Wednesday, November 4, 2020

इतिहासपुरुष डॉ. विष्णु श्रीधर वाकणकर

सौ. स्वाती वर्तक 

      ( ४ मे १९१९ – ३ एप्रिल १९८८)



माननीय डॉ विष्णु श्रीधर वाकणकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष.
खास ओळखीतील, नात्यातील लोक त्यांना हरिभाऊ म्हणत किंवा अनेकांसाठी ते दादा वाकणकर देखील होते.
आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठीच जणू तो भारतात अवतरला.

डॉ विष्णु  यांचा जन्म ४ मे १९१९ रोजी नीमच, मध्यप्रदेश येथे झाला. वडील श्री. श्रीधर सिध्दनाथ आणि आई सौ. सीता श्रीधर… बाल्यावस्थेतच या मुलाला प्रत्येक गोष्टीचे कौतुक, ते समजून घेण्याची अनावर ओढ, आणि प्रचंड जिज्ञासा.

त्यांचे काका श्री. अनंत वामन वाकणकर यांना इतिहासाची गोडी. त्यांचे मार्गदर्शन याने अंगिकारले. कलासाधक तर होतेच पण राष्ट्रसाधना, त्यांचा पहिला प्राण.  किशोरावस्थेतच स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन सत्याग्रहात भाग घेणे, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेणे..काय नाही केले या युवकाने? इंग्रजांविरुद्ध महूजवळील मोरटक्का पूल उडवून लावण्याची योजना यांचीच.

राष्ट्रप्रेम इतके ओतप्रोत भरलेले की त्यासाठी कुठेही जाण्याची तयारी.
फक्त एवढेच नाही, डोंगरदऱ्या पिंजून काढणारे, तेथील शैलचित्रे शोधणारे, त्यांची छायाचित्रे नीट येत नसतील तर स्वतः त्यांची रेखाटने करणारे, सत्यान्वेषी पुरातत्त्ववेत्ते, भारताबद्दलची आपली सांस्कृतिक विधाने ठामपणे सिद्ध करणारे योगी, भारतीय संस्कृती स्वतःच्या रंग, कुंचल्याने जगासमोर आणणारे इतिहासकार आणि आपल्या शिष्याला एखाद्या हिऱ्याप्रमाणे पैलू पाडणारे, त्याला घडवणारे, त्याच्यातून एक सुंदर शिल्प साकारणारे हाडाचे चित्रकार. किती किती रूपे त्यांची ! अगदी साधारण दिसणारा पण उत्तुंग शिखरे गाठणारा हा अंतःकरणापासून कार्यरत राहणारा एक अथक जिज्ञासू !

कलेची आवड त्यांना बालपणापासूनच होती. त्यासाठी त्यांनी १९३३ मध्ये मुकुंदराव भांड विद्यालयात कला शिक्षण सुरू केले. नंतर मुंबईच्या मॉडेल स्कूल ऑफ आर्टस् चा डिप्लोमा घेतला.
 राष्ट्रप्रेमाला एक दिशा मिळावी म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाट चोखाळली. आणि लगेचच त्याचे प्रचारक झाले. त्या वेळची शिक्षण पद्धती त्यांना फारशी पटत नसे. काहीतरी भरीव, ठोस रचनात्मक कार्य करण्यासाठी ते तळमळत होते.आणि याच तळमळीने त्यांनी मध्यप्रदेशात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची संघटना काढली. त्याचे ते प्रथम प्रांतीय अध्यक्ष झाले; नंतर संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख म्हणून काम केले. त्यावेळेस नानाजी देशमुखांनी, संघाने कला क्षेत्रात काहीतरी भरीव करून दाखवावे म्हणून हरिभाऊंनाच निवडले. ते संस्कार भारतीचे संस्थापक महामंत्री झाले आणि आयुष्यभर सतत संस्कार भारतीचे कार्य करीत राहीले.

त्यांना भारतामध्ये शैलचित्रांच्या प्रचंड ज्ञानासाठी पितामह संबोधले जाते आणि त्यात वावगे काहीच नव्हते. इंग्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली, जर्मनी, स्पेन, ग्रीस, मेक्सिको, इजिप्त आणि अमेरिका या देशांत या कलेचा अभ्यास केला. या काळात ४००० गुंफा त्यांनी शोधून काढल्या आणि अभ्यासल्या. विश्वविख्यात पुरातत्त्ववेत्ते आंद्रे लॉराई गौरहान यांच्यासह हरिभाऊंनी कार्य केले. खरे तर दोघेच एकमेकांच्या प्रतिभेमुळे दिपून गेले होते. अमेरिकेच्या रॉबर्ट ब्रुक्स बरोबर त्यांनी १९७६ मध्ये “ रॉक आर्ट पैंटिंग्ज ऑफ इंडिया “ हे पुस्तक लिहिले. त्यांनी स्वतः काढलेली रेखाचित्रे साडे सात हजारांच्या वर असून ती ‘वाकणकर शोध संस्थान’मध्ये जपून ठेवली आहेत. तसेच त्यांनी अभ्यासलेली किमान ८००० नाणी तेथे आहेत. ५०० वर्ष ख्रिस्तपूर्व ते मध्ययुगातील असा इतिहास त्यांनी या नाण्यांनी आपल्यासमोर मांडला आहे जणू !ते एक चालतीबोलती “संस्था“ होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. ही त्यांच्यासाठी मोठीच मानवंदना होती पण म्हणून ते थांबणार नव्हतेच. दगडांवर त्यांचा ”घण“ नादमय आवाज करीत असा काही फिरे की त्यातून अप्रतिम मूर्तिमंत सौंदर्य अवतरे. उज्जैन विक्रम विश्वविद्यालयाच्या संग्रहालयाचे ते संचालक राहिले. व तेथे त्यांनी शैल चित्र संस्थानची स्थापना केली. इंडोलॉजीकल कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट फक्त नव्हे तर ऑस्ट्रिया, रोम, पॅरिस, फ्रँकफर्ट आणि अमेरिकेमध्ये त्यांनी भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सांस्कृतिक प्रदर्शनांचे आयोजन केले. ते कोण नव्हते ? एक चित्रकार, इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ते, भारतीय संस्कृतीचे अमर्याद भक्त. एकदा त्यांनी अमेरिकेत प्रदर्शन भरवले होते. ते बघून ‘नासा’चा भारतीय मूळ असलेला एक वैज्ञानिक इतका भारावून गेला की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसमधील बस भरून सर्वांना घेऊन आला.वाकणकरांनी देशाला भरपूर दिले. पण त्यांचा एक शोध अजूनही बरेच जण समजून घ्यायला तयार नाहीत. तो म्हणजे …सरस्वती नदी..आता मात्र त्यावर तार्किक विचार सुरू होऊन त्यांनी दाखवलेल्या दिशेस वाटचाल सुरू आहे. त्यांनी असे कितीतरी शोध लावले, ज्याने लोक अवाक् झाले.

 

आर्यांची संस्कृती, ते मूळचे येथलेच रहिवासी, आर्य आक्रमणाचा “गल्प सिद्धांत“ वेदांचे अध्ययन करून सरस्वतीचा लोप कुठे झाला, त्या नदीचा प्रवाह शोधण्याचा अथक प्रयत्न आणि ते सिद्ध करणे. ग्रीनविच येथे “मीन टाइम”  नसून कर्क रेषेवरील उज्जैनच्या डोगला जागेची महती शोधणे, भोपाळजवळ ..भीम बैठका गुहा … शोधून तेथील चित्रे रेखाटणे… मार्च १९५७ मध्ये ते शोधले. याचा प्राचीन काळ बघून ही जागा जगातील महानतम आद्य मानव म्हणून गणली जाते. युनेस्को तर्फे २००३ मध्ये या जागेला “ विश्व ठेवा “ या नावाने यादीत घातले आहे.

तेथले स्थानिक असे म्हणतात, तेथे भीम येऊन बसत असे. पांडवांच्या वनवासामधील तो काळ होता. जवळच पंडपुर, भिमापुरा, लाखाजुहार, बाणगंगा आणि गुप्तगंगा या जागाही टेकडीवरील सपाट माळावर बघायला मिळतात. त्यांच्या बरोबर असणारा एक विद्यार्थी सांगतो, ” जागो मोहन प्यारे “ अश्या सुमधुर गीताने दादा आम्हाला उठवीत आणि सूर्योदयापासून सूर्यास्त होईपर्यंत अविश्रांत, शांतपणे कार्य करीत. कधी कधी तेथे रानटी श्वापदेही येत. एकदा एक तरस आमच्याजवळ आले. दादांनी शेजारी ठेवलेला तांब्याचा भाला त्याच्या दिशेने उगारताच ते पसार झाले.  नीलगाय, रानटी डुक्कर, कोल्हे, लांडगे येत.

तेथेच आम्हाला उत्खननात लाखो वर्षे जुनी मानवनिर्मित दगडी उपकरणे सापडली. अशा या शोध कार्याच्या वेळेस त्यांना तहान भूक नसे. पण ते बटाटे जवळ ठेवीत आठवण केल्यावर जागा खणूून त्यात बटाटे घालून वर पेटती लाकडे ठेवीत आणि भाजलेले बटाटे मीठ लावून खात. म्हणून दुर्गा मंदिरगुंफेत राहणारा.. बाबा  सालिगराम ( शाळिग्राम) त्यांना प्रेमाने ..”आलू महाराज “ संबोधत आणि दादा त्याना हसून प्रत्युत्तर देत. टेकड्यांना, तेथील चित्रांना त्यांनी बरोबर सात भागात विभागले आहे. पैकी ५ अति महत्वाचे म्हणून राष्ट्रीय पुरातत्वतर्फे संरक्षित करण्यात आले आहे.

डोगला ग्रामपासून २ की.मी पूर्वेस डॉ वाकणकर यांनी शोध लावला होता. कर्क रेखा आणि शून्य रेखा यांचा ..संयोग.बिंदू…( ते त्यांनी  गणित आणि शंकू यंत्राने सिद्ध केले .) .येथेच होतो. अवंतिका नगरीचे संस्कृत भाषेतील दाखलेही दिले. आता तेथे त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ म.प्र.सरकारतर्फे एक भव्य वेधशाळा उभारण्यात येत आहे.


त्यांना कितीतरी …लिपी..समजत. त्यांचे बंधू आणि त्यांच्याच सहकार्यामुळे नागरी लिपीचे संगणकीकरण झाले. त्यांचे बंधू श्री लक्ष्मण श्रीधर वाकणकर (बापू) यांनी १९६८ मध्ये मुंबईत ‘गणेश विधा’ नावाचे पुस्तक लिहिले; त्यात अनेक रहस्य उलगडली आहेत. डॉ विष्णु यांनी हडप्पाची शैल चित्र लिपी, मौर्य युगातील ब्राह्मी लिपी, खरोष्टी लिपी, गुप्तयुगातील ब्राह्मी, देवनागरी, शारदा या सर्व लिपींचा अभ्यास केला. शक संवत २०६ (२८४ ख्रिस्तपूर्व ) काळातील, मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील महाक्षत्रप स्वामी विश्वसिंघाचा ब्राह्मी आणि संस्कृत भाषेत लिहिलेला शिलालेख सर्वप्रथम यांनीच  वाचून दाखविला. तो लेख शाजापूरच्या संग्रहालयात ठेवला  आहे.लिपी बद्दलही अनेक लेख त्यांनी लिहिले आहेत.

त्यांनी जरी संपूर्ण भारतावर प्रेम केले, आपली संस्कृती जोपासणे, संवर्धन करणे यावर भर दिला तरी त्यांचा मध्यप्रदेश आणि त्यातही माळवा प्रांतावर असलेला विशेष लोभ कोणीही नाकारू शकत नाही. त्यांचा दृढ विश्वास होता की हीच ताम्रपाषाणसंस्कृतीचा इतिहास सांगणारी महत्त्वाची जागा आहे. त्यांनी शोधून काढलेली “ कायथा “ संस्कृती त्यांच्या शोध कार्यासाठी मैलाचा दगड ठरेल. ही कायथा ताम्रपाषाणीक संस्कृती …२००० ख्रिस्तपूर्व ते १८०० ख्रिस्तपूर्व ठरली आहे .

संस्कार भारती त्यांचे जन्म शताब्दी वर्ष संपूर्ण भारतात साजरे करीत आहे. वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि त्यांच्या  भव्य दिव्य कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या सहस्त्र शिष्यांनी आपली कला विनम्रपणे त्यांना अर्पण करीत मनोभावे श्रद्धांजली अर्पिली. चित्र प्रदर्शनी व कार्यशाळा ठिकठिकाणी भरविण्यात आल्या. त्यांच्या नावाने मासिकांचे खास अंक काढण्यात आले. माजी मुख्यमंत्री भारावून त्यांच्याबद्दल बोलले. सर्वच प्रांतात संस्कार यात्रा काढण्यात आल्या.

त्यांचे कार्य इतके महान होते, त्याबद्दल लिहिणे म्हणजे सूर्यास काजव्याने ओवाळणे ठरेल.

डॉ. वाकणकर हे  बहुमुखी होते. सळसळते चैतन्य होते. कधी कोठेही सर्वेक्षण (तपासणी) करायला निघाले की लगेच इतिहासाच्या तरुण विद्यार्थ्याना आपल्या  सोबत नेत. त्यांचे ज्ञानवर्धन करीत.

          डॉ. वाकणकर डोंगर चढताना



त्यांनी कथा तर लिहिल्याच पण सुंदर कविताही रचल्या. भारतात आर्यांचे आगमन या विषयावर प्रामाणिक विचारांचे प्रतिपादन केले. ते असे संत महापुरुष आहेत की त्यांचे शब्दच प्रमाणभूत मानले जातात. त्यांची शोधपत्रे, सरस्वती नदीचा शोध, भीम बैठका जागेची माहिती जगाच्या सांस्कृतिक नकाश्यावर अंकित आहे.
ते असे आगळे साधक आहेत की त्यांच्या तपश्चर्या, त्याग यावर भारताला अभिमान आहे. साधे जीवन आणि उच्च विचार याचे तहहयात पालन करीत ते जगले.

आजच्या इतिहास लेखकांसाठी डॉ. स्वतः महान इतिहासकार असल्याने एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखवितात. जेवढे भूकार्य त्यांनी केले आहे ते अवर्णनीय आहे. त्यांच्यासारखे दुसरे उदाहरण आढळणार नाही. आपले शोध  कार्य ते सतत, अनवरतपणे निष्काम भावनेने, स्थिर-चित्ताने करीत. आपल्या कार्यावर निष्ठा, प्रेम असलेला, त्यातच गढून गेलेला खरा तपस्वी सत्यशोधक त्यांना म्हणणे वावगे ठरणार नाही. कुठल्याही पुरस्कार, सन्मानाची त्यांना अपेक्षा देखील नव्हती. तरीही देशाने त्यांचा “ पद्मश्री “ देऊन सत्कार केला आहे. त्यांचे निस्सीम चाहते म्हणतात..हा सन्मान काहीच नाही.

श्वासाच्या शेवटच्या घटकेपर्यंत हा महात्मा कार्य करीत होता. ३ एप्रिल १९८८ रोजी सिंगापूर येथे भारतीय संस्कृतीवरील आपला शोध प्रबंध वाचण्यासाठी ते गेले होते. ते राहत असलेल्या हॉटेल पॅन पॅसिफिकच्या  १४ व्या मजल्यावरून समोरचे प्राकृतिक सौंदर्य त्यांना खुणावत होते. आपल्या रंगात ते मोहक दृश्य बंदिस्त करण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. खिडकीजवळ कॅनव्हास उभा केला, हातात रंग आणि कुंचला घेतला, एक मनोरम चित्र आकार घेत होते. आणि जणू त्या प्रकृतीमध्येच, त्या आदिशक्तीच्या कवेतच ते थोर कलाकार, हातात तसाच कुंचला ठेऊन भिंतीला टेकून, विलीन झाले .. म्हणूनच त्यांना लोकांनी अविश्रांत कलासाधक या नावाने गौरविले. प्रेमाने हरिभाऊ देखील संबोधले.

त्यांचे विद्यार्थी सांगतात, ते इतके साधे, सज्जन, प्रेमळ होते की आम्हाला त्यांची थोरवी तेव्हा जाणवली जेव्हा त्यांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. २०, २५ हजारांच्या वर लोक उज्जैनच्या छत्री चौक ते नई सडकपर्यंत विखुरले होते. सती दरवाज्यातून असंख्य फुले उधळली जात होती. आम्हाला वाटत होते. त्यांनी आमच्यावरच प्रेम केले, आम्हालाच दिशा दाखवली, आमचेच जीवन सुंदर केले. पण आज साश्रु नयनांनी त्यांना निरोप देणारे असंख्य लोक बघून कळले, आमच्यासारखा विचार करणारे असिमीत आहेत.

अश्या थोर साधकाला माझे कोटि कोटि प्रणाम…

@@@

छायाचित्रे : सौजन्य संस्कार भारती, मध्यभारत प्रांत ,ग्वाल्हेर
– ©️ सौ.स्वाती वर्तक,
खार (प),  मुंबई ४०० ०५२.
swati.k.vartak@gmail.com
@@@
Bheem Baithaka 1 by Subhash Phadke
Bheem Baithaka 2 by Subhash Phadke
भीम बैठका येथील गुहांमधील काही चित्रे – प्रेषक सुभाष फडके

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...