झालं असं, की एप्रिल २०१६ मधे मुलाचा पहिला वाढदिवस होता. टिपिकल गोष्टींशी नेहमीच माझं वावडं असतं त्यामुळे मुलाचा वाढदिवस त्याला अपवाद नव्हताच. मग एक कल्पना मनात आली की वाढदिवसाची भेट म्हणून मुलाला एखादी गोष्ट देण्यापेक्षा एखादा स्प्लेंडिड 'एक्स्पिरियन्स' द्यावा. त्याला कुठेतरी घेऊन जावं असं वाटलं. तसे इथेतिथे बरेच भटकत असतो आम्ही त्याला घेऊन, आणि तोही पक्का भटक्या असल्यासारखा बाहेर जायचं म्हटलं रे म्हटलं की टुण्णकन हातातलं खेळणं टाकून उभा राहतो. तर मग कुठे जावं? हा प्रश्न होता. अभयारण्य, किल्ला, समुद्र, इत्यादींचा विचार करता करता 'लंडन!' असा ग्रँड विचार मनात आला आणि त्याने व्यापलंच मला जवळजवळ. इथवर मी एकटाच या विचाराचा मानकरी होतो.
पुढे मग अपेक्षेनुसार अनेक जर-तर-असंकसं-कसंकाय चे अडथळे पार करत हा विचार प्रत्यक्षात येणार असं ठरलं. अर्थात, अगदी वाढदिवशी नाही तरी थोडं नंतर ते होणार होतं. फिरायला जायचं म्हटलं की भानच उरत नाही मला. त्यामुळे मग दररोज ट्रॅव्हल साइट्स वर शोधाशोध व्हायला लागली. मुंबई लंडन. तीन वर्षापूर्वीपेक्षा नक्कीच वाढलेले असले तरी तिकिटांचे दर आकर्षक होते, त्यामुळे हुरूप वाढला. तसा वाढदिवसाच्या निमित्ताने हा विचार आला असला तरी या दौर्यामुळे अनेक गोष्टी जुळून येत होत्या. अनेक वर्षापासूनचा लांबणीवर पडलेला हा लंडन दौरा, तीन-एक वर्षापूर्वी अगदी ठरल्यात जमा झाला होता, परंतु मग बारगळला तेंव्हा फार हळहळ वाटली होती. आता ती वाटेनाशी होत होती.
मुलाचा पासपोर्ट काढण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. एक उन्हात रांगेत उभं राहणं सोडलं तर बाकी प्रक्रिया इतकी पटापट व पद्धतशीर झाली की काय सांगावं! टीसीएस ला हे काम दिल्यापासून नक्कीच ही यंत्रणा खूप सुधारली आहे असं आता स्वानुभवातून सांगता येईल. पुढची पायरी व्हीजा ची होती. तिथेही अतिशय छान व निर्विघ्न काम झालं. युएस व्हीजा ला मिळालेली भिकार्यासारखी वागणूक आठवणीत होती परंतु इथे फारच सौजन्य अनुभवायला मिळालं. अर्थात युके व्हीजा चं कार्यालय असलं तरी भारतीय कर्मचार्यांच्या वागण्यात मात्र काही बाबतीत भारतीयांचा कॉपीराइट असलेला अव्यवस्थितपणा दिसतोच. तरीही तो दुर्लक्षिण्याइतका कमी होता हे मात्र खरं.
एव्हाना तिकिटांचे भाव मात्र आकाशाकडे झेपावत होते. मग त्याबाबतीतही बरंच संशोधन केलं. काही मतं अशी होती की विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर तिकिटं ट्रॅव्हल कंपन्यांच्या संकेतस्थळांहून स्वस्त मिळतात. शिवाय विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर दिसणार्या विमानसेवा इतर संकेतस्थळांवर दिसत नाहीत, थोडक्यात तिथे एक्सक्लूजिव्ह फ्लाइट्स असतात. कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी तिकिटं बुक करता त्यावरही उपलब्धता, व दर अवलंबून असतात असंही ऐकलं. तसेही प्रयत्न केले. रात्री तीन वाजता उठून किमती बघणं इत्यादी. या आगोदरच्या परदेश प्रवासात इतकी मेहनत घेतली नसल्याने हे माझ्यासाठीही नवीन होतं. थोडाफार फरक नक्कीच असतो तिकिट दरात व त्या किमतीत मिळणार्या सेवांच्या यादीत; पण काही विशेष नाही अशा निष्कर्षावर पोचलो. अपेक्षित नव्हतं, पण एक कार्यालयीन अडथळा यायचा होता. तेच ते; रजा न मिळणं. भरपूर आगोदर दिलेली सूचना, आजवरचा कामाच्या नियोजनाचा आलेख हे सगळं जमेस असूनही खुसपटं काढली जातात तेंव्हा डोकं फिरतं. पण असो. तर त्यामुळे बेत काही दिवस पुढे ढकलण्यात आला.
मग खरा रोचक भाग सुरू झाला. माहितीचं संकलन. काय बघावं, काय टाळावं, काय खावं, कुठे काय विकत घ्यावं हे सगळं वाचणं अनेकदा प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही आनंददायी असतं. ते चालू होतंच, आणि त्यासोबत एक महत्वाची गोष्ट चालू होती; खरेदी! प्रवासाला जायच्या उत्साहाच्या भरात अनेकदा 'होऊदे खर्च!' तत्व अवलंबलं जातं. त्यामुळे होणारा 'वॉलेट लॅग' प्रवासानंतरही अनेक दिवस त्रास देतो. पण प्रवास म्हणजेच मुळी वीक पॉइंट असल्यामुळे तोही सह्य असतो. त्यामुळे उष्ण कपडे, 'कूल' कपडे, इत्यादी सर्व खरेदी झाली. बॅगा भरल्या. आता उड्डाण तेवढं बाकी आहे. 'मिमा.....' (म्हणजे बोबड्या बोलात 'विमान') असं आत्ता म्हणताना होणारा मुलाचा चेहरा आम्ही बघतोय आणि आता प्रत्यक्ष प्रवासात, आणि तिथे गेल्यावर त्याच्या चेहर्याची खुलणारी कळी कशी दिसेल ते बघायची उत्सुकता आहे.
सो, लंडन; हिअर वी कम...
थेट विमानप्रवास असल्याने एक बरं होतं, की मधे उतरा, वेळ काढा हा प्रकार नव्हता. तो असता तरी पाय मोकळे करता येणं वगैरे फायदे असतात, बट थेट जेट इज ऑलवेज ग्रेट. आणि पुढे लंडनला नातेवाईकांकडेच जायचं होतं त्यामुळे अकोमोडेशन नावाचा मोठा प्रश्न उद्भवणारच नव्हता. संध्याकाळी सहा सातच्या सुमारास टर्मिनलमधून बाहेर आलो आणि तापमानातल्या दहाबारा डिग्रीच्या फरकाने सुखावलो. अगदी पाऊस पडून गेल्यासारखी हवा झाली होती. विमानातल्या अपुर्या झोपेमुळे रात्री झोप लागायला त्रास झाला नाही.
लंडनची पहिली सकाळ उजाडली. घड्याळ बघितलं तेंव्हा समजलं की आठ वाजलेत. एरवी हॉर्नचे आवाज किंवा तत्सम गोष्टींनी झोप उडते. इथे खिडकीतून बघितलं तर रस्ता निवांत होता. एखाद दुसरी गाडी निघत होती थोड्या थोड्या वेळाने इतकंच. रस्त्यावर मॅपलच्या झाडाची थोडीफार पानं गळून पडलेली होती, घरांच्या अंगणातल्या फुलझाडांवर रंगीबेरंगी फुलं फुलली होती, एकदम पिक्चर परफेक्ट चित्र होतं. मग गप्पा, गोष्टी आणि आज काय करायचं? या विषयावर चहाचे घोट घेत चर्चा करत बसलो.
सुरुवातीच्या दिवशी नुसतंच जवळपास भटकून आलो. अक्सब्रिज हायस्ट्रीट वर फेरफटका, मॉलमधली टेहळणी, आणि अर्थातच खादाडी अशा अजेंड्याने पहिला दिवस संपला. मुलाला मानवेल अशी थंडी होती, शिवाय स्वेटर, जॅकेट, कानटोपी असा कडेकोट बंदोबस्त आणलेलाच होता. त्यामुळे तशी चिंता नव्हती. फक्त प्राममधे जखडलेल्या अवस्थेत राहण्याची सवयच आम्हाला नसल्याने सारखी त्यातून खाली उतरायची धडपड होत होती. लर्निंग ऑन डे वन असं होतं की लंडनमधे प्रचंड चालायला लागत असल्याने प्रामशिवाय काही खरं नाही हे जरी खरं असलं, तरी त्या प्राममधे बसूनही काही खरं नाही याची कल्पना पुढील प्रवासात ठेवणे.
अक्सब्रिजपासून पुढे वर बेकन्सफील्ड नावाचं एक गाव आहे. या गावात जगातील पहिलं मॉडेल व्हिलेज उभं केलेलं आहे. एखाद्या संपूर्ण गावाची छोट्या आकारातील प्रतिकृती असलेलं हे मॉडेल व्हिलेज बेकन्सकॉट नावाने ओळखलं जातं. आमच्या लंडनवारीच्या दुसर्या दिवशीचं हे पहिलं आकर्षण होतं.
गुडघाभर उंचीची घरं, हाताच्या बोटाएवढी माणसं, छोटाली ट्रेन, अशा गावातून फिरताना कमालीचं सही वाटलं. इथे एक अन एक गोष्ट इतकी बारकाईने केलेली आहे की चकित व्हायला होतं. चर्चबाहेर उभ्या असलेल्या फादरच्या चेहर्यावरचे भाव, एखाद्या माणसाच्या कोटाला पडलेल्या चुण्या बिल्डिंगवरच्या पाट्या, पॅलेसबाहेरच्या गाड्या अशा प्रत्येक गोष्टीत प्रचंड बारकावे टिपलेत. अगदी त्या खेळण्यातल्या ट्रेनचा आवाजही खर्या ट्रेनसारखा 'धिधिक धिधिक.... धिधिक धिधिक' असा येतो; मोटरवर आहे म्हणून बिनाआवाज किंवा कुई.... असा आवाज वगैरे नाही. परफेक्शन. ते बघताना खरंच एखाद्या गावातून फेरफटका मारतोय की काय असं वाटतं.
त्या मिनिएचर व्हिलेजमधे छानपैकी भटकून झालं. तिथेच एक प्ले एरिया होता. त्यात मग आमच्या मिनिएचरला खेळायला नेलं. घसरगुंडी, बोगदा, इत्यादी ठिकाणी मनसोक्त खेळल्यावर आम्ही बेकन्सकॉटवरून निघालो. डेस्टिनेशन: ऑड्स फार्म, हाय विकम्ब.
नेटवर लंडन अॅट्रॅक्शन्स बघताना एखाद्या लोकल फार्मला विझिट करणं हा पर्याय बर्याच जणांनी सुचवलेला दिसला. ही फार्म्स म्हणजे मोठाली शेतं असतात पण विशेषकरून तिथे असलेले प्राणी हा आकर्षणाचा भाग असतो. गायी, शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या अशी प्राणीसंपदा तुम्हाला या फार्म्सवर जवळून बघता येते. आपल्याकडेही गोठे, कुकुट पालन केंद्र वगैरे असतात पण आज म्हटलं तर सहज जाऊन हे विश्व बघता येईल अशा जागा आपल्याजवळ नसतात.
त्यामुळे लंडनला लोकल फार्म विझिट आम्ही करायची ठरवली होती. लांबच्या लांब पसरलेली हिरवळ, त्यावर मुक्त चरणार्या अजस्त्र गायी, मेंढ्यांचे कळप, हे बघणं फारच छान वाटलं. इथेही प्रत्येक बाबतीतली टापटीप लपत नव्हती. कोंबड्यांची अंडी घेण्यापासून ते गायीचं दूध काढण्यापर्यंत कामं तुम्हाला इथे बघता, काही करताही येतात. परत इथेही विरंगुळा म्हणून मुलांना, मोठ्यांना खेळता येतील असे खेळ ठेवलेले आहेत. एकंदरित पूर्ण दिवस व्यतीत करता येईल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आम्ही मात्र काही तास तिथे होतो.
भरपूर मजा करून, दमून, आम्ही घरी परतलो. आणि लंडन भटकंतीचा दुसरा दिवस आटपला.
भाग ३ - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
दुसर्या लाँग डे मुळे पुढच्या दिवशी बरीच निवांत जाग आली. आज आम्ही रिकमन्सवर्थ ला जाणार होतो. रिकमन्सवर्थ ही लंडनच्या उत्तर-पश्चिमेला असलेली हर्टफोर्डशायर काउंटीतील जागा आहे. इथे एक अॅक्वाड्रोम आहे. सुमारे १०० एकर विस्तार असलेला हा एक निसर्गाचा खजिना आहे. इथे एक कॅनल/कालवा आहे ज्याचं नाव ग्रँड युनियन कॅनल. त्यावरील लॉक बघायला आम्ही आज जाणार होतो.
हा लॉक प्रकार फार रोचक असतो. कालव्यातून होणार्या जलवाहतुकीला पाण्याच्या पातळीमधील बदल विनासायास ओलांडता यावेत यासाठी या लॉकचा शोध लागला. लॉक ची यंत्रणा ही बोटी पाण्याच्या पातळीनुसार वर किंवा खाली घेण्याचं काम करते. हे एक प्रकारचं चेंबर असतं ज्याला दोन बाजूंना दरवाजे असतात. कालव्याच्या पाण्याची पातळी जिथे बदलते तिथे ही लॉकची यंत्रणा बांधली जाते. कालव्यातून प्रवास करणारी बोट या लॉकजवळ येते तेंव्हा प्रथम त्या बाजूचा दरवाजा उघडून बोटीला चेंबरमधे आणलं जातं. मग तो दरवाजा बंद करून दुसर्या बाजूचा दरवाजा हळूहळू उघडला जातो. यामुळे चेंबरमधल्या पाण्याची पातळी कमी/जास्त होते. आणि ती दुसर्या बाजूच्या पातळीइतकी झाल्यावत दुसर्या बाजूचा दरवाजा पूर्ण उघडून बोट पलिकडे नेली जाते. लॉक या प्रकाराचा शोध लिओनार्डो दा विंची ने लावला, हे विशेष. It's a DaVinci design.
आम्ही गाडी रिकमन्सवर्थ ला पार्क करून तिथल्या हिरवाईतून चालू लागलो. इथेच एक तलावही आहे. तिकडून काहीतरी आवाज येत होता, म्हणून चौकशी केली तर कळलं की तिथे शिडाच्या बोटींची रेस चालू आहे. अनेक सिनियर सिटीझन मंडळी बरेचदा बोट क्लब मधे या रिमोटवर चालणार्या शिडाच्या बोटींची रेस खेळतात.
तिथून पुढे चालत चालत आम्ही लॉकजवळ पोचलो. वाटेतल्या हिरवळीवर ठिकठिकाणी बसावं, धावावं असं वाटत होतं पण मोह आवरला. आतापर्यंत लंडनमधे बघितलेली प्रत्येक गोष्ट फोटो काढण्यासारखी होती, आणि लॉकचा परिसरही त्याला अपवाद नव्हता. संथ वाहणारा एक कालवा, दुतर्फा झाडी, त्यावर एक कमानीसारखा पूल, त्या पुलाच्या टोकाला एक टोलेजंग घर, आणि निळंशार आकाश, हे समीकरण इतकं सुंदर होतं की तिथे असलेलं लॉक काही वेळ लक्षातच आलं नाही. मग असं झालं की "ते बघ. याला म्हणतात लॉक", "ओह हे का ते! अच्छा अच्छा..." आणि मग आम्ही ती लॉकची यंत्रणा समजून घेऊ लागलो. थियरीला प्रॅक्टिकलची जोड लगेचच मिळाली. एक लांबलचक प्रायवेट बोट तिथे आली. त्यातला एक माणूस उतरला व गेट उघडणं इत्यादी कामं करू लागला. हे बोटीतल्या व्यक्तीनेच करायचं असतं, त्यासाठी कुणी वॉचमन बिचमन नसतो. तिथे असेलच कुणी तर ते गेट ढकलायला मदत नक्की करतात. आम्हीही त्यानुसार जोर लगाके.... केलं. हे गेट ढकलायला विशेष जोर लागत नाही, ते एक विशिष्ट तंत्र आहे ते जमलं की अजस्त्र वाटणारं ते गेट सहज हलवता येतं. पण ते ढकलताना पायाने जोर घेता यावा यासाठी तिथे लाकडी पट्ट्या जमिनीवर लावलेल्या आहेत जेणेकरून जोर घेणं सोपं जावं, पायाला पकड यावी. बोटीतून किनार्यावर जायला जिने केलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी; पण माणसाची सोय प्रत्येक ठिकाणी बघितलेली दिसते. हे वैशिष्ट्य आहे इथलं. इथलंच नव्हे, सगळ्या प्रगत देशांतलं.
लॉकजवळ थोडा वेळ घालवला, फोटो काढले आणि परतीच्या वाटेवर चालू लागलो. आता मात्र गवतावर बागडण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. मुलाला प्राममधून सोडल्यावर दुडुदुडु करत तो जो पळू लागला, ते बघून आम्हाला भलतं छान वाटलं. मग चांगला तासभर त्याचं गवतावर खेळून झालं. तिथे इतरही कुटुंबं आली होती, लहान मुलं होती त्यामुळे गंमत आली.
तिथून मग आम्ही जेवायला एका इटालियन रेस्त्राँ मधे गेलो. अतिशय प्रेमाने वाढणारा, बोलणारा, हसतमुख वेटर आपल्याकडे क्वचित मिळतो. पण या माणसाने खरोखर आमच्या जेवणाची चव वाढवली. अशीही इथल्या पदार्थांची चव क्लास होतीच, पण असं आनंदाने वाढणारं कुणी असेल तर मग ती अजूनच भारी होते. भरपेट जेवून आम्ही घराच्या वाटेला लागलो. दिवस तीन संपला. उद्या साउथ केन्सिंगटन, रॉयल अल्बर्ट हॉल, हिस्टरी म्युजियम इत्यादी बघायचं होतं.
दिवस चौथा. ट्रेनचा पहिलाच प्रवास. पहिल्यांदाच स्टेशन, ऑयस्टर कार्ड, प्रथमदर्शनी किचकट वाटणारा मॅप, हे सगळं आज होतं. स्टेशनवर प्रामसकट दाखल झालो. पहिल्यांदाच असल्याने माझी बहीण आमच्यासोबत आज येणार होती. कार्ड पंच करून फलाटावर आलो. जुबिली, मेट्रोपॉलिटन, सेंट्रल, नि काय काय लाईन्स होत्या. म्हटलं तसं, पहिले किचकट वाटला पण नंतर तो मॅप फिट बसला डोक्यात. या मॅपची गोष्ट अशी की याची संकल्पना एका प्लमरने काढली. आणि हा मॅप पाईप्सच्या जाळ्यासारखा विकसित केला; त्याचं डिझाईन बघता ते लक्षात येतं. शहराच्या विकासात कुणाकुणाचं कसं कसं योगदान आहे याचा हा नमुना.
साउथ केन्सिंगटनला दाखल झालो. लंडनमधे कुठल्याही मोकळ्या जागेत धूम्रपान करायची मुभा आहे. त्याचा फार त्रास झाला पूर्ण प्रवासात. एक सेकंदही तो वास मला सहन होत नाही आणि इथे दर तिसरी व्यक्ती आपली भकाभक धूर सोडत उभी होती स्टेशनबाहेर. त्यात असंख्य कबुतरं होती जागोजागी. ते जरा पक्षांचं आणि माझं वावडं आहे त्यामुळे....
तर हे असं सगळं पार करून केन्सिंगटनच्या रस्त्यांवर आम्ही भटकू लागलो.
इथे अतिशय देखण्या इमारती आहेत. त्या बघताना एक सॉलिड ग्रँड फीलिंग येतं आपल्याला. सोनेरी रंगाच्या पाट्यांवर काळ्या अक्षरांनी लिहिलेली नावं, दारासमोरच्या दोन-तीन पायर्या, त्या जिन्याला असलेले नक्षीदार कठडे, इतकंच नव्हे तर दरवाज्यावर असलेलं बेलचं बटणही रॉयल. आहाहा! जाम भारी प्रकार होता सगळा.
प्रिन्स अल्बर्ट हॉलकडे आलो. इथे आम्ही आत जाणार नव्हतो; त्यामुळे बाहेरून फेरफटका मारला. एक प्रदक्षिणा केली आणि मग हिस्टरी म्युझियममधे शिरलो.
म्युझियम बद्दल लिहायला एक धागा पुरायचा नाही त्यामुळे ते लिहीत नाही. पण इतकं सुरेख आणि रंजक आहे त्या म्युझियम मधलं प्रत्येक दालन, की ते प्रेक्षणीय स्थळ न म्हणता अभ्यासाचं स्थळ म्हणायला हवं.
अर्थातच आम्हालाही वेळ पुरला नाही, शिवाय मग मुलाचाही फिरण्यातला रस संपल्यावर आम्ही दिवस आटपता घेतला. हां; पण पेटपूजा राहिली होती, त्यामुळे हॉटेलात शिरलो. एक वेगवेगळी चीज असलेली डिश आम्ही घेतली होती. इथे चीजबरोबर स्वीट खाण्याची पद्धत आहे. चीजचा फ्लेवर बरेचदा तीव्र असतो त्यामुळे ती टेस्ट न्यूट्रलाईज करायला त्या त्या चीजबरोबर जाणारं विशिष्ट स्वीट तुम्हाला देतात. अशाप्रकारे जिभेचे चोचले पुरवून पुन्हा अंडरग्राउंड आणि बॅक टू होम.
लंडन ट्रिप वॉज गोइंग ग्रेट.
क्रमशः
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
आजचा अजेंडा होता लंडन झू आणि मादाम तुसां संग्रहालय. झू ला जाणार म्हणून मुलगा खूश होता. म्हणजे, त्याला बाकी काही कळत नसलं तरी सिंव्ह बघायचा, वाघ बघायचा इतकं समजत होतं. दोन तीन दिवस सेट झालेल्या दिनचर्येप्रमाणे आम्ही उठलो, ब्रेकफास्ट केला आवरलं आणि प्राम, जॅकेट्स, दिवसभराचं सामान, इत्यादी घेऊन निघालो. एव्हाना लंडन ट्यूब च्या मॅपची चांगलीच उजळणी झाली होती. त्यामुळे मेट्रोपोलिटन वरून जुबिली घेऊ तिथून बेकर स्ट्रीट ला उतरू आणि अर्धा तास चाललं की लंडन झू. हे मी अगदी दादर ला उतरू चर्चगेट ट्रेन घेऊ तिने ग्रँटरोडला उतरू आणि थोडं चाललं की आला लॅमिंगटन रोड असं सहज सांगत होतो. (उदाहरणार्थ झालं तरी पुन्हा ते मुंबईचं चित्र डोळ्यासमोर आलंच. रिडिक्युलस. असो.)
तर ट्यूबमधे बसलो. अव्याहत सौजन्य सप्ताह असल्यासारखी मंडळी वागताना दिसली इंग्लंडमधे. म्हणजे आमचा जितका म्हणून संबंध येत होता तितक्याच्या आधारावर तरी खूप फ्रेंडली वाटली. ट्रेनमधे प्राम घेऊन चढलं की लगेच प्रायॉरिटी सीट रिकामी होणं वगैरे सुखद धक्के मिळत होते. बेकर स्ट्रीट आलं. आम्ही उतरून गूगल मॅप्स सांगेल तशी पायपीट सुरू केली. मस्त हिरव्यागार अशा रीजंट्स पार्कमधून हा रस्ता होता. रिजंट्स पार्कच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत जायला खूप छान वाटलं. मग एकदाचे झू ला पोचलो. लंडनमधे खूप चालायला लागतं! चा रिमाईंडर ठरणारा हा वॉक होता. झू चं तिकिट काढून आमची सैर सुरू झाली.
लंडन झू अपेक्षेपेक्षा खूपच कॉम्पॅक्ट होता. कदाचित शहराच्या मधे असल्यामुळे असेल. पण लंडन झू मधे खरं सांगायचं तर इतकं मोठं तिकिट काढण्यासारखं काही वाटलं नाही. ठीक आहे, म्हणजे मुलासाठी एक अॅट्रॅक्शन म्हणून सुरेख होतं. पण तेवढंच. तसे झू बरेच बघितलेत पण याची खासियत, आणि तशी ती जनरल लंडन किंवा परदेशातलीच खासियत म्हणायला हवी ती म्हणजे इतकं नीटनेटकं सगळं करून ठेवलेलं आहे, इतकं स्वच्छ आणि नियोजित आहे की फिरायला मजा येते. 'कुठे आलोय चायला!' असं होत नाही. त्यामुळे तोच झेब्रा, तेच पेंग्विन, तोच सिंव्ह असूनही झू एन्जॉय केला. हे झालं आमचं. मुलाला गंमत आली ती वेगळीच. पुस्तकातले प्राणी प्रत्यक्ष दिसल्यावर त्याच्या चेहर्यावर एखाद्या पुस्तकाएवढे भाव उमटले होते.
मग झू मधेच बसून जरा खादाडी केली. घरून सँडविच इत्यादी पदार्थ घेऊन निघणं लंडनसारख्या ठिकाणी एकदम बेस्ट. एक तर बाहेर खायचे पैसे जरासे वाचतात, आणि मुख्य म्हणजे वेळ वाचतो. तसं मुळात खवय्ये असल्यामुळे ते आणूनही आम्ही बर्यापैकी बाहेरचे पदार्थ खात-पीत होतो. बायकोला बेकिंग प्रिय असल्याने अनेक ठिकाणी मफिन्स, कुकीज इत्यादी खाऊन झालं.
झू मधून पुन्हा रेजेंट्स पार्क पार करून दुसर्या बाजूला आलो. तिथे मेरिलेबोन रोड वर मादाम तुसाँ आहे. बेकर स्ट्रीटपासून अक्षरशः एक दोन मिनिटावर. आम्ही आत गेलो खरे, पण मुलाचा पेशन्स फारच कमी झाला होता, त्यामुळे पटापटा आटपायला लागणार हे समजलं होतं. एक तर तिथे अंधारलेल्या त्या संग्रहालयात बर्यापैकी गर्दी होती. अर्थातच 'आपले' पर्यटक जास्त. त्यात ते पुतळे नीट बघता येणं महाकठीण होतं. पण पुतळ्यांपेक्षा सजीव व्यक्तींना बघूनच जास्त मनोरंजन झालं. विशेषतः बॉलिवूड दालनात. ते पुलंचं वाक्य नाही का, 'आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय....' त्याप्रमाणे आपण कुठे आहोत, आपण कुणाबरोबर आहोत, मुळात 'आपण' कसे आणि काय आहोत या कशाचीही तमा न बाळगता ते पुतळे सजीवच आहेत असं मानून सगळे प्रकार चालू होते. म्हणजे की, फोटो काढणं (हे अपेक्षितच आहे त्यामुळे त्याचं विशेष नाही), ते फोटो काढताना खांद्यावर हात ठेवणं, कमरेवर हात ठेवणं, मिठी मारणं, अगदी पापे घेणंही चालू होतं. म्हणजे कतरीना कैफ, माधुरी दिक्षित वगैरेंना त्याचा व्हिडियो काढून दाखवला तर झोपेत घाबरून उठतील त्या. असे हे 'चीप बट हिलेरियस' प्रकार आम्ही काही वेळ बघितले. मग संधी मिळेल तसे बायकोने एक दोन फोटो (सामान्य माणसासारखे) काढले आणि आम्ही पुढे निघालो कारण त्या बॉलिवूडी पुतळ्यांमधे मला विशेष रस नव्हता.
तसेही एकूण सगळ्या पुतळ्यांपैकी बॉलिवूड किंवा एशियन लोकांचे पुतळे गंडलेले आहेत असं आमचं मत झालं. खपाटीला गेलेले गाल, सुरकुतलेली त्वचा, काँप्लेक्शन मधे काहीच्याकाही फरक, अशी वाट लावलेली आहे आपल्या लोकांची. त्या मानाने सगळ्याच परदेशी व्यक्ती मस्त वठल्यात. लिओनार्डो डी कॅप्रियो, जॉनी डेप, जुलिया रॉबर्ट्स, मर्लिन मॉनरो, विल स्मिथ विशेष. मग स्पोर्ट्स च्या दालनात आर्नल्ड श्वार्झनेगर, रफाएल नदाल, क्रिस्तियानो रोनाल्डो, होसे मुरिन्यो, इत्यादींशी पुतळाभेट घेतली. इथे बेसमेंटमधे शेरलॉक होम्स मिस्टरी बॉक का काहीतरी प्रकार असतो. तिथे जाणार इतक्यात 'समबडी इज अनवेल देअर' असं सांगून सिक्युरिटी वाला सगळ्यांना बाहेर जायला सांगू लागला. त्यामुळे आम्ही थेट एक्झिट कडे रिडायरेक्ट झालो.
माझे नातेवाईक मला बकिंगहॅम ला ऑफिसमधून परस्पर भेटणार होते. त्यामुळे मग ट्यूबने ग्रीन पार्कला गेलो आणि पॅलेस गार्डन्स मधून चालत चालत चिमण्या, कावळे, कबुतरं मुलाला दाखवत आम्ही बकिंगहॅम पॅलेसला पोचलो.
चेंज ऑफ गार्डस मधे विशेष असं काही नाही हे आधीच ठरल्यामुळे आम्ही संध्याकाळी तिथे जायचं ठरवलं. मग मस्त संधिप्रकाशात ती ग्रँड इमारत बघितली, इकडे तिकडे जरा फिरलो आणि मग वेस्टमिन्स्टर वरून परतीची ट्यूब पकडली.
आज चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे रात्री झोपा पटापट लागल्या. मला सोडून; कारण उद्याचा दिवस माझा होता. पंढरपुराला जायचं होतं, विठठलालाच जणु बघायचं होतं. आय वॉज गोइंग टू मॅन्चेस्टर. मॅचचं काही जमलं नसलं तरी ओल्ड ट्रॅफर्डला जायचं हेच पुरेसं होतं. त्यामुळे गजर वगैरे नीट बघून घेतला, आणि मग विचार करता करताच माझा डोळा लागला.
लंडनवारी - भाग ५ - याचसाठी केला होता सारा अट्टाहास!
लंडनवारी - भाग ६ - बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज
पुढच्या दिवशी आमचा अजेंडा होता बिगबेन, पार्लमेंट हाऊस (लांबून. फक्त फोटोपुरतं), पुढे ग्रीनिच, आणि मग टॉवर ऑफ लंडन आणि टॉवर ब्रिज.
लंडनमधे देखण्या इमारती पावलोपावलीच आहेत. पण पार्लमेंट हाऊस आणि बिगबेनची वास्तू मात्र विशेष आहे. पिवळा-सोनेरी रंग असलेल्या या इमारतीला हाउसेस ऑफ पार्लमेंट किंवा पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर म्हटलं जातं. ही इमारत १८४० - १८८० मधे बांधली गेली. याच्या आत एक वेस्टमिन्स्टर हॉल नावाचा भलामोठा हॉल आहे जो त्या आगोदर बांधला गेला. थेम्स नदीच्या उत्तर काठावर असलेल्या या पॅलेसला आम्ही सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास पोचलो. वेस्टमिन्स्टर ला उतरून थोडंस चाललं की समोरच तुम्हाला हाउसेस ऑफ पार्लमेंट, बिगबेन आणि वेस्टमिन्स्टर ब्रिज दिसायला लागतात. दिसायला म्हणजे, इतक्या भव्य गोष्टी तुम्ही देखल्या-न देखल्या करूच शकत नाही. उभ्याच राहतात तुमच्यासमोर त्या.
| वेस्टमिन्स्टर ब्रिज आणि लंडनची ओळख असलेली रेड बस |
बिग बेन, हाउसेस ऑफ पार्लमेंट निरखत निरखत आम्ही नॉर्थ बँक म्हणजेच उत्तर काठावरून थेम्सच्या बाजूबाजूने चालत होतो. 'मोठं मोठं घड्याळ' मुलाला दाखवत असताना अचानक एक म्हातारी बाई आमच्या जवळ आली. काळा डगला घातलेली, भुर्या केसांची ती बाई 'पे फॉर द हॉस्पिटल! पे फॉर द हॉस्पिटल' असं म्हणत होती आणि समोरच्या एका हॉस्पिटलकडे बोट करत होती. प्रथम तिने मला एक कागदी गुलाबाचं फूल देऊन ते वाक्य म्हटलं. मी 'नो थँक यू' म्हणालो. ती पुन्हा तेच म्हणाली. या वेळी ती माझ्या अजून जवळ येऊन हे बोलली. तोंडातून कसलातरी दर्प आला आणि मी मागे होत पुन्हा थँक यू म्हणालो. मग ती बाजूला उभ्या असलेल्या माझ्याबायकोकडे वळली आणि तिला काही कळायच्या आत तिच्या गालांची पापी घेतली. बायकोही चमकून मागे झाली. मी तिला खुणेने मुलाला घेऊन लांब व्हायला सांगितलं. आणि पुन्हा ती बाई माझ्याकडे वळली. मग मात्र आवाज चढवून मी मोठ्याने 'आय सेड थँक यू. प्लीज!' असं म्हणालो. मग काहीतरी पुटपुटत माझ्याकडचं ते कागदी फूल परत घेऊन ती बाई लांब गेली. हे सगळं जेमतेम ३० सेकंदात झालं. ती बाई इतक्की किळसवाणी होती की पुढची पंधरा मिनिटं बायको फोटोत हसतच नव्हती. 'तिने माझी पापी घेतली! शी! किती घाणेरडी बाई होती ती!.... इत्यादी.
| लंडन आय |
थेम्सचे, लंडन आय चे, अर्थातच बिगबेन, हाउसेस ऑफ पार्लमेंटचे फोटो काढून आम्ही वेस्टमिन्स्टर पिअर वरून ग्रीनिच ला जाणारी बोट पकडली. सुंदर स्वच्छ बोटीच्या लोअर डेकमधे आम्ही बसलो. तसंही ऊन फार होतं, आणि लोअर डेक मधे आत खान-पानाची सोय होती त्यामुळे आम्ही लोअर डेकलाच पसंती दिली. मुलगा झोपला होता त्यामुळे आम्ही मस्त कॉफी, मफिन वगैरे घेऊन बसू असं म्हणून एका टेबलावर सामान ठेवलं. मी कॉफी आणतोय इतक्यात मुलगा उठला होता. टेबलवर बसून हे बघ ते बघ चालू होतं. माझं लक्ष टेबलवर गेलं आणि मला काहीतरी ओलं दिसलं. निरखून बघितल्यावर कळलं की मुलाचा प्रोग्रॅम झाला होता. डायपर असूनही हे कसं झालं या विचाराने हायपर न होता आम्ही शिस्तीत कॉफी वेगळ्या टेबलवर ठेवली आणि साफसफाई ला लागलो. टिशू आणले, शिवाय टॉवेल होताच. हे सगळं होतंय तोच आमच्या लक्षात आलं, 'पँट कुठेय पण आपल्याकडे बदलायला?' आमच्या रोजच्या बॅगेत दोन टीशर्ट असायचे कारण सांडायची, उलटी व्हायची शक्यता विचारात घेतलेली होती. डायपर असल्याने पँटही घ्यावी लागेल असं गावीच नाही त्यामुळे आता पेच उभा राहिला होता.
| बोटीच्या आतली व्यवस्था |
ग्रीनिच पर्यंत फक्त डायपरवरच, आणि शालीने लपेटून मुलाचा प्रवास झाला. पण ती शाल काही तो ठेवून घेईना पायांवर. मग ग्रीनिचच्या टूरिस्ट इन्फॉर्मेशन डेस्कवर जाऊन मी 'इज देअर अ शॉप निअरबाय व्हेअर आय कॅन गेट क्लोथ्स फॉर द किड्स?' असं विचारलं. काउंटरवरच्या बाईने 'अं... वेल...' असं म्हटलं पण जवळच एक किड्स शॉप आहे असं सांगितलं. मग आम्ही ग्रीनिचमधल्या त्या किड्स शॉप मधून १३ पाउंडाला एक पँट घेतली. नंतर झालेला उलगडा असा की ती मेड इन इंडिया होती. तर अशा प्रकारे लेसन ऑफ द डे, 'मुलाचा कपड्यांचा एक संपूर्ण संच सोबत बाळगणे' शिकून आम्ही ग्रीनिच भटकंतीला सुरुवात केली.
| कटी सार्क नावाची ही बोट ग्रीनिच बंदरावर तुमचं स्वागत करते |
| ग्रीनिच टाऊन अतिशय सुरेख वाटलं मला. छोटंस, कॉम्पॅक्ट, आणि लाइव्हली |
| ग्रीनिच बंदर |
| नॅशनल मॅरिटाईम म्युझियम |
| म्युझियमचा परिसर. इथूनच एक चढाची वाट रॉयल ऑब्झर्वेटरीकडे जाते |
| ग्रीनिचवरून दिसणारी स्कायलाईन |
कार्यक्रम लवकर आटपता घेऊन डीएलआर म्हणजेच चालकरहित ट्रेनने आम्ही टॉवर हिल ला आलो. टॉवर हिल हे टॉवर ब्रिज व टॉवर ऑफ लंडनला जाण्यासाठी जवळचं स्टेशन आहे. मग टॉवर ब्रिजच्या जवळ मोकळं धावता खेळता आल्यावर मुलाची कळी खुलली. आम्हीही निवांत बाकावर बसून गप्पा मारल्या, खादाडी केली आणि मग टॉवर ब्रिजचे अंधारातले फोटो काढून परतीच्या ट्रेनमधे बसलो.
| लंडन वॉल |
| टॉवर ब्रिजची कमान |
| संधिकाली या अशा |
| टॉवर ब्रिज |
| द शार्ड - युरोपातली चौथ्या क्रमांकाची उंच इमारत |
दीड एक तासाचा लांब प्रवास करून अक्सब्रिजला पोचलो आणि एका हॅपनिंग डे ची अखेर झाली. पुढच्या दिवशी आम्ही जवळच असलेल्या एका निसर्गरम्य ठिकाणी जाणार होतो.
रायस्लिप लिडो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट
लंडन अॅट्रॅक्शन्स चा तुम्ही गूगलवर शोध घेतलात तर कदाचित रायस्लिप लिडो ही जागा तुम्हाला दिसायची नाही. पण एखाद्या ठिकाणी स्थायिक असलेल्या माणसांना या अशा अप्रचलित रत्नांची बरोब्बर माहिती असते. बिग-बेन, टॉवर ब्रिज आणि ग्रीनिच अशा भरभक्कम प्रोग्रॅमनंतर दुसर्या दिवशी हलकं-फुलकंच काहीतरी हवं होतं. रायस्लिप लिडो वॉज जस्ट परफेक्ट.'काय आहे रायस्लिप लिडो?' असं विचारल्यावर माझा भाऊ मला सांगत होता. 'एक तलाव आहे, आणि त्याच्या काठावर कृत्रिम बीच तयार केलेला आहे. समुद्रासारखी वाळू टाकून एक मोठा बीचसदृश भाग बनवलेला आहे. शिवाय हा तलाव व त्याच्या आसपासचा एकून ६० एकरचा निसर्गरम्य परिसर आहे.' आम्ही गाडी पार्किंगमधे लावली. गार, मंद वारा, मोकळा गवताचा गालिचा, कडेला गर्द झाडी, आणि मधोमध तलाव हा सगळा परिसर बघूनच एक वेगळा तजेला आला.
इथे एक हॉटेलही आहे जिथे ब्रेकफास्ट, स्नॅक्स, चहा-कॉफीची झकास सोय होते. आम्ही ब्रेकफास्ट करूनच आलो असल्याने निवांत फेरफटका मारायला सुरुवात केली. इतका प्रचंड भाग असूनही एकही कोपरा दुर्लक्षित दिसत नव्हता. हे सगळ्या लंडनचंच वैशिष्ट्य असल्याचं जाणवलं होतं. कुठल्याश्या कोपर्यात असलेल्या बाकाबाजूलाही डस्ट्बिन असणं, 'या ट्रॅकवर कुणीही जात नसावं' असं म्हणताच चार पावलांनी तिथे एखादा मॅप किंवा साइनबोर्ड दिसणं ही काही उदाहरणं.
इथला तलाव अतिशय सुरेख आहे. काठावर ठिकठिकाणी बदकं असतात. इथे कुठल्या कुठल्या जातीची बदकं आहेत यांचाही तक्ता लावलेला आहे. मी सरसकट सगळ्यांना बदक म्हणत असलो तरी त्यांची नावं वेगवेगळी आहेत. इतकंच नव्हे तर प्रत्येक बदकाला टॅगिंग केलेलं आहे.
माझा भाऊ आणि मुलगा यांची इथे भारी गट्टी जमली होती. पकडापकडी, बदकांना हात लावणं, खायला देणं, चक्रात बसणं, झोपाळा, घसरगुंडी... नुसतं बागडणं चालू होतं. मी माझी बायको व बहीणही गप्पा मारत होतो, सायकल चालवत होतो. एकंदर मजा मजा चालू होती. हा दिवस असाच व्यतीत केला.
पुढच्या दिवशी आम्ही थोडंफार शॉपिंग करायचं म्हणून ऑक्स्फर्ड स्ट्रीट ला जायचं ठरवलं.
ऑक्सफर्ड स्ट्रीट एक अतिशय गजबजलेला रस्ता असून तिथे सोव्हिनियर्स, आणि इतर बर्याच गोष्टींची दुकानं आहेत. थोडक्यात फेरफटका मारण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी उत्तम जागा आहे. आम्हाला नेमकं हेच हवं होतं. त्यामुळे आवरून-खाऊन आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीटला जायला निघालो.
ट्यूबने जायची आता व्यवस्थित सवय झाल्यामुळे मजा येत होती. ऑयस्टर कार्ड पंच करा, जिना/लिफ्ट ने प्लॅटफॉर्मवर जा, मेट्रोपॉलिटन लाईन, जुबिली लाईन, सेंट्रल लाईन सगळं सवयीचं वाटायचं. मुलालाही कुकगाडीत बसायचं म्हटलं की त्याचा चेहरा खुलायचा. आम्ही प्राम घेऊन सगळीकडे अगदी लीलया फिरत होतो. फक्त अधेमधे प्राममधे बसून सहाजिकच मुलाला कंटाळा यायचा. मग थोडं कडेवर घे, थोडी चालीचाली कर असं आमचं फिरणं चालायचं.
ऑक्सफर्ड स्ट्रीट जरा अंमळ गजबजलेलाच भाग आहे. त्यामुळे तिथे मात्र प्राममधे मुलाला ठेवून चालणं जरा जिकिरीचं होत होतं. मग त्याला कडेवरच घेऊन मार्ग्रक्रमण सुरू केलं. इथे एक 'लश' नावाची आरोग्य आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानाची शृंखला आहे. तिथे अप्रतिम हँडमेड साबण मिळतात. तिथे आम्ही बराच वेळ घालवला. पुढे असंच विंडो शॉपिंग करत करत संध्याकाळचा पीक अवर संपेस्तोवर आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीट ला होतो.
लंडनमधले अवघे तीन दिवस उरले होते. 'आता अजून काही घ्यायचं बाकी नाही राहिलंय ना?...' आटपाआटपीकडे रोख असलेला प्रश्न पडला. पण लगेच 'अजून तीन दिवस आहेत. आरामात' असं म्हणून आपलीच समजूत काढली आणि बरीटो खात आम्ही पुन्हा अंडरग्राउंडच्या दिशेने निघालो.
ऑक्सफर्ड स्ट्रीटचा भरगच्च दिवस झाला म्हटल्यावर पुढच्या दिवशी काहीतरी साधं, सोपं, जवळचं करायचं होतं. मग चेरी पिकिंगला जायचं ठरलं. अक्सब्रिजच्या जवळच कोपाज फार्म नावाची जागा आहे. त्या दिशेने आमच्या गाड्या वळल्या. त्या दिवशी सुट्टीचा वार असल्याने ट्यूबला डच्चू होता. आम्ही सहकुटुंब कोपाज फार्ममधे पोचलो.
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी पिकिंग केल्याचं आठवत होतं त्यामुळे हे थोडंसं मोठं असेल असं एक ढोबळ चित्र मनात रेखाटलं. पण आत शिरल्यावरच ते चित्र गुंडाळून ठेवायला लागलं कारण हे प्रकरण ‘थोडंसं’ नाही तर प्र-चं-ड मोठं होतं. कितीतरी एकरावर ते पसरलेलं असेल. आणि फक्त चेरी किंवा स्ट्रॉबेरी नाही तर हर त-हेची फळं, भाज्या इथे होत्या. इथल्या आणि आजवर ऐकलेल्या पिकिंगच्या नियमात एक मोठा फरक होता. बाकी ठिकाणी तुम्ही खाऊ कितीही शकता, पण बाहेर न्यायला वजनावर पैसे आकारले जातात असं ऐकलं होतं. इथे तुम्हाला खायला मनाई असल्याचा इशारा लावलेला दिसला.
तगडीशी प्रवेश फी देऊन आम्ही शेतात गेलो. नजर पोचेल तिथपर्यंत हे शेत पसरलेलं होतं. लंडनमधल्या या प्रकारच्या ठिकाणी एक गोष्ट स्तुती करण्यासारखी असते. की कमर्शियल करायचं म्हटलं की मग १००% कमर्शियल विचार केलेला असतो. त्यामुळे कोपाज फार्मचा पार्किंग लॉट त्यातल्या स्ट्रॉबेरीच्या मळ्याइतकाच मोठा ठेवलेला होता. आमच्यासोबत तुरळक गर्दी होती. चेरी, स्ट्रॉबेरी, वाइल्डबेरी, सफरचंद असं करत करत आम्ही भाज्यांपर्यंत पोचलो. लहान मुलासारखं ही भाजी तोडूया की ती भाजी तोडूया, असं होत होतं. अप्रतिम नियोजन केलेलं हे शेत मला अतिशय आवडलं. मग सगळं पिकिंग करून भरलेल्या हातांनी बिलिंगपर्यंत आलो. घरून आणलेली चविष्ट न्याहारी केली आणि निवांत घराकडे निघालो, आज तिथून घेतलेल्या वाइल्ड्बेरीजचं काय करायचं याचे बेत आखत.
टूरिस्टी अॅट्रअॅक्शन्सचा अट्टाहास आम्ही केलाच नव्हता. पण तरीही एक अजेंड्यावर असलेली जागा बघायची राहिलेली होती. विंडसर कासल. कासल हा प्रकार फारच ग्रॅंड आहे. आपल्याकडे महाराजांचे अनेक किल्ले मी बघितले. ते बुलंद आहेतच. पण कासल, किंवा राजस्थानमधे हवेल्या बघताना भारावून जायला होतं. म्हणजे राजगडाच्या बालेकिल्ल्यावर गेल्यावर महाराजांचं, मावळ्यांचं शौर्यच आठवतं, पण विंडसर कासल बघताना विलियम द कॉंकररच्या वैभवाचीच कल्पना येते. तिथे शौर्याचा विचार होत नाही; कदाचित तो इतिहास आपल्याला माहित नाही म्हणून असेल, पण तरीही नाही.
उंचच उंच तटबंदी, पिवळसर रंगाच्या विटांनी तयार झालेली भिंतीवरची नक्षी, दिमाखदार अशी ती वास्तू, त्यावर रुबाबात फडकणारा झेंडा, हे सगळं बघत आम्ही फेरफटका मारत होतो. राणीचा मुक्काम असेल तेंव्हा तिथे झेंडा असतो आणि नसेल तेंव्हा नसतो. त्यामुळे राणीचं वास्तव्य आम्ही गेलो असता तिथे होतं. समर मधे राणी विंडसर कासल ला राहते म्हणे. एक एक दालन बघत, आम्ही फिरत होतो. आमच्या कॅमेराची बॅटरी तितक्यात संपली. त्यामुळे विंडसरचे विशेष फोटो आले नाहीत. आणि आमच्या युवराजांनाही विंडसरमधे फार रस न वाटल्याने झरझर पुढे सरकत आम्ही कार्यक्रम आटपला.
लंडनवारीचा फक्त एक दिवस राहिला होता. आता लंडनची एक महत्वाची गोष्ट बघायची राहिलेली होती. ‘लाल लाल बस; डबलडेकर’; जिला चित्रांच्या पुस्तकापासून आम्ही फॉलो करत एवढा प्रवास करून आलो तिच्यात बसायचंच मुळी राहिलेलं होतं. त्यामुळे मग शेवटच्या दिवशी फक्त एक हायस्ट्रीटची सैर आणि डबलडेकरने प्रवास इतकाच कार्यक्रम ठेवला. त्या बसमधे बसल्यावर मुलाला जो आनंद झालाय, तो विंडसर कासलपेक्षाही ग्रॅंड होता. मस्त पैकी पाउण एक तास त्या बसमधून फिरलो, थोडं अक्सब्रिज हायस्ट्रीटवर भटकलो आणि ‘बॅगा पॅक करायला हव्यात’ म्हणत घराकडे आलो.
लंडन अतिशय सुरेख शहर आहे. तुम्ही लंडनच्या नक्कीच प्रेमात पडू शकता आणि जरी या शहराने तुम्हाला प्रेमात पाडलं नाही तरी एकदा तिथे राहिलात की बाकी कुठल्या शहराच्या प्रेमात पडणं जरा कठीण होईल. इथेही गर्दी आहे, पण फक्त गर्दीच्या ठिकाणी. एरवी घरात तुम्हाला शांतता म्हणजे शांतता मिळते. प्रत्येक गोष्ट अतिशय सिस्टिमॅटिक आहे, नियोजित आहे आणि प्रत्येक गोष्टीत वापरणा-याची सोय बघितलेली आहे त्यामुळे फार त्रास होत नाही. आम्हाला भेटलेली लंडनची लोकं तरी खूप चांगली होती, न मागता मदत मिळाली पण खडूसही लोकं आहेत खूप असं कळलं, ते काय, चालायचंच. लंडन कमालीचं महाग आहे त्यामुळे इथे फिरायला जाताना बजेट ओव्हरशूट होण्याची खात्रीच ठेवावी. हे सर्वसामान्य माणसाला दिसणारं लंडन झालं. पण तुम्हाला जुन्या लंडनची जीवनशैली बघायची असेल तर कंट्रीसाइडला एक विझिट नक्की द्या. जमल्यास बेड अॅंड ब्रेकफास्ट मधे रहा एखाद्याकडे. आम्ही पुढच्या ट्रीपमधे ते नक्की करणार आहोत. आणि हे कुठल्याही जागेला लागू होतं खरं तर, पण बकिंगहॅम पॅलेस आणि टॉवर ब्रिज च्या पलिकडे बरंच लंडन आहे पण ते बघण्यासाठी तुम्हाला टूरबरोबर येऊन जमायचं नाही. आणि त्यातून १० देश, १५ देश अशा हायलाइट असलेली टूर घेतली तर नाहीच नाही. आमच्यासारखं कुणी आपलं तिथे रहात असेल तर फारच उत्तम. अर्थात, हा आवडीचा, स्वभावाचा प्रश्न आहे पण आमचं विचाराल तर ‘लंडनमधेच बघायला इतकं आहे की तुम्ही अजून पॅरिस, स्कॉटलंड वगैरे ठेवू नका’ असा मिळालेला आपुलकीचा सल्ला आम्हाला पदोपदी पटत होता. अजून बरंच लंडन बघायचं राहिलंय. पुढच्या वारीत. तेंव्हा मुलगाही जरा अजून मोठा असेल, या वेळी न कळलेल्या गोष्टींचा तो तेंव्हा आनंद लुटू शकेल.
लंडन एअरपोर्टवर मुंबई एअरपोर्टसारख्याच भावना मनात होत्या. फक्त मुंबईला कुरकुरीची जागा हुरहुर घेत होती, आणि आता हुरहुरीची जागा पुन्हा कुरकुर घेणार होती. पुन्हा येऊ म्हणून आमच्या तिकडच्या मंडळींना निरोप दिला आणि विमानाच्या दिशेने निघालो.
"When a man is tired of London, he is tired of life; for there is in London all that life can afford." - Samuel Johnson
शेरलॉक होम्स म्युझियम
221 ब, बेकर स्ट्रीट- बहुधा जगातील सर्वात प्रसिध्द पत्ता! शेरलॉक होम्स या पत्त्यावर १८८१-१९०४ या काळात राहत असे आर्थर कोनन डॉयल यांच्या साहित्यात वर्णन आहे.
शेरलॉक होम्स कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक वातावरण तयार
होते..मागच्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, जुने रस्ते, विक्टोरिया, पावसाळी
कुंद वातावरण आणि शेरलॉक होम्स आणि इतर पात्रांचे स्टायलीश संवाद. खिळवून
ठेवणारे कथानक. त्याचे अजब तर्क आणि वेगळा विचार करायची पद्धत! काल्पनिक
आहे माहित असून कधीतरी पहायला हवे असे वाटणे. हेच ऑर्थर कोनन डॉयल चे
वैशिष्ट्य. रहस्यकथा वाचायची आवड असलेल्या प्रत्येकाला कधीतरी शेरलॉक होम्स
वाचायचे चे वेड लागतेच. मग इतकं वेड जगभरातल्या लोकाना आहे तर असे एक घर
तयारच का करू नये? झालं कल्पना सुचली आणि अमलात पण आली. आणि साकारलं एक
सुंदर संग्रहालय..
१९९० साली हे सुरु झालं असलं तरी २२१ ब हा (खरा तिथला नसलेला )पत्ता
मिळवायला निर्मात्यांना बराच त्रास पडला. मुळात हे घर २३७ आणि २४१
क्रमांकाच्या घरांमध्ये आहे. शेरलोक होम्स आणि डॉ. वाटसन हे मिसेस हडसन
च्या गेस्ट हाउस मध्ये भाडेकरू होते असे लिहिले गेले होते. गेली ऐंशी वर्षे
शेरलोक होम्स साठी येणारी जगभरातली पत्रं Abbey National ही बँक पहात असे.
कारण हा त्यांचा खरा पत्ता ! हल्ली ही पत्रे थेट संग्रहालयाला मिळतात.रॉयल
मेल अर्थात ब्रिटीश पोस्टाने लोकप्रियता पहाता ते मान्य केले
एकदा या प्रसिद्ध पत्त्यावर भेट द्यायची खूप इच्छा होती. जालावर समजलं की
नाताळ चा दिवस सोडून वर्षभर साडेनऊ ते सहा हे संग्रहालय सुरु असते. मादाम
तुसाद्स संग्रहालयामागे चालताना अगदी समोरच हेही संग्रहालय आहे. एकदा
पहावेच असे सन्ग्रहालय आहे.
एकदा बेकर स्ट्रीट ला गेल्यावर विचारायला पण लागत नाही. महाशय आपला तोच पाईप घेऊन स्टेशन समोर स्वागताला उभे! इथून अवघ्या दोनशे पावलांवर २२१ ब बेकर स्ट्रीट!
शेरलॉक होम्स यांचे कार्ड…त्यावर फोन नंबर नाही!
या जुन्या घराच्या तळमजल्यावर प्रवेशिका घेऊन रांगेत उभे राहिलो. सगळीकडे पारंपारिक इंग्रजी वेषातील कर्मचारी पाहून छान वाटते.
घराबाहेरच एक गार्ड स्वागतासाठी उभा आहे. हाच तिकिटे पाहून आत सोडायचे काम करतो.
हे एक जुने घर असल्याने एकाच दारातून आत बाहेर जावे लागते. एका वेळी
फक्त दहा-पंधरा व्यक्ती आत जातील हे तो पहातो. त्यामुळे पंधरा मिनिटे
रांगेत वाट पहावी लागते.
मग प्रवेश मिळाला अन एक खजिनाच उघडल्याचा भास झाला. पहिल्या मजल्यावर मूळ
कथेतील घराप्रमाणे खोल्या सजवल्या आहेत. त्यावर दोन मजले तत्कालीन इतर
वस्तू , व्यक्ती आणि प्रसंगांवर आधारित आहेत.
इथे तर डॉ वाटसन किंवा शेरलॉक होम्स येऊन 'हेलो! इथे काय करतोयस?'’ विचारतील असे वाटले.
गुप्तहेराची छोटीशी प्रयोगशाळा
जमवलेले पुरावे
आर्थर कोनन डॉयल यांचे हस्तलिखित
'Man with twisted lip’ डॉयल यांची एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा.. मेणाच्या पुतळ्याच्या रुपात...
काही वेळा केवळ तीन मजले भरायचे म्हणून उगाचच काही वस्तू गोळा केल्या असे वाटते अन तेव्हढेच खटकते. उदा. शिवण यंत्र , व्हायोलीन वगैरे!
या घराच्या तुलनेत जे होम्स पट आले त्यात बऱ्यापैकी मोठी घरे दाखविली
आहेत आणि ती कथेला अनुरूप पण वाटतात. पण अधिकृत घर मात्र असं आहे.
शेवटी आपल्याकडे असे संवर्धन का करून ठेवले जात नाही हा प्रश्न पडतोच.
व्यवस्थित तिकीट विकत घेऊन पहायला लोक तयार असतात. पण आधी ते तयार तर केले
पाहिजे ना?
भारतात मोजके सन्माननीय अपवाद वगळता संग्रहालय म्हणजे केवळ पुरातन अवशेष
दाखवले जातात. काही नवीन भर टाकून ते चांगले करता येईल. पुण्यातले केळकर
म्युझियम आणि रेल्वे म्युझियम असे वैयक्तिक संग्रह सोडले तर आवर्जून पहावे
असे काही निर्माण झाले नाही. आणि इथे तर अस्तित्वात नसलेल्या, केवळ
साहित्यिक अस्तित्व असलेल्या व्यक्तित्वाचे, त्यातल्या पात्रांचे संग्रहालय
बनवले आहे! आणि त्यासाठी वेड असावं लागेल नव निर्मितीचं ..
अवांतर: डॉयल साहेबांनी लिहिलंय शेरलॉक (अर्थात फिक्शन) स्कॉटलंड यार्डचा 'कन्सल्टींग डिटेक्टीव्ह' होता. सदानंद मोरेंच्या 'लोकमान्य ते महात्मा' मध्ये मोरेंनी लिहिलंय स्कॉटलंड यार्डचा 221 बी बेकर स्ट्रीटवर रहाणारा हा डिटेक्टीव्ह, लंडनमध्येच असलेल्या 'इंडिया हाऊस'
मध्ये सावरकरांची रहाण्याची व्यवस्था झाल्यानंतर (लोकमान्य टिळकांचे
श्यामजी कृष्ण वर्मांना पत्र) स्वातंत्र्यवीर सावरकर करीत असलेल्या
ब्रिटीश राज विरोधातील कारवायांचा छडा लाऊ शकला नाही असे म्हणून मोरेंनी
विनोदाचा एक क्षीण प्रयत्न केला आहे.
वास्तवात
देखील इंडिया हाऊसवर स्कॉटलंड यार्डची नजर होतीच, यासाठी स्कॉटलंड
यार्डमधल्या अनुभवी अधिकार्यांची एक स्पेशल ब्रँच स्थापन करण्यात आली
होती. पण इंडिया हाऊसमध्ये होणार्या बैठकीत युरोपियनाला फक्त आमंत्रित
केले असेल तरच प्रवेश मिळत असे, म्हणून इंडिया हाऊसमध्ये ब्रिटीश राज
विरोधात शिजत असलेल्या कटांची माहिती यार्डपर्यंत पोहोचू शकत नसे. मग
यासाठी स्कॉटलंड यार्डने किर्तीकर नावाचे एक मराठी एजंट नेमले. हे महाशय
लंडनला वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते म्हणे - आणि यांनी लंडन
हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय शिक्षणाबाबत काही चौकशी केली तेव्हा स्कॉटलंड
यार्डने यांना सावरकरांचं अंतवर्तुळ भेदण्यासाठी फितवलं असावं, असा एक
अंदाज. (पहा: इंडिया हाऊसबाबतच्या विकी पानावरील स्कॉटलंड यार्ड हा
परिच्छेद). अर्थात हे किर्तीकर स्कॉटलंड यार्डचे घुसखोर आहेत हे
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नजरेतून सुटलं नाहीच - मग एका रात्री
सावरकरांनी लावलीन् या किर्तीकरांच्या छातीला पिस्तुल - आणि खरं काय आहे ते
वदवलं, अर्थात पिस्तुल लाऊन झाल्यानंतर सावरकरांनी योग्य ती समज दिली
असेलच. मग हे किर्तीकर सावरकरांचे स्कॉटलंड यार्डविरोधातील क्रॉस एजंट
म्हणून काम करु लागले - आणि किर्तीकरांचे स्कॉटलंड यार्डला जाणारे रिपोर्ट
खुद्द सावरकरच छाननी करुन पाठवू लागले ;-) एमपीटी आचार्य नावाचे आणखी एक
एजंट किर्तीकरांनी दिलेल्या रिपोर्टमधील माहिती (अर्थातच सावरकरांनी छाननी
करुन ;-) ) खरीखुरी आहे हे स्कॉटलंड यार्डला भासविण्यासाठी व्हीव्हीएस
अय्यर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमले.
फोटो अन माहिती आवडली.
शक्य आहे! पण व्हायोलीन त्यात येउ नये. खरं तर व्हायोलीन एकायला एवढं छान वाटतं हे "जर्मी ब्रेट" ची सिरियल पाहिल्यावरच कळलं. इथं एका. त्या सिरियल मधे, त्याचं खिडकीत उभ राहून ती व्हायोलीनची आर्त धून वाजवण्याने उदासवाणा क्षण अधिकच गडद व्हायचा.
बाकी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तर्कवेत्ता असलेला शेरलॉक होम्स हुबेहुब साकारणारा जर्मी (वर चित्रात दिसणारा) मात्र सामान्याहून कमी बुद्धिमत्तेचा होता हे वाचून विचित्र वाटलं. एनी वे, पण जर्मी ने शेरलॉकची भूमिका अजरामर केली.
बाकी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तर्कवेत्ता असलेला शेरलॉक होम्स हुबेहुब साकारणारा जर्मी (वर चित्रात दिसणारा) मात्र सामान्याहून कमी बुद्धिमत्तेचा होता हे वाचून विचित्र वाटलं.
कुठे वाचलंत?
He conducted extensive research on the great detective and Sir Arthur
Conan Doyle himself, and was very attentive to discrepancies between the
scripts he had been given and Conan Doyle's original stories.
http://en.wikipedia.org/wiki/Jeremy_Brett
जेरेमी जर सामान्य बुद्धीमत्तेचा माणूस होता तर त्याने खुद्द सर आर्थर
कॉनन डॉयल यांच्याबाबत, आणि त्यांनी निर्माण केलेल्या शेरलॉक होम्स या
पात्रावरदेखील संशोधन करुन ग्रॅनडा प्रोड्यूसर्सनी त्याला दिलेल्या पटकथेत
राहिलेल्या विरोधाभासावर त्याने सामान्य बुद्धीमत्तेच्या बळावर लक्ष दिलं
असेल असे वाटत नाही. सबब सुधीर काळे यांचे हे विधान पटले नाही.
जेरेमीबाबत एक अपघात निश्चित झाला होता. तो शेरलॉक होम्स या काल्पनिक
पात्रात अतिशय गुंतला होता, एवढा की जेरेमीचं वास्तविक जीवन त्यामुळे
विस्कळीत झालं.
It became difficult for him to let go of Holmes after work. He had always been told that the only way for an actor to stay sane was for him to leave his part behind at the end of the day, but Brett started dreaming about Holmes, and the dreams turned into nightmares.[15] Brett began to refer to Sherlock Holmes as "You Know Who" or simply "HIM": http://en.wikipedia.org/wiki/Jeremy_Brett
मधे हॅरी पॉटर विषयक एक फिरते संग्रहालय बघायचा योग आला. लहान मुलांसाठी पर्वणी होतीच. पण एक एक वस्तु बघताना, ते सिनेमा बनवताना किती मेहनत घेतली गेली आहे ते दिसते. तसेच जे के रोलींगच्या अदभूत कल्पनाविश्वाचे खरेच कौतुक वाटते.
कथेतल्या प्रत्येक पात्राची जादूची छडी त्यावरचे नक्षीकाम, हॅग्रीडची कुटी, डोलेरस अंब्रीजचे नेटके सुबक नक्षीदार टेबल, हॉरक्रक्स, गॉब्लेट, ट्रायविझार्ड कप, स्निच, भिंतीवर चालती बोलती चित्रे, मेजवानीचे पक्वान्न असलेला ग्रेट हॉल, दृक्श्राव्य माध्यमातुन पॉटर विश्वाची सफर मनोरंजक होती. नंतर डिसगस्टींग चव असलेले जेली बिन्स खाताना धमाल आली.
जेरमी ब्रेटवाल्या दूरचित्रवाणी मालिकेने अशीच भूरळ घातली होती. तुम्हाला हे संग्रहालय बघताना किती मजा आली असेल याचा अंदाज आहे.









No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.