लेखिका : सुकेशा सातवळेकर
जरी तुम्ही एरवी घरी आहाराचं संतुलन काटेकोरपणे सांभाळत असलात, तरी प्रवासात थोडीशी सूट घेऊन खाण्यापिण्याचा अमर्याद आनंद अनुभवण्याचा मोह नक्कीच होईल, आणि त्यात गैरही काही नाही. प्रवासात खाणंपिणं सांभाळलं, पोटाचं आरोग्य जपलं की नक्कीच भटकंतीची मनसोक्त मजा अनुभवायला मिळेल!
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया !!
दोन-तीन वर्षांच्या विरामानंतर ट्रीपला जायचं आणि तेही ट्रेननं
म्हटल्यावर मुलं खूपच खूश होती. मामाच्या गावाला नाही, पण मामाबरोबर
भटकंतीचा प्लॅन ठरला होता. मुलंच काय, घरातल्या सगळ्यांच्याच उत्साहाला
उधाण आलं होतं. काय आणि किती तयारी करू असं झालं होतं सगळ्यांना!
स्वयंपाकघरातही लगबग सुरू होती. ‘ट्रीपमध्ये मुलांना खायला च्यांव म्यांव
आणि मोठ्यांनाही लागतंच की काहीतरी अधूनमधून तोंडात टाकायला,’ असं म्हणत
बरेच पदार्थ करून झाले. सारखं बाहेरचं तरी किती खायचं? खाऊच्या पिशव्या
बघून सामान उचलण्याआधीच घामही फुटला!
खरंच, रोजच्या रामरगाड्यातून बाहेर पडून भटकंतीचा आनंद घेण्यासारखं
दुसरं सुख नाही! आपल्या घरात, आपल्या शहरात कधीच अनुभवता येणार नाहीत असे
क्षण पर्यटनातून गवसतात. पर्यटनाचा मुख्य हेतू जरी नवनवीन प्रदेश पाहणं,
सृष्टी सौंदर्य बघणं हा असला तरी त्या त्या प्रांतातील खास पदार्थ चाखणं
हेही प्रवासामागचं एक ध्येय असू शकतं. कोकणात गेलं की गरमागरम अंबोळ्या आणि
उसळ किंवा चटणी, तसंच उकडीचे मोदक तुमची वाट बघत असतात. इंदोरला ५६ दुकान
आणि सराफ्याकडे मोर्चा वळतोच; भूट्टे का कीस, इंदोरी पोहे आणि पकवानचे
विविध प्रकार न खाता तुम्ही निघूच शकत नाही. कलकत्त्यात बंगाली मिठाई,
रोशोगुल्ले आणि मिष्टी दोईचा मोह आवरणं अवघडच जातं, हो ना?
जरी तुम्ही एरवी घरी आहाराचं संतुलन काटेकोरपणे सांभाळत असलात, तरी
प्रवासात थोडीशी सूट घेऊन खाण्यापिण्याचा अमर्याद आनंद अनुभवण्याचा मोह
नक्कीच होईल, आणि त्यात गैरही काही नाही. पण जर अति प्रमाणात खाणं झालं तर
परत आल्यावर वजनाचा काटा विश्वास बसणार नाही असा आकडा दाखवेल. तेव्हा
लक्षात ठेवा, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्’! सगळं खा, पण प्रमाणात खा! ट्रीपला
निघण्याआधी थोडं संशोधन करून त्या प्रांतातील खास पदार्थांची यादी तयार
करा, जे तुम्हाला खायचेच आहेत. म्हणजे आरोग्यास हानिकारक पदार्थ नको इतक्या
प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत. काही हेल्दी पदार्थ खायला पोटात जागा उरेल.
जेव्हा तुम्ही ट्रीपला जाता तेव्हा तुमचं ‘डाएट’ही सुटीवर जातं का?
बरेचजण सुटीचा वापर जड पदार्थ खाण्यासाठी करतात, जे एरवी खाल्ले जात नाहीत.
प्रवासात भरपूर मोकळा वेळ मिळतो आणि अधूनमधून सारखी भूक लागल्यासारखं
होतं. रस्त्यावरचे खाण्याचे स्टॉल, नाहीतर फूड जॉइंटकडे कधी मोर्चा वळला
कळतही नाही. बाहेरचं खायचंच झालं, तर विचारपूर्वक पदार्थ निवडा आणि थोड्या
प्रमाणातच खा. जिभेचे चोचले पुरवताना ‘संयम’ हा मंत्र लक्षात ठेवा.
घरून निघताना बरोबर काही हेल्दी पदार्थ पॅक करून घेतले असले तर सारखं
बाहेर खायची वेळ येणार नाही. काहीवेळा ट्रीपच्या ठिकाणी कुठे फिरण्यासाठी
गेल्यावर तिथे खायची सोय नसते, खाण्याचे कोणतेच पदार्थ उपलब्ध होत नाहीत.
अशावेळी घरून नेलेल्या पदार्थांचा खूप उपयोग होईल.
घरून काय काय नेता येईल?
कोरडा खाऊ
छोट्या छोट्या पाकिटांमध्ये चणेफुटाणे, खारे दाणे, सुकामेवा, नट्स नेता
येतील. राजगिरा वड्या, लाडू किंवा बार नेऊ शकता. चिक्की, एनर्जी बार किंवा
प्रोटीन बार उत्तम पोषण करतील. तिखटामिठाचं काही हवं असेल तर पोह्यांचा
चिवडा, फोडणीच्या लाह्या, भडंग किंवा पॉपकॉर्न न्यावेत. चना जोर गरम
सगळ्यांना आवडेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे नेऊ शकता. हल्ली मिनी खाकरेही
मिळतात. हे सगळे पदार्थ हेल्दी आणि टिकाऊ आहेत.
छोट्या भुकेसाठी पदार्थ
भाज्यांचे ठेपले, पराठे किंवा धपाटे. फ्रँकी, रोल किंवा रॅप. मेथी पुरी
किंवा पालक पुरी. मठरी. बेसन लाडू किंवा कणकेचे लाडू. गाजर, काकडी आणि
सफरचंद, पेरू, बोरं, संत्री अशी ताजी फळं पोषणाबरोबरच ताजंतवानं राहायला
मदत करतील.
ट्रीपला कारनं, बसनं, ट्रेननं, बोटीनं का विमानानं जाताय त्यानुसार
बरोबर कुठले पदार्थ न्यायचे, कुठचे पदार्थ टिकतील याचा विचार करून ठरवा.
शक्यतो रूम टेंपरेचरला टिकतील असे पदार्थ न्यावेत. कारनं जात असाल तर
उष्णतेनं खराब होणारे पदार्थ डिकीत न ठेवता कारमध्ये एसी सुरू करून आतच
ठेवा. विमानानं जात असाल तर सिक्युरिटी चेकमधून कुठचे पदार्थ पार पडतील ते
लक्षात घ्या. केबिन लगेजमध्ये आणि चेक इन बॅगमध्ये कोणते पदार्थ चालत नाहीत
ते माहीत करून घ्या. ट्रीपच्या आनंदावर विरजण पडणार नाही याची काळजी घ्या.
दही किंवा पिनट बटर बाटलीतून न्यायला बंदी आहे. असे पदार्थ जर खायचे
असतील, तर विमानतळावर किंवा विमान सुटायच्या आधीच संपवून टाका.
ट्रीपमध्ये जर शक्य असेल तर थोडेफार पदार्थ आपलेआपण शिजवून खाता येतील.
गोव्यासारख्या पर्यटन स्थळी छोटं अपार्टमेंट दोन-चार दिवसांसाठी भाड्यानं
मिळतात. तिथं छोटं स्वयंपाकघर असतं. फ्रीज, गॅस स्टोव्ह किंवा हॉट प्लेट
किंवा इंडक्शन कुक टॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन असतो. थोडीफार भांडी असतात.
घरून थोडी तयारी, कोरडं सामान न्यावं. त्या त्या गावातील मार्केटमधून
ताज्या भाज्या, फळं, दूध, अंडी आणून तयार करायला सोपे ताजे पदार्थ शिजवता
येतील. रेडी टू कुक उपमा, पोहे, शिरा, मूग डाळ खिचडी, पुलावची पाकिटं
ट्रीपला निघण्याआधी घरूनच तयार करून न्यावीत किंवा विकतही मिळतील. जिथं गॅस
किंवा शिजवायची सोय नसेल तिथे इलेक्ट्रिक केटल नेता येईल. या केटलमध्ये
चहा, कॉफी करता येते. अंडी उकडता येतात. भाज्या, दलिया, ओट्स शिजवता येतं.
ट्रेकिंगला किंवा कँपिंगला गेलात तर मस्तपैकी चुलीवर स्वयंपाक करण्याची मजा
घेता येईल. ट्रीप ठरवतानाच थोडं प्लॅनिंग मात्र करायला लागेल.
ट्रीपमध्येही सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. खोलीमधून बाहेर
पडायच्या आधी व्यवस्थित नाश्ता करावा. म्हणजे बाहेर पडल्यावर खूप भूक लागून
जे समोर येईल ते खाल्लं जाणार नाही. दिवसभराच्या भटकंतीसाठी पुरेशा
ऊर्जेचा साठा केला जाईल. शक्य होईल तेवढा, भरपूर फायबरयुक्त नाश्ता करा.
म्हणजे सावकाश पचन होईल, पोट बराच काळ भरलेलं राहील.
आता थोडं जंतुसंसर्ग आणि स्वच्छतेबद्दल! ट्रीपमध्ये पाणी पिताना किंवा
काहीही खाताना जंतूंची लागण होणार नाही याची खात्री करायला हवी. निर्जंतुक
केलेलंच पाणी प्यावं. आपल्या डोळ्यांसमोर शिजवलेले, उकळवलेले किंवा भाजलेले
पदार्थ खावेत. अन्नपदार्थ ताजे आहेत ना याची खात्री करून घ्या. फ्रुट
प्लेट, सलाड किंवा कोशिंबिरीसारखे कच्चे पदार्थ धोकादायक असू शकतात. कारण
ते शिळे, हाताळलेले असू शकतात. काहीही खाण्यापिण्याआधी हात आणि तोंड स्वच्छ
धुवावे. खाऊन झाल्यावरही खळखळून चुळा भरून तोंड स्वच्छ धुवायलाच हवं.
खाण्यापिण्याच्या वेळा शक्यतो ठरावीक ठेवा, तर अन्नाचं पचन व्यवस्थित
होईल. पदार्थ निवडताना शक्यतो पचायला हलके पदार्थ निवडा. कारण प्रवासात
आधीच अनेक प्रकारच्या तणावांचा सामना करावा लागतो, ज्यांचा पचनावर परिणाम
होतो. प्रवासात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं. ट्रीपसाठी ज्या प्रदेशात
जाल, तेथील हवामानानुसार प्यायच्या पाण्याचं प्रमाण कमीजास्त करायला हवं.
थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं पाणी प्यावं.
प्रवासात खाणंपिणं सांभाळलं, पोटाचं आरोग्य जपलं की नक्कीच भटकंतीची मनसोक्त मजा अनुभवायला मिळेल!
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.