स्वातंत्र्य किंवा मरण! जगाला लोकशाही, पाश्चिमात्य साहित्य आणि तत्त्वज्ञान देणा-या ग्रीसला साजेसं हे ब्रीदवाक्य! ग्रीस म्हटलं कि आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस, एजिअन समुद्राचं निळाशार पाणी आणि सान्टोरिनीची निळीपांढरी घरं. ग्रीसला भेट देण्याची आणि विशेषतः तेथील पुरावशेष बघण्याची आम्हा उभयतांची खूप दिवसांपासून इच्छा होती. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ग्रीसच्या भटकंतीबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रवासाचे नियोजन
अथेन्स विमानतळावर २१ डिसेंबरला दुपारी आगमन आणि तिथूनच ३० डिसेंबरला संध्याकाळी प्रस्थान ठरले. ग्रीसला प्रथमच जाणा-या इतर अनेक पर्यटकांप्रमाणे आमचाही अथेन्सला अग्रक्रम होता. त्याशिवाय डेल्फी, मेटेओरा, ऑलिंपिया, स्पार्टा आणि जमल्यास सान्टोरिनी सारखी बेटं अशी wishlist बरीच मोठी होती. हाती असलेल्या आठ पूर्ण आणि दोन अर्ध्या दिवसांत कुठेकुठे आणि कसं जायचं, याचं नियोजन सुरू झालं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथेन्समध्ये चांगली असली तरी देशाच्या अंतर्गत भागात सुधारणेला पुष्कळ वाव आहे. मग अथेन्स सोडून बाकी प्रवासासाठी गाडी भाड्याने घ्यायचे ठरविले. डिसेंबर महिन्यात उष्म्याचा त्रास नसेल आणि पर्यटक कमी व पर्यायाने हॉटेल्स स्वस्त असतील, असा अंदाज होता. अर्थात मधेच २५, २६ तारखांना सुट्टीमुळे बहुतेक पर्यटनस्थळे बंद असायची शक्यता होती.
या सगळ्या दृष्टीने इंटरनेटवर माहिती गोळा करायला लागल्यावर लक्षात आले कि डिसेंबरमधे जाण्यासाठी दक्षिण ग्रीसचा पेलोपोनिझं (Peloponnese) प्रांत योग्य आहे. २५, २६ ला म्युझिअम्स वगैरे बंद होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूर्याची कृपा असलेल्या ग्रीसमध्ये (जुन्या ग्रीकमध्ये ग्रीसला 'Hellas' अर्थात 'सूर्याची कृपा असलेला' म्हणतात.) सांस्कृतिक अखत्यारीतील बहुतेक पुरातन स्थळे हिवाळ्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच खुली होती! (त्याशिवाय सरकारी कर्मचारी अचानक संपावर जाऊ शकतात, हे वाचलं होतं; पण त्याचा फटका बसेल, असं वाटलं नव्हतं.)
ठिकाणांमधील अंतरं आणि दुपारी ३ ची डेडलाईन या अडथळ्यांच्या शर्यतीत आमचे 'कालामाटाहून सकाळी निघून मीस्ट्रास आणि स्पार्टा एका दिवसात बघू' असे इमले ढासळू लागले. शेवटी अथेन्स, डेल्फी आणि पेलोपोनिझं प्रांतातील कोरिन्थ व आर्गोलिस हा विभाग (नाफ्प्लिओ व जवळपासची स्थळं) बघायचं ठरवलं. पेलोपोनिझं (Peloponnese) हा दक्षिणकडील प्रांत (एक बोट नसलेल्या) हाताच्या पंजाच्या आकाराचा असून कोरिंथचा कालवा त्याला ग्रीक मुख्यभूमीपासून वेगळा करतो.
प्रवासाची रूपरेषा
२१ डिसेंबर: दुपारी अथेन्स (Athens) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन -
गाडी भाड्याने घेणे - केप सूनिअन (Cape Sounion) - कोरिंथ (Corinth)
२२ डिसेंबर: कोरिंथ - मिकेने (Mycenae) - नाफ्प्लिओ (Nafplio)
२३ डिसेंबर ते २५ डिसेंबर: नाफ्प्लिओ स्थलदर्शन आणि एपिडाउरोस (Epidaurus)
२६ डिसेंबर: नाफ्प्लिओ - कोरिंथ कालवा - अथेन्स विमानतळ - गाडी परत करणे - अथेन्स शहर
२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर ची दुपार: अथेन्स स्थलदर्शन आणि एक दिवसाची डेल्फी सहल
३० डिसेंबर: संध्याकाळी अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळाहून प्रस्थान
दिवस पहिला: आगमन आणि केप सूनिअन
अथेन्सला विमान पोहोचायला तासभर उशिर झाला. जेवणासाठी फारसे पर्याय दिसत नव्हते. मग सँड्विच खाऊन घेतलं आणि थोडा आराम केला. कॅफेमध्ये संत्र्याच्या चवीचा रवा केक होता. तो खाऊन कडक ग्रीक कॉफी पिऊन मस्त तरतरी आली. भाड्याची गाडी एका स्थानिक एजंसीकडे जालावरून आरक्षित केली होती. तिथे कागदपत्र बनवून किल्ली घेतली. विमानतळाहून बाहेर पडायचा योग्य रस्ताही विचारला. गाडी पार्किंगमध्ये शोधून तिची अवस्था तपासून निघालो एकदाचे अथेन्सहून! साधारण ५० किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला सूर्यास्ताच्या शक्य तितक्या आधी केप सूनिअनला पोहोचायचं होतं.
केप सूनिअनवरून संध्याकाळी दिसणारा नजारा
विमानतळाचा परिसर मागे पडल्यावर डोंगराळ भाग सुरू झाला. अधूनमधून छोटीमोठी गावं लागत होती. रस्त्यावर बहुतेक पाट्या ग्रीकमध्ये होत्या. नेविगेटरवर भरोसा ठेवून चाललो होतो. पण सूनिअनची कुठे निशाणी दिसेना. मग शाळाकॉलेजात वापरलेली ग्रीक α, β, γ आठवून आठवून गावांची नावं वाचायचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा गंमत वाटत होती, पण सहलीत नंतर याचा खूप उपयोग झाला. पण पुढच्या एकदोन दिवसांत आपल्याला ग्रीक शब्द कळत नसले तरी थोडेफार वाचता येत आहेत, असा फाजील आत्मविश्वास वाटायला लागला की बरोब्बर एखाद्या शब्दात ग्रीक Ρ किंवा ρ येऊन दांडी गूल करायचा! तो ग्रीक -हो म्हणजे 'र' आहे, इंग्रजी 'पी' नाही, हे कळत असूनही वळायचं नाही.
थोड्या वेळाने रस्त्याच्या डाव्या हाताला समुद्राचं अस्तित्व जाणवायला लागलं. एका गावी छोटं बंदर दिसत होतं, हिवाळ्यामुळे फारशी हालचाल नसावी. काही मिनिटं रस्ता उन्हात चमकणा-या पाण्याशेजारून गेला.
साडेचार वाजता केप सूनिअनला पोहोचलो. प्रवेशाचं तिकिट काढतानाच ताकीद मिळाली कि सव्वापाचला परिसर बंद होतो. केप सूनिअन हे समुद्रात शिरलेलं भूशिर असून अट्टिका द्वीपकल्पाचं (Attica peninsula) दक्षिण टोक आहे. तीन बाजूंना एजिअन समुद्र (Aegean Sea) असलेल्या टेकडीवर ग्रीक मिथकांमधील समुद्रदेव पोसायडनच्या (Poseidon) देवळाचे अवशेष आहेत. हे संगमरवरी देऊळ ख्रिस्तपूर्व ४४० च्या दरम्यान त्याही आधीच्या देवळाच्या जागी बांधले गेले.
सूर्य अस्ताला जायची वेळ जवळ येऊ लागली तसं देऊळही सोनेरीपिवळ्या प्रकाशात न्हाऊन निघालं.
ग्रीक मिथकांतील हा समुद्राचा देव त्याच्या हातातील त्रिशूळाने समुद्रात वादळे निर्माण करतो. पोसायडनची कृपा होण्यासाठी नाविक इथे प्रार्थना करत. पोसायडनला शांत करण्यासाठी प्राण्यांचे बळी देत असत. आता देवळाच्या कोलोनेडचे काही खांबच शिल्लक आहेत. परंतु पूर्वी बाहेरच्या बाजूने डोरिक पद्धतीचे खांब आणि आत गर्भगृह (Naos) अशी रचना होती. गर्भगृहात बहुधा ब्राँझचा पोसायडनचा पुतळा असावा.
इथून एजिअन समुद्रात होणारा सूर्यास्त आणि संधिप्रकाशात उजळून निघणारे अवशेष बघण्यासाठी अथेन्सहून खूप पर्यटक येतात.
मंदिराच्या पायाच्या दगडांवर आधुनिक मानवाचंही कोरिवकाम दिसलं. इंग्रज कवी लॉर्ड बायरनचं नाव इथे कोरलेलं आहे, असं वाचलं होतं. ते मात्र कुठे दिसलं नाही.
एक ग्रीक मिथक म्हणतं कि अथेन्सचा राजा एजिअसचा (Aegeus) मुलगा थेसेअस (Theseus) हा मिनोटाउरस (Minotaur) या दैत्याचा वध करायला क्रिटी बेटावर गेला असताना एजिअस हा केप सूनिअन येथे त्याची वाट पाहत होता. विजयी होऊन परत येताना थेसेअस विजयाचे चिह्न असलेले बोटीला पांढरे शीड लावायला विसरला. परत येणा-या बोटीचं काळं शीड पाहून पुत्रशोकाने एजिअसने केप सूनिअन येथे समुद्रात उडी मारून मरण पत्करले. तेव्हापासून ह्या समुद्राला एजिअन समुद्र हे नाव पडले.
समोरचं दृश्य डोळ्यात भरून घ्यायचा प्रयत्न करत होतो. आजूबाजूलाही कुणीच बोलत नव्हतं. जणू आम्हाला सगळ्यांना त्या प्रकाशाने आणि पाण्यावरच्या मंद लाटांनी भारलं होतं. पण कातरवेळी वाटणारी हूरहूर नव्हती. सूर्य अस्ताला गेला होता; पण चंद्र त्याचा शीतल प्रकाश घेऊन आला होता!
(क्रमशः)
काही प्रॅक्टिकल प्रश्न -
१. ट्रिपचा खर्च किती आला हे वर्गीकरण करून सांगता येईल का -
* व्हिसा
* विमान प्रवास
* तिथले लोकल ट्रान्सपोर्ट
* हॉटेल रहाणे
* खाणे
* म्युझिअमच्या एंट्री फिया
२. साधारण किती लोकल करन्सी सोबत नेली? इथले एटीएम कार्ड तिथे वापरताना काही अडचण आली का?
3. तुम्ही शाकाहारी आहेत का, असाल तर तिथे खाताना काही अडचण झाली का?
4. तिथले कोणते खाद्यपदार्थ आवडले?
युरोपातील शेंगेन करारात सहभागी देशांचा मिळून शेंगेन (Schengen) विजा आहे. यात ग्रीससह अनेक देश येतात. मी शेंगेन मध्ये राहत असल्याने मला ग्रीसला जायला विजा काढावा लागला नाही. पर्यटकांसाठी वेगळा शेंगेन विजा असतो. ग्रीसबरोबर शेंगेनमधील इतर देशांतही (जसे इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रांस) फिरायचे असल्यास एकाच विजाने काम होते. अर्थात पर्यटकाच्या नागरिकत्वाप्रमाणे नियम बदलतात. (उ.दा. अमेरिकन नागरिकांसाठी भारतीयांपेक्षा वेगळे नियम आहेत.) ही शेंगेनची ढोबळ माहिती झाली. आंतरजालावर अधिक माहिती मिळू शकेल. परंतु ज्या देशात जायचे त्या देशाच्या वकिलातीकडून (किंवा तिच्या साईटवरून) अधिकृत माहिती मिळविणे उत्तम!
मी युरोपियन युनिअनच्या अंतर्गत प्रवास केल्याने भारतातून ग्रीसला जायचा विमानप्रवास, तसेच स्थानिक चलन (युरो) किती न्यायचं किंवा एटिएम कार्ड वापर याबद्दल विशेष सांगू शकणार नाही. मी इथल्या एटिएम आणि क्रेडिट कार्डांचा वापर केला; त्यांचे दर आणि नियम भारतीय कार्डांपेक्षा वेगळे असावेत. अश्या बर्याच गोष्टींची माहिती तुम्हाला Tripadvisor सारख्या फोरमवर किंवा मिपावरील युरोपात भटकंती केलेल्या इतर सदस्यांकडून मिळू शकेल.
शाकाहारी नसल्याने काहीही अडचण आली नाही. शाकाहार आणि बाकी प्रश्नांची उत्तरे लगेच देता येणार नाहीत. थोडी शोधाशोध करावी लागेल. पण सवड मिळाली की नक्की देईन.
हॉटेल्स: एका डबल रूमचा सकाळच्या न्याहारीसह खर्च युरोत
कोरिंथ (साधं b&b): €५०
नाफ्प्लिओ (बुटिक हॉटेल): €६२.९०
अथेन्स (मोठं हॉटेल, उत्तम दर्जा व न्याहारी): €९९. हे हॉटेल ओमोनिया
चौकापाशी (फिरायला मध्यवर्ती) होतं. तिथून पाच मिनिटांवर भारतीय उपखंडातील
लोकांची दुकाने, उपहारगृहे आहेत; घेट्टोही म्हणता येईल. आम्हाला वाईट अनुभव
आला नाही, पण हा भाग बर्याच लोकांना असुरक्षित वाटतो. अथेन्समधे हॉटेल्स
महाग आहेत आणि दर्जाही सुमार असू शकतो. त्यामुळे ऑनलाईन रिव्यूज वाचणे
आवश्यक.
हिवाळा हा लो सीझन आहे, इतर वेळी दर जास्त असू शकतात.
पर्यटनस्थळांचे प्रवेशदर
माणशी €४ ते €१२ असे वेगवेगळे दर होते. यात बर्याच ठिकाणी साईट आणि तिथलं संग्रहालय मिळून एक दर होता.
वाहतूक
भाड्याच्या गाडीचे ५ दिवसांचे €१३५ अधिक इंधनाचा खर्च. अथेन्स-ट्रिपोली महामार्ग नवीन असून टोल आहे.
अथेन्समधे पब्लिक ट्रान्स्पोर्ट (मुख्यत्वे मेट्रो)आणि एअरपोर्ट बस वापरली.
तिकिटांचे बरेच प्रकार आहेत. डेल्फीला जायला बस आहे. (KTEL ही ग्रीसची बस
कंपनी आहे.) परतीचं तिकिट माणशी साधारण ३२ युरो होतं.
खाद्यपदार्थ
ग्रीक खाण्याबद्दल चार ओळीत लिहिणं कठिण आहे. पण शाकाहारात फेटा चीझ घातलेलं सॅलड, वांगं किंवा झुकिनीची भजी, भाताचं मिश्रण भरलेली द्राक्षाची पानं, घट्ट दही किंवा चीझ वापरून केलेली डिप्स असं बरंच काही आहे. शिवाय टोमॅटो किंवा भाज्या घालून भात, कडधान्याचे स्ट्यू, बटाट्याचे काप, वांग्याचं भरितही बनवितात.
मांसाहारातही सुव्लाकी, मीट बॉल्स, ग्रिल्ड मासे, स्ट्यू असे प्रकार आहे. गोमांस एकंदर कमी खातात.
मध आणि अक्रोड घालून घट्ट दही, रव्याचा केक, संत्र्याचा केक, नानकटाईसारखी बिस्किटं हे गोड पदार्थ झाले.
प्राचीन कोरिंथ
केप सूनिअनचा सूर्यास्त मनात साठवून पहिल्या दिवशी मुक्कामासाठी कोरिंथला आलो. हे खरं तर नवं कोरिंथ. साधारण साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असलेलं प्राचीन कोरिंथ (ग्रीकमध्ये Archaia Korinthos) १८५८ साली भूकंपामुळे उध्वस्त झाल्यावर जुन्या शहरापासून दूर नवं कोरिंथ वसविण्यात आलं.
नव्या कोरिंथमध्ये एका न्याहारी आणि निवासात राहिलो. तिथल्या मालकिणबाईंशी थोड्या गप्पा झाल्या. त्यांच्यामते अथेन्स खूप गर्दी असलेलं, अस्ताव्यस्त आणि कुरूप (ugly) शहर आहे! तिथे दोन दिवसांपेक्षा जास्त राहू नये!! अथेन्सहून अधिक वेळ आम्ही त्यांच्या भागात फिरणार आहोत, हे कळल्यावर त्यांचं थोडं समाधान झालं. मग त्यांनी आम्ही जाणार असलेल्या भागाचा नकाशा आणि काही पत्रकंही दिली. बहुधा त्या खुंटा हलवून बघत असाव्यात कि आम्हाला खरोखर त्या जागांबद्दल माहिती आहे कि नाही.
पेलोपोनिझं प्रांताच्या सफरीची सुरुवात कोरिंथपासून होणार होती. हा भूभाग म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एक प्रचंड मोठं द्वीपकल्प आहे. ख्रिस्तपूर्व सुमारे १,००,००० वर्षांपासून मानवाने या भागात वास्तव्य केलेलं आहे. पेलोपोनिझं प्रांताचं प्राचीन तसेच आधुनिक ग्रीसच्या इतिहासात स्थान खूप महत्त्वाचं. पंधराव्या शतकाच्या मध्यापासून ग्रीस हा ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. जवळजवळ चारशे वर्षांची ही गुलामी संपविणारं ग्रीसचं स्वातंत्र्ययुद्ध १८२१ साली पेलोपोनिझं प्रांतात सुरू झालं; बरीचशी लढाईही इथेच लढली गेली. १८२७ मध्ये स्वतंत्र होणारा पेलोपोनिझं हा ग्रीसचा पहिला भाग. १८२८ ते १८३४ या काळात इथलं नाफ्प्लिओ हे शहर स्वतंत्र ग्रीसची पहिली राजधानी होतं.
इलियड या होमरच्या जगप्रसिद्ध महाकाव्यातील एक मुख्य पात्र म्हणजे मिकेने किंवा मायसिनिचा (Mycenae) राजा अगामेम्नॉन (Agamemnon). अगामेम्नॉनचे आजोबा पेलोप्सचे (Pelops) बेट ते पेलोपोनिझं! इलियडमध्ये उल्लेख असलेली मिकेने, स्पार्टा, आर्गोस इत्यादी प्राचीन ग्रीक राज्ये पेलोपोनिझं भूभागात होती. त्यातील मायसिनिअन संस्कृतीविषयी पुढच्या भागात अधिक माहिती येईल. ऑलिंपिक खेळ सुरू झाले ते ऑलिंपियाही या प्रांतात येतं.
अक्रोकोरिंथ किल्ल्यावर
अक्रोकोरिंथचा पहिला दरवाजा
अक्रोपोलिस म्हटलं की आपल्याला आठवतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस. परंतु अक्रोपोलिस शब्दाचा अर्थ होतो एखाद्या टेकडीसारख्या उंच जागी असलेली गढी किंवा कोट. प्राचीन कोरिंथला पायथ्याशी घेऊन असलेलं कोरिंथचं अक्रोपोलिस, म्हणजेच अक्रोकोरिंथ (ग्रीक Akrokorinthos), ५७५ मीटर उंच डोंगरावर आहे. याठिकाणी ख्रिस्तपूर्व सातव्या शतकातही छोटा कोट होता. तेव्हापासून अनेक शत्रूंनी किल्ल्यावर स्वार्या केल्या, किल्ला जिंकून नवीन बांधकामे केली. बायझंटाइन, तुर्की, वेनिशिअन अंमलाच्या खुणा इथे दिसतात.
सुपीक जमिनीबरोबरच सागरी आणि खुष्कीचे मार्ग कोरिंथवरून जात असल्यामुळे कोरिंथला महत्त्व मिळालं. दरवाज्यातून आत गेल्यावर तटावरून दिसणारा दूरवरचा परिसर बघून पटतं की संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याची जागा किती योग्य आहे.
सकाळी न्याहारीच्या वेळी निवासाच्या मालकिणबाईंशी पुन्हा बोलणं झालं होतं. अक्रोकोरिंथला जातोय कळल्यावर आम्ही पायात कसले बूट घातले आहेत हे त्यांनी स्वतः जातीने पाहून खात्री केली होती. त्याचं कारण आता कळत होतं. शेकडो वर्षांच्या वर्दळीने घासून गुळगुळित झालेल्या दगडांवरून ट्रेकिंगचे शूज असूनही पाय घसरत होते!
मागे वळून पाहिल्यावर
किल्ल्याच्या एकात एक अश्या तीन तटबंद्या आहेत. दुसर्या दरवाज्यातून आत गेल्यावर कोरिंथचं आखात आणि दूर डोंगररांगा दिसत होत्या.
इथे उभं राहून कुण्या ग्रीक युवतीने पर्शियाशी लढायला गेलेल्या तिच्या प्रियकराची वाट पाहिली असेल...
एक जुनंपुराणं चर्च दिसलं. किल्ल्यावर कोणी राहत नाही. पण चर्चमध्ये नियमित प्रार्थना होत असावी. आतमधली रचना अगदी साधी होती. भिंतींवर संतांच्या तसबिरी मात्र खूप होत्या.
किल्ल्याच्या वरच्या भागात चॅपेल, तुर्कांनी बांधलेल्या मशिदी, अफ्रोडाइट देवीचं देऊळ अश्या अनेक इमारतींचे भग्नावशेष विखुरलेले आहेत. पण कुठेही दिशादर्शक नव्हते; कुणाला विचारायची सोय नव्हती. मग ६० एकर पसरलेल्या किल्ल्यावर भटकत न बसता प्राचीन कोरिंथकडे मोर्चा वळवला.
विस्तीर्ण पसरलेला अक्रोकोरिंथ
प्राचीन कोरिंथचे अवशेष
अक्रोकोरिंथच्या पार्श्वभूमीवर अपोलोचं देऊळ
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात बांधलेलं डोरिक पद्धतीचं अपोलोचं देऊळ
कोरिंथमध्ये झालेल्या उत्खननानुसार इथे किमान साडेआठ हजार वर्षांपासून मानवी वस्ती आहे. परंतु ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात भरभराटीला सुरुवात झाली. अडिच हजार वर्षांपूर्वी कोरिंथ हे ग्रीसमधील एक मोठं आणि अथेन्सपेक्षाही महत्त्वाचं राज्य होतं. तेव्हा येथे खेळांसाठी बांधण्यात आलेल्या मुख्य थिएटरमध्ये १५,००० प्रेक्षक बसू शकत. आता एके काळच्या वैभवाची साक्ष द्यायला फक्त काही अवशेष उरले आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वीची काव्य आणि संगीताच्या स्पर्धांची जागा (Roman Odeum). आसनक्षमता ३,०००!
एका संगमरवरी रस्त्याचे भग्नावशेष. खालील रेखाटनात या रस्त्याचे मूळ स्वरूप कसे असेल, हे कळते.
प्राचीन कोरिंथची बर्यापैकी टिकून असलेली एक वास्तू म्हणजे पिरेनं (Peirene fountain) हा पाण्याचा स्रोत. ग्रीसच्या भूमितीय कालखंडात (Geometric Period, ख्रिस्तपूर्व नववे ते सातवे शतक) किंवा त्याआधी इथे पाण्याच्या साठवणीची आणि नियोजनाची सुरुवात झाली असावी. ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात जवळच्या झर्यांचं पाणी चार तळ्यांत साठवत असत. पाणी भरण्यासाठी तीन खोल हौद आणि आजूबाजूला सहा दालने होती. रोमन काळात येथे मोठी आवारं, कोलोनेड असलेलं दुमजली बांधकाम करण्यात आलं. सध्या दिसणारे अवशेष रोमन आणि त्यानंतरच्या बायझंटाइन काळातील आहेत.
.
पोसायडनची प्रेयसी पिरेनंचं नाव असलेल्या या वास्तूसह आम्ही प्राचीन कोरिंथचाही निरोप घेतला.
पुढिल भागात कोरिंथचं वस्तुसंग्रहालय आणि मायसिनी.
(क्रमशः)
अगामेम्नॉनच्या राज्यात
कोरिंथचे वस्तूसंग्रहालय
कोरिंथच्या अवशेषांजवळ तिथे झालेल्या उत्खननांमधून मिळालेल्या वस्तू, पुतळे, मातीची भांडी वगैरेंचं एक छोटेखानी संग्रहालय आहे. तिथल्या दालनांमधे ग्रीक संस्कृतीतील वेगवेगळ्या कालखंडांप्रमाणे वस्तू मांडून ठेवल्या आहेत. या संग्रहालयाचे काही फोटो:
संग्रहालयाच्या आवारात
थिएटरच्या इमारतीवर कोरलेली ग्रीक्स आणि अॅमेझॉन्सची लढाई
अठराशे वर्षे जुन्या दगडी शवपेटीवर (Sarcophagus) कोरलेला 'Seven Against Thebes' या नाटकातील सात सरदार लढाईसाठी निघतात तो प्रसंग
ग्रीक गोपाळ
आणखी एक सुंदर मोझाइक; मध्यभागी डायोनिअस हा द्राक्ष, वाइनची निर्मिती, नाट्यकला इत्यादींचा देव
हे अठराशे वर्षे जुनं मोझाइक एका घराच्या भोजनगृहातील जमिनीवर होतं.
खालच्या फोटोत त्या घराचा आराखडा आणि मोझाइकविषयी माहिती आहे. ५x९ मीटर
आकाराच्या या मोझाइकच्या मध्यभागी तीन चौकोनांत फळंफुलं, पक्षी आणि बाजूने
वेली व जंगली प्राणी अशी नक्षी होती. कडेने असलेल्या वेलबुट्टीवर भोजनासाठी
आसने असत.
.
शेवटच्या फोटोतील मातीचा घडा चौतीसशे वर्षे जुना (खि.पू. १४०० ते १३०० वर्षे) आहे! ग्रीक इतिहासाच्या ज्या कालखंडात हा घडा बनविला गेला, त्याला मायसिनिअन संस्कृती (Mycenaean civilization) म्हणतात. ज्या राज्यावरून हे नाव पडलं, ते मायसिनी (Mycenae, ग्रीक मिकेने) बघण्याची उत्सुकता होती. मग कोरिंथहून ५० किमीवर असलेल्या मायसिनीकडे मोर्चा वळविला.
अगामेम्नॉनच्या राज्यात (मायसिनी)
इलियड या होमरच्या काव्यातील अगामेम्नॉनचा उल्लेख मागच्या लेखात आला होता. या अगामेम्नॉननं राज्य केलं ते मायसिनी हे पुरातन स्थळ पर्यटकांच्या रडारवर फारसं नसलं तरी त्याला ग्रीसच्या आणि जगाच्याही संस्कृतींच्या (civilization याअर्थी) अभ्यासात महत्त्वाचं स्थान आहे. कांस्य युगाच्या शेवटच्या टप्पात (खि. पू. १६०० ते ११०० वर्षे) ग्रीसमध्ये मायसिनीअन संस्कृती होती. या काळात ग्रीसमध्ये नागरीकरण झालं.
मायसिनी किल्ल्याच्या अवशेषांचा आराखडा
मायसिनी हे या संस्कृतीचं मुख्य केंद्र होतं, त्याशिवाय टिरिन्स (Tiryns), पायलोस (Pylos), थिब्स (Thebes), आर्गोस (Argos), स्पार्टा (Sparta) अशी अनेक palace states होती. एजिअन समुद्रातील बेटं, मॅसेडोनिआ याठिकाणीही ही संस्कृती होती.
सिंहद्वार (Lion Gate): ख्रिस्तपूर्व १२५० दरम्यान घडविलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा
या काळात स्थापत्य, कला, धातूकाम अश्या अनेक अंगांनी विकास झाला. कांस्य युगातील इतर भूमध्यसागरीय ठिकाणांबरोबर व्यापार सुरू झाला. ग्रीक भाषेची सगळ्यात जुनी लिपीसुद्धा या काळातील. भरभराटीबरोबरच आर्थि़क व धार्मिक व्यवस्था आणि एकसंधता आली. शस्त्र व युद्धकला यांना खूप महत्त्व होतं. भक्कम तटबंदी असलेले कोटकिल्ले आणि कोटाच्या आत राजाचा प्रासाद आणि इतर इमारती असत.
किल्ल्यातील भग्नावशेष
या संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजघराण्यातील लोकांची दफनभूमी. दफनाच्या ठिकाणी सोन्याचांदीचे दागिने, मुखवटे आणि इतर मौल्यवान वस्तू मिळाल्या आहेत. त्यावरून मायसिनीची संपन्नता तसेच ग्रीसबाहेरील जगाशी असलेले व्यापारी संबंध दिसून येतात.
मायसिनी येथील २७मी. व्यासाची एक वर्तुळाकार दफनभूमी (Grave Circle), खि.पू. सोळावे शतक
या प्रकारच्या Grave Circle शिवाय थोलोस प्रकाराच्या थडग्यांसाठी (Tholos Tomb) मायसिनी प्रसिद्ध आहे. त्यातील विशेष महत्त्वाचं थडगं म्हणजे ख्रिस्तपूर्व १३५० ते १२५० या काळातील एट्रिअसचा खजिना (Treasury of Atreus). अगामेम्नॉनच्या पित्याचं, एट्रिअसचं नाव या जागेला मिळालं असलं तरी हे एट्रिअसचं थडगं असण्याचा काहीही पुरावा नाही.
थोलोसची ३५ मी. लांब आणि ६ मी. रुंद मार्गिका (dromos) आपल्याला ५.५ मी. उंच दरवाज्याशी आणून सोडते.
दरवाज्याचा दर्शनी भाग एकेकाळी असा असावा.
थोलोसच्या मुख्य दालनाची उंची १३ मी. आणि व्यास १४.५ मी. आहे. दगडांच्या ३३ समकेंद्रीय वर्तुळांनी हे दालन बनविलेलं आहे. या वर्तुळांची त्रिज्या छताकडे कमीकमी होते. एट्रिअसच्या खजिन्याची भव्यता, त्याकाळातील स्थापत्यशास्त्रातील प्रगती यांनी आपण स्तिमित होवून जातो.
मुख्य दालनाचे छत
अंतर्भागाचा आराखडा
सगळ्यात आतील दफनाची जागा
मायसिनीत उत्खननातून मिळालेल्या बर्याच गोष्टी अथेन्सच्या National Archaeological Museum मध्ये आहेत. परंतु मायसिनीतही एक लहान म्युझिअम आहे. तिथे आपल्याला मायसिनीअन काळाबद्दल अधिक माहिती मिळते.
मायसिनीअन कलेचा उत्तम नमुना असलेलं भित्तीचित्र (Fresco)
खि.पू. १३०० ते १२५० मधील पाटावरवंटा आणि भांडी
थडग्यांमधे मिळालेले मुखवटे, दागिने, शस्त्रे
.
अगामेम्नॉनच्या राज्यावरील लेखाचा शेवट करू या अथेन्सच्या National Archaeological Museum मधील अगामेम्नॉनच्या मुखवट्याने (Mask of Agamemnon). वर दाखविलेल्या Grave Circle मध्ये हा मुखवटा मिळाला. सुरुवातीला अगामेम्नॉनचा मुखवटा म्हणून प्रसिद्ध झालेला हा मुखवटा अगामेम्नॉनच्या काळापेक्षाही जुना आहे, हे नंतरच्या संशोधनातून लक्षात आले.
(क्रमशः)
ट्रॉयच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेल्या हाइनरिश श्लीमानने ट्रॉयनंतर २ वर्षांनी १८७६ मध्ये मायसिनीत उत्खनन केले. त्यावेळी (फोटोत दाखविलेल्या) Grave Circle मध्ये मिळालेल्या ५ मुखवट्यांपैकी हा एक मुखवटा आहे. बहुधा श्लीमान आणि ट्रॉयच्या प्रसिद्धीमुळे या मुखवट्याचा संबंध अगामेम्नॉनशी जोडला गेला असावा. स्वतः श्लीमानने असे म्हटल्याचा लिखित पुरावा नाही. नवीन संशोधनानुसार हा मुखवटा खिस्तपूर्व १५८० ते १५५० या काळातील, म्हणजेच अगामेम्नॉनच्या कालखंडापेक्षा सुमारे ३०० वर्षे जुना असावा.
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत असलेल्या मायसिनीतून पाय निघत नव्हता. पण ३ वाजून गेल्यावर तिथल्या रखवालदारांनी हाकलण्याआधी निघालो. बाहेर मस्त उन पडलं होतं. निळंशार आकाश आणि समोर ऑलिवच्या झाडांना घेवून उभे असलेले डोंगर! आणखी दोनतीन तास सहज उजेड असणार होता. ३ वाजता साइट बंद करण्याच्या आळशीपणाला नावं ठेवत बाहेर सावलीत गप्पा मारत बसलो. तिथे काम करणार्यांच्या गाड्या एकेक करून निघू लागल्या. आम्हाला तिथे बघून एकदोघांनी चौकशी केली. मग त्यांच्यामागोमाग आम्हीही नाफ्प्लिओच्या दिशेने निघालो.
पुढचे चार दिवस नाफ्प्लिओला (Nafplio) मुक्काम होता. ग्रीसमधील सगळ्यात सुंदर आणि रोमँटिक शहरांमध्ये हे शहर गणलं जातं. त्याशिवाय ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यात या शहराला अनन्यसाधारण स्थान आहे. त्याविषयी अधिक माहिती पुढच्या भागात येईलच. पायाशी समुद्र आणी उशाशी पालामिडी किल्ला असलेलं नाफ्प्लिओ हे अथेन्सवासीयांचं सुट्ट्यांसाठी आवडतं ठिकाण. २२ डिसेंबरला फारशी गर्दी नव्हती, पण पुढच्या दोन दिवसात पर्यटक यायला लागले आणि मस्त उत्सवी वातावरण तयार झालं.
हॉटेल जुन्या शहराच्या मागच्या बाजूला उंचावर होतं. गाडी थोडी दूर पार्क करून सामान घेवून चालत गेलो. हॉटेल छोटंसं असलं तरी छान सजवलं होतं. गावात जाण्यासाठी रस्त्याने वळसा घेवून जाण्यापेक्षा समोरच पायर्या होत्या. खिडक्यांतून खाली पसरलेल्या जुन्या पद्धतीच्या इमारती, समुद्र आणि त्याच्या पलीकडे डोंगररांगा दिसत होत्या.
दुसर्या दिवशी सकाळी तयार होवून न्याहारीला गेल्यावर कळले, हॉटेलमध्ये जास्त पाहुणे नसल्याने आज बुफे नाही आणि आम्हाला हवी ती न्याहारी बनवून मिळेल. अंड्याचा पोळा, चीजटोस्ट आणि चक्क्यासारखं ग्रीक दही अशी मस्त पोटपूजा झाली.
न्याहारीची जागा
फोटोतल्या काचेतून मध्यभागी दिसणारी वेनिशिअन्सच्या राज्यात १७१३ साली बांधलेली इमारत कालपासून खुणावत होती. त्या इमारतीत आता आर्गोलिस या भागात सापडलेल्या पुराणवस्तूंचे संग्रहालय आहे. तिकडे जाण्याआधी गावात थोडा फेरफटका मारला. सगळीकडे डोळ्यात भरेल अशी स्वच्छता. एकदोन मोठे रस्ते सोडले तर सगळे गल्लीबोळ किंवा पायर्या. त्या गल्ल्यांमध्येही गाड्या चालविणारे शूरवीर होते! अलीकडेच गावाचं नूतनीकरण झालं असावं. पण कुठेही जुन्या बांधकामाशी विसंगत असं काही नव्हतं.
नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय
संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही इमारत ग्रीसमधील वेनिशिअन स्थापत्याचं उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला शस्त्रागार म्हणून बांधलेली ही इमारत नंतर सैनिकांना राहायला, तसेच दुसर्या महायुद्धात जर्मन इंटरोगेशन सेंटर म्हणून वापरली गेली. नाफ्प्लिओचा मुख्य चौक असलेल्या सिंटाग्मा (राज्यघटना) चौकाची एक बाजू म्हणजे ही इमारत.
तिकिट काढून गेलो तर आतमध्ये जास्त कोणी पर्यटक नव्हते. दुमजली संग्रहालयात वेगवेगळ्या कालखंडांनुसार वस्तू आणि अवशेष मांडून ठेवले आहेत. सुमारे तीस हजार वर्षं जुन्या दगडी वेदिका (Paleolithic altars किंवा hearths) इथे बघता येतात.
आर्गोलिसच्या आग्नेय दिशेला समुद्रकिनारी असलेल्या फ्राग्थी (Fragthi किंवा Franchthi) नावाच्या गुहेत सापडलेले अवशेष हे या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. सुमारे चाळीस हजार वर्षांपासून पाच हजार वर्षांपर्यंत म्हणजेच पॅलिओलिथिक, मेसोलिथिक ते निओलिथिक (नवपाषाण युग, पाषाण युगाचा शेवटचा काळ) काळापर्यंत या गुहेत मानवाने निवास केला होता. त्यामुळे मानवी विकासातील विविध टप्प्यांच्या (जसे hunter-gatherer ते शेतकरी) अभ्यासात या गुहेला विशेष महत्त्व आहे. पर्यटकांना या गुहेला भेट देता येत नाही; परंतु संग्रहालयात ही गुहा, ग्रीसच्या या भागातील मानवी अस्तित्व आणि विकास यांवर एक माहितीपूर्ण चित्रफित बघायला मिळाली.
.
पहिल्या फोटोत ख्रिस्तपूर्व ६८०० ते ३२०० या काळातील बाणांची टोके, धारदार पाती, हाडांपासून बनविलेली हत्यारे, पाटावरवंटा दिसत आहेत. दुसर्या फोटोत ख्रिस्तपूर्व ५८०० ते ५३०० मधील एका नवजात बाळाचे अवशेष आहेत. गुहेत दफन करताना बरोबर छोटा संगमरवरी वाडगा आणि एक मातीचं भांडं ही दफन केलं होतं. इतर दफनांच्या ठिकाणीही हत्यारे, भांडीकुंडी मिळाली आहेत, त्यांवरून दफन केलेल्या व्यक्तीच्या पेशाबद्दल अंदाज बांधता येतो आणि त्याकाळच्या समाजजीवनाची ओळखही होते.
१९५२-५३ साली मायसिनीला झालेले उत्खनन
पाषाणयुगानंतरच्या कांस्ययुगातील वेगेवेगळ्या दफनभूमीत सापडलेल्या काही वस्तू (ख्रिस्तपूर्व १९०० ते १६००) पुढच्या फोटोत दिसतात. यात एक सोन्याचा मुकुटही आहे. भांड्यांचे आकार, घडण, रंगसंगती वगैरेतील वैविध्य बघून थक्क व्हायला होत होतं. दाभण, चाकूसुरे, कुर्हाडीची व भाल्याची पाती, मासेमारीचे हूक अशी हत्यारं ते शिक्के, धातूचे वा काचेचे मणी, दागिने, हस्तिदंताच्या वस्तू असं बरंच काही मांडून ठेवलं होतं. चांगली प्रकाशयोजना आणि ग्रीकबरोबर इंग्रजीतही व्यवस्थित दिलेली माहिती यामुळे हे संग्रहालय आवडून गेलं.
मायसिनिअन संस्कृतीच्या वेगवेगळ्या केंद्रांमधील थडग्यामध्ये मिळालेल्या वस्तूंचे काही फोटो:
कांस्य हत्यारे
वाईन आणि पाणी एकत्र करण्यासाठी मोठी सिरॅमिक भांडी वापरत असत. ख्रिस्तपूर्व तेराव्या ते अकराव्या शतकातील अश्या घड्यांचे तुकडे पाहायला मिळतात. या घड्यांवर रथारूढ योद्धे दाखविले आहेत.
इथल्या संग्रहातील सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ख्रिस्तपूर्व पंधराव्या शतकातील म्हणजे सुमारे साडेतीन हजार वर्षे जुने कांस्य चिलखत. एका मायसिनिअन कबरीत हे चिलखत आणि हातापायांसाठीच्या संरक्षक प्लेट्स सापडल्या. बरोबरच्या शिरस्त्राणात रानडुक्कराच्या सुळ्यांचे तुकडे बसविलेले आहेत.
.
चिलखतापेक्षा बराच नवीन तरीही कारागिरीचा उत्तम नमुना असलेला हा खि.पू. पाचव्या शतकात बनविलेला काश्याचा आरसा:
खालील फोटोतला खि.पू. दुसर्या शतकातील शिलालेख हा एर्मिओनी (Hermione)
आणि एपिडाउरोस (Epidaurus) या शहरांच्या सीमांविषयी आहे. या शहरांमधील
सीमावाद सोडविण्यासाठी र्होड्स आणि मिलेटोस या ठिकाणांहून पंच बोलविण्यात
आले. पंचांनी दिलेल्या निर्णयाचे शिलालेख एर्मिओनी आणि एपिडाउरोसला
बसविण्यात आले, त्यातील एर्मिओनीचा हा शिलालेख आहे.
संग्रहालय पाहताना कर्नाटकाबरोबरचा सीमावाद आठवला होता. आत्ता लिहिताना कावेरीचं पाणीही जोडीला आहे!
एर्मिओनी त्याकाळी आणि अजूनही बंदरासाठी प्रसिद्ध आहे. तर एपिडाउरोस तिथल्या अस्क्लिपिअसच्या आश्रयस्थानासाठी. संग्रहालय पाहून ३० किलोमीटर अंतरावरील एपिडाउरोसकडे मोर्चा वळविला.
एपिडाउरोस
प्राचीन ग्रीकांचा सूर्यदेव अपोलोच्या अनेक मुलांपैकी एक अस्क्लिपिअसच्या (Asclepius) जन्माची गोष्ट अद्भुतरम्य आहे. त्याचा जन्म एपिडाउरोसला झाला, असे समजले जाते. अपोलो हा धन्वंतरी म्हणूनही ओळखला जातो आणि अस्क्लिपिअसकरवी तो लोकांवर उपचार करतो, असा समज प्रचलित होता. एपिडाउरोसपासून थोडं दूर अस्क्लिपिअन हे आश्रयस्थान किंवा उपचारकेंद्र (sanctuary) होते. ख्रिस्तपूर्व तिसर्या आणि चौथ्या शत़कात या ठिकाणाची भरभराट झाली. रुग्णांसाठी निवास, चिकित्सागृह, क्रीडांगण, नाट्यगृह अश्या अनेक सुविधा होत्या. तिथे शल्यकर्मही होत असत. क्रीडांगण आणि इतर अवशेषः
एपिडाउरोसच्या छोटेखानी संग्रहालयात अस्क्लिपिअसच्या कल्टबद्दल तसेच औषधोपचार, शल्यक्रिया, त्याकाळी वापरली जाणारी साधने याविषयी माहिती मिळते. का कुणास ठावुक, तिथे कॅमेरा वापरायला मात्र बंदी आहे.
अस्क्लिपिअनचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांत असून इथलं नाट्यगृह (Theatre) हे ग्रीसमधील एक उत्तम स्थितीतील प्राचीन नाट्यगृह आहे. १४००० प्रेक्षकक्षमता असलेल्या नाट्यगृहाचं acoustics हे एक वैशिष्टय आहे. नाट्य आणि संगीताचा आरोग्यावर परिणाम होतो, असे मानले जात असे. नाट्यगृहात रुग्णांच्या संगीत आणि नाट्यस्पर्धाही होत असत.
अजूनही दरवर्षी उन्हाळ्यात इथे नाट्यमहोत्सव आयोजित केला जातो. या पायर्यांवर बसून प्राचीन नाटकांचे प्रयोग पाहताना प्रेक्षकांनाही मधल्या दोन हजार वर्षांचा नक्कीच विसर पडत असेल!
त्या भारलेल्या वातावरणातून वर्तमानात आल्यावर कुठेतरी शांत बसून राहावंसं वाटत होतं. मग नवीन एपिडाउरोसच्या समुद्रकिनारी गेलो.
भावी दर्याचा राजा
(क्रमशः)
पालामिडी किल्ला
ग्रीसच्या आर्गोलिस भागात इतके किल्ल्यांचे अवशेष दिसतात कि आपल्या सह्याद्रीची आणि गडकिल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंतर नाफ्प्लिओच्या आसपास पर्वत असे नाहीतच, फक्त विखुरलेल्या टेकड्या, काही डोंगररांगा आणि छोटी बेटं. पण त्यांवर कुठे छोट्या गढ्या तर कुठे अवाढव्य किल्ले. त्यातील पालामिडी या महत्त्वाच्या किल्ल्याला भेट द्यायचा २४ डिसेंबरचा कार्यक्रम होता. या एककलमी कार्यक्रमाचं कारण होतं क्रिसमस ईव्हची अर्ध्या दिवसाची सुट्टी. बाकीचा दिवस मोकळा ठेवला होता.
बुर्ट्झीला बेटावर जाताना दिसणारं नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला
थोडं नाफ्प्लिओ शहराविषयी
ग्रीक देव पोसायडनचा मुलगा नाफ्प्लिओसचं नाव दिलेलं नाउप्लिआ प्राचीन काळीही अस्तित्वात होतं. पण ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात एका युद्धाच्या वेळी आर्गोलिस राज्याऐवजी स्पार्टाची बाजू घेतल्यामुळे आर्गोलिसच्या राजाने नाउप्लिआचा विध्वंस केला. त्यामुळे अक्रोनाउप्लिआ या गढीची थोडी तटबंदी वगळता प्राचीन नाउप्लिआच्या खाणाखुणा दिसत नाहीत. नंतरच्या काळात बायझंटाईन, फ्रँक्स, तुर्की, वेनिशिअन अश्या अनेक सत्तांनी इथे राज्य केलं. व्यापार आणि आयातनिर्यातीमुळे या शहराला महत्त्व होतं. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात वेनिशिअन्सनी नवीन तटबंदी, बंदराची डागडुजी, बंदराहून जवळच असलेल्या बेटावर बुर्ट्झी (Bourtzi) ही गढी अशी बांधकामे केली. त्यानंतर एका तहाअन्वये नाफ्प्लिओ पुन्हा एकदा तुर्कांच्या हाती गेले. सुमारे शंभर वर्षांनी वेनिशिअन्स, जर्मन्स आणि पोलिश सैन्यांनी मिळून नाफ्प्लिओवर विजय मिळवला. यावेळी वेनिशिअन्सची सत्ता तीस वर्षं टिकली. याच कालावधीत पालामिडी किल्ला बांधण्यात आला.
किल्ल्यावरून दिसणारा शहराचा काही भाग
किल्ल्यावरून दिसणारं अक्रोनाउप्लिआ आणि समुद्रातील छोटंसं बुर्ट्झी बेट
सोळाव्या शतकापासूनच ग्रीसचा बराचसा भाग ऑटोमान तुर्कांच्या आधिपत्याखाली होता. तेव्हापासून तुर्की राजवटीविरोधी उठावाचे काही प्रयत्न झाले होते. परंतु ग्रीसच्या स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात १८२१ मध्ये पेलोपोनिझं प्रांतातील उठावाने झाली. हळूहळू हे लोण बाकी ग्रीसमध्ये पसरले. नोव्हेंबर १८२२ मध्ये एका वर्षाच्या वेढ्यानंतर ग्रीकांनी नाफ्प्लिओ शहर आणि पालामिडी किल्ला जिंकला. या विजयानंतर नाफ्प्लिओला ग्रीसची अस्थायी राजधानी बनविण्यात आले आणि ते ग्रीक स्वातंत्र्यसंग्राम आणि राष्ट्रनिर्माणाच्या केंद्रभागी राहिले. इ.स. १८२९ मध्ये नाफ्प्लिओ स्वतंत्र ग्रीसची अधिकृत राजधानी झाले. १८३४ साली राजधानी अथेन्सला हलविण्यात आली.
पालामिडीवर फडकणारा ग्रीसचा झेंडा
पालामिडी किल्ला
ट्रोजन युद्धातील एक योद्धा पालामिडीसवरून नाफ्प्लिओ जवळच्या एका टेकडीला पालामिडी हे नाव पडलं होतं. या टेकडीवर वेनिशिअन्सनी इसवीसन १७११ ते १७१४ दरम्यान किल्ला बांधला. आठ बुरूज आणि त्यांना जोडणारी तटबंदी असा किल्ल्याचा आराखडा होता. किल्ल्याचं काम पूर्ण होत आलं आणि पुन्हा नाफ्प्लिओ तुर्कांच्या हाती गेलं. पालामिडीच्या उरलेल्या दोन बुरुजांचं बांधकाम तुर्कांनी पूर्ण केलं. या बुरुजांना वेनिशिअन्सनी दिलेली नावे तुर्कांनी बदलली. ग्रीस स्वतंत्र झाल्यावर बुरुजांची तुर्की नावे बदलून अकिलीस, लिओनिडस, मिल्टायडीस, थेमिस्टक्लीस अशी प्राचीन ग्रीक हिरोंची नावे देण्यात आली.
किल्ल्याचं प्रवेशद्वार
किल्ल्याच्या बुरुजांचे आणि अंतर्भागाचे फोटो:
.
.
जाताजाता नाफ्प्लिओतून रात्री दिसणारं पालामिडीचं हे रूपः
(क्रमशः)
असिनीचे अवशेष आणि टोलो
पालामिडी किल्ला फिरून होईपर्यंत दुपारचे बारा वाजले होते. पूर्ण दिवस मोकळा होता. होटेलला जाऊन थोडा वेळ घालवला. पण itchy feet शांत बसू देईनात. मग नाफ्प्लिओपासून जवळच टोलो हे लोकप्रिय बीच रिझॉर्ट आहे. तिकडे थोडं फिरू आणि दुपारचं जेवण करू असा विचार करून निघालो. तिथे पोहोचायला गाडीने जेमतेम दहा मिनीटे लागली. गावातून जाणारा मुख्य रस्ता आणि समुद्र यांच्यामध्ये एकमेकांना खेटून होटेल्सची पलटण उभी होती. गावात शिरताना लागलेली एकदोन उपहारगृहं सोडली तर सगळा शुकशुकाट दिसत होता. इकडे यायची अभिनव कल्पना नक्की कोणाची होती आणि/किंवा त्या कल्पनेचं खापर दुसर्यावर कसं फोडता येईल, हा विचार दोन्ही डोक्यांत सुरू झाला होता. आणखी थोडं पुढे जाऊन बघू असं म्हणतम्हणत आम्ही गावाबाहेर पडलोही! फळांनी लगडलेल्या संत्र्याच्या बागा दिसू लागल्या. आणि अचानक रस्त्याच्या कडेला कोणी ग्रीक गॉड/गॉडेस ने (take your pick) मंद स्मित करत वगैरे... पण असं काहीही झालं नाही...
तर रस्त्याच्या कडेला प्राचीन असिनीची (Ancient Asine) दिशा दाखविणारा बाण दिसला आणि पुढेच असिनीची टेकडीही. असिनी टोलोच्या इतकं जवळ आहे, हे ठाऊक नव्हतं. असिनीला पाहण्यासारखं काही विशेष नाही, म्हणून ते आमच्या यादीत नव्हतं. ईथवर आलो आहोत तर जाऊन बघू असा विचार केला. थोडं चढून गेल्यावर एक नवीनच बांधलेलं ऑफिस लागलं आणि त्यात एक वयस्कर रखवालदारही होते. त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता, पण आम्हाला बघून त्यांना झालेला आनंद कळायला भाषेची गरज नव्हती. तसेही डिसेंबरमध्ये असे किती पर्यटक इकडे फिरकत असतील!
प्राचीन असिनी
असिनीचे अवशेष तीन वाजेपर्यंत उघडे होते आणि प्रवेशशुल्क नव्हतं. माहितीपत्रक घेऊन आत गेलो.
समुद्रकिनारी कास्ट्राकी नावाच्या टेकडीवर असिनी या प्राचीन अक्रोपोलिसचे अवशेष आहेत. सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीपासून इथे मानवाची वस्ती होती. असिनीचा उल्लेख होमरच्या ट्रोजन युद्धातही येतो. त्याकाळी असिनी हे आर्गोस (Argos) या राज्याचा भाग होतं. आर्गोसचा राजा डायोमिडसच्या ट्रॉयला जाणार्या नौका टोलो बंदरातून निघाल्या होत्या.
ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात आर्गोस आणि स्पार्टाच्या युद्धात स्पार्टाची बाजू घेतल्याने नाफ्प्लिओसारखं असिनीसुद्धा आर्गोसच्या राजाने उद्ध्वस्त केलं. त्यानंतर असिनीच्या लोकांनी असिनी नावाचंच दुसरं शहर स्पार्टाच्या राज्यात वसवलं. आता अस्तित्वात असलेलं बरंचसं बांधकाम ख्रिस्तपूर्व ३०० सालादरम्यान मॅसेडोनियाच्या डेमेट्रिअस राजाने केलेले आहे.
.
पूर्वेच्या बुरुजाचे पत्थर आणि तिथून दिसणारा नजारा
रखवालदारबाबांकडून कुठे काय पाहायचं वगैरे काहीच माहिती मिळाली नव्हती. इतस्ततः पसरलेल्या दगडधोंड्यांतून फिरत एकेकाळचं समृद्ध अक्रोपोलिस डोळ्यांसमोर उभं करायला कल्पनाशक्ती पणाला लागत होती. पण हे Acropolis with a view असणार, एवढं मात्र नक्की!
एका ठिकाणी वाईन बनवायची Press Installation दिसली. तिथे दिलेल्या माहितीनुसार पायांनी दाबून द्राक्षांचा लगदा बनवून मग लाकूड, वजनासाठी दगड इत्यादी वापरून बनविलेल्या प्रेसने रस काढला जात असावा. जमिनीत गोल किंवा चौकोनी टाक्या बसविलेल्या असत, ज्यात द्राक्षांचा रस किंवा इतर द्रवपदार्थ गोळा होत असे.
टेकडीला अर्धीअधिक प्रदक्षिणा घातल्यावर आधी लांब दिसणारी समुद्रातील बेटं बरीच जवळ वाटायला लागली. उजवीकडे टोलोचा किनारा दिसत होता.
टोलोला परत जाईपर्यंत ग्रीकांची दुपारच्या जेवणाची वेळ झाली असावी. थोडा पोटोबा करून बीचवर मस्त भटकलो. निळंशार शांत पाणी बघून डोळे निवत होते. पण पाणी इतकं थंड की त्यात पाऊल टाकणं शक्य नव्हतं.
नाफ्प्लिओला संध्याकाळपर्यंत बरेच ग्रीक पर्यटक येवून पोहोचले होते. 'आमच्या' निवांत नाफ्प्लिओलाच ही माणसं गर्दी करायला का आली, असं वाटून गेलं. समुद्रतीरी असलेले कॅफे आणि पब्ज गजबजले होते. तो गलबला नको म्हणून पहिल्या दिवशी जेवलेल्या एका छोट्या टॅवर्नात रात्री जेवायला गेलो.
एका कुटुंबाने चालविलेल्या त्या टॅवर्नात पारंपारिक जेवण मिळायचं. आम्ही दुसर्यांदा तिथे गेल्याने जवळचे मित्र वगैरे असल्यासारखं आमचं स्वागत झालं! त्या कुटुंबातले आजोबा हीटरजवळच्या टेबलवरून उठून आम्हाला तिथे बसायला सांगत होते. फक्त त्यांनाच आठदहा शब्द इंग्रजी बोलता येत होतं; त्यांनी बहुधा खलाश्याचं काम केलेलं असावं. त्यांच्याशी हातवार्यांनी थोड्या गप्पा मारल्या. हाउस वाईन, झुकिनीची भजी, चिकन सुवलाकी आणि बाळकांदे घातलेला सश्याचा स्ट्यू असं मस्त जेवण झालं. डेझर्ट नको म्हटल्यावर आग्रहाने फळं समोर ठेवण्यात आली.
.
जेवल्यावर पाय मोकळे करणं भाग होतं. रात्री भटकायला मला आवडतंच. त्यात नाफ्प्लिओसारखं रोमँटिक शहर चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालं असेल तर क्या कहने!
(क्रमशः)
आर्गोसचे अक्रोपोलिस
२५ डिसेंबर २०१५, ग्रीसमधील पाचवा दिवस. ख्रिसमसची सुट्टी, त्यात आदल्या दिवशी खूप फिरणं झालं होतं; त्यामुळे सावकाश उठून निवांतपणे न्याहारी केली. आमची न्याहारी सुरू असताना होटेलच्या छोट्याश्या गल्लीत गावाचं बँडपथक आलं होतं. गावातल्या किमान तीन पिढ्या त्या पथकात असतील. होटेलच्या बाहेर त्यांनी थोडा वेळ वादन केलं. त्या इवल्याश्या गल्लीत होटेलच्या अगदी समोर एक घर होतं. पण त्या घराबाहेरही ख्रिसमसची गाणी वाजवण्यात आली. घरमालक स्वखुशीने पथकासाठी देणगी देत होते. आपल्याकडील दिवाळीच्या पोस्तासारखा हा प्रकार होता. गावातील लोकांच्या सहभागातून चालणार्या उपक्रमांसाठी पैसे उभे करण्याचा तो परंपरागत मार्ग होता.
आज नाफ्प्लिओतील शेवटचा दिवस. बुर्ट्झी बेटावर जायला इतके दिवस बोट मिळाली नव्हती. कालपासून बरेच पर्यटक आले होते. त्यामुळे आज बोट असेल तर बुर्ट्झीला अर्ध्या तासाची भेट आणि संध्याकाळी नाफ्प्लिओच्या प्रोमंनाडवर फेरफटका एवढाच कार्यक्रम होता. बाकीचा दिवस मोकळा होता.
आल्या दिवसापासून समुद्रापलीकडे दूर एका डोंगरावर असलेला किल्ला आम्हाला खुणावत होता. नाफ्प्लिओच्या किल्ल्यावरून, समुद्रतीरावरून, होटेलच्या खिडकीतून तो वाकुल्या दाखवित असे. मायसिनीहून नाफ्प्लिओला येतानाही उजवीकडे त्याचं दर्शन झालं होतं. गूगल अर्थच्या कृपेने तो किल्ला आर्गोस शहराबाहेर आहे, हे समजलं. ट्रिपअॅडवायझरवर या किल्ल्याविषयी काही माहिती नव्हती. थोडं खोदकाम केल्यावर किल्ल्यावर जाता येतं एवढं कळलं. तिकीट किंवा उघडण्याची वेळ वगैरे माहिती मिळाली नाही. होटेलच्या मालकांनाही त्याबद्दल ठाऊक नव्हतं. ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे तसंही किल्ला पाहायला मिळेल, असं वाटत नव्हतं. पण वेळ आहे तर किमान पायथ्यापर्यंत जाऊन येऊ, असा विचार करून निघालो.
लारिस्सा किल्ला: आर्गोसचे अक्रोपोलिस
नाफ्प्लिओहून बारा किलोमीटरवर आर्गोस हे ग्रीसच्या सगळ्यांत जुन्या शहरांपैकी एक शहर आहे. सुपीक जमीन असलेली ही जागा मायसिनीअन काळात अधिक विकसित झाली. २०,००० आसनक्षमता असलेल्या प्राचीन थिएटरचे अवशेष इथे आहेत. महाकवी होमरच्या इलियडमधील एक योद्धा डायोमीडचं हे राज्य. शहराबाहेरील एका डोंगरावर लारिस्सा हे आर्गोसचे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील अक्रोपोलिस आहे.
किल्ल्यावरून दिसणारं नेटकं आर्गोस
नाफ्प्लिओहून निघाल्यावर आर्गोस येण्याआधी डावीकडे किल्ला दिसायला लागला. पण किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ला मागे टाकून शहरात शिरून दुसर्या बाजूला बाहेर पडलो. मग अर्ध्या डोंगराला वळसा घालावा लागला. थोडा चढ चढल्यावर एक ख्रिश्चन मोनॅस्टरी दिसली. गाडीने किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचलो. तिथे आणखी एकदोन गाड्या होत्या. पण मनुष्यप्राणी कोणी नव्हते. किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असावं. मोठं लोखंडी गेट हल्लीच लावलेलं असावं. आतमध्ये बरंच सामान पडलेलं दिसत होतं. आता काय करावं या विचारात पडेपर्यंत आणखी एक गाडी येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या लोकांतील एक माणूस स्थानिक असावा. त्याच्याकडून किल्ला बघायला तिकीट नाही, एवढं कळलं. गेट बंद असताना आत कसं जायचं, हे विचारायची वेळच आली नाही. गेटच्या एका टोकाला गेट आणि किल्ल्याचा तट यांच्यामध्ये एकावेळी एक माणूस जाऊ शकेल एवढी फट होती. त्या फटीतून त्या लोकांच्या मागून आम्हीही एकदाचे किल्ल्यात शिरलो.
वेगवेगळ्या कालखंडांत झालेल्या बांधकामांच्या खुणा तटबंदीवर दिसत होत्या.
किल्ल्यावरची विहीर पाहून आतल्या आणखी एका भव्य तटबंदीतून आत गेलो.
या तटाच्या आत खूप बांधकाम आहे. हा बालेकिल्ला असावा. अवशेषांची डागडुजी, माहितीचे फलक लावणे असं काम सुरू असावं. बरंच सामान पडलेलं होतं. काही भिंतींचं काम पूर्ण झालेलं असावं. ते पाहून तिथल्या अनेक शत़कांच्या खुणा पुसून टाकून एक मेकअप केलेला कोराकरकरीत किल्ला तिथे शिल्लक राहील कि काय असं वाटलं.
.
या किल्ल्यात बघण्यासारखं एवढं असेल याची येण्याआधी अजिबात कल्पना नव्हती. कोरिंथचं अक्रोपोलिस किंवा पालामिडी किल्ल्यासारखा हा किल्ला प्रसिद्ध का नसावा हे एक कोडंच आहे. पण इथवर येण्याचं सार्थक झालं हे मात्र नक्की. आणि नाफ्प्लिओतून क्षितिजावर दिसणार्या किल्ल्याचं लारिस्सा हे सुंदर नावही कळलं!
(क्रमशः)
बुर्ट्झी आणि नाफ्प्लिओ प्रोमंनाड
लारिस्सा किल्ला बघून नाफ्प्लिओला परत आल्यावर बंदरावरील एका कॅफेत बसून थोडा आराम केला. दोनतीन दिवसांच्या सुट्टीसाठी अथेन्सहून मोठ्या प्रमाणात ग्रीक पर्यटक नाफ्प्लिओला येतात. आजूबाजूला सगळी मोठमोठी कुटुंबं दिसत होती. त्यांचं निरीक्षण करण्यात आणि त्यांची आपापसातील नाती ओळखण्यात आमचा मस्त वेळ गेला.
नाफ्प्लिओ वॉटरफ्रंट
बुर्ट्झी बेटावर सोडणाऱ्या बोटीच्या फेऱ्या सुरू होत्या. बेटापर्यंत जाऊन परत यायला दहा मिनिटं लागतात आणि बेटावरची छोटी गढी बघायला वीसएक मिनिटं वेळ दिला जातो. प्रत्येकी चार युरो देऊन आम्हीही पुढच्या बोटीत बसलो.
बुर्ट्झी (Bourtzi )
बुर्ट्झी हा बुरूज शब्दाचा एक अवतार. नाफ्प्लिओ बंदराच्या रक्षणासाठी १४७३ साली व्हेनिशिअन्सनी बंदराच्या जवळील छोट्या बेटावर गढी बांधली. नंतरच्या काळात आणखी बांधकामे झाली. या गढीचा वापर काही काळासाठी तुरुंग म्हणूनही करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात पालामिडी किल्ल्यातील तुरुंगात देहदंड देण्याचं काम करणाऱ्याना शहरात राहता येत नसे, ते बुर्ट्झी बेटावर राहत.
गढीचा मुख्य दरवाजा
नाफ्प्लिओ प्रोमंनाड
नाफ्प्लिओच्या वॉटरफ्रंटपासून पालामिडीच्या पायथ्याशी असलेल्या बीचपर्यंत समुद्रालगत एक दगडी पदपथ जातो. जॉगर्स असोत की रमतगमत जाणारे आमच्यासारखे पर्यटक, सगळ्यांना हा सुंदर रस्ता भुरळ घालतो. त्याची सूर्यास्ताला घेतलेली काही प्रकाशचित्रे:
परतीच्या मार्गावरः
अथेन्सला जाताना: कोरिंथ कालवा
नाफ्प्लिओचा निरोप घेण्याची वेळ आली होती. नाफ्प्लिओ सोडून जाण्याची इच्छा नव्हती, पण अथेन्स बोलावत होतं.
२६ डिसेम्बरला सकाळी नाफ्प्लिओहून निघून अथेन्सला जाताना वाटेत कोरिंथच्या
कालव्यापाशी थांबलो. कोरिंथच्या आखाताला एजियन समुद्राशी जोडणारा हा
जगप्रसिद्ध कालवा काढण्याचे अनेक प्रयत्न प्राचीन काळातही झाले होते. अखेर
ग्रीस स्वतंत्र झाल्यावर कालवा बांधायचा विचार मूळ धरू लागला. इ.स. १८८२ ते
१८९३ अशी अकरा वर्षे कालव्याचे काम चालले. आता या कालव्याचा उपयोग फक्त
पर्यटनासाठी होतो.
इतके दिवस सांगाती असलेला हा महामार्ग आम्हाला अथेन्सला नेवून सोडणार होता...
(क्रमशः)
कोरिंथ कालवा अरुंद असल्याने औद्योगिक वाहतुकीसाठी वापरला जात नाही. परंतु पर्यटकांसाठी नौकानयन, बंजी जंपिंग वगैरे सोयी आहेत.
अर्थातच ग्रीस बेटांसाठीही प्रसिद्ध आहे. पण बेटांपेक्षा प्राचीन संस्कृती आणि वास्तू बघण्यात जास्त रस असल्याने दोनदा ग्रीसला जाऊनही अजून कुठल्याच बेटांवर जाणं झालेलं नाही. शिवाय अप्रसिद्ध जागा किंवा समुद्रकिनारेही तितकेच सुंदर असू शकतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी असलेल्या जागा टाळून वेगळी ठिकाणं शोधायला जास्त आवडतं.
मात्र Island hopping कधीतरी नक्की करणार.
अथेन्समधील पहिला दिवस
२७ डिसेंबर, २०१५ अथेन्समधील पहिला दिवस. आजचा दिवस धरून ग्रीसमध्ये साडेतीन दिवस उरले होते. आज सकाळी लवकर निघून डेल्फीची सहल करून यायचं, असं ठरवलं होतं. आम्ही टूर वगैरे बुक केली नव्हती, पब्लिक बसने जाणार होतो. पहाटे गजर व्हायच्या आधीच मला जाग आली. पण झोपही अनावर येत होती. मग आज अथेन्स पाहू आणि डेल्फीला उद्या जाऊ असं मनात म्हणून गजर बंद करून टाकला. झोपा काढणं कधीकधी किती फायद्याचं ठरतं हे नंतर कळणार होतं!
सकाळी उठायला अर्थातच उशिर झाला. ख्रिसमसच्या दोन दिवसांच्या सुट्टीत सगळी पर्यटनस्थळं बंद असतात. त्यामुळे आज अथेन्समध्ये सगळीकडे गर्दी असणार हे नक्की होतं. आता निघायला उशिर झालाच आहे तर आधी सिंटाग्मा चौकातील 'चेंज ऑफ गार्डस्' सोहळा बघू आणि मग अक्रोपोलिसला जाऊ असं ठरवलं.
सिंटाग्मा चौकातील युद्धस्मारक आणि 'चेंज ऑफ गार्डस्'
सिंटाग्मा (Syntagma Square) हा ग्रीस राज्यघटनेचं नाव दिलेला चौक म्हणजे अथेन्समधील मध्यवर्ती ठिकाण आहे. या भागात राजमहालाची इमारत आहे, जिथे आता ग्रीसची पार्लमेंट भरते. चौकात Tomb of the Unknown Soldier हे युद्धस्मारक आहे. हे स्मारक तसेच राष्ट्रपतीभवनाचे रक्षण एव्झोन (Evzone) नावाच्या विशिष्ट सैनिकांची तुकडी करते. हे उंचपुरे Evzoni त्यांच्या पारंपारिक पोषाखामुळे (यात किल्ट, रुंद बाह्या, गोंडे लावलेली आणि खिळे ठोकलेली पादत्राणे येतात) व्हॅटिकनच्या स्विस गार्ड सारखेच पर्यटकांना आकर्षित करतात.
युद्धस्मारक आणि रक्षणास उभे एव्झोनी
युद्धस्मारकापाशी उभ्या Evzoni ची जोडी दर तासाला बदलते. हे 'चेंजिंग ऑफ गार्डस्' बघायला अनेक पर्यटक जातात. त्यादिवशी रविवार असल्याने सकाळी अकरा वाजता नेहमीच्या 'चेंज ऑफ गार्डस्' पेक्षा मोठा सोहळा होता. यात जवळजवळ सगळे गार्डस् त्यांच्या बँडपथक आणि अधिकार्यांसमवेत स्मारकापाशी येऊन सलामी देतात.
कवायत पाहत असताना सैनिकांना सरावाची खूप गरज आहे असं वाटत होतं. 'चेंज ऑफ गार्डस्' संपल्यावर अक्रोपोलिसला जाण्यासाठी अथेन्सच्या मेट्रोकडे वळलो. मेट्रोच्या लाल रंगाच्या मार्गावर पुढचंच स्टेशन अक्रोपोली आहे.
रोम, अथेन्स सारख्या शहरांनाच पुराणवस्तूंची संग्रहालये म्हणणं अतिशयोक्ती ठरू नये. अथेन्सच्या मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामात मिळालेले अनेक अवशेष हे मेट्रोच्या स्टेशनांमध्ये पाहता येतात. त्यामुळे मेट्रोने प्रवास करतानाही बर्याचदा काहीतरी लक्षवेधक पाहायला मिळतं.
एका स्टेशनला पाहिलेला ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील पाणी वाहून नेणारा टेराकोटा पाइप
अक्रोपोलिसच्या परिसरात
अक्रोपोलिस असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी मेट्रो स्टेशनच्या बाहेरच अक्रोपोलिस म्युझिअम आहे. रविवार असल्याने हे म्युझिअम रात्री आठ वाजेपर्यंत पाहता येणार होतं. त्यामुळे आधी अक्रोपोलिस आणि मग म्युझिअम असा बेत होता. पण म्युझिअमच्या बाहेर आधी एक फेरफटका मारला. म्युझिअमच्या प्रवेशासाठी पर्यटकांची लांबलचक रांग लागली होती. अक्रोपोलिसकडे जाणार्या लोकांचीही उन्हाळ्यात असावी तशी गर्दी होती. सकाळी लवकर यायला हवं होतं वगैरे म्हणण्याला आता काही अर्थ नव्हता. पण प्रवेशद्वाराशी पोहोचेपर्यंत लक्षात आले की लोक उलट पावली परत फिरत होते. संप असल्यामुळे अक्रोपोलिस चक्क बंद होतं! तोपर्यंत आम्हांला संपाची कुणकुणही लागली नव्हती. पण अक्रोपोलिस म्युझिअम तर सुरू होतं! हा काय प्रकार आहे, नक्की कोणती ठिकाणं बंद आहेत हे विचारायला जवळच असलेल्या पर्यटन माहितीकेंद्रात गेलो. तिथली रांग थोडी ओसरल्यावर चौकशी केली तर कळलं की ग्रीक सरकारच्या सांस्कृतिक खात्यात काम करणार्या कर्मचार्यांनी सकाळी एक दिवसाचा संप पुकारला होता. २५, २६ डिसेंबर नाताळची सुट्टी आणि २७ डिसेंबरला संप! असं सुट्टीला जोडून संपावर जाणं तिथे नवीन नाही, हे नंतर कळलं. उरलेल्या सुट्टीत सकाळी संपाची माहिती काढल्यावर बाहेर पडायचं असं ठरवून टाकलं.
ग्रीसमधील बहुतेक म्युझिअम्स आणि प्राचीन अवशेष सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने ते बघायला आलेल्या आमच्यासह देशभरातील सगळ्याच पर्यटकांची गैरसोय होणार होती. दु:खात सुख एवढंच की पहाटे उठून आम्ही डेल्फीला गेलो नव्हतो! नाहीतर एवढा प्रवास करून एक दिवस वाया घालवून हात हलवत परत यावं लागलं असतं. अथेन्समध्ये निदान अक्रोपोलिस म्युझिअम तरी पाहता येणार होतं. (या म्युझिअमचा कारभार सां. खात्याच्या अंतर्गत येणारी एक वेगळी संस्था बघते.)
पर्यटन केंद्रात काही माहितीपत्रकं होती. त्यातील प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाच्या एका प्रदर्शनाचं पत्रक घेतलं आणि तिथे कसं जायचं वगैरे विचारून घेतलं.
केंद्राच्या आवारात बसायला कट्टे होते. जवळच मस्त फुललेला जाईचा वेल होता. आम्हाला आता काही घाई नसल्याने आरामात बसलो. अथेन्समधील एकदोन जागांवर वेळेअभावी फुली मारणं भाग होतं. आज प्राचीन तंत्रज्ञानाचं प्रदर्शन, अक्रोपोलिस म्युझिअम आणि लायकाबेटस (Lycabettus) टेकडी पाहू आणि उरलेल्या दिवसांत (सरकारी कर्मचार्यांच्या युनिअन्सनी कृपादृष्टी ठेवल्यास) अक्रोपोलिस, डेल्फी आणि नॅशनल आर्किओलोजी म्युझिअम पाहू असा बेत ठरला.
आमचं बोलणं ऐकून आम्ही भारतीय वाटल्याने जवळ बसलेल्या एक वयस्कर बाई आमच्याशी बोलायला आल्या. मूळच्या श्रीलंकेच्या असाव्या. त्या लंडनहून एकट्याच २५ ते २७ अथेन्स बघायला आल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी परत जाणार होत्या. त्यांनी बुकिंग वगैरे कुणाकडून तरी करून घेतलं होतं. २५, २६ ला पर्यटनस्थळं बंद हे त्यांना अथेन्सला आल्यावर समजलं. त्यात २७ ला संप. अक्रोपोलिस पाहण्याच्या इच्छेपोटी त्या आल्या होत्या. पुन्हा कधी ग्रीसला येणंही जमणार नव्हतं. त्यांच्याजागी मला प्रचंड राग आला असता. पण त्यांच्या बोलण्यात फक्त निराशा होती. त्यांना उरलेल्या अर्ध्या दिवसात काय करता येईल याची माहिती हवी होती. पण पर्यटकांना तोंड देताना वैतागलेल्या (पर्यटन खातं संपावर नव्हतं ना!) तिथल्या कर्मचार्यांनी काही धड सांगितलं नव्हतं.
लायकाबेटस टेकडीवरून अक्रोपोलिस दिसतं असं आम्ही सांगितलं. पण त्या तिथे गेल्या असताना smog मुळे काही खास दिसलं नव्हतं. त्यांच्याकडे केप सूनिअन आणि बोटीने तीन बेटं पाहणे अश्या दोन सहलींची पत्रकं होती. सूनिअन संपामुळे बंद असणार आणि बेटांची सहल दिवसभराची असल्याने करता येणार नाही, हे सगळं त्यांना समजावलं. अक्रोपोलिस पाहायचं होतं तर अक्रोपोलिस म्युझिअमला महत्त्वाचे अवशेष आहेत ते पाहिले का असं विचारलं. तर इतर म्युझिअम्ससारखं ते म्युझिअम बंद नाही हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना झालेल्या आनंदाने आम्हालाही खूप बरं वाटलं. त्यांच्यामागोमाग आम्हीही तिथून निघालो.
प्राचीन तंत्रज्ञानात कितीही रस असला तरी त्यावेळी उत्साह नव्हता. डोकं शांत करण्यासाठी भर दुपार असली तरी लायकाबेटस टेकडी चढू असा विचार केला.
लायकाबेटस टेकडी
अथेन्सच्या अनेक टेकड्यांपैकी लायकाबेटस टेकडी हे एक पर्यटनस्थळ आहे. या टेकडीवर जायला funicular रेल्वे आहे. पण funicular च्या पायथ्याशी पोहोचायला अर्धीअधिक टेकडी चढणे किंवा टॅक्सी हे दोनच पर्याय आहेत. मेट्रोने टेकडीपाशी जाऊन पायर्या चढायला सुरूवात केली. या भागात उच्चभ्रू वस्ती आहे. पायर्यांच्या दोन्ही बाजूंना इमारती, ठराविक अंतरावर पायर्यांना भेदून जाणारे रस्ते आणि काही दुकाने, कॅफे वगैरे आहेत. परत येताना पोटपूजा करायला एक जागा हेरून ठेवली. थोडं चढून झाल्यावर पायर्यांच्या बाजूच्या कट्ट्यावर थोडं बसलो. आज बहुतेक कॉलेज कट्ट्याची आठवण काढायचा दिवस होता. तेवढ्यात एक हायफाय तरुणी बाजूच्या कट्ट्यावर येऊन बसली. तिच्याजवळच्या भल्यामोठ्या पर्समधून तिने एक पिशवी काढून बाजूला ठेवली. आजूबाजूच्या लोकांकडे तिचं लक्षही नव्हतं. कॉलेजकट्ट्यावर डबा खायचो तसा ही डबाबिबा पिशवीतून काढणार की काय याकडे आमचं लक्ष लागलं होतं. पण त्या मुलीने चक्क पायांतील stiletto heel चे शूज काढले. पिशवीतून सपाट तळ असलेली पायताणं काढून पायांत घातली. stilettos पिशवीत आणि पिशवी पर्समध्ये ठेवून ती पायर्या चढायलाही लागली. तिच्या फॅशनप्रति असलेल्या निष्ठेला मनोमन हात जोडले! एकीकडे पावसाळ्यात मुंबईत लोकलने प्रवास करताना छत्री प्लास्टिकच्या पिशवीत आणि पिशवी बॅगेत ठेवणंही आठवलं.
एकदाचं funicular चं तिकिट काढून काही मिनिटांचा प्रवास करून माथ्यावर पोहोचलो. पर्यटक आणि फेरीवाल्यांची गर्दी उसळली होती. वर एक चॅपेल आणि अॅम्फीथिएटर आहे. पण ही टेकडी प्रसिद्ध आहे ती इथून दिसणार्या अथेन्स आणि अक्रोपोलिसच्या नजार्यासाठी.
लायकाबेटसवरून दिसणारं अक्रोपोलिस
सहलीत आतापर्यंत पाहिलेल्या दृश्यांच्या तुलनेत लायकाबेटसवरून दिसणारं अथेन्स काही विशेष वाटलं नाही. हवासुद्धा स्वच्छ नव्हती. इथून रात्री दिव्यांच्या रोषणाईत अक्रोपोलिस छान दिसतं. आम्ही थोडा वेळ वर थांबून परत निघालो.
त्या दिवशी संध्याकाळी म्युझिअमला जाताना मात्र अक्रोपोलिसने पुन्हा दर्शन दिलं.
(क्रमशः)
प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
लायकाबेटस टेकडीवरून उतरल्यावर थोडं खाऊन घेतलं आणि प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानासाठी सज्ज झालो.
प्राचीन ग्रीक तंत्रज्ञान प्रदर्शन
प्रदर्शनात The Kotsanas Museum of Ancient Greek Technology या संग्रहालयातील काही प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. या संग्रहालयांतर्गत ऑलिंपिक खेळांमुळे प्रसिद्ध असलेल्या ऑलिंपिया शहरात Archimedes' Museum, जवळच काटाकोलोन या गावी Museum of Ancient Greek Technology आणि पिर्गोस येथे Museum of Ancient Greek Musical Instruments and Toys अशी तीन संग्रहालये चालविण्यात येतात. ही संग्रहालये श्री. कोस्टास कोट्सानास या एका व्यक्तीच्या अभ्यासातून आणि प्रयत्नांतून उभी राहिली आहेत. ग्रीक, लॅटिन आणि अरबी भाषांमधील उपलब्ध साहित्य तसेच प्राचीन अवशेषांचा आधार घेऊन बनविलेल्या प्रतिकृती या संग्रहालयांत आहेत.
हा लेख लिहित असताना श्री. कोट्सानास यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी संग्रहालयाविषयी माहिती तसेच काही फोटो पाठविले, त्यासाठी त्यांचे अनेक आभार! त्यांनी पाठविलेल्या फोटोंबरोबर मी काढलेले काही फोटो लेखासाठी वापरले आहेत.
ग्रीसच्या सहलीची आखणी करत असताना या संग्रहाविषयी वाचलं होतं. एखाद्यातरी संग्रहालयाला भेट देण्याची इच्छा होती. या सहलीत ऑलिंपियाला जाणं होणार नव्हतं. पण निवडक प्रतिकृतींची फिरती प्रदर्शने जगभर भरत असतात, तसंच एक प्रदर्शन अथेन्समध्ये भरलं होतं आणि आमच्या हातात वेळही होता.
हे प्रदर्शन दुसर्या एका संग्रहालयाच्या जागेत भरलं होतं. इमारतीच्या
आत गेल्यागेल्या हा इ. स. पूर्व सहाव्या शतकातील चिकणमातीचा प्रचंड votive
plaque दिसला. सूनिअनच्या अथीनाच्या देवळात मिळालेला हा फलक एखाद्या
दर्यावर्दीने नवस फेडायला लावला असावा.
प्रदर्शनात प्रतिकृतींची ग्रीक आणि इंग्रजीत सविस्तर माहिती दिलेली
होती. संग्रहालयाच्या वेबसाइटवरही अशी माहिती आहे. शक्य तिथे माहितीची लिंक
देत आहे, तिथे प्रतिकृतीमागच्या तंत्राबद्दल आणि माहितीच्या स्त्रोताबद्दल
वाचता येईल. प्रदर्शनातील काही प्रतिकृती पाहायला सुरुवात करू या
ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकातील पुनर्प्रक्षेपण करणार्या catapult पासून.
The repeating ("polybolos") catapult of Dionysios of Alexandria.
एकामागोमाग एक बाण सोडण्यासाठी याचा उपयोग होत असे.
विशिष्ट नाणं टाकल्यावर तीर्थ देणारं vending machine
हातात पेला ठेवल्यावर त्यात वाइन किंवा वाइन व पाण्याचे मिश्रण भरणारी सेविका.
पेला मधेच हातातून काढून घेतल्यास वाइन किंवा पाण्यचा प्रवाह थांबतो.
आरेखनाची तंतोतंत, लहान वा मोठी नक्कल करणारा अलेक्झांड्रियाच्या हेरोनचा पेंटोग्राफ
गुप्त संदेश पाठविण्याची साधने.
फोटोत डाव्या बाजूला वर दाखविलेल्या प्रकाराच्या चामड्याच्या पट्टीचा उपयोग लॅकोनियन लोकांनी युद्धात हरल्यावर स्पार्टाला निरोप द्यायला केला होता.
पर्शियाचा झर्क्सिस ग्रीसवर हल्ला करणार आहे अशी खबर एका स्पार्टनने उजव्या बाजूच्या पाटीसारख्या साधनाने दिली होती.
खोक्यात वरच्या बाजूला चौदा भागांनी बनलेला एक चौरस आहे. हे भाग वापरून
वेगवेगळे आकार बनविण्याचा खेळ खेळता येतो. त्याचबरोबर हा चौरस म्हणजे
आर्किमिडीजने मांडलेली एक गणिती समस्याही आहे.
खालच्या बाजूला "The Polis" (नगर) या नावाचा प्याद्यांनी खेळायचा बुद्धीबळांसारखा खेळ आहे.
अँटिकिथिरा मेकॅनिझमची प्रतिकृती
१९००
साली अँटिकिथिरा बेटाजवळ समुद्रात बोटीच्या अवशेषांमध्ये इ.स.पूर्व १२०
दरम्यानच्या एका यंत्राचे भाग सापडले होते. अभ्यासाअंती ते एक प्रकारचे
गणकयंत्र होते असे लक्षात आले. अँटिकिथिरा मेकॅनिझमविषयी मंदार कात्रे
यांचा मिपावर हा धागा आहे.
spherical astrolabe of Ptolemy
या दोन हजार वर्षे जुन्या खगोलशास्त्रीय उपकरणाने अक्षांश आणि रेखांश मोजता येत.
वजन उचलण्यासाठी ट्रायपॉड क्रेन
Hydraulics चा उपयोग करून स्वयंचलन. (इ.स.पूर्व तिसरं शतक)
घुबडाने पाठ फिरवली कि पक्षी किलबिल करतात आणि घुबड पक्ष्यांकडे वळलं कि किलबिल थांबते. या क्रिया सतत न थांबता होत राहतात.
Ktesibios चे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक)
घड्याळावरील छोटी मूर्ती दिवस आणि तास दर्शविते.
टिकटिक करणारे आर्किमिडिजचे hydraulic घड्याळ (इ.स.पूर्व तिसरं शतक)
याशिवाय स्वयंचलित नाट्यप्रयोग, अग्निशमनासाठी पाण्याचा पंप, स्वयंचलित कारंजे अश्या अनेक मजेदार गोष्टी होत्या. आम्ही सावकाश एकेक प्रतिकृती बघत होतो. लहानमोठ्या सगळ्यांनाच आवडेल असं प्रदर्शन होतं. आमच्या आगेमागे एक सातआठ वर्षांची फ्रेंच मुलगी आणि तिची आई होती. त्या मायलेकींचं खूप कौतुक वाटलं. ती मुलगी अक्षर लावून हळूहळू इंग्रजी वाचायची. तिला एखादा शब्द अडला तर आई त्या शब्दाचा अर्थ फ्रेंचमध्ये सांगे. तरी कळलं नाही तरच फ्रेंचमधून माहिती सांगत असे.
इमारतीतील छतांवर उत्तम कलाकुसर होती. त्यामुळे छताचे फोटो काढण्याचा मोह होणं स्वाभाविक होतं.
प्रदर्शन बघून बाहेर येईपर्यंत अंधार पडायला लागला होता. रस्ता
पर्यटकांनी आणि स्मरणवस्तूंच्या विक्रेत्यांनी फुलला होता. अक्रोपोलिसच्या
टेकडीला वळसा घालून चालत आम्ही अक्रोपोलिस संग्रहालयाकडे निघालो.
अक्रोपोलिस संग्रहालय
पूर्वी अक्रोपोलिसवरच तिथल्या अवशेषांचं संग्रहालय होतं. पण तिथे जागा
अपुरी पडायला लागल्याने पायथ्याशी नवीन इमारत बांधण्यात आली. २००९ साली या
आधुनिक इमारतीत संग्रहालय सुरू झालं.
नैसर्गिक प्रकाशासाठी इमारत बांधताना काचेचा भरपूर वापर केलेला आहे.
इमारतीखालीही प्राचीन वास्तूंचे अवशेष आहेत. त्यामुळे तळमजल्यावर बर्याच
ठिकाणी खालचे अवशेष दिसतील अशी व्यवस्था आहे.
सगळ्यात वरच्या मजल्यावर पार्थेनॉन या मुख्य देवळातील अवशेष आहेत. पार्थेनॉनसारखी या कक्षाची रचना आहे. देवळाच्या खांबांचा आकार आणि त्यांच्यातील अंतर मूळ रचनेबरहुकूम आहे. त्याखालच्या मजल्यावर अक्रोपोलिसच्या इतर महत्त्वाच्या देवळांत आणि इमारतींत मिळालेले अवशेष आहेत. त्याखालच्या मजल्याला उतार दिलेला असून तिथे अक्रोपोलिस टेकडीवर मिळालेल्या वस्तू बघता येतात. या मजल्यावरचे बरेच अवशेष उंचावर असल्याने नीट बघता आले नाहीत. (मी युरोपियनांच्या मानानेही बुटकी नाही. बर्याच लोकांना हा त्रास होत असणार.) पार्थेनॉनच्या मजल्यावरही प्रकाशयोजना आवडली नाही. संग्रहालयाऐवजी एखाद्या आर्ट गॅलरीत असल्यासारखं वाटत होतं. एकंदर या संग्रहालयाने थोडी निराशा केली. कदाचित आमच्या मूळ योजनेनुसार आधी अक्रोपोलिस पाहून मग इथे आलो असतो तर जास्त प्रभाव पडला असता.
आम्ही गेलो तेव्हा फारसे पर्यटक नव्हते. त्यामुळे रांग वगैरे न लावता ५
युरोचे तिकिट काढून लगेच आत जाता आले. सुरूवातीलाच अक्रोपोलिसची वेगवेगळ्या
कालखंडांतील रचना दाखविणारी मॉडेल्स आहेत. त्यावरून ख्रिस्तपूर्व बाराव्या
शतकातील तटबंदी आणि थोडं बांधकाम असं स्वरूप असलेलं अक्रोपोलिस पुढच्या
पंधराशे वर्षांत कसं बदलत गेलं हे पाहता येतं.
इ.स.पूर्व बाराव्या शतकातील अक्रोपोलिस
इ.स.पूर्व पाचव्या शतकातील अक्रोपोलिस
इसवीसनाच्या दुसर्या ते तिसर्या शतकातील अक्रोपोलिस. खालील फोटोत विविध इमारती आणि त्यांची स्थाने दिली आहेत.
म्युझिअमच्या मुख्य भागात फोटो काढायला परवानगी नाही. त्याशिवाय
पार्थेनॉनचे अनेक महत्त्वाचे अवशेष (Parthenon Marbles) ग्रीसबाहेर,
मुख्यत्वे लंडनच्या ब्रिटिश म्युझिअममधे आहेत. त्यामुळे इथे अधिक माहिती
देण्यापेक्षा पार्थेनॉनची रचना तसेच अवशेष पाहण्यासाठी The Parthenon Frieze
हे ऑनलाईन अॅप्लिकेशन बघणे उपयुक्त ठरेल. तिथे खालच्या बाजूच्या उजव्या
कोपर्यात इंग्रजी भाषा निवडता येईल. जगभर पसरलेल्या अवशेषांचे फोटो तसेच
सतराव्या शतकात नष्ट झालेल्या काही शिल्पांची रेखाटने एकत्र करून बनविलेले
हे आभासी अॅप आपल्याला त्रिमितीत वेगवेगळ्या कोनांतून पार्थेनॉन दाखविते.
अथेन्समधील पहिला दिवस संपला होता. आज नाही पण उद्यातरी डेल्फीचं दर्शन होणार का, हे बघायचं होतं!
(क्रमशः)
गूढरम्य डेल्फी १
प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीत जगाचं केंद्र मानण्यात आलेली डेल्फी (Delphi)! ग्रीक देव झ्यूसने पृथ्वीचं नाभीस्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशांहून सोडलेले दोन गरूड ज्या ठिकाणी भेटले ती ही जागा. प्राचीन ग्रीकांचं हे सगळ्यांत महत्त्वाचं धर्मस्थळ अथेन्सपासून १८० किमीवर पार्नासस पर्वताच्या (Mount Parnassus) उतारावर वसलेलं होतं. ग्रीसमधील पुरावशेष पाहण्यात रस असेल तर अथेन्स आणि ऑलिंपिया बरोबर डेल्फीची वारी करणे भाग आहे.
अथेन्सहून एका दिवसात डेल्फीची सहल घडविणार्या अनेक टूर कंपन्या आहेत. आपल्या डोक्याला त्रास न देता फिरायचं असेल तर तो पर्याय उत्तम आहे. पण या सहलींत डेल्फीजवळच्या एका स्की रिझॉर्टला भेट, तिथे दुपारचं जेवण अश्या गोष्टींत वेळ वाया जातो आणि प्रत्यक्ष डेल्फी बघायला कमी वेळ मिळतो. शिवाय माणशी किमान ९० युरो किंमत. त्यापेक्षा स्वस्तात सार्वजनिक बसने ही सहल करायची असं ठरवलं होतं. आदल्या दिवशीचा संपाचा अनुभव होता, त्यामुळे सकाळी उठून आधी इंटरनेटवर संपाची बातमी वगैरे आहे का बघितलं. बस साडेसात वाजता होती. तयार होऊन पावणेसातला आम्ही निघालो. हॉटेलच्या रिसेप्शनिस्टलाही संपाबद्दल विचारलं. तिने संपाची सूचना अजूनतरी मिळालेली नाही म्हटल्यावर जीव थोडा भांड्यात पडला. न्याहारी सातपासून सुरू होणार होती. पण आम्ही डेल्फीला जातोय कळल्यावर रिसेप्शनिस्टने किचनला कळवून आमची खाण्याची सोय केली. तिला दुवा देत थोडंसं खाऊन घेतलं.
हॉटेलबाहेरच टॅक्सी स्टँड होता. टॅक्सी ड्रायव्हरला मात्र आम्हाला कुठे जायचंय ते कळे ना. ग्रीक भाषेत लिहिलेलं बस स्टँडचं नाव आणि पत्ता दाखवला. नकाशा दाखवूनही उपयोग होईना. पुन्हा आत जाऊन रिसेप्शनिस्टशी बोलले. तिलाही तो बस स्टँड माहित नव्हता. तिने इंटरनेटवर शोधल्यावर सगळा उलगडा झाला. कुर्ला टर्मिनस माहित्येय पण लोकमान्य टिळक टर्मिनस माहित नाही असा प्रकार होता. एकदाचे टॅक्सीत बसून स्टँडवर पोहोचलो. संप असेल तर लगेच परत फिरू असा विचार करून बसचं एकेरी तिकिट काढलं आणि डेल्फीचा प्रवास सुरू झाला. साधारण तीन तासाचा प्रवास. बाहेर तसा अंधारच होता. मग मस्त झोप काढली. दोन तासांनी एक छोटा ब्रेक होता. थोडे पाय मोकळे केले. तिथून पुढे डेल्फीपर्यंत डोंगररांगेतून रस्ता जात होता. बाहेरचं दृश्य पाहण्यात छान वेळ गेला.
बसमधून उतरायच्या आधी उजवीकडे अवशेषांचं दर्शन झालं. संप वगैरे नव्हता. डेल्फी म्हणजे छोटंसं गावठाण आहे. स्टॉपसमोरच्या कॅफेत बसचं तिकिट मिळतं. लगेच परतीचं तिकिट काढलं. भूक लागली होती, दिवसभरात खूप चालणंही होणार होतं. मग कॅफेतच अंड्याचा पोळा, पाव आणि कॉफी अशी पोटपूजा केली आणि डेल्फी बघायला सज्ज झालो.
तिथून चालत दहा मिनिटांवर प्रवेशद्वार होतं. आजूबाजूला पर्वतराजी आणि दूर समुद्राचं पाणी असा नजारा पाहून प्रसन्न वाटत होतं.
इसवीसनपूर्व आठव्या शतकात डेल्फीला महत्त्व प्राप्त व्हायला सुरूवात झाली. इ.स.पूर्व सातव्या शतकात इथे अपोलो आणि अथेना (Athena Pronaia) या मुख्य देवतांची मंदिरे बांधली गेली. डोंगराच्या मध्यभागी बांधलेल्या अपोलोच्या देवळात जाण्यासाठी डेल्फीच्या प्रवेशद्वारापासून Sacred Way नावाचा मार्ग होता. देवळाच्या मागच्या बाजूला नाट्यगृह (theatre) आणि त्याच्या मागे आणखी उंचावर क्रीडांगण (stadium) होते. या दोन ठिकाणी ऑलिंपिक खेळांसारखे Pythian Games भरवले जात असत.
संग्रहालयातील अपोलोच्या देवस्थानाचा आराखडा
अपोलोच्या देवळातील मुख्य पुजारिणीला (High Priestess) पिथिया (Pythia) म्हणत असत. भविष्यवेत्ती (Oracle of Delphi) म्हणून पिथियाची हळूहळू ख्याती होत गेली. अपोलो पिथियाच्या माध्यमातून दैवी संकेत देतो अशी श्रद्धा होती. या ओरॅकलचा सल्ला घेण्यासाठी भेटवस्तू घेऊन सर्वसामान्य लोक येत तसेच वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधीही येत असत. धार्मिक आणि राजकीय महत्त्व वाढत गेले तशीच अपोलोच्या देवस्थानाची संपत्तीही. अनेक नगरराज्यांनी इथे porticoes बांधले, पुतळे उभारले. देवाला समर्पित केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा युद्धातील विजयाचे प्रतिक म्हणून treasuries बांधल्या. ओरॅकलची कीर्ती या काळात सर्वदूर पसरली होती. वैभवाच्या शिखरावर असताना डेल्फीतील अपोलोच्या देवळाचा परिसर कसा दिसत असेल याची कल्पना या चित्रावरून येते.
त्या २,७०० वर्षे पुराण्या वैभवाच्या खुणा काही इमारतींच्या आणि वस्तूविशेषांच्या रूपात अजूनही शिल्लक आहेत. जिथे फक्त इतस्ततः विखुरलेले दगडधोंडेच उरले आहेत तिथेही गतवैभवाचं चित्र डोळ्यांसमोर सहज उभं राहतं. डेल्फीचे अवशेष दोन भागांत आहेत. एका बाजूला डोंगरउतारावर मुख्य अवशेष आणि वस्तुसंग्रहालय आहे. हा भाग आम्ही आधी पाहणार होतो. रस्त्याच्या दुसर्या बाजूला दूर डोंगराच्या पायथ्याशी अथेनाच्या sanctaury चे आणि इतर इमारतींचे अवशेष अस्पष्ट दिसत होते.
प्रवेशद्वारातून आत जाऊन थोडं चालल्यावर अपोलोच्या sanctaury च्या परिसर समोर आला.
अपोलोच्या sanctaury त एक फेरफटका मारून येवू!
Treasury of the Athenians: सुस्थितीत असलेली डेल्फीतील महत्त्वाची इमारत
इ.स.पूर्व
सहाव्या शतकात अपोलोच्या देवळाला आधार देण्यासाठी बांधलेली polygonal
भिंत. मागे देवळाचे खांब आणि पुढे Stoa of the Athenians चे अवशेष आहेत.
अथेनियन्सनी युद्धात, विशेषतः पर्शियन्सकडून, लूटलेल्या आणि देवाला अर्पण
केलेल्या वस्तू Stoa या इमारतीत ठेवत असत. पर्शियाच्या झर्क्सिसला एका
लढाईत हरवल्यावर अथेनियन्सनी ही इमारत बांधली.
देवळाचा परिसर
परिसरातील एका खांबावरील लेख
मुख्य देऊळ
उंचावरून दिसणारं पार्नासस पर्वताच्या कुशीत वसलेलं अपोलोचं देऊळ
थिएटर आणि त्याखाली देवळाचे अवशेष
थिएटर बघून एक चढण चढल्यावर स्टेडियमपाशी आलो. इ.स. पूर्व पाचव्या शतकात इथे एक racing track बनविण्यात आला, प्रेक्षकांना जमिनीवर बसावे लागे. दुसर्या शतकात रोमन सम्राट हाड्रियनच्या कार्यकाळात बांधलेलं तीन arches असलेलं प्रवेशद्वार (क्र. २) आणि संगमरवरी आसने अजूनही आहेत.
स्टेडियमची रचना
शर्यतीचा १७८.३५ मीटरचा track आणि उजवीकडे arched entrance. साधारण मध्यभागी परीक्षकांची विशेष आसने दिसत आहेत.
शर्यत संपते ते स्टेडियमचं टोक
आमचीही डेल्फीची अर्धी शर्यत झाली होती. वस्तूसंग्रहालय आणि डोंगर उतरून अथेनाचं देऊळ पाहण्याआधी थोडा श्रमपरिहार केला. समोर दिसणारं डेल्फीचं विहंगम दृश्य साथीला होतंच!
(क्रमशः)
गूढरम्य डेल्फी २
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या डेल्फीच्या अवशेषांतील अपोलोच्या मंदिराचा परिसर पाहून झाल्यावर अथेनाच्या मंदिराकडे निघालो. दोनअडिच हजार वर्षांपूर्वी इथे अपोलो आणि अथेना या मुख्य देवतांबरोबर इतर काही देवांचीही देवळे होती. ग्रीक संस्कृतीत नाट्यकला, क्रीडा यांनाही खूप महत्त्वाचं स्थान असल्याने डेल्फीत देवळे आणि त्यांच्याशी संलग्न इतर बांधकामांशिवाय खेळ आणि नाट्यकलेशी संबंधित इमारतीही होत्या.
Gymnasium आणि अथेनाची sanctuary
मागच्या भागात बघीतलेल्या थिएटर आणि स्टेडियमबरोबर डेल्फीत खेळाडूंसाठी राहायला जागा, gymnasium, baths अश्या अनेक सुविधा होत्या. रस्त्याच्या दुसर्या बाजूला असलेल्या अथेनाच्या देवळाकडे जाताना आधी gymnasium दिसले. इ.स.पूर्व चौथ्या शतकात याजागी प्रथम जिम बांधण्यात आले. नंतर इथे नवनवीन सुविधा झाल्या, पुनर्बांधणी करण्यात आली. या जिममध्ये Track and field, कुस्ती, मुष्टियुद्ध यांचा सराव करता येत असे. तरणतलावही होता. वाईट हवामानामुळे बाहेर सराव करणे शक्य नसेल तर बंदिस्त portico ची सोय होती.
जिम्नॅशियम लांबूनच पाहून डोंगर उतरून अथेनाच्या sanctuary पाशी आलो. प्राचीन काळी अथेन्सहून डेल्फीला येणारे प्रथम अथेनाच्या देवळाशी येऊन पोहोचत. त्यामुळे Athena Pronaia म्हणजे (अपोलोच्या देवळाच्या) आधी असलेली अथेना असं नाव पडलं असावं. या परिसरात असलेले थोलोस (Tholos) प्रकारच्या इमारतीचे दुरूनही दिसणारे तीन खांब हे डेल्फीचे प्रतीक म्हणावे इतके प्रसिद्ध झाले आहेत.
थोलोस म्हणजे वर्तुळाकार बांधलेली इमारत. ही इमारती जमिनीपासून थोड्या उंचावर असलेल्या गोलाकार पीठिकेवर (podium) बांधलेली असून, पीठिकेवर चढायला काही पायर्या असत. डेल्फीच्या थोलोसला पीठिकेवर बाहेरच्या बाजूने बारा डोरिक पद्धतीचे आणि त्यांच्या आत दहा कोरिंथियन पद्धतीचे खांब होते. इ.स.पूर्व तिसर्या शतकात बांधलेली ही इमारत डेल्फीतील सगळ्यांत वैशिष्ट्यपूर्ण इमारत असली तरी तिचे प्रयोजन काय असावे याबद्दल काहीही माहिती नाही.
थोलोसव्यतिरिक्त या परिसरात अथेनाची विविध कालखंडांत बांधलेली देवळे, treasuries, इतर देवतांच्या वेदी होत्या. आता या इमारतींचे विशेष अवशेष उरलेले नाहीत. खाली दिलेल्या दोन चित्रांवरून या परिसराची रचना लक्षात येते.
देवळाच्या परिसराचे कल्पनाचित्र
अथेनाच्या sanctuary चा आराखडा
१) इ.स.पूर्व सातव्या आणि पाचव्या शतकातील डोरिक पद्धतीच्या देवळांचा पाया.
२) नंतरचे इ.स.पूर्व चौथ्या शतकातील देऊळ. ३) डोरिक पद्धतीने बांधलेली
Treasury. ४) Treasury of Massalia; Massalia अर्थात आताचे फ्रांसमधील
Marseille येथे त्याकाळी ग्रीक कॉलनी होती.
५) Tholos प्रकाराची इमारत
अथेनाच्या sanctuary चा परिसर
sanctuary पासून थोड्या उंचावर असलेल्या एका viewpoint वरून हा सगळा परिसर व्यवस्थित दिसतो. निळसर डोंगरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे अवशेष पाहत तिथे थोडा वेळ रेंगाळलो. मग चढण चढून रस्त्यापाशी आलो. आता जायचं होतं वस्तुसंग्रहालय बघायला.
डेल्फी पुराणवस्तुसंग्रहालय
ग्रीसमधील मुख्य पुरावशेषांच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू जवळच एखाद्या संग्रहालयात मांडून ठेवलेल्या असतात. त्याशिवाय अथेन्सला ग्रीसचं राष्ट्रीय पुराणवस्तुसंग्रहालय आहे, तिथे विशेष महत्त्वाच्या वस्तू पाहता येतात. डेल्फीच्या संग्रहालयातही मंदिरांचे काही अवशेष, पुतळे, देवाला दान केलेल्या किंवा नवस फेडताना दिलेल्या वस्तू इत्यादी ठेवल्या आहेत. त्यातील निवडक संग्रह पाहू.
नवसपूर्तीची इ.स.पूर्व आठव्या शतकातील कांश्याची ढाल
नवसपूर्तीचं इ.स.पूर्व सातव्या शतकातील कांश्याचं प्राणी कोरलेलं शिरस्त्राण
Naxos बेटावरील लोकांनी दिलेली ही संगमवरी Sphinx एका उंच खांबावर असे. खांब आणि स्फिन्क्स मिळून उंची साडेबारा मीटर होती.
Siphnian Treasury ची इमारत. सिफ्नोस या एका सोन्याचांदीच्या खाणी असलेल्या संपन्न बेटाची ही Treasury
Siphnian Treasury मधील एक पुतळा
सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze
सिफ्नियन ट्रेझरी वरील frieze
सिफ्नियन
ट्रेझरीच्या पूर्वेचं ट्रोजन युद्धाचं मुख्य frieze. यात डावीकडे
ट्रोजन्सचं रक्षण करणार्या आर्टेमिस, अपोलो, झ्यूस इत्यादी पाच देवता
आहेत. झ्यूसची प्रार्थना करणार्या अकिलिसच्या आईची आकृती नष्ट झाली असून
Achaeans च्या रक्षक देवता अथेना, हेरा, डेमेटर त्यानंतर आहेत. इतर भागात
युद्धाचं चित्रण आहे.
आर्गोसचं जुळं म्हणून प्रसिद्ध असलेले दोन भावांचे इ.स.पूर्व सहाव्या शतकातील पुतळे
लाकूड, सोन आणि हस्तिदंत वापरून बनविलेली, बहुधा अपोलोची, मूर्ती
अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडच्या शिल्पांचं कल्पनाचित्र. पुढच्या दोन फोटोत काही शिल्पांचे अवशेष दिसतात.
अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं
अपोलोच्या देवळावरील पूर्वेकडची शिल्पं
एका भांड्यावर चितारलेला वाद्य वाजवणारा अपोलो
तीन नर्तकींचा खांब
'Melancholy roman' या नावाने प्रसिद्ध पुतळा
'The Charioteer' या नावाने प्रसिद्ध असलेला कांश्याचा १.८२ मीटर उंच
पुतळा. हा सारथी चार घोड्यांच्या रथावर आरूढ असावा. पिथियन खेळात रथांच्या
शर्यतीच्या एका विजेत्याने या सारथ्यासह रथ अर्पण केला होता.
शेवटी बघू या डेल्फीच्या एका तत्त्वज्ञाने त्याच्या कुटुंबाच्या वतीने अर्पण केलेल्या पुतळ्यांचा समूह. त्यातील वयस्क तत्त्वज्ञाचा पुतळा पूर्ण आहे. बरोबर त्याची मुलगी आणि पत्नी आहे.
संग्रहालयात ठेवलेल्या देवाला अर्पण केलेल्या वस्तू, पुतळे, शिल्पांचे अवशेष यांवरून तत्कालीन डेल्फीच्या संपत्तीची आणि प्रभावाची कल्पना येते. दुरून कष्टप्रद प्रवास करून आलेले भाविक ते वैभव पाहून ओरॅकलला भेटण्याआधीच मंत्रमुग्ध होत असतील का, असा विचार डेल्फीचा निरोप घेताना मनात येत होता.
(क्रमशः)
अक्रोपोलिस
प्राचीन कोरिंथच्या भागात लिहिल्याप्रमाणे अक्रोपोलिस म्हणजे खरंतर उंचावर बांधलेली गढी किंवा नगर. त्याअर्थाने अथेन्सचं अक्रोपोलिस एकमेव नसलं तरीही अक्रोपोलिस म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस आणि तिथलं पार्थेनॉन. अथेन्समध्ये फिरत असताना ते आपल्याला कायम खुणावत राहतं आणि अथेन्सच्या गतवैभवाची सतत आठवण करून देत असतं.
आदल्या दिवशी डेल्फीचा प्रवास आणि दिवसभर फिरणं झाल्याने २९ डिसेंबरला सकाळी सावकाश उठून अक्रोपोलिस पाहायचं आणि नंतर निरुद्देश भटकायचं एवढाच कार्यक्रम ठेवला होता. मेट्रोने अक्रोपोलिस स्टेशनपर्यंत आलो. तिथे आमच्याबरोबर मेट्रोतली यच्चयावत जनता उतरली. सगळ्यांना आमच्यासारखंच अक्रोपोलिस बघायचं होतं! त्यात परदेशी पर्यटकांपेक्षा सुट्टीत सहकुटुंब अथेन्सला आलेले ग्रीक्स जास्त होते. दर चारपाच मिनिटांनी मेट्रोने येणार्या लोढ्यांमुळे गर्दीत भर पडत होती. ग्रीसमध्ये फिरताना एवढी गर्दी तोपर्यंत पाहिली नव्हती. त्यात अक्रोपोलिसचं एकच, दक्षिणेकडचं प्रवेशद्वार खुलं होतं, सामान ठेवायची सोय बंद केली होती. त्यामुळे गोंधळात भर पडत होती. एकंदर अक्रोपोलिस व्यवस्थित नाही बघता आलं तरी मनोरंजन नक्की होणार असं वाटायला लागलं.
इ.स.पूर्व पाचव्या शतकाच्या सुमारास अक्रोपोलिसमधील महत्त्वाच्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं. अक्रोपोलिस संग्रहालयात ठेवलेल्या या मॉडेलवरून इसवीसनाच्या दुसर्या ते तिसर्या शतकात अक्रोपोलिस कसे असेल, याचा अंदाज येतो.
दक्षिणेकडून अक्रोपोलिस पाहायला सुरूवात केली की प्रथम लागतं वरच्या
फोटोत उजवीकडे असलेलं Theatre of Dionysus. ते पाहून डावीकडे वळून टेकडीला
वळसा घालत आपण डावीकडे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या Odeon या दुसर्या
थिएटरपाशी येतो. त्यानंतर अक्रोपोलिसच्या मुख्य मार्गावर येऊन टेकडी चढली
की Propylaea या अक्रोपोलिसच्या प्राचीन द्वारातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश
करता येतो. अक्रोपोलिस आणि आजूबाजूच्या परिसराची ही चित्रमय झलक.
इ.स.पूर्व चौथ्या शतकात बांधण्यात आलेलं Theatre of Dionysus
Odeon
of Herodes Atticus हे दुसर्या शतकात बांधलेलं बंदिस्त नाट्यगृह. ५ हजार
आसनक्षमता असलेल्या या थिएटरची दर्शनी भिंत तिमजली होती. १९५० साली या
इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि तेव्हापासून इथे पुन्हा सांगितिक
कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ लागले. एपिडाउरोससारखंच इथेही एखादा
कार्यक्रम बघायला मजा येईल.
अक्रोपोलिसवरून दिसणारं Odeon
टेकडी चढताना दिसलेलं Temple of Hephaestus आणि खालच्या बाजूला उजवीकडे प्राचीन अगोराचे अवशेष. हे देऊळ पाहायचं मात्र राहून गेलं.
अक्रोपोलिसच्या संरक्षणासाठी असलेल्या तटबंदीत पश्चिमेला असलेला दरवाजा. याखेरीज नैऋत्येला आणखी एक दरवाजा होता.
आतल्या बाजूने तट आणि दरवाजा
तटातून
किल्ल्यात शिरल्यावर दिसणारं Propylaea हे महाद्वार. संगमरवरी पायर्या
चढून आलं की प्रोपिलाइयातून अक्रोपोलिसमध्ये प्रवेश करता येत असे. उजवीकडे
उंचावर बांधलेलं अथेना नायकीचं देऊळ, Temple of Athena Nike.
तीनदा
कोन्सुल बनलेल्या अग्रिप्पा या प्राचीन काळातील राजकारण्याच्या स्मारकाचे
अवशेष. प्रोपिलाइयाच्या डावीकडे असलेल्या या पीठिकेवर काश्याचा चार
घोड्यांचा रथ (quadriga) होता. अग्रिप्पाच्या आधी तिथे युमेनसचे स्मारक
असावे.
प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग
प्रोपिलाइयाचा दर्शनी भाग
अथेन्स शहराची देवता (Patron) मानण्यात आलेल्या अथीना पार्थेनॉस (Athena Parthenos) देवीचे Parthenon हे प्रसिद्ध मंदिर.
पार्थेनॉनच्या
दुरुस्तीचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. काम संपल्यावर एकदम नवंकोरं
पांढरंशुभ्र पार्थेनॉन दिसेल कि काय, अशी शंका मनात आली.
इ.स.पूर्व
४४० च्या दरम्यान बांधलेल्या पार्थेनॉनच्या गाभार्यात सोनं आणि
हस्तिदंतात घडविलेली अथीना देवीची मूर्ती होती. युद्धाच्या वेषात असलेली
देवी अथेन्सवासियांसाठी उजव्या हातात Nike म्हणजे विजयश्री घेऊन आली आहे
असे मूर्तीचे स्वरूप होते. डोरिक पद्धतीने बांधलेलं पार्थेनॉन नंतरच्या
काळात चर्च आणि मशिद म्हणूनही वापरण्यात आलं.
अक्रोपोलिसवरून दिसणारं सुरुवातीला पाहिलेलं Theatre of Dionysus
अथेन्समधील
आणखी एका देवळाचे अवशेष. इ.स.पूर्व सहाव्या शतकात बांधायला सुरुवात केलेलं
Temple of Olympian Zeus हे देऊळ सुमारे साडेसहाशे वर्षांनंतर रोमन सम्राट
हाड्रियनच्या काळात बांधून पूर्ण झालं. फोटोत खालच्या भागात रस्त्याच्या
शेवटी Arch of Hadrian दिसत आहे. तर वरच्या बाजूला डावीकडे Panathenaic
Stadium चा काही भाग दिसत आहे. इ.स.पूर्व ३३० च्या आसपास त्याजागी स्टेडियम
बांधण्यात आले. इसवीसनाच्या दुसर्या शतकात जुन्या स्टेडियमची संगमरवरात
पुनर्बांधणी करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात स्टेडियमची दुरुस्ती करण्यात
येऊन १८९६ सालच्या पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचा उद्घाटन आणि समारोप
सोहळा तिथे साजरा झाला. अजूनही ग्रीसमधील ऑलिंपियाला प्रज्वलित केलेली
ऑलिंपिक ज्योत ऑलिंपिक्सच्या यजमान देशाकडे सुपूर्द करण्याचा समारंभ या
स्टेडियममध्ये होतो. अथेन्समधील या काही जागा अक्रोपोलिसवरून पाहण्यात
समाधान मानावे लागले.
टेकड्यांमधे पसरलेलं महानगर. मध्यभागी लायकाबेटस टेकडी दिसत आहे.
अक्रोपोलिसचा परिसर, उजवीकडे Erechtheion हे देऊळ
Erechtheion
अथीनाचं Erechtheion हे देऊळ आधीच्या जुन्या देवळाच्या जागी इ.स.पूर्व ४१० च्या दरम्यान बांधण्यात आले.
इतर
ग्रीक देवळांपेक्षा वेगळं दिसणारं हे देऊळ एका बाजूच्या Karyatides
नावाच्या सहा नर्तकींच्या पुतळ्यांमुळे लक्ष वेधून घेतं. मूळचे पुतळे
संग्रहालयात असले तरी इथे ठेवलेलेही सुंदर आहेत. या नर्तकींबरोबरच आम्ही
अक्रोपोलिसचाही निरोप घेतला.
(क्रमशः)
राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय
अथेन्स आणि ग्रीसचा निरोप घ्यायची वेळ आली होती. शेवटच्या दिवशी विमानतळाकडे जाण्याआधी सकाळी मोकळा वेळ होता. त्या वेळात काय पाहायचं हा प्रश्नच आला नाही. अथेन्सच्या इतर पुरातन वास्तू आणि अवशेष किंवा बेनाकी संग्रहालय वगैरे बघण्यात रस होता. पण ग्रीसच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाला (National Archaeological Museum, अर्थात NAM) अग्रक्रम होता. डेल्फी वा मायसिनी सारख्या प्रसिद्ध पुरावशेषांजवळही संग्रहालये आहेत, तिथे मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहता येतात. परंतु सगळ्यांत महत्त्वाचे पुतळे, भांडी, धातूकाम, दागिने हे राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात मांडून ठेवलेले आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या संग्रहालयाची निओक्लासिकल शैलीतील इमारत लक्ष वेधून घेते.
प्रागैतिहसिक, मायसिनिअन, मिनोअन अश्या अनेक विभागांमध्ये पसरलेल्या या संग्रहालयातील काही वस्तूविशेष पाहू.
इ.स. पूर्व २८०० ते २३०० या काळातील नाव आणि लाटांची नक्षी असलेला मातीचा तवा
'Thinker' या नावाने प्रसिद्ध नवपाषाण युगाच्या इ.स. पूर्व ४५०० ते ३३०० काळातील चिकणमातीचा पुतळा
रथ कोरलेली इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील शिळा
मायसिनीच्या थडग्यांत मिळालेले इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील सुवर्णालंकार. मायसिनीविषयी तिसर्या भागात वाचता येईल.
मायसिनीचे सुवर्ण
Mask of Agamemnon म्हणून प्रसिद्ध असलेला मायसिनीचा सोन्याचा मुखवटा.
मायसिनीच्या भित्तिचित्रात दाखविलेली कंठभूषण स्वीकारणारी देवता (इ.स. पूर्व तेरावं शतक)
काही भित्तिचित्रांचे अवशेष
शिश्याच्या इ.स. पूर्व चौदाव्या शतकातील मिनोअन मूर्त्या, डावीकडे नर्तकी आणि उजवीकडे बासरीवादक
ग्रीक भाषेच्या सगळ्यांत जुन्या लिप्यांमधील एक असलेली मायसिनिअन काळातील
Linear B लिपी. Pylos (Palace of Nestor), Knossos या काही ठिकाणी Linear B
लिपीत लिहिलेल्या मातीच्या पट्ट्या सापडल्या आहेत. फोटोतील वरच्या दोन
पट्ट्यांवर तीळ, धणे, जिरं, केशर अश्या मसाल्याच्या पदार्थांच्या नोंदी
आहेत. खालच्या एका पट्टीवर कामगारांची आणि दुसर्या पट्टीवर तेलाच्या
साठ्याची नोंद आहे.
Pylos ला सापडलेल्या या Linear B लिपीतील पट्ट्यांवर मेंढपाळ आणि त्यांच्याकडील मेढ्यांच्या कळपांच्या नोंदी आहेत.
Linear B लिपीतील काही चिन्हे
मायसिनीअन सोन्याच्या अंगठ्यांचे नमुने. मध्यभागी असलेल्या मुद्रेवर
सिंहाचे शिर असलेले यक्ष आसनावर बसलेल्या देवतेला अर्पण करण्यासाठी हातात
सुरया घेऊन जात आहेत; आकाशात चक्ररूपी सूर्य आणि चंद्राची कोर आहे. उजवीकडे
वरच्या मुद्रेवर नाविकांसह नौका आणि दोन दांपत्ये आहेत.
Cycladic संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या नग्न संगमरवरी मूर्त्या (इ.स.
पूर्व २८०० ते २३००). बहुतांशी स्त्री मूर्त्या मिळाल्या असून त्या
प्रजननाच्या देवता, अप्सरा यांच्या असाव्या.
Cycladic काळातील पुरुष मूर्त्या शिकारी, योद्धे, वादकांच्या आहेत. त्यातील हार्प वादकाची मूर्ती
Cycladic काळातील भांडी (इ.स. पूर्व २८०० ते २३००). खालचं Kernos नावाचं
भांडं पूजेत देवतांना अर्पण करायच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी वापरत.
यानंतरच्या काही दालनांत अप्रतिम शिल्पकला पाहता येते. ग्रीक
संस्कृतीतील देवदेवता, पुराणांतील गोष्टींवर आधारित शिल्पे अश्या अनेक
कलाकृती मांडून ठेवलेल्या आहेत. यातील अनेक शिल्पे देवांना अर्पण
करण्यासाठी घडविण्यात आली होती. तशी माहिती कोरलेली आढळते.
'Artemision Jockey' नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुतळ्याचे भाग एका
जहाजाच्या अवशेषांत मिळाले. इ.स. पूर्व १४० च्या कांस्य पुतळ्यातील छोट्या
जॉकीच्या डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात आसूड असावा.
अथेना देवीचा पुतळा
ग्रीक देवता झ्यूस किंवा पोसायडनचा हा कांस्य पुतळा. उजव्या हातात thunderbolt किंवा त्रिशूळ असावा.
इसवीसनाच्या दुसर्या शतकातील Sarcophagus
देवांना अर्पण करण्यासाठी बनविलेल्या या शिल्पात डावीकडे तीन अप्सरा,
मध्यभागी हेर्मिस आणि बकर्याचे पाय असलेला पान हे देव आणि उजवीकडे अर्पण
करणारा अगाथेमेरोस आणि त्याला वाइन देणारा सेवक आहेत. (इ.स. पूर्व ३३०)
ग्रीक शिल्पकलेचा आणखी एक सुंदर नमुना. एका अप्सरेच्या अपहरणाची कथा या शिल्पात दिसते.
कालिमाखोस नावाच्या शिल्पकाराने घडविलेल्या इ.स. पूर्व पाचव्या शतकातील या
शिल्पात एक उच्चकुलीन स्त्री हातात धरलेला दागिना पाहत आहे. तिच्या
सेविकेने दागिन्यांची पेटी धरली आहे. त्या स्त्रीच्या कुटुंबाच्या
अथेन्समधील प्राचीन दफनभूमीतील जागेत हे शिल्प होते.
हॉकीसारखा खेळ दाखविणारे हे शिल्प एखाद्या खेळाडूच्या थडग्यावर असावे.
या प्रचंड कुंभावर देव आणि giants यांच्यातील लढाईचं दृश्य आहे. वरती देव
आणि खालच्या बाजूचे giants यांच्या रेषांनी दाखवलेल्या हालचाली, कुंभाच्या
आकाराचा केलेला उपयोग अप्रतिम आहे.
Epinetron नावाच्या या कुंभावर नवविवाहिता आणि तिच्याबरोबर देवता दाखवल्या आहेत.
संग्रहालयाच्या शेवटच्या दालनांमध्ये मिनोअन काळातील पूर्ण आकारातील
भित्तिचित्रे आहेत. मिनोअन ही मायसिनिअन संस्कृतीपेक्षा जुनी संस्कृती इ.
स. पूर्व २६०० ते ११०० या काळातील आहे. क्रिटी (Crete) बेटावर उगम पावलेली
ही संस्कृती तिथून इतर बेटांवर पसरली. अथेन्सला पाहता येणारी मिनोअन
भित्तिचित्रे (frescoes) ही मुख्यत्वे सांटोरिनी किंवा थिरा या बेटावरील
आहेत. पांढर्यानिळ्या रंगसंगतीची घरे आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध
असलेल्या या बेटावरील अक्रोटिरीचे (Akrotiri) पुरावशेषही पाहण्यासारखे
आहेत. इ. स. पूर्व १६२७ साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने
अक्रोटिरीचा विध्वंस केला. पण ज्वालामुखीच्या राखेमुळे काही अवशेष नष्ट
होण्यापासून वाचले. त्यातील काही भित्तिचित्रे अथेन्सला पाहता येतात.
मुष्टियुद्ध करणारी मुले (Boxing children fresco)
Antelopes fresco
वसंत ऋतूतील देखाव्याच्या या सुंदर चित्रात (Spring fresco) थिराची
ज्वालामुखीजन्य भूमी आणि तिच्यावर उमललेली लाल लिलीची फुले दिसतात.
प्राचीन इतिहासातील ग्रीसचे स्थान पाहता हे संग्रहालय (इतर काही युरोपीय संग्रहालयांसारखं) प्रचंड मोठं, भारंभार पुतळे आणि पुरातन वस्तूंनी भरलेले असेल असं वाटलं होतं. पण तसं नसून संग्रह बर्यापैकी आटोपशीर आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची उत्तम माहिती दिलेली आहे. प्राचीन संस्कृती आणि अवशेषांत रस असेल तर अथेन्सच्या भेटीत हे संग्रहालय पाहायलाच हवं.
संग्रहालयातील दोनतीन दालने बंद ठेवली होती, त्यामुळे थोडा विरस झाला. पण एकंदर संग्रहाचा आणि दिलेल्या माहितीचा आवाका पाहता वेळ कमीच पडला. ग्रीसच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील वस्तू पाहताना कधी ओळखीच्या खुणा दिसल्या. तर काही अपरिचित जागांची ओळख होऊन पुढच्या सहलींचं बीज रुजलं.
(समाप्त)
http://misalpav.com/node/43222
ग्रीसच्या क्रिटी बेटावरील समारिया घळ (Samaria Gorge, Crete)
अनेक जागांची, देशांचीही आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते. जसं ग्रीस म्हटलं कि आठवतो तो निळाशार समुद्र, बेटं आणि अक्रोपोलिससारखे प्राचीन अवशेष. ग्रीस हा युरोपातील पर्वतीय देशांपैकी एक असला तरी पर्यटकांमध्ये ग्रीस ट्रेकिंगसाठी विशेष प्रसिद्ध नाही. याला अपवाद म्हणजे ग्रीसचं क्रिटी बेट. ग्रीसच्या अनेक बेटांपैकी क्रिटी हे आकाराने आणि लोकसंख्येनेही सगळ्यांत मोठं. युरोपातील जुन्या मिनोअन संस्कृतीच्या पुरातन वास्तू, तसेच उत्तर आणि पूर्व किनार्यांवरचे सागरी पर्यटन ही इथली मुख्य आकर्षणे. त्याचबरोबर पूर्वपश्चिम पसरलेल्या या बेटावरील पर्वतांमधील गुहा, घळी, घाटवाटासुद्धा भटक्यांना खुणावत असतात.
यावर्षी एप्रिल महिन्यात नवर्यासह केलेल्या क्रिटीच्या सहलीत पायी भटकंतीसाठी दिवस राखून ठेवले होते. बेटाच्या पश्चिम भागातील Lefká Óri (White Mountains) अर्थात श्वेत पर्वत असं नाव पडलेल्या पर्वतरांगेतील समारिया आणि इम्ब्रोस घळी पाहण्याचा बेत होता. या घळी दक्षिणेकडे समुद्राच्या दिशेने उतरत जातात. क्रिटी बेटाच्या या भागात फिरायला सार्वजनिक वाहतूक चांगली नाही. स्वतःचं वाहन असल्यास बरं पडतं. मुक्कामासाठी आम्ही फ्रांगोकास्टेल्लो (Frangokastello) हे समुद्रतीरावरचं गाव निवडलं होतं.
समारिया घळ ही क्रिटीच्या डोंगरवाटांमध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे. १३ किलोमीटर लांबीचा समारियाचा ट्रेक साधारणतः मे ते ऑक्टोबर महिन्यांत पर्यटकांसाठी खुला असतो. बहुतेक पर्यटक उत्तर टोकाहून ट्रेक सुरू करून दक्षिण टोकाला पोहोचल्यावर तिथून ३ किमीवर समुद्रकिनारी असलेल्या अगिया रोमेली (Agia Roumeli) गावी येतात. तिथून फेरी बोटीने सोवगिया (Sougia) किंवा स्फाकिया (Hora Sfakion) ला (फेरी बोट, पोहणे किंवा चालणे हेच उपलब्ध पर्याय!) जाऊन पुढचा प्रवास करता येतो.
समारियाचं उत्तर टोक समुद्रसपाटीपासून सुमारे १२०० मीटर उंचीवर आहे. यातला बराच उतार ट्रेकच्या सुरुवातीला असल्याने हा ट्रेक तसा कठिण आहे. या तीव्र उतारानंतरचा घळीचा भाग अधिक सुंदर आहे. त्यामुळे दक्षिण टोकाकडून सुरुवात करून तुलनेने सोपा अर्धा ट्रेक करून परत येणे हा उपाय माझ्यासारख्या थोड्या आळश्यांसाठी आहेच. अर्थात यात अंतर खूप कमी होत नाही आणि दोनदा फेरी बोट घ्यावी लागते.
हिवाळ्यानंतर घळीतलं पाणी कमी झालं की वाटेची डागडुजी करतात. मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यापासून समारियाचा दक्षिणेचा भाग खुला होतो, असं जालावर वाचलं होतं. २०१७ ची तशी बातमीही वाचली होती. त्यात गेल्या हिवाळ्यात पाऊस जास्त पडला नसल्याने एप्रिल महिन्यात खालचा अर्धाअधिक भाग नक्की पाहता येईल असं वाटत होतं. ट्रेक नाही करता आला तर समुद्रमार्गे छान सहल झाली असतीच.
Heraklion या क्रिटीच्या मुख्य शहराहून १६ एप्रिलला निघालो आणि फ्रांगोकास्टेल्लोला येऊन पोहोचलो. समुद्रतीरी असलेल्या कॅसलमुळे गावाला हे नाव पडलं आहे. चौदाव्या शतकात वेनिशिअन्सनी बांधलेल्या या आयताकृती गढीच्या बाहेरच्या भिंती आणि चार कोपर्यांवरचे बुरुज तेवढे सुस्थितीत आहेत.
फ्रांगोकास्टेल्लो छोटंसं निवांत गाव आहे. मोठ्या रिसॉर्ट्ससारखी इथे पर्यटकांची गर्दी नाही. अर्थात काही न्याहारीनिवास आणि लहान हॉटेल्स सोडल्यास इथे फार सोयीही नाहीत. आजूबाजूच्या इतर गावांचीही हीच कथा आहे. क्रिटीच्या या भागात बरेच पर्यटक हानियाहून (Chania) एका दिवसाच्या सहलीसाठी येतात. अनेक टूर कंपन्यांच्या समारिया, इम्ब्रोससाठी तश्या सहली आहेत. आम्हाला दोन्ही ठिकाणी जायचं असल्याने तिकडे राहणं जास्त सोयीचं होतं.
आम्ही बुकिंग केलेल्या निवासात पोहोचलो तर तिथल्या मालकिणबाईंचं म्हणणं पडलं की आज काही कोणी नवीन गेस्ट येणार नाहियेत, तुमचं इथे बुकिंग नसेल!! त्यांच्याच नावाने आलेली इमेल बघायलाही तयार नव्हत्या. त्या आम्हाला कटवायलाच बघत होत्या. त्यांच्या हेकटपणामुळे डो़कं तापायला लागलं होतं. पण दुसरी सोय करणं ही सोपं नव्हतं. बाबापुता केल्यावर त्यांच्या रजिस्टरमधे बुकिंगची नोंद शोधायचं नाटक सुरू झालं. शेवटी समोर दिसणारं नाव त्यांना दाखवल्यावर सॉरी म्हणणं दूरच उपकार केल्यासारखी एकदाची किल्ली मिळाली. एवढी वाईट वागणूक ग्रीसमध्ये कधी मिळालेली नाही.
दोनतीन दिवसांच्या मुक्कामात मालकिणबाईंचा नूर बदलला नाही. पण ती कसर त्यांच्या मुलीने आणि वयस्कर यजमानांनी मात्र भरून काढली. त्या दोघांशी मस्त गप्पा झाल्या. मालकिणबाईंच्या यजमानांनी मर्चंट नेव्हीत खलाश्याचं काम केलं होतं. त्यामुळे इंग्रजी छान बोलता येत होतं. भारतातील मुंबई, विशाखापट्टण, कांडला अश्या अनेक बंदरांनाही त्यांनी भेटी दिलेल्या. ती नोकरी सोडल्यावर त्यांना प्रथमच भारतीयांशी बोलायला मिळत होतं, त्यामुळे ते भरभरून बोलत होते. सत्तरऐंशीच्या दशकांतले, जग जवळ येण्यापूर्वीचे त्यांचे अनुभव, आठवणी ऐकायला मिळणं ही पर्वणी होती. हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानातील त्यांचा रस पाहून त्याकाळी कुणीतरी भेट दिलेलं भगवद्गीतेच्या इंग्रजी भाषांतराचं पुस्तकही आम्हाला दाखवलं. मग भारत आणि ग्रीसचे प्राचीनत्व, संस्कृती ते राजकारण, आर्थिक स्थिती अश्या अनेक विषयांवर संध्याकाळी गप्पा रंगत.
समारियाला जाता येईल की नाही, ही शंकाही त्यांनी दूर केली. अर्धा भाग नक्कीच खुला आहे, असं त्यांनी सांगितलं.
समारियाला केलेला भोज्जा
१८ एप्रिलला संपूर्ण ग्रीसमध्ये फेरी बोटी चालवणार्यांचा संप होता. समारियासाठी फेरीने जायचं असल्याने १७ ला समारिया आणि १८ ला इम्ब्रोसला जाणं भाग होतं. एप्रिल महिन्यात दिवसाला दोनच फेरी असल्याने १७ तारखेला स्फाकियाहून सकाळी साडेदहाच्या पहिल्या फेरीने अगिया रोमेलीला जाऊन ट्रेक करून संध्याकाळी पाचच्या फेरीने परत यायचं होतं. सकाळची फेरी चुकू नये म्हणून जरा लवकरच न्याहारीला गेलो. पण ग्रीसमध्येही खूपदा सुशेगात कारभार असतो. त्यामुळे व्हायचा तो उशिर झालाच. गाडीने स्फाकियाला आलो तेव्हा फेरी सुटायला पाच मिनिटं होती. धावतपळत जाऊन तिकिट काढलं. समारिया स्पेशल नावाने परतीचं थोडं स्वस्त तिकिट होतं. ते काढताना समारियाला जाता येईल ना असं विचारल्यावर तिथल्या बाईंनी गावापर्यंत जाता येईल असं सांगितलं. पण नक्की कुठलं गाव ते त्या सांगेनात. मनात पाल चुकचुकली. कारण घळीत एक ओसाड पडलेलं समारिया नावाचंच गाव आहे. तिथपर्यंत की अगिया रोमेलीपर्यंत हे कळेना. मागे रांगेत आणखी लोक होते. त्यामुळे जास्त विचारताही आलं नाही.
अगिया रोमेली आणि वाटेतील लोट्रो या गावांसाठी फेरी हेच वाहतुकीचं साधन आहे. त्यामुळे पर्यटकांच्या बरोबरीने स्थानिक लोकही खूप होते. या गावांचं सगळं सामान (एक वॉशिंग मशिन आणि काही फर्निचर दिसलं), भाजीपाला वगैरे फेरीने आणला जातो. (कचर्याच्या विल्हेवाटीची सोय नसल्याने तोही लोट्रोत बोटीवर चढवला गेला.) एकदाचं सगळं सामान आणि गाड्या बोटीवर चढल्या आणि बोटीने धक्का सोडला.
पुढचा वेळ खारी हवा खात आणि किनारपट्टी बघत मजेत गेला. वाटेत लोट्रोला थांबा होता. इथे बरेच लोक उतरले. डोंगर आणि समुद्राच्या मधल्या टिचभर जागेत असलेलं हे गाव पर्यटकांत प्रसिद्ध व्हायला लागलं आहे. स्फाकिया, लोट्रो आणि रोमेलीला जोडणारी समुद्राच्या कडेने जाणारी वाट आहे. मी तेवढी जीवावर उदार झालेली नसल्याने तो ट्रेक करायची कल्पनाही मनात आली नाही.
अगिया रोमेली जवळ आलं आणि समारियाचे डोंगर दिसायला लागले. थोडं धुकं होतं, तरीही भव्यता नजरेत भरत होती. गावापासून घळीपर्यंत बरंच चालत जावं लागतं. बोटीतून उतरल्यावर कोणत्या दिशेने जायचं हे कुणी सांगायची गरज नव्हती. ट्रेक करायला़ आलेल्या इतर प्रवाश्यांप्रमाणे आम्हीही गावाकडे न जाता घळीच्या दिशेने चालायला सुरूवात केली.
बरोबर थोडा कोरडा खाऊ होता. पण आणखी काहीतरी खायला घ्यायचं होतं. वाटेतल्या एकमेव सुरू असलेल्या हॉटेलच्या उपहारगृहातही सँडविच वगैरे बरोबर नेण्यासारखं काही नव्हतं. जेवणात वेळ घालवायचा नव्हता. फार भूकही नव्हती. मग एका ऑम्लेटची ऑर्डर दिली. कुक कम मालकिणबाई किचनकडे वळल्या आणि मालकांशी बोलणं सुरू झालं. ट्रेक करून संध्याकाळच्या फेरीने परत जायचंय, म्हणून आम्ही घाईत आहोत कळल्यावर त्यांनी समारियाचा ट्रेक अजूनही बंद असल्याचं सांगितलं. ट्रेकसाठी येणारे लोक रोज निराश होऊन परत जात होते.
असं व्हायची शक्यता गृहित धरलीच होती. आता काय हातात बराच वेळ होता. हे हॉटेल थोडं उंचावर बांधलेले होतं, त्यात आम्ही पहिल्या मजल्यावर टेरेसवर बसलो होतो. त्यामुळे समोर थोडा दूर समुद्र आणि डावीकडे डोंगर आणि उंच कडे असं मस्त दृश्य दिसत होतं. तेवढ्यात आलेल्या ऑम्लेटची चव चाखली आणि आणखी एक ऑम्लेट आणि संत्र्याच्या रसाची ऑर्डर दिली. खाऊन झाल्यावर कॉफी पित निवांत गप्पा मारत बसलो. मालकही आले मग गप्पा मारायला. त्यांनी आधी सैन्यात आणि मग बोटीवर काम केलं होतं. त्यांनाही भारताबद्दल उत्सुकता होती. आम्हाला एवढं लांब आलोय तर किमान समारियाचं बंद गेट तरी बघायचं होतं. म्हणून शेवटी तिथून निघालो. मालकांनी परत जाताना त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला यायचं आग्रहाचं आमंत्रण दिलं. शिवाय बरोबर पिशवीत घालून चार संत्री दिली. का? तर आम्हाला यायला वेळ नाही मिळाला किंवा नेमके ते तेव्हा बाहेर गेले तर कॉफी प्यायची राहून जाईल. त्यांचा आग्रह मोडवेना. कॉफी प्यायला नक्की येऊ असं सांगून निघालो.
छोट्या का असे ना ट्रेकची सुरूवात झाली. व्यवस्थित दगडात बांधलेली वाट होती. दहाएक मिनिटांनी वाट नदीच्या कडेने जायला लागली. पाणी अगदी कमी होतं. पाण्यापलीकडचा ताशीव कडा मात्र अंगावर येत होता.
मधेच काही घरं लागली. कुंपणांच्या आड जुने ऑलिव्हचे वृक्ष होते. जागा मिळेल तिथे फुलं फुलली होती. आता हलका चढ सुरू झाला होता. थोडं पुढे एका चर्चचा बोर्ड दिसला. डोंगराच्या कपारीत लहानसं चर्च होतं. एवढी जागा असताना तिथे चर्च का बांधलं असेल कुणास ठावूक!
घळीची रुंदी कमी होऊ लागली आणि एकदाचं समारियाच्या बंद गेटपाशी येऊन पोहोचलो. माहितीचा बोर्ड लावला होता. आत तिकिट खिडकी दिसत होती. गेटबाहेर एक कॅफे आहे, तिथे साफसफाई सुरू होती. उगाच दमल्यासारखं करून जरा वेळ बसलो. थोडे फोटो काढले आणि तिथून निघालो.
रमतगमत ठरल्याप्रमाणे कॉफी प्यायला गेलो. गोडसर चवीचा पाव, आम्ही एराक्लिओनहून आणलेल्या कुकीज आणि कॉफी बरोबर पुन्हा गप्पा रंगल्या. क्रिटी बेटावर पर्यटनाला कशी सुरूवात झाली, वेगवेगळ्या देशांतील पर्यटकांच्या तर्हा, आमचे युरोपातील अनुभव, युरोपियन युनिअन, ग्रीसचं अर्थकारण असे एकेक विषय निघत होते. पाय निघत नव्हता, पण फेरीच्या वेळेआधी निघणं भाग होतं.
धक्क्यावर गर्दी बरीच होती. पाच वाजता एक बोट आली, ती अगदी लहान होती. बोटीपाशी गेल्यावर कळलं ती आमची बोट नव्हती. धक्क्यावर लाटांचं पाणी उसळत होतं. लाटांचा अंदाज घेऊन आम्ही दोघं आणि आणखी दोनतीन जण परत जात असताना नेमकी पोटातली लाट आली आणि भिजवून गेली. बेटावर येऊनही समुद्रस्नान व्हायचं होतं ते झालं एकदाचं. बुटात पाणी भरलं होतं. ते काढून वाळत ठेवले. बोटीचा पत्ता नव्हता, बोटीशिवाय तिथून निघायचा दुसरा मार्ग नव्हता. बायको आहे लक्ष द्यायला म्हटल्यावर नवर्याने मस्त झोप काढली. दीस तास उशिराने बोट आली. तोपर्यंत आधी वाट पाहणं, मग त्रागा, फेरी कंपनीवरचा (आणि नवर्याला झोप कशी लागते याचा) राग, थोडीशी काळजी, मग आपल्या हातात (नवर्याची झोपमोड करण्याशिवाय) काहीच नाही हा हताशपणा अशी स्टेशनं घेत मन जगन्मिथ्या पर्यंत पोहोचलं होतं :)
परतीच्या प्रवासात सकाळी धुक्यात दडलेले डोंगर बघण्यात वेळ गेला. क्वचित कुठे एखादी पुळण दिसत होती, मोठे बीच नव्हतेच. स्फाकियाला उतरून गाडीने कास्टेल्लोला आलो.
एक लांबलचक दिवस संपला. त्याआधी रूममधून हॉटेलच्या पाळलेल्या कुत्र्याने कपडे पळविण्याचं उपनाट्यही घडलं. ट्रेक करता आला नाही तरी या आठवणींमुळे समारिया लक्षात राहील.
http://misalpav.com/node/43292
ग्रीसच्या क्रिटी बेटावरील इम्ब्रोस घळ (Imbros Gorge, Crete)
गेल्या भागात लिहिल्याप्रमाणे समारियाचा ट्रेक करणं शक्य झालं नव्हतं. परंतु वर्षभर खुली असणारी इम्ब्रोसची घळ बघता येणार होती. हिवाळ्यात तर समारिया बंद असतेच, शिवाय इतर वेळीही पाऊस पडल्यास किंवा उष्मा वाढल्यास समारिया बंद ठेवतात. अश्या वेळी टूर कंपन्या समारियाऐवजी इम्ब्रोसला घेऊन जातात. इम्ब्रोसचा ट्रेक समारियापेक्षा छोटा व सोपा आहे. घळीत पाणी क्वचितच असतं. इम्ब्रोसला जाण्यासाठी रस्ता आहे, फेरीची गरज नाही. अश्या अनेक कारणांमुळे क्रिटी बेटावर समारियाखालोखाल लोक इम्ब्रोसचा ट्रेक करतात.
पण याचा अर्थ असा नाही की दुधाची तहान ताकाने भागवायची म्हणून इम्ब्रोसला जायचं! इम्ब्रोसची घळही अतीव सुंदर आहे. त्यात वसंत ऋतूत तर रानफुलांचाही साज बघायला मिळतो.
फ्रांगोकास्टेल्लोहून स्फाकियाला जाताना थोडं अलीकडे कोमिताडेस (Komitades) गावापाशी इम्ब्रोसचं पार्किंग (नकाशातील IMBROS Tawerna) आहे. आदल्या दिवशी स्फाकियाहून परत येताना ही जागा बघून ठेवली होती. तिथून जवळच घळीचं खालचं दक्षिण टोक आहे आणि रस्त्याने गेल्यास १३ किलोमीटर अंतरावर उत्तर टोक आहे. दोन्ही दिशांनी ट्रेक करायचा नसेल तर या १३ किलोमीटरच्या रस्त्यावर खाजगी टॅक्सी आहेत. खरंतर हे पिकअप ट्रक असतात. पुढे बसायला मिळालं तर ठिक, नाही तर मागे मोकळ्या जागेत हवा भरलेल्या गादीवर बसावं लागतं. अर्थात खूप जणांना असा प्रवास आवडतही असेल!
१८ एप्रिलला सकाळी आरामात खाऊनपिऊन नवरा आणि मी निघालो. फेरीच्या वेळेचं वगैरे बंधन नव्हतं. इम्ब्रोसच्या पार्किंगमध्ये गाडी लावली. तिथून टॅक्सीने वर जायचं आणि घळ उतरून परत यायचं असं आम्ही ठरवलं होतं. टावेर्नापाशी टॅक्सीचा बोर्ड होता, आत जाऊन चौकशी केली. आणखी दोन मुलं तिथे कॉफी पित होती. त्यांचं आवरलं की एकत्र जाता येणार होतं. एकूण चारच जण असल्यामुळे सगळ्यांना बसायला जागा मिळाली. पंधरावीस मिनिटांत निघालो. ड्रायवर म्हणजे एक नमुनेदार व्यक्तिमत्त्व होतं! साठच्या आसपास वय असेल. त्या घाटरस्त्याचं हरेक वळण अंगात भिनलेलं असणार. एक हात खिडकीवर आणि दुसरा हात स्टिअरिंगवर ठेवून रस्त्याच्या मधोमध घाटात सुसाट गाडी चालवली. जोडीला मोठ्याने, पण सुरात कोणतंतरी ग्रीक लोकगीत म्हणणं चाललं होतं. समोरून घाट उतरणार्या गाड्या येत नसत्या तर गाण्याचा आनंद घेता आला असता!
हवा स्वच्छ असती तर वळणावळणाचा रस्ता आणि घाटाच्या तळाशी समुद्र असं मस्त दृश्य दिसलं असतं. एकदाचा चढ संपला. घळीच्या उत्तर टोकापाशी उतरलो. इथे थोडं पुढे इम्ब्रोस गाव आहे. याच नावाचं एक गाव तुर्कस्तानात आहे म्हणे. कोणे एकेकाळी दोन भावांना तिथून हाकलून दिल्यावर ते इथे डोंगरात येऊन राहिले आणि पुढे त्या जागेला आणि घळीला इम्ब्रोस नाव पडलं.
टॅक्सीला निरोप दिला. बरोबर आलेली मुलं तिथेच सावलीत बसली. आम्ही उजवीकडच्या पाऊलवाटेने चालायला सुरूवात केली.
लगेचच तिकिटखिडकी लागली. उन्हाळ्यात अडिच युरोचं तिकिट आहे. पण आम्ही गेलो तेव्हा खिडकी बंद होती. तिथे ग्रीक, इंग्रजी आणि चक्क जर्मन भाषेत बोर्ड लावला होता. बोर्डावर लिहिल्याप्रमाणे एकूण ८ किमी चालायचं होतं. त्यात चढ जवळजवळ नव्हताच, एकूण ६०० मीटर उतरण होती. दगडधोड्यांमधून वाट काढलेली असली तरी हा ट्रेक कठिण नाही. कुठे झाडांची सावली तर कुठे कडेकपारींनी अडवलेलं ऊन यामुळे भरदुपारीही उन्हाचा त्रास होत नाही. बरोबर पुरेसं पाणी आणि खाऊ मात्र हवा.
सुरुवातीला अंतर राखून असलेले डोंगर जवळ येऊ लागले तशी वाट अरुंद होऊ लागली. उंच कड्यांच्या मधून गेलेल्या अश्या चिंचोळ्या वाटेसाठी इम्ब्रोस प्रसिद्ध आहे. अचानक कुठे मोकळी जागा आणि उतारावर scree लागत होती.
वाटेत हे झाड आडवं आलं. ते प्रेमाचा भार सहन न होऊन उन्मळून पडलं की प्रेमवीरांनी त्याला आधार दिला, कुणास ठाऊक!
आता घळीचा सगळ्यात अरुंद भाग लागला. इथे कड्यांमधलं अंतर दिड ते दोन मीटर आहे. इथे उनसावल्यांचा खेळ बघत थांबावसं वाटत होतं. पण इतरांची वाट अडवणं योग्य नव्हतं.
अर्धा ट्रेक झाला असावा. इथे घळ बरीच रुंद होती. डोंगराच्या बाजूला दगडात एक झोपडी बांधलेली होती. तिथे बहुतेक तिकिट तपासनीस असतो. समोर मोकळ्या जागेत हिरवेगार गालिचे पसरलेले होते. इथे थोडा वेळ विश्रांती घेतली.
आम्ही स्वान्तसुखाय हा ट्रेक करत होतो. पण एकेकाळी दळणवळणाचा हाच मार्ग होता. आम्ही कोमिताडेसहून ज्या रस्त्याने आलो तो रस्ता बांधून होण्यापूर्वी उत्तरेच्या हानिया (Chania) वगैरे ठिकाणांहून स्फाकियाला येण्याजाण्यासाठी इम्ब्रोस घळ पार करावी लागे. त्यामुळे या घळीला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
दुसर्या महायुद्धात जर्मनीने क्रिटी बेटावर केलेला हल्ला परतवण्यात दोस्त राष्ट्रांना अपयश आले. माघार घेतलेल्या दोस्तांच्या हजारो सैनिकांना बोटींनी इजिप्तला हलविण्यात आले. उत्तरेला अडकलेल्या सुमारे वीस हजार सैनिकांना चालत स्फाकियाच्या बंदरापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. त्यासाठी एकमेव मार्ग होता इम्ब्रोसचा. मागावर जर्मन सेना होतीच. अनेक सैनिक मृत्युमुखी पडले, कोणी पकडले गेले, तर कोणी डोंगरदर्यांचा आश्रय घेतला. त्या सैनिकांचा विचार मनात आला की खिन्नता येते. वीस हजारातील सुमारे तेरा हजार सैनिक स्फाकियाला पोहोचले आणि तिथून इजिप्तला जाऊ शकले. यातले बरेच ANZAC म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सैनिक होते. क्रिटी बेटाला भेट देणार्या अनेक लोकांसाठी इम्ब्रोसला येण्यामागे ही ऐतिहासिक पार्श्वभूमीही असते.
याच बेटावरील साध्यासुध्या लोकांनी पुढच्या काळात केलेला जर्मन सेनेचा प्रतिकारही अतुलनीय होता.
आता आजूबाजूचे डोंगर पुन्हा दिसू लागले होते. काही ठिकाणी डोंगरांमध्ये नैसर्गिक amphitheater असावं तशी मोकळी जागा होती. दगडांचे प्रकार, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे झालेली झीज दिसत होती. एक बोकड कुटुंबही भेटलं वाटेत.
वरच्या फोटोतलं झाड बघितलं कसं गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या करतंय. कुठे खडकात मूळं रोवून उभी झाडं, कुठे अंगावर येणारा उतार आणि कधीही कोसळतील असे पत्थर! घळीचं सुरुवातीचं रूप आणि हे रूप यांत किती फरक होता!
ही दगडातली कमान आली म्हणजे बराचसा ट्रेक झाला होता. कमानीच्या डावीकडून वाट जाते. चार पावलं पुढे गेल्यावर वळून पाहिलं तर टेकडीच्या विशिष्ट कोनामुळे कमान दिसेनाशी झाली होती.
आजूबाजूच्या कड्यांची उंची कमी होऊ लागली होती. आणखी थोडंसं चालल्यावर अचानक घळ संपून बाजूने झीज झालेला डोंगरउतार आणि समोर दगडधोंड्यांचं मोकळं मैदान उरलं होतं.
ट्रेकनंतर परतीचा प्रवास नेहमीच जीवावर येतो. गाडीचं पार्किंग गाठलं पण निघायची इच्छा होत नव्हती. तिथल्या कॅफेत थोडा वेळ बसलो. चविष्ट स्फाकियन पाय (स्थानिक चीज भरलेली पोळी, खाताना वरून मध घालतात) खाल्ला आणि फ्रांगोकास्टेल्लोला परतलो.
क्रिटी बेटावर भटकून बरेच दिवस झाले. पण तिथल्या डोंगरदर्या मात्र आजही साद घालत असतात...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.