https://www.facebook.com/search/top?q=vidarbha%20darshan
दहा बाजूंनी प्रवेश असणारी बारव, शिरपूर, वाशिम
महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ, चंद्रपूर
महाकाली मंदिरापासून अवघ्या २ किमी अंतरावर अजून एक अभूतपूर्व गोष्ट आहे. ती म्हणजे भिवापूर वार्ड येथे ४०० वर्ष पुरातन देवीची २६ फुट लांब आणि १८ फुट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंड असलेली दुर्गादेवीची मूर्ती. या मूर्तीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे कि देवी दशभुजाधारी असून प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंड असलेली या प्रकारातील दुर्गादेवीची मूर्ती क्वचितच कुठे बघावयास मिळते. या मूर्तीला दहा तोंड असल्यामुळे अनेक लोक या मूर्तीस लंकापती रावण समजून विजयादशमीला दगड मारुन आपला प्रतिकारक व्यक्त करत असत. त्यामुळे मुर्ती थोड्या प्रमाणात विद्रूप झाली. कालांतराने या मूर्तीची ओळख होऊन हा गैरसमज दुर झाला आणि हि परंपरा बंद झाली.
गोंड राजवटीतील अनेक किल्ले मंदिरे, इत्यादीपासून प्रेरणा घेऊन १६व्या शतकातच्या दरम्यान बाबुपेठ येथे राहणाऱ्या रायप्पा वैश्य यानी भव्य शिव मंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तीची निर्मिती केली या मूर्तीखेरीज मत्स्यावत, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, हत्ती, शेषनाग, गरुड इत्यादी मूर्ती देखील तयार केल्या. मात्र हे शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतांनाच रायप्पा वैश्य याचा मृत्यू झाला आणि हे देवालयाचे काम कायमचे अधुरे राहिले म्हणूनच या मंदिराला "अपुर्ण देवालय" असे म्हणतात. उन वारा पाउस यांच्याशी दोन हात करत ४०० वर्ष उलटूनही ही विशाल दुर्गामूर्ती आपलं अस्तित्व टिकवून आहे. नागपूर पुरातत्त्व विभागाने या मूर्तीचे वैशिष्ट्य लक्ष्यात घेता या मूर्तीची प्रतिकृती तयार करून मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली आहे.
(माहिती - विशाल देवकर)
अमरावती जिल्ह्यातील मुख्य शहरापासून अवघ्या 14 किमी वर असलेला खोरगडे यांचा सावरखेड वाडा !!
दहा बाजूंनी प्रवेश असणारी बारव, शिरपूर, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थान मंदिर परिसरातील ही वैशिष्ट्यपूर्ण बारव आहे. या दुर्मीळ अशा बारवेला आत उतरण्यासाठी दहा प्रवेश मार्ग आहेत.
अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर, शिरपूर, वाशिम
पंथवादामुळे मागील ४२ वर्षांपासून शिरपूर (जैन) येथील भगवान पार्श्वनाथ जी हे मंदिर बंद होते. सुंदर, क्रुष्णवर्णीय, शिर्षावर सप्तफणावली नी सुशोभित, अर्धपद्ममासनातील, विलोभनीय मुर्तीचे आपल्याला दर्शन घ्यायचे असेल तर बंद गर्भगृहाच्या एका खिडकीवजा झरोक्यातून घ्यावे लागत असे पण आता प्रतिक्षा संपली आहे. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर खुले करण्यात आले आहे. आणि अखेर ४२ वर्षांपासून बंद असलेल्या मंदिराच्या दरवाज्याच्या कुलुप साखळ्या गळून पडल्या आहेत.
आणि आत दिसले ते भव्य पुरातन काळ्या पाषाणातील मंदिर. भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांची विलोभनीय मन मोहून टाकणारी प्रतिमा. आणि बरेच अवशेष आणि पुरातन मुर्त्या. अंतरिक्ष यासाठी म्हटले जाते की मुर्ती एक इंच हवेत स्थिरावलेली आहे.
दंतकथा आहे की एलिचपुर चा राजा श्रीपाल (एल्लुक/ईल) याला नदी किनारी ही मुर्ती मिळाली. मुर्ती अचल, जड होती की जागची हलेना राज्याने मनोभावे प्रार्थना, पुजा केल्यानंतर तेथून त्याच्या राजधानीत नेण्याची परवानगी मिळाली पण अट एकच होती की मागे वळून पाहायचे नाही. राजा ईल बैलगाडी चे सारथ्य करत होता पण शिरपुर जवळ येताच त्याला संभ्रम निर्माण झाली की गाडी वजनाने हलकी वाटतेय, मुर्ती रस्त्याने तर नाही पडली? राजाने वळून मागे पाहाताच मुर्ती शिरपूरला स्थीरावली.
चालुक्य नरेश जयसिंह च्या ताम्रपटानुसार ई.स. ४४८ येथे भुमी दान केली आहे. तसा संस्कृत मधील एक शिलालेख संवत १३३४ मधील या मंदीरात आहे. सद्यस्थितीत असलेल्या जिनालयाची निर्मिती ई.स. ७७६ पृथ्वी निर्गुन्दराज ची पत्नी कुंदाची ने केली आहे.
सतराव्या शतकाच्या ऊत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची संरक्षणाची जबाबदारी सरदार पोलकर यांच्यावर सोपवली होती. उत्खननात पुष्कळ जैन देवतांच्या मुर्ती सापडल्या आहेत.
माहिती - वर्षा मिश्रा
(Photo - Hrutik Bhalerao, Pratik Jain)
मुळ महाराष्ट्रीय मराठी दिगंबर जैनांचे हे मंदिर गुजराती श्वेतंबरी हडपण्याचा प्रयत्न करत आहे
आपले धर्म बंधु म्हंणुन श्वेतांबर पंथीयाना मंदिरात दर्शन पुजन करायला दिले तर त्यांनी मुर्तीचे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न केला आहे
वाशिम जिल्ह्यातील म्हसणी हे गाव अगदी टेकडीच्या तळाशी वसलेलं आहे जेमतेम लोकसंख्या दोन हजार या गावाचे इ.स १८८१ साली पुनर्वसन झाले आहे, गावाच्या पूर्वेस श्री बसवेश्वर महादेवाचे प्राचीन हेमांडपंथी मंदीर आहे. यात महादेव ज्योतिर्लिंग, नंदी बैल, अकरा ज्योतिर्लिंग आहेत. गावात दरवर्षी कार्तिक महिन्यात सकाळी ४ वा. काकडा आरती होते, गावातून पंधरा दिवस दींडी काढली जाते, यामध्ये गावातील सर्व भाविक भक्त, लहान मुलांपासून ते बुजुर्ग भाविक भक्त सामिल होतात, स्त्रिया आपल्या घरासमोर मोठ्या उत्साहाने रांगोळी काढतात. आणि कार्तिक समाप्तीला यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
पिपलडोल/पिपलडोह किल्ला, वसाली, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ला. हा किल्ला अंबाबरवा वन्यजीव अभयारण्यात एका उंच डोंगरावर स्थित आहे. दाट जंगल, वन्य पशू आणि अती दुर्गम रस्ता यामुळे येथे कोणी फिरकत नाही. या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही परंतु गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा किल्ला सिताबखाँ नावाच्या एका भिल्ल राजाने बांधला होता. किल्ला उंच ठिकाणी असल्यामुळे राज्यावर लक्ष ठेवणे आणि शत्रू कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हे ठिकाण उत्तम होते. सध्या किल्ल्याचे दोन प्रवेशद्वार आणि एक दोन ढासळलेले बुरुज इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्यावर दगडी पाषाणात बांधलेले पाण्याचे हौद आणि तलाव आहेत. येथे खूप पिंपळाची झाडे आहेत त्यामुळेच किल्ल्याचे नाव पिपलडोह पडले असावे.
ऐतिहासिक गढी, कठोरा, शेगाव, बुलढाणा
पुरातन शिव मंदिर, अंत्री खेडेकर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे हे पुरातन शिवालय आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात आहे परंतु मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे त्याचे पुरातन स्वरूप झाकले गेले आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे येथे दोन लिंगी शिवलिंग आहे.
पुरातन शिव मंदिर, माळशेंबा, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील माळशेंबा आणि पळसखेड भाट या दोन गावाच्या सिमेवर एका जंगलात हे मंदिर स्थित आहे. मंदिर पुरातन असून बांधकाम हेमाडपंथी शैलीत आहे. या भागाला तपोवन म्हणून ओळखले जाते. पुरातन काळात हे ठिकाण ऋषी मुनींचे तपश्चर्या करण्याचे ठिकाण असावे.
दक्षेश्वर मंदिर, लाडखेड, यवतमाळ
यवतमाळ दारव्हा रोड वर लाडखेड नावाचे छोटे गांव आहे. लाडखेड बसस्टॉप पासून डाव्याबाजूला गावाच्या बाहेर साधारणतः 1.5 कि.मी. अंतरावर दक्षेश्वराचे (महादेवाचे) चालुक्यकालीन तथा हेमांडपंथी मंदिर आहे. श्रावण सोमावार किंवा महाशिवरात्रीला येथे यात्रेचे स्वरूप असते. इतर दिवशी येथे गर्दी नसते. दक्षेश्वर देवालय-खांबावरील शिल्पे अत्यंत कोरीव आणि सुंदर आहेत. देवालयाच्या बाहेरील वीरगळ आणि सतीचा हात आहे.
मंदिराराच्या शेजारी अंदाजे नऊशे वर्षांपूर्वीची ही पुष्करणी म्हणजे बारव आहे. पायऱ्या असलेल्या विहिरीला मराठीत बारव म्हणतात. संस्कृत भाषेत पुष्करणी तसेच प्राकृत मध्ये पोखरणी या नावाने संबोधल्या जाणाऱ्या या विहिरी जल संचयाच्या दृष्टीने तर महत्वाच्या होत्याच,परंतु धार्मिक स्थळी त्यांचा वापर संप्रदायांच्या प्रवेशाच्या होणाऱ्या दिक्षाविधीकरिता होत असे. लाडखेड मधील ही पुष्करणी श्रीचक्र किंवा श्रीयंत्र या आकाराची आहे. हे शक्ती म्हणजे देवीचे प्रतिक आहे.
नयनरम्य, निसर्गरम्य गडचिरोली 
ठिकाण - पेठा, ऐटापल्ली, गडचिरोली
गोंदियाचा प्रतापगड
विदर्भामध्ये काही उल्लेखनीय किल्ले आहेत यातील काही डोंगरी किल्ले असून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा सुद्धा एक वनदुर्ग आहे.
● भौगोलिक स्थान :
विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यात दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका आहे. गोंदिया रेल्वे मार्गानी जोडलेले आहे. गोंदिया-सडक अर्जुनी-अर्जुनी मोरगाव असा गाडी रस्ता आहे. हा गाडी रस्ता नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव बांध अभयारण्य प्रसिद्धच आहे. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकाच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिद्ध आहे.
● जाण्यासाठी मार्ग :
नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. ही रांग प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग हा पूर्वेकडून आहे. पूर्व पायथ्यापर्यंत गाडीमार्गाने पोहोचता येते. प्रतापगडाच्या पूर्व पायथ्याच्या पठारावर दर्गा आहे. दर्ग्याजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. दर्ग्याजवळच किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात. येथील मार्ग हा दोन्हीकडून तटबंदीने बंदिस्त केलेला दिसतो. ही तटबंदी रचीव दगडांची आहे. या मार्गावर सर्वत्र पडापड झालेली आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी या मार्गाच्या उजवीकडून दगडधोंड्यामधून एक नवी वाट तयार झाली आहे.
● घडण व पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्याची चढाई पायथ्यापासून २०० मीटर आहे. या जंगलात किलोमिटरभर चालत कड्याच्या पायर्थ्याला येता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात.
या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरु करावी. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे कडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा एका माचीचाच भाग असून तो रचिव तटबंदीने सरंक्षीत केलेलो आहे. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अस्वले खूप आहेत. अस्वल हा जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णत: वेढलेली आहे. या जंगलात पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात.
या कबरीपासून डावीकडील तटबंदीकडे पायऱ्या गेलेल्या आहेत. बुरुजाच्या बाजूने पडक्या तटबंदीमधून गडप्रवेश करावा लागतो. डावीकडील वाटेने मोठ्या तलावाजवळून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाता येत.माथ्यावर काही चौथरे पडलेले असून ते एका तटबंदीने वढलेले आहेत. पश्चिम कड्यावरुन दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. पश्चिमेकडील माचीचे उत्तम दर्शन येथून होते. कड्याच्या कडेकडेने उत्तर बाजूच्या कड्यावर येता येते.
येथे अनेक नैसर्गिक गुहा असून वन्य श्वापदांचा वावरही आढळतो. येथे खाली तळघर आहे. येथून एक वाट खालच्या पश्चिम माचीवर जाते. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी बेसाऊ झालेला आहे.
गजलक्ष्मी प्रवेशद्वार, भटाळा, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या ऐतिहासिक गावात हे प्राचीन प्रवेशद्वार स्थित आहे. ज्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे. हे प्रवेशद्वार राजा जगदेव परमार यांच्या किल्ल्याचे होते असे सांगण्यात येते. किल्ला नष्ट झाला असून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार म्हणून या द्वाराचा उपयोग केला जातो.
दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
ही
मूर्ती दुर्गासप्तशतीतील मुळचंडीका महालक्ष्मी आहे. ती विष्नुपत्नी
महालक्ष्मी नाही. त्या मूर्तीत तीन शिव प्रतिमा आहेत. आणि सप्त/अष्ट
मात्रिका पण आहेत.
पुरातन जगदंबा माता मंदिर, पुसद, यवतमाळ
खोलेश्वर मंदिर, पुसद, यवतमाळ
मल्लिकार्जुन मंदिर, मलगी, बुलढाणा
बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यातील मलगी चे प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर. हे मंदिर अतिशय पुरातन असून काळ्या पाषाणातील हेमाडपंती शैलीतील आहे जे साधारण 12 व्या शतकातील वाटते. मंदिरात पुरातनं शिवलिंग आहे मंदिरात प्रवेश करतानाच बाहेर सुंदर बारव आहे, मंदिराच्या आवारात मंदिराचे अनेक भग्न शिल्प तुम्हाला दिसतील.
मल्लिकार्जुन मंदिर, दिग्रस, यवतमाळ
दिग्रस येथून वाहणाऱ्या दवंडा नदीच्या काठावर मल्लिकार्जुन महादेव संस्थान या नावाने प्रसिद्ध असलेले शिवाचे प्राचीन मंदिर आहे. काळ्या पाषाणातील बांधकाम असलेले हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. मंदिराच्या शेजारी ब्रह्मानंद स्वामींचे मंदिर आहे. त्यांचे अनुयायी डिसेंबर महिन्यात त्यांच्या जयंतीनिमित्त जमतात. हे 7 दिवस चालते आणि पालखी (मिरवणूक) सह समाप्त होते.
जगदंबा देवी मंदिर, नागरतास, वाशिम
मालेगांव तालुक्यातील नागरतास परिसरातील शेत नागरतांना दशरुजी घुमशे यांना 500 वर्षांपूर्वी जगदंबा देवीची काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती नागराच्या तासामध्ये सापडली होती. त्यांनी गांवाच्या ईशान्येला मंदिर बांधून जगदंबा देवी मूर्तीची स्थापना केली. नागराच्या तासामध्ये मुर्ती सापडल्या मुळे गावाचे नाव नागरतास असे पडले. या मंदिरात नियमित विविध धार्मिक उपक्रम राबविले जात असतात.
पुरातन सुर्य मुर्ती, भद्रावती, चंद्रपूर
पुरातन शिव मंदिर, डोमरुळ, ता. + जि. बुलढाणा
लिंगेश्वर मंदिर, लिंगा (देवखेड), बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात पुर्णा नदीच्या तीरावर असलेल्या लिंगा या छोट्याश्या गावात हे पुरातन लिंगेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील दिसून येते. मंदिराचा काही वर्षांपूर्वीच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. येथे एक पुरातन बारव होती जी बुजविण्यात आली आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्र येथे उत्साहात साजरी केली जाते.
पुरातन शिव मंदिर, देऊळवाडा, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेले देऊळवाडा गाव. येथे एका टेकडीच्या पायथ्याशी पुरातन शिव मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील असावे. मंदिराचे फक्त गर्भगृह अस्तित्वात आहे. सभागृह काळाच्या ओघात नष्ट झाला असावा. सध्या सिमेंट बांधकाम केलेला नवीन सभामंडप समोर बांधलेला आहे. येथे पुरातन गणेश प्रतिमा, नृसिंह प्रतिमा आणि इतर स्त्री प्रतिमा दिसून येतात.
टेकडीच्या वर आणखी एक भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. नामशेष झालेला देऊळवाड्याचा किल्ला आहे आणि बर्याच लेण्या कोरलेल्या आहेत. त्यामुळेच या टेकडीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. इतिहासाची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी या टेकडीला भेट द्यायलाच हवी.
राजेश्वर मंदिर, राजेगाव, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव येथील पुरातन शिव मंदिर राजेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. मंदिराचे बांधकाम बाराव्या शतकातील दिसून येते. रंगरंगोटी आणि टाईल्समुळे मंदिराचे काळ्या पाषाणातील सौंदर्य झाकले गेले आहे. कळस आणि समोरील सभागृह बांधकाम अलीकडील आहे.
भ्रुशुंड गणेश, मेंढा, भंडारा
प्राचीन स्थंडिलग्राम नावाने प्रसिद्ध असलेल्या मेंढा या गावी वैनगंगा नदीच्या तीरावर विदर्भातील अष्टविनायकांपैकी हा गणपती वसलेला आहे. या गणपतीला भृषुंड विनायक हे नाव कसे मिळाले. याबद्दल एक सुंदर कथा आपल्याला गणेशपुराणात मिळते. मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची मोठी भव्य असून, ती सव्यललितासनात बसलेली आहे. पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून, एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी भरलेले पात्र दिसते. मूर्तीच्या डोक्यावर पाच फण्यांचा नाग शिल्पित केलेला दिसतो. मंदिराच्या आवारात एका चौथऱ्यावर अंदाजे आठ फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे.
कपिलेश्वर मंदिर, सातेफळ, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील सातेफळ हे छोटे गाव. येथे दोन पुरातन मंदिर अस्तित्वात आहे. कपिलेश्वर मंदिरात गाभारा, सभामंडप आणि नवीन बांधकाम असलेला सभागृह आहे. गाभाऱ्यात एक अत्यंत सभ्य आणि प्रमाणित मुरलीधर मूर्ती आहे. यादवकालीन वास्तुकलेचा या उत्कृष्ट नमुना असलेले एक घुमटाकार छत आहे ज्यामध्ये कृष्णाचे प्रतिनिधित्व करणारे चित्र गोपी आणि गुरांसमवेत बासरी वाजवत आहेत. मंदिराचे शिखर उत्तम प्रकारे जतन केले गेले आहेत.
(Photo - Rahul Deshmukh)
कोंडेश्वर मंदिर, कोंडाळा झामरे, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे निसर्गरम्य परिसरात वसलेले पुरातन कोंडेश्वर शिवालय. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून रंगकाम केल्यामुळे ते दिसून येत नाही. मंदिरात दोन नंदी आहेत. मंदिराशेजारी आणखी एक पुरातन मंदिर आहे ते नरकेश्वर म्हणून ओळखतात. मंदिराच्या समोर एक भव्य बारव आहे. मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक गोलाकार बारव आहे.
जगदंबादेवी शांती उत्सव, (मोठी देवी) खामगाव, बुलढाणा
संपूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी म्हणजेच बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील अनेक वर्षापासून जगदंबेचा शांतीउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, जगदंबा उत्सव ची सुरवात कोजागिरी पासून केली जाते. देवीच्या उत्सवाची सुरुवात १६०८ मध्ये सुरु झाली, नवराञात नऊ दिवस दैत्यांशी युध्द केल्यानंतर तिचा क्रोध शांत हाण्यासाठी हा शांतीउत्सव, या देवीला मोठी देवी देखिल म्हणतात. क्रोधा मुळे चेहरा लाल रक्तवर्ण आहे. देवीचे मुळ ठाणे तेलंगणा मध्ये बोधन येथे आहे. पण आई चे भक्त खामगाव ला स्थायिक झाले. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रांनंतर जगदंबा देवी शांती उत्सव १० ते १२ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
कोंडेश्वर मंदिर, वनवारला, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील वनवारला येथील पुरातन शिव मंदिर. हे मंदिर पुस नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. मंदिर अतिशय प्राचीन असून येथे प्रभु श्रीरामांनी भेट दिली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. जवळच सतत वाहणारा गोमुख कुंड आहे. पुस नदीच्या पात्रात असंख्य नैसर्गिक कुंड देखील आहेत. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे भक्तांची वर्दळ असते.
विदर्भातील भुलाबाई उत्सव
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा!!
आज म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला विदर्भात घरोघरी भुलाबाई आणि भुलोजी राणा/ भुलजा यांची पूजा होते. विशेषकरून शेतकऱ्यांसाठी आणि मुलींसाठी हा भुलाबाईचा सण मोठा आनंदाचा असतो. गणपती विसर्जनानंतर घरोघरी भुलाबाईंची स्थापना होते. (भुलाबाई म्हणजे पार्वतीचेच रूप आणि तिचे पती भुलोजी राणा म्हणजे भोळा सांब- शंकर) भुलाबाई म्हणजे माहेरवाशिणीचे रूप भाद्रपद पौर्णिमेला तिचे आगमन होते ते आजच्या आश्विन/ शरद पौर्णिमेपर्यंत ती लाड करू घेते.
या भुलाबाईसमोर रोज संध्याकाळी 16 वर्षांपर्यंतच्या मुली फेर धरू पारंपरिक गाणी म्हणतात. (ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात भोंडला/ हादगा असतो, तशीच गाणी) भुलाबाईची गाणी म्हणत असताना कुणाचं घर कुठल्या जातीचं आहे, हे सगळे भेद गळून पडतात. त्यामुळेच भुलाबाईचा उत्सव हा सर्व जाती-धर्मातील लहान मुलींचा उत्सव म्हणून आवडीचा आहे. भुलाबाईची गाणी ही तर अमूल्य असा लोकगीतांचा ठेवाच आहे. भुलाबाईच्या गाण्यातून यथार्थ लोकजीवन रेखाटलेलं जाणवतं. पूर्वीच्या काळी असणारं सासरपण आणि माहेरपण हे भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होतं. सून म्हणून मुलींवर असणाऱ्या अतिरेकी जबाबदाऱ्या सांभाळताना सुनेची होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.
उदा. कारल्याचं बी पेर गं सूनबाई,
मग जा आपल्या माहेरा माहेरा किंवा
यादवराया राणी रूसून बसली कैसी किंवा
नणंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
गाण्याचा कार्यक्रम संपला की आलेल्या मुलींना खिरापत म्हणजे खाऊ मिळतो पण तो खाऊ ओळखायचा असतो. जी मुलगी खिरापत ओळखेल तिचे कौतुक होते आणि ही खिरापत ओळखताना मजाही येते. शेवटी
बाणाबाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा.
असे गाणे म्हणून खिरापत आणायला सांगितले जाते.
आजच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. महिनाभर स्थापलेल्या भुलाबाईची कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबाई-भुलोजी-गणपती यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांडय़ांची खोपडी (निवारा) बनवून पूजा केली जाते. या खोपडीला माळी म्हणतात. जिराईत शेतकरी ज्वारीच्या कणसांची खोपडी करतात तर बागाईत शेतकरी ही उसाच्या पाच खोडांची खोपडी करतात. तिला माळी असेही म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या डोक्यावर ही 'माळी' हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन आलेल्या ज्वारीच्या भरलेल्या कणसांची, कणसातील ज्वारीच्या दाण्यांची पूजा करून शेतकरी त्या धान्याचे स्वागत करतात. घरातील अन्न- धान्य- धनलक्ष्मीचे स्वागत म्हणजे म्हणजेच भुलाबाईचा उत्सव. याला काहीजण माळी पौर्णिमा असेही म्हणतात.
शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरीला तर मुलींना एका महिन्याचा खाऊ म्हणजे ३१ दिवसांचा खाऊ (खिरापत) एकाच दिवशी मिळतो. आज भुलाबाईंना 31 प्रकारच्या खिरापतींचा (खाऊंचा) नैवेद्य दिला जातो. त्यामुळे लहान मुलींना, महिलांना आणि सगळ्यांनाच या दिवशी खाऊंची खिरापतीची मोठीच मेजवानी मिळते. शिवाय या घरगुती खिरापती पौष्टिक आणि सकसही असतात. या खिरापतींमध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, बरबटीची उसळ, हरभऱ्याची उसळ, पालक पुऱ्या, सांभार वडी, कचोरी, शेंगदाणा चिक्की, विविध पौष्टिक पक्वान्ने किंवा मग फरसाण, चिवडा, चकली, लाडू, पेढा इत्यादी खिरापतींची खाऊंची अगदी चंगळ असते. शिवाय कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास सुकामेवा घालून आटवलेल्या मसाला दुधाचाही प्रसाद असतो.
आता कालपरत्वे महिनाभर भुलाबाईचा उत्सव साजरा होत नसला तरी किमान दसऱ्यानंतर 5 दिवस किंवा फक्त कोजागिरीच्या दिवशी तरी भुलाबाईची गाणी म्हणत, खिरापती ओळखत हा नवधान्याचा आणि माहेरवाशिणीच्या लाडा- कोडाचा उत्सव साजरा केला जातो. यासाठी भुलाबाई आणि भुलोजींच्या मूर्ती बाजारात विकत मिळतात. पण भुलाबाईच्या हाताने केलेल्या मातीच्या मूर्तीचे या सणात जास्त महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या मातीच्या भुलाबाईंचे विसर्जन होते. विदर्भासह शेजारच्या खानदेशातही हा भुलाबाईचा उत्सव आनंदात साजरा होतो.
विदर्भात
भुलाबाईचे एकमेव अंदाजे 100वर्ष जुने मंदीर भवानी पुरा आकोट येथे आहे.
तिथे आधी माती च्या मोठ्या भुलाबाईच्या मुर्त्या होत्या कालांतराने
त्याजागी सिमेंट क्राॅक्रींट च्या भुलाबाईच्या मूर्त्या बसविण्यात आल्या.
दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा?
विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..
रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..
त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.
या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.
सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.
त्या मूर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.
शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..
रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.
गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.
कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.
आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.
विदर्भातील शक्तीपीठ ५१ - शिवशक्ती मंदिर, काटा (कंटकतीर्थ), वाशिम
वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यामध्ये काटा आणि कोंडाळा ची प्राचीन तीर्थ आहेत. या तीर्थाचा उल्लेख वत्सगुल्म महात्म्य यातील 108 तिर्थांमध्ये येतो. यापैकी काटा येथून कांटेपूर्णा नदीचा उगम होतो. येथील मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी आहे. हे मंदिर गावाच्या पश्चिमेस काटेपूर्णा नदीच्या प्रवाहा जवळ आहे. हे मंदिर राजा रामदेवराव यादव याच्या काळातील आहे. हे मंदिर मंडप, अंतराल आणि गर्भगृह यात विभागलेले आहे.
मंडपास तीन द्वार आहेत. मंडपात नक्षीदार स्तंभ आहेत. त्याचे तळखडे चौरसाकृती आहेत. स्तंभभाग अष्टकोणी आहे. मधल्या चौरस भागावर नाजूक नक्षीकाम असलेला हार कोरलेला आहे. गोलाकार पटावर कुंभ प्रतीक कोरलेले आहे. करणरेषांवर सुंदर वामन मूर्ती व कीचक आहेत. त्यांनी सभामंडपाचे छत तोलून धरले आहे.
गर्भगृहात पंचमुखी शिवलिंग व माता शक्तीची प्रतिमा आहे. शिव व शक्ती एकाच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणाला शिवशक्ती मंदिर म्हणून परिसरात महात्म्य प्राप्त झाले आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ५० - जगदंबा देवी मंदिर, सव, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सव हे ठिकाण. येथे पैनगंगा नदीच्या पात्रात पुरातन जगदंबा मातेचे मंदिर होते. पण ते पुरात वाहून गेले. नंतर नदीच्या तीरावर नवीन मंदिर निर्माण करण्यात आले. आणि जगदंबा मातेच्या मुर्तीची त्यात स्थापना करण्यात आली. पुरातन हेमाडपंथी मंदिराचे स्तंभ आजही मंदिराच्या आवारात आहेत. येथे दरवर्षी यात्रा भरते.
विदर्भातील शक्तीपीठ ४९ - भवानी माता मंदिर, तळेगाव टालाटुले, वर्धा
वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात असलेल्या तळेगाव टालाटुले येथे दोन पुरातन मंदिर होते. एक गावात तळ्याकाठी शिव मंदिर आहे तर दुसरे गावाच्या बाहेर एका शेतात भवानी मातेचे मंदिर आहे. हे हेमाडपंथी शैलीत असलेले मंदिर भग्नावस्थेत होते. दहा वर्षापूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुरातन मंदिराचे अवशेष आजही मंदिराच्या परिसरात पडलेले आहेत. मंदिरात पुरातन दुर्गा मातेची तेजपुंज प्रतिमा आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ४८, कमलेश्वरी माता मंदिर, किन्ही राजा, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्ही राजा या गावाला पुरातन वारसा लाभलेला आहे. गावात पुर्वी ऐतिहासिक गढी होती ती आता नामशेष झालेली आहे. गावात प्राचीन तलाव आहे. गावात चार पुरातन मंदिर अस्तित्वात होती. भवानी माता मंदिर, महादेव मंदिर, खंडोबा मंदिर आणि केशवराज मंदिर. यापैकी महादेव मंदिर पुर्णपणे संपुष्टात आले असून त्याच जागी नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.
भवानी मातेच्या मंदिराजवळच महादेव मंदिर आहे. भवानी मंदिर म्हणजेच कमलेश्वरी मंदिर. येथील तलावात खूप कमळाची फुले असायची त्यामुळे देवीचे कमलेश्वरी असे नामकरण झाले.
विदर्भातील शक्तीपीठ ४७ - महाकाली मंदिर, बोरी, यवतमाळ
विदर्भ आणि तेलंगाना च्या सिमेवर असलेले गांव (बोरी) पाटणबोरी या गावात दोन देवीचे मंदिरे आहेत. महाकाली माता व कालिंका मंदिर. गावाबाहेरील मंदिर पुरातन आहे तर गावातील मंदिर नवीन बांधलेले आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ४६ - जगदंबा देवी मंदिर, वरझडी, यवतमाळ
वरझडीच्या देवस्थानात नवरात्र उत्सव थाटामाटात सुरु झाला आहे. वणीपासून अगदी १३ किलोमीटर अंतरावर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. वणी परिसरातील भाविकांची जगदंबा देवीवर श्रद्धा आहे. मंदिराला लागूनच गोमुख कुंड आहे.
पुरातन मंदिर, हिरवळीचा परिसर, शेजारीच खळखळ वाहणारा झरा यामुळे हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षभर लोक येथे दर्शनासाठी आणि सहलीसाठी देखील येत असतात.
विदर्भातील शक्तीपीठ ४५ - जनामाय कासामाय देवी मंदिर, वनोजा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील शक्तीपीठ म्हणजे वणोजा येथील जनामाय कासामाय मंदिर. हे मंदिर पुरातन असून एका शेतात स्थित आहे. नवरात्रात येथे दूरवरून भक्त येत असतात. मंदिराच्या मागील बाजूस पुरातन पाण्याचा कुंड आहे.
(Photo - Amit Upadhye)
विदर्भातील शक्तीपीठ ४४ - रेणुका माता, पातूर, अकोला
अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेलं गाव म्हणजे पातुर. मात्र हे गाव त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरामुळं जागृत देवस्थान अशी पातूरच्या रेणुकेची ओळख आहे. अतिशय लोभस आणि मनमोहक रूप असलेल्या रेणुकेचं हे ठिकाण डोंगरावर आहे. विश्वस्त मंडळाच्या कल्पकतेतून सध्या या मंदिर आणि परिसराचा झपाट्याने विकास सुरु आहे. नवरात्रीसह वर्षभर येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.
ऐतिहासिक महत्त्व असलेलं पातूर :
अकोला जिल्ह्यातील पातुर हे तालुक्याचे गाव आहे. याच पातुरला ‘नानासाहेबांचे पातुर’ या नावानेही ओळखले जातेय. नानासाहेब म्हणजे ‘नानासाहेब पेशवे’. या गावाचे मोठे ऐतिहासिक महत्व आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोरच्या डोंगरात लेण्या आणि भुयार आहेत. काही वर्षांपूर्वी गावात एका किल्लाही होता. या साऱ्या गोष्टी पातुरचे इतिहासासोबाताचे नाते आणि वैभवशाली संबंध सांगत आहेत.
आदिशक्तीची अनेक पीठं महाराष्ट्रात आहेत. अकोला जिल्ह्यातील देवींच्या अनेक शक्तीपीठांनी येथील अध्यात्मिक विश्व समृद्ध केलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर गावाची अध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या मंदिराने. गावाच्या बाहेर बाळापुर मार्गावर हे मंदिर आहे.
पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरुप :
येथील रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानलं जातं. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांसाठी पातुर म्हणजे जणू ‘प्रती माहूर’च आहे. याठिकाणी नवरात्रासोबतच वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. विशेष म्हणजे देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक समजल्या जाणाऱ्या चिंचोली रुद्रयानी येथील रुद्रयनी देवीचं मंदिर आणि डोंगर येथून दृष्टीक्षेपात पडतं.
या ठिकाणी आज दिसत असलेले मंदिर पहिल्यांदा पन्नास वर्षांपूर्वी दिसले. या ठिकाणी आज असलेली मूर्ती आधीच विराजमान होती. मात्र माळरान आणि जंगलाचा भाग असल्याने या ठिकाणी कुणीही येत नव्हतं. त्यातच ही टेकडी अत्तरकर यांच्या मालकीच्या शेतीचा भाग होती. या ठिकाणी आज असलेली मूर्ती एका हिवराच्या झाडाखाली विराजमान होती. त्यानंतर तात्यासाहेब अत्तरकर यांच्या कल्पकतेतून या मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाला.
याठिकाणी श्रीकृष्ण, राम-सीता-लक्ष्मण आणि दत्तात्रयाच्या तीन मंदिरांचं बांधकामही पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षांत भक्तांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मंदिराला आधी पायऱ्या नव्हत्या. त्यानंतर दगडांच्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. आता या मंदिराला 256 पक्क्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. संपूर्ण डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले असून या ठिकाणी सुंदर सुविचार लिहिण्यात आले आहेत.
मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था, भक्तनिवास यासोबतच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराजवळून बोर्डी नदी वाहते. निसर्गरम्य परिसर असलेल्या या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात. तर नवरात्रातील नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करत असल्याची भावना असल्याने येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते.
विदर्भातील शक्तीपीठ ४३ - महालक्ष्मी माता मंदिर, कोराडी, नागपूर
कोराडीची देवी ही विदर्भातील प्रसिद्ध देवी आहे. नागपूरपासून केवळ १५ कि.मी. वर असलेले हे गाव. विदर्भ व मध्यप्रदेशाच्या लोकांचे दैवत आहे. स्त्रीस्वरूपात असलेली ही देवी महालक्ष्मी म्हणून प्रचलित आहे. माहुरझरीच्या रेणुकदेवीशी ही आपलं नातं सांगणारी आहे. गोंड वंशात ज्या देवीची आराधना करण्यात येते त्यात तिचा समावेश होतो. पूर्वी हे मंदिर काळ्या दगडांच्या चिरेदार दगडांनी तत्कालीन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या गेले होते. गर्भगृह अत्यंत प्राचीन होता. पुढे सभामंडप भोसल्याच्या राजवटीत बांधल्या गेला. मूर्ती अत्यंत देखणी, सुंदर असून काळ्या पाषाणाची आहे. भाविकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांमध्ये तिची महती आहे. श्री रामदास फुलझेले जे आज पुजारी आहेत, त्यांनी सर्व ऐतिहासिक माहिती संग्रहित केली आहे. समोर तलाव असून, कमळांच्या फुलांनी ते फुललेले असते. प्राचीन असलेली ही देवी अन् तिचे स्वरुप भव्य दिव्य आहे. दिवसांतून तीन वेळा तिचे स्वरूप-रूप बदलते. आज या देवीचे भव्य दिव्य मंदिर आपणांस पाहण्यास मिळते. निसर्गसृष्टी, मंदिराचे भव्यत्व भाविकांना आकर्षित करते. - नवरात्रात हजारो भाविक विदर्भ व मध्यप्रदेशातून येत असतात. पूर्वी नवसाला पावल्यानंतर बळी प्रथा होती, पण आता ही प्रथा जवळ-जवळ बंद झाली आहे. पुर्वी सभा मंडपाच्या बाजूला दीपमाळ होती, परंतु आज ती दीपमाळ पाहायला जरी मिळत नसली, तरी मंदिराची भव्यता डोळ्यात भरणारी आहे. मंदिराचे प्रवेशद्वारही भव्य आहे. नागपुरातील सर्वश्रेष्ठ देवता म्हणून तिचे स्थान आहे. नवरात्रात तिचे रुप पाहण्याजोगे असते. अनेकांचे कुलदैवत ही अशी कोराडीची महालक्ष्मी आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ४२ - रेणुका माता मंदिर, दृग, यवतमाळ
दुर्ग गड हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात दृग येथे घनदाट जंगलात वसलेला आहे. दुर्ग किल्ला स्थानिक भाषेत दुरुग किल्ला म्हणुन ओळखला जातो. दुर्ग याच्या नावातच दुर्ग आहे. छोटेखानी डोगरात वसलेला हा वनदुर्ग. एकेकाळी घनदाट जंगल असेल हे आजही जाणवते. दुर्लक्षित ठिकाण आज आपली निशाणी पुसून टाकत आहे. कळंब पासून ७ कि.मी वर दुर्ग गड आहे. गडावर भवानी रेणुका मातेचे पुरातन मंदीर आहे. मंदिर अगदी साधेच आहे. पायथ्याशी हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरापासून गडाच्या चढाई ला सुरुवात होते. गडावर जाण्यास दगडी बांधकाम असलेल्या पायर्या आहेत. पायर्यांच्या दोन्ही बाजूस रचीव दगडी तटबंदी आहे. या गडावर गोंड राजाचे वास्तव्य होते. दुर्ग गावा पासुन २ किमी अंतरावर हा किल्ला आहे.
(Photo - Vijay Menon, Bhagwan Chile)
विदर्भातील शक्तीपीठ ४१ - रूद्रायणी देवी संस्थान, चिंचोली, अकोला
पातूर शहराच्या उत्तर-पूर्वेस अवघ्या 16 किमी अंतरावर ग्राम चिंचोली येथे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीने नटलेला आई रूद्रायणीचा गड आहे. देवीचं मंदिर उंच टेकडीच्या माथ्यावर असून वर जाण्यासाठी सिमेंट-काँक्रीटच्या पायऱ्या आहेत, पूर्वी दर्शनार्थी कच्च्या पायवाटेने गडावर चढतं असतं. दरवर्षी नवरात्रोत्सवात याठिकाणी भावीकांची गर्दी असते तसेच बैलपोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हापोळ्याला पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोडीला सजवून थेट गडावर देवीच्या दर्शनासाठी आणतात. या दोन्हीं वार्षीक उत्सवांदरम्यान संस्थानला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. गडाच्या पायथ्याशी छोटा तलाव आहे ज्यामध्ये असलेली कमळाची फुले संस्थानच्या सौंदर्यात भर पाडतात. हा परिसर सहलीसाठी उत्तम असे ठिकाण असून निसर्गप्रेमी दरवर्षी येथे आवर्जून हजेरी लावतात.
विदर्भातील शक्तीपीठ ४० - पिगंळा देवी, नेर पिंगळाई, अमरावती
श्री पिंगळादेवी संस्थान मंदिर हे एक जागृत देवस्थान असून शक्तीपिठ आहे व अनेक लोकांची कुलदेवता आहे. श्री क्षेत्र पिंगळादेवी संस्थान हे फार पुरातन मंदिर असून श्री पिंगळा मातेचे मुख्य मंदिर सुमारे ६५० ते ७०० वर्षापूर्वी बांधलेले ऐतिहासिक व जागृत देवस्थान आहे. अमरावती - मोर्शी (राज्य महामार्गावर ) अमरावतीपासून ३५ किमी अंतरावर 'गोराळा' गाव आहे, येथून दीड किमी अंतरावर टेकडीवर पिंगळाई देवी चे मंदिर आहे. 'पिंगळादेवीचा गड' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्थानाचे कृपाछात्र या विभागावर आहे. पिंगळादेवी संस्थान नेरपिंगळाई, सावरखेड व नांदुरा या तीन गावांच्या सीमारेषेवर असून पिंगळादेवी चे मंदिर नेरपिंगळाईच्या हद्दीत येते. या सिमारेशीचा दगड मुख्य प्रवेशद्वाराचे थोडे अंतरावर गाडलेला आहे. मंदिराचे सभोवताली बारा शिवाचा पसारा आहे. देवी भागवतानुसार या गडास 'सुंदरगिरी पर्वती' म्हणतात. पण आज पिंगळादेवीचा गड हेच नाव प्रचलित आहे. पिंगळा देवीची उत्पत्ती विहिरीतून झाली आहे. जुन्या लोकांच्या मानाण्यानुसार असे कळते कि पिंगळा देवी व कमळजा देवी या स्वयंभू आहेत. या देवीचा मंदिरात भवानी देवीचे मंदिर आहे. व देवळात मनाला भावून जाणारी मूर्ती आहे. व समोर मारोतीचे, मंदिर आहे. थोडे समोर गेल्यावर चढाई लागते . चढाई संपल्यावर एक भव्य राजावाडयाप्र्माने एक भिंतीचा परकोट आहे. बाजूला बेल्फुलाचे व ओटीच्या सामानाचे दुकान आहे. थोडे समोर गेले कि दोन तीन हिरवेगार मोठे वडाचे झाड आहे. समोर पुरातन मारोती चे मंदिर आहे या मंदिराला लागून एक पुरातन दीपमाळ आहे. ती दीपमाळ चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रा त लावली जाते. या मारोतीच्या मन्दिरापासून पूर्वमुखी मोठे परकोट असलेले पिंग्लादेवीचे प्रवेशद्वार आहे. प्रवेश द्वाराच्या आत गेल्यावर बाजूला फार जुने झाड आहे. थोडे समोर गेल्यावर गणपती व देवीचे मूर्ती आहे. थोडे समोर आल्यावर भैरवनाथ व होमकुंड आहे .त्या होमकुंडा पासून समोर गेल्यावर देवीच्या मंदिरात जाण्याचा दरवाजा आहे. त्या दरवाजातून गेले कि देवी च्या गाभार्यामध्ये देवीचे दर्शन होते गाभार्यामध्ये भव्य पाषाणाची शेंदूर माखलेली पिंग्लादेवी ची मूर्ती आहे हि मूर्ती अंदाजे ४ फुट उंच असून तिची गिली १० फुट व्येवढी आहे.या देवीच्या बाजूला देवीची मूर्ती आहे. मंदिरापासून १०० मीटर अंतरावर भोसलेकालीन तलाव आहे. त्याला 'कापूर तलाव' म्हणतात. हा तलाव कधीच आटला नसल्याचे भाविकांचे म्हणणे पडले. तलाव छोटेखानी असून, बाजूला भिंतीचे बाधकाम झालेले दिसून येते. तलावाच्या पाण्याचा कापूरासारखा सुगंध येतो अशी येणाऱ्या दर्शनार्थिची श्रद्धा असल्याने या तलावाला सध्याच्या काळात कापूर तलाव म्हणून ओळखल्या जाते. परंतु फेरफटका मारला असता या ऐतिहासिक तलावाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.तलावाला लागून नागेश्वर महाराजांची समाधी असून, तेथे पुरातन शिवपींड सुद्धा दिसून येते.
विदर्भातील शक्तीपीठ ३९ - बल्लाळदेवी, अमडापूर, बुलढाणा
अमडापुर हे महाभारतकालीन विराट राजाची विराटनगरी आहे. गावाच्या दक्षिणेस 1 कि.मी अंतरावरील टेकडीवर निसर्गत: सृष्टी-सौंदर्य लाभलेल्या परिसरात गावाची ग्रामदेवता बल्लाळदेवीचे पुरातन मंदिर आहे. बल्लाळदेवी आदिशक्ती असल्याचे मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. या सर्व प्रसिध्द देवस्थानाप्रमाणेच अमडापुरची बल्लाळदेवी देखील हजारो भक्तांचे श्रध्दास्थान ठरले आहे. अमडापुर व पंचक्रोशीत आढळणारे भुयारी मार्ग, हेमाडपंथी पुरातन महादेवाची जवळजवळ 12 मंदिरे, त्यातील प्राचीन शिलालेख, दगडी शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुना ठरणारे खोदकामात सापडलेले बल्लाळदेवी मंदिरातील देवीचे पुरातन मुखवटे, भव्य मुर्तीचे हातपाय आदी अवयव या पौराणिक पाश्वभुमिला बळ देणारे ठरतात.
''बल्लाळदेवी' हे नावपेशवांच्या कमाविसदार खंडो बल्लाळ यांच्या नावावरुन पडले व 17 व्या शतकात या देवीची मुर्ती स्थापना केली व मंदिर उभारले. या पुरातन मंदिराचे बांधकाम एका विशिष्ट विटेने बांधणयात आले आहे. हि विट पाण्यावर रबरासारखी तरंगते. बांधकाम पुरातन वस्तु संशोधन खात्याने या विटेचे संशोधन केले आहे. बल्लाळदेवी संस्थानच्या नवरात्र महोत्सम मोठ्या समारंभ पुर्वक साजरा केल्या जातो. नवरात्र महोत्सवात सातव्या माळीला जास्त महत्व देतात. सातव्या माळीला परीसरातील खेड्या गावातली भावीक मोठ्या प्रमाणात येतात. आणि भक्ती भावाने देवीचे र्दशन घेतात.
पुर्वी या टेकडीवर जुनी मुर्ती (क्षेत्रपाल सारखी) फार विशाल होती. हल्ली तिचे अवशेष विखुरलेले आहेत. त्या देवळात एक संस्कृत लेख शके ११३३ इ.स.१२११ मधील असुन "श्रीमत् प्रतापवर्ति सिंघणदेव" म्हणजे देवगिरीच्या प्रख्यात सिंघण यादवांच्या काळातील आहे. पदुमनशेटी नावाच्या सावकाराने हे देऊळ बांधले असा ऊल्लेख आहे. आताचे देऊळ पेशव्यांचा अमडापुर येथील कमावीसदार खंडो बल्लाळ यांने बांधले असुन देवीस "बल्लाळी देवी' असेही म्हणतात... असा संदर्भ वर्हाडचा इतिहास या पुस्तकात या. मा. काळे लिहतात.
विदर्भातील शक्तीपीठ ३८ - महाकाली मंदिर, भुयारी, नागपूर
नागपूर पासून अवघ्या 25 कि मी अंतरावर असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेले श्री महाकाली माता मंदिर.... शिरपूर (भुयारी). पुरातन मंदिर, घनदाट जंगल, वेणा धरणामुळे हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. जवळच भुयारी येथील पुरातन लेणी आणि महादागड किल्ला सुद्धा बघता येईल.
विदर्भातील शक्तीपीठ ३७ - महाकाली, चंद्रपूर
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते . चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले . आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ३६ - मंगलादेवी मंदिर, मांगलादेवी, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात असलेल्या मांगलादेवी येथे मंगला मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. मंदिर पुरातन असून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंगला देवीच्या नावावरून या गावाचे नाव सुद्धा मंगलादेवी पडले आहे. नवरात्रात येथे भक्तांची प्रचंड गर्दी होत असते.
विदर्भातील शक्तीपीठ ३५ - अंबादेवी संस्थान, तारापूर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील तारापूर येथील प्राचीन हेमाडपंथी अंबादेवी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांनी या देवीची स्थापना केली होती. राणी तारामती च्या नावाने या गावाचे नाव तारापूर असे ठेवण्यात आले आहे. येथे निसर्गरम्य परिसर आणि अद्भुत शांतीचा अनुभव येथे मिळतो. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या भक्तांनी हा परिसर दुमदुमून जातो. प्राचीन काळापासून येथे एक भव्य हेमाडपंथी मंदिर अस्तित्वात होते. त्या मंदिराचे अवशेष येथे पडलेले आढळून येतात. दगडावर कोरीव काम असलेले स्तंभ, अनेक देवी देवतांच्या मुर्ती, मंदिराचे तुटलेले अवशेष येथे सापडतात. काही वर्षांपूर्वी त्या मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले. जुन्या मंदिराचे असंख्य अवशेष या बांधकामात गडप झाले.
तारापूर हे गाव मातीने बांधलेल्या तटबंदीमध्ये होते. गावाच्या चारही बाजूंना चार मातीचे भव्य बुरूज आहेत. ते बुरूज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. आज या गावात एकही मनुष्य नाही. तिथे आज शेती केली जाते. याच ठिकाणी ऋषी विश्वामित्र यांनी वास्तव्य केले होते. त्यांच्या नावावरुनच येथे उगम पावणाऱ्या नदीला विश्वगंगा नदी म्हणून ओळखले जाते.
पुरातत्व विभागाने येथे दुर्लक्ष केलेले आहे. या मंदिराच्या अवशेषांचा अभ्यास केल्यास मंदिराच्या इतिहासाबद्दल आणखी माहीती प्राप्त होईल.
ज्ञानगंगा अभयारण्याच्या डोंगराळ भागात हे निसर्गरम्य ठिकाण असून जवळच पलढग धरण आहे. पर्यटकांनी व इतिहासकारांनी अवश्य भेट द्यावी.
विदर्भातील शक्तीपीठ ३४ - गुगुळादेवी मंदिर, गिरोली खुर्द, देऊळगाव राजा, बुलढाणा
सिंदखेडराजा या गावाचे नाव काढले की महाराष्ट्राचा भव्यदिव्य इतिहास ज्यांनी घडविला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीची- जिजाऊंची- आठवण, त्यांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री शिवाजी राजे यांचं हे आजोळ. लखुजीराव जाधवांची जहागीरदारी इथे होती. त्यांचे कन्यारत्न म्हणजे जिजामाता- राष्ट्रमाता होय. जाधवांचं नव्हे, तर बुलडाणा जिल्ह्यातील बर्याच लोकांचं कुलदैवत गुगुळादेवी आहे ही नवसाला पावणारी आहे. सामान्य महापराक्रमी दिग्विजयी इतिहासात अजरामर राहणारं राष्ट्रीय वृत्तीचं संतान आपणास व्हावं म्हणून जिजाऊनं तिला नवस केला. तिची ओटी भरली. आजही ज्यांना संतान होत नाही ते गुगुळा देवीला नवस करतात.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी ही असली तरी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील गिरोली या गावानाजीकचे ‘श्री गुगलादेवी मंदिर’. ह्या मंदिराला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. हे मंदिर सातवाहन कालखंडात बांधले गेले. या मंदिराला ३०० वर्षाचा इतिहास आहे. अतिप्राचीन कालखंडात या मंदिराची स्थापना केल्या गेली आहे. या मंदिराची भिंतीची जाडी ४ फूट आहे. देवगिरी यादवांच्या कालखंडात हेमाडपंथी साज मिळाला. हे मंदिर स्थापत्य पद्धतीत चुना, सिमेंट न वापरता दगड एकमेकात एखाद्या टेलिस्कॉप प्रमाणे बसवून पक्के केले आहेत. या मंदिराबाहेर अंदाजे दोन ४० फूट उंच भव्य दीपमाळा आजही उभ्या आहेत. दीपमाळा ही देवगिरी यादव कालखंडाची ओळख आहे. या दोन दीपमाळापैकी एक दीपमाळा आतून पोकळ असून त्याच्या आत स्पायरल पद्धतीचा जिना आहे. ही दीपमाळा अद्भूत असून आतून पोकळ असलेली दीपमाळा आजवर कुठेही आढळून येत नाही. ती एकमेव बुलढाणा जिल्ह्यातील गुगलादेवी येथेच आहे.
सिंदखेड राजाजवळ गिरोली गावाच्या घनदाट जंगलात हेमाडपंथी असलेलं गुगुळादेवीचं मंदिर, देवालयाच्या गर्भगृहात गुगुळाची अर्ध तांदळा शेंदूरलिपीत प्रतिमा आहे. हरिणीसारखे डोळे, उंच कपाळ चेहर्यावरचं तेज डोळ्यात साठविता येत नाही. हे देऊळ अत्यंत प्राचीन असावे यात शंका नाही. जवळच्या पहाडावर एक नैसर्गिक गुहा आहे. तोंड अर्धवर्तुळावर आहे. हेमाडपंथी सभामंडप असून, शिवलिंग व नंदी आहे. गुहेच्या समोर पाषाणयुगीन मानवाने तयार केलेली हत्यारे दिसतात. त्यावरून स्थळाची कल्पना करता येते. प्राचीनत्व, पौराणिक व ऐतहासिक असं महत्त्व या देवीला प्राप्त झालं आहे. देऊळगावराजा नावाच्या पंचक्रोशीत गुगलादेवी इतके प्राचीन व जागृत देवस्थान कुठेही नाही.
या गुगलादेवी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की नवरात्री मध्ये अखंड ९ दिवस ५५१ दीप प्रजल्वित केले जातात. हे अखंड दीप भाविक लावतात ते सतत ९ दिवस तेवत ठेवले जातात. त्यामुळे मंदिर हे प्रकाशमय झालेले असते. अखंड दीपमाला लावण्याची पद्धत ही प्राचीन असून त्याला ३०० वर्षाचा इतिहास आहे, पुर्वी मंदिरे जे कुठे तरी जंगल पहाडात असायची तिथे सर्व अंधार असायचा आणि नवरात्रात अखंड दीप ठेवण्या पाठीमागे भाविकांची वेगळीच भावना आहे मनातील मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे हे अखंड दीप लावले जातात. मंदिर परिसरात एक प्राचीन काळातील विहीर असून त्या विहिरीतील पाण्याने स्नान केले तर आजही आपले त्वचा रोग पूर्ण पणे बरे होतात. हे विशेष आहे.
(माहीती - मिलिंद व्ही बरबडे)
विदर्भातील शक्तीपीठ ३३ - लखमाई देवी मंदिर, पाथ्रड, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात यवतमाळ दारव्हा रोडवर बोरी-अरब या गावापासून अवघ्या 13 किमी अंतरावर पाथ्रड गावामध्ये श्री लखमाई देवी संस्थान या नावाने प्रसिद्ध असलेले देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे.
मंदिर पूर्वी गोकी नदीच्या काठावर होते, पुढे धरण बांधकामामुळे गाव स्थानांतरित करण्यात आले आणि पर्यायाने मंदिर सुद्धा उंच ठिकाणी हलवण्यात आले.
विदर्भातील शक्तीपीठ ३२ - रेणुका माता मंदिर, रेणुकापूर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील नेर या तालुक्याच्या ठिकाणापासून 5 की. मी. वर असलेले रेणुकापूर हे एकेकाळी शक्ती संप्रदायातील महत्त्वाचे केंद्र. रेणुकापूर येथील आताच्या मंदिर परिसरात असलेल्या मुर्त्यावरून येथे एकेकाळी भव्य मंदिर असल्याचे दर्शविते. बहुदा या प्रतिमा मुळता नामशेष झालेल्या जून्या मंदिराच्या असाव्यात. जुने मंदिर आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे. येथील असंख्य मातृकाच्या मुर्त्या असे दर्शवितात की हे ठिकाण १२व्या -१३व्या शतकातील मातृका देवीच्या पूजे साठी लोकप्रिय होते. शिल्पकला शैलीच्या आधारे मंदिराचा कालखंड ठरवण्यास मदत होतो. अशाच प्रकारच्या प्रतिमा महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या ठिकाणी आणि विशेषता विदर्भात दिसून येतात. नंतरच्या काळात मूळ मंदिराची पडझड झाल्याने हळूहळू मंदिराचा झालेला विकास आधुनिक मंदिराच्या शैलीत झालेला दिसून येतो. या ठिकाणाचे देवीचे स्थान आणि संलग्नता व रेणुका देवी मंदिर यावरून रेणुका पंथ यांच्याशी मजबूत संबंध दर्शविते. तथापि येथे चामुंडाच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात असल्याने (एकुण ४) असेही सूचित करते की या ठिकाणी देवीचे हे रूप महत्त्वाचे आणि प्रभावशाली असावे. याव्यतिरिक्त येथे २ महालक्ष्मीच्या प्रतिमा आहे. त्यांवरून असे सूचित होते की याकाळात महालक्ष्मीच्या प्रतिष्ठित प्रतिमांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तसेच ती महाराष्ट्रामध्ये व्यापक भौगोलिक प्रमाणात विस्तारलेली दिसून येते. असे असले तरी पवित्र प्रभावाच्या या पैलूचा आणि रेणुका पंथांचा झालेला भौगोलिक प्रसार यासाठी रेणुकाचे मुख्य केंद्र माहूर हे या ठिकाणापासून जवळ आहे हे ही महत्त्वाचे आहे.
नेर तालुक्यात यादव काळातील अनेक मंदिरे आहेत. तथापि सर्व मंदिरे एक तर नव्याने जिर्णोध्दारीत झालेली आहे, होत आहे किंवा दुर्लक्षीत आहे. या मंदिरांचे प्राचीन अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर १५० च्या जवळपास अशी जुनी मंदीरे आहेत. याबाबत जागृतता निर्माण करणे हे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. रेणुका देवी मंदिर पुर्वी प्रमाणे दगड व चुन्यात जिर्णोद्धार करणे शक्य आहे. नेर येथील लोकांनी तसा पुढाकार घेण्यास हरकत नाही.
डॉ विलास वाहणे
सहायक संचालक पुरातत्त्व
विदर्भातील शक्तीपीठ ३१ - गणोजा देवी, गणोजा, अमरावती
महाराष्ट्रात देवीचे साडेतीन पीठ आहेत. कोल्हांपूरची श्रीमहालक्ष्मी ही त्यापैकी एक पूर्ण पीठ आहे. या देवीच्या मूर्तीची प्रतिरूप मूर्ती भातकुली (जि. अमरावती) तालुक्यातील गणोजा येथे आहे.. अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोजा (देवी) येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणोजा येथील गणू भट हे महाराष्ट्रातील शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्रात गणू भट कोल्हापूरला अनवाणी जात असत. दर्शनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. वृध्दावस्थेला आल्यानंतर गणू भट यांनी देवीला विनवणी केली की, यापुढे मी तुझ्या दर्शनाकरिता कोल्हापूरला येऊ शकरणार नाही. त्यावेळी महालक्ष्मीने गणू यांना दर्शन देऊन सांगितले की, आता मीच तुझ्या गावी येणार आहे. तू येथून निघाल्यावर मागे वळून पाहू नको, असे म्हणून देवी अदृष्य झाली. गणू गावी पोहोचत असताना त्यांनी गणोजानजीकच्या नदीजवळ मागे वळून बघितले. त्याचवेळी चमत्कार झाला आणि मागे येणारी महालक्ष्मी त्या नदीच्या काठावर अंतर्धान पावली, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या गावाला सुद्धा गणोजा देवी नाव पडले.
पाचशे वर्षांपीर्वी नदीपात्राच्या उत्खननात काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे सांगितले जाते. या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले असून नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसले तरी गणोजा येथे गेल्यास महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे समाधान होते, असे भक्त सांगतात.
गणोजा येथील या मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अडीच फूट उंचीची ही मूर्ती चतूर्भूज आणि सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या एका हाती त्रिशूल आहे. दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती गदा आणि चौथ्या हाती पद्म आहे. डोक्यावर मुकूट आहे.
पेढी नदीच्या किनाऱ्यावरच पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरातच राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.
यात्रेच्या काळात या ठिकाणी तीर्थस्थापना, अखंड वीणा वादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, हरीपाठ, भारूड, भागवत कथा, दहीहांडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. नवरात्रात देवीचा सोन्याचा मुखवटा विलोभनीय दिसतो. दागिन्यांनी सजलेले देवीचे रूप भक्तांना वेगळीच अनुभूती देत असते.
महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ, चंद्रपूर
महाकाली मंदिरापासून अवघ्या २ किमी अंतरावर अजून एक अभूतपूर्व गोष्ट आहे. ती म्हणजे भिवापूर वार्ड येथे ४०० वर्ष पुरातन देवीची २६ फुट लांब आणि १८ फुट रुंद अशी एकपाषाणी विशाल दहा तोंड असलेली दुर्गादेवीची मूर्ती. या मूर्तीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे कि देवी दशभुजाधारी असून प्रत्येक हातात शस्त्र आहे. दहा तोंड असलेली या प्रकारातील दुर्गादेवीची मूर्ती क्वचितच कुठे बघावयास मिळते. या मूर्तीला दहा तोंड असल्यामुळे अनेक लोक या मूर्तीस लंकापती रावण समजून विजयादशमीला दगड मारुन आपला प्रतिकारक व्यक्त करत असत. त्यामुळे मुर्ती थोड्या प्रमाणात विद्रूप झाली. कालांतराने या मूर्तीची ओळख होऊन हा गैरसमज दुर झाला आणि हि परंपरा बंद झाली.
गोंड राजवटीतील अनेक किल्ले मंदिरे, इत्यादीपासून प्रेरणा घेऊन १६व्या शतकातच्या दरम्यान बाबुपेठ येथे राहणाऱ्या रायप्पा वैश्य यानी भव्य शिव मंदिराची उभारणी करण्यासाठी अनेक मूर्तीची निर्मिती केली या मूर्तीखेरीज मत्स्यावत, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, हत्ती, शेषनाग, गरुड इत्यादी मूर्ती देखील तयार केल्या. मात्र हे शिवालयाचे कार्य प्रगतीपथावर असतांनाच रायप्पा वैश्य याचा मृत्यू झाला आणि हे देवालयाचे काम कायमचे अधुरे राहिले म्हणूनच या मंदिराला "अपुर्ण देवालय" असे म्हणतात. उन वारा पाउस यांच्याशी दोन हात करत ४०० वर्ष उलटूनही ही विशाल दुर्गामूर्ती आपलं अस्तित्व टिकवून आहे. नागपूर पुरातत्त्व विभागाने या मूर्तीचे वैशिष्ट्य लक्ष्यात घेता या मूर्तीची प्रतिकृती तयार करून मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली आहे.
(माहिती - विशाल देवकर)
विदर्भातील शक्तीपीठ ३० - ज्वालामुखी हिंगलाज देवस्थान, हिंगलासपूर, अमरावती
ऐतिहासिक वारसा असलेले हिंगलासपूर हे ज्वालामुखी देवीचे पुरातन मंदिर असलेले देवस्थान, आणि हेच या गावातील वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील पुरातन देवस्थानांन पैकी एक अमरावती वरून साधारणतः २५ ते ३० किमी अंतरावर पश्चिमेस बडनेरा पासून पुढे लोनी-टाकळी गावा जवळ हिंगलासपूर हे गाव आहे
खर तर ज्वालामुखीदेवीचे मंदिर बलुचिस्थान (पाकिस्तान ) मध्ये आहे. याच देवीची प्रतिकृती अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील, हिंगलासपूर या गावात आहे. या मंदिराची स्थापना १३०३ मध्ये झाली म्हणजे आजपासून सुमारे ७१७ वर्ष जुने हे मंदिर आहे. हे मंदिर एखाद्या किल्ला, वाडा, गढी प्रमाणे दिसते.
या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन बाजूनी तीन - तीन प्रवेशद्वार आहे. तसेच हे मंदिर दोन तटबंदीच्या आतमध्ये आहेत, त्याकाळातील परकीय आक्रमण पहाता या मंदिराला दोन तटबंदी ची अभेद्य बांधणी केल्या गेली आहे पहिले मुख्य प्रवेशद्वार हे मोठ्या आकाराचे आहे यातून आत गेल्या नंतर सहा बुरुंज असलेली मोठी तटबंदी आहे. यातील दोन बुरुंज आहे. यानंतर दुसरा दरवाजा पार करावा लागतो हा दरवाजा प्रवेशाच्या दृष्ट्रीने थोडा छोटा आहे, तो पार केल्यानंतर दुसरी तटबंदी लागते, यात चार बुरुंज आणि तटबंदी आहे.इथेच देवीच्या १३०३ पासून असणाऱ्या सेर्वेकऱ्यांच्या समाध्या आहे ज्यांना भगत म्हटल्या जाते. आताही भगत कुटुंब मदिरात वास्तवास आहे. त्यांच्याच परिवारातील आज १० वी पिढी येथे सेवेकरी आहे. या सर्व समाध्यांच्या मंदिरांचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याच समाध्यांच्या शेजारी एक दीपस्तंभ आहे. या स्तंभाच्या खालच्या बाजूने १२×१२ चा चौकोनी चबुतरा आहे. त्यावर गोलाकार २०-२० फूट उंचीचे दोन मजले आहेत, यातून आत चढायला १८ ते २० पायऱ्या आहेत यातून वर चढल्या नंतर आपण दीपस्तंभाच्या वरच्या बाजूला पोहोचतो. यावर मोठ्या मशालीच्या आकाराचे बांधकाम आहे त्यावर देवीच्या पूजेच्या वेळेस आग पेटवण्यात येते.
याच परिसरात जुनी पायविहिर पण आहे. साधारणपणे पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी ही विहीर त्या काळी बांधली असावी या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्याची व्यवस्था आहे. सध्या या विहिरीला मुबलक असे पाणी आहे याचं पद्धतीने बांधकाम असलेल्या तीन विहीरी या परिसरात आहे विहीरीच्या आत कमानी ची पण व्यवस्था आहे.
दुसऱ्या दरवाजा नंतर देवीच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते सध्या या मंदिराचे जीर्णोद्धार झाला असल्यामुळे या मंदिराला नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे. आतमध्ये आई हिंगलाज देवीच्या मूर्ती आहे.
सध्या मंदिराच्या चारही बाजूने भक्कम असे परकोट आहे. या तटबंदी मुळेच या मंदिराला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, बांधकाम असलेली तटबंदी या मंदिराचे सौंदर्य आहे याचं तटबंदी वर काही जुने शिल्प पण मातीत कोररले आहे, त्यात विविध प्राणी, वीर योद्धे जे शस्त्र घेऊन उभे आहे, इत्यादी मंदिराचा जिर्णोध्दार पुर्ण झाला आहे. खरच इतकं वैशिष्ट्य पूर्ण बांधकाम असलेली आणि पुरातन वास्तू आज थाटात उभी आहे.
विदर्भातील शक्तीपीठ २९ - चंडिका मंदिर, भद्रावती
भद्रावती या ऐतिहासिक नगरीने आपल्या इतिहासात खूप मोठा पुरातन वारसा जपून ठेवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले भद्रावती येथे अनेक पुरातन मंदिरे, शिलालेख, लेण्या, किल्ला अशा वास्तूंनी नटलेले आहे.
भद्रावती येथील प्रसिद्ध जैन मंदिराच्या बाजूलाच चंडिका मातेचे मंदिर आहे. मंदिरासमोरील चौथर्यावर चार कोरीव नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभावर उभा आहे. गर्भगृहात तीन प्राचीन मुर्ती आहेत, ज्यात भैरवी, विष्णू आणि देवीची मुर्ती आहे. पण ही चंडिका देवीची मुळ मुर्ती नाही. तीन मुख, सहा हात असलेली चंडिका मातेची तेजपुंज मुर्ती नागपूर संग्रहालयात ठेवलेली आहे. मंदिराच्या एका स्तंभावर शिलालेख कोरलेला आहे.
विदर्भातील शक्तीपीठ २८ - चंडिका देवी मंदिर, वाई, यवतमाळ
विदर्भातील शक्तीपीठ २७ - रेणुका माता मंदिर, उमरद, बुलढाणा
हे ऐतिहासिक मंदिर असुन हेमाडपंथी शैलीचे बांधकाम आहे. गावातील तीन हेमाडपंथी मंदिरापैकी एक रेणुका मातेचे मंदिर बाराव्या शतकातील असून अजून सुस्थितीत आहे.
उमरद ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा जिल्ह्यात असुन ते सिंदखेडराजा येथुन १५ कि मी व किनगाव राजा येथुन ३ कि मी वर असलेले एक ऐतिहासिक गाव आहे. सदरील गावात राजे लखुजीराव जाधवराव यांचे थोरले पुत्र राजे दत्ताजीराव जाधवराव यांची एक वंशजशाखा असुन येथे महादेव मंदिर, श्री नरसिंह मंदिर, रेणुका माता, अष्टभुजा देवी मंदिर, मारुतीची पायाखाली राहु असलेली वैशिष्ट्य पुर्ण मुर्ती, ऐतिहासिक बारव, शेषशायी विष्णू, भुदेवी, रावण दरबारातील शेपटीच्या वाटोळ्यावर बसलेले मारुती शिल्प, राजे जाधवराव घराण्याची सहा बुरुजांची ऐतिहासिक गढी आदी ऐतिहासिक वास्तु आहेत.
(माहिती - राजे नरेश जाधवराव)
विदर्भातील शक्तीपीठ २६ - कालंका देवी मंदिर, रामटेक, नागपूर
रामटेक म्हटले की नजरेसमोर येते गडमंदिरावरील रामाचे मंदिर. रामाच्या दर्शनासाठी गेलेला व्यक्ती दर्शन करून जास्तीत जास्त कालीदास स्मारकाचे दर्शन घेवून व नंतर खिंडसीला जाऊन बोटींगची मौजमजा घेतो.
रामटेकला अजुनही काही धार्मिक महत्त्व असलेली मंदिरे आहेत ज्यातील एक म्हणजे विदर्भातील अष्टविनायकात समावेश असलेले गणेश मंदिर. प्रत्येक गणेशभक्त रामटेकला गेल्यानंतर या मंदिरात दर्शनाला जातोच.
याच रामटेक मध्ये अस्तित्वात असलेले प्राचीन हेमाडपंथी कालंका मंदिर. हे मंदिर खुप लोकांना माहित नाही. त्यामुळे या मंदिराला भेट देण्याचे विसरतो. कालंका मंदिर हे रामटेकमधील महाशक्ती दुर्गा देवीचे मंदिर. जैन मंदिराच्या बाजुलाच हे मंदिर आहे. दर्शन करून खूप प्रसन्नता वाटेल अशी देवीची अप्रतीम मुर्ती आहे. मंदिराच्या परिसरात खूपच प्रसन्न वाटते.
विदर्भातील शक्तीपीठ २५ - गोरजाई माता मंदिर, वैरागड, गडचिरोली
वैरागडची महाकाली (गोरजाई) मंदिर - भारतातील नागवंशीय लोक हे देखील मातृदेवतेचे उपासक होते. वैनगंगेच्या पूर्वेस वैरागड येथे माना जातीच्या राजांनी नवव्या शतकांत आपली सत्ता स्थापन केली. या वंशातील पहिला राजा कुरुमप्रल्होद हा होता. त्याने वैरागड (ता. आरमोरी), गडबोरी (ता. सिंदेवाही) आणि राजोरी (ता. मुल) येथे किल्ले बांधले. त्याच वंशातील शेवटचा राजा गेहलु यांने माणिकगड किल्ला बांधला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नागप्रतिमा आहे. त्यामुळे तो किल्ला गोंडकालीन माणक्या गोंडाचा नाही. गोंडाचे जे किल्ले आहे त्यावर 'हत्तीवर आरुढ झालेला वाघ' हे 'राज चिन्ह' आहे असो त्याचाही आपण पुढे विचार करु. - वैरागड हे गडचिरोली जिल्हा व आरमोरी तालुक्यांत आहे. खोब्रागडी आणि सातनाला या नदीच्या संगमावर आहे. हे गाव द्वापार युगातील चंद्रराज वंशातील वैरोचन राजाने बसविले आहे. पुढे त्याचा अपभ्रंश झाला व वैरागड म्हणून नावलौकिक प्राप्त झाले असे इतिहासकाराचे मत आहे. हे मंदिर गावाच्या दक्षिणेस सुमारे १ कि.मी. अंतरावर स्थानिक शिव तलावाच्या जवळ असून सात नदीच्या किनाऱ्यावर आहे. कॅनिहॅमने या मंदिराची पहाणी इ.स. १९७३-७४ मध्ये केली होती. ही मूर्ती प्राचीन असून रोगनिवारक म्हणून प्रसिद्ध आहे. कॅनिहमच्या मते या मंदिराचे काम दोन टप्प्यात पुर्ण झाले. पहिले मूल मंदिर गर्भगृहाइतकेच होते नंतर गर्भमंडप आणि अर्धमंडप या जिद्दल स्थापत्य रचनेत उभे झाले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून बांधकाम मुरमी पाषाण वालूका पाषणांतील आहे. अत्यंत प्राचीन असले तरी नक्षीकाम अत्यंत देखणे आहे. गर्भगृहात अष्टभूजी समपादाता उभी असलेली देवीची मूर्ती आहे. तीने हातात खडग, कपाल, डमरू, ढाल आणि कमळ इ. आयुधे धरले आहे. महाकाली म्हणून प्रसिद्धी आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अगदी साधे आहे. द्वारपट्टीकेवर नक्षीकाम नाही, कमळाचे अंकन कोरले आहे त्यावरून हे मंदिर महाकालीचे मंदिर लोकश्रद्धेचा विषय बनले आहे. या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात नवरात्रात व चैत्रात यात्रा भरते.
विदर्भातील शक्तीपीठ २४ - पिंगलाई माता मंदिर, भंडारा
भंडारा शहरातील शिवाजी वार्ड भागात एका छोट्या तलावाच्या काठावर पिंगलाई मातेचे हे मंदिर स्थित आहे. बाहेरून सिमेंट बांधकाम दिसत असले तरी हे मंदिर पुरातन आहे. मंदिराचे दगडी स्तंभ, नक्षीदार कोरीव द्वारशाखा पुरातन मंदिराची ओळख करून देतात.
विदर्भातील शक्तीपीठ २३ - पिंगलेश्वरी देवी, कोरंभी, भंडारा
भंडारा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर उंच डोंगरावर असलेली ही देवीची मूर्ती चारशे वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं. देवी शिवपिंडावर असल्यामुळे तिचं नाव पिंगेश्वरी असं पडल्याची आख्यायिका आहे. पिंगेश्वरी देवीची मूर्ती नयनरम्य आहे. कोरंभी गावातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भाविक या कोरंभी देवीचे दर्शन घ्यायला येतात.
मंदिरात आल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन घेण्याकरिता दोनशे एक्कावन (२५१) पायऱ्या चढावं लागतं. मंदिरात प्रवेश करण्याआधी कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते लागते लागते. त्यानंतर मंदिराच्या समोर असलेल्या भोले शंकराचे दर्शन घेऊन भाविक पिंगेश्वरी देवीच्या मंदिरात पोहचतात. जे भाविक छत्तीसगढ या राज्यातील उंच पहाडावर असलेल्या बमलेश्वरी देवीचे दर्शन घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी कोरंभी येथील देवी खूप महत्त्वाची मानली जाते. देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून पहाटेच सूर्याचे पहिले किरण या देवीच्या मुखावर पडतात. त्यामुळे देवीची मूर्ती अधिकच बहरून दिसते.
चैत्र नवरात्री असो किंवा शारदीय नवरात्र या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल बघायला मिळते. या मंदिराला विदर्भाचे डोंगरगड असेही म्हटले जाते. मध्यप्रदेश, गोंदिया, बालाघाट, भंडारा या जिल्ह्यातील भाविक या देवीला नवस मागतात व नवस पूर्ण झाला की भाविक या ठिकाणी नवस फेडायला येतात.
भंडारा जिल्ह्यातील पांडे यांनी या मंदिराचा विकास करायला सुरुवात केली. या मंदिराचा जीर्णोद्धार १९८८ साली झाला. आज मंदिरात लाखो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. अत्यंत नयनरम्य परिसरात असलेल्या या पिंगेश्वरी देवीच्या दर्शनाचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा
विदर्भातील शक्तीपीठ २२ - रेणुका माता मंदिर, आडगाव राजा, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आडगाव राजा येथे असलेले हे रेणुका मातेचे मंदिर आहे. मंदिर पुरातन असून बांधकाम हेमाडपंथी शैलीत दिसून येते. आडगाव राजा हे राजे लखोजीराव जाधव यांच्या वतनदारी मधील महत्वाचे गाव होते. येथे किल्ला सुद्धा आहे.
विदर्भातील शक्तीपीठ २१ - भवानी माता मंदिर, आगर, अकोला
अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आगर येथे असलेले भवानी मातेचे मंदिर. मंदिर पुरातन असून बांधकाम बाराव्या शतकातील दिसून येते. नवरात्रीचे नऊ दिवस येथे भाविकांची गर्दी जमते.
विदर्भातील शक्तीपीठ २० - भवानी माता मंदिर, केसुर्ली, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील केसुर्ली गावाच्या जवळच एका घनदाट जंगलात टेकडीच्या पायथ्याशी हे पुरातन मंदिर स्थित आहे. पुरातन मंदिराच्या जागी नवीन मंदिर बांधलेले आहे. पुरातन मंदिराचे अवशेष मंदिर परिसरात विखुरलेले आढळतात. मंदिराच्या समोर एक पुरातन विहीर आहे.
विदर्भातील शक्तीपीठ १९ - मर्दडी माता मंदिर, दुधा, बुलढाणा
पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे. या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी जमली आहे. शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी मातेच्या मंदिरात मातेचा उदो-उदो होत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी मंदिर भव्य आणि पुरातन असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक गर्दी करतात. या ठिकाणी लग्न, जावळे, मनोरथ पूर्ण, पोळ्याची कर, चैत्र पौर्णिमा, नवरात्रीत सातत्याने भक्तांची गर्दी राहते. तर वर्षभरात तीन वेळा मोठा यात्रा उत्सव राहतो. बुलढाणा - छत्रपती संभाजीनगर रोडवर धाडपासून आठ कि.मी. अंतरावर मर्दडी देवीचे मंदिर आहे. शिवशक्तीचे एकाच ठिकाणी वास्तव्य दुर्मिळ आहे. याच मंदिरात मर्दडी देवीच्या समोरच स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे.
मंदिराच्या परिसरातूनच बाणगंगा या नदीचा उगम होतो. शिव आणि शक्तीसोबतच विष्णू अवतारातील भगवान परशुराम, गणपती, सरस्वती, तेलाई देवी, हनुमान या देवतांच्या मूर्ती आणि मंदिराच्या आवाराच्या आत आहेत. या ठिकाणी आल्यावर बुलढाणा रोडपासून पश्चिमेला थोडेच अंतर चालून गेल्यावर काहीशा पायऱ्याखाली उतरून गेल्यावर भव्य मंदिर दृष्टीस पडते. परिसरात वटवृक्षाचे मोठी झाडे हातात हात घातल्यागत मंदिर परिसरात सावली आणि गारवा निर्माण करतात. लगेचच थोडं खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक चौकोनी पाण्याचा कुंड आहे आणि वर दगडी गोमुख आहे, यावर एक पोकळ खोबणी आहे. आत गेल्यावर आणखी तीन ठिकाणांहून पाणी येताना दिसते. भाविक या गोमुखातून पडणाऱ्या पाण्यानं शुचिर्भूत होऊन देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतात. आत गेल्यावर दगडी सभामंडप दिसतो आणि पुरातन हेमाडपंती बांधणीचे मंदिर दिसते. आत गेल्यावर डावीकडे मोठ्या गाभाऱ्यात मर्दडी देवीची सुंदर मूर्ती दिसते. सोबत बाजूला भगवान परशुरामाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, तेलाई देवीचे मंदिर आहेत. मर्दडी देवीसमोर महादेवाचे मंदिर आहे, तर या सर्वांच्या मधोमध यज्ञकुंड तयार करण्यात आले आहे.
विदर्भातील शक्तीपीठ १८ - भवानी माता मंदिर, विजासन, भद्रावती, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती जवळ असलेल्या विजासन टेकडीवर महिशासूर मर्दीनी भवानी मातेचे पुरातन मंदिर स्थित आहे. हे मंदिर देऊरवाडा रोडवर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत आहे. जवळच एक पुरातन गुफा आहे. टेकडीला लागून एक शिळा आहे ज्यावर गणेश, ब्रह्मदेव, विष्णू आणि नरसिंह यांच्या मुर्ती कोरलेल्या आहे.
विदर्भातील शक्तीपीठ १७ - भवानी माता मंदिर, चिखली यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात चिखली गावाजवळ पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या टेकडीवर भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत आहे नंतरच्या काळात सिमेंटच्या भिंती व छत बांधण्यात आले आहे. चिखलीहून मंदिराकडे जाताना ओम आकारात वाहणारा नदी प्रवाह दिसतो. मंदिरासाठी दगडी खोदकाम केल्यामुळे आजूबाजूला एका खडकात मोठा जलसाठा डोह आहे त्याला परमडोह म्हणून ओळखतात. 'मां भवानी' मंदिराचा डोंगर पैनगंगा नदीच्या कालव्याने वेढलेला आहे. मंदिरासमोर नुकताच RCC मध्ये बांधलेला मंडप आहे. मंदिरातून आजूबाजूचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. जवळच एक छोटी गुहा आहे. इच्छुक लोक नदी ओलांडून तिथे जाऊ शकतात. निसर्गरम्य परिसर असल्यामुळे लोक वर्षभर भेट देत असतात.
विदर्भातील शक्तीपीठ १६ - श्री जगदंबा संस्थान, केळापूर, यवतमाळ
विदर्भ आणि तेलंगाना च्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात केळापूर या ऐतिहासिक गावात ‘आई जगदंबा’चे मंदिर आहे. धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील केळापूरला विशेष महत्व असून वर्षभर येथे जगदंबा आईचा उदो उदो सुरु असतो.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून ४ किमी अंतरावर केळापूर हे गाव आहे. गावात खुनी नदीच्या काठी, आणि वनसंपदेने बहरलेल्या परिसरात आई जगदंबेचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. कुंतलापुरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे. डॉ या. मा. काळे लिखित “व-हाड इतिहास” या पुस्तकात कुंतलापुर म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर असा उल्लेख आढळतो. जेमिनी अश्वमेध या ग्रंथात कुंतलापूर ची भवानी व राजा चंद्रहास यांची कथा आहे. चंद्रहास राजाचे हे नगर होत आणि राजावर प्रसन्न होऊन जगदंबेने कुंतलापूर गावात आपला कायमचा निवास ठेवला. अशी आख्यायिका या ग्रंथात आहे. सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात १८१८ साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अज्ञातवासात असतांना केळापूर येथे आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे. इतिहासात केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचा पण उल्लेख आहे. आजही जीर्ण व पडझड झालेल्या पुरातन किल्याचे अवशेष नदीकाठावर आढळून येतात.
मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू प्रगटलेली आहे. मूर्तीच्या जागेवर २ बाण आहेत. जीर्णोद्धार कार्य सुरु असतांना जी मूर्ती सापडली ती भग्न असून चतुर्भुज जगदंबेच्या मांडी खाली राक्षस आहे. आईच्या एकां हातात त्रिशूल असून ती राक्षसाचा वध करीत आहे. देवीवर भक्तांची प्रचंड श्रद्धा असून औरंगाबाद येथील भक्तांने तर एक किलो सोने देवीला दान चढविले. विश्वस्तांनी त्याचा वापर करून देवीचा मुखवटा बनविला आहे.
जगदंबेवर आंध्र व तेलंगणातील भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. देवीला नवस बोलून लाखो भक्त अनवाणी पायाने चालत नवरात्री दरम्यान दर्शनाला येतात. या काळात मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलीत करण्यात येते. या प्राचीन मंदिराची १९८१ पूर्वी पारवेकर घराण्यांमार्फत देखभाल व्हायची. त्यानंतर पांढरकवडातील तरुणांनी एकत्रित येवून एकता मंडळ जीर्णोद्धार समितीची स्थापना केली. केळापूर गावात प्राचीन चतुर्मुखी गणपतीचे देखील मंदिर आहे. गावात असलेल्या या मंदिरातील गणपतीची अनोखी मूर्ती लोभस आहे. चारही दिशांना गणपतीचे मुख असून गोंड राजाच्या वास्तव्य काळात या चतुर्मुखी गणपतीची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. केळापूर गाव बारा हनुमानसाठी देखील ओळखले जाते. गावात मध्यभागी व वेशीवर हनुमान मंदिर आहे. बाजीराव पेशवाच्या युद्धानंतर काही मूर्ती आसपासच्या गावात स्थापित करण्यात आल्या आहे.
(माहिती - Milind Barbade)
विदर्भातील शक्तीपीठ १५ - भवानी माता मंदिर, राजुरा, चंद्रपूर
(फोटो - बृहस्पति साळवे)
विदर्भातील शक्तीपीठ १४ - रेणुका देवी मंदिर, दिग्रस, यवतमाळ
दिग्रस शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे.
शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे. त्यात जगदंबेचे महात्म्य अपार आहे. शहरात स्वयंभू अखंड शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठ जिल्ह्यातच नव्हे, तर बाहेर जिल्ह्यातील भक्तांचे आराध्य स्थान आहे. याच रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. परिसरातील भाविकांची मंदिरात मंदियाळी आहे.
शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात रेणुका भवानी मातेचे मंदिर आहे. हे पुरातन मंदिर हेमाडपंथी होते. त्याचे अवशेष आजही कायम आहे. मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे असावे, असा अंदाज येथे आढळलेल्या शिळावरून बांधण्यात येतो. हरिभाऊ शिंदे यांना एक रेखीव शिळा आढळली. त्यांनी ती शिळा शहरातील कस्तुरे नामक व्यक्तीला दाखविली. ती अश्वमेघ शिळा असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अश्वमेघ यज्ञ केला जातो, त्याचे स्मरण व्हावे, म्हणून तेथे अशी शिळा ठेवली जाते, असे सांगण्यात येते.
एक शिळा रेणुका मातेच्या मंदिराजवळ सापडली असून ती शिळा महाद्वारातून प्रवेश करताना उजव्या हातावर लावलेली आहे. बाजूला लहान-लहान मूर्त्या आहे. त्यात तुळजापूरची तुळजाई आहे. एक कालभैरवी आणि एक गरूडावरची सुंदर मूर्ती आहे. येथील रेणुका माता तांदळाच्या रुपात असून तिला पिवळा मुखवटा आहे. तीन बाय तिनच्या चौथऱ्यावर ही मूर्ती विराजमान असून हा चौथरा म्हणजे विहीरच आहे.
ही देवी स्वयंभू असून ती विहिरीतूनवर आल्याचे सांगण्यात येते. दत्तात्रेय महाराज हे माहुरला जाताना दिग्रसला भवानी मातेच्या टेकडीखाली बसले होते. त्यांनी एका वृक्षाचा सहारा घेत विश्रांती घेतली. त्यामुळे या टेकडीला “दत्ताची टेकडी" असे म्हटले जाते. दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
गेल्या ४० वर्षांपासून देशातील विविध शक्तीपीठातून शहरात आणलेली ज्योत रेणुका मातेच्या मंदिरात प्रज्वलित केली जाते. शहरातील घरोघरी या ज्योतीवरूनच नऊ दिवसाचे नंदादीप प्रज्वलित करण्यात येतात. नवरात्रोत्सवाच्या पर्वावर भवानी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची पहाटे ४ वाजतापासूनच गर्दी होते. बालक, महिला, पुरुष, युवक, युवती दर्शनासाठी भवानी टेकडीच्या मंदिरात गर्दीचा मेळ घालतात.
विदर्भातील शक्तीपीठ १३ - पिंगलाक्षी देवी मंदिर, रिसोड, वाशिम
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात निसर्गरम्य परिसरात असलेले “पिंगलाक्षी देवी मंदिर” एक जागृत देवस्थान आहे. या मंदिराचे बांधकाम हेमांडपंथी होते परंतु जिर्णोध्दारात मुळ स्वरुप लोप पावले. मंदिराशेजारी पिंगलाक्षी देवी तलाव आहे.
विदर्भातील शक्तीपीठ १२ - एकविरा देवी मंदिर, चंद्रपूर
चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात. हीच रेणुका माता चंद्रपुरात आली होती अशी आख्यायिका आहे. त्यातूनच चंद्रपुरात एकविरा देवीचे मंदिर राणी हिराईने बांधले होते. एकविरेच्या मंदिरातही नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
कृतध्वज नामक राजाने हे नगर वसविल्याचा उल्लेख पुराणात आहे. कृतायुगात या नगरीला लोकपूर असे संबोधले जात असे. द्वापारयुगात चंद्रहास राजाच्या आमदानीत या शहराला इंदूपूर म्हणून ओळखले जाई. इंदू म्हणजे चंद्र त्यामुळे इंदूपूरचा उल्लेख चंद्रपूर असाही होत गेला. पुढे ब्रिटिशांनी चंद्रपूरचे नाव चांदा असे सुटसुटीत केले. पण त्याच नावाची अन्य काही शहरे असल्याने नेमकेपणा दर्शविण्यासाठी चांदाचा उल्लेख चांदागढ अर्थात चांदाफोर्ट असा होऊ लागला. याच चांद्यात विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी एक असणारे आराध्यदैवत देवी महाकाली आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे रेणुकादेवीचे माहूर. महाकाली देवीची ती मोठी बहीण म्हटल्या जाते. महाकालीसोबत रेणुका ही चंद्रपूरला आली होती. येथे ती काही दिवस राहिली आणि बहिणीकडून मानपान घेऊन आपल्या लवाजम्यासह माहुरात परत गेली. रेणुका देवीचे चंद्रपुरात आगमन झाल्याची खूण म्हणून राणी हिराईने येथे स्वतंत्र मंदिर बांधून तिची स्थापना केली. पुढे या नावात अपभ्रंश झाल्याने ती एकविरा या नावाने चंद्रपुरात प्रसिद्धीस आली. चैत्र पौर्णिमेस महाकाली देवीस अहेर अर्पण करण्याचा विधी आटोपल्यावर यात्रेकरू रेणुका देवीकडे येतात.
विदर्भातील शक्तीपीठ ११ - रेणुका माता मंदिर, पिंपळगाव राजा, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अस्तित्वात असलेले श्री रेणुका मातेचे मंदिर हे हजारो वर्षांपुर्वीचे पुरातन मंदिर. हे मंदिर एक रहस्यमय असून पुर्ण दगडात कोरलेले मंदिर आहे. मंदिराची कलाकृती ही फार वैशिष्ट्य पुर्ण असून हे मंदिर जमिनीच्या आत कोरलेले आहे. यात मोठ- मोठी भुयारे या मंदिरात आढळतात. मंदिराच्या शेवटच्या टोकाला असलेले पाण्याचे कुंड येणार्या भाविकांचे लक्ष केंद्रित करते. या मंदिराला आत मध्ये जाण्यासाठी एकमेव रस्ता असून आजपर्यंत भुयाराचे दुसरे टोक सापडले नाही. हे मंदिर जमिनीच्या आत २०० फुट खोल आहे. नवरात्रात याठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.
याठिकाणी नागपूरचा मुधोजी महाराज येऊन गेले होते व जे भुयारी मार्ग पहायला मिळतात ते त्यांनीच तयार केले असावेत असे गावकर्यांकडून सांंगितले जाते.
या
मंदिराचे भुयारात जाताना पहिल्याच पायरी वर मोडी भाषेत शिलालेख लिहिला
आहे...........या मंदिराचा इतिहास खामगाव तालुक्यातील स्थापत्य पुस्तकात
केला आहे.
विदर्भातील शक्तीपीठ १० - रेणुका माता मंदिर, मुळावा, यवतमाळ
विदर्भ व मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली उमरखेड तालुक्यातील मुळाव्याची रेणुकादेवी माहूरच्या रेणुकेची प्रतिकृती आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या ठिकाणी नवरात्रात शेकडो भाविक दर्शनासाठी येथे येत आहेत. रेणुकामातेबाबत परिसरात एक आख्यायिका सांगितली जाते. दंडकारण्यातून परशुराम आपल्या आईची कावड घेऊन निघाले. मुळावा येथे त्यांनी रेणुकामातेची कावड ठेवली असता आकाशववाणी होऊन येथून १२ कोस अंतरावर कोरी भूमी
आहे. त्या ठिकाणी परशुरामाने रेणुकामातेच्या मंदिराची स्थापना केली. मुळावा या ठिकाणी कावड ठेवल्यामुळे देवीचा मूळ वास या ठिकाणी आहे. त्यावरूनच या गावाला मुळावा असे नाव पडले असावे.
माहूरगडाला जाताना पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातील भक्त प्रथम रेणुकामातेचे दर्शन घेऊन नंतर माहूरकडे जातात. बाबासाहेब पुरंदरे यांनी ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी भेट देऊन येथील शिलालेखाचे वाचन केले. येथे एक पुरातन प्रतिमा आहे. मुळावा येथे रेणुका मातेच्या मंदिरात ही मुर्ती विराजमान आहे. ही मुर्ती कीती पुरातन आहे ह्या विषयी कोणाला कल्पना नाही परंतु १९९० मध्ये इतिहास तज्ञ श्री बाबासाहेब पुरंदरे मुळाव्यास आले तेव्हा त्यांनी ही मुर्ती ई.स. ११०० पूर्वीची आहे असे सांगितले. येथील भक्त तुळजाभवानी म्हणून ह्या मूर्तीची पुजा अर्चना करतात परंतु हातातील असणारे आयुधे पाहता ही मूर्ती कुठल्या देविची असावी हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार अहल्याबाई होळकर यांनी केल्याचा उल्लेख आहे, अशी माहिती त्यांनी व्यवस्थापक मंडळाला दिल्याचे संस्थानचे सदस्य रामभाऊ पाठक यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवात या ठिकाणी नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, कीर्तन तसेच सायंकाळी आरती केली जाते. नऊ दिवस सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रमही असतो. पैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या मुळावा येथील रेणुकादेवीच्या सभोवती चार एकराचा रम्य परिसर आहे. समोर पुरातन काळातील बारव (विहीर) आहे. मंदिराच्या पायथ्याशी भक्त निवास बांधलेले आहे. देवीचा उत्सव येथील पाठक मंडळी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विश्वस्तांमध्ये असलेले सर्व सदस्य तन्-मन्-धनाने कार्य करतात. नवरात्र उत्सवात येथे भक्तांची मांदियाळी दिसून येते.
मंदिराच्या चोहोबाजूंनी चिरेबंदी भिंती आहे. मुळावा येथील पुरातन असणाऱ्या गावाच्या वेशीमधून प्रवेश करावा लागतो. देवीच्या पाठीमागे भव्य सभागृह असून गावातील तसेच बाहेरगावातील भक्तमंडळींनी लोकवर्गणी करून या भव्य सभागृहाचे काम पूर्ण केले आहे. धार्मिक उत्सवाच्या कामामध्ये येथील देशमुख परिवार तसेच समस्त गावकरी सहभाग घेत असतात.
विदर्भातील शक्तीपीठ ९ - मुऱ्हादेवी संस्थान, मुऱ्हा, अमरावती
श्री. मुऱ्हादेवी संस्थान हे मुऱ्हा या गावी वसलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. मुऱ्हा हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील एक छोटेसे खेडे आहे. हे अमरावती शहरापासून ६२ किमी. अंतरावर आहे. मंदिराला आठशे वर्षाचा इतिहास असून पौराणिक वैभव आहे. पुण्याच्या पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रा. गुजल यांच्या मूर्ती पाहणीतून देवीची मूर्ती ही तेराव्या शतकातील असल्याची लेखी माहिती संस्थानाला देण्यात आली आहे. हे संस्थान गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला ३ प्रवेशद्वारे आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तगणांना मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करता येतो.
देवीचे मंदिर अतिशय पुरातन आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते कि, या परिसरात असलेल्या मूर नावाच्या दैत्याचा महिलांना खूप त्रास होता. त्याला साखळदंडाने जेरबंद करून देवीने प्राचीन महादेवाच्या मंदिरात असलेल्या विहिरीत त्याला कोंडून ठेवले. ती विहीर व मंदिर अजूनही या परिसरात आहे. दर चैत्र पौर्णिमेला जेव्हा रात्रौ देवीचा गाड्पगाळचा उत्सव होतो तेव्हा हा दैत्य मोठमोठ्या उसळ्या मारतो, असे अजूनही लोक सांगतात. पूर्वी हा संपूर्ण परिसर अरण्यमय होता, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भक्तांना आदिशक्तीच्या दर्शनाकरिता माहूरला जावे लागे. त्या भक्तांच्या सोयीसाठी माहूरच्या रेणुकेने रूप अवतीर्ण केले. माहूर->मैहयुर-> मुरहा->मुऱ्हा असा अपभ्रंश सांगितला आहे. अजूनही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी या देवीला मुराई असेच संबोधितात. या ठिकाणच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, मूर्ती पूर्णाकृती आहे. या ठिकाणच्या मूर्तीवर काही ठिकाणी तलवारीचे घाव आहेत. याचा अर्थ मुघल काळात सुद्धा हि मूर्ती होतीच. तसेच या ठिकाणाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सकाळी देवीचे आंघोळ केली जाते. तेव्हा मंदिर पूर्णपाने बंद केले जाते.स्त्रीयांशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हि परंपरा आजतागायत पाळली जाते. देवीसंबंधात माहिती देणारे स्तोत्र,सी. डी. , फोटो उपलब्ध आहेत. श्री संत वासुदेवजी महाराज यांनी लिहिलेल्या स्तोत्रामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचे दैवत- आई जगदंबा प्रत्येक मोहिमेला जाण्यापूर्वी शिवाजी महाराज आपले कुलदैवत आई जगदंबेचे स्मरण करून शिवनेरीच्या मंदिरात पूजन करीत असत. मुर्हादेवी येथील जगदंबा मातेचे स्तोत्र लिहिणाऱ्या स्व. वासुदेव महाराजांनी नमूद केल्यानुसार येथे शिवाजी महाराज आपले सरदार प्रतापराव गुजर यांचेसह दर्शनास आले होते. ऐतिहासिक नोंदीनुसार इ.स.१६७० च्या डिसेंबर महिन्यात प्रतापराव अचलपूर मार्गे कारंजा लाडाची लुट करण्यासाठी कित्येक दिवस परिसरात होते, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
सातपुड्यातील भिल्ल, गोंड, कोरकू हे तिचे खरे भक्तगण आहेत. तसा नागरी मनुष्यांचेही दैवत देवी आहे. मुर-राक्षसाचा या देवीने इथे वध केला म्हणून आख्यायिका आहे. शासकीय राज्यपत्र गॅझेटियर १९६८ चे अमरावती जिल्हा राज्यपत्र पृ. ३७ वे ७५ वर उल्लेख आलेला आहे. अनेक संत पुरुष इथे झाले. रंगपंचमीच्या दिवशी आदिवासी गोंड, कोरकु आपल्या पारंपारिक पद्धतीने देवीची पूजा करतात. झिंग्राजी महाराज येथीलच. नवरात्रात नवदिवस भक्तीगंगेत भिजून जातात. चैत्र महिन्यात एक महिना यात्रा असते.
विदर्भातील शक्तीपीठ ८ - चंडिका देवी मंदिर, काटोल, नागपूर
आजच्या काटोल शहराला ऐतिहासिक संदर्भ आहे. राजा चंद्रहास च्या राजवटीत हे शहर कुंतलापूर (Kuntalapur) या नावाने परिचित होते. शहरात माता चंडिका व माता स्वरस्वती हे दोन पुरातन मंदिर आहे. म्हणूनच कि काय काटोल शहरातील नवरात्री महोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अवतीभवतीच्या गाव खेड्यातून हजारो भाविक देवीची आरास पाहण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी येथे येतात. गल्लो-गल्ली केलेली रोषणाई रात्री रस्ते प्रकाशित करत भाविकांना मोहित करते. देवींच्या ठिकाणी सामाजिक, पौरोणिक उभे केलेले देखावे हे तर भाविकांच्या आकर्षणाचे बिंदू. स्वरस्वती माता मंदिर परिसरात छोटेखानी यात्रा भरते. आकाश पाळणे, रोषणाई, खाद्य, खेळण्यांची दुकाने, ठिकठिकाणी लावलेले लंगर त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत रस्ते लोकांनी गजबजलेले असतात.
(Photo - Ar Satyam Dhoke)
विदर्भातील शक्तीपीठ ७ - भवानी माता मंदिर, मांगली, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मांगली येथे एका टेकडीवर भवानी मातेचे पुरातन मंदिर वसलेले आहे. हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. मंदिराची खूप पडझड झाली असून कसेबसे तग धरून उभे आहे.
(Photo - Laxman Yerojwar)
विदर्भातील शक्तीपीठ ६ - एकविरा देवी, अमरावती
श्री अंबादेवी मंदिराच्या दक्षिणेस एकवीरा देवीचे मंदिर आहे. हजार वर्षांपासून विदर्भाचे महाशक्तिस्थान असलेल्या एकवीरेला श्री अंबादेवीची मोठी बहीण मानतात. येथील महान तपस्वी जनार्दन स्वामी हे एकवीरा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एकदा नदीला पूर आल्याने त्यांना देवीचे दर्शन घेता आले नाही, काही दिवस त्यांना अन्नावाचून राहावे लागले. तेव्हा त्यांना दृष्टांत देऊन अंबादेवीनेच एकवीरा देवीची स्थापना करावयास सांगितल्याची आख्यायिका आहे. येथे येणारे भाविक प्रथम अंबादेवीच्या आणि नंतर एकवीरा देवीच्या दर्शनाला जातात. या ठिकाणी मोठ्या बहिणीने लहान बहिणीस मान दिला आहे. एकवीरेच्या मंदिराचे महाद्वार पश्चिमाभिमुख आहे. एकवीरा देवी हे रेणुकादेवीचे दुसरे रूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. नवरात्रात येथे यात्रा भरते. नऊ दिवस कार्यक्रमांची येथे रेचलेच असते.
देवीचे स्थान -
नागपूर- मुंबई रेल्वेमार्गावर बडनेरा स्थानकापासून १० किमी अंतरावर अमरावती शहर आहे. बडनेराहून अमरावतीला येण्यासाठी एसटी व रिक्षाची सोय आहे. मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध असून नागपूर-अमरावती अंतर १५५ किमी आहे. नागपूरहून एसटी वा खासगी बस आहेत. एसटी स्थानकापासून दोन किमी अंतरावर श्री अंबादेवी मंदिर आहे. बसस्थानकापासून ऑटोरिक्षा उपलब्ध आहे. मंदिरात राहण्याची सोय आहे.
विदर्भातील शक्तीपीठ ५ - अंबादेवी, अमरावती
अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी जोडला जातो.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वर्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदूमंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यांत अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने व काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.
विदर्भातील शक्तीपीठ ४ - भवानी माता मंदिर, कायर, यवतमाळ
कायर गावाच्या पूर्वेकडे पिंपरी रोड ला असलेले भवानी मातेचे मंदिर छोटी टेकडी वर हे मंदिर स्थित आहे. इथे भवानी मातेची तेजपुंज मूर्ती आहे. बाहेर एक भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे. ती काही वर्षांपूर्वी खोदकामात सापडली. बाहेर कंबरेच्या वरचा भाग आहे अशी अर्धंदेहिक मूर्ती आहे. मंदिराच्या पायऱ्याच्या सुरवातीला घोड्यावर बसून स्वार असलेल्या एक सैनिकाची फक्त धड असलेली मूर्ती आहे.
(फोटो आणि माहिती - Amit Upadhye)
विदर्भातील शक्तीपीठ ३ - जगदंबा मंदिर, ठाणेगाव, वर्धा
६०० वर्ष जुने श्री जगदंबा मातेचं मंदिर नागपूर अमरावती रोड वर असलेले ठाणेगांव येथे आहे, हे मंदिर १३ व्या किंवा १४ व्या शतकातील असावे मंदिराची बांधणी हेमाडपंथी असून सुशोभित कला आणि मंदिराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते. येथे भाविक मातेचा आशीर्वाद घेण्या करीत फार दुरून येतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचे भक्त मंडळींनी सांगितले.
विदर्भातील शक्तीपीठ २ - भवानी माता मंदिर, भटाळा, चंद्रपूर
भटाळा नजीकच्या माळरानावरील भवानी मंदिर तर खूपच विलोभनीय आहे, मंदिराच्या भिंतीवरील कोरीव शिल्पे अतिशय आकर्षक आहेत. गावाला अनेक टेकड्यांनी वेढलेले आहे, त्यांच्यावर भटकंती करताना असंख्य मुर्त्या, गुहा दृष्टोत्पत्तीस येतात. गावातील घरे, मंदिरे एका अजब प्रकारच्या तांबूस पिवळसर दगडांनी बनलेली आहेत. येथील रानोमाळ हिंडताना ठायी ठायी हा दगड दिसून येतो. राजस्थानमधील माउंट अबू च्या परिसरातील दगडाशी याचे साधर्म्य जाणवून येते. गावाच्या जवळच एक फार मोठा तलाव आहे, पक्षीनिरीक्षकांसाठी या ठिकाणी भेट देणे एक पर्वणीच ठरू शकते. इतक्या विविध प्रकारच्या पक्षांनी हा जलाशय सायंकाळच्या वेळी गजबजून जातो.
भवानी मंदिर भटाळा - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या सुमारे ३००० वस्तीच्या गावात अत्यंत प्राचीन हे महालक्ष्मीचे मंदिर आहे. चिमूर रोडवर सालोरा फाट्यापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव इ.स. ४५ व्या शतकापासून अस्तित्वात होते हे येथील शैलग्रह व शिल्पावरून कळते. अश्मयुगीन मानवाचे हे स्थान होते असे पुरातत्वीय गणवेषणात मिळालेल्या पाषाणावरून कळते. हेन्री कझीन्स यांनी महाभारतात उल्लेखलेल्या भद्रावती नगरीचा एक भाग आहे असे म्हटले आहे. त्याला रायबहादुर हिरालाल यांनी मान्यता दिली आहे. परंतु आजच्या येथे मिळणाऱ्या पुरावेषावरून हा इतिहास अश्मयुगाच्याही पलिकडे जातो. भवानी मंदिर आजही चांगल्या अवस्थेत आहे. याचा मंडप शुदमंडप असून मोठा आहे. दोन्ही बाजुस कक्षासन आहे. मध्यभाग गोलाकार अष्टकोनी आणि त्यानंतर कुंभाची रचना आहे. अशाप्रकारचे मंदिर अत्यंत दुर्मिळच आहे. गर्भगृहात भवानी देवीचे शिल्प असून शेंदूर लिंपित आहे. गणेशपट्टी आहे. देवीचे रुप देखणे आहे. रुप, अत्युध आणि अन्य अलंकाराने स्पष्ट दिसत नाही परंतू शिखरावर शुकानारी युक्त नागर शैलीचे आहे त्यावर आमलक व कळस आहे. गर्भगृह हे दक्षिणेत असून प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. मंडप कक्षासनयुक्त आहे. मुख्यद्वार उत्तरेस व दुसरे पूर्वेस आहे. अनेक देवताच्या कोरीव प्रतिमा आहे. हे मंदिर इ.स. ११-१२ शतकातील असावे. महालक्ष्मीची कमान आहे. त्यामुळे हे महालक्ष्मीचे देऊळ आहे. नवरात्र, चैत्रात दर मंगळवारी यात्रा भरते. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
(फोटो आणि माहिती - अमित भगत)
विदर्भातील शक्तीपीठ १ - कमळजा देवी मंदिर, लोणार सरोवर, बुलढाणा
हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला तीन मुख आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. देवीचे अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. मध्ये स्तंभ नाहीत. देवी मुखवट तांदळासारखा आहे. तिचा आकार माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणामध्ये यास पद्मावती देवी संबोधले आहे. अनेक ऋषी-महंतांनी व संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. पापनाशिनी गंगाभोगावती धारेखाली स्नान करुन श्री कमळजादेवीची अनेकांनी आराधना केली आहे. श्री कमळजादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देखणी आहे. समोर यज्ञकुंड आहे. अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करुन देणारी ही देवी आहे. शक्तिस्वरुपिणी, वरदायिनी श्री. कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन आहे. पूर्वी तेथे दीपमाळ होती. श्री. प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना या देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते, असे लोकमत आहे. मारुती चितमपल्ली यांच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे हे मंदिर हेमाडपंथी आहे. तेलपाणी दिल्यावर, दिलेल्या काळ्याशार पार्श्वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या ऑयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहे, हे त्यांच मत खरं आहे. मेहकरच्या बालाजी मंदिरापलीकडे एक जुनाट वाडा उद्धवस्त अवस्थेत आहे. तो कंचनी वेश्येचा महाल. तिला लोणारच्या कमळजादेवीसमोरील दीपमाळेची ज्योती रात्री बघायच्या होत्या. त्यासाठी उंच महाल बांधायला सुरुवात केली. शेवटचा मजला चढला, असता तर कंचनीला दीपमाळेच्या ज्योती दिसल्या असत्या. तिची अपार श्रद्धा श्री कमळजादेवीवर होती.
।। जय कमळजा माता।।
पुरातन मंदिरांच गाव - चांडोळ, ता. जि. बुलढाणा
चांडोळ
ह्या गावाला पूर्वी चंपावती नगर म्हणूनही ओळखले जायचे हे गाव बुलडाणा
शहरापासून ३६ की अंतरावर आहे. ह्या चांडोळ गावाची ओळख पूर्वी मंदिरांचं गाव
म्हणून एके काळी होती. चांडोळ गावात हेमाडपंथी शैलीत बांधलेले काळ्या
पाषाणातील एकूण ४ मंदिरं आहे.
१) नृसिंह मंदिर :
राज्यभर
नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात
चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर ह्या चार ठिकाणी नृसिंह मंदिर आहेत. नृसिंह
अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध
चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच
विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
मंदिराच्या
दर्शनी भागावर एक अतिशय दुर्मिळ अशे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प कोरलेले
असून असे शिल्प कदाचितच एखाद्या मंदिरावर असावे. सभामंडपातील खांबावर काही
देखनिय शिल्प कोरलेले आहे. ह्या नरसिंह मंदिरात तीन गर्भगृह असून दोन
गर्भगृहात शिवलिंग तर मुख्य गाभाऱ्यात भगवान नरसिंहाची मूर्ती आहे.
गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती प्राचीन सिंहरूपातील हिरण्य कपशुचा वध
करतानाची आहे. वेरूळच्या १५ व १६ व्या क्रमांकाच्या लेण्यांत
नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. हे मंदिर आजही चांगल्या
स्थितीत असून मंदिरात आल्यावर आपल्याला अत्यंत शांतता जाणवते.
२) खोलेश्वर किंवा खोल महादेव मंदिर :
ह्या
मंदिराचा गाभारा जमिनीत खोलवर असल्यामुळे ह्याला कदाचित खोल महादेव हे नाव
पडले असावे मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर काही देवी देवतांची
शिल्प आहे.
गाभाऱ्यात
उतरण्यासाठी पायऱ्या एकदम सरळ असल्यामुळे आपल्याला सावकाशच खाली उतरावे
लागते गाभाऱ्यात एक मोठे शिवलिंग असून आतमध्ये आपल्याला गारवा जाणवतो.
मंदिराचे बांधकाम बाहेरून अर्धे दगडात तर अर्धे विटात केलेले आहे. मंदिर परिसरात अनेक शिल्प तुटलेल्या अवस्थेत आहेत.
३) गढीतला महादेव मंदिर :
चांडोळ
येथे असलेल्या ४ हेमाडपंती मंदिरांपैकी हे एक मंदिर. सध्या खुप दुरावस्था
झालेली आहे. स्थानिक सोडले तर इतर लोकांना येथे मंदिर आहे कळणार सुध्दा
नाही. एका गढीच्या भिंतीला लागून हे मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला गढीचा
महादेव म्हणतात. जवळच एका पत्र्याच्या मंदिरात एक विरगळ आहे.
४) महादेव मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर :
चांडोळ
हे एक ऐतिहासिक गाव आहे. येथे एक पुरातन गढी होती. गावाला वेस (दरवाजा)
होती. दरवाज्याची एक भिंत अजून उभी आहे. येथे असलेल्या गढीच्या वर दोन भव्य
हेमाडपंथी मंदिरे होती. एक महादेवाचे तर दुसरे महालक्ष्मीचे मंदिर होते.
आता गढी पुर्णपणे नष्ट झाली आहे आणि त्यावरील पुरातन मंदिरेही उध्वस्त झाली
आहेत.
























































































































































































































































































































































































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.