Wednesday, November 18, 2020

नेदरलँड्सची सफर

 ये कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे २०१४ पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला. लगेच प्लान करुन टिकिट्स बुक केले आणी आता वेध लागले होते ट्युलिप्स बघण्याचे.

११ एप्रिलच्या शुक्रवारी दुपारचे विमान होते त्याप्रमाणे मँचेस्टर एअरपोर्ट्वर आलो आणी विमानासाठी गेटपाशी जाऊन बसलो.

.

.

काही मिनिटात आमचे विमान लागले आणी आम्ही अ‍ॅमस्टरडॅम - स्किपोलला रवाना झालो. एअरपोर्टला उतरुन बाहेर पडलो आणी समोरचं आय अ‍ॅमस्टरडॅमचा लोगो दिसला आणी मग काय एक फोटो तो बनता है :)

.

एअरपोर्टच्या आवारातही छोट्या-छोट्या कुंड्यामध्ये ट्युलिप्सची फुलं लावली होती, वातावरण ही छान होतं , संध्याकाळचे साडेचार वाजले होते , कोवळं ऊन, हलका वारा आणी समोर ट्युलिप्स.

.

मित्र घ्यायला आला , तसेच पटापट सामान गाडीत टाकून थेट अ‍ॅमस्टरडॅम सिटी सेंटरला गेलो, मागेच सिटी, संग्राहलय बघून झाले होते त्यामुळे फारसे ते न करता दाम स्क्वेअरला थोडा टाईमपास केला, तेथूनच थोडे पूढे अ‍ॅमस्टरडॅमच्या "प्रसिध्द" गल्ल्यांमध्ये फेर-फटका मारला ;) आताशी सडकून भूक लागली होती म्हणून माओजमधल्या फलाफालची खादाडी केली. तिकडचा मालक हा पंजाबी आहे, त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारून आम्ही पुन्हा भट्कायला निघालो.

.

फलाफल

.

सिटीत थोडे फिरून आम्ही झुतरमिअरला मित्राच्या घरी आलो, जेवून झोपी गेलो. दुसर्‍या दिवशी Keukenhof / क्युकेनहॉफला निघायचे होते.

सकाळी लवकरचं नाश्ता करून आम्ही निघालो. Keukenhof / क्युकेनहॉफ हे लिस्स (Lisse) ह्या शहरात आहे. येथे जायला हार्लेम, स्किपोल ट्रेन स्टेशन्वरुन बसेस आहेत. Keukenhof / क्युकेनहॉफला गार्डन ऑफ युरोप असे म्हटले जाते. तेथे ट्युलिप्ससोबत, डॅफोडिल्स, हायसिंथ, ब्लूबेल्स, नारसीसस फुलांची ही लागवड केली जाते.

जसे जसे आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफ जवळ येऊ लागलो तसे तसे ट्राफिक आम्हाला लागू लागले. बर्‍याच देशातून असंख्य पर्यटक येथे हा बहर बगायला येतात. तिथे सायकलवरून ही फिरता येतं, पार्कमध्ये सायकल नेण्यास बंदी आहे, त्यासाठी त्यांनी वेगळे सायकल रूट्स बनवले आहेत, तसेच बोटींग करुन ही तुम्ही ह्या ट्युलिप्सचे सौंदर्य बघू शकता. काही गाईडेडे टुअर्सदेखील आहे. Keukenhof / क्युकेनहॉफबद्दल माहिती तुम्हाला इथे मिळेल.

हळू-हळू करत आम्ही एकदाचे तेथे पोहोचलो. गाडी पार्क करुन थेट तिकिटघर गाठले. इतकी गर्दी असूनही तिकिटाला भली मोठी रांग अशी नव्हती. पटापट तिकिटं काढून आम्ही आत गेलो.

.

आता येताच विविध रंगानी सजलेली ती बाग, ते सुंदर ट्युलिप्सचे बल्ब बघून खरचं दिल ट्युलिप ट्युलिप हो गया :)

.

'Jan Bos' - ह्या फुलांचा सौम्य सुवास दरवळत राहतो.

.

टोरंटो

.

ट्युलिपा क्युबेक

.

हार्ट्स डिलाईट

.

विविध रंगाचे ट्युलिप्स

.

.

.

रेड इम्प्रेशन

.

Purissima

.

युडिथ लेस्टर

.

युनायटेड स्टेट्स

.

ऑरेंज एम्परर

.

ऑलम्पीक फ्लेम

.

.

.

मध्ये थोडं थांबून Oranje Nassau Pavilion मध्ये मस्तं फिश एन चिप्स खाल्लं आणी पुढची भटकंती सुरु केली.

.

.

.

.

.

.

.

लेडी जेन

.

फायर विंग्स

.

.

निघता निघता आम्ही Poffertjes house मधले डच पॅनकेक्सवर ताव मारला. मस्तं लुसलुशीत, बटर व पिठीसाखर भरुभूरलेले गरमा-गरम पॅनकेक्स अहाहा!! हेवन!!

.

तेथून आम्ही जवळचं असलेल्या ट्युलिप्स फिल्ड्वर गेलो, खरं तर हे प्रायव्हेट फिल्ड्स आहेत पण काहीजणं तेथे फोटो काढायची परवानगी देतात. मनसोक्तं फोटो काढले अगदी यश चोप्रा स्टाईल ;)

.

.

.

दिवस कसा गेला समजले नाही, आम्ही इथे सहा तास होतो चक्क!! कॅमेरात सगळे सौंदर्य किल्क करुन ही समाधान मिळत नव्हते, मेमरी कार्ड भरले पण मन काही भरत नव्हते. जितके साठवून घेऊ तितके घेण्याचा प्रयत्न करत होते.

जिथे मिपावर जोरदार कट्टे सुरु असताना माझा आनंद द्विगुणीत झाला तो क्षण म्हणजे जेव्हा माझी आणी मिपाकर-अनाहिता मैत्रीण मधूरा देशपांडेची भेट झाली. अगदी अचानक समजले की आम्ही दोघी तेथे ह्याच विकांताला जाता आहोत, म्हटले ही संधी सोडायची नाही, भेटायचेच. ती जर्मनीहून आणी मी राणीच्या देशातून येऊन भेटलो थेट Keukenhof / क्युकेनहॉफला :) किती किती आनंद झाला शब्दात व्यक्त करु शकत नाही :) आमचा ही इल्लूसा कट्टा झाला, थोड्या गप्पा झाल्या व मग पुन्हा नक्की भेटू म्हणत आम्ही आप-आपल्या वाटेने निघालो.

ट्युलिप बघून शांत, प्रसन्न वाटत होते. स्वप्नपुर्ती झाली. आता निघायचीही वेळ झाली होती आणी दूर तक निघाहों में हे गुल खिले हुए म्हणत आम्ही Keukenhof / क्युकेनहॉफचा निरोप घेतला.

आता जायचे होते वॉलंदाम आणी झान्सेस स्कांन्सला.

क्रमशः

Keukenhof / क्युकेनहॉफची ट्रिप मस्तं झाली होती. रात्री मित्राच्या घरी येऊन दमलो असतानाही मस्तं गप्पा मारत बसलो त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि सकाळी उठायला ही थोडा उशीर झाला :P

आवरुन आम्ही प्रथम वॉलंदामला निघालो वाटेत आम्हाला एका फ्लायओव्हरवर नुकतेच उतरलेले केएलएमचे विमान रनवेवर चालताना दिसले. त्या फ्लायओव्हरवरच रनवे असल्यामुळे खालून गाड्या जात आहेत आणि वरुन विमान असे दृश्य दिसत होते. पटकन जमेल तसा मोबाईलमधून फोटो काढला.

.

वॉलंदाम हे एक बंदर आहे. इथे अनेक शेतकरी व मासेमार स्थायिक झाले आहेत. हे बंदर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक फिशींग बोट्स बघायला मिळतात शिवाय डच लोकांचा पेहरावही बघण्यासारखा असतो. असं म्हणतात तेथील स्थानिक बायका आजही डच पेहराव परिधान करतात. आम्हीसुध्दा डच पेहरावात अनेक फोटो काढले ..ते इथे देत नाहीये ;)

छायाचित्र आंजावरुन साभार*

.

वॉलंदामला पोहचेपर्यंत साडेबारा वाजून गेले होते. हवामानही थंड शिवाय थोडे ढगाळ होते.

.

वाटेत अ‍ॅमस्टेल बियर मिळणारे दुकान कम कॅफे लागले. अ‍ॅमस्टेल बियरला अ‍ॅमस्टेल नदीवरुन नाव देण्यात आले.

.

वॉलंदामला येताच समोर दिसते ती सुंदर मार्केनमिअर नदी. एकीकडे सगळे कॅफे, दुकानं आणि दुसर्‍या बाजूला सगळ्या बोटी. दुरवर दिसणार्‍या पवनचक्क्या आणि मार्केन बेट.

मेरी ऑफ वॉटर चा पुतळा

.

मार्केन बेटावर जायला आम्ही लगेच फेरी पकडली.

.

फेरीने जसे वॉलंदाम सोडले तसे ते आणखीनचं सुंदर दिसु लागले.

.

.

.

.

आत्ताशी वारा ही जोरात वाहू लागला होता, वातावरण ही गार होऊ लागले. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर मार्केन बेट दिसू लागले.

.

मार्केन बेट हे द्विपकल्प आहे. इकडची लाकडी, पारंपारिक डच घरं प्रसिद्ध आहेत , लाकडी बुट (क्लॉग्ज) ह्यांचा कारखाना आहे. आम्ही तो मागे डेल्फ्ट्ला बघीतला होता म्हणून ह्यावेळेस नाही पाहिला.

.

.

.

.

.

नदीकिनारी वसलेले हे गाव खुपच सुंदर होतं, थोडीबहूत भटकंती केली , ह्या बेटाची आठवण म्हणून १-२ वस्तूंची खरेदी केली. हवामान गार म्हणून थंडीही वाजू लागली. वॉलंदामला जायला फेरी पकडायची होती , थोडा वेळ होता म्हणून गरमा-गरम कॉफी व हॉट चॉक्लेटचा अस्वाद घेतला. जरा तरतरी आली .

.

जाताना फेरीतून काढलेले काही छायाचित्र.

.

.

.

वॉलंदामला पोहोचताच आम्ही सरळ चीझ फॅक्टरी गाठली. सर्वत्र वेग-वेगळ्या चवीचे, आकारचे चीझ बघून तोंपासू :)

.

येथे चीझ कसे बनवतात त्याची एक डेमो टुर झाली. थोडक्यात माहिती देते.

दुधाला ३० डिग्री सें तापमानावर तापवतात. त्याचे दही बनण्यासाठी त्यात लॅक्टीक अ‍ॅसिड किंवा Rennet त्यात मिसळतात. ते घातल्यानंतर काहीवेळात दुध घट्ट/ सेट (खरवसासारखे) होतं. नंतर त्या दुधाला अनेक पाती असलेल्या रोटेटींग नाईफने बारीक तुकडे / चॉप करतात. व्हे (पनीर तयार केल्यानंतर जे हिरवट्/पिवळट पाणी दिसतं ते) काढून टाकतात. उरलेल्या दह्याला गोल डब्यात दाबून भरतात व वरुन दाब देणार्‍या मशीन खाली २-३ तास ठेवतात. त्यानंतर डब्यातल्या चीझला काढून मिठाच्या पाण्यात चोवीस तास मुरत ठेवतात. त्यावर वॅक्स कोटींग करुन मॅच्युअर होण्यासाठी ठेवतात. एका महिन्याने हे चीझ खाण्यासाठी तयार होतं.

.

थोडे चीझ टेस्टिंग झाले आणी मग आम्ही चीझची शॉपींग करुन झांसेस कांसला निघालो.

नेदरलँड्सच्या लोकांचे सायकलप्रेम :)

.

झांसेस कांसला पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता त्यामुळे एक पवनचक्की जी आतून बघता येते ती बंद झाली होती. फार जळजळ झाली नाही, आमच्या युकेत चालू अवस्थेतील एका पवनचक्कीला गेल्या वर्षी भेट देण्यात आली होती. असो तर इथली चालू अवस्थेतील पवनचक्कीमध्ये पिठं, मसाले दळणे, अशी बरीच कामं केली जातात. ह्या पवनचक्क्या १५७४ साली बांधल्या गेला आहेत. पटापट फोटो काढले, संध्याकाळ ही होऊ लागली होती.

.

.

.

.

एकंदरीत नेदरलँड्सची ट्रिप मस्तं झाली होती, फ्रेश वाटत होत. ट्युलिप्सचा अनुभव अविस्मरणीय, सुखद होता. मन प्रफुल्लित झाले होते, ते टवटवीत, सुंदर गालिचे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले, ज्यांचा आनंद मला उपभोगता आला ह्याचे समाधान होते, हा अनुभव मी आयुष्यभर जपून ठेवीन :)

समाप्त



नेदरलँड्सची सफर - १

या सफरीचे वर्णन इतर भटकंती सारखे नसून सामान्य माणसाला, जो कधीही भारताच्या बाहेर गेलेला नाही त्याला उपयोगी पडावी या हेतूने लिहिलेले आहे. शिवाय केवळ प्रेक्षणीय स्थळे कोणती आणि काय आहेत एवढे न करता त्या देशातील नागरिकांचे जीवन कसे आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. युरोपातील प्रेक्षणीय स्थळे आणि निसर्गसौंदर्य यावर अनेक लेखकांनी उत्तमोत्तम लेख लिहिलेले आहेत/ असतील. मी असे कोणतेही वर्णन न करता फक्त घेतलेल्या फोटोद्वारे हे निसर्गसौंदर्य आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.


ट्युलिप्स

या सफारीची सुरुवात अशी झाली --
म्हणजे असं कि आमच्या लग्नाला मागच्या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली तेंव्हा मला बायकोला घेऊन स्वित्झर्लंड ला जायचे होते. परंतु ऑक्टॉबरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये भयंकर थंडी असते असे वाजल्याने बायकोने चक्क नकाराधिकार( व्हेटो) वापरला. मग आम्ही आपले कोडाईकॅनालला तीन दिवस जाऊन आलो. त्यानंतर उन्हाळ्यात स्वित्झर्लंडला जायचे का असा विचार चालू असताना क्यूकेनहॉफ येथे असणारा ट्युलिपच्या फुलांचा फुलोरा याची माहिती समोर आली. हा फुलोरा पाहायचा हे आमच्या यादीत असल्याने तेथे जायचा विचार चालू झाला. त्यात आमच्या बायकोचा चुलतभाऊ ऍमस्टरडॅम मध्ये सध्या असतो हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा समोर आला. त्यात मध्येच त्याची परत भारतात यायची हूल उठली त्यामुळे आरक्षण करण्यात थोडा उशीर झाला.
त्याचे भारतात यायचे रद्द झाल्यामुळे वास्तव्य त्याच्या घरीच होते. हे त्याच्या घरातून काढलेले खालच्या रस्त्याचे फोटो

VIEW FROM HOUSE

.

परंतु ट्युलिपच्या फुलांचा फुलोरा हा १३ मे पर्यन्तच असतो म्हणून मी विमानाचे आरक्षण करून टाकले. जेट आणि इतिहाद यांचे कोड शेअरिंग असलेले आरक्षण केले. यात अबूधाबीला विमान बदलायचे होते त्यात २ तास वेळ जाणार होता. परंतु थेट ९ तास प्रवास असलेले जेटच्या विमानाचे तिकीट दोघांसाठी ८७ हजार होते तर दोन तासाच्या विश्रामानंतर जाणाऱ्या या विमानाचा दर होता ५४ हजार रुपये. मध्यमवर्गीय माणसाला ३३ हजार रुपये खूप जास्त असतात.

यानंतर व्हिसा साठी अर्ज करण्यात आला. व्ही एफ एस इंटर नॅशनल हि कंपनी बऱ्याच देशांच्या व्हिसाचे काम करते तिचे कार्यालय लोअर परेल आणि महालक्ष्मी च्या मध्ये आहे. जेंव्हा जालावर पाहिले तेंव्हा त्यांनी लिहिले होते कि व्हिसा मिळण्यास १० दिवस लागतील. मला ३२ दिवसांचा अवधी होता म्हणजे मी ५ एप्रिल ची वेळ घेतली होती आणि तिकीट ७ मे चे होते म्हणून मी निःशंक होतो. ज्या दिवशी जायचे होते त्या दिवशी परत जालावर पहिले तर तेथे लिहिले होते कि व्हिसा साठी २१ दिवस लागतील. तरीही वेळ आहे म्हणून मी शांत होतो.

एके दिवशी सकाळी साडे नऊची वेळ घेतली. तेथे सर्व कागदपत्रे नेऊन दिली. कोणताही एजंट किंवा काहीही जास्त न त्रास होता दुपारी एक वाजता हाताचे ठसे पासून सर्व सोपस्कार करून परत आलो. आपलं व्हिसा कुठवर आला आहे हे आपल्याला जाला वर पाहण्याची सोया आहे आणि ८५ रुपये भरले तर आपला व्हिसा कुठे आहे याचा आपल्याला एस एम एस येतो.
साधारण २५ एप्रिल पर्यंत व्हिसा चा कोणताही एस एम एस आला नाही. म्हणून जालावर गेलो तर आता व्हिसा ला ३० दिवस लागतील असे लिहिलेले आढळले. मला संतापच आला. मी व्ही एफ एस इंटर नॅशनलला इ मेल टाकली कि तुम्ही सारखी तारीख कशी बदलत आहात? हा अप्रामाणिकपणा आहे. याची कॉपी नेदरलँड्सच्या वकिलाला (AMBASSADOR) ला पाठवून दिली.

लगेच दुसऱ्याच दिवशी (२६ एप्रिल ला) तुमचा व्हिसा दिल्लीच्या व्ही एफ एस इंटर नॅशनल कार्यालयात पाठवला आहे म्हणून एस एम एस आला आणि)तिसऱ्या दिवशी तुमचा व्हिसा मुंबईत आला आहे तेंव्हा आपला पास पोर्ट दाखवून व्हिसा घेऊन जा म्हणून एस एम एस आला.

तात्पर्य -- व्हिसा साठी काम दोन महिने अगोदरच सुरु करावे. आता व्ही एफ एस इंटर नॅशनल व्हिसा घरपोचपण देता अशी जाहिरात वृत्तपत्रात पाहिली.

यानंतर तेथे जाण्यासाठी पैसे-- म्हणून मी थॉमस कुक आणि ऍक्सिस बँक यांची प्रत्येकी ५०० युरोची प्रीपेड डेबिट कार्डे घेतली. हि कार्डे स्वस्त पडतात म्हणजे यात युरो मला ८० रुपये ५० पैशाला पडला तोच एच डी एफ सी बँकेच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डासाठी ८३. ३० पैसे पडला.( या कार्डावर कुठूनही नेट बँकिंगने पैसे भरता येतात). शिवाय ऍक्सिस बँकेकडून १०० युरो रोखही घेतले.

जालावर कोणत्याही देशाची इत्यंभूत माहिती आहे. ती आपण स्वतः वाचावी. कारण लोकांनी सांगितलेली माहिती बदलू शकते आणि कालबाह्य झालेली असू शकते.

विमानाचे तिकीट काढताना एक चूक झाली होती. ती म्हणजे माझ्या नावाचे स्पेलिंग SUBODH ऐवजी SUBDH असे टाकले गेले होते. मी याच्या कडे दुर्लक्ष केले होते परंतु तीन दिवस अगोदर मला मित्राकडुन कळले कि असे चालत नाही. इमिग्रेशन अधिकारी जर असून बसला तर तुझी सहल रद्द होईल. यावर मी क्लिअर ट्रिप या जालावरील कंपनी जेथून आरक्षण केले होते त्यांना संपर्क केला. त्यावर त्यांनी हात वर करून सांगितले कि तुम्ही जेट एअरवेज कडे संपर्क करा. जेट एअरवेजच्या सांगितले कि आम्ही काही करू शकत नाही तुम्ही क्लिअरट्रीप कडे जा. या प्रकरणात कोणीही काहीही मदत करण्यास राजी दिसले नाहीत. मग मी टरकलो. मी आमच्या हवाई वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या नातेवाईकांमध्ये विचारणा सुरु केली की असे झाल्यास काय होते. त्यांनी असे सांगितले कि इमिग्रेशनच्या माणसाच्या मर्जीवर अवलंबून आहे. या मध्ये माझ्या पुतणीच्या नवऱ्याने सांगितले कि त्याचा एक मित्र जेट एअरवेज मध्ये आहे. (श्री अमर पेठे) त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी सर्व मदतीचे आश्वासन दिले. यात मुंबई ते अबूधाबीचे तिकीट जेटचे होते. त्याचे काम लगेच झाले आणि पुढचे तिकीट इतिहाद चे होते त्यांचे कार्यालय शनिवारी बंद त्यामुळे काम रविवारीच होईल रविवारी रात्री/ सोमवारी पहाटे ५ चे विमान होते. परंतु श्री अमर पेठे यांच्या मदतीने रविवारी दुपारी १ वाजता नावातील बदल करून मिळाला आणि एकदाचे हुश्श झाले. असा मानसिक तणाव होणे अजिबात चांगले नाही. (माझ्या नातेवाईकाचे एकदा नाव श्री ऐवजी कुमारी झाले होते तेसुद्धा श्री अमर पेठे यानि बदलून दिले होते.)

तात्पर्य -- विमानाचे तिकीट आरक्षित करताना आपल्या पासपोर्ट वर असेल तसेच्या तसे तंतोतंत नाव टाका. अन्यथा फार कटकट आणि मानसीक तणाव होऊ शकतो.

TULIPS .
ट्युलिप्स

VONDEL PARK
वोंडेल पार्क -- हे अ‍ॅमस्टरडॅम च्या संग्रहालयांच्या जवळ असलेले एक सुंदर उद्यान आहे.

फोटो निकॉन D ३३०० या कॅमेऱ्याने काढलेले आहेत. जवळचे फोटो पोर्ट्रेट मोड वर काढले आहेत आणि लांबचे ऑटो मोड वर 

 

नेदरलँड्सची सफर भाग -२

मुळात युरोप पाहायचा तर सहा दिवसात पाच देश किंवा १० दिवसात दहा देश असे करणे मला पटत नाही. कारण सहा दिवसात महाराष्ट्रसुद्धा बघून होणे अशक्य आहे.
अर्थात बरेच लोक केसरी वीणा सारख्या ट्रॅव्हल सर्व्हीसने जाणे पसंत करतात आणि तसे करण्याची कारणे आहेत आणि आपल्या ठिकाणी ती बरोबरही असतील. एक तर जाण्यायेण्याचा खर्च आणि पासपोर्ट व्हिसा ची आणि लांब विमान प्रवासाची कटकट परत परत नको. दुसरे म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. विशेषतः शाकाहारी लोकांचे. शिवाय जिकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळापर्यंत बसने नेले आणि आणले जाते. पण मला ते पटत नव्हते हे खरं.

महत्त्वाची गोष्ट-- तुम्ही यात्रा कंपनी बरोबर गेला नाहीत तर युरोपात सर्वत्र मैलोगणती चालत जावे लागते. तशी तयारी नसेल किंवा काही शारीरिक व्याधी असेल तर यात्राकंपनीतर्फे जावे हेच योग्य.

असो. त्यात सौ चा चुलत भाऊच नेदरलँड्स मध्ये असल्याने स्वतः जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले हि वस्तुस्थिती.

सोमवारी पहाटे पाचचे विमान होते. यासाठी आम्हाला दोन वाजता विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. मुंबईतच राहत असल्याने आम्ही रात्री सव्वा वाजता घरून निघालो. इमिग्रेशनचे सर्व सोपस्कार करून तीन वाजेपर्यंत "रिकामे" झालो. पुढे करायला काहीच नव्हते. वेळहि विचित्र होती त्यामुळे धड झोपणेही शक्य नव्हते.

तात्पर्य-- विमानाची वेळ पाहताना आडनिडी वेळ न पाहता रात्री लवकरची वेळ शक्य असेल तर निवडा.एकदा विमानात बसलात कि झोप घेणे शक्य होते.

पहाटे पाच वाजता विमान निघाले. मला खिडकीची सीट मिळाली होती (वेब चेक इन केल्यामुळे) तेंव्हा उड्डाण केल्यावर खाली मुंबई दिसत होती. दिव्यांनी लखलखलेली मुंबापुरी कितीही वेळा पहिली तरी परत परत पाहायला मला फारच आवडते.

विमानात उत्तम नाश्ता मिळाला. इतिहादची खानपान सेवा उत्तम आहे आणि जाताना आणि येताना मिळालेले खाद्यपदार्थ आणि जेवण उत्तम आणि चविष्ट होते.

हे लिहिताना मला एक विनोद आठवला - एक पंजाबी आंटी दुसरीला विचारत होती कि "फोर्टिस अस्पताल बायपास कराने के लिये कैसा है "?
त्यावर दुसरी म्हणाली " बिलकुल बकवास है जी. उनके कँटीन मे "छोले भटुरे" तो मिलते हि नहीं !
असो.

सकाळी स्थानिक वेळ ८ वाजता विमान अबू धाबीत उतरले. तेथे उतरण्यापूर्वी आजूबाजूची मरुभूमी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे जिकडे तिकडे वैराण असा मातकट खाकी रंग पसरलेला आणि केवळ अबू धाबी शहरातील रस्त्यावर मुद्दाम लागवड केलेली खजुराची झाडे सोडली तर हिरवा रंग औषधाला सुद्धा दिसत नाही.

अबूधाबीत इतिहादचे कर्मचारी अतिशय अगत्याने सेवा देत होते. आम्हाला अबूधाबीत विमान बदलायचे होते. तेथे शारीरिक आणि सामानाची तपासणी अतिशय शिस्तबद्ध तर्हेने आणि पटकन झाली. आता पुढच्या विमानासाठी १ तास होता तेंव्हा आम्ही मुखमार्जन करून घेतले आणि तेथे पहिल्यान्दा चहा घेतला. तेथे असलेल्या इंडियन कॅफे मध्ये एक आले घातलेला फक्कड गरमागरम चहा मोठ्ठा मग भरून मिळाला. किंमत फक्त ३३० रुपये (५ डॉलर्स) पण असा उत्तम चहा पूर्ण युरोपात नंतर कुठेही मिळाला नाही हि वस्तुंस्थिती.

काही वेळाने आम्ही पुढच्या विमानात बसलो हे विमान जास्त आरामशीर होते. काही वेळाने विमान युरोपावरून उडत असताना परत एक गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे आता जमीनच रंग खाकी वरून पूर्ण हिरवा झाला आहे.

स्थानिक वेळ दुपारी २ ला आम्ही ऍमस्टरडॅम च्या शिफॉल या विमानतळावर उतरलो तेथे उतरताना सर्वत्र लांबवर हिरवी हिरवी शेते आणि असंख्य पाणथळ जागा सरोवरे नदी इ. निळाई हे पाहून डोळ्याचे पारणे फिरते.

ऍमस्टरडॅमला उतरल्यावर तेथे इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडून बाहेर आलो. या विमानतळातच रेल्वेचे स्टेशन पण आहे आणि बाहेर पडलो कि लगेच बसही मिळते. विमानतळाचा इतर भागांशी संपर्क फारच छान आहे.

ऍमस्टेलव्हीनच्या बस स्थानकावर एक बस बदलून दुसरी बस घेतली आणि तीन स्टॉप नंतर आमचे स्थानक आले तेथे आमचे पेटारे घेऊन उतरलो. बस मध्ये पुढचे स्थान कोणते याचा डिस्प्ले असतो शिवाय गुगल मॅप्स वर आपण कुठे जात आहोत याच्याकडे लक्ष होतेच. नेदरलँड्स मध्ये एक ९२९२ नावाची साईट आहे यात आपण आता कुठे आहोत आणि कुठे जायचे आहे हे टाकले कि मिनिटाबरहुकूम कुठली बस किंवा रेल्चे, कुठे जायचे कुठे बदलायचे हे सर्व येते.

आम्ही दोघांनी आमच्या एअरटेलने आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक घेतले असल्याने सौंच्या भावा आणि वहिनी बरोबर सतत संपर्क होताच. एअर टेलचा १० दिवसाचा पॅक २९९९ रुपये होता. अर्थात परत आल्यावर बिल ३९९८ आले कारण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मूळ बिल ४०० रुपये, २९९९ रोमिंग पॅक आणि ६०० रुपये कर. परंतू दोन्ही मुले आणि आईवडील भारतात असताना त्यांचा आमचा सतत संपर्क होता येणे हा एक मोठा मानसिक आधार होता शिवाय लाखात खर्च करायचा तर हजारात चिकू पणा करू नये.

यथावकाश ऍमस्टेलव्हीन या ऍमस्टरडॅमच्या उपनगरात असलेल्या त्यांच्या घरात पोहोचलो. त्यांचे घर सहाव्या मजल्यावर आहे तेथून काढलेले फोटो मागच्या भागात टाकले आहेत.

अतिशय शांत अशा ठिकाणी यांचे घर आहे. तुरळक वाहतूक, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि सगळीकडे हिरवळ असे त्यांचे घर आहे. नेदरलँड्स उत्तरेस असल्यामुळे मी महिन्यात तेथे पहाटे साडेपाच च्या सुमारास सूर्योदय होत असे आणि रात्री आठ वाजता सूर्यास्त. तसेच संधिप्रकाश रात्री नऊ साडे नऊ पर्यंत असतो. दिवस जवळ जवळ १५ तासांचा असतो. त्यामुळे संध्याकाळी चहा पाणी करून आम्ही साडे सात वाजता ते राहत असलेल्या जागेपासून जवळच असलेल्या जंगलात गेलो तेथील काही फोटो

हे फोटो भ्रमणध्वनीवरून काढलेले आहेत. one plus ५ T

 

 

 

अ‍ॅमस्टरडॅमच काय पण एकंदर युरोप मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आहे. या बसेस अतिशय स्वच्छ असतात. त्यात वायफाय पण आहे. शिवाय त्यातून लहान मुलांची बाबा गाडी, सायकल किंवा दिव्यांग माणसांच्या व्हीलचेअर नेण्याची पण सोय आहे. बरीच माणसे घरापासून सायकलवर बस स्थानकावर येतात आणि बसमध्ये किंवा ट्राम मध्ये सायकल घालून आपल्या जायच्या ठिकाणापर्यंत नेतात आणि तेथे उतरून परत सायकलवर बसून कार्यलयात /आपल्या जायच्या ठिकाणापर्यंत जातात. प्रत्येक बस स्थानकावर पुढची बस किती मिनिटानी येते याचा इलेक्ट्रॉन डिस्प्ले असतो त्यामुळे आपली पुढची बस किती वेळात येईल हे आपल्याला नक्की माहिती असते.

bus

अगदी अशीच सुविधा रेल्वेतही आहे.

परंतु भारतीय रुपयात पाहायला गेलात तर तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भयंकर महाग आहे. विमान तळापासून भावाचे घर हे अंतर १३ किमी आहे यासाठी दोघांचे मिळून १५ युरो म्हणजे १२०० रुपये झाले. हे अंतर पुणे विमान तळापासून ते नळ स्टॉप इतके आहे.

तेथे फिरायचा एक दिवसाचा दोन दिवसांचा आणि तीन दिवसांचं पास पण मिळतो जो बस ट्राम किंवा स्थानिक रेल्वेवर कितीही वेळा जाण्यासाठी वापरता येतो. ज्याची किंमत अनुक्रमे १८.५०, २६. ५० आणि ३३.५० युरो माणशी आहे

युरोपात रेल्वे तर भयंकर महाग आहे. मला ऍमस्टरडॅम हुन ब्रसेल्स (कि ब्रुसेल्स)ला (२०० किमी) जायचे तिकीट काढायचे होते. तेंव्हा जालावर पाहिले तर सर्वात स्वस्त रेल्वेचे तिकीट २५ युरो होते (म्हणजे मुंबई पुणे अंतरासाठी २००० रुपये).तेथे रेल्वेला डायनॅमिक प्राइसिंग आहे. आणि गर्दीच्या वेळेस हेच तिकीट ५८ युरो होते. हि गाडी २ तास ४५ मिनिटात जाणार होती.

अशीच थालीस (THALYS) हि अतिवेगवान फ्रेंच गाडी हेच या अन्तर १ तास ४५ मिनिटात जाणार होती त्याचे तिकीट ७५ युरो होते. आणि गर्दीच्या वेळेस हेच तिकीट १०० युरो होते( म्हणजे ८००० रुपये) ४० रुपये किमी साठी.

दिल्ली ते आग्रा या मार्गावर शताब्दी चे तिकीट वातानुकूलित कुर्सीयान ६१८ रुपये (नाश्ता चहा सकट) आणि रुपये १०१९ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे आणि हि गाडी २०० किमी २ तासात जाते.

तेथे गंमत म्हणजे आपल्यासारख्या पॅसेंजर गाडीला "स्प्रिंटर" म्हणतात आणि एक्स्प्रेसला "इंटरसिटी"

train

आम्ही आपले १२ युरो च्या बसचे तिकीट काढले जी ३ तासात जाणार होती आणि आमच्या सोयीच्या वेळेत आणि घराच्या जवळून निघत होती सकाळी ०९.१५.

साधारण सर्व लोकांचे एकच म्हणणे असते कि तुम्ही युरोपात गेलात तर युरो चे रुपयात रूपांतर करण्याचा प्रयत्न सोडून द्या.
हा युरो चे रुपयात रूपांतर करण्याचा प्रयत्न नाही तर वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे. कारण नेदरलँड्स मध्ये एका अभियंत्याचा पगार साधारण तीन ते साडेतीन हजार युरो इतका आहे आणि किमान वेतन दीड हजार युरो इतके आहे. या कारणास्तव तिथे बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक सायकलने जाणे पसंत करतात.

 

नेदरलँड्सची सफर भाग -३
मेहुण्याच्या (अक्षय) घरी वास्तव्य असल्याने बऱ्याच गोष्टी फार सुलभ झाल्या हि एक वस्तुस्थिती होती. त्याने आम्ही येणार म्हणून तेथे वापरायची दोन ovi chipkaart नावाची प्रीपेड कार्डे घेऊन ठेवली होती. यात जालावरून पैसे भरायचे आणि बस, ट्राम, मेट्रोमध्ये चढल्यावर आणि उतरताना तेथल्या यंत्रावर टेकवायचा कि आपोआप त्यातून पैसे वळते होतात.
एकंदर युरोपातील हवामान बेभरंवशी असते हे ऐकून माहित होते. त्यामुळे तेथे हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडत होतो. आजकाल हवामानाचा अंदाज बऱ्यापैकी अचूक असतो, त्यामुळे जेंव्हा त्यांनी पाऊस पडेल सांगितले तेंव्हा जवळचीच ठिकाणे पाहायला गेलो आणि हवामान स्वच्छ आणि निरभ्र आहे हे पहिले तेंव्हा क्यूकेनहॉफ सारख्या ठिकाणी गेलो.
यामुळे आमच्या आठही दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला सर्वोत्तम हवामानाचा फायदा घेता आला.
तेथे पोहोचल्यावर दुसरा दिवस हा जवळच सहलीला जाऊ असे ठरवले होते. कारण विमानातील झोप हि तितकी चांगली झाली नव्हती.
दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच म्हणजे ऍमस्टरडॅमला जाऊन तेथली वस्तुसंग्रहालये, कालवे आणि बागा पाहायचे ठरवले. त्यासाठी सकाळी व्यवस्थित नाश्ता करून पाण्याची बाटली घेऊन आणि निघण्यापूर्वी स्वच्छतागृहात जाऊन निघालो.
याचे कारण युरोपात कुठेही स्वच्छतागृहा वापरण्यासाठी अर्धा (४० रुपये) ते पाऊण युरो(६० रुपये) इतके पैसे द्यावे लागतात. शिवाय कुठेही पाणी मिळत नाही. हॉटेलात सुद्धा पाणी विकतच घ्यावे लागते ज्याची किंमत ४ युरो आहे. ३२० रुपये देऊन एक बाटली. आपल्याकडे कोणत्याही हॉटेलात कधीही पाणी फुकट मिळते. मुंबईत तर कोणत्याही रेस्टोरंट मध्ये शिरा टेबलावर असलेले पाणी प्या ते नसेल तर पाणी मग प्या आणि चालू लागा हि सवय असल्यामुळे पाणी विकत घ्यावे हे काही पटतच नाही.
स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे द्यावे हे ठीक आहे कारण ते बांधण्यासाठी आणि साफ ठेवण्यासाठी साधनसामग्री आणि मानवी श्रम लागतात. पण पाण्यासाठी ४ युरो हे काही पटले नाही.जी गोष्ट जवळ जवळ फुकट मिळते ती इतक्या महाग विकत घ्यावी लागते हे चक्क अन्यायकारक आहे असेच वाटते. संपूर्ण ८ दिवसात मी एकदाही पाणी विकत घेतले नाही. सगळीकडे घरचे पाणी घेऊन जात होतो आणि एकदा प्रसंग आला तर मी चक्क ७ अप विकत घेतले जे पाण्यापेक्षा स्वस्त म्हणजे अडीच युरोला १ लिटर होते.
असो.
आम्ही सर्वप्रथम व्हॉन्डेल पार्क या शहराच्या मध्यभागी असलेल्या उद्यानात गेलो. अतिशय शांत फारशी गर्दी नसलेले उद्यान, छान झाडी, मोकळे निरभ्र आकाश आणि हवेत थोडासा गारवा. VONDEL PARK

त्या उद्यानात भटकून आलो. थोडे फार फोटो काढले. एका ठिकाणी १५ मिनिटे शांतपणे बसून आजूबाजूच्या वातावरणाचा मुक्तपणे आस्वाद घेतला. VONDEL PARK

VONDEL PARK

VONDEL PARK

VONDEL PARK

थोडावेळ शांतपणे बसल्यावर तेथून जवळच असलेल्या व्हॅन गॉग च्या संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले.
याचे तिकीट तुम्हाला ऑनलाइनच काढावे लागते. याचे दुपारी तीन वाजताचे तिकीट काढले आणि आता फक्त बारा वाजले होते मधल्या काळात काय करावे म्हणून ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील बोटीचे तिकीट काढले. (१२.५ युरो एका तिकिटाला/ १००० रुपये माणशी). बऱ्यापैकी ऊन होते म्हणून छप्पर असलेल्या बोटीचे काढले. छप्पर असले तरी पुढे किंवा मागे असलेल्या मोकळ्या जागेत जात येते. तसेच छताला काच होती आणि खिडक्या पण मोठ्या मोठ्या होत्या.
अन्यथा उघड्या बोटीचेहि तिकीट मिळते, ते काढले नाही म्हणून बायको जरा नाराज झाली. पण काही वेळाने उन्हाचे चटके बसू लागले तेंव्हा नवरा इतका मूर्ख नाही याची तिला खात्री पटली असावी. असो
ऍमस्टरडॅमच्या कालव्यातील हि सफर सुंदर आहे. त्यात एक गाईडपण होती जी इंग्रजीत सर्व माहिती सांगत होती आणि याचा फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन भाषेत अनुवाद हेडफोनद्वारे ऐकण्याची सुविधा पण होती. या शहराचा इतिहास तेथील बऱ्यचशा सुंदर इमारती या कालव्याच्या काठाने असल्याने पायी फिरण्यापेक्षा असे बोटीने फिरणे फारच छान झाले. बोटीत जागा पण भरपूर होती. त्यामुळे उजवीकडे, डावीकडे असे दोन्ही कडे खिडकीत बसून पाहता आले. ऍमस्टरडॅम च्या कालव्यात किंवा इतर जलमार्गात फिरणाऱ्या या सर्व बोटी या विजेवर चालणाऱ्या( रिचार्जेबल बॅटरीवर) असल्याने तुलनेत बऱ्याच शांत असतात आणि कुठेही रहदारीचा आवाज किंवा वाहनांच्या हॉर्नचे आवाज येत नाहीत त्यामुळे अशा बोटीतून फिरायला जास्त छान वाटते.

CANAL

CANAL

CANAL
कल्पना करा कि पुण्याच्या पेठांमधून गल्ल्याबोळातुन किंवा मुंबईत फोर्ट भागातील इमारती रस्त्यातून शांतपणे बोटीतून फिरून पाहायला किती छान वाटेल. बाकी इमारतींबद्दल त्यांनी वेगवेगळी माहिती सांगितली तितकी आता माझ्या लक्षात नाही( म्हणजे तितकी ती महत्त्वाची नव्हतीसुद्धा).
काही इमारतीचे फोटो (जालावरून साभार).
हि सहल करून आलो तेंव्हा अजून सव्वातास बाकी होता तेवढ्या वेळात पोटपूजा आटपली म्हणजे एक फूटभर लांब "बागेत" (baguette) या पावात चिकन सॉसेज, सॅलड, तीन तर्हेची सॉसेस आणि चीज घालून केलेला रोल घेतला. तेवढ्यात आमचे दोघांचे तुडुंब पोट भरले. ( नाही तरी आम्ही दोघे खाण्यात फुकटच आहोत).
यानंतर परत व्हॉन्डेल पार्कमध्ये आलो. तेथे छान पैकी एका झाडाखाली आम्ही पहुडलो. अर्धा तास निःशब्दपणे आडवे होऊन शांतता ऐकण्याची मजा काही और असते.
तेथे शेजारीच तो म्युझिअम होता.पावणे तीन ला चालत चालत तेथे गेलो. या संग्रहालयात व्हॅन गॉगच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन त्याने काढ्लेली स्वतःची आणि इतर चित्रे पाहिली.
कदाचित माझी अपेक्षा फार असावी पण एकंदर तेथे असलेली चित्रे पाहून बर्यापैकी निराशाच झाली. पिवळ्या रंगाच्या विविध छटातच बहुसंख्य चित्रे होती. पण एकंदर रंग आणि चित्रे पाहून माझी पार निराशा झाली.
व्हॅन गॉगची चित्रे म्हणजे त्यांना चांगलेच म्हटले पाहिजे असा एकंदर ती पाहिलेल्या बऱ्याच लोकांचा अविर्भाव होता/ आहे.
हे म्हणजे के एल सहगल यांची गाणी चांगली आहेत असे म्हटलेच पाहिजे असा भाव येतो. मला चित्रकलेत काहीही समजत नाही. तसा माझा दावाही नाही.
मी काढलेली प्रकाशचित्रे वर काच असल्याने नीट येत नाहीत हे समजल्याने दोन चित्रानंतर मी कॅमेरा बंद केला

VAN GOGH

VAN GOGH
जालावर त्यांच्या चित्रांची प्रकाशचित्रे आहेत.
https://www.google.co.in/search?rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&biw=1164&bih...
परंतु एकंदर ऍमस्टरडॅममध्ये संग्रहालये यांचा उदो उदो ( गाजा वाजा- hype) इतका जास्त केला गेला आहे कि तुम्ही तेथे जाऊन अमुक तमुक म्युझियम पहिला नाहीत तर तुमचे आयुष्य फुकट गेले असे म्हणण्यापर्यंत hype केलेली आहे.
( पुण्यातहि याचा अनुभव येतो-- तुम्ही सवाई गंधर्व महोत्सवाला गेला नाहीत? किंवा मी फक्त भीमसेन ऐकतो बाकी सर्व फालतू गायनाला कोण जाणार इ इ ).
ऍमस्टरडॅम येथे एकंदर ४० म्युझियम आहेत. एकंदर प्रत्येक वस्तू जतन करून ठेवण्याची त्यांची पद्धत चांगली आहे (आणि तिचा उदो उदो/ गाजावाजा करून पैसा करण्याची सुद्धा) कोणताही म्युझियम २० ते २५ युरो आहे म्हणजे १५०० ते २००० रुपये माणशी.
हे सर्व पूर्ण वैयक्तिक आस्वादाचा प्रभाव आहे आणि यात व्हॅन गॉग यांचा उपमर्द करण्याचा कोणताही हेतू नाही
शेवटी मला जे आवडतं तेच संगीत/ चित्र मी चांगलं म्हणणार.
असो. आपल्याला चित्रातील काहीच कळत नाही हे गृहीत धरून मी परवाच ३ जून ला मुद्दाम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय( जुने नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) येथे चित्रे पाहायला गेलो. (उलटी तुलना लगेच झाली. तिकीट ८५ रुपये. एक युरो फक्त. पाणी फुकट. प्रसाधन फुकट.) तेथे असलेली असंख्य सुंदर सुंदर चित्रे ज्यात हळदणकर राजा रविवर्मा सारखे आणि काही दिग्गज युरोपियन चित्रकार यांची चित्रे पाहून आलो. हि चित्रे मला नक्कीच जास्त भावली. या संग्रहालयात अक्षरशः २ हजार वर्षा पूर्वी पासूनच्या हडाप्पा संस्कृती लोथल येथील वस्तू कलाकृती पासून ते १८ १९ व्या शतकातील असंख्य कलाकृती, अत्यंत सुबक मूर्ती, वस्त्रे, शस्त्रे, चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू आहेत. बऱ्याच वर्षांनी आपल्याच देशातील आपल्याच शहरातील इतक्या उत्कृष्ट संग्रहालयात आपण गेलो आणि आपला समृद्ध वारसा पाहायला मिळाला याचा मला अक्षरशः अभिमान वाटला. परत येताना संग्रहालय ते सी एस एम टी स्टेशन चालत आलो आणि मुंबईतील असंख्य १८ व्या आणि १९ व्या शतकातील जुन्या इमारती पाहत पाहत आलो. मध्ये भूक लागली म्हणून महेश लंच होम मध्ये पोटपूजाही केली.

एक गोष्ट मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली आहे कि जोवर भारत देश बऱ्यापैकी पाहून होत नाही तोवर युरोप अमेरिकेत तेथील इमारती/ वास्तुकला स्थापत्य पाहायला जायचे नाही.

 

नेदरलँड्सची सफर भाग -४

एक दिवस ऍमस्टरडॅम मध्ये फिरण्यात घालवून दुसऱ्या दिवशी आम्ही क्यूकेनहॉफ येथे ट्युलिप उत्सव पाहण्यास सज्ज झालो.

या उत्सवाची तिकिटे तुम्हाला जालावर काढता येतात आणि हि तिकिटे शिफॉल विमानतळापासून तुम्हाला क्यूकेनहॉफला नेणे आणि आणणे या दोन्ही प्रवासाचा खर्च गृहीत धरूनही काढता येतात. हि सोय फारच चांगली आहे. कारण अगोदरच लिहिल्याप्रमाणे शिफॉल विमानतळ हा सर्व वाहतुकीनी युरोप आणि बाकी सर्व जगाशी व्यवस्थित जोडलेला आहे. त्यामुळे युरोपातील आणि बाहेरील पर्यटक तेथे रेल्वे, विमान किंवा बसने सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकतात. असो.
आम्ही बस पकडून शिफॉलला पोहोचलो तेथे अक्षरशः दर मिनिटा दोन मिनिटाला क्यूकेनहॉफसाठी बस जात होती. त्यात बसून आम्ही तेथे पोहोचलो.

जगातील एक आश्चर्य वाटेल इतकी सुंदर बाग आहे. जगनियंत्याने जितके रंग असतील ते इतक्या कलात्मकतेने तेथे ओतले आहेत कि अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटावे. त्याबद्दल काहीही न लिहिता मला जमेल तितकि प्रकाश चित्रे टाकत आहे.

याच साठी केला होता अट्टाहास असे वाटून आल्याचे सार्थक झाले असे वाटले. तरी आम्हाला तेथे जायला थोडा उशीर झाला कारण काही काही ट्युलिप सुकायला लागले होते आणि सुकलेले ट्युलिप तेथील कर्मचारी काढून टाकीत असत ज्यामुळे गर्द असलेले काही ताटवे थोडेसे विरळ झाल्याचे जाणवते.

आमच्या सौ ला थंडी सोसत नाही त्यामुळे एप्रिल च्या ऐवजी मी मध्ये आल्याने असे झाले परंतु एकंदर हवामान फारच उत्तम होते अन थंडी गुलाबी होती बोचरी नव्हती.

सगळे फोटो माझ्या निकॉन ३३०० कॅमेऱ्याने काढलेले आहेत एकतर पोर्ट्रेट किंवा ऑटो मोड वर काढलेले आहेत. त्यातील जवळ जवळ ३०० फोटो चा दुवा येथे देत आहे. ज्याला पाहिजे त्याने हा दुवा उघडून पाहावा आणि फोटो आवडला तर हवा तेथे वापरावा.

(टीप -- फोटो खाली माझे नाव/ श्रेय कृपया टाकू नये). परमेश्वराने दिलेल्या या अनमोल स्वर्गीय ठेव्यावर माझा कोणताही हक्क नाही

https://photos.app.goo.gl/fG1YQgCm68Be3yHA8

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

k

kukenhof

kukenhof

k

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof

kukenhof


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...