अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय. या बेटांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपल्याला जालावर मिळेलच , मी मात्र माझ्या नजरेतुन अनुभवलेला आणि भावलेला अंदमान तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही शक्यतो टुर कंपनीसोबत फिरणं टाळतो त्यामुळे कसं आपल्याला वाट्टेल तेव्हा वाट्टेल तस फिरता येतं. म्हणून या प्रवासाला लागते ती पुर्वतयारी तशी ६ महिने आधी सुरु झाली होती. डिसेंबर मधे आम्ही आमच्या सुट्ट्यांचा अंदाज घेऊन तिकिटं बुक केली आणि अंदमान बेटांचा अभ्यास सुरु केला. काय करावं, काय करु नये हे वाचलं. आणि आम्ही साधारण कसे आणि किती फिरणार हे ठरवलं.
( www.andamans.gov.in आणि अजून एक nic ची साईट आहे त्यावर अभ्यास केला. शिवाय inter island प्रवासाची माहिती घेण्यासाठी वww.and.nic.in ही साईट. खूप छान दिलय त्यांनी डिट्टेलवार. त्याशिवाय मी जेव्हा पोर्ट ब्लेअर मधल्या टुरिजम डिपार्टमेंट मधे गेले होते तेव्हाही न कंटाळता सगळी माहिती दिली आणि शंका दूर केल्या होत्या माझ्या.
पहिल्या दिवशी रात्री जेवल्यावर आम्ही एक फेरफटका मारायला गेलो होतो शहरात. तर तेव्हा तिथलं सचिवालय, वेगवेगळ्या खात्यांची offices रात्रीचीही सुरु होती. पर्यटन खात्याच्या office मधे गेले तर एका दादांनी खूप मस्त माहिती दिली. अंदमान ट्रंक रोड वर एका लिमिट पर्यंतच दुचाकी नेता येते, पुढे ट्रायबल एरियामधे compulsory चार चाकी. त्या शिवाय ट्रायबल एरियातले किंवा ट्रायबल्स चे फोटो नाही घेता येत. त्यांना खाऊ पिऊ नाही देता येत. ते काम पोलीस करतात. हे अन बरेच काही. तिथे offices ६ वाजता उघडतात. ३ साडे तीन ला बंद होतात. आणि शिफ्ट्स मधे २४ तास सुरु असतात. फक्त सह्या वगैरे office hours मधे. इतर मदत सतत सुरु असते.)
आता फक्त शरीर तिथे पोचायचं राहिलं होतं. मन तर कधीचच पोचलं होतं. शेवटी हो ना करता ९ मे उजाडला. आणि सकाळी ७.२० च्या विमानाने आम्ही चेन्नै ला निघालो. पोर्ट ब्लेअर साठी आमचं विमान १०.४० ला होतं. तेवढ्यात जे काही कस काय अन चेपु खेळुन घ्यायचय तेवढं घेतलं. कारण तिकडे फक्त बीएसेनेल , ऐर्टेल अन वोडाफोन हे तीनच सर्विस प्रोवाईडर आहेत. आणि २जी स्पीड बडी मुश्किल से मिलती है अस होटेलवाल्याकडुन कळलं होत. ठरलेल्या वेळी आमचं विमान निघालं वीर सावईकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं. दिडेक तासाने काही पाचूची बेटं दिसु लागली. विमानातुन जमतील तसे फोटो घेतलेत.


विमानतळ जवळ आल्यावर क्यामेरे बंद केले. आमच्या गोव्यासारखाच हासुद्धा डिफेन्स एअर्पोर्ट आहे. सामान घेण्याचे सोपस्कार केल्यावर अंदमानच्या पर्यटन विभागाचा हेल्पडेस्क वर प्रिपेड टॅक्सी , बाईक रेंटल वगैरे ची चौकशी केली आणि विमानतळाबाहेर जाऊन टॅक्सी करुन गेलो. इथेच अंदमानी लोकांच्या नियमप्रियतेचा/प्रामाणिकपणाचा पहिला अंदाज आला. पठ्ठ्याने प्रिपेड टॅक्सी च्या दरापेक्षा एक रुपया अधिक घेतला नाही. तेवढ्या अंतरासाठी आमच्या गोव्यात ५०० रुपडे सहज घेतले असते इथल्या टॅक्सीवाल्यांनी.
फ्रेश होऊन सरळ सेल्युलर जेल बघायला गेलो. सगळी जेल फिरुन बघताना अंगावर शहारे येत होते. कश्या परिस्थितीत ह्या लोकांनी इथे दिवस काढले असतील आपण कल्पनाही करु शकत नाही. खूप मराठी माणसं भेटली तिथे. सावरकरांच्या कोठडीत सगळे पायताणं काढुन गेलो. देवळाइतकीच पवित्र जागा होती ती. बसलो थोडा वेळ. जयोस्तुते चं सामुहिक गायन झालं आणि मग उर्वरीत भाग बघितला.
सेल्युलर जेल
सेल्युलर जेल च मुळ स्वरुप सात आरे असलेल्या स्टार फिश सारखं होतं. त्यातले तीनच आरे उभे आहेत. एका आर्याच्या जागी सरकारी इस्पितळ उभं आहे. मधल्या मनोर्याच्या खांबांवर तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांची नावं आहेत. या इमारतींची रचना अशी होती की एका इमारतीतल्या कैद्यांना समोरचे कैदी दिसू नयेत. फोटोत व्हरांड्यासमोर समोरच्या खिडक्या दिसतायेत. त्या खिडक्यांनाही उतरती छपरे. आणि खोलीत त्याही उंचावर. म्हणजे फक्त उजेड आणि हवा थोडीफार येणार. काळ्या पाण्याची शिक्षा... आणि या इमारती कैद्यांकडूनच बांधून घेतल्या होत्या. कोठडीचे दरवाजे गडगंज आडण्यांनी(कड्यांनी) बंद असत. हे तिथे अजूनही पाहता येतात. त्यातही तात्याराव जास्त डेंजर कैदी , म्हणून त्यांना सगळ्यात शेवटची, कोपर्यातली कोठडी दिली होती. जिथे एका भक्कम दरवाज्यातुन आत गेल्यावर अजून एक दरवाजा लागायचा आणि मग आत तात्याराव. कोलू आणि काथ्याचा ठराविक कोटा पूर्ण झाला नाही तर जेवण देण्यात येत नसे. हात सोलवटून जात, रक्तं येत पण काथ्या कुटलाच पाहिजे. थोड्या जुन्या आणि त्यातल्या त्यात मवाळ कैद्यांना लाकूड्तोडीसाठी नेत. या कैद्यांवर आदिवासी लोकांचे हल्ले होत, तसे ते आताही होतात जर तुम्ही आदिवाश्यांच्या भागात "शिरलात" तर . अंदमानी लाकूड अत्यंत टिकाऊ असतं. खार्या पाण्यानेसुद्धा त्याला अपाय होत नाही. तिथल्या अंगणात जिथे कैद्यांना कोलूवर चढवायचे, काथ्या कुटायला लावायचे, तेल घाण्याला जुंपायचे, लाकूड कामाला लावायचे , छळाचे इतर प्रकार प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटलं. सावरकरांचं पुस्तक आधीच वाचून गेल्याने अजून जास्त फरक पडला. बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर वेगवेगळ्या आर्यांमधे होते. त्यांची प्रत्यक्ष भेटही खूप सायासांनी तब्बल दोन वर्षांनी झाली.
सेल्युलर जेल मधे तेवत असलेली स्वातंत्र्य ज्योत. (फोटो tripadvisor.com वरुन साभार)
सावरकरांच्या कोठडीत मी
फाशीपूर्व अंतिम विधी करण्याचे स्थान
फाशीघर
फाशीघरात
विविध छळप्रकार
विविध प्रकारच्या बेड्या
लाईट अँड साउंड शो अक्षरशः शहारे आणतो अंगावर. प्रत्येक गोष्ट त्या त्या कोठडी किंवा जागेवर प्रकाशझोत टाकुन जिवंत करुन माहिती दिली जाते.
जेल च्या आवारात एक पिंपळाच झाड आहे. त्याला बेरीबाबा का पेड म्हणतात. तिथला त्याकाळचा जेलर बेरी ह्याच ते "निवाड्याचं" स्थान होतं. इथुनच तो "गोड शब्दात"कैद्यांचे निवाडे करत असे/ शिक्षा करत असे. सध्याच्या जेलमधे एक प्रदर्शन आहे त्यात इत्थंभूत माहिती फोटोंसकट आहे. गाईड हवा असल्यास जेलच्या ऑफिसमधे नाममात्र शुल्क भरुन मिळवता येतो. या प्रदर्शनातले काही फोटोज द्यायचा प्रयत्न करते.
अंदमानमधे तसे सहा महिने खूप जास्त पावसाचे आणि उरलेले सहा महिने कमी पावसाचे असतात, त्यामुळे तिथे डांस , चिलटं इ. त्रासदायक मंडळीही भरपूर होती/आहेत तर हासुद्धा एक खूप त्रासाचा प्रकार असे कैद्यांसाठी. एस्पेशली ज्यांना जंगलात लाकूडतोडीसाठी नेले जायचे त्यांच्यासाठी. आणि लाकूडतोड कितीही पाऊस असो ठरलेला कोटा झाल्याशिवाय परत येणए नसायचेच. अंदमान मधली जंगलं ट्रोपिकल डेसिड्युअस / एवरग्रीन फॉरेस्ट्स मधे मोडतात. ही अजस्त्र खोडं असतात. हयाचाही एक नमुना टाकेन येत्या भागांमधे.
हे सेल्युलर जेलच्या वरच्या गच्चीवरुन घेतलेली प्रचि
रॉस बेट
जेलवरची गच्ची
नॉर्थ बे बेट
अंदमान सरकारी इस्पितळ
हे सगळं बघताना एक तर आम्ही भावुक झालो होतो आणि अंधारही झाला होता. मग एक बाईक रेंटवर घेतली आणि पेटपूजा करुन सरळ होटेल गाठुन झोपलोच.
हे लक्षात ठेवा
जेल संध्याकाळी ५ वाजता बंद होते, सोमवारी सुट्टी असते, रविवारी खुली असते.
५.३० वाजता आणि अजून एक उशीरा असे २ लाईट अँड साऊंड शो होतात.
क्रमशः
लवकर झोपी गेल्यामुळे मला दुसर्या दिवशी पहाटे ४ लाच जाग आली. उठल्यावर माझं घड्याळ बिघडलय का काय झालय हे कळेचना थोडा वेळ. सुर्य उगवायला लागला होता. मग लक्षात आलं की काल ५.३० लाच अंधारुन आलं होतं!! मग काय नवरोबाला उठवला लगेच पटपट आवरलं आणि पोर्ट ब्लेअर च्या आबर्दीन जेट्टी कडे गेलो.
आम्हाला थोडक्यासाठी एक सुंदर सुर्योदय चुकला होता, म्हंटल जाऊदेत आता उद्या पाहुयाच. बराच वेळ तिथे घालवल्यावर मग मन मारेल तस आणि रस्ता फुटतो तिथे भटकायचं ठरवलं आणि बाईक घेऊन आम्ही निघालोच. हे त्या वाटेतले काही फोटो.
ही आबर्दीन जेटी
हे जहाज बहुतेक हॅवलॉक ला निघालय
हे नॉर्थ बे बेट. ह्याला तुम्ही कुठेतरी पाहिलय (नक्की), आठवतय का काही?
आता आम्ही कोर्बिन्स कोव्ह बीच च्या रस्त्याला लागलो होतो
कोर्बिन्स कोव्ह बीच ची किनारपट्टी
कोर्बिन्स कोव्ह बीच
इथे थोडावेळ क्लिकक्लिकाट करुन पुढच्या रस्त्याला लागलो. कुठे वगैरे काही माहित नाही. वाटेत कित्येक खेडी लागली. त्या खेड्यातल्या वस्त्या, घरं, जनावरं, आणि मुख्य म्हणजे तिथले लोक यांच निरीक्षण करत आम्ही जात होतो. अंदमानी लोक खूप भोळे-भाबडे, मदतीला अत्यंत तत्पर, नियमप्रिय, प्रामाणिक , मायाळु आहेत. आपल्या घरांमधे कोणतीही भाषा का बोलेनात तुमच्याशी अगदी अस्खलित हिंदी बोलतात. जिथे जिथे आम्ही वाटेत थांबलो तिथे तिथे लोकांनी आमची चौकशी केली. आम्हाला काही हव नको ते विचारलं. ह्यामागे त्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती. मला खरं सांगायचं तर त्या प्रेमाने अगदी भरून आलं.
या बेटांवर अजूनही ठिकठिकाणी त्सुनामीच्या वाताहातीच्या खुणा दिसतात.
अर्थात लोकांची घरं , उडलेली छपरं , जहाजं वगैरे दुरुस्त झालीत पण तेव्हा
पडलेल्या मोठमोठाल्या झाडांचे ओंडके, समुद्राच्या वाढलेल्या पातळीमुळे
बुडलेले रस्ते आणि मग बांधलेले नवे रस्ते ई. इथे झालेल्या वाताहातीचा अंदाज
येतो. अश्याच एका पडलेल्या झाडाचा ओंडका.
हे महाशय बराच वेळ लपाछपी झाल्यानंतर असे सापडले
मला नेहमी नव्या प्रदेशात गेल्यावर तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या घरांबद्दल, संस्कृतीबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं .ही अंदमानमधली काही घरं. ही घरं बघितल्यावर मला "गोव्याची" सय आलीच. अंदमानी लोकही आमच्या गोवेकरांसारखे रंगांच्या प्रेमात आहेत. अंदमान अजुन एका अंगाने माझा वाटायला लागला.
इथे एकही नदी नाहीये. मात्र पावसाच्या पाण्याला ते साठवतात
ही खरंतर एका मिडल स्कूल ची इमारत आहे. तिचं काम पाहिलत का? लाकडी आहे
ती शाळा. पारंपारिक अंदमानी घरं अशीच असतात लाकडाची. ओट्यापासुन
जमिनीपर्यंत सगळं लाकडाचं. सुनामीनंतर लोकं काँक्रिटची घरं बांधु लागले
आहेत
अंदमानी मगरी कुठेही आढळु शकतात त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून अश्या जाळ्या/ तारा लावल्या आहेत
इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर
क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला
पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता
धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित
बांधलाय .
ही सुद्धा एक सरकारी शाळाच आहे. नो युनिफॉर्म!! इतक्या मस्त शाळेत मला आवडेल बाबा शिकायला.
केवढाले वृक्ष होते एकेक. हे उगाच माझ्या क्षुद्रतेच्या अंदाजासाठी. हे मूळ आहे फक्त झाडाचं जे सुनामी मधे मुळासकट उपटुन गेलं होतं.
हे सगळे मला माझेच वाटु लागले. माझ्या एकेकाळच्या गोव्यासारखेच डोंगर,झाडं, समुद्र तर होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर आणि श्रीमंत !!! अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.
क्रमशः
नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच. फुलपाखरं आणि पक्षी क्यामेर्यात कैद नाही करु शकले :( आम्ही फुलपाखरं बघुन थांबलो एके ठिकाणी तर ती आमच्याच अंगावर नाचत होती. फार मजा आली अशी अंगा खांद्यावर बागडुन उडणारी फुलपाखरं बघताना.
वाटेत एके ठिकाणी आम्ही आमच्या शिदोर्या सोडुन खायला बसलो, तिथे काही पोरं मासे पकडत होती आणि कितीतरी जेलीफिश कार्टून सारखे बागडत होते. खायचं सोडून त्यांनाच बघत बसलो आम्ही. अश्या वेळी मी नेहमी एक गोष्ट पाळते आणि इतरांनाही सांगते, माश्यांना किंवा इन जनरल कोणत्याही जंगली प्राण्याला तुमच्याकडचा खाऊ आयुष्यात देऊ नका, आणि पर्यावरणाचे /निसर्गाचे नियम पाळा. अंदमानी लोक कसोशीने हे नियम पाळतात. आपण तिथे जाऊन तिथला तोल बिघडवु नये.
मग आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तर एक बॉटॅनिकल झूलोजिकल गार्डन लागलं. तिथे अंदमानी मगरी , घोरपडी , अस्वलं, अंदमानी पक्षी त्यांच्या हॅबिटॅट मधे स्वच्छंद बागडताना बघितले, प्रत्येक झाडावर त्याचं सायंटिफिक नाव लावलं होतं. तिथुन बाहेर पडेस्तो जोरदार पाऊस आला. खूप भिजले पावसात. अंदमानमधला पाऊस खूप बेधुंद असतो, कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने कितीही वेळ पाऊस कोसळु शकतो. मुसळधार पाऊस म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. मग तिथुन अजुन थोडं पुढे मुंडा पहाड च्या पायथ्याला मुंडा पहाड बीच वर पोचलो. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला मग सुरक्षित क्षेत्रात आंघोळ केली. कपडे बदलायला आणि शावर घ्यायला सरकारने व्यवस्था केलीय लाकडी घरांची तिथे जाऊन कपडे बदलले आणि पुढल्या वाटेला लागलो.
सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे
अंघोळीसाठीचे सुरक्षित क्षेत्र जाळीने मार्क केलय . इथे प्रत्येक बीचवर
लाईफगार्ड, पोलीस कंपल्सरी असतातच. आणि अंघोळीसाठी सुरक्षित क्षेत्र मार्क
करतात. पर्यटकांनी त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते.
मग आम्ही जिथे गेलो ती जागा माझ्यासाठी स्वर्ग होती. त्या गावाचं नाव मंजेरी . पुर्ण रिजर्व फॉरेस्ट एरिया. तिथे जाण्यासाठी परमिट काढावं लागतं. ही जागा महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक हिस्सा असलेल्या १५ बेटांपैकी एक आहे.
हे मंजेरीच्या वाटेतले फोटो
इथल्या दलदलीत मगरी आहेत
@ मंजेरी फॉरेस्ट चेक पोस्ट.
@मंजेरी जेटी
इथे फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे. आम्ही तिथे गेलो आणि मला परत यायचच नव्हत!! एक तर तिथे अज्जिबात माणसं नव्हती. फक्त आम्ही दोघंच आणि सोबतीला इतका सुंदर निसर्ग. आम्ही पोचलो तेव्हा भरती येत होती तिथे. काय काय नाही पहिलं तिथे? हजारो प्रकारचे जिवंत कोरल्स, आजपर्यंत फक्त डिस्कवरी वर पाहिलेले मासे, मगरीने एका मोठ्या माशाला खातानाचा लाईव्ह शो, माश्यांचे खेळ बापरे!!! शब्दातीत अनुभव होता.
आमचं वाहन


इथुन तृप्त मनाने निघालो तेव्हा ५ वाजले होते. लगेच सुर्यराव पश्चिमेला गुडुप होणार होते . वाटेत कुठेतरी हा सुर्यास्त टिपला .

उद्या महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक भाग असलेलं जॉली बॉय बेट बघायचं अस ठरवुनच गुडुप झालो अंधारात.
क्रमशः
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.