आमच्या १९७७ आणि १९८१ मधील काशी यात्रेनंतर खालील लेख दि. १४ एप्रिल १९८१ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. टाइम्सने या लेखासाठी पानावरची मधली जागा उपलब्ध करून दिली. ही जागा नेहमी छोट्या टिपणांसाठी असते. एका अध्यात्मिक शहराविषयी लिहिलेला हा लेख (अनुवादाच्या रूपाने ) मला तुमच्यासाठी द्यावा असं वाटतं.

इथे आलेला भक्त “हर गंगे” असं ओरडून गंगेच्या आपल्या कंबरेइतक्या पाण्यात उभा राहतो आणि एक डुबकी मारतो. मग सूर्यनारायणाकडे मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने पाहून अर्घ्य देतो म्हणजे पाण्यालाच पाणी वाहतो. हा विधी या अध्यात्मिक शहरातील घाटांवर गेली कित्येक शतकं चालू आहे. या शहराचा आत्मा साक्षात गंगा आहे आणि तो घाटाच्या पाय-यांशी जोडलेला आहे. स्नान व अनेक विधी करण्यासाठी घाटांची मालिका या शहरात आहे.
या शहरात येण्यासाठी स्थानकावर जेव्हा उतरता, तुम्ही या पारंपारिक शहरात आला आहात. मग रिक्षा किंवा टांगा घेऊन शहराच्या कुठल्याही टोकाला जाऊ शकता. मग तुमचं सामान घेऊन उतरा आणि एखादा हमाल घेऊन एखाद्या गल्लीत शिरा. एक सांगतो, या हमालावर भरंवसा ठेवा; त्याच्या मागून गेलात की तो तुम्हाला हव्या त्या मुक्कामावर पोचवेल.
अलिबाबाची गुहा

आता इथून तुम्ही अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करा. अरुंद आणि वळणावळणाच्या गल्लीत चालत जा. अनेक जुन्या भारतीय शहरात अशाच गल्ल्या अस्तित्वात आहेत. या गल्ल्यांचं एक वैशिष्ट्य असे आहे की तीन तीन मजली इमारती जेमतेम पाच फूट रुंदीच्या गल्लीच्या दोन्ही बाजूना आहेत. यामुळे तुम्ही एका बोगद्यातून जात आहात असं तुम्हा वाटेल. इथलं जीवन म्हणजे मध्ययुगीन स्थापत्यविद्याशास्त्राच्या एकेक आकार आहेत.या गलिच्छ व दुर्गंधी येणा-या गल्ल्यांतून चालताना वाटेत तुम्हाला शेकडो मंदिरं, हवेली, प्रशस्त चौक असलेले मोठाले वाडे, बनारसी शाली, लुगडी व तांब्या पितळेची भांडी, मिठाया विकणारी दुकानं आणि प्रसिद्ध पानवाले दिसतील. एकूण काय इथे सारा भारतीय बाजार भरलेला आहे.या गल्ल्यांतून शेकडो भक्त, पंडे, प्रवासी पंडित आणि असंख्य परके लोक चालताना आढळतील. तुम्ही कुठल्याही गल्लीतून जा, हे सारे लोक काही ना काही विकत घेत असतात, खात असतात आणि बनारसी पान खाऊन थुकत असतात. कुठलीही गल्ली पकडा, ती तुम्हाला उतरणीवरून गंगेच्या काठावर नेऊन सोडते. मग तेथून एखादा दयाळू भय्याजी तुम्हाला होडीतून पुलापासून अस्सी घाटापर्यंत नेईल. या शहराला किल्ल्यासारखी इमारत, जी खालच्या पातळीवर ओबडधोबड तर शिखरावर सजवलेली, विविध छत्र्या, मनोरे, घुमट, राजवाड्यासारख्या इमारती, झेंडे आणि शेकडो भक्त याशिवाय जणू जिवंतपणा नाही.ढासळत्या इमारती
कलते आणि खचणा-या इमारती, शेकडो पुतळे, ध्यानधारणेसाठी मानवनिर्मित गुंफा, होड्या आणि सतत बदलती अशी क्षितिजरेषा. घाटावरील चिता आणि मृत देहांचे नदीत केले जाणारे विसर्जन यांनी जीवनचक्र पूर्ण होते आणि सर्वत्र पसरलेल्या मायेची जाणीव करून दिली जाते.
हे शहर तुम्हाला एक विचित्र भावना देते आणि तुम्हाला विसावे शतक विसरायला लावते. तुम्ही कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या विचारधारेला बांधील असा, त्या क्षणापासून तुम्हाला वेगळे काही असे वाटते.
काहीही म्हणा बनारस म्हणजे काही स्पष्ट करून सांगण्यासारखी चीज नाही. ते शब्दांच्या, रंगछटांच्या आणि चित्रपटाच्या पलीकडची अशी जाणीव आहे.
Short Stories 16th January 2020- Note # 77



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.