नेहमी प्रमाणेच या ट्रिपसाठी सुद्धा एक गोष्ट मनाशी पक्की केली होती कि कोणत्याही टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्ट्स च्या घशात पैसे घालायचे नाहीत. निदान जिथे शक्य आहे तिथे तरी. त्यामुळे विमानाची तिकिटे, हॉटेल्स, व्हिसा, अंतर्देशीय फिरायची सोय, खाणं, पिणं सगळं आपण मॅनेज करायचं.
इंटरनेट हे कायम तुमच्या दिमतीला असतंच. एकतर अशाने आपले पैसे खुप वाचतात, स्थानिक लोकांना जास्त जवळून ओळखता येत, तुम्ही अनुभव संपन्न होता ते वेगळेच. आणि विमानाची स्वस्त तिकिटे शोधण्यापासून, व्हिसासाठी पळापळ करणे, हॉटेल्स शोधणे - त्यांची किंमत अजून कमी व्हावी यासाठी कूपन्स शोधणे - हॉटेल बुक करणे - परत फेरविचार करून हे नको ते बुक करू म्हणत जुने बुकिंग रद्द करून नवीन बुक करणे, आपला प्लॅन आपण ठरवणे या संपूर्ण प्रोसेस मध्येच एक वेगळा आनंद असतो.
आता आम्ही स्वतः जायचं ठरवलं त्यामुळे किती दिवस हा मुद्दा फार महत्त्वाचा राहिला नव्हता. १४-१५ दिवस निवांत फिरू असं ठरवून तिकिटे बुक केली होती १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंतची. तारखांना लक्षात घेऊन कोणत्या दिवशी काय पाहायचं आणि कसं पाहायचं याचा एक ढोबळ प्लॅन आखून घेतला. आणि दिवस-ठिकाण अशा जोडीने हॉटेल्स चा शोध चालू केला. बुकिंग डॉट कॉम वरून काही हॉटेल्स शोधली, गूगल मॅप्स च्या साहाय्याने त्याच्या आजूबाजूच्या खाण्याच्या / वाहतुकीच्या / खरेदीच्या सोई बघून घेतल्या. वेळोवेळी संजयचा सल्ला घेत होतेच. जशा जशा तारखा पुढे जात होत्या आमच्या चेकलिस्ट मधील एक एक गोष्टी Done होत होत्या. एक प्रत्येक दिवसाची माहिती देणारी आयटेनेरी बनवली. याचे दोन फायदे असतात, एक म्हणजे आपला प्लॅन आपल्याकडे तयार असतो, आणि दुसरं, घरच्यांना याची एक प्रत दिली कि त्यांना पण अंदाज राहातो की आपण कुठल्या दिवशी कुठे आहोत याचा. अशीच एक प्रत इथे डकवली आहे.
२ ऑगस्ट २०१८
मी: हॅलो, सगळ्या प्रिंट आऊट घेतल्या का रे?
तो: हो ग.
मी: तिकीट?
तो: हो.
मी: सगळे हॉटेल बुकिंग्स?
तो: हो.
मी: Day by Day Itinerary?
तो: हो ग बाई.
मी: व्हिसा कव्हर लेटर?
तो: नाही ते राहिलंय (अरे यार हे विसरलोच होतो मी)
मी: बघ मी म्हणलेले ना काहीतरी विसरशीलच तू!!
तो: विसरलो नाहीये तू मध्येच फोन केलास. मी आत्ताच काढत होतो प्रिंट्स.
मी: ह्या ह्या ह्या.. चल थापाड्या.... बरं सगळ्याच्या २-२ कॉपीज काढ, २ सेट लागतील व्हिसासाठी.
तो: हो ग आहे माझ्या लक्षात (ओ तेरी! ये भी भूल गया यार) ४ कॉपीज काढतो चांगल्या.
ऑफिस मधल्या प्रिंटरचा सदुपयोग करून व्हिजाची कागदपत्र गोळा केली गेली.
१० ऑगस्ट २०१८
व्हिसा पासपोर्टला चिकटला आणि हुश्श झालं.
१७ सप्टेंबर २०१८
सगळ्या गोष्टी बॅगेत भरल्या गेल्या आणि आम्ही मुंबई एअरपोर्ट साठी कूच
केले.बॅग्ज चेक इन करून सिक्युरिटी चेक मधून बाहेर पडून इमिग्रेशन च्या
रांगेत दाखल झालो.
इमिग्रेशन ऑफिसर: कुठे जाताय?
मी: इजिप्तला.
इ. ऑ: कशाला?
मी: फिरायला.
इ. ऑ: किती दिवस फिरणार?
मी: १४ दिवस.
इ.ऑ: परत कधी मग? (त्याला बहुतेक मजा येत होती चौकशी करायला)
मी: २ ऑक्टोबर ला. (लिवलंय ना दादा सम्द त्या बुकात)
इ.ऑ: आँ? एवढे दिवस? काय काय बघणार मग इजिप्त मध्ये? पिरॅमिड्स?
मी: हो. अजूनही बरंच काय काय आहे. नाईल, वाळवंट.
इ.ऑ: छान छान!! मज्जा करा. (ठ्ठाप ठ्ठाप २ शिक्के मारले गेले होते)
मुख्य म्हणजे वरचं सगळं संभाषण खरंच मराठी मध्ये झालं. त्यालाही कंटाळा आला असावा बहुतेक हिंदी/इंग्लिश बोलून.
EgyptAir ची हि डायरेक्ट फ्लाईट अंदाजे ५ ते ५:३० तास लावते. १८ तारखेला बरोबर पहाटे ३ वाजता उडालेल्या आमच्या विमानाने पहाटे ५:३० वाजता (स्थानिक वेळ) आम्हाला फेरोंच्या देशात आणून सोडलं.
१८ सप्टेंबर २०१८
बरोब्बर १ वर्ष १ महिना वाट पाहून झाल्यावर अखेरीस आम्ही फेरोंच्या देशात येऊन पोहोचलो. कैरो एअरपोर्ट वर बघण्यासारखं असं फार काही नाही, त्यामुळे एअरपोर्ट बाहेर पडायला जास्त वेळ लागत नाही. एअरपोर्ट वरून हॉटेलला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. कारण कैरो एअरपोर्ट वरून शहरात जाण्याचा दुसरा सोयीचा पर्याय सध्यातरी नाहीये. संबंध कैरो शहरात मेट्रोच जाळं पसरलं असूनही एरपोर्टच्या भागात मात्र अजून तिचे रूळ पोहोचले नाहीयेत. पर्यटन हा मुख्य व्यवसाय असलेल्या या देशाच्या राजधानीत टॅक्सी व्यतिरिक्त कुठला सोपा पर्याय उपलब्ध नाही हि गोष्ट मनाला थोडी खटकली. कैरो एअरपोर्टवर टॅक्सीसाठी अव्वाच्यासव्वा भाव सांगितले जातात. तुम्हाला current rate ची थोडी कल्पना असेल आणि घासाघीस करू शकत असाल तर योग्य दर मिळवता येतो, नाहीतर खिशाला भगदाड पडलं म्हणून समजा. कैरोमध्ये प्रायव्हेट टॅक्सी ला पर्याय आहे उबर. पण कैरो एअरपोर्टवर मोफत वायफाय ची सुविधा नाही, आणि तोवर आपल्याकडे लोकल सिम कार्ड वगैरे पण नसतं, त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीला पर्याय नाहीच.
आमचं हॉटेल शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात, तहरीर चौकात होतं. तोच तहरीर चौक जिथे असंख्य मोर्चे, प्रदर्शने झालेली, आणि आजही होत असतात. सकाळी ट्रॅफिक अजिबात लागलं नाही आणि २० मिनिटात टॅक्सीवाल्याने हॉटेलच्या दारात सोडलं. आम्ही ठरवल्या प्रमाणे जे पैसे दिले ते त्याने घेतले आणि म्हणाला, "हे तर गाडी चे पैसे झाले. मला टीप?" आम्ही परत नम्र नकार चिकटवला.
इजिप्तमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा टीपसाठी विचारलं जातं. पण तुम्हाला त्यांची सर्विस असामान्य नसेल वाटली तर तुम्ही नकार देऊ शकता. फार काही फरक नाही पडत. पण जिथे काम आवडलं असेल तिथे टीप नक्की द्यावी.
"My Hotel Cairo" हे आमचं हॉटेल एका जुन्या इंग्रजांच्या काळातील इमारतीमध्ये आहे, इजिप्शिअन म्युझिअमच्या बरोब्बर समोर. हॉटेल वजा हॉस्टेल असं त्याचं स्वरूप. सकाळचे ६:३० वाजले होते. थोडा वेळ स्वागतकक्षात वाट पाहिली. ७ वाजता त्यांची रिसेप्शनिस्ट आली. तिला इंग्लिशचा गंध नाही. तिने मॅनेजर महमूदसोबत बोलून दुसऱ्या मजल्यावरची एक बरीशी रूम उघडून दिली. फ्रेश होऊन थोडा आराम केला तोवर महमूद पोहोचला होताच. योगायोगाने संजयसुद्धा याच हॉटेलला थांबला असल्याने महमूदची आणि त्याची ओळख होतीच. थोडी विचारपूस झाल्यावर त्याने कोरा चहा आणून दिला. आणि मला कधी नव्हे तो कोरा चहा प्रचंड आवडला.
महमूद: किती दिवस आहात तुम्ही मग इजिप्त मध्ये?
नवरा: १४ दिवस
महमूद: आणि काय काय बघायचं ठरवलं आहे?
मी: आज तर समोरचं म्युझियम बघू आणि वेळ मिळाला तर कैरोची कॉप्टिक बाजू बघू.
बाकी गिझा, अॅलेक्झांड्रिया आणि बहारिया मरुद्यानाला पण जायचं आहे.
महमूद: मी करून देतो सगळी सोय. गिझा आणि अॅलेक्स साठी प्रायव्हेट टूर असेल
बहारियाला मात्र तुम्हाला तिथे पोहोचेपर्यंत गाडी कोणासोबत तरी शेअर
करावी लागेल.
नवरा: हो चालेल ना. काहीच हरकत नाही. किती अंदाजे खर्च येईल?
महमूद: टीप टीप.. टॅप टॅप (कॅल्क्युलेटर वर कसला हिशोब करायला लागला)
मी: आणि हो नुसतं गिझा नाही सक्कारा आणि दाहशुर पण करायचं आहे.
महमूद: अरे हो का.. बरं ### एवढे होतील सगळ्याचे.
मी: नाही जास्त होत आहेत. थोडे कमी कर.
हो नाही करत थोडी घासाघीस करत एका रकमेला आम्ही तयार झालो. कैरो मधील दिवसांचा प्लॅन परत बनवला गेला.
महमूद: तुम्ही आज कैरो बघा जेवढं शक्य असेल तेवढं. उद्या सकाळी ८.३० वाजता गाडी येईल गिझा-सक्कारा-दाहशुर साठी. तयार राहा. आज मला थोडं लवकर जायचं आहे उद्याच भेट होईल बहुदा आपली. आम्ही: ठीक आहे. भेटू उद्या मग.
गूगल मॅप वर जवळचं वोडाफोन स्टोअर शोधलं. ते तलात हार्ब चौकात होत. जवळ असल्याने चालतच निघालो.
तलात हार्ब चौक हा तहरीर चौकाच्या जवळचा दुसरा मोठा चौक. ६ रस्ते एकत्र येणाऱ्या ह्या चौकात जुन्या मोठ्या इमारती बघायला मिळतात. काही इमारतींवरचे नक्षीकाम इजिप्तवर इंग्रजांचे राज्य होते याची आठवण करून देते तर काही त्याही मागे जाऊन रोमन सत्तेची जाणीव करून देते. या सगळ्या इमारतींमधून विविध बँकांची कार्यालये आहेत. या चौकाला तलात हार्ब नाव देण्यामागचं कारण पण हेच. तलात हार्ब हे इजिप्ती अर्थशात्रज्ञ होते ज्यांनी नंतर "बंक मिस्र" अर्थात 'बँक ऑफ इजिप्त' या पहिल्या इजिप्ती बँकेची स्थापना केली. तलात हार्ब चौकात मध्यभागी त्यांचा पुतळा उभा आहे.
वोडाफोन मध्ये नवीन सिमकार्ड घेतलं आणि पोटोबा करायला "कझाझ" नावाच्या
रेस्टॉरंट मध्ये पोहोचलो. महमूदच्या मते तिथले सँडविच फार चवदार असतात. एक
फलाफल सॅन्डविच, एक फ़ुल (म्हणजे उकडलेल्या राजम्याला वाटून त्यात मीठ मिरची
भुरभुरलेलं) सॅन्डविच आणि दोन श्वारमा घेतले. पहिल्या घासातच कझाझ वरचा
विश्वास उडाला. मी श्वारमा बऱ्याच ठिकाणी खाल्ला आहे पण पुण्यातल्या
'मारकेश'पेक्षा सुद्धा वाईट कझाझ मध्ये होता. (नंतर एके दिवशी
जवळच्याच फेलफेला नावाच्या हॉटेलमध्ये जेवलो तिथली चव फारचं छान होती)
कझाझमध्ये कसंबसं जेवण उरकून आम्ही इजिप्शिअन म्युझिअम पाहायला निघालो.
संबंध इजिप्तमधील उत्खननात मिळालेल्या गोष्टी इथे हारीने रचून ठेवल्या आहेत. जुनी राजवट, मध्य राजवट आणि नवी राजवट अश्या भागांत साहित्य विभागून ठेवलेलं दिसतं. पण त्याच बरोबर असंख्य मस्तबा, शवपेट्या, दागिने, भांडी, मुखवटे यांची स्वतंत्र दालनेच इथे आहेत. इजिप्तच्या अवाढव्य बांधकामांची झलक इथे बघायला मिळते. मुख्य चौकात ठेवलेले उंचच उंच पुतळे आपलं स्वागत करतात.
पण इथले २ प्रमुख आकर्षण म्हणजे, रॉयल ममी रूम आणि तुत-अंखं-अमूनच्या थडग्यात सापडलेल्या सोन्याच्या गोष्टी.
रॅमसिस-२ च्या ममीसोबत अजून अंदाजे २५-३० ममी २ दालनात विभागून ठेवल्या आहेत. काचेच्या पेटीत बंद असलेले हेच ते फेरो होते ज्यांनी मिस्रचा सुवर्णकाल गाजवला. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा तो "सुवर्ण"काळ होता. सुदान, लिबिया मधून सोन आणून बनवलेल्या चीजवस्तू थडग्यात ठेवायला वापरणारे फेरो वेडेच म्हणायचे. याची खात्री पटते तूतच्या थडग्यातील वस्तू पाहताना. सोन्याचे दागिने, मुकूट, चपला, खंजीर, पलंग, खुर्ची, भांडी, शवपेटी, मुखवटा वगैरे तर झालंच पण हे सगळं त्याच्या ममी सोबत ज्या खोलीत ठेवलं होत ती सोन्याची, ती खोली ज्या मोठयाल्या बॉक्स मध्ये ठेवली होती तो बॉक्स सोन्याचा, त्याच्या बाहेरील दालनाची तावदानेपण सोन्याची.
लुटारुंच्या नजरेतून निसटलेलं हे सोन्याचं भांडार कार्टर ने १९२२ साली उघडलं आणि सगळ्या जगाचे डोळे दिपले. याबद्दल विस्ताराने नंतर कधीतरी, पण कार्टरच्या मेहनतीमुळे हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची ओळख पुन्हा एकदा नवीन नजरेने जगापुढे आली.
फोटो काढायचे तिकिट घेतले नसल्याने 'चोरी-छिपे' मारलेले हे काही क्लिक्स.
मनोमन तृप्त होऊन आम्ही दोघे अंदाजे ३ तासांनी बाहेर पडलो. सकाळी येतांना रिकामा दिसलेला तहरीर चौकातील रस्ता आता दुथडी भरून वाहत होता. प्रचंड ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न, असंख्य पादचारी. भारतापेक्षा काही वेगळ दृश्य नव्हतं हे. पुढे वेळोवेळी मला भारत आणि इजिप्त मध्ये बऱ्याच ठिकाणी साम्य आढळलं त्यातील हा पण एक समान धागा.
म्युसिअम मधून बाहेर पडल्यावर एक स्थानिक माणूस येऊन आमच्याशी गप्पा मारू लागला. कुठून आलात, किती दिवसाची ट्रिप वगैरे. सुरवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा मारून तो मुख्य मुद्दयावर आला. इजिप्ती गिफ्ट्स आणि सुवेनिअरच्या दुकानासाठी तो काम करत होता. मलाही अशा दुकानाला एकदा भेट द्यायची होतीच. 'घ्यायचं काहीही नाही नुसतं बघ' अशी नवऱ्याने अट मला घातली आणि त्या बाबाच्या मागे आम्ही दुकानात गेलो. असंख्य अत्तरे, छोटे मोठे पिरॅमिड, दगडी मूर्ती, किचेन, फ्रिज मॅग्नेट वगैरे तर होतेच पण सोबत तुतच्या सोन्याच्या मुखवट्याच्या प्रतिमा, छोट्या शवपेट्या असं काहीही सापडत होतं. थोडक्यात समोरच्या म्युसिअम मधील सगळ्या गोष्टींच्या छोट्या कॉपीज. यामध्ये आम्हाला रुची नाही हे लक्षात आल्यावर आमची वरात वरच्या मजल्यावर वळवण्यात आली.
थंड AC आणि बसायला छान सोफा, मासा गळाला लावायचा पूर्ण बंदोबस्त केला होता तिथे. इजिप्तचे प्रसिद्ध पेय थंडगार करकाडे आमच्या समोर आणून ठेवलं गेलं आणि पपायरस च्या गुंडाळ्या उघडण्यात आल्या. पपायरस हा एका पाणवनस्पती पासून बनवला जाणारा कागद पूर्वी राजेशाही पत्र वगैरे पाठवायला वापरला जात असे. आता त्यावर चित्रे काढून सुवेनिअर म्हणून विकतात. खरंच अप्रतिम कलाकारी केली होती त्यावर. वेगवेगळे रंग वापरून फेरोंचे प्रसंग दर्शवले होते. कधी फक्त फेरो देवाला पूजताना तर कधी फेरो आणि राणी. विविध आकारात सुद्धा बनवलेले. अगदी लहान पोस्टकार्ड च्या आकारापासून ते भल्या मोठ्या गालिचाच्या आकारात पण. काही सकाळी वेगळं चित्र दाखवणारे आणि रात्री वेगळं, रेडियम वापरून बनवलेलं. काहींवर फार बारीक काम केलेलं तर काही उगीच रेखाटलेलं. या पपायरसनी मात्र मला भुरळ पाडली. प्रचंड घासाघीस करून, सांगितलेल्या किमतीच्या निम्म्याहून कमी किमतीत डील करून, नवऱ्याला मनवून एकदाची मी ते पपायरस घेती झाले. आम्ही दुकानातून बाहेर पडेस्तोवर आधी भेटलेल्या माणसाने अजून एक परदेशी मासा गळाला लावून दुकानात सोडला.
घेतलेल्या पैकी एक पपायरस
आता पुढे जायचं होत कॉप्टिक कैरो ला. पण नवऱ्याची तब्बेत भारतातून निघतांनाच थोडी नरम गरम होती, आता मात्र त्याला ताप चढू लागला होता. त्यामुळे पुढला प्लॅन रद्द करून सरळ हॉटेलवर परत आलो. ३-४ तास आराम केल्यावर काहीतरी खाऊ म्हणून परत तहरीर चौकात आलो. एका हाटेलात (हो हाटेलच हॉटेल नाही) कोशरी आणि पास्ता मागवला. दोन्ही मध्ये एकच टोमॅटो रस्सा टाकून दिला होता त्यामुळे चव सारखीच लागत होती. आंबट आणि थोडी खारट अगदी साधारण. रूमवर परत आल्यावर नवऱ्याने औषध खाऊन ताणून दिली आणि मी दुसऱ्या दिवशीच्या प्लॅनबद्दल थोडं वाचू लागले.
रात्री ११ च्या सुमारास नवरा तापाने पार फणफणला होता. ओल्या पट्ट्या कपाळावर ठेवून २-२ ब्लॅंकेट पांघरून त्याला कसाबसा झोपवत होते. पहाटे ३ च्या सुमारास ताप उतरला आणि मग कुठे माझा डोळा लागला.
१९ सप्टेंबर २०१८
सकाळी ७:३० वाजता महमूद चा फोन आला.
-- "तुमच्या आजच्या ट्रिपची गाडी तासाभरात पोहोचेल, नाश्ता करायला कॉमन रूम मध्ये या."
नवऱ्याचा ताप उतरला होता पण अशक्तपणा थोडा होताच.
"नक्की जाऊया ना आज?" असं त्याला ४ वेळा विचारून पक्कं केल्यावर १५ मिनिटात आवरून आम्ही नाश्ता करायला पोहोचलो.
लांबुळका ब्रेड, बटर, जॅम आणि कोरा चहा संपवेपर्यंत गाडी तयार होती.
"हॅलो, गुड मॉर्निंग!! माझं नाव अशुर. तुमचा आजचा गाडीवान. तुमचं नाव?"
-- "मी प्रवीण"
-- "आणि मी कोमल"
"नमस्ते पारवीन आणि कुमाल. आज आपण जाणार आहोत दहशुर, सक्कारा आणि ग्रेट पिरॅमिड पाहायला. गिझा आपण सगळ्यात शेवटी करूया."
- "ओके"
नील नदीवरचा ६th ऑक्टोबर ब्रीज ओलांडून आम्ही गिझा हद्दीत आलो आणि नदीच्या कडेकडेने आमचा प्रवास चालू झाला.
गिझा मधील सगळ्या इमारती विटांच्या आहेत आणि सगळ्या एकमेकांना अगदी खेटून. इतक्या कि एका घरात पडलेल्या भांड्याचा आवाज तिसऱ्या घरापर्यंत पोहोचावा. कधी दोन्ही किंवा कधी तिन्ही बाजूंनी इमारती वेढलेल्या. त्यामुळे फक्त दर्शनी भिंतीला रंग देण्याची पद्धत. काही इमारती तिच्या शेजारणीचं बांधकाम पूर्ण होई पर्यंत तशाच बोडक्या उभ्या तर काही शेजारी कोणी येईल का याची वाट बघत उभ्या. सगळ्या इमारतींवर डिश टीव्हीच्या छत्र्यांचं छप्पर. आणि सगळ्याच इमारतींचा रंग सारखाच. मातकट. गिझा मधून वाहणारं नील नदीचं पाणी सुद्धा प्रचंड कळकट. आपल्या मुळा-मुठे सारखंच.
गिझा संपलं कि चालू होतात खजुराच्या बागा, स्वच्छ हवा आणि नीलचं स्वच्छ पाणी. आपल्याकडे कोकणातून फिरताना माडाच्या लांब रांगा दिसतात तशा इथे खजुरांच्या दिसतात. आम्ही गेलो तेव्हा फळ पिकायला आलं होतं. उंच वाढलेल्या झाडांच्या शेंड्याला सोनेरी फळं काय सुरेख दिसत होती म्हणून सांगू. रस्त्याशेजारी छोटी पोरं खजुराचे वाटे विकतांना दिसत होती. चव बघावी म्हणून एक वाटा घेतला, काय गोड आणि ताजा होता तो खजूर. आपल्याकडे पोरं जशी बोरं पाडतात तसं तिकडं खजूर पाडत होते. रसरशीत आणि भरपूर गर असलेलं ते फळ तिथे चाखतांना फार छान वाटल.
खजूराच्या बागा
पिकलेलं फळ
छोटं झाड आणि कच्चं फळं. चव तुरट बोरासारखी
साधारण तासाभराने गाडीने मुख्य रस्ता सोडून गावात प्रवेश केला. आणि दहशुरची पाटी दिसली.
पिरॅमिड कॉम्प्लेक्सच्या हद्दीवर असलेल्या तिकीट खिडकीवर पोहोचलो आणि चेहरे बघताच तिथे सगळे पुटपुटायला लागले, "हिंदी हिंदी. मेशी.. शारूखान, अमिताबच्चन""yes yes" म्हणत मी तिकीटे घेतली आणि पुढे निघालो. तिकडे भारतीयांना इंडियन म्हणून नव्हे तर हिंदी म्हणून ओळखतात. आणि बॉलिवूड चित्रपटांची मोहीनी पण त्यांच्यावर फार आहे. त्यामुळे भारतीय लोक बघून त्यांना फार आनंद होतो, त्यांचं प्रेम आणि आदर त्यांच्या वागण्यातून जाणवतोही.
दहशुरचा रेड पिरॅमिड फेरो स्नेफेरू याने ख्रिस्त पूर्व २६०० मध्ये बांधला. हा पिरॅमिड बांधायच्या आधी स्नेफेरूने २ वेळा पिरॅमिड बांधायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात सुरवातीचे काही दगड ठेवल्यावरच ते कोसळले. दुसऱ्या प्रयत्नात पिरॅमिडच्या बाजूंचा कोन साधतांना आकडेमोडीत काहीतरी गोंधळ झाला. आणि हे लक्षात आलं तोवर निम्मा पिरॅमिड उभा राहिला होता. सुरवातीच्या कोनाला धरून बांधकाम केले असता पिरॅमिड ढासळण्याची शक्यता होती. त्यामुळे झालेला गोंधळ सुधारण्याकरिता मध्यातून कोन बदलण्यात आला आणि तयार झाला वाकडा पिरॅमिड (Bent Pyramid). पिरॅमिडच्या बाजू सपाट आणि गुळगुळीत होण्यासाठी चुन्याचा थर लावला जायचा. आज जवळजवळ साडेचार हजार वर्षांनंतर सुद्धा तो थर इथे शाबूत दिसतो.
रेड पिरॅमिड
यानंतर रेड पिरॅमिड बांधायला अंदाजे १०-१७ वर्ष लागली. लाल चुनखडकापासून बनवलेला हा पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा असा तिसरा पिरॅमिड असून, याच्या आत जायला वेगळे तिकीट घ्यावे लागत नाही. पहिले दोन मोठे पिरॅमिड खुफू आणि खाफ्रे यांच्या आत जायला प्रत्येकी १००० पौंड्सचं तिकीट असल्याने आम्ही रेड पिरॅमिड आतून पाहायचा ठरवला. अशुर आम्हाला पायथ्याशी सोडून गाडी पार्किंग मध्ये लावायला गेला. या आवारात गर्दी अजिबात नव्हती. फक्त एक मध्यम वयस्क युरोपियन जोडपं नुकतंच पिरॅमिड बघून खाली उतरत होतं. १०-१५ मिनिटांनी आम्ही पिरॅमिडच्या मध्यापर्यंत पोहोचलो. इथून आत उतरण्याच्या पायऱ्या सुरु झाल्या. बऱ्यापैकी उतार असलेल्या लाकडी फळीवर मध्ये मध्ये पट्टे मारून शिडीप्रमाणे बनवलेलं आहे. यावरून उतरून एका हॉल मध्ये पोहोचलो. आता एक लाकडी जिना परत वर घेऊन जात होता. वरती पोहोचल्यावर ममी ठेवलेली ती खोली आली. सध्या इथे काहीच नाही, मस्तबा पण इथून हलवून कैरोच्या म्युसिअम मध्ये ठेवलेला. पण जेव्हा स्नेफेरूला इथे ठेवलं असेल तेव्हा त्या सोन्याच्या वस्तुंनी फार सुंदर दिसत असेल ना ही खोली. सुंदर कि उदास कि भयावह?
उतरायचा जिना
चढाईचा लाकडी जिना
फेरोची ममी ठेवलेली खोली
परत १५ मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही पिरॅमिडच्या प्रवेशापाशी पोहोचलो. भरपूर आणि थंडगार वारं वाहात होत. इथून सक्काराचा स्टेप पिरॅमिड पण दिसला दूरवर. खाली उतरून गाडीत बसलो आणि वाकड्या पिरॅमिड कडे एक चक्कर मारली. याच्या शेजारीच थोड्या अंतरावर काळा पिरॅमिड उभा असलेला दिसतो. विटा आणि मातीपासून बनवलेला हा पिरॅमिड सध्या मात्र दगडावर आलेल्या बुरशी सारखा दिसत असल्याने याला ब्लॅक पिरॅमिड असं म्हणतात.
वाकडा पिरॅमिड आणि मागल्या बाजूस काळा पिरॅमिड
इथून निघालो सक्काराला. इजिप्त मधील पहिला पिरॅमिड बघायला. इथेपण तिकीटबारीवर तसंच स्वागत झालं. "हिंदी", "शारुक" "अमिताबच्चन". आणि "वेलकम टू इजिप्त""Thank you, शुक्रन" म्हणत पुढे सरकलो. इमहोटेप या वास्तूविशारदाने फेरो झोसेरसाठी बांधलेला स्टेप पिरॅमिड हा इजिप्त मधील पहिला हे मी तुम्हाला आधी सांगितलंच. ख्रिस्त पूर्व २७०० मध्ये सहा मस्तबा एकावर एक रचून बांधलेला. इथे फक्त पिरॅमिड नसून कुंपणाची भिंत, खंदक, उंच खांबांमधून जाणारा मार्ग, प्रवेश कक्ष (हॉल), आणि चौक अशा अनेकाविध गोष्टी आहेत. खांबांवर बांबूसारखी घडण दिसते आणि अप्पर इजिप्त चा प्रभाव जाणवतो. या बद्दल पुढील एका भागात येईलच. पण सक्काराच्या पिरॅमिड कॉम्प्लेक्सला बघून इमहोटेपच्या कौशल्याबद्दल आणि नंतर त्याला मिळत गेलेल्या बढत्यांबद्दल जराही शंका रहात नाही. पिरॅमिड च्या पायथ्याशी इमहोटेप म्युसिअम आहे. ते बघून आम्ही गिझा कडे परत फिरलो.
पिरॅमिडच्या बाहेरील भिंत
बांबू सारखे काम असलेले खांब
स्टेप पिरॅमिड
पिरॅमिडचे आवार. मागील बाजूला दुरवर दिसतोय तो रेड आणि वाकडा पिरॅमिड
इमहोटेप म्युसिअम
रस्त्यात अशुरने जेवायला एका फार छान हॉटेल मध्ये नेलं. हम्मुस, आईश बलादी*, वांग्याचे तळलेले काप आणि त्यावर लिंबू, मुरवलेले ऑलिव्ह, ३ प्रकारचे कबाब आणि शेवया मिश्रित भात आणि बटाट्याचा रस्सा असा भरगच्चं आणि स्वादिष्ट मेनू समोर आला. या सगळ्यावर ताव मारल्यावर आलेले रसाळ खजूर सुद्धा पोटात मावले.
जेवण
*( पिटा ब्रेड सारखाच दिसायला मात्र चव फार वेगळी. गाव-शहरांतून जागोजागी याचे स्टॉल असतात. हा इजिप्तच्या रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थ कोणी घरी बनवत नाही. सरकार तर्फे १ पौन्ड ला ५ आईश इतक्या वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात)
अर्ध्या तासात आम्ही गिझाला पोहोचलो आणि गिझाच्या गल्यांमधून हळूच त्याने दर्शन दिले. लांबून जेवढा रुबाबदार आणि सुरेख दिसतो तो, जवळूनही तेवढाच देखणा आणि भव्य दिव्य भासतो. "द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा"बघताक्षणी प्रेमात पडावं अशी वास्तू. वास्तुशात्रातील गूढ. शब्दांत मांडता येण्याच्या पलिकडचा. हजारो वर्षांपासून मनुष्याला भुरळ घालत आलेला तो जेव्हा प्रत्यक्ष समोर आला तेव्हा हृदयाचे ठोके वाढलेले अंगावर काटा आलेला. You don't always feel that way, you know. "कसं करू शकले असतील ते लोक?" या जगाला सतावणाऱ्या प्रश्नाची खरी खोली तेव्हा जाणवली. मशीन आणि रोबोटिक्स च्या जगात वावरत आहे मी, त्यामुळे कदाचित जरा जास्तचं जाणवतंय त्यांचं कसब, त्यांची मेहनत आणि हुशारी. गेल्या पाच हजार वर्षांपासून तो उभा आहे, ऊन-वारा-वाळू यांचा सामना करत आणि पुढील पाच हजार वर्ष सुद्धा असाच उभा असेल मनुष्याचं अनोखं कर्तृत्व बनून. गाईडने स्वतःची कॅसेट सुरु केलीये पण माझी नजरच हटत नाहीये त्याच्यावरून. आजूबाजूच्या ३-४ गोष्टी पाहून आल्यावर आम्ही दोघं त्याच्यापायथ्याशी येऊन बसलो. थंड वारं आणि उतरतीचा सूर्य झेलत. दोघंही शांत. मनाने त्याच्या काळात पोहोचलेलो. आमच्या शेजारी कामगारांची लगबग लगबग सुरू आहे. मोठाले दोरखंड, मोठी मोठी चाकं आणि भल्या मोठ्या शिळा दिसत आहेत आजूबाजूला. खालच्या बाजूला कामगारांची वस्ती आहे. त्यांचे सफेद कपडे वाळू आणि धुळीमुळे मळकट झालेत. त्यांच्या पेक्षा वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात पपायरस वर काढलेल्या आकृत्या आहे, ज्याचा बोध त्यांनाच होत आहे. बघता बघता तो बांधला जात आहे. आता चुनकळीचा थर मारणं सुरु आहे. त्यानंतर सोन्याची टोपी चढवली कि झालं. लाडक्या फेरो साठी अतिप्रचंड असं वास्तूकौशल्य घडवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यांवरून झळकत आहे.
.१९ सप्टेंबर २०१८
सकाळी ७:३० वाजता महमूद चा फोन आला.
-- "तुमच्या आजच्या ट्रिपची गाडी तासाभरात पोहोचेल, नाश्ता करायला कॉमन रूम मध्ये या."
नवऱ्याचा ताप उतरला होता पण अशक्तपणा थोडा होताच.
"नक्की जाऊया ना आज?" असं त्याला ४ वेळा विचारून पक्कं केल्यावर १५ मिनिटात आवरून आम्ही नाश्ता करायला पोहोचलो.
लांबुळका ब्रेड, बटर, जॅम आणि कोरा चहा संपवेपर्यंत गाडी तयार होती.
"हॅलो, गुड मॉर्निंग!! माझं नाव अशुर. तुमचा आजचा गाडीवान. तुमचं नाव?"
-- "मी प्रवीण"
-- "आणि मी कोमल"
"नमस्ते पारवीन आणि कुमाल. आज आपण जाणार आहोत दहशुर, सक्कारा आणि ग्रेट पिरॅमिड पाहायला. गिझा आपण सगळ्यात शेवटी करूया."
- "ओके"
नील नदीवरचा ६th ऑक्टोबर ब्रीज ओलांडून आम्ही गिझा हद्दीत आलो आणि नदीच्या कडेकडेने आमचा प्रवास चालू झाला.
गिझा मधील सगळ्या इमारती विटांच्या आहेत आणि सगळ्या एकमेकांना अगदी खेटून. इतक्या कि एका घरात पडलेल्या भांड्याचा आवाज तिसऱ्या घरापर्यंत पोहोचावा. कधी दोन्ही किंवा कधी तिन्ही बाजूंनी इमारती वेढलेल्या. त्यामुळे फक्त दर्शनी भिंतीला रंग देण्याची पद्धत. काही इमारती तिच्या शेजारणीचं बांधकाम पूर्ण होई पर्यंत तशाच बोडक्या उभ्या तर काही शेजारी कोणी येईल का याची वाट बघत उभ्या. सगळ्या इमारतींवर डिश टीव्हीच्या छत्र्यांचं छप्पर. आणि सगळ्याच इमारतींचा रंग सारखाच. मातकट. गिझा मधून वाहणारं नील नदीचं पाणी सुद्धा प्रचंड कळकट. आपल्या मुळा-मुठे सारखंच.
गिझा संपलं कि चालू होतात खजुराच्या बागा, स्वच्छ हवा आणि नीलचं स्वच्छ पाणी. आपल्याकडे कोकणातून फिरताना माडाच्या लांब रांगा दिसतात तशा इथे खजुरांच्या दिसतात. आम्ही गेलो तेव्हा फळ पिकायला आलं होतं. उंच वाढलेल्या झाडांच्या शेंड्याला सोनेरी फळं काय सुरेख दिसत होती म्हणून सांगू. रस्त्याशेजारी छोटी पोरं खजुराचे वाटे विकतांना दिसत होती. चव बघावी म्हणून एक वाटा घेतला, काय गोड आणि ताजा होता तो खजूर. आपल्याकडे पोरं जशी बोरं पाडतात तसं तिकडं खजूर पाडत होते. रसरशीत आणि भरपूर गर असलेलं ते फळ तिथे चाखतांना फार छान वाटल.
खजूराच्या बागा
पिकलेलं फळ
छोटं झाड आणि कच्चं फळं. चव तुरट बोरासारखी
साधारण तासाभराने गाडीने मुख्य रस्ता सोडून गावात प्रवेश केला. आणि दहशुरची पाटी दिसली.
पिरॅमिड कॉम्प्लेक्सच्या हद्दीवर असलेल्या तिकीट खिडकीवर पोहोचलो आणि चेहरे बघताच तिथे सगळे पुटपुटायला लागले, "हिंदी हिंदी. मेशी.. शारूखान, अमिताबच्चन""yes yes" म्हणत मी तिकीटे घेतली आणि पुढे निघालो. तिकडे भारतीयांना इंडियन म्हणून नव्हे तर हिंदी म्हणून ओळखतात. आणि बॉलिवूड चित्रपटांची मोहीनी पण त्यांच्यावर फार आहे. त्यामुळे भारतीय लोक बघून त्यांना फार आनंद होतो, त्यांचं प्रेम आणि आदर त्यांच्या वागण्यातून जाणवतोही.
दहशुरचा रेड पिरॅमिड फेरो स्नेफेरू याने ख्रिस्त पूर्व २६०० मध्ये बांधला. हा पिरॅमिड बांधायच्या आधी स्नेफेरूने २ वेळा पिरॅमिड बांधायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात सुरवातीचे काही दगड ठेवल्यावरच ते कोसळले. दुसऱ्या प्रयत्नात पिरॅमिडच्या बाजूंचा कोन साधतांना आकडेमोडीत काहीतरी गोंधळ झाला. आणि हे लक्षात आलं तोवर निम्मा पिरॅमिड उभा राहिला होता. सुरवातीच्या कोनाला धरून बांधकाम केले असता पिरॅमिड ढासळण्याची शक्यता होती. त्यामुळे झालेला गोंधळ सुधारण्याकरिता मध्यातून कोन बदलण्यात आला आणि तयार झाला वाकडा पिरॅमिड (Bent Pyramid). पिरॅमिडच्या बाजू सपाट आणि गुळगुळीत होण्यासाठी चुन्याचा थर लावला जायचा. आज जवळजवळ साडेचार हजार वर्षांनंतर सुद्धा तो थर इथे शाबूत दिसतो.
रेड पिरॅमिड
यानंतर रेड पिरॅमिड बांधायला अंदाजे १०-१७ वर्ष लागली. लाल चुनखडकापासून बनवलेला हा पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा असा तिसरा पिरॅमिड असून, याच्या आत जायला वेगळे तिकीट घ्यावे लागत नाही. पहिले दोन मोठे पिरॅमिड खुफू आणि खाफ्रे यांच्या आत जायला प्रत्येकी १००० पौंड्सचं तिकीट असल्याने आम्ही रेड पिरॅमिड आतून पाहायचा ठरवला. अशुर आम्हाला पायथ्याशी सोडून गाडी पार्किंग मध्ये लावायला गेला. या आवारात गर्दी अजिबात नव्हती. फक्त एक मध्यम वयस्क युरोपियन जोडपं नुकतंच पिरॅमिड बघून खाली उतरत होतं. १०-१५ मिनिटांनी आम्ही पिरॅमिडच्या मध्यापर्यंत पोहोचलो. इथून आत उतरण्याच्या पायऱ्या सुरु झाल्या. बऱ्यापैकी उतार असलेल्या लाकडी फळीवर मध्ये मध्ये पट्टे मारून शिडीप्रमाणे बनवलेलं आहे. यावरून उतरून एका हॉल मध्ये पोहोचलो. आता एक लाकडी जिना परत वर घेऊन जात होता. वरती पोहोचल्यावर ममी ठेवलेली ती खोली आली. सध्या इथे काहीच नाही, मस्तबा पण इथून हलवून कैरोच्या म्युसिअम मध्ये ठेवलेला. पण जेव्हा स्नेफेरूला इथे ठेवलं असेल तेव्हा त्या सोन्याच्या वस्तुंनी फार सुंदर दिसत असेल ना ही खोली. सुंदर कि उदास कि भयावह?
उतरायचा जिना
चढाईचा लाकडी जिना
फेरोची ममी ठेवलेली खोली
परत १५ मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही पिरॅमिडच्या प्रवेशापाशी पोहोचलो. भरपूर आणि थंडगार वारं वाहात होत. इथून सक्काराचा स्टेप पिरॅमिड पण दिसला दूरवर. खाली उतरून गाडीत बसलो आणि वाकड्या पिरॅमिड कडे एक चक्कर मारली. याच्या शेजारीच थोड्या अंतरावर काळा पिरॅमिड उभा असलेला दिसतो. विटा आणि मातीपासून बनवलेला हा पिरॅमिड सध्या मात्र दगडावर आलेल्या बुरशी सारखा दिसत असल्याने याला ब्लॅक पिरॅमिड असं म्हणतात.
वाकडा पिरॅमिड आणि मागल्या बाजूस काळा पिरॅमिड
इथून निघालो सक्काराला. इजिप्त मधील पहिला पिरॅमिड बघायला. इथेपण तिकीटबारीवर तसंच स्वागत झालं. "हिंदी", "शारुक" "अमिताबच्चन". आणि "वेलकम टू इजिप्त""Thank you, शुक्रन" म्हणत पुढे सरकलो. इमहोटेप या वास्तूविशारदाने फेरो झोसेरसाठी बांधलेला स्टेप पिरॅमिड हा इजिप्त मधील पहिला हे मी तुम्हाला आधी सांगितलंच. ख्रिस्त पूर्व २७०० मध्ये सहा मस्तबा एकावर एक रचून बांधलेला. इथे फक्त पिरॅमिड नसून कुंपणाची भिंत, खंदक, उंच खांबांमधून जाणारा मार्ग, प्रवेश कक्ष (हॉल), आणि चौक अशा अनेकाविध गोष्टी आहेत. खांबांवर बांबूसारखी घडण दिसते आणि अप्पर इजिप्त चा प्रभाव जाणवतो. या बद्दल पुढील एका भागात येईलच. पण सक्काराच्या पिरॅमिड कॉम्प्लेक्सला बघून इमहोटेपच्या कौशल्याबद्दल आणि नंतर त्याला मिळत गेलेल्या बढत्यांबद्दल जराही शंका रहात नाही. पिरॅमिड च्या पायथ्याशी इमहोटेप म्युसिअम आहे. ते बघून आम्ही गिझा कडे परत फिरलो.
पिरॅमिडच्या बाहेरील भिंत
बांबू सारखे काम असलेले खांब
स्टेप पिरॅमिड
पिरॅमिडचे आवार. मागील बाजूला दुरवर दिसतोय तो रेड आणि वाकडा पिरॅमिड
इमहोटेप म्युसिअम
रस्त्यात अशुरने जेवायला एका फार छान हॉटेल मध्ये नेलं. हम्मुस, आईश बलादी*, वांग्याचे तळलेले काप आणि त्यावर लिंबू, मुरवलेले ऑलिव्ह, ३ प्रकारचे कबाब आणि शेवया मिश्रित भात आणि बटाट्याचा रस्सा असा भरगच्चं आणि स्वादिष्ट मेनू समोर आला. या सगळ्यावर ताव मारल्यावर आलेले रसाळ खजूर सुद्धा पोटात मावले.
जेवण
😍
*( पिटा ब्रेड सारखाच दिसायला मात्र चव फार वेगळी. गाव-शहरांतून जागोजागी याचे स्टॉल असतात. हा इजिप्तच्या रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थ कोणी घरी बनवत नाही. सरकार तर्फे १ पौन्ड ला ५ आईश इतक्या वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात)
अर्ध्या तासात आम्ही गिझाला पोहोचलो आणि गिझाच्या गल्यांमधून हळूच त्याने दर्शन दिले. लांबून जेवढा रुबाबदार आणि सुरेख दिसतो तो, जवळूनही तेवढाच देखणा आणि भव्य दिव्य भासतो. "द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा"बघताक्षणी प्रेमात पडावं अशी वास्तू. वास्तुशात्रातील गूढ. शब्दांत मांडता येण्याच्या पलिकडचा. हजारो वर्षांपासून मनुष्याला भुरळ घालत आलेला तो जेव्हा प्रत्यक्ष समोर आला तेव्हा हृदयाचे ठोके वाढलेले अंगावर काटा आलेला. You don't always feel that way, you know. "कसं करू शकले असतील ते लोक?" या जगाला सतावणाऱ्या प्रश्नाची खरी खोली तेव्हा जाणवली. मशीन आणि रोबोटिक्स च्या जगात वावरत आहे मी, त्यामुळे कदाचित जरा जास्तचं जाणवतंय त्यांचं कसब, त्यांची मेहनत आणि हुशारी. गेल्या पाच हजार वर्षांपासून तो उभा आहे, ऊन-वारा-वाळू यांचा सामना करत आणि पुढील पाच हजार वर्ष सुद्धा असाच उभा असेल मनुष्याचं अनोखं कर्तृत्व बनून. गाईडने स्वतःची कॅसेट सुरु केलीये पण माझी नजरच हटत नाहीये त्याच्यावरून. आजूबाजूच्या ३-४ गोष्टी पाहून आल्यावर आम्ही दोघं त्याच्यापायथ्याशी येऊन बसलो. थंड वारं आणि उतरतीचा सूर्य झेलत. दोघंही शांत. मनाने त्याच्या काळात पोहोचलेलो. आमच्या शेजारी कामगारांची लगबग लगबग सुरू आहे. मोठाले दोरखंड, मोठी मोठी चाकं आणि भल्या मोठ्या शिळा दिसत आहेत आजूबाजूला. खालच्या बाजूला कामगारांची वस्ती आहे. त्यांचे सफेद कपडे वाळू आणि धुळीमुळे मळकट झालेत. त्यांच्या पेक्षा वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात पपायरस वर काढलेल्या आकृत्या आहे, ज्याचा बोध त्यांनाच होत आहे. बघता बघता तो बांधला जात आहे. आता चुनकळीचा थर मारणं सुरु आहे. त्यानंतर सोन्याची टोपी चढवली कि झालं. लाडक्या फेरो साठी अतिप्रचंड असं वास्तूकौशल्य घडवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यांवरून झळकत आहे.
आता चुना गळून पडलाय. टोपी तर कधीच गेली. पण तो मात्र मोठ्या ऐटीत उभा आहे. आजही.
२० सप्टेंबर २०१८
आज भल्या पहाटे बहारियाला जायला निघालो. इथे पोहोचायला तुम्हाला बस घेता येते किंवा शेअर टॅक्सी करता येते. महमूद ने आमच्यासाठी टॅक्सी ठरवून दिली होती. सकाळी ७:३० वाजता आम्हाला हॉटेल मधून गिझा स्टॅन्ड वर एक गाडी सोडून गेली. दुसरी गाडी तिथे वाट पाहात थांबली होतीच. त्यात आधीच एक स्पॅनिश जोडपे आणि त्यांचा गाईड बसला होता. आम्हाला घेतल्यावर गाडी गिझाच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरत एका घराजवळ थांबली. तिथे बरंच सामान गाडीत चढवल्यावर ड्राइव्हरची बायको आणि मुलगा पण गाडीत येऊन बसले आणि एकदाचा आमचा बहारियाच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
बहारिया हे एक सहारा वाळवंटातील मरुद्यान अर्थात ओऍसिस. फाराफ्रा आणि सिवा हि इतर काही मरूद्याने.
बहारिया आणि फाराफ्रा च्या मध्ये पांढरे वाळवंट(white desert), काळे वाळवंट (black desert), स्फटिकांचा डोंगर(क्ट्रिस्टल माउंटन) या ३ सुंदर जागा लागतात. त्याशिवाय गरम पाण्याचा झरा, गार पाण्याचा झरा या गोष्टी पण आहेतच. हे सगळं बघायचं, १ रात्र पांढऱ्या वाळवंटात मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत असा प्लॅन होता. या २ दिवसांच्या प्लॅन साठी reviews फार छान होते म्हणून मी हि ट्रिप नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. म्हणजे नक्की काय तर, जो ट्रिपचा खर्च येईल तो दोघात विभागला जाईल त्यातून बहारियाला वगळायचे एवढंच. पण anniversary gift असल्याने ती चांगली व्हायलाच हवी हा मात्र माझा आग्रह होता.
सहारा वाळवंट कापत सुमारे ५ तासांनी आम्ही बहारिया गाठलं. इथे आम्हाला
घ्यायला मुस्तफा ४ x ४ गाडी घेऊन तयार होता. वाळवंटात प्रत्येक "पार्टी"ची
स्वतंत्र सोय असते. स्वतंत्र गाडी असते. दुबईच्या डेझर्ट सफारीला डोक्यात
घेऊन काहीश्या सांशक मनाने आलेल्या नवऱ्याचे पूर्वग्रह इथेच गळून पडले.
मुस्तफा आम्हाला छानश्या ठिकाणी जेवायला घेऊन गेला. एक अरेबिक घर, ज्यातून
खमंग वास येत आहे. त्याच्या शेजारील जागेत खजुराच्या झाडाखाली मातीने
सारवलेल्या भिंती आणि खजुराच्या झावळ्यांचे झप्पर बनवून, गाद्या गिरद्या
टाकून जेवायची सोय केलेली. भिंतींवरून हाताने बनवलेल्या काही वस्तू आणि
चित्रे टांगून ठेवली आहेत. भर दुपारी सुद्धा थंड निवांत वाटत होतं. आम्ही
जागा घेताच समोर विविध पदार्थ हजर झाले. फ़ुल*, शाकशुका**, उकडलेला बटाटा वर
शेपूची सजावट, तळलेले वांग्याचे काप त्यावर लिंबू पिळलेलं, चिप्स, सलाद
आणि अनलिमिटेड आईश.
* म्हणजेच उकडलेल्या राजम्याला बारीक वाटून केलेली भाजी
** या लेबनीज पदार्थात टोमॅटोच्या घट्ट ग्रेव्ही मध्ये अंडी फोडून तशीच
शिजवतात, पोर्चड एग्ग्स सारखी. वाळवंटात मात्र त्याच वेगळं रुपडं समोर आलं,
आपल्या भुर्जी सारखं काहीस, फक्त कांद्याशिवाय
जेवण केलं ते घर वजा रेस्टाँरंट
जेवण
जेवून थोडा वेळ आराम केला आणि निघालो. तापलेल्या वाळवंटातून आमचा प्रवास सुरु झाला. सोबतीला होता अबोल मुस्तफा आणि त्याची मोठ्याने वाजणारी अरेबिक गाणी. यातलं एक गाणं मला जाम आवडलं. साद लॅमजार्ड याचं माल्लेम.
जरा वेळातच आजूबाजूला छोट्या मोठ्या काळ्या टेकड्या दिसत होत्या. जणू
रणरणत्या उन्हाने रापलेल्या.साधारण अर्ध्या तासाने मुस्तफाने गाडी थांबवली
आणि सांगू लागला,
मुस्तफा: आपण पोहोचलो आहोत ब्लॅक डेझर्ट मध्ये. या भागातील सगळ्या टेकड्यांवर असा काळा रंग दिसेल.
मी: हो. पण ते कशामुळे?
मुस्तफा: खूप खूप पूर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता.
त्यामुळे वाळूच्या टेकड्यांवर लाव्हाचा थर जमा झाला आणि थंड होऊन तो दगड
बनला. तुम्हाला सगळ्या काळ्या वाळवंटाचा नजारा या मोठ्या टेकडीवर चढून
गेल्यावर दिसेल. अर्ध्या तासात परत या.
जवळच्याच टेकडीवर १०० -१५० फूट चढून गेल्यावर विस्तीर्ण काळं वाळवंट दिसलं. खाली वाकून एक दगड हातात घेतला. नक्कीच बॅसाल्ट होता. मुस्तफाची ज्वालामुखीची थेअरी मला तेव्हा अतिशयोक्ती वाटली कारण एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर लाव्हा सांडला असेल असं म्हंटल तर तो उद्रेक किती मोठा असायला हवा. पण नंतर गूगल वर पाहिलं आणि बऱ्याच ठिकाणी तेच वाचायला मिळालं जे मुस्तफाने सांगितलं होतं.
ब्लॅक डेझर्ट
ब्लॅक डेझर्ट टेकडी वरुन
ब्लॅक डेझर्ट
टेकाड उतरून खाली आलो आणि पुढे निघालो. २०-२५ मिनिटांत मुख्य रस्ता सोडून गाडी माळावर शिरली आणि मिनिटभरातच आम्ही क्रिस्टल माउंटन वर पोहोचलो. विविध आकारातील गारगोटीचे दगड संपूर्ण डोंगरावर पसरले होते. आणि कललेल्या उन्हांत ते विलक्षण चमकत होते. इजिप्त मध्ये मुन स्टोन पण सापडतात म्हणे, आणि हे रात्रीच्या अंधारात हिरवा प्रकाश देतात. पूर्वीच्या काळी वाळवंटातील लोक त्याचा वापर रात्रीच्या प्रवासात करायचे. आम्ही शोधलं पण आम्हाला तो काही सापडला नाही. त्यामुळे थोडे आकर्षक क्रिस्टल आठवण म्हणून सोबत घेतले.
आता आम्ही मोठा रस्ता सोडून एका गावात शिरलो. थोडी शेती आणि गुरु ढोर दिसली आणि गाडी एका खोपट्या समोर थांबली. इथे गरम पाण्याचा झरा होता. त्याचं पाणी एका हौदात गोळा करून जास्तीचं पाणी पुढे सोडून दिलं जात होते. थोडा वेळ तिथे घालवला पण तो हॉट स्प्रिंग फारसा काही आवडला नाही. कोकणातील गरम पाण्याचे झरे त्या झऱ्याहून जास्त छान आहेत. झऱ्यापाशी जास्त वेळ न थांबता मी शेजारच्याच शेतात गेले. ज्वारी सारखं पीक दुरून दिसत होत, जवळ जाऊन पाहिलं तर खरंच ज्वारी होती. आणि सोबतीला गावरान भेंडी पण. थोडे फोटो काढून तिथून निघालो.
ब्लॅक डेझर्ट
अर्ध्या पाऊण तासाने परत मुख्य रस्ता सोडून आम्ही वाळवंटात शिरलो. गाडी थांबवून मुस्तफाने टायर मधली हवा कमी केली. आणि मग कळालं कि आता मज्जा येणार आहे. एकापाठोपाठ वाळूच्या टेकड्यांवरून सॅण्ड ड्यून बॅशिंग करत निघालो. कधी वेगाने टेकडी चढून जायची आणि कधी दुप्पट वेगानी खाली उतरायची असं करत एक खिंडीत येऊन पोहोचलो. इथून दिसणारा नजारा फारच छान होता. उंचावर आम्ही, दोन्ही बाजूंना उंच भिंतींसारखे डोंगर आणि वाळूची घसरगुंडी. मऊसूत वाळू हातातून भुरुभुरु निसटून जायची. शूज आणि सॉक्स काढून तिथेच फतकल मारून बसलो. थंड वारा, उतरतीच्या उन्हाची उब, मऊशार वाळू सगळंच फार सुंदर होतं, आणि मुस्तफाने बोलावलं नसतं तर कदाचीत आम्ही तिथून हललोच नसतो. पण त्याच्याकडे दाखवण्यासारखं अजून बरंच होतं, आणि आम्ही बघण्यासाठी भुकेले होतो.
सूर्रर्रर्र करत गाडी त्या उतारावरून खाली आली आणि परत ड्यून बॅशिंग चालू झालं. आता सोबतीला बाकी पार्टीजच्या गाड्या पण होत्या. मुस्तफा आम्हाला एका उंच टेकडीवर घेऊन गेला. गाडीतून सॅण्ड बोर्ड काढला आणि त्याला साबणाने पॉलिश करून दिलं. म्हणाला तुम्ही खेळा, मी तोवर चहा बनवतो. सॅण्ड बोर्डिंग मध्ये घसरतांना जेवढी मजा येते, त्याहून जास्त वाट लागते तो बोर्ड घेऊन परत वर चढून यायला. मी कतार मधील Singing Sand Dunes वर याचा अनुभव घेतला होताच त्यामुळे मी यावेळी त्याच्या फंदात पडले नाही. पण नवरोबाने मात्र बऱ्याच वेळा ही चढाई केली. शेवटी थकलो आणि मुस्तफाने स्टोव्हवर बनवलेला चहा पिऊन गाडीत जाऊन बसलो.
वाळवंटातून हेलकावे खात थोड्याच वेळात ओल्ड व्हाईट डेझर्ट मध्ये पोहोचलो. चुनखडीचे काही दगड इथे होते. थोडे फोटो काढले तोवर White Desert National Parkचे लोक तिकीट देण्यासाठी आले. हे स्वतः ४x४ मध्ये फिरत तिकिटे वाटत असतात.
मुस्तफा आता घाई करू लागला होता, "लवकर चला नाहीतर इथेच मुक्काम करायला लागेल."अजूनही आमची गाडी वाळवंटातूनच चालली होती, पण आता वाळूच्या जागी कठीण खडक लागत होता. अजून एक टेकडी चढून गेलो. मुस्तफाने म्हणाला, "फ्लॉवर स्टोन. फ्लॉवर स्टोन". मी मनातल्या मनात भाषांतर केलं दगडफूल. पण तिथे दगडफूलासारखं काहीच नव्हतं. पण फुलांच्या आकाराचे छोटे छोटे काळे असंख्य दगड होते. इतके छान कि कोणी कारागिरी करून तसेच सोडून गेला असावा. आमच्या दगडं गोळा करण्याच्या सवयीला ओळखून यावेळी मुस्तफाने स्वतः पण मदत केली आणि तो कार्यक्रम अवघ्या दोन मिनिटात आटपला.
वेगात ती टेकडी उतरून खाली आलो ते थेट व्हाईट डेझर्ट मध्ये. जमिनीतून उगवून आल्यासारखे वाटणारे विविध आकारांचे चुनखडक दूरवर पर्यंत दिसत होते. कुठे ससा, कुठे कोंबडी, कुठे चेहरा तर कुठे आईस्क्रीम. आणि काही खडक एका बाजून पहाल तर बास्केट सारखे आणि दुसऱ्या बाजूने पाहाल तर अननसासारखे. शोधावं तेवढं कमी, बघावं तेवढं थोडं. आता सूर्यास्त झाला होता, आणि अंधार पडायला फार काही वेळ नव्हता. तरी तेवढ्यात मुस्तफाचं आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं चालूच होत. तो वाळवंटाच्या प्रेमात होता आणि आम्हालाही त्याच्या नजरेतून पाहतांना वाळवंट आवडू लागलं होतं.
अंधार पडला आणि एका भागात त्याने गाडी थांबवली. "आपण आज इथेच मुक्काम करूया. मी कॅम्प लावतो तोवर तुम्ही फिरून या."
चहुबाजूने चुनखडक, मध्यभागी वाळवंटाचा छोटासा तुकडा आणि वर अथांग आकाश.
कॅम्पिंग साठी परफेक्ट जागा निवडली होती मुस्तफाने. अंधुक प्रकाशात
दिसणाऱ्या खडकांच्या आकाराचे अंदाज बांधत थोडावेळ फिरून परत येई पर्यंत,
मुस्तफाचा सेटअप तयार होता. गाडीच्या शेजारी जेवणासाठी सतरंजी - गाद्या -
छोटासा टेबल. त्यावर फळांचं ताट. एका बाजूला मस्त शेकोटी पेटवलेली होती आणि
त्याच्या विस्तवावर जाळी घालून त्यावर मॅरिनेटेड चिकन भाजलं जात होतं,
स्टोव्ह वर त्याने भात चढवला होता आणि भाज्या कापत बसला होता. त्याचा सगळा
स्पीड पाहून आश्चर्यचं वाटलं. आम्ही फळं खात त्याच्या बाजूला बसलो. काही
बाही विषय काढत त्याला बोलत करायचा प्रयत्न सुरु होता. पण तो कामात इतका
गर्क होता कि आमच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तरे देऊन तो शांत व्हायचा. भात
उतरवून त्याने भाजीला फोडणी दिली. हे सगळं करतांना मात्र सिगारेट फुंकणं
काही बंद नव्हतं केलं त्याने. एका मागोमाग एक अशा दिवसभरात किती शिलगावल्या
असतील याचा हिशोब नाही.
चिकन शिजलं आणि मुस्तफाने ताटं वाढली.
मी: तू पण बैस ना आमच्या सोबत.
मुस्तफा: नाही तुम्ही दोघे जेवा . मी करेन नंतर.
नवरा: अरे ये रे. इथे बैस. आणि जेव आमच्या सोबत.
मुस्तफाने पण वाढून घेतलं. जेवण खरंच खूप चविष्ट होतं. भात भाजी तर अप्रतिम लागतं होतं.
मी: खूप छान बनवलं आहेस सगळं. चव आहे तुझ्या हाताला.
मुस्तफा: थँक्स. १-२ वर्षचं झाली मी बनवतो आहे. नाही तर त्या आधी आई यायची सोबत जेवण बनवायला.
मी: लग्न झालंय तुझं?
मुस्तफा: हो. २ वर्षांपूर्वी. मुलगा पण आहे १ वर्षाचा.
नवरा: अरे वा! आणि डेझर्ट कॅम्पिंग किती वर्षांपासून करतोयस?
मुस्तफा: १७ वर्ष होतील आता.
नवरा: क्काय? म्हणजे १३-१४ वर्षाचा असल्यापासून येतोस पर्यटकांना घेऊन?
मुस्तफा: १२ वर्षाचा होतो तेव्हा पासून. सोबत आई असायचीच. मग आता मीच तिला म्हणालो कि तू घरी थांबत जा. मी बघेन.
मी: छानच की!! मग तू बायको कडून शिकलास जेवण बनवायला कि आई कडून?
मुस्तफा: छे. बायकोला काही येत नाही माझ्या. आई खूप छान स्वयंपाक करते. तू
माझ्या आईच्या हातचं जेवण चाखून पाहिलंस तर बाकी इजिप्त मधली जेवणं विसरून
जाशील.
मुस्तफा आता बोलू लागला होता.
मी: मुलाचं नाव काय ठेवलंस?
मुस्तफा: अशुर.
नवरा: ओह. आमच्या गिझा टूर साठी ज्याची गाडी केली होती त्याचं पण नाव अशुरच होत. चांगला माणूस आहे तो पण.
जेवण झालं आणि आम्ही शेकोटीच्या आजूबाजूला येऊन बसलो. गार वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या त्यामुळे मुस्तफाने चहा बनवायला घेतला. आमच्या मध्येच बंद पडलेल्या गप्पा परत सुरु झाल्या.
मी: तुझी वाळवंटातली एखादी आठवण सांग ना.
मुस्तफा: आठवण अशी नाही काही. खूप वेगवेगळी माणसं घेऊन आलोय आजवर इथे. एक
जण भारतीय पण होता. मला तसा तुमचा देश आवडतो, पण मी बरंच ऐकलं आहे तुमच्या
देशाबद्दल.
मी: जसं की?
मुस्तफा: स्त्रियांसाठी तुमचा देश अजिबात सुरक्षित नाहीये. मी बऱ्याच महिला
पर्यटकांना इथे डेझर्ट मध्ये फिरायला आणलंय. त्यांतल्या बऱ्याच जणी हेच
सांगत होत्या. तिथली माणसं एकटक बघत असतात. उगीच स्पर्श करायचा प्रयत्न
करतात.
मी: कधी होत असेल असं पण सगळीकडे अशी परिस्थिती नाहीये. (फार वाद नाही घालू
शकले या मुद्द्यावर कारण कितीही नाही म्हणालात तरी हे होतच भारतात हे मी
सुद्धा जाणून आहे).
थोड्या शांततेनंतर मुस्तफानेच विषयाला सुरवात केली.
मुस्तफा: पूर्वी युरोपातील खूप बायका यायच्या इकडे वाळवंटात. फक्त फिरायला
नाही तर शरीरसुखासाठी. असं म्हणतात कि याबाबतीत इजिप्ती पुरुषाला कोणी मात
देऊ शकत नाही (तो हसत हसत म्हणाला). मी स्वतः लग्नाच्या आधी हे सगळं
करायचो, फार चांगले पैसेही मिळायचे मला. पण लग्नानंतर मात्र सगळं बंद करून
टाकलं. आणि २०११ नंतर पर्यटकांचा ओघ आटला आणि सगळीकडूनच हे बंद झालं.
नवरा: इस रेगिस्तान में काफी राज दफ़न है।
मी: याव्यतिरिक्त सत्तापालटाचा वाळवंटावर काय परिणाम झाला?
मुस्तफा: मुबारक फार चांगला माणूस होता. शहरापासून दूर राहणाऱ्यांसाठी फार
चांगली काम करायचा. कैरो मध्ये फक्त काही लोकांना तो आवडत नव्हता.
त्याच्यानंतर वाळवंटाकडे दुर्लक्षच झालं सगळ्यांचं. वाईट झालं २०११ नंतर
सगळं. आमचे पर्यटक तर गेलेच, बाकी उरला रिकामटेकडेपणा. त्यामुळेच अशा
सिगरेट मागून सिगरेट ओढायची सवय लागली. सोडायची आहे पण होत नाही.
मी: पण हे तुझ्या आरोग्यासाठी नाहीये चांगलं.
मुस्तफा: हो. सगळं माहित आहे. पण असंख्य प्रश्न आहेत समोर आणि उत्तरं
कोणाकडेच नाहीत. रिकाम्या डोक्यात मग नाही ते विचार येतात. त्यावर मात
करायला फक्त हिचा उपयोग होतो. आज इजिप्तमधील सगळे लोक याच एका कारणामुळे
सिगारेटच्या आहारी गेलेत. असो, मी चहा बनवून ठेवलाय तुमच्यासाठी, लागेल तसा
घ्या. मी जातो झोपायला.
नवरा: तू नाही घेणार चहा?
मुस्तफा: नाही, झोपायच्या आधीची सिगारेट घ्यायची आहे मला आता.
**********************************************************************************
बराच वेळ मोकळ्या आभाळाखाली निवांत पडून होतो. मुस्तफाने सांगितलं होत कि
कोल्हे येतात रात्री त्यांच्या भीतीने नवऱ्याने शेकोटीचं विझत आलेलं एक
लाकूड जवळ घेऊन ठेवलं. हळू हळू रात्रीची गुंगी चढू लागली आणि आम्ही टेन्ट
मध्ये जाऊन पडलो.
रात्री अडीचच्या सुमारास नवऱ्याने 'ए उठ ना पटकन' म्हणत जागं केलं. मला
वाटलं कोल्हा आला असेल पण कोल्हा तर नव्हता आला पण आकाशने रुपडेच पालटले
होते. आकाशगंगा डोक्यावर आली होती. चंद्र कधीच मावळला होता त्यामुळे तारे
अधिकच प्रखर भासत होते. हजारो लाखो दिवे पेटलेले जणू. एक एक नक्षत्र ओळख
दाखवू लागले. उत्तरेला वृश्चिकाचा आकडा दिसू लागला होता तर कुठे कृतिकेचा
पुंजका दिसत होता. अधूनमधून उल्का पडत होत्या. आकाशात जणू जल्लोष सुरु
होता. आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींना आपण कायम गृहीत धरतो आकाश हे
त्यापैकीच एक याची जाणीव तेव्हा झाली.
पहाटे ५:३० वाजता सूर्योदयाच्या थोडावेळ आधी जाग आली. आकाश गुलाबी झाले
होते. काल सूर्यास्ताच्या वेळी पाहिलेलं व्हाईट डेझर्ट आता अजूनच कमाल दिसत
होतं. जणू सहारा वाळवंटाच्या मधोमध बर्फवृष्टी झाली आहे. किंवा थेट
चंद्रावर पोहोचलो आहोत आम्ही. सूर्योदय पाहत पाहतच नाश्ता उरकला. ब्रेड,
बटर, जॅम आणि मस्त पुदिना घातलेला चहा.
२१ सप्टेंबर २०१८
बहारियाहून निघालेली बस ६ तासांनी कैरोला पोहोचली. वाटेत महमूदचा फोन येऊन गेलेला. तो म्हणाला होता "गिझाला पोहोचल्यावर फोन करा. गाडी पाठवतो". त्याप्रमाणे बस गिझा स्टँड वर थांबली आणि आम्ही उतरून त्याला फोन केला तर तो म्हणाला, "तुम्हीच टॅक्सी करा मी आल्यावर पैसे देतो". बस स्टॅण्ड च्या बाहेर येतो तोवर १०-१५ टॅक्सी चालकांनी गराडा घातला. त्यातल्या एकाला पत्ता सांगितला आणि त्याने अक्षरशः बॅग आमच्या हातातून खेचली आणि त्याच्या गाडीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागे आम्ही पळत त्याच्या गाडी पर्यंत पोहोचलो तेवढ्यात दुसऱ्या टॅक्सी चालकाने येऊन पहिल्याला मारायला सुरवात केली. त्यांची बेदम मारामारी सुरु झाली. आमची बॅग त्याच्या डिक्कीत, त्यामुळे आम्ही तिथून निघू शकत नव्हतो. १५-२० मिनिटांनी दोन-चार दात प्रत्येकी पडल्यावर आमच्या टॅक्सीवाल्याने बॅग काढून आमच्या ताब्यात दिली, 'didn't wanted you to see this' असं पुटपुटतं तो निघून गेला. बाकीचे लोक अजूनही तसेच होते मात्र या वेळी कोणी बॅग हातातून घ्यायला धजावलं नाही. थोडं मागे चालत येऊन दुसरी टॅक्सी हाकारली. महमूदला फोन लावून नव्या टॅक्सी चालकाशी बोलायला लावलं आणि अवघ्या १५ मिनिटांत आम्ही आमच्या हॉटेलच्या खाली येऊन पोहोचलो.
महमूद येई पर्यंत आम्ही अंघोळलो, चहा घेतला आणि रिसेप्शनिस्ट सोबत Ki & Ka बघत बसलो. थोड्या वेळाने तो आला. त्याला झाल्या प्रकारचं इत्थंभूत वर्णन केलं. सगळी ट्रीप उत्तम झाल्यानंतर संध्याकाळच्या प्रकाराने त्याला गालबोट लागलेसे झाले. महमूदने अजून एक चहा आणि फलाफल सॅन्डविच मागवले. एव्हाना सात वाजत आले होते. आमच्या ट्रेनची तिकिटे घेऊन त्याचा निरोप घेतला. खाली येऊन परत टॅक्सी केली आणि २० मिनिटांत रॅमसिस रेल्वे स्टेशन वर पोहोचलो.
आमची गाडी नं ८८ हि स्पॅनिश बनावटीची एक्सप्रेस ट्रेन होती. संध्याकाळी ८:३० ला कैरो वरून निघून गिझा-लक्सॉर-इस्ना-इडफू-कोम ओम्बो करत सकाळी १०:३० ला आस्वानला पोहोचणारी होती. कैरो वरून दक्षिणेला जायला टॅक्सी किंवा बस हे पर्यायसुद्धा आहेत पण रेल्वेने प्रवास करायची मज्जाच वेगळी अशा विचारसरणीची मी असल्याने शक्य असेल तेव्हा रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. परदेशातील रेल्वे सुविधेची ओळख करून देणारी https://www.seat61.com मला फार उपयोगी पडली.
भारताप्रमाणेच मिस्र मध्येही रेल्वे ची पायाभरणी इंग्रजांनी केली. मात्र भारतासारखं इथं रेल्वेचं जाळं पसरलेलं नाही. कैरो ते अॅलेक्झांड्रिया/पोर्ट सैद/ मरसा मत्रुह/ दमाईत / अल मन्सूरा / सुवेझ या बंदरांपर्यंत आणि कैरो ते आस्वान अशा मोजक्याच मार्गांवर कैरो रेल्वे धावते.
रॅमसिस स्टेशन मात्र, मेट्रो आणि रेल्वेचं सगळ्यात महत्वाचं जंक्शन. स्टेशन तसं छान. प्रकाशमान. माहितीचे बोर्ड जागोजागी लावलेले. गाडयांची स्थिती सांगणारे डिजिटल डिस्प्ले. स्टेशनचा अंतर्भाग वातानुकूलित. पण प्लॅटफॉर्म वर पोहोचलात कि सगळीकडे सिगारेटच्या धुराचे ढग. रेल्वेच्या आत आणि स्टेशनच्या आत मज्जाव असलेल्या सिगारेटला फलाटावर मोकळीक होती. त्यामुळे सगळे अखंड तिचा आस्वाद घेत होते. सिगारेटच्या धुराच्या ऍलर्जीमुळे माझी अवस्था फार वाईट झाली होती. अखेरीस ८:१५ ला ट्रेन आली आणि बरोब्बर ८:३० ला निघाली. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा आता जाणवू लागला होता. कैरो पासून निघालेली गाडी गिझाला पोहोचायच्या आधीच आम्ही ढाराढूर झोपलो.
२२ सप्टेंबर २०१८
सकाळी ६:३० च्या सुमारास जाग आली. एका सुंदर दिवसाची सुरुवात झाली होती. उजव्या बाजूला नील नदी, तिच्या पलीकडे हिरवीगार शेती, डाव्या बाजूला उंच बोडके डोंगर, डोंगरांच्या मधील सखल भागात वाळवंट. असं परस्पर विरोधी दृष्य आम्हाला पुढेपण बऱ्याच वेळा दिसलं. कैरो आस्वान रेल्वे लाईनला सोबत करत होता कैरो आस्वान हाय वे. खजुराची पळती झाडे पाहत पाहत १०:१० पर्यंत आस्वानला येऊन पोहोचलो. गाडीच्या डब्यातून खाली उतरल्या बरोब्बर गरम हवेच्या भपकाऱ्याने आम्हाला जागीच उभं केलं. कैरो नाईल डेल्टा मध्ये, त्यामुळे तिथे तापमान कमी असतं. आस्वानला पण नाईल आहे पण वाळवंट जास्त त्यामुळे इथे कैरोपेक्षा ५-६ °C तापमान जास्त असतं आणि ते पटकन जाणवतं सुद्धा.
नीलचा नजारा(रेल्वे मधून)
रेल्वेचा अंतर्भाग
आस्वान रेल्वे स्थानक
स्टेशन पासून १०-१५ मिनिटांवर आमचं हॉटेल होत. Nile Hotel, Cornish. नाईल च्या बाजूच्या रस्ताला कॉर्निश म्हणतात. रस्त्यालगतच आमचं हॉटेल छोटं पण छान होतं. Nile Facing अशी रूम तर भन्नाट होती. समोरच नाईल मधील एलफन्टाईन बेट दिसत होत,नदीमध्ये बऱ्याच क्रूझ उभ्या होत्या, छोट्या बोटी इकडून तिकडं फिरत होत्या. एकंदरीतच निवांत शहर आहे आस्वान.
नीलचा नजारा(हॉटेल मधून)
नीलचा नजारा(हॉटेल मधून)
आधी फ्रेश होऊन मग दुपारचा वेळ आरामात घालवू असं ठरवलं. ४०-४२° मध्ये काय फिरणार म्हणा. संजयचा मित्र आयमन आठवत असेल तुम्हाला. त्याचा भाऊ मुस्तफा. संजयने मुस्तफाचा नंबर दिला होता, आम्ही येणार याची त्याला पण कल्पना दिली होती. त्याला फोन करून सांगितलं कि आम्ही आस्वान मध्ये दाखल झालो आहोत. संध्याकाळी भेटूया असं ठरलं. दुपारची भूक भागवण्यासाठी कॉर्निश वरील KFC मध्ये आसरा घेतला. टेस्ट वेगळी होती पण छान होती. उन्हाने मात्र आम्हाला नको करून सोडलेलं. हॉटेल मध्ये परत येऊन संध्याकाळची वाट बघत बसलो.
५ वाजता उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर आम्ही खाली येऊन कॉर्निश वर फेरफटका मारत बसलो. गरम हवेच्या झुळूका वाळवंटावरून नदीपार करत आमच्यावर येऊन थडकत होत्या. एका बाजूला नील दुसऱ्या बाजूला फारशी रहदारी नसलेला रस्ता. मधल्या रुंदशा फुटपाथवर बाकड्यांची सोय. फार छान वाटत होतं. थोड्या वेळाने मुस्तफा आला आणि त्याच्या आणि आयमनच्या दुकानात घेऊन गेला. "आयमन सकाळी दुकान सांभाळतो आणि मी संध्याकाळी येतो." मुस्तफाने आमच्या मनातल्या न विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. थोड्याच वेळात त्याने इजिप्ती चहा आणून दिला, संजयची विचारपूस केली आणि गप्पांचा सिलसिला सुरु झाला.
सध्या दुकान वगैरे सांभाळत असला तरी मुस्तफा आणि त्याचे वाडवडील कलाकार. इजिप्तच्या इतिहासातील कोणतीही गोष्ट, मूर्ती, वस्तू दगडांत घडवण्यात त्याच्या आजोबांचा आणि वडिलांचा हातखंडा. मुस्तफा मात्र चित्रकारी, फॅब्रिक प्रिंटिंग, आणि वजनाने हलक्या अश्या वस्तू फायबर पासून बनवण्यात पटाईत. त्याने बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन फिनलँड मध्ये ३-४ वर्षे होतं. पण इजिप्तच्या प्रेमात असलेल्या मुस्तफाला फिनलँड फार भावला नाही आणि वर्षभरातच तो पुन्हा इजिप्तला परत आला आणि लग्न करून आस्वान मधेच स्थायिक झाला. त्याची सध्याची कामं, बायको-मुलं, आई-वडील असे झपाट्याने विषय बदलत आम्ही भरपूर गप्पा मारत होतो.
हळू हळू राजकारणाच्या गोष्टी सुरु झाल्या आणि मी माझा खास ठेवणीतला
प्रश्न त्याला विचारला, "मुबारक यांची सत्ता गेली त्याचा आस्वान वर काय
परिणाम झाला?"
"मुबारक होते तोवर ठीक सुरु होतं सगळं असं नाही. जनतेचे प्रश्न तेव्हाही
होते. पण आत्ताची परिस्थिती तेव्हा पेक्षाही बिकट आहे. महागाई प्रचंड वाढली
आहे. उद्योगधंदे नाहीत. पूर्वी नुसत्या पर्यटनावर इजिप्तची अर्थव्यवस्था
भक्कम उभी होती. बांधकाम विश्व पसरत होतं. आता तर कित्येक वर्ष बांधून
ठेवलेल्या इमारती पण नीट विकत नाहीत."
हातातल्या सिगारेटचा मोठ्ठा झुरका मारत तो म्हणाला. "मुबारक चांगल्या योजना
आणायचे. शेतीसाठी सुद्धा त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. पण आता
सरकार लष्कराला आणि धार्मिक गोष्टींना सगळा पैसे वापरतं त्यामुळे सामान्य
नागरिकाला काहीच मिळत नाही. २०११ नंतर इजिप्त कित्येक वर्ष मागे लोटला गेला
आहे हे नक्की." मुस्तफा हताश होत म्हणाला.
आणि माझा इजिप्तच्या सत्तापालटाचा अंदाज खरा ठरला. बरेच लोक याबद्दल नाखूश
होतेच आणि नवीन सरकारचे सगळेच काही आलबेल सुरु होते असं पण नव्हे.
"पण गेल्या १-२ वर्षात पर्यटनाने परत जोर पकडला आहे ना. होईल सगळं पूर्ववत." मी म्हणाले.
"इन्शाल्ला!" एवढे बोलून मुस्तफा दुसऱ्या सिगारेटला पेटवण्याचा मागे लागला.
५:३० वाजता सुरु झालेल्या आमच्या गप्पा १०:३० वाजता भुकेच्या जाणिवेने खंडल्या. नील नदी वरच्या एका बोटीतील रेस्टारंट मध्ये आम्हाला सोडून मुस्तफा घरी गेला. चविष्ट नुबीयन जेवण मागवलं. आईश, हम्मुस, भात, बटाट्याची भाजी आणि गरमा गरम उम्म अली. जेवण करून नदीच्या कडेने चक्कर मारत आम्ही हॉटेल वर परत आलो. निवांत आस्वान मधील पहिला दिवस मस्त निवांत गेला.
नुबीयन जेवण
उम्म अली
क्रमशः
२३ सप्टेंबर २०१८
पहाटे ३ वाजता रिसेप्शन वरून फोन आला, "तुमची अबू सिम्बल टूर ची बस २० मिनिटात पोहोचते आहे. वेळेत खाली येऊन थांबा.' आठव्या मिनिटाला आम्ही दोघे खाली येऊन थांबलो. तिथे आमचा नाश्ता पाकिटांत भरून तयार ठेवला होता. ३:२५ पर्यंत बस आली. छोटीशी आपल्या १७ सीटर TT पेक्षा पण लहान अशी. बऱ्यापैकी सगळ्या सहप्रवाश्यांना गोळा करून मग आम्हाला घेऊन अबू सिम्बल च्या दिशेने पळू लागली. रस्ता फार छान होता. एक दोन चेकपोस्ट मागे टाकून मुख्य रस्ताला लागलो. ३ तासाच्या प्रवासात उरलेली झोप वसूल केली आणि बस अबू सिम्बल गावामध्ये शिरतांनाच जाग आली. छोटेखानी नीटनेटकं गाव मागे पडलं आणि गाडी अबू सिम्बल मंदिराच्या आवारात शिरली.
तिकीट घेऊन सिक्युरिटी चेक झाल्यावर एका टेकडीसमोर आलो आणि आखून दिलेल्या रस्त्याने चालू लागलो. उजव्या हाताला निळाशार नासर लेक डाव्या हाताला टेकडी. थोडं पुढे आल्यावर मंदिराची समोरची बाजू दिसू लागली. इजिप्तचा सर्वात जास्त म्हणजे ९० वर्षांपर्यंत जगलेल्या फेरोने, रॅमसिस दुसरा याने बांधलेलं हे स्वतःचं मंदिर. सुरवातीलाच त्याचे ४ पुतळे आयुष्याच्या ४ अवस्था दर्शवतात; बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध (चारही पुतळ्यांमध्ये रॅमसिस मात्र सारखाच दिसतो हा भाग वेगळा). चार पैकी एका पुतळ्याचा चेहरा दगडात चीर जाऊन बऱ्याच वर्षांपूर्वी केव्हा तरी खाली पडलेला आहे. या चार पुतळ्यांशिवाय अजूनही काही पुतळे आहेत. रॅमसिसची पट्टराणी नेफरटारी, आई टुया आणि त्याची लेकरं वगैरे. पण कोणाच्याही मूर्तीची उंची रॅमसिसच्या गुढघ्यापेक्षा जास्त नाही. फेरोंना सर्वोच दाखवण्याचा हा अजून एक नमुना. अशी उदाहरणे संपूर्ण इजिप्तभर पाहायला मिळतात.
डावीकडील रॅमसिसचे उजवीकडील नेफरटारीचे
रॅमसिसचे मंदिर प्रवेश्द्वार
आत गेल्यावर मोठ्या हॉल मध्ये 'ओसायरिस' गॉड ऑफ अंडरवर्ल्ड (अर्थात मृत्यूनंतरच्या साम्राज्याचा देव) च्या ४-४ मूर्त्या दोन्ही बाजुंना उभ्या दिसतात. छतांवरील बार्स रिलीफ मधून काही युद्धाचे प्रसंग दाखवले आहेत ज्यात फेरो (साहजीकच) विजयी होतं आहे. मुख्य हॉल मधून पलीकडे अजून काही खोल्या आहेत ज्यात रॅमसिस आणि नेफरटारी वेगवेगळ्या देवांना नैवेद्य, भेटवस्तू देतांना दाखवले आहेत. अतिशय सुंदर काम आहे हे. मंदिराच्या सगळ्यांत शेवटच्या दालनात आहे अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह यांच्या मूर्ती. मंदिराची रचना अशी केली गेली होती कि २१ फेब्रुवारी रॅमसिसचा जन्मदिवस आणि २१ ऑक्टोबर रॅमसिसचा राज्याभिषेकाचा दिवस या दोन्ही दिवशी पहिली सूर्यकिरणे थेट अमुन, रॅमसिस आणि रा यांच्या चेहऱ्यावर पडतील आणि प्ताह पाताळाचा देव असल्याने कायम अंधारात असेल. मला कोल्हापुरातील किरणोत्सवाची आठवण झाली. आणि भारतीय-इजिप्शियन संस्कृती मधील अजून एक समान धागा सापडला.
ओसायरिस
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह
रॅमसिसच्या मंदिराशेजारीच थोड्या अंतरावर नेफरटारी आणि देवी हॅथॉरचं मंदिर दिसतं. इजिप्त मध्ये राण्यांची मंदिरे फार कमी दिसतात. सर्वांत पहिले मंदिर फेरो आखेनतेन याने आपली राणी नेफेर्तीती साठी बांधलेले आढळते. अबु सिम्बल येथील हे दुसरे मंदिर. या मंदिराच्या आत सुद्धा सुंदर बार्स रिलीफ आहेत. काही ठिकाणी रॅमसिस इजिप्ती देवतांना भेटवस्तू देताना तर काही ठिकाणी देवता त्याला आशिर्वाद देतांना. खांबांवर ठिकठिकाणी हॅथॉरचे मुखवटे लावलेले आहेत. हॅथॉर हि सौंदर्य, प्रेम आणि मातृत्वाची देवता. हिला इजिप्त मध्ये काही ठिकाणी गायीच्या स्वरूपात पण दाखवले जाते आणि बाकी ठिकाणी तिच्या मुखवट्याला गायीचे कान असतात. रिलिफ्स मधून हॅथॉरच्या मुकुटावर गायीची शिंगे, मधोमध सूर्य आणि भोवतीने साप असे दाखवले आहे.
नेफरटारीचे मंदिर
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
खांबांवरील हॅथॉर
रॅमसिस, हॅथॉर आणि नेफरटारी
निळ्याशार नासर लेक ने तीन बाजूने मंदिराला घेरलं आहे. पण हे मंदिर इथे आलं कसं याची गोष्ट फार रोचक आहे. आफ्रिकेची जीवनदायिनी नील नदीवर असलेल्या जुन्या आस्वान धरणाच्यावर अजून एक नवीन मोठं धरण बांधायचा निर्णय प्रेसिडेंट नासर यांनी घेतला. वीज निर्मिती आणि शेतीसाठी हा प्रोजेक्ट फार महत्वाचा होता. पण धरणाच्या बॅक वॉटरमुळे आस्वानच्या दक्षिणेकडील जवळपास ५५० किलोमीटरचा प्रदेश पाण्याखाली जाणार होता, आणि यात समाविष्ट होती अनेक पुरातन मंदिरे आणि एक संपूर्ण नुबीयन संस्कृती. नुबीया मधील लोकं आपली राहती घरं सोडून आस्वान मध्ये स्थायिक होणार होते. पण मंदिरांचं काय? मंदिरांच्या पुनर्वसनासाठी नासर यांनी युनेस्को कडे मदत मागितली. युनेस्को ने जगभरात आवाहन केल्यावर जवळपास ३० देश इजिप्तच्या मदतीला आले.
नासर जलाशय
या प्रोजेक्टच्या अंतर्गत अबू सिम्बल इथली रॅमसिस आणि
नेफरटारीची मंदिरे, आस्वान हाय डॅम च्या एका बाजूस वसवलेलं फिलाई मंदिर,
आणि दुसऱ्या बाजूला वसवलेलं कलाबशा मंदिर या मोठ्या मंदिरांसोबतच अजून ३
लहान मंदिरे धरण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. प्रत्येक मंदिर
हे मोठ्या तुकड्यांत कापून, त्या प्रत्येक तुकड्याला नंबर देऊन, नवीन
ठिकाणी नेऊन परत जोडलं आहे. आणि हे काम इतक्या शिफातीने केलं आहे कि ना
कुठे मंदिराचे दगड कापल्याच्या खुणा आहेत ना कुठे ड्रिल केल्याच्या खुणा
आणि कुठेही दगडांना जोड दिल्याचं दिसतं. हि मंदिरे हलवतांना प्रत्येक गोष्ट
जशीच्या तशी ठेवली गेली आहे. अगदी रॅमसिसच्या ४ पैकी एका पुतळ्याचा पडलेला
चेहरा सुद्धा जसा पूर्वी त्याच्या पायथ्याशी होता, हुबेहूब इथे ठेवला
आहे. या संपूर्ण प्रोजेक्टला संपायला ५ वर्ष लागली. इथे सापडलेल्या काही
मूर्त्या कैरोच्या इजिप्तशियन म्युसिअम मध्ये ठेवण्यात आल्या तर इतर ४
मंदिरे इजिप्तने या प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेल्या स्पेन,
नेदरलँड, इटली आणि अमेरिका या ४ देशांना भेट दिले. नॅटजिओच्या वेबसाईटवर या
प्रोजेक्टची फार छान माहिती दिली आहे ती इथे नक्की बघा.
https://www.nationalgeographic.com/archaeology-and-history/magazine/2019...
मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही ब्रेकफास्ट बॉक्स उघडला. तोच लांबुळका ब्रेड, बटर आणि जॅम, सोबतीला फ्रुट ज्युस आणि उकडलेली अंडी असं सगळं रिचवून आम्ही मंदिराच्या आवारात चक्कर मारली. अबू सिम्बल मधून बाहेर पडायला १०:३० वाजले, १ पर्यंत परत आस्वान. जातांना मात्र झोपलो नाही. आजूबाजूचा रस्ता आणि वाळवंटी प्रदेश बघत होतो. ठिकठिकाणी चेक पॉईंट्स होते आणि प्रत्येक चेकपॉईंट वर सध्याच्या राष्ट्रपतींचा अब्देल फत्ताह अल-सिसी यांचा मोठा फोटो दिसला. मुस्तफाने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती मिलिटरी बॅकग्राऊंडचे असल्याने सेनेचा अंमल जरा जास्तंच जाणवतो, आणि ते या चेकपॉइंट्स वर दिसून येत होतं.
नील नदी रुफटॉप रेस्टॉरंट मधून
नुबियन जेवण आणि ग्रील
१ च्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो आणि तडक रुफटॉप रेस्टॉरंट गाठलं. इथून दिसणारा नील नदीचा नजारा फार सुंदर होता. मध्यान असली तरी नदीवरून येणारा गार वारा सुखावत होता. नुबीयन जेवण आणि सोबत चिकन आणि फिश ग्रील मागवले. जेवण झाल्यावर थोडी ताणून दिली आणि ५:३० वाजता परत नदीचा किनारा गाठला. मुस्तफाने एक फेलुका आधीच बुक करून ठेवली होती. फेलुका चालवणाऱ्याचं नाव पण मुस्तफाच होत. एक म्हातारा नुबीयन. ज्याला नदीवर, धरणावर राग नव्हता तर प्रेमचं होतं, जरी त्याचं घर जमीन सध्या पाण्याखाली गेलं असलं तरी.
फेलुका
सूर्यास्त
फेलुका नदीच्या पाण्यावर तरंगू लागली, आणि जणू तीच आणि नदीचं हितगुज
सुरु झालं. लहान लहान लाटांवरून फेलुकाचा प्रवास सुरु होता, अगदी
शांततेत. अधून मधून गल पक्षी फेरी मारून जात होते. एलिफंट बेटाला संपूर्ण
फेरी मारून परत येई पर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. दीड तास कसा गेला
कळलंच नाही.
संपूर्ण दिवसात जे बघितलं होत, मानवाच्या कामाच्या विविध छटा अनुभवल्या होत्या, त्यामुळे फार समाधानी वाटत होत.
उरलेलं आस्वान दुसऱ्या दिवशी मुस्तफा सोबत बघायचंच ठरवून, we called it a day!
२४ सप्टेंबर २०१८
आज लवकरच जाग आली. पहाटे ५:३० च्या सुमारास. समोर नील नदीचा संथ शांत प्रवाह आम्हाला रूम मध्ये बसू देईना. पटकन जॅकेट चढवून आम्ही खाली आलो. रस्ता ओलांडून समोरच्या बाकावर बसलो. थंड झुळुका नदीच्या पृष्ठभागावर नक्षी उमटवत अलगत आमच्यापर्यंत येत होत्या. थोडावेळ बसून नदीकाठाने एक लांबवर चक्कर मारून हॉटेलवर परत आलो.
आवरून, नाश्ता करून तयार होईपर्यंत मुस्तफा येऊन वाट पाहत थांबला होताच. आजचा पहिला स्टॉप होता Unfinished Obelisk अर्थात अपूर्ण ओबेलिस्क. ओबेलिस्क म्हणजे एक उभा उंच चौकोनी खांब, ज्याच्या टोकावर छोटासा पिरॅमिड असतो. खाली रुंद आणि वर निमुळता होता जाणाऱ्या खांबावर बनवणाऱ्या फेरोच नाव, बनवल्याचा कालखंड वगैरे माहिती कर्तृश मध्ये कोरलेली असते. राणी आणि फेरो हॅटशेप्सयुतने हि ओबेलिस्क बनवायला घेतली. ओबेलिस्क पूर्ण झाल्यावर लुक्झॉर च्या कर्नाक मंदिरात स्थापन करायचा विचार होता, पण काम सुरु झाल्यावर काही दिवसांतच ओबेलिस्कच्या ग्रॅनाईट तडे गेले आणि अपशकुन म्हणून काम थांबवण्यात आलं. अर्ध्या तासांत ओबेलिस्कचा परिसर पाहून झाला आणि आम्ही बाहेर आलो.

Unfinished Obelisk जालावरुन साभार
ऊन हळू हळू वाढायला लागलं होत. आता जायचं होत आस्वान हाय डॅम पाहायला. थोडा वळणांचा रस्ता पार केल्यावर गाडी एका पूलावर आली ज्याच्या उजव्या हाताला आस्वान low dam आणि डाव्या हाताला high dam ची भिंत. खालच्या धरणाचं बॅकवॉटर मागे टाकून गाडी हाय डॅमच्या आवारात पोहोचली. धरणाच्या भिंतीवर गाडी जाते. तिथे एका ठिकाणी पार्क करून आम्ही धरणाचा नजारा पाहू लागलो. नजर जाईल तिथवर साठवलेल्या पाण्याचा पसारा. राष्ट्रपती नासर, ज्यांनी या अद्भुत प्रोजेक्टचं स्वप्न पाहिलं, त्यांचं नाव या महाकाय जलाशयाला दिलं आहे. संपूर्ण नुबीया, असंख्य पुरातन मंदिरे, अवशेष गिळंकृत करून ५५० किलोमीटर पर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण जलाशयाने इजिप्तच्या विकासामध्ये कमालीचा हातभार लावला आहे हे मात्र खरं. नासर लेक वरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या आस्वाद घेत, तिथल्या माहितीचे बोर्ड वाचत, फार छान वेळ गेला.
अरब सोव्हियत मैत्री प्रतीक
धराणातून नील मध्ये सोडलेले पाणी
अथांग पसरलेला नासर जलाशय
पुढचा स्टॉप होता फिलाई मंदिर, आस्वान हाय डॅम प्रोजेक्ट मधून वाचवलेल्या मंदिरांपैकी एक, आता एका बेटावर हलवण्यात आलेलं. ११ वाजता तिकीट घेऊन, बेटावर घेऊन जाणाऱ्या बोट मालकांशी घासाघीस करून एकदाचे आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर पहिल्या मंडपात पोहोचलो. ओसायरिस आणि इसिस यांना अर्पण केलेल्या या मंदिरात सुरवातीला उजव्या हाताला लागते mammisi म्हणजे जन्माची खोली . हि खोली मुख्य मंदिराला लागून असते.या मंदिराची हि खोली इसिस आणि ऑसिरीस यांचा मुलगा होरस याला अर्पण केली आहे.
फिलाई मंदिर बोटीमधून
मॅमिसि म्हणजे जन्माची खोली
याच्या शेजारीच मुख्य मंदिराच्या आवारात घेऊन जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूला सुंदर उंच खांब आहेत. या खांबांच्या शेवटी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर फेरो शत्रूची मुंडकी धडावेगळी करत शक्ती प्रदर्शन आहे, ओसायरिस, इसिस, होरस, हॅथॉर यांना विविध प्रकारच्या भेटी देत आहे असे दर्शवणारे रिलिफ्स आहेत. इथून आत गेल्यावर एक ऐसपैस सोपा लागतो. येथील खांबांवर हॅथॉरचे मुखवटे कोरलेले आहेत.
खांबांच्या पॅसेज नंतर असलेले मुख्य द्वार
मुख्य प्रवेशद्वार
हॅथॉरचे मुखवटे
पुढे अजुन काही दरवाजे पार करुन मुख्य मंदिराच्या गाभार्यात आपला प्रवेश होतो. इथे इसिस आणि होरस यांच्या रिलिफ्स मधून आई मुलाच्या नात्याचे क्षण दाखवले आहेत. सोबतीला नेहमीचे फेरो देवतांना भेटी अर्पण करत आहे हे रिलिफ्स पण आहेतच. पण बऱ्याच रिलिफ्सना छिन्नी हाथोड्याने नष्ट केलं आहे. पुढच्या काही दिवसांत आम्हाला याचं कारण कळालं ते म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू जेव्हा धर्मप्रसार करतांना फिरत इजिप्त मध्ये आले तेव्हा त्यांनी या शिल्पकलेला अश्लील मानून नष्ट केले. (असंच परप्रांतीय धर्मप्रसारासाठी भारतात आल्यावर झालेले सुद्धा दिसून येते, हे अजून एक साम्य.)
गाभार्याकडे जाणारे दरवाजे
इसिस होरसला स्तनपान करतांना
फेरो इसिसला विविध भेटी देतांना
फेरो इसिसचे सिस्ट्रम वाद्य वाजवून मनोरंजन करतांना
फेरो इसिसला विविध भेटी देतांना
फेरो इसिसला विविध भेटी देतांना
ओसायरिस हा सुबत्तेचा देव. याच्या हातातील Crook and flail हे त्याचे चिन्ह. Crook म्हणजे आकडा, मेंढ्याना हाकारतांना वापरतात तसा. त्यामुळे ओसायरिसला मेंढपाळांचा देव पण म्हटले गेले आहे. Flail म्हणजे धान्य झोडपायची काठी. ही जमीनीच्या सुपिकतेची निशाणी. त्यामुळे धान्य आणि गुरे यांच्या सुबत्तेचा देव असा ओसायरिस.
फेरो ओसायरिसला धान्य आणि फळे देतांना.
लाईट/साउंड शो च्या जागेवरुन डावीकडे मुख्य मंदिर, उजवीकडे मॅमिसि
मंदिराच्या बाहेर लाईट अँड साऊंड शो साठी दगडी खुर्च्या मांडल्या आहेत. तिथे थोडावेळ आराम करत बसलो. निल नदीवरून गार वाऱ्याच्या झुळूका येत असल्या तरी दुपारच्या तापलेल्या सूर्याने दगडी खुर्च्या 'बसणेबल' नव्हत्या म्हणून आम्ही आवरते घेऊन निघालो. बोटीने किनाऱ्यावर आणून सोडलं आणि आम्ही पुढचा स्टॉप नाईल म्युसिअम कडे निघालो.
नव्याने बांधलेलं हे म्युसिअम शाळकरी मुलांसाठी होते. पण आत नाईल नदीचा संपूर्ण आफ्रिकेतील प्रवास, नाईल नदीचा इतिहास वगैरे माहिती फार छान पद्धतीने दर्शवली होती. नदीतील मगरी, सुसरी, मासे, पक्षी भुस्याने भरून ठेवले होते. इजिप्त मधील काही चित्रकारांची चित्रे पण इथे ठेवलेली आहेत. फोटोग्राफीला मनाई असल्याने काढले नाहीत, पण फार काही सुटलं असं वाटलं पण नाही.
अर्ध्या तासात म्युसिअम उरकले. आता मात्र पोटात मगरी सुसरी उड्या मारत होत्या. मुस्तफा आम्हाला घेऊन एका खास अड्ड्यावर घेऊन गेला. त्याच्या आजोबांपासून त्याच्या घरातील लोक इथे येतात. नदीतील मासे आणि कोळंबी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या जागेला रेस्टॉरंट पण म्हणता नाही येणार आणि ठेला पण नाही म्हणता येणार. उंच खजुराच्या झाडाखाली चार टेबलं मांडलेली, पण लोक इथून पार्सल जास्त घेऊन जातात. आमच्या साठी सुद्धा असंच एक पार्सल मुस्तफाने घेऊन दिलं आणि आम्हाला परत हॉटेल वर आणून सोडलं. संध्याकाळी पुन्हा भेटायचं ठरवून आम्ही रूम मध्ये आलो. मत्स्याच्या खमंग वासाने तोंडात पूर आला होताच. पार्सल उघडल्या बरोबर एकमेकांशी एक शब्दही न बोलता आम्ही मासा आणि कोळंबीचा आस्वाद घेऊ लागलो. अप्रतिम चव, मस्त कुरकुरीत तळलेली कोळंबी अहाहा!! आज पुन्हा तोंडाला पाणी सुटलं आठवणीने.
मासे बनवतांनाची एक झलक
फायनल डीश
पाच वाजेपर्यंत आराम करून पुन्हा निघालो. जवळचं नुबीयन म्युसिअम पाहायचं राहिलं होतं ते उरकून घेऊ ठरवलं. चालत १० मिनिटात पोहोचलो. त्या दिवशी का कुणास ठाऊक पण फोटोग्राफी बंद होती आणि ठिकठिकाणी गार्डसचा पण पहारा होता. आस्वान हाय डॅममुळे नष्ट झालेल्या नुबीआ प्रांताची ओळख करून देणारे हे म्युसिअम. त्यांची जीवनशैली कशी होती, शेतीच्या पद्धती, वापरायची भांडी, अलंकार वगैरे तर होतेच पण मला जास्त आकषिर्त केलं ते निर्वासनाच्या वेळी घेतल्या गेलेल्या फोटोग्राफ्सनी. आपण राहतं घर सोडून काही महिन्यांसाठी जरी गेलो तरी परत आल्यावर जो सुखाचा अनुभव असतो तो वेगळाच. पण नुबीयन लोकांना सगळंच मागे सोडून जायचं होत. परत कधीही न येण्यासाठी. जेवढं शक्य आहे ते सामान हाताशी घेऊन बाकी मागेच सोडलेलं, एकटी पडलेली छोटी छोटी दगडी घरे, आवार आणि शेती. सगळंच उदासीन तरीही देशाच्या विकासासाठी नुबीयन लोकांनी स्वीकारलेलं. आणि मी ज्या नुबीयन लोकांना भेटले त्यांच्या बोलण्यातून कधीही याची तक्रार जाणवली नाही. म्युसिअमच्या बाकी दालनांतून मंदिरे स्थलांतरित करतांना सापडलेल्या गोष्टी मांडून ठेवल्या आहेत. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे अबू सिम्बल मधील मंदिराचे पूर्वीचे आणि आत्ताचे स्थान दर्शवणारे प्रोटोटाईप. गार्डच्या परवानगीने याचा तेवढा फोटो टिपला.
अबू सिंबल येथील मंदिर पूर्वी आणि आत्ता
म्युसिअम मधून बाहेर पडल्यावर हॉटेलच्या रस्तातच एक कॉप्टिक कॅथीड्रल लागलं. जाताजाता ते तरी का सोडा म्हणून आत गेलो. बाहेरून दुधी रंगाची इमारत आतून मात्र वेगवेगळ्या रंगांनी सजवली होती. प्रार्थनेसाठी बसायला लाकडी बाकडे. वरील उंच छतांवर मोठी झुंबरे टांगलेली आणि भिंतींवर येशूची रंगवलेली चित्रे. छान शांततेत १०-१५ मिनिटे बसून बाहेर आलो.
चर्च बाहेरुन
चर्च आतून
दोन मिनिटात चालत कॉर्निश वर आलो. इथे मकानी नावाचा छान छोटासा कॅफे आहे. इथलं कॅपचिनो फार मस्त असतं. आस्वान मधील शेवटचा दिवस म्हणून अजून एकदा घेऊन निघालो. एव्हाना आस्वान मधील नाईल कॉर्निश माझी फार आवडती जागा बनली होती. थोडं चालायचं मग एखाद्या बाकड्यावर बसायचं, परत छोटासा वॉक घेऊन परत कुठेतरी बसायचं. असं करत मुस्तफाच्या दुकानावरून दोन चकरा मारून झाल्या.
इजिप्ति गोड पदार्थ कनाफा आणि कॅपचिनो
आठ वाजता तो आला, आणि दुकान दाखवायला घेऊन गेला. आज त्याचे वडील पण होते दुकानात. मुस्तफाने त्यांच्याशी ओळख करून दिली आणि आम्हाला दुकान दाखवायला किंवा संजय (टर्मिनेटर)च्या भाषेत सांगायचं तर अलिबाबाच्या गुहेत घेऊन गेला.
अलिबाबाच्या गुहेत, तुत च्या खुर्चीमध्ये आमचे साहेब
खरंच नजर जाईल तिथे सामानच. हारीने मांडून ठेवलेले गालिचे, कपडे, असंख्य छोटे मोठे पिरॅमिड, सोबतच इजिप्ती देव-देवता होरस, बास्तेत, रा, अनुबिस इ. च्या दगडी मूर्त्या. ममी ठेवायची पेटी, तुत-अंखं-अमुन ची सोन्याची खुर्ची, मास्क वगैरे फायबर मध्ये बनवल्या गोष्टी आणि अजून बरंच काही. आम्ही काही गोष्टी घेतल्या, त्याचं बिल चुकतं करून खाली आलो तोवर मुस्तफा मागून आला आणि त्याने नवऱ्याच्या हातात एक छोटी पिशवी दिली. आम्ही उघडून बघितली तर आत स्कॅरब बीटल ची जोडी निघाली.
मुस्तफा: हे माझ्या कडून.
नवरा: छान आहे, पण याची काय गरज होती. असो किती देऊ याचे?
मुस्तफा: नाही हे गिफ्ट आहे माझ्याकडून. तुमच्या दोघांना.
मी नवऱ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं, तसं तो पुढे म्हणाला, "हि जोडी
शुभ असते. यातील जो उंच आहे तो पुरुषाला दर्शवतो आणि बुटकी आहे ती स्त्री
आहे. तुमचं कुटुंब लवकर वाढो म्हणून माझ्याकडून हि छोटीशी भेट."
आम्ही काहीसं हसतच ती भेट स्वीकारली.
बाहेर येऊन त्याच्या वडिलांशी थोडं बोलत बसलो, तोवर मुस्तफा स्पेशल चहा आलाच.
दुसऱ्या दिवशी आम्हाला लक्सोर (Luxor) साठी निघायचं होत. जातांना रस्त्यात लागणारी कोम उम्ब, इदफू आणि इस्नाची मंदिरे पण पाहायची होती. मुस्तफाने त्याच्या मित्राची गाडी आमच्या दिमतीला लावून दिली होती. ड्राइवरचा नंबर वगैरे देऊन ठेवला. सकाळी ७ वाजता निघावं लागणार कारण सुरक्षेच्या दृष्टीने रात्री ११ ते सकाळी ६ हायवेवर पर्यटकांना घेऊन जाण्याची मनाई होती. असं सगळं ठरवून त्याचा निरोप घेऊन निघालो.
पुन्हा एकदा नुबीयन जेवण जेवलो आणि हॉटेलवर परत येऊन बॅग भरून तयार ठेवल्या. हॉटेल रिसेप्शन वर सकाळी ब्रेकफास्ट बॉक्स तयार करून ठेवायला सांगितलं. रूम मध्ये येऊन बराच वेळ नील नदीला न्याहाळत घालवला. तिच्या पासूनच सुरु झाला दिवस तिला पाहात संपला.
२५ सप्टेंबर २०१८
ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता गाडी तयार होती. आम्ही नाश्त्याची पाकिटं घेतली आणि निघालो. गाडी चालक अहमद फारच अबोल असल्याने त्याच्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीच कळू शकलं नाही.
१० मिनिटात आस्वानच्या बाहेर पडलो आणि आस्वान-कोम ओम्बोच्या रस्त्याला लागलो. डाव्या हाताला निळीशार नील नदी आणि उजव्या हाताला वाळवंट, उघडे बोकडे डोंगर असा अजब नजारा होता. कुठे मध्ये नीलच्या किनारी उसाची शेती पण दिसत होती. छोटी छोटी गावे येत होती आणि मागे टाकली जात होती. दर काही किलोमीटरनंतर चेकपोस्ट यायचं, तिथे गाडीची कागदपत्रं आणि आमचे पासपोर्ट तपासले जायचे, 'हिंदी हिंदी'चा गजर व्हायचा आणि निघतांना टाटा, बाय साठी हात हलवले जायचे.
सव्वा तासात आम्ही कोम ओम्बोच्या मंदिराच्या आवारात पोहोचलो. नुकतीच एक क्रूझ पण पोहोचली असल्याने तिकिटासाठी थोडी रांग होती. तिकिटे घेऊन आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. नील नदीने मारलेल्या एका लफ्फेदार वळणावर हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या नदीकडील भागात डागडुजीचे काम सुरु असल्याने तो भाग बंद होता. आठवड्याभरापूर्वीच या मंदिराच्या आवारात टॉलेमी काळातील एक स्फिन्क्सची मूर्ती सापडल्याने उत्खनन विभागाचे लोक पण जास्त संख्येने होते.
मंदिराबद्दल सांगायच्या आधी थोडी राजवटीची पार्श्वभूमी सांगायला हवी. इ. स. पू. ३००० च्या आधी इजिप्त दोन भागांत विभागलेला होता, अप्पर इजिप्त आणि लोअर इजिप्त, दोन वेगळे देश असल्यासारखा. दोन्ही राज्यांचे वेगळे मुकुट होते, वेगळे फेरो हे भाग चालवायचे आणि त्यांच्यात युद्धे पण होत असत. हळू हळू परकीय आक्रमणांना तोंड देतांना जेव्हा त्यांची त्रेधा व्हायला लागली तेव्हा, दोन्ही सत्तांनी एकत्र राज्य करायचा विचार केला. असे म्हणतात नारमेर या फेरोने अप्पर आणि लोअर इजिप्तचं एकत्रीकरण केलं आणि तिथून पुढे फेरो हा "दोन भागांचा राजा" म्हणवला जाऊ लागला आणि फेरोंनी दोन्ही राज्यांचा एकत्रित मुकुट वापरायला सुरवात केली ज्याला स्चेन्ट (pschent) म्हटले जाऊ लागले. यानंतर सुरवातीच्या सहा राजवटी मिस्रची राजधानी मेम्फिस होती. पण सातव्या राजवटीपासून राज्याच्या कारभारात गोंधळ होऊ लागला. राज्यातील छोटे छोटे भाग बंड करू लागले. असे म्हणतात कि ७वी राजवट अवघ्या ७० दिवस टिकली आणि त्यातही दरदिवशी नवीन फेरो. ८व्या आणि ९व्या राजवटीमध्ये परिस्थिती थोडी सुधारली पण तेवढ्या वेळात अप्पर इजिप्तमध्ये इंटेफ, त्याचा नातू मोंटूहोटेप यांनी सत्ता मिळवली आणि त्याच्या पासून ११वी राजवट सुरु झाली आणि पुन्हा एकदा संपूर्ण मिस्र एक झाला. राजधानी बनली थिब्स अर्थात सध्याची लक्सॉर. पुढे कित्येक वर्ष पुजाऱ्यांचं राजकारणातील अंमलाने थिब्स मिस्रची राजधानी होती. पुढे रोमन कालखंडात राजधानी अॅलेक्सझान्ड्रिया येथे हलवली गेली.
स्चेन्ट (जालावरुन साभार)
नवीन राजवटीमध्ये बांधलेल्या कोम ओम्बो येथील मंदिराचा टॉलेमीच्या काळात पुनर्निर्माण करण्यात आला, पुढे रोमन कालखंडात त्यावर रोमन कलेची छटा पण दिली गेली. पण बाकी मंदिरांपेक्षा हे मंदिर वेगळं आहे कारण याचं दुहेरी बांधकाम. मंदिराचा दक्षिणेकडील (अप्पर इजिप्त) भाग हा प्रजननाचा देव सोबेक आणि उत्तरेकडील (लोअर इजिप्त) भाग हा आकाशाचा देव होरस याला समर्पित केला आहे. दोन्ही बाजूचे बांधकाम सिमेट्री मध्ये केलं आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेल्या रिलिफ्सचे रंग अजूनही दिसून येतात. मंदिरातील खांबांवर कमळाच्या पाकळ्यांचे काम केलेले आढळते. खांबांवरील आणि भिंतींवरील रिलीफ मधून फेरो सोबेक, होरस, हॅथोर इत्यादी देवांची पूजा करतांनाचे प्रसंग कोरलेले आहेत. काही ठिकाणी फेरोने अप्पर इजिप्तचा मुकुट घातला आहे, काही ठिकाणी लोअर इजिप्तचा बाकी वेळेस दोन्ही साम्राज्यांचा एकत्रित मुकुट. मंदिरातील आतील बाजूच्या भिंतींवर सुद्धा असेच प्रसंग दिसतात तर बाहेरील भिंतींवर कमळ आणि पपायरसची कलाकारी नील नदीचं अस्तित्व अधोरेखित करतात.
दुहेरी मंदिर
कमळाच्या पाकळ्यांची कारागिरी असलेले खांब
मंदिराच्या भिंतीवरील एक रिलिफ
सोबेक या देवाला मगरीचे शीर असते. त्यामुळे मगरींना पण इजिप्शियन संस्कृती मध्ये फार महत्व. फेरोंसोबत मगरीचंही ममीफिकेशन केलं जात असे. या मंदिराच्या आवारात हजारोंच्या संख्येने मगरीच्या ममीज सापडल्या, त्यांच्या शवपेट्या मंदिराच्या आवारात तर ममीज मंदिराशेजारील म्युसिअम मध्ये ठेवल्या आहेत. मंदिर आटोपून आम्ही म्युझिअमकडे मोर्चा वळवला. इथे काही फार गर्दी नसल्याने आरामात बघता आणि फोटो काढता आले.
मंदिराच्या आवारातील शवपेट्या
ममिफाईड मगरींची एक झलक
मंदिरातील आणि म्युझियम मधील अधिक फोटोज्
सकाळी ९ वाजता कोम ओम्बोमधून निघालो आणि गाडीत बसल्यावर नाश्ता उरकून घेतला. दोन तासात इदफु मंदिराच्या आवारात गाडी आली. तिकीटे घेऊन मंदिर पाहायला सुरवात केली.
हे मंदिरसुद्धा कोम ओम्बो सारखंच टॉलेमीच्या कालखंडात बांधले गेले. मात्र वर्षानुवर्षे वाळूखाली गाडले गेल्याने बाकी मंदिरांसारखी याची फारशी पडझड झाली नाही. होरस आणि हॅथोर यांना समर्पित केलेल्या या मंदिराचे आवार प्रशस्त आहे. भल्या मोठ्या पटांगणातून मंदिराचं भलं मोठं प्रवेशद्वार नजरेस पडतं. त्यावर "फेरोने आपल्या शत्रूला केसांनी पकडलं आहे आणि त्यावर वार करण्याच्या बेतात असून हि भेट तो होरसला देणार आहे" अशा अर्थाचं रिलीफ कोरलं आहे. इथून आत गेल्यावर अतिशय उंच खांबांवर तोललेला मंदिराचा दुसरा हिस्सा येतो. कमळाच्या पाकळ्यांची नक्षी असलेले हे खांब पायथ्याशी इतके रुंद आहेत कि त्याच्याभोवती एक घेर घालायला ५ जण मिळून त्याला कवटाळावं लागेल. इथल्या भिंतींवर आजही काही ठिकाणी आपल्याला तेव्हाचे रंग दिसतात.
इदफु मंदिर प्रवेशद्वार
मोठाले खांब
इदफु मंदिर प्रवेशद्वार (मंदिराच्या आतून)
भिंतींवर जागोजागी फेरो देवतांना पूजतानांचे रिलिफ्स आहेतच पण त्याहून विशेष २ रंजक कथा इथले काही रिलिफ्स सांगतात. पहिली म्हणजे होरस आणि सेत या दोन देवतांमधील युद्धाची. होरसहा इसिस देवता आणि ओसायरिस देव यांचा मुलगा. सेत त्याचा काका. सेत सत्ता मिळवण्यासाठी ओसायरिसची हत्या करतो आणि याचा बदला होरस त्याला हरवून करतो आणि गादी वर बसतो. या कथेची सुद्धा विविध रूपे आहेत त्यातील हे एक. "Gods of Egypt" या हॉलिवूडपटात हीच कहाणी दाखवली आहे.
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
दुसरी कथा होरस आणि हॅथोरची. यांच्या लग्नानंतर दरवर्षी हॅथोर आपल्या देन्देरा च्या मंदिरातून नील नदीमधून प्रवास करून होरसला भेटायला येते असा एक उत्सव त्याकाळी असायचा. हॅथोरच्या बोटी, त्या उत्सवाचे रिलिफ्स बाकी भिंतींवर आहेत. मंदिराच्या अंतर्भागात एक छोटीशी लाकडी बोट पण ठेवली आहे, ज्यात बसून हॅथोरची सोन्याची मूर्ती उत्सवासाठी देन्देरा वरून इदफु पर्यंत येत असे. हि लाकडी बोट खऱ्या बोटीची प्रतिकृती असून, खरी बोट पॅरिसच्या म्युसिअममध्ये ठेवली आहे.
हॅथोर बोटीतून येत आहे याचे रिलिफ
मंदिरातील लाकडी बोट
सव्वा बाराच्या आसपास आम्ही इदफु वरून निघालो थेट लक्सॉर गाठायला. मुस्तफाच्या मते इस्नाचे मंदिर फार काही मोठे नव्हते, आणि तिकडे गेलो असतो तर उशीर पण झाला असता म्हणून ते वगळले. गाडी परत डावीकडे नील आणि उजवीकडे डोंगर यांच्या मधून जाऊ लागली. पण या डोंगरांवर काही भगदाडं दिसली. गाडीचालक अहमदला विचारलं तेव्हा कळालं की डोंगरात अजूनही लहान-मोठे ममी चेंबर सापडत आहेत. त्याचंच काम सुरु आहे तिथे. फेरोंच्या नसल्या तरी सरदार, सेनापती वगैरे अजूनही अशा थडग्यांमधून विश्रांती घेत आहेत. अजून किती रहस्य दडली आहेत या भूमीत?
डोंगरातील उत्खननाचे काम
ता.क.
१५ ऑक्टोबर २०१९
इजिप्तच्या पुरातत्व विभागाने एक ट्वीट केले ज्यात लक्सॉर जवळ २० पेक्षा जास्त बंद शवपेट्या सुस्थितीत सापडल्या आहेत.
तीन च्या सुमारास हॉटेल वर पोहोचलो. यावेळी पण नीलचा नजारा दिसेल अशी रूम घेतली होती. पण का कुणास ठाऊक आस्वानला नील जितकी आपली वाटली होती इथे तो आपलेपणा नाही जाणवला. लक्सॉर पर्यटकांच्या बाबतीत अगदी प्रोफेशनल आहे, आस्वान सारखा मोकळा ढाकळा स्वभाव नाही इथला. नीलपण तशीच बनली असेल का?
असो. कडाडून भूक लागली होती आणि जेवण संपलं असल्याने रूम मध्येच एक कॉफी आणि काही कांद्याचे काप मागवले. ५ मिनिटात डिशमध्ये कांदा आला. रूममधल्या सुरीने स्लाइस्ड ओनिअन ला चॉप्ड ओनिअन बनवलं आणि भारतातून नेलेलं गणेश भेळेच पाकीट उघडलं. अहाहा, बाल्कनी मध्ये बसून नीलला न्याहाळत, कॉफी आणि भेळेची मजाच न्यारी वाटली.
गणेश भेळ मिस्र मध्ये
दुसऱ्या दिवशी आम्हाला बलून राईड करायची होती, आणि लक्सॉरची ईस्ट बँक-
वेस्ट बँक अशी दिवसभराची टूर पण करायची होती. बलून राईड साठी वईलला आणि टूर
साठी इमादला फोन केला आणि दोन्ही गोष्टी बुक करून टाकल्या. संध्याकाळी
टांगा घेऊन लक्सॉर गावातून एक चक्कर मारून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३०
ला निघायचं होतं त्यामुळे लवकरचं ताणून दिली.
२६ सप्टेंबर २०१८
ठरल्या प्रमाणे बरोब्बर ४:३० वाजता वईल सोबत आम्ही निघालो. नीलच्या किनारीच हॉटेल असल्याने आम्हाला व्हॅन वगैरे नव्हती आली घेऊन जायला. रस्ता ओलांडून पलीकडे पोहोचलो तोवर बाकी सोबतींना व्हॅन सोडून गेली. बोटीतून आम्ही पलीकडच्या तीराला पोहोचलो आणि तिथून एका मिनी बस मधून बलून राईडच्या टेक ऑफ पॉईंट जवळ आलो. सगळ्यांना कॉफी आणि केक देऊन वईल त्याच्या साथीदारांसोबत बलूनची तयारी करायला गेला. या राईड २ वेळा होतात. पहिली भल्या पहाटे, जिला टूरवाले "फर्स्ट लाईट फर्स्ट फ्लाईट" म्हणतात आणि दुसरी "सेकंड फ्लाईट".
बलूनची तयारी
वेगवेगळे टूरवाले आपापल्या बलूनला तयार करण्यात गुंग होते. बलूनमध्ये आगीने गरम हवा भरायला सुरु झाली तशी एकेका बलूनने मस्त आकार घ्यायला चालू केलं. बलूनला बास्केट बांधलं गेलं आणि आम्ही सगळे १५ लोक बास्केट मध्ये जाऊन बसलो. इजिप्तमध्ये पूर्वी बलून कोणीही चालवू शकायचं पण काही अपघातांनंतर हे बंद करून फक्त हॉट एअर बलून राईडचं शिक्षण घेतलेले कॅप्टन बलून हाताळू शकतात. आणि बलून उडण्याची दिशा, स्थिती लक्सॉर विमानतळावरून ठरवण्यात येते. कधी वातावरण उडण्यासाठी योग्य नसेल तर विमानतळावरून राईड रद्द पण करण्यात येते. सुदैवाने आमच्या बलून राईड वर तशी वेळ आली नाही आणि काही मिनिटांतच त्याने आभाळाच्या दिशेने प्रवास सुरु केला. आम्ही फर्स्ट लाईट फर्स्ट फ्लाईट टूर होती. आभाळात एका उंचीवर येई पर्यंत पूर्वेला फटफटलं होत. अजून थोड्या उंचीवर पोहोचल्यावर क्षितिजावर सूर्य बिंब दिसू लागलं. खाली हिरवीगार शेती, पलीकडे निळीशार नील, तिच्या पलीकडे आळसावलेलं लक्सॉर आणि आमच्या मागे काही डोंगररांगा आणि दूरवर पसरलेलं वाळवंट.
बलून मधून
बलून मधून
नील आणि सुर्योदय
अलगद तरंगत बलून 'कोलॉसी ऑफ मेम्नॉन' वरून जायला लागला. कॅप्टन गरम हवेचा मारा कमी जास्त करत बलूनची जमिनीपासून उंची सुद्धा कमी जास्त करत होता. काही घरांवरून बलून जाऊ लागला, त्यांच्या कोंबड्या, गच्चीवर टाकलेली वाळवणं सगळं स्पष्ट दिसत होतं.
कोलॉसी ऑफ मेम्नॉन
मेदिनेत हाबु
'मेदिनेत हाबु' वरून बलून जाऊ लागला तेव्हा कॅप्टन म्हणाला, "तुमच्या लक्सॉरच्या टूर मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही निवांत बघणार आहातच. पण बलून मधून बघतांना आपण एका म्युसिअम मधून फेरफटका मारत आहोत असं वाटतं." आता हळू हळू बलूनची उंची कमी होऊ लागली. कॅप्टनने 'टच डाउन' करताना काय काळजी घ्यायची याच्या सूचना दिल्या आणि पुढल्या १० मिनिटात आम्ही बास्केट मधून खाली उतरून ग्रुप फोटो काढत होतो. दुसरीकडे बलून मधून हवा काढून त्याला गुंडाळण्यात येत होतं. इतका ऎटबाज बलून हवा गेल्यावर फारच बिचारा वाटू लागला होता. ६:३० वाजता व्हॅन आम्हाला घ्यायला आल्या. आणि परत बोटीत बसवून नदीच्या पलीकडे सोडण्यात आलं. संध्याकाळी फोटो आणि व्हिडिओचा पेनड्राईव्ह हॉटेल वर येऊन देऊन जातो असं म्हणून वईल निघाला. पुढची टूर ८:०० वाजता सुरु होणार होती, आम्ही तोवर अंघोळ करून, भरपेट बफे नाश्ता करून घेतला.
इमाद आमचा लक्सॉर टूरचा गाईड मिनीबस घेऊन ८ वाजता आम्हाला घ्यायला आला. आधीच काही पर्यटकांना गोळा करून, आम्हाला घेऊन, अजून २ जपानी पर्यटकांना घेतलं अन आमची 'वेस्ट बँक' ची सफर सुरु झाली.
पहिला स्टॉप होता 'कोलॉसी ऑफ मेम्नॉन'. इथे पूर्वी आमेनहोटेप तिसरा याने बांधलेलं मंदिर होतं, आता फक्त आमेनहोटेपचे हे दोन पुतळे तेवढे शिल्लक राहिलेत. भूकंपामुळे या पुतळ्यांची पण अवस्था फार वाईट झाली आहे. १० मिनिटे इथे घालवल्यावर पुढे निघालो.
कोलॉसी ऑफ मेम्नॉन
Mortuary Temple of Hatshepsut अर्थात दफनविधी करण्याचं मंदिर. सगळ्यांची तिकिटे इमाद ने काढली आणि मंदीराच्या पायथ्याशी येऊन इमाद भोवती सगळे गोळा झालो. त्याने सांगायला सुरवात केली, "हॅटशेपस्यूत ही इजिप्तच्या इतिहासातील फार कर्तबगार फेरो राणी होती. राजघराण्यात जन्माला आलेली हॅटशेपस्यूत ही वडिलांनंतर (थूटमॉस पहिला) गादीवर बसली. तिचा नवरा थूटमॉस दुसरा हा तिचा भाऊपण होता. या दोघांना एक मुलगी झाल्यानंतर हॅटशेपस्यूत परत गर्भवती राहिली नाही. थूटमॉस II याला दुसऱ्या बायको द्वारे पुत्रप्राप्ती झाली ज्याचं नाव ठेवलं गेलं थूटमॉस तिसरा आणि हाच हॅटशेपस्यूतच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. हॅटशेपस्यूतने आपल्या कारकिर्दीत लोकहिताची कामे केली, त्यामुळे ती लोकप्रिय तर होतीच पण तिच्या काळात कर्नाक मंदिरासारखे भव्य मंदिर बांधले गेले होते.
फेरोच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचं ममीफिकेशन केलं जायचं हे तर तुम्हाला माहित असेलच. ते करण्याच्या जागेला फार पवित्र मानलं जायचं. त्यामुळे त्यांची मंदिरे बनवली जायची. तसंच हे हॅटशेपस्यूतचं मंदिर. सामान्य माणसाला इथे येण्यास पाबंदी होती. ममीफिकेशन करणारे पुजारी फक्त येथे येऊ शकायचे. हे मंदिर तीन टप्यात बनलेलं आहे. सगळ्यात पहिले हे बघा, हे झाड हॅटशेपस्यूतने 'लँड ऑफ पंट' जे लाल समुद्राजवळ आहे तिथून मागवले होते. याच्या अत्तराचा वापर ममीफिकेशन मध्ये केला गेला असावा असा कयास आहे. जागोजागी तुम्हाला हॅटशेपस्यूतचे पुतळे दिसतील पण त्याची विटंबना तिच्या सावत्र मुलाने सत्तेवर आल्या आल्या केली. सगळ्यात शेवटच्या खोलीमध्ये छतावर तुम्हाला गडद निळ्या रंगाचं आकाश आणि तारे दिसतील. फेरो निद्राधीन होत आहे असा संकेत त्यातून दिला गेला आहे. तुम्ही मंदिर पाहून या ४५ मिनिटांत आपण इथे परत भेटू. "
हॅटशेपस्यूतने मागवलेले झाड
Mortuary Temple of Hatshepsut
हॅटशेपस्यूत
मंदिरातील रिलिफ्स
सकाळचे ९:३० वाजले होते तरी उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. लांबून नवं कोरं वाटणारं मंदिर पायऱ्याचढून वर गेल्यावर वेगळंच वाटू लागलं. बरेच हॅटशेपस्यूतचे पुतळे भग्नावस्थेत होते. २६ पुतळ्यांपैकी फक्त ६-७ चांगल्या अवस्थेत होते. इथून आत गेल्यावर जिथे जिथे हॅटशेपस्यूतचं नाव किंवा चित्र होतं ते नष्ट केलेलं आहे आणि शक्य तिथे थूटमॉस III ने स्वतःचं नाव कोरलं आहे. इमाद ने सांगितल्या प्रमाणे मंदिराचं आवार पाहून फोटो काढून वेळेत परत आलो. आता उत्सुकता होती पुढच्या थांब्याची. 'व्हॅली ऑफ किंग्ज'.
२० मिनिटात तिथली तिकिटे घेऊन इमाद एका हॉल मध्ये उभा होता. त्याच्या मागे प्लॅस्टिकची कसलीशी प्रतिकृती होती. "आपण आता जे पाहायला जाणार आहोत त्या व्हॅली ऑफ किंग्जची ही प्रतिकृती. जो काळा भाग दाखवला आहे तो रस्ता आहे, जागोजागी नंबर लिहिलेले आहेत ते थडग्यांचे आहेत. आणि तुम्ही इथे वाकून बघाल तर प्रत्येक थडग्याची खोली पण इथे दिसून येईल. KV १७ ही सेटी पहिला याची कबर सगळ्यात खोल आहे. आणि पर्यटकांसाठी खुली नाही. तुत-अंखं-अमुन च्या कबरी साठी वेगळे तिकीट आहे. ते घेऊन कोणी पाहणार असेल तर चालेल, फक्त वेळेत परत या. आत्ता आपण जी तिकिटे घेतली आहेत त्यात ३ कबरी बघता येतील. आपण KV ८, KV ९ आणि KV ५५ बघणार आहोत. चला तर मग."
व्हॅलीची प्रतिकृती
व्हॅलीमध्ये थडगे बनतांना
बुकिंग ऑफिस पासून कबरींपर्यंत घेऊन जायला एक मिनी ट्रेन आहे. इलेक्ट्रिक वर चालणारी. व्हॅली मध्ये धुराने क्षती होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी. ट्रेन आम्हाला मध्यावरील एका ठिकाणी सोडून गेली. तिथून पायी आम्ही KV ८ पाशी आलो.
इमाद पुढे सांगू लागला, "सुरवातीच्या काळात लोअर इजिप्त मध्ये फेरोंसाठी पिरॅमिड बांधले गेले. पण ते इतके भव्य होते लुटारू फेरोला त्यात ठेवल्या नंतर काहीच दिवसांत थडगी उघडून सगळे लुटून न्यायचे. म्हणून नंतरच्या काळात, जेव्हा अप्पर आणि लोअर इजिप्त एक झालं आणि इजिप्तची राजधानी 'थेबेस' अर्थात सध्याचं लक्सॉर ला हलवण्यात आली, तेव्हा फेरोंनी लुटारूंना आकर्षित करतील अशा भव्य कबरी बांधणं सोडून मागच्या डोंगरात भुयारे खोदून त्यात विसावा घेण्याचं ठरवलं. नवीन फेरो गादीवर बसल्यावर लगेच तो आपल्यासाठी एखादी जागा या व्हॅली मध्ये शोधत असे आणि तिथे लगोलग काम सुरु होई. पण फेरो जिवंत असतांना कबरीचं काम पूर्ण झालेलं चालत नसे त्यामुळे सुरवातीला निवांत आणि सुंदर रित्या कबर घडवायला सुरवात व्हायची. अशातच फेरोचा मृत्यू झाला कि ७० दिवसांत त्यांना कबर तयार ठेवावी लागे."
कुणी तरी प्रश्न विचारला "७० दिवसच का?"
इमाद म्हणाला, "ममीफिकेशनची एक कृती असते ज्यात वेगवेगळे टप्पे असतात.
ज्यात सुरवातीला शव स्वच्छ होते. नंतर नाकातून तार टाकून मेंदू वेगळा केला
जातो आणि टाकून दिला जातो. यकृत, फुफुसं, आतडी वगैरे काढून वेगवेगळ्या
बरण्यांमध्ये भरले जातात. हृदय काढून त्याच्या जागी पवित्र स्क्रॅरब किडा
ठेवण्यात येतो. त्यानंतर ४० दिवस मिठामध्ये शव सुकवले जाते आणि नंतर अत्तर,
तेल वगैरे लावून कापडी पट्ट्या गुंडाळून ममी तयार होते. यावर फेरोचा
सोन्याचा मुखवटा चढवून त्याला शवपेटीत आणि मस्तबा मध्ये ठेवलं जात असे. हि
संपूर्ण प्रोसेस करायला ७० दिवस लागायचे. म्हणून ७० दिवसांची डेड लाईन.
त्यामुळे सगळ्याच कबरीची कामं मध्याला रेखीव आणि दरवाज्याजवळ कशी तरी
उरकलेली दिसतील. बऱ्याच कबरी तर नीट पूर्ण सुद्धा झाल्या नाहीत."
नवरा म्हणाला, "पण याने लुटारूंचा प्रश्न सुटला?"
"दुर्दैवाने नाही" इमाद म्हणाला. "सोनं सगळ्यांच्याच आवडीचा विषय. त्यामुळे तेव्हा लुटारु इथे पहाऱ्याला असलेल्या रक्षकांना लाच देऊन कबरी लुटत होतेच. सगळ्यांशी संधान साधलेलं होत त्यामुळे लुटारू येतच राहीले."
"मी असं ऐकलं आहे कि त्याकाळचे पुजारी पण यात सामील होते. खरं आहे का ते?" माझा प्रश्न.
"हम्म" इमाद भुवया उंचावून म्हणाला. "काही लोकांच्या मते हो. असं बघा, मोंटूहोटेप दुसरा याने इजिप्तची राजधानी थेबेसला हलवली. त्यानंतर पुढची ७००-८०० वर्षे हीच राजधानी होती. या कालखंडात फेरोंचं देव आणि देवळांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आणि तेव्हा पुजाऱ्यांचं फावलं. जेव्हा आणि जे जे पुजारी सांगे तेव्हा ते ते फेरो करे. फेरोला वाटे कि आपण देवाला खुश ठेवत आहोत. पण देवासाठी मागवल्या जाणाऱ्या गोष्टी या थेट पुजाऱ्यांच्या कामी येत असत. आणि अशा रितीने पुजाऱ्यांचं प्रस्थ फार वाढलं. मी मघाशी तुम्हाला म्हणालो कि हॅटशेपस्यूतच्या मंदिरात सामान्य माणसाला प्रवेश नव्हता. खरंतर पुजाऱ्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता. हळू हळू पुजाऱ्यांची भूक देवासाठी मागवल्या जाणाऱ्या गोष्टींनी भरेनाशी झाली आणि त्यांनी लुटारूं मार्फत या व्हॅली मधली थडगी फोडली असा एक विचार इजिप्तऑलॉजिस्ट मध्ये आहे."
"So , coming back to Kings Valley, KV ८, मेरेनटाह या फेरोचं हे थडगं असून, अंदाजे १६० मीटर पॅसेज नंतर ममी ठेवलेली खोली येते. KV ९ हे रॅमसिस चौथा याचं थडगं आहे. विशेष बाब अशी की हे थडगं खोदताना चुकून एक भिंत फोडून कामगार KV १२ मध्ये पोहोचले, त्यामुळे मध्येच दिशा बदलून खोदकाम उजवीकडे वळवण्यात आलं. राहता राहिलं KV ५५ हे थडगं आखेनतेन या फेरोचं आहे. त्याच्या बद्दल पण 'इंटरेस्टिंग' गोष्टी आहेत" हाताच्या बोटांचे quotes करून इमाद म्हणाला, "पण ते नंतर सांगेन. सध्या तुम्ही हे बघून या कुठल्याही कबरीच्या आत मला यायला परवानगी नाही, आणि फोटो काढायलाही नाही. तासाभरात परत या मी इथे रेस्टिंग पॉईंट ला बसलोय."
५० मिनिटात सगळ्या गोष्टी पाहून आम्ही पण इमाद सोबत येऊन बसलो. त्याच्या ओळखीची एक गाईड पण तिथे गप्पा मारत बसली होती. एका जपानी-अमेरिकन जोडपं आणि त्यांची ८ महिन्यांची मुलगी यांच्या सोबत ती आलेली. ते जोडपं बघायला गेलेलं तोवर ही गाईड मंजुळ आवाजात त्या बाळाला गाणी ऐकवून झोपवत होती. अरेबिक का होईना सूर आणि धून फार छान वाटत होते. तिच्या हातावर झुलत, गाणी ऐकत गोरी गुलाबी पोर मस्त झोपी गेली होती. हे जोडपं खरंच प्रेरणादायी वाटलं मला. फिरायची आवड आणि मुलांची जबाबदारी एकमेकांच्या आड कधीच येऊ शकत नाही याच मूर्तिमंत उदाहरण मी पाहात होते.
बाकी लोक येई पर्यंत काही तरी बोलू म्हणून इमादला म्हणाले, "तुत-अंखं-अमुन च्या थडग्याविषयी सांग काहीतरी. हे समोर दिसतंय तेच आहे ना त्याचं?" "हो. पण ही त्याच्यासाठी निवडलेली कबर नव्हती. नवव्या वर्षी फेरो बनलेला तुत १८व्या वर्षी जाईल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याच्यासाठी निवडलेल्या थडग्याचं काम नीट सुरु पण झालं नव्हतं त्यामुळे कोण्या दुसऱ्यासाठी बनवलेलं हे थडगं वापरावं लागलं. ते तितकस मोठं पण नाही. तुत ला इथे ठेवल्या नंतर किमान दोन वेळा हे फोडलं गेलं पण फक्त बाहेरची खोली लुटली गेली आणि आतल्या २ खोल्या तशाच शाबूत राहिल्या. काही वर्षांनी सगळ्यांना या थडग्याचा विसर पडला, इतका की त्याच्यावर दुसरं थडगं सुद्धा बनवण्यात आलं. हावर्ड कार्टर ने १९०७ साली इथे व्हॅली मध्ये काम सुरु केलं. १९२२ साली त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तुतची 'रॉयल टुम्ब' सापडली. तिच्या आत अनेकविध वस्तू तर सापडल्याच पण भिंतींवरची रिलिफ्स पण सुरेख होती. ज्या वस्तू सापडल्या त्यात काही ठिकाणी राणीची कोरलेली चित्रे आढळतात. काही म्हणतात ती तुत ची बायको अंखंसुनामून आहे तर काही म्हणतात ती सावत्र आई नेफरतीती आहे." या गप्पा सुरु होत्याच तेवढ्यात टूर मधले सगळे परत आले आणि आम्ही निघालो.
वईलने दिलेल्या बलून सफारीच्या फोटोंमध्ये संपूर्ण लक्सॉरचे फोटो होते. त्यातील व्हॅलीमधील काही फोटो.
आता वेस्ट बँक टूर मधील शेवटचा स्टॉप होता मेदिनेत हाबु, अर्थात रामसिस तिसरा याचं दफनविधी करायचं मंदिर. हे सकाळी बलून मधून पाहिलं होतं आता नीट आतून पाहायचं होतं. इमाद सांगू लागला, "रॅमसिस तिसरा याचं हे दफनविधीचं मंदिर असून, जागोजागी तुम्हाला फेरो विविध देवतांची पूजा करतांना दिसेल. देवांच्या हातात key of life आहे, जी मृत्यूनंतर च्या प्रवासात फेरो ला लागेल. म्हणून त्या त्या देवतांची पूजा करून ते ही चावी फेरोला देणार असं यातून दाखवलं गेलं आहे. काही रिलिफ्स वर तर तुम्हाला तेव्हाचे रंग पण दिसतील. रिलिफ्स नीट कोरलेले आहेत पण त्या सोबत चे कर्तृश कोणी खोडू नये म्हणून खणून काढल्या सारखे ठळक बनवले आहेत. बघालच तुम्ही. मंदिर फार मोठं नाही १५ मिनिटात पाहून होईल. या तोवर." मंदिराच्या आतील बाजूस रॅमसिस चे पुतळे होते, आणि खांबावरचे रिलिफ्स आणि त्यांचे रंग फार सुंदर होते. भिंतींवर काही ठिकाणी फेरो शिकारीला निघाल्याची दृश्ये होती, शेती करतानांची, देव-देवतांच्या पूजेची. आणि कर्तृश मात्र खांबांवर चक्क खोदलेले होते.
प्रवेशद्वार
इतर रिलिफ्स
कोरलेले (की खणलेले?) कर्तुश
मंदिर पाहून बाहेर आलो आणि जेवायला जाऊया असं ठरलं. आमची ईस्ट बँकची टूर पण अशीच पुढे चालू राहणार होती, त्यामुळे इमाद सोबत आम्ही जेवायला गेलो आणि बाकीची मंडळी निघून गेली. जेवतांना इमाद ला सांगितलं, "उद्या आमचा देन्देराला जायचा प्लॅन होता, अर्ध्या दिवसाची टूर करायचा. तूच का येत नाहीस सोबत?" "ऑफिस मध्ये विचारून बघतो" इमाद म्हणाला. जेवण उरकून बोटीतून पुन्हा पल्याड पोहोचलो. हॉटेल च्या बरोबर समोर. पण इतक्यात हॉटेल वर नव्हतं जायचं. दुसऱ्या बाजूला एक नवीन मिनी बस आमची वाट पाहत होती. काही जण आधीच येऊन बसले होते. आम्ही आलो आणि ईस्ट बँकची टूर सुरु झाली.
सुरुवात झाली कर्नाक मंदिरापासून. भव्य भव्य ते किती असावं याची प्रचिती या मंदिराच्या आवारात पाऊल ठेवल्यापासून होते. आमची तिकिटे घेऊन इमाद आला आणि कर्नाक बद्दल सांगू लागला,"इथे राज्य केलेल्या प्रत्येक फेरोने यात आपला वाटा जोडून हे मंदिर वाढवले. मुख्यतः मंदिराचे आवार ५ भागात विभागले असून पैकी ४ हि मंदिरे आहेत अमुन रा, त्याची पत्नी देवता मुट, त्यांचा मुलगा देव मोंटू आणि आमेनहोटेप चौथा यांची. पाचव्या भागात पवित्र तलाव आणि खेपेर या स्कॅरब किड्याचा पुतळा आहे. या व्यतिरिक्त कर्नाकच्या आवारात खोन्स, प्ताह, थूटमॉस तिसरा, आमेनहोटेप दुसरा, ओसायरिसची खोली वगैरे अशा अनेक वास्तू आहेत. पण यातील आपण फक्त अमुन रा चे मंदिर आणि पवित्र तलावाचा भाग पाहणार आहोत. बाकी भाग पर्यटकांसाठी बंद आहेत. मेंढ्याचे डोके आणि सिंहाचे शरीर असलेल्या रॅम हेडेड स्फिंक्सची हि रांग आपल्याला मुख्य मंदिराच्या आवारात घेऊन जाते. "
रॅम हेडेड स्फिंक्स
उंच भल्या थोरल्या भिंती आणि खांबाच्या रांगांमधून आम्ही पुढे पुढे सरकत होतो. पुढे एका ठिकाणी इमाद जाऊन थांबला त्याच्या भोवती आम्ही सगळे गोळा झालो.
"मी मघाशी तुम्हाला सांगितलं कि प्रत्येक फेरोने या ना त्या स्वरूपात मंदिर वाढवले. तसाच हातभार शक्तिशाली अशा एका स्त्री फेरोनेही लावला. सांग बरं कोण असेल ती?", इमादने माझ्याकडे बोट दाखवून विचारलं.
"हॅटशेपस्यूत" मी आज्ञाधारक रित्या उत्तरले.
"बरोब्बर. तिने सुद्धा काही बदल केले. आणि आपलं नाव कर्तृश मधून त्यावर कोरून ठेवलं. आता या बाजूने या भिंती मागे पहा."
आम्हाला एका ओबेलिस्कची वरची बाजू तेवढी दिसत होती.
"हि हॅटशेपस्यूतची ओबेलिस्क. हॅटशेपस्यूतनंतर जेव्हा तिचा सावत्र मुलगा थूटमॉस तिसरा सत्तेवर आला, त्याने तीच नाव सगळ्या ठिकाणाहून मिटवण्याचा खूप प्रयत्न केला. त्याला तिची हि ओबेलिस्क सुद्धा पाडायची होती. पण आजूबाजूच्या मंदिरावर त्याचा परिणाम होईल म्हणून त्याने चारही बाजूंनी भिंत उभारून ओबेलिस्कच झाकून टाकली. याचा परिणाम असा झाला कि ओबेलिस्क नंतरच्या काळातील आक्रमणे आणि विद्धवंसांपासून वाचली. एका अर्थाने बरंच केलं म्हणायचं ना त्याने." इमाद हसत म्हणला आणि पुढे चालू लागला. जिथे तिथे असलेले फेरोंचे पुतळे मंदिराला भव्यता देत होते. थोड्याच वेळात आम्ही एका तलावाच्या शेजारी येऊन पोहोचलो.
इसिस आणि पायापाशी हॅटशेपस्यूत
हॅटशेपस्यूत ओबेलिस्क
अतिभव्य खांब
प्रत्येक रॅम हेडेड स्फिंक्सच्या खाली रॅमसिस दुसरा
मंदिराची प्रतिकृती
"हा आहे पवित्र तलाव अर्थात सेक्रेड लेक. मंदिरात पूजा करणारे पुजारी आधी या तलावात न्हाऊन मगच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचे. आणि सगळ्या पुजाऱ्यांना प्रवेश नव्हताच. मोजकेच उच्च स्तरावरील पुजारी इथे येऊ शकत. सामान्य जनतेला मात्र मंदिरातही प्रवेश नसे. फक्त उत्सवाच्या दिवशी काही मोजके स्थानिक मंदिरात येऊन देवाचं दर्शन घेऊ शकायचे."पूर्वी नक्कीच सुंदर असलेला हा तलाव आता मात्र हिरवट पाण्याने भरलेला होता. त्याच्या शेजारीच स्कॅरबचा पुतळा एका दगडी खांबावर होता आणि त्याच्या भोवती बरेचसे पर्यटक प्रदक्षिणा घालत होते.
"हे काय सुरु आहे नक्की?" आमच्या ग्रुप मधील एकाने विचारले.
"हा स्कॅरब हे तर तुम्हाला माहित असेलच. असं म्हणतात या ठिकाणी स्कॅरबला
प्रदक्षिणा मारल्या तर इच्छा पूर्ण होतात. ३ फेऱ्या मारल्या तर साधी इच्छा
पूर्ण होईल. ५ मारल्या तर लग्न पटकन होईल. ७ मारल्या तर मुलं बाळ होतील.
आणि अगदीच अवघड इच्छा असेल तर मात्र २१ फेऱ्या माराव्या लागतील. चला करा
सुरु ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार फेऱ्या मारायला." हसत हसत इमाद त्याच्या
मित्रासोबत गप्पा मारण्यात गुंग झाला.
बाकी लोक फेऱ्या मारत होते तोवर आम्ही जवळच्याच एका दगडावर टेकलो.
स्कॅरब
१० मिनिटांत तिथून निघालो दिवसाच्या शेवटच्या ठिकाणी भेट
द्यायला. लक्सॉर मंदिराला. इमाद पाठोपाठ आम्ही मंदिरच्या आत
पोहोचलो. "इजिप्त मधील बाकी मंदिरांप्रमाणे हे मंदिर एखाद्या देवाला किंवा
फेरोला अर्पित केलेले नसून, उत्सवांसाठी बांधले गेले होते. फेरोंचे
राज्याभिषेक असो किंवा अमुन रा आणि मुट यांचा विवाह सोहळा असो. सगळे उत्सव
या मंदिरात साजरे होत. अमुन-रा आणि मुट यांच्या विवाहासाठी त्यांच्या
मूर्ती कर्नाक मंदिरातून इथं आणल्या जायच्या. त्या ज्या मार्गे इथे
पोहोचायच्या त्या ३ किलोमीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्फिन्क्स उभे
होते. स्फिन्क्स अव्हेन्यू असे त्याला म्हणतात. एकूण १२०० ते १३००
स्फिन्क्स उभारण्यात आलेले त्यापैकी काही सध्या त्या रस्त्यावर लावले आहेत
आणि जसे सापडतील तसे अजून लावण्याचं काम सुरु आहे. लक्सॉर शहराच्या
इमारतींखाली दबलेले स्फिन्क्स शोधून काढणं जिकरीचं काम आहे, पण हळू हळू
उत्खनन चालू असतं." इमाद म्हणाला.
"इकडे मागे बघा. काय दिसतंय?" इमाद ने विचारलं.एक पांढऱ्या रंगाची मशिद उभी होती.
"मशिद इथे कशी?" आम्ही विचारलं.
"कालांतराने हे मंदिर वाळूखाली गाडले गेले. जेव्हा मुस्लिम आक्रमणे झाली
तेव्हा त्यांना इथे सपाट जमीन दिसली आणि इथे अबू हग्गाग यांची मशिद उभी
केली गेली. हे एक बरं झालं कि मंदिरावर मशीद उभी नाही एका बाजूला आहे.
त्यामुळे आज दोन्ही वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात."
आपल्या इथे घडलेल्या अशाच काहीशा किश्श्याने नकळत चेहऱ्यावर हसू उमटले.
मशिद
आम्ही पुढे निघालो. एका मोकळ्या पटांगणात पोहोचलो. तीन बाजूनी उंच खांब
होते. "हि खांबांची धाटणी अप्पर इजिप्त मध्ये फार प्रसिद्ध होती. लोअर
इजिप्त मधून इमहोटेप इथे येऊन हि शैली तिकडे घेऊन गेला. सक्कारा मध्ये भेट
द्याल तर अशा प्रकारचे काही खांब तुम्हाला तिथे पाहायला मिळतील." मी आणि
नवऱ्याने चटकन होकार भरला.
"आपली टूर आज इथे संपत आहे. एक ग्रुप फोटो काढूया?" इमादने विचारलं आणि आम्ही पटकन ३-४ फोटो काढले.
"उद्या मीच येत आहे बरं तुमच्या सोबत देन्देराला. सकाळी ८:३० वाजता गाडी
घेऊन पोहोचतो तयार राहा." इमादने सांगितलं आणि आम्ही खुश झालो.
आज दिवसभरात त्याने उत्तम माहिती सांगितली होती.
संध्याकाळील टूर ग्रुप
मंदिरातील काही प्रचि
प्रवेशद्वार लाइट्स मध्ये
मंदिराबाहेरील एक वास्तू
सूर्यास्तानंतर थोडा वेळ आम्ही मंदिराच्या आवारातच रेंगाळलो. विशिष्ट
पद्धतीने लावलेल्या दिव्यांमुळे मंदिर वेगळेच दिसू लागले होते. मंदिरातून
बाहेर पडून नीलच्या किनाऱ्याने हॉटेल पर्यंत येऊन पोहोचलो. आज जाम दमलो
होतो. पहाटे पासून इतक्या गोष्टी पाहून झालेल्या कि आता मेंदूची आणि मनाची
अजून काही सामावून घ्यायची क्षमताच जणू संपलेली. त्यामुळे बाहेर कुठेही न
जाता हॉटेल मध्येच जेवण करायचं ठरवलं. सोबतीला घेतल्या प्रसिद्ध इजिप्शियन
बिअर स्टेला आणि सकारा. दिवसभराचा थकवा स्टेला-सकारा जोडीने हळूहळू कमी होत
गेला आणि निवांत मनाने झोपेच्या अधीन झालो.
२७ सप्टेंबर २०१८
सकाळी ६ च्या आसपास नवऱ्याने गदागदा हलवून जागं केलं. पटकन बाल्कनी मध्ये ये असं म्हणाला. जाऊन पाहिलं तर टमटमीत फुगलेले बलून आकाशात उंच चढत होते. आजच्या बलून राईडला सुरवात झाली होती. रूम मधल्या कॉम्पलिमेन्टरी कॉफीचा आस्वाद घेत, गप्पा मारत, नीलला न्याहाळतांना तास सहज निघून गेला. आज देन्देरा नंतर हॉटेल मधून चेक आऊट पण करायचं असल्याने मुख्य सामानाची बांधाबांध करून झाली आणि तयारी करून आम्ही बफे ब्रेकफास्ट करायला पोहोचलो. कॉन्टिनेन्टल आणि इजिप्ती दोन्ही पद्धतीचा नाश्ता होता. उदरभरण करून रिसेप्शनला पोहोचतो तोवर इमादचा फोन आला कि तो ५ मिनिटात पोहोचतोय म्हणून.
नील आणि बलून
ठरल्या प्रमाणे ८:३० वाजता निघालो. हा प्रवासही नदीच्या कडेने पण हिरव्यागार रस्तावरुन सुरु होता. दीड तासात क्वेना आलं. मंदिर जरी देन्देरा म्हणून ओळखले जात असले तरी शहराचे नाव क्वेना आहे. इमाद तिकिटे घेऊन आला आणि आम्ही मंदिराच्या आवारात आलो. देन्देराचं मंदिर हा फारसा प्रचलित टुरिस्ट स्पॉट नाही. त्यामुळे इथे गर्दी अजिबात नव्हती. क्रूझ टूर आस्वान-लक्सॉर पर्यंतच असतात म्हणून त्या पर्यटकांची गर्दी इथे नसते. कोणी आवड असणारा पर्यटक इकडे वळतो किंवा संशोधक, आर्किओलॉजिस्ट वगैरे. हे मंदिर बऱ्यापैकी निवांत पहायला मिळालं.
इमाद सुरवातीपासून सांगू लागला, "हॅथोर देवतेचं हे मंदिर आहे. असं म्हणतात कि पेपी पहिला याने ख्रिस्त पूर्व २२०० च्या शतकात इथे मंदिर आणि मरुद्यान बनवलेलं. जशी वर्षं गेली तशी मंदिरात बदल होत गेले. सध्या जे बांधकाम उभं आहे ते टॉलेमी काळातील असून इदफु, इस्ना येथील मंदिरांच्या धाटणीचं आहे. मंदिराच्या सभोवताली संरक्षणासाठी मातीच्या विटांची भिंत उभारली होती. पुढे नाईलला आलेल्या पुरात ती पडली पण काही ठिकाणी ती अजूनही उभी आहे. या भिंतीच्या आत मंदिर परिसरात मुख्य मंदिर, पवित्र तलाव वगैरे आहेच पण टॉलेमी नंतर आलेल्या रोमन राज्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने मंदिरात भर टाकली आणि मँमिसि अर्थात जन्माची खोली उभारली. आपण आता मुख्य मंदिरात जाऊया."
"इथे हे उंच मोठे खांब दिसत आहेत, तसे या दालनात १८ खांब आहेत. प्रत्येक खांबावर फेरो हॅथोरची पूजा करतांनाचे प्रसंग कोरलेले आहेत. सर्वात वर हॅथोरचे मुखवटे लावलेले आहेत. त्यावरचे रंग अजूनही दिसत आहेत बघा. या दालनाच्या खांबांच्या मधल्या छतावर जीवनप्रवास दाखवणारे रिलिफ्स दिसतील. त्यातले रंग सुद्धा अजून टिकून आहेत. सर्वांत शेवटी न्यूट या देवतेचा रिलीफ पाहायला मिळेल. आकाशाची आणि रात्रीची देवता म्हणून न्यूटला ओळखले जाते. फेरोंची मृत्यूनंतर रक्षा करावी म्हणूनही तिची पूजा होते. रिलिफ्स मधून ती सूर्यदेव 'रा' याचं रक्षण करतांना दाखवली जाते. संध्याकाळी सूर्य तिच्या मुखातून प्रवेश करतो, तिच्या शरीरातून रात्रभराचा प्रवास करून सकाळी न्यूट नव्या सूर्याला प्रसवते असा याचा अर्थ. न्यूट च्या आजूबाजूला असलेले तारे आणि निळा रंग रात्र असल्याचं दर्शवतात."
हॅथोरचा मुखवटा
छतावरील इतर प्रसंग (झूम केल्यास रंग ठळक दिसतील)
छतावरील इतर प्रसंग
छतावरील इतर प्रसंग
न्युट सूर्याला गिळतांना
नंतर प्रसवतांना
पूर्वी येथे पवित्र तलाव होता.
मंदिराभोवतीची मातीची भिंत
मंदिराच्या आवारातील काही प्रचि
इमाद सांगत होता आणि आम्ही शक्य तेवढं साठवत होतो. काय अप्रतिम कलाकृती. छतांवरील रंग इतके देखणे कि काही दशकांपूर्वीचे वाटावे. हॅथोरचा चेहरा इतका सुंदर कि बघत राहावं.
"आता आपण आत जाऊया. तुम्हाला एका खास ठिकाणी नेतो." त्याच्या पाठोपाठ आम्ही काही दालने पार करून गेलो.
एका ठिकाणी एक सुरक्षारक्षक तळघरात उतरणाऱ्या एका दरवाजाजवळ बसून होता.
इमादची ओळख होती त्याच्याशी. अरेबिक मध्ये त्याने काहीतरी संभाषण केले आणि
त्या गार्डने आम्हाला हसून अभिवादन केले.
"हिंदी?"
"येस" आम्ही म्हणालो.
"वेलकम, वेलकम. गो इन साईड."
आम्ही इमादकडे पाहिलं, "चला आत उतरा. समजावतो."
सात आठ पायऱ्या उतरून खाली गेलो. आधी उजवीकडे मग डावीकडे वळत शेवटी एका अगदी अरुंद पॅसेज मध्ये पोहोचलो.
"हा भुयारी मार्ग कोठारे जोडतो. देवासाठी आलेल्या भेटवस्तू, धान्य, अत्तरे,
दागिने वगैरे यांचे साठे इथे ठेवले जात. मुख्यत्वे सगळं पुजारीच वापरत
असत. कोणत्या कोठारात काय ठेवलं आहे हे त्याच्या भिंतीवर कोरलेलं असे. जसं
इथे अत्तराच्या कुप्या आहेत."
आम्ही कॅमेरा सरसावला. पण अंधारामूळे फोटो काही नीट आला नाही.
"इथे पर्यटकांना यायची परवानगी नाहीये. आज ओळखीच्या गार्डची ड्युटी होती त्यामुळे आपण आलो आत. जाऊया परत वर मग?"
आम्ही होकार भरून त्याच्या मागे परत गार्डच्या खोलीत आलो आणि १० पौंडची नोट त्याच्या हातात दिली.
भुयार
आता मंदिराच्या मुख्यदालनात आलो. इथून दोन छोट्या खोल्यांचे रस्ते होते. पहिलीत गेलो. "हि पूजेची खोली. फेरो हॅथोरची पूजा करतांनाचे रिलिफ्स तुम्हाला इथे दिसतील. हे चार टप्यात आहेत. पहिल्यांदा फेरो गाभाऱ्याचा दरवाजा ठोठवत आहे, नंतर दरवाजा ढकलतोय, तिसऱ्या ठिकाणी फेरो आणि देवता समोरासमोर असून फेरो तिचं दर्शन घेत आहे आणि सगळ्यात शेवटी धूप/उद जाळून तिची पूजा करत आहे. असेच रिलीफ बाकी देवांच्या बाबतीत पण बाहेरील भिंतीवर आहेत. आपण आता दुसऱ्या खोलीत जाऊया."
फेरो गाभाऱ्याचा दरवाजा ठोठवत आहे
दरवाजा ढकलतोय
फेरो आणि देवता समोरासमोर
धूप/उद जाळून तिची पूजा करतांना
"हि उत्सवाची खोली. तुम्ही इदफु येथील होरसचं मंदिर पाहिलं असेल ना. तिथे पण अशा पद्धतीचे रिलिफ्स तुम्ही बघितले असतील. होरस आणि हॅथोर यांच्या लग्नाचा विधी दरवर्षी केला जात असे. तेव्हा हॅथोर इथून छोट्या बोटीमधून नाईल मार्गे इदफु पर्यंत प्रवास करत असे आणि इदफु येथे त्यांचं लग्न होई. इथे फेरो हॅथोरच्या बोटीची पूजा करून तिला निरोप देतांना दाखवला आहे. "
हॅथोरची बोट
हॅथोरला निरोप देतांना
"आता पुढच्या खोलीत जाऊया. हि जन्माची खोली, मॅमिसी, जी रोमन राज्यकर्त्यांनी उभारली. याच्या छतावर सुद्धा तुम्हाला न्यूट दिसेल. इथे सुद्धा न्यूट सूर्याला गिळतांना आणि प्रसवतांना दाखवली आहे, फक्त हॅथोरचा चेहरा तितकासा साधला नाही रोमन लोकांना. हो ना?"
मॅमिसी मधील छत
"इथून डाव्या बाजूने एक रस्ता मंदिराच्या छताकडे जातो. तिकडे जाऊया." मंदिरात खोल्या आणि भिंतींच्या भुलभुलैय्या मधून फिरतांना इजिप्शीयन वास्तूकौशल्याचं फार कौतुक वाटत होतं. इमाद ने सांगितलेल्या त्या पॅसेजपाशी पोहोचलो, "हा रस्ता थेट छतावर जातो. इथून फेरो आणि पाठोपाठ पुजारी देवाला घेऊन छतावर पूजेसाठी घेऊन जात. या पॅसेज मधील रिफील बघून लक्षात येईल कि रोज सकाळी करण्याचा हा एक रिवाज होता. असाच दुसऱ्या बाजूचा पॅसेज आहे पण त्यावर देवाला घेऊन उतरतांनाचे क्षण दाखवले रिलिफ मधून दाखवले आहेत."
आम्ही तिथून छतावर पोहोचलो. छान ऊन आणि वारा होता वर. काही खोल्या होत्या ज्यातील एक उघडी असून बाकी कुलूपबंद होत्या.
"हि ओसायरिसची खोली. या खोलीच्या छतावर वृषभ आणि तूळ राशींच्या द्वारे
आकाशाची स्थिती दाखवणारे कॅलेंडर कोरलेले आहे ज्याला देन्देरा झोडियॅक
म्हणून ओळखले जाते. सध्या इथे त्याची नक्कल लावलेली आहे पण मूळ कॅलेंडर
लुवर म्युसिअम मध्ये पाहायला मिळू शकत. या खोलीच्या भिंतींवर ओसायरिसच्या
आयुष्यातील एक गोष्ट चित्रित केली आहे. ओसायरिस सुबत्तेचा देव आणि इसिस हि
बऱ्याच शक्ती अंगी असलेली देवता हे इजिप्तचे राज्यकर्ते होते. सेत हा
ओसायरिसचा भाऊ. इजिप्तचा राज्यकर्ता होण्यासाठी याने धोक्याने ओसायरिसला
मारले आणि त्याचे तुकडे करून वाळवंटात फेकून दिले. इसिसने पक्षाचे रूप
घेऊन सगळे तुकडे गोळा करून ओसायरिसला परत जिवंत केले. सेतने अशा विविध
मार्गाने ओसायरिसला मारण्याचा प्रयत्न केला आणि इसिसने त्याला पुनर्जीवन
दिले. एकदा मात्र त्याला परत जिवंत करणे शक्य नसल्याने इसिस अनुबिस(
मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींच्या) देवाकडे मदत मागते आणि ओरायसिस कडून
पुत्रप्राती करून घेते. होरस हा त्यांचा मुलगा पुढे जाऊन वडिलांच्या
मृत्यूचा बदला घेतो. या कथेमध्ये थोडाफार बदल करून गॉड्स ऑफ इजिप्त हा
हॉलिवूडपट बनवला आहे." आम्ही हा चित्रपट पाहिला होताच त्यामुळे सारे संदर्भ
सापडत गेले. तिथल्या या काही रिलिफ्स.
देन्देरा झोडियॅक
विकि वरुन साभार इसिस पक्षीरुपात बिजारोपण करुन घेतांना
आम्ही मंदिरातून बाहेर पडू लागलो. एका दालनातून जातांना वरचे संपूर्ण छत
काळ्या रंगात दिसले. त्या दालनातील रिलीफ सुद्धा फार विद्रुप करून टाकले
होते.
"इमाद माझा एक प्रश्न आहे" मी म्हणले.
"विचार ना" इमाद म्हणाला.
"हे असं छत काळं कसं पडलं? कि मुद्दाम केलं आहे? आणि दुसरं आम्ही सगळ्या
मंदिरातून पाहत आलोय खूपसे रिलिफ्स असे विद्रुप केले आहेत. त्या मागचं काय
कारण?" मी विचारलं.
"इजिप्त मधून रोमन गेल्यावर इंग्रज धर्मगुरू येऊन पोहोचले. त्यांनी
सर्वसामान्य लोकांचे धर्मांतर करायला सुरुवात केली. आणि इतक्या सुंदर
कामाला अश्लील सांगू लागले. शक्य असेल आणि पोहोच जाईल ती ती रिलिफ्स
त्यांनी खरडून खराब केली. अशा एक धर्मांतराच्या वेळी काही लोक इथे लपून
बसले होते. त्यांच्या चुलीतून निघालेल्या धुराने छते काळवंडली असं काही लोक
सांगतात. आणि काही लोक असंही सांगतात कि धर्मांतर होऊ नये म्हणून इथे
लपायला आलेल्या लोकांना इथे जिवंत जाळण्यात आलं, त्यामुळे छतांवर काळ्या
धुराचा रंग चढला. नक्की काय झालं कोणास ठाऊक. मी स्वतः ख्रिश्चन आहे पण
मलाही त्या धर्मगुरूंचा तितकाच तिटकारा येतो जेवढा बाकीच्यांना. असो जेवढी
तोंडे तेवढ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही या बाबत अजून वेगळी गोष्ट ऐकली तरी
नवल नाही."
काळे पडलेले छत
होरस बाल्यावस्थेत असून विविध देवता त्यास खेळवतांना. असे मातृत्वाच्या रिलिफ्सना खराब केलेले आढळते.
१
२
११ च्या सुमारास देन्देराहून निघालो. २००० वर्षांपूर्वीचे रंग मनात साठवून, अजून एका कलाकृतीचा निरोप घेतला. १२:३० ला परत लक्सॉर गाठलं. इमादला पुढच्या टूर साठी जायचं होतं त्यामुळे आम्हाला सोडून तो लगेच निघाला.
आजचा आमचा अप्पर इजिप्तमधील शेवटचा दिवस. निळ्याशार नीलचा तात्पुरता निरोप घ्यायची वेळ आली होती आणि आता हुरघडा या तांबड्या समुद्राजवळील गावी जायचे होते. इजिप्त मधील सर्वांग सुंदर अशा अनेक वास्तू पाहून झाल्या होत्या. काही गोष्टी वेळेअभावी राहून गेल्या होत्या. जसं ऍबीदोस शहर जे देन्देरा पासून अजून पुढे ३ तासाच्या रस्त्यावर आहे आणि इजिप्तच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण. लक्सॉर मधील काही म्युसिअम, कर्नाक मंदिरातील लाईट अँड साउंड शो वगैरे. पण जे पाहिलं होतं तेही थोडकं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे काहीही अडचण न येता इजिप्तचा हा टप्पा पूर्ण झाला होता.
थोडं सेलिब्रेशन करावं म्हणून ओमर खय्याम यांच्या नावाने बनवलेली वाईन आणि रेमन नूडल्स मागवून निवांत जेवण करत बसलो. खय्याम साहेब म्हणाले आहेतच, “Drink wine. This is life eternal. This is all that youth will give you. It is the season for wine, roses and drunken friends. Be happy for this moment. This moment is your life.”
ओमर खय्याम यांच्या नावाने बनवलेली वाईन
हुरघडाला जाणारी बस ३ वाजता होती. २:३० वाजता टॅक्सीने बस स्टॅन्डवर पोहोचलो. 'गो बस' इजिप्त मधील मुख्य शहरांना जोडणारी अग्रेसर बस सेवा प्रवाशांना फार चांगल्या सुविधा सुद्धा देते. बरोबर ३ वाजता लक्सॉर सोडलं. तासभर देन्देराच्या रस्त्यावरून प्रवास केल्यावर गाडी उजवीकडे वळाली आणि अगणित वाळवंटाला सुरवात झाली.
अजून तीन तास प्रवास करून गाडी हुरघडाच्या बस स्टॅन्डवर पोहोचलो आणि
पुढच्या १० मिनिटात इथल्या रिसॉर्टवर. Sun Rise Holiday Resort (Adults
only) हे हुरघडा मधील एक पंचतारांकित हॉटेल. Adults only याचा अर्थ लहान
मुलांची किरकिर कुठेच ऐकू येणार नाही. हुरघडामध्ये असे बरेच रिसॉर्ट्स
आहेत. आमच्या रिसॉर्टच्या खर्चात तीन वेळचे जेवण आणि अमर्यादीत स्थानिक
मद्य समाविष्ट होते. पण प्रत्येक जेवणाच्या वेळी ड्रेस कोड पाळावा असा नियम
होता. चेक इन केल्या केल्या कपडे बदलून खादाडी करायला गेलो. Unlimited
सोयींचा चवी चवी ने आस्वाद घेत कॉन्टिनेन्टल जेवण केलं. आमच्या रूम मधून
थेट बीच वर जायचा मार्ग होता. थोडा वेळ तिकडे जाऊन खाऱ्या हवेचा आस्वाद
घेतला. तांबड्या समुद्राला उद्या भेटूया असं ठरवून झोपी गेलो.
२८ सप्टेंबर २०१८
तांबड्या समुद्राची घनता आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायविंगसाठी हा समुद्र प्रसिद्ध आहे. हुरघडा, मरसा आलम, दहाब, शर्म-अल-शेख ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेली असतात. हुरघडा मधील बहुतेक रिसॉर्ट्सला प्रायव्हेट बीच असतो आणि रिसॉर्टच्या आतच संपूर्ण जेवणाची वगैरे सोय असते. आमच्या रिसॉर्टच्या बुकिंग मध्ये पण ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि अमर्यादित स्थानिक अल्कोहोल समाविष्ट होतं. रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीच वर जायला रूम मधून थेट रस्ता होता.
रिसॉर्टचा कृत्रिम प्रायव्हेट बीच
रिसॉर्टचा कृत्रिम प्रायव्हेट बीच. पलीकडे मुख्य समुद्र
या समुद्राला तांबडा समुद्र म्हणत असले तरी इथलं पाणी अतिशय निळं आणि स्वच्छ. नजरेस सुखावणारा समुद्र किनारा आणि तिथेच स्नॉर्कलिंग करायची सुद्धा सोय होती. पण आम्ही हॉटेल मधून अर्ध्या दिवसाची क्रूझ आणि स्नॉर्कलिंगची टूर बुक केली. बफे ब्रेकफास्ट करून मनसोक्त समुद्रात डुंबून ११ वाजायच्या सुमारास रिसॉर्ट मधून टूर साठी रवाना झालो.
रिसॉर्टजवळ समुद्राचा रंग
अंदाजे ५० लोकांसाठी ही क्रूझ असून बोटीचा तळ काचेचं होतं. सुरवातीला बोटीला समुद्रात बऱ्यापैकी आत नेण्यात आलं. आणि मग बोटीवरचे स्कुबा डायव्हर्स समुद्रात उतरून माशांना खाद्य टाकून बोटी जवळ आणू लागले. थोड्याच वेळात विविध रंगांच्या माशांनी बोटीचा तळ भरून गेला. या समुद्राला तांबडा समुद्र बनवणाऱ्या लाल कोरल्सचं दर्शन पण अधून मधून होत होतं. अर्धा तास माशांसोबत गेल्यावर बोट पुढे निघाली.
बोट / क्रूझ निघते ती जागा. मागे हुरघडा गाव
समुद्राच्या निळाईच्या विविध छटा
...
कोरल्स आणि मासे (काचेचा तळ असलेल्या बोटीतून)
स्कुबा डायवर भोवती गोळा झालेले मासे
अंदाजे १५ मिनिटे अजून समुद्रात जाऊन एका ठिकाणी नांगर टाकला गेला. आणि स्नॉर्कलिंग करणारे गिअर्स चढवून पटापट समुद्रात उड्या मारून समुद्राची मजा घेऊ लागले. माझ्यासारखे ज्यांना पोहणे येत नाही ते बघत बसले. तेवढ्यात बोटीच्या स्कुबा डायव्हर्स म्हणाले कि ज्यांना पोहता येत नाही ते पण स्नॉर्कलिंग करू शकतात. त्यांच्या मदतीने स्नॉर्कलिंग गिअर्स चढवून, प्लास्टिक टायर घेऊन मी पण समुद्रात उतरले. कमरे इतक्या पाण्यातही माझा निभाव लागत नाही, इथे तर तळ सुद्धा दिसत नव्हता. माझी भलतीच तारांबळ उडाली. आयुष्यात घडलेल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा जलद पिक्चर बनून रिलीज होऊन मी तो पाहून सुद्धा घेतला. असा पिक्चर याआधी सुद्धा ३-४ परिस्थितीत बनला होता म्हणा, पण याही वेळी तो बनला. But I am still here telling you the tale. :D :D
Help म्हणायला तोंड उघडल्यावर स्नॉर्केलिंग गिअर्स मधून नाकातोंडात आणि डोळ्यांत पण पाणी जाऊ लागले. मी पॅनिक होऊ लागले म्हटल्यावर मदतीला परत डायवर आला. त्याने रिलॅक्स व्हायला सांगितलं. त्यानंतर तोंडात धरायची नळी दातांनी घट्ट दाबून ठेव म्हणाला. तोंडाने श्वास घ्यायचा आणि नाकाने सोडायचा हे सुरात करायला थोडा वेळ गेला पण जमलं. शरीर शिथिल झालं आणि आपोआप पाण्यावर तरंगू लागलं. सोबतीला प्लास्टिकचे टायर होतेच. आपण बुडणार नाही याची खात्री झाली आणि डोकं हलकेच ३ ते ४ इंच पाण्यात बुडवलं. नजर पाण्याखाली स्थिर व्हायला जरा वेळ गेला मात्र थोड्याच वेळात पाण्याखालच्या जगाचं पहिलं प्रत्यक्ष दर्शन घडलं. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील अभय देओलचा संवाद आठवू लागला, "ब्लु वॉटर होगा, मछलीया ऐसे तैरेंगी आस पास. It would be nice." पाण्याखाली डोकं बुडवल्याच्या त्या क्षणापर्यंत मी एका अद्भुत जगापासून अनभिद्य होते याची जाणीव झाली. चंदेरी शरीरावर काळे पट्टे असलेला सार्जंट मेजर मासा, Finding Nemo मधली डॉरी (यलो टेल सर्जन फिश) पण दिसली. मध्येच रेड सी पॅरोट फिश या हिरव्या माशाने पण दर्शन दिले. या समुद्राला तांबडा समुद्र अर्थात रेड सी म्हणायला भाग पाडणारे असंख्य लाल कोरल्स सुद्धा पाहिले.
आमची स्नॉर्केलिंग ची जागा
थोड्या वेळाने बोटीवर परत आले ते आता स्कुबा डायविंग शिकून पाण्याखालील या जगाची ओळख करून घ्यायची हे ठरवून. जाताना हळू जाणाऱ्या बोटीने येतांना वाऱ्याच्या वेगाने अंतर कापलं आणि अर्ध्या तासात आम्ही रिसॉर्टवर परत आलो. उरलेला सगळा वेळ अमर्यादित समुद्राची मजा आणि अमर्यादित वारुणीचा आनंद घेत घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता कैरोला जाणाऱ्या गो बसचं तिकीट बुक केलं आणि सामान बांधून परत समुद्र किनारी येऊन समुद्राची गाज ऐकत बसलो. शांत झोप लागावी म्हणून व्हाईट नॉइजची सध्या चलती आहे. पण खऱ्या खुऱ्या समुद्राच्या गाजेला ऐकत झोपण्यात जी मजा आहे ती रेकॉर्ड केलेल्या समुद्राच्या व्हाईट नॉइज मध्ये कधीच येऊ नाही शकत. रात्रीही कोमट असणाऱ्या पाण्यात चालणं, मऊशार वाळू चुरत किनारी पहुडणं आणि आल्हाददायक खारा वारा पिणं. समुद्र किनाऱ्याची चटक वेगळीच असते ना!!
२९ सप्टेंबर २०१८
सकाळी परत समुद्राची भेट घेऊन आलो. ब्रेकफास्ट करून चेक आऊट केलं आणि गो बसच्या स्टॅन्ड वर येऊन पोहोचलो. नेहमी प्रमाणे बस वेळेवर निघाली. या खेपेची बस थोडी वेगळी होती. दुमजली आरामदायक बसच्या आत टॉयलेटची पण सोय होती. प्रत्येक प्रवाशासाठी ब्रेकफास्ट बॉक्स होता.
तांबड्या समुद्राशेजारून निघालेली बस थोड्या वेळाने सुवेझ कालव्या शेजारून जाऊ लागली. आणि अगदी सुवेझ पोर्ट नाही पण कालवा तरी पाहू शकलो याचं समाधान लाभलं. सुवेझची साथ सुटली आणि झाफराना येथील भला मोठा पवनचक्की प्रकल्प नजरेस पडला. पुढे घाटातून घाटमाथ्यावर गाडी पोहोचली आणि संध्याकाळी ६:३० च्या सुमारास कैरो मध्ये.
सुवेझ जवळील एका विश्रामथांब्यावर बस थांबली असता
बस मध्ये मिळालेले इजिप्ती ७up त्यावर पपायरस आणि देव बास्तेत यांचे इल्युस्ट्रेसशन
झाफराना येथील पवनचक्की प्रकल्पाचा छोटासा भाग
सगळे बोडके डोंगर
प्रचंड ट्रॅफिकशी झगडत आमच्या स्टॉपवर बस आम्हाला सोडून गेली. इथून उबर
करून आमच्या कैरो मधील हॉटेलवर येऊन पोहोचलो. खान-अल-खलिली मार्केटच्या
सर्वांत जवळ असलेले एक अगदी साधेखानी एक तारांकीत हॉटेल निवडले होते. बॅग
टाकल्या आणि प्रवासाने आंबलेलं अंग मोकळं करावं म्हणून थेट झोपलो.
३० सप्टेंबर २०१८
पहिल्या दिवशी ठरल्या प्रमाणे महमूदने आमच्यासाठी अलेक्झांड्रिया दाखवून आणेल अशी गाडी बुक केली होती. त्याप्रमाणे सकाळी ७:३० वाजता आम्ही नाश्ता उरकून तयार बसलो. थोड्यावेळाने चालक महंमद गाडी घेऊन आला आणि आम्ही कैरो मधून उत्तर दिशेला प्रस्थान केलं. कैरो पासून पुढे उत्तरेला नील नदीचा सुपीक प्रदेश जो नाईल डेल्टा म्हणून ओळखला जातो तो सुरु होतो. त्यामुळे चहूबाजूंनी हिरवीगार शेती आणि झाडे आपली सोबत करतात, मात्र या सगळ्याला कारण असलेली नील कुठेही दिसत नाही. बऱ्याच दिवसांनी आजूबाजूला दिसणारा हिरवा रंग डोळ्यांना सुखकर होता. कैरो-अलेक्झांड्रिया हायवे मस्त मोठा होता. त्यामुळे ट्रॅफिक वगैरे फारशी जाणवली नाही आणि ३ तासांत आम्ही शहराच्या हद्दीतून प्रवेश करते झालो.
अलेक्झांड्रिया हे गाव अलेक्सझांडरने ख्रिस्त पूर्व ३०० मध्ये एक बंदर बांधून उभारले. विचार असा कि ग्रीस मार्गे इजिप्त मध्ये पाय रोवावे आणि व्यवसाय आणि पर्यायाने सत्ता मिळवावी. त्यानंतर अंदाजे ख्रिस्त पूर्व ३० च्या दशकात क्लिओपात्रा हि शेवटची टॉलेमी फेरो होती. तिला हरवून इजिप्त मध्ये रोमन सत्ता स्थापन केली गेली आणि रोमनांनी इजिप्तची राजधानी अलेक्झांड्रियाला हलवली. आजचा पहिला टप्पा होता पॉम्पेचा स्तंभ. अंदाजे ३०० व्या शतकात बांधला गेलेला हा स्तंभ रोमन इजिप्त मधील टिकून राहिलेला एकमेव स्तंभ आहे. याची उंची अंदाजे २८ मीटर आहे आणि तळाचा व्यास ३ फूट आहे. रोमन कलाकारी ल्यायलेला हा स्तंभ समोर असलेल्या स्फिंक्समुळे इजिप्तशी धागा जोडून ठेवतो. या आवारात बाकी विशेष काही नाही. त्यामुळे थोडे फोटो काढून १५-२० मिनिटांत तेथून निघालो.
पॉम्पेचा स्तंभ.
समोरचे २ स्फिंक्स
अवांतर: मागील एका भागात जॉनविक्क यांनी हायजीन बद्दल विचारलं होतं. बाकी पर्यटन स्थळांवर अनुभव चांगला आला होता. पण पॉम्पेच्या स्तंभाच्या आवारात असलेले प्रसाधनगृह वापरावं लागलं तेव्हा नाक आणि जीव दोन्ही मुठीत आलेले इतका गलिच्छ कारभार होता.
आता जायचे होते कॅटकॉम्ब्स ऑफ कोम अल शकाफा पाहायला. हे कॅटकॉम्ब्स अर्थात भूमिगत थडगे दुसऱ्या शतकापासून ते चवथ्या शतकापर्यंत वापरले गेले होते. कोम अल शकाफा याचा अर्थ मातीच्या भांड्याचे तुकडे. इथे ज्यांना दफन केले जाई त्यांचे नातेवाईक येथे भेट देण्यास येताना वाईन आणि अन्न हे मातीच्या भांड्यामधून आणत. त्या भांड्याचे तुकडे येथे पसरलेले असत त्यामुळे याला नाव मिळालं 'कोम अल शकाफा'. जमिनी खाली ३ मजले याचं बांधकाम असून सर्वांत खालील मजला सध्या पाण्याखाली आहे. येथे ३ मस्तबा सापडल्या असून बाकी शवपेट्या या भिंतींमधून पुरून ठेवलेल्या आढळल्या. फक्त माणसाच्याच नव्हे तर कुत्रा, घोडा वगैरे जनावरांचे शव इथे सापडले होते. ही जागा जगासमोर आली ती एका गाढवामुळे. चरत चरत एक गाढव या भागात पोहोचलं आणि भुसभूशीत झालेल्या इथल्या जमिनीवरून थेट आत पडलं आणि या भूमिगत शवागाराचा शोध लागला.येथील भिंतीवर इजिप्त, रोमन आणि ग्रीक या तिन्ही कलाकारीचा संगम आढळून येतो.
सापडलेल्या शवपेट्या
त्या अशा येथे पुरून ठेवलेल्या आढळल्या
एक मस्तबा. इजिप्ती देव होरस आणि अनुबिस हे रोमनांच्या हातून घडवल्यावर विनोदी दिसत आहेत.
येथेही हॅथोर बाबत तेच झालेले. खाली द्राक्षे आणि वेलींची नक्षी
अजुन एक मस्तबा. येथेही द्राक्षे आणि वेलींची नक्षी
पुढचा टप्पा होता कैतबेचा किल्ला (Citadel of Qaitbay). अलेक्झांड्रिया मधील महत्त्वाची वास्तू. १४७७ च्या सुमारास अल अश्रफ कैतबे या मामलक सुलतानाने हा किल्ला बांधायला सुरवात केली. याच ठिकाणी पूर्वी अलेक्झांड्रियाचा प्रसिद्ध दीपस्तंभ होता. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या दीपस्तंभाच्या जागी कैतबे याने हा किल्ला बांधला आणि संपूर्ण भूमध्य समुद्रात हाभेदण्यास कठीण असा किल्ला म्हणून ओळखला गेला. पुढे आलेल्या कित्येक सुलतान आणि राजांनी हा किल्ला जपला, वेळप्रसंगी दुरुस्त केला. शेवटी १९५२ मध्ये इजिप्तच्या नेव्हीने या किल्ल्याला संग्रहालयाच रूप दिलं आणि तेव्हापासून ते आजतागायत हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतोय. सफेद दगडांत या किल्ल्याचे बांधकाम झालं असून आतील खोल्या, पॅसेज वगैरे घुमटाकार आहेत. किल्याचे तीनही मजले पर्यटकांसाठी खुले असून, तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांमधून समुद्राचे आणि किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते. तळमजल्यावर मागच्या बाजूला बोटींवर सामान, तोफा चढवता येतील असा उतार असून किल्ल्याच्या मागील बाजूला तोफा चढवून नेता येतील अशाप्रकारचा चढ आहे. तो चढून गेलं कि खुला समुद्र आपली वाट पाहत असतो. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा वारा आणि समुद्राची जणू जुगलबंदी सुरु होती. फेसाळलेला समुद्र आणि खारा वारा अंगावर झेलत बराच वेळ आम्ही तिथे बसून होतो.
प्रवेशद्वारा जवळील बोटी
किल्ल्याची एक बाजू
प्रवेशद्वार
किल्यावरून समुद्रात लक्ष ठेवण्याची खिडकी
किल्याच्या मागे फेसाळलेला समुद्र
भुकेची जाणीव झाली आणि निघावं लागलं, पण दोन मुख्य समुद्राचं दर्शन या इजिप्त ट्रीप मध्ये झाल्याने मस्त वाटत होतं, पहिला तांबडा समुद्र आणि आता हा भूमध्य समुद्र. किल्याच्या आवाराच्या बाहेर आल्यावर महंमदला म्हणालो जेवायला घेऊन चल बाबा. अलेक्झांड्रिया मधील मासे फार प्रसिद्ध तेव्हा अशाच एका रेस्टॉरंट मध्ये तो आम्हाला घेऊन गेला. आतापर्यंत महंमदच्या बाबत तयार झालेल्या चांगल्या मतांना इथून सुरुंग लागू लागले.
१९०० सालापासून अलेक्झांड्रियाला खाऊ घालणारे अथेनिअस हे रेस्टॉरंट समुद्राचं दर्शन घडवत जेऊ घालते. आम्ही खिडकी जवळची जागा निवडली.
सोबत महंमद पण आला आणि म्हणाला, "इथे तुम्ही ऑर्डर नाही देऊ शकत. इथे फक्त
२-३ प्रकारचं उत्तम जेवण मिळत. तुम्हाला फिश खायचं आहे कि चिकन?"
"आम्ही का ऑर्डर नाही देऊ शकत? मेनूकार्ड असले ना त्यांचं? आणि इंग्लिश नाही येत त्यांना?" मी विचारलं.
"नाही. इंग्लिश नाही येत आणि मेनू कार्ड वगैरे काही नाहीये. फिश किंवा चिकन ते सांगा मी त्यांना सांगतो." इति महंमद.
आम्हाला थोडं आश्चर्य वाटलं पण म्हणालो ठीक आहे असेल एखाद्या ठिकाणी अशी पद्धत.
आम्ही दोन्हीचा दर विचारला.
महंमद म्हणाला, "रेट २५ प्रत्येकी." म्हटलं २५ पौंड फिशचे आणि २५ चिकन चे म्हणजे उत्तम आहे कि.
आम्ही म्हणालो "दोन्ही द्यायला सांग."
महंमद वेटर सोबत अरेबिक मध्ये काही बोलत होता. तोवर आम्ही आजूबाजूला नजर
फिरवली. एक मोठासा युरोपियन पर्यटकांचा ग्रुप पण जेवत होता. त्यांनी कसं
बरं जेवण मागवले असेल?
माझ्या मनात हा विचार आला तोवर नवऱ्याने महंमदला विचारलं, "२५ पौंड ना प्रत्येकी?"
"पौंड? नाही नाही डॉलर." महंमद म्हणाला.
आम्ही चकित झालो. या आधी कधी जेवायच्या ठिकाणी डॉलर मध्ये बिल भरलं नव्हतं. मी मनात '५० गुणिले ७०' करू लागले.
नवरा म्हणाला, "नाही हे जास्त आहेत. आपण दुसरीकडे जेवायला जाऊया. ऑर्डर रद्द करायला सांग."
महंमद बरं म्हणाला आणि थोडं वेटर सोबत बोलल्या सारखं करून परत येऊन
म्हणाला, "ते तुम्हाला 'कॉम्प्लिमेंटरी' चिप्स पण देतील. थांबायचं का मग?"
नवऱ्याने ठाम नकार सांगितला आणि आम्ही उठून चालू लागलो.
दरवाजा जवळ पोहोचायच्या आधी एका टेबलवर मला एक मेनूकार्ड दिसलं. मी चटकन
उचलून वाचू लागले आणि शेजारी उभ्या असलेल्या वेटरला म्हणाले, "तू इंग्लिश
बोलू शकतोस?"
"हो मॅडम. नक्कीच बोलू शकतो" अस्खलित इंग्लिशमध्ये त्याने उत्तर दिलं.
मी आणि नवरा थांबलो. "हे मेनूकार्ड आहे ना? आम्ही यातून जेवण मागवू शकतो का?"
"अर्थात मागवू शकता" तो म्हणाला.
मी त्याच्याशी बोलत आहे हे पाहून दरवाजा पर्यंत गेलेला महंमद मागे आला आणि "चला चला उशीर होईल" म्हणत घाई करू लागला.
"हे आहे मेनू कार्ड आणि इथे आम्ही जेवण मागवू शकतो. आम्ही इथेच जेवण करणार
आहोत." आम्ही म्हणालो आणि आधीच्या खिडकी जवळील जागेवर जाऊन बसलो.
त्यांचा मॅनेजर आणि महंमद अरेबिक मध्ये काही तरी बोलत होते. अंदाजाने सांगायचं तर महंमद मॅनेजर कडे फुकट जेवण मागत होता कारण तो आम्हाला तिथे घेऊन आला. पण हे या रेस्टॉरंट च्या नियमांत बसत नसल्याने मॅनेजर नकार देत होता. आम्ही जेवण काय मागवायचं ते ठरवलं, वेटरला ऑर्डर दिली. तोवर मॅनेजरने स्वतःला पुढील कामात गुंतवले होते. महंमद म्हणाला, "तुम्ही जेऊन घ्या मी बाहेर थांबलोय." काही वेळाने मागवलेला मासा, सीझर सलाद आणि फ्रेश मँगो पल्प आलं. अप्रतिम चव. सगळ्याच पदार्थांची. मँगो पल्प तर परत मागवलं इतकं छान होतं. रेस्टॉरंट १९०० सालापासून आजवर सुस्थितीत असल्याचं कारण सापडलं. जेवण संपवून अवघे १८० पौंड म्हणजे ११ डॉलर एवढं बिल चुकतं करून आम्ही बाहेर पडलो.
खिडकीतून दिसणारा किल्ला, समुद्र आणि रस्ता
हेच ते मेनू कार्ड
अत्यंत चविष्ट जेवण
महंमद गाडी घेऊन आला, आणि आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो. अलेक्झांड्रियाला मी येण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे इथली भव्य लायब्ररी. सुरवातीला ग्रीक राज्यकर्त्यांनी इथे हे ग्रंथालय बांधून जगातील सर्व ज्ञान एकवटायचा प्रयत्न केला. इथल्या बंदरात येणाऱ्या प्रत्येक बोटीला त्यांच्या देशातील, भाषेतील पुस्तकाची एक प्रत इथे कर म्हणून द्यावी लागे. अशाप्रकारे दर वेळी ग्रंथालयाचा पसारा वाढत जाई. असे मानले जात असे कि जगातील प्रत्येक लिखित गोष्टीची किमान एक प्रत या ग्रंथालयात निश्चित सापडेल. पुस्तक, ग्रंथ यांच्या सोबत पपायरस वर काढलेले असंख्य नकाशे, दस्तावेज, कागदपत्रे सुद्धा येथे होती. ग्रीक, टॉलेमीक विद्वान आणि विद्यार्थी यांचा सतत इथे राबता असू लागला. असंख्य नवीन शोध इथे लावले गेले. टॉलेमीवर रोमनांनी आक्रमण केले असता, रोमन योद्धा ज्युलिअस सीझर याच्याकडून त्याच्या स्वतःच्या बोटींना लावलेली आग शहरभर पसरली आणि त्यात हे महान ग्रंथालय सुद्धा सापडले. असंख्य पुस्तके, हस्तलिखिते यात भस्मसात झाली आणि ग्रंथालयाचा अंत झाला. पुढे १९७४ मध्ये इथे लायब्ररीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मांडला गेला. तत्कालीन राष्ट्रपती हुस्नी मुबारक यांनी स्वतः लक्ष घालत नवीन लायब्ररी २००२ पर्यंत उभारली.
७ मजल्यांवर विविध भाषा आणि विषय यांच्यामध्ये पुस्तके विभागली आहेत. जिकडे पाहावं तिकडे पुस्तके शोधण्यासाठी असंख्य संगणक ठेवले आहेत. प्रवेशद्वाराच्या मजल्यावर जुन्या छपाई पद्धती आणि यंत्र ठेवले आहेत. यामजल्याच्या वर चार आणि खाली दोन मजले आहेत. भरपूर प्रकाश आत यावा अशा पद्धतीचे वेगळेच छत बनवले आहे. सर्व अद्ययावत सोयींनी परिपूर्ण अशी हि लायब्ररी, यातील उच्चशिक्षित कर्मचारीवर्ग यामुळे विद्यार्थ्यांना इथे अभ्यास करायला सोपे जाते. त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुद्धा लायब्ररीच्या आवाराचा वापर होतो. आम्ही तिथे होतो तेव्हा टेक फेस्ट २०१८ सुरु होते. जगभरातून लोक बनवलेल्या विविध टेकी उपकरणांना घेऊन इथे आले होते. त्यात सध्या प्रचलित असलेल्या VR अर्थात व्हर्चुअल रिऍलिटी उपकरणे, ड्रोन आणि रोबोट यांचे स्टॉल गर्दी खेचत होते. लायब्ररी मध्ये तासभर घालवून आम्ही या फेस्ट मध्येही अर्धा तास चक्कर मारली. शेवटी पायांनी कुरकुर करायला सुरु केल्यावर निघालो ते थेट कैरोच्या दिशेने.
लायब्ररीमधील प्रचि. सुरवातीचे फोटो छपाईचे यंत्र आणि त्यानंतर त्याची माहिती अशा क्रमाने
येतांना महंमदने गाडी प्रचंड वेगाने हाकायला सुरवात केली आणि गाडीच्या काचा
पूर्ण उघड्या ठेवल्या. हायवे मोठा असल्याने वेगाचा फार प्रश्न नव्हता पण
गाडीत भसाभसा वारा शिरत होता त्याने त्रास होऊ लागला. त्याला सांगितलं कि
बाबा AC सुरु कर तर त्याचं उत्तर होतं, 'AC broke.' आम्हाला वाटलं असंच
म्हणत असेल कारण जातांना तर सगळं ठीक होतं. त्याला, 'तरीपण सुरु कर
सांगितलं.' काचा बंद केल्या आणि गाडीचं धुरांडं धूर बाहेर टाकायच्या ऐवजी
आतच सोडत होतं. त्याला त्याबद्दल विचारलं तर म्हणे मी आधीच सांगितलं होतं.
शेवटी तो भसाभसा वारा परवडला पण काचा उघड अशी विनवणी केली. शेवटी
संध्याकाळी ७ पर्यंत कैरोमध्ये पोहोचलो. हॉटेलच्या अलीकडेच खान-अल-खलिली या
मार्केटच्या प्रवेशद्वारापाशी सोड असं त्याला सांगितलं. ट्रिपचे पैसे
चुकते करून निघालो तोवर त्याचा प्रश्न आला, "मला टीप?". ठामपणे नकार दिला.
आणि क्षणात तो वाऱ्याच्या वेगाने तेथून निघून गेला.
३० सप्टेंबर २०१८
अलेक्झांड्रिया टूर चा ड्रायव्हर आम्हाला खान-अल-खलिलीच्या प्रवेशद्वाराजवळ सोडून गेला आणि आम्ही ट्रीपमधील 'शॉपिंग' या माझ्या लाडक्या कामाला सुरवात केली. खान-अल-खलिली हा इजिप्ती सूक अर्थात बाजार. स्थानिक आणि पर्यटक दोन्हींनी कायम भरलेला असतो. छोट्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून कपडे, झुंबरं, काचसामान, दागिने आणि सुविनीअर्स यांची असंख्य दुकाने. भाव करता येत असेल आणि घासाघीस करायचा कंटाळा नसेल तर इथे खरेदीला फार मजा येते. संध्याकाळी फेरफटका मारल्यास असंख्य लखलखते, रंगीत दिवे तुम्हाला अरेबियन नाईट्स मध्ये घेऊन जातात. इजिप्ती कॉटन हा पण एक फार प्रचलित प्रकार. पण कापडातील जाणकार असाल तरच त्या वाटेने जायचे, कारण इजिप्ती कॉटनच्या नावाखाली चीन वरून बनवून आणलेले स्वस्त कापड गळ्यात मारले जाईल. जो प्रकार कापडाचा तोच दागिन्यांच्या पेटीचा. अगदी मोत्यांच्या शिंपल्यांच्या आतील भागापासून ते साधे शिंपले वापरून आणि अगदी स्वस्त प्लास्टिक वापरून सुद्धा यातील कलाकुसर केली जाते. त्यामुळे किंमत सुद्धा तशीच बदलते. मसाल्यांचे पदार्थ, अत्तरं, स्त्री पुरुषांचे अरेबिक कपडे, हुक्का आदी आकर्षकरित्या रचून ठेवलेले असतात. तुमची नजर आणि पर्यायाने तुम्हीही त्याकडे ओढले जाणार हे नक्की.



दागिन्यांच्या पेट्या
वरील फोटो जालावरुन साभार
खान-अल-खलिलीच्या या गल्ली बोळात नवखा माणूस नक्कीच हरवेल. योगायोगाने आम्हाला फिरतांना भारतीय एम्बसी मधील एक कर्मचारी इथे भेटला. तो सुद्धा काही दिवसांसाठी मायदेशी यायला निघालेला. त्यामुळे बायकोने दिलेली सामानाची यादी खरेदी करत होता. तुम्ही कुठून, कधी आलात, कधी जाणार वगैरे फार आपुलकीने बोलला. जणू त्याची भारत सफर तिथूनच सुरु झाली असावी. त्याने त्याच्या खरेदीचा नेहमीचा अड्डा सांगितला. जातांना म्हणाला काही जरी लागलं तरी एम्बसी मध्ये यायचं. आपलीच माणसं आहेत तिथे.
तो आमचा निरोप घेऊन निघाला आणि आम्ही त्याने सांगितलेल्या दुकानात जायला
निघालो. दोन गल्ल्या पलीकडे जाऊन माळावर आत ते दुकान होतं पण किंमत खरंच
वाजवी. मित्राने आणायला सांगितलेले पिरॅमिड, मला आवडलेल्या दागिन्यांच्या
पेट्या, काचेचा सुंदर दिवा, कॉफी मग, इत्यादी इत्यादी अशी; 'सामान जास्त
वजनदार होणार नाही' या बोलीवर खरेदी पण केली. जेवढं घ्यावं तेवढं कमीच
वाटतं अशा वेळी.
तो दुकानदार सुद्धा बोलका. त्याच्या व्यवसायासाठी बोलकं असावंच लागत.
आम्हाला म्हणाला, "पूर्वी इतके भारतीय पर्यटक इकडे येत नव्हते. युरोपियन
जास्त असायचे. त्यामुळे मला फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश वगैरे येतात बऱ्यापैकी
बोलता. पर्यटकांना त्यांच्या भाषेत थोडं बोललं कि छान वाटतं म्हणून. आता
भारतीय पर्यटक पण यायला लागलेत. मला थोडं तुमच्या भाषेतील गोष्टी शिकवणार
का?"
मी अगदी आनंदाने हो म्हणाले. तो वही पेन घेऊन आला.
१ ते १० आकडे एका बाजूला लिहिले; त्याच्या खाली हॅलो, वेलकम, ओन्ली, थँक
यू, बाय हे शब्द लिहिले आणि म्हणाला याला हिंदी मध्ये काय म्हणतात ते
इंग्लिश मध्ये लिही.
सगळं लिहून दिल्यावर त्याने आमच्या समोरच उजळणी केली.
आम्ही त्याच्या कडून देवनागरी मध्ये आकडे गिरवून घेतले.
४ आणि ६, २ आणि ५ मध्ये जाम गल्लत होत होती त्याची पण शेवटी जमलंच.
आम्हाला निरोप देतांना शुक्रन ऐवजी शुक्रिया म्हणाला, see you again ऐवजी फिर मिलेंगे म्हणाला.
छान वाटलं.
इजिप्त मधील एक फार वेगळा पण प्रचलित असा खाद्यपदार्थ म्हणजे हमाम माहशी, मसालेभात भरलेलं कबुतर (स्टफ्ड पिजन). आणि सर्वांत छान कबुतर मिळण्याचं ठिकाण खान-अल-खलिलीच्या अगदी जवळ. अशावेळी आम्ही तिथे जाणार नाही असं होणे नाही. मॅप वर दिशा पाहत आम्ही एकदाचे तिथे येऊन पोहोचलो. छोटंसं दुकान, समोर २ टेबलं मांडलेली. त्यावर सगळे स्थानिक लोक बसून जेवणाचा आनंद घेत होते. पार्सल घेणाऱ्यांची गर्दी अर्थातच जास्त होती. आम्ही पण रांगेत उभं राहून पार्सल घेतलं. पुन्हा मॅप लावून चालत हॉटेल वर पोहोचलो. रूम मध्ये एका बाजूला पार्सल ठेवलं आणि नवीन पदार्थ चाखायचा प्रयत्न फसला तर प्लॅन B म्हणून घरून आणलेले आणि फक्त २ शिल्लक राहिलेले बेसन लाडू आणि चिवडा पण काढून ठेवला. पार्सल उघडलं कबुतर आणि भाताचा वास छान येत होता. चव पण छान होती. थोडी चिकनच्या जवळ जाणारी पण तरीही वेगळी. आणि इंजेक्शन घेऊन कोंबड्याना गुबगुबीत केलं जातं ती गोष्ट इथे नव्हती त्यामुळे तेव्हढंच थोडक्यात मांस आणि भात. चिवडा-लाडवाकडे चक्क दुर्लक्ष करून हमाम माहशीवर ताव मारला.
हमाम माहशी
जेवण झाल्यावर सामानाची शेवटची बांधाबांध केली. दुपारी ३ वाजता आमचं परतीचं विमान होतं त्यामुळे ११ वाजता चेक आऊट करून निघणार होतो. उद्या थोडं उशिराच उठू असं ठरवलं.
१ ऑक्टोबर २०१८
इजिप्त प्रवासातील शेवटचा दिवस. 'छुट्टीया खतम, स्कुल शुरु' वाली फीलिंग. आवरून, सामान गोळा करून खाली रिसेप्शनला आलो. हॉटेल मालकाच्या बायको आणि आईने नाश्ता-चहा आणून दिला. त्यानंतर चेक आऊटची प्रक्रिया पूर्ण केली. उबर मागवली आणि ठरल्या प्रमाणे ११ ला विमानतळाकडे निघालो.
जातांना कैरो मधील पाहायच्या राहिलेल्या गोष्टींची यादी बनवत होतो. कॉप्टिक कैरो, इस्लामिक कैरो, अझर उद्यान, मेट्रोचा प्रवास....पण काही तरी राहून गेल्याशिवाय शहर आपल्याला परत बोलावणार कसं? कदाचित पुढल्या एखाद्या सहलीत कैरोला विमान बदलून जाऊ शकत असू तर या गोष्टी पूर्ण करण्यासाठी १ दिवसाचा ट्रांझिट घेऊ. किंवा कदाचित कामानिमित्त चक्कर मारता आली तर पाहू शकू किंवा अगदीच काही नाही तर सहजच एक चक्कर मारून जाऊ असे नानाविध प्लॅन बनवत आम्ही विमानतळावर येऊन पोहोचलो.
वेळे आधी विमानतळावर पोहोचायला मला आवडतं. सगळीकडे मस्त फिरून, २ वेळा
ड्युटी फ्री मध्ये जाऊन पिशव्या भरून घेतल्यावर थोडा पोटोबा केला. कितीही
विमानप्रवास केला तरी विमाने पाहायला आम्हाला फार आवडतं. त्यामुळे रन वे
जवळील काचेच्या खिडकीशेजारी बसून वेगवेगळी विमाने न्याहाळली. विमान फलाटाला
लागल्याची घोषणा होईपर्यंत किंडल वर शेरलॉक होम्सचं अ स्टडी इन स्कार्लेट
निम्मं वाचून झालं होतं. विमान आलं आणि आम्ही आत जाऊन बसलो. तिकीट बुक
करतांना एअरबस A ३८० असलेलं आमचं जम्बो जेट, कमी प्रवासी असल्याने बोईंग
७३७ ला बदलविण्यात आले होते. पटकन खिडकीची जागा मी पकडली. (हो आमच्यात
आजही खिडकीच्या जागेसाठी पळापळी करावी लागते. आणि मी नेहमी त्याला
गप्पांमध्ये गुंतवून खिडकी मिळवते 😉 😜 )
विमान आकाशात झेपावल्यावर थोड्याच वेळात सुवेझ कालव्याचा सुंदर नजारा दिसला
आणि काही मिनिटांतच ढगांमुळे दिसेनासा पण झाला. सुवेझ दर्शनाने इजिप्त
ट्रीप सफळ संपूर्ण झाली.
।। समाप्त ।।
ता. क.
१. ही प्रवासमाला लिहिण्यासाठी मला नॅशनल जिओग्राफी, विकिपीडिया, युनेस्को
वगैरे open information websites ची मदत तर झालीच पण इतिहासाबद्दल जाणून
घ्यायला Amazon Prime वरील The Story of Egypt या डॉक्युमेंटरीचा फायदा
झाला. यातील सूत्रसंचालिकेची सांगण्याची पद्धत मला फार आवडली. त्यामुळे
ज्यांना इतिहासाबद्दल खोलवर जाणून घ्यायचे असेल त्यांनी हि जरूर बघावी.
२. त्याच बरोबर मीना प्रभू यांच्या 'इजिप्तायन' या पुस्तकाचा वाटा या इजिप्त ट्रीप मध्ये सुरवाती पासून होताच. लिखाणातही त्यांची मदत झाली. त्याच बरोबर क्रॉसवर्ड मधील अनेक पुस्तके ज्यांची नावं न पाहता फक्त इजिप्त दिसल्याने बसून वाचली त्यांचाही वाटा यात आहेच.
३. प्रवासवर्णनाच्या सुरवातीला सांगितल्या प्रमाणे संजय उर्फ टर्मिनेटर
याने सुद्धा व्हिसाची माहिती, इजिप्त मधील लोकांचे नंबर वगैरे देऊन तर मदत
केलीच, पण एका धावत्या पुणे भेटी मध्ये त्याचं इजिप्त मधील सिमकार्ड सुद्धा
देऊन गेला.
वरील सर्वांचे मनापासून आभार, माझ्या शाळेपासून असलेल्या या स्वप्न सहलीला साकारतांना मदत केल्याबद्दल.
आणि अखेरीस, या लेखमालेतील शेवटचे भाग फार वेळाने प्रकाशित होत गेले कारण ऐन दिवाळीत झालेली पुत्ररत्न प्राप्ती. तो झोपल्यावर मिळणाऱ्या वेळेत शेवटचे काही भाग लिहिले गेले आणि वाचकांनी ते तग धरून वाचले याबद्दल वाचकांचेही अनेक अनेक आभार.
_/\_
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.