Thursday, November 19, 2020

हिमाचल प्रदेश

 मु.पो.सांगला, किन्नर कॅंप्स  

 फिरायला जायचं ठरवलं तेव्हा दोघांच्याही डोक्यात आणि मनात बरेच विचार होते . शांत पण निसर्गयरम्य ठिकाणी जायचं. अगदी जिथे वायफाय सोडा मोबाईलची रेंज सुद्धा नाही आली तरी चालेल. खूप गर्दी नको पण सुरक्षित सुद्धा हवं. काही वेगळं ट्राय करता आलं तरी हरकत नाही. तीच ती मोठाली हॉटेल्स , तेच ते खाणं या सर्वापासून काहीतरी वेगळं असं ठिकाण आम्ही शोधत होतो. सगळ्यांनी नेहमीची सगळी ठिकाण सांगून बघितली. कुणी केरळ ला जायचा सल्ला दिला तर कुणी शिमला मनाली सुचवलं. काहींनी परदेशात जायचा सल्ला दिला. यातील एकही ठिकाण आमच्या पसंतीस उतरत नव्हतं. कारण हि सगळी टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन झालेली आहेत. गर्दी ,त्यामुळे होणारा त्रास , न मिळणारा एकांत, फेमस नावाखाली दुकानदारांची चाललेली लूटमार , प्रशासनाच्या गैरसोयी यातील कुठलाही त्रास करून घेऊन मला माझा संयम घालवायचा नव्हता. त्यामुळे सुचवणाऱ्यांच्या यादीतील एक एक ठिकाण आम्ही बाद करत होतो. शेवटी एक मित्र मदतीला आला. तो countryside या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करतो. तो अशाच वेगळया टूर्स घेऊन जातो. आम्ही ग्रुप मधून न जाता फक्त दोघांनी जायचं ठरवलं होत तर त्याने सगळी बुकिंग करून दिलंन. त्याने सांगितलेल्या ठिकाणाचं नाव होत सांगला, हिमाचल प्रदेश !
नेहमीच्या ऐकलेल्या नावांमध्ये हे नाव नव्हतं त्यामुळे जरा उत्सुकता होती पण हिमाचल प्रदेश म्हटल्यावर परत एक शंका आली कि गर्दीची. मग गुगल बाबाला विचारलं कि या आमच्या मित्राने सुचवलेलं हे ठिकाण आहे तरी कुठे?, दिसत तरी कसं?, जाऊन आलेले लोक काय म्हणतात त्याबद्दल?, फोटोत कसं वाटतंय गाव? गुगल बाबाने जराही वेळ न दवडता सगळ्या प्रश्नांना पटापट उत्तर दिली. सांगला हे हिमाचल प्रदेश मधलं तिबेट च्या सीमेलगतच छोटस गाव. शिमला पासून साधारण ८ तासाच्या अंतरावर. खरं तर करण्यासारखं किंवा खूप काही बघण्यासारखे पॉईंट्स असं इथे काही नाही. तरीहि मूळचा निसर्गच इतका सुरेख आहे कि बाकी कशाची गरजच लागत नाही. मुद्दाम तयार केलेले अम्युझमेंट पार्क किंवा सनराईज /सनसेट पॉईंट यातलं काहीही तिथे नव्हतं .
पण सुंदर निसर्ग आणि शांतता मात्र भरपूर होती. नेट वर वाचलेल्या प्रतिसादांमध्ये या ठिकाणाबद्दल चांगलेच मत होत. क्वचितच ज्याला फक्त मॉल मध्ये फिरायची नि शॉपिंग ची हौस अशांनी दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया होत्या. अन्यथा सगळ्या चांगल्या प्रतिक्रिया होत्या . फोटो मध्ये सुद्धा बघून ठिकाण आवडलं . आमची राहायची सोय किन्नर कॅम्प या ठिकाणी असणार होती. इथे मुक्काम तंबूत असणार होता. हेही काहीतरी वेगळं आवडलं होत. वाचलेल्या सगळ्या प्रतिसादांमध्ये किन्नर कॅम्प बद्दल खूपच चांगलं मत व्यक्त केले होते. तिथलं राहणं आणि खाणं दोन्ही खूपच चांगल्या दर्जाचं असल्याचं जाऊन राहून आलेल्यांचे म्हणणं होत. एकूण सगळ्या आमच्या अपेक्षांना उतरेल असं हे ठिकाण आम्ही जाण्यासाठी पसंत केलं .
आमच्या या ट्रिप मध्ये मोठा मुद्दा होता प्रवासाचा. कोकणातल्या आमच्या गावाहून म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका टोकाकडून हिमाचल प्रदेश च्या शेवटच्या टोकाला जायचं हा प्रवास फारच लांबलचक होता. आमचा प्रवास थोडक्यात असा होता - चिपळूण ते मुंबई , मुंबई ते चंदीगड, चंदीगड ते नारकंदा ,नारकंदा ते सांगला . प्रवासाला एकूण ३ दिवस लागले. अर्थात आम्ही फार आरामशीर प्रवास केला. चिपळूणहुन मुंबईला जाऊन काही भेटीगाठी घडल्या. दुसऱ्या दिवशी मुंबई चंदीगड विमान प्रवास . तिथे टूरचा माणूस गाडी घेऊन आणायला आला होता. इथून पुढे चंदीगडला परत येईपर्यंत स्विफ्ट डिझायर मधून सगळा प्रवास होणार होता. ड्राइवर आणि गाडी पूर्णवेळ आमच्या दिमतीला होती. चंदीगड हुन प्रवास सुरु झाला तो मध्ये शिमला लागलं म्हणून तासभर तिथे घालवून पुढे गेलो आणि नारकंदा ला येऊन राहिलो. चंदीगड ते नारकंदा साधारण ८ तासच अंतर आहे. एक रात्र तिथे घालवून दुसऱ्या दिवशी पुढे ५ तास प्रवास करून सांगला या ठिकाणी पोहोचलो.
थोडक्यात सुरवात आमच्या सांगला ट्रिपची. चंदीगड पासून सुरवात. चंदीगडला टूर एजन्सी चा माणूस कम ड्राइवर आम्हाला आणायला गाडीसह आला होता. त्याच नाव भीमसिंग. नाव भीम असलं तरी देहाने हा माणूस विदुराच्या जवळपास सुद्धा नव्हता. अगदीच किरकोळ शरीरयष्टी आणि बेताचीच उंची असलेला हा माणूस स्वभावाने फारच नम्र होता. ४ दिवसांच्या सहवासात आम्हाला हा माणूस आवडून गेला. ड्राइवरला शोभेल अशी उगाच बाष्कळ बडबड नाही कि भोचकपणे प्रश्न विचारणे नाही. विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरे देत होता. शांत माणूस होता एकदम. जिथे लागेल तिथे तो माहिती द्यायचा. आम्ही नाश्त्यासाठी कुठल्याही हॉटेल वर थांबायला सांगितलं तरी त्याची ना नसायची. तो म्हणेल तिथेच, कुठल्यातरी महागड्या हॉटेलात न्यायचं, आम्ही बिल भरतोय म्हणून उगाच वाटेल तेव्हढं खायचं असले कोणतेही प्रकार त्याने केले नाहीत. आम्ही जागोजागी फोटो काढायला थांबलो, त्याने कधी कुरकुर केली नाही वेळेची. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल असेल तर ती म्हणजे त्याचा गाडीवर असलेला ताबा अर्थात कंट्रोल. गाडी कधी आचके देऊन बंद पडली नाही कि अचानक सुरु झाली नाही, स्पीड कधी लिमिट च्या बाहेर गेला नाही, अगदी घाटात आणि अवघड वळणार वर सुद्धा त्याची गाडी इंचभर सुद्धा इकडची तिकडे हलली नाही. मोठे मोठे आणि भीतीदायक असे तिथले घाट होते. एखाद्या वळणावर एका वेळी एखादीच गाडी पास व्हायची. पण त्याचे गाडी चालवायचे कौशल्य खरंच वाखाणण्यासारखे होते. आम्ही ४/५ वेळा आग्रह करूनही तो कधी आमच्या बरोबर जेवायला बसला नाही. शेवटी आम्ही तो नाद सोडून दिला. कदाचित आलेल्या टुरिस्ट बरोबर बरोबरीनं न वागण्याची सवय असावी. अत्यंत नम्र आणि मितभाषी असा हा ड्राइवर आमच्या ट्रिपचा एक महत्वाचा भाग बनून गेला .

क्रमशः

 चंदिगढ ला भीमसिंग ने आम्हाला वेलकम केले . तिथून पुढे सुरु झाला आमचा सांगला पर्यंतचा प्रवास गाडीने . साधारणपणे १० तासाचा प्रवास आहे . पण आम्ही पूर्ण प्रवास एका दिवशी न करता मध्ये एक रात्र नारकंदाला विश्रांती घेऊन केला . चंदिगढ ते सांगला हे अंतर साधारण ३३५ किमी आहे . दिसायला हे अंतर कमी दिसलं तरी जास्तीत जास्त प्रवास हा अवघड वळणे आणि अरुंद आणि कठीण अशा घाटातून असल्याने प्रवासाला वेळ लागतो . आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या या लांबलचक प्रवासाला सुरवात झाली . भीमसिंगअतिशय व्यवस्थितपणे , कोणत्याही नियमांचे उल्लंघन ना करता गाडी चालवत होता . एकीकडे आम्हीच त्याच्याशी गप्पा सुरु केल्या . चंदीगडहून आम्ही साधारण १०. ३०च्या सुमारास निघालो असू . मग २ वाजता मध्ये शिमला खूप लोकप्रिय ठिकाण लागल्याने भीमसिंग ने आम्हाला तासभरासाठी शिमला फिरायला सोडले . तेव्हढ्यात आम्ही शिमला दर्शन उरकून घेतले . तिथेच एक हॉटेल मध्ये जेवून घेतले आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो .
हिमाचल प्रदेश या राज्याला देवभूमी असं टोपणनाव आहे . ते असं का आहे हे तिथे गेल्यावर समजतं . जिथे जाऊ तिथे देऊळ . रस्त्याच्या कंठायाही वळणावर देऊळ . वेगवेगळ्या देवांचं संमेलन भरवावं इतके देव आणि त्यांची देवळं इथे होती . कदाचित पुण्यातल्या गणपती आणि मारुती पेक्षाही जास्त प्रकारची देऊळं इथे होती . लोक भक्तिभावाने थांबत होती ,नमस्कार करत होती , प्रसाद वाटत होती . आमच्या भीमसिंग ने पण रस्त्यातल्या २/३ ठीकाणी थांबून नमस्कार केलंन . आम्ही गाडीतून उतरून आजूबाबाजुच निसर्गसौंदर्य बघत होतो . मुळातच देवळात जायची हौस दोघानांही नाही त्यामुळे रस्त्यातल्या एवढ्या देवळांना कोण भेट देणार असं आमचं झालेलं . आम्ही देवळात गेलो नाही तरी भीमसिंग ने आम्हाला प्रसाद मात्र आणून दिला . मला खार तर असे देवळातले प्रसाद खान पण जीवावर येत . डालडा तुपातला शिरा , टोपण राव न भाजलेला , नीट न शिजलेला असा तो प्रसाद खान माझ्या जीवावर येत पण भीमसिंगने एवढ्या श्रद्धेने आणून दिला म्हणून मी खाल्ला . एखाद्याच ठिकाणी मला आवडला नाही . बाकी सगळीकडे छान होता प्रसाद . या दुर्गम भागातली अवघड वळण पार करताना जवळजवळ प्रत्येक वळणावर कुठलातरी देव उभा असायचा . कधी वाटायचं या अशा अवघड रस्त्यावरून जायचं म्हणजे परीक्षाच होती . कधी समोरून येणाऱ्या गाडीमुळे अपघाताची भीती तर कधी दरड कोसळण्याची भीती . अशा वेळी रस्ते सुधारण आणि सोयीसुविधा निर्माण करणं सरकार ला तर शक्य होणार नाही . मग कुठल्या पक्षाचं का सरकार येईना. मग अशा वेळी सर्वना देवावरच भरोसा ठेवून जगायला लागत असेल . सरकार मारी त्या देवचं तारी .
इथले रस्ते मात्र खरोखरच खूप वाईट अवस्थेत आहेत . मोठ्या शहरांना पक्क्या सडकेने जोडले आहे पण शहर सोडणं जरा आत जावं तर कच्चा रास्ता सुरु होतो . आपल्याकडे कच्चे रस्ते लाल रंगाचे असतात इकडे ते पांढऱ्या रंगाचे असतात एवढाच फरक . जवळजवळ एकेरी वाहतूक होईल असे रस्ते . आमचा ड्राइवर खरंच कुशल होता . त्याच सगळं कौशल्य या आड रस्त्यांवर पणाला लागायचं . समोरून मोठी गाडी येणारी दिसली आणि आपली गाडी आणि ती गाडी एकावेळी रस्त्यावरून जाऊ शकणार नाहीत हे लक्षात आलं कि झटक्यात तो आधीच्या वळणावर गाडी बाजूला घेऊन उभा राहायचा . मग समोरची गाडी निघून गेली कि मग आमची गाडी जायची . इथे लक्षात येन्यासारखी गोष्ट अशी कि सगळे ड्राइवर अगदी हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट चा ड्राइवर सुद्धा ट्रॅफिक चे नियम पाळायचा . कारण असे नियम एकाने जरी पाळले नाहीत तरी अपघाताची शक्यता जास्त होती .
भयंकर असे नागमोडी आणि चिंचोले रस्ते पार करताना एकीकडे मात्र दिसणारा निसर्ग खूपच सुखावह होता . हिरवेगार डोंगर ,कधीतरी मधूनच पावसाचं एखादी सर , तर कधीतरी धुक्याची दुलई , डोंगारांच्या मधून वाट काढत जाणारी नदी हे सगळं साथीला घेऊन प्रवास चालू होता . आम्ही शिमला दर्शन उरकून नारकंदा ला निघालो आणि वाटेत जोरदार पाऊस सुरु झाला . शिमला ते नारकंदा दोन ते अडीच तसाच अंतर आहे . प्रचंड पाऊस आणि धुकं यामुळे आम्ही ते अंतर ३ तासात पार केलं . थंडीची पहिली चुणूक आम्हाला मिळाली . आणि पुढे यापेक्षा किती थंडी असेल याचा अंदाज आला . हॉटेल आल्यावर गाडीतून उतरून हॉटेलच्या उबदार रिसेप्शन खोलीत जाईतोवरच आमची अवस्था वाईट झालं . इतका वेळ आम्हाला आमच्या जर्किन ची गरज लागली नव्हती . हॉटेल मध्ये एन्ट्री करणे, चावी घेणे असले सोपस्कार पार पडल्यावर आम्ही रूम मध्ये गेलो . बरोबर हॉटेल चा माणूस होताच . तो रूम मधल्या सोयीसुविधा दाखवायला लागला . त्याला थांबवून आधी हिटर असेल तो चालू करायला सांगितलं . आणि गरम पाण्याची सोय विचारून घेतली . या गोष्टी आम्हाला त्या कशाला सगळ्यात महत्वाच्या वाटल्या . आमच्या दुर्दैवाने हॉटेल फार काही खास नव्हते . त्यामुळे आमचा पार विरस झाला होता . खर तर नारकंदा शहरातील ते बेस्ट हॉटेल अशी त्याची जाहिरात होती . पण रात्री लाईट गेले तर जनरेटर किंवा इन्व्हर्टर वगैरेची सोय नव्हती . पांघरूण हे गोधडी किंवा घोंगडी असं नसून जवळपास गादीच्या जवळपास जाणारा प्रकार मिळाला . ज्याला ऊब तर फार नव्हती नुसताच जडपणा होता . रात्री हॉटेलच्याच रेस्टॉरंट मध्ये जेवलो . जेवण बरे होते . दुसऱ्या दिवशीची सकाळ मात्र प्रसन्न उगवली . आम्ही थोड्या आरामात उठू म्हटलं तरी ७ वाजता जाग आली . तर सूर्य बराच डोक्यावर आलेला . आम्ही भारताच्या पूर्व भागात आल्याची जाणीव तेव्हा झाली . तिथल्या लोकांची रोजची लगबग केव्हाच सुरु झाली होती.
आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती . त्यामुळे आजूबाजूला काय आहे नाही काहीच कळले नव्हते . आमची रूम कुठल्या दिशेला आहे , रस्त्याच्या बाजूला आहे कि पाठच्या बाजूला काहीही लक्षात आले नव्हते . सकाळी मात्र रूम च्या खिडकीतून डोकावल्यावर सुंदर दृश्य दिसले . समोरच बऱ्यापैकी खोल दारी होती आणि जवळजवळ सगळी दरी देवदार वृक्षांनी भरलेली होती .सूर्याची सुंदर किरणं त्यांच्यावर पडली होती. काचा पावसाची हलकीशी जाणीव झाडांचा ओलेपणा दाखवून देत होता . आकाश मात्र निरभ्र होत . आम्ही सुटकेचा निश्वास टाकला . कारण कालच्या पावसाने आणि त्यामुळे आलेल्या गारठ्याने आमची अवस्था बिकट करून टाकली होती . आज मात्र वातावरण एकदम फ्रेश वाटत होत . त्याच हॉटेल मध्ये नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
आता हळूहळू आम्ही त्यातल्या त्यात म्हणता येतील अशी मोठी गावं पाठी टाकून सांगल्याच्या दिशेने जायला सुरवात केली . शांतात वाढत चाललेली आणि वर्दळ कमी होत असलेली जाणवत होती . मोठमोठ्या डोंगररांगा कालपासूनच दिसत होत्या. आज त्यांच्यावर पसरलेल्या सफरचंदाच्या आणि चेरीच्या बागाही दिसायला लागल्या . पावसामुळे फळांचं नुकसान होऊ नये म्हणून हि झाड झाकून ठेवलेली असतात . आपल्याकडच्या कोळ्यांची जाळी असतात साधारण तेव्हढी मोठी ट्रान्सपरंट पण भोक नसलेली अशा कापडं झाडांवर पांघरलेली होती . ८/१० झाडांवर मिळून एक अशी सगळी झाड आच्छादून ठेवलेली होती . त्यामुळे लांबून देखील या डोंगरावरच्या बागा नजरेत येत होत्या . काही चेरीची झाडं तर रस्त्याच्या इतकी जवळ होती कि हाताने चेरी काढू शकले असते . आम्ही घेऊ तेव्हा चेरी चा सिझन होता . सफरचंदाचा नसल्याने त्या बागा बघायला मिळाल्या नाहीत . 

 सतलज नदीचे दर्शन

.

अरुंद आणि अवघड रस्ते

.

देवभूमी हिमाचल अर्थात रस्त्यावर ठिकठिकाणी असणारी देवळे

.

हिमाचल प्रदेश राज्य परिवहन बस

.

 असाच सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललो होतो आणि एका वळणार आम्हाला सतलज नदीचं दर्शन झालं. खूपच छान वाटलं ते पाहून. नदीच पात्र चांगलेच रुंद होतं. आणि पाणी फारच उथळ होत. आम्ही एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथून नदी अगदीच जवळ दिसत होती. नदीचा खळखळाट चांगलाच जाणवत होता. सतलज नदीत रिव्हर राफ्टिंग सारखे गेम्स चालतात अशी माहिती ड्राइवरने दिली. पण आम्ही जिथे जाणारा होतो तिथे हि सोय नव्हती. आम्ही सतलज एका कडेला ठेवून तिच्या बाजूने प्रवास सुरु केला. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली आणि गावं लांबच्या लांब पसरलेली दिसत होती. गावात कधी कधी मोजकीच घरं लगत होती. पण एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला. एक डोंगराच्या वरच्या बाजूला तर एक खालच्या बाजूला अशी लांब लांब दिसत होती. इथल्या बायका आणि पुरुष आता पारंपरिक पोशाखात दिसायला लागले. मधूनच शाळेत जाणारी अथवा येणारी मुलं दिसत होती. बहुतेक जण स्वेटर घालून वावरत होती. तर ज्यांना सवय झालेली अशी माणसं स्वेटर शिवाय सहज वावरत होती.
आमच्या सुदैवाने सूर्यनारायण प्रसन्न असल्याने लख्ख परंतु उबदार असा सूर्यप्रकाश पडला होता. वातावरण अगदी प्रसन्न होते. तिथल्या लोकांना सवय असल्याने तिथली लोक तेवढ्या उबदार वातावरणात सहज वावरत होती. आम्ही मात्र आमची जॅकेट्स चढवली होती. आता आम्ही सतलज नदी पाठी टाकून बासपा नावाच्या नदीच्या काठाने प्रवास सुरु केला. आमचा प्रवास आरामात सगळीकडे थांबत फोटो काढत चालू होता. एके ठिकाणी एक पूल आला. तिथे बघितलं तर मिलिटरी चे काही लोक होते. पूल जरा अरुंद असल्याने एका वेळी एकीकडची वाहतूक चालू होती. आम्हाला कळेना एव्हढयाश्या कारणासाठी मिलिटरीची लोक का आलेली. पूल पार केल्यावर ड्राइवरने दाखवले कि ज्या बाजूने आम्ही पूल पार केला डोंगराचा तो भाग हळूहळू कोसळायला लागला होता. पुलाच्या पलीकडे नदीचं पात्र भरून जाईल एवढ़े दगड वरून घसरून आले होते. लँड स्लायडिंग चा प्रत्यक्ष अनुभव जरी नाही घेतला तरी साधारण कल्पना आली होती. आधीच पूल याच कारणाने बंद करून हा नवीन पूल मिलटरीने बांधून वाहतूक चालू करून दिली होती. आमच्या समोरही काही छोटे छोटे दगड कोसळत खाली येत होते. वाऱ्याने खाली सरकत येणारी माती चांगलीच उडत होती. आम्हाला ठिकठिकाणी रस्त्याने जाताना नदी इकडून तिकडे पार करावी लागत होती. बासपा नदीला सुरवात झाली आणि JSW अर्थात जिंदाल यांचे हायड्रो प्रोजेक्ट लागायला लागले. कितीतरी ठिकाणी भुयार बांधून,बोगदे खणून पाणी सोडले होते. पाण्यावर वीज निर्मितीचे मोठे मोठे प्रोजेक्ट चालू होते.
असाच घाटातून जात असताना गाडीनं एक वळण घेतले आणि समोर अचानक एक हिमाच्छादित पर्वताच टोक दिसलं. इतकं सुंदर दिसलं ते दृश्य. आजूबाजूला सुंदर हिरवे डोंगर आणि त्यांच्या मधून डोकावणारं बर्फाने मढलेल पर्वताचं टोक. आणि मग आमचं फोटोसेशन आणखीनच भरात आलं. किती फोटो घेऊ आणि नको असं झालं. शेवट ड्राइवर ने आम्हाला सांगितलं कि तुम्ही जाणारा आहेत तिथे चारही बाजूने तुम्हा अशीच शिखरं दिसतील. मग आम्ही स्वतःला आणि कॅमेरा ला यावरून परत प्रवास सुरु केला. मध्ये एके ठिकाणी ड्राइवर ने जेवण्याकरिता गाडी थांबवली. जरा अतीच साधी अशी ती खानावळ होती. मला तिथे जेवायला जायचं अगदीच जीवावर आलं होतं. पण नवऱ्याने आग्रह केला म्हणून आम्ही आत गेलो. अगदी साधी रंग उडालेली बाकडी आणि टेबलं होती. एकच थाळीचा मेनू होता. भात,पोळी,राजमा,डाळ,पापड आणि थोडी काकडी टोमॅटो. बस आणखी काही नव्हत. पावभाजीच्या कप्प्याच्या डिश असतात तश्या ३/४ कप्प्याच्या डिश मधून हि थाळी वाढली जात होती. मी जेवायला सुरवात केली आणि मग मात्र न थांबता जेवत गेले. सुरवातीला नाकं मुरडणारी मी नतर ते सुग्रास जेवण न थांबता जेवले. जेवण अतिशय चविष्ट होते. मोजकेच पदार्थ पण एकदम चवदार. आणि न थांबता वाढत होते. जेवणाने मन अगदी तृप्त झालं. एवढ्याश्या त्या खानावळीत पोट भरून आम्ही दोघे आणि ड्राइवर ३ जण जेवलो आणि बिल फक्त ४५० रुपये झालं. आता तर मी आणखीनच खुश झाले.
आमची गाडी वळणावळणाने जात होती आणि आणखी आणखी हिमालयाच्या जवळ आम्ही जात होतो. असा समोर हिमालय दिसतोय,बर्फाने आच्छादलेली शिखरं दिसतायत पण बोचरी थंडी मात्र नाही. हे फारच सुखावह होत. शेवटी सगळा प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी म्हणजेच सांगला या ठिकाणी पोहोचलो.
अतिशय नयनरम्य अशी हि जागा आहे. शांत,सुंदर निसर्गाने,आणि डोंगरांनी वेढलेला हा परिसर खरंच स्वर्गलोक असावा. बासपा नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव खूपच सुंदर आहे. आमचं राहण्याचं ठिकाण किन्नर कॅम्पस हे होत. गुगल वर शोधल्यावर खूप सुंदर असे फोटो दिसले होते. ट्रिप ऍडवायझर वर खूप चांगले रिव्ह्यू वाचायला मिळले होते. दिलीप नेगी हे या कॅम्पस चे कर्ताधर्ता तर तुलसी हे बल्लवाचार्य. या दोघांनी हे कॅम्पस खूपच चांगल्या तर्हेने चालवले आहेत. तुलसी हे नाव स्त्री च नसून पुरुषाचं आहे.अतिशय सुंदर असे तंबू इथे उभारलेले आहेत. कॅम्पिंगचे चांगल्या तर्हेचे तंबू इथे उभारलेले आहेत. तिथल्या वातावरणाला साजेसे तंबू आहेत. कमीत कमी १ ते जास्तीत जास्त ३/४ माणसं तंबूत राहतात. तंबूच्या आत दोन जणांसाठी सिंगल/डबल मागणीनुसार बेड लावून दिलेले. बेड च्या दोन्ही बाजूला छोटी छोटी टेबलं. त्यावर मोजकेच चार्जिंग पॉईंट. बेडवर स्वच्छ बेडशीट अंथरलेल्या उश्यांचे अभ्रे पांढरेशुभ्र. ब्लँकेट्स व्यवस्थित घडी करून ठेवलेली. समोर दोन वेताच्या खुर्च्या. मध्ये कापडाचं पार्टीशन करून बाथरूम केलेलं. त्याला कापडाचाच चेनने बंद करता येईल असा पडदा. छोटासा चौकोन अंघोळ करण्यापुरता. समोरच अतिशय स्वच्छ कमोड. मध्ये वॉश बेसिन. बाथरूम मध्ये गरम आणि गार दोन्ही प्रकारचे पाण्याचे नळ. खोलीचा दरवाजा देखील कापडाचाच चेन ने लावता येईल असा. चेन आतून बाहेरून लावता येईल अशा प्रकारची. पूर्ण खोलीत एक सॉफ्ट असं कार्पेट अंथरलेलं. आत घरात वापरायच्या असतात तशा चपला,टॉवेल ठेवलेले. अतिशय आखीव रेखीव अशी खोली (तंबू )तयार केलेली. खोलीबाहेर छोटासा व्हरांडा,त्यातही दोन वेताच्या खुर्च्या टाकलेल्या आणि एक छोटंसं टेबल. प्रत्येक तंबू एका एका सिमेंट च्या चौथऱ्यावर उभारलेला. सगळ्या तंबूच्या मधोमध एक मोठा मंडप घातलेला ज्यात जेवण्याची सोय केलेली. साधारण ४ माणस बसतील एव्हढी कडप्प्याची गोल टेबलं आणि मधोमध मोठ्या ग्रुप साठी लांबलचक टेबल. बुफे पद्धत. शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं स्वादिष्ट खाणं. त्यांचा मुख्य कूक तुलसी नावाचा होता. अतिशय लाजाळू असा हा माणूस परंतु हाताला सुंदर चव. एकही पदार्थ नाव न ठेवण्यासारखा. अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर भोजन आम्हाला पाचही दिवस मिळालं

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...