पॅरीसला निवासस्थानी सर्व सामान टाकल्यावर लगेचच पर्यटन धर्म निभावण्यास
बाहेर पडलो. सर्वात पहिली गरज होती वाफाळणारा चहा. पण तिथे आपला भारतिय
चहा, जो मस्तपैकी मसाला वगैरे घालून खळखळून उकळलेला असतो तो मिळणे
दूरापास्त होते त्यामुळे कॉफी नामक पेयावर समाधान मानले. कॉफी आणि क्रोसाँ
नामक पावाची किंमत अदा करून बाहेर आलो आणि आयफेल टॉवरच्या रस्त्याला लागलो.
सौ. साडेसात युरो म्हणजे किती रुपये ह्या हिशोबात बोटे मोडत होती. तिला
म्हंटले, पर्यटनाची मजा लुटायची असेल तर हिशोब करणं विसरून जा. ह्या थंडीत
कुडकुडताना गरमागरम कॉफी मिळाली त्याचा आनंद घ्यायचा, ती किती कडू की गोड
होती ह्याचा नाही. पण हे समजवताना (बहुतेक्) मी हातातल्या गुगल
मार्गदर्शकावरील एक रस्ता चुकलो आणि आम्ही पॅरीसात अर्धा तास भरकटलो. शेवटी
एका वाहतूक पोलीसाला आयफेल टॉवरचा पत्ता विचारल्यावर त्याने त्याच्या
मोटरसायकलला जोडलेल्या संगणकातून तपासून मला अगदी आत्मियतेने फ्रेंच भाषेत
पत्ता समजविण्याचा प्रयत्न केला. मी त्याला धन्यवाद देऊन वळलो आणि बायकोला
म्हणालो, 'एक अक्षर कळले नाही.' पोलीस पत्ता समजावून देत असताना, माझा,
त्याचे बोलणे शब्द अन शब्द समजत असल्याचा 'अभिनय' पाहून सौ. मला 'फ्रेंचही
समजते' ह्या गैरसमजाने अगदी कौतुकाने माझ्याकडे पाहात होती, तिचा भ्रमनिरास
झाला. त्याच्या हातवार्याच्या भाषेत समजलेल्या दिशेने १५ मिनिटे
चालल्यावर पुन्हा एका सभ्य दिसणार्या माणसाला पत्ता विचारला. त्याला
इंग्रजी आणि फ्रेच दोन्ही भाषा जेमतेमच येत होत्या. पण पत्ता माहित होता
आणि तो समजविण्याची दुर्दम्य इच्छा त्याचे ठायी होती. पण जेंव्हा ते जमेना
तेंव्हा त्याने मला विचारले 'तुला अरेबिक समजते का?' तो बहुतेक जॉर्डेनियन
होता. अगदी माहेरचा माणूस भेटावा अशी माझी अवस्था झाली. मी 'होSS समजते
की!' असे म्हंटल्यावर त्याने अरेबिक मध्ये पत्ता सांगितला. तो अगदी साधा
सोपा होता. 'इथून सरळ जा. नदी लागेल. त्याच्या कडेने रस्ता आहे त्या
रस्त्याने सरळ सरळ जात राहा अगदी आयफेल टॉवरच्या पायथ्याशीच पोहोचशील.'
पत्ता समजला होता. मी त्याला अरेबिकमध्येच 'शुक्रन' (धन्यवाद) म्हणून वळलो
आणि आयफेल टॉवरच्या दिशेने चालू लागलो..... बायकोच्या डोळ्यांत कौतुक
पुन्हा परतले होते.
नदीरस्त्यावर वळल्यापासून आयफेल टॉवर दिसत होता. पण दिसत होता... दिसत
होता... दिसत होता... जवळ कांही येत नव्हता. आम्हालाही तशी घाई नव्हतीच.
आजूबाजूचे पॅरीस न्याहाळत चाललो होतो. कचेरीतून घरी लगबगीने परतणारे
स्त्री-पुरुष, झगमगणार्या शोरुम्स, बिअर आणि वाईनची रेलचेल उडविणारी
उपहारगृह, कुत्र्यांना फिरायला नेणारे 'डॉग वॉकर्स' रस्त्याला बर्यापैकी
गर्दी होती. एवढ्या थंडीत फिरणार्या ललना पोटर्यांपर्यंत चामड्याचे, उंच
टाचेचे बुट घालून, तोकडे उबदार कोट आणि जाळीदार स्लॅक्स सदृष वसने लेऊन
चटचटीतपणे घराकडे निघाल्या होत्या. त्यांच्या जाळीदार स्लॅक्स कडे एक
कटाक्ष टाकून पत्नीने प्रश्न केला, 'ह्या टवळ्यांना थंडी कशी नाही वाजत?'
मी म्हंटलं,' त्यांना पुरुषांच्या नजरांची उब मिळत असते.' 'तुम्ही सरळ समोर
बघत चाला.' असा आदेश मिळाल्यावर माझाही नाईलाज झाला.
(छायाचित्र आंतरजालावरून साभार.) मी काढलेले छायाचित्र चुकून खोडले गेले (डीलीट झाले).
आयफेल टॉवर.. आयफेल टॉवर म्हणतात तो हाच. सौ. हरखून गेली होती. 'कस्सला स्सही आहे, नाही?'
रॉट आयर्नच्या ३२४ मिटर उंचीच्या मनोर्यासमोर आम्ही उभे होतो. फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजिलेल्या जागतिक प्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून हा मनोरा उभारण्यात आला होता. प्रवेशद्वाराचा आराखडा कसा असावा ह्या बद्दल अनेकांकडून विविध आराखडे सरकार दरबारी सादर केले गेले त्यातील गुस्ताव आयफेल ह्या अभियंत्याच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. पॅरीस मधल्या मान्यवर चित्रकार, शिल्पकारांनी आणि समाजधुरीणांनी ह्या आराखड्यास आक्षेप घेतला होता. पॅरीस हे सुंदरतेने नटलेले शहर आहे. तिथल्या, आर्च ऑफ ट्रँफ, नॉन्स्त्र दॅम चर्च, आणि अनेकविध ऐतिहासिक आणि सौंदर्यसंपन्न वास्तुंपुढे हा 'लोखंडाचा ढिग' शहराला विद्रुप करतो आहे असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, 'नुसत्या कागदावरील आराखडा पाहून टॉवरच्या सौंदर्यावर ताशेरे ओढणे गैर आहे. आणि इजिप्तच्या पिरॅमिड्सचे कौतुक फ्रान्स मध्ये होऊ शकते तर टॉवरला आक्षेप का?' ह्या गुस्तावच्या प्रतिवादाने सरकार समाधान पावले. परंतु, एकूण खर्चाच्या फक्त १/६ खर्च सरकारने केला बाकी गुस्ताव आयफेलने केला आणि टॉवर उभा ठाकला. प्रदर्शन समाप्तीला तो उतरवायचा होता परंतू पुन्हा आयफेलने सरकारला त्याची उपयुक्तता पटवून दिली. पुढे तो फ्रान्सच्या रेडिओ लहरी प्रक्षेपण करण्यात अग्रेसर ठरला. दुसर्या महायुद्धात जर्मनांची चढाई रोखण्यातही टॉवर वरील बिनतारी यंत्रणेने महत्त्वाची कामगिरी बजावली. आजही टॉवरवरुन फ्रान्सच्या आकाशवाणीच्या प्रक्षेपणाला मोलाची मदत होते. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर उपहारगृह आहे तर दुसर्या मजल्यावर गुस्ताव्ह आयफेलचे ऑफीस आणि महत्त्वाच्या पाहुण्यांचे स्वागतकक्ष आहे. इथे ह्या उपहारगृहात आयफेल टॉवरला कडाडून विरोध करणार्यांचा म्होरक्या रोज येऊन बसायचा. त्याला एकदा एका पत्रकाराने विचारले, 'तुमचा ह्या वास्तूला एव्हढा विरोध होता तर आता तुम्ही रोज इथे का येऊन बसता?' त्यावर तो म्हणाला, 'हा टॉवर मला आजही आवडत नाही. मला तो माझ्या नजरेसमोर नको असतो. पण संपूर्ण पॅरीस मधून तो दिसतो. मी त्याचे दर्शन टाळू शकत नाही. फक्त इथे येऊन बसल्यावर त्याचे दर्शन होत नाही. पण सुंदर पॅरीस शहर मला दिसते, मनाच्या वेदना कमी होतात.'
आयफेल टॉवर वरून पॅरीसचे विहंगम दृष्य...
दुसर्या महायुद्धात हिटलरचे सैन्य आता फ्रान्स काबिज करणार असा अंदाज आल्यावर फ्रेंच सरकारने हिटलरला आयफेल टॉवरच्या वर सहजी जाता येऊ नये म्हणून आयफेल टॉवरच्या उदवाहकाचे (लिफ्टचे) पोलादी दोर कापून टाकले. महायुद्धातील पोलादाची टंचाई पाहता हिटलरला तातडीने पोलादी दोर उपलब्ध झाले नाहीत आणि त्याचा नाईलाज झाला. (परंतू, आयफेल टॉवरला वरपर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत त्या हिटलरने का वापरल्या नाहीत? असा मला प्रश्न पडतो.) फ्रान्स सोडून जाता जाता हिटलरने आपल्या जनरलला आयफेल टॉवर पाडून टाकण्याची आज्ञा दिली. पण त्या जनरलला सुबुद्धी सुचली म्हणा किंवा कसे पण हिटलरचा तो आदेश पाळला गेला नाही, आणि आयफेल टॉवर शाबूत राहिला.
टॉवरला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे (त्यात मिपाचा सदस्य म्हणून मीही आहेच). १८८९ साली जेंव्हा हा टॉवर बांधला तेंव्हा गुस्ताव्ह आयफेलच्या भेटीला थॉमस अल्वा एडीसन हा अमेरीकन शास्त्रज्ञ आला होता. त्यावेळी त्याने गुस्ताव्ह आयफेलला त्याचे नविन संशोधन असलेले फोनोग्राम हे उपकरण भेट दिले. हे थॉमस एडिसन ह्यांचे संशोधन त्या प्रदर्शानात ठेवलेले होते. ह्या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या भेटीचे दृष्य सर्वात वरच्या मजल्यावरच्या 'महत्त्वाच्या पाहुण्यांच्या स्वागतकक्षात' पुतळ्यांच्या स्वरुपात जतन केलेले आहे.
थॉमस अल्वा एडिसन आणि गुस्ताव्ह आयफेल.
गुस्ताव आयफेल ह्याने ह्या टॉवर नंतर अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेची उभारणीही केली आहे.
आयफेल टॉवरचे सौंदर्य दिवसा जसे भव्य-दिव्य आहे तसे ते रात्रीच्या अंधारात दिव्यांनी उजळल्यावर काळया मखमलीवर चमचमणार्या एखाद्या हिर्याप्रमाणे लखलखीत आहे आणि आपल्या तोंडून एकच उदगार येतो......'व्वा!'.
टॉवरच्या प्रांगणात ठग लोकांचा वावर आहे. पुरुषांच्या बरोबरीने सुंदर सुंदर तरूण मुली तुम्हाला ठगवायला टपलेल्या असतात. त्यांचे सावज म्हणजे आशियायी आणि त्यातल्या त्यात भारतिय पर्यटक. 'एका तान्या बाळाला कर्करोग आहे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भात फक्त एक सही करा' असे भावनिक आवाहन केले जाते. सही केली की २० युरोची मागणी होते. आपण चरफडत देतो आणि आपण ठगवले गेलो आहे हे जाणवतं. काय करणार कर्करोगाचे कारण पुढे केले की मी 'अजूनही' फसतो. ह्या मुली तुम्ही कांही खात असाल तर त्याचीही मागणी करतात. कांही जणी तर हातातील खाद्य पदार्थ हिसकावण्याचा प्रयत्नही करतात. पुरूष पाकिटमार आपली सावजं हेरत असतात. त्यांच्यापासून साभाळावे. पण ह्या सर्वातून आयफेल टॉवर अलिप्त आहे. त्याचे सौंदर्य, भव्यता, त्यामागील कल्पकता आपल्याला नि:शब्द करते. भारावल्या मनाने आम्ही आमच्या निवासाकडे परतलो.
दुसर्या दिवशी मोर्चा होता... लुव्ह्र संग्रहालय.
लुव्ह्र संग्रहालय हे एक जगप्रसिद्ध संग्रहालय आहे. त्याचा पसारा पाहता २-४ दिवसांत 'उरकायचा' हा विषय नाही हे सहज लक्षात येतं. त्यातून तुम्ही चित्रकला आणि शिल्पकलेतील दर्दी जाणकार असाल तर संपलंच. कमीत कमी महिना तरी लागेल सर्व दालनं पाहून आणि जाणून घ्यायला. सुदैवाने आम्ही 'जाणकार' नाही. रसिक जरूर आहोत. दिवसभर तंगडतोड करून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे कांही अप्रतिम नमुने पाहायला मिळाले. त्यातील ह्या कांही निवडक कलाकृती:



ह्या वरील सर्व तैलचित्रांमधील खेडेगावातील किंचित मागे रेंगाळलेली संध्याकाळ, उन - सावलीचा खेळ आणि एकूणातीलच जिवंतपणा आपली नजर खिळवून ठेवतो. कितीतरी सूक्ष्म तपशील चित्रकाराने मोठ्या कौशल्याने चितारले आहेत.

तेच, ह्या चित्रातील खवळलेल्या समुद्राचे रौद्र रुप भयावह वाटते.

ह्या आपल्या 'मोनालीसा' काकू. का एवढ्या सर्वांना आवडतात कांही कळत नाही. यमीच्या चारपट गोर्याही नाहीएत.
तैलचित्रांमध्ये अजून बरेच कांही पाहण्या-सांगण्याजोगे आहे पण विस्तारभयास्तव जास्त लिहीत बसत नाही. येशूची, मेरीची आणि फ्रेंच राजघराण्यातील कर्तबगार योध्यांची अनेक चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. इंग्रजांची चित्र शैली, अरबस्थानातील तैलचित्रे वगैरे देशविदेशाचा मोठ्ठा खजिना आपल्या समोर मांडलेला असतो. काय पाहू, किती पाहू असं होऊन जातं.

ह्या शिल्पातील रेखीवता, सौष्ठव वाखाणण्याजोगे आहे. तर,

ह्या मोहक शिल्पाची निरागसता मला फार भावली.
सर्वात कठीण वाटले ते हे शिल्प..

शिकार, शिकारी आणि त्याचा कुत्रा, तिघांच्याही चेहर्यावरील वेगवेगळे
भाव अगदी ठसठशीत आले आहेत. काळविटाला मृत्यू समोर दिसतो आहे, कुत्र्याच्या
चेहर्यावर क्रौर्य आहे तर शिकार्याच्या चेहर्यावर विजयाचे भाव आहेत.
शिकार्याच्या हाताचे स्नायु, उभे राहण्याची पद्धत आणि उगारलेल्या
सुर्यातील आवेश पाहता शिकार हातून सुटणं आता केवळ अशक्य आहे. कुत्रा
सावजावर नजर खिळवून आहे. काळविटाचा कान आपल्या तिक्ष्ण दातांमध्ये करकचून
पकडला आहे तरीपण स्वतः मात्र काळविटाच्या मार्यापासून स्वतःला
वाचविण्यासाठी शिकार्याच्या दोन पायांत सुरक्षित उभा आहे. अप्रतिम.
बाकी राजे रजवाड्यांची, सरदारांची, प्रेमिकांची अनेक शिल्पे आहेत. संग्रहालय अतिशय सुंदर पद्धतीने राखलेले आहे. थकलेल्या पर्यटकांसाठी बसण्याची सोय ठिकठिकाणी आहे. प्रसाधनगृह आहेत. उपहारगृह आहे. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवशी चिक्कार म्हणजे चिक्कार गर्दी होती. संध्याकाळच्या वेळी दादर स्टेशनवर धक्के चुकवत चालावं तसं चालावं लागत होतं. बसण्याच्या सर्व जागा व्यापलेल्या होत्या. उपहारगृहाच्या खुर्च्याही रिकाम्या नव्हत्या. मन भरत नव्हतं पण शरीर थकलं. संग्रहालयाच्या मुख्य कक्षात मोठे उपहारगृह आहे. तिथे बसण्यास जागा मिळाली. पण हा परिसर अत्यंत धोक्याचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणी त्रास वगैरे देत नाही पण इथे पर्यटक निवांत बसतो, क्षणभर बेसावध असतो. इथे बायकांची पर्स, सामानाची पिशवी उचलून पळण्याच्या घटना घडल्या आहेत. माझ्या एका मित्राचा, इथेच कॉफी पित निवांत बसले असता, सामानाची पिशवी चोरट्यांनी पळविली. त्यात रोकड रकमेबरोबरच दोघांचेही (नवरा-बायकोचे) पासपोर्ट चोरीला गेले. कफल्लक अवस्थेत राहयची वेळ आली. सुदैवाने त्याच्या साहेबांनी (अरब स्पॉन्सर) त्याची पॅरीस मध्येच राहायची व्यवस्था केली, पैशांची सोय केली आणि भारतिय दूतावासाने त्यांना भारतात पाठवायची सोय केली. भयंकर मनःस्ताप झाला. इथे आपले पाकिट, पर्स, प्रवासाच्या हलक्या बॅगा वगैरेची काळजी घ्यायची.
संग्रहालयानंतर शिन नदीतील नौकेची सफर केली. ही निव्वळ विश्रांतीची सफर होती. नौका चालत राहते आपण खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत किनार्यावरील इमारतींचे सौंदर्य, रोषणाई न्याहाळत बसायचं. पावणेदोन तासांच्या विश्रांती नंतर पुन्हा किनार्याला पाय लागले. आमच्या निवासस्थानाजवळच एक गुजराथी उपहारगृह आम्हाला सापडलं होतं तिथे जाऊन उकळलेल्या मसाला चहाचा आस्वाद घेतला. आणि रात्री तिथेच जेवण घेतले.


. 


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.