त्याने जात असताना वाटेतच एक पडका बुरुज दिसला. त्याच्या शेजारी जुन्या धाटणीचा एक वाडा दिसला. मग जे जुनं ते आमच्या नजरेत भरत हा आमचा गुण स्वभाव.! घरातून आजोबा आले आणि त्यांनी आम्हाला बोलावलं. मग वाड्या विषयी कुतूहल निर्माण झालं. मात्र आधी केशव मंदिर बघायचं म्हणून मंदिराकडे निघालो. थोडसं पुढे गेल्यावर डावीकडे वळून अतिशय पडक्या अवस्थेत एक लहान मंदिर उंच टेकडीवर दिसलं.

माझे सहकारी-विनोद भाऊ नाईकवाडे, हरणे सर, नायक सर

अतिशय ओबडधोबड दगडांनी रचलेली अस ते मंदिर उत्तर कालखंडात बांधलेलं असावं. मंदिराला सभामंडप नाही. एकच गर्भगृह. मात्र वेदीवर मूर्ती नव्हती. आजूबाजूला मुर्त्या होत्या. दोन देव कोष्टके होती. एक देव कोष्टक नष्ट झाले होते. तर डाव्या देव कोष्टकात नरसिंह लक्ष्मी ची गरुडावर आरूढ असलेली खंड झालेली मूर्ती दिसली. मूर्तीच्या रचनेवरून ते अप्रतिम असे शिल्प असावे. 

मंदिरातील नृसिंह लक्ष्मीचे गरुड भारुड शिल्प

बाजूला एक तसेच अप्रतिम गरुडावर आरूढ विष्णू लक्ष्मीची खंडित मूर्ती आहे. तसेच महिषासुरमर्दिनीची आणि भैरवाची मूर्ती आहे. 

गरुडावर आरूढ विष्णू लक्ष्मी
गरुडावर विराजमान विष्णू लक्ष्मी

महिषासुरमर्दिनी
महिषासुरमर्दिनी शिल्प

भैरव मूर्ती
भैरव शिल्प

या मंदिराची सर्वात विशेष बाब म्हणजे मंदिराचे छत. आजूबाजूला कुठेच न बघावं अशी त्याची रचना अप्रतिम.! दगडाचे गोल पट्टा उतरत्या क्रमाने होत जातात आणि मधोमध एका गोल दगडावर श्रीकृष्ण आणि गोपी यांचं सुंदर शिल्प कोरलेलं. ते पाहून तर मनात जो आनंद झाला तो खरच गगनात मावेनासा.

मंदिराच्या छताचे गोलाकार पट्टा व मध्ये मुरलीधर कृष्ण

हे मंदिर केशवाचे आहे मात्र यातील मुख्य वेदीवरील मुख्य मूर्ती लोकांनी गावात नवीन मंदिर बांधून तेथे स्थापन केली. जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही मूर्ती बघितली. या नवीन केशव मंदिरामध्ये प्राचीन केशव मूर्ती आणि त्या बाजूला इतर दोन मुर्त्या आहेत. त्यापैकी एक भैरव मुर्ती तर दुसरी महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. केशव मूर्ती ही काळ्या पाषाणात असून अतिशय सुबक आणि बारीक कलाकुसर त्यावर केलेली आहे. त्यावर विष्णूचे अवतार असून खालच्या बाजूस गोपी कोरलेल्या आहेत. वाशीम जिल्ह्यात वाशीम येथील बालाजी मंदिरातील मूर्ती तसेच वाशीम येथील गोंदेश्वर मंदिरातील मूर्ती प्रसिद्ध आहेत. मात्र या केशव मूर्तीकडे कुणाचे लक्ष नाही. त्यावरील कोरीव काम बघितल्यावर तिचे प्राचीनत्व आणि महत्त्व कळते. थोडक्यात मेहकरच्या बालाजी मूर्ती प्रमाणेच ती सुबक आणि सुरेख आहे. यावरुनच मूर्तीचा कालखंड शोधता येईल.

कृष्णाची मूळ मुर्ती

यानंतर आम्ही देशमुखांच्या वाड्याकडे निघालो. वाड्यात आजोबांशी आम्ही भरपूर गप्पा केल्या. काही मोडी कागदपत्रे त्यांनी दाखविली. त्यावरून असे लक्षात आले की हे घराणे ब्रिटिशकालात सारा वसुलीचे काम करत असेल. यांचे पूर्वज हे ब्रिटिश काळात ज्युरी चे सदस्य होते.

वाड्याची बांधणी बघितल्यावर आणि द्वारा वरील नक्षीकाम बघितल्यावर कारंजा येथील कांन्नव बंगल्याची आठवण झाली. दरवाजावरील नक्षीकाम हे कान्नव बंगल्याच्या एका दरवाज्याशी समानता दाखवणारे आहे.

देशमुख यांच्या वाड्याच्या द्वारा वरील नक्षीकाम

वाड्याच्या आत दगडी तळ घर आहे. त्याचा उपयोग धान्य साठवून ठेवण्यासाठी होत असे. वाड्याच्या आत उंच लाकडी खांबांवर सुबक नक्षी कोरलेली आहे.

एकूणच हे गाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील आमचं एक हेरिटेज साईट आहे. आर्किऑलॉजीशी संपर्क साधल्यावर समजले की हे मंदिर त्यांच्या साईटमध्ये नाही. तरी काय झाले, आम्ही वाशिम जिल्ह्यातील लोकांनी तरी याचा मान सन्मान आणि याचे महत्व टिकून ठेवायला पाहिजे.. तेव्हाच आम्ही म्हणू शकू की आमच्या जिल्ह्यालाही दिव्य इतिहास आहे.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

 

कारंजा येथील एका पुराण पुरुषाची भेट।।

करंजा येथील ब्रिटिश कालीन कान्नव बंगला

खरे तर मित्रांनो कारंजा जाण्याचे निमित्त म्हणजे जीवशास्त्राच्या पेपरचं व्हॅल्युएशन.!
नुकतेच बोर्डाचे पेपर संपले आणि पेपर तपासणीचा हंगाम सुरु झाला. प्रत्येकच  तत्त्वात इतिहास शोधणारी दृष्टी आम्हाला इतिहास दर्शन घडवतेच हे खरेच कारण आमच्या अंतरंगात इतिहास वावरतो.
विदर्भातील प्राचीन असं हे शहर इतिहासातून डोकावत कधी स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या  दिव्यतेने तर कधी शिवछत्रपतींच्या मोगल शहराच्या छाप्याने. याठिकाणी इंग्रज व फ्रेंच कंपनीच्या वखारी होत्या आणि विदर्भ तसे कापसासाठी प्रसिद्ध असे. शकुंतला एक्सप्रेसचा तो इतिहासात गडप झालेला रेल्वेमार्ग सुद्धा ब्रिटिशांनीच आपल्या व्यापारासाठी येथे आणला होता.
करंज ऋषींच्या नावाने वसलेले हे शहर प्राचीन मध्ययुगीन कालखंडात नावाजलेले होते.
नशीब माझे पेपरच्या निमित्ताने तरी मला ह्याचं ते ऐतिहासिक दर्शन घडलं. सुरुवातीपासूनच घरून निघतांना वाटलं होतं की पेपरचा काम झाल्यावर थोडं तरी इतिहासात जाऊन याव, आणि अगदी प्रवेश करतानाच मला  या शहराच्या  एका प्रमुख सरदाराची भेट व्हावी तशी मला मंगळवारी वेशीची भेट घडून आली.! तिचे विस्तीर्ण स्वरूप काळजात साठवून चौरे विद्यालय कडे निघालो. काम झाल्यावर निघालो ऐतिहासिक दर्शन घेत!

गावातील जुने वाडे
 

शहरात बरेच लहान-मोठे जुने वाडे बघावयास मिळतात. जुने विटांनी बांधलेलं बांधकाम आणि त्याचे नक्षीदार दरवाजे नजरेस पडले की थोडे थांबून बघावास वाटतं.
स्वामींच्या मंदिराचे दर्शन घेऊन असेच वाडे बघत मी पोहा निघालो वेशीकडे वाड्याबद्दल लोकांना विचारत विचारत. आणि कुणीतरी सांगितलं एका पुराण पुरुषाचे नाव. कान्नव यांचा वाडा!!

पोहा वेश 

पोहा वेशीला लागून अगदी जवळच विस्तीर्ण आणि सुरेख विटांच्या बांधणीचे राम मंदिर दिसले. मंदिर आणि आतील गाभार्‍याचं बांधकाम बघितलं की थोडाबहुत पातूरच्या बालाजीचे मंदिर आणि वाशीमच्या बालाजी मंदिराची आठवण येते. अर्थात कालखंड समान असावा.

राम मंदिर
मंदिराच्या आतील सभामंडप

मंदिरातील  पुजारी बुवांना  विचारले असता  समजले की, हे मंदिर या शहरातील कान्नव घराण्याने बांधलेले आहे. मंदिराच्या समोर एक महादेवाचे देऊळ असून त्याला लागूनच श्री तुकाराम कान्नव यांचे समाधी मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे अतिशय सुरेख नक्षिणे नटलेली आहेत.
ब्रिटिश कालखंडात कारंजा शहरांमध्ये कापसाचा मोठा व्यापार चालत असे. कान्नव या घराण्यातील श्री तुकाराम कान्नव पूर्वी निंबाळकर रियासतीत काम करत होते. तेथून व्यापाराच्या निमित्ताने ते कारंजाला स्थायिक झाले. त्यांनी व्यापारामध्ये मोठी उन्नती साधली आणि गावाच्या बाहेर वेशीच्या बाजूला हे राम मंदिर बांधले. त्या बाजूस त्यांची समाधीसुद्धा आहे.

मंदिरासमोरील महादेव मंदिर व कानव यांची समाधी

वेशीतून बाहेर पडल्यावर जवळच कान्नवांचा वंशपरंपरागत वाडा नजरेत भरतो. या वाड्याचे बांधकाम १८९९ मध्ये या घराण्यातील लोकांनी केले.

एका मोठ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वड्याचे विस्तीर्ण चित्र नजरेत भरते आणि त्याची ती ब्रिटिश कालखंडातील बांधणी पाहून मन थक्क होऊन जाते. मोठ्या लाकडी बांधकामात हा वाडा बांधला असून त्यावर प्रत्येक ठिकाणी अतिशय सुबक असे कोरीवकाम केलेले आहे ते पाहून कुणी म्हणावे की हे काम लाकडावर केलेले नसून संगमरवर दगडातील असावे तेवढे ते बारीक आणि सुबक असे आहे. बाहेरील लोकांना विचारपूस करत मी वाड्याच्या जवळ गेलो. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ मला भेटले.  त्यांचे नाव मधुकर कान्नव. आपलं कुतूहल दाखवत मी माझा परिचय दिला आणि ते मला आतील दालनात घेउन गेले.
ते सांगू लागले की पूर्वी आमच्या आजोबा व त्यांच्या वडिलांनी याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे आजोबा गोविंदराव, ज्यांना नाईक अशी पदवी मिळाली होती हे व्यापाराच्या निमित्ताने मुंबईत जात असत. तिथे त्यांनी ब्रिटिश वाडे बघितले. मोठ-मोठे हाऊसेस बघितले. तसेच डौलदार घर आपण कारंज्यात बांधावे असे त्यांनी ठरविले. या बांधकामासाठी त्यांनी मुंबईमध्ये असलेले पोर्तुगीज आर्किटेक्चर  आणले. पोर्तुगीज बांधणीची छाप या इमारतीवर पहायला मिळते. गोव्याची चर्च म्हणा किंवा मुंबईचे चर्च किंवा कोरलाईचा तो किल्ला, हे सर्व पाहिल्यावर आपल्याला पोर्तुगीच वास्तुशास्त्राची ठेवण या वाड्यामध्ये सुद्धा बघावयास मिळते हे विशेष!

मधुकर काका मला वाड्याची माहिती देत होते. ते म्हणाले, या वाड्याचा पाया खोदताना प्रचंड माती लागल्याने त्यामध्ये जस्त शिसे अशा धातूंचे मिश्रण ओतले गेले. शिवाय येथील वड्याच्या बांधकामासाठी लागणारे लाकूड हे बर्मा येथून बोलावले. आणि चुन्यामध्ये शंखशिंपल्यांचा, बेलफळ आणि मजबूती करिता तागाचा वापर केलेला आहे. भिंतीवर सुद्धा चुन्याचे बहुत प्रमाणात नक्षीकाम केलेले आढळते. ही नक्षी मुंबईतील ऑपेरा हाऊस व इतर ब्रिटिशकालीन जुन्या इमारती सारखी दिसते. शिवाय या इमारतीचं फ्लोरींग सुद्धा याच धर्तीवर बनवलेल आहे. दालनात असलेले साहीत्य, लाकडाचे कोरीव कपाट नजरेत भरतं. उंच आणि भव्य गोल कमानीचे दरवाजे म्हणजेच पोर्तुगीज वास्तुशिल्पाची विशेषता. इमारतीच्या छतावर सुद्धा चून्याने नक्षीकाम केलेले आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉलमध्ये त्याकाळातील चिनी मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू, कुंड्या, लाकडाचे फर्निचर बघावयास मिळते.


एवढेच काय तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असणारा जिनासुद्धा संपूर्णपणे लाकडाने बनवलेला असून आज एक 115 वर्षे झाल्यानंतरही तो मजबूत शाबूत आणि सुबक असा आहे.

कारंज्याचा बंगला श्रीलंकेत.?-
काण्णवांनी हा बंगला बांधल्यानंतर या बंगल्याची महती पार सातासमुद्रापार गेली. इंग्रज राजवटीत श्रीलंका व भारत हे दोन्ही देश असल्याने श्रीलंकन व्हाईसरायच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तत्कालीन वर्‍हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभार्‍यांनी ही बाब मुंबई प्रांताच्या गव्हर्रनरच्या कानी घातली. सरकारी सुत्र फिरली. काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले गेले. तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले. श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला काण्णवांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. ही आम्हा विदर्भ वासियांना मोठी अभिमानाची बाब आहे..!
असो,
अतिशय डौलदार अशा या विस्तीर्ण पुराण पुरुषाची भेट घेतल्यावर आपल्याच भूमीच किती कौतुक करावंसं वाटतं. आमचा विदर्भ हा केवळ कोळशाची खाण नसून हिऱ्याची खान आहे. सिंदखेड, लोणार, कारंजा, गाविलगड, नरनाळा, पातुर, बाळापुर, मेहकर, वाशिम, चंद्रपूर असे कितीतरी म्हणावे माणिक मोती रत्न या भूमीत आहेत. या हिंद भूमीच्या इतिहासात आमचे स्थान मानाचे आहे. या हिंदुभूमीला तिचा स्वाभिमान विदर्भाच्याच मातीने दिला. हीच आमची संस्कृती आणि हाच आमचा अभिमान !!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

 

गणपतीचा वाडा:शतकापूर्वीचा गणेशोत्सव- मैराळडोह



सन१६२२ मध्ये स्थापीलेले गणराय

मैराळडोह" अर्थात मैराळाच्या डोहांनी व्यापलेला एक सामान्य पण परंपरेस जिवापाड जपणारा जिंदादिल गाव!

परंपरा आणि गाव हे तस या भारतभूला संस्कार व संस्क्रुतीची मंगलमय मोहर प्राप्त करून देणार सूत्रच होय. सद्ध्या गणेशोत्सवात सर्वत्र बोलावणं येत ते श्रींच्या प्रसादाचे. मला व माझ्या मित्रांनाही मैराळडोह येथून असेच आमंत्रण आले तेव्हा निघालो.

वाटलं की, वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावात काय असेल.? काय असेल बरे या खेड्यात.?
पण सापडला, सापडला तो पिढ्यान् पिढ्या अखंड जपलेला एक दिव्य अनमोल संस्कार !!

पांडव उमरा येथून वाहून येणारी अडान नदी या गावाला स्पर्शून जाते. अनेक नाल्यांमुळे नदीस तुडूंब पाणी राहते. त्यावरच जवळ सोनल प्रकल्प बांधलेला आहे. वाशीम जिल्ह्याच्या लोकांना हा प्रकल्प मोठा जीवनदायी ठरला आहे. मैराळडोह हा तसा साधारणपणे ४००० लोकसंख्येचा गाव. जेथील शेती हा प्रमुख व्यवसाय. मात्र लोकांची शिक्षणाबाबतची आस्था मोठी लक्षणीय आहे. जेवढा भक्तीभाव लोकांच्या मनात नांदतो, तितकाच शिक्षणाबाबत कळवळा. गावात बहुतकरून धार्मीक वातावरण असून नाथनंगे महाराज, मुंगसाजी महाराज,वाघामाय व पाताळशेष महाराज यांची सुंदर देवालये आहेत. तसेच श्रीराम, हनुमान व महादेव आदि देवतांची देवालये सुद्धा आहेत.

मात्र या छोट्या गावात "गणपतीच्यावाड्यावर" जपला जातो हा दिव्य संस्कार !

येथील गणपतीबाप्पाची स्थापना चक्क मध्ययुगीन काळातील आहे.
सन १६२२ !!!

श्री दौलतराव घुगे हे या सुमारास चित्तोडाहून कुटूंबासह प्रवास करत मैराळडोह या गावी राहावयास आले व त्यांनीच या गणेश मुर्तीची स्थापना केली व आज या मूर्तीस व परंपरेस तब्बल ४३२ वर्षे झाली..! येथील पुंडलीकराव बहादूरराव घुगे व सुमित घुगे यांनी श्री दौलतरावांची संपूर्ण वंशावळ मला दाखवली व बरीच माहिती पुरवली.

गणपतीचा वाडा

येथील श्री गणेशमूर्ती ही साधारणपणे दोन फुट उंच असून निव्वळ मातीने बनलेली आहे.

प्लास्टरच्या या युगात मातीने बनलेली ही प्राचीन मूर्ती खरोखरच एक आश्चर्य आहे!
या गणपतीचे प्राचीनत्व व सिद्धीचा लौकीक एेकून भक्तगन दुरून दर्शनास येतात. काही आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस करतात. तर पंचक्रोशीतील बरेच राजकारणी आपल्या प्रचाराचा नारळ येथेच फोडून आशीर्वाद प्राप्त करतात.

 मिरवणुकीतील पूर्वीचा फोटो

पारंपारीकतेचेच पालन करत गणेशोत्सव व मंदिराचे कार्य पिढ्यान् पिढ्या अखंड चालत आले आहे. कोणतीही संस्था वगैरे हे काम बघत नसून प्रत्यक्ष गावकरी मोठ्या उत्साहात हे कार्य करतात. कोणत्याही प्रकारचे निधी संकलन वा शासन मदतीचा येथे अंर्तभाव नाही.

दरवर्षी गणेशोत्सवात मंदिरातील डाव्या बाजूस असलेल्या गाभाऱ्यातील ही श्रीगणेशमूर्ती काढून तीला रंग दिला जातो. संपूर्ण विधित अभिषेक केल्यावरच श्रीगणेशमूर्ती मंदिरातील उजव्या बाजूस असलेल्या गाभाऱ्यात मांडले जाते. मात्र एकदा श्रीगणेशमूर्ती स्थापना झाल्यावर पूनश्च तीला स्पर्श करणे वर्ज्य मानले जाते. या सुमारास ज्यांनी कुणी हा नियम मोडून मूर्तीस स्पर्श केला त्यांना गाभाऱ्यातून हलने शक्य झाले नाही असे लोक सांगतात.

तसे वर्षभर दररोज नियमीत आरती व सांजदिवाबत्ती असते. मात्र नागपंचमिपासून तर गणेशोत्सवापर्यंत मंदिरासमोर पोथीचे अखंड पारायण केले जाते. साधारणपणे श्रावणमास ते गणपती विसर्जनापर्यंत हे पारायण चालते. समाप्तीचे दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

महाप्रसाद हा तीन दिवस चालतो. सकल गावकरी प्रसाद निर्मीतीत मोठ्या निष्ठेने सहभाग घेतात. गावकरी लोक हे भावीक, सोज्वळ आणि मोठ्या उदार मनाचे आहेत. या उत्सवात ते शेजारील गावकऱ्यांना व शिक्षक-अधिकाऱ्यांना मोठ्या प्रेमाने आवर्जून आमंत्रण देतात. या महाभोजात बरेच लोक न चूकता येतात. यंदा मलाही असचं आमंत्रण आलं व त्यातूनच हे आश्चर्य मलाही कळलं.
असो, विसर्जनाचे दिवशी महाप्रसादाचे नंतर दुपारला या श्रीगणेशाची वाजत-गाजत मिरवणूक निघते. नदित दुसऱ्या लहान मूर्तीस विसर्जीत केले जाते व परंपरागत श्रीगणेशमूर्ती पूनश्च मंदिरातील गाभाऱ्यात स्थापिली जाते.

आज पाच पिढ्यानंतर दौलतराव घुगे यांच्या कुटूंबाचा विस्तार पस्तीस कुटूंबांमध्ये झाला असून ही सर्व कुटूंबे एकत्रीतपणे या उत्सवात एकदिलाने सहभाग घेतात.
श्रीगणेशमूर्तीची मातीची काया जणू सांगून जाते की, शरीर हे नष्वर आहे. आणि श्रीगणपतीचे विशाल उदर हे सांगून जाते की, साठवायच तर ज्ञान साठवा कारण सर्व काही नाशीवंत आहे !

ecofriendly गणेशमूर्ती स्थापन करा असे गेल्या काही दशकांपासून बोलले जाते. मात्र "गणपतीच्या वाड्यातील"  ही श्रीगणेशमूर्ती आम्हास गेल्या चार शतकांपासून निसर्गाशी मैत्री करायला सांगत आहे.

गणेशोत्सवात जिथे कोट्यावधि खर्च होतात तिथे अगदि साधेपणाने पैशाची उधळन न करता मुख्य हेतू जो सामाजिक एकोपा, मन:शांती आणि भक्तीतून मिळणारा खरा आनंद कसा साधेपणाने साधता येतो हे इथे आल्यावर कळते.

वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात अनेक गावांनी, तलावांनी, मंदिरांनी भर घातली. मात्र ४३२ वर्षांपासून अक्षय्य विराजमान दयानिधान श्रीगणेश म्हणजे आधुनिक युगात दौडणाऱ्या माणसास जीवनाचा साक्षात्कार !

पूर्वी ब्रिटीशांना भारतीय लोक फोडूनच आपले शासन अबाधित ठेवता येई. तेव्हा कुठेतरी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकोपा साधावा या हेतूने उत्सव साजरा केला. कदाचित त्यांच्याही अगोदर सार्वजनिक गणेशोत्सवाचं ते सामाजिक एकतेेचे कार्य अशा सामान्य गावातून झालं म्हणजे थोरच..!

ब्रिटीश गेले मग आता या एकोप्याची आम्हास गरज ना उरावी. पण उलट आता मानसा-मानसातील दुजाभाव व जातीय दुफळी पाहिल्यावर वाटते ते की आता खऱ्या अर्थाने या सार्वजनिक गणेशोत्सवातून बांधिलकी साधण्याची जिकरीची गरज भासत आहे. म्हणून मित्रांनो या कधितरी अनुभवा  "गणपतीचा वाडा" आणि त्याची सिद्धी व लोकांची निर्भेळ भक्ती, शुद्ध निष्ठा देवाप्रती व मानसाप्रती. कारण मानव व निसर्गाच्या निष्ठेतून साकार होते तिच खरी ईश्वरनिष्ठा..!

||फक्तइतिहास||
http://www.faktitihas.blogspot.in

 

शिरपूर चे दिव्यत्व- अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान।।


मंदिरातील एक स्तंभ त्यावर भक्तित तल्लीन झालेले भक्त

शिरपूर हे मालेगाव तालुक्यातील एक प्राचीन आणि दिव्य असे ठिकाण आहे.
शिरपूर चे प्राचीन नाव श्रीपुर असे पुराणांमधून आढळते. तर जैन, हिंदू, मुस्लिम धर्माच्या अनेक सिद्ध पुरुषांचे हे ठिकाण असल्याने याला सिद्धपूर असेही म्हणतात. यापैकी जैनांची पार्श्वनाथ भगवान मूर्ती आणि मंदिर यांचा इतिहास बघूया.

पवळी दिगंबर जैन मंदिर-





गावातील पोलिस स्टेशनच्या बाजूने असलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर दोन मंदिर दिसतात. सुरुवातीला एक लहान मंदिर असून त्याच आवारात पुढे सुरेख दगडी बांधकामाचे मंदिर दिसते. हेच भव्य मंदिर म्हणजे पवळी जैन मंदिर होय.
पवळी जैन मंदिर हे भव्य असून एक गर्भगृह आणि सभामंडप असे बनलेले आहे.
सभामंडपाला पूर्व उत्तर आणि दक्षिण असे तीन द्वार आहेत. यापैकी पूर्वेकडील द्वार प्रमुख असून त्याला पूर्वी एक मुखमंडप होता तो आज नष्ट झालेला आहे.
सभामंडपाच्या तिन्ही दगडी द्वारावर अतिशय सुबक नक्षी कोरलेली आहे. दार पाच द्वार शाखा याने बनलेले आहे.
शाखांच्या खाली द्वारपाल आहेत.
हे अगदी तसेच आहे जसे एखादे महादेवाचे यादवकालीन मंदिर असते.
द्वाराच्या वरील कोष्टकात श्री पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती कोरलेली आहे.
पूर्वेकडील मुख्य द्वाराच्या वरच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे पण आता तो अस्पष्ट झाला आहे. त्याचे वाचन झाले आहे-

मंदिराचा गर्भगृह बघितल्यावर लासुर आणि दैत्य सुदान मंदिराची आठवण येते.
मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर आतील खांबांवरील नक्षी अतिशय सुबक दिसते. आत भगवान महावीरांची अतिशय सुंदर मूर्ती आहे.

ज्या अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीसाठी हे मंदिर बांधले गेले आहे ती मूर्ती मात्र गावातील दुसऱ्या मंदिरांमध्ये तळघरात ठेवलेली आहे. मध्ययुगीन कालखंडात छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात सिंदखेडच्या जाधव घराण्यातील  स्त्रीला या गावाचा मुकासा मिळाला होता. पौळकर घराण्याकडे या  मंदिराची व्यवस्था लावलेली होती.

अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान मूर्तीचा इतिहास-

यासाठी थोडे रामायणा कडे वळावे लागते. खर आणि दूषण हे लंकेचा राजा रावण याचे सावत्र भाऊ होते. कारण खर हा पुष्पोत्कटा तर दूषण हा वाका पासून जन्मलेला ऋषी विश्रवा यांचा पुत्र होता. तर रावणाच्या मातेचे नाव कैकसी असे होते.
एकदा खर आणि दूषण हे विमानाने श्रीपुर वरून आकाशातून प्रवास करीत होते. तेव्हा आपली नित्य पूजा करण्यासाठी ते श्रीपुर  येथे उतरले. त्यांचे राजसेवक माली व सुमाली हे अनावधानाने पूजेची प्रतिमा आणायचे विसरले होते. सोबत ईश्वर प्रतिमा नसल्याने पूजेसाठी तिथे त्यांनी वाळू व शेण यांनी बनलेली ईश्वराची मूर्ती साकारली. पूजा समाप्तीनंतर ईश्वर प्रतिमेचे त्यांनी जवळच्या एका जलकुंडामध्ये विसर्जन केले. त्यानंतर कित्येक शतके ईश्वर मूर्ती पाण्यामध्ये अदृश्य बनून राहिली.

१६ व्या शतकात लक्ष्मण नामक एका कवीने ‘श्रीपुर पार्श्वनाथविनती’ या काव्य ग्रंथात  वरील घटनेचे  पद्यमय चित्रण केले आहे ते असे-

‘‘लंकानयरी रावण करे राज्य। चन्द्रनखा भगिनी भरतार।।१।।
खरदूषण विद्याधर धीर। जिनमुख अवलोकनव्रत धरे धीर।।२।।
वसंत मास आयो तिह काल। क्रीड़ा करन चाल्यो भूपाल।।३।।
लागी तृषा प्रतिमा नहिं संग। बालुतनू निर्मायो बिंब।।४।।
पूजि प्रतिमा जल लियो विश्राम। राख्यो बिंब कूपनि ठाम।।५।’’

चारुदत्त शिरपूर येथे ज्ञानार्जन करण्यासाठी आला होता. त्यानेही ही चारुदत्त चरित्रात याचे वर्णन केले आहे.
पोरण्योगा नंतरही प्राचीन काळात  निर्माण झालेल्या अनेक ग्रंथांमध्ये  ते शिरपूर व  पार्श्वनाथ भगवान यांचे वर्णन वाचावयास मिळते.
प्राकृत निर्वाण-काण्ड या  या जैन ग्रंथात  शिरपूर व  भगवान पार्श्वनाथ यांच्या वर्णनात  म्हटले आहे की -
‘पासं सिरपुरि वंदमि’ अर्थात् मी श्रीपुर येथील पार्श्वनाथ भगवान यांना वंदन करतो.
तसेच भट्टारक उदयकीर्ति कृत निर्वाण-भक्ति ग्रंथामध्ये म्हटले आहे की-‘अरु वंदउँ सिरपुरि पासणाहु। जो अंतरिक्ख थिउ णाणलाहु।’
अर्थात शिरपूर स्थित पार्श्वनाथ भगवान यांना वंदन करतो. जे अंतरिक्ष मध्ये विराजमान आहेत.( हवेत अधर आहेत)
एकूणच प्रस्तुत ग्रंथांमधील वर्णनात पार्श्वनाथ भगवान मूर्ती हवे मध्ये अधर असल्याचे वर्णन वाचावयास मिळते.
असो, या पौराणिक घटनेनंतर बराच काळ गेला. एक दिवस एलीचपूर (अचलपूर) चा राजा श्रीपाल या भागातून प्रवास करीत असताना श्रीपूर(शिरपूर) येथे थांबला. तहान लागल्याने त्याने आपल्या सैनिकांना पाणी शोधावयास सांगितले. तेव्हा जंगलामध्ये असलेल्या एका जलकुंडाचे पाणी त्यांनी श्रीपाल राजाला पाजले. राजाला व कुणालाच गतकाळातील दडलेले दिव्य रहस्य ठाऊक नव्हते, की खर आणि दूषण द्वारा निर्मिती पार्श्वनाथ भगवान मूर्ती या जलकुंडामध्ये विराजमान आहे!

राजा आपल्या छावणीकडे निघून गेला. त्याच्या राणीने त्याकडे आश्चर्याने पाहिले व म्हटले कि, आपण कुठले औषधे घेऊन आला ज्यामुळे आपला कोड नाहीसा झाला आहे..? राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण ज्या जल कुंडाचे पाणी प्यालो तो दिव्य आहे.

रात्री समयास राजा झोपलेला असताना त्याला स्वप्नांमध्ये जलकुंड आणि त्यामध्ये विराजमान मूर्ती दिसली व दृष्टांत मिळाला की ती मूर्ती त्याने स्वतः चालवत आपल्या राजधानीत न्यावी. मात्र कुठलीही शंका न धरता मागे वळून पाहू नये.

दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने तयारीनिशी काजल कुंडा कडे प्रस्थान केले व त्यातील मूर्ती आपल्या रथामध्ये विराजमान केली आणि तो स्वतः सारथी बनून राजधानीकडे चालू लागला. मात्र लगेच मनात शंका उत्पन्न झाल्याने त्याने मागे वळून पाहू नये तर तात्काळ पार्श्वनाथ भगवान मूर्ती हवेत तरंगू लागली व रथ पुढे निघून गेला.

तरंगलेली ही मूर्ती पुढे अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान म्हणून संबोधली गेली. म्हणतात ही मूर्ती हवेमध्ये इतकी उंच होती की त्या खालून एक घोडेस्वार सहज जाऊ शकत होता. असो चमत्काराने राजा आश्चर्यचकीत झाला व त्याने शेजारीच एक भव्य मंदिर निर्माण केले त्याला पवळी जैन मंदिर असे म्हटले जाते. मात्र पार्श्वनाथ भगवान मूर्ती मंदिरा बाहेरच तशीच स्थिर राहिली.

 पुढे गावांमध्ये संघ मंदिराची स्थापना करण्यात येऊन मूर्ती त्या ठिकाणी बसविण्यात आली. हे मंदिर गावामध्ये स्थित असून त्याच्या तळघरामध्ये प्रस्तुत भगवान पार्श्वनाथ मूर्ती ठेवलेली आहे. साधारणपणे पंचवीस वर्षापूर्वी मूर्ती खालून कपडा अलगत जात होता.

ब्रिटिश काळामध्ये १९०५ मध्ये श्वेतांबरी आणि दिगंबरी असा वाद उत्पन्न झाल्याने दिगंबरी व श्वेतांबरी यांनी मूर्तीच्या पूजेचे तास वाटून घेतले. १९२० मध्ये ब्रिटिश शासनातर्फे या मंदिराला  प्रोटेक्टेड मॉन्युमेंट घोषित करून पुरातत्व शाखेकडे सोपविण्यात आले.
मात्र अधिक वाद निर्माण झाल्याने तळ घराला कुलूप लावण्यात आले. प्रस्तुत पार्श्वनाथ भगवान मूर्ती आता शासनाच्या निगराणी मध्ये आहे व वाद कोर्टामध्ये सुरू आहे. मंदिरामध्ये असलेल्या एका छोट्या झरोक्यातून या मूर्तीचे दर्शन घेता येते.

खर आणि दूषण वध स्थळ-
छत्तीसगडमध्ये जांजगिर-चंपा जिल्ह्यातील एका जागेचे नाव खरौद असे आहे, ते हे प्रभू रामचंद्राने खर व भूषण या या दैत्यांचा तेथे वध केला म्हणून असे बोलले जाते.
खरौद सबरी तीर्थ शिवरीनारायण पासून 3 किमी तर राजधानी रायपुर पासून 120 किमी अंतरावर स्थित आहे. खरौद नगर मध्ये प्राचीन काळातील अनेक मंदिरे असल्याने त्याला छत्तीसगडची काशी सुद्धा म्हटले जाते. येथील लक्ष्मणेश्वर महादेव या प्राचीन मंदिराची स्थापना  प्रभू रामचंद्राने खर आणि दूषण यांच्या वधानंतर  लक्ष्मणाच्या सांगण्यावरून  केली  म्हणून या मंदिराला लक्ष्मणेश्वर मंदिर असे म्हटले जाते.
वायुपुराण तसेच रामचरित मानस यातील अरण्या कांड मध्ये खर आणि आणि भूषण यांच्या वधाची ही कथा वाचायला मिळते.
ज्यावेळी लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापतो त्यावेळी त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी प्रथम खर आणि पश्चात भूषण येतो. दोघांचं प्रभूरामचंद्रांनी भयंकर युद्ध होऊन त्यात दोन्ही दैत्य मारले जातात.
खर आणि दूषण यांच्या वधानंतर खर या दैत्याचा अकंपन नावाचा सैनिक आपले प्राण वाचवून लंकेश रावणाकडे पोहोचतो. रावणाला हात जोडून म्हणतो, हे लंकेश आकारण्यात दंडकारण्यात आपल्या जन्मा स्थानाजवळ राहणारे आपले दोन्ही बंधू खर आणि दूषण तसेच त्यांच्या या चौदा सहस्त्र सैनिकांचा वध झाला आहे. मी ही बातमी सांगण्यासाठी कसातरी आपले प्राण वाचवून आपल्याकडे धावत आलो आहे. अयोध्याचे राजकुमार श्रीराम यांनी संपूर्ण नित्य सेनेला यमसदनी पाठविले आहे. रावणाने विचारले की, त्‍यांना मारण्यासाठी देवतांनी रामाची मदत तर केली नाही ना..?
अकंपन म्हणाला, नाही श्रीरामाने देवांच्या मदतीशिवाय सर्व राक्षस वीरांना ठार मारले. हे ऐकून रावण आश्चर्यचकित झाला.

असो मूर्तीचे दिव्यत्व आज कुलूपबंद होऊन  छोट्या झरोक्या पुरते उरले म्हणजे मोठीच खेदाची बाब आहे.
देव, प्रकृती आणि मनुष्य या साखळीत आमचे कृत्य मोठेच लहान असे आहे.
शिरपूरचे दिव्यत्व येथेच संपले नसून दिव्य पुरुष संत जानगीर महाराज आणि अमानुल्ला शहा बाबा यांचा इतिहास अजून सांगायचा आहे, मात्र आता इथेच थांबूया.
 प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

 

किल्ले बाळापूर-वर्‍हाडातील शंभूराजांची जहागीर

मित्रांनो, मालेगावहून तासाभराच्या अन् अकोल्याहून अर्ध्यातासाच्या अंतरावर असलेले बाळापूर तसे सर्वांस परिचीत. पण मी अनुभवलेली ती किल्ले बाळापूरची ट्रेक-
मान आणि महिषी या दोन नद्यांच्या संगमावर अगदी मधोमध एका टेकडीवर बाळापूरचा पाण्याने वेढलेला बुलंद किल्ला दूरूनच काळजात धडकी भरवतो. किल्ल्याच्या शेजारीच बालादेवीचे प्राचीन देऊळ आहे. देवीच्या नावावरूनच गावाचे नाव बाळापूर पडले आहे.

हा किल्ला औरंगजेब बादशहाचा दुसरा शहाजादा आज्जमशहा याने सन १७२१ साली बांधायला सुरूवात केली होती. पुढे त्याचे बांधकाम इस्माईल खान या अचलपूरच्या नवाबाने सन १७५७ पूर्ण केले.

मित्रांनो, बाळापूरचा इतिहास शोधत असतांना मला आणखी काही महत्त्वाची गोष्टी आढळल्या. त्या अशा-

एक म्हणजे सन१६६५ साली ज्या वेळी औरंगजेब बादशहाने मिर्झाराजा जयसिंग यांना शिवाजी महाराजांवर मोहिम करायला दक्षिणेत पाठविले त्या सुमारास त्यांनी नदीच्या काठावर एक भव्य छत्री बांधली. ही छत्री २५फुट चौरस असून तब्बल ३३फुट उंच अशी मोठी भव्य दिव्य आहे.
एकदा मोठ्या पूराने छत्रीच्या पायास काही नुकसान झाले होते तेव्हा जयपूरहुन त्याच्या दुरूस्तीसाठी ३००० रू खर्च करण्यात आले होते.
दुसरी अतीमहत्वाची बाब म्हणजे पुरंदरच्या तहानंतर महाराज बाल संभाजीराजांसह आग्यास गेले. तेथून सुटून आल्यावर त्यांनी सन १६६७ साली बादशहाशी नमते धोरण ठेऊन तह केला होता. या तहानुसार बादशहाने संभाजीराजांस सात हजारी मनसब बहाल केली होती.(सभासद७३)
या मनसबीच्या सैन्य खर्चासाठी संभाजीराजांना वऱ्हाड व खानदेशात मिळून पंधरा लाख होनांची जहागीर दिली होती. वऱ्हाडातील तो परगणा म्हणजेच आपले बाळापूर होय.!!!
यावेळी संभाजीराजांचे वय १० वर्षे होते. प्रतापराव गुजर, मकाजी आनंदराव, निराजी रावजी, रावजी सोमनाथ व लष्कर घेऊन संभाजीराजे शहाजाद्याकडे औरंगाबादेस राहत. संभाजीराजे आपल्या जहागीरीचा कारभार या सहकाऱ्यांच्या मदतीने बघत. कधी ते बाळापूर आदि जहागीरीकडे आलेही असतील. पण वय लहान असल्याने बहुतेक कारभार मुतालिक म्हणून रावजी सोमनाथ व निराजी बघत असल्याने संभवत नाही. शिवाय इतिहासात बाळापूर भेटीची नोंद नाही. असो, पण कधिकाळी बाळापूर हा शंभूराजांच्या जहागीरीचा भाग होता याचे समाधान अन् अभिमान सार्थ आहे.!!

आता किल्ल्याविषयी बोलू-
दोन नद्यांच्या मधोमध असलेल्या या बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून जागोजाग बुलंद आणि उंच बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केलेली आहे.
त्याला कारण म्हणजे तत्कालिन इतिहासातील त्याचे भौगोलिक स्थान. हा किल्ला अकोला -जळगाव या प्रमुख मार्गावर वसलेला आहे. तत्कालिन मोगल खानदेशची राजधानी बुऱ्हाणपूर व वऱ्हाड सुभ्यास जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर बाळापूर वसलेले आहे. तसेच बुलडाना,नरनाळा सरकार, वाशीम सरकार व अकोला सरकार यांना जोडणारे हे मोगलकालीन शहर होते.
(सरकार अर्थात मोगलकालिन जिल्हा)

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे.
थोडक्यात उत्तर-पश्चिम-उत्तर अशी या दरवाज्यांची मांडणी आहे.
तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या पंचायत समिती वगैरे काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.
तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या तटबंदीची रूंदी तीन मीटर एवढी भरते.

पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.
या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. पण तरी त्याच्या दुरूस्तीसाचे योग येत नाही.
असो, शिवछत्रपतिंच्या थोर राजनितीचा, शंभूराजांच्या जहागीरीचा व मिर्झाराजा जयसिंगाच्या दक्षिणेतील कारकीर्दीचा हा साक्षिदार नामशेष व्हावयाच्या आत त्याचे बुलंद रूप आपल्या नजरेच्या कवडश्यात साठवून ठेवा..!

||फक्तइतिहास||

पहिले उत्तर द्वार

दुसरे पश्चिम द्वार
तिसरे उत्तर द्वार

जेव्हा थडगं बोलू लागतं...

वाकाटकांची राजधानी "वत्सगुल्म अर्थात आपलं वाशीम शहर, मध्ययुगात "सरकार वाशीम म्हणून असलेल जिल्ह्याच ठीकाण ब्रिटीश कालातही जिल्ह्याचच ठीकाण होत ते त्याच्या उत्तम भौगोलिक स्थानामुळे.
पुराणातून अन् आजही उरलेल्या एेतिहासिक अवशेशातून ही नगरी नेहमीच बोलण्याच्या प्रतिक्षेत असते. येथील देवळ अन् प्राचीन तलावच काय तर प्रत्यक्ष कबरीही बोलू लागतात तेव्हा खरेच भूत-काल अवतरतो.
मित्रहो, असेच वाशीमहून काम आटोपून निघालो होतो. आयुडिपी परिसरातून short cut मारून सरळ तहसिल गाठाव अस वाटलं अन् निघालो. भर उन्हात त्या निर्जन एकाकी रस्त्याने एकटी-दुकटी छोटी घरे आणि सारी शेतेच नजरेस दिसत होती. पण एवढ्यातच एक जीर्ण व ध्वस्थावस्थेत असलेल कब्रस्थान नजरेत भरल. प्राचीन दगडाच्या भिंतीने ते अगदी जूनाट दिसत होतं. मग जे जे जूनाट, ते ते मनात भरून जात. दगडी फाड्यांचे ब्रिटीश बांधनीचे त्याचे प्रवेशद्वार भग्नावस्थेत होत. आत प्रवेश केल्यावर अस वाटल जस या थडग्यांना माझीच प्रतीक्षा होती.!
मोठ्या कुतूहलाने एक-एक थडग न्याहाळत त्यावरील मजकूर मी वाचत होतो. पण तेथील भयाण शांततेने व सर्र वाहनाऱ्या वाऱ्याने मी दचकून जात होतो. अस वाटत होतं कुणी मागे तर नाही ??? शिवाय मजकूरही मोठे विस्मयकारी वाटू लागले,,,,
मृत्यू जीवनाच अंतीम..""

तरी कुतूहल आणि जिज्ञासेने पायास धरून ठेवलं होत.
असे काही थडगी अभ्यासल्यावर समजल की येथील काही थडगी सन १८०० मधिल होत्या. अर्थात ब्रिटीश कालातील. एक थडगं ब्रिटीश कालातील सार्जंटच होत. काही अंतरावरील दुसर थडग पाहून तर मोठच आश्चर्यच वाटल. कारण ते बोलक होत. ते होत ब्रिटीश काळातील वाशीम जिल्ह्याच्या ब्रिटीश SP चे !

सव्वाशे वर्षे लोटली तरी ते थडग मृत नव्हत, कारण ते सांगत होत त्याची कहानी. अर्थात ते चांगल्या अवस्थेत असून त्या थडग्यावरील कोरलेला मजकूर वाचल्यावर समजल की, हा पोलीस अधिकारी ब्रिटीशकालीन वाशीम जिल्ह्याचा SP, Even Robert Christian होता. तो एकदा वाघाच्या शिकारीसाठी पांढूरण्याच्या जंगलात गेला. तेथे त्याची अचानक वाघाशी झडप झाली. त्यात तो गंभीर जख्मी झाला. मात्र वाशीमला परत आल्यावर झालेल्या जखमेने काही दिवसातच तो मरणपावला. त्याच्या वऱ्हाडातील कुण्या मित्राने त्याच हे थडगं बनवल होत. त्याच्या चारी बाजूस असा मजकूर आहे-

डाव्या बाजूस-
In memory of Even Robert Christian superintendent of Police. Basim District.

खालच्या बाजूस-
Who died at Basim on 18th April 1879.

उजव्या बाजूस-
From wounds inflicted by a tiger in the Pandhurne K Jungle aged 43 years.

वरील बाजूस-
Erected by his friends in Berar

असा हा मजकूर या ब्रिटीश SP च्या कबरीवर कोरलेला आजही बघावयास मिळतो.

आपल्या सर्राट धावनाऱ्या आयुष्यात थोड थांबून पाहील की पूर्ण विरामाच स्थान समजत. विविध थडग्यात विसावलेली व्यक्ती भूतकालात कुणीही असोत, आज मात्र एका रांगेमध्ये, काट्यांच्या बागेत पहुडलेले पाहिले की आयुष्याचा सार समजतो. जणू थडगी आम्हास सांगू इच्छितात की, 

समुद्र बनुन काय फायदा, बनायच तर तळे बना, जिथे वाघ पण पाणी पितो, तो पण मान झुकवुन ! कितीही कमवा, पण कधी गर्व करू नका" कारण, बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर 'राजा' आणि 'शिपाई' शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात..असेच...!         

म्हणूनच थडगीही बोलू लागतात...पण ऐकणार कुणीतरी हवं...नाही...?

||फक्तइतिहास||

 

अज्ञातवासातील बार्शी टाकळी येथील कालिंका देवी मंदिर-

काही महिन्यांपूर्वी अकोल्याला जाणे झाले तेव्हा पुनश्च एकदा असद गडावरून इतिहासाची वाटचाल सुरू झाली आणि मग बार्शी टाकली जाण्याची इच्छा झाली.
बार्शी टाकळी येथील कालिका देवी मंदिर हे अतिशय प्राचीन असे सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. हे मंदिर गर्भगृह अंतराळ सभामंडप युक्त असे आहे. या मंदिराची बांधणी सुरेख असून त्याच्या कलशाचा भाग नष्ट झाला आहे. मात्र तत्कालीन शिल्पकलेचा तो एक आजोड आणि अप्रतिम नमुना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमीप्रमाणे गाभाऱ्याच्या
समोर नसून सभामंडपाच्या बाजूस काटकोनात आहे. ते गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस आहे. सभामंडप साधारणत चौकोनी असून गाभारा हा चांदणीच्या आकाराचा आहे.

अप्रतिम नक्षीदार स्तंभ

सभामंडपास चार प्रमुख नक्षीदार खांबांचा आधार आहे. त्यावर देवदेवतांच्या आकृती कोरलेल्या आहेत. मंदिरा वरील विविध देवतांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यामध्ये प्रमुख महाकाली महिषासुरमर्दिनीच्या आहेत.
मंदिराच्या भिंती नक्षीदार असून त्यावर विविध आकृत्या कोरलेल्या अनेक स्तरांनी युक्त आहेत.

गर्भगृह व सभामंडप यांच्या बाहेरील एका पट्टीत देवादिकांची शिल्पे आहेत. काही मिथुन शिल्पेही आहेत.
मंदिराच्या भिंतीवर एक लांबलचक संस्कृत भाषेतील शिलालेख आढळतो. मात्र तो बऱ्याच प्रमाणात नष्ट झालेला आहे. तरी त्यावरील तारीख गुरुवार वैशाख शुक्ल ७, दुर्मुख संवत्सर शके १०९८ अशी, म्हणजे ७ एप्रिल ११७७ अशी आहे.(महाराष्ट्र व गोवे शिलालेख)
हा लेख संस्कृत व नागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. या शिलालेखाप्रमाणे टेक्कली येथून यादवांचा एक मांडलिक राजा राज्य करीत होता. दंतुराज हा या राजवंशाचा मूळपुरुष तर लेख घेताना हेमाद्रीदेव हा राजा शाशन करीत होता.
हिमाद्रीदेवाने आपल्या राजधानीवर चालून आलेल्या मालुगीपुत्र राजल याचा पराभव केल्याचा उल्लेख शिलालेखात केलेला आहे.
या राजाने आपल्या सत्कृत्यांनी राजधानी टेक्कलीस वाराणसीचे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे असा उल्लेख त्यात केला आहे.
लेखांमध्ये पुढे वंशपरंपरेने मंत्रीपद भोगत असलेल्या भिल्लम या वल्लभ गोत्रीय मंत्र्याची वंशावळ दिलेली आहे. या घराण्यातील गामियाय या व्यक्तीने टेक्कलीस विष्णूचे मंदिर बांधले तसेच लोककल्याणासाठी विहिरी व तलाव बांधल्याचा उल्लेख केलेला आहे.
असो, प्रस्तुत मंदिरातील कालिंका मातेची मूर्ती काही दूर अंतरावर असलेल्या खोलेश्वर शिव मंदिरांमध्ये स्थापन केलेली आहे.

 खोलेश्वर मंदिरात स्थापन केलेली कालिंका मूर्ती

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यादवांचा सेनापती खोलेश्वर याचा हा प्रशासकीय भाग असावा कारण बार्शीटाकळी तसेच अकोला व इतरही भागामध्ये खोलेश्वर या नावाने शिव मंदिरे बांधलेली आहेत.

काही दूर अंतरावर असलेले खोलेश्वर मंदिर

आता प्रश्न येतो तो बार्शी टाकळी येथील हिंदू प्रजेचा घट व मुस्लिम संख्येची वाढ. त्यास मला असे कारण वाटते की बहामनीच्या कालखंडांमध्ये हा मुलुख कुण्यातरी मुस्लिम सरदाराकडे असावा. बहामनी राजवटीचा अभ्यास करताना त्यामध्ये हसन बार्शी असं एका मुस्लिम सरदाराचा नाव आढळत. बहुतेक हसन बार्शी या सरदाराकडे व्यवस्थेसाठी हा मुलुख असावा. त्याने येथे आपली जहागीर वाढविली व टेक्कली या गावास बार्शी टाकली असे नाव प्राप्त झाले असावे असे वाटते. अर्थात अभ्यास सुरू आहे, ज्ञान असीम आहे!
असो, असे हे अप्रतिम कलेचे दिव्य स्थान आज बार्शीटाकळी गावाच्या बाहेर बाजूस एकाकी अवस्थेत पडलेले आहे. यादवकाळातील  टेक्कळीचे सुवर्णयुग आता राहिले नसले तरी नंदादीपाप्रमाणे या मंदिराचे तेच आजही शाश्वत आहे. शासनातर्फे त्याच्या पुनर्निर्माणाचे कार्य बहुतेक अर्धवट राहिल्याचे दिसते, काम थांबले असावे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील विशेष म्हणजे विदर्भातील महाकालीचे हे मंदिर हा कलेचा अजोड नमुना आजही सामान्यांच्या दृष्टीपासून फार दूर आहे.
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

-शौर्यशंभुचा शिलेदार

 

राजुरा: स्त्रीशक्तीचा शौर्य स्तंभ'



बऱ्याच वर्षांपासून राजूरा या गावाविषयी अनेक लोककथा कानावर येत होत्या. येथील बुरूजबंदी वाडा, प्राचीन देवळं आणि लोकमुखातून पिढ्यान् पिढ्या बोलली जाणारी एक शौर्यकथा. मग जे जे जुनं ते ते कुतूहल अन् जिज्ञासा निर्माण करते. आणि मनास वेध लागतात ते इतिहासाचे.!

मग गेलो मित्रांसह राजूरा गावच्या स्मृती पटलावरचा इतिहास जिवंत करण्यासाठी, तो अनूभवन्यासाठी !

शुक्रवारी अगदि पहाटेच मित्रांसह राजूरा गावात पोचलो. (३०/९/२०१६)

राजूरा येथील ७६ वर्षांचे वयोवृद्ध किर्तनकार श्री नामदेव विठोबा गोरे यांनी गावाच्या चालीरीती व ऐतिहासीक घटनांबद्दल बरीच माहिती दिली.

मध्ययुगीन कालखंडात राजूरा येथील राजूरकरांचे जवळच्या बऱ्याच मुलूखात वर्चस्व होते. आपल्या भागावर सत्ता गाजवने व बाहेर मुलूखात मुलूखगीरी अर्थात हल्ला करून संपत्ती गोळा करणे असा हा तत्कालिन कार्यक्रम. आपल्या शक्तीच्या जोरावर राजूरकरांनी पिढ्यान् पिढ्या आपले वर्चस्व अबाधित ठेवले. त्यांच्याकडे सोळा गावच्या पाटिलक्या होत्या असे लोक सांगतात.
सन १८०० मध्ये राजुरकरांच्या घराण्यांतील बाजीराव, उत्तमराव, त्रिंबकराव, धारराव, नारायणराव, रूस्तुमराव व बहादूरराव या बंधूंचे गावात व शेजारील भागात बरेच वर्चस्व होते.

रामराव राजुरकर

तो काळ होता ब्रिटिश सत्तेचा, स्वातंत्र्यापूर्वीचा.
चांदनी चतारी या गावात एक दरोडा पडला. त्याच्या संशयाहून तत्कालिन ब्रिटिश शासनाने रावसाहेब मंडळींना वाशीम येथे बोलावले. शिंदेशाही पगड्या व बुलंद पेहराव धारण करून घोड्यावरून मोठ्या थाटात ते वाशीमला गेले. वाशीम हे ब्रिटिश शासनाचे जिल्ह्याचे ठीकाण. रावसाहेब मंडळींचा थाट पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना ब्रिटिश शासनात सामावून वेग-वेगळ्या अधिकारपदावर नियुक्त केले. एक मात्र बोलले जाते, की त्या दरोड्यातून रावसाहेब मंडळींना पाच किलोग्राम वजनाची सोन्याची मूर्ती मिळाली होती. पण आज तीचे अस्तीत्वाबाबत कुणालाच काहीही ठावूक नाही. तसे कुणी सांगेलही कसे.? पण मानसाच्या जिज्ञासेची कमाल, ती ठीक-ठीकाणच्या खड्ड्यांमधून बघावयास मिळाली.
असो,

पुढिल पिढित विश्वासराव, दिनकरराव, रामराव, रूस्तुमराव, बाबाराव(त्रिविक्रमराव), जगदिशराव हे सुद्धा आपले वर्चस्व टिकवून होते.

यातील दिनकरराव हे अकोला जनपथचे अध्यक्ष होते. राजूरकरांचा ब्रिटिश सत्तेशी बराच सलोखा निर्माण झाला होता.

नवरात्री हे स्त्री शक्तीचे प्रतिक. राजुरकर घराण्यांतील धाडसी स्त्रीयांनी दाखवलेल्या शौर्याचे प्रतिक म्हणून नवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होई. राजुरकर मंडळी गावात मोठ्या मेजवानीचे आयोजन करीत. दसऱ्याचे आदल्या दिवशी गावाबाहेर वीरांगनांच्या शिळास्तंभास नैवेद्य दाखवला जातो. दसऱ्याचे दिवशी ग्रामभोज ठेवला जाई. ब्रिटिश सत्तेत नवालेल्या या मंडळींचा मोठा थाट असे. गोरगरीबांनी तर म्हणच पाडीली की-

ना पावा देव पण पावा राजूरचा राव ।।

बाबाराव राजूरकर हे एक पट्टीचे शिकारी होते. दोन लांब नळ्यांच्या त्यांच्या बंदूकिने जंगलातील बऱ्याच वाघांची शिकार केल्याचे किस्से लोक सांगतात. ब्रिटिश सरकारने यांना "रावबहादूर" पदवीने नवाजले होते.

बुरूजबंदी वाड्याचे अवशेष

गावातून माहिती गोळा करत आम्ही मग गेलो त्या बुरूजबंदी वाड्याकडे. राजुरकरांच्या घराण्यांतील श्री अजीत राजुरकर यांनी आपल्या पूर्वजांच्या बुरूजबंदी वाड्या बद्दल बरीच माहिती दिली. कधिकाळी ज्या बुरूजबंदी वाड्याने सत्ता गाजवली त्याचे आज मात्र अवशेष उरले आहेत. बुरूजावर आज एक प्राचीन विहिर आहे. बुरूजावरील बहूतांश भाग ढासळला आहे. या बुरूजबंदी वाड्याच्या पायथ्याशी समोरील भागात जमिनीवर एक विस्तीर्ण वाडा होता. तोही आज पडक्या अवस्थेत आहे. एक- दोन दालना शिवाय फक्त भिंतीच उरल्या आहेत. त्यातील दिवानखाना नावाची एक इमारत ध्वस्त पण बऱ्यापैकी शाबूत आहे. त्याच्या दरवाजे व खिडक्यांच्या बांधणीवरून ब्रिटिश कालाची जाणीव होते.
मागील २५ वर्षांपूर्वी या वाड्यात शाळाही भरत असे. पण आज केवळ पाऊलखूनाच उरल्या. गावाच्या बाजूस राजूरकरांची वंशपरंपरागत स्मशानभूमि आहे.

श्री अजीत राजुरकर

श्री अजीत राजुरकर यांच्या सोबत आम्ही त्या स्मशानभूमिकडे निघालो. एक लोखंडी गेट ओलांडून आम्ही आवारात दाखल झालो. त्यांच्या पूर्वजांनी बांधलेले महादेवाचे एक प्राचीन देवालय तेथे दिसले. त्याची बांधनी दगड -विटांची असून चून्याचा वापर केलेला आहे. मात्र सालाचा अंदाज लावता ते १७०० च्या उत्तरार्धातील असावे असे वाटते.

पूर्वजांच्या समाध्या

पण आवारात असलेल्या पूर्वजांच्या समाध्या ह्या त्यावरील सालावरून अतिप्राचीन असल्याचे वाटते. स्त्रीयांच्या समाध्या व पुरूषांच्या समाध्या ह्या दोन वेगळ्या रांगांमध्ये बांधलेल्या आहेत.
सन १२९९ असे साल व्यक्तिच्या नावाच्या वर कोरलेले आढळते. याचा अर्थ ह्या समाध्या सन १२०० मधिल आहेत असे अनुमान चूक ठरते. कारण त्या शतकात इंग्रजी सन वापरला जात नसे. तसे इंग्रजांचा प्रवेश भारतात १५ व्या शतकात झाला. मग समाधिवरील हे साल कदाचीत सुहूर सन असेल. त्या कालात दक्षिणेत फारसी सुहूर सन वापरला जाई. सुहूर सनात ६०० मिळवले असता आजचे इंग्रजी सन निघते. याप्रमाणे १२९९+६००= १८९९ हे मृत्युचे साल निघते. अर्थात सन १८०० मधिल काही व्यक्तिंच्या या समाध्या होत.

समाधिचे बांधकाम शंभर वर्षांपूर्वीचे असावे. कारण ते चून्याचे असून शाबूत आहे. अर्थात या घराण्यांतील कुणीतरी व्यक्तिने १०० वर्षांपूर्वी या समाध्या बांधल्या असाव्या.

शिवमंदिर व शिलालेख

श्री गणेशभाऊ मोहळे यांनी गावाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या दोन देवळांबद्दल सांगितले. तेव्हा आम्ही सर्व ते बघावयास गेलो. या दोन्ही देवळांबद्दल स्थानिक लोकांना फार काही माहित नाही. त्यातील एक शिवमंदिर होते. कारण देवळात शिवलिंग होते. तसेच बाहेरील भिंतीवर एक शिलालेख कोरवलेला होता. आता यावरून काहीतरी माहिती नक्कीच हाती लागेल असे मला वाटले. एक विटीने तो घासून पाहिल्यावर समजलं, की तो संस्कृतमध्ये असून शके १८१० मध्ये या देवळाचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्यात आहे.

देवी मंदिर

शेजारील दुसरे देऊळ ज्यातील मूर्ती बाहेर ठेवलेली होती. ते देवीचे होते. मात्र फार वर्षांपूर्वी असलेली मूर्ती भग्न झाली असावी. कारण देवळाच्या पायथ्याशी देवीचा फक्त दगडी मुखवटा दिसला. अर्थात शिव-पार्वतीचे हे दोन देवालये आहेत.

हे सर्व बघत असताना मात्र त्या स्त्रीयांच्या शौर्यकथेबद्दल जिज्ञासा वाढत होती. त्या रणभूमिवर त्यांच्या रक्ताने लाल झालेल्या त्या मातीस स्पर्श करण्याची उत्कट इच्छा मनात दाटत होती. आणि निघालो, राजूऱ्याहून ब्राह्मणवाडा ते गांगलवाडीच्या दिशेने. गाडी रस्त्यावरून तर मन इतिहासात धाव घेत होते.
दोन स्त्रीयांनी केलेल्या एका देदिप्यमान जंगाची ती कहानी, जी रोमांच खडे करणारी ती दृष्टिपुढे तरळू लागली-
मुलूखगीरीच्या कालात १५० वर्षांपूर्वी वा कदाचीत जास्तच. एक दिवस राजुरकरांच्या घरची पुरूष मंडळी बाहेर निघून गेल्याची बातमी मिळताच कोठूनतरी काही लोक जमून राजुरकरांच्या बुरूजबंदी वाड्यावर चालून गेले. दरोडा टाकून त्यांच्या संपत्तीची लूट करावी या हेतूने ती हत्यारबंद टोळी गावात शिरली. मात्र या समयास बुरूजबंदी वाड्यावर राहणाऱ्या दोन तरूण धाडसी स्त्रीयांनी मनाशी एक प्रण करून रावसाहेबांचा पुरूष वेश धारन करून लढण्याचा निर्धार केला. हातात तलवार धारण करून त्या घोड्यावरून सवार होऊन दौडत निघाल्या. त्यांना पुरूष समजून आक्रमकांनी पलायन केले. सर्व आक्रमकांना हूसकावून लावल्यानंतर पिंपळवाडीजवळ जंगलात त्या थांबल्या.
सर्व आक्रमक गेल्याचे पाहून त्या बोलू लागल्या...

"दरोडेखोर पळून गेले, आता आपण परत जावे. घरी आपली मुलं रडत असतील.. " मात्र त्यांना काय ठावूक की आक्रमकांपैकी एक बाजूच्या झाडीत लपून बसलेला होता. बहूदा त्याच्या पायास जखम झाल्याने तो झाडीत आश्रयास दडून बसला होता. मात्र या दोन घोडेस्वारांच्या संभाषनातून त्या पुरूष नसून चक्क स्त्रीयाच असल्याचे झाडीतील त्या दरोडेखोरास पक्के समजले. त्याने झाडीतून आडमार्गाने जाऊन कसेतरी आपल्या टोळीस गाठले व ते दोन घोडेस्वार स्त्रीयाच असल्याचे वर्तमान विदीत केले. आता मात्र चवताळून या टोळीने परत फिरून घोडेस्वारांकडे धाव घेतली. त्यांना पाहून घोडेस्वारही हत्यार चालवून गेले. आणि काही क्षणांत आक्रमकांच्या टोळीने त्यांना घेरले. प्राणांतीक जंग करत त्या शूरांगनांनी लढने सोडले नाही. मात्र थोड्याच अवधित टोळीवाल्यांच्या शस्त्रांनी त्यांच्या शरीरास रक्तांकीत केले. एखाद्या बुलंद योद्ध्यास लाजवेल असेच रणशौर्य गाजवून अखेर दोन्ही स्वार घोड्यावरून पडले.!

शक्तिस्तंभ'

या वीरांगनांच्या शौर्याची याद देणारे राजूरकरांनी उभारलेले ते स्मृतिस्तंभ आजही खडे आहेत. आणि आता आम्हीसुद्धा तेथे पोचलो होतो.
गांगलवाडीच्या समोर काही अंतरावर एक वळण लागते. येथून पिंपळवाडीस व राजूरा गावात जाता येते. येथून राजूरा गावाचे अंतर फक्त ३ किलोमीटरच भरते. अर्थात याच रस्त्याने त्या स्त्री घोडेस्वार आल्या होत्या. आणि याच वळणावर ते शौर्यस्तंभ आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देत खडे आहेत. आजही या रणभूमिवर त्यांच्या शौर्यस्मृति दृष्टिपुढे खड्या राहतात...तेव्हा दिसू लागतात मर्दानी वेशातील त्या दोन स्वार.... हातात तेग धरून घोड्यावरून दौडणाऱ्या त्या साक्षात महिषासूरमर्दिनीच वाटू लागतात..... घेराव टाकनाऱ्या हत्यारबंद टोळीवाल्यांच्या किलकाऱ्या.... गर्दितून तलवार चालवनाऱ्या वीरांगना.... त्यांच्या देहातून सांडणारे ओजस्वी रक्त....भूमिवर पडणारे ते ज्वलंत रक्तथेंब.... आणि शेवटी रणभूमिवर निवांत पहुडलेले त्यांचे देह व आसमंताकडे निर्वीकारपणे बघनाऱ्या त्यांच्या नजरा बोलून जातात की हे मरण नव्हे...!
हे तर अमरण होय.!

राजुरकरांच्या पिढ्यांनी तो सन्मान दसऱ्याचे रूपात अखंड जपला. या शक्तिस्तंभावर महिला व घोड्याची आकॄती कोरलेली आजही बघावयास मिळते. आणि येथील लाल माती रणरागीनींच्या धाडसी रक्ताची याद देते तेव्हा मनातले भाव शब्दबनून ओठांमधून बाहेर पडतात-

विजयेन लाभते लक्ष्मी।
मॄत्यूनापि शूरांगना।।
क्षण विध्वंसीनी काया।
चिंता का ती मरणे रणे।।

खरेच, मरण हे शरीरास येते. शौर्य तर अमर आहे. आणि बलिदानातूनच सिद्ध होतो लौकीक साहस अन् शौर्याचा.....!!!

खरेच, काळाच्या ओघात जिथे बुरूजबंदी सत्ता जमिनदोस्त होतात आणि संपत्तीचे कारंजे आटून जातात. तिथे दिव्य कर्म अखंड उरतात, जिथे आजही मानसे मानाने सॅल्यूट देतात.!!

वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील ४००० लोकसंख्येच्या या सामान्य गावाकडे पाहिलं की कुणालाच न वाटाव की किती गुपितं अन् किती कथा आपल्या अंर्तमनात सांभाळून हा आजही कसा साधेपणाने मानसाच्या वर्दळीकडे बघतोय. माणसाच्या पिढ्या अन् मनाच्या घड्या पाहिलेला हा साक्षिदार बोलू पाहतोय त्याची कहानी.! मातीचे ढिगारे अन् दगडावरचे नक्षिकाम हिच त्याची जूबानी...!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर,मालेगाव

 

 

माझे शहर-मंगरूळपीर

जननि जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि।’

हे संस्कृत वाक्य किती विचाररपूर्वक निर्माण झाले असेल, नाही? आपली आई असो वा आपले गाव/शहर असो प्रत्येकाला यांची एक वेगळीच ओढ असते. ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्याप्रमाणेच आपले मन अापल्या गावाभोवती फिरत राहते. प्रत्येक शहराच्या दृष्टीने तेथील माणसे, घरे यांप्रमाणे निसर्ग, जीवसृष्टी महत्त्वाची असते.

माझ्या शहराचे नाव आहे मंगरूळपीर. महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक. ‘मंगलपूर’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘मंगरूळ’ हे नाव तयार झाल्याचे सांगितले जाते. या शहराच्या नावाला ‘पीर’ हा शब्द लागण्याचे कारण म्हणजे येथील सुप्रसिद्ध पीराचा दर्गा. या शहरातील विविधधर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत.

मला येथील सर्वात  जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे दरवर्षी होणारी जत्रा. ही जत्रा दहा दिवस चालते. या जत्रेत मोठमोठाले पाळणे, विविध वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थांचे गाडे असतात. टुरिंग टॉकीजेस तसेच खेळांची दुकानेदेखील असतात. सर्कशीसारख्या थरारक गोष्टी असतात. प्रत्येकाने एकदातरी ही जत्रा अनुभवावी असे मला वाटते.

IMG_20171219_135256

हे शहर एक आध्यात्मिक भूमी आहे. या शहरातील पीराचा दर्गा हा सुफी संत दादा हयात कलंदर यांचा आहे. जगात जे तीन कलंदर होऊन गेले त्यांपैकी हे एक. विंध्य ओलांडून येणारी ही पहिली मुस्लीम व्यक्ती. खुद्द औरंगजेबाने या दर्ग्याला देणगी दिल्याची नोंद आहे.हा दर्गा म्हणजे अतिशय सुंदर व प्रेक्षणीय  स्थळ आहे. तसेच या शहरात ब्रिटिशांच्या काळात श्री बिरबलनाथ महाराज हे संतपुरूष होऊन गेले. त्यांनी येथे नाथ संप्रदायाचा प्रसार केला. येथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. शहराच्या मध्यभागी त्यांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्यावरील श्रध्देपोटी शहराला ‘मंगरूळनाथ’ असेही म्हटले जाते. येथे दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जत्रा आयोजित केली जाते. या आध्यात्मिक स्थळांना भेट दिल्यावर आपल्याला एका वेगळ्याच उर्जेचा अनुभव येतो.

शहरामध्ये एक मोठा तलाव आहे जो पावसाळ्यामध्ये पाहणार्‍यांचे लक्ष वेधून घेतो. शहराच्या आतील भागात दाट लोकवस्ती असली तरी शहराच्या आजूबाजूंनी अनेक झाडे आहेत. शहराचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनेक मोकळी मैदाने आहेत. ही मोकळी मैदाने म्हणजे मुलांचे सर्वात आवडीची ठिकाणे. कारण इथेच मुलांचा शारीरिक विकास होतो. असे हे माझे शहर नक्कीच भेट देण्यासारखे आहे.

 

— मंदार कुळकर्णी

वाशीम : भारत आणि श्रीलंका तसे दोन स्वतंत्र देश, प्रशासन व्यवस्थाही स्वतंत्रच मात्र, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला वर्हाडातील कारंज्यात हे ऐकूण कुणालाही आश्चर्य वाटेल.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील काण्णव यांचा बंगला चक्क श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. नव्हे तर, श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांचा बंगला काण्णवांच्या बंगल्याची प्रतिकृती आहे. इंग्रजांनी काण्णवांनी बांधलेला बंगला पाहून इथलेच कारागीर श्रीलंकेत नेले. आणि तेथेही असाच बंगला उभा राहिला. श्रीलंकन व्हाईसरायचे असलेले निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे ते शासकीय निवासस्थान ठरले.
Image may contain: sky, tree and outdoor
वर्हाड तशी सोन्याची कुर्हाड म्हणून ओळखले जाते. संपन्नतेचा वारसा लाभलेले वर्हाड त्यात कारंजा हे वैभव इतिहासात आहे. विदर्भामध्ये वाडे खूप आहेत. कारंज्यातील काण्णवांचा मात्र ‘बंगलाच’ आहे. 121 वर्षांपूर्वी सोने 17 रुपये तोळा होते. त्यावेळी हा बंगला साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. आत्ताचा सोन्याचा भाव आणि रुपयांची किंमत याची तुलना केली तर, आज या बंगल्याची काय कॉस्ट असती, याचा विचार करा. ती या बंगल्याची किंमत झाली. ही श्रीमंती लौकीकाच्या पातळीवर संपन्नता सांगायची तर या बंगल्यात संपन्नता मोजता येणार नाही.
कारंजा येथील कृष्णाजी काण्णव व्यापाराच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायायचे. तेथील ब्रिटीश व पोर्तुगीज स्थापत्य कलेच्या वास्तू पाहून ते प्रभावीत झाले. कृष्णाजींनी मग कारंज्यातही पोर्तुगीज शैलीतील बंगला बांधण्यास सुरुवात केली. 1899 साली सुरुवात केलेला हा बंगला 1903 सालापर्यंत तयार झाला. या बंगल्याच्या पाया खोदताना काळी माती असल्याने प्रत्येक आठ फुटांवर सहा इंचाचा शिसाचा थर टाकण्यात आला. त्याकाळी ब्रम्हदेशातील सागवानाचे लाकूड बांधकामासाठी सर्वोत्कृष्ट समजले जायायचे.
वाशीम जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
इंग्लडच्या महारानीचा दिवानखाणा याच लाकडांनी सजला आहे. या बंगल्याचे खांब एकसंघ बर्माटिकवूडचे आहेत. राजस्थानी कारागिरांनी बारीक नक्षी कोरून त्याला चार चांद लावले आहेत. बंगल्याचे विटा चुण्याचे बांधकाम काठेवाडी कारागिरांनी केले आहे. रंगरंगोटी मुंबई येथील प्रख्यात विठोबा पेंटर यांनी केल्याचा उल्लेख आहे. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे आहे. समोरचे दोन्ही नक्षीदार स्तंभ कित्येक टन वजन असलेल्या ओतीव बिडाचे आहेत.
Image may contain: outdoor
फसरबंदी त्याकाळात दुर्मीळ असलेल्या इटालियन मार्बलचे आहे. इटालियन मार्बल वापरणारे त्या काळातील काण्णव हे एकमेव ग्रहस्थ होते. वास्तूच्या मधोमध दोन्ही दालनांना लागून 30 बाय 30 चौरस फुटाचा चौक आहे. दुसर्या माळ्यावर 50 बाय 40 फुटांचा दिवाणखाना आहे. ही भौतिक श्रीमंती पाहिल्यानंतर हा बंगला पाहणार्यांशी बोलू लागतो. या बंगल्याची कलौकीक संपन्नता डोळे दिपवणारी आहे. दिवाणखान्यातील प्रसन्नता रोमारोमांत भिनली जाते. या दिवाणखान्यात कधीकाळी लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर बसले होते. याच दिवाणखान्यात कधी सतारीचे स्वर दरवळले. कुणाचा षड्ज ऐकू आला तर कधी बालगंधर्वाचे नाट्यपद निनादून गेले. मास्टर दिनानाथांचा मालकंस रुनझुनला, बालगंधर्व, भाटेबुवा, शिरगोपीकर यांच्या खास मैफीली याच बंगल्यात रंगल्या. हिराबाई बडोदेकर, पंडित नारायण व्यास, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मनोहर बर्वे, केशवराव भोळे, पंडित दिनानाथ मंगेशकर यांचे स्वरही या दिवाणखान्याने अनुभवले.
लता मंगेशकरांची बाळपावले याच बंगल्यात दुडदुडली. दिनानाथ मंगेशकर यांची कंपनी कारंज्यात आली असताना काण्णवांकडे गाण्याची मैफल झाली. लहानगी लता दिनानाथांचे बोट धरून बंगलाभर फिरली. आणि थकून झोपी गेली. किर्तन महोत्सवामध्ये घोंगडेबुवा महाराज, कराडकर, कोल्हटकर, पाठक, हिरवळकर, आयाचीतकर, निजामपूरकर, भालेराव, कुळकर्णीबुवा इत्यादी प्रसिद्ध किर्तनकारांची किर्तने या बंगल्याच झाली. केशवराव भोळ्यांसारखा मराठी संगीतातील तालेवार गायकांची मैफलही इथे सजली. प्रत्येक मैफीलीनंतर काण्णवांकडे वर्हाडी परंपरेनुसार पुरणपोळ्यांची पंगत असायची. एकदा केशवराव भोळ्यांसाठी मसाल्याची आमटी (सार) बनविली. केशवरावांना ती एवढी आवडली की ते चक्क दहा वाट्या आमटी प्यायले. परिणामी, घसा खराब होऊन रात्रीची मैफल रद्द करावी लागल्याचा उल्लेख खुद्द केशवरावांनी एका दिवाळी अंकात केला होता. या बंगल्याच्या आधी काण्णवांच्या पूर्वजांनी 28 एप्रिल 1876 रोजी कारंजा येथे राममंदिर बांधल्याची नोंद आहे.
आत्ता वळू श्रीलंकेकडे
कृष्णाजी काण्णव यांनी हा बंगला बांधला तेव्हा तो काळ इंग्रज आमदणीचा होता. त्यात कारंजा पुरातन काळापासून मोठी व्यापारी पेठ म्हणून ओळखले जात होते. शिवाजी महाराजांनी गुजरातेतील सुरत हे शहर लुटले होते. हे त्या शहराची श्रीमंती अधोरेखीत करण्यासाठी सांगितले जाते. मात्र, महाराजांनी मोगलांचे महत्त्वाचे व्यापारी ठाणे असलेले कारंजा देखील दोनवेळा लुटल्याची ऐतिहासीक नोंद आहे. या शहराची गरिमा संपन्न आहे. वर्हाडातील कापसाची उलाढाल कारंज्यातून होते. ब्रम्हदेश, चीन, श्रीलंका, आखाती देश ते पार इंग्लंडपर्यंत कारंज्यातील कापूस जात होता. या व्यापारातून अनेक व्यापारी शहरात आले. मूळचे फलटणचे असलेले काण्णव देखील कापसाच्या व्यापारासाठी कारंजात आले. आणि इथल्या मातीत रमले.

कृष्णराव काण्णवांनी हा बंगला बांधल्यानंतर या बंगल्याची महती पार सातासमुद्रापार गेली. इंग्रज राजवटीत श्रीलंका व भारत हे दोन्ही देश असल्याने श्रीलंकन व्हाईसरायच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी तत्कालीन वर्हाड प्रांताच्या इंग्रजांच्या कारभार्यांनी ही बाब मुंबई प्रांताच्या गव्हर्रनरच्या कानी घातली. सरकारी सुत्र फिरली. काण्णवांच्या बंगल्याचे बांधकाम करणारे कारागीर जहाजाने तत्कालीन सिलोनला नेले गेले. तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. व्हाईसराय हाऊस म्हणून ओळखले जाणारे हे निवासस्थान श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष सिरीमाओ भंडारनायके यांचे शासकीय निवासस्थान झाले


 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...