Monday, November 16, 2020

फिनलँड

 अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा. फिनलँडचे व्हिसा ऑफिस दिल्लीला होते. सगळ्या कागदपत्रांची पुर्तता करून आम्ही व्हिसा साठी दिल्लीला गेलो. सर्व तपासणी करून आम्हाला आत सोडण्यात आले. पुढच्या काही मिनिटांतच आमचा नंबर आला तशी माझी धड धड वाढू लागली. आम्ही समोरच्या खुर्चीत जाऊन बसलो. काही वेळातच एक माणुस काचेच्या पलीकडून आमच्या समोर येऊन बसला. एक माईक त्याच्या कडे आणि एक माईक आमच्या कडे, दोघांच्या मधे जाड काच, त्या काचेखाली बारीक फट, त्या खाली एक सरकता ट्रे. जेमतेम एखदा जाड कागदांचा गठ्ठा त्या फटीतून जाऊ शकेल ईतकीच तीच्यात जागा. मी कागदपत्र काढुन तो माणूस काय बोलणार हे कान देऊन ऐकायला तयार झाले आणि काय आश्चर्य..... समोरचा माणुस चक्क माझ्याशी हिंदीत बोलला. त्या क्षणी मला काय तो आनंद झाला.... त्याचे मी वर्णनच करू शकत नाही. मग माझी धड धड लगेच कमी झाली आणि तिथले सगळे सोपस्कार संपवून आम्ही परत आलो. आता व्हिसा मिळेपर्यत वाट बघावी लागणार होती.
व्हिसा येईपर्यन्त मी जाण्याआधिची सगळी काम संपवण्याच्या मागे लागले. जवळ जवळ एक महिन्यानी व्हिसा मिळाला. आमची जाण्याची तारीख ठरली. फ्लाईट सर्च झाले. यात पुणे- दिल्ली, दिल्ली- हेलसिंकी असे फ्लाईट होते. ज्यात दिल्ली विमानतळावर जवळ जवळ बारा तास पुढच्या विमानाच्या प्रतिक्षेत काढावे लागणार होते. तर आणखी एक म्हणजे मधे मधे एक दोन तासांचे दोन थांबे असलेले अजुन एक फ्लाईट होते. आता प्रश्न होता तो मधे मधे थांबे असलेल फ्लाईट घ्याव कि डायरेक्ट फ्लाईट घ्याव याचा. थांबे असलेल्या विमानात जास्त सामान नेण्याची सोय होती. तर डायरेक्ट फ्लाईट मधे कमी वजनाचे सामान न्यावे लागणार होते. पण माझी ईग्रजीशी असलेली गट्टी बघता बायको हरवली विमानतळावर असे व्हायला नको म्हणुन नवर्‍याने डायरेक्ट फ्लाईटच घेतले. दोनचार वेळा सामानाच्या बॅगा काढून भरून झाल्या तरी विमानाच्या ठरवून दिलेल्या वजनात त्या काही बसेनात. शेवटी आवश्यक असलेल सामान कुरिअरने पाठवून दिले.
आम्हाला निरोप द्यायला नातेवाईक मंडळी आली होती. मला तर जणू पुन्हा माझी पाठवणी करताहेत की काय असेच वाटत होते. कारण सगळ्यांचे डोळे पाणावले होते.
( असे नातेवाईक मिळायला भाग्यच लागत. उगा नजर लवू नये ;) ) पुणे ते दिल्ली प्रवास पार पडला. दुसर्‍या विमानाला बराच वेळ असल्याने आम्हाला सगळ सामान परत घेऊन चेक ईन कराव लागणार होत. तस सामान घेऊन आम्ही पुढच्या विमानाच्या जागी जाऊन बसुयात अस ठरवल. तिथ गेल असता कळाल की बसायला अजीबातच जागा नाहीये. लोक परत बाहेर येऊन बसत होते. मी मात्र एकदा बघुन तर याव म्हणुन आत गेले, तर अगदी एस टी स्टॅडवर आल्यासारखच वाटल मला. सगळीकडे लोकांचा चिवचिवाट. जिथे जागा मिळेल तिथे सामान टाकून लोक पसरले होते. मी आमच्या विमानाची चौकशी केली. चेक ईन चालू व्हायला बराच अवकाश होता. मी बसायला जागा शोधू लागले. दोनच खुर्च्या रिकाम्या असलेलया माझ्या नजरेस पडल्या. तस मुलाला पळत जाऊन त्या पकडायला सांगितल्या. मी सगळ सामान घेउन त्याच्या मागे गेले. आता या ठिकाणी आम्हाला दहा ते बारा तास काढायचे होते. वेळ रात्रीची होती. नीट झोपताही येत न्हवते. शेवटी मुलाला हाताची उशी करून दिली आणि मी विमानतळावरील गंमत न्याहाळू लागले.( आता जर मला कोणी 'विमानतळावर दोन तास' या विषयावर निबंध लिहायला सांगीतला असता तर नक्कीच पैकीच्या पैकी मार्क मिळवले असते.) सकाळ होत आली तशी आमची चेक ईन ची वेळ जवळ आली तस मुलाला उठवून मी फ्रेश होऊन आले. आमच काऊंटर अजुन कूठेच सुरू झालेल दिसेना, म्हणुन चौकशी केली असता कळाले की विमान सहा तास उशीराने सुटणार आहे. म्हणजे पुन्हा ईथे सहा तास काढावे लागणार होते.
दुसरा काही पर्याय नसल्याने आम्ही पुन्हा खुर्चीत जाऊन बसलो. आता निदान बसायला बरीच जागा झाली होती. आम्ही जागा बदलून बसलो. हा ही वेळ सरला चेक ईन सुरू झाल बॅगा गेल्या. तस हायस वाटल. मधून मधून नवर्‍याला बातम्या पोहोचवण चालू होत. विमानाची वेळ झाली आम्ही गेट पाशी जाऊन थांबलो. काहीवेळातच विमानात जाऊन बसलो. मला झोप येत असल्याने मी झोपायचे ठरवले. काही वेळाच्या झोपेने जरा तरतरी आली. खिडकीतून सहज खाली बघितले असता अनेक लहान लहान पाण्यानी वेढलेली बेट दिसायला लागली. या बेटांच्या बाजूला कही ईमारती. काही वेळातच आम्ही हेलसिंकी विमानतळावर उतरलो. बाहेर नवरा स्वागतासाठी उभाच होता. मला एखादा किल्ला सर केला अस झाल होत. नवर्‍याला बघताच मी सुटकेचा श्वास सोडला.
ईथे आहे तोपर्यन्त आजूबाजूच जमेल तस बघायच ठरवल आहे. पुढ्च्या भागांमधे भेटी दिलेल्या ठिकाणांची माहीती मला जशी माहीती मिळाली आहे तशी देण्याच्या प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिले आम्ही बघितला तो सुओमेनलिना (suomenlinna) समुद्री किल्ला. याची माहिती पुढील भागात.

 नुसत नावावरून हे नेमक कुठ आहे? असाच भाव मी बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर बघितला. मी सुद्धा त्यातलीच एक. मग आंतरजालावर याची माहिती मिळवली. घराजवळची नेमकी खुण काय असे आपण विचारतो, त्या भाषेत सांगायचे झाले तर स्विडन आणी नॉर्वेच्या जवळ फिनलँड हा देश आहे. युरोपमधिल आठव्याक्रमांकावर हा देश आहे.या देशाची लोकसंख्या ५.५ दशलक्षच्या जवळपास आहे. हेलसिंकी याची राजधानी आहे.
Flag
युरोप मधे येणारा हा देश बाल्टीक समुद्राने वेढलेला आहे. पांढरा आणि निळा रंगांचा वापर असलेला ह्या देशाचा झेंडा आहे. येथील हवामान बहुतांशी थंडच असते. अगदी समर म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा तापमान कधी कधी १३अं पर्यन्त खाली जाते. उन्हाळ्यामधे सुर्यप्रकाश हा रात्रीचे बारावाजेपर्यन्त दिसतो. बाहेर लख्ख उजेड असतो. जणू घरात बिना लाईट लावता राहिले तरी काही हरकत नाही. जेमतेम पाच सहा तास अंधार असतो. तर हिवाळ्यात संध्याकाळी चार वाजताच अंधार पडायला सुरुवात होते. दिवसा घरात उजेडासाठी लाईट लावावी लागते. कधीही पाऊस पडू शकतो. जुन जुलै अशी ईकडे शाळेची सुट्टी असते. बरेच लोक उन्हाळ्यात लांबच्या सुट्टीवर जातात. तसेच या वातावरणात फिरण्यासाठी भटकंतीला जातात. या मोसमाचा पुरेपुर आनंद घेण्याचा प्रयत्न ईथले लोक करतात. कारण याच महिन्यांनमधे सुर्यकिरणे त्यांना मिळतात. कारण एकदा का हिवाळा सुरु झाला की सुर्यप्रकाश फक्त नावापुरताच राहतो. बाहेर -२०,-२५अं असे तापमान असते आणि सगळी कडे बर्फ असतो. मग अशावेळी हे लोक सौना घेतात. सौना हा जणु ह्यांच्या संस्कृतीचा एक भाग असल्या सारख आहे. कॉमन सौना खुप ठिकाणी आढळून येतो, तसेच बर्‍याच जणांच्या घरात या साठी वेगळी जागाच ठेवलेली असते. ( सौना म्हणजे एका बंदीस्त खोलीत गरम वाफ अंगावर घेणे आणि त्यातून अंगावर घाम तयार करणे. ही वाफ तयार होण्यासाठी एका डब्यात मोठाली दगड अतिउच्च तापमानावर तापवली जातात आणि मग त्यावर थोडा थोडा वेळाने पाणि टाकत रहायचे. त्या तापलेल्या दगडांवर पाणि पडताच जी वाफ तयार होते ती त्या बंद खोलीत साठून राहते. आपल्या शरीराला सोसेल ईतपत ही वाफ घेऊन आपण बाहेर पडावे. ऊगा समोरचा आपल्यापेक्षा जास्त बसला आहे म्हणून आपणही बसु नये. त्याने शरीरास अपाय होऊ शकतो. )
Sauna
आम्ही अगदी योग्य वेळेत आल्याने सध्या भ्रमंती करता येत आहे. मुख्य करून ईकडे फिनीश आणि स्विडीश भाषा बोलली जाते. ईकडची शिक्षण पद्धती खुप चांगली आहे. त्यामुळे बाहेरुन विद्यार्थी शिक्षणासाठी ईकडे येण्याचे प्रमाण बरेच आहे.
ईकडे फिरण्यासाठी बस, मेट्रो, ट्राम, जहाच यांचा वापर करता येतो.
Tram
यात मला गंमत वाटली ती ही कि एकदा का तुम्ही तिकिट घेतल की ते बस पासुन जहजापर्यन्त सगळ्यांना चालत. तुम्ही कुठेही बसु शकता आणि कुठेही उतरू शकता. तिकिट घेतल्यापासून पुढे दिड तासापर्यन्त ते चालते. त्या वेळात तुम्ही कुठलही वाहन कितीही वेळा वापरू शकता. फक्त पुण्याप्रमणे ईकडेही वेग वेगळे रिजन म्हणजे नगरपलिका आणि त्यांच्या हद्दी आहेत. तुम्हाला ज्या रिजन मधे जायचे आहे त्या रिजनचे तिकिट काढायचे. एका रिजनचे तिकिट दुसर्‍या रिजनला चालत नाही.

पुढचा भाग लवकरच... ( सुओमेनलिना किल्ला )

Suomenlinna fort.jpg
फोटो जालावरून साभार
फेरीबोट मधून जाताना दिसणारे हेलसिंकी बंदराचे दृष्य.
CIMG1538.JPG
बंदरावर बांधलेल्या तलावात पोहण्याचा आणि सौना बाथ घेण्याचा आनंद घेताना तेथिल लोक.
CIMG1543.JPG
सौना बाथ हा येथील रोजच्या जीवनातील आवश्यक भाग असून जणू हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. सौना म्हणजे एका बंदिस्त खोलीत एका छोट्या टब मधे ठेवलेली काही विशिष्ट दगड अतिउच्च तापमानाला तापवली जातात. मग त्या तापलेल्या दगडांवर हळू हळू पाणि ओतत रहायचे, या पाण्याची होणारी वाफ त्या बंदिस्त खोलीत साठत जाते. ती वाफ शरीरावर घेऊन कृत्रिमरित्या घाम तयार होतो.
फोटो जालावरून साभर
Sauna.jpg
बोटीतून जाताना दिसणारी लहान लहान बेट आणि त्या वरील घर.....
CIMG1530.JPG
सुओमेनलिना समुद्री किल्ला एक ऐतिहासिक किल्ला असून १९९१ मधे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादित ह्याचे नाव समाविष्ट केले गेले आहे. २०१८ मधे हा किल्ला
त्याच्या स्वातंत्र्याची शंभर वर्ष पुर्ण करत आहे. हा किल्ला १७४८ मधे हेलसिंकीच्या किनारपट्टी जवळील बेटांवर स्थापित केला गेला. त्या वेळी फिनलँड हा स्वीडनचाच एक भाग होता. स्वीडन रशिया युद्धामधे हा किल्ला रशियाला मिळाला. त्या नंतर बरीच वर्ष तो रशियाच्या ताब्यात तो होता. त्या नंतर १८५५ मधे फ्रेंच बरोबर झालेल्या युद्धात ह्या किल्ल्यावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमधे याचे बरेच नुकसान झाले. त्या नंतर ह्या किल्ल्याची डागडूजी करून हा किल्ला पुन्हा उभा केला गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी देखिल या किल्ल्याने नवदल आणि हवाई दल यांना हल्यात बरीच मदत केली.
हा किल्ला हेलसिंकी मधे असून पर्यटन स्थळ म्हणुन आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. लोक ईथे दिवसभराची सहल काढून येतात. या किल्ल्यवर फक्त बोटीद्वारेच जाता येते. हा किल्ला वर्षभर बघण्यासाठी खुला असतो. उन्हाळ्यात संपुर्ण किल्ला बघता येतो तर हिवाळ्यात किल्ल्याचा काही भाग बंद ठेवला जातो. हा किल्ला सात बेटांत विस्तारित आहे. याची उभारणी ही युद्धासाठी करण्यात आली होती. हेलसिंकी बंदरावरून काही वेळाच्या अंतराने फेरी बोट या किल्ल्यावर जाण्यास सुटतात. पंधरा ते वीस मिनिटांत तुम्ही किल्ल्याच्या बंदरावर उतरता. उतरल्यावर समोरच तुम्हाला माहितीपुस्तिका आढळून येतात. फिनिश, स्वीडिश, ईग्रजी अशा भाषांमधे या उपलब्ध आहेत. लहान मुलांकरता वेगळी माहितीपुस्तिका आहे. तीही अशाच तीन भाषांमधे आहे. या पुस्तिकेत किल्ल्याची सर्व माहिती नकाश्यासकट दिलेली आहे. तसेच किल्ला कसा फिरावा या साठी एक निळामार्ग या पुस्तिकेत आखुन दिलेला आहे. (त्याच मार्गाने जायला पाहिजे असे काही नाही. पण दर्शवलेल्या मार्गाने गेल्यास काही बघायचे राहून जाणार नाही. ) तुम्ही गाईडही घेऊ शकता. उन्हाळ्यात बारा ते चौदा भाषांमधे बोलणारे गाईड मिळतात तर हिवाळ्यात केवळ फिनिश,स्वीडिश आणी ईग्रजी बोलणारे गाईड मिळतात. किल्ल्याचा विस्तार बराच असल्याने किल्ला फिरण्यास जवळ जवळ तीन ते चार तास हवेत किंवा तुम्ही आख्खा दिवसही ईथे घालवू शकता.
किल्ल्यावर ८०० घरांची वस्ती असून, एक शाळा आणि दवाखाना आहे आणि एक चर्च आहे. प्रवाश्यांसाठी खाण्यासाठी बरीच हॉटेल्स आहेत. ( जे लोक पुर्ण शाकाहारी किंवा केवळ अंडी खाणारी किंवा केवळ चिकन टेस्ट केलेली असतील त्यांनी आपले खाणे आपल्या बरोबर घेउन जाणे सोयीस्कर ठरते, नाहीतर उपाशी रहावे लागते.) किल्ल्यावर बघण्यासाठी सहा संग्रहालय आहेत. पण त्यांच्या उघडण्याच्या वेळा बघुन तिथे जाता येत. काही संग्रहालयांना तिकिट आहे. किल्ल्याच्या आत अनेक छोटी छोटी तळी आहेत.
Pond & Duck.JPG
किल्ल्यामधिल गोदाम आणि भुयार. भुयार बंद करून ठेवलेले असल्याने ते पहाता येत नाही.
Bhuyar.JPG
लक्षवेधी फुले
Phul.jpg
किल्ल्यावर घेउन जाणारी एक वाट.....

Ek Vat.JPG

असाच एक
Pond.JPG
किल्ल्यावरील तोफ
Canon.JPG
हे पिवळ्याफुलांनी नटलेले पठार.... हिवाळ्यात मात्र ही फुल बर्फाची पांढरीशुभ्र चादर ओढून कुंभकर्णासारखी झोपून जातात ती पुढचा उन्हाळा येईपर्यन्त.
Flowers.JPG
किल्ल्यावरुन दिसणारे एका बाजुचे दृष्य....
Killa view.JPG
येथिल बर्‍याच जणांकडे स्वताच्या बोटी, शिडाची जहाज आहेत. किल्ल्याच्या बाजुला फिरताना एक जहाज....
Sidace Jahaj.JPG
किल्ल्यावर असलेल्या वस्तितील काही घरे.....
House.JPG
किल्याच्या पाण्यातिल हा भाग पाण्यात मनमुराद डुंबण्यासाठी राखुन ठेवलेला आहे.
Samudra.JPG
दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी वापरण्यात आलेली पाणबुडी.... ही आता लोकांना बघण्यासाठी खुली करून देण्यात आलेली आहे.
Submarin.jpg
हा किल्ला हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही मौसमात बघता येतो. दोन्ही वेळेसचा अनुभव वेगळा असतो.
अजुन काही फोटो
ek vaat.JPGRainbow.JPGWater & Boats.JPG
पुढिल भाग.. सांबा कार्निवल

 

स्टॉकहोम क्रुज ट्रिप

 क्रुज ट्रिप करायच खुप दिवसांपासुनच स्वप्न होत. भारतात असताना माहिती मिळवल्यानंतर हे काही परवडणारे नाही असे कळाले. मग हा विषय असाच स्वप्न म्हणून सोडून दिला. जेव्हा फिनलँड मधे आलो तेव्हा आम्ही रहात असलेल्या घराच्या खिडकीतून जरा लांबवर समुद्र दिसतो असे कळाले. सहज काम करत असताना त्या खिडकीतून बाहेर लक्ष गेले आणि एक मोठे जहाज त्या पाण्यावरून जाताना दिसले. मग मला काम करताना सारख बाहेर बघायचा नादच लागला. दिवसभरात किती जहाजा, बोटी या पाण्यावरून जातात हे बघत बसायच. कदाचित माझ हे जहाज प्रेम बघता आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवर्‍याने मला जहाज सहलीची अनोखी भेट दिली.
हेलसिंकी ते स्टॉकहोम असा येताना आणि जाताना दोन रात्रींचा प्रवास या जहाजावरून करायचे ठरले. त्या प्रमाणे वाईकिंगलाईन या कंपनीच्या जहाजाचे बुकिंग केले.
Cruse.JPG
हे जहाज दहा मजली होते. पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर रहाण्यासाठी केबिन होत्या. तिसरा मजला हा चारचाकी गाड्यांसाठी राखिव होता. पुन्हा चवथा, पाचवा, सहावा मजला राहण्यासाठी होता. मग सातव्या मजल्यावर रेस्टॉरंट आणी वेळ घालवण्यासाठी लहान मोठ्यांसाठी ईलेक्ट्रोनिक खेळणी होती. आठव्या, नववा आणि दहाव्या मजल्यावर डेक होता. जिथून खुले आकाश आणी समुद्राचे निळेशार स्वच्छ पाणि दिसत होते. हिवाळ्यात मात्र हे पाणि पांढरेशुभ्र असते.
जायचा दिवस उजाडला. सामानाची बांधाबांध करून आम्ही हेलसिंकी बंदरावर पोहोचलो. पहिलीच वेळ असल्याने वेळेत जाउन बसावे म्हणून आम्ही एक तासअगोदरच जाउन बसलो. चेकईन सुरू झालेले होते. आम्ही बोर्डींगपास घेऊन आमच्या गेट जवळ जाऊन बसलो. बोर्डिंगपास म्हणजे एटीएम कार्डाप्रमाणे ईलेक्ट्रॉनिक पट्टी असलेली प्रत्येकाच्या नावची कार्ड मिळतात. जर तुम्ही जेवण, नाष्टा आधिच बुक करून ठेवल असेल तर त्याचेही असेच कार्ड मिळतात. तुमच्या नावाचे कार्डच तुमची रुम की असते. या वरच तुमचा रुम नंबर असतो. जहाज सुटायची वेळ जवळ येत होती. अजुनही आत सोडण्याचे गेट उघडले गेले न्हवते. दिल्या वेळेच्या पंधरा मिनिटे उशीरा सोडण्यात आले. आम्ही जाहाजेच्या दिशेने चालू लागलो. गर्दी बरीच होती. आम्ही आत प्रवेश केला. आमची रुम शोधत त्यापाशी पोहोचलो. दरवाजा उघडला, तस समोर चार बंक बेड असलेली आणी त्यातच बाथरूमची सोय असलेली छोटीशी केबिन नजरेस पडली. आम्ही खिडकी असलेली केबिन मुद्दाम घेतली होती. सामान खोलीत टाकून आम्ही जरा वेळ तिथच बसलो. संध्याकाळचे सहा ते सकाळचे दहा असा वेळ आम्हाला ईथे घालवायचा होता.
Khidaki.JPG
मग जरा जहाजेवर फिरण्यास बाहेर पडलो. सुरूवातीला कूठून कुठे फिरतो आहोत हे लवकर कळतच न्हवते. मजल्यांवर जाण्यासाठी छोटे छोटे जिने आणी लिफ्टची सोय होती. ही सोय तीन चार ठिकाणी केलेली होती. सर्वात पहिले आम्ही सनडेक वर गेलो. (जहाजेच्या फोटोतिल दिसणारा झेंड्याकडील भाग.)

वरजाण्यासाठी असलेले जिने.
Stairs.JPG
सन्डेक हा भाग जहाजेच्या मागील बाजूस होता. ईथे काही टेबल खुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. मोकळ्या आकाशाखाली खाण्या-पिण्याचा आनंद ईथे बसून अथवा कठड्याला टेकून उभे राहून तुम्ही घेऊ शकता. पावसाळी हवा असल्याने ईथे थंडगार वारा सुटला होता. आम्ही ईथेच असताना जहाजेने बंदर सोडले. तिथे उभे राहून मागे जाणारे बंदर बघताना भारी वाटत होते.

बंदर सोडताना दिसणारे हेलसिंकी..
Helsinki Bander.JPG
जहाजेच्याखालून भोवर्‍यासारखे फिरणारे पाणि पाहिले की गरगरायला व्हायचे. आता हवा जरा जास्तच गार लागू लागल्याने आम्ही परत आत आलो. लहान मुलांची खेळण्यासाठीची ठेवलेली खेळणी खेळण्यात मुलगा रमून गेला. आता त्याला कुठेही यायचे नसल्याने आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि कॅप्टनच्या डेकवर जाऊ लागलो (जहाजेचा सर्वात पुढील भाग). गार वारा अजुनही झोंबत होता. आम्ही जिना चढून वर जाऊ लागलो, तस हवेचा जोर वाढू लागला. जिना संपवून आम्ही एक पाऊल पुढे टाकले तोच प्रचंड वार्‍याच्या वेगानी आम्ही मागे ढकललो जाऊ लागलो. नवरा कसाबसा रेलिंगजवळ पोहोचला. पण मला काही केल्या जाता येईना. आमच्याप्रमाणे ईथे आजून चार जणी आनंद घ्यायला आल्या होत्या, त्याही एक दोन पाऊल पुढे जाउन परत मागे आल्या. गार वारा कानांना सपासप मारत होता. शेवटी मी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या ठोकाणी टायटानिक मधिल रोज आणि जॅक सारखा फोटो काढायचा राहून गेला. मग मनात विचार तरळून गेला की हे जॅक आणि रोज ईतके निवांत उभे राहून कसे काय पोज करू शकले असतील?
आम्ही पुन्हा मुलगा खेळत होता तिथे आलो. त्याचे खेळणे अजुनही चालूच होते. आमची जेवणाची दिलेली वेळ जवळ आली. आम्ही जेवण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आत पदार्थ मांडून ठेवलेले होते. ईथे देखिल आम्ही खिडकीजवळचे टेबल आधिच घेऊन ठेवलेले होते.
Table.JPG
मांडून ठेवलेले पदार्थ बघता आपल्याला उपाशी रहावे लागणार याची कल्पना आली. तिथल्या कर्मच्यार्‍याशी बोलले असता मेनू कार्ड मधुनही आम्ही जेवण मागवू शकत होते. लहान मुलांसाठी वेगळे कार्ड होते. मग त्यातून काही मागवता येते का ते पाहू लागलो. पण ईथेही निराशाच झाली. शाकाहारी म्हणवता येईल असा कुठलाच पदार्थ येथे न्हवता. त्यातल्या त्यात मुलाला फ्रेंच फ्राईज आणि चिकन हा त्याचा आवडता मेनू मिळाला. मग आम्ही फ्रेंच फ्राईज मागवू असे ठरवले. तिथल्या कर्मचार्‍याला तसे सांगीतले, पण मुलांच्या पदार्थातुन आम्ही काहीही मागवू शकत नाही असे सांगीतले. शेवटी बाकीचे पदार्थ सोडून आम्ही सरळ गोडवर आलो. तिथ छान छान केक, कुकिज ठेवलेल्या होत्या. त्यातच गोड मानून घेतले. अर्धउपाशी पोटी आम्ही तिथुन बाहेर पडलो. एव्हाना रात्रीचे नऊ वाजून गेले होते. रात्री दिड वाजता डिस्को चालू होणार होता. त्याला जायचे ठरवले होते. पण मला अचानक मळमळीचा त्रास सुरु झाला. आता हे नक्की कशान झाल हे सांगण अवघड आहे. जहाज लागल्यामुळ...., तिथल्या जेवणामुळ, की डेकवर लागलेल्या वार्‍याच्या सपक्यार्‍यामुळ, की तिथल प्यायलेल टॅप वॉटर... काहिच कळेना... मी मात्र झोपायच ठरवल. तस सगळ पोट रिकाम करून मी झोपून घेतल. नवरा आणि मुलगा थोडावेळ जहाजेवर फिरून आले. मला काही केल्या बर वाटेना.
जहाजेवर असणारे लक्षवेधी झुंबर.....
Zumbar.JPG
सकाळी जाग आली ती एका निवेदनाच्या आवाजाने. खर तर भाषा काहीच कळत न्हवती. मी खिडकीचा पडदा बाजूला करून पाहिले. जहाज थांबलेले दिसले. पहाटेचे चारच वाजले होते, ईतक्यात कसे पोहोचलो असा मनात विचार असतानाच नवर्‍याला पण जाग आली. मग आठवले की वाटेत एक थांबा जहाज घेणार होते तेथेच ते थांबले होते. पुढच्या दहा मिनिटांतच जहाज पुन्हा प्रवासाला लागले. रात्रीच्या झोपेनंतर जरा बरे वाटत होते. सकाळी साडेसात वाजता नाष्ट्याची वेळ दिली होती. आता पुन्हा काही झोप येईना, म्हणुन खिडकीतून बाहेर बघत बसलो. सहा वाजत आले तसे आवरून नाष्त्याला जायच ठरवल. मुलाला अजुन ऊठवल न्हवत. सगळ आवरून झाल की त्याला उठवायच अस ठरवल. मग त्याला हाक मारली तर हा काही ऊठायच नाव घेईना. अजुन नाष्ट्याला जायला तसा वेळ होता. म्हणून परत एक चक्कर मारुन येऊ अस ठरवल. बाहेर चांगलाच गारठा होता. जहाजेच्या आत कडेने बसायला जागा केली होती. तिथ थोडावेळ बसलो. हळू हळू गर्दी वाढत होती. नाष्टा मिळणार होता तिथे लोक रांग लावून ऊभे राहू लागले. आता मुलाला ऊठवून आणण्यासाठी आम्ही पुन्हा खोलित गेलो. अजुनही त्याच उठायच मनात न्हवत, मग जरा आवाज चढवल्यावर उठून कसबस आवरल. या सगळ्यात पाऊणतास गेला. पुन्हा वर नाष्ट्याच्या जागी आलो तर अजुनही दार उघडले न्हवते.
ईथे मला आठवण झाली ती पुण्याची.... जर एखाद्या नाट्यप्रयोगाच्या वेळी आतप्रवेश देण्यास दार उघडायला उशीर केला तर लगेच आरडा ओरड सुरू करून त्या लोखंडी दाराला जोर जोरात हलवले जाते आणि नाईलाजाने ते दार उघडावे लागते. पण ईथे सगळे शांत होते. मलाच जाऊन दाराला धक्का द्यावे असे वाटत होते.

शेवटी एकदाचे दार उघडले. आत मधे सगळे रांगेनेच जात होते. शे - दिडशे लोक असावित. ईथे कॉर्नफ्लेक्स, ज्युस, ब्रेड- बटर असे पदार्थ खाण्यास मिळाल्याने आनंद झाला. पोटभर नाष्टा करून आम्ही पुन्हा सनडेक वर गेलो. आता जरा सुर्य वर आल्याने गारवा कमी झाला होता. बाहेर स्टॉकहोम जवळ आल्याच्या खुणा दिसु लागल्या.
Stockholm.jpg
उशीरा जहाज निघुनही बरोबर दहा वाजता आम्ही स्टॉकहोमला पोहोचलो. जहाजेला निरोप देऊन आम्ही बाहेर पडलो. घरी आखणी केल्याप्रमाणे उतरल्यावर जवळच असणारी दोन ठिकाण बघत बघत पायी हॉटेलवर जायच अस ठरल होत. परंतू माझी रात्री बिघडलेली तब्येत बघता आधी हॉटेलवर जाऊन सामान ठेवून मग बाहेर पडुयात असे ऐन वेळी ठरवले. बसने हॉटेल जवळ उतरलो. खर तर चेकईनची वेळ दुपारी दिली होती. पण आम्ही आधी रूम देता आली तर जमवा अशी विनवणी केलेली होती. आम्ही आत जाताच रुम तयार असल्याचे कळले. मग सामान तिथ टाकून थोड फ्रेश होऊन आम्ही फिरण्यास बाहेर पडलो.
ईथे फिरण्यासाठी आम्ही वाईकिंगलाईनद्वारेच हॉटेल बुकिंग, स्टॉकहोम पास आणि कुठेही चढा कुठेही ऊतरा या बसचे तिकिट सर्व काही घेऊन ठेवले होते. आम्ही या बसच्या थांब्यावर आलो. दर दहा मिनिटांनी ही बस सुटते. पुर्वी आपल्याकडे होत्या तश्या डबल डेकर अश्या या बस असतात. वरील बाजूचे छत सरकते असून पाऊस आला की ते बंद केले जाते, ईतर वेळी मात्र ते ऊघडेच असते.
Bus.JPG
बस मधे चढताच एक खोक हेडफोननी भरून ठेवलेल असत. त्यातील एक घेउन आपल्याला हव्या त्या जागेवर ( जर ती रिकामी असेल तर) जाऊन बसायच. प्रत्येक सीट जवळ हे हेडफोन लावण्यास जागा दिलेली असते. तसेच पंधरा भाषांमधे तुम्ही सांगितली जाणारी माहीती- ईतिहास ऐकू शकता. तुम्हाला कुठली भाषा हवी आहे त्याप्रमाणे त्या भाषेचा नंबर दाबून तुमची भाषा निवडू शकता. एकूण एकोणीस थांबे घेत एक तासाची फेरी ही बस मारून आणते. यात तुम्हाला जिथे उतरायचे असेल तिथे तुम्ही उतरू शकता. ते ठिकाण पाहून झाल की परत मागाहून येणार्‍या बसमधे तुम्ही चढू शकता.

सुरूवातीलाच आम्हाला रॉयल पॅलेस मधे होणारा रोजचा 'गार्ड्चेंज' हा सेरेमनी बघायला मिळाला.
Gard.jpg
रोज दुपारी या पॅलेसबाहेर तैनात असलेला गार्ड बदलला जातो. त्या वेळी पॅलेसला एक फेरी अश्या लामाजाम्या सकट मारली जाते. तिथुन आमची बस पुढे जाऊ लागली. आम्हाला ईतक्यात तरी उतरायचे न्हवते. त्या मुळे बस मधे बसूनच आम्ही ईतर ठिकाण बघत होतो. बस मधून दिसणारे स्टॉकहोम.
Stockhome.jpg
ईथे बघण्यासाठी बरीच ठिकाण आहेत. किमान तीन दिवस स्टॉकहोम बघण्यासठी हवेत. आम्ही फक्त दिड दिवस तिथ असल्याने जास्त फिरता आले नाही. त्यात दुसर्‍या दिवशी पाऊस होता. म्हणून आम्ही त्या दिवशी बंदिस्त असणारी ठिकाण पहाण्याच ठरवल. पहिल्या दिवशी आम्ही स्कानसेन संग्रहालय बघितले. या बद्दल सांगायचे झाले तर , जुनं काळातिल स्टॉकहोम तिथ पहायला मिळत. हे संग्रहालय मोकळ्या आकाशाखाली उभ केल गेल आहे. ईथ काच कारखाना, शेतीसाठी लागणारी अवजारे बनवण्याचा कारखाना अस पहायल मिळत. तुम्हाला ईथुन खरेदीही करता येते. थोडावेळ फेरफटका मारून आम्ही निघालो. कारण पुर्ण बघायला तीन तास गेले असते. आमच्या कडे वेळ कमी होता.
स्कानसेन संग्रहालयातील काही फोटो
Skansen Garden.jpg
जुन्या पद्धतीच्या एका खेळाचा आनंद घेताना मुलगा..
Skansen Game.jpg
तिथुन आम्ही गेले मनोरंजन नगरी मधे. जिथे हृदयाचे ठोके चुकवणारी अती उंचावर नेणारी खेळणी होती. मला यात बसायची भिती वाटत असल्याने मी केवळ बघ्याची भुमिका घेतली. ईथे आमचा बराच छान वेळ गेला. संध्याकाळ झाल्याने आणि पावसाला सुरुवात झाल्याने आम्ही परत हॉटेलवर जाण्याचे ठरवले. आता प्रश्न होता तो रात्रीच्या जेवणाचा....हॉटेलचेच रेस्टॉरंट मधे जाउन बघुयात असे ठरले. बाहेरून वास तर चांगला येत होता. हे चायनिज रेस्टॉरंट होते. आत जाउन मेनू बघितला. जरा हायस वाटल. खाण्यायोग्य पदार्थ मिळाले. पोटभर खाल्ल. दमलो असल्याने रात्री लवकर झोपी गेलो.
स्टॉकहोमचे काही फोटो. जे पायी फिरत असताना काढले आहेत.Stockh.jpgStockhom fl.JPG
कारंजे
Karanje.JPG
मला आवडलेली एक गल्ली.
Ek galli.jpg
अशा प्रकारे आमचा एक दिवस संपला होता. दुसर्‍या दिवशी आम्ही भेट दिली ती वासा संग्रहालय आणि गमला स्टान. हे पुढील भागात.

 सकाळी उठून नाष्टा करून पुढील ठिकाणे बघण्यास निघालो. आमचा कुठेही उतरा आणि चढा या बसचा पास अजूनही शिल्लक होता. तुम्ही जेव्हा पहिली फेरी या बस मधे बसुन मारता त्या वेळेपासून पुढे चोवीसतास तो वापरू शकता. खरं तर ठिकाण बघण्याची यादी बरीच मोठी होती. सर्व काही बघणं शक्य न्हवत. मग ज्याला जास्तित जास्त पर्यटक भेट देतात अशी काही ठिकाण आम्ही निवडली. त्यातीलच एक 'वासा संग्रहालय'. हे बघायला जात असताना अनवधानाने अजून एक ठिकाण बघण झाल. ते म्हणजे 'जुनिबॅकन' जे आमच्या यादीत न्हवत. झाल अस की वासा संग्रहालय आणि जुनिबॅकन ही दोन्ही ठिकाण अगदी जवळ आहेत. आम्ही पाटी बघत जात असताना आमचा रस्ता चुकला आणि आम्ही जुनिबॅकन मधे पोहोचलो. बर तिथ गेलो तरी आम्हाला हे कळाल नाही की आम्ही चुकिच्या ठिकाणी आलो आहोत. स्टॉकहोमचा पास असल्याने तिकिट खिडकीवर तो दाखवला आणि आत जायचे तिकिट घेतले. तिथे सामान ठेवायला लॉकर असल्याने जास्तिचे सामान त्यात ठेवून आम्ही आत गेलो. तिकिट खिडकीवर सांगितले होते की येथे गोष्ट सांगणारी (स्टोरी ट्रेन) आगगाडी आहे ती नक्की बघा. आम्हाला वाटले की वासा बद्दल काही माहीती देणारी चित्रफित असावी. म्हणून आम्ही आधी यात बसायचे ठरवेल. त्या प्रमाणे रांगेत उभे राहिलो. एक लाकडी खोक हळू हळू सरकत येत होत. आपण त्या चालत्या खोक्यात बसायच, आपल्याला हवी असलेली भाषा सांगीतली की यात बसवण्यात आलेले ध्वनीयंत्र चालू होते आणि जुनिबॅकन नावाच्या मुलाची गोष्ट चालू होते. ईथे फोटो काढायला बंदी असल्याने याचे सर्व फोटो गुगलवरून घेतले आहेत.
880490166_junibackenmarch2018_1.jpg

जस जशी गोष्ट पुढे जाते आपण अगदी त्या गोष्टीत हरवून जातो. केवळ सरळ रेशेत न जाणारी ही आगगाडी आपल्याला मधेच सहा सात फूट वर उंच तर कधी जमिनिला समतल तर कधी डवी- उजवीकडे वळत या जुनिबॅकनच्या सोबत फिरवते. हा अनुभव फारच वेगळा होता. छोट्या छोट्या मुर्त्यांच्या रुपात अतिशय सुंदर अशी शिल्प तयार करून या जुनिबॅकनची गोष्ट तयार केली आहे. पण हे बघताना कुठेही आपण खोट बघत आहोत हे जाणवत नाही.
खांबावर चढलेला जुनिबॅकन
Junibacken.jpgkesakumpu_540_junibacken.jpg
खर तर हे लहान मुलांचे वेळ घालवायचे ठिकाण आहे. पण बघण्यासारखे आहे. गोष्ट ऐकून झाल्यावर मग आम्हाला कळाले की आपण वासा मधे न येत भलतिकडेच आलो आहोत. मग पुन्हा तिकिट खिडकीवर जाऊन विचारले असता तिने वासा याच्या शेजारीच आहे असे सांगितले. तिथुन बाहेर पडून आम्ही पुन्हा वासा कडे नेणारा रस्ता बघू लागलो. समोरच एक मोठी ईमारत दिसली. आम्ही तिकडे गेलो. या वेळी आत जायच्या आधी बाहेरून नाव वाचून घेतले. ईथे बरीच गर्दी होती. आम्ही आत गेलो आणी डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य समोर दिसले.
Vasa Ship.jpg
वासा हे एक संग्रहालय आहे जिथे ३०० वर्षापुर्वीची बोट अथवा विशाल जहाज संग्रहीत करून ठेवले आहे. याचा ईतिहास असा...
वासा हे जहाज युद्ध नौका म्हनून बनवण्यात आले होते. त्या काळात बनवल गेलेल सर्वात मोठ जहाज होत हे. या वर माणसं आणि दारूगोळा वाहून नेण्यासाठी बरीच जागा होती. या जहाजेची बांधनी पुर्ण झाल्यावर ते युद्धासाठी पाण्यात उतरवण्यात आले. तोफा, दारूगोळा, माणसं, धान्य अस बरच काही यावर चढवण्यात आल. प्रवासासाठी हे जहाज निघाले असता केवळ तेराशे मिटर अंतर जाऊन हे जहाज पाण्यात बुडाले आणि समुद्र तळाशी गेले. त्या नंतर बरीच वर्ष हे जहाज पाण्याखाली होते.
हे जहाज का बुडाले यात जरा दुमत आहे. नक्की कारण सांगता येत नाही. तरी याची दोन कारण सांगीतली जातात. एक म्हणजे जहाजाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या तोफा, दारूगोळा यावर चढवण्यात आले. दुसर म्हणजे ज्याने हे जहाज बांधले त्याला एतक्या मोठ्या जहाज बांधणीचा अंदाज न आल्याने त्याच्या कडून काही त्रुटी राहिल्या गेल्या ज्या मुळे जहाज बुडाले.

या जहाजाचा शोध घेउन ते पाण्याबाहेर काढण्याचे ठरवले गेले. याचा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा एकदा जहाजाचा अभ्यास करून मग ते बाहेर काढले गेले.
पाण्यात काम करण्यासाठी त्या वेळी वापरण्यात आलेले पोषाख.
Poshakh.JPG
हे जहाज बघण्यासाठी जहाजेच्या दोन्हि बाजूने सात मजले बांधले गेले आहेत. प्रत्येक मजल्यावर जाउन हे जहाज बघता येते. वर जाण्यासाठी लिफ्ट आणि पायर्‍यांची सोय आहे. प्रत्येक मजल्यावर जहाजातील मिळालेले अवषेश काचपेटित ठेवले आहेत. तसेच एक चित्रफितही दाखवली जाते. अजुनही जहाजेवर काम चालू आहे. २००५ साली जहाजेच्या लाकडाला बुरशी चढू लागली. याचा अभ्यास केला असता बाहेरच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर होतोय असे अभ्यासकांच्या लक्षात आले. मग ईथे वातावरण नियंत्रित करण्यासाठी काही उपाय योजन केल्या गेल्या. हे संग्रहालय बघायला किमान एक तास तरी हवा.
जहाजेवर केलेले कोरीम काम बघण्यासारखी आहेत.Ship Work.jpgShip Work 2.jpg
वासा बघून आम्ही निघालो ते रॉयल पॅलेस बघायला.
रॉयल पॅलेसचा पॅनोरमिक फोटो.
Panoramic Royal Place.jpg
बाहेरून पॅलेस किती भव्य आहे याचा अंदाज येत होता. आम्ही आत गेलो. राजा- राणीचे जिथे लग्न झाले ते चर्च बघितले. बाकीचा राजवाडा फिरू लागलो, पण बर्‍याच ठिकाणी ईथे कॅमेरा, महिलांच्या पर्स आणि छत्र्या बरोबर नेता येणार नाहीत असे सूचना फलक होते. बर हे ठेवण्यासाठी कुठे जागाही दिसेना. एक जण बाहेर थांबून एक जण बघुन येईल असे करण्यापुरता वेळ आमच्या कडे न्हवता. कुठल्याही स्थितित दुपारी दोनवाजेपर्यत आम्हाला बंदरावर जाण्यास निघावे लागणार होते. त्यामुळे आम्ही बाहेरून पॅलेस बघण्याचे ठरवले.
पॅलेस जवळच गमला स्टान नावाची जागा आहे. हे कुठलेही संग्रहालय न्हवते. ही जागा म्हणजे जुने स्टॉकहोम. जसे पुण्यात आढळण्यार्‍या विविध पेठा. तसच काहिस हे. येथिल ईमारती ह्या अजुनही जुन्या काळातील आहेत. यांची रचना, ईथे जाणार्‍या चिंचिळ्या वाटा हे सगळ ईथ बघता येत.
जून्या ईमारती
Old Gamala Stan.jpgGamala Stan Panoramic.jpg
गल्ली
Ajun Ek.jpgEk Galli Gamala Stan.jpg
पर्यटकांची संख्या येथे जास्त असल्याने येथे अनेक रेस्टॉरंट आतील बाजूस पहायला मिळतात. जणू खाऊ गल्लीच आहे ही. ईथेच जेवायच होत पण मेनू बघता केवळ वॅफलवर भागवल आणि पुन्हा हॉटेलच्याच रेस्टॉरंट मधे जेवायच ठरवल.
याची चव फार सुंदर होती
Waffel.jpg
याच परिसरात नोबेल संग्रहालय देखिल होते. पण आमच्या कडे पुरेसा वेळ नसल्याने बर्‍याच चांगल्या ठिकाणांना आम्हाला मुकावे लागले. दोन वाजत आले अस्ल्याने आम्ही हॉटेलच्या दिशेने झपाझप पाऊले उचलू लागलो. रेस्टॉरंट मधे गेलो तर ते रिकाम होत. जेवणाची चौकशी केली असता ते चालू व्हायला अजुन एक तास आहे असे साम्गीतले. आता पंचाईत झाली. जवळच दोनचार छोटेखानी रेस्टॉ. होते. तिथ जाऊन बघू असे ठरले. जवळच असलेया रेस्टॉ. मधे व्हेज सँडविच आणि फ्रेंच फ्राईज मिळाले. सँडाविच बरेच मोठे असल्याने ते लवकर संपेना. घड्याळ्याचे काटे मात्र पटापटा सरकत होते. मग ते राहिलेले सँडविच पार्सल करून घेतले आणि आम्ही हॉटेल मधून सामानाच्या बॅगा उचललया. आता बसने गेलो तर वेळ जाईल म्हणून टॅक्सीने जायचे ठरले. ती कशी बुक करायची याची चौकशी रिसेप्शनला केली असता तिनेच आम्हाला टॅक्सी बुक करून दिली.
पुढच्या दोनच मिनिटांत ती दारत हजर झाली. आम्ही आत बसलो. ईथे एक जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर वाहनांची बरीच गर्दी होती. तरीही कोणीही हॉर्न न वाजवता एका मागून एक पुढे जात होते. हे बघता आम्हाला वाटले की आता उशीर होणार. पण वेळेत बंदरावर पोहोचलो. टॅक्सी चालकाने जरा त्यात करमणूक केली. आमची बोली भाषा ऐकून त्याने ती कुठली आहे ते विचारले. याला मराठी म्हणता असे त्याला सांगीतले तसे तो मराठिच्या काही गाण्यांचा आणि सोनू निगमच्या फॅन असल्याचे कळाले. मला जरा हे ऐकून आश्चर्यच वाटले. एवढेच नाही तर त्याने काही हिंदी चित्रपट ही बघितले होते. हिंदीतिल काही गायकांंचा देखिल तो फॅन होता. त्याच्या सोबत मग जरा गप्पा झाल्या.
अगदी वेळेत त्याने आम्हाला बंदरावर उतरवले. आम्ही आत गेलो. चेकईन करून जहाजावर जाऊ लागलो. जाताना येताना बुक केलेल्या जहाजाची कंपनी जरी एकच असली तरी दोन्ही वेळेस जहाज थोडी वेगळी होती. जणु जहाजातील एल एक्स आय आणि व्हि एक्स आय मॉडेल होते हे. परतीचे जहाज अकरा मजली होते. थोड्याफार फरकाने बांधणी वेगळी होती. आम्ही रुम वर पोहोचलो. पुन्हा सामान टाकून सनडेकवर गेलो.
स्टॉकहोम बंदरावरून निरोप घेतानाचे स्टॉकहोम. आपल्या एथे लवासा या धर्तीवर बान्धले आहे.
Bye 
Stockholm.jpgStockhome jatana.jpg
जहाज आपला मागे सोडत चालेल मार्ग
Path of Ship.jpg
आमचे जहाज पुढे निघाले आणि दुसर्‍या कंपन्यांची जहाज आपले बंदर सोडण्याव्या प्रतिक्षेत होती.
Other Ships.jpg
जहाजावरून दिसणारे टुमदार घर
House on way.jpg
अजुन एक जहाज वाटेत दिसले
Ship 2.jpg
या वेळीही आम्ही जातानाचे जेवण आधीच घेऊन ठेवल्याने दिल्या वेळी तिथे पोहोचलो. खायला काही मिळ्णार नाही हे माहितच होते, पण पोटात काही जाणेही महत्वाचे होते. या वेळीमात्र जेवताना बरीच गर्दी होती. शे- दिडशे माणस असावित. या ठिकाणी समुद्रीअन्न आवडण्यार्‍यांची खरच चंगळ आहे. आम्ही आपल गोडाच जेवण उचलून दिलेल्या टेबलवर जाऊन बसलो.
आमचे जेवण
Jevan.jpg
मुलाने पार्सल आणलेले खाल्ल्ले असल्याने त्याला काही भुक न्हवती तो खेळायला निघुन गेला. मी मात्र आजुबाजुच्या लोकांचे निरिक्षण करू लागले. सवय जरा वाईट आहे पण नाईलाज होता. ईकड तिकड बघण्याशिवाय काहीच करता येत न्हवत. या निरिक्षणात आढळलेल्या काही गोष्टी
ईथले लोक खरच खादाड खाऊ आहेत की केवळ पैसे भरलेत आणि येऊद्या मग हवे तेवढे अस म्हणून ताट भरून भरून आणत होती
सगळ्याच टेबलांबर प्रॉनचा ढिगारा झाला होता. बर ते लोक हे खाताना मला उगा आपल्या भाजक्या आणी उकडलेल्या शेगांची आठवण झाली. जसे आपण शेंगेचे नाक मोडत आतील दाणे खाऊन फोलपट साचवतो अगदी तसेच हे लोक प्रॉन सोलून खात होते आणि टेबलावर ढिगारे करत होते.
मनोसक्त प्रॉन खाऊन झाल्यावर यांचा मोर्च्या वळतो तो पोर्क, बीफ अश्या केवळ वाफवलेल्या अथवा कच्च्या अन्नाकडे. जास्त करून हे सगळ अन्न बर्फाच्या लादीवर ठेवून गार ढोण्ण केलेल. ( आपल्याला म्हणजे गॅस वरून उतरवल की पोटात अशी खायची सवय)
हे ही मनोसोक्त खाऊन झाल की मग गोडाकडे. तेही पुन्हा भरपेट, नावापुरत वगैरे काही नाही. जणू ठेवलेले सर्व पदार्थ पोटात गेलेच पाहिजे.
बर या सगळ्याच्या जोडीला द्रवपदार्थ म्हणुन बिअर, वाईन, सोडा, व्हिस्की यांचे नळच लावले होते. ग्लास घायचा आणि नळाखाली हव्या तितक्यावेळा तो भरून घ्यायचा.
हे सगळ बघून मलाच लाजल्यासारख झाल आणि मी चार वेळा उठून मोजक्याच दोन दोन स्ट्रॉबेरी आणल्या.
जेवण करून आम्ही मुलगा जिथे खेळत होता तिथ गेलो. या वेळी आम्हाला एक भारतीय कुटूंब भेटल. नवरा- बायको आणी दोन मुल. त्यांनी बर्‍याच वेळा या जाहाजेवरुन प्रवास केला होता. नवर्‍यापेक्षा त्याच्या बायकोला जहाजेची अधिक माहिती झालेली होती. तिच्याकडूनच कळाले की जहाजेवर मुलांसाठी दर काही तासाने वेगवेगळे कर्यक्रम ठरवलेले असतात. त्यात हातचलाखीचे छोटे छोटे प्रयोग यांना शिकवले जातात, एक स्पर्धा घेतली जाते ज्यात जहाजेसंबधिच्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यायची असतात. जादूचे प्रयोग, बाहुलीनाट्य असे कार्यक्रम योजलेले असतात. मग मुलगा त्यांच्या मुलासोबत हे सगळ अनुभवायला गेला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.
जहाजवर बाहुलीनाट्याचा आनंद घेताना
Puppet Show.jpg
अशाप्रकारे आमचा प्रवास संपला आणि माझ स्वप्न सत्यात उतरलं.

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...