लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी भाग -१
छायाचित्राखाली तिरप्या अक्षरात दिलेली माहिती ही त्या छायाचित्राचा भाग आहे असे समजावे.
चालुक्यकालीन
खांबाच्या अचूक टर्निंगबद्दल मला नेहमी अचंबा वाटतो. त्या काळात लेथसदृस्य
काहीतरी असावे जेणे करुन एवढ्या कॉनसेंट्रीसिटीमधे हे खांब तयार करता येत
असावेत. मधे कुठेतरी इजिप्तच्या मोठ्या शिळा, ज्या पिरॅमिडमधे वापरतात त्या
अचूक सपाट कशा करतात यावर व्हिडिओ पाहिला होता. त्यात एक शिळा दुसर्या
शिळेवर घासून दोन्ही शिळा अचूक सपाट करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले
होते. तसेच काहीतरी येथे असेल. किंवा असावे अशी माझी फार इच्छा आहे. यावरील
नक्षिकाम तर अप्रतीम आहेच पण खालच्या बाजूला जी वर्तुळे आहेत ती कशी केली
असावीत ?
मित्राने नवीन सिआझ घेतली आणि कुठेतरी लांब जायचे ठरले, गंडीकोटा व बेलमच्या गुहा प्रथम ठरल्या होत्या नंतर त्यात जवळ बघण्यासारखे म्हणून ताडपत्रीची दोन देवळे घेतली. एका मित्राने लाकुंडी पाहिले नव्हते म्हणून जाताना लाकुंडी बघण्याचे ठरविले पण नंतर त्यात हंपीचे दोन दिवस व बदामीचा परिसरही बघून झाला. यातील मी लकुंडी, हंपी व बदामी अगोदरच पाहिले होते व त्यावर लेख लिहून येथे प्रकाशीत केला होता. पण भारतातील कुठलीही विशेषत: दक्षिणेकडील देवळे मी कितीही वेळा बघू शकतो आणि दरवेळी मला ती पाहताना नवीन काहीतरी गवसते. मी अचंबीत होतो. शिवाय आमच्या मित्रांनी ती देवळे पाहिली नव्हती हेही एक महत्वाचे कारण होतेच.
दिवस १
तारखांचा त्रास निवृत्त माणसांना विशेष होत नसल्यामुळे तारखांना फाटा दिला
आहे. शिवाय आमची ही सहल फक्त निघायचे या बोलीवर ठरली होती. पूर्वी पैसे
संपले की सहल संपवायची असे लोक करीत पण आता क्रेडीट कार्डांच्या जमान्यात
पैसे संपायची भितीही उरली नाही. म्हणून एकमेकांचा चेहरा बघण्याचा कंटाळा
आला की परत फिरायचे अशी अट आम्ही स्वत:ला घालून घेतली. आता आम्ही तिघे गेली
५० वर्षे मित्र आहोत त्यामुळे आपापसातील अनेक भांडणे आम्ही यशस्वीरित्या
रिचविली असल्यामुळे त्याची विशेष काळजी नव्हती. शिवाय ही पेल्यातील
वादळे...एका पेल्यात उसळतात आणि दुसऱ्या पेल्यात शांत होतात. अर्थात याचे
श्रेय माझ्यापेक्षा माझ्या मित्रांनाच जाते हे प्रामाणिकपणे मान्य केलेच
पाहिजे. असो.
हीच ती गदग शिल्पकला. पहिले शिल्प हे तेथील संग्रहालयाच्या दरवाजात आहे. संग्रहालय नीट ठेवले आहे पण फोटो काढण्यास परवानगी नाही. दुसर्या छायाचित्रातील बारीक कलाकुसर बघण्यासारखी आहे. जरा लांबून तर खूपच कोरीव नक्षिकाम वाटते. तिसर्या फोटोत खांबाची चकाकी बघण्यासारखी आहे. गुळगुळीतपणा तर हात लावल्यावरच कळेल. पण हे काम मात्र हातानेच केले असावे. त्यासाठी राळ व रेशमाचे कापड वापरले जात असे काही जणांचे म्हणणे आहे.
सकाळी बरोबर सहा वाजता नवा कोऱ्या सिआझला चावी लावली. पहिला मुक्काम गदगला करायचा असं ठरले होते. गदगला साधारणत: दुपारी जर पोहोचलो तर संध्याकाळच्या उन्हात देवळे पहाण्याचा व छायाचित्रणाचा कार्यक्रम करायचा व रात्री परत गदगला येऊन मुक्काम करायचा असे ठरले. गदगपासून हॉस्पेटकडे जाताना १२ किमीवर लाकुंडी/लकुंडी नावाचे गाव लागते. (15°23′23″N 75°43′06″E) मुख्य रस्त्यावर दोनतीन छोटी उपहारगृह आहेत. अगदी वेळ पडल्यास येथे खायलाही मिळू शकते. पण गदगवरुन काहीतरी खाऊन किंवा घेऊन येणे सगळ्यात उत्तम.
या ठिकाणी डावीकडे वळले की लाकुंडीच्या पन्नासएक देवळांकडे व १०० एक कुंडांकडे जाता येते. गाडी पार आतपर्यंत जाते. हे वळण सापडणे अवघड असले तरी कर्नाटक पर्यटन खात्याने एक अत्युत्तम सोय केली आहे ती म्हणजे सर्व मुख्य रस्त्यांवर पिवळ्या रंगाची पाटी दिसली की थांबायचे. त्या पाटीवर त्या पाटी जवळपासची सर्व देवळांची यादी, दिशा व अंतरे दिलेली असतात. जसे जसे आपण दाखविलेल्या रस्त्यावरुन जातो तशा तशा या पाट्या आपली सोबत करतात.

या
पाट्यांची अत्यंत मदत होते. खरे तर कर्नाटकमधे इतकी सुंदर देवळे आहेत की
कोठेही रस्त्यात ही पाटी दिसली की थांबावे आणि वेळ असल्यास या पाटीवर
लिहिलेली देवळे बिनधास्त पहावीत. कारण बरीच देवळे विशेष प्रसिद्ध नसतात
त्यामुळे माहितही नसतात.
नशीबाने या पाट्या परदेशी पर्यटकांना उपयोगी पडाव्यात म्हणून इंग्रजीमधेही लिहिलेल्या आहे. इतर पाट्या मात्र कटाक्षाने कानडीमधेच लिहिल्या आहेत. मला कर्नाटक कितीही आवडत असले तरी त्यांचा हा अतिरेकी भाषावाद मुळीच आवडत नाही. भाषा हे एक संवादाचे साधन असल्यावर त्याला नसती इतर दुराग्रहाची ठिगळं कशाला लावावीत या मताचा मी आहे. तामिळनाडूतही तेच पहायला मिळते. भाषा आणि त्याची अस्मिता यासारखा ढोंगीपणा जगात नसेल. अर्थात राजकारणी पुढार्यांनी याचा फायदा अचूक उचलला आहेच. संवाद साधणे हेच भाषेचे काम आहे हे मान्य केल्यावर खरेतर प्रश्र्नच उरत नाही. येताना बेळगावातील अनेक दुकानांवर मराठीत पाट्या वाचल्यावर हे अजूनच पटते. (अर्थात बेळगावच्या मराठी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रात येण्याचा आपला हट्ट सोडून द्यावा. येथे आलात तर येथील राजकारणी अगोदर तुम्हाला विकतील मग तुमच्या जमिनी ... पूर्वीचा महाराष्ट आता राहिला नाही.)
जैन बासडी येथील देऊळ. याच्या खालीच वस्तूसंग्रहालय आहे. त्यातील काही शिल्पांची छायाचित्र खाली देत आहे.
कोणा तिर्थंकराची ही मूर्ती. इस्लामी धर्मीयांनी, इतर धर्म व त्यांचे विचार मान्य नाहीत म्हणून त्यांच्या मूर्तीं/प्रतिके तोडली कारण त्यांच्याकडे या सगळ्याचा विचाराने प्रतिवाद करण्यास ना वेळ होता ना धाडस. अर्थात या मूर्ती भंजकांना नावे ठेवण्यात तसा अर्थ नाही. त्यांनाही इतर धर्मियांचा / विरुद्ध विचारांचा फार राग येत असे.
बासडीजवळच असलेले देऊळ व त्याच्यावरील सगळ्यात खालच्या थरावरील नक्षिकाम. जसा आपल्या कडे गजथर किंवा कमळाचा थर असतो व त्यावर देऊळ उभे आहे आभास उत्पन्न केला जातो तसे मला वाटते हे देऊळ नागाच्या फण्यावर उभे आहे असे शिल्पकाराला दाखवायचे असावे. हा माझा विचार आहे. मला स्वतःला याची खात्री नाही.
लाकुंडी/लकुंडीच्या देवळांचा काळ म्हणजे चालूक्य, कल्याणीचे कलाचूरी, सेऊण व होयसळांचा काळ. चालुक्यांनी नवव्या शतकात राष्ट्रकुटांकडून सत्ता हस्तगत केली व कल्याणीला त्यांची राजधानी स्थापन केली. अर्थात त्याचा आता काही मागमुस उरला नाही. पण त्याची माहिती काही शिलालेखातून मिळते. आज जी देवळे बघण्यास मिळतात ती चालुक्यांचच्या काळातील आहेत असे मानले जाते. (मला ते विशेष मान्य नाही कारण नंतरही काही बांधली गेली असणार) मुख्य म्हणजे लाकुंडीमधे जैन देवळेही आहेत. त्या काळातील प्रथेप्रमाणे सर्व भारतीय धर्मांना राजांचा उदार आश्रय असायचा आणि मुख्य म्हणजे लढाया झाल्या तरी या देवळांना कोणी हात लावत नसे. त्यामुळे या सर्व राजांच्या शिल्पकारांनी आपापली शिल्पकला जतन केली त्याचे प्रतिबींब आपल्याला या देवळांमधे पहाण्यास मिळते. भारतातील इतर देवळांपेक्षा वेगळी अशी येथील शिल्पकलेला ‘‘गदग शिल्पकला’’ असे नाव देण्यास हरकत नाही.
गदग शिल्पकलेचे काही नमुने. डोळ्याचे पारणे फेडणारी ही शिल्पकला मरण्याआधी पहायलाच हवी.
स्वातंत्र्य काळात ज्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी संशोधन केले त्यात जे. बर्गेस यांचे नाव आदराने घेतले पाहिजे. देशातील अनेक शिलालेखांचा अभ्यास या माणसाने केला, त्याचे वाचन केल व त्यांचा अर्थ लावला. लाकुंडीमधे अनेक कोरलेले लेख आहेत. सगळ्यात जुना आहे १००७ सालचा. तर सगळ्यात अलिकडचा आहे तेराव्या शतकातील. पहिला आहे तो जैन बासडीतील एका लादीवर, ज्यात राजाच्या गुर्जर प्रदेश जिंकून घेतला त्याबद्दल देवळाला देणगी (जमीन) दिल्याचा उल्लेख आहे. त्यात वाजी घराण्याच्या एका ढल्ला नावाच्या प्रमुखाच्या मुलाच्या म्हणजे नागदेवाची पत्नी अत्तियब्बीने व तिच्या मुलाने पडवेल्ला म्हणजे सेनापती तालिआने ही देणगी दिल्याचा उल्लेख सापडतो. मी थोड्याफार लेखांचे फोटो काढले पण तसा प्रकार कंटाळवाणा असल्यामुळे येथे टाकलेले नाहीत. अभ्यासकांनी इंटरनेटवर शोधावेत त्यांना तेथे सापडतीलच. काशीविश्र्वेश्र्वराच्या देवळावर असलेल्या एका लेखात कलाचुरी राजा सिंघणाचा उल्लेख आढळतो व १२२३ ( सध्याच्या कालगणणेत रुपांतर केले आहे) हे सालही आढळते.
यातील बऱ्याच लेखात लकुंडीचे नाव लोक्की-गुंडी असे लिहिलेले आढळते. तेच त्याचे खरे नाव असावे.मी पूर्वी लाकुंडीची छायाचित्रे टाकली होती पण परत टाकण्याचा मोह आवरत नाही. पण यावेळी घेतलेलीच आत्ता टाकली आहेत.
जी देवळे महत्वाची आहेत व पाहिलीच पाहिजेत अशा देवळांची छायाचित्र टाकली आहेत. लाकुंडी खरे बघायचे असेल तर कमीतकमी चार दिवस पाहिजेत.
संध्याकाळी देवळे पाहून झाल्यावर गदगला परतलो. एवढे ड्रायविंग केल्यावर
दमछाक झाली होती व आता श्रमपरिहाराची निकड तिघांनाही वाटू लागली होती.
गदगला पोहोचल्यावर ताजेतवाने होत हॉटेलमधील (नाव आठवत नाही) रेस्तराँमधे
प्रवेश केला.... उद्या ताडपत्रीला जायचे होते पण मधेच हंपीत घुसलो...ते
पुढच्या भागात. त्या आधी काशीविश्र्वेश्र्वराच्या देवळावरील रामायणाच्या
कथा सांगणार्या काही शिल्पांची छायाचित्रे आपण पाहणार आहोत.
इतके सुंदर कोरीवकाम करणारे कलाकार जेव्हा शिलालेख लिहितात तेव्हा त्यांचे अक्षर बहुदा दुसरीतल्या मुलांसारखे असते. असे का होत असावे ?
त्याविरुद्ध सर्व चिनी शिलालेख कटाक्षाने सुंदर वळणदार अक्षरांत/चिनी फराट्यांत असतात, अर्थ कळत नसला तरी ते पहायलाही छान वाटते !
चिनी कॅलिग्राफीचा इतिहास फार जूना आहे. अंदाजे ११०० बीसी असे म्हणतात.
सगळ्यात जूना कॅलिग्राफीचा नमुना ते म्हणतात शँग घराण्याची सत्ता असताना
एका हाडावर सापडला. यावर समजा विश्र्वास ठेवला नाही तरी टँग घराण्याची
सत्ता असताना (अंदाजे २०० बीसी) तर कॅलिग्राफी करुन लिहलेले अनेक शिलालेख
सापडतातच. भारतातही ब्राह्मी लिपी अलंकृत पद्धतीने लिहिली जायची. त्याला
शंख लिपी म्हणत. यात लिहिलेलेही फार सुंदर दिसत असे. याची काही उदाहरणे
राजगीर (ओरिसा) मधे आहेत असे म्हणतात. मी पाहिलेले नाही. पण यात कोरणे
अत्यंत वेळखाऊ असल्यामुळे कदाचित यात क्वचितच लेख कोरले जात असावेत.
शंखलिपी त्या काळात मला वाटते राजांची नावे लिहिण्यास वापरली जात. शंखलिपी
वाचता येणारे काही तज्ञ ५०/६० वर्षापूर्वी होते. आता एखादा असेल. अगदी
लहानपणी माझ्या आजोबांना याबद्दल बोलताना मी ऐकलेले आहे....
पण कानडीमधे लिहिलेले काही शिलालेखही फार सुंदर दिसतात हे आपले जाताजाता नमूद करतो.
क्रमश:
लकुंडी-हंपी-ताडपत्री-बेलमच्या गुहा-यागंती-गंडीकोट-ऐहोळे-पट्टडकालू-बदामी ....भाग -२
पहिले लाकुंडीचे आहे. छतावर कोरीवकाम कसे करीत असत ? भारतातील देवळांची छते हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. उदा. हे दुसरे मराठवाड्यातील चारठाण्यातील एका देवळाचे छत बघा. मधे एकदा मराठवाड्यात देवळे पाहण्यासाठी आठ दिवस फिरलो होतो तेव्हा हे छायाचित्र काढले आहे. यातील आकार हा हत्तीच्या गंडस्थळासारखा दिसतो. अप्रतीम कोरीवकाम तर अनेक देवळांच्या छतांवर सापडते. छत करण्याआधीच या दगडांवर कोरीव काम केले जात असणार. ते वर चढविण्याआधी त्याचा त्रिमितीतील अभ्यास व अचूकपणा वाखाणण्यासारखाच आहे.
मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे आता काही काशीविश्र्वश्र्वराच्या मंदीरावरील बाहेरील भिंतींवरची शिल्पे आपण बघणारच आहोत पण त्याआधी लाकुंडी गावाबद्दल. मला तर वाटते या गावातील प्रत्येक घराखाली एक देऊळ लपलेले असावे. आता त्याचे उत्खनन करणे अशक्य असावे कदाचित. मी तर एक घर असे पाहिले की ज्याच्या अर्ध्याभागात देऊळ आहे व अर्ध्या भागात जनावरांचा गोठा होता. मी त्याचा फोटो काढणार होतो पण स्थानिकांनी नाराजी दर्शविल्यावर मीही जास्त उत्साह दाखविला नाही. तरीही अशा गावात ए.एस्.आय्.ने खूपच चांगले काम केले आहे. पण आपण आपल्या येथे गोंदेश्र्वरच्या मंदीराची जी कुचंबणा झाली आहे त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. कांद्याचे पीक जेव्हा निघते तेव्हा देवळाच्या सभोवताली कांद्यांचे ढीग पसरलेले असतात त्यातच ट्रॅक्टर धूर ओकत असतात...या सगळ्याचा या शिल्पांवर निश्चितच दुष्परिणाम होत असणार. लांकुंडीला बदामीसारखे पर्यटनस्थळ बनविण्याचे काम बहुधा चालू असावे.
पहिले बहुधा इंद्राचे शिल्प असावे. दुसरे सुरसुंदरी नसून कुठलीतरी देवता आहे व तिसरे अर्थातच गणपतीचे आहे. प्रचेतस बरोबर सांगू शकेल.
हे शिल्प गजासूरवधाचे आहे. या वीतभर उंचीच्या शिल्पामधे शिल्पकारानी काय काय दाखविले आहे बघा. वेरुळ व बेलोर येथील गजासूरवधाची शिल्पे तर प्रसिद्धच आहे पण ती मोठ्ठी आहेत. तेथे जागाही भरपूर आहे.. त्यात गणपती दाखविलेला नाही असे मला आठवतं आहे. येथे गणपतीही दाखवला आहे. गजासुराच्या वधाची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. पण शिल्प पाहताना दुसरीकडे वाचायला नको म्हणून थोडक्यात येथे सांगतो. गजासूर नावाचा एक राक्षस उन्मत्त होऊन ऋषीमुनींना छळत असताना शंकराला कळल्यावर तो त्याच वध करतो व त्याला उभा सोलतो. त्याचे कातडे अंगावर घेऊन तांडव करतो. त्यात त्याची सोंड एका बाजूला व शेपटी दुसर्या बाजूला दिसते. याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून परत राक्षस तयार होणार असतात म्हणून सप्तमातृका त्याचे रक्त गोळा करतात. (ते इथे दाखविलेले नाही. आणि ही गोष्ट अशी आहे का, हेही मला निश्चित माहीत नाही.) पण एवढ्या छोट्या जागेत ही गोष्ट मांडणे हे फार अवघड काम शिल्पकाराने करुन दाखवले आहे हे निर्विवाद.
हे शिल्प आहे रावण इंद्राशी लढतानाचे. मला पटत नाही पण बर्याचजणांचा हाच समज आहे..
हे शिल्प आहे रावण कैलास हलवितो त्याचे. याचा उत्कृष्ट नमुना वेरुळमधे आहे. याच्यातसुद्धा अगदी वर शंकर पार्वती सारीपाट खेळताना कोरलेले आपल्याला दिसतात. हेही शिल्प जेमतेम एक वीत उंचीचे असेल.
सेतू बांधा रे सागरी....वानरे समुद्र बुजविण्यासाठी शिळा टाकत आहेत. लाटा नागमोडी रेषांनी दाखविल्या आहेत तर त्याच्या खाली जलचर दाखविले आहेत. कासव, मासे...एक सुसरही दाखविली आहे.
त्याच देवळाचा असलेला हा नक्षिकाम केलेल्या चौकटीतील दरवाजा.
यातील फक्त दरवाजा क्रॉप करुन मी एक छायाचित्र तयार केले होते. "Blues of the Door permanently closed" ते खाली देत आहे.

"Blues of the Door permanently closed"
यातील पहिले शिल्प आहे दुर्गेच्या एका रुपाचे. श्रीतत्वनिधी नावाच्या
१८२३ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा श्री खरे यांनी संदर्भ दिला आहे
त्यात हिचे नाव चंडखंड असे दिले आहे ही सापावर, सरड्यावर, अशा प्राण्यांवर
बसते असा उल्लेख आढळतो.
दुसरे जे छायाचित्र आहे ते भारतातील बहुतेक देवळांवर आढळणार्या शिल्पाचे
आहे.... बरोबर ! हे शिल्प आहे भारवाहकाचे. तुळयांचा,छतांचा, देवळाचा भार ते
उचलतात अशी कल्पना आहे..... त्याबद्दल पुढच्या भागात पाहू... तोपर्यंत
रामराम !
तुम्ही म्हणता ते इंद्राचे शिल्प मला अंधकासुरवधासारखे वाटते आहे. त्रिशुळावर अंधकासुराच्या छाताडात खूपसल्यासारखा दिसतोय आणि शेजारी बहुधा पार्वती उभी आहे. मधले शिल्प बहुधा वैष्णवी. एका हातात शंख दिसतोय.
याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून परत राक्षस तयार होणार असतात म्हणून सप्तमातृका त्याचे रक्त गोळा करतात.
ही अंधकासुराची कथा.
गजासुरवधानंतर गजचर्म धारण करुन शिव अंधकाचा वध करतो, अंधकाला
ब्रह्मदेवाकडून तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून असुर निर्माण होतील असा
वर मिळालेला असतो. त्यामुळे शिव ते रक्त टिपायला मातृकांची उत्पत्ती करतो.
तसेच एका हातात कपाल धारण करुन अंधकाचे रक्त त्यात पडेल अशी व्यवस्था
करतो.
चंडखंड दुर्गेचे शिल्प रोचक आहे. ही योगीनी आहे का?
हल्ली मुर्तिशास्त्रावर विशेष काही वाचले जात नाही, त्यामुळे असे होते आहे.
माझ्या वेरुळवरील लेखात मी बरोबर लिहिले आहे. आता जरा रिव्हिजन केली
पाहिजे. पण कशासाठी हा प्रश्र्न उभा रहातो मनात मग रहातेच ते.... असो
आपल्यासारखे मित्र आहेत दुरुस्त करायला तोपर्यंत काळजी नाही.... :-)
https://www.facebook.com/photo.php?fbid=10210142764942210&set=a.19308367... यावर श्री. पाडिगारांनी थोडा वेगळा प्रकाश टाकलाय...
यागंटीपासून जवळच कर्नुल शेजारी आलमपूर नावाचे चालुक्यकालीन नवब्रह्म
मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे, तिथे जोगुलांबा (योगांबा - योगिनी)
देवीचे शक्तीपीठ आहे. त्या देवतेशी ह्या देवतेचे वर्णन फार जुळते. अतिशय
भयावह असे स्वरूप, तिच्या मंत्रातच 'लंबस्तनी विकृताक्षी घोररुपा
महाबला...' असे वर्णन आहे. जटाधारी वृद्धेचे स्वरूप असून विंचू, कोळी,
सरडा, घुबड, वटवाघूळ व कवटी असे असे सर्व अलंकार असल्याप्रमाणे सान्निध्यास
आहेत
(येथेच कृष्णा तुंगभद्रा संगमस्थान असून आंध्रातील महत्वाच्या तीर्थांपैकी एक)
अगदी नक्की जा... परिसरातील महत्वाच्या मंदिरांची (तुम्हाला मंदिरांची आवड आहे असे वाचले म्हणून) एक झलक
अलमपूरची मंदिरे : डावीकडील गोपुर व पाठचे मंदिर हे शक्तीस्थान, मधले व उजवीकडील मंदिर नवब्रह्म (शिव) मंदिरांपैकी.
जवळच नंद्याळचे महानंदी मंदिर, यागंटी प्रमाणेच पण अधिक मोठे व अतिशय शुद्ध वाहते झरे असणारे कुंड.
अहोबळाचे सुरेख मंदिर (गुरुचरित्रात या स्थानाचा उल्लेख आढळतो)
अहोबल परिसरात असलेल्या अनेक गूढ गुंफामंदिरांपैकी एक
क्रमश
आज या भागात आपण भारवाहकांबद्दल वाचणार आहोत. देवळांचा सर्वात खालच्या थरांनंतर भितींच्या टोकावर यांची शिल्पे सर्व देवळांवर आढळतात. ज्याठिकाणी तुळया येतात किंवा खांबावर छताचा भाग येतो त्यावर हे शिल्प आढळतेच. नुसता सांधा ठेवण्यापेक्षा हे वजन कोणीतरी उचलते आहे ही कल्पना करुन हे शिल्प तेथे लावणे ही कल्पनाच मला मोठी रम्य वाटते. सगळ्यात दुर्लक्षित अशी ही मूर्ती. सगळ्यात अभ्यासावेत तर त्यांच्या चेहर्यावरील हावभाव. सगळ्यात खाली असतात त्यांच्या चेहर्यावर जरा त्रासिक भाव मला आढळतो तर जसे जसे वर जात जाऊ तसे वजन हलके झाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावरील भाव सौम्य व प्रसन्न होत जातात. सगळ्यात वरचे तर नर्तनही करताना दिसतात. सगळ्या देवळाचे वजन उचलताना त्यांच्या चेहर्यामागे एक प्रकार्चा निर्विकारपणा लपलेला असतो असे मला उगीचच वाटते.
लाकुंडीच्या देवळावरील हा एक भारवाहक. मजबूत दंड व पाय. आपल्याकडे शरीर पिळदार दाखविण्याची पद्धत नसावी. ओठातून बाहेर आलेले सुळे बहुधा हे मर्त्य नसावेत हे दर्शवते. काही तज्ञ हे गंधर्व योनीतील आहे असे प्रतिपादन करतात.
जरी यांची वर्गवारी गंधर्व/यक्ष योनीत केलेली असली तरी मला यांच्यात आणि आपल्यात एक साम्य आढळते ते म्हणाजे भारवाहकाची त्यांची भुमिका. आपणही आयुष्यभर कसला ना कसलातरी भार उचलतच असतो. त्यातून कोणाचीच सुटका नाही. काय सांगावे हे त्याचेही प्रतिक असावे. खाली अजून काही भारवाहकाची छायाचित्रे देत आहे.
आपल्याला माहीत आहे की अफगाणीस्थानात फार पूर्वी हिंदू धर्माचे अधिष्ठान होते. त्या काळात जी काही देवळे होती त्यावर हिंदू मूर्ती शास्त्राचा प्रभाव पडला असणार. तेथे नंतर ग्रीकांच्या संस्कृतीचाही प्रभाव पडला हेही आपल्याला माहीत आहे. मग भारवाहकांचा प्रभाव का नाही पडणार ? एका बौद्ध देवळात ग्रीक देवतेला, अॅटलासला चक्क भारवाहकाची भुमिका दिलेली आढळते. ते चित्र खाली बघा. (हाड्डा, अफगाणिस्थान)
भारवाहकांची एक रांग.
लाकुंडीचे कितीही फोटो टाकले तरी समाधान होत नाही. मी तर जवळजवळ ५००/६०० फोटो काढले. फोटो काढल्यावर मुक्कामाला जाऊन सर्व फोटो लॅपटोपवर डाऊनलोड करायचे, कार्डे रिकामी करायची, सर्व बॅटर्या चार्ज करायच्या ही सर्व महत्वाची कामे करायची होती आणि सकाळी ताडपत्रीला रवाना व्हायचे होते...आता एवढे फोटो येथे टाकणे शक्य नाही...असो...
शेवटी ताडपत्रीच्या देवळावरील एका भारभावकाच्या एक शिल्पाचे एक छायाचित्र टाकून हे भारवाहक पुराण येथेच थांबवतो..... :-)
भारवाहन करणारे हे गंधर्व नसून यक्ष.
बटबटीत डोळे, खुजी मूर्ती, सुटलेले पोटे, चार हात, विकृत चेहरा ही त्यांची काही प्रमुख लक्षणं. यक्षांचे प्रमुख काम म्हणजे भारवाहन.
काही संशोधक यक्ष ही संकल्पना ग्रीकांकडून आली असे मानतात कारण यक्षांचा
अधिपती कुबेर. ह्याचे ग्रीक देव बेकस ह्याच्याशी साम्य आहे. बुटकी मुर्ती
असल्यानेच यक्षांना कीचकही म्हटले जाते.
क्रमशः
ताडिपत्रीला ( येथे ताडिपत्री असे म्हटले तर कोणालाही कळत नाही. तेथे सगळे याला ताडपत्री असेच म्हणतात) जायला सकाळीच नाष्टा वगैरे करुन निघालो. रमतगमत कॉलेजच्या आठवणी काढत निवांत चाललो होतो तेवढ्यात लक्षात आले की आपण हॉस्पेटवरुन चाललो आहोत. आजवर संध्याकाळी हंपीमधे मुक्काम आमच्यापैकी कोणीही टाकला नव्हता. जयचे की नाही, जायचे की नाही असे करत शेवटी जायचे ठरविले. नुसतेच गेलो नाही तर के एस आर टी डी सीच्या सौजन्याने चांगले तीन दिवस राहिलो. हे हॉटेल हंपीमधेच आहे. (हॉस्पेटला रहाण्यात काही अर्थ नाही हे मी अनुभवाने सांगू शकतो) दोन दिवसांवर एक दिवस फुकट अशी सूटही मिळाल्यावर कोण नाही राहणार ? शिवाय भाड्यातही चांगली सूट मिळाली. अर्थात हे सगळे ऑफसिझन असल्यामुळे असे व्यवस्थापक सांगण्यास विसरला नाही. पण एकंदरीत सगळे कर्मचारी चांगलेच होते. जेवणही चांगले आणि मुख्य म्हणजे थंडगार बीअर मिळत होती. आख्या हॉटेलमधे फक्त आम्हीच असू. दुसर्या दिवशी एक गाडी आली व संध्याकाळी गेली.
आता यावेळी काढलेले काही फोटो.

राणीवशाची भिंत व त्यामधे देखरेखीसाठी उभे केलेले मनोरे. लोटस महालावर गिलाव्यातील नक्षिकाम फार सुंदर आहे.
हंपीमधी सगळ्यादूर हे दृष्य दिसते..
नृसिंहाची मूर्ती अंदाजे १५ फूट उंच असावी. त्याचाच एक क्लोजअप.
विरुपाक्ष मंदीराबाहेर विकायला ठेवलेला गजरा. मला दक्षिण भारतातील
स्त्रियांच्या फुलांच्या वेडाचे फार कौतुक वाटते. कुठेही जायचे असल्यास
केसात गजरा माळलेला असलाच पाहिजे... आणि गजरे असतातही स्वस्त आणि ताजे...
विरुपाक्ष मंदीरात एक कामशिल्प आहे. जेथे मोठी घंटा बांधली आहे त्याला पाठ करुन समोर वर पाहिले की ते आपल्याला दिसेल. त्याचे छायाचित्र टाकून आजचा भाग संपवतो. पण वर दिलेल्या लिंक्स वाचण्यास विसरु नका...उद्या विठ्ठल मंदीर..
क्रमशः















































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.