https://www.misalpav.com/node/37120
काही गावं, जागा आणि शहरं वर्षानुवर्षे भेटूनसुध्दा आपल्याशी फटकून वागतात तर काही अगदी तटस्थ, अनोळखी राहतात. काही मात्र आपल्याला पहिल्या भेटीमधेच स्वत:च्या धाडकन प्रेमात पाडतात..... केप टाउन हे शहर हे निर्विवादपणे या तीसरया प्रकारात येतं.
स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाश, भर वस्तीत असूनही सतत असलेली निसर्गाची साथ, सभोवताली उधाणणारा महासागर, एका हाकेच्या अंतरावर असलेले द्राक्षांचे मळे, तर श्वास घ्यावा इतक्या सहजतेने या शहरात भिनलेला आणि रमलेला देशाचा मानबिंदू असा एकमेवाद्वितीय टेबल माउंटन!!!
आयुष्यात कधीतरी साऊथ आफ्रिकेला जायला पाहिजे अशी माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. तिथला अप्रतिम समुद्र, जंगल सफारी, गार्डन रूट आणि जमलंच तर इथून एका फ्लाइटच्या अंतरावर असलेला विक्टोरीया फॉल्स.... पण प्रत्येक वेळेस कधी सुट्टी नाही, तर कधी बजेट नाही तर कधी मुलांना घेऊन एव्हडा दहा अकरा तासांचा प्रवास करण्याची हिंमत नाही अशा कारणांमुळे बेत बारगळतच गेला. पण शेवटी या वेळेस मात्र आम्ही 'अब चाहे सर फुटे या माथा...' असे म्हणत तयारी सुरू केली. अर्थातच वरच्या सर्व कारणांमुळे फार महत्वाकांक्षी बेत ठरवणार नव्हतोच. बरीच काटछाट केल्यानंतर शेवटी केप टाउन, गार्डन रूट आणि सफारी साठी क्रुगर नॅशनल पार्क असा प्लान ठरला.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जायच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता विमानतळावर जाऊन पोहोचलो. चेक इन च्या रांगेत आमचा नंबर आला. सगळी कागद पत्रे बघीतल्यावर काउंटर वरच्या मुलाकडून प्रश्न आला की तुमची मुलं अठरा वर्षांखालची दिसताहेत त्यांचा जन्मदाखला कुठेय तो द्या...आता साऊथ आफ्रिकेत जातांना अठरा या वयाच्या खालील मुलांसाठी त्यांचा जन्म दाखला दाखवावा लागतो नाहीतर विमानात चढूच देत नाही ही आमच्यासाठी एक नवीनच माहिती होती. अर्थातच जन्मदाखले आमच्या सोबत नव्हतेच. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या मुलाला ''ओ, करून घ्या ना जरा अड्जस्ट...'' असे म्हणून बघितले. पुढच्या वेळी मुलांचेच काय पण आमचेही जन्माचे दाखले देईन असेही शपथेवर सांगितले. पण त्याने मला '' काहीही हां काकू......" टाइप लुक्स दिले आणि तातडीने आमचे दुसर्या दिवशीच्या फ्लाइट मधे बुकिंग करून तो मोकळा झाला...असो.
दुसर्या दिवशी पुन्हा अ ब क ड.. लवकर उठा, एक दीड तासांचा घर ते
विमानतळ प्रवास, चेक इन ची लाइन, सेक्यूरिटी इत्यादी प्रकार करत शेवटी
विमानात जाउन बसलो आणि दहा अकरा तासांनंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी केप
टाउन मधे येऊन पोहोचलो.
हॉटेल साधंच पण सोयीच्या मध्यवर्ती ठीकाणी होते. रूम वर जाउन आंघोळ केली
आणि ताजेतवाने झालो. रूममधेच पटकन कॉफी, बिस्किटे असलं काही बाही खाल्लं.
हॉटेलच्या मालकिणबाई उर्सुला खाली होत्या त्यांच्याकडून नकाशे घेतले आणि
गावात फेर फटका मारायला बाहेर पडलो.
ही काही क्षणचित्रे...
आम्ही जिथे राहत होतो त्या भागाचे नाव होतं बो काप. तेथलं वैशिष्ट्य म्हणजे ही रंगीत संगीत घरे.
इथला सगळ्यात लोकप्रिय भाग म्हणजे विक्टोरीया अँड आल्बर्ट वॉटरफ्रंट.
केप टाउनची शान. अतिशय सुंदर आणि उत्साहाने सळसळता असलेला हा भाग. काय
नाही इथे? रोज संध्याकाळी इथे चक्कर मारली तरीही कंटाळा येणार नाही इतक्या
गोष्टी करायला. पाण्याच्या कडेने असलेले रस्ते, बसायला बेंचेस. सायकलींग
करा, स्केट बोर्डींग, वॉक करा. सगळीकडे स्वच्छता आणि सुव्यवस्था.
सर्व प्रकारची असंख्य उपाहार गृहे, पब्स, कॅफेस. शॉपिंग साठी हाय एण्ड
ब्रॅंड्स मॉल पासून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणारे, तिथल्या वस्तू
विकण्यासाठीचे दुकानं, स्टॉल्स. मुलांसाठी एक छानसं अक्वेरियम तीथे आहे आणि
एक मोठा आकाश पाळणा देखील. त्या आकाश पाळण्यात बसून संपूर्ण शहर आणि
समुद्र असा नजारा उंचीवरुन बघता येतो . फारच सुंदर दृष्य असतं ते.
शहरात फिरतांना टॅक्सी हा उत्तम पर्याय आहे. शक्यतो हॉटेल वाल्याने ठरवून दिलेल्या टॅक्सी आम्ही वापरायचो पण एक दोन वेळेस रस्त्यावर टॅक्सी केली ती पण सुरक्षितच वाटली. दुसरा पर्याय तो म्हणजे हॉप ऑन- हॉप ऑफ बसेस. अगदी मस्तं भरवशाची सर्विस. आरामात बसच्या वरच्या मजल्यावर बसून केप टाउन फिरा. एखादी सुंदर जागा दिसली की त्या स्टॉप वर उतरा, कुठेतरी छान लंच करा मग पुन्हा बस मधे चढा. शहरात फिरतांना जाणवतं की निसर्गाची साथ इथे कधीच सुटत नाही.
केप टाउन हे शहर बाकी साऊथ आफ्रिकेच्या तुलनेत अतिशय सुरक्षित आहे. आम्ही मुलांना घेऊन रात्री उशिरा जरी परतलो तरीही आम्हाला कुठे भीती अशी वाटली नाही. नाही म्हणायला आमच्या हॉटेल मधे संध्याकाळ नंतर ग्रिलचा दरवाजा लावून घेण्याची पद्धत बघितली. आम्ही आलो की इंटरकॉम वरुन आल्याचं सांगायचो मग दार उघडल्या जायचं.
रात्री परतल्यावर उर्सुलाकडून दुसरया दिवशी कुठे फिरावं या बाबतीत विचारणा केली. त्यावर तिने सांगितले की येथील हवामान खूप लहरी आहे. त्यामुळे कुठेही जायचं असल्यास वेळेवरच बेत ठरवावा. खास करून टेबल माउंटन च्या बाबतीत. सकाळी उठल्यावर त्या डोंगराकडे बघावं डोंगरावरती ढगांचा पडदा दिसल्यास प्लान कॅन्सल. हवा चांगली नसेल तर वरती जायच्या केबल कार्स बंद ठेवतात.
टेबल माउंटन तर बघायचाच होता त्यामुळे दुसर्या दिवशी हवामान चांगले असु दे अशी आशा करत आम्ही झोपी गेलो.....
क्रमश:
सकाळी उठून खिडकीच्या बाहेर बघितलं तर हवा छान वाटली. ब्रेकफास्ट रूम मधे खाली गेलो तर अरसुला तिच्या दोन सहायकांबरोबर स्वत: एप्रन बांधून कामे करत होती. हाताने कामे आणि तोंडाने अखंड गप्पा...
चार पिढ्यांपुर्वी तिचे कुटुंब स्वित्झर्लंड मधून केप टाउन मधे स्थायिक झाले. रक्ताने स्विस असली तरी मनाने ती पक्की साऊथ आफ्रिकन आहे. काहीही गोंधळ झाला, प्रॉब्लेम आला तरी रिलॅक्स..यू आर इन केप टाउन. टॅक्सी यायला उशीर होतोय...रिलॅक्स, आज हवामान चांगलं असेल का नाही, कार रेंटल वाला फोनच करत नाहीये, ब्रेकफास्ट जरा जास्तंच आरामात बनतोय....सगळ्याला उत्तर...रिलॅक्स...!!!
आम्हाला सांगत होती की ती स्विट्ज़र्लॅंडला फारशी जात नाही, तिला आवडत नाही तिथे. ती शिस्त, काटेकोर हिशोबाने चालणार्या ट्रेन्स्, बसेस... नको वाटतंं म्ह्णाली. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर '' चार दिवसातच वैताग येतो गं , काय ते मिनिटा सेकंदाला बांधून चालणं, काय ते रूल्स, नियम. आय जस्ट गेट फेड अप अँड वॉंट टू फ्लाय बॅक होम.....
येथील सगळ्याच लोकांना आपल्या या शहराचं अतिशय प्रेम आणि अभिमान आहे. कुठलाही माणूस म्हणजे गौरवर्णीय सुद्धा मी मुळचा स्विस आहे का ब्रिटीश आहे का जर्मन असे कधी बोलतांना मला दिसला नाही. मी साऊथ आफ्रिकन आहे हेच नेहमी सांगणार. पण आता दुर्दैवाने हळू हळू परीस्थती बदलतेय. स्वातंत्र्य मिळाल्यापासून गोरे आणि कृष्णवर्णीय यांच्यामधे असंतोष वाढत चाललाय हे जाणवतं. याचं एक कारण या दोन समाजांमधली असलेली आर्थिक दरी हेही आहे. आम्हाला तरी असे आढळले की बहुतेक करून सगळे बेड अँड ब्रेकफस्ट, हॉटेल्स, रेस्टोरेंट्स, वाइनरीस ही सगळी गौरवर्णियांच्या मालकीची आहेत. जेवायला गेलो तरी गर्दी स्थानिकांपेक्षा जास्ती टूरिस्ट्सची. गुन्हेगारीचं प्रमाण बरंच आहे असेही ऐकलं. आमच्या सुदैवाने मात्र आम्हाला कधीच असुरक्षितता अशी वाटली नाही.
नाश्ता आटोपल्यावर टेबल माउंटन कडे निघालो. जाता जाता माउंटन कडे बघितले तर ढगांचा पडदा ज्याला इकडचे लोक टेबल क्लोथ म्हणतात तो नव्हता त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. गाड्या, बसेस, टॅक्सी केबल कार स्टेशन पर्यंत आपल्याला घेऊन जातात. हॉप ऑन हॉप ऑफ बसेस पण तिथपर्यन्त जातात. हा डोंगर शहरातच असल्यामुळे जाण्या येण्यात फार काही वेळ जात नाही. जातांनाचा रस्ताही मोठा सुरेख आहे.
केबल कार स्टेशन ला मात्र गर्दी खूप असते. दुपारच्या वेळी थोडीफार कमी गर्दी असते असे म्हणतात. केबल कार चे तिकीट घ्यायला खूप मोठी रांग होती. जे लोकं ऑनलाइन तिकीट काढतात ते थेट केबल कार च्या रांगेत जाऊ शकतात. आम्ही तिकिटे काढली नसल्यामुळे आम्हाला आधी तिकिटांच्या रांगेत उभे राहणं भाग होतं. पण तेथील शिस्त आणि नियोजन उत्तम होतं त्यामुळे रांग लांब जरी असली तरी पुढे सरकत होती. आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आणि हवा छान असल्यामुळे अजिबात कंटाळा येत नव्हता. तिकीट घेऊन पुन्हा केबल कार मधे चढे पर्यंत पुन्हा नागमोडी वळणे असलेली भलीमोठी रांग.
एक आहे मात्र या शहरात किंवा एकूणच या देशात आम्हाला लोक अतिशय आनंदी आणि नम्र वाटले. विमानतळे असो, टूर कंपनी चे लोक असु द्या, रेस्टौरेन्ट्स, दुकानं, सार्वजनिक ठीकाणे असोत की अशा साईट सीयिंग च्या जागी असलेले कर्मचारी असो सगळे खूप चांगले आणि मदतीला तत्पर असे होते. मुख्य म्हणजे इतक्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा नियोजन आणि सोयी अगदी उत्तम. तसेच सार्वजनिक स्वच्छताही खूप चांगली होती.
२०१२ मधे जगातील सात नैसर्गिक आश्चर्यापैकी एक म्हणून टेबल माउंटनची निवड करण्यात आली. स्थानिक रहिवासी याला माउंटन ऑफ द सी म्हणायचे. १५०३ मधे पहिल्या युरोपियन दर्यावर्दीने या डोंगरावर पाउल ठेवले आणि या डोंगराचा सपाट माथा पाहून त्याने याला टेबलाची उपमा दिली. याचं पठार जवळजवळ तीन किलोमीटर सपाट पसरलं आहे. इथे ऊभे राहीले की एका बाजूने डेविल्स पीक आणि दुसर्या बाजूने लायन्स हेड अशा दोन डोंगरांचे मोठे सुंदर दर्शन होते. डोंगराच्या कडा सरळसोट खाली ऊफाणणार्या अटलांटिक सागरात कोसळतात.
टेबल माउंटन ला वरती काही जण हाइक करतही जातात पण बहुतेक लोक मात्र या केबल कार्स चा पर्याय घेतात.
एका कार मधे जवळपास पन्नास लोकं आरामात उभे राहू शकतात. अतिशय हळूवार पणे
गोल फिरवत ही केबल कार आपल्याला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. खरंतर मला
उंचीवरुन खाली पाहायला नको वाटतं. पण या केबल कार मधे मात्र मी भीती बीती
साफ विसरून मंत्रमुग्ध झाल्यासारखी बाहेर पाहात होते. जमीनीवरुन
क्षणार्धात उचलून ही केबल कार आपल्याला डोंगराच्या सरळसोट कडेवरून सरसरत
वरती घेऊन जात असते आणि समोर खाली पसरलेला असतो नीळाशार, शुभ्र फेसाळत्या
लाटांचा समुद्र.......
वरती खालच्या पेक्षा तापमान बरंच कमी असतं आणि वाराही खूप असतो त्यामुळे एक जॅकेट नेहमी बरोबर ठेवावं. सर्व जागी चालायला आखून दिलेले मार्ग आहेत. फ्री वॉकिंग टूर्स पण असतात. या टूर्स मधे इथे आढळणार्या वनस्पती, झुडुपे, फूले आणि वन्यजीवना बाबत खूप चांगली माहिती दिली जाते. काही विशिष्ठ प्रकारच्या वनस्पती तर जगात फक्त याच डोंगरावर बघायला मिळतात. इथल्या खडक, दगडांवरून असा निष्कर्ष केला जातो की टेबल माउंटन हा सहाशे मिलियन वर्षे जुना आहे.
फिरतांना वेळेचं भान अजिबात राहात नाही. भन्नाट वारा, आजूबाजूच्या पर्वत रांगा, स्वच्छ सुंदर आकाश, खाली पाहिल्यास दिसणारं, डोंगराने आणि समुद्राने अर्ध गोलाकार वेढलेलं केप टाउन एखाद्या खोलगट बशीत सूबकपणे रचून ठेवल्यासारखं दिसतं....म्हणून याला सिटी बोल असेही म्हणतात.
वरती कॅफे आणि एक छोटंसं गिफ्ट शॉप पण आहे. टेबल माउंटन च्या वरती आजूबाजूचा निसर्ग पाहात आरामात लंच करणे अगदी मस्तं वाटतं.
चालतांना पठार सोपं आहे. रस्ते आखलेले आणि उत्तम स्थीतीत आहेत. कडे पण
व्यवस्थीत बांधले आहेत. पण तरीही चालतांना आणि मुख्य म्हणजे फोटो काढतांना
आपण थोडी खबरदारी घेतलेली नेहमीच चांगली. काही अती उत्साही पर्यटक खास
करून तरुण मूले फारच बेपर्वाइने वागतांना बघितले.
एक माणूस डोंगराच्या अगदी कडेला तोंडावर पुस्तक घेऊन गाढ झोपी गेला होता.
एक किंचित सुद्धा धक्का लागला असता तर हा मुलगा सरळ खाली
समुद्रात...स्ट्रेट ड्रॉप. चार मुलं, मुलींचा ग्रूप तिथेच काठावर
बाहेरच्या बाजूने पाय सोडून बसले होते. कर्मचारी शक्यतो लक्ष ठेवून असतात
पण ते सुध्द्धा किती बघणार? तो कडा उंच करावा किंवा तितक्या कडेपर्यंत
कोणाला जाऊच देऊ नये असे मनाला वाटून गेले.
या ठिकाणी कितीही वेळ झाला तरी मन भरत नाहीच पण एकतर वारा आता बोचरा व्हायला लागला होता आणि दुसरे म्हणजे परतीची रांग वाढायला लागली होती म्हणून दिल मांगे प्रचंड मोअर असतांना सुध्हा केवळ नाइलाजाने आम्ही त्या रांगेत जाऊन उभे राहिलो.
निसर्गाचं हे अफाट रूप फक्त मनात आणि डोळ्यात साठवायचं, शब्दात आणि कॅमेरात त्याला बांधणे फार अवघड आहे....
क्रमश:
कॅॅपस्टॅड, द मदर सिटी अर्थात केप टाउन!!!
अगदी आटोक्यात, हाकेच्या अंतरावर आणि सतत नजरेच्या टप्प्यात असणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही या शहराची खासियत आहे. समशीतोष्ण हवामान, समुद्र, डोंगर रांगा, मुबलक वन्यजीवन आणि त्याचबरोबर उत्तम कुझीन, शॉपिंग साठी असंख्य प्रकारचे पर्याय, मुलांसाठी सुद्धा झू, अक्वॅरियम्स.... जगभरातील पर्यटकांच्या बकेट लिस्ट मधे हे शहर नक्कीच खूप वरच्या नंबर असते. वेळ कसा जाईल हा प्रश्न नाहीच इथे उलट असलेला वेळ नेहमी कमीच पडतो मग ते चार दिवस असोत किंवा चार महिने....
केप टाउनचे मूळ रहिवासी खोई या जमातीचे लोक होते. साधारणपणे पंधराव्या शतकाच्या शेवटी युरोपियन दर्यावर्दींची या भागावर नजर पडली.
मग पुढे पोर्तुगीझ, स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटीश जहाजं इथे थांबू लागली. हे
खलाशी लोखंड आणि इतर धातूंच्या मोबदल्यात स्थानिकांकडून मांस विकत घ्यायचे.
भौगोलिक दृष्ट्या या भागाचे महत्व युरोपियन देशांच्या लक्षात यायला लागलं
होतं. युरोपातुन पुर्वेकडे जातांना मधे त्यांना एखाद्या मध्यवर्ती जागेची
गरज वाटायला लागली होती.... अशी जागा किंवा तळ कि जिथे साधनसामुग्री,
अन्नपाणी तसेच टपाल या सर्व गोष्टी भरून घेता येतील आणि पुढचा प्रवास
ताज्या दमाने करता येईल.
हाच हेतू घेऊन सोळाशे बावन्न मधे डच ईस्ट इंडिया या कंपनीने स्वत:चे
प्रतिनिधी इथे पाठविले. या डच लोकांनी वसाहतीला सुरूवात केली. कामासाठी
मजुरांची गरज पडू लागली तशी इंडोनेशिया, मादागास्करहून मजुरांना बोलावण्यात
आले. हळूहळू शहर वाढायला लागले. आधी डच मग नंतर ब्रिटीश वसाहतींनी इथे
राज्य केले.
केप टाउन पासून अर्धा तास बोटीच्या अंतरावर समुद्रात रॉबेन आयलंड नावाचे बेट आहे. डच वसाहत काळापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत या बेटाचा उपयोग हा गुन्हेगार, राजकीय विरोधक, बंडखोर यांचा तुरुंग म्हणून केला जायचा. सभोवताली खवळणारा समुद्र, भयंकर वादळी वारे, कायम पाउस असे हवामान म्हणजे सुटुन पळून जाण्याची शक्यता शून्य. जवळ जवळ साडे तीनशे वर्षे हा तुरुंग जुलमी, अभेद्य अशा साम्राज्यवादाचे प्रतीक म्हणून ओळखला जायचा.
राजकीय कैद्यांना आणि विरोधकांना रॉबेन आयलंड वर सगळ्या जगापासून दूर या एकांतावासात वर्षानुवर्षे ठेवले जायचे. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करून त्यांचे साहस आणि मनोधर्य मोडून टाकणे हा हेतू. नंतर इंग्रज राजवटीत तर कैद्यांबरोबरच इथे कुष्ठरोग आणि अशाच गंभीर आजाराने ग्रासलेले लोक आणि मोकाट प्राणी यांना बाकी समाजापासून दूर ठेवण्यासाठी उपचाराचे कारण देऊन या बेटावर आणले जायचे. त्यांना इथून परत जायला बंदी असायची.
एकोणीसशे साठ नंतर साऊथ आफ्रिकेत वर्णभेद तसेच वांशिक भेदाविरुद्ध जी चळवळ चालवल्या गेली होती त्यामधले बहुतेक करून सर्व कैद्यांना याच तुरुंगात ठेवल्या गेले होते. नेल्सन मंडेलांनी इथे सत्तवीस वर्षे काढली. साऊथ आफ्रिकेच्या आत्तापर्यंतच्या तीन राष्ट्रपतींनी रॉबेन आयलंड वर राजकीय तुरुंगवास भोगला आहे.
गेल्या काही वर्षांपासून मात्र रॉबेन आयलंड वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित झाले आहे आणि तुरुंगाचे रुपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करण्यात आले आहे.
हवामानाच्या बाबतीत आमचं नशीब पुन्हा जोरदार निघालं. बाहेर स्वच्छ उन पडलं होतं आणि वारा अजिबात नाही. बोट प्रवासासाठी हे आयडियल होतं कारण वारा भरपूर असेल तर बोटी निघतच नाहीत त्यामुळे आयलंडला जाणे अर्थातच कॅन्सल होते.
दुपारनंतर समुद्र जरा रफ होतो असे आम्ही ऐकलं होतं त्यामुळे पहिलीच फेरी घेण्याच्या इराद्याने आम्ही सकाळी व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट वॉटरफ्रंट ला जायला निघालो. सकाळची वेळ होती तरी खूप रहदारी नव्हती. सिग्नल ला थांबल्यावर द्राक्ष, केळी वगैरे विकायला काही लोकं गाडीजवळ येत होते.
आमचा टॅक्सी ड्रायवर त्याचा रॉबेन आयलंडचा अनुभव आम्हाला सांगत होता. त्याला तिथे जायची खूप उत्सुकता होती. पोहोचल्यावर सगळा तुरुंग बघेपर्यंत तो ठीक होता. मग थोड्यावेळाने मात्र तिथल्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर असा झाला की त्याला छातीत धडधडायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं. इतका जबरदस्त पॅनिक अटॅक की तो सांगत होता की आयलंड वरुन समोर केप टाउन शहर दिसत होते. त्याला अक्षरश: त्या समुद्रात झोकून देण्याचा मोह झाला एक क्षण...जणू काही तो कैदी आहे आहे आणि काहीही करून त्याला या कैदेतून सुटून पुढे दिसत असलेल्या मुक्त समाजात परत जायचंय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या आयलंडच्या वातावरणात एकप्रकारचा ताण आहे, दु:ख आहे जे तीथे जाणार्या प्रत्येकाला कमीजास्ती प्रामाणात का होईना पण जाणवतं. तुरुंगवासात असलेल्या लोकांचे अश्रू, शाप, निश्वास, संताप, हतबद्धता या सर्वांचा परिणाम वातावरणावर होणारच.....
टूरचे ऑनलाइन बुकिंग करता आले तर चांगलेच आहे पण आम्ही वेळेवर जाऊन तिकीट काढले. तिकिटाच्या किमतीत बोटचे तिकीट इंक्लूडेड असतं. रांग सुद्धा फार काही लांब नव्हती. तिकीट काढून झालं की तिथेच तुमची पर्स, बॅकपॅक सुरक्षिततेच्या कारणाने तपासतात आणि मग बोटीत चढा. एकूण सगळा प्रकार शिस्तबद्ध आणि वेळेवर. कुठेही गोंधळ नाही किंवा कुठे उशीर होतोय असे कधीच झाले नाही.
अर्धा तासाचा प्रवास करून आमची बोट आयलंडला जाऊन पोहोचली. तिथे जवळच बसेस उभ्या होत्या त्यापैकी एका बस मधे जाऊन बसलो. बस मधे गाइड होता तो सगळ्या आयलंडची आणि तिथल्या इमारतींची, अवशेषांची चांगली माहिती देत होता.
कुष्ठरोगी आणि अन्य रुग्णांची दफनभुमी
दुसरया महायुद्धाच्या काळात या बेटावर लष्करी तळ बनवला होता. तेव्हाच्या बराकी.
तुरुंगवासीयांना या चुन्याच्या खाणीत काम करावे लागायचे. दिवसभर उन्हातान्हात कैदी अर्धपोटी काम करायचे. नेल्सन मंडेला यांच्या सहित कित्येक लोकांना उन्हाच्या तीव्र प्रकाशात सतत काम करून पुढे गंभीर दृष्टीदोष निर्माण झाले.
बस फेरीच्या मधे एक वीस मिनिटांचा ब्रेक देतात. तिथे स्वच्छ
प्रसाधनगृहे आहेत. जवळंच छोटासा कॅफे पण आहे. समुद्र सपाटीपासून हे बेट
अगदीच कमी उंचीवर आहे त्यामुळे तिथे समुद्र अगदी जवळ आलेला वाटतो.
बस आपल्याला तुरुंगाच्या दाराशी आणून सोडते.
दारावरच तुरुंग दाखविण्यासाठी गाइड असतो तो सर्वांना आत घेऊन जातो. हे
गाइड्स म्हणजे तुरुंगातील माजी कैदिच असतात. त्याना तुरुंगाची, त्याच्या
इतिहासाची अतिशय चांगली माहिती असते आणि उत्तम इंग्रजी भाषेत हे गाइड्स
आपल्याला माहिती देतात.
ही नेल्सन मंडेला यांची कोठडी. अशा महत्वाच्या राजकीय कैद्यांसाठी वेगळे स्वतंत्र सेल्स असत. हेतू असा की ही माणसं सामान्य कैद्यांमधे मिसळायला आणि त्यांच्यावर प्रभाव पडायला नको. एक झोपण्यासाठी सतरंजी, छोटं टेबल आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे टाय्लेटच्या जागी फोटोत दिसतेय ती लाल बकेट :(
ही सामान्य कैद्यांसाठी सार्वजनिक झोपण्याची खोली.
टूर पूर्ण करायला सुमारे दोन तास लागतात. सकाळी टॅक्सी ड्रायवरने सांगितल्याप्रमाणे तेथील वातावरणात एकप्रकारचा उदासपणा म्हणा किंवा गांभीर्य जाणवतं हे खरंय. बाहेर आल्यावर सर्वच लोक अत्यंत शांत अंतर्मुख झाले होते.. जड मनाने आम्ही बोटीत बसलो.
केप टाउनला पोहोचताच तिथल्या मुक्त, मोकळ्या वातावरणात आल्यावर जरा बरं वाटलं. सहजतेने गृहीत धरत असलेल्या स्वातंत्र्याची किंमत त्यादिवशी मला खरोखर जाणवत होती.....वॉटरफ्रंटच्या त्या मुक्त, उत्साहाने रसरसणार्या वातावरणात येऊन मी मोकळेपणाने श्वास घेतला आणि देवाला अगदी मनापासून थॅंक यू म्हणाले....
क्रमश:
मला ना लहानपणी काही विशिष्ठ गावे आणि जागा या निव्वळ दंतकथा वाटायच्या. उदाहरणार्थ - टिमबकटू , झुमरीतलैय्या किंवा केप ऑफ गुड होप. मला ही ठिकाणं म्हणजे अनुक्रमे- वाक्प्रचार म्हणून वापरायला, फिल्मी गाण्यांच्या फर्माईशी पाठवायला आणि वास्को डी गामाला शॉर्ट कट मारुन हिंदुस्तानात येता यावे म्हणून निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टी वाटायच्या…….
पुढे वयोमानपरत्वे समजले की या जागा दंतकथेतल्या नसून खरोखरीच अस्तिवात आहेत. त्यापैकी केप ऑफ गुड होपला तर आज प्रत्यक्ष जाण्याचा आमचा बेत ठरला होता. सहाजीकच तीथे जाण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक होतो.
ब्रेकफास्ट नंतर आम्हाला घ्यायला आमची टूर गाइड आली होती. तिचे नाव मर्टल. साधारणपणे आज काय काय बघायचे यावर मर्टलशी थोडी चर्चा केली. गाडी तिचीच होती. केप टाउन मधे असेपर्यंत आम्ही गाडी रेंट केली नव्हती, तशी गरजच वाटली नाही. एकतर आमचे राहण्याचे हॉटेल खूप मध्यवर्ती जागी होते आणि सगळीकडे फिरायला टॅक्सी आणि हॉप ऑन हॉप ऑफ बसेस खूप सोयीच्या आहेत. शहराच्या बाहेर जायचे म्हणजे मग मात्र रेंटल कार हवीच कारण या भागात ट्रेन्स्, बसेस जवळपास नाहीतच.
सुमारे साडे नऊ वाजता आम्ही हॉटेल मधून निघालो. आज आमचा या शहरातला शेवटचा दिवस होता त्यामुळे हवामानाला आज सुद्धा चांगले असण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नाहीतर हा शेवटचा दिवस अगदी वाया गेला असता.
केपटाउन पासून साधारण दोन तासांच्या ड्राइविंगच्या अंतरावर केप पॉइण्ट / केप ऑफ गुड होप आहे. हा भाग म्हणजे साऊथ आफ्रिकेचे अगदी दक्षिण टोक. रस्ता जरी दोनच तासांचा असला तरीही तिथे जाऊन यायला पूर्ण एक दिवस राखून ठेवावा लागतो. याचे कारण असे की हा संपूर्ण मार्ग समुद्राच्या कडेकडेने जातो. अधेमधे सुंदर समुद्र किनारे आणि डोंगर रांगा....जातांना मधेच कुठेतरी थांबून निवांतपणे निसर्ग डोळ्यात भरून घ्यावा. डोंगराच्या कडेला गाडी उभी करावी आणि भान हरपून खाली उसळणार्या लाटांकडे बघत बसावे. हिरव्या- निळ्या रंगांच्या इतक्या अगणीत छटा त्या पाण्यात पाहतांना मन अगदी थक्क व्हायला होते. रस्ते अतिशय उत्तम आहेत. डोंगरांमधून बरेच वेळा रस्ता जातो पण तरीही तो मला कधी धोकादायक वाटला नाही. अप्रतिम हवा, अगदी बेताची रहदारी, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, ऐसपैस गाडी, आजूबाजूला वेड लागेल असा निसर्ग आणि गाडीत कटकट न करता शांत बसलेली मुलं......सुख, सुख काय म्हणतात ते हेच हो.....
केपटाउनच्या दक्षिणेला चॅपमन'स पीक हा पर्वत आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्याला चॅपमन'स पीक ड्राइव म्हणतात. हा ड्राइव केप टाउन मधे आल्यास तुमच्या मस्ट विज़िट यादीमधे असावाच. सुदैवाने इथे जायला विशेष काही वेगळे करावे लागत नाही. केप पॉइण्ट कडे जातांना अनायसे इथूनच जावे लागते. या डोंगराचा पश्चिमेकडील भाग हा म्हणजे एक प्रचंड सरळसोट कडा आहे, जणू एखादी भिंत . ही भिंत उतरते ती थेट खाली अटलांटिक महासागरात.....आणि या सरळ सपाट भिंतीला जो आडवा, नागमोडी रस्ता छेदून जातो तो म्हणजे चॅपमन'स पीक ड्राइव. अत्यंत सुरेख मार्ग. अरुंद आहे पण तरीही व्यवस्थीत बांधला आहे त्यामुळे घाट वळणाचा असूनही कुठेच भीती वाटत नाही.
डोंगराचा माथा म्हणजे चॅपमन'स पीक. इथे उभे राहून जो सृष्टीचा जो अप्रतिम नजारा दिसतो त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही……
साऊथ आफ्रिकन नौदलाचा तळ आणि आफ्रिकन पेंग्विन्सची वस्ती या दोन गोष्टींसाठी सायमन्स टाउन हे शहर प्रसिद्ध आहे. केप टाउन आणि केप पॉइण्टच्या बरोबर मधे हे टूमदार गाव आहे. इथून हार्बरचा नजारा खूप छान दिसतो. गाडी थांबवून या गावात आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. डोंगर पायथ्याशी असलेले हे सुंदर गाव. रस्त्याच्या दुतर्फा छोटी, छोटी दुकाने, कॅफे आणि रेस्टोरेंट्स आहेत.
जवळच बोल्डर बीच आहे. आफ्रिकन पेंग्विन्स सहजासहजी भरवस्तीत बघायला मिळत
नाहीत. हे पक्षी इतक्या जवळून पाहता येतील अशा अत्यंत कमी जागा आहेत
जगभर. सायमन्स टाउन शहर आणि हा किनारा त्यापैकी एक.
बीच एखाद्या शांत सरोवरासारखा आहे. मुलांसाठी पाण्यात खेळायला अगदी
सुरक्षित. हे बोल्डर्स करोडो वर्षे प्राचीन आहेत असे म्हणतात . पाण्यात
पोहतांना आपल्याबरोबर पेंग्विन्सही मस्तं पोहत असतात. त्यांना लोकांची इतकी
सवय आहे की ते बिनदिक्कतपणे आपल्या जवळ येतात. फोटोसाठी पोज़ वगैरे सुद्धा
देतात......
या बीच पासून अगदी जवळच फॉक्सी बीच आहे. भरपुर पेंग्विन्स बघायचे असतील तर या फॉक्सी बीच वर जावे. पार्किंग लॉट मधे पार्किंग करून, बीच तिकीट काढून आम्ही आत गेलो. समुद्र किनारी किंचित उंचीवर लाकडी पायवाटा बनवल्या आहेत. इथे फक्त या प्लॅटफॉर्म वरुनच फिरता येते. पेंग्विन्सची सुरक्षितता आणि संवर्धन हा उद्देश. आपल्यासाठी सुद्धा हे पक्षी पाहण्याची ही उत्तम सोय आहे. या पायवाटेवरुन फिरत फिरत हजारो पेंग्विन्स आपल्याला अक्षरश: हाताच्या अंतरावरून पाहायला मिळतात. आरामात किनार्यावर पहुडलेले असतात, तुरुतुरू चालत असतात आणि मस्तं मासोळी सारखे पाण्यात पोहायला सूर मारत असतात. पंचवीस वर्षांपूर्वी पेंग्विनची नर आणि मादी अशी एक जोडी आणल्या गेली होती आज जवळपास तीन हजारांवर त्यांची संख्या गेलीय. या किनार्याजवळच्या पाण्यात पेंग्विन्स जे मासे खातात ते मासे मुबलक प्रमाणात आहेत याचबरोबर या पेंग्विन्सची काळजी देखिल अतिशय चांगल्या तर्हेने घेतली जाते.
इकडे दिवसभर वेळ घालवला तरीही कमीच वाटेल पण आम्हाला रेंगाळण्याची ऐश
परवडण्यासारखी नव्हती. जितका उशीर केप पॉइण्टला पोहोचायला होईल तितकी
येतांना ट्रॅफिक मधे फसण्याची शक्यता जास्ती. वर पुन्हा इथल्या हवेचा काही
भरवसा देता येत नाही त्यामुळे हवा चांगली आहे तोपर्यंत फिरून घ्यावे असा
आमचा हिशोब.
आता आजच्या दिवसाच्या हायलाईटकडे म्हणजेच केप पॉइण्टकडे आम्ही निघालो होतो.
वाटेत यांचेही दर्शन झाले...
केप पॉइण्ट जसा जवळ येत चालला होता तशी आमची उत्सुकता अगदी उतू जायला लागली होती. साधारणपणे शेवटी दुपारी तीन ते चारच्या सुमारास आतापर्यंत जो फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकातच आम्हाला भेटला होता त्या केप ऑफ गुड होपच्या दाराशी आम्ही जाऊन पोहोचलो.........
सर्वात दक्षिणेच्या टोकाला 'केप अघुलस' असे म्हणतात (जिथे हिंद व अटलांटिक महासागर संगम होतो), केप ऑफ गुड होप हे सर्वात दक्षिणेकडे नाही.
असो तिथे एक दोन्ही महासागरांच्या संगमावर काल्पनिक रेषा (मॉन्युमेंट) आहे, त्या रेषेच्या वर उभे राहून (दोन्ही पायांच्या मध्ये रेष येईल) अश्या रीतीने फोटो काढणे मस्ट असते !!!
क्रमश:
पंधराव्या शतकात म्हणजे साधारणपणे १४८८ मधे पहिला युरोपियन दर्यावर्दी Bartolomeu Dias केपच्या किनार्यावर येऊन पोहोचला. येथील रुद्र वादळी लाटा, अत्यंत ओबडधोबड खडकांचा किनारा, बेभरवशाचे हवामान आणि सैतानी वेगाचे वारे अनुभवल्यामुळे या भागाला त्याने नाव दिले ' केप ऑफ स्टॉर्म्स'. हळूहळू मात्र केपला वळसा घालून सुदूर पूर्वेला जाणे शक्य आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात यायला लागले होते. इथून आपल्याला पूर्वेकडच्या देशांशी दळणवळणाचा आणि व्यापाराचा राजमार्ग मिळतोय हे एकदा समजल्यावर मग केप ऑफ स्टॉर्म्स हे निराशादायी नाव मागे पडून 'केप ऑफ गुड होप' हे नवीन नाव प्रचलित झाले.
केप पॉइंटला उंचावर एक लाइट हाउस आहे. तिथे जायला एकतर पायी चालत
जाण्याचा पर्याय आहे आणि दुसरा म्हणजे लाइटहाउसच्या अगदी पायाशी तुम्हाला
आरामात घेऊन जाणारी फूनिक्युलर आहे. हा अतिशय आरामदायी आणि सुखद पर्याय
आहे.
बेस स्टेशनला तिकीट मिळतात ती तिकिटे घेऊन आम्ही गाडीत जाऊन बसलो. रांग अशी
नव्हतीच आणि असती तरी त्या गाडीमधे एकावेळेस बरेच लोक मावत असल्यामुळे
रांग पटापट पुढे सरकली असती. अवघ्या तीन मिनिटात आपल्याला ही झुकझुकगाडी ८७
मीटर्स उंचीवर सरसरत घेऊन जाते.
या फूनिक्युलरचे नाव आहे ' फ्लाईंग डचमन'. या नावामागे एक आख्यायिका आहे.
धोकादायक हवामानामुळे या किनार्यावर जहाज दुर्घटना नेहमीच्याच होत्या.
खडकाळ किनार्यावर आपटून किंवा राक्षसी लाटांमुळे जहाजे नष्ट व्हायची. अशाच
एका दुर्दैवी जहाजाचे नाव होते 'फ्लाइयिंग डचमन'. अजूनही हे भूताळी जहाज
अधेमधे समुद्रात दिसते अशी दंतकथा आहे.
वारा इतका भन्नाट असु शकतो हे आम्हाला वरती आल्यावर जाणवलं. पुर्वी याला केप ऑफ स्टॉर्म्स का म्हणायचे क्षणार्धात लक्षात येत होते. पंचमहाभूतांपैकी वायू आपले 'भूत' हे विशेषण त्यादिवशी अगदी सार्थ करत होता. लहान मुले आणि शरिराने किरकोळ असलेल्या व्यक्ती वार्याच्या जोराने खाली खडकांवर किंवा समुद्रात पडतात की याची मला वाटायला लागली. लाइटहाउस पर्यंत जायला उत्तम बांधलेल्या पायरया आहेत. या उंचीवरुन दिसणारा नजारा केवळ अप्रतिम... शब्दात मांडता येणार नाही इतके अफाट, रुद्र-नीळे सौंदर्य!!!!!
खाली दिसतोय तो केप ऑफ गुड होप...
एव्हाना वार्याचा जोर इतका वाढला होता की मला डोळे सुद्धा उघडे ठेवणे
कठीण जाउ लागले. मुलांना तर आम्ही घट्ट पकडूनच ठेवले होते. कसेबसे जीव
मुठीत धरून खाली आलो आणि तडक खाली जायच्या गाडीत बसलो.
बेस स्टेशनला काही कॉफी शॉप्स, गिफ्ट शॉप आणि एक रेस्टोरेंट आहे. खरंतर
रेस्टोरेंट मधे आरामात बसून खाली अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्याकडे बघत
लंच करण्याचा आम्हाला खूप मोह होत होता पण मर्टलने तो बेत हाणून पाडला.
तिचेही बरोबर होतं तिने सांगितलं की आपण जेवणातच दोन तास घालवले तर येतांना
ट्रॅफिक मधे अडकण्याची शंभर टक्के निश्चिंती. मग काय..आम्ही एका
दुकानामधून सॅण्डवीचेस, कॉफी घेतली आणि एका बेंचवर बसून जेवण आटोपले.
खाली पाचच मिनिटावर केप ऑफ गुड होप आहे. तीथे 'केप ऑफ गुड होप' लिहिलेला एक फलक आहे. या फलकाच्या पुढे उभे राहून फोटो काढण्यासाठी पब्लिकची काय ती मरमर....आजूबाजूचा अप्रतिम निसर्गाची मजा घेण्याच्या ऐवजी प्रत्येकाचे लक्ष्य जणू फक्त पाटीचा फोटो काढणे हेच होते. आधी त्या लोकांना आम्ही मनसोक्त आणि यथासांग नावे ठेवली मग लगेच त्या गर्दीत मोठ्या उत्साहाने सामील झालो....
केप टाउन मधला आमचा हा शेवटचा दिवस अतिशय सुरेख गेला होता. निसर्गाने
दिलेले या शहराला दिलेले दैवी निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आता आम्ही
परतीच्या प्रवासाला लागलो...
दिवसभर खूप प्रवास झाला होता पण प्रवासाचा शीण मात्र अजिबात नव्हता. उद्या
केप टाउन सोडण्याची हूरहुर लागली होती. मग जास्तीत जास्तं वेळ इथे घालवावा
म्हणून टूर संपल्यावर मर्टलला हॉटेलच्या ऐवजी वॉटरफ्रंट जवळ आम्हाला
सोडायला सांगितले. वॉटरफ्रंटला थोडावेळ फिरलो आणि मग तिथल्याच एका भारतीय
रेस्टोरेंटमधे जेवायला गेलो. जेवण अगदी चविष्ठ होते. आम्हाला वाढणारा
कर्मचारी भारतीय वंशाचाच होता. त्याचे कुटुंब चार पाच पिढ्यांपुर्वी इथे
आले. हा मनुष्य कधी भारतात गेलेलाही नाहीये पण भारताविषयी त्याचा जिव्हाळा,
प्रेम त्याच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होता. मातीची ओढ म्हणतात ती हीच…
आम्ही दुसर्या दिवशी हॉटेलमधून चेकाउट केले आणि रेंटल कार घेतली. आजपासून पुढचे चारपाच दिवस आम्हाला हीच कार वापरायची होती.
केप टाउनच्या आजूबाजूचा परिसर केप वाइन्लॅंड्स म्हणून प्रसिद्ध आहेत.
इथल्या द्राक्षांपासून निर्माण झालेल्या वाइन्स जगभर प्रसिद्ध आहेत.
त्यामुळे केप टाउनची सफर ही एखाद्या वाइनरीला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊच
शकत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते.
शहराच्या पूर्वेला स्टेलेनबोश नावाचे गाव आहे. स्टेलेनबोश हे गाव आणि सभोवतालचा मोठा परिसर द्राक्षांच्या शेतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथली द्राक्षे खाण्यासाठी नाहीत तर वाइन बनविण्यासाठी जास्ती उपयोगी आहे. डच लोकांनी इथे सर्वप्रथम द्राक्षांच्या लागवडीची सुरूवात केली. सुपीक जमीन आणि भूमध्यसागरी हवामानामुळे हा भाग लवकरच केप वाइन्लॅंड्स म्हणून भरभराटीला आला.
केप टाउन ते स्टेलेनबोश हा रास्ताही मोठा सुंदर आहे. आम्ही निघालो
तेव्हा सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाश, हवेत किंचित गारवा.
रस्त्याच्या दोन्हीबाजूला आखीव रेखीव द्राक्षांचे मळे आणि दूरवर दिसणारे
डोंगर.....
एका वाइनरी मधे आम्ही गाडी थांबवली. या वाइनरीचा परिसर प्रचंड मोठा आहे.
अतिशय सुरेख हिरवळ, मधोमध तलाव, आजबाजूला हिरवीगार झाडे, मुलांसाठी
खेळण्यासाठी जागा, वेलींचे मांडव, बसायला बेंचेस आहेत...... फारच सुंदर आणि
स्वच्छ. तळ्याच्या काठी शांतपणे नुसते बसून राहावेसे वाटत होतं.
जेवण्यासाठी, वाइन टेस्टिंग आणि वाइन विकत घेण्यासाठी त्यांचे एक छान प्रशस्त रेस्टोरेंट आणि वाइन सेलर आहे. वाइन टेस्टिंगसाठी हे खूप प्रसिद्ध आहे असे म्हणतात.
मेनु मधे मोठ्यांसाठी वाइन्स आणि लहान मुलांसाठी जूस टेस्टिंग दोन्ही
आहे. वाइनमधे तीन प्रकारच्या वाइन्स- एक अगदी माइल्ड, एक थोडी कमी माइल्ड
आणि एक जरा स्ट्रॉंग. ग्रेपजूस मधेही तीन वेगवेगळ्या प्रकारच्या
द्राक्षांचे जूस.
पुढे ड्राइविंग करायचे असल्यामुळे त्यादिवशी ड्राइव न करणार्या सदस्यासाठी
वाइनसॅंपलिंगची आणि मुलांसाठी जूसच्या ऑर्डर्स आम्ही दिल्या आणि बरोबर
चीज़,ऑलिव्स अँड क्रॅकर्स….
या मळ्यात खरे म्हणजे आरामात दिवस घालवता येऊ शकतो. पण आम्हाला पुढे प्रवास करायचा होता. अगदी नाइलाजाने या टुमदार गावाचा आणि केपटाउनचा निरोप घेऊन आम्ही शेवटी गार्डन रूटच्या दिशेने निघालो......
क्रमश:......
साधारणपणे केपटाऊन पासून पूर्वेला पोर्ट एलिझाबेथ पर्यंतच्या आठशे किलोमीटरच्या पट्ट्याला गार्डन राउट असे नाव आहे. निळाशार समुद्र आणि त्याला बिलगुन वळणावळणाने पुढे जाणारा हा गार्डन रूट. उधाणणारा समुद्र, रूपेरीसुंदर समुद्रकिनारे, डोंगर रांगा, शांत स्वच्छ तळी, सरोवरे, जंगलं, द्राक्षांचे मळे, हिरवीगार समृद्ध वनराई त्याचबरोबर लहानसहान टूमदार गावं, गोल्फ कोर्सस, अभायरण्ये, पेटिंग झू, उत्तमोतम कॅफे, रेस्टोरेंट्स, शॉपिंगसाठी तुरळकच पण उत्तम दुकाने...असा हा गार्डन रूट! मात्र या भागात फिरण्यासाठी गाडी जरूरी आहे किंवा दुसरा पर्याय आहे गार्डन रूट टूर पॅकेज घेणे.
स्वच्छ, उत्तम रस्ते, सोबतीला वेड लावेल असे निसर्ग सौंदर्य. हे
सौंदर्य, इथला समुद्र काही औरच आहे. तीन चार दिवस हाताशी ठेवून केप टाऊनहून
निघा. रमत गमत ड्राइव करत मधूनच एखाद्या समुद्रकीनारी गाडी
थांबवा...सागराची ती अथांग निळाई डोळ्यात साठवून घ्या. जवळच एखाद्या कॅफे
मधे लंच करा आणि पुढे चला. वाटेत अनेक टुमदार गावं आहेत तिथे मनसोक्त
फेरफटका मारा, वाटलं तर कुठेतरी बसून मस्तं कॉफी प्या. रात्री एखाद्या
गावात मुक्काम करा. उठल्यावर जवळपासच्या शांत तळ्याकाठी फिरून या. नाहीतर
कुठल्या एका फार्मवर चक्कर टाका. ट्रेकिंग करा, बोट राइड घ्या, रिवर
रॅफटिंग, व्हेल वाचिंग मुलांसाठी झू....एक ना दोन! असंख्य पर्याय आहेत इथे.
सगळीकडे चांगल्या दरात हॉटेल्स उपलब्ध असतात. फिरतांना आम्हाला तरी अतिशय
सुरक्षित वाटले. कुठेही अस्वछ्ता, गबाळेपणा आढळला नाही सुदैवाने. रस्ते
सुद्धा उत्तम. फक्त एक गोष्ट जरा जाणवली ती म्हणजे इथे असलेला सार्वजनिक
वाहतुकीचा अभाव. त्यामुळे भर महामार्गावर लोक आपल्या मुलाबाळा सकट
येणार्या जाणार्या गाड्या, ट्र्क्स ना लिफ्ट मागतांना दिसले. हातातले
पैसे दाखवून हे लोक भस्स्कन रस्त्यावर येतात तेव्हा जरा आपल्याला बिचकायला
होतं. तेव्ह्डा एक लहानसा अपवाद सोडला तर हा संपूर्ण प्रवास अतिशय सुखकारक
होता.
न्यास्ना (knyasa) हे या देवभूमीचे हृदय!!!
केपटाऊन पासून सुमारे सहा सात तासांच्या अंतरावर असलेले नितांतसुंदर शहर.
गार्डन रूट मधली जवळपास सर्वच सुंदर ठिकाणे या न्यास्ना पासून एका दिवसात
जाऊन परतता येतील अशी आहेत. इथे तंबू टाकून जवळपासच्या पर्यटन स्थळान्ना
भेटी द्याव्या असा विचार आम्ही केला. पुढचे काही दिवस आमचा मुक्काम इथेच
होता.
न्यास्नाला पोहोचेपर्यंत चांगलीच रात्र झाली होती. आम्ही गावात एके ठिकाणी
जेवून घेतलं. दूध, ब्रेड, फळे अशी सटरफटर खरेदी केली आणि मुक्कामाच्या
हॉलिडेघरी येऊन निवांत झोपी गेलो.
दुसर्या दिवशी उठल्या उठल्या घरातूनच बाहेरचा जो काही नजारा दिसला त्याने धप्पकन न्यास्नाच्या प्रेमात पडलो....
हिरव्यागार पर्वतरांगांनी वेढलेले, खळखळणारी नदी उशाला आणि निळ्याशार
न्यास्ना लगूनला कुशीत घेऊन निवांत पहुडलेले हे हिंदी महासागराच्या
किनर्यावरचे हे देखणे रत्न. हसतमुख लोक, आल्हाददायक हवामान, चविष्ट जेवण
आणि मुख्य म्हणजे सर्व आधुनिक सुखसोयी असूनही आपली शांत आरामशीर जीवनशैली
जपणारे हे गाव.
इथल्या असंख्य पर्यटन स्थळांपैकी प्रमुख आहे न्यास्ना हेड्स! न्यास्ना
लगूनच्या प्रवेशद्वारापाशी उभे असलेले दोन द्वारपाल. गावातूनच एक सुंदर
नागमोडी रस्ता आपल्याला या हेड्स म्हणजे डोंगरावर घेऊन जातो. कार पार्क
करून किंचित अंतर पायी गेले की व्यूयिंग प्लॅटफॉर्म आहे. व्यूयिंग
प्लॅटफॉर्मवरुन खाली लगून आणि हिंदी महासागराचा अप्रतिम नजारा दिसतो. जवळच
असलेल्या पायवाटेने चालता चालता निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याचे दर्शन
देहभान हरपायला लावते.
थोडेसे खाली उतरले की एक लहानच पण सुंदरसा बीच आहे. त्या पाण्यात मात्र उतरायला नको वाटते. याचे कारण म्हणजे इथल्या पाण्याला प्रचंड ओढ आहे. भीती वाटावी इतका उसळणारा समुद्र आहे.
निसर्गाचे असे रुद्र सौंदर्य केपटाऊन ते न्यास्ना या पटट्यात ठिकठीकाणी
दिसते. पण सागराच्या निळाईच्या इतक्या अनंत छटा असाव्यात हेही इथेच दिसते.
डोंगरावरून खाली अर्ध्या वाटेवर एक कॅफे आहे तिथे नक्की जा असे आम्हाला
बरेच जणांनी सांगितले होते. अनायसे जेवणाची वेळ झालीच होती म्हणून त्या
कॅफेच्या आत शिरलो. हे ठिकाण इतके लोकप्रिय का आहे त्याचा त्या कॅफेमधे
शिरताक्षणीच अंदाज आला. जेवण जरी सर्वसाधारण असले तरी जेवतांना आजूबाजूला
अथांग पसरलेला सफेत लाटांनी फसफसणारा निळाभोर लगून आणि त्या निळाईला साथ
देणारे हिरवेगार डोंगर. डोळे सुखावून टाकणारा आसमंत!
जेवण उरकून खाली गावात गेलो. थोडंफार शॉपिंग करावं, फेरफटका मारावा या उद्देशाने थीसन आयलंड कडे गाडी वळवली. हे मात्र फक्त नावालाच आयलंड आहे. गावातून सरळसोट रस्ता इथे जातो. इथे बोटिंगसाठी मरिना आहे, मुलांसाठी खेळायला छोटं प्लेग्राऊंड आहे, शॉपिंग आहे, चालायला, सायकलिंग करायला ट्रेल्स आहेत, रेस्टोरेंट्स आहेत. खूप काही विशेष नसलं तरी संध्याकाळ घालवण्यासाठी एक छान ठिकाण आहे. हेच आणि असेच येथील वॉटरफ्रंटलाही आहे. अगदी देखणे बांधकाम आणि मांडणी. इथल्या जेटटी वरुन बोटीमधून लगूनची सफर करता येते. शॉपिंग करायचे नसेल तरी इथे वेळ फार छान जातो.
दुसर्या दिवशी ब्रेकफस्ट आटोपून गावात आलो. आज जरा मुलांच्या दृष्टीने
दिवसभर काय करता येईल याचा विचार मनात होता. न्यास्नापासुन अर्ध्या तासांवर
एक एलिफेंट पार्क आहे तिथे जाण्याचे ठरवले.
अनाथ हत्तींना आसरा देणारे न्यास्ना एलिफेंट पार्क हे साऊथ आफ्रिकेतील
पहिलावहीले एलिफंट पार्क आहे. जन्मत: अनाथ असलेली पिल्ले, सर्कस मधून
रीटायर झालेले हत्ती त्याचबरोबर पॉप्युलेशन कॉंट्रोलचा उपाय म्हणून केल्या
जाणार्या कत्तलींपासून वाचलेले हत्ती अशा सर्व हत्तींना इथे आसरा मिळतो.
त्यांचे पालनपोषण केले जाते. पिले मोठी, सक्षम झाली की त्यांना अभयारण्यात
सोडण्यात येते.
प्राण्यांसाठी शक्य होईल तितके नैसर्गीक वातावरण ठेवण्याचा या एलिफंट पार्कचा प्रयत्न असतो.
पार्कमधे पोहोचल्यावर तिकीट काढून आत गेलो. हत्तींना खाऊ घेण्यासाठी
फळं, भाज्यांच्या टोपल्या विकायला ठेवल्या होत्या त्या घेतल्या.
स्वागतकक्षाच्या दाराशी एका ट्रेलरवॅन मधे बसवून आम्हाला एका मोठ्या
मोकळ्या मैदानात घेऊन जाण्यात आले. आमचा गाइड उत्तम इंग्रजीतून माहीती देत
होता. वॅन मधून उतरतांना आजूबाजूला हत्ती होतेच. खूप माणसाळलेले वाटत होते.
आमच्या सगळ्यांच्या हातात खाऊ पाहून ती पिल्ले मस्तं दुडदुडत आमच्या
दिशेने येऊ लागली. त्यांचं ते दूदडुडणं आमच्या गाइडला जरी फारच क्यूट वाटत
असले तरी आम्हाला मात्र जरा दचकायला झाले :)
पण पिल्ले खरोखर गोड होती आणि शहाणीपण. एका लाकडी लहानशा अडसरामागे शिस्तीत
उभी राहयली. खाऊ खाल्ला, आमच्याकडून लाड करून घेतले....खूप मस्तं अनुभव
होता तो.
इथे रात्री राहण्याची सुध्हा सोय आहे. स्लीपओवर विथ द एलिफंट्स म्हणे!
एक प्रचंड मोठी बंदिस्त हत्तीशाळा जिथे हे हत्तीगण रात्री झोपायला येतात
तिथेच उंचीवर मुक्कामासाठी अत्याधुनीक मचाणे बांधली आहेत.
अतिशय वेगळा आणि छान अनुभव घेऊन आम्ही दुपारी परतीच्या वाटेला लागलो.
हे गाव फार काही मोठे नाहीये आणि केप टाऊन इतके कॉस्मोपॉलिटन पण नाही दिसले. तरीही काही उत्तम भारतीय रेस्टोरेंट्स इथे आहेत. दुपारी जेवायला मुख्य रस्त्यावरच्या एका भारतीय उपाहारगृहात आम्ही गेलो. उपाहारगृहातले कर्मचारी स्थानीक मूळ वंशाचेच होते. आम्ही जागेवर बसल्यावर एक कर्मचारी ' नमस्ते, क्या खाना पसंद करेंगे आप? ' असे अगदी आपुलकीने आमची चौकशी करत होता. त्याला अशी एक दोन वाक्ये सोडली तर बाकी हिंदी अर्थातच येत नव्हते पण तरीही ग्राहकाची त्याच्या भाषेत विचारपूस करण्याचे आगत्य आमच्या मनाला फार भावले. अत्यंत चांगल्या दर्जाची कस्टमर सर्वीस आम्हाला या देशात वेळोवेळी अनुभवायला मिळाली.
न्यास्ना मधे फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. आसपासच्या गावांमधे करण्यासारख्या असंख्य आक्टिविटिज आहेत. मात्र मुलांचा फिरण्याचा उत्साह एव्हाना संपत आल्यामुळे आम्ही गाव सोडून कुठेही आसपास फिरलो नाही. पण फिरण्याची आवड असलेल्या लोकांनी न्यास्नामधे काही दिवस राहून जवळपासच्या नॅशनल पार्कला, ऑस्ट्रिच फार्मला आणि अर्थातच एकापेक्षा एक सुंदर समुद्रकिनार्यांना जरूर भेट द्यावी. खूप खूप करण्यासारख्या गोष्टी आहेत इथे.
आमचा या गावातला मुक्काम संपत आला होता. कितीही दिवस राहिलात तरी इथून पाय निघू नये इतके सुरेख हे गाव. निरोप घ्यायची वेळ आली होती. दुपारी पुन्हा एकदा नदीवर जाऊन शांतपणे कितीतरी वेळ त्या शांत निळ्या पाण्याकडे बघत बसलो.
न्यास्नाला स्वत:चे विमानतळ नाही. प्रवासाच्या पुढच्या टप्प्याचे विमान पकडायला आम्ही एका तासावर असलेल्या जॉर्ज विमानतळावर पोहोचलो. रेंटल कार परत केली आणि क्रुगर नॅशनल पार्कला जाणार्या विमानात जाऊन बसलो...
क्रमश:
न्यास्नाला स्वत:चे विमानतळ नाही. प्रवासाच्या पुढच्या टप्प्याचे
विमान पकडायला आम्ही एका तासावर असलेल्या जॉर्ज विमानतळावर पोहोचलो. रेंटल
कार परत केली आणि क्रुगर नॅशनल पार्कला जाणार्या विमानात जाऊन बसलो...
क्रुगर नॅशनल पार्क. अफ्रिकेतले हे सर्वात मोठे अभयारण्य साऊथ अफ्रीकेच्या उत्तर पूर्वेला सुमारे आठहजार स्क्वेर मील पसरलेले आहे. याच्या उत्तर आणि पूर्व सीमा झिमाब्वे आणि मोझम्बिकला जाउन भिडतात. असंख्य प्राणी आणि पक्ष्यांच्या जाती या क्रुगर मधे पाहायला मिळतात. कुठल्याही सफारीचे बिग फाईव हे आकर्षण सुद्धा अर्थात इथे आहेच. आता बिग फाइव म्हणजे काय? तर बिग फाइव म्हणजे हत्ती, सिंह, गेंडा, बिबट्या आणि केप बफलो हे प्राणी.
क्रुगरला जाण्यासाठी जोहनसबर्गहून दिवसातून भरपूर फ्लाइट्स असतात. अवघा एखाद तासाचा प्रवास. बरेच लोक जोहनसबर्ग ते क्रुगर ड्राइवपण करतात. आम्ही सकाळी न्यास्ना ते जोहानसबर्ग आणि जोहनसबर्ग ते पुमालांगा असा विमान प्रवास करत साधारणपणे १२ वाजता दुपारी पुमालांगा विमानतळावर येऊन पोहोचलो. इथे आल्या आल्याच अगदी प्रसन्न हवामानाने आमचं स्वागत केले. हा विमानतळ सुद्धा छान आहे. लहानसा, नीटनेटका आणि स्वच्छ. येथील स्टाफ सुद्धा मस्तं घरगुती आहे. अतिशय हसरे आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे लोक.
विमानतळावर आम्हाला घ्यायला हॉटेलची गाडी आली होती. सुमारे दोन तासाचा प्रवास तसा आरामाचा होता. मात्र इथे केप टाऊन, गार्डन रूटपेक्षा अगदी वेगळा निसर्ग आहे. समुद्राची निळाई नाही अर्थातच पण तरीही आजूबाजूला हिरवीगार शेती दिसत होती. रस्ता उत्तमच होता. मात्र जसजसे क्रुगरच्या जवळ यायला लागलो तसतसा कच्चा रस्ता सुरू झाला. आमच्या हॉटेलपर्यंत शेवटचा अर्धा पाऊण तासाचा रस्ता चांगलाच हाडे खुळखुळवणारा होता.
हॉटेल मात्र अप्रतिम. भर अभयारण्यात. गाडीतून उतरल्या उतरल्या आमचे स्वागत हसतमुखाने केले गेले. हात, तोंड पुसायला गरम टॉवेल्स, प्यायला थंडगार जूस. या हॉटेलाची रचना भवतालच्या निसर्गाशी जुळवून घेऊन केलेली दिसली. संपूर्ण बांधकाम लाकडी. लॉबी, रेस्टोरेंट्स सगळंच बाहेरच्या निसर्गाचा भाग वाटावा असे... हवेशीर.
चेक इन केल्यानंतर आम्हाला सावधगिरीच्या काही सूचना देण्यात आल्या. ही जागा क्रुगर जंगलाचच भाग असल्यामुळे हॉटेलच्या आवारात वन्यपशु सहजतेने येतात. बरं, कुंपण वगैरे असा प्रकार नाहीच. रूम्स म्हणजे कॉटेजेस होते. आम्हाला सांगण्यात आले की आपापल्या कॉटेजला जातांना आमच्याबरोबर स्टाफपैकी कोणीतरी असणे अनिवार्य आहे. सकाळची वेळ असेल तर हरकत नाही पण रात्री मात्र जेवायला आम्ही जेव्हा हॉटेलच्या र्रेस्टोरेंट मधे येऊ तेव्हा आमच्या पुढे आणि मागे त्यांचे दोन गार्ड्स असतील. अगदी दोन ते तीन मिनिटांचा काय तो वॉक पण तरीही ते बंदुकधारी आमच्या बरोबर असणार.
सुमारे संध्याकाळच्या पाच सहाला आम्ही जरा ताजेतवाने होऊन आमच्या
पहिल्या वहील्या गेम ड्राइव्हसाठी हजर झालो. या हॉटेलमधे दोन- तीन दिवसांचे
सफारी पॅकेज होते ते आम्ही घेतले होते. यामधे राहणे, खाणे आणि गेम
ड्राइव्स अशाचा समावेश होता.
सफारीसाठी दणदणीत मजबूत गाड्या सज्ज होत्या. प्रत्येक गाडीमधे सात आठ लोक.
गाडीचा चालक उत्तम गाइड पण असतो. आम्हाला तीनही दिवस एकच गाइड मिळाला. शेन
त्याचे नाव. या शेनला क्रूगरची खडानखडा माहीती होती. अर्थातच तिथल्या
सर्वच गाइड्सना असतेच. कुठल्या जागी कुठले प्राणी आढळतील, त्या
प्राण्यांविषयी सखोल माहीती आणि मुख्य म्हणजे त्यांच्याविषयी प्रचंड आस्था.
या सर्वच लोकांना हे काम करायला फार आवडते. कुठेही पाट्या टाकण्याचा
लवलेशही नव्हता.
गाडीच्या पुढयात किंचीत उंचीवर एका खुर्चिवर अजुन एक रेंजर बसलेला असतो.
त्याचे काम म्हणजे दूरवर नजर ठेवणे, प्राणी आढळले की चालकाला तसे सांगणे
आणि जनावरांकडून काही धोका जाणवल्यास त्याचा प्रतिकार करणे. दोन्ही रेंजर्स
कडे बंदुका होत्या पण त्यांनी सांगितले की बंदुका ते कधीच वापरत नाहीत.
काही संकट आल्यास बाकीचे सगळे उपाय करतात पण हां अगदी प्राणावर बेतले तरच
नाइलाजाने बंदुकीचा उपयोग करतील. पण सुदैवाने अशी वेळ क्रुगरमधे आजतागायत
कधीच आलेली नव्हती...येउही नये.
आमच्या गाड्यांचा ताफा हॉटेलच्या आवाराच्या बाहेर पडला. बाहेर पडतो ना पडतो तोच ही मंडळी दिसली. यत्र तत्र ही हरणे दिसतात. पण जितकी यांची लोकसंख्या जास्ती तितकी यांची शिकार पण होते. जंगलातील जवळपास प्रत्येक प्राणी या हरणांना आपले भक्ष्य बनवतो. म्हणून या हरणांना प्राण्यांचे फेवरेट फास्ट फुड असे म्हणतात गमतीने :)
गाडी चालवतांना शेनच्या अखंड गप्पा चालल्या होत्या. त्याच्या बोलण्यातून
क्रुगरची इत्यन्भुत माहीती आम्हाला मिळत होती. थोड्याच वेळात बिग
फाईव्हपैकी एकाचे, र्हाइनोचे दर्शन झाले. अतिप्रचंड दिसणारा आणि संथ
वाटणारा हा प्राणी वाटतो तितका संथ नसतो. धावायला लागला की बर्यापैकी
वेगाने धावतो. आमच्यापासून काहीशा अंतरावरच हे गेंडे उभे होते. शेन
म्हणाला आता बघा हं गंमत. असे म्हणून तो तोंडातून एक विशिष्ठ प्रकारची शिळ
घालायला लागला. त्या शिटीचा आवाज इतका कमी होता की गाडीत त्याच्या सीटच्या
थेट मागे बसलेल्या मलासुद्धा ऐकू येत नव्हता. मी त्याला विचारले काय करतोयस
बाबा? तर बाबा म्हणाला की मी नं मादी गेंड्याचा आवाज काढून त्या नर
गेंड्याला बोलवतोय...बेसिकली आय अम फ्लर्टिंग विथ हिम......
आणि खरंच त्यामधला एक गेंडा आमच्या दिशेने झुलत झुलत यायला लागला. आता
मात्र आम्ही शेन साहेबांना त्यांचे फ्लर्टिंग आवरते घ्यायला सांगितले आणि
तेव्हा कुठे आमची गाडी पुढे निघाली.
अधे मधे जिराफ त्यांच्या माना लांब करून शांतपणे चरत होते. आतापर्यंत झू मधे बघितलेले जिराफ किती केवीलवाणे दिसतात याची आम्हाला नव्याने जाणीव होत होती. इथले सगळेच प्राणी त्यांच्या नैसर्गीक वातावरणात राहात असल्यामुळे अंगपींडाने जबरदस्त होते. हे जिराफ सुद्धा आमच्या आतापर्यंतच्या अनुभवापेक्षा दणदणीत उंच आणि सशक्त दिसत होते.
आता ब्रेकची वेळ झाली होती म्हणून शेननी गाडी थांबवली. मग त्याने आणि दुसर्या रेंजरने छानपैकी एक छोटेसे टेबल मांडले. बरोबर त्याने थोडा खाऊ आणि ड्रिंक्स आणले होते त्याची पटापट मांडणी केली. जंगलाच्या अगदी मधोमध आमची मग छोटीशी पिकनिक सुरू झाली. आमच्या बरोबर जे दुसरे एक कुटुंब होते ते सुद्धा खूप चांगले होते. आमच्या गप्पा अगदी रंगल्या होत्या आणि समोर सूर्यास्त होत होता.....एक अतिशय सुरेख अनुभव घेऊन आम्ही हॉटेलकडे वळलो.
दुसर्या दिवशी सकाळी पाच वाजता आम्हाला वेक अप कॉल आला की फ्रेश होऊन लॉबीमधे या. लॉबीमधे गरम चहा कॉफी आणि बिस्किट्स ठेवली होती. ज्यांना खायचे प्यायचे असेल त्यांनी पटकन खाऊन जीपमधे बसावे असे आम्हाला सांगितले. सकाळी आणि संध्याकाळी प्राणी थंड हवेत बाहेर फिरायला, पाणी प्यायला येतात त्यामुळे एक सकाळी आणि एक संध्याकाळी असे हे गेम ड्राइव्स ठरलेले असतात. आज सकाळी सिंह, चित्ता दिसावेत अशी आम्हाला आशा होती.
आज आणि कालही हत्ती खूप दिसत होते. प्रचंड आकाराचे हे आफ्रिकन हत्ती आपल्या गाडीच्या अगदी जवळ आले की छातीत धडधडायला होतं. बरं हे हत्ती फिरतात सुद्धा एकटे दुकटे नाही किमान तीन, चार च्या झुंडीत. तशी त्यांना माणसांची सवय असते पण डोकं फिरलं तर काय करतील याची कल्पना सुद्धा करवत नाही. शेनने आम्हाला सूचना दिली होती की हत्ती म्हणा किंवा सिंह जर पुढयात आला तर पॅनिक होऊ नका. फक्त गाडीत स्तबधपणे बसून राहा. अशावेळी गाडी मागे फिरवून पळून जाण्यातही काहीच अर्थ नसतो. असे केल्यास प्राणी अधीकच चवताळतात आणि पाठलाग करतात. जवळ आलेल्या हत्तीला आमचा रेंजर दूर हो, दूर हो असे सांगत होता. आम्ही पहिल्यांदाच इतक्या जवळून असे जंगली हत्ती पाहात होतो. इथे हत्तींची फार मोठ्या प्रमाणावर शिकार व्हायची. आता मात्र या प्रकाराला खूप चाप बसलाय. क्रुगर चे शस्त्रधारी रेंजर्स सगळीकडे नजर ठेवून असतात. तरीही अधूनमधून असे प्रकार होतातच. या अवैध शिकारीमागे मोझम्बिकच्या टोळ्यांचा सर्वात जास्ती हात असतो. या टोळ्या मोझंबिकमधून थेट क्रुगरमधे येतात.
पक्षी मात्र आम्हाला फार दिसले नाहीत. या शेनला त्याच्या वॉकी टॉकी वरुन अधेमधे सूचना येत होत्या. मधेच त्याला काहीतरी सूचना मिळाली तशी शेननी जीप गरर्कन वळवली आणि थोड्याच वेळात यांचे दर्शन झाले...
जणू फोटोसाठीच या राणीसाहेब पोज देत होत्या. एकदम रॉयल कारभार. डोळ्यात
जरब. एक क्षणभरच मी तीच्या नजरेला थेट नजर द्यायचा प्रयत्न केला.....इतकी
तेजस्वी आणि खिळवून टाकणारी नजर आज एक वर्षांनीदेखील मी विसरू शकत नाही.
समोर असलेल्या झुडुपात तिची पिल्ले होती. गाडीत पीन ड्रॉप शांतता!
आमच्या गाडीपासून अवघ्या दहा पावलांवर हे राजस सौंदर्य पहुडले होते ....आजचा आमचा गेम ड्राइव सफळ संपूर्ण झाला होता!
हॉटेलवर परत आलो तोवर ब्रेकफस्टची वेळ झाली होती. ब्रेकफास्ट चांगलाच होता आणि अगदी त्यांच्याच आवारातल्या ताज्या भाज्या आणि फळे असल्यामुळे जास्तीच चवदार होता. तेथील अंड्यांचे ऑम्लेट मात्र फार उग्र वाटत होतं. त्यांच्या पोल्ट्री फार्मवरची ताजी अंडी आहेत असे तेथील स्टाफ सांगत होता. ते खरंच होतं पण ती इतकी फार्म फ्रेश चव माझ्या शहरी जिभेला मानवली नाही हेही तितकंच खरं. बाकी सकाळ, संध्याकाळचे जेवणही छानच होते. मुख्य म्हणजे माझ्यासाठी असलेले शाकाहारी जेवण पण उत्तम आपल्या भारतीय चवीने बनविले होते. त्यांचा संपूर्ण स्टाफ अतिशय आस्थेने आम्हाला खाऊ घालत होता, अगदी आपुलकीने.
जेवण झाल्यावर हॉटेलच्याच लायब्ररी मधे थोडा वेळ घालवला. एखादे मचाण असावे नां तशा रुपाची इथली लायब्ररी मस्तं होती. म्हणजे पुस्तके यथातथाच पण तिथे बसायला मजा वाटत होती. तिथल्या स्वींमिग पूल मधे जरा वेळ पोहावं म्हणून आम्ही गेलो. तोच तेथील अटेंडेंट भयंकर उत्साहात दिसली. आम्हाला बघताच'' अरे वा पूलवर जाताय नां? जा, जा खूप मज्जा येईल तुम्हाला.'' तिने मज्जा येईल असे म्हणताच आम्ही एकदम अलर्ट!! क्रुगरच्या लोकांच्या मजेच्या कल्पना आमच्यापेक्षा जरा वेगळ्या आहेत हे एव्हाना आम्हाला लक्षात आलंच होतं. साधारणतः ज्या गोष्टी त्यांना खूप मज्जेदार वाटतात त्या आपल्याला वाटतीलच असे नाही. म्हणून विचारले तिला की बाई काय मज्जा आहे तिथे सांग तर आधी. तर म्हणाली त्या स्वींमिंगपूलच्या जवळ जी नदी आहे की नै...तिथे किनै आता हत्तींचा कळप येतोय पाणी प्यायला. मला आत्ताच कळलं. तुम्हाला छान अगदी जवळून बघायला मिळतील हत्ती. ते येतात नां पुलच्या अगदी जवळ......हे ऐकल्यावर आम्ही आमचा स्विमिंगचा प्लान तातडीने कॅन्सल केला आणि सुसाट वेगाने आमच्या कॉटेजच्या दिशेने निघालो.
आज आमचा इथला आणि या देशातला सुद्धा शेवटचा दिवस होता. उद्या परतीचे
विमान होते. आम्ही संध्याकाळी शेवटच्या गेमड्राइवसाठी आता तयार झालो
आज आम्हाला हिप्पोज बघायला नदीच्या किनारी नेण्यात आले. किनार्यावर खडकांवर
बसून पाण्यात डुंबणारे हीप्पोज पहायला गंमत वाटत होती. ते अजस्त्र,माहाकाय
प्राणी मोठ्या मजेत पाण्यात डुंबत होते.
तेव्हड्यात शेनला सूचना आली की जवळपासच लेपर्ड आहे कुठेतरी. मग काय आम्ही सगळेच उत्साहाने निघालो लेपर्डला शोधायला. फार वेळ शोधावे लागलेच नाही. जवळच एका झाडावर हे ध्यान बसलेलं उंचावर. थोड्यावेळाने त्याला काय वाटले कुणास ठाऊक पण तो त्या झाडावरून खाली उतरला आणि आमच्या गाडीसमोरून आरामात चालत चालत आसपासच्या झाडीत गुडूप झाला.....आमची ही शेवटची ड्राइव पण वसूल झाली होती :))
संध्याकाळी डिनरची वेळ झाली तसे आम्ही आवरून रेस्टोरेंटमधे आलो तर आज तिथे काही वेगळाच नूर होता. तेथील जेवण्याचे टेबल्स काढले होते, फक्त बार तेव्हडा ओपन होता. हॉटेलच्या पाहुण्यांसाठी आज आफ्रिकन ड्रम्सचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम रंगत होता. ड्रिंक्स आणि अपेटायझर्सचे ट्रेज़ सर्वांमधून फिरत होते तेव्हड्यात डिनरची वेळ झाल्याची घोषणा झाली. जेवणाचे ठिकाण नेहमीच्या रेस्टोरेंटमधे नाही तर आज दुसरीकडेच आहे असे आम्हाला सांगण्यात आले. नेहमीप्रमाणेच बंदुकधारी रेंजर्स बरोबर आम्ही निघालो पायीच. बाहेर पडून हॉटेलच्याच आवारातून आम्ही चालत होतो. सबंध काळोख...रातकिड्यांची किरकीर तेव्हडी फक्त ऐकू येत होती. अगदी तीन ते चार मिनिटातच आम्ही एका बंदिस्त पण प्रशस्त अंगणात येऊन पोहोचलो. गडद अंधारातून जेव्हा त्या अंगणात पोहोचलो तेव्हा तेथील नजारा पाहून अक्षरश: स्तब्ध झालो. त्या अंगणात चहुबाजूंनी लखलख मशाली उजळलेल्या होत्या. मशालींचा तो उजेड, माथ्यावरचे काळेभोर आकाश, जागोजागी कंदील टांगलेले..अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटलेली आणि अशा वातावरणात जेवणाचे टेबल्स मांडलेले......सुख, सुख म्हणतात ते तरी दुसरं काय असावं??
इतके लोकं असूनही सभोवताली एक मंद तृप्त शांतता पसरली होती. त्या मंतरलेल्या वातावरणाची धुंदी आमच्या तनमनावर हळूहळू साचत होती...दुरून येणारा ड्रम्सचा नाद आता गुंगी आणत होता.. डोळे जड जड होत होते...
या अविस्मरणीय सफरीचा शेवटचा दिवस आता संपला होता...आमच्या मनात सुखाची सप्तरंगी उधळण करीत क्रुगरमधे अलगद रात्र उतरत होती...
समाप्त!!
पुनश्च टेबल माऊंटन
http://www.misalpav.com/node/41627
केप टाऊनला एका दिवसात तीन ऋतू बघता येतात, ही तिथल्या लोकांची एक आवडती म्हण. मागच्या वेळेस याचा चांगलाच अनुभव घेतला होता, त्यामुळे तिथल्या उन्हाळ्याची सुरुवात असली, तरी भरपूर थंडीची तयारी करून गेले होते. पण यावेळी स्वागत केलं ते कडक उन्हाने. यावर्षी तिथे चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे भेटेल ती व्यक्ती पाणी जपून वापरायचा सल्ला देत होती. मुळात उन्हाळा नावडता, त्यात पाणी कमी. पहिले तीन चार दिवस अगदीच अपेक्षेपेक्षा वेगळे गेले. पण नंतर एखादा आठवडा मधेच पाऊस, मधेच थंडी असं काहीपण सुरू झालं. त्यात माझ्या घराच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर चोरी, सुरीने धमकावणे वगैरे गोष्टी सुरू झाल्यामुळे हिंडण्या-फिरण्यावर अशक्य बंधनं आलेली होती. एखादी गोष्ट उद्यासाठी ठरवावी, आणि मग काहीतरी पाऊस-वार्याचे निमित्त होऊन ती घडूच नये, असं सतत व्हायला लागल्यावर मला घरच्या हिवाळ्याची सतत आठवण यायला लागली. मग शेवटी काम गेलं खड्ड्यात, असं ठरवून मस्तपैकी एका ओळखीच्या कुटुंबासोबत बोल्डर्स बीच वरचे आफ्रिकन पेंग्विन, आणि केप पॉईंटचं दर्शन घेऊन आले. कदाचित मी हेच करावं, आणि पक्क्या केप टोनियनसारखं शिस्तीत रिलॅक्स व्हावं, अशी त्या शहराची इच्छा असावी. कारण चिंता करायचं सोडून दिल्यावर पुढच्या आठवडाभरात बरंचसं काम उरकलं, आणि आता मला फिरायला थोडा वेळ मिळेल असं दिसू लागलं. पण तरीही जी टेबल माऊंटन हाईक करायच्या इच्छेची मागच्या वर्षी सतत भुणभुण लावली होती, तिचा विषय प्रोफेसर स्वतःहून काढतील असं वाटलं नव्हतं. पण भारतातून आलेल्या गुजराती भाषेवर काम करणार्या लोकांसोबत मला जाता येईल असं त्यानी सुचवलं, आणि माझ्या आशा पल्लवित झाल्या. वर चालत जाऊन केबल कारने खाली यायचं, असं ठरलंही.
पण म्हणून प्रत्यक्ष तिथे जाणं सोपं थोडंच होतं. टेबल माऊंटन हा खराखुरा पर्वतराज आहे. त्याला भेटायला जायचं तर त्याच्या लहरी सांभाळत जावं लागतं. एका रविवारी जायचं ठरवलं होतं, पण त्या दिवशी एवढा वारा, की बाहेर पडणं मुश्किल होऊन गेलं होतं. सकाळी सकाळी केबल कार बंद असल्याची सुवार्ता वेबसाईटवर कळली. अजून फक्त एकच आठवडा राहिला होता. पुढच्या रविवारी काहीही करून जाता आलं पाहिजे, असं मनात होतं...
आणि तो या वर्षी हुलकावण्या देणारा पाऊस शनिवारी हजर झाला. पावसाला बघून इतकी नाराज मी कधीच झाले नव्हते. रात्री पाऊस पडल्याने सकाळी ढग असणार, पुन्हा रस्ता निसरडा असणार. सकाळी याला दुजोरा देत बेत रद्द झाल्याचा सरांचा मेल आला. आता जाता येणार नाही असंच वाटत होतं.
आणि दुपारपर्यंत कडक ऊन पडलं. इतकं कडक, की पुन्हा दुपारी मेल आला की तुम्हाला अजून जायचं असल्यास आपण पायथ्याशी जाऊन परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतो. मनातल्या मनात उड्या मारत मी तयारीला सुरुवात केली. पाऊण तासात गाडीत बसून आम्ही निघालोही होतो. पर्वतरांगांच्या शेंड्यांवर ढग दिसत असले, तरी बर्यापैकी स्वच्छ वातावरण दिसत होतं. एकदाचे पायथ्याशी पोचलो, आणि खडखडीत वाळलेल्या पायर्या दिसल्या, आणि अशा प्रकारे 'ताफेलबर्ग' चढायला एकदाची सुरुवात झाली.
त्यातल्यात्यात सगळ्यात सोपा रस्ता आम्ही निवडला होता. ज्याचं नाव 'प्लॅटक्लिप गॉर्ज (लांबवलेला 'ट')'असं आहे. पायथ्याशी खूप सार्या गाड्या दिसल्याने, आणि बरेच लोक चढताना दिसल्याने आम्ही निर्धास्त होतो.

उन्हाळ्याची सुरुवात असल्याने खूप सारी फुलं फुललेली होती. सुरुवातीलाच राष्ट्रीय फूल प्रोटियाने आमचं स्वागत केलं. माऊंटन लिली, पेलागॉर्निया मध्ये मध्ये पेरलेला दगडी रस्ता बघून सुरुवातीपासून उल्हसित वाटत होतं. पाण्याचा आवाज पण येत होता. वीसेक मिनिटं चालल्यावर रात्रीच्या पावसाने जिवंत केलेला छोटा झरा आम्हाला दिसला. तिथे थोडं थांबून अजून उत्साहात आम्ही पुढे निघालो.


पण आता हळू हळू रस्ता कठीण व्हायला लागला होता. वरून उतरणारे लोक चढणार्यांचा उत्साह वाढवत होते. 'यू आर अल्मोस्ट देअर, जस्ट अबाऊट टू मोर अवर्स' म्हणून डोळे मिचकावून गेलेल्या हाइकरच्या विनोदावर हसलो खरे, पण रस्त्यावरची एकमेव दिशादर्शक पाटी दिसेपर्यंत थकायला सुरुवात झाली होती. व्यायामाची सवय नसणे, आणि तीनेक आठवडे साधं चाललेलंही नसणे हे चांगलंच भोवत होतं. त्यात सकाळपासून बेत रद्द झाल्याच्या दु:ख्खात मी नीट जेवले नव्हते, आणि निश्चित ठरल्यावर वेळ मिळाला नव्हता. नक्की काय झालं कळलं नाही, पण मला आयुष्यात पहिल्यांदा चालताना गरगरायला लागलं. सोबत चालणार्यांना सांगून मी बसले, पण तरी तोल सावरेना. शेवटी मी चक्क आडवी झाले. तेव्हा सोबतच्या लोकांना चांगलंच टेन्शन आलं असणार आहे. पण ज्या वेगाने भोवळ आली, त्याच वेगाने मला बरंही वाटलं. डोळे मिटलेले असताना वरून खाली चालत आलेली एक बाई म्हणालेली ऐकू आलं 'आय वुडंट गो अहेड इन धिस सिच्युएशन'. कदाचित ते पचलं नसेल, पण आता हा हाइक पूर्ण करायचाच, असं ठरवूनच डोळे उघडले. पुढे मला काहीच झालं नाही, पण माझ्यासोबतच्या गुजराती लोकांनी सतत 'आम्ही तुला टाकून जाऊ' असा त्यावर जोक करणं, आणि त्या जोक्सना मी त्यांना २०१९ च्या निवडणुकीची शपथ घालणं असं चालू राहिलं.
प्लॅटक्लिप म्हणजे सपाट दगडांचा रस्ता. १५०३ मध्ये टेबल माऊंटन चढून जाणारा पहिला मनुष्य याच रस्त्याने गेला होता. यावरचे दगड बर्यापैकी पक्के आहेत, आणि नावाला जागण्यापुरते सपाटही. पण म्हणून चढ कमी नाही.जवळ येऊ तशी अजून उंच दिसणारी शिखरं, आणि चढून पार केलेलं अंतर, दोन्ही थोडंसं दडपण जाणवून देतात. पण जिथे बघू तिथे निसर्गदत्त सौंदर्य-खडबडीत दगड, नाजुक फुले, आणि मागे वळून दिसणारा समुद्र. मधे पसरलेलं शहर इतकंसं डोळ्यांना खुपत नाही.

साधारण तासाभराने वरून येणारे लोक 'आता अर्धाच तास राहिलाय'असं सांगू लागले. त्यामुळे वर जायचा उत्साह टिकून राहिला खरा, पण अर्धा तास झाल्यावरही 'अजून अर्धा तास'हे ऐकायला लागल्यावर धाप जरा जास्तच लागू राहिली. मग आम्ही 'हम होंगे कामयाब' हे गाणं दम लागलेल्या आवाजात म्हणत पुढे जाऊ लागलो. वरून येणारी प्रत्येक व्यक्ती 'इट इज टायरिंग, बट इट्स वर्थ इट' हे सांगून मनोधैर्य वाढवत होतीच. वरून उड्या मारत येणारे एक आजोबा, एक पाण्याची बाटली तेवढी घेऊन आम्हाला मागे टाकून गेलेली एक तरुणी, दूरवरून खणखणीत आवाजात आफ्रिकन गाणं गात अनवाणी चालत आलेला मनुष्य, या वल्ली बघून अजून बरं वाटत होतं. वाटेवरच्या निसर्गसौंदर्याला मात्र तोडच नाही. आम्ही मध्ये विसाव्यासाठी टेकलो, की पक्षी बिनधास्त जवळ येऊन बसायचे. पर्वताचे ओलसर कडे सावली धरत होते. दोन कड्यांच्या मधली वाट जवळ येत होती.


एक चिंचोळी वाट दिसू लागली, आणि आता अर्ध्या तासावरून 'दहा मिनिटं फक्त' अशी आशा येणारे लोक दाखवू लागले. अशा पद्धतीने अजून अर्धा तास चालल्यावर खरोखर त्या वाटेवर पोहोचलो. दोन्ही बाजूच्या कड्यांवरून पाण्याचे मोत्यासारखे थेंब टपकत होते. ही वाट पार केली, आणि दोन लोक भेटले. त्यांना विचारलं तुम्ही परत चाललात का, तर म्हणाले छे छे, आम्ही तर इथे फक्त फोटो काढायला आलोय...
पोचलो बाबा! असं वाटून आम्ही वळसा घेतला, तर समोर दुसर्या बाजूने भारतीय महासागर सामोरा आला. आत्तापर्यंत आम्हाला मुळीच त्रास न दिलेले शहाणे ढग पर्वतांची नक्कल करत पुंजके बनवून तसेच निश्चल वाटावेत असे पसरले होते.


इथे अजून थोडं वळून साखळीचा आधार घेऊन अजून दहा मिनिटं चाललो, आणि एकदाची दूरवर ती केबल कारची पर्वतावरची एकमेव मानवी इमारत दिसली. टेबल माऊंटन/ ताफेलबर्ग सर झाला. या खालच्या लिंकमध्ये आम्ही गेलो तो रस्ता बघता येईल.
https://www.youtube.com/watch?v=zCmW4Ak2zTg
आता उत्साहात पटापट फोटो काढायला फोन काढला, आणि लगेचच माझ्या हातातून निसटून खालच्या दगडावर पडून तो खळ्ळकन फुटला. माथ्यावर एकही फोटो काढता आला नाही. पण तिथे जे बघता आलं, ते कदाचित कॅमेर्यात बांधता आलंच नसतं मला. आम्ही पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. शॉपमध्ये मनसोक्त खरेदी करून आणि कॅफेमधून खायला घेऊन कुसुंबी रंगापासून लाल होत जाणार्या क्षितिजाला बघत आम्ही शांत बसलो. दृष्टिक्षेपातील संपूर्ण क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्रात तो रंग विरघळत होता. अस्तंतीचे रंग, तो गूढगंभीर समुद्र आणि त्यात बुडत जाणारा तो तेजाचा गोळा... नि:शब्द व्हायला झालं होतं. सूर्यास्त होईपर्यंत ७.३० वाजले, आणि केबल कारचा भोंगा वाजायला सुरुवात झाली. आम्ही त्या दिशेने वळलो मात्र...
तिकडून आत्ता दिसलेल्या दृश्याशी स्पर्धा करत दुसरं दृश्य उभं होतं. खाली शहरात लागलेले चमचम दिवे, आणि वर चांदणं प्रसवणारा पुनवेचा चंद्र. त्या दिवशी 'सुपरमून'होता हे आम्हाला माहितीच नव्हतं. इतक्या उंचावरून इतक्या जवळ दिसणारा, पृथ्वीला मोहवू पाहणारा सुधांशू दिसला, आणि सुखाने कोंदायला झालं. बोरकरांची 'दीस गेला खाला, चंद्रिम वयर आयला' कविता अशी अनुभवायला मिळाली. फोन नव्हता, आणि फोटो काढता आले नाहीत, याचा आनंदच वाटला.
शेवटच्या ८.३० च्या केबल कार मध्ये गेल्यावर त्याच्या ऑपरेटरने लाईट्स बंद केले, आणि चांदण्यात न्हालेला पर्वत, पाझरणारा चंद्र, आणि खाली ते नशीबवान शहर, हे सगळं बघत आम्ही खाली पोहोचलो. केबल कार थांबत आल्यावर अनाउन्समेंट करताना ऑपरेटर 'टेक मी होम' गाणं म्हणत होता. आणि कुठच्यातरी स्वर्गीय घराच्या कुशीत शिरून आल्याचा अनुभव मी मनात साठवून ठेवत होते...
माझं केप टाऊन
कधी कधी अनपेक्षितपणे काही संधी मिळून जातात आणि नंतर ते सगळंच स्वप्नवत् असल्याचं वाटू लागतं. केप टाऊनला जाऊन येऊन साधारण दीड महिना लोटल्यावर त्याच्या आठवणी स्वप्नासारख्या पुसट होऊ नयेत असं वाटतं म्हणून त्यांना शब्दांत बांधून ठेवायचा हा प्रयत्न.
तर केप टाऊनच्या भारतीय लोकांच्या भाषेवर काम करण्यासाठीच्या प्रॉजेक्टवर काम करायला मला जाता येईल, असं कळल्यावर फार द्विधा मन:स्थिती झाली होती. एकीकडे ही संधी फार छान आहे हे कळत होतं. माझ्या सुपरवाईजर आणि तिथले प्रचंड अनुभवी प्राध्यापक यांच्यासोबत काम करता येणार म्हणजे दुधात साखर. पण पहिला-वहिला परदेश प्रवास, आणि तो चक्क दक्षिण आफ्रिकेला? माझ्या सुरक्षिततेची सवय झालेल्या मध्यमवर्गीय मनाला गूगलवरचे दक्षिण आफ्रिकेतल्या गुन्हेगारीबद्दलचे रिव्ह्यू फार घाबरवत होते. मग नेहमीप्रमाणे अनाहितातल्या मैत्रिणी, रूममेट्स, परदेशातील मित्र-मैत्रिणी सगळ्यांकडे रडून झालं. सगळीकडून हळू हळू धीर गोळा केला आणि मी माझ्या मनाची समजूत पटवली. पुढे घरी पटवणे हा दुसरा भाग. मी एकटीच जाणार हे त्यांना शक्य तेवढ्या उशिरापर्यंत कळू वगैरे न देऊन त्यात मी काही प्रमाणात यश मिळवलं (कळल्यावर काय झालं ते सांगत नाही). मिपावर तेव्हाच पद्माताईची केप टाऊन मालिका आली. उल्काताईंना द. आफ्रिकेबद्दल पिडून झालं. आणि सगळ्यांच्या शुभेच्छांसकट एकदाची मी केप टाऊनला निघाले.

ड्राईव
केप टाऊनचं पहिलं दर्शन पावसाने भिजलेलं झालं. मला घ्यायला आलेली माझी ईमेल मैत्रीण आणि ज्यांना एकदाच काही मिनिटांसाठी भेटले होते ते प्राध्यापक यांना काही माझं पावसाचं कौतुक कळेना. मग मी तिथल्या भारतीय भागात(रायलंड्स) ला पोचेपर्यंत शांत बसून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या. मला दिलेल्या कॉटेजची सगळी गेट्स लॉक करणे हा एक सल्ला तिथे पोचल्यापासून तिथून निघेपर्यंत प्रत्येकाकडून ऐकायची मला सवय होणार होतीच. एकटीने बाहेर न फिरणे, मोठी पर्स घेऊन न जाणे, फोन हातात ठेवून न फिरणे अशा सूचनांचा वर्षाव झाला. ज्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात वाचली, ते प्राध्यापक (राज) इतके काही कूल होते, की त्यांच्या वयाचा, अनुभवाचा वगैरे लवकरच विसर पडला. आणि माझ्या वयाची मैत्रीण नासिरा, तिला तर सेकंदभरासाठी पण मला एकटं सोडलं तर मी होमसिक होईन असं वाटत होतं. मी मनात म्हटलं वैतागाल बाबांनो लवकरच मला. पण मला केप टाऊनकरांची खरी ओळख तर व्हायचीच होती..
माझं काम होतं नेहमीचंच, लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या भाषेचे नमुने गोळा करण्याचं होतं. पण भारतात परिस्थिती वेगळी, डायरेक्ट कुणाच्या अंगणात जाऊन बोलता येतं. इथे म्हणजे त्या गेट्सच्या आत पोचायला ओळख असल्याशिवाय पर्यायच नव्हता. मग एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असे इंटरव्ह्यू मिळवत जावं लागायचं. नशिबाने मला ज्या मुस्लिम लोकांमध्ये काम करायचं होतं, त्यांचे बऱ्याचदा स्वत:चे बिझनेस असत. मग ते वेळ काढून अख्खी सकाळ/ संध्याकाळ राखून ठेवत. बरेचसे लोक अतिअतिश्रीमंत. त्यामुळे माझ्यावर दडपण यायचं. पण लोक इतके प्रेमळ की त्या दडपणाचा विचार करायला वेळच नाही मिळायचा. काही वेळा अनिच्छेने इंटरव्ह्यूला सुरुवात केलेले लोक हळूहळू भारताच्या आठवणींनी इतके विरघळून जात, की इंटरव्ह्यू संपेपर्यंत त्यांनी अजून ४ लोक माझ्यासाठी शोधलेले असत. ‘अ यंग लेडी फ्रॉम इंडिया’ला रायलंड्स मध्ये लोकांनी इतकं जपलं की काय सांगू. बरं, माझ्या इंटरव्ह्यूची नुसती वेळ ठरवून हे लोक शांत नाही राहायचे, मी पोचण्याअगोदर ‘व्हेजिटेरियन, नो एग्ज’ हा संदेश त्या घरी पोचलेला असायचा आणि त्या निर्देशांत बसणारे टेबल भरून पदार्थ माझी वाट बघत असायचे. एका दिवसात साधारण ३ इंटरव्ह्यू, म्हणजे ३ जेवणंच. परत येईपर्यंत ओळखता येईनाशी गोलमटोल होऊन येण्याचं श्रेय मला ४ पावलं देखील चालू न देणाऱ्या आणि नको वाटेपर्यंत खाऊ घालणाऱ्या केप टाऊनकरांना जातं. ही माझी परिस्थिती कळल्यानंतरचे प्रा. राजचे त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण देणारे ईमेल्स 'एंड डोंट वरी, आय विल स्टार्व्ह यू हियर’ असे संपायचे! राजसोबत काम करणं म्हणजे एक अतिशय आनंददायी अनुभव होता. त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह माझ्या आळशी मनातही झिरपला होता. तीन पिढ्या दक्षिण आफ्रिकेत राहूनही भारताबाबत हळवे होणार्या, मला पाणिनीची सूत्रं शिकवायला लावणार्या या प्रोफेसरांसोबतचं प्रत्येक संभाषण मला नवीन काहीतरी देऊन जायचं.
माझं काम खरं तर खूप जास्त होतं. त्यामुळे केप टाऊनमध्ये टूरिस्ट बनून फारसं फिरताच आलं नाही. पण तरीही त्याला पर्याय म्हणून आम्ही कामासंबंधीच्या चर्चा गाडीत करत काही सुंदर ड्राईव्ह केल्या. न्यूलंड्स स्टेडियम बघितलं.कर्स्टनबॉशच्या बॉटनिकल गार्डनमधे एक दिवस घालवला.आणि माझा हट्ट म्हणून त्यापुढचा एक पर्वतांमधला ट्रेल करून त्या इकडून तिकडून दिसणाऱ्या पर्वताला गुदगुल्या करून आलो. अटलांटिकचं सौंदर्य जवळून अनुभवलं. आणि स्टूडंट प्रॉटेस्टनी विद्यापीठ बंद होण्याअगोदर तिथलीही सैर करून आलो. हर्मानसला व्हेल फेस्टिव्हलला जाऊन एका व्हेलची पाठ तेवढी बघितली. आणि केबल कारमधून टेबल माऊंटनला जाण्याचं कंपल्सरी काम पार पाडलं. हे शहर इतकं सुंदर आहे, की जिथे जाल तिथे सौंदर्य तुमची वाट बघत असतं. आणि इथे तर कौतुकाने माझं माहेरपण करायला शहरवासी अतिशय आतुर होते..

न्यूलँड्स स्टेडियम

कर्स्टन्बॉश- लेडी अॅन बर्नार्ड्स बाथ

कर्स्टनबॉश- बूमस्लँग वॉक

कर्स्टनबॉश- हंस आणि हंसाची पिल्लं

माऊंटन ट्रेल

पर्वताच्या कुशीतून दूर दिसणारे द्राक्षमळे
रोज सकाळी उठल्यापासून मला कुणाचे ना कुणाचे फोन कॉल्स येतच राहायचे. ‘आज तू कशी आहेस, काय करणार आहेस, घरची आठवण येत आहे का?’ असे प्रश्न कमी अधिक फरकाने कुणी ना कुणी विचारायचं. माझी जबाबदारी घेऊन माझ्यावर जे नितांत प्रेम इथल्या लोकांनी केलं, त्याला तोडच नाही. कधी कधी मला स्वत:ला वैताग यायचा इतक्या गोष्टी त्यांना करायच्या असायच्या. एका बॉलीवूड गाण्यांच्या कार्यक्रमात मी भारतीय असल्याच्या क्वालिफिकेशनवर मला बोलायला लावलं होतं. त्या कार्यक्रमानंतर भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलून तोंड दुखायला लागलं. पण गेली चाळीसेक वर्षे भारतात न आलेल्या एका आजींनी जेव्हा मला आपलं राष्ट्रगीत तिथे म्हणून दाखवलं, तेव्हा खरंच डोळ्यांत पाणी आलं होतं.
महिनाभर अतिशय भुर्रकन उडून गेला. शेवटच्या दिवसांत एक पेपर पूर्ण करायचा असल्याने माझं भूत झालं होतं आणि परतीचे वेध लागल्यानंतर जेवणाची आमंत्रणं नाकारताना नाकीनऊ आले होते. पुन्हा इथे फक्त फिरायला ये असं बजावणारे, ‘इथलाच मुलगा शोध आणि इथेच सेटल हो’ असे टिपिकल भारतीय सल्ले देणारे लोक केवळ महिनाभरात फार जवळचे होऊन गेले होते. शेवटच्या दिवशी तिथल्या ‘बझ्मे आदाब’ या भारतीयांच्या संस्थेत त्यांच्या भाषेच्या (मुसलमानी कोंकणी) संदर्भात भाषण आणि प्रश्नोत्तरं असा दोन तासांचा कार्यक्रम झाला. इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलताना माझी जाम तंतरली होती, पण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्यांचा निरोप घेता आला. आणि तरी येण्याच्या दिवशी इतके लोक भेटायला आले, की मी विमानाच्या वेळेत पोचेन अशी खात्री वाटेना. शेवटी धावत-पळत पोचून सिक्युरिटीच्या इथे मला सोडायला आलेल्या लोकांचा निरोप घेतला, आणि विमानात बसले तेव्हा सगळ्यात शेवटी निरोप द्यायला होत्या त्या तिथल्या आता आपल्याच वाटणाऱ्या पर्वतरांगा. आणि विमानाने झेप घेतली, तेव्हा पाऊस नव्हता, पण डोळ्यांत मात्र आता माझं झालेलं केप टाऊन सोडून जातानाचा ओलावा होता..
----------------------------------------------

हट बे

अटलांटिक

हर्मानस

हर्मानस

केबल कार

टेबल माऊंटन

शहर न्याहाळणारा 'दस्सी'
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.