14/11/2017
देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून
बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद
इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे. त्या
परंपरेतील संत बाबा भागवत महाराज यांचा जन्म देवपूर गावी झालेला आहे. भागवत बाबांच्या जन्माचा भाग अनेक चरित्रकारांनी रसाळ पद्धतीने रंगवलेला आहे.
देवपूर गाव देवनदी तीरावर वसले आहे. गावाच्या चौफेर हिरवीगार झाडी आहे. त्या वनराईच्या आश्रयाने अनेक त-हेचे पशू-पक्षी वास्तव्य करून आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पक्षी म्हणजे मोर. ब्रिटिशांनी देव नदीवर कालवा बांधला. नदीतील पूरपाणी गावानजीकच्या शेतीला त्या कालव्यातून पुरवले जाते. त्यामुळे गावाचा बराचसा भाग हा ओलिताखाली आला.
गावामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक आहेत. मराठा, जरेमाळी, मांग, महार, ढोर, परिट, भिल्ल, चांभार, सोनार, मारवाडी, कोळी, ब्राह्मण इत्यादी जातींचे लोक एकत्र राहतात.
सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या विडी उद्योगाचे काही कारखाने देवपूर गावामध्ये पूर्वी चालत. परंतु विड्यांची मागणी कमी होत असल्याने तो उद्योगधंदा मंदीच्या मार्गावर आहे.
देवपूरात वर्षभरातून दोन वेळा यात्रोत्सव पार पडतो. यात्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी जणू ती पर्वणी असते! चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी संत बाबा भागवत महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू होते. त्या दिंडी सोहळ्यासाठी देवपूर, धारगाव, फर्दापूर, पंचाळे, शिंदेवाडी या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांच्या तालात दिंडी प्रदक्षिणा सुरू असते. पालखी पहाटे पाच वाजता ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या गाभाऱ्यात येते. कावडीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी होते. त्यासाठी भाविक ग्रामस्थ गोदावरीचे पाणी पायी जाऊन घेऊन येतात व गावातील देवतांना त्या जलाने स्नान घालतात. त्याच दिवशी कुस्त्या होतात. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काल्याच्या कीर्तनाने यात्रेचा शेवट तिसऱ्या दिवशी होतो.
श्रावण महिन्यामध्ये सव्वा महिना महादेवाच्या मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवतात. गावातील प्रत्येक कुटुंबातून नंदादीप लावला जातो. ते दीप लावण्याचे काम गावातील गुरव समाजाचे लोक करतात. त्या बदल्यात त्यांना दक्षिणा दिली जाते. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रावण पंचमीच्या दिवसापासून गावामध्ये केले जाते. गावातील वाड्यानुसार पहारा (वीणा किंवा टाळ यांचा नाद अखंड सुरू ठेवणे) दिला जातो. सात दिवस सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होतो. रात्री नऊ वाजता कीर्तन, पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होते. श्रावण वद्य एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होतो.
गावातील
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीच्या
दिवशी भरतो. त्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे खंडेराव महाराजांचा भगत बारा बैलगाड्या
ओढत आणतो. जागरण, गोंधळ यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम (विधी) उत्सवात पार
पाडले जातात. त्र्यंबकेश्वर येथे होणा-या निवृत्ती महाराज यात्रेसाठी श्री
क्षेत्र बेलापूर येथून सुमारे चारशे वर्षांपासून पायी दिंडी सोहळा पौष
महिन्यामध्ये आयोजित केला जातो. त्यासाठी लागणारी शिधासामग्री, बैलांसाठी
चारा ही व्यवस्था गावकरी करतात. श्री क्षेत्र देवपूर ते श्री क्षेत्र
त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा असतो. शेकडो भाविक त्या सोहळ्यात सहभागी
होतात.
पंचक्रोशीतील लोक बाबा भागवत महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला येतात. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो. गावामध्ये नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
देवपूरला पौराणिक ऐतिहासिक महत्त्वही आहे. अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी झाले. त्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. त्या गदारोळांत दोन व्यक्ती बचावल्या. त्यांपैकी नाना फडणवीस अंगाला राख फासून बैराग्याच्या झुंडीत घुसले तर महादजी शिंदे तोफेचा गोळा लागल्याने जखमी अवस्थेत पडले होते. राणेखान हे शिंद्यांच्या फौजेत पखालीवरून पाणी वाहण्याचे काम करत.त्यांनी महादजींना उचलून त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केला आणि त्यांचे प्राण वाचवले. राणेखानने शत्रूपासून लपत-छपत मैलोगणिक प्रवास केला व त्याने त्याच्या मुलुखात महादजींना आणले. महादजींनी राणेखानने दाखवलेल्या स्वामीनिष्ठेमुळे त्याला सरदारकी व जहागिरीही प्रदान केली. त्यांत सिन्नर तालुक्यातील देवपूर, पिंपळवाडी, निमगाव, पास्ते या गावांचा समावेश होता. राणेखानने त्यांपैकी देवनदीच्या किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न देवपूर गावाची वास्तव्यासाठी निवड केली. राणेखानने देवपुरात काही वास्तूंचे बांधकाम केले. संपूर्ण देवपूरला कोट बांधून त्यात दिवाणखाना, नगारखाना, कबुतरखाना, दारूखाना, मशीद आणि मंदिर या वास्तूही बांधल्या. गावाला लागून असलेल्या देवनदीच्या पलीकडील तीरावर कोट बांधून तेथे बडाबाग नावाचे शाही कबरस्थान बनवले आहे. त्या बडाबागेतच राणेखानची भव्य कबर आहे.
- सोपान वासुदेव गडाख
देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!
राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे. मात्र स्थानिक पातळीवर ते स्थळ 'राणेखानचा वाडा' या नावाने ओळखले जाते.
देवपूर गावाची महती तीन नावांनी प्रसिद्ध आहे. गावाला राजकीय दृष्टिकोनातून नाना गडाखांचे देवपूर असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने, ‘बाबा भागवतांचे देवपूर’ असा उल्लेख केला जातो. तर ऐतिहासिक दृष्टीने ते गाव ‘राणेखानचे देवपूर’ म्हणून ओळखले जाते. राणेखानचे वंशज देवपूर येथे राहत नाहीत. मात्र राणेखानबद्दलची संक्षिप्त माहिती गावातील कबरीच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली आहे.
पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी 1761 मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे जबर जखमी झाले. त्यांना राणेखान याने पाणक्याचा वेश धारण करून सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवला. महादजी शिंदे यांनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केले. त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. राणेखानने देवपूर गावात अनेक वाडे व हवेल्या बांधल्या. तसेच, त्याने संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ एक मशीद व मंदिर बांधून, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. राणेखानने बंधारे बांधून देवपूर परिसर समृद्ध केल्याचे दाखले आहेत. राणेखानचे निधन 22 डिसेंबर 1791 रोजी झाले.
राणेखानने देवपूर गावातून वाहणा-या देवनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत निसर्गरम्य जागेत ‘बडाबाग’ हे शाही कब्रस्तान बांधले होते. कबरीचे आवार सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाटयापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर सुरू होते. त्या आवाराच्या पश्चिमेकडील पुरुषभर उंच तटबंदी, घडीव दगडातील दरवाज्याची कमान व अन्य अवशेष यांमधून जाणवणाऱ्या गूढ वातावरणाच्या सान्निध्यात, राणेखानच्या समाधिस्थळाचा सौंदर्यानुभव अधिक आकर्षक वाटतो. राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत. त्यांपैकी एक त्याच्या आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती. त्या आवारात समाधीसारख्या दिसणाऱ्या इतर वास्तू व चबुतरे यांचे अवशेष आहेत. आवारातील सर्व जागा दगडी पायवाटेने एकमेकांस जोडल्या गेलेल्या आहेत. काटकोनातील मोकळ्या जागेत कारंज्यांनी सजवलेले हौद व निरनिराळी झाडे यांमुळे ती जागा त्या काळी अधिक शोभिवंत दिसत असावी. परिसरात पेरु, चिंच व डाळिंब यांच्या बागा असल्याने शेकडो मोर वास्तव्यास आहेत. राणेखानने त्याचे मरणोत्तर जीवन प्रसन्न, शांत व सर्वांगसुंदर स्थळी जावे म्हणून त्या जागेचा आराखडा व त्यातील वास्तू, स्थापत्यकलानिपुण, कला-संवेदनशील कलाकाराकडून बनवून घेतल्या असाव्यात याचा प्रत्यय ते स्थळ पाहताना पावलोपावली येतो.
साधारणत:
पराक्रमी वीर पुरुषांची समाधिस्थळे कणखर व राकटपणाचे दर्शन घडवतात, पण
राणेखानची समाधी त्या बाबतीत वेगळी ठरते. त्याने स्वत:साठी बांधलेले
समाधिस्थळ, आकाराने भव्य नसले तरी ते कला-सौंदर्यपूर्ण स्थापत्याचा
उत्कृष्ट नमुना आहे. त्या समाधीसाठी वापरलेला फिकट पिवळसर भुरकट रंगातील
दगड हा पोरबंदर - गुजरात -येथील, लाईमस्टोन व सँडस्टोन यांच्याशी
मिळताजुळता दिसतो. जमिनीपासून सहा फूट उंच चौथऱ्याचा भाग, समाधीची
जोत्यापर्यंतची रचना, त्यावरील कोरीव व लयबद्ध आकृतिबंध पाहणाऱ्याला
गुंतवून ठेवतात. चौथऱ्यावरील समाधीभोवतीची मोकळी जागा समाधिस्थळाच्या
भव्यतेत भर घालते. समाधीच्या चारही दिशांना भिंतीच्या सम आकारातील पोकळीत
दरवाजे बसवले आहेत. त्यावर कोरलेली अनेक पदरी महिरप, दरवाज्याची दुपदरी
दगडी चौकट, अर्धगोलाकार कमान व आयताकृती चौकटीतील भिंतीचा पृष्ठभाग तासून
साधलेले कोनाडे आणि भिंतीपासून पुढे ओढलेल्या तळभागातील दगडी पटट्यांवरील
ठळक कोरीव नक्षीकाम प्रेक्षकाला भान विसरायला लावते. चारही कोनाडयांतील
भिंतींचे पृष्ठभाग, भिंत व छताचे सांधे जेथे मिळतात त्या कोपऱ्यांत फिटट्
बसवलेले दगडी पुष्पकळ्यांचे आकृतिबंध व दगडात कोरलेला फुलांच्या देठाएवढा
फुगवट्याचा भाग स्थापत्यकलेतील लवचीकतेचे उदाहरण आहे. बहु अर्धगोलाकारातील
आयताकृती दगडी चौकटीत बसवलेल्या कमानीला धरून ठेवणारे दोन्ही बाजूंचे स्तंभ
ही मुघल वास्तुकलेची शैली समजली जाते. चारही दिशांच्या दर्शनी भिंतींवरील
कमानी व त्यात कोरलेले नाजूक आकृतिबंध आणि कोपऱ्यातील खाचेत बसवलेल्या
रेखीव स्तंभाची रचना कलासक्त नजरेतून निर्मिलेला आविष्कारच वाटतो!
समाधीच्या घुमटाचा कळीदार पाकळ्यांतून बनवलेला बाह्यभाग व छताचे चारी कोपरे
आणि दरवाज्याच्या माथ्यावरील कमी-अधिक उंचीचे मनोरे त्या समाधिस्थळाचे
सौंदर्य समृद्ध करतात. समाधिस्थळाच्या जोत्याच्या चारी बाजूंच्या
पृष्ठभागावरील व छताच्या उतरत्या सज्ज्यावरील आकृतिबंधातील नक्षीकाम व इतर
घटक पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. सुंदर निळे आकाश, काटेरी बाभूळ व
कडुनिंबाच्या सावलीत कलासंवेदनशील कलावंताने घडवलेले ते दगडी शिल्प,
दिमाखाने उभे आहे.
समाधीची
अंतर्गत रचना कलात्मक व मन प्रसन्न करणारी आहे. चारही दिशांतील
दरवाज्यांचा काटकोन साधून समाधीच्या मधोमध ठेवलेला पांढऱ्या रंगातील चबुतरा
लक्षवेधक आहे. भिंतीच्या अंतर्भागावर पांढऱ्याशुभ्र चुन्याच्या गिलाव्यात
केलेल्या कोनाड्यांचे लहान-मोठे छाप व आकृतिबंध यांतून साधलेली लयबद्धता या
गोष्टी त्या जागेची मर्यादा विस्तारण्याचे काम करतात. समाधिस्थळाच्या सम
दरवाज्याची रचना व पांढरा रंग यांमुळे परावर्तित सूर्यप्रकाश त्या वास्तूत
सूर्यास्तापर्यंत राहतो. पश्चिमेकडील दरवाज्याच्या चौकटींची फिकट हिरवी
रंगछटा त्या जागेत चैतन्य फुलवण्याचे काम करते. घुमटाच्या आतील व चौकटीच्या
भागावरील कोरीव कामात विविधता दिसते. समाधीच्या अंतर्बाह्य पृष्ठभागावरील
लहानमोठया आकारातील सम आकृतिबंधांच्या पुनरावृतीत त्या स्थळाचे खरे
सौंदर्य दडलेले आहे. त्या अभिजात वास्तुकलेत परिसरातील रुक्षपणा
विसरवण्याची क्षमता आहे.
राणेखानने स्वत:च्या वास्तव्यासाठी देवपूरची निवड केली होती. त्याने तेथे बांधलेली चार मजली हवेली अवशेषरूपात उरली आहे. त्या वाडयात, दहाएक वर्षांपूर्वी विड्या वळण्याचे काम होत असे व काही वर्षांपूर्वी त्या जागेचा उपयोग गोदामासाठी केल्याचे कानावर आले. देवपूर गावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या वेशीचे चिरे ढासळले आहेत, तर वेशीचे जीर्ण दरवाजे लेचापेच्या आधारावर उभे आहेत.
राणेखानचे समाधिस्थळ, ज्या काळात बांधले होते ते जसेच्या तसेच आहे! काही घडीव चिरे ढासळले आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे.
- चंद्रशेखर बुरांडे
(छायाचित्र - चंद्रशेखर बुरांडे)
Last updated on 11 Nov 2017
वडांगळीची सतीदेवीची यात्रा
‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे
वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आहे. त्या यात्रेत
हजारोंच्या संख्येने दिले जाणारे बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने
यामुळे ती यात्रा दरवर्षी गाजते.
वडांगळी हे गाव सिन्नरपासून पूर्वेकडे बावीस किलोमीटर अंतरावर देवनदीच्या काठावर वसलेले आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या, वडांगळीची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. तेथे पंचक्रोशीतील आठ-दहा गावांची बाजारपेठ भरभराटीला आली आहे. गावाच्या पश्चिमेला सायखेडा रस्त्यालगत सतीदेवी-सामंतदादाचे देखणे मंदिर लक्ष वेधून घेते.
त्या देवस्थानाच्या निर्मितीमागे दंतकथा प्रचलित आहे. सामतदादा हा बंजारा तांड्याचा नायक. त्याच्या मृत्यूनंतर त्याची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. तो लिंबू वडांगळी गावाजवळ पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या दोन्ही पत्नी सती गेल्या. तेथे सामंतदादा आणि सतीदेवीची मंदिरे उभारण्यात आली. सतीदेवी मंदिरापुढे दहा फूट अंतरावर सामंतदादाचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरात पारंपरिक बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ मूर्ती आहे. सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे.
वडांगळीत १९७० सालापर्यंत केवळ सतीदेवी व सामतदादा यांची दगडी साळुंका असलेली दोन छोटी देवळे होती. गोवर्धन राठोड नावाच्या बंजारा भाविकाने देवीला नवस केला आणि त्याला अपत्यप्राप्ती झाली. त्याने पुत्रप्राप्तीच्या आनंदात मंदिराचा जीर्णोद्धार केला. वडांगळीत सतीदेवी व सामतदादा अशी दोन छोटेखानी सुबक मंदिरे उभी राहिली.
सतीदेवीच्या मंदिरात दगडी चिऱ्यासोबतच सतीदेवीच्या दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सामतदादाच्या दोन पत्नींपैकी एक ब्राह्मण तर दुसरी बंजारा जमातीची होती. त्यामुळे त्या मंदिरातील एक मूर्ती ब्राह्मण स्त्रीच्या पारंपरिक वेशात तर दुसरी मूर्ती बंजारा जमातीच्या पेहरावात आहे.
वडांगळीतील
प्रभाकर सूर्यकांत म्हाळणकर व शंकरराव सूर्यकांत म्हाळणकर या बंधूंनी
सतीदेवीची कथा ओवीबद्ध करून पुस्तक स्वरूपात भाविकांसाठी उपलब्ध करून दिली
आहे. नवनाथ पोथीतील भर्तृहरी नाथाच्या कथेशी सांगड घालत त्या कथेचे उपकथानक
स्वरूपात सतीदेवीची कथा पुढे फुलवत नेली आहे. सतीदेवी संबंधातील लेखी
माहिती सर्वप्रथम त्या पुस्तकात प्रकाशित झाली.
मंदिर परिसरात कोरीवकाम असलेले दोन दगडी चिरे आहेत. त्यांचा संदर्भ उपलब्ध नाही. सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचा, त्या भागात सहसा न आढळणारा वृक्ष आहे. सतीदेवीचे मंदिर त्या वृक्षाच्या छायेत उभे आहे. वडांगळी गावात किंवा सिन्नर तालुक्यात बंजारा समाजाची वस्ती नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून बंजारा भाविक वडांगळी गावात दर्शनासाठी येत असतात. पूर्वी माघ पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशी वर्षातून दोन वेळा देवीची यात्रा भरत असे. यात्रा काळात बंजारा समाजाचे बहुसंख्य तांडे ऊस तोडणीसाठी फिरतीवर असत. ते यात्रेसाठी बैलगाड्या जुंपून वडांगळीत दाखल होत. गावात बंजारा भाविकांना लमाण, चारण या नावांनीही संबोधले जाते.
‘सतीयाडी न् सामंतदादा लो ऽ लो ऽ ऽ लो ऽ ऽ ऽ’ अशी गाणी म्हणत तांड्या तांड्यांनी यात्रेकरूंचे गावात आगमन होत असते. बंजारा समाजाचे भाविक डफ, काशाची थाळी वाजवत देवीची बंजारा भाषेतील गाणी गात, निशाणकाठी मिरवत डेरेदाखल होतात. यात्रेकरू गावात आल्यानंतर सर्वप्रथम सतीदेवीचे दर्शन घेतात. देवीला गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. सतीदेवी नवसाला पावते अशी बंजारा भाविकांची धारणा आहे. नवसपूर्तीसाठी सामतदादाला बोकडबळी देण्याची प्रथा आहे.. बळी दिल्या जणा-या बोकडाला आधी सामतदादाच्या मंदिरात नेले जाते. तेथून बळीसाठी त्याचा होकार मिळवला जातो. बक-याने मान हलवणे याला बक-याचा होकार समजतात. त्याने मान हलवली नाही तर त्यावर पाणी शिंपडून त्याला मान हलवण्यास भाग पाडले जाते. बोकडबळीला ‘खारा’ नैवेद्य असे म्हणतात. सोबत ‘मद्या’चाही नैवेद्य दाखवला जातो. ऊसतोडणी कामगार असलेल्या अनेक बंजारा भाविकांची वर्षाची पूर्ण कमाई यात्रा काळात प्रवास व बोकडबळीच्या नवसपूर्तीवर खर्च होते. अनेकजण पै-पाहुणे घेऊन स्वतंत्र वाहनाने यात्रास्थळी येतात. ज्यांची आर्थिक कुवत नसते असे चार-पाचजणांचे कुटुंबही बोकडबळी देते. बोकडाच्या मांसाला देवाचा प्रसाद म्हणून मान्यता असल्याने ते फेकून देणे पाप समजले जाते. ज्या कुटुंबाला संपूर्ण बोकड खाणे शक्य होत नाही, ते बोकडाचे मांस खारवून सोबत घेऊन जातात.
सतीदेवी यात्रेत बोकडबळी व मद्याचा नैवेद्य देण्याच्या अनिष्ट प्रथांबरोबरच इतरही काही प्रथा पाळल्या जातात. अनेक बंजारा भाविक यात्रा काळात स्वत:च्या मुलांचे जावळ काढून देवीला मुलांच्या डोक्यावरचे केस अर्पण करतात. त्या प्रथेसाठी गावातील नाभिक समाजातील घरांनी सामंजस्याने प्रत्येक वर्षाच्या पाळ्या वाटून घेतल्या आहेत. गाव व परिसरातील ग्रामस्थ देवीला नवस म्हणून सत्यनारायणाची पूजा घालण्याचे कबूल करतात. त्यानुसार नवसफेडीसाठी यात्रा काळात मंदिर परिसरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. काही भाविक महिला-पुरुष नवसपूर्तीसाठी गावाच्या वेशीपासून दंडवत किंवा लोटांगण घालत देवीच्या चरणाशी लीन होतात. यात्रेत सौभाग्यलेण्याची प्रथा आढळते. सतीदेवी यात्रेतून विविध बंजारा आभूषणे, उदाहरणार्थ, बांगड्या, चांदीचे गोठ, पाटल्या, चांदीचे झुमके, पायातील पैंजण वगैरे खरेदी करून ती परिधान केल्यास सौभाग्य लाभते अशी समजूत आहे. त्यामुळे अनेक बंजारा महिला यात्रेतून दागिने खरेदी करतात. त्या काळात गावातील सोनाराकडे देवीचे टाक बनवण्यासाठी गर्दी होते. यात्रा काळात देवीला नवीन निशाण (झेंडा) वाहण्याची प्रथा बंजारा भाविकांत आहे. भाविक घरून येताना जुने निशाण घेऊन येतात. यात्रेतून दोन नवीन निशाणे विकत घेऊन जुने निशाण विसर्जित करतात. दोन निशाणांपैकी एक निशाण देवीला वाहून दुसरे घरी घेऊन जातात.
बंजारा
समाजाने महाराष्ट्राला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री
दिले आहेत. तरीही या समाजात शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मागासलेपण आहे.
विविध रुढी-परंपरा व अंधश्रद्धा यांचा पगडा आहे. त्यामुळे त्यांच्यात बोकडबळी, व्यसनाधीन होण्यासारख्या अनिष्ट प्रथा
पूर्वापार काळापासून रूजल्या आहेत. हा समाज ऐपत नसतानाही बोकडबळीची प्रथा
पाळताना दिसतो. त्यामुळे त्या समाजात कर्जबाजारी होण्याचे प्रमाण जास्त
आहे. आजही तो समाज परंपरा व रूढी यांच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यात्रा
काळात वडांगळी गावात ‘बंजारा दल’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या तालुका व
जिल्हा शाखा यांच्यातर्फे तसेच काही शाळांचे विद्यार्थी भाविकांचे
अंधश्रद्धा विरोधी जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धेचा निषेध
करण्यासाठी लाक्षणिक उपोषण, पत्रके वाटप, प्रचार फेरी, पथनाट्ये असे मार्ग
वापरले जातात. पूर्वी यात्रेत बोकडबळी उघड्यावर दिले जात असत. तो प्रकार
आता बंद झाला असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदिस्त ‘स्लॉटर
हाऊस’मध्ये बोकड कापले जातात.
कापलेल्या बोकडांच्या कातडीला बाजारात चांगला भाव असतो. ते कातडे खरेदी करण्यासाठी लिलाव केला जातो. त्यांची किंमत लाखांच्या पुढे जाते. स्थानिक खाटिकांमध्ये लिलावाची बोली लावण्याची स्पर्धा असते. तो लिलाव म्हणजे वर्षभर देवीसाठी कापल्या जाणाऱ्या बोकडांच्या कातड्यांची खरेदी करण्याचा मक्ता असतो. यात्रेकरूंना योग्य ते पैसे देऊनच कातडे खरेदी करावे लागते. कातडे विक्रीचा निर्णय यात्रेकरूंचा असतो. केवळ चामडे खरेदीचा मक्ता लाखभर रुपयांच्या पुढे जातो. लिलावातून आलेली रक्कम अथवा लिलाव करण्याचा अधिकार पूर्वापार गावकीकडे (गावची गावठी ट्रस्ट) आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून गावातील मंदिरांची देखभाल, यात्रेतील कुस्त्या, टांग्यांच्या शर्यती यांचा खर्च भागवला जातो.
सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सहपरिवार सतीदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपयांचा निधी सतीदेवी देवस्थानाच्या विकासासाठी दिला होता. अशोक चव्हाण या कल्पक बंजारा तरुणाने १९८३ मध्ये देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मंदिर व परिसराच्या विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली. त्याने शासन दरबारी सतत पाठपुरावा करून, अनेक उच्चपदस्थ बंजारा भाविकांकडून, आर्थिक पाठबळ मिळवत मंदिर परिसर विकसित केला. पूर्वी केवळ तीन-चार गुंठे जागेवर असलेला तो मंदिर परिसर दहा एकरहून अधिक जागेवर विस्तारला गेला. मंदिर परिसरात भाविकांसाठी ‘भक्तनिवास’, बोकडबळीसाठी ‘स्लॉटर हाऊस’, सभामंडप, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून एका वेळी दहा हजार लोक जमू शकतील असे भव्य सभागृह त्या ठिकाणी उभारण्यात आले आहे.
एका
वृत्तपत्राने १९९३ साली सतीदेवी देवस्थानाच्या बोकडबळी प्रथेसंदर्भात
बातमी छापली. त्यानंतर माध्यम जगताचे लक्ष त्या यात्रेकडे, तेथील नवसाच्या
नावावर होणाऱ्या पशूहत्येकडे वेधले गेले. दरवर्षी यात्रा काळात त्या
विषयावर होणाऱ्या आंदोलनांमुळे; तसेच, दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतील
प्रसिद्धीमुळे यात्रेचे स्वरूप गेल्या पंचवीस वर्षांत कमालीचे व्यापक होत
गेले आहे. पूर्वी केवळ काही हजारोंच्या संख्येने येणारे बंजारा भाविक आता
लाखोंच्या संख्येने वडांगळीत येतात. चार-पाच हजार लोकसंख्येच्या गावावर,
तेथील ग्रामपंचायतीवर यात्रेच्या नियोजनाचा प्रचंड ताण येतो. यात्रा काळात
दोन-तीन दिवसांत हजारो वाहनांनी लाखो भाविक गावात येतात. दोन हजारांहून
अधिक बोकडांचा बळी दिला जातो. दारूची विक्रमी विक्री होते. यात्रेकरूंच्या
सोयीसाठी यात्रा काळात परिसरातून वाहणाऱ्या कडवा कालव्याच्या चारीला पाणी
पाणी सोडले जाते. त्यामुळे यात्रेकरूंची पाण्याची मोठी गरज भागते. तांड्या
तांड्यांवर राहणाऱ्य़ा बंजारा समाजाला प्रतिकुलतेशी झगडण्याचे बाळकडू मिळत
असते. त्यामुळे तो समाज यात्रा काळात राहणे, स्नान, प्रातर्विधी आदी अनेक समस्यांची गैरसोय सहन करत मोठ्या संख्येने यात्रेसाठी हजेरी लावतो.
सतीदेवी हे वडांगळी ग्रामस्थांचेही ग्रामदैवत आहे. पूर्वी तेथील शंकर गुरव देवीची पूजाअर्चा करत असत. सध्या त्यांचे वंशज ती जबाबदारी पार पाडतात. देवस्थान ट्रस्टने बंजारा समाजाचे हरीभाऊ राठोड यांची मंदिराच्या देखभालीसाठी व्यवस्था लावली. त्यांचे कुटुंब गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून वडांगळीत स्थायिक झाले आहे. गावात बंजारा समाजाचे ते एकमेव कुटुंब. हरीभाऊंच्या निधनानंतर त्यांची मुले मंदिराची व्यवस्था पाहतात.
सतीदेवीचा यात्रोत्सव हा वडांगळीच्या ग्रामस्थांचा मानबिंदू! गावकरी तो उत्सव दिवाळीसारखा साजरा करतात. गाव तसेच पंचक्रोशीतील कोणीही देवीला बोकडबळी देत नाहीत. गावकरी ‘पुरणाच्या पोळी’चा गोड नैवेद्य देवीला अर्पण करतात. यात्रेच्या निमित्ताने गणगोत, माहेरवाशिणी, पै-पाहुणे, नोकरीनिमित्त बाहेर असलेले चाकरमानी गावाकडे परतात. यात्रेत सामील होतात. यात्रेचा आनंद लुटतात.
वडांगळी गावी यात्रा काळात मोठी उलाढाल होते. बोकडविक्री, दारूविक्री, खाद्यपदार्थ, मिठाई, प्रसाद, नारळ, फुलहार, खेळणी, भांडी, बंजारा पेहराव, बंजारा दागिने-आभुषणे यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. ती एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. यात्रेच्या दिवशी देवस्थानाच्यावतीने पहाटे देवीची महापूजा करण्यात येते. स्थानिक आमदार, खासदार पुढाऱ्यांना पुजेचा मान देण्यात येतो. सायंकाळी गावातून निशाणकाठीची मिरवणूक निघते. डफांच्या तालावर पन्नास-साठ फूट उंचीची निशाणकाठी गावातून मिरवली जाते. त्यावेळी गणपतबाबा भगत यांच्या अंगात देवीचे वारे संचारते. निशाणकाठीची मिरवणूक देवी मंदिराशी येऊन विसावते. तेथे देवीच्या (वारे) हवेत प्रश्न पाहिले जातात. त्यावेळी देवीचा कौल घेऊन पाऊसपाणी, दुष्काळ, रोगराई यासंबंधीचे भाकीत केले जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगतो. करमणुकीसाठी लोकनाट्य, तमाशा असतो. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेची उत्साहात सांगता होते.
- किरण भावसार
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.