Thursday, November 26, 2020

इंग्लंड भटकंती

इंग्लडची स्वर्गभूमी ...लेक डिस्ट्रिक्ट
सध्या मुक्काम पोस्ट लंडन आहे. समर असल्याने हे दिवस फिरायला जायला अगदी योग्य आहेत. ना फार थंडी ना खूप उकडा आणि रात्री नऊ वाजेपर्यंत उजेड . म्हणून मुलीने चार दिवस लेक डिस्ट्रिक्टला जायचा प्लॅन केला. भारतात एखाद्या ट्रिपची आखणी, कुठे काय पाहायचं, काय खायचं, खरेदी कुठे करायची, हॉटेल बुकिंग , गाड्यांचं रिझर्वेशन हे सगळं मी करते , तो माझ्या आनंदाचा भाग आहे. पण ह्या ट्रिपच प्लॅनिंग मुलीने केल्यामुळे थोडं वेगळं ही वाटत होतं आणि छान ही वाटत होतं .




हा भाग इंग्लडच्या उत्तर पश्चिमेकडे आहे आणि प्रदेश तसा मोठा आहे. त्यामुळे चार दिवसाच्या ट्रिप मध्ये त्यातली सर्वात सुन्दर म्हणा किंवा पॉप्युलर म्हणा हवं तर ठिकाणंच फक्त बघता येणार होती.. लंडन सोडून कन्ट्री साईड लागल्यावर सगळीकडे हिरवीगार कुरणं , त्यात सुखेनैव चरणाऱ्या मेंढ्या, गाई, गव्हाची, मक्याची शेतं, कधी विस्तीर्ण दिसणारं क्षितिज तर कधी हिरवाईच्या अनेक छटानी नटलेल्या लहान लहान टेकड्या हे सगळं बघताना डोळे बंद करणं अशक्यच होतं. पाच सहा तासाचा प्रवास करून आम्ही aMbelside या मुक्कामी गावी कधी पोचलो ते कळलं ही नाही.
कोणत्याही गावात पायी फिरताना जी मजा येते ती वेगळीच असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो पायी फिरायला. छोटी छोटी घरं, प्रत्येक घरासमोरची बाग , फुलं, दूरवर दिसणारं गावातलं एकुलत एक चर्च , छोटे छोटे रस्ते , सिग्नल फार नसल्याने गाड्याना हाताने इशारा करून रस्ता क्रॉस करणारे पादचारी, आपल्या मुला बाळांना आणि हो लाडक्या कुत्र्यांना ही घेऊन आनंदात फिरणारी तरुण मंडळी आणि एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना आधार देत हळू हळू चालणारी वयस्कर जोडपी, छत्री उघडायची गरज नाही पण जाणवतोय, कळतोय न कळतोय असा भुरू भुरू पडणारा पाऊस , हवेतला गारवा ह्यामुळे चालताना फार मस्त आणि ताजतवानं वाटत होतं.
IMG-20220722-WA0024_0.jpg
छोटंसं घर
IMG-20220722-WA0038_0.jpg
फुल

हे टूरिस्ट लोकांच लाडकं ठिकाण असल्याने इथे पुष्कळ घरांच्याबाहेर रहाण्याची आणि जेवणा खाण्याची होईल अश्या पाट्या दिसत होत्या. कोस्टा , सबवे, पिझ्झा एक्स्प्रेस अश्या मोठया चेन ना ह्या भागात शिरकाव करण्याची परवानगी नाहीये त्यामुळे पदार्थांच्या चवीचं सरसकटीकरण न होता त्यांची लोकल चव टिकून राहिली आहे. आम्हाला ही इथलं जेवण खूप आवडलं. सगळ्याच पदार्थांची चव सुन्दर होती. एक भारतीय रेस्टॉरंट ही बघितले गावात पण मला अश्या ठिकाणी भारतीय जेवणात जरा ही इंटरेस्ट नसतो. असो.
चालता चालता एका फुटपाथवर मला तीनेक फूट उंचीचे दोन जाडे लाकडी वासे पुरलेले दिसले आणि त्याला दोन जाड्या लोखंडी साखळ्या ही अडकवलेल्या होत्या. पूर्वीच्या काळी घोडा हे प्रवासाचे मुख्य साधन होते, त्यामुळे बाजारहाट करताना घोड्याला ठाणबंद करण्यासाठी ह्याचा उपयोग होत असणार आणि त्याची आठवण म्हणून ते जपून ठेवले असतील हा माझा अंदाज. न जाणो आज ही येत असेल एखादा गोरा उमदा तरुण घोड्यावरून बाजारात अशी कल्पना ही केली मी मनात उगाचच.
लेक डिस्ट्रिक्ट ला जाऊन लेकची सफर न करणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघण्यासारखेच आहे. त्या भागात एकंदर बारा लेक्स आहेत. आमच्या गावाजवळच असणाऱ्या विंडरमिअर ह्या प्रसिद्ध लेकची आमची बोट राईड फारच सुंदर झाली. एका बाजूला हिरवे डोंगर, एका बाजूला किनाऱ्यावरची छोटी छोटी गावं, मध्ये भरपूर पाणी असलेलं स्वच्छ लेक , पाण्यात पोहणारे राजहंस , बदकं, बोटीवर घिरट्या घालणारे सिगल्स, तलावाच्या पाण्यात होडी वल्हवणारे हौशी नाविक हे सगळं एखाद्या कुशल चित्रकाराने चित्र काढावं इतकं सुन्दर दिसत होतं.
20220730_234252.jpg
हा अजून एक फोटो
IMG-20220723-WA0012~2_1.jpg
इथे जी लेक्स आहेत त्याच्या काठा काठाने जाणारी एक हेरिटेज ट्रेन ही आहे. एका प्लँटफॉर्म च छोटंसं स्टेशन, तिथे जुन्या काळातल्या एका छोट्याश्या इमारतीत असलेलं रेल्वे ऑफिस आणि कँटीन , आजूबाजूला डोंगर झाडी, कोळश्याच धूर सोडणारं इंजिन, डब्यात लाकडाची बाकं असा सगळा जुना बाज आहे त्या ट्रेनचा.
जुनं सामान
20220730_232953.jpg
ट्रेन
20220730_232322.jpg
डबा
20220730_232358.jpg
ट्रेन मधून समोरची लेक्स बघताना मला सारखी वर्ड्सवर्थ ची आठवण येत होती. त्या प्रसिद्ध कवीचं वास्तव्य ही ह्याच परिसरात होतं. त्यांचं घर ही जपून ठेवलं आहे पण आम्ही बघू शकलो नाही. मी दोनशे वर्षांपूर्वीच त्या काळातलं लेक district इमॅजिन करत होते. मोटारी, पक्के रस्ते, विजेचे दिवे नसतीलच तेव्हा आणि वस्ती ही अधिक विरळ असेल. जीवनशैली निसर्गाच्या जास्त जवळ असलेली असेल तेव्हा. सुन्दर लेक्स, हिरव्यागार टेकड्या, कधी निरभ्र निळं आकाश आणि सुंदर सूर्यप्रकाश तर कधी करड्या ढगांची आकाशात गर्दी आणि तृप्त करणारा पाऊस, हिवाळ्यात कापसाची फुल पडावीत तसा होणारा हिमवर्षाव आणि वसंत ऋतूत हिरवळीवर फुलणारी रानफुले, तळ्याकाठाने फुलणारी डॅफोडील्स, वातावरणात कायमच भरून राहिलेला शांतपणा , निवांतपणा ... एखाद्या प्रगल्भ कवीची प्रतिभा फुलण्यासाठी किती पोषक हा सभोवतीचा निसर्ग ...
ह्या भागात टेकड्यांवर सगळीकडे गडगे घातलेले दिसतात. घराच्या कम्पाउंडला ही कोकणातल्या सारखे गडगेच असतात. फक्त इकडे स्लेट दगड असल्याने त्याचा वापर होतो, कोकणात जांभा वापरतात. हे गडगे म्हणे प्रॉपर्टीच्या सीमा रेषा म्हणून घालायला सुरवात झाली आणि ही पद्धत सात आठशे वर्ष जुनी आहे. हजारो मैल अंतर असून ही गडगे घालण्याची कोकणातल्या सारखी सेम पद्धत पाहून मन अचंबित झाल्या खेरीज राहिलं नाही. कदाचित दोन्ही भाग डोंगराळ आणि दगडांची / खडकांची विपुलता असल्याने गरज म्हणून एकच तंत्र दोन्ही ठिकाणी एकाच वेळी विकसित झाले असावे.

20220730_093646.jpg
इथल्या घरांच्या भिंती रुंद तसेच जाड असतात आणि त्या ही उंच आणि रुंद गडगेच असतात. फक्त आतून सिमेंटचा गिलावा दिलेला असतो. ह्या दगडाचेच पातळ चौकोनी तुकडेच घरां4वर कौलं म्हणून ही सगळीकडे घातलेले दिसले. आम्ही रहात होतो त्या घराच्या भिंती ही अश्याच होत्या. आधुनिक सुख सोयीने युक्त असलेलं ते घर ही खूप जुनं होतं. उंच सिलिंग, लाकडाचा भरपूर वापर, जुन्या पद्धतीची पण चालू स्थितीत असणारी फायर प्लेस , तिचं वर पर्यंत गेलेलं धुरांड, शेजारी कोळसे हलवण्या साठी ठेवलेले लांब लांब लोखंडी चिमटे, सळया इ साहित्य , छापराला मोठ्या मोठ्या काचा असलेला माळा हे अनुभवायला खूप मजा आली.
फायर प्लेस
20220731_003006.jpg
भारतात मोसमी पाऊस असल्याने जनरली पाऊस नसेल तेव्हाच फिरणं होतं. कुठे गेले की पावसात हे ठिकाण किती सुंदर दिसत असेल ह्या कल्पनेत मी कायमच रमते. ह्या ट्रिप मध्ये मात्र मला अगदी ह्याच्या उलट कल्पना करावी लागली. ह्या लेकच पाणी सूर्यप्रकाशात किती चमकेल किंवा निळ्याशार आकाशच प्रतिबिंब ह्या तळ्याला ही कशी निळाई प्रदान करेल. संध्याकाळच्या पिवळ्या तांबूस उन्हात समोरचे डोंगर किती सुन्दर दिसतील अश्या कल्पनेतच रममाण व्हावं लागलं. सतत ढगाळलेलं आकाश, समोरच्या डोंगरावर चालणारे ढग आणि हलका किंवा जोरात पडणारा पाऊस ह्याचीच साथ होती कायम. पाऊस आवडत असला तरी थोडं वेळ तरी इथलं ऊन अनुभवावं अस मला मनातून इतक्या उत्कटतेने वाटत होतं की शेवटी आम्ही निघालो तेव्हा जणू सूर्यदेवाने आम्हाला बाय करायला हात हलवला दोन मिनिटं आणि माझं कल्पनेतल सुर्यप्रकाशातल लेक डिस्ट्रिक्टच चित्र प्रत्यक्षात उतरलं.

चारी बाजूने टेकडीवजा असलेले हिरवे डोंगर, डोंगर उतारावर मजेत चरणारी गुरं, चढ उताराचे अरुंद रस्ते, घनदाट झाडीने रस्त्यावर उभारलेल्या कमानी, रस्त्याच्या कडेला दिसणारे तेरडा सदृश्य गुलाबी फुलांचे ताटवे, हलका किंवा जोरात पडणारा पाऊस, छोटी छोटी एक मजली घरं आणि छोटी छोटी गावं ,सारखे दृष्टीस पडणारे गडगे मला कोकणची आठवण करून देत होते. जणू क्षणात लेक डिस्ट्रिक्ट आणि क्षणात कोकण असा मनाचा खेळ चार दिवस सतत सुरू होता.
 डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव
 मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती. त्या हॉटेल पासून अंदाजे 10 मिनिटाची पायवाट आहे डर्डल डोअर पर्यंत पोचायला.
डर्डल डोअर हे चूनखडीने बनलेले नैसर्गिक ठिकाण आहे. ज्युरासिक कोस्टचा एक भाग तसाच समुद्रात गेलेला आहे आणी त्याला मध्ये एक छिद्र तयार झाले आहे समुद्राच्या पाण्यामुळे. प्रत्यक्षात ही जागा खाजगी मालकीची आहे; तरी सर्वाना तिथे जायला परवानगी आहे.

taxi जिथे सोडते तिथून एक तीव्र उतार आहे डर्डल डोअरला जायला.

taxi stand पासून डर्डल डोअरकडे जाणारी पायवाट.

ही पायवाट एका ठिकाणी संपते आणी तिथून पुढे थोड्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला सरळ डर्डल डोअरच्या समोर घेऊन जातात.

वरून काढलेले काही फोटो.



डर्डल डोअरचे काही फोटो खाली जावून एकदम जवळून काढलेले.

समुद्राचे पाणी खूपच थंड असल्याने पाण्यात जाण्याची हिम्मत झाली नाही.
जवळपास २ तास तिथे राहिलो आणी मग पुन्हा पायऱ्या चढून वर आलो. ज्या पायवाटेने डर्डल डोअरला आलो होतो तिने चालत चालत लुल्वर्थ कोवला जायला निघालो. हे अंतर अंदाजे २ की.मी आहे. पूर्ण पायवाट समुद्राच्या कडेने जाते. एका बाजूला अथांग समुद्र आणी दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ.
लुल्वर्थ कोवच्या अगोदर एक सुंदर डोंगर दिसला समुद्रात. त्याचा फोटो.

लुल्वर्थ कोव म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले एक वर्तुळ म्हणू शकतो. तुम्ही अगदी कोवच्या मुखाशी जावू शकता. पण मुखाशी जाण्यापेक्षा डोंगरावरूनच फार सुंदर दिसते हे ठिकाण.
इथे काही हॉटेल्स आहेत आणी बाथरूमची सोय आहे.


लुल्वर्थ कोवचे काही फोटो.

तिथे काही लोकांची घरे देखील आहेत. इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळत असल्याचा हेवा वाटला.

मग तिथे काही वेळ घालवला नी परत पूलला आलो.
अतिशय सुंदर जागा आहेत दोन्हीही. किमान एकदा तरी भेट द्याव्यात अश्या.

स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी


ह्या भागाची सुरवात एका फोटोने.

ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते. हे prehistoric monument आहे. Archaeologists च्या म्हणण्यानुसार व कार्बन डेटिंग नुसार प्राप्त माहिती प्रमाणे हे ठिकाण ख्रिस्तपूर्व 3000 ते ख्रिस्तपूर्व 2000 दरम्यान बांधले गेले असावे. म्हणजे आधुनिक माणसाच्या खुणा दिसायच्या अगोदरपासून. ही जागा नक्की काय असावी आणि कशी उभारली असावी ह्या बद्दल बरेच तर्क वितर्क आहेत. कारण हे दगड इतके मोठे आहेत की ते त्या काळातल्या माणसाला तिथे घेऊन जाणे (त्या वेळी चाकाचा शोध लागला न्हवता) आणी असे उभे करणे, एकमेकांवर ठेवणे कसे शक्य झाले असेल हे एक कोडेच आहे. काहींच्या मते ही जागा म्हणजे मृत लोकांना पुरण्याची जागा होती. कारण ह्या जागेच्या आजूबाजूला केलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व 3000 काळातील माणसाच्या हाडाचे अवशेष सापडले होते. युनेस्कोने ह्या जागेला 1986 मध्ये वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिला.
स्वतःची गाडी नसल्यानी आम्ही एका टूर कंपनी बरोबर जायचे ठरवले. ती टूर कंपनी सॅलिसबरी वरून स्टोनहेंजला घेऊन जाणार आणि परत सॅलिसबरीला आणून सोडणार असा प्लॅन होता. इंग्लंड मध्ये वेगवेगळ्या रूट वर वेगवेगळ्या खाजगी कंपन्या रेल्वे सेवा देतात. मग आम्ही पूल वरून Southampton ला साऊथ वेस्ट ट्रेन ने गेलो. तिथे गाडी बदलली आणि तिथून सॅलिसबरी स्टेशनला ग्रेट वेस्टर्न रेल्वेने गेलो. हा जवळपास दीड तासाचा प्रवास आहे. टूर ऑपरेटरची गाडी स्टेशनच्या बाहेर उभीच होती. सॅलिसबरी वरून अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागली बस ने तिथे जायला. बसने एका रिसेप्शन सेंटरला सोडले. तिथे स्टोनहेंजचे तिकिट घ्यावे लागते. आम्ही टूर वाल्याकडून आलेलो असल्याने त्याने अगोदरच तिकिटाची सोय केलेली होती. ते तिकिट घेऊन एका दुसर्या बस मध्ये बसलो आणि त्या गाडीने स्टोनहेंज जवळ नेऊन सोडले.
लोकांनी जवळ जाऊन नासधूस करू नये म्हणून स्टोनहेंजच्या बाजूने दोरी लावून आत जायला मनाई केलेली आहे. पण वर्षातील एक दिवस असा असतो जेव्हा तुम्हाला ह्या वास्तूला हात लावायची परवानगी असते. तो म्हणजे 21 जून; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
बऱ्यापैकी गर्दी असल्याने जास्त फोटो काढता आले नाहीत. कारण प्रत्येक वेळी फोटो काढतां कुणीतरी आडवे यायचेच. तरी पण जमतील तसे काढलेले अजून काही फोटो खाली देत आहे.


तिथे जवळपास दीड तास थांबून परत यायला निघालो. वाटेत 'ओल्ड सेरम' नावाच्या एक जागी २ तासा साठी सोडले बसने.
ओल्ड सेरमची रचना एखाद्या पडक्या किल्यासारखी आहे. आपल्याकडे एक सो एक किल्ले असल्याने एवढे काही विशेष वाटले नाही ओल्ड सेरमचे. (पण मुख्य फरक हा होता की आपल्या इकडे असते तसे कुणीही भिंतीवर प्रियकर प्रेयसीचे नाव खडूने लिहिले न्हवते किंवा आजूबाजूला कचरा केला न्हवता.) स्वतः:चा भूतकाळ जतन करण्याबाबत असलेली काळजी कौतुकास्पद.


मग शेवटी बसने सॅलिसबरी स्टेशनला सोडले. सॅलिसबरी मध्ये एक कॅथेड्रल आहे.इंग्लंड मधील अन्य शहरांप्रमाणेच हे अतिशय सुंदर शहर आहे. तिथे थोडा वेळ फिरून परतीची ट्रेन पकडली.
गर्नसे आयलंड :-
तर आम्ही पूल बंदराजवळच राहत होतो. त्यामुळे बंदरावर रोज एक तरी फेरी व्हायची. तेव्हा एकदा सहज पत्नी बंदरावर गेली असता तिथे पूल ते गर्नसे आयलंड जहाज फेरी असल्याचे कळले (Condor Ferries नाव होते फेरी चालवणार्या कंपनीचे). जहाज शनिवारी सकाळी 9 ला निघणार, 12 वाजता गर्नसे आयलंडला पोचणार आणि दुपारी 3 ला परत निघून 6 ला पूलला पोचणार असे वेळापत्रक होते.
फ्रान्सच्या अगदी जवळ असलेले गर्नसे आयलंड ही यु.के.ची 'Crown Dependency' आहे. म्हणजे जरी ते स्वतंत्र राष्ट असले तरी त्यांचे परकीय व्यवहार आणि सुरक्षा ह्याची जबाबदारी यु.के.ची आहे. गर्नसे आयलंडला जायला व्हिसा लागतो पण मी ICT (इंट्रा कंपनी ट्रान्स्फर) व्हिसा वर आलो असल्याने आम्हाला तिथे जायला वेगळ्या व्हिसाची गरज देखील न्हवती. आम्ही कधीही जहाजातून प्रवास केला नसल्याने त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही जायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी पूलच्या हॅमवर्दी बंदरावर पोचलो. लगेच चेक इन करून जहाजावर गेलो.
जहाजावरुन दिसणारे पूल शहराचे आणी हॅमवर्दी बंदराचे दृश्य.

जी लोक गर्नसेला राहण्यासाठी जात होती ती कार वगैरे घेऊन आली होती आणी त्या गाड्या जहाजात लोड केल्या होत्या. थोड्याच वेळात जहाज समुद्रात दूरवर गेले आणि आम्ही वरती डेक वर येऊन बसलो. दूर दूर फक्त समुद्र आणि जहाजाच्या स्पीड मुळे लागणारा वारा.
जवळपास 3 तासाने जहाज गर्नसे आयलंडची राजधानी 'Saint Peter Port' ला पोचले . जहाजातून बाहेर आलो आणी समोर हे दिसले. बहुतेक लाईट हाऊस (?)

बंदावरून दिसणारे Saint Peter Port शहर.

2 मिनिटात शहरात प्रवेश केला.

सुरवातीलाच एक सुंदर क्लॉक टॉवर होता.

तो पाहून आम्ही पुढे गेलो आणी फक्त आश्चर्यचकित होऊन प्रत्येक रस्त्याने फिरत राहिलो.
संपूर्ण शहराला, शहरातील एकूण एक दुकानाला सुंदर फुलांनी सजवलेले होते. खरे सांगतो इतके सुंदर शहर आम्ही आयुष्यात दुसरे बघितले न्हवते. हा एक अतिसुखद धक्का होता. मग आम्ही तिथल्या शक्य होईल तितक्या रस्त्यांवरून फुलांची सजावट बघत वेळ घालवला. खाली काही फोटो.
फुलांनी सजवलेली दुकाने

चर्च

तिथे एक छोटी बाग देखील आहे. (कॅन्डी गार्डन). तिथे देखील थोडा वेळ गेलो.
बागेतून दिसणारे दृश्य

परत येताना दिसलेला एक सुंदर चौक

अवघे 3 तास मिळाल्याने आम्ही जास्त काही बघू शकलो नाही. आमचा मूळ उद्देश फक्त जहाजाचा प्रवास करण्याचा अनुभव घेणे हा होता. पण ह्या ठिकाणी किमान दोन दिवस राहण्यासाठी यायला हवे होते असे वाटायला लागले. ती हुरहूर आजही आमच्या मनात आहे. तरी यु.के. ला जाणाऱ्यांनी ह्या ठिकाणाला नक्की भेट द्यावी. आणि किमान एक दिवस तरी मुक्काम करावा असे सुचवेन. गर्नसे वरून पुढे जर्सी आयलंडला जायला देखील बोट मिळते. ते देखील असेच सुंदर असावे असा माझा कयास.
अजून एक
ह्या बेटाचे स्वतःचे चलन आहे. त्याची किंमत ब्रिटीश पौंड एवढी गणली जाते. इथल्या दुकानात ब्रिटीश पौंड स्वीकारला जातो पण यु.के. मध्ये गर्नसे पौंड स्वीकारला जात नाही.
गर्नसे पौंडची नोट

 लंडन ... थेम्स नदीच्या काठावर वसलेले जगातील एक फार मोठे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र. आतापर्यंत झालेल्या दोन्ही महायुद्धांमध्ये जर्मनीने लंडनवर प्रचंड बॉम्बफेक करून शहर बऱ्यापैकी उद्ध्वस्त केले होते. तरी देखील त्यातून फिनिक्स प्रमाणे भरारी घेत हे दिमाखदार सुंदर शहर जगभरातील लोकांना त्याच्याकडे आकर्षित करून घेण्यात यशस्वी झालेले आहे.
लंडनमध्ये तुम्हाला विनासायास फिरायचे असेल तर फक्त 4 गोष्टींची गरज आहे
1) 'ऑयस्टर कार्ड' - जे लंडनची ट्यूब ट्रेन, बस सगळीकडे चालते. किंबहुना हे कार्ड नसेल तर तुम्ही प्रवास करूच शकत नाही. कारण बसमध्ये कंडक्टर नावाचा मनुष्यच नसतो.


 लंडन ट्यूबचा एक मॅप.

तो मॅप समजावा ह्यासाठी इंग्लिश भाषेचे ज्ञान.

बस. एवढ्या गोष्टी असल्या आणी अंगात पायपीट करण्याची ताकद असली की तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय लंडन फिरू शकता.
कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.
साधारण सन १८३० च्या सुमारास रेल्वेचा शोध लागला आणि वेगवान प्रवासाची मुहुर्तमेढच इंग्लंड मध्ये रोवली गेली. लंडन इंग्लंडमधल्या इतर शहरांशी रेल्वेने जोडले गेले. अनेक खाजगी रेल्वे कंपन्या उदयास आल्या. या सर्व कंपन्यांनी लंडनला आपल आपल एकेक टर्मिनस उभारलं होतं. लोक एका टर्मिनस हून दुसर्या टर्मिनसला रस्त्यानेच जात असत. तसेच रेल्वे मुळे खुप लोक कामासाठी ही लंडनला येऊ लागले. परंतु एवढ्या लोकांना सामावुन घेण्याची क्षमता लंडनच्या बोळकंडीसारख्या रस्त्यांची नव्हती. घोडागाडीने चार पाच मैल जायला दोन दोन तास लागत असत. ह्याचा लंडनच्या विकासावर विपरीत परिणाम होत होता म्हणून यावर तोडगा काढण्यासाठी पर्यायी वहातुक व्यवस्थेची निकड भासत होती. या सगळयाचा परिणाम म्हणून रेल्वेच्या मुख्य मुख्य टर्मिनसना जोडणारा भुयारी रेल्वेचा प्रस्ताव नगरपालिकेने मंजूर केला. या कामी जाॅन फाऊलर या हुशार अभियंत्याची नियुक्ति केली गेली. खुप परिश्रमाने प्रकल्प यशस्वी रीत्या पूर्ण झाला आणि सन १८६३ साली म्हणजे आपल्या कडे रेल्वे आल्यानंतर दहाच वर्षांनंतर पॅडि्गंटन ते फेरिंग्टन अशी अंदाजे साडेचार मैलाच्या अंतरासाठी ही भुयारी रेल्वे सुरु झाली. ही जगातली पहिलीच भुयारी रेल्वे. वाफेच इंजिन आणि उघडे डबे असलेल्या हीच लंडनकरांनी जोरदार स्वागत केले . पहिल्याच दिवशी विक्रमी ३८००० हजार प्रवाशांनी टयुबने प्रवास केल्याची नोंद आहे. पहिल्यांदा वाफेच्या इंजिनामुळे या भुयारी मार्गात धूर होत असे आणि या धूरापासून थोडेसे संरक्षण मिळवे म्हणून मोटरमनना म्हणे दाढी राखण्याचा सल्ला दिला जाई. दाढी थोडा धूर शोषुन घेईल म्हणून ( स्मित)
ही ट्युब म्हणजे अक्षरशः एक नळीच असते. सुरवातीच्या काळात ट्यूबच्या उभारणीसाठी कट अॅंड कव्हर तंत्र वापरले जाई. म्हणजे पहिल्यांदा जमीन खोदुन त्यात ट्युब आणि त्या ट्युब मध्ये रेल्वे लाईन आणि असल्यास स्टेशन असं सगळ बांधायच आणि सगळ काम झाल की वर जमीन पहिल्यासारखी करायची. परंतु काही वर्षांनंतर इमारतीला धक्का न लावता ट्यूबची उभारणी करण्याचे तंत्र विकसीत झाले. आणि ट्युब बांधणे जास्त सोपे झाले. आम्ही लंडनला ज्या इमारतीत रहात होतो त्या इमारतीच्या खालीच एक ट्युब स्टेशन होते. रात्रीच्या शांत वेळी गाडीची कंपने घरातही जाणवत असत
ट्युबमुळे लंडन अक्षरशः चारी बाजुनी फोफावु लागल. शहरातल्या गर्दीत, लहान जागेत रहाण्याची गरज आता उरली नाही.दुरवरच्या शांत उपनगरात राहुन लोक सिटीत ट्युबने कामाला येऊ लागले. त्यामुळे ट्यूब ची मागणी आणखीनच वाढली. या क्षेत्रात वेगवेगळ्या रुटवर सेवा देण्यार्या अनेक खाजगी कंपन्या उदयास आल्या. या प्रत्येक रुटच्या केंद्रस्थानी सेंट्रल लंडन होतच. लंडनभर अक्षरश: ट्युबच जाळ विणल गेलं. भुयारी म्हटलं तरी जिथे अगदीच शक्य नसेल तिथेच ही जमीनी खालुन जाते आणि जागा असेल तिथे मात्र आपल डोक वर काढते. विशेषतः मध्य लंडन मध्ये ही जमीनीखालुनच जाते. काही ठिकाणी ही अतिशय खोल ही जाते. . आज ट्युबचे जवळ जवळ दहा बारा रुट्स आहेत.सोईसाठी त्यांना हिरवा, काळा, डार्क निळा, लाईट निळा लाल, गुलाबी करडा वेगवेगळे रंग दिले गेले आहेत. आता नवीन रुटला द्यायला कोणता रंगच शिल्लक नाहीये. ( स्मित) मुळात खाजगी असलेल्या ह्या रेल्वे कंपन्यांच आज सरकारीकरण झालं आहे टीएफएल म्हणजे ट्रांसपोर्ट फाॅर लंडन ह्या नावाने. काळानुसार यात अनेक बदल झाले. आहेत. पहिल्यांदा वाफेवर चालणार्या इंजिनांची जागा वीजेने चालणार्या इंजिनाने घेतली. उघडे डबे जाऊन त्या जागी बंदिस्त डबे आले. डब्यात दिव्यांची सोय करण्यात आली, आपोआप उघड - बंद होणारे दरवाजे आले. मोठ्या मोठ्या स्टेशनांवर सरकते जिने बसवले गेले. अत्याधुनिक तिकीट प्रणाली आली पण त्याचबरोबर ट्युब खूप महाग ही झाली. लंडनच्या गरीब माणसांना आज ट्युबने प्रवास करताना विचारच करावा लागतो.
ट्युबच्या प्रवासाच आकर्षण फक्त सामान्य माणसांनाच होत अस नाही तर ते राजघराण्यातल्या व्यक्तीना सुद्धा होत. सध्या राज्ञीपदावर असलेल्या राणीने ती साधारण बारा तेरा वर्षांची असताना आपल्या बहिणीबरोबर आणि गवर्नेस बरोबर अगदी रोमन हॉलिडे मधल्या ऑड्री हेपबर्न सारखा वेष पालटुन ट्यबचा प्रवास केला आहे. ती ज्या लाईनने प्रवास करणार होती तिचा रंग हिरवा असल्याने राणीने ही हिरवाच ड्रेस परिधान केला होता. गाडी जेव्हा जमीनीखाली गेली तेव्हा राणीचे डोळे आश्चर्याने चमकले होते. सरकत्या जिन्यावरुन जाताना त्यांची ही त्रेधातिरपीट उडाली होती आणि गाडी बदलताना तर त्या चक्क चुकल्या होत्या आणि कळस म्हणजे शेवटी बाहेर पडताना त्या चेकर कडे तिकीट द्यायचचं विसरल्या. चेकरने अक्षरशः हाक मारुन त्यांचे तिकीट घेतले. तसेच ह्या राणीच्या राज्यकारभाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षात नवी ज्युबिली लाईन सुरु केली गेली. तिच उदघाटन ही राणीने एक स्टेशन गाडी चालवून केलं होत. सगळं केलेलच होत, राणीला फक्त एक बटन दाबायच होत. ( स्मित)
लंडनच्या जीव घेण्या थंडीपासून बोचर्या वार्यापासून आणि कधी ही येणार्या अवसानघातकी पावसापासून टयुबच लंडनकरांचं रक्षण करते. पाऊस वैगेरे आला की माणसं पुटकन जवळच्या स्टेशन मध्ये शिरतात. . पण ट्युबने खरा आधार दिला तो दुसर्या महायुद्धाच्या काळात. जर्मनीची विमान रोज लंडनवर बाँब वर्षाव करत होती. त्यामुळे संध्याकाळ झाली की लोक आपल्याकडच किडुक मिडुक घेउन जवळच्या ट्युब स्टेशन मध्ये जात असत झोपायला . स्टेशन रात्री अशा लोकांनी भरुन जाई. सकाळी उठून लोकं येत आपपल्या घरी. एवढच नाहीतर लंडनच्या इतिहास प्रेमीनी युद्धकाळात लंडन म्युझियम मधला ऐतिहासिक मौल्यवान ठेवा जवळची दोन ट्युब स्टेशन प्रवाशांकरता बंद करुन तिथे ठेऊन दिला होता
ट्युबच्या ह्या अभूतपूर्व यशानंतर हीच अनुकरण मग जगातल्या खूप देशांनी केल. कुठे हिला सबवे म्हणतात तर कुठे मेट्रो. आणि हो.... हीच ही ऑफिशिअल नाव आहे " लंडन अंडरग्राऊंड ". आणि हिचा लोगो म्हणजे एक वर्तुळ जे चाकाच प्रतीक आहे आणि दोन समांतर रेषा ज्या रुळांच प्रतीक आहेत. हा लोगो दिसला की बिनधास आत शिरायच आणि इच्छित स्थळी पोचायच. काही अडचण आलीच तर मदतीला ट्युबचा नकाशा असतोच
लंडनकरांना ट्युब बद्दल खूप अभिमान आहे, पण कसा , तर तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचुन करमेना असा. गर्दीच्या वेळेत रश अवरचा पार क्रश अवर होऊन जातो. गाड्या, सरकते जिने माणसांनी ओसंडून जात असतात. प्लॅटफॉर्म आणि गाडी यात असणार्या गॅपमुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. या गॅप बद्दल ही कोण अभिमान लंडनकरांना " प्लीज माईंड द गॅप" असं प्रिंट केलेले टी शर्ट घालुन मिरवत असतात मंडळी. गाडीत चढता येत नाही म्हणून लोकांना गाड्या सोडाव्या लागतात, अती गर्दीमुळे माणसं गुदमरुन जातील म्हणून कधी कधी विशिष्ट स्टेशनांवर मानवी हस्तक्षेपाने गर्दी कंट्रोल करावी लागते, गाड्या लेट होतात. प्रवास महाग आहे , ट्युबचे संप होतात ...... तरी ही लंडनची ट्युब ही लंड्नची जीवन वाहिनीच आहे त्यामुळे ट्युब शिवाय लंडनकरांच पान ही हलत नाही हे ही तितकच खर आहे.

हेमा वेलणकर
लंडन मधील दोन आयकॉनिक पुलांची एकमेकात गुंतलेली ही गोष्ट नक्की वाचा.
दोन पूल... लंडन ब्रीज आणि टॉवर ब्रीज
थेम्स किनारी वसलेलं लंडन हे अंदाजे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेलं आणि हा ऐतिहासिक वारसा नीटपणे जपलेलं एक खुप जुनं शहर आहे. लंडन ब्रीज हा त्या पैकीच एक मौल्यवान वारसा.
लंडन हे नदीकाठी वसलेलं असल्याने पैलतीरावर जाण्यासाठी थेम्स वर आज जरी अनेक ब्रीज असले तरी फार पूर्वी जेव्हा एक ही पुल नव्हता तेव्हा ओहोटीच्या वेळी नदीच्या उथळ पात्र असलेल्या भागातून लोक चालत नदी ओलंडत असत आणि भरतीच्या वेळी बोटीतून. पण अंदाजे दोन हजार वर्षापूर्वी लंडन जेंव्हा रोमन साम्राज्याचा भाग होतं तेव्हा सैन्याच्या आणि इतर युद्ध सामानाच्या वाहतुकीसाठी साधारण आत्ता आहे त्याच ठिकाणी थेम्स वरचा पहिला ब्रीज “ लंडन ब्रीज “रोमन लोकांनी बांधला अशी इतिहासात नोंद आहे. पाण्यात हलणाऱ्या लाकडी फळ्या शेजारीच नांगरलेल्या होड्या तोलून धरतायत असं त्याचं स्वरूप होत अस म्हणतात. लोकं त्या हलणाऱ्या फळ्यांवरूनच नदीपार होत असत.
ह्या पुलाची आतापर्यंत तीन वेळा पुनर्बांधणी झाली आहे. पैकी बाराव्या शतकात बांधलेला पुल एवढा मजबूत होता की तो अंदाजे सहाशे वर्ष टिकला. त्यावेळी लंडन शहरात जागेची फारच टंचाई निर्माण झाली होती म्हणून लोक ह्या पुलावर घरे बांधून राहू लागले. तसेच लंडन ब्रीज हा एक शॉपिंग स्ट्रीट ही होतं. शहरातली सगळी मोठी मोठी दुकाने ह्याच पुलावर होती. एखाद्या पुलावर कायम स्वरुपी घरे, दुकाने, चर्च आणि इमारती असणारा लंडन ब्रीज एक वैशिष्ट्यपूर्ण ब्रीज आहे. हळु हळु तिथे ही गर्दी वाढू लागली. तसेच ह्या पुलाला असणाऱ्या अरुंद प्रवेशद्वरामुळे ही तेथे कायमच ट्रॅफिक जॅम होऊ लागला. शेवटी अठराव्या शतकात म्युनसिपालटीने सगळी घरं जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आणि पूल फक्त वाहतुकीसाठीच खुला ठेवला.
तिसऱ्यांदा पुनर्बांधणी केलेला सध्या वापरात असलेला लंडन ब्रीज फारच तरुण म्हंजे अवघे “पन्नास वयमान “ आहे. बघता क्षणी जरा ही नजरेत न भरणारा, काही ही वेगळेपण आणि स्थापत्य सौंदर्य नसणारा असा हा एक फारच नॉर्मल सिमेंटचा ब्रीज आहे. ना त्याला कमानी, ना शोभिवंत कठडे , ना सुंदर दिवे…मी पहिल्यांदा बघितला तेव्हा माझा थोडा भ्रमनिरासच झाला होता. अर्थात काही वेगळेपण आणि स्थापत्य सौंदर्य नसलं तरी त्याचं जगभरातील महात्म्य आणि ऐतिहासिक मूल्य मात्र जरा ही कमी होत नाही. ( कसे ते कळण्यासाठी शेवटपर्यंत वाचा एका बाजूला हा ब्रीज जिथे लाखो लोक रोज कामासाठी येतात त्या लंडनची आर्थिक सत्ता एकवटलेल्या सिटी ऑफ लंडन ला आणि दुसऱ्या बाजूला लंडन ब्रीज ह्याच नावाचं मोठ ट्रेन आणि बस टर्मिनल, खाण्या पिण्याची चंगळ असलेलं बरो मार्केट आणि बहुमजली शार्ड ह्यांना जवळ असल्याने ह्या पुलावर कायम वाहनांची, पादचाऱ्यांची ही खूप गर्दी असते. ह्याच कारणासाठी पुलाचे फुटपाथ थोडे जास्तच रुंद आहेत असं माझं निरीक्षण आहे.
हया ब्रीजवरून लंडनची स्काय लाईन फार सुंदर दिसते. नदीच्या दोन्ही काठावर ह्या शहराचा इतिहास सांगणाऱ्या शेकडो वर्ष जुन्या गॉथिक शैलीतील इमारती आणि त्याच वेळी लंडनच्या अधुनिकतेची ही ग्वाही देणाऱ्या शार्ड, गर्किन, वॉकी टॉकी अश्या गगनचुंबी इमारती हातात हात घालून उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. कधी कधी तर समोरच्या ब्लॅक फ्रायर पुलावर संथ गतीने जाणारी ट्रेन, लंडन ब्रीज वर जाणाऱ्या गाड्या आणि बसेस, नदीपात्रातून जाणाऱ्या बोटी, आणि आकाशात लँडिंग साठी घिरट्या घालणारं विमान हे आपण एकाच वेळी पाहू शकतो पुलावरून. तरी ही ह्या पुलावरून सर्वात सुन्दर काय दिसत असेल तर तो म्हंजे टॉवर ब्रीज.
लंडनची जणू ओळखच असलेला टॉवर ब्रीज “टॉवर ऑफ लंडन” ह्या किल्ल्याच्या जवळ असल्याने ह्या ब्रीजला “ टॉवर ब्रीज “ हे नाव दिलं असलं तरी पूल मधोमध दुभंगणाऱ्या मोटर्स जिथे बसवल्या आहेत ते त्याचे दोन टॉवर ही त्याच हे नाव सार्थ करतातच.लंडनच्या पूर्व भागात वस्ती वाढत होती आणि त्या भागात थेम्स वर एका ही पूल नसल्याने लोकांची फार गैरसोय होत होती. परंतु तिथे पूल बांधण्यात पुलाची उंची हा मोठाच अडसर होता. कारण तेव्हा त्या भागातून मोठ्या मोठ्या मालवाहू जहाचांची कायम ये जा सुरू असे. शेवटी सरकारने ब्रीजच्या डिझाईन साठी एक स्पर्धा जाहीर केली. गरज पडेल तेव्हा मधोमध दुभंगून मोठ्या जहाजांना वाट मोकळी करून देण्याचं तसेच शेजारीच असलेल्या किल्ल्याला ही शोभून दिसेल अस गॉथिक शैलीतील डिझाईन पास केलं गेलं. सात वर्षात बांधकाम पूर्ण होऊन साधारण सव्वाशे वर्षापूर्वी अश्या तऱ्हेचा जगातला पहिला पुल जनतेच्या सेवेत रुजू झाला.
मुळातच सुंदर असलेला हा ब्रीज कायम रंगरंगोटी करून सुस्थितीत ठेवल्याने तो टुरिस्ट लोकांच आकर्षण बनला नाही तरच नवल. लंडन पहायला आलेला प्रत्येक जण हा पूल पहातोच. ख्रिसमसची सजावट म्हणून मंद निळ्या रंगाच्या छोट्या छोट्या दिव्यांच्या रोषणाईने सजलेला, अनेक वर्षापूर्वी पाहिलेला टॉवर ब्रीज आज ही माझ्या डोळ्यासमोर आहे.
आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा पुल बघितला तेव्हा त्याचे टॉवर बघणे, पुलावरून रमत गमत चालणे, तिथे लिहिलेली माहिती वाचणे, पुल जिथे दुभंगतो तिथली एक दोन इंचाची गॅप निरखून पाहणे, फोटो काढणे ह्यात इतके दंग होतो की “ पूल रिकामा करा “ हे सांगणारा सायरन मागे वाजतोय हे माझ्या ध्यानात ही आलं नव्हत. सायरन जेव्हा फारच जोरात वाजायला लागला तेव्हा मागे वळुन बघितलं तर सगळा पूल रिकामा होत होता आणि तो थोड्याच वेळात दुभंगायला ही सुरवात होणार होती. मग आम्ही ही धावत धावत खाली आलो. तो कसा दुभंगतो, कशी मोठी जहाज पार होतात आणि पुन्हा एकसंध होऊन वाहतूक कशी सुरु होते हे अगदीच अनपेक्षितपणे आम्हाला पहायला मिळालं.
पूलावरच्या एका कर्मचाऱ्याने अंदाजे सत्तर एक वर्षापूर्वी पूल दुभंगतोय हे सांगणारा सायरन न वाजवताच पुल वर उचलला जाणारं बटण दाबलं . नेमकी त्याच वेळी एक डबल डेकर पुलाच्या अर्ध्या पर्यंत आली होती. अचानक समोरचा रस्ता गायब झालेला बघून काय झालंय हे ड्रायव्हरच्या क्षणात लक्षात आलं. त्याने प्रसंगावधान राखून अफाट वेगाने त्या थोड्या वर वर उचललेल्या भागावरून बस पलीकडच्या अर्ध्या भागावर नेली जे फारच धोकादायक होतं. नशिबाने पुलाचा तो भाग वर जायला सुरवात झाली नव्हती त्यामुळे बस तिथे जाऊन थांबली. विशेष म्हणजे सगळ्या प्रवाशांचे प्राण तर वाचलेच पण कोणाला ही फार कुठे इजा ही झाली नाही . हा ब्रीज आणि डबल डेकर बस दोन्हीना लंडन करांच्या मनात खास स्थान. त्यांची ही काळजाचा ठोका चुकवणारी कहाणी.
लंडन ब्रीजशी लंडन करांच नातं अधिक जवळीकीच आणि अधिक मुरलेलं आहे. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात लंडन ब्रीजला महत्वाचे स्थान आहे. “लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन “ हे मुलांचे गाणं प्रसिद्ध आहेच. असं असलं तरी लंडनच आयकॉन होण्याचा मान लंडन ब्रिजला न मिळता टॉवर ब्रीज ला मिळाला आहे. लंडनची ओळख म्हणून फोटो असतो तो टॉवर ब्रीज चा, लंडन ब्रीज चा नाही. त्यामुळे लोकांचा ह्या दोन पूलांमध्ये खुप गोंधळ होतो. अनेक वेळा टॉवर ब्रीजच लंडन ब्रीज समजला जातो.
साधारण पन्नास एक वर्षांपूर्वी हा ब्रीज जेव्हा तिसऱ्यांदा बांधला तेव्हा जुन्या आधीच्या पुलाचा दगड अन् दगड एका अमेरिकन बिझनेसमन ने दाम दुप्पट किमतीला विकत घेतला आणि त्यावर भरमसाठ वाहतूक खर्च करून तो अमेरिकेतल्या अरिझोना राज्यात एका नदीवर पूल बांधायला वापरला. त्यावेळी अमेरिकन लोकं कसे मूर्ख आहेत, त्यांनी टॉवर ब्रीज म्हणून लंडन ब्रीजच कसा दाम दुप्पट किंमत मोजून त्यांच्या देशात नेला अशी ही कंडी इंग्रजांनी पिकवली होती. असो. अश्या तऱ्हेने लंडन ब्रीज एका आज वेगळ्याच नावाने एका वेगळ्याच देशात वेगळ्याच ठिकाणी वास्तव्यास आहे .
लंडन ब्रीज ने अमेरिकेला जाताना ही इंग्लंड ला मालामाल तर केलंच पण ह्या सगळ्या प्रकारामुळे म्हणा किंवा लंडन ब्रीज चा परीस स्पर्श झाल्याने म्हणा अमेरिकेतील ते छोटंसं गाव जिथल्या नदीवर लंडन ब्रीज चे दगड वापरून पुल बांधण्यात आला ते ही प्रसिद्ध झालं आणि बघता बघता त्याची ही भरभराट झाली.
हेमा वेलणकर

लंडनमध्ये जाऊन काय बघावे ह्याचे एक ठराविक असे उत्तर नाही. एखाद्या लहान मुलाला खेळण्यांच्या दुकानात घेऊन गेलात आणी 'तुला ह्यातले काय काय हवे ?' असे विचारलेत तर काय उत्तर येईल? तसेच लंडनचे आहे. दिवसभर बसने फिरत बाहेरच्या सुंदर इमारती बघत बसलात तरी मन भरेल. कुठल्याही स्टॉप वरून मिळेल त्या बसमध्ये बसा, मधेच कुठे तरी उतरून आजूबाजूच्या गल्ल्यांमधून फिरा. कुठेतरी एखादा कलाकार त्याच्या प्रेयसीसाठी व्यायोलिन किंवा गिटार वाजवत बसला असेल ते १० मिनिटे ऐका. तुमची पण एखादी जुनी 'आठवण' जागी होईल. किंवा एखादी चुणचुणीत मुलगी गाणे म्हणत किंवा नाच करून दाखवत असेल तो पहा. आणी तिथून निघण्यापूर्वी मन मोठे करून (Pound vs INR कॅल्क्युलेशन न करता) त्यांच्या हॅट मध्ये एखादा पाउंड बक्षीस द्या. कॅमेरा घेऊन मादाम तुसाँ मधल्या निर्जीव पुतळ्यांबरोबर सेल्फी काढण्यात जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा थोडा वेळ कॅमेरा बाजूला ठेवा आणी ह्या शहराचा वरीलप्रमाणे मनमुराद आस्वाद घ्या. खूप मजा येईल.
मुख्य गोष्ट सांगून झाल्यावर आता तिथल्या अन्य भटकंतीचे काही फोटो.
टॉवर ब्रिज. ह्याच्या बाजूला थेम्स नदीच्या काठावर असलेल्या हिरवळीवर दिवसभर पडून राहिले तरी कंटाळा यायचा नाही ह्याची गॅरंटी. (लंडनच्या शेवटच्या भेटीत ती वेळ आली देखील माझ्यावर.)



लंडन आय



लंडन आय मधून दिसणारी यू.के. पार्लमेंट

टॉवर ऑफ लंडन

पिकॅडिली सर्कस जवळचा एक फोटो

लहानपणी क्रिकेट हा धर्म होता आणी मोहम्मद अझरूद्दीन म्हणजे गळ्यातला ताईत. तो गळ्यात ताईत घालतो म्हणून मी पण एक ताईत घरी बनवला होता एवढा अझरवर जीव. पण 1999-2000 साली जे वादळ आले त्यात काय झाले ते माहीतच आहे सर्वाना. तिथून पुढे ह्या खेळावरचे प्रेम थोडे कमी झाले. त्यामुळे ह्या ठिकाणी जायचे नाही असा विचार बऱ्याचदा मनात आलेला. पण कितीही विसरायचे म्हटले तरी पहिले प्रेम नाही विसरता येत. बरोबर ना ? सर्व कटू आठवणी बाजूला सारून शेवटी गेलोच ह्या ठिकाणी.
जिथे कपिल पाजीने ध्यानीमनी नसताना विश्वचषक उंचावला होता आणी दादाने शर्ट काढून गरागरा फिरवला होता त्या गॅलरीत बराच वेळ बसलो. ड्रेसिंग रूमच्या प्रत्येक खुर्चीवर बसून घेतले. नंतर खाली जाऊन स्टेडियम पाहिले आणी नंतर कौंमेंट्री बॉक्स. एखादे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बघण्याची आमची पहिलीच वेळ. सगळे पाहून झाल्यावर शेवटी तिथले छोटेखानी म्युझियम बघितले. (जणू भरपेट जेवण झाल्यावर त्यावर जसे आईस्क्रीम)
म्युझियम मध्ये ठेवलेला मूळचा ऍशेस चषक
भारताने जिंकलेला 1983 चा विश्वचषक

लॉर्ड्सची माहिती देणारे आमचे उत्साही गाईड

1827 साली खेळल्या गेलेल्या एका सामन्याचे स्कोरकार्ड

लंडन मधले अजून एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे 'मादाम तुसाँ '. बरेचसे पुतळे चांगले आहेत. पण एकाही भारतीयांचा पुतळा नीट नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
'चेंज ऑफ गार्ड' हा फार भंपक प्रकार असावा असे वाटते. मी तर तो बघण्याच्या भानगडीत न पडता बाजूच्या जेम्स गार्डनमध्ये फिरत बसलो होतो.
ह्या सर्व ठिकाणी भेट द्यायला तिकीट आहे. पण साऊथ वेस्ट ट्रेन किंवा नॅशनल एक्स्प्रेस बसने गेल्यास सर्व ठिकाणी एकाच्या तिकिटात दोघांना एंट्री मिळते.
लंडनमध्ये काही उत्तमोत्तम म्युझियम्स आहेत. आणी बहुतेक सर्व म्युझियम्स फ्री आहेत. Science Museum, Natural history, National Galary वगैरे. तसेच ''फोटोग्राफर्स गॅलरी' नावाचे एक ठिकाण आहे जिथे सतत फोटोग्राफीवरची प्रदर्शने चालू असतात.
(पाय गळ्यात येणे म्हणजे नक्की काय प्रकार असतो तो ही म्युझियम्स बघताना तुमच्या लक्षात येईल.)
तर अशा प्रकारे दिवसभर मनमुराद भटकंती करा आणी पाय गळ्यात आले की कुठल्या तरी पार्क मध्ये जाऊन आडवे पडा थोडा वेळ.
आणी हो लंडनमध्ये विनासायास फिरण्यासाठी लागणारी चौथी गोष्ट सान्गायची राहून गेली ना. ती म्हणजे तथाकथित 'Summer season' ला लंडनला गेलात तरी स्वेटर किंवा जर्किन न घालता जाण्याचा विचार मनात आणू नका. तो त्यांच्यासाठी 'Summer season', तुमच्यासाठी नाही. इथली बोचरी थंडी आणी त्यात भर म्हणून सतत जोरदार वाहणारे थंड वारे तुमचे जिणे हराम करू शकतात. त्यामुळे चांगला स्वेटर किंवा जर्किन, कानटोपी घालायला मुळीच विसरू नका.
फिरत राहा.
लंडनपासून अंदाजे १९० की.मी दूर डोर्सेट कौंटीमधे असलेले अंदाजे दीड लाख लोकसंख्येचे एक छोटेसे शहर 'पूल'. इंग्लंड म्हटले की लंडन, मँचेस्टर, लिव्हरपूल अशी प्रसिद्ध शहरे लगेच आठवतात. त्यामुळे पूल सारख्या तितक्याश्या माहीत नसलेल्या ठिकाणी कंपनीने ऑफिस का काढले असावे हा प्रश्न इकडे जाण्याअगोदर डोक्यात होता. पण इथून परत जाताना मात्र इथे ऑफिस काढल्याबद्दल आभारच मानले.
ह्या शहराला एक ऐतिहासिक महत्व आहे. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी ६ जुन १९४४ रोजी सुरु केलेल्या 'Normandy Landing' च्या ऐतिहासिक घटनेतील काही सैनिकांचे प्रस्थान 'पूल' मधूनच झाले होते. शहरात व्रुद्ध लोकांची संख्या बऱ्यापैकी जास्त. आपण पेन्शनरांचे शहर म्हणतो त्या प्रकारचे ठिकाण असावे. पूलच्या समुद्रावर मासेमारी करत बसलेले वृद्ध हे नेहमी दिसणारे दृश्य. हे एक प्रमुख बंदर असल्याने इथून बरीच जहाज वाहतूक होत असते. रोज नवी नवी जहाजे बंदरावर मुक्कामासाठी असणारच.
पूल बंदर

पूल मधील बारक्लेजचे ऑफिस

डबल डेकर शहर वाहतूक बस

पूलचा ट्वीन सेल ब्रिज.

हा समुद्रावरचा पूल दिवसातून काही ठरावीक वेळेला पूर्ण वर उचलला जातो. मग जहाजे निघून गेली की पुन्हा बंद होऊन वाहतुकीला खुला होतो. असे 2 पूल आहेत तिथे. फोटोत दिलाय तो नवा. ह्याच्या पासून जवळच एक जुना पूल आहे.
ट्वीन सेल ब्रिजकडे जाणारा चकाचक रस्ता व फूटपाथ

ट्रॅफिक आयलंड.

अजून एक सुंदर रस्ता.

ऑफिसपासून चालत 2 मिनिटाच्या अंतरावर पूल पार्क होते. प्रचंड मोठा तलाव आणि पूर्ण हिरवळ. तसे पूर्ण शहरच हिरवेगार होते म्हणा. एकदा मी लॅपटॉप घेऊन मस्त पैकी ह्या झाडाखाली जाऊन बसलो काम करत लॅपटॉपची बॅटरी उतरेपर्यंत.

पार्क पासून जवळच असलेल्या एका घराची जुन्या प्रकारची खिडकी.

'लाईट हाऊस' इथे नेहमी विविध कार्यक्रम (ऑपेरा) किंवा प्रदर्शने असत.

पूल बंदरावरून अंदाजे २० मिनिट बोटीच्या प्रवासावर आहे ब्राऊन सी आयलंड. हे एक छोटेसे जंगल आहे. बोट आयलंड वर नेऊन सोडते. तिथे तिकीट घ्यायचे आणी मग तुम्ही जंगलात जाऊ शकता. लहान मुलांसाठी तिथे स्ट्रोलरची पण सोय केलेली आहे. आम्ही आमचा स्ट्रोलर घेऊन गेलो होतो पण तो लहान चाकाचा होता. तिथल्या कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे येऊन आमचा स्ट्रोलर ठेऊन घेतला आणी त्यांच्याकडचा मोठ्या चाकाचा दिला. (जर लहान चाकाचा आत जंगलात घेऊन गेलो असतो तर तो कायमचा तिथे ऑनसाईट राहिला असता हे निश्चित.)
ब्राऊन सी आयलंड वर फार मोठ्या प्रमाणात मोर व विविध पक्षी आहेत. मोर तर न घाबरता माणसांच्या जवळ येत होते. एका मोराने असे जवळपास १० मिनिटे नृत्य देखील करून दाखवले.

पण इतका आरामदायक स्ट्रोलर मिळाल्यावर मोर बीर गेले उडत. झोप महत्वाची.

मग दिवसभर जंगलात फिरून संध्याकाळी परत आलो.एक दिवस घालवण्यासाठी अतिशय मस्त जागा.

मे आणी जून ह्या दोन महिन्यात पूल शहराच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भागात पूल बाईक शो भरवला जातो. अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स आणून प्रदर्शनात मांडतात आणी त्यातून एक विजेती बाईक निवडली जाते. प्रदर्शन पाहायला कोणतेही तिकीट नाही.
प्रदर्शनात पाहिलेल्या काही आवडलेल्या बाईक खाली.













खालील बाईक कुठल्यातरी प्रदर्शनात विजेती होती. पूर्ण बाईक टाकाऊ वस्तूं पासून बनवलेली आहे तर बैलाची शिंगे हॅण्डल म्हणून वापरलेली आहेत.

पूल ग्रेहाऊंड हे दर रविवारी कुत्र्यांच्या धावण्याच्या स्पर्धा भरवण्याचे ठिकाण.

आपण तिथे पैसे लावून सट्टा खेळू शकतो. गेलो एकदा सट्टा खेळायला. प्रत्येक रेस ला ६ नवीन खेळाडू (कुत्रे). सुरवातीला त्यांना त्यांचे ट्रेनर फिरवून सगळ्या लोकांना दाखवणार. मग त्यांच्यावर पैसे लावायला थोडा वेळ मिळतो आणी मग रेस. जिंकलात तर लगेच पैसे घ्यायचे. बऱ्याच प्रकारे पैसे लावू शकता. पहिला कोण येणार, दुसरा कोण येणार, तिसरा कोण येणार, पहिले 3 कोण असतील, ६ जणांमध्ये कसे नंबर येतील. खूप प्रकार होते पैसे लावायला. फक्त पैसाच पाहिजे. एकदा माझा कुत्रा जिंकला त्याचे एकाच्या बदल्यात ३ पौंड मिळाले. बाकी सर्व रेस मध्ये निराशा झाली.

मूर्स व्हॅली -

हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. परंतु ह्या ठिकाणी जायला थेट बस सेवा नाही. बरेच अंतर चालावे लागते. त्यामुळे तिथे पोचण्यातच बराच वेळ खर्ची होईल कुणाचाही. स्वत:ची गाडी असल्यास उत्तम.
इथे एक टॉय ट्रेन आहे. खरोखरच खेळण्यातली वाटावी इतकी छोटी ट्रेन आहे. आणी ती व्हॅलीच्या आत दोन स्टेशनच्या दरम्यान (लेकसाईड आणी Kingmere ) फिरते. वाटेत छोटे बोगदे बनवलेले आहेत आणी सिग्नल सिस्टिम देखील उभारलेली आहे.
गाडीचे कोळश्यावर चालणारे इंजिन

तसेच मूर्स व्हॅली मध्ये आत प्रवेश केला की लगेच एक सायकल भाड्याने देण्याचे ठिकाण आहे. तेथून सायकल भाड्याने घेऊन ह्या सुंदर व्हॅलीमध्ये फिरणे का एक अतिशय सुंदर अनुभव आहे.
 
शेरलॉक होम्स म्युझियम

221 ब, बेकर स्ट्रीट- बहुधा जगातील सर्वात प्रसिध्द पत्ता! शेरलॉक होम्स या पत्त्यावर १८८१-१९०४ या काळात राहत असे आर्थर कोनन डॉयल यांच्या साहित्यात वर्णन आहे.
शेरलॉक होम्स कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक वातावरण तयार होते..मागच्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, जुने रस्ते, विक्टोरिया, पावसाळी कुंद वातावरण आणि शेरलॉक होम्स आणि इतर पात्रांचे स्टायलीश संवाद. खिळवून ठेवणारे कथानक. त्याचे अजब तर्क आणि वेगळा विचार करायची पद्धत! काल्पनिक आहे माहित असून कधीतरी पहायला हवे असे वाटणे. हेच ऑर्थर कोनन डॉयल चे वैशिष्ट्य. रहस्यकथा वाचायची आवड असलेल्या प्रत्येकाला कधीतरी शेरलॉक होम्स वाचायचे चे वेड लागतेच. मग इतकं वेड जगभरातल्या लोकाना आहे तर असे एक घर तयारच का करू नये? झालं कल्पना सुचली आणि अमलात पण आली. आणि साकारलं एक सुंदर संग्रहालय..
१९९० साली हे सुरु झालं असलं तरी २२१ ब हा (खरा तिथला नसलेला )पत्ता मिळवायला निर्मात्यांना बराच त्रास पडला. मुळात हे घर २३७ आणि २४१ क्रमांकाच्या घरांमध्ये आहे. शेरलोक होम्स आणि डॉ. वाटसन हे मिसेस हडसन च्या गेस्ट हाउस मध्ये भाडेकरू होते असे लिहिले गेले होते. गेली ऐंशी वर्षे शेरलोक होम्स साठी येणारी जगभरातली पत्रं Abbey National ही बँक पहात असे. कारण हा त्यांचा खरा पत्ता ! हल्ली ही पत्रे थेट संग्रहालयाला मिळतात.रॉयल मेल अर्थात ब्रिटीश पोस्टाने लोकप्रियता पहाता ते मान्य केले
एकदा या प्रसिद्ध पत्त्यावर भेट द्यायची खूप इच्छा होती. जालावर समजलं की नाताळ चा दिवस सोडून वर्षभर साडेनऊ ते सहा हे संग्रहालय सुरु असते. मादाम तुसाद्स संग्रहालयामागे चालताना अगदी समोरच हेही संग्रहालय आहे. एकदा पहावेच असे सन्ग्रहालय आहे.
एकदा बेकर स्ट्रीट ला गेल्यावर विचारायला पण लागत नाही. महाशय आपला तोच पाईप घेऊन स्टेशन समोर स्वागताला उभे! इथून अवघ्या दोनशे पावलांवर २२१ ब बेकर स्ट्रीट!
.
शेरलॉक होम्स यांचे कार्ड…त्यावर फोन नंबर नाही!
.
या जुन्या घराच्या तळमजल्यावर प्रवेशिका घेऊन रांगेत उभे राहिलो. सगळीकडे पारंपारिक इंग्रजी वेषातील कर्मचारी पाहून छान वाटते.
.
.
घराबाहेरच एक गार्ड स्वागतासाठी उभा आहे. हाच तिकिटे पाहून आत सोडायचे काम करतो.
.
हे एक जुने घर असल्याने एकाच दारातून आत बाहेर जावे लागते. एका वेळी फक्त दहा-पंधरा व्यक्ती आत जातील हे तो पहातो. त्यामुळे पंधरा मिनिटे रांगेत वाट पहावी लागते.
मग प्रवेश मिळाला अन एक खजिनाच उघडल्याचा भास झाला. पहिल्या मजल्यावर मूळ कथेतील घराप्रमाणे खोल्या सजवल्या आहेत. त्यावर दोन मजले तत्कालीन इतर वस्तू , व्यक्ती आणि प्रसंगांवर आधारित आहेत.
.
इथे तर डॉ वाटसन किंवा शेरलॉक होम्स येऊन 'हेलो! इथे काय करतोयस?'’ विचारतील असे वाटले.
.
.
गुप्तहेराची छोटीशी प्रयोगशाळा
.
जमवलेले पुरावे
.
.
आर्थर कोनन डॉयल यांचे हस्तलिखित
.
'Man with twisted lip’ डॉयल यांची एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा.. मेणाच्या पुतळ्याच्या रुपात...
.
काही वेळा केवळ तीन मजले भरायचे म्हणून उगाचच काही वस्तू गोळा केल्या असे वाटते अन तेव्हढेच खटकते. उदा. शिवण यंत्र , व्हायोलीन वगैरे!
या घराच्या तुलनेत जे होम्स पट आले त्यात बऱ्यापैकी मोठी घरे दाखविली आहेत आणि ती कथेला अनुरूप पण वाटतात. पण अधिकृत घर मात्र असं आहे.
शेवटी आपल्याकडे असे संवर्धन का करून ठेवले जात नाही हा प्रश्न पडतोच. व्यवस्थित तिकीट विकत घेऊन पहायला लोक तयार असतात. पण आधी ते तयार तर केले पाहिजे ना?
भारतात मोजके सन्माननीय अपवाद वगळता संग्रहालय म्हणजे केवळ पुरातन अवशेष दाखवले जातात. काही नवीन भर टाकून ते चांगले करता येईल. पुण्यातले केळकर म्युझियम आणि रेल्वे म्युझियम असे वैयक्तिक संग्रह सोडले तर आवर्जून पहावे असे काही निर्माण झाले नाही. आणि इथे तर अस्तित्वात नसलेल्या, केवळ साहित्यिक अस्तित्व असलेल्या व्यक्तित्वाचे, त्यातल्या पात्रांचे संग्रहालय बनवले आहे! आणि त्यासाठी वेड असावं लागेल नव निर्मितीचं 
https://www.misalpav.com/node/21944
https://www.facebook.com/hema.velankar/



जगातलं आठवं आश्चर्य...लंडनची ट्युब








Submitted by मनीमोहोर on 30 July, 2022 - 18:37

लंडनचा पाऊस
कोणत्याही गावातला पाऊस मला खूप आवडतो. कोकणातला आठ आठ दिवस संतत धार धरणारा पाऊस तर सर्वात आवडता. ठाण्याचा ही आवडतोच पण तो फक्त घरात बसून बघायला. आपल्याकडे पावसाळा हा सेपरेट ऋतू आहे आणि साधारण त्याच काळात आपण पाऊस अनुभूवू शकतो. लंडन मध्ये ही ऑक्टोबर ते जानेवारी असा ऑफिशियली पावसाळा जाहीर केलेला असला तरी इथे पाऊस वर्षभर आणि कधी ही पडतो. पावसामुळे क्रिकेटच्या किंवा विम्बल्डनच्या मॅच वर पाणी फिरल्याचे आपण अनेक वेळा बघितलं आहेच. तरी ही लंडनचा पाऊस ही अनुभवण्या सारखीच गोष्ट आहे म्हणून हा लेखन प्रपंच.
इथे बरेच वेळा आकाशात ढगांचीच गर्दी असते त्यामुळे आकाश ही करड्या रंगाचंच दिसतं. विमानातून खाली पाहताना ही ढगांचा पडदा दूर सारून विमान खूप खाली आल्याशिवाय भर शहरातून नागमोडी वळणे घेत जाणारी लंडनची टेम्स नदी, मोकळी मैदानं, एका लायनीत एक सारखी दिसणारी एक मजली लाल कौलारू घरं, सरळ सोट जाणारे मोटार वेज आणि त्यावर खेळातल्या गाड्यांसारख्या दिसणाऱ्या सुर्रकन जाणाऱ्या गाड्या हे काहीही आपल्याला पहाता येत नाही.
लंडनचं आकाश नितळ निळं क्वचितच दिसतं. स्वच्छ ऊन ही गोष्ट लंडनमध्ये तशी दुर्मिळच आहे. त्यामुळे Sun is shining bright च टोपीकराना फारच अप्रूप. अर्थात हवा कशी ही असली तरी त्याबद्दल तक्रार करणं हा लंडनकारांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. Happy असो. बहुतांश वेळा हवा ढगाळ असल्यामुळे खूप जणांना ते डिप्रेसिंग ही वाटतं पण मला अशी हवा मनापासून आवडते. अश्या हवेत अगदी भर दुपारी फिरायला गेलं तरी उन्हाचा त्रास होत नाही. दुपारी बारा वाजता सुदधा मागच्या अंगणात गरम गरम कॉफी घेत एखादं पुस्तक वाचण्याची मजा काही वेगळीच असते. किंवा काही ही न करता मनात कोणताही आकार धरला तरी आकाशातल्या ढगात तो लगेच तयार होण्याचा खेळ तर किती ही वेळ खेळला तरी कंटाळा येत नाही मला.
इकडे जनरली पाऊस खूप वेळ आणि अगदी धो धो असा पडतच नाही. थंड हवेमुळे आणि कमी सूर्यप्रकाश असल्याने जमीन एवढी तापत नाही आणि जरी तापत असती तरी जमीन हा प्रकारच इंग्रज लोकांनी आपल्या गावात ठेवलेला नाहीये. सर्वत्र सिमेंटचे रस्ते, हिरवळ किंवा मग छोटे छोटे दगड तरी घातलेले मोकळ्या जागी. त्यामुळे पावसा बरोबर येणाऱ्या मृदगंधाला मात्र इथली मंडळी मुकली आहेत. अत्तराचे भाव आज पार कोसळले हा पहिल्या पावसात आपल्याकडे फिरणारा मेसेज ही इथे व्हायरल होत नसेल.
कधीतरी थंडर स्टॉर्म ची वॉर्निंग येते, आपण विजांचा कडकडाट आणि धो धो पावसाची अपेक्षा करतो पण आपला अगदीच भ्रमनिरास होतो. थंडरस्टॉर्म म्हटलं तरी विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट नसतोच. दहा पंधरा मिनिटांची एखादी सर पडली की संपलं इथलं थंडरस्टॉर्म. एरवी तर पाऊस अगदीच कळेल न कळेल इतपत पडतो पुण्याच्या पावसासारखा. बाहेर असलो तर छत्री उघडली नाही तरी ही चालेल . पण त्याचा फायदा असा होतो की त्यामुळे इथले रस्ते, झाडं, फूटपाथ रोजच नैसर्गिक रित्याच धुवून निघतात.त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही.
आपल्याकडच्या धो धो पडणाऱ्या आणि खिडकीच्या पत्र्यावर ताड ताड ताशे वाजवणाऱ्या पावसाच्या आवाजाची एक मस्त गुंगी येते. धो धो पडणाऱ्या पावसाचा आवाज हा सगळ्या white noise मध्ये लोकप्रिय आहे ते उगाच नाही. इथे मात्र पावसाला फार जोरच नसतो आणि पावसाबरोबर येणाऱ्या थंडीमुळे खिडक्या
दारं बंदच करावी लागत असल्याने इथला पाऊस अगदी निःशब्द असतो. घरात असलो तर कळत ही नाही बाहेर पाऊस पडतोय ते. अर्थात असा पाऊस ही खिडकीत बसून बघायला छानच वाटतो.
मुसळधार वृष्टी होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला की त्या दिवशी चकचकीत ऊन पडतं ह्या पार्श्वभूमीवर इथला अचूक अंदाज ही काही तरी जादूच वाटते. हवामान खात्याच्या अंदाजाला पाऊस कधी धोका देत नाही. एक दिवस सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज होता. साधारण पावणे दहा झाले तरी पत्ता नव्हता पावसाचा. मला “कसे चुकले हे “ म्हणून थोडा असुरी म्हणतात तसा आनन्द होत होता पण पुढच्या पाचच मिनिटात वातावरण बदललं आणि थोडा का होईना पडला बिचारा. स्वतः पडला पण हवामान खात्याचा अंदाज खोटा नाही पाडलान.😀
सकाळी ऊन दुपारी ढग आणि संध्याकाळी पाऊस हे एकाच दिवशी दाखवण्याचे कसब लंडनच्या हवेत आहे. ऊन पावसाचा खेळ इथे कायमच सुरू असतो. त्यामुळे इंद्रधनुष्य मात्र खूप वेळा दिसते. थंडीच्या दिवसात सूर्याची किरणं तिरपीच असतात दिवसभर तेव्हा तर भर दुपारी ही इंद्रधनुष्य दिसू शकत. थंडीच्या दिवसात पारा चार अंशाच्या खाली असताना जर पाऊस पडला तर त्याच रूपांतर हिम वृष्टीत होत. अर्थात लंडनला थंडी खूप असली तरी बर्फ मात्र क्वचितच पडतो. असो. कधी कधी संध्याकाळच्या वेळी आकाशातले काळे ढग दूर सारून आसमंतात फाकणारा सोनेरी सूर्यप्रकाश फार सुंदर दिसतो. सर्व परिसर सुवर्ण प्रकाशात झळाळून निघतो.
एक दिवस असाच दिवसभर पाऊस होता. छत्री वैगरे घेऊन मी पाय मोकळे करायला बाहेर पडले होते. ढगाळ हवा, रिमझिम पडणारा पाऊस, हवेतला गारवा, पावसामुळे स्वच्छ झालेली झाडं, फुलं , घरांपुढल्या ताज्यातवान्या झालेल्या बागा, वाऱ्यामुळे भिरभिरत खाली येणारा झाडांचा मोहर , पावसामुळे अचानक रस्त्यावर आलेल्या असंख्य गोगलगायी हे सगळं पहात असतानाच समोरच दृश्य पाहून थबकलेच मी. झुपकेदार शेपटी असलेला एक छोटासा कोल्हा समोरच्या फुटपाथवरून पलीकडच्या वाडीत धावत जाताना दिसला. होय होय , बरोबर वाचताय तुम्ही... कोल्हाच होता तो....
लंडनचे कोल्हे हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण थोडक्यात म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर शहराची लोकसंख्या वाढू लागली त्यामुळे जंगलं तोडून तिथे मानवी वसाहती बांधल्या गेल्या. त्या जंगलातले हे मूळ रहिवासी नवीन रहिवाश्यां बरोबर इथेच मुक्कामास राहिले, म्हणून लंडन मध्ये खूप कोल्हे दिसतात. लोकं घरातल उरलं सुरलं मांस वैगरे रात्री त्यांच्यासाठी घराबाहेर ठेवून देतात. त्यांच्या पोटापाण्याची सोय आपोआपच होते त्यामुळे शिकार वैगरे विसरून ते आता माणसाळलेत असं म्हणतात. तरी कोल्हा म्हटलं की थोडी भीती वाटतेच. तरी कोकणात आमच्याकडे कोल्ह्याचं दर्शन हा शुभसंकेत मानला जातो म्हणून थोडं बरं ही वाटलं. असो. लहान मुलांना आपल्या बागुलबुवा सारखी कोल्ह्याची भीती दाखवतात म्हणे.
बघता बघता पावसाचा जोर वाढला . पावसामुळे आणि वाऱ्यामुळे थंडी ही वाढली. माझ्याकडे छत्री आणि स्वेटर दोन्ही असल्याने मी पावसाचा आनन्द घेत मजेत चालत होते. तेवढ्यात माझ्या अगदी जवळ एक गाडी येऊन थांबली. इतक्या जवळ थांबलेली गाडी बघून मी थोडी घाबरलेच पण गाडीचा नंबर बघताच मात्र रिलॅक्स झाले. पावसाचा जोर वाढलेला बघून माझी मुलगी मला न्यायला आली होती. मुलीला आपली एवढी काळजी आहे हे बघून छानच वाटलं पण मानवी मनाला निखळ आनंद घेताच येत नाही.एवढे दिवस आपण तिची कळजी घेत होतो , आता ती आपली घेतेय ह्या रिव्हर्स पेरेंटहुडच्या विचाराने थोडं उदास ही वाटलच.
हेमा वेलणकर

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...