Monday, November 16, 2020

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल

 

बर्‍याच वर्षांपासून वॉशिंग्टन डिसीला जाऊन तिथल्या चेरी ब्लॉसमचा बहर पाहावा हे मानात होते. त्या निमित्ताने अमेरिकेच्या राजधानीतील इतरही ठिकाणे पाहता येतील हा उद्देश त्यामागे होता. हो नाही करत या वर्षी चेरी ब्लॉसम महोत्सव पाहायला जायचे असे ठरले. म्हणून मग चेरी ब्लॉसमच्या पूर्ण बहराच्या तारखांच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून होतो. त्या तारखा मागे पुढे होत होत शेवटी त्या तारखा पहिला आडाखा जाहीर झाला. मागे पुढे न पाहता मग लगेच विमानाच्या आरक्षणाच्या मागे लागलो. मिनेसोटाहून थेट डिसीजवळच्या विमानतळांचे (डलेस व रिगन) रीटर्न तिकीट चांगलेच महाग पडत होते. म्हणून मग डिसीला थेट न जाता आधी शेजारच्या बाल्टीमोर येथे थांबायचे ठरले. त्याप्रमाणे मिनेसोटा ते बाल्टीमोर आणि परतीचे रिगन विमानतळ ते मिनेसोटा असे विमानाचे आरक्षण केले.

बाल्टिमोरला रात्री उशीरा पोहोचणार म्हणून विमानतळाजवळचे हॉटेल बुक केले. तसेच डिसी डाउनटाउन पासून सुमारे १० मैलांवर व्हर्जिनीया राज्यातील हॉटेल बुक केले. डिसी मेट्रो एरिया तेथील मेट्रो ट्रेन आणि बसने अतिशय उत्तमरीत्या गुंफला आहे. मेट्रो ट्रेन व बसला एकच पास चालतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार व उपलब्धतेनुसार बस व ट्रेन या दोन्ही गोष्टी वापरू शकता. हा पास तेथील कुठल्याही मेट्रो स्टेशनवर काढता येतो. तसेच हे कार्ड रिचार्ज करण्याची प्रक्रिया ही सोपी व सुटसुटीत आहे. मेट्रोसाठी वीकडेज मध्ये सकाळच्या ९ वाजेपर्यंत खूप गर्दीची वेळ असल्यामुळे त्यावेळी प्रवासाचे दर चढे आहेत. तसेच ९ नंतर हेच दर कमी आहेत. दुपारी ३ ते संध्याकाळी सात पर्यंत दर पुन्हा चढे आहेत तर त्यानंतर दर कमी होतात. विकेंडला हे दर दिवसभर कमी आहेत. फक्त विकेंडला मेट्रोच्या धावण्याच्या वारंवारतेत किंचित कमी आहे. मेट्रो आणि बसच्या अधिक माहितीसाठी ही वेबसाइट पहा. वीकडेजमध्ये मेट्रो स्टेशनवर गाडी पार्क करण्याचे दर रास्त आहेत तसेच विकेंडला गाडी पार्क करण्याची सुविधा निशुल्क असते.

डीसी आणि बाल्टिमोर मध्ये कुठे काय पाहायचे याची यादी झाली. एवढी तयारी केली तरी सगळे मनाप्रमाणे झाले तर काय मज्जा. मात्र कुठे तरी माशी शिंकली. आम्ही डीसी ला पोचण्याच्या दोन दिवस आधी पूर्वकडील राजांमध्ये हिमवादळ धडकणार होते. त्याच बरोबर गोठवणारे तापमान परतत होते. यामुळे चेरीच्या कळ्यांचे चांगलेच नुकसान होणार होते. आता चेरी ब्लॉसम पाहायला मिळणार की नाही याविषयी अनिश्चितता निर्माण झाली :-(. आता विमानाच्या तिकिटांच्या तारखा बदलणे परवडणारे नव्हते म्हणून मग आधी ठरलेल्या तारखांनाच जायचे ठरले.

प्रवासाला निघायचा दिवस उजाडला. विमान संध्याकाळचे होते. टाइमझोनमधल्या एक तासाच्या फरकामुळे आम्ही बाल्टीमोरला रात्री अकरा वाजता पोचणार होतो. विमानतळावरील सर्व सोपस्कार आटपून आम्ही विमानात आमच्या जागांवर स्थिरावलो. विमानही वेळेत सुटले. आमच्या लेकीने बराच वेळ विमानात गोंधळ घातला. लँडिंगच्या थोड्या वेळापूर्वी बाल्टिमोर आणि आजूबाजूचा परिसरातले असंख्य दिवे लुकलुकताना दिसले. रात्रीच्या वेळी खाडी व त्याभवतीचा शेकडो दिव्यांनी उजळलेला परिसर नयनरम्य वाटत होता. बाल्टीमोरला हॉटेलवर पोहचायला मध्यरात्र उलटून गेल्यामुळे लगेच गुडुप झालो.

दुसर्‍या दिवशी विमानतळावरून रेंटल कार घेतली आणि बाल्टीमोरची ओझरती झलक पाहायला निघालो. बाल्टीमोर हार्बर आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहायचे ठरवले. आधी वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने गेलो. हे ठिकाण माऊंट व्हर्नॉन प्लेस या भव्य चौकात उभारलेले आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सन्मानार्थ हे सर्वात पहिले मॉन्युमेंट बांधले गेले आहे. बाल्टीमोर आणि वॉशिंग्टन डीसीस्थित वॉशिंग्टन मॉन्युमेंटचा आर्किटेक्ट रॉबर्ट मिल्स हा आहे. बाल्टीमोरस्थित वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या बांधकामाला १८१५ साली सुरुवात होवून १८२९ साली पूर्ण झाले. या मॉन्युमेंटच्या बांधणी विषयी काही रंजक माहिती - १८१३ साली आर्किटेक्ट असलेल्या उमेदवारांसाठी खास स्पर्धा आयोजित केली गेली. या स्पर्धेत मॉन्युमेंटचे डिझाइन बनवायचे होते व त्यानुसार होणाऱ्या बांधकामाचा खर्च कमाल १ लक्ष डॉलर्स इतका असेल ही अट होती. स्पर्धेच्या विजेत्यास $५०० बक्षीस मिळणार होते. यात मिल्स विषयी ठरला. मिल्स हा पहिला नेटिव्ह अमेरिकन होता ज्याला आर्किटेक्टचे प्रक्षिक्षण प्राप्त होते. हा स्तंभ सुमारे १७८ फूट उंच आहे व त्यावर जॉर्ज वॉशिंग्टन यांचा पुतळा आहे. आतूनही हा स्तंभ पाहता येतो मात्र आम्ही गेलो त्यावेळी ते प्रवेशासाठी बंद होते. म्हणून मग बाहेरुन भरपूर फोटो काढून बाह्य निरीक्षण करण्यात समाधान मानले.

माउंट व्हॅर्नॉन प्लेस व वॉशिंग्टन मोन्युमेंटचा हा फोटो जालावरुन साभार...

या चौकाच्या चारी बाजूंना छोटेखानी बागा आहेत व त्यात काही पुतळे तसेच कारंजी आहेत. आम्ही गेलो तेव्हा हिवाळा असल्याने सर्व कारंजी बंद होती तसेच हिरवळही नव्हती.















मोन्युमेंटशेजारीच चौकाच्या एका कोपर्‍यात युनायटेड मेथडिस्ट चर्च आहे









एकोणिसाव्या शतकातले एक दानशूर व्यक्ती जॉर्ज पिबॉडी यांचा पुतळा. शेजारीच पिबॉडी इन्स्टिट्युट आहे.



या भागात विटांचे बांधकाम असणार्‍या बर्‍याच इमारती आहेत.

पुढे बाल्टिमोरच्या इनर हार्बरच्या दिशेने निघालो. इथे अनेक आकर्षणे आहेत. जसे की द नॅशनल अ‍ॅक्वॅरियम, मेरीलॅण्ड सायन्स सेंटर, चिल्ड्रन्स म्युझियम, क्रूझ इत्यादी. इथे उपलब्ध असलेले पब्लिक पार्किंगचे पर्याय चांगलेच महाग आहेत.








US Coast Guard Cutter TANEY दुसर्‍या महायुद्धातील पर्ल हार्बरच्या जपानी हल्ल्याची साक्षीदार असणारी अन अजूनही पाण्यावर असणारी एकमेव नौका. ही नौका ५१ वर्षांच्या सेवेनंतर १९८६ साली निवृत्त झाली.


अमेरिकेतल्या प्रसिद्ध बार्न्स अ‍ॅन्ड नोबल या पुस्तकांच्या दुकानांच्या साखळीतले एक दुकान.











अतिशय गार वारे अन वेळेअभावी आम्ही इथे बाहेरच थोडीफार भटकंती केली आणि डीसी जवळच्या व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथील आमच्या हॉटेलकडे प्रयाण केले. 

क्रमशः

जसजसे डीसी जवळ आले तसे लांबून युएस कॅपिटॉल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसू लागले. असो आम्ही व्हर्जिनिया राज्यात शिरून आमच्या हॉटेलला पोहोचलो. दुसर्‍या दिवशी पासून डी सी भटकंतीला सुरुवात करायची होती. मनात थोडी धाकधूक होती ती म्हणजे इतक्या लांबून येऊन चेरी ब्लॉसम पाहायला मिळतील काय? की आणखीन काही वेगळे अनपेक्षित पाहता येईल. 

 

सकाळी लवकर उठून डीसी भटकंतीला सुरुवात केली. डीसीतील मंद गतीने चालणार्‍या ट्रॅफिक मध्ये गाड्यांवरील नंबर प्लेटकडे लक्ष गेले. दिसायला अतिशय साध्या असलेल्या या नंबर प्लेटवर लिहिलेल्या एका घोषवाक्याने चांगलेच लक्ष वेधले. त्यावर लिहिले होते "TAXATION WITHOUT REPRESENTATION". या घोष वाक्या मागील इतिहासा विषयी थोडे खोदकाम करायचे ठरवले. याचे मूळ घोषवाक्य आहे "No taxation without representation". सन १७५० ते सन १७६० च्या दशकात या घोषवाक्याचा उगम झाला. त्या काळी अमेरिकेत ब्रिटिशांच्या १३ वसाहती होत्या. ब्रिटिश संसदेत त्यावेळी या वसाहतींचे थेट प्रतिनिधित्व कुणी करत नव्हते. त्यामुळे ब्रिटिशांनी पास केलेला कोणताही कायदा या मूळ वसाहतींना मान्य नव्हता. कारण हे कायदे त्यांच्या मते राईट्स ऑफ इंग्लिशमेन या हक्कांची पायमल्ली करणारे होते. थोडक्यात काय की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अमेरिकेतल्या वसाहतींना थेट प्रतिनिधित्व असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा कर भरायला वसाहतींतील नागरिकांचा विरोध होता. या प्रकारे प्रत्येक राजांशी निगडित नंबरप्लेट वरील वाक्यांमागील पार्श्वभूमी जाणून घेणे खरंतर एक वेगळा विषय आहे.


no tax
हा फोटो जालावरून साभार.


युएस कॅपिटॉलची बाहेरुन भटकंती केली. कॅपिटॉलच्या मागील बाजूच्या तळे आणि पुतळ्यांचे बरेच फोटो काढले.



तोवर जेवायची वेळ झाली म्हणून मग आधी पोटपूजा केली. बसने परत कॅपिटॉल जवळच्या रस्त्यावर उतरलो. काही मॉन्युमेंट्स पाहावेत म्हणून मग वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत निघालो. आम्ही ज्या भागातून फिरत होतो तो फेडरल ट्रँगल म्हणून ओळखला जातो. या त्रिकोणी भागाच्या एका बाजूला युस कॅपिटॉल आहे तर त्या विरुद्धच्या बाजूला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान 'व्हाईट हाउस' आहे. फेडरल ट्रँगल मध्ये फेडरल प्रशासनाच्या तसेच वॉशिंग्टन डीसी शहराच्या विविध कार्यालयांच्या इमारती आहेत. या सर्वच इमारती स्थापत्यसौंदर्याच्या बाबतीत एकाहून एक वाटतात.




चालता चालता अनपेक्षितपणे ट्रंप इंटरनॅशनल हॉटेलच्या भव्य इमारतीसमोर येऊन थांबलो. हे हॉटेल पेनस्लिवेनिया ऍव्हेन्यु वर स्थित आहे. या हॉटेलचे गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर डॉनल्ड ट्रंप यांच्या हस्ते थाटात उद्घाटन सोहळा पार पडला होता. इमारत पाहून असे वाटले की ही वास्तू किमान १०० वर्षांपूर्वीची असावी. म्हणून मग इमारतीचे बरेच फोटो काढले. ही बहुमजली अशी इमारत बाहेरून बघायला अतिशय आखीवरेखीव वाटते.

2

3

4

5

6


इमारतीचे समोरून, आजूबाजूने असे बरेच निरीक्षण केले. त्यावरच समाधान मानले आणि हॉटेलच्या बाजूने पुढे चालू लागलो. तेवढ्यात तेथील सुरक्षा कर्मचार्‍याने आम्हाला पाहिले आणि म्हणाला की हॉटेलच्या मागील बाजूने वर जाऊन क्लॉक टॉवर आवर्जून पहा. झाले आम्ही लगेच हॉटेलच्या मागे असलेल्या लिफ्टकडे निघालो. हा क्लॉक टॉवर पाहायला. क्लॉक टॉवर हा हॉटेलच्या इमारतीचा एक भाग आहे. खरंतर हे हॉटेल म्हणजे "ओल्ड पोस्ट ऑफिसची" ची इमारत आहे. डॉनल्ड ट्रंप यांच्या कंपनीने या इमारतीचे रूपांतर एका आलिशान हॉटेल मध्ये केले आहे.


7

सन १८९२ साली बांधकामाला सुरुवात झाली आणि सन १८९९ साली ओल्ड पोस्ट ऑफिस' आणि क्लॉक टॉवर यांचे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीला 'ओल्ड पोस्ट ऑफिस पॅव्हिलियन' असेही संबोधले जाते. यात क्लॉक टॉवरची उंची ३९५ फूट एवढी आहे. ही इमारत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवरच्या ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. डी सी शहरातील ही पहिलीच अशी इमारत बांधली गेली ज्यामध्ये स्टीलच्या फ्रेमचा उपयोग करण्यात आला होता. तसेच इमारतीच्या डिझाइन मध्ये इल्केट्रिकल वायरिंग अंतर्भूत असणारीही ही या शहरातली पहिलीच इमारत होती. क्लॉक टॉवर मधील घड्याळ सुरुवातीला यांत्रिक स्वरूपाचे होते. नंतर मात्र ते बदलून विजेवर चालणारे करण्यात आले. सन १९१४ पर्यंत या इमारतीने वॉशिंग्टन डी सीचे मुख्य पोस्ट ऑफिस म्हणून भूमिका बजावली.

या इमारतीच्या उद्घाघाटनानंतर एक वर्षात डी सी शहराचे पोस्टमास्तर जेम्स विलेट यांचा इमारतीतील लिफ्टच्या पोकळीत पडून अपघाती मृत्यू झाला. तसेच या इमारतीच्या शेजारी असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ओल्ड पोस्ट ऑफिस जमीनदोस्त करावे असे त्या काळी काँग्रसचे मत होते. मात्र त्यावेळी इमारत पाडली गेली नाही. पुन्हा एकवार १९३८ साली ही इमारत पाडावी असे काही काँग्रेसच्या सदस्यांचे मत होते. मात्र तेही बारगळले गेले. स्थानिक लोकमतही सुस्थितीत असणाऱ्या ३५ वर्षा जुनी इमारत पाडण्याच्या विरोधात होती. असो ही इमारत आजही अतिशय सुस्थितीत आहे यातच सारे काही आले :-) .

२००१ सालापासून या इमारतीचे रूपांतर एका हॉटेल मध्ये व्हावे यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. अखेर सन २०१२ साली ट्रंपच्या कंपनीने या इमारतीचे लीज मिळवण्यासाठी वाटाघाटींना सुरुवात केली. यात त्यांनी जवळजवळ २०० मिलियन डॉलर्स इतका खर्च करण्याची तयारी दाखवली. यावेळी डीसीतील सामान्य जनतेला वाटले की क्लॉक टॉवर पर्यटकांसाठी बंद केला जाईल. मात्र तसे काही झाले कारण की नॅशनल पार्क सर्व्हिसकडे हा भागाचे हक्क आहेत आणि पर्यटकांसाठी हा क्लॉक टॉवर आजही खुला आहे. एवढेच नव्हे तर क्लॉक टॉवर पाहायला कोणतेही प्रवेशशुल्क नाही. सन २०१३ साली वाटाघाटी पूर्ण झाल्या. ट्रंपच्या कंपनीला ६० वर्षांचे लीज दिले गेले. ज्यात ते सुमारे २,५०,००० डॉलर्स इतके मासिक भाडे भरते. आता या आलिशान हॉटेलमध्ये सर्व सुखसोयींनी युक्त अशा २६० खोल्या आहेत.


१९११ सालचा हा फोटो विकीवरून साभार.

9
फेडरल ट्रायंगलचा एक भाग असलेली इमारत.

इमारतीच्या मागील बाजूने आत प्रवेश केल्यावर एक छोटेखानी म्युझियम आहे.त्यात जुन्या काळातील ओल्ड पोस्ट ऑफ़िस आणि क्लॉक टॉवरची अनेक छायाचित्रे आहेत. ते म्युझियम पाहून आम्ही क्लॉक टॉवरला जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने निघालो. या लिफ्टने थेट ९व्या मजल्यावर पोचवले जाते. या लिफ्ट मधून वर जाताना खाली ट्रंप हॉटेलच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रेस्टॉरंटचे विलोभनीय दृश्य दिसत राहते. तिथून पुढे आणखी एक लिफ्ट आहे त्यातून ११व्या मजल्यावर पोचावे लागते. शेवटी तिसर्‍या लिफ्टने आणखी १ मजला वर जाऊन आपण क्लॉक टॉवरच्या ऑब्झरवेटरी डेकला पोचतो. इथे मध्यभागी ते भव्य घड्याळ आणि ते चालवणारी अजस्त्र वाटणारी यंत्रणा दिसते. तसेच या उंचीववरून डी सी शहराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. ते दृश्य नजरेत साठवून आणि बरेच फोटो काढून आम्ही पुन्हा खाली आलो.

म्युझियम मधील काही फोटो.


Peter Charles L'Enfant - यांनी सन १७९१ साली डी सी शहराचा मूळ आराखडा तयार केला होता. पेशाने तो मिलिटरीत काम करणारा इंजिनियर होता. याच्या नावाने डी सी शहरात एक मोठे स्टेशन आहे.


युएस कॅपिटॉलच्या डोमचे काम चालु असताना (साल १८६२) .

पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यु

ट्रंप हॉटेल मधील काही दृश्य.










१९१४ सालचा हा फोटो विकीवरुन साभार
















त्या दिवशी ठरवले होते की कॅपिटॉल बाहेरुन पाहून झाल्यावर काही मॉन्युमेंट्स पाहायचे. पण अनपेक्षितपणे ओल्ड पोस्ट ऑफिस आणि क्लॉक टॉवरची इमारत पाहायला मिळाली. ऐतिहासिक असा हा ठेवा अतिशय उत्तम प्रकारे आजही जतन करून ठेवला आहे याचे समाधान वाटले.

 क्रमशः

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. L'Enfant च्या उल्लेखावरून १९८९ मध्ये डिसी भेटीच्या वेळी L'Enfant Plaza Hotel मध्ये राहिलो होतो त्याची आठवण झाली. आता गुगलवर पाहिले तर ते २०१३ मध्ये बंद झालेले दिसले. :( भर चौकात असलेल्या त्या हॉटेलच्या चार मजले खाली सबवे स्टेशन होते. ते हॉटेल स्वतःची जाहिरात, "द सेकंड बेस्ट अ‍ॅड्रेस इन डिसी" अशी स्वतःची जाहिरात करत असे ! कारण, अर्थातच, "द बेस्ट अ‍ॅड्रेस इन डिसी" म्हणजे खुद्द व्हाईट हाऊस ! :) हॉटेलची मोक्याची जागा व आम्हाला मिळालेल्या खोलीची जागा यामुळे खोलीच्या गॅलरीतून "लिंकन मेमोरियल-वॉशिंग्टन मॉन्युमेंट-स्मिथसोनियनचा अवाढव्य पसारा-कॅपिटॉल" हा डिसीची बहुतेक महत्वाची आकर्षणे असणारा पट्टा समोरच नजरेत येत होता. ती सगळी आकर्षणे हॉटेलपासून पायी चालत जाऊन मनसोक्त पाहिली होती !

आता नक्की पत्ता आठवत नाही पण तिथल्या जवळच्याच एका सरकारी इमारतसंकुलातील भारतिय रेस्तराँमध्ये दुपारचे जेवण घेतेले होते. डिसीमध्ये चक्क २०-२५ चटकदार शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचा मोठा बुफे आणि त्यासोबत पापड, लोणची, चटण्या असा भारी बेत पाहून आश्चर्याने गारेगार झालो होतो ! शुक्रवार दुपार असल्याने एक शँपेनचा ग्लास 'ऑन द हाऊस' होता :) आतापर्यंत मी भारताबाहेर घेतलेल्या भारतिय जेवणांच्या चविष्टपणात या जेवणाचा दुसरा क्रमांक लागतो ! विशेष म्हणजे तीन लोक (आम्ही नवरा-बायको आणि एक जपानी गृहस्थ) सोडून रेस्तराँमधली सगळी गर्दी (बहुतेक तिथल्या ऑफिसेसमध्ये काम करणार्‍या) गोर्‍या अमेरिकनांचीच होती ! या सगळ्या विशेषांमुळे तो प्रसंग अजूनही आठवणींत ताजा राहीला आहे !

 

आम्हीही या सहलीचे नियोजन करताना कॅपिटॉल हिल्स किंवा व्हाईट हाऊसजवळच्या अपस्केल भारतीय रेस्तराँमध्ये जेवायचा बेत आखला होता. परंतु अशा दोन रेस्तराँमध्ये आगाऊ बुकिंग आवश्यक होते. तिथे प्रत्यक्ष भटकताना वेळेचे गणित न जमल्याने ते राहून गेले. प्रेसिडेंट ओबामांनी त्यांच्या पत्नीबरोबर एका लग्नाच्या वाढदिवसाला तिथल्या भारतीय रेस्तराँमध्ये डिनर केल्याची बातमी वाचली होती. त्याच बातमीत प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या कार्यकाळात त्याच रेस्तराँमधून व्हाईट हाउसमध्ये नियमितपणे जेवण मागवले जात असे अन चेल्सी क्लिंटन तर ते जेवण खाऊनच मोठी झाली आहे असाही उल्लेख होता :-) .

या सहलीदरम्यान आम्ही अलेक्झांड्रिया व्हर्जिनिया इथल्या डिशेस ऑफ इंडिया या भारतीय रेस्तराँमधल्या जेवणाचा आस्वाद घेतला. अमेरिकेतल्या टिपीकल भारतीय रेस्तराँपेक्षा ते वेगळे वाटले. तिथे आम्ही पालक चाट हा रुचकर पदार्थ प्रथमच खाल्ला.

ओल्ड पोस्ट ऑफिस पाहून झाल्यावर वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेनं चालू लागलो. खरेतर युनियन मेट्रो स्टेशनच्या समोरून सुटणार्‍या बसेस नॅशनल मॉलचा भाग फिरवून आणतात. इथेच सर्व मॉन्युमेंट्स आहेत. तसेच हॉप ऑन हॉप ऑफ टूर्सचा लाभ घेतला जाऊ शकतो. आम्ही मात्र ऐनवेळेवर काहीतरी घोळ घालून या सुविधा वापरल्या नाही आणि खूप पायपीट केली :-( . तर मग रमत गमत डी सीतील थोडी बोचरी गार हवा झेलत वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने चालत राहिलो. रस्त्यात नॅशनल म्युझियम ऑफ आफ्रिकन अमेरिकन हिस्टरी अ‍ॅन्ड कल्चर लागले. या इमारतीचे उद्घाटन गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते झाले होते.

या नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वाटणाऱ्या इमारतीचे बाहेरून निरिक्षण करून आम्ही शेजारीच असणाऱ्या वॉशिंग्टन मॉन्युमेंटला पोचलो. आता वातावरण एकदम झाकाळून आले होते.


वॉशिंग्टन मॉन्युमेंटचे निरीक्षण चालू असताना अचानक वर काही हेलिकॉप्टर्स भिरभिरू लागली. एकसारखे दिसणारे असे ते तीन हेलिकॉप्टर्स होते. ते कमी उंचीवरून उडत असल्यामुळे त्यावर काय लिहिले आहे स्पष्ट दिसत होते. त्यावर लिहिले होते 'UNITED STATES OF AMERICA'. हे हेलिकॉप्टर्स कोणत्या दिशेने चालले होते हे पाहू लागलो. आमच्या बरोबर इतरही अनेक पर्यटक एकटक पाहू लागले. लवकरच त्यापैकी एक हेलिकॉप्टर चांगलेच खाली आले आणि अलगदपणे व्हाइट हाउसच्या हिरवळीवर उतरले!! बाकीचे २ हेलिकॉप्टर बर्‍याच उंचीवरून घिरट्या घालत होते. या हेलिकॉप्टर्सपैकी ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष बसतात त्याला मरीन वन असे संबोधले जाते. असाच प्रकार एअर फोर्स वन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत विमानाबाबतही असतो.

आम्ही लांबून थोड्या वेळ निरीक्षण केले. अजूनही काही हेलिकॉप्टर परत निघायची चिन्ह दिसेनात. मग व्हाइट हाउस जवळील पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. आम्ही असे ठरवले की वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहायला पुन्हा नंतर यावे आता मोर्चा व्हाइट हाउसकडे न्यावा ;-) . व्हाइट हाउसला लागून असे मोठे मोकळे मैदान आहे तिथे बरीच गर्दी जमली होती. आम्हीही त्या बघ्यांच्या गर्दीत सामील झालो ;-) . मग लक्षात आले की आज तर शुक्रवारची संध्याकाळ आहे राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम कुटुंब त्यांच्या मार ए लागो च्या रिसॉर्टवर विकांताला राहायला निघाले होते. सुज्ञांना व्हाइट हाउस पाहायला कधी जावे हे वेगळे सांगायला नको ;-) . लवकरच प्रथम कुटुंब हेलिकॉप्टर मध्ये विराजमान झाले आणि जॉइंट बेस अ‍ॅन्ड्रुजला रवाना झाले जेथून ते फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथे एअर फोर्स वन विमानाने जाणार होते.

हेलिकॉप्टर साऊथ लॉनवर उतरताना आकाशातून काढलेला हा फोटो विकीवरून साभार.

तसेच टचडाऊनपूर्वीचा हा फोटो जालावरून साभार.

जिथे हेलिकॉप्टर उतरले होते व्हाइट हाउसच्या त्या मागील भागाला साऊथ लॉन असे म्हणतात. लांबून जरी हा भाग लहान वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र साऊथ लॉन्स अतिशय भव्य आणि तितकेच आखीव रेखीव आहे. मग आम्ही तिथे असलेल्या कुंपणाजवळ फोटो काढायला गेलो. इथे व्हाइट हाउसकडे पाठ करून अनेक फोटो काढले. समोरच वॉशिंग्टन मॉन्युमेंट दिसत होते. व्हाइट हाउस अनेकदा टीव्ही आणि फोटोंमधून पाहिले होते. मात्र इतक्या जवळून प्रथमच पाहिले असल्याने खूप छान वाटले. आमची मुलगी त्या कुंपणाला धरून उभी होती. ते तिला इतके आवडले की ते सोडायला तयार नव्हती :-) .

खालचे दोन फोटोज जालावरून साभार.

साउथ लॉनकडून व्हाइट हाउसला वळसा घालून जाताना जे उद्यान लागतं तिथला एक फोटो

आता जाणून घेऊया थोडे व्हाइट हाउसच्या स्थापत्या विषयी. व्हाइट हाउस चे डिझाइन आयरिश आर्किटेक्ट जेम्स होबान यांचे आहे. सन १७९२ ते १८०० सालापर्यंत याची मूळ वास्तू बांधली गेली. सन १८०० साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे व्हाइट हाउस मध्ये राहिले. तेव्हापासून आजवरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसच आहे. मूळ वास्तू बांधून पूर्ण झाल्यावर त्यात नंतर वेळोवेळी यात भर घालण्यात आली. १८१२ साली सुरू झालेल्या ब्रिटिश अमेरिकन युद्धादरम्यान १८१४ साली ब्रिटिश सैनिकांनी लावलेल्या आगीत व्हाइट हाउसचा आतील भाग जळून गेला. तसेच या आगीत बाहेरील भागाचेही नुकसान झाले. पुन्हा बांधणीचे काम अगदी लगेच चालू झाले होते.राष्ट्राध्यक्ष विल्यम हॉवर्ड टाफ्ट यांनी वेस्ट विंग वाढवून प्रथमतः ओवल ऑफिस निर्माण केले. हा काळ होता १९०९ सालचा.

१८१४ साली लागलेल्या आगी नंतर व्हाइट हाउस असे दिसत होते. हा फोटो विकीवरून साभार.

व्हॉइट हाउसचा सगळ्यात पहिला ज्ञात फोटो १८४६ साली John Plumbe यांनी काढला आहे. हा फोटो विकीवरून साभार.

राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स हे जेव्हां राहायला लागले व्हाइट हाउस मध्ये त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीस एका पत्रात लिहिले की: "I pray Heaven to bestow the best of blessings on this House, and all that shall hereafter inhabit it. May none but honest and wise men ever rule under this roof." या ओळी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांनी स्टेट डायनिंग रूम मध्ये एका मॅन्टलवर(हर्थवरील आधाराचा बीम) कोरून ठेवली आहेत. माजी फर्स्ट लेडी जॅक्लीन केनेडी यांनी काही महत्त्वपूर्ण सजावट त्यांच्या कार्यकाळात व्हाईट हाउस मध्ये केली. यात अनेक धनिकांनी मौल्यवान चित्रे तसेच फर्निचर इत्यादी वस्तू व्हाईट हाउस सजवण्यासाठी दान दिले.

आश्चर्याची बाब अशी की यात एक अँटीक वॉलपेपर देखिल डिप्लोमॅटिक रूम सजवण्यासाठी वापरला गेला. हा वॉलपेपर एका आलिशान महालात वापरला होता १९६१ सालापर्यंत. हा महाल जमीनदोस्त केला गेला एका दुकानाच्या बांधकामासाठी. मात्र अगदी महाल पाडण्या आधी हा वॉलपेपर व्हाइट हाउसला विकला.कालांतरात अनेक सुविधा व्हाइट हाउस मध्ये भर टाकत गेल्या. जसे की अपंगासाठी सुलभ प्रवेशद्वार. तसेच पहिले संगणक आणि प्रिंटर इत्यादी.व्हाइट हाउसच्या वेस्ट विंग मध्ये ओवल ऑफिस आहे. जिथे राष्ट्राध्यक्षांचे ऑफिस आणि त्यांच्या सीनियर ऑफिसर्सचे कार्यालय आहेत. तसेच ईस्ट विंग मध्ये प्रामुख्याने फर्स्ट लेडीचे ऑफिस आहे.

पुढे आम्ही चालत व्हाइट हाउसच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या दिशेने जाऊ लागलो. काही वर्षांपूर्वीपर्यंत पेनसिल्वेनिया ऍव्हेन्युवर व्हाइट हाउस समोर पर्यटकांना उभे राहू दिले जात होते. आता पर्यटकांसाठी तिथे मुक्त प्रवेश नाहीये. त्याऐवजी व्हाइट हाउससमोरच्या उद्यानाजवळ (लाफेयट स्क्वेअर) गेल्यास तिथून व्हाइट हाउसची समोरची बाजू दिसू शकते. आम्हीही तिथे पोचलो. इथेही अनेक पर्यटकांची बरीच गर्दी होती. बरेच लोक फोटो काढत होते. तर काही लोक तेथील सुरक्षा कर्मचार्‍याना विचारत होते की "राष्ट्राध्यक्ष परत कधी येणार व्हाइट हाउस मध्ये?" ते कर्मचारी देखील न कंटाळता प्रत्येक वेळी नम्रपणे "आम्हाला काही त्याची कल्पना नाही" असे सांगत होते!

इथेही काही भव्य पुतळे तसेच कारंजी आहेत. इथली हिरवळ अतिशय आखीव रेखीव आहे. इथे जाणवलेली आश्चर्याची बाब म्हणजे व्हाइट हाउसचा हा भाग डी सी शहरात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी आहे. व्हाइट हाउसच्या अगदी जवळच लागून अनेक मोठ्या बँकांची कार्यालये तसेच इतर अनेक व्यावसायिक कार्यालये आहेत. शिवाय एक बस थांबाही आहे. जिथे अनेक सिटी बसेस रांगा लावून उभ्या होत्या. संध्याकाळच्या वेळी इथे कुठल्याही शहराच्या मध्यवर्ती भागात असते तशीच वर्दळ होती.

या ठिकाणी आम्ही लांबून काढलेले काही फोटोज.

या परिसराची कल्पना येण्यासाठी गूगल अर्थवरून घेतलेला हा स्क्रीनशॉट

अमेरिकेचे नागरिक असाल तर पूर्वनियोजित वेळ घेऊन व्हाइट हाउस आतूनही पाहता येते. तसेच अमेरिकेचे नागरिक नसाल तर आपल्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून पाहता येते (हे मात्र किती सहजतेने होऊ शकते याची कल्पना नाही). या दिवसाच्या भटकंतीचा शेवट आम्ही इस्ट कोस्टमधल्या एका कॅफे चेनच्या (प्रेट) कॅफे मध्ये कॉफी व Croissant चा आस्वाद घेऊन केला.

बोचरी हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे थोडे नाउमेद वाटत होते. मात्र ऐतिहासिक डी सी शहर पाहायला लागल्यावर मात्र ही उणीव भासली नाही. आजचा दिवस अनपेक्षित गोष्टी पाहायचा होता. त्यात क्लॉक टॉवर आणि प्रथम कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टरचे उड्डाण पाहायला मिळाले. एकंदरीतच डीसीच्या पहिल्या दिवसाच्या भटकंती मध्ये ही स्थळे प्रत्यक्षात पाहून आनंद वाटला. उर्वरित सहल अशीच चांगली पार पडेल याची खात्री वाटली.

व्हाइट हाउसचा नॉर्थ लॉनवरुन काढलेला हा फोटो जालावरून साभार.

माहितीचा स्रोत: विकी

क्रमश:

आमच्या सहलीच्या तिसऱ्या दिवशी युएस कॅपिटॉल आतून पाहिले. हा अनुभव अतिशय चांगला होता कारण की कॅपिटॉल आतून पाहायलाही खूप रंजक आहे. तसेच तेथील ऐतिहासिक संदर्भासहित केलेली गायडेड टूर खूपच माहितीपूर्ण होती. ते पाहून होईपर्यंत दुपार कधी झाली ते कळले नाही. शेवटी तेथे काही सॉव्हेनियर्स खरेदी केले.


आम्ही राहतो त्या मिनेसोटा राज्याने दिलेला मारीया सॅनफोर्ड यांचा युएस कॅपिटॉलमधील पुतळा.

त्यानंतर आम्ही लायब्ररी ऑफ काँग्रेस पाहायचे ठरवले. या लायब्ररीविषयी आधीही खूप ऐकले होते. खास करून येथील साहित्यसंपदा आणि लायब्ररीच्या अतिशय भव्य आणि देखण्या वास्तूबद्दल. त्यामुळे लायब्ररी ऑफ काँग्रेस आवर्जून पाहायच्या यादीत होती. काँग्रेसच्या सदस्यांच्या उपयोगासाठी या लायब्ररीची स्थापना केली गेली. ही लायब्ररी अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. ही लायब्ररी फेडरल सरकाराने स्थापन केलेली सर्वात जुनी सांस्कृतिक संस्था आहे. तसेच ही लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी आहे.

युएस कॅपिटॉल व लायब्ररी ऑफ काँग्रेसला भुयारी मार्गाने जोडलेले आहेत . आम्ही त्याच भुयारी मार्गाने लायब्ररीच्या दिशेने चालू लागलो. या मार्गात अनेक उत्तम चित्रे पाहायला मिळतात. युएस कॅपिटॉलला लायब्ररी ऑफ काँग्रेसची जी इमारत आतून जोडली आहे ती आहे थॉमस जेफरसन बिल्डिंग.








अमेरिकेची राजधानी फिलाडेल्फीयाहून डीसीला स्थलांतरित झाल्यावर या लायब्ररीची स्थापना करण्यात आली (सन १८००). ही लायब्ररी त्यावेळी युएस कॅपिटॉल मधेच होती. मात्र १८१४ सालच्या ऑगस्ट महिन्यात ब्रिटिश सैनिकांनी कॅपिटॉल जाळले. त्यावेळी या आगीत लायब्ररीतले तीन हजार ग्रंथ जळून नष्ट झाले. लगेच महिन्याभरात थॉमस जेफरसन यांनी आपली व्यक्तिगत लायब्ररी काँग्रेसला बदली म्हणून वापरायला दिली. त्यात सुमारे ६ हजार ग्रंथ होते. त्यासाठी काँग्रेस ने जेफरसन यांना त्या काळी २४ हजार डॉलर्स दिले . दुर्दैवाने १८५१ साली पुन्हा कॅपिटॉल मधील लायब्ररीच्या दालनास आग लागली. ज्यात जेफरसन यांनी दिलेली बरीचशी ग्रंथसंपदा नष्ट झाली. यानंतर लायब्ररीतील पुस्तकांची संख्या वाढत गेली. १८७० साली कॉपीराइट लॉ पास करण्यात आला. त्यामुळे कापी राइट मिळवण्यासाठी लेखकांना त्यांच्या लिखाणाचे २ नमुने लायब्ररीला पाठवावे लागत असत. या लायब्ररीत आजही अमेरिकेचे कॉपीराइटचे ऑफिस आहे. तसेच लायब्ररीतील बहुतकरून सगळ्या संग्रहित वस्तू आणि बौद्धिक संपदा कॉपीराइट लॉद्वारे मिळवण्यात आल्या आहेत. लायब्ररीसाठी नवीन इमारतीचे बांधकाम १८८८ साली सुरू होवून १८९४ साली पूर्ण झाले. हीच ती थॉमस जेफरसन बिल्डींग जी १८९७ साली खुली करण्यात आली. आता कॅपिटॉल हिलवर लायब्ररीच्या तीन इमारती आहेत. जेफरसन बिल्डींग , जॉन अ‍ॅडम्स बिल्डींग जी १९३८ साली बांधली गेली आणि जेम्स मॅडीसन मेमोरियल बिल्डींग १९८० साली लोकांच्या वापरासाठी खुली करण्यात आली. या तिन्ही इमारती एकमेकींशी भुयारी मार्गांनी जोडल्या आहेत.

या लायब्ररीत सुमारे १५ कोटी संग्रहित वस्तू आहेत. यात सुमारे ३.६ कोटी पुस्तके आणि इतर छापील साहित्य आहे. या लायब्ररीत प्रामुख्याने पुस्तके तर आहेतच पण इतरही अनेक गोष्टींचा इथे संग्रह आहे. जसे की नकाशे, शीट म्युझिक, फोटो, साऊंड रेकॉर्डींज, सिनेमे आणि हस्तलिखितांचा समावेश आहे. या लायब्ररीत सुमारे ४५० विविध भाषांचे साहित्य संग्रहित केलेले आहे. या लायब्ररीत असलेल्या हस्तलिखितांची संख्या जवळजवळ ७ कोटी आहे. या हस्तलिखितांमध्ये अमेरिकेच्या इतिहास व संस्कृतीविषयी अनेक लेख आहेत. तसेच या थॉमस जेफरसन यांनी लिहिलेल्या "डिक्लेरेशन ऑफ इन्डीपेंडन्स" चा मूळ मसुदा देखिल आहे. या लायब्ररीत समाविष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या अशा सुमारे १५००० बौद्धिक संपदेच्या गोष्टी दर दिवशी येत असतात. यातून जवळजवळ रोज १२००० या लायब्ररीत समाविष्ट केल्या जातात. ज्या गोष्टी समाविष्ट केल्या जात नाही त्या मग देशात तसेच आंतररष्ट्रीय पातळीवर आदान प्रदान केल्या जातात. ही लायब्ररी जेव्हा लोकांसाठी खुली झाली. त्या काळी ही एक मोठी उपलब्धी होती कारण अर्थात ही लायब्ररी सर्वात मोठी, खूप भव्य आणि सगळ्यात सुरक्षित असे ठिकाण म्हणून गणले गेले. वय वर्षे १६ आणि वरील कोणतीही व्यक्ती इथे वाचक म्हणून नाव नोंदवू शकते किंवा आपला फोटो आयडी दाखवून येथील पुस्तके वाचू शकते. तसेच ऑनलाईन अ‍ॅक्सेस करू शकते. या लायब्ररीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की या लायब्ररीच्या साईटवर शेकडो पुस्तके डिजीटल स्वरूपात उपलब्ध आहेत. ही डिजीटल पुस्तके सर्वांना वाचण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत (कुठल्याही
सदस्यत्वा शिवाय).







ही थॉमस जेफरसन बिल्डींग मधील मुख्य रीडिंग रूम. या दालनाच्या एका बाल्कनीला काचेने सील करून पर्यटकांना या दालनाचे निरीक्षण करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे.










खाबांवरचे आकर्षक नक्षीकाम


१९६२ सालापासून या लायब्ररीने जगभरात आपली कार्यालये उघडली आहेत. यात नवी दिल्ली, कैरो, रिओ डी जनेरो, जकार्ता, नैरोबी तसेच इस्लामाबाद येथे ही कार्यालये आहेत. या कार्यालयांद्वारे इतर देशांतून पुस्तके व इतर अशा वस्तू गोळा करतात जसे की मौल्यवान पुस्तके, नकाशे इत्यादी. या लायब्ररीत अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखितं आहेत. तसेच जगभरातील दुर्मिळ पुस्तकांचा सर्वात मोठा साठा आहे. यात पंधराव्या शतकातील काही हस्तलिखितं आहेत. तसेच ज्ञात असे पहिले छापील पुस्तक “The Bay Psalm Book” हे देखिल आहे. हे पुस्तक १६व्या शकतील आहे. या लायब्ररीत लहान मुलांची सुमारे १०० अतिशय दुर्मिळ पुस्तके आहेत. तसेच येथे अगदी लहान पुस्तक आहे "ओल्ड किंग कोल". हे पुस्तक इतके लहान आहे की ते आकाराने एका पूर्णविरामा एवढे आहे. या लायब्ररीत सर्वात मोठे पुस्तक देखील आहे जे की ५x७ फूट एवढे आहे. यात भूतानची रंगीत छायाचित्रे आहेत. येथे प्रिटींगचे अगदी पुरातन उदाहरण आहे जे की इ. स. ७७० मधील आहे. १९३१ सालापासून लायब्ररीने अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तसेच ध्वनिमुद्रण पुरवत आहे. आता ही सुविधा अद्यावत होवून ही पुस्तके ऑडियो स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. या लायब्ररीत अमेरिकन तसेच इतर देशांतल्या शहरांच्या टेलिफोन डिरेक्टरीज देखील आहेत. येथे गुटेनबर्ग बायबलची प्रत पाहायला मिळते. या बायबलच्या छपाईत वापरलेल्या तंत्रज्ञाने प्रसिद्ध अशी गुटेनबर्ग क्रांती आली.



लायब्ररीतील भव्य असा ग्रेट हॉल


लायब्ररीतला थॉमस जेफरसन यांचा पुतळा

या लायब्ररीला देता आलेली प्रत्यक्ष भेट ही आमच्यासाठी एक अपूर्वाई ठरली. ही लायब्ररी बघायला अतिशय देखणी आहेच तसेच येथील साहित्य संपदा अतिशय उच्च दर्जाची आहे. पुस्तक या विषयात रस असणार्‍यांनी या लायब्ररीला आवर्जून भेट द्यावी. येथून पाय निघत नव्हता पण आता बाहेर पडावे लागणार होते. म्हणून मग इथून काही सॉव्हेनियर्स खरेदी केले आणि बाहेर पडलो.




थॉमस जेफरसन ब्लिडींगचा हा फोटो विकीवरून साभार


हा फोटो लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या संस्थळावरुन साभार


लायब्ररी ऑफ काँग्रेसच्या संस्थळावर उपलब्ध असलेला ३६० अंशाचा टूर. यात चार ठिकाणांचे दृश्य उपलब्ध आहे.

हा व्हिडिओ जालावरून साभार


ता. क. - प्राध्यापक संजय सोनवणी यांनी लिहिलेले जातीसंस्थेचा इतिहास हे पुस्तक लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये सामील झाले आहे.

माहितीचा स्रोत - लायब्ररी ऑफ काँग्रसचे संस्थळ. विकी

क्रमशः

 

लायब्ररी ऑफ काँग्रेस पाहून झाल्यावर संध्याकाळी मेट्रोने हॉटेलवर परतीचा प्रवास सुरू केला. त्या दिवशी भटकंती थोडी दमाने घ्यायची असे ठरवले होते. कारण अगोदरच्या दिवशी एकतर खूप काही पाहिले होते अन बरीच पायपीट झाली होती. मुख्य म्हणजे आम्ही घातलेल्या (नेमका पार्किंग लॉट विसरण्याच्या) घोळाने मेट्रो स्टेशनच्या पार्किंग मध्ये लावलेली गाडी सापडायला खूप वेळ आणि श्रम लागले. याविषयी सविस्तर शेवटच्या भागात लिहीन. आमच्या मेट्रोच्या मार्गावर एक भव्य इमारत आकर्षित करायची. लांबून ही वास्तू नेमकी कशाची आहे ते मात्र कळत नव्हते. दुरून पाहताना ही वास्तू चांगलीच भव्य अन रेखीव दिसत होती. त्यामुळे ही वास्तू नक्की काय हे जर हाती वेळ राहिला तर अवश्य पाहावी असे वाटत होते. त्याप्रमाणे त्या दिवशी वेळ होता म्हणून मग ही वास्तू पाहायची ठरवली. ही वास्तू पोटोमॅक नदिपल्याड व्हर्जिनिया राज्यातील अ‍ॅलेक्झांड्रिया गावात आहे. इथे मेट्रोने पोहचायला किंग्ज स्ट्रीट ओल्ड टाउन हे स्टेशन आहे. तसेच समोरच अलेक्झांड्रियाचे ऍमट्रॅक ट्रेन स्टेशनही आहे.






हे आहे जॉर्ज वॉशिंग्टन मसॉनिक नॅशनल मेमोरियल. जॉर्ज वॉशिंग्टन हे मेसॉनिक संप्रदायाचे सदस्य होते. या टॉवरचे बांधकाम सन १९२२ साली चालू होवून १९३२ साली पूर्ण झाले. मात्र जरा खोलात शिरून माहिती करून घेतल्यावर समजले की या मेमोरियलच्या बांधकामाची कथाही तितकीच रंजक आहे :-) . खरे तर हे मेमोरियल व्हावे म्हणून सन १८५२ पासून तयारी सुरू झाली होती. हे मेमोरियल एक खासगी मालमत्ता आहे जी सामान्य जनतेसाठी खुली आहे. याची सुरुवात झाली मेसन संप्रदायातील लोकांकडून या मेमोरियलच्या बांधकामासाठी पैसे गोळा करण्यापासून. हे काम केले गेले अमेरिकेतील राज्य स्तरावर.पुरेसा निधी गोळा केला गेला. मग रोम मध्ये पॉवर्स नावाच्या शिल्पकाराकडून वॉशिंग्टन यांचा भव्य असा ब्रॉन्झचा पुतळा तयार करून मागवण्यात आला. हा पुतळा १८६१ साली व्हर्जिनियातील अ‍ॅलेक्झांड्रिया येथे पोहोचला देखिल. मात्र याच सुमारास अमेरिकेतील सिव्हिल वॉरला सुरुवात झाली. १८६३ सालापर्यंत हा पुतळा लोकांना पाहायला ठेवण्यात आला. त्यानंतर मात्र हा पुतळा व्हर्जिनियातील रिचमंड येथे हालवण्यात आला. दुर्दैवाने १८६५ साली सिव्हिल वॉर दरम्यान लागलेल्या आगीत हा पुतळा बेचिराख झाला.

मेमोरियलचे काम काही काळापुरते थांबवले गेले. पुन्हा मग १९०९ साली या कामाला सुरुवात झाली. या मेमोरियलसाठी प्रस्तावित जागा होती शुटर्स हिल. अठराव्या शतकाच्या शेवटी युएस कॅपिटॉलच्या उभारणीसाठी थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन या द्वयीने या जागेचाही विचार केला होता. १९०० साली अ‍ॅलेक्झांड्रियाच्या रहिवाश्यांनी 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर चालणारी एक संस्था निर्माण केली. या संस्थेचे ध्येय एकच होते अ‍ॅल्केझांड्रिया शहरात जॉर्ज वॉशिंग्टन यांचे मेमोरियल बांधणे. मुख्य वास्तूचे बांधकाम १९२२ साली चालू होवून १९३२ साली पूर्ण झाले. आश्चर्याची बाब अशी की या दरम्याने आलेल्या आर्थिक मंदीतही या मेमोरियलसाठी निधी फक्त मेसन संप्रदायातील सदस्यांकडून गोळा करण्यात आले. यात अनेक अडचणीही आल्या मात्र मेसॉनिक लोक आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

१२ मे १९३२ साली ही या वास्तूची उद्घाटनाची तारीख ठरली होती. मात्र याची मूळ तारीख होती १३ मे. प्रचलित समजा अनुसार १३ तारीख अशुभ मानली जाते. त्यामुळे तारीख बदलून ती १२ करण्यात आली. निमंत्रण जगभरातील लाखो मेसन लोकांना तसेच राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर आणि व्हर्जिनिया राज्याचे गवर्नर याना पाठवण्यात आले.सुमारे ५० हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतील असा अंदाज होता. समारंभ अगदी थाटात पार पडला. मात्र दुर्दैवाने त्या दिवशी खूप पाऊस पडला त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी कमी लोक आले. मात्र असे म्हणतात की मूळ तारखेला म्हणजे १३ ला हा कार्यक्रम झाला असता तर लाखो लोक उपस्थित राहिले असते! मुसळधार पाऊस पडत असतानाही मेसॉनिक लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.



हे आहे १९२२ सालचे मेमोरियलचे मॉडेल. हे मॉडेल आणि अखेर पूर्ण झालेली वास्तूत अनेक बदल आहेत. हा फोटो विकीवरून साभार.


आम्ही गाडीने या मेमोरियलजवळ पोचलो आणि प्रवेशद्वारापाशीच जरा थबकलो. या टेकडीवर जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला कारण इथे लिहिले होते की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणून ; -) . मग जरा आजूबाजूला पाहिले आणखी कोणी दिसत आहे का टेकडीवर जाणारे. तर काही गाड्या वर जाताना दिसल्या. मग आम्हीही गेलो. ही खरे तर संबंधीत संस्थेची खासगी मालमत्ता आहे . तसे असले तरीही सर्व लोकांना खुली आहे त्यामुळे बिनधास्त जावे ; -) .

प्रवेशद्वाराजवळ पोचल्यावर कळले की त्या दिवसाची पर्यटकांनी भेट देण्याची वेळ संपलेली आहे. त्यामुळे भोवताली फिरून या इमारतीच्या स्थापत्यसौंदर्याचा आस्वाद घ्यायचे ठरवले. नुकताच सुर्यास्त होऊन गेल्यामुळे उजेड कमी होऊ लागला होता. मेमोरियलसाठी पार्किंगही चांगलेच मोठे होते. त्या संध्याकाळी तिथे कुठलिशी म्युझिकल कंसर्ट होती. त्यासाठी श्रोते येण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या बाजूंनी फोटो काढून आम्ही तेथून परतलो. भविष्यात हे मेमोरियल आतून पाहायचे ठरवले आहे.









या इमारतीपुढील मेसॉनिक संप्रदायाचे हे चिन्ह









मेमोरियल आतील हा फोटो जालावरून साभार.


चोथ्या मजल्यावर जॉर्ज वॉशिंग्टन म्युझियम आहे तेथील हा फोटो.

नवव्या मजल्यावर ऑब्झर्वेशन डेक आहे तिथून दिसणारे विहंगम दृश्य.

वरील तीन फोटोज या मेमोरियलच्या संस्थळावरून साभार.


संध्याकाळच्या वेळेचा हा फोटो जालावरून साभार.

डिसीमध्ये फिरताना वेळ हाताशी असल्यास अवश्य पाहावे असे हे एक ठिकाण आहे. इथे गायडेड टूर्सही उपलब्ध आहेत. टूर साठी १५ डॉलर्सचे तिकीट असते.


माहितीचा स्रोत - विकी , मेमोरियल संस्थळ

क्रमशः

 

आज काही मॉन्युमेंट्स पाहावी असे ठरवले होते. त्याप्रमाणे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या दिशेने कुच केले. आजही हवेत गारवा जाणवत होता. सतत चालत राहिल्यामुळे खूप जाणवत नव्हते. गारठा जरी पुन्हा परतला असला तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि काही ठिकाणी फुललेले ट्यूलिप्सनी वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होते.वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या थोडे अलीकडेच थांबून लांबून काही फोटो काढले आणि मग मॉन्युमेंटच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलो. जवळून ही वास्तू अतिशय भव्य अशी वाटत होती कारण एक तर आजूबाजूला कैक मैल इतक्या उंचीची दुसरी कुठलीही इमारत अथवा वास्तू नाहीये.








तसे पाहिले तर या ट्रीप मध्ये आम्ही जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ तिसरे स्मारक पाहत होतो. त्यापैकी हे मॉन्युमेंट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. लिंकन मेमोरियलच्या पूर्व दिशेला हे बांधलेले आहे. ही वास्तू जवळजवळ ५५४ फूट उंच आहे. या वास्तूचे बांधकाम १८४८ साली सुरू झाले. मात्र थोड्याच अवधीत म्हणजे १८५४ पासून १८७७ पर्यंत हे काम थांबवले गेले कारण पुरेसा निधी नव्हता. त्यात काही काळ याच्या बांधकामास सिव्हिल वॉरचाही फटका बसला. अखेर हे बांधकाम पूर्ण झाले १८८५ साली. लोकांसाठी ते खुले केले गेले सन १८८८ साली. बांधकाम पूर्ण झाल्यावर ही वास्तू जगातील सर्वात उंच होती. हा पहिला मान १८८९ सालापर्यंत अबाधित राहिला मग मात्र हा मान आयफेल टॉवरने पटकावला!!

या वास्तुसंबंधित इतिहासात डोकावण्यासाठी आपण काही वर्ष मागे जाऊयात. म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या मृत्यू नंतरच्या काही घटनांकडे. त्या काळी काँग्रेसने वॉशिंग्टन मेमोरियल व्हावे असे ठरवले. पण मग काँग्रेस मध्ये बहुमत बदलले. डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पार्टीकडे बहुमत आले. त्यांनी वॉशिंग्टन यांचे मेमोरियल व्हावे हा काँग्रेसचा निर्णय बदलला. त्यावेळी त्यांना कोणाचेच मेमोरियल/मॉन्युमेंट असावे हे वाटत नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांनी वॉशिंग्टन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चित्र असलेल्या नाण्यांच्या छपाईला बंदी आणली.

कालांतराने हा विरोध मावळला. बांधकामासाठी सुमारे २८ हजार डॉलर्स इतका निधी जमा झाला. त्यांनंतर मेमोरियलच्या डिझाइनसाठी स्पर्धा आयोजित केली गेली. गमतीचा भाग म्हणजे ही स्पर्धा चालू झाली १८३६ साली आणि रॉबर्ट मिल्स याने ही स्पर्धा १८४५ साली जिंकली. मात्र त्या काळी मिल्सच्या डिझाइनचे विरोध करणारे अनेक होते. मुख्य म्हणजे त्याच्या प्रस्तावित मेमोरियलच्या बांधकामाचा खर्च सुमारे १ दशलक्ष डॉलर्स पेक्षा अधिक होता. मात्र या डिझाइन प्रमाणे बांधकाम होणे अवघड होते. कारण तेवढा निधी नव्हता. म्हणून मग नाइलाजाने फक्त स्तंभ उभारायचे नक्की झाले.



रॉबर्ट मिल्सच्या प्रस्तावित वॉशिंग्टन मॉन्युमेंटची डिझाइन. हा फोटो विकीवरून साभार.


मॉन्युमेंटचे बांधकाम चालू असताना १८६० साली मॅथ्यु ब्रेडी यांनी काढलेला हा फोटो विकीवरून साभार.

सध्या मॉन्युमेंट आतून पाहायला बंद आहे कारण लिफ्टची दुरुस्तीचे काम चालू आहे. ते चालेल २०१९ सालच्या वसंत ऋतू पर्यंत. त्यामुळे आम्हाला मॉन्युमेंट बाहेरुन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याप्रमाणे आम्ही बाहेरचे आणि आजूबाजूचे काही फोटो काढले.







काही लोक असे मोठे पतंग उडवण्याच्या तयारीत होते.

तेथून दिसणारे युएस कॅपिटॉल.

लांबवर दिसणारे लिंकन मेमोरियल.


मंडळी, डिसीच्या सहलीदरम्यान हाती भरपूर वेळ असेल तर मॉन्युमेंट्स सूर्योदय आणि सूर्यास्त झाल्यावर अवश्य पाहा. हा एक अलौकिक सोहळा असतो. त्याची ही एक झलक.


हा सूर्योदयाच्या वेळचा फोटो जालावरून साभार.

सूर्यास्तानंतरचा हा फोटो जालावरून साभार.

माहितीचा स्रोत विकी

क्रमशः

वॉशिंग्टन मॉन्युमेंट पाहून झाल्यावर मग इतर मॉन्युमेंट्सकडे लक्ष्य केंद्रित केले. तसेच पुढे चालत गेलो आणि वर्ल्ड वॉर २ च्या मेमोरियलला पोचलो. हे मेमोरियल दुसऱ्या महायुद्धात भाग घेणाऱ्या अमेरिकन सैनिकांना व असैनिक अमेरिकनांना समर्पित करण्यात आले आहे. तसेच हे मेमोरियल वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियलच्या मधोमध बांधलेले आहे.

हा स्क्रीनशॉट गुगल मॅप्सवरुन साभार

इतर मेमोरियल्सच्या तुलनेने हे बरेच नवे आहे. २९ एप्रिल २००४ साली त्तकालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लु बुश यांनी या मेमोरियलचे उद्घाटन केले. या मेमोरियलचे स्वरूप म्हणजे एका मोठ्या चौकात प्रत्येकी १७ फूट उंचीचे ५६ ग्रॅनाइटचे खांब अर्ध वर्तूळ आकारात उभारले गेले आहेत. उत्तर आणि दक्षिण दिशेला भव्य अश्या दोन कमानी बांधल्या आहेत तसेच मधोमध असलेल्या मोठ्या जागेत अनेक सुंदर कारंजी आहेत. या प्रत्येक खांबावर अमेरिकेतील सन १९४५ साली असलेल्या ४५ राज्यांची नावे कोरली आहेत. तसेच डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबीया, अलास्का टेरिटरी, टेरिटरी ऑफ हवाई, कॉमनवेल्थ ऑफ द फिलिपिन्स, पोर्तो रिको, ग्वॉम, अमेरिकन समोआ आणि यूएस वर्जिन आयलंड्स अशी नावे कोरली आहे. उत्तरेकडील कमानीवर "अटलांटिक" तर दक्षिणेकडील कमानीवर "पॅसिफिक" असे कोरले आहे.


हा फोटो विकीवरून साभार.

फ्रीडम वॉल - ४, ०४८ सोनेरी तारे असलेली अर्धवर्तुळाकार आकाराची एक मोठी भिंत या मेमोरियलच्या एका बाजूला आहे. यातला प्रत्येक तारा युद्धातल्या १०० शहिदांचे प्रतिनिधित्व करतो. या भिंतीसमोर "Here we mark the price of freedom" असे शब्द कोरले आहेत.


इथून पुढे गेल्यावर एका स्तंभावर पर्ल हार्बरचा उल्लेख दिसतो. सात डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बर या नाविक तळावर अचानक हल्ला केला होता. ज्यात अमेरिकेच्या नौदलाची खूप हानी झाली तसेच मोठी जीवित हानी झाली. या हल्यानंतर अमेरिकेच्या दुसर्‍या महायुद्धात भाग घेतला.

बरीच मंडळी इथे पर्यटक म्हणून भेट देतात. मात्र या गर्दीतही काही लोक असे होते जे या युद्धात प्राणांतिक बलिदान करणार्‍या पूर्वजांच्या आठवणीने काहीसे व्याकुळ होत होते.



फ्लोरिडातल्या एका शाळेची सहल तिथे आली होती. त्यांनी त्यांच्या राज्याच्या स्तंभासमोर पुष्पगुच्छ ठेवून शहिदांना आदरांजली वाहिली.


आम्ही या मेमोरियलला एक पूर्ण चक्कर मारली आणि इतर काही स्तंभ पाहिले. दुसऱ्या महायुद्धाचे हे मेमोरियल उभारताना त्यावर टीका झाली नाही असे नाही. विरोध करणार्‍यांचे काही मुद्दे होते की हे मेमोरियल उभारले गेले तर वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि लिंकन मेमोरियल यांच्या मध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होईल. तसेच ही मोकळी जागा कायम मोर्चे इत्यादींसाठी हक्काची मानली जात असे ती हातची जाणार. अजून एक मुद्दा असा होता की या मेमोरियलसाठी मंजुरी खूप लवकर देण्यात आली होती. ज्यासाठी अनेक वर्षे लागायची. खरे तर त्यावेळी काँग्रेसला (अमेरिकन प्रतिनिधीगृहला) अशी काळजी वाटत होती की तेव्हा हयात असणार्‍या दुसर्‍या महायुद्धातल्या अमेरिकन अधिकाधिकक सैनिकांना हे मेमोरियल पाहायला मिळावे. म्हणून मग काँग्रेसने हे उभारण्यास घाई केली आणि मेमोरियलच्या मार्गातील सर्व अडचणी त्वरेने दूर झाल्या.


या फोटोत कारंज्यांच्या पलीकडे वॉशिंग्टन मॉन्युमेंट व आफ्रिकन अमेरिकन म्युझियमची इमारत दिसत आहे.


या फोटोत दूरवर लिंकन मेमोरियल दिसत आहे.


मेमोरियलचा रात्रीच्या वेळी काढलेला हा फोटो जालावरून साभार.

यानंतर आम्ही लिंकन मेमोरियलच्या दिशेने चालू लागलो. त्याचे वर्णन वाचूया पुढच्या भागात.
क्रमशः

 

वर्ल्ड वॉर टू मेमोरियल पाहून झाल्यावर आम्ही या पलीकडे असलेल्या प्रसिद्ध लिंकन मेमोरियलच्या दिशेने चालू लागलो.

हा स्क्रीनशॉट गुगल मॅप्सवरुन साभार

इथे मधोमध एक आयताकृती आकाराचे तळे आहे. ज्यात नुकत्याच वसंत ऋतूच्या आगमनामुळे काही बदकांच्या जोड्या विहरत होत्या.

आम्ही रमत गमत इकडे तिकडे पाहत बरेच फोटो काढले. काही लोक भाड्याच्या सायकली घेऊन पर्यटन स्थळे पाहत होती. लिंकन मेमोरियलच्या जवळ पोहोचल्यावर मात्र आम्ही एका ठिकाणी पोटपूजा करण्यासाठी बसलो. इथे एक धिटुकली खार आमच्या मागे पुढे करू लागली होती. तिला आशा होती आम्ही तिला काहीतरी खायला देऊ. मात्र वन्य जीवांना आपले खाणे देऊ नये असे म्हणतात. त्यामुळे इच्छा असूनही तिला काही खायला दिले नाही. निराश होवून तिने दुसरीकडे मोर्चा वळवला :-(. मग मात्र आम्ही लिंकन मेमोरियल आतून पाहण्यासाठी चालू लागलो.


मेमोरियलसमोरिल पायर्‍यांदरम्यानच्या मोकळ्या जागेवर एक म्युझिकल बॅन्ड सराव करत होता.


मेमोरियल लोकांसाठी खुले झाल्या नंतरच्या वर्षी म्हणजे १९२३ साली काढलेला हा फोटो जालावरून साभार.


लिंकन मेमोरियलच्या समोरच्या तळ्यात काही मंडळी आईस स्केटिंग करत आहेत. १९२२ सालच्या हिवाळ्यातला हा फोटो जालावरून साभार.


हे मेमोरियल अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. तसे पाहिले तर अमेरिकेच्या इतिहासातील अनेक गणमान्य नेत्यांच्या स्मारकास विरोध झाला अगदी तसेच लिंकन यांच्या स्मारकास देखिल झाला. विरोधाचे कारण असे की नियोजित जागा काहीशी दलदलीची आणि तिथवर पोचायला कठीण मानली जात होती. मात्र काँग्रेसने तीन लक्ष डॉलर्स मंजूर केले मार्च १९१४ साली बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामात काही बदल करूनही हे मेमोरियल वेळेत म्हणजे १९२२ सालच्या मे महिन्यात पूर्ण झाले. या प्रसंगी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डींग आणि लिंकन यांचे तेव्हा हयात असलेले एकमेव पुत्र रॉबर्ट टॉड लिंकन हे उपस्थित होते.


मेमोरियलची प्रस्तावित जागा. वरील फोटो विकीवरून साभार.

मेमोरियलच्या बाह्य स्वरूपाबद्दल बोलायचे झाले तर ते ग्रीक मंदिरासारखे बांधले आहे. यासाठी कोलोरॅडो येथे मिळणारे युल मार्बल वापरले आहे. ग्रीक मंदिरासारखे बांधल्यामुळे अतिशय भव्य असे खांब तीन बाजूंनी बघायला मिळतात. हे खांब सुमारे ४४ फूट इतक्या उंचीचे आहेत. खांबांवरच्या कमानींवर लिंकन यांच्या मृत्यू समयी अमेरिकेत समाविष्ट असणाऱ्या ३६ राज्यांची नावे कोरली आहेत.

प्रमुख शिल्पकार डॅनियल चेस्टर फ्रेंच याच्या हाता खाली Piccirilli Brothers यांनी निर्माण केलेली लिंकन यांची मूर्ती १९ फूट उंच आहे.ही मूर्ती घडवायला सुमारे ४ वर्ष लागली. जॉर्जिया येथे मिळणार्‍या संगमरवरा पासून ही मूर्ती घडवली गेली आहे. त्यांची ही मूर्ती टेनेसी मार्बलवर विराजमान आहे. या मूर्ती बद्दल अनेक प्रवाद आहेत. त्यात काहींचे मत असे आहे की ही मूर्ती साइन लँग्वेजचा वापर करत आहे. जसे की त्यांचे डावा हात 'A' आणि उजवा हात 'L' ही त्यांच्या नावाची आद्याक्षरे संबोधत आहे.कुणी असेही म्हणत की लिंकन यांची नजर यूएस कॅपिटॉल वर रोखली आहे.

ही मूर्ती पाहताच अब्राहम लिंकन यांची करारी मुद्रा लगेच नजरेत भरते.


मूर्तीचे निरीक्षण करत राहिल्याने आतल्या भागांचे फारसे फोटो काढायचे राहूनच गेले.


मेमोरियलच्या दोन्ही बाजूंच्या व मागच्या बाजूनेही उपलब्ध असणार्‍या पोर्चमधून आपण फिरू शकतो. मागच्या बाजूने दिसणारा हा पोटोमॅक नदीवरचा पूल अन पलीकडे आर्लिंग्टन नॅशनल सेमेटरी.


तसेच समोरच्या पायर्‍यांवरुन दिसणारा वर्ल्ड वॉर टू मेमोरियलचा काही भाग, वॉशिंग्टन मॉन्युमेंट व लांबवरचे युएस कॅपिटॉल.

ही ऐतिहासिक वास्तू अमेरिकेतल्या एका क्रांतिकारी आंदोलनाची साक्षीदार आहे. २८ ऑगस्ट १९६३ रोजी सिव्हिल राइट्स चळवळीतल्या मार्च ऑन वॉशिंग्टन फॉर जॉब्स अ‍ॅन्ड फ्रीडमदरम्यान मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी त्यांचे ऐतिहासिक आय हॅव अ ड्रीम भाषण लिंकन मेमोरियलच्या पायर्‍यांवरुनच केले. योगायोगाने हे लेखन यंदाच्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर डेच्या अगोदरच्या दिवशी प्रकाशित होत आहे.


हे दोन्ही फोटोज जालावरून साभार

लहान असताना लिंकन यांचे शाळेच्या हेडमास्तरांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र वाचले होते. तसेच २०१२ साली आलेला 'Lincoln' सिनेमा पाहून प्रभावित झालो होतोच. त्यामुळे या महान व्यक्तीचे मेमोरियल पाहायचे भाग्य लाभले याबद्दल निश्चितच आनंद वाटला.

वरील फोटो जालावरून साभार. या फोटोचे वैशिष्ट्य असे की लिंकन मेमोरियल सूर्योदय समयी पाहिले असता लिंकन यांचे शिल्प रविकिरणांनी नाहून अतिशय तेजस्वी दिसते.

ही सहल झाल्यानंतर जालावर वाचायला मिळालेला एक गमतीशीर किस्सा म्हणजे या मेमोरिअलमध्ये असलेली स्पेलिंग मिस्टेक. लिंकन यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीचे भाषण भिंतीवर कोरलेले आहे. FUTURE शब्द कोरताना कारागिराने चुकून EUTURE असे कोरले. नंतर दुरुस्ती करण्यात आली असली तरी चूक सहजपणे लक्षात येते.

माहितीचा स्रोत: विकी

क्रमशः

 http://mr.upakram.org/node/1956

नूपोर्टचा रहस्यमय मनोरा

न्यूपोर्टचा मनोरा

न्यूपोर्ट हे अमेरिकेच्या र्‍होड आयलंड ह्या राज्यातले सुप्रसिद्ध गांव. हे गांव २-३ बेटांच बनले आहे आणि इतर शहरांना मुंबईच्या बांद्रा-वरळी सी लिंक सारखे दोन मोठ्या पूलांनी जोडले आहे.

काही जण ह्या शहराला गोव्याची उपमा देतात तर काहींना ह्या शहरातील 'राजवाडे' भारतातल्या राजस्थान मधल्या राजवाड्यांची आठवण करून देतात. भारतातले राजवाडे जास्त चांगले आहेत अशी प्रतिक्रियापण देतात. मी स्वतः राजस्थानमधले राजवाडे प्रत्यक्ष पाहिले नाही पण चित्रातून पाहिले आहे आणि माझीही प्रतिक्रिया आपल्या राजस्थानचे राजवाडे सुरेख आहे अशीच आहे.

२-३ राजवाडे पाहतांना मला तिथे लावलेल्या चित्रात एक दगडी मनोरा चित्रीत केलेला दिसला. उगाच मला त्या मनोर्‍यात काहीतरी रहस्य आहे असे वाटायला लागले. दगडी मनोरा होता. वरती छत नव्हते.

हा मनोरा कुठे आहे? त्याचे काय नाव आहे? त्याची चित्रे न्यूपोर्टच्या राजवाड्यात का लावली आहे? वैगरे... अशी प्रश्ने मनात आली.

मनात कुतूहल जागे झाले आणि त्याची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जमल्यास हा मनोरा आता कसा दिसतो ते पाहू असे ठरवले.

माझ्या ऑफिसमधल्या २-३ सहकार्‍यांना ह्या मनोर्‍याची काही माहिती आहे का हे विचारले पण काही हाती आले नाही. आंतरजालावर माहिती शोधण्याचे काम हाती घेतले. पण कोणते शद्ब शोधण्यासाठी वापरायचे ह्यात गोंधळ झाला आणि पाहिजे ती माहिती लवकर जमवता आली नाही. असे माझ्याबाबती वरचे वर घडत असते. म्हणून हार मानली नाही. शोधकार्य पूढे चालू ठेवले.

आणि एक दिवस माझ्या एका सहकारी मित्राने त्या मनोर्‍याला बरीच नावे आहे. त्यातील ही काही नावे - 'न्यूपोर्ट मनोरा', 'पोर्तुगिज मनोरा', गोल मनोरा', 'तोउरो मनोरा', रहस्यमय मनोरा' इत्यादि. पण त्याची अधिक माहिती माझ्याजवळ नाही. तु आंतरजालावर शोध. आणि जमल्यास येत्या शनिवारी किंवा रविवारी भेट दे.

कामाच्या नादात माहिती मिळवली नाही पण शनिवारी न्यूपोर्टला जावून ह्या रहस्यमय मनोर्‍याला भेट दिली होती.

चित्रात दिसत होता तसाच गोलाकार एकावर एक दगड रचून बांधलेला हा मनोरा होता. मनोरा बघितल्याचे समाधान वाटले होते. पण मला ह्या मनोर्‍यात काय रहस्य दडले आहे हे काही समजले नाही.

Newport Tower

रहस्य जाणून घेण्यासाठी आंतरजालावरून ह्या मनोर्‍याची जी माहिती मला मिळाली ती आपल्या सर्वांसाठी थोडक्यात देत आहे.

हा मनोरा कुठे आहे?
अमेरिकेच्या र्‍होड आयलंड ह्या राज्याच्या न्यूपोर्ट ह्या गावातल्या मिल स्ट्रीटवरच्या तोउरो पार्कमध्ये हा मनोरा आहे.

हा मनोरा कधी बांधला?
१७ व्या शतकामधे हा मनोरा पवन चक्की म्हणून बांधण्यात आला असावा असे मत आहे. पण हा मनोरा त्याच्या खूप आधीपासून अस्तित्वात असावा असे धागे-दोरे पुरातत्व विभागाच्या संशोधकांना सापडले आहे. अजूनही हा मनोरा कोणी आणि कधी बांधला याच्यावर संशोधन चालू आहे.

मनोर्‍याची कोणती वैशिष्ठे आहे?
मनोर्‍याची स्थापत्यकलेच्या दृष्टीकोनातील वैशिष्ठे: हा मनोरा उभा गोलाकार आहे. बाहेरचा जमिनीलगतचा गोलाकार भाग तेवीस फूट आहे. उंची साडे चोवीस फूट आहे. साडे सात फूट उंचीचे ८ गोलाकार खांबाचा हा मनोरा आहे. ८ पैकी २ खांब हे बाकीच्या ६ खांबांपेक्षा थोडे जास्त जाड आहेत. खांबांची जाडी जवळ पास ३ फूट आहे. मनोराच्या आतिल भाग जवळपास अठरा फूटाचा आहे. हे ८ खांब ८ गोलाकार घुमटाने जोडले आहे. त्यामुळे उलट्या इंग्रजी यू (U) ह्या अक्षराचे ८ आकार तयार झाले. हे आकार रोमन स्थापत्यकलेत वापरले जातात असे म्हणतात. चार खिडक्या ह्या खांबाच्या वरच्या भागातल्या भिंतीवर आहे. ह्या खिडक्यांच्या भागाला मनोर्‍याचा पहिला मजला असे ही संबोधतात. ह्या पहिल्या मजल्याच्या वरच्या भागात ३ खिडक्या आहेत. एक खिडकी ईशान्येकडे आहे. दूसरी खिडकी दक्षिणमुखी आहे, ती खिडकी अटलांटीक महासागराकडे बघते. तर तिसरी खिडकी पश्चिममुखी आहे.

Sketch Newport Tower

मनोर्‍याच्या आतील भागाच्या भिंतीत ७ खोलगट जागा आहे त्यामूळे त्या जागा 'फायर प्लेस' म्हणून वापरत असाव्यात असा अंदाज वर्तवला जातो. प्रत्येक खांबाच्या वरचा भागात आणि घुमटाकार भाग जेथे मिळतो तिथे त्रिकोनाकार छोटी खाच आहे. ही खाच लाकडाची तुळई अडकवण्यासाठी वापरात येत असावा असा अंदाज बांधला जातो.

ह्या मनोर्‍याच्या दगडांवर समुद्रातुन गोळाकेलेल्या शंख, शिंपले आणि चुनखडी यांच्या एकत्रीत बारीक केलेल्या चुर्‍या पासून तयार झालेल्या मिश्रणाचा वापर करून मुलामा दिलेला आहे.

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.

ह्या मनोर्‍यावर केलेले आता पर्यंतचे संशोधन कार्ये:

१) १८४८ ला मनोर्‍यावरच्या मुलाम्यावरचे संशोधन : न्यूपोर्टच्या डॉक्टर जॅकसन यांनी न्यूपोर्ट शहरातील इतर इमारतीवरच्या मुलाम्यात वापरलेले साहित्य आणि मनोर्‍याच्या मुलाम्यात वापरलेले साहित्य सारखे आहे का यांवर संशोधन केले आणि त्यांना असे आढळून आले कि हे साहित्य सारखेच आहे. जवळच्या समुद्रातून गोळा केले शंख, शिंपले, चुनखडी वैगरेच साहित्य वापरले गेले होते.

२) १९४८ – खोदणे : १९४८ साली न्यूपोर्टच्या शासनकर्तांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून ह्या मनोर्‍याचे संशोधन करायची परवानगी अमेरिकेच्या पुरातत्व विभागाला (Society for American Archaeology') दिली. संशोधनाचा एक भाग म्हणून जवळपास १ मिटर लांबीची नाली खोदली. ही नाली मनोर्‍याच्या आतील भागातून बाहेरच्या भागात जाईल अशाप्रकारे खोदली. ह्या संशोधनाच्या निरिक्षणातून असे निकर्ष काढण्यात आले की हा मनोरा १७व्या शतकात बांधला आहे. १६७७ सालाच्या आधी बेनेडिक्ट अर्नोल्ड (Benedict Arnold) ह्याने हा दगडी मनोरा पवनचक्की म्हणून बांधला असे समजले जाते.

३) 1992 - कार्बन डेटिंग टेस्ट: १९९२ साली डेनमार्क आणि फिनलंडच्या काही संशोधकांनी मनोर्‍यावरच्या मुलाम्याची रेडियो कार्ब्न डेटिंग टेस्ट (radiocarbon dating test) घेतली. ह्या तपासणीत हा मनोरा १६३५ ते १६९८ सालात बांधला गेला असावा असे आढळले.

४) २००६-०७ चे खोद चाचणी (excavation): २००६ च्या ओक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आणि २००७ च्या ओक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही चाचणी घेण्यात आली. मागच्या ६० वर्षातली तोउरो पार्कमधली ही पहिलीच चाचणी. ह्या चाचणीचा उद्देश हा मनोरा कोणी व कशासाठी बांधला हे शोधून काढणे हा होता. पुरातत्व विभागाच्या मते त्यांना ह्या संशोधनामुळे हा मनोरा १७च्या शतकात बांधला गेला ह्याच्या पैक्षा अधिक कोणतीच माहिती मिळाली नाही.

हा मनोरा समुद्रमार्गाने अमेरिकेत येणार्‍या प्रवाश्यांना ह्या बेटावर वस्ती आहे हे दर्शवणारा होता. अनेक प्रवासी न्यूपोर्टच्या बेटावर ह्या मनोर्‍याच्या खिडक्यातून होणार्‍या सूर्यकिरणाकडे आकर्षित होऊन ह्या बेटावर आले असाही एक समज आहे.

हा मनोरा आकाश निरिक्षणा साठी वापरला जात असे असापण एक समज आहे.

नक्की कोणी व कश्यासाठी हा मनोरा बांधला हे कोणाला ठामपणे सांगता येत नसल्यामुळे हा मनोरा रहस्यमय मनोरा आहे असे मला वाटते.

संदर्भ दुवे:
१) मनोरा कोणी बांधला
२) रहस्यमय मनोरा
३) संशोधनाचे प्रबंध

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

लेख रोचक आहे. मनोरा कशासाठी वापरला जात असेल याबद्दल उत्सुकता वाटते.

----

वा छान!

वा मस्तच झाला आहे हा लेख.
आवडला.
भरपूर माहिती आणि सर्वांगीण दृष्टीकोनातून.

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.
असे असेल तर या विभागात त्याची माहिती निश्चितच असेल.
असो,
लेख आवडला.

आपला
गुंडोपंत

मस्त

वा मस्तच झाला आहे हा लेख.
आवडला.
भरपूर माहिती आणि सर्वांगीण दृष्टीकोनातून.

सहमत आहे.. सचित्र माहितीपूर्ण लेख आवडला

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

निश्चित माहिती नाही

जून्या काळी अमेरिकन नेव्हीच्या बोटींवर व गणवेषावरच्या बिल्ल्यावर ह्या मनोर्‍याचे चित्रण केलेले होते.
असे असेल तर या विभागात त्याची माहिती निश्चितच असेल.

मला जे काही दूवे सापडले, त्यात ह्या विषयावरची जास्त माहिती सापडली नाही.

लेख आवडला

वेगळ्याच तर्‍हेचा लेख. मनोर्‍याचा उपयोग काय असावा याबद्दल कुतूहल वाटत आहे.

दूवे +

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...