Monday, December 11, 2023

मराठ्यांच्या रामभक्त सेनापतीची रघुजी भोसले समाधी

 https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2022/03/blog-post_65.html

 








मराठ्यांच्या  रामभक्त सेनापतीची रघुजी भोसले समाधी




मराठ्यांच्या पराक्रमी सरदारात ज्यांनी स्वराज्यातून साम्राज्य उभे केले त्यातील नागपूरकर रघुजी भोसले अग्रणी म्हणावे लागतील. इ.स. १७४० ते १७५१ या बारा वर्षांत रघुजींनी स्व पराक्रमाने बंगालवर मुर्शिदाबादेवर बऱ्याचदा अनेक स्वाऱ्या करून बंगालचा पश्चिम भाग व ओरिसा हे प्रदेश जिंकले. मीर हबीबला हाताशी धरून अलिवर्दीखानावर वचक बसवला. रघुजीराजांचा अंमल वऱ्हाडपासून ओडिसापर्यंत आणि गढा मंडलापासून चांद्या पर्यंत पसरला होता. रघुजींचे स्वभावदर्शन आपल्याला वाचायला मिळते ते असे :-
"रघुजी बुवा शिपाई दोस्त. एक पैसा जवळ न ठेविता तमाम खर्च फौजास देऊन फौजेस रजावंतीने ठेवीत होते व अडचणीचे प्रसंगास कोणासही शब्द टाकिल्यास माघारे घेत नव्हता. व कूच मुक्काम कोणासच कळवू नये. हर वख्त म्हणत असावे 'जे राम करील ते खरे'. जवामर्दी जातीनी करावी. ऐशाराम बिलकूल नाही. घोड्यावरच भाकर खावी..... "
मृत्यूसमयी रघुजींचे वय ६० च्य वर होते.बंगालच्या स्वारीनंतर रघुजींनी हळूहळू राजकारणातून अंग काढायला सुरुवात केली. वऱ्हाडात तेव्हा "दोअमली मुलूख" चालत असे. हुकूमत निजामाची असली तरी चौथाई, सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांकडे होते. निजामाचा त्रास हा नेहमी करीताच होता.त्यात रघुजींचा स्वभाव स्वतंत्र वृत्तीचा. बाजीरावांच्या काळापासून ते नानासाहेबांच्या काळा पर्यंत त्यांचं पेशव्यांशीही कधी पटलं नाही. पुढे शाहू महाराजांनी पेशव्यांना व भोसल्यांना आपापलं कार्यक्षेत्र ठरवून दिलं. शाहू महाराजांची रघुजीवर विशेष मर्जी म्हणून महाराजांनी आपली चुलत मेव्हणी सुकाबाई त्यांना देऊन संबंध अधिक दृढ केले हाेते. शाहू महाराजांच्या या जवळच्या नातलगाला दुखावून चालणार नाही म्हणून पेशव्यांनीही पुढे नमतं घेतलं.
नानासाहेब पेशव्यांनी रघुजींचे मृत्यूचे वर्तमान समजल्यावर लिहिले ...
"(रघुजी भोसले) मातब्बर सरदार होते वाईट गोष्ट जाहली होणार ईश्वर इच्छा प्रमाण अलीकडे आमचे कामाचे फार होते."
रघूजीला पोटदुखीचा आजार होता, 'बाबासाहेबांची प्रकृति बिघडली तेव्हां राज्यकारभाराचे कितीएक प्रकार बाबूराव याजला एकांत घेऊन करावे. आज्ञा झाली की, तुम्ही आम्हांस पुत्रवत् आहा, तेव्हा आम्हाजवळ रात्रंदिवस राहत जाणे. श्रीमंत जानोजी भोसले यांनीही जवळ राहावे. या उभयतांस दौलतीचे सर्व कारभार ते समजावून देऊन स. ११६३ फसली साली फाल्गुन शु० ३, श० १६७६, ता. १४ फेब्रु०, स. १७५५ या दिवशी देवाज्ञा झाली. सहा स्त्रिया व सात दासी अशा तेरांनी सहगमन केले. सेनासाहेबसुभा पद जानोजीस व इतरांस कांहीं सरंजाम मृत्युपूर्वी रघूजीने ठरवून पेशव्यांनी ते चालवावे असे कळविलें ; आणि इतर सरदारांप्रमाणे पुत्रांनी राज्याचा उद्योग करावा असे त्यांस कळकळीने बजाविलें'.
मराठ्यांच्या या रामभक्त सेनापतीची समाधी आज बरिच एकांतात आहे. धड दिवाबत्तीची सोय नाही अशी तिची गत आहे. लोकं एकवेळ पराक्रम विसरतील मात्र इथे तर रघुजीराजेंच नावही विसरलेत. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारातून शिरल्यानंतर उजव्या हाताकडे कोपऱ्यात आद्य रघुजींची सर्वात मोठी आणि उंच समाधी आहे. ही समाधी किंवा छत्री ११.५० मी. लांब आणि ११.५० मी. रुंद आहे. प्रत्येक बाजूला पाच त्रिकोनी कमानी अशा एकूण २० कमानी आहेत. ही समाधी पूर्वाभिमुखी असून प्रथम टप्पा चढण्याकरिता पाच पायऱ्या आहेत. २.४० मी. बांधकाम प्रत्येक बाजूस आहे. एकंदर २८ खांब भिंतीत बसविलेले आहेत. मध्यावर मुख्य समाधी आहे. या इमारतीची सर्व बांधणी पूर्णपणे दगडाची आहे. दगड वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. मध्यवर्ती घुमटावर माकडांच्या शिल्पाकृती आहेत. हा प्रकार परकीय वास्तूबाबत आढळतो. या समाधीवर बंगालमधील मुस्लिम शिल्पकलेचे प्रतिबिंब पडलेले आहे.
संदर्भ :- १) नागपूर जिल्हा गॅझिटिअर :- भाग :- २
२) मराठी रियासत खंड :- ४
३) नागपुर प्रांताचा इतिहास :- या.मा.काळे
_पृथ्वीराज धवड

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...