Wednesday, November 18, 2020

स्टॅचू ऑफ युनिटी - सरदार पटेलांचा अतिभव्य पुतळा !!!!

 

३१ ऑक्टोबरला मोदींनी ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरण केल्यावर कधी एकदा हा पुतळा पाहतो असं झालं होत , माहितीतील बऱ्याच जणांना काही अधिक माहिती आहे का हे विचारून झालेलं पण काहीही माहिती हाती लागली नाही , नंतर एकाशी बोलताना टेन्ट सिटी नावाचं काही तरी राहायला आहे एवढा धागा घेऊन आणि गुगल बाबाला साकडं घालून प्लॅन सुरु केला. २५ ला सकाळी ५:४५ निघून २७ ला रात्री घरी एक मस्त रोड ट्रिप मारून आलो

सरदार वल्लभाई पुतळा :- १८२ मीटर्सचा जगातील सर्वात उंच पुतळा नुसताच उंच नाही तर बर्यापॆकी रुंद पण आहे , लार्सन आणि टुब्रो (आम्ही गमतीने ल आणि ट म्हणतो ) ह्यांनी अवघ्या ४ वर्षात उभा केला आहे , तुमच्या अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या दुपटीहून अधिक आहे , श्री राम सुतार हे ह्या पुतळयाचे शिल्पकार आहेत , पुतळ्या खालीच म्युसिम आहे तेथे सर्व माहिती सविस्तरपणे मिळते

जवळच रेल्वे स्थानक / एअर पोर्ट :- बडोदा (गुगलला वडोदरा कळत म्हणे ) इथून नर्मदा सरोवर किंवा पुतळा साधारण पण ९० km / २ तासावर आहे.
बडोदा शहरापासून सरदार सरोवर साठी बसेस सुटतात त्या बसने ये-जा करू शकतो किंवा बडोद्याहून एखादी प्रायव्हेट गाडी बुक करून तुम्ही येऊ शकता

जर ठाणे / मुंबई हुन ड्राईव्ह करून जाणार असाल तर साधारण अंतर ४२० किमी आहे पण जायला सहजच ७/८ तास लागतात. सरदार वल्लभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा केवडिया कॉलनी राजपिपला गुजरात येथे आहे मुंबईहून जाणार असल्यास सकाळी पाच वाजता निघावे जेणेकरून दुपारी बारा किंवा एक वाजेपर्यंत तिथे पोहोचता येईल

राहायची सोय :- एकतर बडोद्याला राहावं आरामात किंवा मग सर्वोत्तम पण बऱ्यापैकी महाग पर्याय म्हणजे नर्मदा टेन्ट सिटी , टेंथ सिटी मध्ये राहणार थोडसं महाग असलं तरी तिथल्या सोयीसुविधा अत्यंत चांगल्या आहेत जर दिवसाचं तपमान जास्त असेल तर एअर कंडीशन चा पर्याय निवडावा अन्यथा एअर कंडिशन शिवाय चालू शकेल. टेन्ट सिटीचे वेगवेगळे पॅकेज येतात २ दिवस १ रात्र किंवा ३ दिवस आणि २ दोन रात्र , आम्ही दुसरा पर्याय निवडला एकदा टेंट सिटी रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर सर्व खाणं-पिणं ब्रेकफास्ट चहा जेवण आणि साईट सीन याचा समावेश आहे , जेवणाची Quality अर्थातच उत्तम (सगळे गुजराती पदार्थ हादडुन झाले ) खूप छान आहे त्यामुळे आम्ही हाच पर्याय निवडला. टेंट सिटीमध्ये राहणार असाल तर बारा वाजता चेकिंग आहे चेक इन करून जेवण करून इतर स्पॉट बघता येतात पुतळ्याला जाण्यासाठी आणि गॅलरीचे तिकीट याची सर्व व्यवस्था टेंट सिटी व्यवस्थित पणे करते. रिसॉर्ट मधून पुतळ्यासाठी सरदार सरोवर धरणासाठी आणि आजूबाजूचे इतर छोटे-मोठे स्पॉट बघण्यासाठी बसेस आहेत या बसेस एअरकंडीशन आहेत तसेच रिसॉर्टचा एक गाईड तुमच्याबरोबर येतो आणि सर्व माहिती देतो पुतळ्यासाठी जर viewing गॅलरी जायचं असेल तर त्याची तिकीट बुक करता येतात.
viewing गॅलरीतुन जे काही दृश्य आहे चित्तथरारक आहे , पुढे सरदार सरोवर धारण आणि भोवताल नर्मदा खोर डोळ्याचं पारणे फेडतात आणि तळ मजल्यावरून viewing गॅलरीला जाणारी लिफ्ट ३६ सेकंदात वर पोहोचवते

सरदार सरोवर आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ पास इतरही काही छोटी-मोठी सुंदर स्थळे आहेत ती पाहता येतात व्हॅली ऑफ फ्लॉवर हे एक नवीन उद्यान जे फक्त फुलांसाठी आहे ते हल्लीच उघडला आहे तसेच जवळपासच्या परिसरात एक राजवाडा आणि एक मंदिर आहे तेही छान आहे.
(Statue of Unity Visit , Sardar Sarovar Dam , Visit Rajvant Palace, Rajpipla , Shoorpaneshwar Temple , valley of flower )

https://live.ipms247.com/booking/book-rooms-narmadatentcity

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि त्याचा परिसर अत्यंत मोहक आहे पुतळ्याच्या छातीमध्ये viewing गॅलरी आहे त्या गॅलरीचे तिकीट वेगळा आहे माणशी साडेतीनशे रुपये तिकीट आहे. तसेच पुतळ्या पुतळ्यावर संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी जवळजवळ अर्धा तासाचा एक लेझर शो आयोजित केला जातो तोही अत्यंत सुंदर आहे शक्य असल्यास हा शो नक्की पाहावा. हेलिकॉप्टर चे १५ मिनिटाच्या राईडचे माणशी तीन हजार रुपये आहेत

आता रिवाजानुसार सर्व फोटो , काहीही माहिती लागल्यास व्य नि करावा

पुतळ्याचे आणि भोवतालचे काही फोटो

image1

Narmda Nadi and Duravar Saradar sarovar

पुतळ्याची भव्य सावली

आम्ही इवलुसे

Corroidor in front of Statue

Huge Size

Nameplate of statue

Sardar Sarovar Dharan

Valley of flowers

Vf2

VF3

VF4

vf4

लेझर शो क्षणचित्रे

टेन्ट सिटी

tent city

शनिवार / रविवार लिफ्ट साठी खुप लांब रांग असते असे ऐकून आहे. (मी शुक्रवारी गेलो होतो ) दोन तास लागु शकतात. रांगेत बसण्याची काही सोय नाही.
तसेच पुतळ्याच्या आवारात शिरण्यापूर्वी दोनदा सुरक्षातपासणी होते. (पुन्हा रांग).
कोणतेही खाण्याचे पदार्थ आत नेउ देत नाहीत. सुरक्षातपासणीत फेकून द्यावे लागते.
फूडकोर्ट आहे.
ऑनलाईन तिकिट काढावे.( एक रांग कमी !)
एक्सप्रेस तिकिट काढल्यास कोणतीही रांग नाही. १००० रु -मोठे, मुले समान दर.

शनिवार , रविवार शक्यतो टाळावेत , सोमवारी बंद असतो आणि मंगळवारी सोमवारी बंद असल्याने थोडी गर्दी जास्त असतात

पुतळा शक्यतो सकाळी दहा पर्यंत बघून घ्यावा जेणेकरून नंतर ऊन आणि वाढलेली गर्दी ह्याचा फटका बसणार नाही 

तुम्हाला एकुण खर्च किति आला?

कार ने जाऊन येऊन , टेन्ट सिटी साठी चौघांचे मिळून २५ हजार रुपये , बडोद्याहून जाऊन एक दिवसात पाहिलं तर अर्ध्याहून कमी होतील  

धन्यवाद माझीही शॅम्पेन. आपला लेख वाचून खूपच चांगली माहिती मिळाली आणि लगेच जाऊनही आले.
मुंबई सेन्ट्रलहून रात्री साडे अकराच्या गाडीने निघालो. बडोद्याला सकाळी साडे सहाला पोहचलो. स्टेशन बाहेरच चहा घेतला व टेन्ट सिटीसाठी सात आसनी गाडी केली. (२३००+५०० कुबेर मंदिरासाठी. यात परतीचा प्रवास नाही). कुबेर मंदिराला भेट देऊन अकरा वाजता टेन्ट सिटीला पोहचलो. एक रात्र व दोन दिवसाच्या सहलीचे बुकिंग अगोदरच केलेले होते. लगेच रूमचा ताबा घेतला.
काही गोष्टी सोडल्या तर माझीही शॅम्पेन यांनी वर्णन केल्याप्रमाणेच सर्व सहल झाली. आम्ही दोन तंबू बुक केलेले होते. दोघांचाही अनुभव वेगवेगळा. एका तंबूत राहिलेल्या लोकांना तेथे राहणे खूपच आवडले. सगळ्या अडचणी मात्र माझ्याच तंबूत होत्या. ए सी बंद पडल्याने दुपारच्या ३८ डिग्री तापमानात तंबूत भाजून निघत होतो शॉवरला पाणी येत नव्हते. संडासचा फ्लश काम करत नव्हता.
तक्रार केल्यावर एकेक तंत्रज्ञ तंबूत येऊन खूप काम केल्यासारखे दाखवत होता आणि आम्ही मात्र तंबूच्या बाहेर झाडाखाली सावलीला. तीन वाजता बाहेर फिरायला जायची वेळ झाली तरी ए सी चे काम झालेच नाही. संध्याकाळी परत येऊ तोपर्यंत सर्व ठीकठाक झालेले असेल अशी मॅनेजरने खात्री दिली. फिरून आलो. रिसेप्शनलाच मॅनेजरने सर्व हसून स्वागत केले व सर्व काही व्यवस्थित झाल्याचे सांगितले. रूमवर जाऊन बघितले तर ए सी चालू आहे पण फक्त हवेचा झोत येतो आहे पण थंड होतच नाही. परत आरडा ओरड , परत तीच दुरुस्ती करणाऱ्यांची धावपळ. काम झालेच नाही. संध्याकाळी सात वाजता आम्हाला दुसरा तंबू दिला गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता तंबू सोडायचा असला तरी उद्या संध्याकाळपर्यंत येथेच रहा, दुपारच्या जेवणाचे कूपनही फुकट देतो असे सांगून मॅनेजरने स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला बडोद्याहून दुपारी साडे चारची गाडी पकडायची होती त्यामुळे आम्ही सकाळीच तंबू सोडला.
थोडक्यात :
१. टेन्ट सिटी छानच आहे पण अतिशय महाग आहे.
२. देखभाल-दुरुस्ती व्यवस्था अतिशय खराब.
३. पुतळा बघण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी शनिवार, रविवार टाळावा (आम्ही बुधवार निवडला
होता. रांग नव्हतीच)
४. या भागात उन्हाचा तडाखा खूपच जाणवतो त्यामुळे उन्हाळ्यात पुतळा व टेंट सिटी सहल शक्यतो टाळावी.

टेन्ट सिटीत तंबूचे तीन प्रकार आहेत
१. स्टॅंडर्ड २. डिलक्स ३. प्रिमिअम व तीनही प्रकारात ए सी व नॉन ए सी.
याबद्दलही एक मुद्दा सांगावासा वाटतो.
तंबू कुठलाही घेतला तरी सर्व सुविधा जसे जेवण, बघण्याची ठिकाणे, रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम, बस सेवा वगैरे संगळ्यांसाठी एकच आहे. बदलते ते फक्त तंबूचे क्षेत्रफळ. त्यामुळे प्रिमिअम तंबू घेऊन आपण जास्त काही वेगळे अनुभवत नाही (स्वानुभव). उगाच प्रिमिअमच्या मागे लागून खर्च वाढवण्यात काही अर्थ नाही. 

 

आम्ही सहा चुलत भावंडं बायकांसहित असे १२ जण एक हेक्झा आणि एक सफारी अशा दोन गाड्यांनि २२ फेब्रुवारीला बडोद्याला गेलो. मुंबईतून हे अंतर ४०० किमीच्या आसपास आहे. रस्ता अप्रतिम आहे परंतु ट्रकची वर्दळ प्रचंड प्रमाणात आहे. ट्रक ड्रॉयव्हरना अजिबात शिस्त नसल्याने सारखे त्यानच्या पुढे जाण्यासाठी या लेनमधून त्या लेनमध्ये सारखे नागमोडी जावे लागते. त्यामुळे प्रवासाला ८ तास लागतात (त्यात मधला नाष्टा जेवणाचा वेळ गृहीत नाही).

२२ फेब्रुवारीला बडोद्याला हॉटेलात मुक्काम केला होता. दुसऱ्या दिवशी तेथून एकात्मतेच्या पुतळ्याला गेलो हे ९० किमी सुद्धा रस्ता उत्कृष्टच आहे. तेथे आपली गाडी पार्क करून त्यांच्या बसनेच सर्वत्र फिरलो. सर्वांचे १००० रूपयांचें तिकीट अगोदरच काढलेले होते त्यामुळे कुठेही रांगेत उभे राहावे लागले नाही. आपण तेथे रांगेत उभे राहून ३५० रुपयांचे तिकीट काढू शकता. दोन्हीच्या सुविधांत रांगेत उभे राहावे लागते एवढे सोडले तर काहीच फरक नाही.

प्रत्यक्ष पुतळा लाम्बपासूनच दिसू लागतो परंतु प्रत्यक्ष जवळ गेल्यावर त्याच्या भव्यतेची कल्पना येते. हा पुतळा फोटोत पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.

पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.

हा पुतळा त्यांच्या उत्तुंग प्रतिमेला साजेसा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील करारी भाव फोटोत अजिबात पकडता येत नाहीत.

अशी भावना मला प्रथम फक्त ताज महाल पाहताना झाली होती. फोटोत किंवा प्रतिकृतीत हा पुतळा किंवा ताजमहाल यांचे सौंदर्य भव्यता आणि उत्तुंगता याची अजिबात कल्पना येत नाही. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा पुतळा जरूर पाहावा यात कोणतीही शंका नाही.

स्वच्छता कमालीची आहे. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी अतिशय स्वच्छ अशी स्वच्छतागृहे जागोजागी निःशुल्क आहेत. त्यामुळे विशेषतः स्त्रियांची अजिबात कुचंबणा होत नाही.

आपण भरतो त्याचे पैशात तेथे असलेल्या फुलांची बाग आणि धरणाची सहल अंतर्भूत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या पातळीचे हे स्थळ आहे असे असूनही तेथे असलेल्या फूड मॉल मध्ये सर्व तर्हेचे उत्तम पदार्थ सर्वाधिक किरकोळ किमतीलाच मिळतात (MRP). म्हणजे थंड पाण्याची बाटली सुद्धा १५ रुपयालाच मिळते किंवा समोसा ४० रुपये लाच मिळतो. एवढे मोठे पर्यटन स्थळ असूनही मॉल सारखे २०० रुपये पॉप कॉर्न आणि ९० रुपयाला पेप्सी असा चावटपणा नाही. याशिवाय तेथे स्थानिक मिळणारी फळे, बोरे, चिंचा, मेवे, खारे दाणे हे सुद्धा मुबलक मिळते.

कुठेही आपल्याला लुटण्यात आले आहे अशी भावना अजिबात येत नाही.

एकंदर -- आंतर राष्ट्रीय पातळीचे पर्यटन स्थळ म्हणून ताजमहालसारखे केवळ एकात्मतेचा पुतळा हे पर्यटन स्थळ भेट देण्याच्या नक्कीच लायकीचे आहे.

परंतु एका दिशेने ४०० किमी चा प्रवास थोडा जास्त होतो आणि जाऊन येउन तुमचे दोन दिवस त्यात जातात. या पेक्षा उत्तम म्हणजे शताब्दी एक्स्प्रेसने सकाळी ६ २५ ला मुंबई सेंट्रल ला बसलात ( किंवा बोरिवली ला ०७.००) तर भरूच ला १०.२५ ला पोटातले पाणी न हलता नाष्ट्यासकट पोचता.माणशी तिकीट ७२५ रुपये. भरूच पासून हे अंतर ९० किमी च आहे तेथून तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा सरकारी बसने जाऊ शकता. परत येताना दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी निवांतपणे येऊ शकता.

 

मी सुद्धा तुमचा लेख वाचून जाऊन आले ,तुम्ही दिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला . शनिवारी औगस्ट क्रांति ने रात्री बड़ोदयाला पोचलो , बडोदयाला रहिलो , ,7 आसनी गाडीने पुतळा पहायला गेलो , दुपारी 1ला पोचलो ,रस्ते अगदी गुळगुळित , पूर्वी लालू म्हणाले होते -हेमामलिनीचे गाल, ते उगिचच आठवले , आम्ही आधी तिकीट काढले ,गर्दी चिक्कार रविवार असल्यामुळे तरीही अर्ध्या तासात तिकीट मिळालि ,मग आम्ही टेंबे स्वामी मंदिरात दर्शन घ्यायला गेलो , जवळच आहे , नंतर 3 वाजता परत आलो ,इथुन त्यांच्या ए सी बस मधुन प्रवास ,आम्हाला लेझर शो पहायचा होता म्हणून आम्ही आधी सरदार सरोवर ,नंतर valley of flower आणि मग 4 वाजे पर्यंत statue of Unity असा उलटा प्रवास केला .त्यामुळे प्रवेश रांग बरीचशी ओसरली होती , पण तुम्ही म्हटल्या प्रमाणे एक्सप्रेस तिकीट साठी direct entry नव्हती, आम्ही साधे तिकीट काढले होते पण एक्सप्रेस तिकीट वाले वाद घालत होते ,एक्सप्रेस तिकीट चा फायदा फक्त viewing gallery ला होतो ,तिथे त्याना वेगळी रांग होती .
-------------प्रत्यक्ष पुतळ्याचा जवळ गेल्यावर एक आश्चर्य, उत्सुकता आणि अवाक होणे यातील संमिश्र भावना मनात उचंबळून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.

पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या चरणाशी लीन होताना आदर, अभिमान आणि कृतज्ञता या संमिश्र भावाने डोळ्यात अश्रू उभे राहतात.
अगदी सहमत ,

 







No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...