Saturday, November 7, 2020

औरंगाबाद जिल्ह्याचे पर्यटन

 औरंगाबाद विषयी माहिती

अनेकवेळा औरंगाबादेस संभाजीनगर म्हणून संबोधले होते. महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला याच जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यात २ जगप्रसिद्ध हेरिटेज वास्तू (अजिंठा लेणी व वेरूळ लेण्या) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकाने औरंगाबाद येथील दौलताबादेत आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही).

औरंगाबाद शहर प्राचीन काळातही समृद्ध होते. प्राचीन औरंगाबाद लेणी परिसर यास साक्षीदार आहे. पितळखोरा, अजिंठा, वेरूळ आदी प्राचीन स्थानांबरोबरच विकसित झालेले हे स्थान होय. त्यावेळी हे नगर राजतडाग या नावाने ओळखले जात होते. भारतातील प्राचीन महामार्गावरील हे एक वैभवशाली नगर होते.


औरंगाबादचा इतिहास

निजामशाही: या नगराचा नव्याने विकास झाला तो मलिक अंबरच्या काळात, दौलताबाद येथील निजामशाहीचे ते वजीर होते. त्यांनीच अंदाजे १६१० मध्ये निजामशाहीची राजधानी दौलताबादहून औरंगाबाद आणली. त्यावेळी या गावाचे नाव खडकी होते. नवखंडा महाल ही त्यांचीच निर्मिती होय. येथे त्याचंी राजधानी होती. त्यांनी येथे भूमिगत पाईपद्वारे पाणीपुरवठ्याची उत्कृष्ट व्यवस्था केली. आजही काही भागात ही टिकून आहे. नहर-ए-अंबरी म्हणून ही प्रसिद्ध आहे. भडकलगेटसह पाच दरवाजे, काली मशीद, जामा मशीद, काला चबुतरा इत्यादींची निर्मिती त्यांनीच केली. मलिक अंबर हे पूर्व आफ्रिकेतील ऍबिसिनिया (आताचे इथिओपिया) या देशातील एक गुलाम होते. आपल्या कर्तृत्वाने ते निजामशाहीचे मुख्य प्रधान झाले. मलिक अंबर नंतर त्यांचा मुलगा फतेहखान याने औरंगाबादचे नाव फतेहनगर ठेवले.

मोगल: यानंतर औरंगाबाद दिल्लीच्या मोगल साम्राज्यात समाविष्ट झाले. प्रथम शहाजहान बादशहाने हे शहर जिंकले. त्यांच्यानंतर औरंगजेब येथे दोन वेळा सुभेदार म्हणून राहिले. औरंगजेब बादशहाची शेवटची ५० वर्षेयाच शहरात गेली. त्यावेळी दक्षिण भारताची ही त्यांची राजधानीच होती. त्यांनीच फतेहनगर हे नाव बदलून १६५३ मध्ये या शहरास औरंगाबाद हे नाव दिले. त्यांच्या काळात किले अर्क हा किल्ला, त्या भोवतालची तटबंदी, हिमायतबाग, दिल्लीगेट, नौबतगेट इत्यादी दरवाजे निर्माण झाले.१६६६ हे वर्ष औरंगाबाद शहरासाठी विशेष महत्त्वाचे आहे. यावर्षी औरंगजेब बादशहाच्या भेटीस दिल्लीस जात असताना शिवाजी महाराज या शहरात मुक्कामास होते.

आसफजाही: औरंगजेबनंतर १७२० मध्ये त्यांचाच एक सरदार निझाम उल मुल्क यांनी येथे आसफशाही वंशाची सत्ता स्थापन केली. त्यांची राजधानी नवखंडा महालात होती. त्यांच्याच काळात गुलशन महाल, दमडी महाल, बारादरी इत्यादी वास्तूंची निर्मिती झाली. त्यांच्यानंतर आलेल्या दुसर्या निजामाने राजधानी हैदराबादेस स्थलांतरीत केली. १९४८ पर्यंत हैदराबादच्या निजाम संस्थानमधील हे एक प्रमुख शहर होते. पूर्वी ५२ दरवाजे व ५२ पुरे म्हणून या शहराची प्रसिद्धी होती. भडकल गेट, दिल्ली गेट, रंगीन गेट, पैठण गेट, मकाई गेट, इत्यादी विशाल दरवाजे आजही ऐतिहासिक काळाचे साक्षीदार आहेत.मागील १० ते १५ वर्षात या शहराची औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. चिकलठाणा, शेंद्रा, पंढरपूर, वाळूज तसेच पैठण रोड व बीड रोडवर औद्योगिक क्षेत्रे आहेत. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर या प्रकल्पात या शहराचा समावेश झाल्यामुळे दिल्ली-मुंबई प्रमाणे हे शहर लवकरच प्रगती करू शकेल.पैठणी, हिमरू शाली, औरंगाबाद सिल्कच्या साड्या व चादरी प्रसिद्ध आहेत.

पर्यटन स्थळे

औरंगाबाद लेणी

हा लेणी समूह मकबर्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर हनुमानटेकडी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागील भागात आहे.
हा लेणी समूह पूर्व-पश्चिम डोंगररांगेत दोन गटात विभागलेला आहे. यात एकूण नऊ लेण्या आहेत. या लेण्या बौद्धधर्मीय म्हणून ओळखल्या जातात. यात मध्ये क्र. ५ भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती व क्र.६ मध्ये श्रीगणेशाची एक मूर्ती आहे. एक लेणी हीनयान असून उर्वरित आठ लेण्या महायान पंथाच्या आहेत. लेणी क्र. ४ मध्ये चैत्यगृह असून ही हीनयान पंथाची आहे. एक चैत्यग्रह सोडलयस बाकी सगळे विहार आहेत. ही सर्वात प्राचीन लेणी आहे. इ.स.तिसर्या शतकातील असावी. उर्वरित लेण्या ७ व्या शतकापय्रंत खोदण्यात आल्या. लेणी क्र. १ ते ७ व ९ या लेण्या प्रेक्षणीय आहेत. येथे हीनयान, महायान व वज्रयान हे सर्व बौद्ध पंथ येथे एकत्र आढळतात. येथे बोधिसत्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर व वज्रपाणी यांच्या भव्या मूर्ती आहेत. पद्मपाणीच्या हातात कमळ, अवलोकितेश्वराच्या मुकुटात बुद्धाची मूर्ती व वज्रपाणीच्या मुकुटात स्तूप असते. पहिल्या गटापासून दुसर्या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे. अजिंठा व वेरूळ प्रमाणे याही लेण्या रंगीत होत्या. रंगकामाचे अवशेष येथे आजही पाहावयास मिळतात.

लेणीक्र. २ : दीर्घिका, मध्यवर्ती दालन व प्रदक्षिणा मार्ग अशी या लेणीची रचना आहे. यातील गाभार्यात भगवान गौतमबुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती आहे. उजवीकडे विविध आसनातील बुद्ध मुर्ती आहेत. यात शिल्पकाम भरपूर आहे परंतु त्याची झीज झालेली आहे.

लेणीक्र. ३ : हे एक प्रेक्षणीय विहार आहे. यातील सभा मंडपात बारा सुशोभित स्तंभअ ाहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजविलेले आहेत. येथे एका स्तंभाच्या नाटेवर (तुळई) सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेले आहे. गाभार्यात प्रलंबपाद आसनातील सिंहासनावर बसलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस आदरभावयुक्त भक्तजन दाखविण्यात आले आहेत. हे भक्तजन आफ्रिकेतील कृष्णवर्णीय असावेत असे त्यांच्या केसाच्या रचनेवरून वाटते.

लेणी क्र. ४ : ही येथील सर्वात प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या तिसर्या शतकातील असावी. हीनयान पंथाचे हे चैत्यगृह आहे. यातील तुळ्याचे छत व स्तूपावरील कोरीव काम अतिशय कुशलतेने केलेले आहे.

लेणी क्र. ५ : या लेणीत जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची ध्यानस्थ मूर्ती आहे.

लेणी क्र. ६ : या लेणीपासून पुर्वेकडील गटास आरंभ होतो. या लेणीची दोन दालने आहेत. पहिल्या दालनात श्री. गणेशाची मूर्ती आहे. त्यासोबत सप्तमातृका कोरलेल्या आहेत. बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुसर्या दालनात भगवान बुद्धाची मूर्ती व काही बौद्ध शिल्पे आहेत.

लेणी क्र. ७ : त्या काळातील शिल्पकलेचे काही अप्रतीम नमुने आजही या लेणीत आहेत. सकाळची सूर्यकिरणे थेट गाभार्यात भगवान बुद्धाच्या मूर्तीला स्पर्श करतात. त्यामुळे ही मूर्ती सजीव व चैतन्यमयी भासू लागते. मूर्तीच्या एका बाजूला नर्तकीचा एक अलौकिक शिल्पपट आहे. हा शिल्पपट शिल्पकलेच्या इतिहासातील एक मानबिंदू समजला जातो. यात नृत्यात तल्लीन झालेली नर्तिका व वाद्यवृंदासह साथ देणार्या युवतींचे कोरीव काम देखणे व अतिशय विलोभनीय आहे. हा शिल्पपट अंधारात आहे. प्रकाश परावर्तीत करणार्या बोर्डाच्या साहाय्याने या शिल्पातील सौंदर्याचे दर्शन घडते. अंधार असलेल्या सर्व लेण्यांत अशा बोर्डाची व्यवस्था आहे. गाभार्यातील प्रवेश दारावर पद्मपाणी अवलोकितेश्वर यांची उभी मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूस अष्टमहाभयाचे प्रसंग कोरलेले आहेत. याच्या डावीकडील दालनात ध्यानी बुद्धाच्या व उजवीकडील दालनात पांचिक व हरितीचे शिल्प आहे.

लेणी क्र. ९ : ही येथील सर्वात भव्य लेणी आहे. यात भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणाचे विशाल शिल्प ओ. हे शिल्प अर्धवट व जीर्ण अवस्थेत आहे. या लेणीतील काही मूर्तिंच्या डोक्यावरील नागफणीचे काम अतिशय उत्कृष्ट आहे



बीबी का मकबरा

बीबी का मकबरा हे इतिहास प्रसिद्ध स्मारक खामनदीच्या सान्निध्यात पानचक्की व औरंगाबाद लेणीच्या जवळजवळ मध्यावर आहे. येथूनच लेणीस जाण्यासाठी मार्ग आहे. याच लेणीच्या डोंगररांगाची नैसर्गिक पार्श्वभूमी या मकबर्यास लाभली आहे. मोगल सम्राट औरंगजेब यांची पत्नी बीबी रबिया-उल-दुर्राणी उर्फ दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधण्यात आला आले.
राजपुत्र आजमशहा या औरंगजेबच्या मुलाने आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ इ.स. १६५१-६१ मध्ये याची निर्मिती केली. त्यास सुमारास आगर्यातील ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. जे एक जागतिक आश्चर्य ठरले. त्याच ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. जे एक जागतिक आश्चर्य ठरले. त्याच ताजमहालाची ही प्रतिकृती आहे. त्यामुळे यास दक्षिणेचा ताजमहाल म्हणतात. दक्षिण भारतातील मोगलकालीन हे सर्वात भव्य व सुंदर स्मारक आहे.मुख्य मकबरा एका चौकोनी भव्य चबुतर्याच्या मध्यावर आहे. त्याच्या चारही कोपर्यावर उंच मिनार आहेत. मकबर्याचा खालील भाग व घुमट संगमरवरी असून त्यावर नाजूक व सुंदर कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. इतर भाग शंख-चुन्याने प्लास्टर केलेला आहे. मकबर्याच्या आतील कबर अलंकाररहित व साधी आहे. तिच्या सभोवती नाजूक संगमरवरी जाळया आहेत. मकबर्याच्या बाहेरच्या भिंतीची लांबी ४५८ मीटर व रूंदी २७५ मीटर आहे. दक्षिणेस मुख्य प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडे मशीद, उत्तरेस दिवान-ए-आम व पूर्वेस दिवान-ए-खस या इमारती आहेत. इतर मोगलकालीन स्थापत्य शास्त्रानुसार यातही चारी बाजूस उद्याने आहेत



वेरूळ कैलास लेणी

वेरुळ औरंगाबाद जिल्ह्यातील गाव आहे. वेरुळ लेणी येथून जवळ आहेत. औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. या परिसरात एकूण ३४ गुंफा आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम पाचव्या ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे तसा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील प्रमुख ३४ गुंफापैकी १७ गुंफा हिंदू धर्म शैलीच्या आहेत, १२ बौद्ध पंथाच्या तर ५ जैन पंथिंयाचा प्रभाव असलेल्या आहेत. अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे. या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. ‘आधी कळस, मग माया’ ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे. भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.



देवगिरी किल्ला (दौलताबाद)

देवगिरी म्हणजे ’देवतांचा पर्वत’. पुढे महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले. यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून ३ हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील २ वर्षेसोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने. देवगिरी किल्ल्याचे प्रवेशद्वार ः हत्तींच्या धडकेपासुन संरक्षणासाठी लावलेले महाकाय खिळे. ह्या किल्ल्यामधे बरेच दरवाजे आहेत आणी त्यांच्या दिशा आणी त्यांच्यामधली अंतरे अशा प्रकारे ठेवली आहेत की शत्रुला हल्ला करणे आणि रणनीती ठरवणे एकदम अशक्य होउन जावे. मुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत.

भारतमाता मंदिर : आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा १९४८ साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले. त्या मंदिराच्या प्रांगणातील काही कोरीव खांब

चॉंद मिनार : भारतमाता मंदिराजवळ एक मोठा ३ मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या ३ मजली चॉंद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो.

चिनी महल : एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे.

मेंढा तोफ : चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला ’तोप किला शिकन’ म्हणजे ’किल्ला तोडणारी तोफ’ म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्याचे आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे.

खंदक : मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते.

अंधारी/ भुलभुलय्या : हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान.

शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो डायरेक्ट खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत.

बारादरी : सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला १२ कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे आणी आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते.
अत्त्युच्च शिखर : हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. इथे पोहोचे पर्यंत आपली फॅ फॅ होते, तर एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो.




          

  उद्ध्वस्त प्राचीन केशव मंदिर (माजलगांव-केसापुरी)!


उरूस, 21 सप्टेंबर 2020 

माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्‍याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.

मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्‍यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.


 मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे. 

बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक. 


या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत.  ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे. 

महादेव मंदिराच्या गाभार्‍याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्‍यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे. 


आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे. 


आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. 

गोदावरी खोर्‍यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.

महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्‍या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्‍या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.  

गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते.  जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.  

खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे.  औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.

पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्‍याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे. 

मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्‍यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे). 

देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्‍यांची नावेही पाठवा. 

चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने  समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.

(या विषयात रस आसणार्‍यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)          

(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)

(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

  मुस्लीम महानुभाव संत शहामुनींची दुर्लक्षीत समाधी


उरूस, 30 सप्टेंबर 2020 

भारतीय संस्कृती ही एक खरेच अजब असे मिश्रण आहे. आपला जन्म कुठे/ कुठल्या धर्मात पंथांत होतो हे आपल्या हातात नसते. पण आपली श्रद्धा अभ्यास यातून काही माणसं वेगळाच मार्ग निवडतात. शाहगड (ता. अंबड जि. जालना) येथील महानुभावी संत शहामुनी यांची कथा अशीच काहीशी आहे. 

औरंगाबाद-सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी नदीवर प्रचंड मोठा पुल आहे. हा पुल ज्या गावात आहे ते गाव म्हणजे शहागड. नविन झालेल्या पुलाखालून गावात शिरलो की उजव्या बाजूला एक रस्ता सरळ चिंचोळा होत नदीच्या दिशेने जात राहतो. त्याच्या टोकाशी नदीच्या काठावर जूना प्राचीन किल्ला आहे. किल्ल्याचे अगदीच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. एक भव्य पण काहीशी पडझड झालेली कमान आहे. या कमानीतून आत गेलो की भाजलेल्या वीटांच्या कमानी आणि एक दीपमाळ लागते. हे म्हणजे पुराण्या समाधी मंदिराचे अवशेष आहेत. आता नविन बांधलेले एक सभागृह आहे. यातच आहे शाहमुनींची समाधी. यालाच शाह रूस्तूम दर्गा असे पण संबोधले जाते.

लेखाच्या सुरवातीला वापरलेले छायाचित्र त्याच सुंदर कमानीचे आहे. 


शहामुनींनी त्यांच्या सिद्धांतबोध ग्रंथात आपल्या कुळाची माहिती दिली आहे. आपल्या घराण्यात चार पिढ्यांपासून हिंदू देवी देवतांची पुजा अर्चना होत असल्याची माहिती स्वत: शहामुनींनीच लिहून ठेवली आहे. त्यांचे पंणजोबा प्रयाग येथे होते. पत्नी अमिना हीला घेवून ते तेथून उज्जयिनी येथे आले. शहामुनींचे पणजोबा मराठी आणि फारसी भाषेचे तज्ज्ञ होते.  शहामुनींच्या आजोबांचे नाव जनाजी. जनाजी विष्णुभक्त होते. जनाजी हे सिद्धटेक (ता. कर्जत. जि. नगर) येथे स्थलांतरीत झाले. जनाजीच्या मुलाचे नाव मनसिंग. हे मनसिंग म्हणजेच शहामुनींचे वडिल. मनसिंग सिद्धटेकला असल्याने असेल कदाचित पण त्यांना गणेशभक्तीचा छंद लागला. मनसिंगांच्या पत्नीचे नाव अमाई. याच जोडप्याच्या पोटी शके 1670 (इ.स. 1748) मध्ये पेडगांव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे शहामुनींचा जन्म झाला. काशी येथे  मुनींद्रस्वामी यांच्याकडून त्यांना गुरूमंत्र प्राप्त झाला. सातारा जिल्ह्यात त्यांनी सिद्धांतबोध ग्रंथाची रचना केली. यांनी शके 1730 (इ.स.1808) मध्ये शहागडला त्यांनी समाधी घेतली. 

शहाबाबा असे त्यांचे जन्मनाव. त्यांना मुनी ही उपाधी लावली जाते ती संत असल्यामुळे नव्हे. त्यांच्या गुरूंचे नाव मुनींद्रस्वामी होते. म्हणून शहाबाबा यांनी आपल्या नावापुढे मुनी जोडून आपले नाव ‘शाहमुनी’ असे केले. जसे की 'एकाजनार्दनी'. शहामुनींची गुरूपरंपरा त्यांच्याच पुस्तकांत दिल्याप्रमाणे दत्तात्रेय-मुनींद्रस्वामी-शहामुनी अशी सिद्ध  होते.

शहामुनींचे मोठेपण हे की त्यांनी आपल्या मुस्लीम धर्मातील विद्धंसकारी शक्तींची कडक निंदा आपल्या ग्रंथात करून ठेवली आहे. त्याकाळी हे मोठेच धाडस म्हणावे लागेल. आजही सुधारणावादी मुसलमान व्यक्तींना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला मारूनही टाकले जाते. अशा वेळी शाहमुनी लिहीतात

नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण ।

शुद्रापरीस हीन वर्ण । अविंधवंशी जन्मलो ॥

ज्यांचा शास्त्रमार्ग उफराटा । म्हणती महाराष्ट्रधर्म खोटा ।

शिवालये मूर्ति भंगिती हटा । देवद्रोही हिंसाचारी ॥

जयांच्या सणाच्या दिवशी । वधिता गो उल्हास मानसी ।

वेदशास्त्र पुराणांसी । हेळसिती उद्धट ॥

ऐसे खाणींत जन्मलो । श्रीकृष्णभक्तीसी लागलो ।

तुम्हां संतांचे पदरी पडलो । अंगीकारावे उचित ॥

शहामुनींची समाधी आज दुर्लक्षीत आहे. खरं तर समाधीचा परिसर हा नदीकाठी अतिशय रम्य असा आहे. प्राचीन किल्ल्याचे अवशेष इथे आहेत. हा सगळा परिसर विकसित झाला पाहिजे. किमान येथील झाडी झुडपे काढून स्वच्छता झाली पाहिजे. प्राचीन सुंदर कमानीची दुरूस्ती झाली पाहिजे. 


शहामुनींचे वंशज असलेली 5 घराणी आजही या परिसरांत नांदत आहेत. या समाधीची देखभाल हीच मंडळी करतात. मुसलमान असूनही हे शहामुनींच्या उपदेशाप्रमाणे मांसाहार न करणे पाळतात. चैत्री पौर्णिमेला इथे मोठी जत्रा भरते (जयंतीची तिथी चैत्र वद्य अष्टमी आहे). तो उत्सव ही मंडळी साजरा करतात. एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

केवळ ही समाधीच नव्हे तर शहागड परिसरात जून्या मुर्ती आजही सापडतात. जून्या वाड्यांमधून अप्रतिम असे नक्षीकाम केलेले सागवानी खांब आहेत. याच परिसरांत सापडलेली विष्णुची प्राचीन मुर्ती एका साध्या खोलीत ठेवलेली आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरांत तर बर्‍याच मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. दोन मुर्ती तर परिसरांत मातीत पडलेल्या आमच्या सोबतच्या फ्रेंच मित्राच्या दृष्टीस पडल्या. दोन जणांनी मिळून त्या उचलून मंदिराच्या भिंतीला लावून ठेवल्या. पाण्याने स्वच्छ धुतल्या. त्यावर रंगांचे डाग पडले आहेत. इतकी आपली अनास्था आहे प्राचीन ठेव्यांबाबत. 

स्थानिक लोकांनी आता पुढाकार घेतला आहे. मुर्तींची स्वच्छता करून मंदिरात आणून ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. शिवाय अजून काही अवशेष सापडले तर नोंद करण्याचे मनावर घेतले आहे. 

शहामुनींचे समाधी स्थळ एक धार्मिक सलोख्याचे विशेष ठिकाण म्हणून विकसित केल्या गेल्या पाहिजे. मंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील हे गाव आहे. त्यांनी या प्रकरणांत लक्ष घालावे असे सर्वसामान्य इतिहाप्रेमींच्या वतीने विनंती आम्ही करत आहोत.  

(शहामुनींच्या बाबतीत सविस्तर माहिती रा.चिं.ढेरे यांच्या ‘मुसलमान मराठी संतकवी’ या पुस्तकांत दिली आहे. प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन पुणे.)  (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

    मालोजी राजांची अतिक्रमणाने वेढलेली समाधी !


उरूस, 4 सप्टेंबर 2020 

 वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्‍यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे. 

या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत. 


मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत. 


लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्‍यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.

हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत. 


तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्‍या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्‍यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.  


सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्‍यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे. 


कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची? 

मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?

समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.    

(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

  घटोत्कच लेणीचा सुंदर निसर्ग आणि आपली अनास्था !


उरूस, 14 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगराचा परिसर विलक्षण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथल्या दगडाचा दर्जा पारखून दोन हजार वर्षांपूर्वीपासून इथे लेणी कोरल्या गेली आहेत. अजिंठा लेणी सर्वपरिचित आहे पण याशिवाय त्याच काळातील किंवा त्यापूर्वीचीही काही लेणी या डोंगरात आहेत. पितळखोरा लेणी तर अजिंठ्याच्या आधीची आहे. 

सिल्लोड तालूक्यात हळदा घाटात वाडीचा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी आहे. याच किल्ल्याच्या बाजूला दुसर्‍या घाटात आहे ऐतिहासिक जंजाळा किल्ला (याला वैश्यगड किंवा तलतमचा किल्लाही म्हणतात). याच किल्ल्यासमोरच्या दरीत घटोत्कच लेणी आहे. नितांत सुंदर अशा दाट जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी याच्या मध्ये दरीत आजूबाजूच्या शेत शिवारातून वाहत येणारे पाणी धबधबा बनून कोसळते. कोसळते म्हणण्यापेक्षा वहात येते असं म्हणणं जास्त संयुक्तीक आहे. हिंदीत ‘झरना’ असा जो शब्द आहे तो याला नेमका लागू पडतो. 


जून्या मोगल वास्तूंमध्ये दगडांवरून वहात जाणार्‍या पाण्याची कारंज्याजवळ रचना केलेली असते. तशीच रचना या अनोख्या धबधब्याची आहे. उंचावरून तिरक्या असलेल्या दगडावरून हे पाणी खळाळत येते. अन्य जागी उंच कड्यांवरून पाणी खाली झेप घेते. इथे अतिश वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दगड रचना असल्याने या झर्‍याचे सौंदर्य वेगळेच जाणवते. (औरंगाबाद परिसरांत बिबीचा मकबरा, सोनेरी महाल, औरंगजेबाचा राजवाडा किलेअर्क, हिमायत बाग, विद्यापीठातील सलाबत खानाचा मकबरा अशा कितीतरी ठिकाणी दगडांवरून पाणी वाहण्याची सुंदर रचना केलेली आढळून येते.)

घटोत्कच लेणीला जायला मुळात रस्ताच नाही. अक्षरश: शेत शिवारांतून वाट काढत जावे लागते. स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे. पुरातत्त्व खात्याने अगदी अशात प्रत्यक्ष लेणीपर्यंत डोंगरमाथ्यापासून नीट पायर्‍या खोदल्या आहेत. लेणीजवळही एक ओहोळ परत आडवा येतो. तो ओलांडून पाय पाण्यात भिजवूनच लेणीला जाता येते. लेणीजवळ पुरातत्त्व खात्याने माहितीचा फलक लावला आहे. एक रक्षक तिथे नेमला आहे जो की कधीच हजर नसतो.

महायान पंथातील ही पहिली लेणी आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीत एकच दालन आहे. वीस सुंदर भव्य खांबांवर एक मोठे सभागृह आहे. त्याच्या एका बाजूला बुद्धाची भव्य अशी धम्मचक्र परिवर्तन मुर्ती आहे. लेणीत फारसे कोरीव काम दिसून येत नाही. कदाचीत त्या काळात काढलेली चित्रे नष्ट झाली असावीत. ब्राह्मी भाषेतील एक शिलालेख लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. लेणी समोर प्रशस्त अशी जागा मोकळी सोडलेली आहे. लेणीला दोन खिडक्या आहेत. आतल्या अंधारातून बाहेर प्रवेशद्वार आणि खिडक्यांकडे पाहिल्यास खांबांमधून मोठे सुंदर चित्र दिसते. 


लेणी समोरची दरी पावसाळ्यात दगडावरून वाहणार्‍या पाण्याच्या आणि मोरांच्या आवाजाने भरून गेलेली असते. लेणीच्या अगदी समोर जंजाळा किल्ल्याचे अवशेष दिसतात किल्ल्याचा एक दरवाजा या दरीत उतरण्यासाठी आहे. तोच किल्ल्याचा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. तटबंदीचे थोडे अवशेष, दिल्ली दरवाजा, किल्ल्यावरील महाल आणि एक पडकी मस्जिद असे फारच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत.

हा सगळा परिसर विलक्षण सुंदर आहे. सागाच्या हिरव्या गर्द वनराईने सगळा डोंगर भरून गेलेला आहे. घटोत्कच लेणी समोरच डोंगरात अजून लेणी कोरल्याच्या खुणा दाट झाडीतून डोकावताना दिसतात. ही लेणी रिकामी असून तिथे फारसे कोरीव काम नाही अशी माहिती स्थानिक हौशी गाईड अक्रम भाई यांनी दिली. 

हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षण ठरावा असाच आहे. पण याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही. अगदी गावात गेल्यावरही लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही. आता गावामधून जाणार्‍या सिमेेंट रस्त्याचे काम चालू आहे. पण मार्गात येणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता आडवून ठेवला आहे. 

ऐतिहासिक पुराण वास्तूंबाबत आपली अनास्था जागजागी दिसून येते. दोन हजार वर्षांपूर्वीचा सुंदर वारसा जवळ आहे आणि त्याकडे जाणारा साधा रस्ता आपण आजतागायत बांधू शकलो नाही याची अत्यंत खंत वाटते. लेणीच्या शोधात आमच्यासोबत असलेला फ्रेंच मित्र व्हिन्सेंट वाटेत शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून कॅमेर्‍यासह पडला. एक भारतीय म्हणून आणि त्याचा मित्र म्हणून मला विलक्षण शरम वाटली. कुणीतरी आपला ऐतिहासिक दिव्य वारसा आपली वास्तूकला आपली शिल्पं आपल्या परंपरा यांचा शोध घेत धडपडत आहे आणि आपण किमान सोयीही पुरवू शकत नाही ही फारच शोकांतिका आहे. 

बरं केवळ या लेणीसाठी रस्ता करायला पाहिजे असेही नाही. अगदी लेणीच्या जवळ जंजाळा या गावातील लोकांसाठीही याची गरज आहे. भराडीपासून अंभईपर्यंत किंवा उंडणगावपासून अंभईपर्यंत बर्‍यापैकी रस्ता आहे. तिथपासून जंजाळ्यापर्यंत चांगला रस्ता करणे हे केवळ लेणीच नाही तर येथील लोकसंख्येसाठीही आवश्यक आहे.

याच वाटेवर अंभई जवळ वडेश्वराचे पुरातन महादेव मंदिर आहे. तेही पुरातत्त्व खात्याने नोंदीकृत केले आहे. त्या ऐतिहासिक वास्तुसाठीही रस्ता गरजेचा आहे.  

प्रत्यक्ष लेणी आणि त्या परिसरांतील घाण, आतमध्ये मोकाट जनावरे शिरून त्यांनी टाकलेले शेणाचे पोवटे, वटवाघळांनी केेलेली घाण या तर अजून वेगळ्या बाबी. पण इथपर्यंत येण्यासाठी आपण किमान वाटही करू शकत नाही याला काय म्हणावे? बारमाही रस्ते ही बाब महत्त्वाची आहे. मग याचा उपयोग करून इथे बाहेरचे लोक येवू शकतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. चलनवलन वाढू शकते. आणि त्यामुळे त्या भागातील अर्थकारणाला गती येवू शकते. पण आपण याचा विचार करत नाही. 

आम्हाला वाट दाखविणारे अक्रम भाई हौसेने आलेल्या पर्यटकांना लेणी दाखवतात, किल्ला दाखवतात, डोंगरावर फिरून आणतात. त्यांच्याच छोट्याश्या झोपडीवजा घरामसोर बसून चहाची खाण्याची व्यवस्था कुणी सांगितले तर ते करतात.  ही सामान्य माणसे आणि व्हिन्सेंट सारखे परदेशी पर्यटक/अभ्यासक विनातक्रार हे सर्व करत आहेत. आणि ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार आहेत, सत्ता आहे ते मख्ख बसून आहेत. 

केवळ सरकारच नव्हे तर त्या त्या परिसरांतील लोकांची अनास्था पण याला कारणीभूत आहे. किमान स्वच्छता, किमान सोयी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकते. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करू शकते. 


अजिंठा डोंगराचा दिडदोनशे किलोमिटरचा पट्टा हा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरांत अभयारण्ये, लेण्या, मंदिरे, किल्ले दर्‍या डोंगर धबधबे असे पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत. सर्व परिसरांत अग्रक्रमाने बारमाही चांगले पक्के रस्ते पहिल्यांदा निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं या परिसरांत फिरले तरी आनंदाची अनुभूती सामान्य पर्यटकांना होवू शकते. आधी आपण आपल्या मनातील अनास्थेवर मात करू. मग स्थानिक प्रतिनिधींवर दडपण आणू. आणि मग राज्य व केंद्र सरकारवर दबाव तयार करून हा परिसर विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करूया. परत कुणी व्हिन्सेंट सारखा परदेशी हौशी पर्यटक/अभ्यासक रस्ता नाही म्हणून शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून पडला असे व्हायला नको.      

(फोटो सौजन्य अॅक्विन टूरीझम, या भागातील भटकंतीसाठी मला छोट्या भावासारख्या असलेल्या नीलेश महाजनचे विशेष धन्यवाद)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

  वेताळवाडी : अजिंठा डोंगरातील एक दुर्लक्षीत किल्ला !



उरूस, 15 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगर रांगांतील रूद्रेश्वर लेणी, जंजाळा किल्ला व घटोत्कच लेणी यांवर मी याच सदरात लिहीले होते. त्याच मालिकेतील हा पुढचा लेख. संपूर्ण तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे शाबूत असलेला अजिंठा डोंगर रांगेतील किल्ला म्हणजेच वेताळवाडीचा किल्ला. औरंगाबाद अजिंठा रस्त्यावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांवपासून डाव्या बाजूला एक  रस्ता फुटतो. हा रस्ता उंडणगाव मार्गे सोयगांवला जातो. याच रस्त्यावर हळदा घाटात तीन्ही दिशेने डोंगर रांगांनी वेढलेला असा हा वाडीचा किल्ला.  


किल्ल्याची संपूर्ण तटबंदी लांबूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. भोवताली डोंगर रांगा आणि मध्यभागी मोदक ठेवावा असा एक डोंगर. लांबट आकारात पसरलेला भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. यादव राजा भिल्लम याच्या काळातील हा किल्ला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. किल्ल्यावर एक तोफ पण सापडलेली आहे. तिच्यावरची चिन्हे आणि दरवाज्यावरची चिन्हे यांवरून किल्ला यादव काळातील असल्याची पुष्टी मिळते. 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. त्याची रचना इतकी अवघड आहे की शत्रूला सहजा सहजी मुख्यद्वार सापडू नये. हल्ला करण्यासाठी दरवाजा समोर जराही जागा मोकळी सोडलेली नाही. परिणामी या दरवाजासमोर शरण गेल्याशिवाय कुणाला त्यातून प्रवेशच मिळू शकत नाही. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार, अगदी त्याला लागूनच असलेले द्वारपालाचे दालन, मुख्य बुरूजावर टेहेळणीसाठी बांधलेली झरोके झरोके असलेली माडी. या गॅलरीवजा सज्जाच्या कमानीतून समोरचे डोंगर आणि त्याच्या पायाशी असलेले तळे हे दृश्य मोठे कलात्मक दिसते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वार आणि परिसराची डागडुजी पुरातत्त्व खात्याकडून चांगल्या प्रकारे करण्यात आलेली दिसून येते आहे. किल्ल्यावर सापडलेली एक मोठी लोखंडी तोफ लाकडी गाड्यावर बुरूजावर मांडून ठेवली आहे. किल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याची दुसरी तटबंदी लागते. ही संपूर्ण नसली तरी बर्‍याच जागी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या एका महालाचा बुरूज पडक्या अवस्थेत आहे.


किल्ल्यावर धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालनं चांगल्या अवस्थेतील आहेत. शिवाय एक अतिशय देखणे असे दगडी चिर्‍यांचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला पूर्वेला तोंड करून ‘जलमहाल’ आहे. याच्या तीन भिंती शिल्लक आहेत. दगडांवरील सुंदर कोरीव काम कोण्या एके काळी हा महाल अतिशय रसिकतेने उभारलेला असावा याची साक्ष देतात.

या किल्ल्यावरील सर्वात देखणी आणि सुंदर जागा म्हणजे उत्तर टोकावर असलेल्या हवामहलच्या शिल्लक चार कमानी. मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणार्‍या डोंगरकड्यावरील टोकाचा बिंदू म्हणजे ही जागा. एकेकाळी सुंदर असा हवामहल या ठिकाणी होता. त्याची पडझड होवून महालाच्या चार कमानी आणि दोन भिंतीच आता शिल्लक आहेत. या कमानींमधून दूरवर पसरलेला खानदेशचा परिसर, सर्वत्र पसरेली शेते, जागजागी पाणी साठून तयार झालेली सुंदर तळी असे मोठे नयनरम्य दृश्य दिसून येते. याच किल्ल्याच्या डाव्या अंगाला सोयगाव धरणाचा पाणीसाठा डोळ्याचे पारणे फेडतो. किल्ल्याच्या उजव्या अंगाला प्रसिद्ध अशी रूद्रेश्वर लेणी आणि धबधबा आहे. 


अजिंठा डोंगराची नैसर्गिक अशी भव्य संरक्षक भिंत औरंगाबाद आणि जळगांवला विभागते. तेंव्हा या डोंगराच्या कड्यांवर चार किल्ले बांधल्या गेले आहेत. त्यांची रचना टेहेळणीचे संरक्षक किल्ले अशी असावी. हे चार किल्ले म्हणजे वाडिचा किल्ला, त्याच्या बाजूचा जंजाळ्याचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला आणि गवताळा अभयारण्या जवळचा अंतुरचा किल्ला. वाडीच्या किल्ल्यावरून जवळचा जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणीचा डोंगर दिसतो.  

वाडीच्या किल्यावर हवामहलच्या बाजूने खाली उतरल्यास किल्ल्याचा उत्तरेकडचा म्हणजेच सोयगावच्या दिशेचा दरवाजा आढळतो.  दरवाजापासून आतपर्यंत डाव्या बाजूला ओवर्‍या ओवर्‍यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. कदाचित हा भाग किल्ल्यावरील बाजारपेठेसारखा असावा. उत्तरेकडील दरवाजापासून डाव्या हाताने तटबंदीला लागून चालत गेले तर आपण परत दक्षिणेकडील मुख्य दरवाजापाशी येतो.

वाडिच्या किल्ल्याजवळ डोंगरात उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) डोंगरात काही रिकाम्या लेण्या आहेत. हा परिसर अजिंठा लेणीच्या कालखंडात लेणी कोरण्यासाठी तपासला गेला होता. दगडा हवा तसा सापडला नाही म्हणून ही लेणी सोडून दिलेली दिसते. हौशी पर्यटकांसाठी अशा झाडांत लपलेल्या लेण्यांचा शोध घेणे हे एक आव्हान असते. 

वाडिचा किल्ला जून ते डिसेंबर काळात एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. किल्ल्यावरील माजलेली झाडी, झुडपे काढणे, हवामहल ते उत्तर दरवाजापर्यंत जाणारी चांगली पायवाट तयार करणे, मुख्य तटबंदीला लागून पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पायवाट तयार करणे आवश्यक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी डागडुजी झाली आहे तशीच किल्ल्यावरील इतर भग्न अवशेषांची व्हायला हवी. 

जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वाडीचा किल्ला, रूद्रेश्वर लेणी, रूद्रेश्वर धबधबा, वडेश्वर महादेव मंदिर, मुर्डेश्वर देवस्थान असा हा अगदी एकमेकांच्या जवळ असलेला परिसर. औरंगाबादेहून पहाटे निघून जंगलात एक दिवसाचा मुक्काम (तशी चांगली सोय उंडणगावात व जवळच गणेशवाडीत उपलब्ध आहे) केल्यास दोन दिवसात सर्वच ठिकाणं पाहणं शक्य होते.

जळगांव कडून सोयगांव मार्गे आल्यास तर हा परिसर अजूनच जवळ आहे. अगदी अर्ध्याच अंतरावर आहे.

पर्यटनाचा एक वेगळा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला आहे. प्रत्येक भारतीयाने वर्षातून किमान एकदा देशांतर्गत पर्यटनासाठी गेले पाहिजे. कोरोना काळात जास्त खर्चिक पर्यटन करण्यापेक्षा आपल्या जवळच्या अशा स्थळांना भेटी दिल्यास हा उद्देश सफल होईल.

या प्रदेशात हौशी पर्यटकांसोबतच अभ्यासक विद्यार्थी आल्यास त्यांच्याकडून इतिहासातील अजून काही लपलेल्या बाबींवर प्रकाश पडू शकतो.

(छायाचित्र सौजन्य -ऍक्वीन टूरिझम)  

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

 

  औरंगाबाद परिसरांतील अपरिचित 50 पर्यटनस्थळे!


(ऑटोमन कबर खुलताबाद)   

उरूस, 21 ऑक्टोबर 2020 

 घरदार विकून एक बोट खरेदी करून दोन वर्ष नदीत भटकंती करणार्‍या नेदरलँड मधील कुटूंबाबाबत डॉ. राघवेंद्र अष्टपुत्रे या मित्राने फेसबुकवर छोटी पोस्ट टाकली. त्यावर बर्‍याच प्रतिक्रिया उमटल्या. खरं तर घरदार विकून वगैरे अशी काही गरज नाही. अगदी सगळं सांभाळून या कोरोना आपत्तीच्या काळात जवळपासच्या सुंदर ठिकाणांना भेट देणे सहज शक्य आहे. अगदी जास्त पैसेही खर्च न करता. अशी मांडणी मी केल्यावर अशा ठिकाणांची  यादी दे अशी मागणी काही मित्रांनी केली. हा विषय तसाही समाज माध्यमांवरच चर्चिला गेला होता. तेंव्हा प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं वगळून काहीशी अपरिचित स्थळं हौशी पर्यटकांसाठी सुचवीत आहे. भटकंतीचाही व्यवसायीक पातळीवर विचार करणार्‍यांनी इकडे फिरकू नये. त्यांचे व्यवसायीक समाधान करण्याची माझी ताकद नाही. 

1.शेंदूरवादा :  औरंगाबाद पासून वाळूजमार्गे डावीकडे गेल्यास शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर गणेश स्थान आहे. येथेच मध्वमुनीश्वरांचा आश्रम आहे. गावात एक सुंदर विठ्ठल मुर्ती असलेले मंदिर आहे. (मंदिर साधेच जूने लाकडी माळवदाचे आहे)

2. कायगांव टोका : औरंगाबाद नगर रस्त्यावर कायगांव टोका येथे प्रवरा गोदावरी संगमावर सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिरा जवळच इतर पाच मंदिरे आहेत ती सहसा बघितली जात नाहीत. शिवाय याच मंदिराचा नदीकाठ एक भुईकोट किल्लाच आहे. नदीचे पाणी उतरल्यावर घाटाच्या ओवर्‍या पहायला मिळतात.

3. कर्णसिंहाची छत्री : वाळूज मधील गोलवाडी येथे करणसिंहाची छत्री आहे. आठ दगडी कोरीव स्तंभावरची ही छत्री शेतात आहे. फारसे कुणीच इकडे फिरकत नाही. याच करणसिंहाचा एक पडका महाल कर्णपुर्‍यात आहे. देवीच्या मंदिराच्या जवळ जैन मंदिरापासून पुढे गेल्यावर शेतात एक बारव आहे. भाजलेल्या वीटांची ही बारव तीला चार ओवर्‍या आहेत. 

4. खंडोबा मंदिर : सातार्‍यात खंडोबाचे मंदिर हे अहिल्याबाईंच्या काळातील आहे. देव दर्शनाला जाताना आपण तिथले स्थापत्य पहातच नाही. एकवेळ केवळ स्थापत्य बघण्यास या मंदिराला भेट दिली पाहिजे.

5. साई मंदिर : देवळाई चौकातून उजवीकडची वाट साई टेकडी कडे जाते. या परिसरांतील कितीतरी ठिकाणं अतिशय निसर्गसंपन्न अशी आहेत. साई मुर्तीच्या अगदी समोरच्या टेकडीवर दर्गा आहे. साई मंदिराच्या मागील भागात अतिशय चांगली जागा वन पर्यटनासाठी आहे. हौशी जंगल पर्यटकांनी जरूर जावे.

6. साई टेकडी घाट : साई टेकडीपासून जरा पुढे गेल्यावर एक छोटासा घाट लागतो. तो परिसर अतिशय रम्य आहे. सिंदोण भिंदोण तलावाच्या परिसरांतही इथून जाता येते. 

7. कचनेर : साई टेकडीच्या रस्त्यानीच पुढे गेल्यावर आपण सरळ कचनेर येथे पोचतो. तेथील जैन मंदिर आणि त्यातील मुर्ती  इथेही भेट देता येईल. 

8. भालगांव : कचनेर पासून मुख्य बीड रस्त्याला लागल्यावर परत औरंगाबादला येताना उजव्या हाताला भालगांव म्हणून एक छोटे गांव आहे सुखना नदीच्या काठावर. या गावात समर्थ रामदासांनी स़्थापन केलेल्या रामाच्या मुर्ती आहेत. जूना वाडा वाटावा असे हे मंदिर आहे.

9. इस्लाम खान मकबरा :  औरंगाबाद-जळगांव रस्त्यावर ताज हॉटेल जवळ मौलाना आझाद महाविद्यालयाच्या परिसरांत इस्लाम खान यांचा मोठा मकबरा आहे. त्याची डागडुजी रंगरंगोटी संस्थेने चांगल्या पद्धतीने केली आहे. या मकबर्‍याचे प्रवेश द्वार दक्षिण दिशेला आहे. इतका भव्य आणि सुंदर दरवाजा औरंगाबादेत दुसरा नाही. मुलांच्या वस्तीगृहातून या दरवाजाकडे जाता येते.

10. जयसिंह छत्री : ताज हॉटेल समोरून डावीकडे वानखेडे नगर कडे जाणारा रस्ता जयसिंहाच्या छत्रीकडे जातो. 32 सुंदर दगडी खांबांवर हीचे छत तोलून धरले आहे. छत्रीच्या तळघरात महादेवाचे मंदिर आहे. 

11. हर्सूलची देवी : हे ठिकाणही पाहण्यासारखं आहे. गर्दीचा दिवस टाळून तिथे एखाद्या दुपारी संध्याकाळी गेलं तर हा शांत रम्य परिसर आवडू शकतो. देवीचे मुळ मंदिरही जूने आहे. 

12. हिमायत बाग : ही जागा अगदी जवळ असूनही दूर्लक्षीली जाते. येथील महालाची डागडुजी करून घेतली व कारंजे दुरूस्त केले तर हा परिसर एक बगीचा म्हणून अजून रम्य वाटू शकतो. 

13. सारोळा : औरंगाबाद जळगांव रस्त्यावर चौक्यापासून जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला सारोळा म्हणून पाटी लागते. हे एक छोटे हिलस्टेशन आहे. या जागेपासून दुधना नदीचा उगम होतो. या उंच जागेवरून औरंगाबाद शहराचा विस्तार दृष्टीक्षेपात येतो.

14. लहूगड नांदरा : चौक्याच्या अजून जरा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला लहुगड नांदरा अशी पाटी लागते. लहुगड हा एक छोटा किल्ला एकेकाळी होता. आता तिथे एक गुहेतील दगडी महादेव मंदिर आणि वर दगडात कोरलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी टाकं आढळतात. 

15. लिंगदरी : लहुगडाला वळसा घालून तो रस्ता परत औरंगाबादला पळशी मार्गे येतो. हा परिसर अतिशय रम्य आहे. वाटेवर तळं लागते. तसेच लिंगदरी नावाचा धबधबा आणि देवस्थानही आहे.

16. बालाजी मंदिर बाबरा :  फुलंब्रीच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूला बाबरा गावाकडे रस्ता वळतो. या गावात बालाजीचे जूने मंदिर आहे. मंदिराच्या ओवर्‍या, लाकडी खांब, माळवद एकदच चांगल्या अवस्थेत आहे. मंदिराला कमान आणि इतर दगडी बांधकाम राजस्थानी कारागिरांकडून विश्वस्त मंडळी करत आहेत. 

17. औरंगाबाद लेण्या : मकबर्‍याच्या पाठिमागे जाणारा रस्ता पुढे औरंगाबाद लेण्यांकडे जातो. मकबर्‍याला जाणारे खुप आहेत पण औरंगाबाद लेण्यांकडे फारसे कुणी फिरकत नाही. उजव्या बाजूच्या लेण्यात आम्रपालीचे अप्रतिम असे शिल्प आहे. गायन वादन नृत्य असा एकत्रित भारतातील पहिला संदर्भ याच लेण्यात आढळून आला आहे.

18. गोगा बाबा नविन लेण्या : गोगा बाबा टेकडीच्या पाठीमागे गेल्यावर आता नविन लेण्या सापडल्या असून लोकांनी त्याची साफसफाई केली आहे. ही जागा फार छान असं निसर्गसंपन्न ठिकाण आहे. 

19. सलाबत खान मकबरा : विद्यपीठ परिसरांत साई क्रिडा केंद्राकडे जाताना वाटेत डाव्या बाजूला सलाबत खानाचा मकबरा लागतो. हा मकबरा काहीसा पडक्या अवस्थेत असला तरी मुळ इमारत चबुतरा शाबूत आहे. मकबर्‍याला संपूर्ण चारही बाजूनी संरक्षक भिंत आहे. दक्षिण दिशेला मकबर्‍याचा सुंदर असा दगडी दरवाजा आहे. (ही खासगी मालमत्ता आहे.) 

20. नवखंडा पॅलेस :  भडकल दरवाजा जवळची ही वास्तू मलिक अंबरची आठवण सांगते. हा महाल आता काहीसा पडीक अवस्थेत आहे. पण त्याचा बराचसा भाग शाबूत आहे.

21. भांगसी माता गड : औरंगाबाद दौलताबाद रस्त्यावर दौलताबाद टी पॉईंटपासून डाव्या बाजूचा रस्ता रेल्वे लाईन क्रॉस करून सरळ जातो भांगसी माता गडाकडे. हे ठिकाण देवी ठिकाणा सोबत एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. वरपर्यंत जायला चांगल्या पायर्‍या केलेल्या आहेत. 

22. हमामखाना : देवगिरी किल्ल्याच्या समोर आणि पाठीमागे काही सुंदर ठिकाणं आहेत. त्यातील पहिलं आहे ते किल्ल्यच्या समोर असलेला हमामखाना. ही इमारत बाहेरून पडकी वाटत असली तरी आतून संपूर्ण व्यवस्थीत आहे. 

23. चांदबोधले समाधी : हमामखान्याला लागूनच जनार्दन स्वामींचे गुरू चांद बोधले या सुफी संताची समाधी आहे. चांद बोधले हे हिंदू असून त्यांची सुफी संप्रदायाने कबर बांधली व तिथे दरवर्षी यात्रा भरते. हिंदू संताचा दर्गा असलेले भारतातील एकमेव ठिकाण आहे. 

24. देवगिरी किल्ला तटबंदी :  याच परिसरांत किल्ल्याची संपूर्ण शाबूत अशी तटबंदी आहे. तिचे चार मोठे दरवाजे आहेत. हा भाग कधीच पर्यटकांकडून बघितला जात नाही. देवगिरी किल्ल्याकडून खुलताबादला जाताना ज्या दरवाजात नेहमी वाहतूक अडते. त्याला लागून जी तटबंदी आहे तीच्या कडे कडेने फिरल्यास हे चार दरवाजे आढळतील.

25. हातीमहल- मुसाफिरखाना : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे हात्तीमहल, मुसाफिर खाना या इमारती आहेत. मुसाफिरखान्याचा वरचा मजला पडलेला असला तरी तळघरसंपूर्ण शाबूत आहे. हातीमहल तर संपूर्ण शाबूत आहे. त्याच्या जीन्यावरून वर गच्चीवरही जाता येते.

26. रसोई माता मंदिर :  देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रसोई माता मंदिर आहे. यादवांचा खजिना सांभाळणारी देवता ‘हिरे माणकांची रास म्हणून ती रसोई माता’ अशी दंतकथा सांगतात.

27. खुफिया बावडी : देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागे केसापुरी रस्त्याला फतेपुर गावाजवळ एका शेतात खुफिया बावडी म्हणून सुंदर दगडी ओवर्‍या असलेली बारव आहे. 

28. केसापुरी धबधबा : याच रस्त्यानं पुढे गेल्यावर केसापुरी तांडा गावा जवळ तलाव आहे. शिवाय गावाजवळून पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर केसापुरी धबधबा आहे.

29.  निजामाची कबर : खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आणि भद्रा मारूती सर्वांना माहित आहे. पण या कबरी समोरच असलेल्या बुर्‍हानोद्दीन गरीब दर्ग्यात पहिला निजामाची कबर आहे. हा दर्गा ओवर्‍या ओवर्‍यांचे दगडी बांधकाम असलेला वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

30. लाल बाग अरबाज बेग कबर : बुर्‍होनोद्दीन दर्ग्याच्या बाजूलाच लाल बाग नावाची दरवाजापाशी अतिक्रमण केलेला पडलेला बगीचा आहे. त्यात एक पडिक अशी कबर आहे. त्यावरचे रंगकाम अजून बरेच शाबूत आहे. 

31.अरबाज बेग कबर :  लाल बागे जवळ कबरस्तान असून तिथे मिर्झा अरबाज बेग या सरदाराची मलिक अंबर कबरीची छोटी प्रतिकृती असलेली सुंदर सुबक कबर आहे. याच कबरीचा दक्षिण दरवाजा एका तलावापाशी उघडतो. हा परिसर अतिशय सुंदर असा बगीचा होवू शकतो.

32. खुलताबादला वळसा घालून वेरूळकडे जाताना उजव्या बाजूला बनी बेगम बाग लागते. ही वास्तू चांगल्या पद्धतीने जतन केल्या गेली आहे. औरंगजेबाच्या सुनेची इथे कबर आहे. मोठा भव्य दरवाजा यावास्तूला आहे. भक्कम तटबंदी संपूर्ण शाबूत आहे.

33. जर्जर बक्ष दर्गा : म्हैसमाळ कडे जाणारा रस्ता एका कमानीतून पुढे जातो आणि डाव्या बाजूला खुलता बादचा प्रसिद्ध उरूस ज्यांच्या नावाने भरतो त्या सुफी संत जर्जरी बक्ष यांचा दर्गा आहे. हा दर्गा जून्या वास्तूकलेचा नमुना आहे. 

34. मलिक अंबर कबर : जर्जरी बक्ष परिसरांत मलिक अंबरची सुंदर देखणी कबर आहे. शिवाय अजून 8 छोट्या मोठ्या कबरी आहेत. एक रिकामी कबर पण आहे. शिवाय डोंगरावर उंच एक मस्जिद आहे. ते ठिकाण या परिसरांत सर्वात उंच असे आहे. 

35. आटोमन कबर :  खुलताबाद वेरूळ रस्त्यावर डाव्या बाजूच्या डोंगरावर एक तुर्की पद्धतीचा वेगळाच मनोरा दिसून येतो. ही आहे ऍटोमन साम्राज्याचा सुलतानाची कबर. हैदराबादच्या निजामाची सून निलोफर हीच हा पिता. त्याच्यासाठी ही कबर बांधली पण त्याचा मृतदेह इकडे आणता आलाच नाही.  हे ठिकाण अशा नेमक्या ठिकाणी आहे की तेथून सर्व वेरूळ दृष्टीक्षेपात येते.  या कबरीसाठी खुलताबादच्या शक्कर चटाने का दर्गा इथून एक छोटी वाट जाते. शक्कर दर्गा हे ठिकाण पण पाहण्यासारखे आहे. 

36. परियोंका तालाब सुर्‍हावर्दी दर्गा:  खुलताबाद पासून डाव्या बाजूला एक रस्ता शुलीभंजन कडे जातो. या वाटेवर सुफींच्या सुर्‍हावर्दी परंपरेतील संतांचा एक दर्गा आहे. याच दर्ग्याच्या जवळ परियोंका तालाब म्हणून मोठे सुंदर तळे आहे. याच दर्ग्याच्या परिसरांत अंगणात एक स्वयंभू महादेव शाळूंका आहे. तिचीही नियमित पुजा होत असते.

37. शुलीभंजन :  या ठिकाणी नाथ महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली असे सांगितले जाते. हे एक छान हिलस्टेशन आहे. जून्या नाशिक रस्त्यावरून हे ठिकाण दिसते. तेथून डोंगरावर जाणारा रोपवे तयार केला किंवा पायर्‍या बांधल्या तर या परिसरांत पर्यटकांची गर्दी वाढेल.

38. गणेश लेणी :  खुलताबाद येथील मलिक अंबर कबरी जवळ प्रसिद्ध विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाजवळून एक वाट कैलास लेण्याच्या मागच्या बाजूला निघते. इथे फारसे ज्ञात नसलेले गणेश लेणे आहे. हा परिसर झरे, धबधब्यांनी अतिशय सुंदर असा बनलेला आहे.

39. मालोजी राजे समाधी :  वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी समोर शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची अतिक्रमाणाने वेढलेली सुंदर समाधी आहे. मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून मोकळ्या जागेत एक रिकामी कबर आहे. इथून जवळच जनार्दन स्वामी आश्रम परिसरांत एक राजस्थानी शैलीची अप्रतिम दगडी दोन मजली छत्री (समाधी) आहे.

40. अहिल्या बाईची बारव : अहिल्या बाईंनी उभारलेली एक अप्रतिम बारव घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळच आहे. बारव चौरस आकाराची असून तिला चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. बारवेत आठ छोटी मंदिरं असून लाल दगडांतील हे बांधकाम फार वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

41. मोमबत्ती तलाव व तीन कबरी : हिरण्य रिसोर्ट जवळ तीन कबरी आहेत. हिरण्य जवळचे तळेही खुप सुंदर आहे. त्या परिसराला भेट देताना या कबरीही जरूर पहा.

42. कडेठाणची महालक्ष्मी : औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडून उजव्या बाजूला कडेठाणकडे जाणारा रस्ता लागतो. या गावातील महामक्ष्मीचे मंदिर शिवकालीन बांधकाम असलेले अतिशय छान आहे.

43. जामखेड शिवमंदिर : औरंगाबाद पासून बीड रस्त्याला जाताना अडूळच्या जरा पुढे जामखेडची पाटी लागते. या गावात 12 व्या शतकांतील सुंदर असे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिराचा जिर्णाद्धार गावकर्‍यांनी केला असून परिसर छान ठेवला आहे.

44. जांबुवंत मंदिर : याच जामखेडला जांबुवंताचे एक मंदिर डोंगरावर आहे. हा परिसर निसर्गरम्य असा आहे.

45. रोहिला गड : औरंगाबाद बीड रस्त्यावर जामखेडच्या अलीकडेच रोहिला गडची पाटी लागते. हा जूना किल्ला असून आता फक्त काही अवशेषच शिल्लक आहेत. डोंगरावरचे ठिकाण म्हणून रम्य. 

46. त्वरीता देवी :  गेवराईच्या अलीकडे डाव्या बाजूला तलवाडा गावाकडे एक रस्ता जातो. इथे डोंगरावर त्वरीता देवीचे शिवकालीन मंदिर आहे. ही देवी म्हणजे विष्णुची शक्ती रूपात पुजा केली जाते अशी एकमेव आहे. मंदिर परिसरांतील दिपमाळा सुंदर आहेत. गावकर्‍यांनी मंदिर अतिशय चांगले ठेवले आहे. 

47. शहामुनीची समाधी :  गोदावरीच्या काठावर शहागड म्हणून जे गांव आहे त्या गावात महानुभाव संत शाहमुनी यांची समाधी आहे. समाधी अगदी गोदावरीच्या काठावर असून ही समाधी म्हणजे जून्या किल्ल्याचाच एक भाग आहे. समाधी जवळ प्राचीन जूना भव्य दरवाजा आहे. बाकी किल्ल्याचा बहुतांश भाग पडला आहे. 

48. दाक्षायणी देवी : लासुरची दाक्षायणी देवी हे नदीकाठी असलेले एक प्रेक्षणीय असे स्थळ आहे. याच गावात गणपतीचे शेत म्हणून एक ठिकाण असून तिथे उघड्यावर गणपतीचे मुर्ती आहे.

49. रावणेश्वर मंदिर : शिवूर मध्ये एक रावणेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर यादव काळातील आहे. 

50. जटवाडा : जटवाडा इथे जैन मंदिर आहे. शिवाय इथून एक वाट दौलताबादपाशी निघते. आता समृद्धी मार्गासाठी काम इथे चालू आहे. हा घाट सुंदर आहे.

तरूण पत्रकार मित्र संकेत कुलकर्णी याने सुचवलेली ठिकाणे

51. एकलरा देवी : औरंगाबाद करमाड रस्त्यावर उजवीकडे वळल्यावर हे सुंदर ठिकाण आहे. 

52. सातारा डोंगरातील पठारावर असलेले खंडोबा मंदिर. 

अभिजीत शेजूळ मित्राने सुचवलेले ठिकाण

53. चिंचखेड खंडोबा मंदिर : पाचोड अंबड रस्त्यावर हे पुरातन खंडोबा मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार गावकर्‍यांनी चांगला केला असून मंदिराचे सुंदर दगडी खांब, सभागृह शाबूत आहे. बाह्यभाग नव्याने बांधण्यात आला आहे.

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  

  सिमेंटने गिळले अंभईचे प्राचीन मंदिर


उरूस, 5 ऑक्टोबर 2020 

जून्या मंदिरांबाबत दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एक तर उद्ध्वस्त प्राचीन मंदिरांचे अवशेष इततस्त: विखुरलेले असतात. यातील काही दगड लोकांनी सरळ उचलून नेले आणि त्यांचा वापर घरगुती कामांसाठी (धुणे धुण्यासाठी) केला किंवा बिनधास्तपणे बांधकामांसाठी त्यांचा वापर केलेला दिसून येतो. तर काही ठिकाणचे दगड दुसर्‍याच मंदिराच्या बांधकामासाठी वापरले (बीडच्या कंकालेश्वराचे मोठे ठळक उदाहरण आहे).

दुसरी विचित्र अडचण अशी आहे की जिर्णोद्धार करण्याच्या नावाखाली अशा मंदिरांची नविन पद्धतीने सिमेंट वीटांत बांधणी केली जाते. त्यात पुरातन अवशेष नष्ट होतात. त्यांची हेळसांड होते. सौंदर्यदृष्ट्याही हा जोड विजोडच ठरतो. महत्त्वाचे म्हणजे मंदिरांवरची नक्षी छोटी शिल्पे त्या द्वारे सांगितलेली गोष्ट त्यातील गुढ अर्थ याची अपरिमित हानी होते. काही ठिकाणी जून्या दगडी मंदिराला रंग/वॉर्निश फासून विद्रूपता आणली गेली आहे. 

अंभई (ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) येथील प्राचीन वडेश्वर शिव मंदिराबाबत दुसर्‍या प्रकारची अडचण आहे. 

डॉ. देगलुरकर, डॉ. प्रभाकर देव सारख्या विद्वानांनी या प्राचीन मंदिराचे महत्त्व आपल्या ग्रंथांत संशोधन प्रकल्पांत नमुद केले आहे. यावर सविस्तर लिहून ठेवले आहे. हे मंदिर बहुतांश उद्ध्वस्त झाले होते. मुळ पाया मातीत बुजून गेलेला होता. मुखमंडप आणि मुख्य मंडप कधीच नष्ट झाले होते. तिन गर्भगृहे आणि त्यांच्या बाह्य भिंती तेवढ्या शाबुत होत्या. शिखरेही ढासळलेली होती. गावकर्‍यांनी मंदिराचा जिर्णाद्धार करताना सिमेंटचे बंदिस्त सभागृह समोर बांधले. त्यांचा हेतू आणि तळमळ गैर नव्हती. पण त्यामुळे मंदिराचे मुळ रूपच नष्ट झाले. 

मराठवाड्यात एक गर्भगृह असलेली मंदिरे अकराव्या शतकातील अगदी मोजकीच अशी आहेत. त्यानंतर तिन गर्भगृह असलेली त्रिदल मंदिर शैली विकसीत झाली. अशा दुर्मिळ प्राचीन मंदिरापैकी एक म्हणजे वडेश्वरचे हे शिव मंदिर. 


मंदिराच्या तिन्ही गर्भगृहांवर अप्रतिम असे कोरीव काम आहे. मुख्य गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. चार पद्धतीच्या द्वारशाखा आढळून येतात. मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर किर्तीमुख आहे. ललाटबिंबावर गणेशाची मुर्ती कोरलेली आहे. चालुक्य शैलीचे या गर्भगृहाचे छत आहे. गर्भगृहाच्या अंतराळात देवकोष्टके आहेत. (अंतराळ म्हणजे मुख्य मंडप आणि गर्भगृह यांना जोडणारी जागा.) यात ब्राह्मी, सरस्वती, वैष्णवी यांच्या मुर्ती आहेत. हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. 


डॉ. देगलुरकरांनी यातील एका विष्णु मुर्तीचा विशेष असा उल्लेख केला आहे. विष्णुची जी विविध नावे आहेत त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीच्या मुर्ती मंदिरावर कोरलेल्या असतात. यातील उपेंद्र नावाने ओळखली जाणारी अतिशय दुर्मिळ अशी मुर्ती या मंदिरावर आढळून आली आहे. मुख्य गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या वर मध्यभागी ही उपेंद्र विष्णुची मुर्ती आहे. उपेंद्र मुर्तीची वैशिष्ट्य म्हणजे वरच्या उजव्या हातात गदा, खालचा उजवा हात वरदमुद्रेत, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात पद्म असते. 


या मंदिरातील काही मिथून शिल्पे परिसरात मातीत पडली आहेत. मुख्यमंडपाचे काही अवशेषही तसेच इतस्तत: विखुरले आहेत. मुख्य गर्भगृहासमोर नंदी नाही. तो मंदिराबाहेर एका वेगळ्याच चौथर्‍यावर दिसतो आहे. लक्षात असे येते की हे मंदिर मुलत: शिवाचे असण्याची शक्यता नाही. ते देवीचे असावे किंवा विष्णुचे. (असे बहुतांश मंदिरांच्या बाबत झाले आहे. आक्रमणाच्या भितीने मुख्य मुर्ती हलवल्या गेली. कालांतराने तेथे घडविण्यास सोपी असलेली महादेवाची पिंड बसविण्यात आली.)   


मंदिराचा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवला आहे. मंदिरासमोर आणि बाजूला पेव्हर्स ब्लॉक बसवून त्यांनी जमिन समतल केली आहे. पण मागचा भाग व आपण प्रवेश करतो त्याची विरूद्ध बाजू मात्र अजूनही खराबच आहे. त्याच ठिकाणी शिल्पं विखुरलेली आहेत. 


जून्या मंदिरांचे जतन चांगल्या पद्धतीने कसे करता येवू शकते याचे तीन नमुने याच मराठवाड्यात समोर आहेत. अन्वा  (ता. भोकरदन जि. जालना) येथील मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्त्व विभागाने चांगल्या पद्धतीने केला आहे. सर्व परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. आधारासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. निखळलेले दगड नीट बसवले आहेत. जिथले दगड सापडत नाहीत तिथे त्याच आकारात नविन दगड तासून बसवलेले आहेत. (पुरातत्त्व खात्यानेच गडचिरोली येथील मार्कंडा मंदिराचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले आहे. अंबाजोगाई जवळ धर्मापुरी येथील मंदिराचे कामही याच खात्याने चांगले केले आहे.)

दुसरे अतिशय चांगले काम इंटॅक्ट या देश पातळीवरील नावाजलेल्या संस्थेने होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथे केले आहेत. दोन मंदिरांचा जिर्णोद्धार अतिशय शास्त्रीय पद्धतीने एक एक दगड हुडकून त्याची जागा शोधून तिथे तो बसवून करून दाखवला आहे. 

तिसरे काम जामखेड (ता. अंबड, जि. जालना) येथील खडकेश्वर शिव मंदिराबाबत गावकर्‍यांनी करून दाखवले आहे. साध्या दगडी घोटीव दगडांव बाह्य भिंत उभारून मंदिर सावरून धरले आहे. 

कुठल्याही जून्या मंदिराचे काम करावयाचे असल्यास कृपया त्या विषयातील तज्ज्ञांना विचारून करा. सिमेंट वीटांचा वापर करून रसायनिक रंग दगडांना फासुन विद्रुप करू नका. काहीच जमणार नसेल तर जसे आहे तसेच ठेवून किमान जागेची स्वच्छता आणि जवळपास विखुरलेले दगड शिल्पं एका ठिकाणी आणून ठेवले तरी पुरे. जनावरे येवू नयेत म्हणून जागेला संरक्षक असे तारेचे कुंपण घालण्यात यावे. तातडीने इतके तरी काम करा. शिवाय गावात इतरत्र आढळून येणारी शिल्पे कोरीव दगड मंदिर परिसरांत आणून ठेवा. 

दृश्य स्वरूपात जी मंदिरे किमान अस्तित्वात आहेत ज्यांचा अभ्यास झाला आहे अशा 11 व्या ते 14 व्या शतकांतील महाराष्ट्रातील 93 मंदिरांची यादी डॉ. गो.ब. देगलुरकरांनी आपल्या ग्रंथात दिली आहे. या शिवाय मराठवाड्यातील अगदी किमान अवशेष सापडले अशी ठिकाणे शोधून त्यांची एक यादी डॉ. प्रभाकर देव यांनी दिली आहे. अशी 114 ठिकाणं/ मंदिरे आहेत. आपआपल्या गावांत अशी पुरातन मंदिरे अवशेष कोरीव दगड वीरगळ, सतीचे दगड काही आढळूनआले तर आम्हाला जरूर कळवा. त्यांची छायाचित्रे पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिरांचा कोश तयार करण्याची गरज आहे. या कामासाठी सहकार्य करण्याचे विविध संस्था/ व्यक्तींनी मान्य केले आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू या. हे काम संपूर्ण महाराष्ट्रात करावयाचे आहे. माझ्या स्वत:च्या मर्यादांमुळे सध्या मी मराठवाड्यात फिरतो आहे. पण तशी प्रदेशाची मर्यादा या कामाला नाही.    

(छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)

    

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

  ऐतिहासिक स्थळांबाबत अनास्थेचा रोग !


उरूस, 10 ऑगस्ट 2020 

 औरंगाबाद परिसरांतील एका पुरातन बारवेचा फोटो काल फेसबुकवर टाकला. हे ठिक़ाण कोणते ओळखा? असा प्रश्‍न विचारला. शंभर जणांनी तो फोटोला लाईक केले, 16 जणांनी कॉमेंट केल्या. पण कुणालाच ती जागा ओळखता आली नाही. केवळ दोन जणांना नेमके त्याच दिवशी तेही आमच्या मागेपुढे तिथे गेले होते म्हणून ओळखता आले. 

एखादी जागा परिचित नाही हे पण एकवेळ आपण समजू शकतो. पण सोबत दुसरा एक अनुभव फार खंत वाटावी असा होता. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मागच्या बाजूला एक मजबुत दगडी महाल आहे. त्या ठिकाणाची दुरवस्था पाहून मन हेलावून गेले. त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंबाबत काही एक अनास्थेचा रोग आपल्याला जडला आहे की काय असे वाटायला लागले. वर्षाच्या सुरवातीलाच चारठाण गावात एक ‘हेरिटेज वॉक’ आम्ही  डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी आणि डॉ. प्रभाकर देव यांच्या उपस्थितीत व त्या परिसराचे अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केला होता. त्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात देगलुर जवळ होट्टल येथे होट्टल महोत्सवा निमित्त जाणं झालं होतं. तेंव्हाही तिथे असल्या मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराची अवस्था पाहून मन हेलावले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे इंटॅकने तिथे चालू केलेले काम प्रा. डॉ. सुरेश जोंधळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. 

औरंगाबाद पासून दौलताबाद कडे जाताना देवगिरी किल्ल्यासाठी वळताना अगदी अलिकडेच मुख्य रस्ता सोडून डावीकडे एक वाट कमनीतून गावात शिरते. त्या वाटेने  केसापुरी रस्त्याला पुढे जाताना फतियाबाद नावाचे एक छोटे गाव लागते. या गावाच्या पाटीपाशीच मुख्य रस्त्यापासून जेमतेम 200 मिटर अंतरावर शेतात वर छायाचित्र दाखवले आहे ती दगडी बारव आहे. या बारवेला ‘खुफिया बावडी’ असे म्हणतात. डॉ.दुलारी गुप्ते कुरेशी यांच्या ‘दौलताबाद फोर्ट’ या इंग्रजी पुस्तकात हीचा उल्लेख आहे. त्या भागात बोली भाषेत या बारवेला ‘चोर बावडी’ असे म्हणतात. हीची रचना संपूर्णपणे जमिनीच्या आतच असल्याने हीचे कसलेच अस्तित्व दुरून ओळखू येत नाही. दगडी पायर्‍या उतरून आत उतरतो तेंव्हा पाताळात उतरतो आहोत असेच भासते. अर्ध्या पायर्‍यांवर आल्यावर दोन्ही बाजूच्या ओवर्‍यांवर कडे जाणार्‍या दोन दिशांच्या पायर्‍या लागतात. आणि मुख्य पायर्‍या खाली पाण्याकडे उतरत जातात. बारवेच्या तिन्ही बाजूला तीन कमानींच्या भक्कम सुंदर ओवर्‍या आहेत. पाण्यात उतरणार्‍या पायर्‍यांच्या विरूद्ध दिशेला ज्या तिन ओवर्‍या आहेत त्या कमानी बाकी दोन पेक्षा जास्त मोठ्या आहेत. त्यामुळे त्या भागात कमानंींचा एक टुमदार छोटा महालच तयार झाला आहे. 

बारवेचे सगळे बांधकाम भक्कम आहे. भरपूर पाण्याने ही बारव भरलेली आहे. बारवेच्या काठावर सुगरणीचे सुंदर खोपे आहेत. आम्ही जेंव्हा ही बारव पाहण्यास गेलो होतो, (रविवार 9 ऑगस्ट 2020) तेंव्हा सुगरण पक्षाचा  गोड किलबिलाट विहीरीत भरून राहिला होता. (फोटो .सौजन्य:आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी) खुफिया बावडी ही जागा सोमनाथ मुळे आणि स्वप्नील चक्रे यांच्यामुळे आमच्या दृष्टीपथात आली.   

केसापुरी रस्त्याला लागताना सुरवातील देवगिरी किल्ल्याची मजबुत तटबंदी आणि भक्कम दरवाजा ओलांडला की डाव्या बाजूला दोन जून्या इमारती व संरक्षक भिंतीची रस्त्याकडेची बाजू दिसायला लागते. 

यातील एक इमारत म्हणजे हाथीमहाल. म्हणजेच हत्ती बांधायची जागा. ही इमारत संपूर्ण मजबूत अवस्थेत आजही उभी आहे. रस्त्याच्या बाजूने तिची भक्कम दगडी भिंत दिसते. त्यात भरीव अशा तीन कमानी दिसतात. आतल्या बाजूला इमारतीचे भव्य प्रवेशद्वार आहे. हा भाग झाडींनी संपूर्ण वेढलेला आहे. अगदी दरवाज्या समोरही दाट झाडी आहे. आत शिरायचा प्रयत्न केला तर काटे ओरबाडून घेत जावू लागते. आत भव्य अशी रूंदीच्या तिप्पट लांबी असलेला महाल आहे. हत्ती बांधता याव्यात अशा लोखंडी कड्या भिंतीत आहेत. जमिनला फरशी केलेली नाही. एरव्ही अशा मोठ्या भक्कम इमारतींना उंचावरचे जोते आणि जमिनीला घडीव दगडाची फरसबंदी असतेच. इमारतीच्या पूर्वेकडच्या भिंतीतून गच्चीवर जाण्यासाठी भक्कम दगडी जिना आहे. महालाच्या पश्चिमेला मोठी कमानेदार खिडकी किंवा छोटा दरवाजाच शोभावा अशी रचना आहे. (हाती महालाचा फोटो सोबतच आहे.)

याच हाथी महालाच्या पूर्वेला काटकोनात मुसाफिरखाना किंवा रंगमहाल नावाची वास्तु उभी आहे. तिच्या पहिल्या मजल्याची संपूर्ण पडझड झालेली आहे. पण तळमजला मात्र भक्कम आहे. तळमजल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत. आणि तेही छोटे. तेंव्हा हा भाग धान्य साठवणुकीसाठी, स्वयंपाकघरासाठी, नौकरांच्या राहण्यासाठी असावा. 

हाथी महाल, रंगमहाल हा सगळा परिसर बेवारश्यासारखा आहे. मोकाट जनावरांचा वावर, बेफाम वाढलेल्या जंगली काटेरी वनस्पती, वटवाघळांनी केलेली घाण, गायी म्हशींच्या शेणांनी इमारतींत झालेली दलदल, चिखल पाहून मन सुन्न होते. या महत्त्वाच्या वास्तुंची डागडुजी आपण जेंव्हा करू तेंव्हा करू. पण जागेची किमान साफसफाई, तारांचे संरक्षक कुंपण, देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एखाद्या कर्मचार्‍यांची नेमणुक या साध्या गोष्टी का केल्या जात नाहीत? 

15 ऑगस्टला आपण 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देवगिरीचा पराभव झाला आणि आपल्या देशावर परकियांचे हल्ले सुरू झाले. आणि तेथपासून पराभवाची एक मालिकाच  सुरू झाली. 15 ऑगस्टला आपण निर्णायकरित्या  स्वांतत्र्य मिळवले. आपल्या पराभवाची देवगिरी ही खुण होती जी आपण 15 ऑगस्टला बदलून टाकली. मग या परिसरांत किमान साफसफाई आणि सौंदर्यदृष्ट्या काही एक रचना बाग बगीचा करण्याचे आपल्याला 15 ऑगस्टच्या निमित्ताने का सुचत नाही? 

याच परिसरांत पुढे केसापुर तांडा या गावाजवळ सुंदर असा धबधबा आहे. निसर्ग संपन्न, ऐतिहासिक महत्त्व असलेला हा सगळा परिसर पाहण्यासारखा आहे. 

शासकीय पातळीवर जे काही करता येण्यासारखे आहे त्यासाठी आपण दबाव निर्माण केला पाहिजे. पण त्या सोबतच आधी स्थानिक पातळीवरील पर्यटन प्रेमी, इतिहास प्रेमी, निसर्ग प्रेमी यांनी एकत्र येवून जनजागृती केली पाहिजे. स्थानिक प्रशासनाला विनंती करून किमान सोयी साफसुफ येणार्‍या पर्यटकांसाठी चहा नाश्ता याची सोय कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. महिलांसाठी स्वच्छतागृहे फार आवश्यक आहेत. स्थानिक लोकांना आम्ही बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी सगळे सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. व्हिन्सेंट हा आमचा फ्रेंच मित्र अश्या फारश्या परिचित नसलेल्या ठिकाणाबाबत सदैव उत्सुक असतो. त्याचा उत्साह बघून मला स्वतःलाच लाज वाटत राहते. कारण त्यामानाने आपण आपल्याच अश्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारश्याबाबत जागरूक नसतो. 

15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूची जी ऐतिहासिक स्थळे असतील त्यांची किमान माहिती घेवू. तिथे भेटी देवू. सगळ्यांनी मिळून कोरोना सोबतच ऐतिहिासिक स्थळांबाबतची ‘अनास्था’ या संसर्गजन्य रोगाच्या निवारणासाठी काम करण्याची शपथ घेवू.     

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती


उरूस, 18 जानेवारी 2021 

औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते. 

मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्‍या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्‍याने उपसता येते. बारवेला पायर्‍या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्‍याची गरज नाही. 

औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे. 

औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या. 

औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.

दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्‍या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे  बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक. 

चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्‍या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.

पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्‍हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.


मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्‍याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्‍यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 

नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो. 

बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही. 

औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा. 

(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)        

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

© लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले

ओंकार वर्तले response.lokprabha@expressindia.com

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून गौरवलेल्या औरंगाबाद जिल्ह्य़ातील गड-किल्ले पाहणे हाडाच्या पर्यटकांसाठी मेजवानीच असते, पण या जिल्ह्य़ातील बहुतांश गड-किल्ले हे सामावले आहेत अजिंठा-सातमाळ या सह्य़ाद्रीच्या उपरांगेत. किंबहुना याच रांगेत या जिल्ह्य़ाच्या दुर्गभ्रमंतीचे सार सामावले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. प्रत्येक किल्ल्याची बांधणी आणि साज हा इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा. अशाच काही मोजक्याच किल्ल्यांची ही सफर..

मराठवाडय़ाचा मुकुट ‘किल्ले अंतुर’

औरंगाबाद जिल्ह्य़ातून गेलेली अजंठा-सातमाळ ही सह्य़ाद्रीची उपरांग भटकंतीचे अनेक रंग उधळत जाते. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या उपरांगेवर अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, शिवाय समृद्ध अशा गौताळा अभयारण्याचे कोंदणही लाभले आहे. हे सारे आहेच, पण औरंगाबाद जिल्हा हा लेणींनी नटलेला आहे, किंबहुना या लेण्या हीच या जिल्ह्य़ाची ओळख आहे, कारण या जिल्ह्य़ातील जागतिक वारसा यादीत असलेली जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी ही, सह्य़ाद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. अशा या मराठवाडय़ातील उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुर किल्ला ठाण मांडून बसलेला आहे. या भागातील सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे. हा किल्ला येतो कन्नड तालुकात. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे हे संरक्षित स्मारक आहे. तसं पाहिलं तर गौताळा अभयारण्यात मुख्य चार किल्ले आहेत. त्यातला प्रत्येक किल्ला आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे प्रत्येक किल्ला एकदा तरी जरूर पाहण्यासारखा आहे. मोक्याचे ठिकाण, प्रवेशद्वाराची अभिनव रचना, शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी केलेले विशिष्ट बांधकाम आणि अशा अनेक गोष्टींमुळे हा किल्ला सरस मानला जातो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा किल्ला दोन्ही प्रकारांत मोडतो. भुईकोट आणि गिरिदुर्ग. ही सारी गुणवैशिष्टय़े पाहण्यासाठी का होईना अंतुर किल्ल्याची भटकंती एकदा तरी करायलाच हवी. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्हीही मार्ग गौताळा अभयारण्यातूनच जातात. पहिला मार्ग आहे पायथ्याच्या भोपेवाडी गावातून. या वाटेने चालत जायला दोन तास लागतात. दुसरा मार्ग आहे तो खोलापूर या गावातून. या गावामार्गे एक कच्चा रस्ता थेट अंतुर किल्ल्यापर्यंत जातो. त्यामुळे या दुसऱ्या मार्गाने कमी पायपीट करावी लागते. शिवाय गाडीमार्ग थेट गर्द झाडीतून जात असल्यामुळे वेगळाच थरार अनुभवता येतो. त्यामुळे सहकुटुंब या ठिकाणी जाता येते.

अद्भुत प्रवेशद्वाराचा सुतोंडा

सुतोंडा किल्लाही तितकाच देखणा आणि भटक्यांची तहान भागविणारा आहे. हा किल्ला सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोडा किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. या किल्लय़ावर येण्यासाठी नाशिकहून चाळीसगाव-नागद-बनोटी असा सरळ रस्ता आहे. जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव ते बनोटी गाव हे साधारण ४५ किलोमीटर अंतर आहे. गावाला लागून नदीकाठावर शंकराचं अतिशय सुंदर मंदिर  आहे. त्यात आपल्या निवासाची व्यवस्था होऊ शकते. बनोटी गावालगत साधारण ३ किमी अंतरावर नायगाव हे सुतोंडा किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. बनोटी ते नायगाव रस्ता थोडा कच्चा असला, तरी फार खराब नाही.

किल्ला चढाईला सोपा आहे, पण किल्ल्यावर पाहण्यासाठी भरपूर अवशेष आणि वास्तुस्थापत्य असल्यामुळे संपूर्ण दिवस हाताशी हवाच. किल्ला चढण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट गावातूनच समोर दिसणाऱ्या भागातून म्हणजे किल्ल्याच्या उत्तरेकडून चोरदरवाजातूनच आहे. या वाटेने वर जाण्यासाठी गावातून सोबतीला वाटाडय़ा घ्यायलाच हवा, अन्यथा वाट चुकण्याचीच शक्यता अधिक. दुसरी वाट समोर दिसणाऱ्या भागातून किल्ल्याला उजवीकडून वळसा घालत (ट्रॅव्हर्स) किल्ला डावीकडे ठेवत पलीकडच्या म्हणजेच दक्षिण बाजूने कातळ फोडून केलेल्या खंदकासारख्या भागातल्या प्रवेशद्वाराने माथ्याकडे जात. हीच वाट जास्त सोयीची आहे, फक्त चालण्याची तयारी मात्र हवी.

वाकाटक साम्राज्याचा जंजाळा किल्ला

वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला तसा दुर्लक्षितच. मात्र, आजही या ठिकाणी गेल्यावर वास्तुशास्त्राचा हा उत्तम नमुना पाहून डोळ्याचे पारणे फिटते. हा किल्ला सोयगाव तालुक्यात येत असल्यामुळे याच तालुक्यातील अंभईवरून थेट जंजाळा गावात यायचे. याच गावातून सपाट चालीची अध्र्या तासाची पायवाट थेट किल्ल्यावर घेऊन जाते. सध्या किल्ल्यात जाण्यासाठी कच्चा रास्ता आहे. या मार्गाने हा किल्ला भुईकोट वाटतो. दुसरा मार्ग हा सोयगाव तालुक्यातीलच जरंडी गावातून जातो. सोयगाव ते जरंडी हे अंतर ९ किमी आहे. जरंडी गावाच्या पूर्वेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्या सोंडेवरून तीन तासांत गडावर जाता येते. या मार्गाने हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. गडावर जाण्यासाठी तिसरा मार्गही आहे. तो आहे वेताळवाडी गावातून. सोयगाव ते वेताळवाडी अंतर अवघे चार किलोमीटर आहे. वेताळवाडी धरणाच्या पश्चिमेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून तीन तासांत गडावर जाता येते. जरंडी आणि वेताळवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाडय़ा घेतला तर उत्तमच, अन्यथा वाट चुकण्याची शक्यता आहे. तीनही मार्गापेक्षा पहिली वाट म्हणजेच जंजाळा गावातून जाणारी वाटच सर्वात उत्तम. जंजाळा किल्ला हा औरंगाबादमधील एक दुर्लक्षित किल्ला आहे. अगदी थोडेच पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी येतात. याच किल्ल्याच्या पोटात खोदलेल्या घटत्कोच लेणीही आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. लेणीकडे जाण्यासाठी पुरातत्त्व खात्याने चांगली सिमेंटची पायवाट केलेली आहे. जंजाळा किल्लाही राज्य सरकारच्या संरक्षित स्मारक यादीत समाविष्ट झालेला आहे. एक आगळावेगळा आणि अवशेषांनी संपन्न असलेला किल्ला पाहायचा असेल तर या किल्ल्याकडे वाट वाकडी कराच.

छोटेखानी, देखणा लहुगड

औरंगाबादपासून अवघ्या ४० किमी अंतरावर, सिल्लोड रस्त्यावर एक छोटेखानी पण तितकाच देखणा किल्ला आहे तो नांद्रा गावाजवळचा लहुगड. कातळात खोदून काढलेला हा किल्ला म्हणजे दुर्गभटक्यांसाठी पर्वणीच म्हटली पाहिजे. या किल्ल्यावर येण्यासाठी औरंगाबाद शहरापासून फुलंब्रीच्या रस्त्यावर चौका फाटा लागतो. त्या फाटय़ावरून १५ मिनिटांत आपण नांद्रामार्गे किल्ल्यापाशी पोहोचतो. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला आवर्जून जाणवते ती म्हणजे मुळात लहुगड हे ठिकाण किल्ला कमी, पण रामेश्वराचे ठिकाण म्हणूनच या पंचक्रोशीत जास्त प्रसिद्ध आहे, कारण या किल्ल्याच्या कुशीत दडलं आहे भगवान शंकराचं- रामेश्वराचं अप्रतिम कातळकोरीव मंदिर. केवळ मंदिरच प्रसिद्ध नसून हे ठिकाण निसर्गभ्रमंती, ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांना दिवसभर भटकंती करण्यासाठी अगदी योग्य आहे. अजिंठा या सह्य़ाद्रीच्या उपरांगेतील डोंगरात वसलेले असल्याने याला निसर्गाचे वरदान भरभरून लाभले आहे. पावसाळ्यात इथे अतिशय निसर्गरम्य वातावरण असते. एक सुंदर गुहामंदिर, त्याचे कलाकुसरीने नटलेले स्थापत्य आणि लहुगडावरील कातळकोरीव पाण्याची टाकी पाहायची असेल तर या लहुगडाकडे एकदा तरी वाट वाकडी करायलाच हवी.

महादेव टाक्याचा डोंगर – लोंझा किल्ला

महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्थानिकांमध्ये किल्ले म्हणून परिचित नसून ते वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावाने ओळखले जातात. हाच अनुभव लोंझा किल्ल्याच्या बाबतीत येतो. या किल्ल्याच्या अवतीभोवती असणाऱ्या गावात जरी तुम्ही लोंझा किल्ला कुठे आहे, असे विचारले तर लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसेल, कारण हा किल्ला ओळखला जातो तो ‘महादेव टाका डोंगर’ या नावाने. अगदी याच नावाची पाटीसुद्धा तुम्हाला रस्त्यावर स्थळ-निर्देशक म्हणून आढळेल. शंभू महादेवाचे स्थान वर असल्यामुळे या किल्ल्यावर भक्तांची वर्दळ असते. अगदी पायथ्यापासून गड माथ्यापर्यंत रेलिंग आणि सिमेंटच्या पायऱ्याही आहेत. किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० किमीवर  नागद गावाजवळच हा किल्ला उभा आहे. दुसरा मार्ग म्हणजे जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगावपासूनही या नागद गावाजवळ येता येते. चाळीसगावपासून अवघ्या २६ किमीवर चाळीसगाव-सिल्लोड रस्त्यावर गौताळा अभयारण्यात हा किल्ला आहे. प्रवास शक्यतो खासगी वाहनानेच करावा. किल्ला काहीसा आडबाजूला असल्यामुळे एसटी वेळेवर मिळत नाही.

अवशेषांनी नटलेला वेताळवाडी किल्ला

या किल्ल्याकडे येण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्य़ातील सोयगाव गाठायचे. सोयगावातून या किल्ल्याचे दर्शन आपल्याला होते. तिथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आणि पश्चिम-दक्षिण बाजूस हा किल्ला दिसतो. सोयगावातून हळद्या घाटातून आपण या वेताळवाडी किल्ल्याला पोहोचतो. दुसरा मार्ग म्हणजे  सिल्लोडहूनसुद्धा या किल्ल्याचा पायथा गाठता येतो. या किल्ल्याला खेटूनच हळदा घाट रस्ता झाल्यामुळे आपण अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशीच येऊन पोहोचतो. वेताळवाडी किल्ला महाराष्ट्र शासनाच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे. किल्ल्यावर तटबंदी दुरुस्ती, तोफांचे संवर्धन अशी बरीच कामे झालेली दिसतात. इतर अवशेषही शाबूत असल्यामुळे हा किल्ला प्रेक्षणीय होतो. चढाई कमी करावी लागत असल्यामुळे सहकुटुंब भ्रमंतीचा आनंद घेता येतो. पावसाळा हा इथे येण्यासाठी सर्वोत्तम काळ. या दिवसांत इथला निसर्ग कात टाकतो, वातावरण सुखद असते आणि परिसर नयनरम्य झालेला असतो.

भांगसाई मातेचा भांगसी गड

औरंगाबाद-देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परिसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर भांगसी गड किल्ला आहे. भांगसाई देवीच्या मूळच्या भुयारी मंदिरावर नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.


सारोळा वनपर्यटन

जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक नवीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola).

औरंगाबाद शहरापासून अगदी जवळच असलेलं डोंगरांच्या कुशीत वसलेलं अन गर्द वनात लपलेलं सारोळा हे अगदीच २५ ३० उंबऱ्यांच गाव.शहरातील ताणताणाव दूर ठेवून कुटुंब अथवा मित्रांसोबत एकदिवसीय सहलीवर जाण्याचे हे अत्यंत उत्तम ठिकाण आहे. म्हैसमाळच्या तुलनेत फारसे प्रसिद्ध नसलेलं सारोळा म्हैसमाळ ला उत्तम पर्याय ठरू शकतं.अगदी नुकतेच ७ ते ८ वर्ष पूर्वी या ठिकाणाच्या विकासाला सुरुवात झाल्यामुळे इथे लोकांची फारशी वर्दळ नसते.केवळ सुटीच्या दिवशी घराबाहेर पडणारी काही कुटुंब रविवार अथवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी इथे निसर्गाचा आनंद लुटण्यास येतात.

औरंगाबादअजिंठा महामार्गावर फुलंब्री च्या दिशेने पुढे जातानाच एक छोटासा चौका घाट लागतो.हा घाट ओलांडून पुढे चौका गावाच्या अलीकडेच उजव्या हाताला सारोळा गावात जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग म्हणजे कच्ची सडक आहे त्यामुळे तो फारसा उठून दिसत नाही त्यामुळे उजव्या हाताला वनविभागाने सारोळा निसर्गपर्यटन केंद्र व उपाहारगृह अशी पाटी लावली आहे तेवढीच काय ती खूण,तिच्या शेजारून आत गेलं कि सुरु होतो वळणावळणांचा एक सुंदर निसर्ग प्रवास. छोटे छोटे घाट पार करत वर वर चढत जाणारा हा रस्ता हळू हळू घनदाट जंगलाच्या पांघरुणात घेऊन जातो.वाटेत लागणारा सारोळा तलाव अन डोंगरदऱ्या असलेलं सौंदर्य मन मोहून घेतं.उंच डोंगरमाथ्यावर नेणारा हा रस्ता जरी कच्चा असला तरी इथे वाहन चालवायचा मोह हा होतोच.दोन्ही बाजूंनी गर्द झाडीने वेढलेले रस्ते इथे कुणाला वाहन चालवण्याचा मोह होणार नाही?

 road to sarola

हाच रस्ता पुढे सुमारे 7 किमी वर एका छोट्याशा २५ ३० घरांच्या गावाशेजारी घेऊन जातो, जिथे उजव्या हाताला एक लहान उद्यान आहे. हे आहे सारोळा गाव,उद्यानाला लागुनच वनविभागाचं एक निजामकालीन विश्रामगृह आहे.इथून पुढची वाट पायीच चालावी लागते, तशी या पायवाटेने वर वाहने जाऊ शकतात परंतु वनविभागाने हा रस्ता वाहनांसाठी बंद केला आहे,केवळ विशेष परवानगीची वाहनेच वरपर्यंत जाऊ शकतात. तसेही या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पायीच जाणे उत्तम.
खाली वाहने सोडून पायवाटेने वर जाताच समोर दोन वेगळे व्ह्यू पॉईंट आहेत.दोन उंच कड्यांच्या मधील दरीत खडकावर उभेराहून दूरदूर पसरलेली घनदाट हिरवळ पाहण्यासारखी आहे.

दोन बाजूला असलेले व्ह्यू पॉईंट

त्यातील पहिला व्ह्यू पॉईंट समोरील बाजूस येतो. हा व्ह्यू पॉईंट सुमारे 45 मीटर लांब असून इथे वर एक आरामगृह आहे.वाहन जाण्याकरिता केलेल्या रस्त्याने न जाता कड्या शेजारी असलेल्या मंदिरा मागून एक चढाईची वाट आहे तिथून सरळ वरच्या बाजूला जाता येते.या व्ह्यू पॉईंट ला उभे राहून सारोळा डोंगराची मागची बाजू,या सारोळा गावाबाजूची डोंगररांग,दऱ्या यांचे नितांत सुंदर दर्शन करता येते. येथे वनविभागाने एक टुमदार पॅगोडा उभारला आहे. बराच वेळ वाट पाहिल्यास खालच्या जंगलातील मोरांचे गीतगान इथे ऐकता येऊ शकते.

यातील दुसरा व्ह्यू पॉईंट हा दुसऱ्या कड्यावर उभारला आहे परंतु इथे वाहने नेण्याची वाट कधी न वापरल्याने उपयोगात नाही.पहिला कडा उतरून पुन्हा हा चढताना मात्र गर्द झाडीतून वाट काढावी लागते.गर्द झाडीझुडपांतून वाट चढत आपण वर जाताच लांबलचक पसरलेला पठाराचा भाग दिसतो. इथे वनविभागाने एक वॉच टॉवर उभा केला आहे. यातून या पठाराचं विहंगम दृश्य पाहता येत.

या व्ह्यू पॉईंट वरून एकीकडे सुंदर पठार तर दुसरीकडे सारोळा डोंगराची विरुद्ध बाजू अर्थात औरंगाबाद शहराकडील बाजू न्याहाळता येते. औरंगाबाद शहराच्या दिशेला हर्सूल चा भव्य तलाव नजरेस पडू शकतो.पूर्व पश्चिम पसरलेल्या औरंगाबादची धूसर प्रतिमा दिसते.वातावरण स्वच्छ असल्यास हडकोतील दूरदर्शन चा उंच टॉवर तसेच चिखलठाणचे नवीन विमानतळ यांचा अंदाज बंधू शकतो. आडव्या पसरलेल्या डोंगररांगा यांच्या मधोमध वसलेलं हे शहर इतिहास काळात कसं सुरक्षित ठेवता आलं असेल याची कल्पना येते.
एकीकडे औरंगाबादचं विहंगम दृश्य असताना दुसऱ्या बाजूला भव्य पठारावर दूरवर नजर खिळवून ठेवावी.आपले भाग्य असल्यास या भागात हरीण,नीलगायी,मोर,कोल्हे इत्यादी पशुंचे अपवादात्मक दर्शन होऊ शकते.

हाही कडा उतरून खाली आल्यावर वर उल्लेख केला ते छोटेसे गणपती मंदिर आहे.या मंदिराच्या शेजारीच दगडात कोरलेला पाण्याचा हौद (टाक) आहे.जमिनीतील झऱ्यातून येणारे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे येथील भक्त सांगतात.हा हौद कधी खोदला ह्याबद्दल निश्चित माहिती नसली तरी हा पुरातनकालीन असावा.

sarola-panyacha-puratan-houd

इथून खालच्या बाजूस देखील दाट झाडी आहे,पण थोडे खाली उतरल्यास इथे एका सुंदर ओढ्याचा उगम नजरेस पडतो. तसे भरपूर पाउस झाला असेल तरच ह्या ओढ्याला पाणी असते इतर वेळी हा कोरडाच असतो.ओढ्यातूनच खाली उतरल्यास वाट शोधत आपण थेट जिथे वाहन सोडले तिथे उतरता येऊ शकते.वाटेत कुणा भक्ताची समाधी देखील नजरेस पडते.

हे तीन सद्य स्थितीत उल्लेख केलेली मी ठिकाणे येथे आहेत. परंतु जंगल सफरीचा अनुभव घ्यायचा असल्यास दुसऱ्या कड्या जवळून अनेक पायवाटा खालच्या जंगलात जातात,परंतु परतीच्या पायवाटेचे ज्ञान असल्या शिवाय आत जाणे धोक्याचे वाटते,कदाचित रस्ता हरवल्यास गोंधळ उडू शकतो.

वनपर्यटनाला इथे भरपूर वाव आहे सोबतच हे ठिकाण समुद्रसपाटी पासून १००० मीटर उंचीवर असल्याने याकडे थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील पहिल्या जाते.प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या धर्तीवर विकसीत होत असलेल्या सारोळा वनक्षेत्राला औरंगाबादच्या जनतेच्या मनात हळूहळू महत्व प्राप्त होत आहे.

जायचे कसे: औरंगाबाद हून अजिंठ्याच्या दिशेने जाताना वाटेत छोटासा चौका घाट लागतो,त्याला ओलांडून पुढे बुद्ध अंतरराष्ट्रीय विद्यालय आहे,तिच्या थोडे पुढे उजव्या हाताला वनविभागाच्या सारोळा उपहारगृहाची पाटी आहे,तिथून आत वळायचे हा रस्ता थेट सारोळा गावात जातो.
जाण्याची सोय: इथे जाण्याकरिता स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे.वर्दळ नसल्यामुळे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही.घाटमाथ्याचा रस्ता व तुरळक वस्ती यामुळे उत्तम स्थितीत असणारे वाहनच वापरणे हिताचे.
अंतर: सुमारे २४ कि.मी.(सिडको बसस्थानक येथून)

विशेष सूचना: हे स्थळ अद्याप प्रकाशझोतात आलेले नसल्याने सुट्टीचे दिवस वगळता इथे अजिबात वर्दळ नसते,त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न म्हणून समूहानेच गेलेले उत्तम.सोबत थोडे फार खाद्यपदार्थ व मुबलक पाणी असू द्यावे. आणि महत्वाचे हे निसर्गरम्य ठिकाण सोबत नेलेले प्लास्टिक इत्यादी कचरा तिथेच फेकून येण्याऐवजी हा परिसर आहे तसाच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू या.

औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय नसलेल्या पर्यटन अथवा ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारी हि मालिका अशीच सुरु राहील,यात लवकरच लहुगड,किल्ले अंतुर,सुतोंडा किल्ला,वाडीचा किल्ला (वेताळवाडी),जंजाळ किल्ला,तलतम गड,घटोत्कच लेणी,गौताळा इत्यादी सर्व ठिकाणांना भेटी देऊन त्यांची योग्य माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन.

https://www.ashutoshblog.in/travel/sarola-vanparyatan-aurangagabad-tourist-place/

सारोळा वनातली हि काही चित्रे

हे सामायिक (शेअर) करा

औरंगजेब आणि मालोजीराजे भोसले...



दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला
घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही...

हे आपल्याकडेच असं का होतं?

एका इतिहास पुरूषाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या

स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते,

अनं दुसर्‍याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी...

मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत

महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत...दोघांच्या भूमिका

हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी...
मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा

झेंडा रोवला...हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्‍या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्तपणाने राजकारण करून अवघ्या भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली...

त्यावेळची जगातली ही एक बलशाली राजवट होती...
मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा...विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले...साल अंदाजे १६२० असावे...औरंगजेबचा जन्म १६१८ दाहेड येथे...मृत्यू १७०७ अहमदनगर येथे...वेरूळ  व खुल्ताबाद अशा एका शेजारी एक असलेल्या ठिकाणी हे दोघे चिरविश्रांती घेत आहेत, परंतू या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते!

या सुट्टीत देवगिरीच्या यादवांनी बांधलेला जगप्रसिद्ध देवगिरीचा किल्ला

सहकुटुंब बघण्याचा आमचा निर्धार होता...हो! नाही करता करता आम्हाला

मुहूर्त गवसला ता ७ जुनचा...सात जुन म्हणजे पावसाच्या आगमनाची

वैजापूरच्या शेतात बागडणारे काळविट...या परिसरात दहा 

हजारच्या आसपाद काळविट असून शेतकरी त्यांची उपस्थिती भाग्याची मानतात...

पारंपारिक तारीख...गेल्या अनेक वर्षांपासून ही तारीख चूकतेय खरी, पण

आज सकाळ पासूनच आभाळ दाटलेले होते...उकाडाही प्रचंड होता...
अगोदर वेरूळला घृष्णेश्वराचे दर्शन घ्यायचे व मग पुढे देवगिरीला कुच

करायची, असा आमचा बेत...
वाटेत वैजपुरला एका शेताच्या बांधावर आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली

न्याहारीचा बेत हाणला, त्यावेळी दोन काळविटांचे मनोहारी दर्शन

घडले...मोहिमेची सुरूवात तर छान झाली होती...
वेरूळ गावच्या वेशीवर  घृष्णेश्वर व भद्रा मारूतीकडे निर्देश करणारे फलक

दिसले. पुढे एका फलकाने लक्ष्य  वेधून घेतले, 'आलमगिर औरंगजेबकी

मजार'. तेव्हाच ठरवलं, भारताच्या एका बलशाली बादशाहच्या स्मृतीस्थळाला

भेट द्यायची...पण अगोदर घृष्णेश्वर..
हल्ली एखाद्या बड्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची म्हटलं की अंगावर

काटा येतो...एक तर देवळात जाण्याकरिता भाविकांवर नाना बंधने...असंख्य

वळणा वळणाच्या लांबच लांब रांगा...त्यात पिशवी आत नेऊ नका...फोन

नेऊ नका...आवारात थांबू नका...त्याउपरही देवालयात प्रवेश मिळवलात तर

नीट दर्शन घेण्याची सुविधा नाही...ना दोन क्षण तल्लीन होऊन देवाची

आराधना करण्याची परवानगी...
आमच्याकडे सप्तश्रृंगीकड, शिर्डी, काळाराम मंदिर, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर

मंदिरात जाऊन दर्शन घेणे केवढे अडचणीचे बनले आहे, याचा अनूभव

आम्ही घेतच असतो...तसाच अनूभव पंढरपूर, तुळजापूर, जेजूरी या

ठिकाणीही घेतला आहे, त्यामुळे  घृष्णेश्वरात आख्खा कुटुंबकबिला नेण्याच्या

विचार अंमळ अडचणीचा होता...
परंतू धार्मिक व ऐतिहासिक अंगाने अत्यंत महत्वाच्या घृष्णेश्वराचे दर्शन

घ्यायचे होतेच...आज घृष्णेश्वराला अजिबात गर्दी नव्हती...विशेष म्हणजे थेट

मंदिराच्या जवळ गाडी नेण्याची परवानगी, तेव्हा झटपट दर्शन घेऊन पुढच्या

प्रवासाला निघायला मिळणार! ही भावना सुखावणारी होती...
घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर एका पुरातन मंदिराने लक्ष्य वेधून

घेतले...संपुर्णपणे दगडात घडवलेल्या या देवालयाचे कोरिवकाम व एकुण

स्थिती पाहता, ते फार पुरातन मंदिर असावे असे वाटत होते, परंतू या

मंदिराला लक्तरे निघालेल्या दुकांनांचा वेढा पडल्याचेही दिसून आले...लांबून

दोन फोटो घेऊन आम्ही  घृष्णेश्वराकडे निघालो...

या कथित देवालयाच्या चहुबाजूंनी लक्तरलेली दुकाने, 

मातीचे ढिगारे व कचर्‍याचा ढिग दृष्टीस पडतो...

मोबाईल...कॅमेरे फेकून द्या...
पहिल्या चिंचोळ्या द्वारात पोलिस ओरडत होता, मोबाईल व कॅमेरे आत

नेऊ नका...आमच्यातील पाच जणांकडे मोबाईल होते...माझा कॅमेरा व गाडी

चालकाचे दोन मोबाईल, यांचे करायचे काय? हा प्रश्न येण्यापूर्वीच समोरचा

दुकानदार खुणेने बोलावत असल्याचे जाणवले...फार गर्दी नसल्याने आम्ही

सर्वजण त्या दुकानात गेलो...तिथे मोबाईल व कॅमेरे सांभाळण्याची व्यवस्था

होती...प्रती डाग ५/- रूपये या दराने ४०/- रूपये मोजले व आम्ही

घ्रुष्णेश्वराच्या देवालयात मार्गस्थ झालो...फार पायपीट न घडवता आम्हाला

पटकन गाभार्‍यात जाता आले...
पुरूषांना गर्भगृहात टॉपलेस जावे लागते, तर महिलांना मात्र थेट गाभार्‍यात

प्रवेश दिला जातो...
लाल फत्तरात कोरलेल्या दगडात मंदिराचे बांधकाम लक्ष्यवेधी

आहे...खासकरून मंदिराचा कळस व आतील स्तंभ...काही जणांच्या ब्लॉगवर

मी ही छायाचित्रे बघितली आहेत...त्या भाग्यशाली लोकांना देवळाची

छायाचित्रे घेता आली...मला मात्र कॅमेरा नेण्याची संधी मिळू शकली

नाही...अर्थात मी तसा प्रयत्नही केला नाही...हल्ली कॅमेरे नेऊ नका...फोटो

काढू नका! भाविकांवर व पर्यटकांवर असे निर्बंध लादण्याची प्रथा रूढ झाली

आहे...याचा मला प्रचंड तिटकारा आहे...

शिवस्पर्षाचा गंध...
याच मंदिराच्या प्रांगणात माझ्या राजाने खुल्या असमंताखाली राजपुत्र

संभाजींसह मुक्काम केला होता...'पिता पूत्र कोठे थांबले असतील'...'त्यांनी

काय काय बघितले असेल', कशा अशा ना ना विचारांनी अंगावर रोम उभे

राहिले...
पुरंदरच्या तहात सर्वस्व गमावल्यानंतर संभाजींना पंधरा हजाराची मनसब

मोगल दरबारी मिळाली...शिवाजी राजांसाठीं शाही फर्मान निघाले...
''इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातरजमेने यावे. म्हणजे भेटी अंती बहुत 

सत्कार पावुन माघारी जाण्याविषयी निरोप दिला जाईल''...

राजे मग उरल्या सुरल्या स्वराजाची उत्तम घडी बसवून निघाले आग्र्याला

बादशाहच्या भेटीला...औरंगाबाद मार्गे...
औरंगजेबने राजांसाठी खास पोषाख पाठवला होता...
''खुद शहजादा प्रमाणे अदब चालवावी, म्हणजे शिवाजी राजांच्या काफिल्याची 

उत्तम बडदास्त ठेवणे'' असे कडक फर्मान औरंगजेबने आपल्या तमाम

कुलफौजदार व महाल मोकासे यांना ताकिदपत्र देऊन पाठविले होते...
औरंगाबादचा सुभेदार सफशिकनखान मोठा घमंडी होता, त्याने शिवाजी

राजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतू राजांनी त्याची शेखी जिरवली

तेव्हा, बादशाहची गैरमर्जी होईल या भितीने खान सुतासारखा सरळ झाला...
औरंगाबादेत काही काळ मुक्काम केल्यानंतर राजे पुढच्या प्रवासाला देवगिरी,

वेरूळ मार्गे निघाले...
भोसले हे मुळचे वेरूळचे...घृष्णेश्वर त्यांचे कुलदैवत...तेव्हा राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली...बालसंभाजीसह राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. राजांनी नजिकच्या कैलास लेण्यांचे दर्शन

घेतले...''कोण कलाकार असतील ते'', कैलास मंदिराची रचना बघून,

''साधूतत्वाशिवाय अशी अजोड रचना शक्य नाही'' असे राजांचे उद्‌गार

होते...तिथले मुर्तीकाम व मंदिराची रचना बघून राजे स्तिमित झाले...
राजे परत घृष्णेश्वर मंदिरात परतले....मंदिराच्या प्रांगणात राजांनी दोनवेळा

भोजनप्रसाद घेतला...राजांनी मंदिराच्या बाहेर खुल्या आसमंतात रात्र

काढली...आग्य्राला बादशाच्या भेटीला निघताना केवढं बळ घेतलं असेल

राजांनी घृष्णेश्वराकडून...कोण कोणत्या विचारांची वादळं डोक्यात थैमान

घालत असतील...की राजे अधिक शांत झाले असतील इथल्या वातावरणात!

अशा या इतिहास प्रसिद्ध घृष्णेश्वराच्या दर्शनाने आम्ही सर्वजण हर्षोल्हासित

झालो...
शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे यांनी घृष्णेश्वर देवालयाचा जिर्णोद्धार

केला...शिवांजी राजांचे पिताश्री शहाजींचा जन्म वेरूळ गावचा...
घृष्णेश्वराचे समाधानकारक दर्शन घेऊन आम्ही वाहनतळाकडे आमच्या

गाड्यांकडे निघालो, परंतू घृष्णेश्वराबाहेर ऐटीत उभ्या असलेल्या त्या प्राचीन

देवालयासमोर आमची पावले पुन्हा घुटमळली...
लक्तरलेली दुकाने ओलांडून आम्ही देवालयाकडे जाण्यास निघालो, तेव्हा

मंदिराच्या चहुबाजूला आम्हाला कचर्‍याचे साम्राज्य दिसले...मंदिराच्या

पहिल्या पायरीवरच कोणीतरी चक्क प्रातर्विधी उरकली होती...इतके सुंदर

देवालय इतक्या घाणीत कसे? याची कोणी देखभाल का करत नाही?
आम्ही आत प्रवेश केला, पण आत देवाच्या मुर्ती ऐवजी एक समाधी दृष्टीस

पडली...आत प्रचंड कुबट वास येत होता...वटवाघळांच्या वस्तीमुळे त्यांच्या

मलमुत्रांने उग्रदर्प सर्वत्र सुटला होता...फार थांबण्याची आवश्यकता उरली

नव्हती...आम्ही तडक समाधीस्थळ सोडले व वाहनतळ गाठले...तिथल्या

दुकानदाराला विचारले, ही वास्तू कसली? मालोजी राजे भोसल्यांची समाधी

आहे! विजेचा एकच झटका बसला...भोसले घराण्याचे पराक्रमी

वंशज...घृष्णेश्वराचे सुंदर देवालय बांधणार्‍या मालोजी राजांच्या समाधीची

अवकळा बघवत नाही...
आज उभा महाराष्ट्र शिवाजी व शहाजींचे गोडवे गातो, पण शहाजींच्या

पराक्रमी पित्यांच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्गती व्हावी? बोचणारे अनेक

प्रश्न घेऊन आम्ही भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी प्रयाण केले...

भद्रा मारूती म्हणजे जमिनीवर झोपलेली हनूमानाची मुर्ती, अन्यथा हनुमान

हे उभ्या स्थितीतच दिसतात...निद्रास्थितीतले हनूमान तिन ठिकाणी बघायला

मिळतात, एक म्हणजे अलाहबादेत यमुना नदीच्या तिरावर व दुसरे जाम

सावली, मध्यप्रदेशात...
खुल्ताबादचे नाव पूर्वी भद्रावती होते...तिथला पराक्रमी राजा भद्रसेनवरून हे

नाव पडले असावे...हे रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे तिथे नित्य

नियमाने रामस्तूती गायली जायची...एकदा खुद्द हनूमान ही रामस्तूती

ऐकण्यासाठी भद्रावतीला आले...राम भजनात तल्लीन होऊन हनूमानाला झोप

लागली व ते तिथेच भाव समाधीत ते आडवे पडले...भद्रासेनाची रामस्तूती

संपल्यानंतर खुद्द हनूमानाला बघून ते चकित झाले व त्यांनी हनूमालाला

तिथे निवास करण्याची विनंती केली...तेव्हा पासून हनूमानाची भाव

समाधीतली मुर्ती विराजमान आहे...

औरंगजेबच्या समाधीस्थळाचे प्रवेशद्वार स्वच्छ रखरखाव असलेले...

याठिकाणी प्रचंड असा सिमेंट कॉंक्रिटचा सभामंडप तयार करण्यात आला

आहे...आतमध्ये सुद्धा फोन नेऊ नका...पिशवी नेऊ नका...कॅमेरा नेऊ

नका...पुन्हा या गोष्टी बाहेरच्या दुकानात जमा करण्याची कसरत...

पर्यटन मंत्र्यांनीच आता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे...लोकांनी धार्मिक

पर्यटनाला जाताना सोबत मोबाईल फोन व कॅमेरे न्यायचे की नाही...जो तो

उठतो आणि या गोष्टींवर बंधने आणतो...बाहेर गावी या गोष्टी  एकतर

गाडीत ठेवणे सुरक्षित नाही...व एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे सोपविणे मोठे

जोखमीचे...दहशतवादाचा धोका जगात सर्वत्र असला तरी जगातील प्रमूख

पर्यटन स्थळी फोटो काढू दिले जातात ते कसे? ताजमहाल सारखी संरक्षित

वास्तू नाही...खजूराहो सारखे संरक्षित ठिकाण नाही...त्याठिकाणी सुद्धा फोटो

काढण्याची...फोन आत नेण्याची परवानगी आहेच ना...असो...
भद्रा मारूतीचे झटपट दर्शन आटोपले व आम्ही
खुलताबादेच्या वेशीच्या बाहेर पोहोचलो...एका भव्य मशिदीवर, मजार मोगल

सम्राट शहंशाह हजरत औरंगजेब (रह) हा फलक दिसला...हा रह म्हणजे

रेहमतुल्लाह या अर्थाने लिहीला असावा...याचा अर्थ ईश्वराची करूणा...
भारतावर निरंकुश सत्ता स्थापन करणार्‍या औरंगजेबचे स्मृतीस्थळ आहे तरी

कसे? आमची पावले या जुन्या वास्तूत वळली...पुर्णपणे काळ्या पाषाणात

हिन्दूस्तानच्या महापराक्रमी बादशाहची साधीशी कबर...

असंख्य कमानी व स्तंभात ही मशिद घडविली आहे...त्याला चुन्याची

रंगसभेदी व कडा हिरव्या व सोनेरी रंगात रंगविल्या आहेत...
आत गेल्यावर आम्हाला प्रथम हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी (रह) यांच्या

समाधीकडे नेण्यात आले...हे मुस्लीम धर्मातले २२वे व शेवटचे

खलिफा...औरंगजेब यांना आपला गुरू मानित...
हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांना दस्तूरखुद्द महंमद पैगंबर यांनी आपला

पोषाख दिला होता...हा पोषाख त्यांना अल्ला कडून मिळाला, तोच याठिकाणी

सुरक्षित ठेला आहे...रमजानच्या महिन्यात आठ दहा लाख भाविक या

पोषाखाचे दर्शन घ्यायला येतात, अशी माहिती आम्हीला मिळाली...
ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या बाहेर उजव्या बाजुला औरंगजेबचा

पुत्र आझमशाह व त्याच्या पत्नीच्या कबरी आहेत...कोणतेही छत नसलेल्या

या कबरी खुल्या आसमंताखाली आहे व त्यांना फक्त संगमरमरी दगडात

कोरलेल्या जाळ्या आहेत...
डाव्या बाजुला औरंगजेबची तशाच स्वरूपात समाधी आहे...परंतू तिचे

प्रवेशद्वार बाहेरून आहे...संभाजी राजांची हत्या केल्यानंतर पंचवीस वर्ष

औरंगजेब दख्खनमध्ये राहिला, परंतू दख्खन काही त्याला हाती लागला

नाही, अखेर नगरमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला...आपला देहांत

झाल्यावर आपले दफन गुरूचरणी व्हावे, वर कोणतेही छप्पर नसावे...टोप्या

शिवून कमावलेल्या रकमेतील फक्त १४ किंवा १२ आणे आपल्या कबरीवर

खर्च करावे अशी औरंगजेबची इच्छा होती...त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीची

ही कबर बांधली आहे...दहा बाय दहाची जागा असावी...तथापी चहुबाजूंना

संगमरमरी जाळीदार खिडक्या व प्रवेश द्वार संगमरमरात घडविले आहे...
कबरीचा जमिनीशी थेट संबंध असावा...असे औरंगजेबचे इच्छापत्र

होते...त्यावर सुगंध दरवळत रहावा याकरिता सब्जाचे एक रोप लावल्याचे

दिसून येते...संपूर्ण कबर ही संगमरममरात घडविली असून त्यावर पांढरी

चादर टाकण्यात येते व त्यावर गुलाबाची फुले टाकली जातात...औरंगजेबने

इच्छी व्यक्ती केली होती, त्याचे पालन आजही केल्याचे दिसून येते...

औरंगजेबच्या कबरीची आजही देखभाल ठेवली जाते...त्यावर सफेद चादर
टाकून रोज गुलाबाची फुले चढविली जातात...

ज्या भूमीवर त्याने अनन्वीत अत्याचार केले त्या औरंगजेबच्या वाट्याला

त्याच दख्खनेत तीनशे वर्षांनंतरही त्याच्या इच्छेनुसार सन्मान मिळाला...
वेरूळ व खुलल्ताबादेत दोन इतिहासपुरूषांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही

देवगिरीच्या किल्ल्याकडे कुच केली...देवगिरीचा वृत्तांत पुढील लेखात...

http://prashantpardeshi.blogspot.com/2016/06/blog-post.html?m=1


 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...